Tuesday, 5 April 2016

MAD-रास ५

चेन्नईमध्ये आल्यापासून मला माझे मित्रमैत्रीणी बर्‍याचदा हा प्रश्न हमखास विचारतात. “तिकडे हिंदी अजिबात बोलत नाहीत, मग तुझं कसं निभावतं?” यावर उत्तर: माझं अतिशय उत्तमरीत्या निभावतं.

आपल्याला हे ऐकून माहित असतं की दाक्षिणात्य राज्यांमध्ये त्यांच्याच भाषा बोलाव्या लागतात, अन्यथा ते लोकं फार त्रास देतात. हे एका बाजूने बरोबर आहे आणि एका बाजूनं नाहीसुद्धा. दाक्षिणात्यांना हिंदीचा इतका राग आहे कारण त्यांच्यासाठी ती भाषाच पूर्णपणे परकी आहे आणि याच भाषेची सक्ती त्यांच्यावर केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या मराठी भाषिकांना हिंदी फार सोपीची वाटते, तसं त्यांना वाटत नाही.


चेन्नईमध्ये आल्यानंतर आठेक दिवसांत मुंबईच्या सवयीने बाहेर बर्‍याचदा दुकानांतून वगैरे आपसूक हिंदी बोललं जायचं,  ते हिंदी बोललं काय आणि मराठी बोललं काय फारसा फरक पडणार नाही हे लक्षात आलं. लहानपणापासून घरात कानडी असल्याने आणि मंगळूरला दोन वर्षं काढल्याने कानडीची सणसणीत सवय होती. मग इकडे बाहेर सर्रास कानडीमधूनच बोलायला सुरूवात केली. अजिबात काही कळत नाही यापेक्षा किमान काय तीस चाळीस टक्के समजतंय तितकं तरी पुरेसं! कानडी तमिळ भाषा बर्‍यापैकी जवळच्या आहेत पण एकदा तमीळसाठी कान तयार झाला की मराठी-तमिळ-कानडी अशा तिन्ही भाषांमधल्या शब्दांची गंमत मला तरी घेता येते.


साधारण बर्‍यापैकी चांगल्या दुकानांमधून अथवा शेजार्‍यांबरोबर फार मोठा प्रश्न आला नाही. बहुतेक सर्वजण इंग्रजी माध्यमात शिकलेले असल्याने इंग्रजी झिंदाबादचा नारा देता आला. ज्यांना अजिबात इंग्लिश येत नाही अशा “काकू आंटी” वगैरेंच्या मुलांनी भाषांतरकाराचं काम केलं. ती मुलं नसली की काकू तमिळमध्ये मी इंग्लिश-कानडीमध्ये असा संवाद चालू झाला. एकंदरीत बोलायचंच असेल तर भाषेचा अडथळा कधी येत नाही, आणि बोलायचंच नसेल तर कितीही समान भाषा असली तरी संवाद साधला जात नाही, हेच खरं. आमच्या घरासमोरच एक मारवाडी फॅमिली राहते. गेली वीस वर्षे इथंच राहत असल्याने त्यांचं तमिळ उत्तम आहे, शिवाय हिंदी समजतं. त्या भाभींनी मला खूप मदत केली.

रोजच्या वापरामधले शब्द  मी एका वहीमध्ये लिहून ठेवले. वाणसामानाची नावं, फळं भाज्यांची नावं. मराठी तमिळ हिंदी कानडी अशी सापड्तील त्या भाषेमध्ये लिहून ठेवत गेले. आकड्यांचा फारसा प्रश्न आला नाही. मला तमिळमधले वर,रंडं, मुणं, नालं हे आकडे आधी पासून येत होते. पुढचे आकडे मी कानडीमधून बोलायचे. ते थोडेफार सारखेच आहेत. कानडीमधला “ह” इकडे “प” होतो. कानडी “हत्त” तमिळ पत्त (दहा), हन्नोंद-पन्नोंद (अकरा), हन्यार्ड-पन्यार्ड (बारा) असे आकडे लक्षात ठेवले. पण बर्‍याचदा पायांत पाय अडकवून तोंडघशी पाडलं ते “पांज” ने. बहुतेकदा दुकानामध्ये समोरच्याने “पांज रूपया” सांगितलं की मी पाचचं नाणं काढून द्यायचे. समोरचा माझ्याकडे “कहांकहांसे आते है” टाईप लूक द्यायला. “इन्न पत्त कोडी”. मग कानडीमधून “पाच रूपये म्हणालात ना?” समोरून तमिळमध्ये “आमा, पांज” (ज चा उच्चार “च” आणि “ज” मधला) मग लक्षात यायचं त्याला पंधरा रूपये म्हणायचं आहे. निमूटपणे अजून एक दहाची नोट द्यायची. मागे  रत्नागिरीमध्ये लिंबं घेतल्यावर ती बाई “पाच द्या” म्हणाली. मी पर्समधून मोजून पंधरा रूपयाचे सुट्टे दिल्यावर त्या बाईनं परत मझ्याकडे “कहांकहांसे आते है” टाईप लूक दिला. चालायचंच!! चेन्नई काय आणि रत्नागिरी काय.. आम्ही असलेच वेंधळे.


भाजी-फळं वगैरे घ्यायला इतका त्रास झाला नाही. अगदी पहिल्या दिवसांपासून दारावर विकायला घेणार्‍या विक्रेत्यांमुळे पुन्हा एकदा आपण गावकुसात रहायला आलोय याची जाणीव झाली. हे लोक काय ओरडतात ते समजायचं नाही, म्हणून हाक मारून नक्की काय भाजी आहे ते बघावं लागायचं. एकदा या नादांत मी स्टोव रीपेअरी आणि छत्री दुरूस्तीवाल्याला हाक मारली आहे. एकदा सकाळी साडेसहाला एक बाई अगम्यपणे काय ओरडत होती ते कळेना, म्हणून बोलावली तर ती इडियप्पम विकत होती. कोकणामधल्या लोकांना रसशेवया माहित असतील. त्याच या तांदळाच्या गरमगरम वाफवलेल्या शेवया. दहा रूपयाचे चार. ही बाई आता आमची फार आवडती झाली आहे. सकाळच्या वेळी कंटाळा आला असेल तर तिच्या “इड्डीआपै” अशा जोरदार हाकेची वाट पहायची, गरम शेवया आणि त्यावर दूध साखर हा नाश्ता पोटभरीचा तर होतोच, शिवाय डायेट फ्रेंडलीसुद्धा.


या दारी येणार्‍या विक्रेत्यांमुळे मला भाज्यांची तमिळ नावे लगेच समजत गेली. “कीरै” म्हणजे पालेभाजी. सीरीकीरै, मणतक्कालीकिरै, पुळच्चीकीरै ही लोकल पालेभाज्यांची नावं समजली. तक्काली तक्काली तक्काली असं सकाळी सकाळी ओरडत येणारा बावा टोमॅटो आणि इतर भाज्या घेऊन यायचा. तक्काली म्हणजे टोमॅटो. सोरेकाई म्हणजे दुधी. वेंडेकाई म्हणजे भेंडी. वाळेकाई म्हणजे केळी. (कानडीमधल्या बाळेकाई मुळे हे लक्षात रहायला बरंच सोपं) काई म्हणजे भाज्या-फळफळावळ. पळम म्हणजे फळं. हे तर लक्षात ठेवायला बरंच सोपं होतं. असे बरेच रोजच्या वापरातले शब्द समजल्यानंतर एकेक मजा जाणवायला लागली. मांगा म्हणजे आंबा. अरिसी म्हणजे तांदूळ. याचे मॅंगो आणि राईस हे इंग्रजी शब्द याच तमिळ शब्दांवरून आलेत असं कुठंतरी लेखामध्ये वाचलं होतं. खरंखोटं असेल का माहित नाही, पण मला लक्षात ठेवायला हे नीमॉनिक बरंच उपयोगी पडलं. पुरूप्पू म्हणजे डाळी. कडलीपुरूप्प्पू म्हणजे हरभर्‍याची डाळ. इथंही नीमॉनिक वापरलंच. J


भाषेची सर्वात जास्त अडचण जाणवली ती कामवालीच्या संदर्भात. सेल्वीला इंग्लिश समजायचं, पण तेही थोडंसंच. सेल्व्हीने महिनाभर माझ्याकडे धुणीभांडी, झाडू पोछा आणि अंगण झाडणे इतकं काम केलं. पुढच्या महिन्यापासून तीच स्वयंपाक करायला लागली. सेल्व्हीच्या हाताला जबरदस्त चव होती, मसालेदार, झणझणीत पन अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. मला मासे चिकन वगैरे काही घरी बनवता यायचं नाही. तिच्यामुळे थोडंफार करायला शिकले. पण हे करणं-शिकणं-शिकवणं फार मजेदार असायचं. किचनमध्ये ती मला काहीतरी “हवंय” किंवा “संपलंय” म्हणून सांगायची. तिला काय हवंय ते मला कळलेलं नसायचं. मग अख्ख्या  किचनमध्ये सापडलं तर ठिक अन्यथा कंप्युटर चालू करून ती जे सांगेल ते गूगल सर्च करून त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते शोधणे. मग ते इंग्रजीमधलं नाव आपल्याला समजलंतर ठिक नाहीतर त्याचं परत मराठी मध्ये काय म्हणतात ते शोधणे. इतक्या सर्चिंगमध्ये काहीतरी गमतीजमती व्हायच्यात. एकदा सेल्वी चिकन बिर्याणी करत होती. काहीतरी मसाल्याचा पदार्थ तिला हवा झाला. काय ते गूगलभाऊला विचारलं. इंग्रजी नाव मला उमगेना. त्याचं मराठी नाव काय म्हणून विचारलं. “मराथीमोगू इन मराठी” असं स्पेलिंग टाकल्यावर गूगल पण गरगरला असणार. अखे त्याला मराठीमध्ये “नागकेशर” म्हणतात हे मायबोली.कॉमवर समजले. पण मग ह्या नागकेशराला तमीळमध्ये “मराठी” का म्हणतात ते मात्र अद्याप समजलेले नाही.


पण हे मात्र खरं आहे की, तमिळ आणि मराठी संस्कृती फार जवळच्या आहेत. वरवर पाहता त्या अजिबात तश्या जाणवत नाहीत याची मला कल्पना आहे. पण मुळातून आपली आणि तमिळ नाळ कुठंतरी खोल जुळल्यासारखी वाटते. रा. चिं ढेर्‍यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी याबद्दल बरंच लिहिलं आहे. अगदी मराठीमधला “मुलगा” हा शब्ददेखील तमिळ देव मुरूगावरून आल्याचं ढेरे यांनी लिहिलं आहे. मुरुगन म्हणजेच आपला मल्हारी असंही वाचलंय. गंमत म्हणजे मराठी टीव्हीवर सध्या चालू असणारी हिट सीरीयल “जय मल्हार” तमिळमध्ये डब करून दाखवली जाते, आणि ती बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. इथल्या इमिटेशन ज्वेलरीच्यादुकानात मला बानु नथ पण दिसली होती. मुरूगन आपल्याकडे कार्तीकेय (शिवपुत्र) समजला जातो आणि स्त्रिया त्याचे दर्शन घेत नाहीत. इकडे मात्र मुरूगनची कृष्णासारखीच प्रियकर म्हणून आळवणी केली जाते. सौभाग्यवती स्त्रिया त्याचे आवर्जून दर्शन घेतात. अशा अजबगजब कहाण्या ऐकायला मला फार गंमत वाटते.


इतक्या दूर आल्यावर सणावारांची त्यानिमित्ताने घराची आठवण होणं साहजिक आहे. सणांच्या पूजाविधीपेक्षा नैवेद्यावर आमचं जरा जास्त प्रेम. आल्यानंतर महिन्याभरातच गणपतीचा सण होता. घरून “आला असतात तर..” चे हेव्ही इमोशनल डोसेस चालू होते. आता गणपतीच्या वेळेला कोकणी माणूस गावात नसेल तर काय चिडचिड होइल.  सकाळीच आम्ही तिघं घराजवळच्या गणपती देवळात गेलो. हे देऊळ चांगलं मोठं आहे. खरंतर देवांचं हाऊसिंग संकुल आहे कारण तिथे देवळाच्या अंगणामध्ये गणपतीसोबतच देवी, विष्णू, हनुमान, कार्तीकेयन, शंकर अशा सर्वच मुख्य देवांची मंदिरं आहेत. आम्ही आत गेल्यागेल्या देवळात जाण्याआधीच पुजा्र्‍यानं आम्हाला बघून इकडे असे या, रांगेत उभे रहा असे तमिळमधून सुनावले. देवळात जायच्या आधीच आम्ही देवळाबाहेर असलेल्या प्रांगणात कशाला उभे आहोत ते समजेना. आमच्यासोबत अजून वीस पंचवीस माणसं होती. मग त्या पुजार्‍यानं आमच्या हातात एक मातीचं सुगड टाईप दिलं. त्यात पाणी, थोड्या दुर्वा आणि झाडांची पानं फुलं वगैरे होती. ती छोटी सुगड सर्वांच्या हातात दिल्यावर पुजार्‍याने आम्हाला “चला आता” असं सांगितलं. आम्हाला काहीही समजत नसल्याने आम्ही आपले हल्याहल्या करत इतर काय करतात त्यांच्यासारखे निघालो. अख्ख्या देवळाला प्रदक्षिणा घालून मग आम्ही प्रांगणाच्या दुसर्‍या टोकाला आलो. तिथे गणपतीची एक सुंदर पितळी मूर्ती बाहेर चौथर्‍यावर ठेवली होती. पुजार्‍यांनी त्या मूर्तीला मंत्र म्हणत अभिषेक चालू केला. त्याचा अभिषेक झाल्यावर ज्या लोकांच्या हातात ही सुगड होती त्यांनी त्यातलं पाणी मूर्तीवर ओतलं. आम्ही कॉपी पेस्ट केलं. मग पुजार्‍यांनी ते अभिषेकाचं पाणी ज्या मातीत मुरवलं ती थोडी माती फुलं वगैरे त्या सुगडीत घालून दिलं. “आता याचं काय करायचं” असा प्रश्नचिन्ह तोंडावर झळकलं असणार कारण शेजारी उभ्या असलेल्या बाईनं “वीडीगं पोणा सॅंड मे ऎड माडी” असं सांगितलं. घरी जाऊन मातीत मिसळा असा अर्थ. आम्हाला समजावं म्हणून तिला काय कसरती कराव्या लागल्या. गणपती विसर्जन करून आलं की त्याची मूठभर का  होइना ओली माती घरात आणून ठेवायची आपली पद्धत. इथंही थोडाफार तीच पद्धत पण किंचित फरक. पुजार्‍यांनी त्या पितळी मूर्तीची पूजा करेपर्यंत आम्ही आत देवळांत जाऊन दर्शन घेतले. 

तोवर बाहेर प्रसाद द्यायला सुरूवात झाली होती. देवळात आलेल्या प्रत्येकाला प्रसाद हा दिलाच जातो. काबुली चण्यांचे सुंडल आणि गोड पोंगल. गोडगोड गुळाचा केलेला पोंगल इतका खमंग लागतो की बास. पोंगल आणि सुंदलबद्दल नंतर सविस्तर सांगेन. “इकडे घरी गणपती बसवत नाहीत वाटतं” मी नवर्‍याला सांगितलं. त्याला देवदर्शनापेक्षा उकडीच्या मोदकांची आस अधिक लागली होती. देवळाबाहेर पडल्यावर गावच्या मुख्य बाजारात काहीतरी आणायला गेलो. तिथं तीन-चार विक्रेते रस्त्याच्या एकाकडेला गणपतीच्या मूर्ती विकत होते. पूर्ण मातीने बनवलेली ओली मूर्ती. गुंजेचे लावलेले लाल डोळे. रंग वगैरे काहीही नाही. शब्दश: पार्थिव मूर्ती. अगदी छःओट्याच्या पण गोजिर्‍या मूर्ती. विक्रेत्यांपैकीच काही लोक साच्यामध्ये ओली माते घालून फटाफट या मूर्ती घडवत पण होते. लोक या मूर्ती ताटात ठेवून घरी घेऊन जात होते. आजूबाजूला फुलाफळांची विक्री चालू होती. इकडे कुठल्याही सणाला तोरण म्हणून झावळ्यांचा एक प्रकर करतात. तोही विकायला होता. सणाचा दिवस म्हणजे केळीच्या पानांची तडाखेबंद विक्री. नेहमीचा बाजार सणासाठी छानच नटला होता.. कोकणापासून इतक्या दूर येऊन इतका सुंदर गणपतीचा सण बघायला मिळेल असं वाटलंच नव्हतं. याच बाजाराच्या रस्त्यावरून आमच्या घराकडे येताना मुरुगनचे घर आहे. हा मुरुगन नुकताच आमच्या ओळखीचा झालेला. त्याची बायको मराठी आहे, पण सध्या ती युएसला कामासाठी गेली होती. पण बायकोची भाषा बोलणारे लोक् इतकी ओळख त्याच्यासाठी पुरेशी होती. बाजारात जातायेताना तो घरी असला की हाक मारायचा, तो नसला की त्याची आई तमिळमध्येच सर्व काही कुशलमंगल विचारायची. आताही आम्ही घरी जाताना त्याने हाक मारली. “प्रसाद घ्यायला या”


त्याच्या घरात ही पार्थिव इवलाली मूर्ती सुंदर पुजून ठेवली होती. आज संध्याकाळी आम्ही घरातल्याच बादलीत विसर्जन करून ते पाणी झाडांत ओततो म्हणाला. “आमच्याकडे” सणाच्या नावाखाली हाय हैदोस घालतात ते त्याला सांगायची गरजच नाही. मुरूगन मुंबईला दोन तीन वर्षे होता. मुरूगनची आई टिपिकल तमिळ. बाहेर येऊन माझ्याशी आणि लेकीशी दोन वाक्यं बोलून गेली. मला वाटलं होतं की प्रसाद म्हणजे परत पोंगल येईल. मुरूगनच्या आईंनी ताटामध्ये वाढून आणले ते “मोदगम” त्या मोदगम म्हणाल्या तरी मी एकदम “उकडीचे मोदक” बघून उडालेच. कर्नाटकात उकडीचे मोदक फारसे मीतरी पाहिले नाहीत. महाराष्ट्रामध्ये कोकण साईडकडे उकडीच्या मोदकांचं फार असतं. घाटावर तळणीचेच मोदक. पण तरी हे तिथून ते इकडे इतक्या तमिळनाडूपर्यंत कसं आलं ते माहित नाही (का इकडून तिकडे गेलं तेही माहित नाही) पण गरम गरम वाफवलेले, साजुक तुप घातलेले, नारळागुळाचा खमंग सारण वगैरे भरलेले मोदक. नवरा एकदम खुशच झाला. गणपती बाप्पा मोरया!! फक्त इकडे या मोदकांचा कायापालट होतो. आपल्या महाराष्ट्री पद्धतीसारखे नाजुक कळीदार मोदक इकडे बनवत नाहीत. सरळ समोसाशेपमध्ये मोदक वळतात. २१ करा नाहीतर ४२. मग तसे हे झटपट होतात हे मोदक.  चवीला सेमच लागत् असल्याने केवळ रूपाने असा काही फारसा फरक पडत नाही. मोदक न जमणार्‍यांनी मोदगम करून बघा!!!


या खाण्यापिण्यावरून अजून एक गंमत आठवली. कसल्याशा स्वीट मार्टमध्ये गेलो होतो. तिथले नेहमीचे केक्स पेस्ट्रीज आणि अतिशय गोड चपचपीत बंगाली  मिठायांपेक्षा वेगळं काही आहे हा ते बघत होते. एका ट्रेमध्ये पोळ्यांची चळत ठेवली होती.  मी दुकानदाराला “वोबट्टू?” म्हणून विचारलं. मंगलोरकडे पुरणपोळ्यांना वोबट्टू म्हणतात. त्याला काय ते समजेना. मी परत कानडीतून विचारलं “हुरणद्द होळगी” तो परत नॉनप्लस. मग तोच म्हणाला. “इदु पुरणपोळी” क्काअय्य्य? मी मराठीमध्येच आले. चक्क!! पुरणपोळी (ण आणि ळ! हल्ली त्तर काही मराठी लोकंसुद्धा पुरनपोली म्हणतात). चेन्नईमध्ये ही पोळी दोन तीन प्रकाराने करतात. पैकी कोकोनट पोळी म्हणजे खोबर्‍याची पोळी तर अप्रतिम लागते. पुरूप्पू पोळी म्हणजे चणाडाळीचं पुरण वापरून केलेली पोळी. बर्‍याच स्वीट मार्टमध्ये ताज्या पुरणपोळ्या हमखास विकायला ठेवलेल्या असतात. मी लगेचच विकत घेतली हे सांगायला नको.  तमिळनाडूमध्ये आल्यावर बर्‍याच दिवसांनी आयती पुरणपोळी खाल्ली. घरगुती पोळी अजून वेगळी असणार पण एकंदर चव बरीचशी आपल्या मराठी पुरणपोळीसारखीच. आकार थोडासा लहान. पुरणपोळीला साधारण इकडे बोळीदेखील म्हणतात. प आणि ब ची हे अशी अदलाबदल कशी काय होते याबद्दल आता पुढच्या लेखात. तूर्तास मला चेन्नईमध्ये उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्या विनासायास मिळू शकतात याचा शोध लागल्याने आनंदी आनंद गडे म्हणत बागडायचंय.
No comments:

Post a Comment