Friday, 5 August 2016

रहे ना रहे हम (भाग १४)

साला, ये रूम तो शुरू होनेसे पहलेही खतम हो गया” माझ्या बाजूला उभ्या असलेल्या लतिकाने ही सर्किटस्टाईल कमेंट असली भन्नाट केली की सर्वांना हसू आलंच.
“मेरेलिये ये रूम ठिक रहेगा” मी हसू ओसरल्यावर म्हटलं.
“पागल है क्या? कितना छोटा है. और एक बेड लगेगा तो लोकल के डिब्बे जैसी हालत होगी” कुणीतरी सीनीअर म्हणाली.
“पर यहापे तो एकही बेड है”
“जैसे ऍडमिशन बढेंगे. बेडभी बढेंगे” हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. हॉस्टेल या गोष्टीशी माझा आयुष्यात पहिल्यांदाच परिचय होत होता. आईला तर मी गाव सोडून जाऊच नये असं वाटत होतं. बाबा मात्र खुश होता. आधी म्हणाला की पनवेलचा फ्लॅट भाड्यानं दिलाय, तो रिकामा करून घेऊन तिथं रहा. मग मात्र आईनं तिचा स्टॅंड बदलला, एकटी राहणार असेल तर सरळ हॉस्टेलला राहू देत म्हणून. एंट्रन्समध्ये चांगले मार्क असल्यानं मला कॉलेज एकदम ठिक मिळालं. पण हॉस्टेलला सीट मात्र जास्त नव्हत्या, त्यामुळे तिथं नंबर लागला नाही. शेवटी साहिलने माझ्या चुलतभावानंच हे हॉस्टेल सुचवलं त्याची कुणी वर्गमैत्रीण इथेच राहत होती म्हणे. खरंतर हे वर्किंग वूमन्स हॉस्टेल होतं. पण पोस्टग्रॅज्युएट मुलींना ऍडमिशन मिळायची. शेवटी अख्खं हॉस्टेल फिरून झाल्यावर मला हवी तशी सिंगल अकोमोडेशनची रूम व्यवस्थित मिळणार नाही हे लक्षात आल्यावर मी ट्विन शेअरिंगची रूम घेतली. माझ्याच वर्गात शिकणारी लतिका माझी रूममेट झाली. आमच्या दोघींची लेक्चरस प्रॅक्टिकल सेम असल्याने एकत्र राहिलं की आम्हाला बरं पडलं असतं.
कॉलेज सुरू व्हायच्या आधी घर सोडून येताना मला कसंतरी झालं. मी आजवर याच गावात लहानाची मोठी झाले. बाकीची मुलं अगदी सुटीसाठी आजोळी जायचे, तसंही माझं कधी नव्हतं. मुंबईला काकाकाकूकडे आलं तरी जास्तीत जास्त चार दिवस राहणं व्हायचं. गाव सोडल्यास मला इतर ठिकाणं केवळ टूरीस्ट डेस्टिनेशन म्हणूनच माहित. आता मात्र पहिल्यांदा मी मुंबईमध्ये एकटी राहणार होते.
नातेवाईकांनी, परिचितांनी तथाकथित हितचिंतकांनी मी पुढे शिकू नये यासाठी चिक्कार प्रयत्न केले. आईला काहीबाही सांगून किंवा खोटीनाटी भिती घालून झाली. पण मला माझ्या आईचं एकाबाबतीत फार कौतुक वाटलं, मी घर सोडून जाऊ नये असं तिला वाटत होतं, तरीही मी निर्णय घेतल्यानंतर मात्र तिनं मला खूप सपोर्ट केला. काकू मेडिकलचं सगळं शिक्षण हॉस्टेलमध्ये राहूनच शिकली होती, त्यामुळे हॉस्टेल या विषयावर तिची ऑथोरीटी आईनं मान्य केली. एरवी दोघीजणी महिन्यांतून एकदा फोनवर बोलतील. मी निघायच्या आधी पंधरा दिवस मात्र सकाळ संध्याकाळ फोनवर काहीबाही विचारणं-सुचवणं चालू होतं. साहिल मागच्याच वर्षी आय आयटी खडगपूरला गेला होता. बाबानं त्यालाही फोन करून हॉस्टेल बद्दल महिती विचारून घेतली.
बाबा काय खुश होता! मी बीएससीनंतर पुढे शिकणार या एका गोष्टीनेच त्याला खूप आनंद झाला. काहीही शिकले तरी चाललं असतं त्याला. हॉस्टेलवर जाण्याआधी मला नवीन मोबाईल गिफ़्ट मिळाला. तेव्हाचा साधाच नोकियाचा पीस होता, पण तरी तेव्हा मोबाईलचं काय अप्रूप होतं. ग्रॅज्युएशननंतर पूर्वीने एम बी ए साठी पुण्याला ऍडमिशन घेतली. निधीने पण एमसीएम करण्यासाठी पुण्यालाच ऍडमिशन घेतली. खरंतर तिला मुंबईमध्ये सहज ऍडमिशन मिळत होती, युनिव्हर्सिटीही बदलली नसती पण पुण्यामध्ये तिचे ते “परिचित” होते ना!!
नवीन कॉलेजला येण्याआधी मला खूप भिती वाटत होती. आईबाबाला सोडून राहिले नव्हतेच. त्यात परत एम एससीचा अभ्यास झेपेल की नाही याचीपण साशंकता होती. कॉलेज सुरू झाल्यावर लक्षात आलं की इतकंही घाबरायची गरज नाही. माझे बेसिक्स पक्के होते. आफताबमुळे अभ्यासाची एक शिस्त केव्हाच लागली होती, इतकं काही मला काम कठीण गेलं नसेल. तसे कॉलेजचा पहिला महिना तर मस्तीमध्येच गेला. फ्रेशर्स पार्टी नी काय! एकूणातच गावामधल्या कॉलेजात होतं तसं इथं फार अभ्यासू वातावरण नव्हतं, म्हणजे लेक्चर्स प्रॅक्टिकल वगैरे व्हायची, पण त्याला गांभीर्य जास्त नव्हतं. सर्वात मस्त गोष्ट म्हणजे एक अख्खा मजला भरून लायब्ररी होती, शिवाय भलंमोठं कॅंटीन. माझ्या ब्रेकफास्टची आणि रात्रीच्या जेवणाची सोय हॉस्टेलमध्ये होती, पण दुपारचं जेवण कॅंटीनमध्येच करावं लागणार होतं. इथं चांगले पंजाबी, चायनीझ वगैरे व्हरायटीज उपलब्ध होत्या. एकंदरीत माझी चंगळ झालीच असती, पण झाली नाही कारण माझी रूममेट लतिका होती.
लतिकाचे वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होते. त्यामुळे तिचे दहावीपर्यंतच शिक्षण वेगवेगळ्या राज्यांत प्रांतात झालं. ग्रॅज्युएशनसाठी ती दिल्लीला होती, पण पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मुद्दाम मुंबईला आली. खरंतर तिचा उद्देश मॊडेलिंगमध्ये करीअर करण्याचा होता, पण घरी आईवडलांना सांगायची सोय नव्हती. म्हणून पुढे शिकणे असं कारण देऊन ती मुंबईला आली होती. वास्तविक तिला शेअरिंगमध्ये फ़्लॅटवर रहायचं होतं, पण आईवडलांना तिच्याबद्दल थोडीफार कल्पना असल्याने त्यांनी मुद्दाम हॉस्टेलला ठेवलं होतं. हॉस्टेलचे नियम तसे फार कडक होते. संध्याकाळी सातनंतर इन्फ़ॉर्म न करता बाहेर राहिलं की सरळ पालकांना फोन जायचा. त्यातही लतिका चाप्टरगिरी करायचीच. काही  मॉडेलिंग एजन्सीमध्ये तिने फोटो पोर्टफ़ोलिओ वगैरे दिले होते. असा करीअर ऑप्शन असल्याने लतिका प्रचंड हेल्थ कॉन्शस होती हे सांगायला नकोच. इथेही गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या नियमानं मलाही जबरदस्तीनं हेल्थ कॉन्शस बनाव्ं लागलं. साहजिकच आहे, हातामध्ये मस्त गरमगरम वडापाव असावा आणि आपण पहिला घास घेण्याआधीच लतिकाने वड्याला तेलामध्ये किती ट्रान्सफॅट्स असतात आणि त्याने स्किन कशी खराब होते त्यावर लेक्चर चालू करावं. क्या खाक मजा आयेगा उस वडापावका!!
लतिका रोज सकाळी साडेपाचला वॉकसाठी जायची. बरं जाताना गुपचुप आपली आपण जाईल तर नाही, मलाही उठवून चल म्हणायची. मला खरंतर डोळ्यांवर प्रचंड झोप असायची, तरीही पेंगत पेंगत मी तिच्यासोबत जायचे. तासभर चालून झालं की ती रीफ्रेशमेंट म्हणून कसलातरी आवळ्याकारल्याचा ज्युस प्यायची. मी तसलं काही पिण्याऐअवजी हॉस्टेलच्या मेसमध्ये नाश्ता कराय्चे.
“इतकं चालून आलीस त्या सर्व कॅलरीज वाया गेल्या. इतका तुपकट उपमा खाऊन” मी पहिला घास घेण्याआधी लतिका सुरू होणारच. आता मला तिचा इतका त्रास वाटत असतानाही मी एमएससीची दोन वर्षं तिच्याच सोबत का काढली असा प्रश्न तुम्हाला पडला तर आश्चर्य नाही. असल्या अनॉयिंग मैत्रीणी ठेवायची मला हौसच आहे. आधी ती निधी नंतर गौतमी मग लतिका, आम्ही खूप भांडलो पण मी कधीही रूम चेंज करवून घेतली नाही. लतिकाचा कित्येकदा राग यायचा, खाण्यापिण्यावरून ती टोमणे मारायची तेव्हा जरा जास्तच. पण लतिका केवळ तेवढीच नव्हती. फ्रेंड या शब्दाला साजेशी होती. कॉलेजच्या पहिल्या दोन तीन महिन्यांत मला खूपवेळा होमसिक वाटलं. कित्येकदा आईची खूपच आठवण यायची. रडावंसं वाटायचं पण रडू यायचं नाही. अशावेळी माझी फक्त चिडचिड होत रहायची. हॉस्टेलमध्ये आजही विचारलं तर वॉर्डन मॅडम सांगतील की मॅक्झिमम भांडणांचा रेकॉर्ड स्वप्निलचा आहे. मी प्रचंड हट्टी होते, माझं तेच खरं करायची मला सवय होती. त्यामुळे माझं कुणाशीच पटायचं नाही. अख्ख्या हॉस्टेलमध्ये मी तेव्हा प्रत्येकाशी भांडले होते. चूक माझीच असलीतरी लतिका माझीच बाजू घेऊन भांडायला उतरायची. पण नंतर रूममध्ये आल्यावर माझ्यावर बरसायची.

“किती चिडतेस? तिनं हात धुतले तर तुला काही प्रोब्लेम आहे का??”
“पण मी ब्रश करत होते ना? मग त्याच बेसिनमध्ये....”
“शेअर करायला शिक स्वप्निल. बेसिन तुझं एकटीचं नाहीये. तुझं ब्रश करून होइपर्यंत ती तशीच थांबली तर तिला ऑफिसला उशीर होणार नाही का? प्रत्येकाला घाई आहे. प्रत्येकाला बाहेर जायचंय” लतिका मला प्रेमानं समजवायची. कित्येकदा पटायचं, तर कित्येकदा नाही.
पण सर्वात जास्त मजा यायची ती माझं आणि लतिकाचं भांडण झालं की. आम्ही दोघी दिवसांतून चारदा तरी भांडायचोच. आमच्या वादावादीला कसलंही निमित्त पुरायचं. पण सर्वात जास्त भडका उडायचा तो कॉलेजला निघायच्या आधी!
गावामध्ये असताना आमचा ग्रूप सर्वात जास्त स्टायलिश मुलींचा होता. केदार तर कायम म्हणायचा, तुमचं अर्धं डिस्कशन “काय घालू” यावरच केंद्रित असतं. बाबा मी म्हणेन तो ड्रेस मागवून द्यायचा. अख्ख्या गावात कुणाकडे नसतील अशा फॅ्शनचे कपडे माझ्याकडे होते. पण मुंबईला आल्यावर लतिकाने हा फुगा फोडला, चांगली टोकदार टाचणी लावूनच.
“क्या फिल्मी फॅशन फॉलो करती है?” माझे बरेच ड्रेस बघून ती म्हणायची. “हे रंग तुला सूट होत नाहीत. ही स्टाईल तुला छान दिसत नाही. ही ऍक्सेसरी यावर अजिबात जात नाही. ही बॅग त्या ड्रेसवर किती रॉंग दिसतेय” अशा लतिकाच्या कमेंट्स चालू असायच्या. हॉस्टेलवर येऊन दोन महिने झाल्यानंतर मी तिच्यासोबतच शॉपिंग करायला लागले. तिनं माझा स्टाईल सेन्सच बदलला.
आता खरंतर कुणालाही असं वाटेल की मी गावामध्ये फार साधी वागणी वगैरे होते आणि मुंबईला येऊन एकदम डिवामटेरीअल झाले. बदल असे घडत नसतात.. घडले तर केवळ पिक्चरमध्ये. कपडे बदलले, हेअर कट बदलला, चष्मा जाऊन लेन्सेस घालायला सुरूवात केली फ़्लॅट हील्स जाऊन हाय हील्स आल्या म्हणून मी बदलले का? यापैकी कित्येक बदल गावामध्ये राहिले असते तरी घडलेच असते. घडतही होते. केदारसोबत मोडल्यानंतर थर्ड इयरला आल्यावर मी कॉलेजला जाताना मुद्दाम स्लीवलेस घालायचे. शाळा संपल्यानंतर स्कर्ट कधी वापरले नव्हते पण तेव्हा मुद्दाम स्कर्ट्स घालायला लागले. गुडघ्याइतके स्कर्ट्स् बघून आईपण वैतागायची, पण मी कुणाचं काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हते. ही माझी स्वत:सोबतच केलेली बंडखोरी होती. पण मग मुंबईला आल्यावर नक्की काय बदललं? एक तर निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य मला मिळालं. आणि दुसरं त्याहून महत्त्वाचं घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी घेण्याची अक्कल आली. हे बदल तसे दिसून येत नाहीत पण फार खोलवर रूजलेले असतात.
अगदी पहिले सहा महिने मी बाबाकडे अल्मोस्ट दर आठवड्याला पैसे मागायचे. आई मला फोनवरून ओरडलीसुद्धा. पैसा कसा खर्च व्हायचा तेच समजायचं नाही. बाबाकडे कधीही मागितले की वस्तू मिळायच्या, खाणंपिणं सर्व काही उपलब्ध असायचं. मी आजवर बाजारात जाऊन एकदाही भाजी आणली नव्ह्ती की फळं आणली नव्हती. पैसे मोजून खर्च करावेत असं कधी वाटलंच नाही. पण इथं आल्यावर लक्षात आलं की बर्‍याचदा कॅंटीनचं बिल आपणच देतोय. लतिका क्वचित देते, वास्तविक तिचा बाबा हा माझ्या बाबापेक्षा दुप्पट श्रीमंत होता, पण मी मूर्ख होते त्याचं काय? अखेर कधीतरी माझ्या लक्षात आलं की आपण थांबवणं तर गरजेचं आहे, पण लतिकाला दुखवायचं नव्हतं. मग सरतेशेवटी मी पर्समध्ये मोजूनच पैसे ठेवायला लागले. चव्वेचाळीस रूपयाचं बिल झालं की “इतनाही है मेरेपास” म्हणत मी पर्समधून वीसची नोट काढायचे मग उरलेले पैसे लतिका द्यायची. थोडीफार तरी अक्कल आली म्हणायची मला.
पण लतिका वाईट नव्हती, एके दिवशी सहज तासभर तिनं मला तिच्या प्रेमकहाण्या ऐकवल्या. याबाबतीत ही आफताबची बहीण शोभली असती. आतापर्यंत तिचे सात की आठ बॉयफ्रेंड झाले होते. नववा तर तिनं कॉलेजमध्ये आल्याआल्या पटवला होता.
“व्हॉट अबाऊट यु? तेरा कोइ बॉयफ्रेंड?” तिनं मला विचारलं.
“पागल है क्या? छोटेसा गांव है हमारा. उधर ऐसा कुछ नही चलता.  मैने गर्ल्स स्कूलमे पढाई की. आजतक कभी लडकोंसे बात भी नही की” मी सांगून टाकलं. खोटं बोलले असं नाही, पण मला माझं प्रेमप्रकरण इथं कुणाला सांगायचं नव्हतं, ज्या गोष्टीत आपण हारलोय ती काय इतरांना मिरवून दाखवायची बाब नव्हे. तसंही आधीच्या कॉलेजमध्ये काहीही लपवाछपवी न केल्याचे अनेक तोटे सहन केलेच होते. निधी वॉज राईट. या दुटप्पी समाजामध्ये नीट रहायचं असेल तर आपणही असंच दुटप्पी रहायला हवं.
फक्त हे असं सांगितल्याचा एकमेव तोटा असा झाला की अख्ख्या कॉलेजमध्ये मी फार साधीसरळ मुलगी असून अद्याप “काहीही न केल्याची” बातमी आपसूक पसरली. लतिकाच्या काही मित्रांनी म्हणे, माझ्या वर्जिनीटी घालवण्यावर पैजा मारल्या होत्या.
हे सर्व मी जेव्हा आफताबला फोनवर सांगितलं तेव्हा तो नुसता खदाखदा हसत होता.


No comments:

Post a Comment