Monday, 3 November 2014

दरवाजा (भाग 5)

अरे सुन, आज शाम को आयेगा ना?” बाहेर निघालेल्या असिफला मिथुननं हाक मारली.
“पता नही” त्यानं मागं वळूनदेखील न पाहता उत्तर दिलं. पण मिथुन ऐकण्यातला नव्हता, तो असिफकडेच धावत आला. “ऐसा मत कर! साला, आजकी पार्टी मे तो आ जाओ. बघ, आज आपल्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणच नसेल.” मिथुन दोन्ही हात फैलावून फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला. “ये देखो.. अनारकली का ताजमहाल! पुरे २ करोडका. आज हम इसे तोडेंगे, तो पार्टी तो बनती है ना?”
असिफनं पुन्हा एकदा स्वत:च्या हातानं बनवलेल्या त्या भव्यदिव्य सेटवर नजर टाकली. शूटिंग चालू असेपर्यंत सेटची काळजी तान्ह्या बाळासारखी घेतली होती. आणि आता शूट संपल्यावर हाणामारातोडा काम चालू झालं होत्तं. सेट बनवायला महिना लागला होता. तोडायला अट्ठेचाळीस तास. “पार्टीसाठी खरंच वेळ नाही. माझं काम होतं. मला उद्या सकाळी भेटशील? मेहबूबच्या बाहेर.” असिफनं विचारलं.
“तुझं हे काम म्हणजे गेले चार दिवस मेहराच्या घराचे खेटे मारतोस तेच ना?” त्यानं अगदी कुजबुजत्या आवाजात विचारलं “भाई, तू ग्रेट आहेस. अजून तुला इंडस्ट्रीत येऊन चार वर्षं झाली नाहीत... आणि तू सोलो काम घ्यायची बात करतोस. जमणार आहे का? राशिदभाई कच्चा कापेल”
“रशीदभाईनेच हा लीड दिलाय. त्याला वर्षभर दुसर्‍या फिल्मचं काम मिळालंय, त्यामुळे ही सीरीयल जमणार नाही...” असिफनं हसत उत्तर दिलं. “मला त्यानं विचारलं की माझ्या नावावर तू बघशील का? म्हटलं, माझ्याच नावावर द्या. करून देइन. किती दिवस इथं कारपेन्टरगिरी करणार? सेट डीझायनर असिस्टंट असं ग्लॅमरस नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात करवत आणि हातोडा घेऊन फिरायचं... किती दिवस? तू येशील माझ्या टीममध्ये? पैशाचं वगैरे नंतर उद्या भेटून ठरवू”
“असिफ, तू यार दोस्त है मेरा. जहन्नममेंभी बोलेगा ना, आंख बंद करके आऊंगा. लेकिन एक शर्त पर... आज की पार्टी मे तू आयेगा... यार कितने दिनोंबाद ऐसी मेहफिल जमेगी. दस्तूरनं काय मस्त अरेंजमेंट केलीय. दारू, पोरी, डान्स, बार सबकुछ एकदम टॉपक्लास...”
“ओके. इथलं पॅकिंग आणि शिफ्टींग जर वेळेत झालं तरच.. नाही तर नाही”
“असं नाही. तू कसम खा. दोस्तीची कसम. आज तू यायलाच पायजे”
असिफने हसून मिथुनच्या पाठीवर थाप मारली. “चल, काम तो खतम कर”
साडेचार वर्षापूर्वी रेश्माच्या बापाकडून पैसे घेतले आणि मागचा पुढचा काही विचार न करता आरतीला घेऊन मुंबईला आला.
इथं आरतीचा मामेभाऊ रहात होता. असिफनं सगळी खरी परिस्थिती त्याला सांगितली. त्याच्याच मदतीनं जोगेश्वरीच्या झोपडपट्टीमध्ये एक खोली मिळवली. आरती गावामध्ये कशीही फिरत असली तरी तिला घरी यायचं बरोबर समजायचं. नाहीच समजलं तर गावामधलं कोणतरी दयाबुद्धी दाखवून घरी सोडायचं. इथं तिला एकटं ठेवणं शक्यसुद्धा नव्हतं. मुंबईच्या गर्दीला ती घाबरली होती. कुणाच्याही भरवश्यावर ठेवणार? त्यात परत घडत असलेल्या या घटनांमुळे ती प्रचंड बावरली होती.
गावाबाहेर पडताना एस्टीमध्ये बसल्यावर तिनं हळूच त्याला विचारलं. “रेश्मा येते?”
“आई. परत ते नाव तोंडातून काढायचं नाही. आता जगात आपण दोघंच. आधीही दोघंच होतो म्हणा, मध्येच ही कसलीतरी भुरळ पडली. राहू देत.. परत तिचं नाव घेऊ नकोस” तिला जवळ घेत असिफनं समजावलं. सगळं जग भले आरतीला वेडं म्हणत असावं, पण त्या रात्री असिफनं सांगितल्यानंतर एकदाही... एकदाही अगदी मरेपर्यंत तिनं रेश्माचं खरंच नाव काढलं नाही, की असिफला कधी तिच्याबद्दल विचारलं नाही.
मुंबईमधली खोली घेऊन सगळं स्थिरस्थावर करून एक दोन आठवड्यांत त्यानं आरतीला मालाडच्या एका आश्रमामध्ये ठेवलं.. इतक्या वर्षामध्ये आरतीला सोडून कधीच राहिला नव्हता. त्यात परत नवीन गाव, नवीन माणसं, ती कशी वागवतील, नीट खायला प्यायला देतील की नाही याची चिंता. तिला तर असिफ इथं सोडून जातोय हेच समजलं नव्हतं, नेहमीसारखा असिफ संध्याकाळी लवकर ये.. एवढंच ती म्हणत राहिली. आश्रमाच्या गेटबाहेर आल्यावर असिफ आयुष्यात पहिल्यांदाच रडला. रस्त्यावरून येणारे जाणारे त्याच्याकडे बघत होते. त्यानं मात्र कुणाची ही पर्वा न करता डोळ्यांमधल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
पैशाचा प्रश्न नव्हता, सध्यातरी. पण इतकेच पैसे घेऊन आयुष्य काढणं शक्य नव्ह्तं. आरतीचं सर्व व्यवस्था झाल्यावर त्यानं नोकरी शोधायला सुरूवात केली. डिप्लोमा अर्धवट राहिला होता. शिक्षण आणि नोकरी दोन्ही शक्य झालं नसतंच. आता काम करणं एवढाच एक रस्ता होता. त्यामध्ये असिफला काहीच प्रॉब्लेम नव्हता. इतकी वर्षं गावामध्ये वेगवेगळी कामं करून सवय होतीच. त्याला मदत करणार्‍या मामानं स्वत: एवढी वर्षं कुठल्यातरी दुकानामध्ये सेल्समन म्हणून काम केलं होतं. त्याच्या ओळखीनं एका फर्निचरच्या दुकानामध्ये काम मिळालं. तिथून अशीच ओळख होत होत राशिदभाईशी ओळख झाली. राशीदभाई फिल्स आणि टीव्हीमधला बापमाणूस. गेल्या चाळीस वर्षामध्ये त्याच्याइतके मोठमोठाले सेट्स कुणीच बनवले नसतील. मेहनती असिफला त्यानं लगेच कामावर ठेवून घेतलं. हाताखालच्या असिस्टंट आणि असिफमधला एक फरक महिन्याभरातच त्याच्या लक्षात आला. असिफ नुसतं सांगितलेलं काम करायचा नाही, स्वत:चं डोकंपण लावायचा. त्याच्या कामाला शिस्त होती. एके दिवशी असिफने सेटवर असंच रिकाम्या वेळात बसून केलेली स्केचेस राशिदभाईनं पाहिली, तेव्हापासून असिफवर अजूनच जबाबदारीची कामं टाकत गेला. हळूहळू असिफ ज्या प्रोजेक्टवर काम करेल तिथं फक्त फोनवर सूचना देऊनही चालू शकतंय हे पाहून त्यानं असिफला स्वत:चे प्रोजेक्ट स्वत:च करायची परवानगी दिली होती. राशिदभाईचं वय झालं होतं, मुलं या धंद्यामध्ये आली नव्हती. असिफलाच मनातल्या मनात मुलगा मानलं होतं.
असिफनं काममाधेच सगळा वेळ घालवला होता. गेल्या चार वर्षामध्ये एकदाही गावाचं नाव काढलं नव्हतं. सुट्टी असेल त्या दिवशी आरतीला भेटायला आश्रमामध्ये जायचं, उरलेला वेळ स्टुडिओमध्येच. त्यात शिवाय अजून एक पैसे कमवायचा छंद मिळाला होता, सोबत काम करणार्‍या स्ट्रगलर विकासचं नवीन घर त्यानं सजवून दिलं आणि त्याला आठवड्याभरात नवीन मालिका मिळाली. अवघ्या दोन महिन्यांत विकास टीव्हीचा सुपरस्टार झाला. या सगळ्याचं श्रेय असिफच्या हातगुणाला दिलं. तेव्हापासून आजतागायत आपल्या घराचं इंटीरीअर डीझाईनींग असिफकडे दिल्यावर नशीब पालटतं, अशी समजूत इंडस्ट्रीमध्ये पसरली. असिफनं आयुष्यात श्रद्धा अंधश्रद्धा पाळलेल्या नसल्या तरी या अंधश्रद्धेनं त्याचा फायदाच झाला होता. असिफनं या जगामध्ये काम करायला लागल्यावर स्वत:पुरतेच काहीही नियम घालून घेतले होते. कसलीही नशा करायची नाही, कसलीही भानगड करायची नाही, आणि कुणाह्च्याही फंदात पडायचं नाही. शक्यतो काम संपल्यानंतर चालणार्‍या मौजमजेपासून तो लांबच असायचा, पण आज अगदीच नाईलाज होता. पार्टी म्हणजे नुसता धांगडधिंगा, दारू आणि असलंच सगळं असणार याची कल्पना होती, पण आता मिथुनला तोडून चाललं नस्तं. कामासाठी तो हवा होत्ता. इथं अर्धाएक तास थांबायचं, आणि नंतर निघून जायचं असं ठरवूनच तो इथं आला होता.
पण ठरवल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडतेच असं नाही!
शैलजाला दरवाज्यावरच्या सतत वाजणार्‍या बेलने जाग आली, उठून घड्याळात पाहिलं तर रात्रीचा दीड वाजला होता. यावेळेला येणार म्हणजे कोण्तरी पेशंटच असणार. डोळे चोळतच तिनं दरवाजा किंचित उघडला. दारामध्ये उभा राहिलेला असिफ बघून ती दचकलीच. त्याच्या बाजूला मान खाली घालून उभी असलेली एक मुलगी उभी होती. “असिफ, आता कसा काय? काय झालं?”
“इमर्जन्सी आहे. हिला जरा चेक करशील.” असिफ शांतपणे म्हणाला.
“आत तरी ये!” शैलजा पूर्ण दरवाजा उघडत म्हणाली. “काय ऍक्सिडंट वगैरे झालाय का?”
“हिचं नाव जेसिका, हिला आत जाऊन चेक कर. ती सांगेलच” असिफ खुर्चीमध्ये बसत म्हणाला. “मी तुला मागेच म्हटलं होतं, क्लिनिक आणि घर एकच ठेवू नकोस. रात्री अपरात्री पेशंट येऊन त्रास देतील, बघ माझी भविष्यवाणी खरी ठरली ना?” शैलजानं हसून त्या मुलीला आतमधल्या तिच्या क्लिनिकमध्ये चलायला सांगितलं.
असिफ शांतपणं पुढ्यात ठेवलेली गृहशोभा वगैरे मासिकं वाचत बसला. पाचेक मिनिटांनी शैलजा बाहेर आली. “असिफ, काय प्रकार घडलाय? नीट सांग, मुलगी मायनर आहे. सतरा वय सांगतेय. तिला हिंदी मराठी येत नाही. इंग्लिश नीट समजतंय. इथली नाहीये. शी हॅज बीन रेप्ड. गॅंग रेप्ड. हातापायांवर बांधून ठेवल्याच्या जखमा आहेत. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. पोलिस केस होइल”
“रेप नाही झाला. काही जनावरं मस्तीमध्ये येऊन तिच्याशी खेळत होते. तिचे हातपाय गुरासारखे बांधून तोंडात बोळा कोंबून. शी इज अ प्रॉस्टीट्युट. भाड्यानं आज रात्रीच्या पार्टीसाठी आणली होती. तिथं मी हा प्रकार पाहिला. एकावेळेला दोघा तिघांनी मिळून.. व्हेरी डिस्गस्टिंग. म्हणून तिला तिथून घेऊन निघालो. तिच्या भडव्याकडं नेऊन सोडणार होतो, बट शी वॉज ब्लीडींग... म्हणून तुझ्याकडे घेऊन आलो. सरकारी हॉस्पिटलमध्ये नेता येणार नाही...”

“ओह गॉड. लोक काय विकृत वागतात. मुलीला अजूनही नीट बोलता येत नाहीये. आतून बाहेरून सोलवटून निघालीये. माझ्याकडे असतील ती औषधं वगैरे देते. पण तरी गायनॅककडे घेऊन जा. मी रेकमेंड करू का?”
“शैलजा, तेवढी माझी जबाबदारी नाही, तिच्या घरी... म्हणजे जिथं कुठं राहत असेल तिथं सोडून येईन. पुढचं ते लोक बघून घेतील. तुझा नवरा नाहीये का?”

“आज त्याची नाईट ड्युटी आहे. आमचं नवरा बायकोची अशीच गंमत चालू असते. कधी त्याची नाईट ड्युटी, कधी माझी. बरं असिफ, मी तिला पुन्हा एकदा तपासते, तू तोपर्यंत किचनमध्ये जा, आणि चहा कर. एवीतेवी झोपेचं खोबरं केलंच आहेस, तर किमान तुझ्या हातचा आयता चहा तरी मिळू दे. किती दिवसात घरी आलाच नाहीस!!” असिफनं चहा करून आणेपर्यंत शैलजा तिच्या तपासायच्या खोलीतून बाहेर आली. “ती चक्क झोपली. एक अर्ध्या तासानं उठवेन. तुझं काय चालू आहे? आरतीमावशी बरी आहे?” तिनं विचारलं. असिफनं नुसती मान डोलावली. “मी तिला भेटायला मागे गेले होते. मला ओळखलं नाही, पण तुझ्याचबद्दल सांगत राहिली... तुझं कॉलेज, तुझा अभ्यास असलं काहीतरी...”
असिफ हसला. “तिचं एकमेव स्वप्न, मी खूप शिकावं. दोन दोन मास्टर्स डिग्री असलेल्या बापाचा मी अर्धवट डिप्लोमा केलेला मुलगा. साला, किती विश्वास ठेवायचा नाही, म्हटलं तरी नशीब आपलं रूप असं थयाथया नाचून दाखवतंच”
“अजून इतकी पण वेळ गेलेली नाही, बर्‍यापैकी पैसा कमावतोस ना, मग कुठल्यातरी नाईट कॉलेजला वगैरे ऍडमिशन घे ना... तुला बारावीनंतर पण मी सांगत होते. माझ्यापेक्षा जास्त मार्क होते. मेडिकलला सहज ऍडमिशन मिळाली असती. खर्चाचं बाबा मदत करायला तयार होते. शेखरकाकांनी कधीकाळी बाबांना खूप मदत केली होती...”
“आईला सोडून जायचं नव्हतं, पण परत एकदा नशीब बघ, आता आईला अनाथासारखं आश्रमात ठेवलंय. फार त्रास होतो गं या सर्वाचा. आईची तब्बेत दिवसेंदिवस खराब होतेय. दर वेळेला भेटायला गेलं की जाणवतं.. आई दूर जातेय... जीव तुटतो. पण काही करता येत नाही..”
“तुला एक सांगू का? लग्न कर. घरात बायको आण. आरतीमावशीला घरी घेऊन ये. ती सांभाळेल. किती दिवस असा एकटाच राहणार आहेस..” असिफ काही न बोलता चहा पित राहिला. “जे झालं त्याला पाच वर्षाहून जास्त वेळ गेला. आता विसर. नवीन आयुष्य चालू केलं आहेस, तर नवीन साथीदार नको? खूप झाली ही देवदासगिरी!!”

असिफ पुन्हा गालातच हसला. “हसतोस काय? मागच्या महिन्यांत गावाला गेले होते तेव्हा तुझी हिरॉइन भेटली होती. तिला तू माझ्या संपर्कात आहेस ते माहित नाही. खूप खुश आहे हां... इथं तू असा दु:खी कष्टी... आणि तिथं ती एकदम कोडकौतुकात. दुसर्‍यांदा प्रेग्नंट आहे. सातवा चालू होता.”
“पहिली मुलगी आहे ना?” असिफनं हातातला कप खाली ठेवत विचारलं.
“हो. आता यावेळी मुलगाच व्हायला हवाय, म्हणून देव पाण्यात घातलेत. मला तिच्या आईनं विचारलंच, तपासून बघशील का? म्हटलं, पोलिसांत केस करेन.. हे लोकं सुधारण्यातले नाहीत रे. पैशाचा भलता माज चढलाय. गावातली एक नंबरची घाण आहे. ते कॉलेज ताब्यात घेऊन त्यावर नागासारखी वेटोळी मारून बसलेत हरामखोर.”
“जाऊ देना. कशाला विषय काढायचा? तूच म्हणालीस ना.. जे झालं ते होऊन गेलं. आता काथ्याकूट करण्यात काहीच अर्थ नाही.”
“मग आताबद्दल बोलू.. लग्न कधी करतोस?”
“त्या लग्न शब्दाची पण मला शिसारी बसलीये. त्यामुळं आयुष्यात काहीही करेन. पण लग्न करणार नाही.”

“बरं, नको करूस. पण कोणतरी आयुष्यात येऊ देत. एकटं जगण्यात मजा नाही... कुणाचातरी हात धरायला नको.”
“चल. तू येतेस सोबत?” असिफनं तिला चिडवलं.
“हा माझा नवरा भेटायच्या आधी विचारलं असतंस ना तर खरंच आले असते. तुला सोडणार्‍यांचं नशीब करंटं!” शैलजा त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाली.
“चल, या जेसिकाला उठवतेस का? रात्र खूप झाली. तुला उद्या परत ओपीडी असेल.” असिफ म्हणाला.
“तिचं नाव जेसिका नाही, धंद्यासाठी घेतलेलं नाव आहे. तमिळ आहे. खरंनाव काहीतरी “एबीसीडी मायिलकारिणी” असं म्हणाली. हाय सोसायटी गर्ल आहे, त्यामुळं असल्या जंगली वागण्याची सवय नाही. तशीपण नवीनच आहे... दिवसा कॉलेजला जाते. सावत्र आईनं तीन वर्षापूर्वी कोइमतूरमध्ये विकली. दिसायला गोरी वगैरे म्हणून कामाठीपुर्‍याच्या कोठ्यामध्ये न जाता या “एस्कॉर्ट सर्व्हीसमध्ये” आहे.”
“तू डॉक्टर आहेस की पत्रकार? केवढी माहिती गोळा केलीस!”
“असिफ, मुलगी चांगली हुशार आहे. बारावीला मार्क चांगले पडलेत. पुढं शिकायचं म्हणाली. तू मदत करशील?”

+++++++++++++++
असिफ लॅपटॉपवर डीझाईन चेक करत होता, तेव्हा त्याचा मोबाईल वाजला.
“असिफसर, जेसिका हीअर! तुम्ही कॉल करायचा मेसेज टाकला होता” ती घाबरल्या आवाजात बोलत होती. तमिळ टोनमधलं ते इंग्लिश ऐकून त्याला कायम गंमत वाटायची.
“डोन्ट कॉल युअरसेल्फ़ जेसिका, युज युअर नेम. मला सर वगैरे म्हणणं बंद कर. मी मेसेज केला होता सगळं व्यवस्थित आहे का ते विचारायला. कॉलेज ठिक चालू आहे? काही प्रॉब्लेम? हॉस्टेल ठिक आहे?”
“एव्हरीथिंग इज ओके...”
“त्या तुझ्या भडव्या प्रवीणचा काही फोन वगैरे?” त्यानं विचारलं.
ती काहीही न बोलता शांत राहिली. “त्याचा फोन आलाच तर त्याला सांग माझ्याशी बोलायला. मी काय ते बघून घेईन. तू काही बोलू नकोस. अंडरस्टूड?”
“येस सर... तो मला अधूनमधून फोन करतोच. कुठे आहे.. कशी आहे ते विचारायला.”
“त्याला सांग! तुझा आता माझ्यावर काहीही हक्क नाही. परत फोन करू नकोस. आणि तू अभ्यासात लक्ष दे. बाकीच्या भानगडी मी बघेन. मला दर आठवड्याला एकदा फोन कर. काही प्रॉब्लेम आलाच तर दिवसरात्र काहीही न बघता फोन कर. ओके?”
“येस सर.. आय कान्ट थॅंक यु एनफ, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंत ते... तुम्ही खूप ग्रेट आहात”
असिफनं हसून फोन बंद केला. नजर वर करून पुन्हा एकदा सेटच्या डीझाईनवर नजर टाकली. दिग्दर्शकाला कोठेवालीचा महाल हवा होता. आरसे महाल. जिथं नजर जाईल तिथं आपलंच प्रतिबिंब दिसणारं. कोठेवाली खूप सुंदर होती, तिच्या सुंदरतेची ग्वाही देणारी चित्रं या महालात लावायची होती.
जिथं तिच्या शरीराचा सौदा रोज रात्री होणार होता, ती जागा भव्यदिव्य, डोळे दिपवून टाकणारी वगैरे बनवायची जबाबदारी त्याच्याकडे होती.
नकळतच त्याच्या डोळ्यासमोर जेसिका उभी राहिली. शैलजा म्हणाली ते खोटं नव्हतं, मुलगी हुशार होती. पुढं शिकायचं होतं. धंद्यामध्ये अजून थोडे दिवस राहिली असती तर ही हुशारी वायाच गेली असती.

त्या रात्रीनंतर चारपाच वेळा तिला काहीनाकाही निमित्तानं भेटला राहिला. तिला जाणून घेत राहिला. नंतर त्यानं रशीदभाईकडे तिचा विषय काढला. रशीदभाईचे कॉंन्टॅक्ट अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये होते. कुणाचातरी वशीला वापरून पोरीचा सौदा केला. चार लाख रूपये कॅश.
असिफ शेखरनं ही मुलगी विकत घेतली, रेश्माच्या बापाकडनं आणलेल्या नोटा जशाच्या तशा प्रवीणला दिल्या.

स्वत:च्याच बायकोचा सौदा करून विकत आणलेली वेश्या, असिफ स्वत:शी पुटपुटला. आणि मग कितीतरी वेळ खुर्चीवर डोकं टेकून एकटाच हसत राहिला. स्वत:च्याच या विचित्र योगायोगावर.
++++++++++
माहीनं मोबाईल बंद केला तरी हृदयाची धडधड बंद झालेली नव्हती. कॉलेजची वेळ होत आली म्हणून तिनं आवरायला घेतलं तरी मन मात्र अजूनही घाबरलेलंच होतं. असिफचा फोन आला की अशीच विचित्र भिती अंगभर दाटून यायची.
गेल्या कित्येक दिवसांमध्ये असिफ येऊन तिला भेटून गेला होता. एकदाही “गिर्‍हाईक” म्हणून आलेला नव्हता. पण तिचं कॉलेज, तिचा अभ्यास यावर काहीबाही बोलायचा. मध्येच एकदा तिला घेऊन हॉस्पिटलात गेला, आणि कसल्याकसल्या टेस्ट करवल्या. नक्की काय चालू आहे हे तिला समजत होतं, तिच्यासोबत राहणार्‍या मुली म्हणाल्या की हा माणूस फिल्म इंडस्ट्रीमधला आहे, कदाचित नागड्या पिक्चरसाठी तिला घेणार असेल.
असं काही झालं तर आपण आत्महत्या करायची, असं माहीनं केव्हाच ठरवलं होतं. वयाच्या पंधराव्या वर्षी सावत्र आईनं पंचवीस हजारावर तिला देऊन टाकलं होतं. तेव्हापासून तिची खरेदी विक्री चालूच होती. ज्या दिवशी तिला समजलं की अजूनच तिसर्‍यानं विकत घेतलंय, त्या रात्री तिचा डोळ्याला डोळा लागला नाही. पण घडत असलेल्या घटना वेगळ्याच होत्या. असिफ तिला घेऊन त्याच्या घरी गेलानाही, हॉटेलवरसुद्धा गेला नाही. तिची ऍडमिशन एका कॉलेजमध्ये केली होती. बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा डिग्री कोर्स. रहाण्यासाठी कॉलेजजवळचंच एक हॉस्टेल.

“इथं कुणालाही तुझ्याबद्दल काही सांगू नकोस. आजपासून तू फ्री आहेस. मी तुला विकत घेतलं असलं तरीही... तू फ्री आहेस. पुन्हा त्या दलदलीचा विचारसुद्धा करू नकोस. पैशाची काही अडचण आलीच तर मला फोन कर. हे तुझं नवीन आयुष्य आहे.. सगळं चांगलं होइल” तिला समजावत तो म्हणाला. ती भारावल्यासारखी त्याच्याकडे नुसती बघत राहिली. जे घडतंय ते एखादं स्वप्न असल्यासारखं वाटत होतं. जगात असंही काही घडू शकतं यावरचा तिचा विश्वास केव्हाच उडाला होता.
तो विश्वास पुन्हा एकदा तिला असिफनं दिला होता.
कॉलेज चालू झाल्यावरपण ती मध्येच कधीतरी असिफला भेटायची. तो तिच्या कॉलेजबद्दल, कुठले विषय चालू आहेत, ती कुठली पुस्तकं वाचतेय वगैरे विचारायचा. स्वत:बद्दल फार कमी सांगायचा, तिनं काही विचारलंच तर जेवढ्यास तेवढंच. एकदा मात्र, बोलताना म्हणाला की त्यानं आईला ज्या आश्रमात ठेवलं होतं, ती संस्था आश्रम बंद करायचा विचार करत होती. आईची सोय कुठं लावायची हा प्रश्न त्याला सतावत होता. आधीच आईची तब्ब्येत खालावलेली, त्यात आता जागा बदलायची, म्हणजे सगळंच कठिण पडलं असतं.
तिला वाटलं त्याच क्षणी त्याला विचारावं. पण तिनं स्वत:ला सावरलं. “ती आपली लायकी नाही” स्वत:लाच ती म्हणाली. पण तरी चारपाच दिवस याचाच विचार करत राहिली. शेवटी असेल नसेल तो सगळा धीर एकवटून तिनं असिफला फोन केला.
“तुझी काहीच हरकत नसेल तर मी तुझ्या आईला सांभाळू शकेन. इथं हॉस्टेलला पैसे देण्यापेक्षा एका खोलीत आम्ही राहू शकतो. माझ्य कॉलेजच्या वेळेमध्ये एखादी बाई ठेवता येईल. उरलेला वेळ मी बघेन. काही त्रास होऊ देणार नाही.” ती कशीबशी म्हणाली.
“आणि तुझ्या अभ्यासाचं काय?” त्यानं विचारलं.
“डोण्ट वरी, मी दिवसातून एक तास अभ्यास केला तरी पुरेसा आहे. तेवढा वेळ मला नक्कीच मिळेल.”
त्या रविवारी असिफ माहीला घेऊन त्या आश्रमात गेला. आरती आता कुणालाच ओळखत नव्हती. अवघ्या पन्नाशीची आरती सत्तरीच्या म्हातारीइतकी थकली होती. पण माहीला बघून प्रचंड खुश झाली होती. तिच्याबरोबर तासनतास गप्पा मारत बसायची, कितीतरी वेळा माहीला तिचं बोलणं समजायचं नाही. तरी ती ऐकत बसायची.

तिचं खरं नाव कितीहीवेळा सांगितलं तरी आरतीला काही म्हणता येईना, मग तिनंच सुटसुटीत “माही” केलं, असिफ पण थोड्या दिवसांनी माहीच म्हणायला लागला, कागदोपत्री नाव कागदावरच राहून गेलं. असिफनं ठरवलं होतं, हे सेमिस्टर झालं की माहीनं हॉस्टेल सोडायचं, त्याच्याच खोलीमध्ये रहायचं. आरतीला घरी घेऊन यायचं. इतकी वर्षं तिला असं पोरक्यासारखं सोडलं होतं, आता मात्र तिच्या स्वत:च्या लेकाच्याच घरामध्ये ती राहील.
पण असिफचं हेही स्वप्न अधुरं राहिलं. एके रात्री आश्रमामधून फोन आला. हृदयविकाराचा तीव्र झटका. आरती कायमची निघून गेली होती. आजपर्यंत कधीही असिफ कोसळला नव्हता, उद्ध्वस्त झाला नव्हता. आज खर्‍या अर्थानं तो अनाथ झाला.

आरतीला विद्युतदाहिनीमध्ये आत ढकलताना बाजूलाच उभ्या असलेल्या माहीचा हात त्यानं घट्ट धरला. माहीनं वळून त्याच्याकडे पाहिलं. असिफच्या गालावर आलेला अश्रू तिनं टिपला.
ही त्यांच्या नात्याची खरी सुरूवात होती....

+++++++++++++++++
रेश्मा दोन पावलं पुढं गेली, हात दरवाज्याच्या बेलपर्यंत गेला आणि परत खाली आला, पुन्हा ती दोन पावलं पाठी गेली. शेवटी स्वत:लाच तिनं ठामपणं समजावलं आणि पुढे येऊन तिनं बेल मारली.
दोन मिनिटांनी असिफनं दरवाजा उघडला. “येस?” त्यानं अनोळखी व्यक्तीला विचारतात तसं विचारलं. तसंपण रेश्मा त्याच्या ओळखीमध्ये होतीच कुठे?
“असिफ, एक काम होतं...”
“माही इथं नाही. यु एसला गेलीये.”
“तुझ्याचकडे माझं काम होतं... तुझ्याशी थोडं बोलायचं होतं... तू प्लीज एकदा... एकदा ऐकून घे ना”
“काय ते इथं दरवाज्यात उभं राहून बोल. घरात माझ्याशिवाय कुणी नाही. मी तुला घरात घेणार नाही.”
“असिफ, जिन्यामध्ये नको. कुणी ऐकेल.... मी आत येऊन बोलते ना.. प्लीज पाचच मिनीटं. खरंतर मला आज सकाळी माहिचा फोन आला होता. तिनं तुझ्यासाठी एक निरोप दिलाय.. प्लीज आत येऊ देत.” रेश्मा घाबरतच म्हणाली. असिफनं दरवाजा पूर्ण उघडला. रेश्मा आत आली. त्यानं तिला सोफ्यावर बसायला सांगितलं.
रेश्मा असिफकडे बघत असताना पुन्हा एकदा भूतकाळातल्या संवेदना पुन्हा जागृत झाल्या. तिला वाटलं असंच पुढे अजून दोन पावलं जावं, आणि झोकून द्यावं स्वत:ला पुन्हा एकदा त्या असिफ नावाच्या समुद्रामध्ये.
पण असिफची नजर मात्र दगडासारखी निश्चल होती.
“काय निरोप आहे?” त्यानं कोरड्या आवाजात विचारलं.
“असिफ, आय ऍम सॉरी.. पण माही बिझनेस ट्रीपवरून परत आल्यावर तुझ्याशी भांडून घर सोडून गेली आहे असं तिनं मला सांगितलं. तुमचं भांडण कशावरून झालंय तेही मला माहित आहे”
“मग?”
“माहीनं तू ठिक आहेस का ते विचारायला सांगितलं होतं.”
“तिला म्हणावं, ती मुंबईमध्येच आहे, आणि कुठे आहे ते मला माहित आहे. गेले दोन महिने तिची सगळी खबरबात मी ठेवली आहे. मी ठीकच आहे. एवढाच निरोप द्यायचा होता ना?”
“असिफ, का असं वागतोयस? ती तुला फक्त लग्न कर म्हणतेय.. तर तू का नाही..” रेश्मा एक एक शब्द कसाबसा उच्च्चारत म्हणाली. तिच्या या वाक्यासरशी असिफच्या नजरेमध्ये वणवा पेटत गेला.
“हा प्रश्न तू विचारतेस? माझं अख्खं आयुष्य बरबाद करून मग तू आज पंधरा वर्षांनी मला हा प्रश्न विचारतेस?”
“आपण दोघंही भूतकाळ बदलू शकत नाही, माझं चुकलं हे मी कबूल केलंय... मी गुन्हेगार आहे. मी त्यावेळी खोटं बोलले, तुला नकार दिला. पण आता त्यासाठी तू माहीला का शिक्षा देतोस? तिची काय चूक आहे?”
“तिची काहीच चूक नाही. जो काही मामला आहे, तो आम्ही दोघं बघून घेऊ.. आता तू निघालीस तरी चालेल. मला उगाच इथं गॉसिपिंग नकोय. जा!!” तो शांतपणे म्हणाली.
“नाही, असिफ. आज जोपर्यंत माझ्या मनात काय आहे ते तुला सांगत नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही... गेल्या पंधर्रा वर्षातील प्रत्येक क्षणाचा हिशोब तुला दिल्याखेरीज मी आज जाणार नाही....”दरवाजा (भाग 6)

No comments:

Post a Comment