“आणि गाढवासारखं खाली मान
घालून मोबाईलचे मेसेजेस वाचत बसू नकोस. इकडे तिकडे बघत रहा” बाबानं मला परत सूचना
केली. “पैसे नीट मोज”
माझ्या कॉलेजला आठेक
दिवसांची सुट्टी होती. घरी आले तर बाबानं नवीन टुमणं काढलं होतं. मी दुकान
सांभाळायला शिकायचं म्हणून. आमची तीन दुकानं. त्यापैकी दोन दुसर्यांना चालवायला
दिली होती. त्यातलं किराणामालाचं दुकान आता बाबानं परत घेतलं होतं. नेहमीचं जुनं
दुकान काढून तिथे बाबाला आता सुपरमार्केट घालायचं होतं. त्याचं रीनोव्हेशनचं काम
चालू होतं. बाबा दिवसेंदिवस तिथंच असायचा. त्याला एकदम मुंबईसारखं चकाचक
सुपरमार्केट मांडायचं होतं. बाहेरूनच दोन-तीन इंटीरीअर आणि आर्किटेक्ट आणले होते. मग
आई कपड्याच्या दुकानामध्ये असायची. “नाहीतरी घरी बसून काय अंडी उबवायचीत”
आता आठ दिवस सुट्टीवर
आल्यावर मात्र बाबानं माझ्यासाठी हुकूम काढला. “तू रोज दुकानावर बसायचं” खरंतर
शाळेमध्ये असल्यापासून मी अधेमध्ये कधीतरी दुकानावर जात होते. पण आता सलग बसायचं ते
पण दुकान सांभाळत म्हणजे वैताग. पण बाबासमोर हल्ली काही बोलणं डेंजर होतं. एकतर तो
सुरूवात करायचा, “तुला मी आजवर काही म्हटलंय का?” शेवटी पोचेपर्यंत माझे झालेले
लाड, केलेलं कौतुक, पुरवलेले हट्ट इतकं सगळं झालं की आई अखेर “तुलाच बघायचं आहे
सर्व. त्याला आता झेपत नाही गं” अशी उत्तरपूजा बांधायची. बाबा शक्य होइल तितक्या
हताशपणे माझ्याकडे बघायचा. या नाटकीपणाचं खरंतर मला हसू यायचं. बाबाला बीपीचा
त्रास होता, असं डॉक्टर म्हणे. म्हणजे नक्की काय होतंय असं मी तीनदा विचारूनही काही
उत्तर आलं नव्हतं.
तिकडे अझरभाईचं काम अगदी
जोशात चालू होतं. गावामध्ये बिल्डिंगची कामं सर्वत्र चालू होती. आमच्याकडे पूर्वी
फ़्लॅटमध्ये राहणारे म्हणजे “कमी दर्जाचे” आणि स्वत: दोन खोल्या का होइना स्वतंत्र
बांधून राहणारे “जास्त” अशी वर्गवारी होती. ती आता पूर्णपणे उलटी झाली होती.
आमच्या कॉलनीमधल्या भोसल्यांनी शाळा लांब पडते म्हणून इथला बंगला विकला आणि
शाळेजवळ फ्लॅट घेतला. “सर्व सोयी आहेत हो. पाण्याचा त्रास नाही. शिवाय आपलं आपण
रहायला बरं, इकडच्यांसारखे नाक खुपसणारे कोणी नाही” भोसलेकाकू आईला सांगत होत्या.
मुळात आमच्या भागात पाण्याचा काही त्रासच नव्हता. प्रत्येकाच्या घरामध्ये सर्व
सोयी होत्याच. शिवाय जितक्या पैशामध्ये फ्लॅट आला तितक्या पैशांत घर रीनोव्हेट
झालं असतं. भोसलेकाकू स्वत:च सर्वांच्या भानगडीत नाक खुपसत असल्याने त्यांना या
गोष्टीचा श्रीगणेशा त्यांच्या बिल्डींगमध्ये लवकरच करायचा असणार.
पण एकंदरीत या बिल्डिंग
बूमचा अझरभाईला फायदा होत होता. आम्हाला काय लोकं जितकी वाढतील तितकी दुकानं
चालणार आहेतच की. बाबाचं धंद्यातलं डोकं तुफान चालायचं. मी लहान असताना भारतात
कोकपेप्सी आल्यावर बाबानं सर्वात आधी त्याची एजन्सी घेतली. किराण्याचं दुकान
भाड्यानं दिलं. जिल्हास्तरावर एजन्सी चालवणारा तेव्हा बाबा एकटाच होता. मग हळूहळू
कंपीटीशन वाढत गेली, तसं त्यानं ते काम सोडून दिलं. मग बाबानं कपड्याचं दुकान
टाकलं. आता हे डीपार्टमेंट स्टोरचं त्याच्या डोक्यात घुसलं होतं. गावामध्ये तश्या
कित्येक वस्तू मिळायच्या नाहीत. बाबानं तेच नेमकं हेरलं होतं. “यापुढे गावामधून
कुणीही पुण्यामुंबईला जाताना अमकं घेऊन ये असं म्हणता कामा नये. ड्रीमनीलमध्ये
सर्व सामान मिळालं पाहिजे” बाबा मला सांगत होता. ड्रीमनिल हे नाव त्याला आफताबने
सुचवलं म्हणे. तो आधी स्वप्निल स्टोअर्स असे नाव ठेवनार होता. पण आफताब म्हणाला होता.
“ड्रीमनिल जास्त कॅची वाटतंय” कॅचीच्या आयचा घो. नशीब ब्लूड्रीम्स असं नाव सुचवलं
नाही. माझ्या नावाचा पार बट्ट्याबोळच.
तर बॅक् टू आपला आजचा
प्रॉब्लेम. सुट्टीचे दोन दिवस लोळून झाल्यावर एक दिवस सर्व मैत्रीणींना भेटून
झाल्यावर बाबानं आजपासून संध्याकाळी दुकानात बसायचं असा हुकूम काढला.
कितीही वैताग आला तरी आता
नकार देण्यात अर्थ नव्हता. आमच्या दुकानामध्ये काम करणारे शिंदेकाका आणि इतर लोकं
सर्व काही सांभाळत होते. मला फक्त बिलं छापून त्यानुसार पैसे घ्यायचे होते. पण
माझा प्रॉब्लेम भलताच होता. आमच्या दुकानासमोरच केदार स्वीट मार्ट नावाचं एक दुकान
होतं. त्या दुकानाच्या मालकाचं तोंडही बघण्याची
माझी इच्छा नव्हती. खरंतर जवळजवळ दोन वर्षं होऊन गेली होती. मला वाट्लं
होतं की जखमा भरलेल्या असतील. पण दुकानासमोर स्कूटी लावताना सहज त्या दुकानाकडे
लक्ष गेलं आणि परत एकदा संताप संताप झाला. राग केदारचा आला नाही, असा कुणाचाच
स्पेसिफिक आला नाही. पण राग आला हे खरं. दुकानात गेले तर शिंदेकाका समोर बसले
होते.
“तो आता या दुकानात नसतो”
माझा चेहरा वाचत असल्यासारखे ते म्हणाले. “सर्वे भावांच्या वाटन्या झाल्या. त्यानं
दुकानामदून फक्त पैसे घेतले. दुकानाचा वाटा नको म्हनाला. तिकडे शनिपाराजवळ नवीन
दुकान टाकलय. काय ते तुमचे कंपूटर्स आनि मोबाईल्चं”
मी त्यावर काहीही बोलले
नाही. एकीकडे बरं वाटत होतं, किमान तो समोर दिसणार नाही. पण तरी आलेला संताप काही
कमी होत नव्हता. अशी माझी विनाकारण चिडचिड झाली की मला सिगरेट हवी असते. पण आपल्याच
दुकानात बसून ओढणं बरं दिसलं नसतं. आताच आल्याआल्या दुकानाबाहेर पडणंही जमलं नसतं.
दुकानामधल्या एका पोराला
पाठवून मी बबलगम मागवलं आणि चघळत बसले. सहज लतिकाला फोन केला. ती आठही दिवस
हॉस्टेलवर राहणार होती. तिला एक दोन डीझायनरकडून काही मॉडेलिंगचं काम मिळालं होतं.
“कैसी है रे?” मी
विचारलं.
“बिनधास्त! तु बोल”
“यार तेरा व्हेकेशन एकदम
सही चल रहा है. इट्स फ़ोर पीएम. ऍंड यु आर ड्रंक!”
“नही रे. इधर कुछ लोगो से मिलने आयी थी तो वी हॅड अ बीअर. तू बोल. तेरा व्हिलेजमे कैसे टाईमपास होता है रे” मी हसले. लतिकाला आमचं गाव म्हणजे पिक्चरमध्ये दाखवतात तसलं खेडं वाटायचं, माझ्याकडे गेली सात वर्षं इंटरनेट आहे यावर तिचा विश्वास नव्हताच. इतकंच काय माझ्याकडे सात वर्षे पीसी आहे यावर तिचा विश्वास नव्हता. मुंबईदिल्लीवाले आम्हाला अगदीच “खेडूत समजतात”
“नही रे. इधर कुछ लोगो से मिलने आयी थी तो वी हॅड अ बीअर. तू बोल. तेरा व्हिलेजमे कैसे टाईमपास होता है रे” मी हसले. लतिकाला आमचं गाव म्हणजे पिक्चरमध्ये दाखवतात तसलं खेडं वाटायचं, माझ्याकडे गेली सात वर्षं इंटरनेट आहे यावर तिचा विश्वास नव्हताच. इतकंच काय माझ्याकडे सात वर्षे पीसी आहे यावर तिचा विश्वास नव्हता. मुंबईदिल्लीवाले आम्हाला अगदीच “खेडूत समजतात”
“अच्छा टाईमपास होता है. और
बता!”
“कुछ नही. काम का थोडा
टेन्शन है. बाकी सब ठिक” दुकानामध्ये कुणी दोन मुली ड्रेस बघायला आल्या म्हणून मी
फोन बंद केला. दोन्ही पोरींनी तासभर कपडे उचकउचक उचकले आणि काही न घेता बाहेर
पडल्या. त्या दोघी बाहेर पडल्यावर शिंदेकाका सगळे ड्रेस मटेरीअल आवरून ठेवत होते.
“बायको कशी आहे?” मी सहज
विचारल्यासारखा अगदी जेनेरीक प्रश्न विचारला. तुमची बायको कशी आहे?मागच्या वर्षी
तुमच्या मुलाचं लग्न झालं त्याची बायको कशी आहे? पुढच्य आठवड्यात एका कामगाराचं
लग्न आहे त्याची बायको कशी आहे? किंवा
मग....
“बरी आहे. तोच नीट वागत
नाही म्हणे. घटस्फोटाची धमकी देत असतो” शिंदेकाकांना प्रश्न बरोबर समजला होता.
“फक्त धमकी! प्रत्यक्षात
स्वत:हून काही करायची हिंमत नाही काका”
“काय माहित! आमाला आपले
हिकडून्तिकडून समजता. लग्नानंतर कितीतरी दिवस राती घरला यायचा नाही. दारूपन
चिक्कार प्यायचा. शेवटी त्याच्या आज्यानं वाटन्या केल्या. दुकानात लक्षच नाही मनून
पैसे दिले”
“नवीन दुकान टाकलंय
म्हणालात ना”
“होय. पन ते काय हे. तुझे
बाबा कसले माहित आहेत ना. गावकीमध्ये सर्वांना दम भरलाय. कुनी जात नाही त्यच्या
दुकानात. महिन्यातून एकादा ते कंपूटर विकतोय. त्याचं लवक्रच दिवाळं निगनार.”
हे ऐकून मनापासून खूप
आनंद झाला. एखाद्याचं वाईट झालं तर असं हसू नये, पण त्यानं आपल्याच आयुष्याचे इतके
झोल केले असतील तर... तर का आनंद मानू नये. आज जर त्यानं माझयशी लग्न केलं अस्तं
तर या दोन्ही दुकानांचा तो मालक असता.
आणि मी.... मी कदाचित
त्याच्या घरामध्ये आता चहाचं पातेलं गॅसवर चढवत असते. कदाचित एव्हाना मी प्रेग्नंट
झाले अस्ते. नाही, दोन वर्षामध्ये कदाचित
डीलीव्हरी पण झाली असती. मी “आई” झाले असते. घरात लहान बाळ आहे म्हनून दिवसभर
घरातच राहिले असते. बीएससीची डिग्री कशीबशी घेऊन रिकामटेकडे उद्योग करत बसले असते.
नेटवरून रेसिप्या वाचूवाचून घरात प्रयोग केले असते. कदाचित... पण काही झालं तरी मी
आज जितकी खुश आहे तितकी अस्ते का? मी दिवसभर कुणाचाही कसलाही विचार न करता माझ्या
मित्रासोबत मुंबईभर भटकू शकले असते का. गेल्या दोन वर्षामध्ये मी जे काय शिकले ते
नक्कीच शिकले नसते. मुंबईच्या हॉस्टेलमध्ये रात्री दहा अकरापर्यंत लतिकासोबत गप्पा
ठोकल्या नसत्या. लतिका, अखिल, ब्रिजेश सर्वांबरोबर पबमध्ये गोंधळ घातला नस्ता. इतकी
शिकले नसते, स्वावलंबी झाले नसते. माझ्याच चुका माझ्या मीच निस्तरल्या असत्या का?
ओठांवरचं हसू केव्हाच
मावळलं होतं. नक्की काय कमावलं आणी गमावलं याचा हिशोब मनातल्या मनांत चालू झाला
असावा. (दुकानाच्या गल्ल्यावर बसल्याचा परिणाम असावा) पण हिशोब कितीहीवेळा केला
तरी गमवल्यापेक्षा कमावल्याचं पारडं जरा जास्तच जड झालं होतं.
त्या रात्री बाबाचं जेवण
झाल्यावर त्याला म्हट्लं गच्चीवर फेर्या मारूया. आई तिची कसली सांसबहू सीरीयल बघत
बसली होती. “बाबा, तुला एक रीक्वेस्ट करायची आहे.”
“बोल ना निल्या. काय
हवंय?”
“काही नकोय. शिंदेकाकांनी
आज मला केदारच्या नवीन दुकानाबद्दल सांगितलं” बाबा एकदम चमकला. “बाबा, जे व्हायचं
ते होऊन गेलंय. केदार चांगला मुलगा आहे. माझ्याबाबतीत तो जे काही वागलाय त्यावरून
तुला किंवा मला राग येणं स्वाभाविक आहे. पण मला वाटतं झालं तेवढं पुरे आहे. त्याचं
दुकान चालू देत”
“निल्या दुकान चालवणं
म्हणजे काय भेळ करायचं आहे का...”
“मला काय म्हणायचंय ते
तुला चांगलंच माहित आहे. माणूस जेव्हा सगळीकडून मार खातो तेव्हा तो कोलमडतो.
केदारने प्रेमात मार खाल्लाय. धंद्यात पण मार खाल्ला, तर परत कधी उठणार नाही.
त्याला जगू देत.”
“मी काय करू..त्याचं
दुकान आहे, त्याला चालवू देत की!”
“मी तुला काय करायला
सांगतेय ते तुला माहित आहे. प्लीज, माझी रीक्वेस्ट म्हणून”
बाबा चालता चालता थांबला.
“मी त्याला माफ करणार नाही.”
“करूही नकोस. मी तरी कुठे
केलंय. पण मी त्याला आयुष्यातून पूर्णपणे वजा केलंय. तूही तसंच कर. त्याचे आणि
आपले रस्ते कधी क्रॉस झालेच नाहीत असं समज. मी त्याला ओळखतच नाही असं समज.”
“असं समजून जाणं इतकं
सोपं असतं?”
“माझ्यासाठी तरी आहे.
नसलेल्या गोष्टीसाठी कुढत रडत बसण्यापेक्षा ती गोष्ट नाहीच अशी समजूत घालणं फार
सोपं आहे”
“थेट गौरीसारखीच बोलतेस. खूप दिवस मला वाटायचं की तू
माझ्यावर गेलीस. माझ्यासारखीच चिडकी, तुडतुडी. पण अशी पाहिलीस की वाटतं,
माझ्यापेक्षा जास्त गौरीची आहेस. तिचा समजूतदारपणा फार आलाय तुझ्यामध्ये”
“मग माझी रीक्वेस्ट
ऍक्सेप्टेड समजू?”
“पाहू! काय होइल ते होइल”
बाबासोबत गच्चीवर बोलत
असताना कुणीतरी माझ्या तोंडावर बॅटरीचा झोत मारला. पलिकडल्या गच्चीवरून.
“कोणाय?” मी वैतागून
विचारलं. “जादू?”
“जादू की चमची, मी आलोय”
आफताबचा आवाज आला. “उद्या रीझल्ट आहे. विसरलीस?”
>>>>>>>
“काल संध्याकाळी पुण्याला
जाऊन घेऊन आलो” अझरभाई आम्हाला सांगत होता. “उद्या रीझल्ट आहे. काही करून बसला
म्हणजे. आधीच डोक्यात बसलंय की फेल होइल म्हणून” अझरच्या शब्दांमधून त्याची काळजी
जाणवत होती. रात्रीचे बारा वाजत आले होते.
उद्या सकाळी अकराच्या
सुमाराला ऑनलाईन रीझल्ट येणार होता. आफताब अल्मोस्ट रात्रभर झोपलाच नव्हता. प्रचंड
तणावाखाली असला की आफताब व्हीडीओ गेम्स खेळायचा. मी त्याला सोबत म्हणून रात्री दीड
वाजेपर्यंत त्याच्या खोलीमध्ये गेम्स खेळले. वेळेचा खरंतर अंदाजच नव्हता, अखेर,
डोळे पारच गपापा व्हायला लागल्यावर घरी निघाले. “इथंच झोप की.” मी निघाल्यावर तो म्हणाला.
“वेडा आहेस का? तुझ्या
बेडरूममध्ये झोपायला!”
“त्यात काय बिघडतं? तू
बेडवर झोप मी तसंपण एरवी खालीच चादर अंथरून झोपतो.”
“तुझ्या भाभीला समजलं ना
तर तांडव करेल!”
“बरोबर! म्हणजे भाभी नसती
तर तू इथे झोपली असतीस ना?”
“फालतू विनोद नको. चल बाय
गूडनाईट. आणि तूपण झोप आता!” मी दरवाज्याकडे निघाले.
“झोपच येत नाहीये.”
“तुला जर माहित आहे की
पेपर टफ गेलाय, नापास होणारेस तर टेन्शन कशाला घेतोस?” दारावरून मागे वळत मी
विचारलं.
“जा ताई जा. घरी जाऊन
नीज. मला अजून घाबरवू नकोस.”
खरंतर त्यालाच काय मलाही
झोप येत नह्वती. सीएची परीक्षा फार टफ असते (म्हणे) पहिल्याच अटेम्प्टला क्लीअर
करणारे फार थोडे असतात (म्हणे). कित्येकजण
तर फर्स्ट अटेम्प्ट केवळ सराव म्हणूनही देतात (म्हणे). पण आफताबनं मात्र उगाचच इतकं टेन्शन घेतलं होतं.
अझरचं एका अर्थानं बरोबर होतं. रीझल्टच्या दिवशी आफताब पुण्यात एकटा राहिला असता
तर काय केलं असतं क्कुणास ठाऊक, माझ्यासारखा आला दिवस साजरा करायचा त्याचा स्वभाव
नव्हताच. एखादी गोष्ट इतकी मन लावून करायचा आणि ती मनासारखी घडली नाही की पुरता
सैरभैर व्हायचा.
मी त्याच्या खोलीत
राहिलेलं नूरीला आवडलं नव्हतं. मुळात आफताब आलेला पण तिला आवडलं नव्हतं. “इतना क्या रीझल्ट का, सब काम छोडके गये
भाईकेपास” तिनं दोनतीनदा बोलून दाखवलं. आज
संध्याकाळपासूनच ती फार शांत होती. अझरशीसुद्धा फार बोलत नव्हती. बाबा आणि अझर
बहुतेकदा रात्री गच्चीमध्ये प्यायला बसायचे.. आज आफताब आल्याने तो कार्यक्रम झाला
नव्हता, अझर दिवसभर ड्राईव्ह करून आल्याने थकला होता, तो कधीच झोपला.
सकाळी मला जाग आली तेव्हा
नऊ वाजले होते. “उठा. लोकांच्या घरामधली माणसं कामावर गेली. आमच्या घरातले अजून
लोळतायत” आईनं उठल्या उठल्या उद्धार केला. किचनमधून खमंग थालीपीठांचा वास येत
असल्याने मी त्या उद्धाराकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आई म्हणाली की नूरी सकाळीच
माहेरी गेली. तिला म्हणे बरं वाटत नव्हतं. ते जरा बरंच झालं.
अकरा वाजेपर्यंतचा वेळ
आम्ही कसाबसा काढला. आफताब कधीचा उठला होता, पण चहा घेण्याइतपत पण ठीक नव्हता. आम्ही
नाश्ता वगैरे करून टीव्हीवर फ्रेंड्सचे काहीबाही एपिसोड पाहत बसलो. आफताब माझ्या
लॅपटॉपवर दर दहा मिनिटांनी साईट रीफ्रेश करून बघत होता. अजून रीझल्ट अपलोड झाला
नव्हता. अझरभाई आज सगळीच कामं कॅन्सल करून त्याच्यासोबत थांबला होता.
अखेर जोईने नेहमीसरखाच
काहीतरी बिन्डोक जोक केला आणि त्यावर चॅंडलर त्याला काही चिडवत होता तेव्हा अचानक आफताब
ओरडला. “रीझल्ट”
मी आणि अझर दोघंही टीवीकडचं
मुंडकं त्याच्याकडे वळवून बघायला लागलो. इतकं टेन्शन तर माझय डिग्रीच्या फायनलच्या
रीझल्टलापण नव्हतं.
“पास. पास. पास. पास.
इतका कमी स्कोअर, पण पास. ओके, पास” आफताब वाचत होता. अजून कुठे फेल म्हणत नाही हे
नशीब. अखेर तो म्हणाला. “येस्स, सगळे सब्जेक्ट्स क्लीअर. आय ऍन अ चार्टर्ड
अकाऊंटंट! येस्स” त्याबरोबर आमच्या घरात नुसता गोंधळ उडाला. अझरने तर आफताबला
उचलून घ्यायचंच शिल्लक ठेवलं.
आईनं लगेच गोडासाठी शेवयाची खीर केली. बाबा ऑलरेडी दुकानांत गेला
होता त्याला फोन करून निरोप दिला. तो म्हणाला, लगेच घरी येतो. बाबा येताना चार
किलो पेढे घेऊनच आला. कुणी पाहिलं असतं तर त्याला वाटलं असतं की आमच्याच घरात कुणी
इतकी मोठी परीक्षा पास झालंय. आईनं लगेच जेवणाचा मेनू ठरवायला घेतला.
“एक मिनीट काकी, अजिबात काही
करू नका मी बाहेरून ऑर्डर करेन. पण त्या आधी आफताब, उठ. चालता हो. सगळ्यांत आधी
दाढी केस करून ये. रीझल्ट लागेपर्यंतच मन्नत होती ना? आता चल” अझरभाईने त्याला
जवळजवळ ढोसून घराबाहेर काढल्ं. “एक्स्ट्रा पैसे घेऊन जा. तुझं जंगल उडवेपर्यंत त्या
हजामाचा वस्तरा मोडणार आहे, तुझ्याकडूनच वसूल करेल.” अझरनं त्याला चिडवलं.
हल्ली देशामध्ये कायम
इन्टॉलरन्स हा शब्द ऐकू येतो. असहिष्णुता. हिंदूची मुसलमानांबद्दल किम्वा
मुसलमानांची हिंदूबद्दल. हे लोक म्हणे वेगळ्या धर्माच्या लोकांना सहन करत नाहीत.
नक्की कूठे असतात हे लोक. मला खरंच एकदा बघायचं आहे. त्या दिवशी आमच्या कॉलनीमध्ये
जो अखंड कौतुक वर्षाव चालू होता, तो ना
हिंदू होता ना मुसलमान. एका आईवडील नसलेल्या मुलानं एकट्यानं इतकी मोठी परीक्षा
पहिल्या फटक्यात पास केल्याबद्दल वाटणारं कौतुक हे धर्माच्या तराजूत तोलताच कसं
येईल. माझं किवा आईबाबाचं राहू देत, आम्ही आधीपासूनच आफताबसोबत जवळचे होतो, पण
कॉलनीमधली एक व्यक्ती अशी नव्हती की जिने मनापासून आफताबचं कौतुक केलं नसेल. अझरच्या पायाला तर भिंगरी
लागली होती. सगळीकडे पेढे वाटत नुसता फिरत होता. आईनं गोडाधोडासाठी शेवयाची खीर
केली होती, आफताबचा फोन दिवसभर अखंड वाजत होता. यातले किती फोन त्याच्या
“गर्लफ्रेंड्सचा” असावेत याचा अंदाज घेण्यासाठी मी आणि अझरने प्रयत्न केला. “इतक्या
हळू आणि इतक्या प्रेमाने “शुक्रिया” म्हणतोय. नक्की मुलीचा फोन असणार. त्याची अजून
एक गर्लफ्रेंड. काऊंट वाढव.” असं अझरभाई ठामपणे मला सांगत असतानाच आफताबने
त्याच्या हातात फोन आणून दिला. पलिकडे नूरी होती. मी एकटीच हसून हसून वेडी.
अख्खा दिवस इतका मस्त
एंजॉय केला होता. आफताबच्या ज्युनिअर कॉलेजच्या मुलांनी रात्री पार्टी अरेंज केली
होती.
“तूपण चल” केस कापून आणि
दाढीमिश्या सफाचाट करून एकदम मकरंद
देशपांडेवरून सैफ अलि खान बनलेला हीरो मला आज्ञा करता झाला.
“मी कशाला? सगळे बॉय्ज
आहेत ना”
“नाही. काही गर्ल्स पण
आहेत. पण मी त्यासाठी तुला नेत नाहीय. कमॉन. पार्टी आहे ऍंड आय ऍम गोइंग टू गेट
ड्रंक. मला परत आणण्याची जिम्मेदारी तुझी”
“ही काय जबरदस्ती आहे.
अझरभाईला सांग”
“ताई, मी इतकाही मोठा झालो
नाही, की भाई समोर असताना दारू घेईन. शिवाय माझ्या फ्रेंड्समध्ये तो अनकंफर्टेबल
होइल. तू किमान सर्वांना ओळखतेस. कमॉन... प्लीज.”
एरवी तुसडेगिरीची कमाल करणार्या आफताबकडून प्लीज वगैरे ऐकणं म्हणजे
मज्जाच.
आईला विचारलं तर ती
म्हणाली, “जा, पण कार घेऊन जा. रात्री उशीरा स्कूटीवरून येऊ नकोस. आगदीच भिती
वाटली तर बाबाला फोन कर. तो येईल” मी मान डोलावली. रात्री “पिण्याचा” उदात्त कार्यक्रम
ठरवलेल्या आफताबला मी स्कूटीवरून आणायचा विचार केलाही नसता, आणि बाबाला फोन
करण्याइतकी भिती तर मला कशाचीच वाटत नव्हती. “चला, हे पण पोरगं हातावेगळं झालं” आई
मला मध्येच म्हणाली. “किती लवकर मोठे होता तुम्ही. कालपरवापर्यंत एकमेकांसोबत
तडातडा भांडत होता. शाळेत एकत्रच जायचात. दिवस फार लवकर जातात बघ, त्यानं तर गाव
आधीच सोडलं होतं. तूही सोडलंस म्हणा. पण तू काय एम एस्सी झाल्यावर परत येशील. हो
ना?”
“आई, कुणी पाहिलंय?
चांगला जॉब मिळाला तर कोण परत येईल” मी सहजपणे म्हणाले पण आईचा चेहरा एकदम पडला.
“नाहीच मिळाला तर परत यायचं. नेट सेट देऊन इथे गावात लेक्चररचा जॉब मिळेलच. तोही
नाही तर डीएड करेन.” आईला बरं वाटावं म्हणून मी बोलले खरी, पण मी परत गावी येणार
नाही हे तिलाही माहित होतं.
“तू आणि शाळेची मास्तरीण!
पोरं शाळेतून पळून जातील.” मी हसले.
>>>>
आफताबच्या मित्रांनी
पार्टी म्हणजे काय अफलातून बंदोबस्त केला होता. त्याच्या एका मित्राच्याच घरी सर्व
जमलो होतो. मी बहुतेकांना नावानं ओळखत होते, काहीजण शाळेमधले होते काही ग्रॅज्युएशनला
माझ्यासोबत होते. जेवण बाहेरूनच मागवलेलं होतं. इतर सर्व “व्यवस्था” बेस्ट होती.
मला कार घेऊन परत जायचं असल्याने मी एकच बीअर घेतली. मला काही घ्यायची गरजच नव्हती,
इतकी मी खुश होते. आफताबचा रीझल्ट लागला म्हनून नाही. तो पास होणार याची मला खात्री
होतीच.. “पैसे नाहीत” म्हणून मेडीकल इंजीनीअरिंगसारख्या खर्चिक शिक्षणाचा
विचारदेखील न करनारा आफताब वयाच्या बावीसाव्या वर्षी सीए झाला. अरिफ असता तर आज
नाचलाच असता. आफताबला नववीच्या वार्षिक परीक्षेत पहिला नंबर आला तर अरिफच सर्वात
खुश होता. पण आता आरिफ सोबत नव्हता. तरीही तो जिथं कुठं होता तिथं तो नक्कीच
आनंदात असणार.
आदल्या रात्री रीझल्टचं
टेन्शन म्हनून आमचं जागरण झालं होतं. अकरा वाजले तसं मी आफताबला निघूया म्हनून
सांगितलं. तो ऑलरेडी चार पेग डाऊन होता. “पाचच मिनिटं” त्याच्याऐवजी कुण्या
मित्रानं उत्तर दिलं. तितक्यात कोणीतरी भलामोठा केक घेऊन आलं. मग तो केक कापण्याचा
एकमेकांच्या तोंडाला फासायचा खेळ झाला. खरंतर मला ते बिल्कुल आवडत नाही, पण इतक्या
सर्वांच्या मध्ये आपल्या आवडीनिवडी कशाला सांगायच्या? केक कापताना मी कॅमेरा घेऊन
फोटॊ काढायला गेले म्हणजे किमान मला कुणीतरी तेलकट डालड्याचं क्रीम फासणार नाही.
“स्वप्नील,” सगळे परत
आपापल्या जागी गेल्यावर आफताबने मला हाक मारली. “मला घरी सोडशील ना? मी सॉलीड
प्यायलोय”
“लिक्वीडच पितो आहेस. माझं
लक्ष आहे. मी घरी सोडेन. त्यासाठीच तर...” मी त्याला सांगत असताना मध्येच माझं
वाक्य कापत तो म्हणाला. “निधीचा कॉल होता. पुण्याला आलास की भेटू. कॅन यु बीलीव्ह?
जेव्हा मला तिची गरज होती तेव्हा तिला नखरे सुचत होते. मला डिस्टर्ब करू नकोस
म्हणून सांगितलं की लगेच ऑर्कुटवर मित्रांसोबत फोटो टाकत होती. मी ब्रेकप
केल्यावर... आणि आता शी वॉंट्स टू मीट मी... कॅन यु बीलीव्ह दिस?”
“आय थिंक, आपण आता निघू
या. खूप उशीर झालाय. अझरभाई वाट बघत असतील”
“नूरी आली ना संध्याकाळी.
ती एक दुखियारी आत्मा है. यार उसको बोलो, मेरेको वो घरमे कुच नही चाहिये. बेचना है
घर तो बेच दे. किधर बोलेंगे उधर मे साईन कर दू” आफताब कंप्लीट कामातून गेला होता.
त्याच्याच दोन तीन मित्रांच्या मदतीने कारमध्ये बसवला.
“नीट जाशील ना? मी सोडायला
येऊ?” त्यांनी विचारलं.
“नको. घरी पोचले की
त्याच्या भावाला बोलवीन”
“पोचलीस की फोन कर”
रात्री साडेबारा वाजता गावामधल्या
शांत रस्त्यांवरून गाडी चालवताना इतकं मस्त वाट्त होतं. आफताब डोळे मिटून काहीतरी
गुणगुणत होता. रस्त्यावरच्या दिव्यांमुळे रस्त्यांवर प्रकाशाची रांगोळी
काढल्यासारखं झालं होतं. पौर्णिमा आसपास होती, कारण पूर्ण चंद्र कारच्या काचेमधून
चमकत होता. कारचा स्पीड मुद्दामच कमी ठेवला होता. मी इतक्या रात्री याआधी कधी
ड्राईव्ह केल्याचं मला आठवत नव्हतं. काल
रात्री झोपायला उशीर झालाच होता. तरी आज मरगळल्यासारखं वाटत नव्हतं.
घरी आल्यावर मी आई बाबाला
उठवण्याआधीच आफताबच्या घराचं दार वाजवलं. नूरीनं दार उघडलं. आफताब कारमधून उतरून
स्वत:च अडखळत का होइना पण दारापाशी उभा होता.
“सॉरी थोडा उशीर झालाच.
पण.. अझरभाई कुठाय?”
“क्यु? अब वो क्यु
चाहीये? इस यार के साथ दिल भरा नही” इतक्या वर्षांमध्ये नूरीभाभीसोबत पत्यक्ष फार
थोडंच बोलले होते. आफताब जितकं सांगायचा त्यावरून आसले संशय तिच्या मनात कायमच
असायचे.
“रात बहोत हो गयी है. इसे
अंदर लेके जाओ” मी माझा राग कंट्रोल करत म्हनाले. आफताबचं आमच्या बोलण्याकडे लक्षच
नव्हतं. तो माझ्या मागून दाराजवळच्या पडवीमध्ये आला.तिथे एक खुर्ची ठेवली होती
त्यावर बसून तो पायातले शूज काढत होता. तोंडामध्ये मघाशी गुणगुणत असलेलं गाणं अजून
होतंच.
“बाय!” मी म्हटलं तरी
त्याचं लक्ष नव्ह्तं.
“मांबाप ध्यान नही देते
कया? इतनी बडी हो गयी हौ. रातको घूमती है. कुछ बोलते नही?” नूरी परत मला म्हणाली.
मी दुर्लक्ष केलं. दारामधून मागे वळाले. “लोग सही बोलते है. लडकीकी शादी सही उमर
मे ना करादो तो ऐसे छिनाल बनही जाती है” या शिवीनंतर मी फक्त मी माझ्यामनाविरूद्ध का होइना मागे वळून पाहिलं.
नूरी दारातच दात विचकून माझ्याकडे रागानं पाहत होती. हिचं मी काय बिघडवलं होतं देव
जाणे.
तरीही काही न बोलता मी
माझ्या घराकडे निघाले.
घरी गेल्यावर आईनं दार
उघडलं. “किती गं उशीर? जेवणार आहेस का? तुझ्यासाठी बटाट्याची भाजी आणि खीर ठेवली
आहे. गरम करून देऊ?” आईचं नेहमीचं पुराण चालू झालं.
“आई, अजिबात भूक नाही.
दारात स्कूटी नाहीये. का?” मी डोळ्यांतल्या लेन्स काढत विचारलं.
“बाबा घेऊन गेलाय” मी
कॉलेजात गेल्यापासूनच बाबाचं रात्रीचं बाहेर जाणं पूर्ण थांबलं होतं. मी मुंबईवरून
गावी आले तर तो अजिबातच जायचा नाही.. मग आजच कसा काय गेला? मी आईला पुढे काही
बोलणार त्याआधीच बाजूच्या बंगल्यामधून जोरजोरात ओरडल्याचे आवाज ऐकू आले.
खरंतर आत कॉलनीमध्ये
सर्वांना याची सवय झालीच होती. नूरी रात्रीअपरात्री ओरडायची. किंचाळायची. अझरला
वाटेल तश्या शिव्या घालायची. आमच्या सारख्या शेजार्यांचा उद्धारही अधूनमधून
व्हायचाच. सगळेच तिच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करायचे.
पण आज मात्र आवाज ऐकू
आल्याबरोबर मी आणि आई एकदम चमकलो. आता बाजूच्या बंगल्यामधून नूरीच्या नव्हे तर
अझरच्या ओरडण्याचा आवाज पहिल्यांदाच येत होता.
“रात्रीचे साडेबारा
वाजलेत. तसंपण हे हल्ली नेहमीचं आहे. अर्धाएक तास बडबडेल आणि मग शांत बसेल.”
“हो, पण अझरभाईचा
आवाज येतोय. तो का इतका ओरडतोय?” माझ्याच्याने राहवेना. “मी जाऊन बघते”
“नको गं, उगाच
तिला तमाशा करायला निमित्त मिळेल. यतिन एकदा असाच गेला तर त्यालाच नाहीनाहीते
बोलायला लागली. अझरला ते फार अपमानकारक झालं होतं. उगाच तू जाऊन काही होइल. दोघंच
आहेत”
“दोघं कुठे?
आफताब आहे ना, मी पटकन पाच मिनीटांत जाऊन येते” मी बोलत असतानाच नूरीचा जोरात
किंचाळायचा आवाज आला. ते ऐकून मी लगेच घराबाहेर आले. अझरच्या घराचा मेन दरवाजा
उघडाच होता. हॉलमध्ये नूरी आणि अझर उभे होते, आफताब मघाशी खुर्चीत बसला होता तसाच
अजून होता. जे काही चाललंय ते एकतर त्याला कळत नसावं किंवा त्याला झोप लागली
असावी. मी दोनतीनदा आवाज दिला पण त्याने डोळेसुद्धा उघडले नाहीत. मी आलेलं बहुतेक
नूरी आणि अझर दोघांनाही समजलं नसावं. मला इतका अंदाज आला की नूरीने आफताबला घरात
घेण्याऐवजी बाहेर पडवीतच ठेवलं आहे आणि
त्याच वेळी अझरला जाग आल्यानं ही वादावादी चालू झाली होती. काही असलं तरी मी आजवर
अझरला इतक्या संतापलेलं कधीच पाहिलं नव्हतं.
“तुने मुझे क्यु
नही जगाया? तुमको उसको घरमे नही लेना था...”
“क्यु?” नूरी
जोरात चिरकली. “तू दारू पिके आता है. मै कुछ नही बोलती. बीवी होने का फर्ज अदा
करही देती हू. पर उसको मै क्यु घरमे लू? गिरता है तो गिरने दे गटरमे. मेरे घरमे
मुझे ये सब कुछ नही चलेगा. कितनी बार बोला है मैने”
“ये घर सिर्फ
तेरा नही. उसका भी है”
“गलत. ये घर
सिर्फ़ उसका है. मेरा तो ये घर कभी था ही नही. मुझे तो अम्मीअब्बाने सोचके इस गंदी
नालीमे डाल दिया. घरबार मे इमान तो कुछ रखा ही नही. काफीर की तरह रहता है. तुझे
इत्तीसी भी शरम नही आती, वो शराब पिके आये और मै उसकी खार्तीरदारी करू... क्युंकी तू
उसके घर मे रहता है. उसकी अम्मी ने खरीदा ये घर. खुद की हिंमतसे एक चम्मच भी तो
खरीद नही सकता.”
“नूरी. आवाज कम! आज
मैने बहोत सुन लिया. आफताब बहोत बडी एक्झाम पास होके आया है. तुम उसकी तारीफ नही
कर सकती तो कमसेकम इस तरह से उसे घरसे बाहर बंद तो ना करो. मेरा भाई है...
समझी...मेरा भाई और कोई मेरे भाई को कुछ
बोले...” मी इतकं ऐकून निघणारच होते पण माझ्या समोर असलेला आफताब खुर्चीवरून पडत
होता, म्हणून मी त्याला सावरून धरलं.
“पता है” नूरीचा
आवाज आता अल्मोस्ट घोगरा झाला होता. “कैसा भाई है ना मै सब जानती हू. तुम्हारी वो
अम्मी थी ना, मेरे रिश्तेदारी मे थी. सब धंदे मालूम है”
“नूरी, बस्स! अब
एक लफ़्ज मूंह से निकला ना... तो...” अझरभाई नोरीच्या अंगावर धावून आला. त्यानं हात
उचलला पण मारलं नाही. इकडे आफताबने मला इतक्या घट्ट धरलं होतं की मला परत जाताही
येईना. या दोघांच्या भांडणामध्ये मी तिथं आहे हे सांगणार तरी कसं!
“क्या करेगा तू?
करभी क्या सकता है. सच बोलती हू तो मेरा मूह बंद करेगा. बोलो ना... हां!!! भाई है
वो तेरा!! तेरी सौतेली अम्मी तीन महिने पेटसे थी जब उसका निकाह दो बच्चोंके बापसे
जलदी मे करवाया! सगा सौतेला भी क्या तो तुम दोनोंका खून का रिश्ता तक नही”
“नूरी” इतका वेळ
अझर संतापलेला होता, पण आता मात्र त्याच्या नजरेमध्ये आग पेटली होती. “बहोत हो
गया. अल्ला कसम बहोत हो गया. खूप ऐकून घेतलं. माझ्याबद्दल काय वाट्टेल ते बोल.
आफताबबद्दल मी तुला एक शब्द बोलू देणार नाही. त्याचं आणि माझं नातं रक्ताचं नसेल
पण मायेचं आहे. तो माझा भाई आहे आणि राहील. इतके दिवस मी तुझे सर्व नखरे सहन
केलेत. मला नाहीनाही ते बोलतेस. गावभर मला नामर्द म्हणून हिणवतेस. रोज ऐकून घेतोय.
आज ना उद्या सुधारशील या आशेवर राहिलोय...
पण आता शक्य नाही. नूरी.. अल्लातालाला को हाजीर रखकर मी तुला तलाक देतोय. आता या
क्षणी माझ्या घरातून. माझ्या नजरेसमोरून. माझ्या आयुष्यातून कायमची चालती हो.
तलाक. तलाक”
“तलाक!!”
No comments:
Post a Comment