Thursday, 6 November 2014

दरवाजा (भाग 6)

नाही, असिफ. आज जोपर्यंत माझ्या मनात काय आहे ते तुला सांगत नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही... गेल्या पंधर्रा वर्षातील प्रत्येक क्षणाचा हिशोब तुला दिल्याखेरीज मी आज जाणार नाही....”
“मला काहीही ऐकायचं नाहिये. रेश्मा, मी आता शेवटचं सांगतो... प्लीज इथून जा” असिफ तिच्याकडे पाठ वळवून खुर्चीमध्ये बसला
“असिफ, एकदा फक्त मला बोलू देत.. फक्त एकदा. ऐकून घे”
असिफनं पुढ्यातलं स्केचबूक उघड्लं. काहीही गरज नसताना पांढर्‍य़ा कागदावर निळ्या पेन्सिलीनं रेघोट्या काढत बसला. रेश्मा दोन मिनिटं शांतपणे बसून राहिली.
“मी तसं वागायला नको हवं होतं..” ती म्हणाली. “मला तेव्हा खरंच काही सुचलं नाही. एके दिवशी कॉलेज संपवून घरी आले तर रवीदादानं आणि आईनं बोलायला सुरूवात केली. दादानं तर खूपच मारलं, तेव्हा मला समजलं की मला त्यानं तुझ्या खोलीवर....”
“घर.... आपलं घर. म्हणजे, तेव्हा तरी तू तसंच म्हणायचीस.” असिफ मानदेखील वर न करता म्हणाला. “आता त्या कशाहीबद्दल बोलून काही उपयोग नाही, हे मी तुला परत परत सांगतोय. तू तुझ्या आयुष्यात सुखी आहेस, मी माझ्या आयुष्यात...”
“नाही, असिफ, किती दिवस आपण दोघंही हे “सुखी आहोत” हा मुखवटा घालून एकमेकांसमोर येणार आहोत... कधीना कधी तरी...”
असिफने खुर्ची गर्रकन मागे फिरवली. “रेश्मा, तुझ्याबद्दल माहित नाही. पण मी माझ्या आयुष्यात खरंच सुखी आहे. इंडीयाचा टॉपमोस्ट सेट डीझायनर आहे. लाखो करोडोंची कामं करतो. कशाचीही कमी नाही... त्यामुळे मी कसलाही मुखवटा वगैरे घातलेला नाही. मी खुश आहे. कदाचित मी स्वत:ला जिथं पंधरावीस वर्षापूर्वी पाहत होतो, तिथं पोचलो नाही. पण तरीही मी खुश आहे”
“मग तू माहीसारख्या मुलीबरोबर का आहेस?.. तिनं मला सगळं खरं सांगितलंय.”
“व्हॉट डू यू मीन बाय... माहीसारख्या? माझी लाईफ पार्टनर मला जशी हवी तशीच माही आहे. म्हणून मी तिच्यासोबत आहे. हा पूर्णपणे ठरवून घेतलेला निर्णय आहे, कुणाच्याही भुलवण्यानं, खोटं बोलण्यानं किंवा खोट्या प्रेमांच्या शपथांना बळी न पडता. ती कितीही भांडली, कशीही वागली तरीही माझ्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा आहे आणि राहिल. तिनं तुला काहीही सांगितलं असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव.. माहीची आणि तुझी तुलना होऊ शकत नाही. ती मुलगीच या जगावेगळी आहे.”
“मी तिची आणि माझी तुलना स्वप्नांतदेखील करणार नाही... कारण.. काहीही असलं तरीही मी तिची जागा कधीही घेऊ शकणार नाही. तिनं जरी माझी जागा घेतली…”
असिफ हसला. “कुठली जागा? माझ्या आयुष्यात त्या संध्याकाळनंतर तुझ्यासाठी कसलीही जागा कधीच नव्हती.. माही माझ्यासाठी काय आहे हे तुला कधीच कळणार नाही... त्यामुळं मला आता पुन्हा हा विषय नको.. तुला तुझं चुकलं हे सांगायचं होतं ते सांगितलंस. माझ्या अक्षरश: पाठी लागून माझ्याशी लग्न केलंस. नंतर जेव्हा तुझ्या घरी समजलं तेव्हा खोटं बोललीस. मी तुझ्यावर जबरदस्ती केलीस म्हणून सांगितलंस. एवढा प्रचंड अपमान कधीच झाला नव्हता. तुझ्याबरोबर आयुष्याची स्वप्नं बघायला लागलो होतो. तू त्या स्वप्नांना बलात्कार ठरवलास. एवढं सगळं होऊन आज पंधरा वर्षांनी तू कुठल्या तोंडानं मला बोलतेस तेच मला समजत नाहीये”
असिफचं शांत बोलणं ऐकत असताना रेश्माच्या डोळ्यांतून पाणी यायला लागलं. “बोल... खरंच बोल, असिफ. चिडून बोल. संतापून बोल. मी जे काही वागले त्याला कसलीही शिक्षा असूच शकत नाही. मी कुठल्या तोंडानं एवढी तुझ्याशी बोलतेय, माफी मागतेय.. तुझ्या एका नजरेसाठी.. एकदा... एकदा एकदा असिफने वळून फक्त माझ्याकडे पहावं म्हणून झुरतेय.. हे कुणालाच समजणं शक्य नाहीये. तुला काय वाटतं. मी फार सुखी आहे. माझ्या संसारामध्ये, दोन मुलांमध्ये, नवर्‍यामध्ये. जगाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर हो! खूप सुखी आहे. देवाशपथ, एवढा चांगला नवरा मिळालाय. कशाचीच कमी नाही... पण माझ्यादृष्टीनं बघ. कधीतरी शक्य असेल ना, तर माझ्या मनाच्या डोहात उतरून बघ. मग कळेल तुला.... मागे काय म्हणालास मला... की तुला माझ्यावर कसलाही सूड उगवायचा नाही... चूक. साफ चूक आहे असिफ शेखर. तुम्ही तुमचा सूड माझ्या लग्नाच्या दिवसापासून आजवर उगवत आलेला आहात. प्रत्येक क्षणी... आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी तू माझ्यासोबत आहेस. खोटं वाटतंय तुला? पण हेच खरं आहे... यासाठी माझ्याकडे कसलाही पुरावा नाही.. असल्या गोष्टींचे पुरावे नसतात. पण आज मी जे सांगतेय त्यावर तुला विश्वास ठेवावाच लागेल. मी आपल्या लग्नाबद्दल खोटं बोलले. तू मला फसवलंस म्हणून सांगितलं. आईबाबांना ते पटलं होतं की नाही कुणास ठाऊक. पण तरी त्यांनी तेच खरं मानलं. मला लग्नाची मागणी आलेलीच होती. दोन महिन्यांमध्ये लग्न लावून दिलं. तोपर्यंत मी खुश होते. प्रचंड खुश. जे हवं होतं ते मला मिळालं होतं. चांगला बॅंकेमध्ये काम करणारा नवरा. मुंबईला फ़्लॅट होता, दागदागिने होते. खूप कौतुक होतं माझं. त्यावेळेला मी तुला विसरून गेले होते. आई म्हणाली तसं तो सगळाच पोरकटपणा होता. तुझ्यासोबत मी कसं आयुष्य काढलं असतं ना? तू तेव्हा रिक्षा चालवायचा, पहाटे लोकाच्या दारात दूध आणि पेपर टाकायचा. मी एवढ्या लाडाकोडांत वाढलेली आणि मी कशी राहिले असते तुझ्यासोबत? सकाळची चपाती मला रात्री चालायची नाही, अशी मी, तुझ्या घरांत शिळंपाकं खाऊन कसे दिवस काढले असते? मला तेव्हा आईचं म्हणणं पूर्णपणे पटलं. वाटलं, हो. हेच बरोबर आहे. माझ्या आयुष्याची नव्यानं सुरूवात करायलाच हवी. मोहितसोबत लग्न झालं. संसारही चालू झाला... तेव्हाही मी खूप खुश होते. मोहितला कधी याबद्दल काही सांगावंसं वाटलंच नाही. त्याला कधी संशयसुद्धा आला नाही. काही झालं तरी मी आता रेश्मा नव्हते. लग्नानंतर माझा पुनर्जन्म म्हणून मला मीरा नाव मिळालं होतं. मोहितची मीरा. मीराचा रेश्माशी काही संबंधच् नव्हता. मी नव्या नवरीची भूमिका अगदी परफेक्टली निभावत आणली. पहिल्या रात्रीपासून. आणि.. मग एके दिवशी सहजच.. सहजच. आणि तुझी आठवण आली. पहिल्यांदा.. इतक्या दिवसांमध्ये पहिल्यांदा मला असिफ आठवला. नुसता आठवला नाही. त्याचा आवाज, त्याचा स्पर्श, त्याचं स्वत:शीच हसल्यासारखं हसणं, हळूवारपणे एक एक शब्द मोजून बोलल्यासारखं बोलणं, त्याचं माझ्यावर... माझ्या शरीरावर एखादं चित्र काढत असल्यासारखं प्रेम काढणं... सगळं आठवत गेलं. लग्नानंतर त्या दिवशी मी वेड्यासारखी रडले. सासरी सगळ्यांना वाटलं की मला माहेराची आठवण येतेय म्हणून मी रडतेय... प्रत्येकानं खूप समजावलं. मोहित तर पूर्णपणे गोंधळले होते. काय करायचं ते कुणालाच सुचेना. मला एकटीलाच माहित होतं मला काय खुपतंय. मला काय हवंय. त्या रात्री विचार केला, खड्ड्यात गेली ती घरची इज्जत. खड्ड्यात गेलं ते लग्न. आताच्या आता निघायचं आणि तुझ्याकडं यायचं. तू हवा होतास. असिफ, फक्त तू हवा होतास...” रेश्मा बोलता बोलता थांबली. असिफ शांतपणे एकटक तिच्याकडे बघत होता. त्याच्या चेहर्‍यावर कसलाही भाव नव्हता. रेश्मानं डोळ्यांत आलेलं पाणी पुसलं. “मोहितला सांगित्तलं मला माहेरी नेऊन सोडा. मला बरं वाटलं की मी परत येईन. गावात आले तेव्हा समजलं की तू गाव सोडलंस. कुठं गेलास माहित नाही. कुणालाच माहित नव्हतं. चार दिवस गावात फिरले. मैत्रीणींना भेटण्याच्या निमित्तानं. पण तुझा ठावठिकाणा कुणाकडेच नव्हता. मग मोहित मला न्यायला आले. माझ्याशिवाय त्यांना करमत नव्हतं म्हणून. काय कारण देणार? परत सासरी आले. पण यावेळी येताना तूही सोबत आलास. प्रत्येक जागत्या झोपत्या क्षणाला, प्रत्येक सुखाला, प्रत्येक वेदनेला तू सोबत होतास. आजूबाजूलाच होतास कायम. मोहित ऑफिसला गेले की तुझ्याशी गप्पा मारायला लागले. तुझ्यासोबत वेळ घालवायला लागले. तू आणि मी एकत्रपणे घालवलेला वेळ पुन्हापुन्हा एकटीनं अनुभवत राहिले. सरत्या काळासोबत तुझ्या आठवणी संपत गेल्या, मग मी नवीन आठवणी बनवल्या. हा वेगळाच संसार तुझा आणि माझा. आपलंच दोघांचं विश्व. तिथं मी तुला परकं केलं नव्ह्तं, तुझ्यावर कसलाही दोषरोप लावलेला नव्हता. उलट फार हिमतीनं मी तुझा हात धरून तुझ्यासोबत आले होते. अख्ख्या जगाची पर्वा न करता. खोटं होतं, स्वप्नं होतं. माझ भास होता नाही... आहे... अजूनही आहे. इतक्या वर्षानंतरसुद्धा तू माझ्यासोबत आहेस. तुझा विश्वास बसत नाही... त्याला मी काहीच करू शकत नाही. पण हेच खरं आहे... मी तुला कधीच विसरले नाही. कारण विसरण्यासाठी तू माझ्या आयुष्यातून गेलाच नाहीस. अगदी मी बाळंतपणाच्या त्या वेदना सहन करत तळमळत दोन दिवस हॉस्पिटलमध्ये पडले होते, तेव्हा माझा हात हातात घेऊन मला समजावणारा, माझी सोबत करणारासुद्धा तूच होतास. त्या क्षणी मला मोहित नको हवा होता, असिफच हवा होता. या सर्वांच्या दरम्यान खरा असिफ कुठं आहे ते मला माहित नव्हतं. तुझं काय चालू आहे, काही माहित नव्हतं. त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये काय करतो हे मला जाणून घ्यावंसंसुद्धा वाटलं नाही. पण मी खुश होते. कारण असिफ माझ्यासोबत होता. तुला समजतंय ना मी काय म्हणतेय ते? हे एवढं सगळं मी तुला का सांगतेय माहित नाही. पण तू इथं रहायला येऊन माझ्या त्या प्रत्येक विश्वाला सुरूंग लावतो आहेस. असिफ माझा होता. माझा एकटीचा. पण मग ही माही का त्याच्यासोबत आहे? खरा असिफ आणि माझ्या विश्वामधला हा असिफ... दोघं वेगळे नाहीत. एकच आहेत. मी त्याच्या प्रेमात कायमच होते. मी तुझ्या प्रेमात कायमच होते. पण मला हे फार उशीरा समजलं. जेव्हा समजलं तोपर्यंत... सगळीच समीकरणं बदललेली होती. आता माझ्यावर तुझा कसलाही हक्क उरला नाही, तुझ्या नजरेमध्ये तर मी पूर्णपणे अनोळखी बनून गेले. तुला आयुष्यामधून वजा केल्याची ही किंमत मी चुकवली. प्रत्येक क्षण केवळ तुझ्याच सोबत जगायची. मी आयुष्यात फक्त तुझ्यावर प्रेम केलं. फक्त तुझ्यावर!”
असिफ काही न बोलता उठला. किचनमध्ये जाऊन पाण्याचा ग्लास आणून रेश्मासमोर ठेवला. रेश्मा दोन घोट पाणी प्यायली. “एवढंच तुला सांगायचं होतं” थकल्या आवाजात ती म्हणाली.
“रेश्मा, एक प्रश्न विचारू?” थोड्या वेळानं तो तिच्यासमोर येऊन उभं राहत म्हणाला. तिनं मान वर करून त्याच्याकडे पाहिलं.
“धर माझा हात. येतेस?” त्यानं त्याचा हात पुढं करत विचारलं. काही न समजल्यानं तिनं गोंधळून त्याच्याकडं पाहिलं. “गेल्या पंधरा वर्षांना तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही आयुष्यातून वजा करू. पुन्हा नव्यानं सुरूवात.. येतेस सोबत?” रेश्मा अचानक गडबडली.
“असिफ, अरे! काय बोलतोस? कसं शक्य आहे? म्हणजे…मोहित... चैत्रा अश्विन.. मी सगळं..” ती म्हणाली.

“रेश्मा, तेव्हा जशी होतीस तशीच आजही आहेस. नुसतं माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे म्हणणं. आणि ते सत्य आहे, मला मान्य आहे. तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे, तुझ्या नजरेमध्ये कायम दिसतं” असिफनं पुढं धरलेला हात मागे घेतला. “पण नुसतं प्रेम असून चालत नाही. ते निभवण्याची हिंमतही लागते. ती मात्र तुझ्यामध्ये कधीच नव्हती, आज इतक्या वर्षांनीदेखील नाही. पंधरावर्षापूर्वीचं तुझं लॉजिक बरोबर होतं. माझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत आयुष्य काढण्याची कल्पना करणं खरंच फार प्रॅक्टिकल नव्हतं. पण आज जेव्हा मी जगातलं प्रत्येक सुख तुझ्या पायावर टाकण्यासाठी समर्थ असतानासुद्धा तू माझ्यासोबत येऊ शकत नाहीत. येणं तर लांब, तसा विचारदेखील करू शकत नाहीत. ती मानसिक कुवतच नाही. कारण, तुला कधीच कसलाच संघर्ष करायचा नसतो. तुला फक्त ईझी वे हवा असतो.” असिफ शांतपणे म्हणाला.

“तू असं अचानक विचारलंस की मी... पण...”
“घाबरू नकोस. तुला नसेल, पण मला तुझ्या नवर्‍याची आणि दोन मुलांची चिंता आहे. मला कुणाचाही संसार मोडायचा नाही. तुला फक्त तुझं प्रेम किती तकलादू आहे तेच दाखवायचं होतं. या प्रेमाला काहीही अर्थ नाही”

“तुझ्या दृष्टीनं नसेल, पण माझ्यासाठी आहे. तुला ते तकलादू वाटत असेल.. अचानक असं फिल्मी स्टाईलने तू हात पुढे करावास आणि मी तो लगेच धरावा.... हे शक्य नाहीये. मी तुझ्यावर कितीही प्रेम करत असले.... कितीही वेळ तुझाच विचार करत असले तरीही मी मोहितना सोडू शकत नाही. माझ्या दोन लहान मुलांना मी अनाथ करू शकत नाही...”

“मी. माझा नवरा. माझी मुलं.... एवढंच सुचतं ना तुला? कधी विचार केलास... माझ्या आईला तुझ्या बापानं आणि भावानं चार दिवस कोंडून ठेवलं होतं. मला मारायचं ठरवलं होतं. त्याचदरम्यान माझ्या वडलांच्या खुनाच्या केसच्या तारखा पडल्या होत्या, तेव्हा ही भानगड नको, म्हणून मी वाचलो. नाहीतर तुझ्यापायी वडलांसारखाच मेलो असतो. काय हवं होतं तुला? पैसा, दागिने, घर, गाडी! आणि मी तुला हे दिलंच नसतं असं तुला का वाटलं? कशामुळे? माझ्यावर विश्वास नव्हता..... मी आयुष्यात कधीच काहीच करू शकलो नसतो असला लूजर वाटलो होतो? शिक्षण अर्धवट सोडल्यावर याच हातांनी काम करून हे सगळं मी कमावलंय. एकदाही.... एकदाही आजवर कुणाला फसवलेलं नाही, कसली लांडीलबाडी केली नाही. ज्या बिल्डींगमध्ये तुझा वन बी एचकेचा सासर्‍यानं घेतलेला फ़्लॅट आहे, तिथंच माझा टू बी एच केचा स्वकमाईवर घेतलेलं घर आहे. दोन गाड्या आहेत. थोडाफार सेलीब्रीटी पण आहे. देशा-परदेशांमध्ये चिकार फिरतो. हेच सर्व तुला हवं होतं.... मी दिलंच नसतं... हो ना?”

“असिफ, मला तुझ्याइतकी अक्कल कधीच नव्हती. मी कधी इतका विचार केलाच नाही. आईनं त्या दिवशी मला जे समजावलं ते मला पटलं....”

“काय पटलं? असिफ खालच्या जातीचा आहे. की मग त्याच्याकडं रहायला घर नाही की मग त्याच्याकडे पैसा नाही.. काय पटलं?”
रेश्मा काही न बोलता गप्प बसली. “मी सांगू? आयुष्यभर त्या वेड्याबाईचं हगणं मुतणं काढत बसणार आहेस का? त्यानं तुझ्याशी लग्न वगैरे नाटकं केलीत कारण त्याला आईला सांभाळायला आयती नोकराणी हवी आहे हे वाक्य तुला पटलं” तिनं चमकून त्याच्याकडं पाहिलं. “हो. मला त्या दिवशी देवघरात बसून तुझं आणि तुझ्या आईचं काय बोलणं झालं ते शब्दनशब्द समजलं. तुमच्या घरात तुळजाई काम करायची, तिनं मला भेटून हे सगळं सांगितलं.... माझ्या आईसाठी मी एकवीस वर्षं एकटाच होतो, नंतरही आयुष्यभर मीच एकटा राहिलो. तुझ्या अमाप कृपेनं वेळ आली तेव्हा तिला अनाथासारखं ठेवलं. पण तुझ्याशी लग्न करताना चुकूनही मी असला विचार केला नव्हता, जो तुझ्या आईनं तुला सांगितला. राग तुझ्या आईचा नाही, तुझा आला. कारण तुला ते पटलं. तू तेच खरं मानलंस. हे ओळखलं होतंस तू मला? ही किंमत केलीस? म्हणून खोटं बोललीस? स्वत:शी, आईवडलांशी, नवर्‍याशी? आणि आज मला त्या खोटं बोलण्याचं काहीतरी लंगडं समर्थन देतेस? काय भोगलंस... काहीतरी वेड्यासारखं माझं तुझ्यावर कायम प्रेम होतं, एवढं एक वाक्य म्हटलं की झालेला प्रत्येक प्रमाद संपला?” असिफ अगदी हळू आवाजात बोलत होता, तरीपण त्या प्रत्येक शब्दांतला संताप रेश्माला जाणवत होता.
“मी तुला गेल्या पंधरावर्षातल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब देऊ? तुझ्या एका स्वार्थापायी माझी झालेली परवड सांगू? एक आसरा होता, माझी आई. तिला माझ्यापासून दूर ठेवलं. एक स्वप्न होतं, खूप शिकायचं. ते स्वप्न तुटलं. एक इच्छा होती, कुठेतरी काहीतरी चांगलं काम करायचं. इथं बेगडी खोटी घरं सजवत मोडत बसलो. काय चुकलं होतं माझं? तुझ्यावर विश्वास ठेवला. तुझ्याशी लग्न केलं? लग्न म्हणजे सातजन्माचा साथीदार वगैरे काहीतरी बावळट कल्पना मनात बाळ्गल्या. हेच चुकलं? कधी एकदातरी विचार केलास.. काय अवस्था झाली असेल माझी? एकटा! एकटा होतो. आयुष्याशी नाळ बांधून ठेवणारी प्रत्येक गोष्ट तू माझ्यापासून तोडलीस. आणि ते तोड्ताना तुला काहीहीसुद्धा वाटलं नाही. तुला असं वाटलं की जितक्या सहजगतीनं तू मला विसरलीस, तितकं मीही तुला विसरून गेलो असेन. कसा विसरू? आईला त्या आश्रमात सोडून येताना... खंडणी मागितल्यासारखे तुझ्या बापाकडे पैसे मागताना.. झोपडपट्टीमधल्या एका खोलीमध्ये चार जणांबरोबर राहताना... फिल्मी जगामधल्या लोकांसोबत राहताना.. दोन दिवसांतून एकदा जेवताना.. हातोड्यानं खिळे ठोकून हाताला घट्टे पडत असताना.. ज्याचा बाप आयुष्यभर देवदासीप्रथेसारख्या गोष्टींविरूद्ध लढला, त्याच्याच मुलानं एका वेश्येला विकत घेत असताना... तुला कसा विसरू? माझ्या इतक्या संघर्षामध्ये एक गोष्ट माझ्यासोबत योग्य झाली असेल तर ती माही. मी माझ्या आयुष्यामध्ये तिला विकत आणलं. आजवर मला कुठल्या गोष्टीचा पश्चाताप होत असेल तर या फक्त याच गोष्टीचा.. माझी आयुष्याची जोडीदार मी अशी आणायला नको हवी होती. पण त्यावेळेला मला जे सुचलं तेच मी केलं..मला जेवढं शक्य होतं तितकंच केलं.”
“मग तू तिच्याशी लग्न का करत नाहीस? ती त्याच गोष्टीवरून भांडून गेली आहे ना...”
असिफ गालात हसला. “तुला कसं सांगू?समजणार आहे ही गोष्ट? किती बदलत गेलो ना... जोपर्यंत तुझ्या गळ्यांत मंगळसूत्र बांधलं नव्हतं, तोपर्यंत तुझ्या अंगाला हातसुद्धा लावला नाही. पाप असतं.. असं मीच तुला सांगितलेलं. आपण केलं ते लग्नच होतं ना... मग ते नातं तुझ्या बाजूनं तोडून टाकलंस ना... संपल्या त्या सर्व भावना. संपलं ते नातं. मला तेच माझ्या आणि माहीच्या नात्यांत नकोय. लग्नाची फॉर्मॆलिटी. आज मला ती आवडते, तिला मी आवडतो.. म्हणून एकत्र आहोत. उद्या दोघांपैकी कुणाचंही मन उडालं तर वेगळे व्हायला स्वतंत्र आहोत....”
“असिफ, खोटं बोलतोयस.. अजूनही तुला खोटं बोलता येत नाही”
“मग आता तू शिकवशील मला? ट्युशन घे. खोटं कसं बोलायचं. आठ महिन्यापूर्वी ज्याच्यासोबत लग्न केलं त्यालाच “बलात्कारी” कसं म्हणायचं. पंधरावर्षं ज्याच्यासोबत संसार करतेस त्याला तुझ्या भूतकाळाविषयी एकही शब्द न सांगता रहायचं. शिकवशील मला?”
“असिफ, पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते. पुन्हा तो विषय काढू नकोस. जुन्या जखमा ओल्या करून...”
“माझ्या जखमा कधीच भरल्या नाहीत. आजपर्यंत ओल्याच ठसठसत राहिल्या. कायम तश्याच राहतील. तू कितीही माफी मागितलीस तरी मी माफ करू शकणार नाही. तेवढं मोठं मन माझ्याजवळ नाही. तुला जे सांगायचं होतंस. ते सांगितलंस, मला जे बोलायचं होतं तेही बोलून झालंय. यापुढे मी तुझ्यावर दोषारोप करणं आणि तू माफी मागणं हेच एक चक्र चालू राहील. यातून साध्य काहीच होणार नाही... जा. तुझ्या घरी जा.”
रेश्मानं परत एकदा डोळे पुसले. “मी तेव्हा हिंमत दाखवून तुझ्यासोबत यायला हवं होतं” ती हलकेच म्हणाली.

“बरं झालं नाही आलीस. मला माही भेटली नसती. माहीला भेटल्यावर मला समजलं, प्रेम काय असतं. तुझ्यासोबत जे होतं ते सगळा शरीराचा व्यापार होता. त्यात मी कधी मनापासून नव्हतोच. माहीमुळे मला पहिल्यांदा जाणवलं, एखाद्यासाठी आयुष्य झोकून देणं काय असतं. मी आज जे काही आहे, ते माहीसाठी. माहीमुळे.... रेश्मा, तू माझ्या आयुष्यातली सगळ्यांत मोठी चूक होतीस. आणि माही माझ्या आयुष्यामधली सर्वात बरोबर आलेली गोष्ट...”

“माझं चुकलं.. तेव्हा मी…”
“हे सांगून झालंय तुझं. परत परत तेच बोलायला माझ्याकडे वेळ नाही. इतरही कामं आहेत. हातावर पोट असणारी माणसं आहोत. तुझ्यासारखं आयतं कधीच काही मिळत नाही.” असिफ पुन्हा एकदा खुर्चीवर बसत म्हणाला. “जाताना दरवाजा ओढून जा”
“असिफ! तुझा राग, तुझा संताप सगळं मान्य आहे. पण फक्त एकदा माझ्या समाधानासाठी मला माफ केलंय असं म्हण. परत कधीही तुझ्याशी किंवा माहीशी बोलणार नाही. तुमच्यामध्ये कधीही…”
“प्लीज, रेश्मा! स्वत:विषयी इतक्या महान भावना बाळगू नकोस. तू आमच्यामध्ये येण्याइतकी महत्त्वाची नाहीस हे कितीवेळा आणि अजून किती स्पष्ट शब्दांत सांगू?”
“खोटं बोलू नकोस. तसं असतं तर मग माही इतक्यावेळा भांडत असूनसुद्धा का लग्न करत नाहीस.. अजून मी कुठेतरी मनामध्ये आहे, तिरस्कार म्हणून का होइना, कडवेपणा म्हणून का होइना, मी आहेच…”
असिफ काही न बोलता शांत बसून राहिला. “मी खरंच जातेय, असिफ. जेवढं मला सांगायचं होतं, तेवढं सांगितलंय. माफी मागितली आहे. गेलेला काळ कधीही परत येत नाही, पण जर कधी परत आलाच तर मी माझी चूक सुधारायला तयार आहे...” बोलताना ती क्षणभर थांबली, “मी आजही ती चूक सुधारायला तयार आहे... मघाशी म्हणालास ना... मी जर तुझ्यासोबत आज यायला तयार असले तर...तर..”
“मघाशी मी हेदेखील म्हणालो की, मला कुणाचाही संसार मोडायचा नाही. माझा तूच मॊडला होतास. त्यामुळं ते दु:ख काय आहे ते पुरेपूर अनुभवलंय. आई असून नसल्यासारखा अनाथासारखा वाढलोय, त्यामुळं कुणाच्याही मुलांना तसलं काही बालपण द्यायचा इरादा नाही. तू तुझ्या संसारात सुखी आहेस. तशीच रहा..”
“एकदा फक्त असिफ. एकदा मला तुझ्याजवळ येऊ देत.. तुझा स्पर्श अनुभवू देत..” रेश्मा हलकेच कुजबुजली.

“सॉरी, रेश्मा. परत त्या प्रलोभनाला मी बळी पडणार नाही. आता तितका बावळट राहिलो नाही. घरी जा. शाळेतून तुझी मुलं येतील. तुला इथं बघून काहीतरी विचारतील. तुझा काय प्रश्न नाही. परफेक्टली खोटं बोलशील. मला बोलता येणार नाही. जा!”

“मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही...” ती मुसमुसत म्हणाली.
“गेले पंधरा वर्षं कशी जगलीस ते पाहतोच आहे.” असिफ खुर्चीवरून उठला आणि त्यानं पुढे येऊन फ्लॅटचा दरवाजा उघडला पण रेश्मा जागची हलली नाही.. “तू जाणार नाहीस तर ठिक आहे. मीच घराबाहेर पडतोय..”
रेश्मा डोळे पुसत ऊठली. “नको.. मी निघते.” म्हणून ती घराबाहेर पडली.
असिफने लगेच दरवाजा बंद करून घेतला आणि सुन्नपणे कितीतरी वेळ बसून राहिला.
++++++++++
खणाखण मोबाईलची रिंग वाजत राहिली, तसा असिफ झोपेतून जागा झाला. सकाळचे साडेसात वाजले होते. आजचं शेड्युल दुपारी तीननंतर चालू होणार होतं, त्यापैकीच कुणाचा काहीतरी फोन असेल म्हणून त्यानं झोपेतच मोबाईल कानाला लावला. “बोलो”
“असिफ.. मी बोलतेय” पलिकडून माहीचा आवाज आल्यावर मात्र तो चांगलाच जागा झाला.
“माही! कुठं आहेस? एवढ्या सकाळी का फोन केलास? एव्हरीथिंग इज ओके?” त्यानं विचारलं.
पलिकडून काहीही आवाज आला नाही. “माही! प्लीज काहीतरी बोल. कुठं आहेस? ऑफिसमधून निघालीस का? मी तुला न्यायला येऊ??.. घरी ये ना!”
“असिफ.. मला तुला काहीतरी सांगायचंय...”
“जे काही सांगाबोलायचं ते घरी आल्यावर. इतकं भांडायची गरज आहे का? जवळ जवळ दीड महिना होत आलाय. मी फोन केला तर फोन उचलत नाहीस. मेल्स मेसेज कशालाच उत्तरं नाहीत. ऑफिसमध्येच राहतेस, कशासाठी? मी इथं रोज तुझी वाट बघतोय. हे असं कशाला?”
“मला पण तुझी खूप आठवण येतेय. पण तरीही...”
“आता कसला पण बिण काही नाही. तुझा प्रत्येक हट्ट, प्रत्येक मागणी मला मान्य आहे. इतके दिवस माझा फुकटचा इगो पोसत होतो. तू इतकी दूर जात असशील तर भाडमध्ये गेला तो इगो. तू हवीस. तू नाहीस तर घर फार सुनं सुनं झालंय. तू ताबडतोब घरी ये. आपण लग्न करू. तू म्हणशील तसं.”
"निव्वळ माझा हट्ट म्हणून?"
"नाही. मला असं फोन्वर सांगता येणार नाही. तू घरी ये मग आपण बोलू:"
माहीचा हसण्याचा आवाज आला “आधी मला काय सांगायचंय ते ऐक. त्यानंतरही मी घरी परत यायला हवी असेन का? ते सांग....”
“ऐकायचंच नाहीये मला. तू घरी ये. माझ्यासमोर बस आणि तुला काय सांगायचंय ते सांग. या घराला, या जगण्याला कशालाच अर्थ नाही. तू नसलीस तर...” बोलताना अचानक असिफचा आवाज भरून आला. “मी रडून हात जोडून माफी मागितल्यावर परत येणार आहेस का? मी साष्टांग नमस्कार घालून माफी मागायला तयार आहे. पण तू परत ये”
“तू परत ये, एवढयच मंत्राचा जप करणार आहेस का?” ती पुन्हा हसत म्हणाली.
“मला तुझ्यासारखं छान छान बोलता येत नाही म्हणून नाहीतर थांब, कुणाकडून तरी कविता वगैरे लिहून आणून तुला ऐकवतो. तमिळ कविता, पण तू परत ये. तुझ्या घरी.....”
“असिफ, ऐक ना. मलाही परत यायचं आहे, पण माझा लग्नाचा हट्ट आता फार क्षुल्लक वाटतोय.. असं काहीतरी घडलंय... असिफ.. आय ऍम प्रेग्नंट” माही अचानक म्हणाली. पलिकडून असिफचा थांबलेला श्वास तिला जाणवला. पण तो काहीही बोलला नाही. “असिफ.. ऐकतोयस ना?”
“नाही. तू घरी परत ये. तेव्हाच हे सगळं मला सांग. आता मी काहीही ऐकलेलं नाही, आणि मी त्याबद्दल काही बोलणार नाही. तू परत ये.”
"अजूनही आपलं नातं तसंच आहे?"
"कायम राहिल. पण तू घरी ये. इतकं पण सतावू नकोस."
“कधी परत येऊ?” माही हसत म्हणाली.
“कधी म्हणजे काय? आता लगेच. ताबडतोब. कुठं आहेस सांग? मी तुला न्यायला येतो. कुठं आहेस?”
“मी कुठं असणार? तुझ्यापासून जाऊन जाऊन किती लांब असणार? दरवाजा उघड. आपल्याच दारासमोर उभी आहे.” ती हसत म्हणाली.
(क्रमश:)


दरवाजा भाग 7

No comments:

Post a Comment