Friday, 19 August 2016

रहे ना रहे हम (भाग १५)

एमएससीचं पहिलं वर्ष केव्हा संपलं ते कळलंसुद्धा नाही. अगदी सुरूवातीला आईबाबाची फार आठवण यायची. मी आईवेडी किती होते. ते मला घर सोडल्यानंतर जाणवलं. लहान असताना आई मला फार बाहेर खेळायला सोडायची नाही. मला झेपत नाही वगैरे कारणं सांगून. तेव्हा बाबा दुपारी जेवायला घरी यायचा, आला की माझ्यासोबत व्हीडीओ गेम्स खेळायचा, पण तो घरी नसला की, आई माझ्यासोबत बसून बिझनेस, चेस, ल्युडो असे खेळ खेळायची. शाळेमध्ये मैत्रीणी होत्या, पण मैत्री फारशी कुणाहीसोबत नव्हती. कॉलेजसाठी घर सोडल्यावर सर्वात जास्त आईची आठवण यायची यात काही नवल नाहीच. मी रविवार एक दिवस सुट्टी असले तरी गावी जायचे. ट्रेनचा प्रवास आवडायचा नाही पण घरी आईला भेटायची ओढ होतीच. अधेमध्ये गेले तर काकूकडे जायचे, पण ती तिच्या कामामध्ये खूप बिझी असायची, तिच्या आणि काकाच्या ड्युटीवेळा पण वेगवेग्ळ्या असायच्या. त्यापेक्षा घरी गेलं की आई वाट बघत असायचीच. बाबाच अधूनमधून कधीतरी ओरडायचा, किती त्रास करवून घेतेस म्हणून. पण मला आईला बघितलं की प्रवासाचं काही वाटायचं नाही. परत निघताना बाबा दरवेळी म्हणायचा, ट्रेनमध्ये बसवून देतो, बसमधेय बसवतो. पण दरवेळी तो मुंबईपर्यंत सोडायला यायचाच.
“निल्या, प्रत्येक वीकेंडला असं यायचं नाही हां. अभ्यास कर. सुट्टीमध्ये महिनाभर यायचंच आहे” बाबा ओरडल्यासारखं करायचा. “मी तेव्हा तुला न्यायला येईन” तरी मी शनिवारी सकाळचं प्रॅक्टीकल संपलं की लेक्चर्स अटेंड करण्याऐवजी स्टेशनवर येऊन घरची ट्रेन पकडायचे. आमच्या गावाला जायला ट्रेनची फ्रीक्वेन्सी बरीच वाढली आहे हे एक बरं झालंय.
शनि रवि हॉस्टेलमध्ये फरसं नसलयने लतिका माझ्यावर एकदोनदा वैतागली. “क्या घर भागती रहती है. इस वीकेंड तूकही नही जायेगी. हम लोग इधरही रहेंगे. पूरा ग्रूप मिलके पार्टी करेगा” तिने एकदा आदेशच सोडला. तरी शनिवारी मी निघणार होते तेव्हा तिने मला अडवूनच धरलं. मग त्या शनिवारी आम्ही सर्वजण पिक्चर बघायला गेलो. नंतर पबमध्ये थोडावेळ मस्ती केली आणि बाहेरच डिनर करून हॉस्टेलवर परत आलो. त्यासाठी आम्ही वॉर्डनकडून लेट नाईट परमिशन घेतली होती. लतिका तिच्या आत्याकडे गेली होती आणि मी काकूकडे. म्हणजे परमिशन फॉर्मवर तसं लिहिलं होतं.
पण माझं गावी जाणं नंतर हळूहळू कमी होत गेलं. कॉलेजमध्ये लेक्चर्स आणि लॅब सेशन्स वाढत गेले. असाईनमेंट्स, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन्स यात खूप वेळ जायचा. सीनीअर्सबरोबर आमचं तसं बरं पटायचं, अधूनमधून खटके पण उडायचे. सीनीअर्सची खरी गरज भासायची ती नोट्ससाठी, पण मी या बाबतीत माझाच फंडा चालू ठेवला होता, आफताब-स्टाईलने आपल्या नॊट्स आपणच काढायच्या. कॉलेजमध्ये आल्यावर मी आईला जितकं मिस केलं तित्कंच माझ्या कंप्युटरलाही मिस केलं. इंटरनेट कॅफेमध्ये तासावर पैसे देऊन कंप्युटर वापरताना मला माझ्या रूममधला पीसी आठवायचा. माझ्या पीसीवर बसून मी सलग तीन चार तास गेम्स खेळायचे. क्वचित कधीतरी आफताब सोबत पिक्चर पाहणं व्हायचं. पण घर सोडून आल्यावर मला त्या पीसीचीच सर्वात जास्त आठवण यायची. दिवाळीला मी बाबाकडून लॅपटॉप घेतला.
आमच्या ग्रूपमधला सौरभ माझ्यामागे जरा जास्तच लागला होता. त्याचा सब्जेक्ट फिजिक्स होता, त्यामुळे एरवी कॉलेजमध्ये कधी दिसायचा नाही पण लायब्ररीमध्ये हमखास भेटायचा. काही मुलांना आपण फर मोठे सेक्स मॅग्नेट आहे आणि पोरी आपल्यावर बघताक्षणी फिदा होतात असा एक माज असतो. सौरभ त्यातलाच. दिसायला छान होता, स्टायलिशही होता, पण मला फारसा काही भावला नाही. सतत त्याचं ते किलर लूक्स द्यायचे प्रयत्न करणं फार बोर व्हायला लागलं. प्रत्यक्षात ते मला तरी डेस्पो वाटायला लागले. त्याला दूर लोटायला मी बराच प्रयत्न केला, पण तरी तो अधिकच चिपकायला लागला. मग मी शाणपणा करून अखिलशी मैत्री वाढवली. अखिल सुरूवातीला खूप शांत वाटला होता. फारसा कुणाशी बोलायचा नाही. त्याला आय आयटीला जायचं होतं म्हणून तो तयारी करत होता. दोनतीनदा त्याच्याबरोबर मूव्हीला वगैरे गेल्यावर स्पष्टपणे म्हणाला, “मला रीलॅक्सेशन हवंय. खूप अभ्यास करून  ब्रेन थकतो” म्हणून.
हाड!! तोंडावर उत्तर दिलं त्याच्या. च्यायला, मी म्हणजे काय सेक्सटॉय वाटले का? मीच काय, कुठलीही मुलगी त्याला केवळ सेक्सटॉय म्हणून हवी होती. अभ्यासामध्ये लक्ष लागावं म्हणून. कसलीही कमिटमेंट नको. रिलेशनशिप नको. केवळ फिजिकल संबंध हवेत. म्हटलं मला शक्य नाही. सेक्सबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. सेफ सेक्स असेपर्यंत मला काही काळजी नव्हती. पण केवळ मज्जा म्हणून माझ्याच्याने शक्य झालं नस्तं. मला काय कुणासोबत डायरेक्ट लग्न करायचं नव्ह्तं, पण रिलेशनशिपचं एक उबदार कुशन असतं त्याखेरीज केलेल्या सेक्सला काहीही अर्थ नसतो. मी केदारसोबत झोपले कारण, माझं केदारवर प्रेम होतं. अखिलसोबत झोपणार नाही कारण माझं त्याच्यावर प्रेम नाही. ही सर्व माझी तत्त्वं मी गुंडाळून वरच्या माळ्यावर फेकली ती फक्त आफताबसाठीच. आता नाही, पण नंतर!!
हल्ली माझं दर आठवड्याला घरी येणं थोडं कमी झालं होतं. कॉलेजमध्ये अभ्यासाचं वारं वहायला लागलं होतं. दर आठवड्याला एक टेस्ट व्हायची, आणि त्याचे मार्क फायनलला धरणार असं सांगितलं होतं. शिवाय वीकेंडला लतिकाच्या ग्रूपसोबत काही ना काहीतरी प्लान्स ठरायचेच.  गेल्या चार महिन्यात तर मी एकदाही घरी आले नव्हते. मी येणार म्हणून बाबानं फटाके उडवायचेच काय ते शिल्लक ठेवले होते. सकाळी घरी पोचले तेव्हापासून आईला किती बोलू नी काय असं झालं होतं. माझंच घर मला नवीन असल्यासारखी “इकडे ठेवलाय बघ साबण” म्हणून मला माझ्याच खोलीच्या बाथरूममध्ये सांगत होती. आई म्हणजे ना, आईच आहे!
घरी गेल्यावर सकाळ अख्खी मी झोपून काढली. आईनं जेवायला पुरणपोळ्या करेन असं सांगितलं होतं. माझा जीव पुरणपोळ्यांपेक्षा कटाच्या आमटीत जास्त अडकलेला. आई काळा मसाला घालून ती आमटी काय करते! आईनं साडेबारा वाजता हाका मारून मारून मला अखेर उठवलं. जाग आल्याआल्या घरामध्ये मसाल्याचा तो मस्त दरवळ पसरलेला जाणवला. “आईगं! आय लव्ह यु” मी आईच्या गळ्यात पडत म्हटलं.
“होय का? आता आई हवी झाली. चल आटप. भूक नाही लागली का?” मी तोंड वगैरे धुवून स्वयंपाक घरात आले तेव्हा आई पोळ्या लाटत होती. अचानक  जोरजोरात भांडी फेकल्याचा आवाज ऐकू यायला लागला, आमच्या नव्हे शेजारच्या किचनमधून. घरात नूरी असेल, पण ती अशी भांडी का फेकत होती? दोन मिनिटांनी  गडग्यावरून उडी मारून अझरभाई घरात आला.
“ये! गरम पोळ्या करतेय.” आई त्याला म्हणाली.
“कधी आलीस?” माझ्याकडे बघत त्यानं विचारलं. मी आपलं सकाळी आले, मग कॉलेज कसं चालू आहे वगैरे बोलत होतो, पण बाजूच्या किचनमधून येणारे भांड्यांचे आवाज काही थांबले नव्हते.
आईनं जादूला ताट वाढून दिलं. “काकी, स्वप्नीलला द्या की”
“दोनच पोळ्या झाल्यात. बाकीच्या झाल्या की तिलापण देते. तू जेव निवांत. आज काय पराक्रम केला?”
“अर्धा किलो गवारीच्या भाजीत अर्धा किलो मीठ” जादू पुरणपोळीच्या घासावर किंचित फुंकर मारत म्हणाला.
“म्हणजे?” मी न राहवून विचारलं.
“म्हणजे. अशी भाजी कढईमध्ये शिजत होती. त्यामध्ये अर्धा किलो मीठाची पिशवी अशी धरून ओतली. आमच्या बेगमसाहिबांनी” बोलताना जादूने हातातला घास खाली ठेवला.
“काहीही. असं कुणी कशाला करेल?” आफताब नूरीला वेडी म्हणायचा, पण नूरी खरंच मला तशी कधीच वाटली नाही.  
“असंच काय, ती बरंच काही करते. एखाद्याला किती छ्ळायचं त्याला काही लिमिट असावं की नाही? बिचारा नवरा दमून कामावरून येतो, त्याला जेवायचं काही करत नाहीच. वर त्याने स्वत:हून काही करून घेतलं की त्यात असले घाणेरडे प्रकार करायचे” आई नूरीचा सगळा राग पोळीवर काढत असणार. पोळी अगदी टम्म फुगली होती. “सोन्यासारखा नवरा आहे. दिवसभर इकडेतिकडे राबतोय. घरात बाकीचं काही काम नाही. दोन वेळेला शिजवून वाढायचं तर आहे. तेही जमत नाही!” आईनं पोळीला पोळपाटावर आपटून तिच्यातली सर्व हवाच काढली. बोलायच्या नादांत आईनं बहुतेक साधीच पोळी केली होती. पुरण घालायचं विसरली! “हा इतका सांभाळून घेतो म्हणून इतकी शेफारलीये.”
आईनं तरी माझ्या पुढ्यात ताट आणून ठेवलं. “तूप घे गं” मला पुढची पोळी लाटत असताना आज्ञा केली. आता पुरण नसलेल्या पुरणपोळीवर तूप कशाला हवंय?
“भाई, तुला आईनं तूप वाढलंच नाही”
“मी खात नाही.” जादू सहज म्हणाला. “मला नको.”
आईनं परत तीच दोरी  पकडून पुढचा टाका घतला, “बरं, खायचे प्यायचे तरी काय नखरे आहेत का? पोळी भाजी आणि कोशींबीर. याहून दुसरं काही नको. भाजी फळं सगळं खरेदी करून आणतो. ही बाई घरामध्ये फळं अगदी कुजवून मग बाहेर टाकेल, पण त्यानं एक सफरचंद कापलं तरी असा अकांडतांडव करेल की बास्स” एकंदरीत नूरीचा आईला प्रच्ंड राग आलेला दिसत होता. जादूनं मात्र काही न बोलता जेवणं संपवलं. जितक्या सहजतेनं तो जेवायला घरी आला, आणि आईशी बोलत होता त्यावरून हे कदाचित रोजचंच असावं.
“काकी, संध्याकाळी सातनंतर येईन” ताट सिंकमध्ये ठेवून हात धुत तो म्हणाला. “काही आणायचंय?”
“भाजी आणू नकोस. यतिनने चिक्कार आणली आहे, पण जर त्या मारवाड्याच्या दुकानाकडून आलास तर मागे आणलीस ती बेसनाची मिठाई आण. स्वप्निलला आवडेल”
“चालेल, दुध दही आणू का? त्याच्याकडे चांगलं मिळतं”
“दही नको. पनीर आण. स्वप्निलसाठी पालकपनीर करेन. तुझ्यासाठी आलूपालक!”
“ओके. रात्री तुम्ही काही जास्त करू नका. दुपारचं तसं पण फार उरेलसं दिसतंय. रात्री मी काहीतरी लाईट बनवून आणेन..” आई आणि अझरभाई आरामात बोलत होते. मला त्यांच्या या डेली कामाची लिस्ट ऐकायला मजा येत होती. जादू जेवून निघून गेल्यावर आईनं परत नूरीपुराण चालू केलं.
“कैदाशीण आहे नुसती. त्याच्यातर जीवावर उठली आहे. एकदा अशीच माहेरी गेली. जाताना दारंखिडक्या बंद केल्या आणि गॅसचे दोन्ही नॉब चालू ठेवले. नशीब तो घरात आला आणि त्याला लगेच गॅसचा वास आला. नाहीतर काय झालं असतं.”
“पण मग तो कशाला सहन करतोय? सोडून द्यायचं ना...”
“मलाही तेच समजत नाही. याचा चांगुलपणा दरवेळी मध्ये येतो. मागे म्हटलं मी देऊन टाक काय तुमच्यात  तलाक असतो... तर म्हणे, असं करणं ठिक नाही. तिच्या घरचे पण यालाच दोष देतात. पण हिचे प्रकार रोज वाढतच चाललेत. तिला म्हणे याच्याशी लग्न करायचं नव्हतं. शाकाहारी नवरा तिला आवडत नाही. तो सिगरेट दारू पितो हे तिला आधी माहित नव्हतं.”
“आफताब मागे म्हणाला होता की तिला वेडाचे झटके येतात”
“वेडाचे झटके येणारी माणसं अशी वागत नाहीत. ही वेडाचं सोंग घेते. मुद्दाम छ्ळायला बघते. हे घर विकून चिक्कार पैसे येतील, मग फ्लॅट घेऊन राहू या म्हणून त्याच्या मागे लागताना कसे हिला वेडाचे झटके येत नाहीत. घर भाभींच्या नावावर होतं. त्यांच्या पश्चात अझर आणि आफताबच्या नावावर झालं, मग अझर एकटा कसा घर विकेल? तर आफताबला म्हणे, तू सही करून घर सोड.  अझरला म्हणे, तू परत दुबईला जा, तिथे बराच पैसा मिळेल, कशाला स्वत:च्या बिझनेसमध्ये इतके कष्ट घेतोयस? हे सर्व बोलताना हिला वेडाचे झटके येत नाहीत. त्याने डॉक्टरकडे जाऊया म्हटलं की हिचा धिंगाणा चालू. एकदा यानं फोन करून ऍम्ब्युलन्स बोलावली तर ती गाडी पोचायच्या आत ही नॉर्मलवर. मला सगळे नखरे समजतात. नवरा नकोय. दोन वर्षं बाहेर होता, तेव्हा धड राहिलीच की माहेरी. बिचारा इकडे परत काय आला, हिला अवदसा सुचली. माणसानं किती सहन करावं याला काही लिमिट? दया येते मला त्या आईविना लेकराची.”
अचानक त्या क्षणी लख्खकन जाणवलं. आई म्हणजे आता फक्त माझी आई नव्हती. अझर तिला मुलासारखा नव्हता, तर तिचा मुलगाच झाला होता. त्यांचं दोघांचंच अतिशय सुंदर निरागस आणि तितकंच हळवं नातं झालं होतं. आपल्याला भरपूर मुलं असावीत आपण त्यांचं कोडकौतुक करावं अशी आईची खूप इच्छा. पण झाले मी एकटीच. माझं काय कमी लाड केले नाहीत, पण मी मुंबईला गेल्यावर तिच्यासाठी अझर होता. त्यानं तर फार  लहानपणी आई गमावली. नंतर चाची गेल्या. आफताब शिकायला लांब. या गावामध्ये परक्यासारखा एकटाच होता. नूरीच्या या तर्‍हेवाईक वागण्यानं दुखावलेल्या अझरला आईनं आपलं मानलं! मी आईला  सोडून मुंबईला गेले हे तिला मनामध्ये फार खुपलं होतं, वरकरणी तिनं दाखवलं नव्हतं इतकंच. अझर आणि माझी आई दोघं म्हणजे एकाला झाकावा दुसर्‍याला काढावा. बाबाच्या चुका आई माफ करत गेली आणि नूरीचा दुष्टपणा अझर सांभाळत राहिला.  नंतरही दोन दिवस जादू दुपारचा जेवायला आमच्याचकडे येत राहिला. संध्याकाळी कामावरून आल्यावर काहीतरी बनवून घरी घेऊन यायचा. त्या दिवशी स्वत: बनवलेले पोहे मला आणून दिले. “कावळ्याचिमण्यांसाठी वाटीभर पोहे” ठेवलेला अरिफ मला अख्खा दिवस आठवत राहिला. आज अरिफ असता तर... काही नाही तर नूरीला तरी त्यानं गप्प केलं असतंच.
आता एक्झाम जवळ येत चालली होती, प्रॅक्टीकल रीपीट चालू झाली होती. मी आफताबस्टाईलने माझ्या अभ्यासाचं टाईमटेबल बनवून घेतलं.या टाईमटेबलानुसार अभ्यास केला तर मला काहीच प्रॉब्लेम आला नसता. त्याची इंटर्नशिप संपली होती, त्याच्या फायनल परीक्षेचा अभ्यास भलत्याच तयारीनं चालू केला होता. लतिकाला एका मराठी जाहिरातीमध्ये रोल मिळाला होता. त्यामुळे ती भलतीच खुश होती. टीव्हीवर ऎड पहिल्यांदा आली तेव्हा अख्खं हॉस्टेल मेसमध्ये टीव्हीसमोर येऊन बसलं होतं. प्रत्यक्षात चार मुलींच्या गराड्यात लतिका कुठली अहे ते समजायच्या आत कोणतरी जाडी मराठी हिरॉइन आली आणि म्हणाली, “या मुली तुम्हाला हसतात तर तुम्ही लावा आमचं हे मसणं क्रीम. वगैरे वगैरे” तरीपण आम्ही सर्वांनी लतिकाचं जमके अभिनंदन वगैरे केलं. “ही तर सुरूवात असते गं, अशीच हळूहळू कामं मिळत जातात” रूमवर आल्यावर ती म्हणाली.
मला त्यातलं काहीच माहित नसल्यानं मी केवळ मान डोलावली.

>>>>>>

“लतिका हॉस्टेलमध्ये नाहीये” मी वॉर्डनला जाऊन सांगितलं. रात्रीचे अकरा वाजत आले होते. लतिका आज सकाळीच बाहेर पडली होती. कॉलेजला सुद्धा माझ्यासोबत आली नव्हती. नंतर दिवसभर तिचा मोबाईल स्विच्ड ऑफ येत होता. आता जर मी वॉर्डनला सांगितलं नसतं तर पंचाईत माझ्यावर आली असती. लतिकाने लेटनाईट परमिशनसुद्धा घेतली नव्हती.
व‘ओर्डनने तिच्या नोटबूकमध्ये लतिकाचं नाव लिहून घेतलं. नंतर ती जाणे आणि लतिका. रूममध्ये येऊन मी पुस्तक वाचत्बसले होते. रात्री साडेबारानंतर लतिका आली. आली ती एकदम घुश्शातच.
“मॅडमकडे कंप्लींट कशाला केलीस?”
“कंप्लेंट केली नाही. तू रूममध्ये नाहीस हेच सांगितलंय. कुठे होतीस?”
“ते मी तुला कशाला सांगू?” तिनं लाईट बंद केला आणि बेडवर जाऊन झोपली. वॉर्डनने तिला बरंच सुनावलं असणार. मी अंधारातच माझं पुस्तक टेबलावर ठेवलं आणि डोळ्यावरचा चष्मा काढून मी पण झोपले. लतिकाचं वागणं हल्ली अजिबात भरवश्याचं राहिलं नव्हतं. रोज लेक्चर्स चुकवायची. प्रॅक्टीकलला जेमतेम असायची. मागे मिळालेल्या त्या एका जाहिरातीनं तिला कामतर काय फार मिळालं नव्हतं. पण तरीही लतिका अजूनही मॉडेलिंग एजन्सीजचे दरवाजे ठोठावणं काही बंद करत नव्हती.
मला तिच्या या ग्लॅमरमागे लागण्याचं ऑब्सेशनच समजत नव्हतं. लतिका हुशार होती. दिसायला सुंदर होती. घरून बरीच चांगल्या परिस्थितीमध्ये होती. मग आता इतका आटापिटा करायची गरजच काय? तिचं डायेटींगचं फॅड दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. नेटवर कुठून काहीतरी माहिती गोळा करून काय काय प्रकार करायची. मध्यंतरी सलग पंधरा दिवस ती फक्त कलिंगडं आणि लिंबूरस पिऊन राहिली होती. सलोनमध्ये जाऊन कसल्यातरी स्किन ट्रीटमेंट करून घेणे हे नेहमीचेच. “तुझ्यासरखी नॅचरल गोरी स्किन नाहीये”म्हणत वर मलाच टॉंट मारायची. खरंतर लतिकाचा स्किन टोन सुरेख होता. माझ्या चेहर्‍यावर बरेच खड्डेधब्बे होते, तिचा चेहरा मात्र एकदम नितळ होता. हल्ली तिचे आणि माझे असेच कशावरून तरी मेजर खटके उडाल्यावर मी तिच्याशी बोलणं कमीच केलं. आता मला मुंबईत बर्‍यापैकी एकतीनं फिरता येत होतं. सुएरूवातीला आम्ही दोघी रीक्षा करून कॉलेजला जायचो. पण लतिकाचे लेक्चर चुकवणं अति वाढलं, मग मी एकटीनंच जायला लागले. रीक्षाच काय गर्दीचा टाईम नसेल तर मला लोकमध्ये चढता यायला लागलं.
लतिकाने वॉर्डनकडे दोनतीनदा माझी तक्रार केली होती. माझं नाव आधीच “चिडकाबिब्बा” असल्याने वॉर्ड्न मला बरंच ओरडली पण होती. आधी मला खूप राग आला, ही कोण वॉर्डन बाई ओरडणारी? मी वॉर्डनशी पण खूप भांडले.  मगीकदा  मोठाच राडा झाला, तेव्हा लतिकाच येऊन मला वॉर्डनच्या रूममधून बाहेर घेऊन आली. “कंप्ल्लीट मॅद आहेस. वॉर्डन ओरडेल तेव्हा ऐकून घ्यायचं. आपण वर्षाचे एकदम पैसे भरलेत त्यामुले अगदीच काही प्रचंड मोठा राडा केला नसेल तर आपल्याला काय हॉस्टेलवर काढून टाकत नाहीत. पण इतका आरडाओरडा केला तर काढून टाकतील”
तेव्हापासून मी वॉर्डनने बोलावलं की कानात एफ एम् रेडीओचे हेड्फोन खुपसून जायचे. वॉर्डनचं तोंड हलायचं बंद झालं की “शॉरी, दिस विल नॉट हॅपन अगेन” म्हणायचं आणि बाहेर यायचं.
एरवी गायब असणारी लतिका आज नेमकी रविवारी रूमवर होती, आणि आफताबचा फोन आला.
 “तुझा मित्र? तू तर म्हणालीस की तुला कुणी मित्र नाहीत?” उलट चौकशी केल्यासारखी मला विचारत असली तरीही तिला प्रचंड उत्सुकता लागली होती.
“लतिका, नेबर आहे. इकडं मुंबईत काही कामासाठी आलाय तर आईनं त्याच्यासोबत खाऊ पाठवलाय. त्यावरून किती प्रश्न विचारशील?” मी शक्य तितक्या वैतागून म्हटलं. ख्रंतर आफताब पुण्यावरून येत होता. मी एरवी लतिकासमोर आफताबशी फोनवर कधीच बोलायचे नाही. आमचं बरंचसं बोलणं एसेमेस वरच व्हायचं तो  त्याच्या फायनल परीक्षेसाठी बराच ब्बिझी होता. दिवसाम्तून अठरा तास वगैरे अभ्यास करायचा. मागे कधीतरी निधीला फोन केला तर ती म्हणाली की त्याने परीक्षा संपेपर्यंत तिला फोन करू नको असं साम्गितलंय. एसेमेस आणि चॅटींगवर पण नाही.  पण तो दिवसातून दोन तीन मेसेज तरी मला पाठवायचा. क्वचित एखादा फोनसुद्धा करायचा. जास्त नाही अगदी दोन तीन मिनिटं बोलायचा, हे मी निधीला सांगितलं नाही. नाहीतर उगाच परत या दोघाम्ची भांडणं व्हायची आणि खापर माझ्यावर फुटायचं.
आज मात्र सकाळीच त्यानं फोन केला होता. काही कामासाठी मुंबईला आलोय, तुला भेटायला हॉस्टेलवर येऊ का? म्हट्लं ये की. फोनवर बोलून झाल्यावर त्याचा मेसेज आला, मी तुझ्यासाठी स्वीट्स घेऊन येईन. ते आईने दिलेत म्हणून सर्वांना सांग. असाच भेटयाला आलो तर तुला कुणी काही म्हणेल. तो मेसेज बघून मला हसूच आलं. हॉस्टेलमध्ये सरसकट बॉयफ्रेंड भेटायला यायचे.  अर्थात वॉर्डनला सांग्ताना मात्र ते “कझिन्स” असायचे, आफताब मित्र म्हणून भेटला तरी मला काही प्रॉब्लेम नव्हता पण त्यानिमित्ताने त्यानं काही गोड खाऊ आणला तर नको कशाला म्हणा!!
पण आता लतिका ज्या पद्धतीनं मला ईंटेरोगेट करत होती ते फारच इरीटेटिम्ग होतं. स्वत:चा बीएफ़ असताना केवळ माझा मित्र भेटायला आला म्हणून इतकं नाक खुपसून विचारत होती की जणू काही मी आफताबबरोबर पळूनच जातेय. “आफताब म्हणजे मुस्लिम् का? आय लाईक मुस्लिम गाय्ज. दे आर सो क्युट” दोनतीनदा ते म्हणाली. मी आफताबला क्युट म्हणण्याअधी सलमान खानचं लग्न होऊन त्याला पोरंबाळं झाली असतील.

 वॉर्डनने व्हिजीटर आलेत म्हणून निरोप पाठवल्यावर माझ्यासोबत तीपण बाहेर आली. आता इथे खरंतर मला डोळ्यांसमोर निधी प्रकरणाचं रीपीट घडेल की काय याची भिती होती. एक तर आफताबचा काही भरोसा नाही, लतिकाचा त्याहून जास्त भरोसा नाही.  
सुदैवाने, लतिकाने आफताबला पाहिलं आणि लगोलग ती मागे वळाली. मी आफताबला पाहिलं आणि माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. केस विचित्र वाढलेले, दाढी वाढलेली, किती दिवसांपूर्वी अंघोळ केली होती कोण जाणे. अंगातला टीशर्ट जुना आणि ढगळ. त्या टीशर्ट्ला न शोभेल अशी जीन्स. डोळ्यांवर चष्मा होताच, एरवी दिसणारा नीटनेटका आफताब आज अगदी गबाळेपणची कमाल दिसत होता. पण या सर्व गबाळेपणाहीपेक्षा आफताब कसातरी दिसत होता. काही नाहीतरी किमान दहा किलो वजन कमी झालं असेल. डोळे खोल गेलेले, चेहर्‍यावरचा रंग उडालेला.
“काय झालं?” त्याला बघताच मी पहिला प्रश्न विचारला. हातातली पिशवी त्यानं माझ्याक्डे दिली.
“कशाचं?” लांब वाढलेल्या नखांनी गालवरची दाढी खाजवत तो म्हणाला.
“आफताब, सीरीयसली. कसा दिसतोय्स?”
“तुला बाहेर जायला अलाऊड आहे? कॉफी घेऊया?” तो मोबाईलमधला मेसेज वाचत म्हणाला. मेसेज आल्याचा टोन काही वाजलेला नव्हता. होस्टेलच्या खालीच एक छोटंसं हॉटेल होतं. आफताबनंच इडलीवडा मागवला. मी फक्त कॉफी. मघापासून तो बराच शांत दिसत होता.
“कॉलेज कसं  चालू आहे?” अखेर त्यानं विचारलं.
“ठिक! तुझी एक्झाम झाली ना?”
“हो. नेक्स्ट मंथमध्ये रीझल्ट आहे.”
“इतका खराब कशाने झालास?”  
“एक पेपर जाम टफ गेलाय. मी उडणार आहे त्यात”
“रीझल्ट लागेपर्यंत टेन्शन घेऊन उपयोग आहे का? रीझल्ट लागल्यावर मग परत अभ्यास करता..”
“छे! वेड लागलंय का? आता मस्त अभ्यासाचं रूटीन चालू आहे. मी तेच चालू ठेवलंय. नापास होणार हे माहित आहे. मग रीझल्ट लागेपर्यंत दोन महिने उगाच मस्ती करून दिवस वाया का घालवा?”
“चरणस्पर्श करू का तुझे? अरे परीक्षेसाठी इतका अभ्यास केलास, आता थोडे दिवस तरी विश्रांती घे. आरश्यात चेहरा बघ. किती खराब झाला्यस? आणि हे काय, कपडे, दाढी वगैरे? हॉरीबल दिसतोयस”
“असू देना, आपल्याला कुठे थोबाड चमकवायचं आहे. तसंपण मी मन्नत मागितली आहे. जोवर रीझल्ट होत नाही तोपर्यंत दाढी करणार नाही. नवीन कपडे घालणार नाही, आणि आवडीचं काही खाणार नाही”
“सीरीयसली, आणि यामुळे तू पास होशील? नवस मागून?”
“च्क्कक! नवसामुळे मला कायम आठवण राहते की मला अभ्यास करायचाय. आय हॅव्ह टू स्टडी. तुझा चेहरा सांगतोय.. की तुझा यावर विश्वास नाही, पण माझा आहे. मी नुसते नवस मागून बसलो असतो आणि अभ्यास केला नसता तर तू ही रीएक्शन देणं योग्य ठरलं अस्तं. बट आय ऍम वर्किंग हार्ड. सो डोण्ट जज मी”
“जज करत नाहीये. माझा यावर विश्वास आहे की तू सगळे विषय सोडवशील”
“नाही... त्याबाबतीत मात्र मी इतका पॉझिटीव्ह नाही. एक पेपर टफ गेलाय बरं ते असू दे..... स्वप्निल, मी आज पहाटे झोपेतून उठलो... आणि तुला फोन केला. मी भेटायला येतोय म्हणून. कारण माहिताय?”
“तुझं मुंबईत काहीतरी काम होतं म्हणालास ना?”
“नाही. मी फक्त तुला भेटायला आलोय. तुझ्याखेरीज ही गोष्ट अजून कुणाला सांगूही शकणार नाही. स्वप्निल, गेले काही दिवस अरिफ येतोय” बोलताना त्याचा आवाज हळू झाला.
“म्हणजे?”
“अल्मोस्ट रोज माझ्या स्वप्नांत येतोय. बोलत काहीच नाही, पण सारखा मला हाताने माझ्यासोबत ये म्हणून इशारा करतो. आधी वाटलं की अभ्यासाचं इतकं टेन्शन आहे. आठवतं, अरिफ परीक्षा जवळ आली की किती घाबरायचा. बोलून कधीच दाखवायचा नाही, पण मनामधून तो खूप बिचकलेला असायचा... म्हणून कदाचित मलाही तसंच वाटत असेल पण काल रात्री... स्वप्निल, काल रात्री तो चक्क आपल्या खोलीत आला होता. आठवतं, माझ्या घरामध्ये आपण त्याच्याच खोलीमध्ये व्हीडीओ गेम्स खेळायचो. तसा तो आला, माझ्या बाजूला बसला आणि म्हणाला आफताब, असं करू नकोस. सगळी वाट लागेल. त्याक्षणीच मला जाग आली. आय डोंट नो. मला काहीच कळत नाहीये”
“कदाचित, परीक्षेच्या टेन्शनमुळे असेल. अरिफ कितीही दूर गेला तरी तुझ्याभोवती त्याचा जीव घुटमळणार आहे. तुमच्या लोकांमध्ये तुम्ही काय मानता माहित नाही, पण आमच्यात आई म्हणते की माणसाचा ज्याच्यावर जीव असतो त्याच्यासाठी तो  परत येतच राहतो. गेले  वर्षभर या परीक्षेसाठी तू काय काय केलंस... स्वत:ला किती त्रास दिला आहेस. अरिफ जिथं कुठं असेल तिथं हे सगळं बघून त्याला वाईट वाटत नसेल का?”
“माहित नाही स्वप्निल. आमच्यामध्ये याचे काय अर्थ निघतात ते  मौलवींना विचारावं लागेल. कुणाला विचारणार? भाईला तर मी काही बोलणार नाही. यु नो, त्याचे स्वत:चेच किती वांदे चालू आहेत. पण काहीतरी भयंकर घडणार हे नक्की. अरिफ जायच्या आधी मला सारखं स्वप्न पडायचं की आम्ही दोघं गर्दीमध्ये हरवलोय. त्याला सांगितलेलं तर म्हणाला की पिक्चर अझरभाई बघतो अणि तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. अम्मी जायच्या दिवशी तर मला आमच्या पुण्यातल्या घरामध्ये अम्मी अरिफला भरवत बसलेली दिसली होती. तेव्हा या गोष्टींचा कधी इतका विचार केला नाही.. पण हे स्वप्न... धिस वॉज नॉट अ ड्रीम. बाजूला बसलेला अरिफ, त्यानं खांद्यावर ठेवलेला हात हे सगळं काही मला जाणवतंय.”
“आफताब, इकडे माझ्याकडे बघ. स्वप्न असेल किंवा नसेल. पण यासाठी प्लीज तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. रीझल्ट लागेपर्यंत जरा अभ्यासामधून ब्रेक घे.. जमलंतर गावी जाऊन राहा”
“ओह नो. तो विचारपण करणार नाही. तिथे ती चुडैल टपलेलीच आहे. गेलंकी भांड्ते. अल्लाकसम, स्वप्निल! आमच्या घरामध्ये ही बाई फूट पाडूनच राहणार. मी गेल्या कित्येक महिन्यात घरी गेलो नाहीये हे भाईला पण जाणवतंय. तो मला फोन करतो ये म्हणून. तोंडदेखलंच. मनापासून कधीही बोलवत नाही. त्यालाही हिचे सगळे धंदे माहित आहेत. काय करते!!! हिच्यासाठी ना सीरीयसली अरिफ हवा होता. त्यानं बरोबर वठणीवर आणलं अस्तं. स्वप्निल, डू यु थिंक अरिफला काही त्रास होत असेल का? तुला याबद्दल..”
“मला खरंच माहित नाही. पण एक गोष्ट नक्की, अरिफ तुला काही तरी सांगतोय. आपल्या ते लक्षात येत नाहीये. तू नापास वगैरे झालास तरी अजिबात खचू नकोस. नेक्स्ट अटेम्प्ट क्लीअर कर. मनात भलतंसलतं काही आणू नकोस.” आम्ही बोलत असताना वेटर बिलासाठी दोन तीनदा येऊन गेला, पण मला अजून थोडं बोलायचं होतं म्हनून मी दोन कप कॉफी सांगितली.
“एकच कप. मी कॉफी सोडलीये”
“कधीपासून?”
“झंपू, मघाशी म्हणालो नाही का. फेवरेट सर्व काही सोडलंय”
“निधीसुद्धा?” मी चिडवलं.
“निधीने मला सोडलंय. आय गेस, अरिफ मला बहुतेक तिच्याबद्दल वॉर्न करत असणार. म्हणजे दर वेळेला आमचा ब्रेकप होतो, मी भांडतो, ती भांडते, मग प्रत्येकवेळी तिला भेटून, सॉरी म्हणून मी तिची समजूत काढतो. माझंच चुकलं हे कबूल करतो. आणि आमचा पॅचप होतो. याही वेळी आमचं खूप मोठं भांडण झालं. ती पुण्याला माझ्या खोलीवर आली होती आणि तेव्हा... मी एकटा नव्हतो. आय मीन, म्हणजे फार काही..”
“समजलं! आफताब, लाज वाटत नाही कारे? एक गर्लफ्रेंड असताना दुसरीबरोबर...”
“ओह ताई!! काय वाट्टेल ते बोलू नका. दुसरी आली होती पण ती अभ्यासासाठी आली होती.. जेव्हा निधी आली तेव्हा आम्ही सुस्थितीमध्ये..”
“समजलं. पुढे?”
“काय नाही, भांडणं झाली, ती परत गेली. आता मी एक्झाम झाल्यावर मी विचार करत होतो की, तिला जाऊन परत भेटावं.”
“तुझा प्रॉब्लेम काय आहे आफताब? निधीशिवाय करमत नाही का? आणि इतकंच असेल तर मग तिच्याखेरीज इतर कुणासोबत लफडी करतोस कशाला?”
“तिच्यासोबत असताना मी लफडी करत नाही. प्रॉपर ब्रेकप झाला की मगच दुसर्‍या कुणाचा चान्स. प्रॉब्लेम हा झालाय की आमचे ब्रेकपच सारखे होत राहतात. बट आय लव्ह हर. तिच्याशिवाय मी फार दिवस राहू शकत नाही.”
“लक्की आहे ती. इतकं वेड्यासारखं प्रेम करतोस पण तिला कदर नाही” बोलताना आफताबचा मूड बराच हलका झाला होता. आल्या आल्या पाहिलं तेव्हा डोक्यावर मणामणाचं ओझं असल्यासारखा दिसत होता, आता मनापासून मोकळेपणानं हसत होता.
“अरिफभाई म्हणूनच सावधानगिरीची सूचना देत आहेत. असं वागू नकोस, सगळी वाट लागेल. निधीला सोडून दे वगैरे!!! तुला काय वाटतं?”
“पण हे टिपिकल अरिफसारखंच आहे हां! आय मीन, सांगायचंच आहे. सांगण्यासाठी इतक्या लांबून वगैरे येतोस तर स्पष्टपणे सांग की, आफताब, निधीसोबत पॅचप करू नकोस. किंवा आफताब अजून अभ्यास करू नकोस. किंवा आफताब इतका घाणेरडा राहू नकोस. सगळी वाट लागेल”
तो जोरात हसला. “खरंय स्वप्निल, असलं काहीतरी अरिफ बोलला असता तर मी नक्की विश्वास ठेवला असता. आफताब, संडेच्या दिवशी स्वप्निलच्या हॉस्टेलवर जाऊ नकोस. सगळी वाट लागेल”
मग आम्ही दोघंही खूप हसलो. त्याचा अख्खा दिवस फ्री होता, अख्खी मुंबई फिरलो. थोडीफार शॉपिंग केली. पिक्चर पाहिला. पिक्चरमधली हीरॉइन नाईटक्लबमध्ये गेल्यावर चष्मा काढते आणि एकदम “सेक्सी आयटम” होते त्यावर मी बराच वेळ चिडचिड केल्यावर त्यानं सांगितलं. “चष्म्यासोबत ती अंगातला शर्ट पण काढते. मग तर कुणीपण सेक्सी दिसेलच”
“कैपण असतं तुझं. हाच नाही, कितीपण पिक्चर बघ. चष्मा लावलेली मुलगी म्हणजे एकदम बावळट, घरेलू बहेनजी टाईप! का? चष्मेवाल्या मुली चालू, घोटाळेबाज आणि सेक्सी नस्तात का?”
“असतात ना! तू आहेसच की”
“तू मला सेक्सी म्हणतोयस? लाज वाटते?”
“अरे प्रॉब्लेम काय आहे तुझा? सेक्सी म्हटलं तरी चिडते आणि नाही म्हटलंतरी चिडते.”
“मला असल्या स्टीरीओटाईप्सचा वैताग येतो. आय मीन, गांव की मुलगी म्हणजे तिला जगाबद्दल काहीही माहित नसणारच. अभ्यासू मुलगा म्हणजे तो फारच सज्जन असणार वगैरे वगैरे. रीअल लाईफ़मध्ये असं नसतं.”
“रीअल लाईफवर पिक्चर बनवले तर बघणार कोणे? म्हणून तर स्टीरीओटाईप्स चालतात”
यावर आम्ही चिकार वेळ वादावादी केली. अखेर आफताबने मला गिफ़्ट म्हणून तीन चार किलो पुस्तकं घेऊन दिली. दोघांनी मरिन ड्राईव्हवर सनसेट पाहिला. संध्याकाळच्या गाडीने तो पुण्याला परत गेला.
हॉस्टेलवर परत आले तर लतिकाने लगेच विचारलं. “दोनोंही घूमने गये थे ना? नेबर के साथ फ़ुल दिन?? ये चल्ता है क्या?”
“हम तीनों गये थे. मै आफताब और... अरिफ”
दिवसाभराच्या मस्तीमध्ये अरिफ आमच्यासोबत होताच. असणारच, त्याचा जीवच होता आफताबवर. म्हणून तर आताच नाही तर नंतरही कित्येकदा तो आफताबसाठी येत राहिला.
आणि या अरिफला तरी स्पष्ट सांगायला काय होतं... आफताबच्या सीएच्या रीझल्टच्या दिवशी हे कांड घडेल म्हणून....  

No comments:

Post a Comment