Sunday 17 April 2016

रहे ना रहे हम (भाग ७)

जॉयसने बारावीच्या वर्षासाठी टाईमटेबल आखलं होतं, पण तिच्या घरामध्ये तिला अभ्यासाला जास्त वेळ मिळायचा नाही. तिची आई कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये नर्स असल्याने तिची शिफ़्ट ड्युटी असायची, जॉयस सर्वात मोठी. त्यानंतरची कॅरोल आणि मग मायकल. शिवाय त्यांचं एकत्र कुटुंब, काकाकाकी, त्यांची मुलं आणि अजून बरंच कोण कोण. इन मिन चार खोल्यांच्या घरामध्ये एवढी सर्व माणसं. त्यामुळे ती अभ्यासाला माझ्याचकडे येऊ लागली. जादू आल्यापासून परत घरामध्ये येणारे जाणारे लोक वाढले होते, म्हणजे आफताबची चिडचिडपण. ती आणि आफताब या दोन पुस्तकी किड्यांमध्ये माझा अभ्यास झाला नसता तर तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला असता.

आईसोबत बोलायला मला खरंतर आधी फार आवडायचं. रोज शाळेत काय काय घडलंय त्याबद्दल मी सविस्तर सांगायचेच, पण आता आईला काही सांगितलं की ती भलतेच उपदेश करायची. वसीमबद्दल तिनं मला एकदोनदा चौकशी केल्यासारखं विचारलं... फार खोलात जाऊन नाही सहजच विचारल्यासारखं, पण टोकेरी प्रश्न बरोबर समजतातच की. मी तसंच काहीतरी उडवून लावलं.
आफताब बोर्ड एक्झामसोबतच सीएच्या परीक्षेसाठी तयारी करत होता. आम्हाला नुकतीच मेडीकलसाठी एंट्रन्स एक्झाम सुरू झाली होती. जॉयस त्याची तयारी करत होती.
“तू पण एक्झाम देना” आफताब मला दोन तीनदा म्हणाला.
“पण मला डॉक्टर व्हायचंच नाही.”
“का? तुझे काका आणि काकी मुंबईला डॉक्टर आहेत ना, मग तुलाही त्यांच्यासोबत काम करता येईल” आफताब आजचा विचार करतच नाही, पुढच्या पाच दहा वर्षांचा विचार करून मगच बोलतो, तरीही नशीबाचे फासे कायम विचित्र पडतच राहतात. ठरवल्यासारखी एकही गोष्ट घडत नाहीच. शाहीनशी लग्न करताना पुढं असं काही घडेल हे त्याला चुकून तरी वाटलं असेल का? 
“मला इतका अभ्यास झेपणार नाही. शिवाय मला ते इंजेक्शनं सलायनी वगैरे अजिबात आवडत नाहीत.” मी त्याला उडवून लावलं.
“डॉक्टर व्हायचं नाही तर इंजीनीअर हो” जॉयस आमच्यामध्ये पडली.
“बिल्कुल नाही. मला गणितं आवडत नाही. शिवाय...”
“सॉफ्टवेअर इंजीनीअर हो, ते बेस्ट आहे. तो शाळेजवळच्या गल्लीमधला प्रवीण माहिताय? तो मेकॅनिकल इंजीनीअर झाला. कॅंपस इंटरव्युमध्ये सीलेक्ट झाला. डायरेक्ट अमेरिका. करोडोंमध्ये कमावेल. त्याच्याकडे तर घरी कंप्युटर पण नव्हता तरी तो सॉफ्टवेअर इंजीनीअर झालाय. तुज्याकडे मस्त पीसी आहे.” जॉयसला काय सांगावं? घरात पीसी आहे म्हणून मी प्रोग्रामर व्हायचं का? अजून काय करीअर चॉइसेस नाहीतच.
“नॉट इंटरेस्टेड”
“कशामध्ये? इंजीनीअर होण्यामध्ये की, अमेरिकेला जाण्यासाठी?” आफताबनं अतिशय सीरीयसली विचारलं.
“म्हणजे?”
“इंजीनीअर व्हायचं नसेल तर ओके, तसाही अभ्यास खूप असतो. पण तुला अमेरिकेला तसंही जाता येइल. आमच्या घरात नवीन ट्रेंड चालू झालाय. पोरं अमेरिकेत जातायत. सॉफ्टवेअरमध्ये पैसे कमवायला आणि पोरी त्यांच्याबरोबर लग्न करून जातायत. जास्त शिकलेल्या नसाल तरी चालेल, फक्त “अमेरिकेतील जीवनमानाशी जुळवून घेण्याची तयारी हवी” जाहिरातीत असंच लिहितात. सिराजभाई तर पंधरा दिवसांच्या सूट्टीवर आला आणि निकाह लावून बायको नेली. गल्फ़मध्ये असता तर बायको इथंच सोडून गेला अस्ता, आमच्याकडे हल्ली बघताना असे अमेरिकन पोरंच डीमांडमध्ये आहेत. बायकोला नेतात म्हणून”
एकूणात आमच्याकडे सध्या सॉफ्टवेअर इंजीनीअरिंग आणि त्यामागोमाग अमेरिकेला जाणं हे फारच रूळत चाललं होतं. मागे मुंबईला गेले होते तेव्हा काकीची आई आली होती. त्यापण नुकत्याच त्यांच्या सुनेच्या बाळंतपणासाठी त्या बोस्टनला जाऊन आल्या होत्या. तिकडच्या थंडीच्या, भरपूर सामानाच्या आणि सगळं काम स्वत:चं स्वत:च करावं लागत असल्याच्या कायकाय गप्पा सांगत होत्या. आमच्या गावात परदेशी जाणं म्हणजे मुस्लिम लोकांसाठी गल्फ नेहमीचंच होतं. त्यातही गल्फचा पैसा म्हणजे प्रचंड! अझरभाईसारखे लोकं तिथं राबायचे ते केवळ पैशासाठीच. करीअर म्हणून नव्हे. पण अमेरिकेत जाणं म्हणजे करीअरची दिशा सेट करणं. आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं अचिव्ह करणं वगैरे. इतके दिवस पुण्या-मुंबईमध्ये नोकरी मिळणं हे फार भारी काम मानलं जायचं, इंग्लंडमध्ये वगैरे जाणारे लोक फारच हुशार पैसेवाले आणि भलतेच चिकाटीवाले. पण आता हळूहळू गेल्या दहा वर्षामध्ये अमेरिकेला जाऊन नोकरी करणं खूपच कॉमन झालं होतं.
मला डॉक्टर व्हायचं नव्हतं की अमेरिकेला जायचं नव्हतं. खरंतर मला काय करायचं आहे तेच क्लीअर नव्हतं. पुढच्या शिक्षणासाठी आईवडलांनी मला गावाबाहेर ठेवलं नसतं. मी हॉस्टेलमध्ये वगैरे राहतेय ही कल्पनाच आईला असह्य झाली असती. बाबानं काय केलं असतं माहित नाही.
त्यामुळे मी बारावी झाल्यावर गावातच बीएससी असा सुटसुटीत पर्याय डोळ्यांसमोर ठेवला होता.
“टीव्ही लगाव” आम्ही बोलत असतानाच जादूचा जोरात आवाज आला. त्यांचं केबल कनेक्शन आफताबनं गरज नाही म्हणून काढून टाकलं होतं. “जल्दी न्युज चॅनल्स लगाव” तो गडग्यावरून उडी मारत आला.
आम्ही लगेच एनडीटीव्ही लावलं. अमेरिकेमध्ये कसल्यातरी विमानांचा अपघात झाला होता. दोन्ही विमानं भल्यामोठ्या शेकडो मजल्यावरच्या इमारतींवर जाऊन धडकली होती. टीव्ही बघताना केवळ ती विमानं धडकत असल्याचं दृश्य वारंवार दिसत होतं. बाकी टीव्हीवाल्यांचं नेहमीची फालतू बकबक चालू होती, काय झालं कळायला मार्ग नव्हता. आम्हाला फक्त तो हॉलीवूडच्या पिक्चरमध्ये शोभेल असा विमानांचा स्टंट बघून मज्जा वाटली, आणि किती लोकं मेली असतील याबद्दल काळजीसुद्धा. जादू कितीतरी वेळ चॅनल्स बघत राहिला, हे सगळं घडून चार-पाच तास उलटून गेले होते. आम्हाला आत्ता पत्ता लागला होता, पण त्यात विशेष लक्ष घालण्यासारखं काही वाटलं नाही. आम्ही परत अभ्यासाकडे वळालो.
या असल्या गोष्टींचे भविष्यावर काय परिणाम होतील याचा विचार करायची आमची अक्कल नव्हती आणि तशी आवश्यकतादेखील वाटली नाही. आणि तसंही असल्या गोष्टींचे परिणाम एका दिवसात थोडीच दिसून येतात.


>>>>> 
एके दिवशी आई बाहेर गेली होती, तेव्हा पोस्टमन आला. पत्रं काही खास नव्हतीच. आता कोण पत्रं लिहितंय. एक दोन एल आय सीचे रीमाईंडर्स, बाबांच्या दुकानामधल्या मालाचे काही बोशर्स आणि आईसाठी एक लिफाफा होता. मागच्या महिन्यांत आईला अशाच लिफाफ्यामधून टप्पारवेअरचं ब्रोशर आलं होतं. मला वाटलं तेच असेल, असल्या ब्रोशरमधली चित्रं पहायला मला फार आवडाय्चं. (आताही आवडतंच, सगळे हसतात पण मी सर्व मेलर्स फ्लायर्स, ब्रोशर्स इतकेच काय टेक अवेचे मेनूसुद्धा अखंड वा्चून काढते)
 पण या मधलं ब्रोशर वेगळंच होतं. मुंबईमधल्या कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये कस्लंतरी फंक्शन होतं त्यासाठी आईला आमंत्रण होतं. कॅन्सर सर्वायवर म्हणून! आई घरी आल्यावर मी आईला ते ब्रोशर लगेच दाखवलं.. “आई! तुला कॅन्सर कधी झाला होता?” हे खरंच मला माहित नव्हतं म्हणजे एक तर मी खूप लहान असताना किंवा माझ्या जन्माच्याही आधी.
“खूप वर्षं झाली” ते ब्रोशर आईनं कचर्‍याच्या पेटीत फेकून दिलं.
“मग तू मला सांगितलं का नाहीस?”
“त्यात तुला सांगण्यासा्रखं काय आहे? अजून लहान आहेस”
“इतकी पण लहान नाही. हे बघ, आम्हाला बायोमध्ये कसले सब्जेक्ट्स आहेत. सांग की, काय झालं होतं?”
आई माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता किचनमध्ये चहा करत होती “सांग ना गं, आई” मी माझी किरकिर प्रत चालूच ठेवली. शेवटी आईनं चहाचा कप माझ्यासमोर आदळला. “लग्नानंतर मला कॅन्सर झाला. गर्भाशयाचा. केवळ तू व्हावीस म्हणून मी ट्रीट्मेंट घेत राहिले. तू जन्मल्यावर मात्र लगेच हिस्टरेक्टोमी झाली. त्यानंतर मी ठणठणीत आहे. अजून काय सांगू?” आई माझ्यावर ओरडलीच.
मी काही न बोलता चहाचा कप उचलला. माझ्या आईला कॅन्सर झाला होता, मी व्हायच्या आधीपासून. मी झाले मग तिनं ऑपरेश्न केलं. आईला एवढं सर्व काही त्रास होत असूनसुद्धा बाबानं बाहेर लफडं केलं होतं. बाई ठेवली होती.
आईनं चहा आज इतका पांचट आणि बेक्कार केला होता की.... असला चहा पिताना मला रडूच यायला लागलं.




बारावीचं वर्ष एकदाचं संपलं. काही खास नव्हतंच. क्लास, ट्युशन्स, अभ्यास इतकंच आणि एवढंच. आईच्या आजाराबद्दल समजलं होतं. नंतर बोलताना आईनं अजून काय काय सांगितलं. बाबानं आईची किती काळजी घेतली, तिला किती सपोर्ट केला वगैरे वगैरे आईनं ऐकवलं. पण त्या संध्या नावाच्या काळ्या बाईबद्दल ती काही बोलली नाही.
पण मला आता तितकं गणित येत होतं. आईचा आजार चालू झाला, माझा जन्म झाला, आईची हिस्टेरेक्टोमी झाली आणि त्यानंतर बाबानं बाई ठेवली. ऑब्व्हियसली, सेक्ससाठी. कुणी निव्वळ गप्पा मारण्यासाठी तर बाई ठेवत नाही.. पण का? आई बाबाचं काही भांडण नव्हतं. दोघांच्या नात्यात कसला कडवटपणा मला आजवर दिसला नव्हता. उलट माझ्या सर्व मैत्रीणींचे आईवडील कायम अवघडलेल्या नात्यात असायचे. प्रत्यक्षात एकत्र तर झोपायचं आहे, पण चारचौघांत मात्र आपण एकमेकांना ओळखत नसल्याचा आव आणायचा आणि हे केव्हा तर मुलं दहा बारा वर्षं झाल्यानंतरदेखील. मग एरवी इतका दांभिकपणा कशाला? नवरा बायकोच्या नात्यामधली ही गुंतवळ मला कधीच समजली नाही. माझ्या आईबाबाचं लव्ह मॅरेज होतं. तरी बाबानं केवळ झोपण्य़ासाठी वेगळ्या बाईची सोय केली होती. गणित येत तर होतं पण अजून समजत नव्हतं.
बारावीनंतर जॉयस इंजीनीअरिंगला गेली. तिला चांगली गव्हर्नमेंटची सीट मिळाली. यशस्वी पुढच्या शिक्षणाला पुण्याला गेली. गेली बीएससी करायलाच पण तरी एकूण अविर्भाव फारीनात चालल्याचा  होता. ते काय फार खोटं पण नव्हतं. नात्यामधल्याच एका मुलाबरोबर आईवडलांनी लग्न ठरवलं होतं. मुलगा युएसला होता. अजून दोन वर्षांनी लग्न आणि तोपर्यंत जमेल तितकं शिकत रहायचं. निधी आणि रझियानं आमच्याच गावातल्या कंप्युटर सायन्सला ऍडमिशन घेतली. त्यांचं कॉलेज माझ्या कॉलेजपासून पाच मिनिटाच्या अंतरावर. मी आणि पूर्वी बीएससीला गेलो. पूर्वीला मार्क जास्त नव्हते आणि मला सत्तर टक्के मार्क असूनही कुठेही जायचं नव्हतं.
आफताब सीएच्या परीक्षांची तयारी करत होता. बारावीला त्यालाही चांगले पंचाएंशी टक्के मार्क मिळाले. त्यानं पुण्याला बीकॉमसाठी ऍडमिशन घेतली. तिकडे सीए साठी क्लासेस चांगले आहेत म्हणाला. परीक्षेमध्ये पास झाला की लगेच त्याला इंटर्नशिप करावी लागणार होती.
“सो, आता पुढच्यावेळी सुट्टीत आलो की भेटू” डोळ्यांवरचा चष्मा सारखा करत तो मला म्हणाला. त्याच्या दोन तीन बॅगा आमच्या कारमध्ये ठेवल्या होत्या. बाबा पुण्याला काहीतरी कामासाठी निघाला होता. त्याच्याचसोबत आफताब जाणार होता.. माझ्या खोलीमध्ये मला बाय करायला आला होता.
“ईमेल्स करत रहा. चॅटवर भेटूच की” मी म्हटलं.
“सायाबर कॅफेमध्ये जायला तरी वेळ मिळेल का?”
“मग फोन कर” बाबानं कार गेटच्या बाहेर काढली होती. “अर्थात, निधीला फोन करण्यापासून वेळ मिळाला तर...” मी तेवढ्यात त्याला चिडवून घेतलं. बाहेरून आईचा आवाज आला. “अझरभाई दोन-तीन महिन्यांत परत येतील. तेव्हा मी इकडे चक्कर मारेनच. अभ्यास कर. काळजी घे. स्वत:ची आणि काकीची पण” तो म्हणाला. “सारखी तुडतुडत राहू नकोस. कॉलेज लाईफ एंजॉय कर.” माझ्यापेक्षा तीन महिन्यांनी लहान असलेल्या आजोबांनी मला सल्ला दिला.
“तू पण अभ्यास कर.” आफताबसाठी अत्यंत अनावश्यक असलेला सल्ला मीपण दिला.
तो नुसता हसला. “फोन करेन. अम्मीची काळजी घे.”
“आय विल मिस यु” तो दाराजवळ गेल्यानंतर मी अचानकच म्हटलं.
“आय विल मिस यु, टेक केअर” तो क्षणभर मागे वळून म्हणाला. पुढं त्याला काहीतरी सांगायचं असणार पण तेवढ्यात बाबानं कारचा हॉर्न जोरात मारला आणि आफताब तडक रूमबाहेर पडला.

माझे आणि आफताबचे रस्ते वेगवेगळे झाले.
रीझल्ट झाल्यानंतर बीएससीचं कॉलेज लगेच चालू झालं. पहिले काही दिवस कॉलेज म्हणजे बोरिंग होतं. बोरींग हा शब्द एक्सायटिंग वाटावा इतकं बोरींग. सब्जेक्ट्स इंटरेस्टिंग होते पण आमच्या नशीबानं प्रोफेसर एकदम फालतू. कसले कसले भयाण आवाजात टेप लावल्यासारखे बडबडायचे. माझ्यासारख्या इंग्लिश मीडीयमच्या मुलीला त्यांचे उच्चार समजायचे नाहीत तर मराठी मीडीयम आणि खेड्य़ापाड्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांची काय कथा? पण एक बरं होतं. प्रत्येक लेक्चर अटेंड करायलाच हवी अशी काही अट नव्हती. आमच्या कॉलेजपासून निधीचं कंप्युटर कॉलेज जवळच होतं. आमचा ग्रूप आधीसारखाच अजूनही भेटत होता. अगदी रोजच्या रोज नाहीतरी किमान आठवड्यांतून एकदा तरी. मी बारावीच्या सुट्टीत कार चालवायला शिकले होते. त्यामुळे आता आम्हाला गावामध्ये अगदी रात्री उशीरापर्यंत भटकता येत होतं. आईला रात्री मी बाहेर गेलेलं आवडायचं नाही. एकदोनदा तिनं मला यावरून बोलून दाखवल्यानंतर मी स्पष्टपणे मी अठरा वर्षांची झालीये, मला सज्ञान असल्यामुळे कसंही वागायचा हक्क आहे हे सांगितलं. त्यानंतर आईनं माझ्याशी जास्त बोलणंच सोडलं. बाबाशी तर मी कित्येक वर्षांपासून धड बोलत नव्हते.
यावर्षी माझी मैत्री गौतमीबरोबर झाली. ही आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रहायची. बारावीला मार्क चांगले होते पण ते मार्क सगळे पाठांतराचे. कसलीच कन्सेप्ट क्लीअर नव्हती. तशी ती हुशार होती. वर्गात माझ्या जवळपास बसायची, म्हणून मी तिला नोट्स वगैरे द्यायचे. एकदा कशासाठी तरी मी तिला माझ्या घरी घेऊन आले होते. माझं घर बघताच ती म्हणाली. “काय छान बंगला आहे गं!”
डोंबल. आमचं घर पंधरा वर्षांपूर्वीचं जुनं होतं. आई गेल्या कित्येक महिन्यांपासून बाबाला रीनोव्हेशन करूया म्हणून मागे लागली होती. यावर्षी करू त्यावर्षी करू करत बाबा मागेपुढे करत होता.
आणि हे असलं घर हिला सुंदर वाटतंय. घरची परिस्थिती खास नव्हती. जॉयसपेक्षाही वाईट. गौतमीचे बाबा कुठल्यातरी आमराईमध्ये गडी म्हनून काम करायचे. आई घरातच शिवणकाम. पाठीमागे अजून दोन भावंडं. तिला बीएससी करून मग बीएड करायचं होतं म्हणजे शिक्षिकेची चांगली नोकरी मिळाली असती. मला तिच्याशी बोलायला आवडायचं, पण ती लेक्चर्स सोडून एरवी कुठेही यायची नाही. अगदी चल कॅंटीनमध्ये कॉफी पिऊ म्हटलं तरी “नक्को” म्हणायची. परिस्थिती नव्हती हे मान्य आहे पण पाच पाच रूपयांच्या कॉफीकरता इतका विचार कशाला करायचा? आता मी काय फार करोडपतीची मुलगी नाही. पण तरी घरात पैशांचा काहीच त्रास नाही. मला रोजच्या रोज आई खर्चाला पैसे द्यायचीच. मग दोन कप कॉफीचे पैसे मी दिले तर काय प्रॉब्लेम, तर तेही हिला पटायचं नाही. “नक्कोच”
मी वैतागायचे तरी तिच्याशी बोलायचे. माझ्यापेक्षा ती खूप वेगळ्या लाईफस्टाईलमधली मुलगी होती. आईवडलांना लांब सोडून हॉस्टेलवर राहणारी ती एकटी मुलगी तेव्हा मला बिच्चारी वाटायची.  तिला स्वत:ला तसं कधी वाटायचं नाही. आपण आठवड्यांतून तीनदा एकच पंजाबी ड्रेस कॉलेजला घालतो, आपण रोज एकच चप्पल वापरतो, बॅगचा बंद तुटला तर तो चांभाराकडून शिवून तसाच वापरतोय यामध्ये तिला कधीही कमीपणा वाटायचा नाही. माझी एक बॅग रंग उडाल्यासारखी झाली म्हणून मी फेकेन म्हणाले तर लगेच “फेकू नकोस. इतकी फाटली नाही. मी वापरेन” असं स्वत:हून म्हणाली. त्या दिवशी मला गौतमीचं खरंच खूप आश्चर्य वाटलं. दुसर्‍याची वस्तू वापरणं मला कधीच सहन झालं नसतं, पण तिच्यासाठी “जर आपले पैसे वाचत असतील तर दोन तीन महिने वापरलेली वस्तू वापरण्यात काहीच हरकत नव्हती”. फालतूच्या इगोपेक्षा तिला प्रॅक्टिकल विचार करता येत होता. आयुष्यात एकदातरी आफताब आणि गौतमी भेटायला हवे होते. दोघंही काहीकाही बाबतीत कित्ती सारखेच होते आणि काही बाबतीत कित्त्ती वेगळे!!

कॉलेजचे पहिले सहा महिने इतके बोरिंग गेले पण नंतर गॅदरिंग आणि डेज चालू झाले. आता कॉलेज एकदम एक्सायटिंग झालं. महिनाभर सगळीकडे नुसते उत्साहाचे वारे का काय म्हणतात तेच. कॉलेजच्या समित्या बनल्या त्यामध्ये मी कशातही भाग घेतला नाही. जळ्ळं, मला काहीच येत नव्हतं. निधी ऑर्गनायझिंग कमीटीमध्ये होती. दिवाळीच्या सुट्टीत ती पुण्याला चार-पाच दिवस गेली होती. “आमचे एक परिचित आहेत, त्यांनी मला ही साडी दिली” परत आल्यावर निधीनं आम्हाला एक सोनेरी रंगाची झिरझिरीत साडी दाखवली. ही साडीडेला नेसणार होती. अर्थात हे परिचित म्हणजे आमच्याच बाजूला राहणारे चष्मीस सद्गृहस्थ हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल.. पण मलाच खूप उशीरानं समजलं. त्यांचा सीएचा रीझल्ट लागला होता. काहीतरी पहिली परीक्षा पास करून सध्यी कुठल्यातरी मोठ्या कार्पोरेटमध्ये इंटर्नशिप चालू झाली होती. आफताब महाशय “कमावते” झाले होते... तरीच डीझायनर साडी वगैरे!!!
कॉलेज डेजचा पहिला दिवस ब्लॅक ऍंड व्हाईट डे होता. मी आधीच बाबाला सांगून एक पांढराशुभ्र ड्रेस मागवला होता. दिल तो पागल है मध्ये माधुरीचे नेटेड ड्रेस होते ना, त्या टाईपमध्ये. ब्लॅक पर्ल्सचा सेट आणि हातात ब्लॅक क्लच. केस मुद्दाम मोकळेच ठेवले होते.
त्यादिवशी चाची पण म्हणाल्या, “गौरी, लेकीची नजर उतरव गं. सुभानअल्ला, आज परी दिसतेय”

कॉलेजमध्ये गेले तेव्हा अख्खं कॉलेज काय माझ्याकडे बघत राहिलं वगैरे काही झालं नाही. ते फक्त फिल्म हिरॉइन्ससोबत होतं. आज सगळ्याच जणी छान दिसत होत्या. काळी पॅंट आणि पांढरा शर्ट हा पोरांसाठी काय फारसा वेगळा ड्रेस नसल्याने ते सर्व नेहमीसारखेच चंपट दिसत होते. तशी आज लेक्चर्स फारशी नव्हतीच. इकडेतिकडे नुसते भटकत होतो. निधी कमिटीमध्ये असल्यानं ती बिल्ला लावून उगाच मिरवत होती. गौतमीनं साधाच ड्रेस घातला होता आणि त्यावर शोभत नसतानाही काळी ओढणी घेतली होती. डेजसाठी नवीन ड्रेस वगैरे घेणं तिच्या स्वप्नांतही आलं नसतं. ट्रॅडिशनल वगैरे साठी तर ती काही स्पेशल करणार नव्हती म्हणाली. माझ्या ड्रेसेस मधलं काही घालशील का तर नक्को!
बोरिंग असलं तरी ते लेक्चर एकदाचं संपलं.
“एक्स्युज मी,” मी वर्गामधून बाहेर पडताना दारात उभ्या असलेल्या एका मुलानं मला हाक मारली. “तुझं नाव स्वप्नील, राईट?”
मी मान डोलावली. हा मुलगा बहुतेक एस वायचा असावा.. वर्गामधली सगळी मुलं निघून जाताना त्यानं मला हातानं केवळ थांब असा इशारा केला. मी जरी थांबले तरी आता मला वर्गात यावरून चिडवलं गेलं असतं हे नक्की. वर्ग रिकामा झाल्यावर तो जरा दोन पावलं पुढे आला. “हाय,” तो जरा बिचकतच म्हणाला. “सॉरी, आपली आधीची ओळख नाही. पण झालंय असं की...”
मला निधीसोबत तिच्या डान्सची प्रॅक्टीस बघायला जायचं होतं. “लवकर बोला”
“माझी वर्गातल्या मुलांबरोबर पैज लागली आहे. तुला चॉकलेट द्यायची आणि... आणि... एनीवेज, मी केदार. बाजारपेठेमध्ये तुझ्या वडलांच्या दुकानाजवळचं आमचं स्वीट मार्ट आहे”
ओह, केदार मिठाईवाल्यांचा मुलगा. “मग?”
“प्लीज, हे चॉकलेट घेशील?” त्यानं हातामध्ये एक डेअरी मिल्क धरलं होतं. मी ते चॉकलेट घेतलं. तसंही मला कुठं खायचं होतं. “थॅंक्स. आज तू छान दिसतेस.”
“थॅंक्स. पण तुमची पैज नक्की माझ्यावरून का लागली? आय मीन, स्पेशल काय आहे?”
“स्पेशल काही नाही” तो एकदम गांगरला. “त्याचं काये की, आपली दुकानं जवळ असल्यानं वर्गातली मुलं मला चिडवतात. दॅट्स इट”
गोष्ट दॅट्स इट असण्याइतकीच नव्हती हे तर साफ होतं. कारण जर पैज लावलेली असती तर हा चॉकलेट देतो की मी त्याच्या कानाखाली मारते ते बघायला त्याचे मित्र आजूबाजूलाच घोटाळत राहिले असते.. तसं कुणीही दिसत नव्हतं. समोरचा मुलगा मी आधी एकदोनदा कधीतरी पाहिला होता. छान गोरासा, टिपिकल पिंगट केस आणि घार्‍या डोळ्यांचा. काळा कॉटनचा शर्ट आणि ऑफव्हाईट कलरची डेनिम. उलटंच कॉंबिनेशन, पण त्याला एकदम कातिल दिसत होतं.
“ओके” तो हसून म्हणाला. “बाय”
मी पण बाय म्हटलं. तो निघाला, आणि निघतानाच हलकेच मला ऐकू येईल अशा आवाजात कुजबुजला. “उद्यापण मी अशीच पैज लावली तर चालेल ना?”
“चालेल, पण मी चॉकलेट खात नाही.” मीही तितक्याच हळू आवाजात कुजबुजत म्हटलं.
“हरकत नाही, तसाही उद्या मिसमॅच डेच आहे”

(क्रमश:) 

No comments:

Post a Comment