Sunday 24 April 2016

नजर

खरंतर दोन तीन मिनिटांत घडलेल्या प्रसंगाचं एवढे काय कौतुक. पण प्रसंग लक्षात राहिला हे मात्र खरं.

कुठल्याही मॉलमध्ये असते तसली ब्रॅंडेड कपड्यांची भलीमोठी शोरूम. वीकेंड शॉपिंगसाठी जमलेली जत्रा. मी आणि माझा हीरो त्या जत्रेत सामील. मी लेडीज सेक्शनमधून तीन चार टॉप उचलले आहेत, हीरो एक लाल टीशर्ट माझ्याकडे देऊन “हा घे. तुला छान दिसेल” असं सांगतोय.

“ट्रायल घेऊन बघू की” मी त्याला हटकते. त्याला ट्रायल रूमच्या बाहेर वाट बघायला आवडत नाही. त्याला खरंतर शॉपिंग करायलाच आवडत नाही. पण मी बधत नाही. मी शोधलेले इतर कुठलेही कपडे त्याला तसेही कधी आवडत नाहीत.

ट्रायल रूमच्या बाहेर भलीमोठी रांग आहे. ट्रायल घ्यायला गेलेल्या लोकांपेक्षा बाहेर वाट पाहणार्‍या लोकांची रांग जास्त आहे. काहीकाही बहाद्दर हातात पाच सहा हॅंगर घेऊन वाट पाहत उभे आहेत- त्यांच्या रीस्पेक्टीव्ह बीलव्हेडची वाट बघत.. आता इथून बाहेर गेल्यावर फेसबूकावर ते ताबडतोब बायकांचं शॉपिंग किती वाईट वगैरे फन्नी स्टेटस टाकणार आहेत. पण सध्यातरी इथं “बिच्चारे” थांबलेत.  

मी एका खोलीत घुसते, मला ना तो काळा लखनवी  डीझाईन असलेला टॉप फार आवडलाय. मी तोच आधी घालून पाहते. बाहेर उभ्या असलेल्या हीरोला “कसा दिसतोय?” हे विचारण्यासाठी मी दार उघडते. काहीतरी जब्बरदस्त अंदाज चुकतो. माझ्या ट्रायल रूम समोर दुसरीचाच हीरो उभा आहे. माझ्यापेक्षा जास्त अंदाज त्याचा चुकतो. आपली सोबतीण कुठल्या रूममध्ये गेली आहे याचा! ती बाहेर आली असं समजून तो दोन पा्वलं पुढं आलाय पण समोर आलेली मुलगी भलतीच! ही कोणे? आणि आपली पोरगी गेली कुठं? तितक्या दोन सेकंदाच्या गोंधळात मी त्याला “कशी दिसतेय” हे खुणेनं आधीच विचारलंय. तो गडबडतो, मी पण गडबडते. मी लगेचच नजरेनं सॉरी म्हणते. तो हसतो, त्याच्या उजव्या गालाला खळी पडते. तो नजरेनंच “हा टॉप नॉट गूड” म्हणतो. उगाचच. दोघंही आधी ओशाळलेले. त्यावर सारवासारव म्हणून असेल कदाचित.

मी ट्रायल रूमचं दार परत बंद केलंय. आतमध्ये माझंच मला हसू येतंय. त्याचा तो गोंधळलेला चेहरा बघून. माझा चेहरा बघून त्यालाही असंच हसू आलं असेल. माझा हीरो इतक्यात कुठे गायब झाला होत माहित नाही. मी तो बेबीपिंक कलरचा टीशर्ट ट्राय करून बघते. साईझला थोडा मोठा आहे, पण दिसतोय छान. परत ट्रायल रूम यायच्या आधी मी हीरोला फोन करते पलिकडून “बाहेरच उभाय, दिसेना का?” अशी जबरदस्त खेकसणी होते. यांचं “बाहेरच” म्हणजे अर्धा किमीच्या परीघामध्ये कुठंही असू शकतं. मी परत दार उघडून बाहेर येते. बरोबर!! आमचा हीरो दिसेना, अर्धा किमी दूर पाहण्याइतकी माझी नजर नाहीये. मघासचा खळीवाला पोरगा (थोडा बाजूला सरकून) अजून तिथं बुजगावण्यासारखा उभाय. तो परत माझ्याकडे बघून हसतो, मी पण उगाचच. तो आता परत नजरेनं “हा मघापेक्षा बेकार आहे” अशी टिप्पणी देतो. मी थॅंक्स म्हणते आणि परत आत जाते.


आता हा तिसरा टॉप कुठल्या गाढवानं शिवलाय माहित नाही, पण फिटिंगला एकूणच विचित्र आहे, घेण्यात काहीच अर्थ नाही. सर्वात शेवटी मी हीरोला आवडलेला लाल टीशर्ट घालून बघते. काय मस्त फिटिंग आहे, रंगपण एकदम फ्रेश लाल. हीरो बाहेर नसणार याची खात्री आहे तरी मी एकदा बाहेर डोकावते, मघासचा बुजगावणेवाला अजून तिथंच उभा आहे. त्याच्या चेहर्‍यावर किंचित वैताग आहे. साहजिक आहे, कधीचा खोळंबलाय. मी दार उघडलेलं पाहताच तो माझ्याकडे बघून हसतो. “परफेक्ट” म्हणून तो खूण करतो. मी परत एकदा थॅंक्स! करून आत जाते.


ट्रायल रूमच्या बाहेर येते तेव्हा हीरो समोरच उभा असतो. हिला चार टॉपची ट्रायल घ्यायला साधारण किती वेळ लागेल याचा त्याला परफेक्ट अंदाज आहे. खळीवाला हीरो अजून बुजगावणे मोडमध्येच आहे. “लोकांच्या गर्लफ्रेंड्स चार चार टॉप बदलून येतात आणि आमच्या हिलाच इतका वेळ लागतोय. हळूबाई कुठची!” तो मनातल्या मनात म्हणत असणार याची पूर्ण खात्रीच...
त्याच्याकडे पाहून मी उगाच बाय करते. “लोकांचे बॉयफ्रेंड्स बघ किती रोमॅंटीकपणे ट्रायल रूमसमोर उभे असतात नाहीतर आमचं ध्यान!” मी हीरोला सांगते. ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. 

No comments:

Post a Comment