अजून एक पेग, अजून एक बर्फाचा
तुकडा, अजून एक उसासा, अजून एक रात्र.
कदाचित शेवटची रात्र.
पंधराव्या मजल्याच्या माझ्या खिडकीतून अजून दिसतायत येणार्या जाणार्या गाड्या.
या गाड्या ज्या रस्त्यावरून धावतायत त्याच्यापलिकडे एक समुद्र आहे. काळा काळा.
अक्राळ विक्राळ. मला त्याच्यामधे ओढून घ्यायला बघतोय. पण मी का घाबरतेय? सर्व संपवायचच
असं ठरवल्यावर घाबरायचं कशाला आणि किती?
शून्यात डोळे लावून बसलेय
मी. कोणतरी स्वतःच्या दर्दभर्या आवाजात गझल म्हणतय. मूर्ख माणूस, दु:ख विकली जातात
म्हणून विकायला बसलाय. आणि त्याहून मूर्ख कुणीतरी विकत घ्यायला तयार आहे, मीपण त्यातलीच्
एक मूर्ख.. पण का म्हणून दु:ख विकत घेतीये मी? माझ्याकडे खूप दु:ख आहेत म्हणून की अजिबात दु:ख
नाही म्हणून. हे सुख आणि दु:ख कशावरून ठरवतात लोक? मी सुखी आहे का दु:खी हे कोण सांगेल मला?
पण आता सांगून काय होणार? बाण कधीचाच
सुटलाय. हळू हळू त्याच्या शिकारीकडे जातोय. शिकार सुखी आहे की दु:खी याच्याशी त्या
बाणाचा काय संबंध? तो तर फक्त घुसणार. आरपार.
माझ्या हातातला पेग
संपलाय का? की मी मघाशी बनवूनच नाही घेतला? खूप घेतलिये का मी आज? पण अजून तर चढली नाही...
मग हे माझ्या घरात कोण
उभं आहे? आशिष?? तू इथे?? यावेळी??
बोलत का नाहीस? अजून रागवलायस? मी तुला सोडून
दिलं म्हणून. अरे चक्क अकरा वर्षे झाली
त्या गोष्टीला... कित्ती वेळा मी समजावलं
तुला? मला नव्हतं तुझ्याशी लग्न करायचं. जबरदस्तीने केलं माझं लग्न. माझ्या आईबापाला
माझ्या चारित्र्याची काळजी होती म्हणुन. त्याना सारखं वाटायचं की मी कुणाचा तरी
हात धरून पळून जाईन म्हणून. हं... मी अशी कुणाचा तरी हात धरून् पळाले असते का रे?? आकाशात उडायची
स्वप्ने माझी. कुणाच्या तरी खुराड्यात जन्म कसा काढला असता... तुझ्या खुराड्यात
तरी कशी राहिले असते रे मी?
कधीच नव्हते तुझी मी.
कुणाचीच नव्हते मी... माझी स्वत:ची होते. मी होते.. मी.. माझ्याशिवाय माझ्या
आयुष्यात दुसर्या कुणाला कधीच स्थान नव्हतं, आणि कधीच नसेल.
काय मिळालं असतं मला
तुझ्यासोबत राहून? मोकळ्या पंखांचं स्वप्न घेऊन फिरणारी मी, क्षितिजाच्या
पलीकडल्या जगात जायचं होतं मला. खूप दूर. माझ्या गावापासून, माझ्या
लोकापासून. मला स्वतःला शोधायचं होतं. सापडले का मी?? की हरवून गेले? कुणास ठाऊक? आयुष्याच्या हिशोबाची गणिते आता मांडून काय
उपयोग? सर्वच समीकरण सुटल्यावर मग...
होय, सोडलं मी तुला.
तुझ्या स्वप्नामधे मला काही स्वारस्यच नव्हते. आयुष्याची इतिकर्तव्यता दोन मुलं
जन्माला घालणं आणि घर बांधणं यात असलेला तू आणि मी?? आयुष्यात कमावण्यासारखं असलेलं सर्व काही
कमवायची इच्छा होती मला. आणि सर्व काही गमवायची तयारी ठेवून. कसं जमलं असतं रे
आपलं? नातं नुसतं लग्नाने नाही तयर होत. नातं बनतं ते दोन व्यक्तीच्या एकत्र
येण्याने. शरीरानेच नव्हे तर मनाने. तुझं बाळ मी पाडून टाकलं म्हणून तुला राग आला
होता ना.. अरे, अशी कुठलीच गोष्ट मला नको हवी होती. माझ्या रस्त्यात अडचण ठरणारी. तुझंच काय
पण अजून एक पण मी पाडून टाकलं.. कुणाचं होतं ते मात्र खरंच आठवत नाही!!
किती हृदयशून्य, निर्दयी आणि
दुष्ट आहे ना मी? तुझी आई काय म्हणायची रे कायम? कुणाच्या
टाळूवरचे लोणी खाणारी.. हं.. कुठल्या कुठे गेले मी. स्वतःच्या हिमतीवर आणि
ताकदीवर. माझ्या नशीबाच्या जोरावर.
काय?? नशीब म्हटलं का
रे मी?? की तू म्हणालास ?? धत, मी नशीब म्हणणारच नाही. कधीच विश्वास नव्हता असल्या फालतू
गोष्टीवर. कुडाळसारख्या गावात जन्मलेली
आणि शिकलेली मी. ते पण मराठी मीडीयममधे. आज बघ कुठे आहे.. तू बहुतेक अजून तिथेच
असशील ना? मी तुला सोडलं तिथे.. एकटी आहे मी??
कुणी सांगितलं तुला? सर्व काही आहे
माझ्याकडे. तीन गाड्या आहेत, तुझं घर भरून जाईल इतका पैसा आहे.. जरा नीट बघ.. घर बघ..
माझं.. स्वतःच घर.. एकटीचं घर.. एकटीचं.........
माझं डोकं त्याच्या
छातीवर ठेवून तो म्हणाला होता.. "कशीही असलीस तरी माझी आहेस. मी सांभाळेन
तुला आयुष्यभर. कधीही सोडणार नाही तुला"
पाच साडेपाच वर्षं झाली
त्याच्या लग्नाला. पत्रिका पाठवली होती त्याने. कुठल्यातरी खेड्यात लग्न होतं
त्याचं. काय बरं नाव ?? त्याचं सुमीत. ते आठवतय् मला, इतकी पण विसरली नाहिये मी.. .. बायकोचं नाव
आठवतेय.... .. अं... राजिसा नाही.. हे काय
नाव आहे का?? नाही .... प्राची बहुतेक.. काहीही असेल. मला काय!!
"माझं फार फार प्रेम आहे तुझ्यावर." दिवसातून पंचवीस
वेळा तरी म्हणायचा. बाकीचे नुसते नर. नुसते मादीच्या शरीराला झटायला आतुर. हापण
त्यातलाच. पण कमीतकमी हा म्हणायचा "प्रेम आहे, दूर जाणाअर नाही.. हिंदी पिक्चर फार बघायचा.
चाप्टर साला. त्याला
माहित होतं, त्याला या कंपनीमधे कन्फर्म फक्त मीच करू शकते! सौदेबाजी सगळी!
मी नाही केलं त्याला
कन्फर्म. रोज रोज त्याला भरभरून सुख दिलं, माझ्या घरात रहायला ठेवून घेतलं. आणि वर त्याला
कायम पण करू.. हट.. सौदेबाजीला पण सीमा असते.
पण साला तो आवडायचा मला. रोमँटिक वगैरे होता. एकदा चक्क गजरा घेऊन आला होता
माझ्यासाठी, माझे सर्व परफ्युम्स फ्रान्सवरून येतात आणि हा गाढव मला गजरा घालायला निघाला
होता. मूर्ख. पण तरी कधी तरी त्याचा हळूवारपणा सुखावून जायचा. एखादी सतार छेडत
जावी तसा तो माझ्या शरीराला छेडायचा.
आज का आठवतोय मला तो?? कलियुग आहे ना? सर्व हिशोब इथेच
संपवायचे आहेत. त्याचा हिशोब काही शिल्लक नाही, हेच सांगायचय. तो सोडून गेला त्यादिवशी त्याचा
पत्ता आयुष्यातून कट केला. आणि त्यानंतर कुणालाही इत्कं जवळ केलं नाही की त्याची
सवय होइल.
महिन्याला दोन क्लायंट्स
आणून द्यायचे मी बॉसला. आणि क्लायंट्स नुसते येत नाहीत!!
त्यात राकेशभाईशी ओळख
झाली. मस्त दिलदार माणूस. त्याने माझी कुवत जाणली आणि त्याच्या कंपनीमधे
क्रीएटिव्ह हेड म्हणून घेतलं. लोकाची बॉसगिरी सहन करायचे दिवस गेले. आता मीच बॉस!!
खूप जगले मी,. प्रचंड जगले.
अख्खं जग फिरले. माझ्या सात पिढ्यात कुणी पाहिला नसेल इतका पैसा कमावला. आणि खर्च
पण केला. रोज नवी बेहोषी, रोज नवा स्पर्श,
रोज नवीन आयुष्य. खूप खूप जगले मी. कसलीही आशा
अपेक्षा आकंक्षा उरली नाही...
अवघे अकराच वाजलेत ना? मग रस्त्यावर
गाड्या का नाहीयेत? मला इथून गाड्या बघायला फार आवडतं. कधी एकटीच असले तर मग
बघते. हल्ली बर्याचदा इथे खिडकीतच असते मी. सर्व इतकं शांत शांत का आहे? त्या दु:ख
विकणार्याचं दुकान बंद झालं का? कुठे गेला तो? परत दु:ख विकायला येइल का तो? माझा ग्लास कुठाय? मघाशी तर हातात
होता.. मी कुठाय? आणि एक मिनिट... कुणाचं घर आहे हे?
कोण?? कोण?? किंचाळतय तिथे? अरे
प्लीज... ओरडू नका. कोण आहे माझ्या घरात..
पोलिस,.. पोलीस.. हे किती लोक आहेत बघा ना.. मी काहीही पैशाचा झोल केलेला नाहिये...
बीलीव्ह मी.. माझ्यावर विश्वास ठेवा.. ऐका जरा प्लीज.. सर्व हसतायत का? आणि मी.. मी
रडतेय का?
काय केलय मी? मला का मारताय?? अहो, मी नाही ओळखत
तुम्हाला. राकेशभाई... राकेश भाई.. अहो, हे काय चाललय? तुम्ही सांगितल्याशिवाय कशावर पण मी सही नाय
केली ऐका जरा..
सांगा ना तुमच्या
बायककोला.. बंदूक घेऊन धमकी देतीये मला. काय गुन्हा कबूल करू मी?? ...
*****
किती वेळ पडून आहे मी
इथे... पायाला लागलय बहुतेक माझ्या. काय लागलय.. रक्त तर दिसत नाही.. मग जखम कसली? फोन.. फोन वाजतोय
का माझा? राकेश भाईचा नंबर. नाही, त्याचा नाहिये. कुणाचा नंबर आहे हा??कोण कशाला फोन
करतोय मला? ते पण रात्री दोन वाजता? दोन वाजले? पण मघाशीतर काही वेगळेच वाजले होते ना? बहुतेक दहा किंवा
अकरा? मी अजून जिवंत आहे का??
का होतय मला असं.? वेड लागलय का मला? मघाशी काही काही
भास होत होते का मला? का होतायत मला असे भास? का घाबरलेय मी? पहिल्याच पेगमधे ते कसलं तरी औषध.. अंहं विष
घातलं तेव्हा नाही घाबरले.
राकेशभाईने मला
पार्टनर्शिप ऑफर केली तेव्हा का नाही घाबरले. स्वतःची जीत वाटली ती मला. आणी आज का
घाबरतेय?? तेपण आत्ता?? परत फिरायचे सारे मार्ग बंद केल्यावर.
का घेतला मी हा निर्णय?
हेराफेरी केली म्हणून? की तसा आरोप आला
म्हणून?? छे! इतक्या मूर्ख कारणासाठी मी नाही असं करणार. हा. वकिलाच्या मते मी यातून
सुटू शकते.. कदाचित.. आणि कदाचित नाही. आणि माझं काहीही झालं तरी राकेशभाई सुटणारच
सुटणार.
मग मी त्यालाच का अडकवू
नये? आयुष्यात सर्व काही मिळवल्यावर अजून काय मिळवायचे शिल्लक आहे. आशिष कायम
म्हणायचा.. वासनेचा ज्वालामुखी आहेस तू! पण आता ज्वालामुखी स्वतःहून विझतोय. खूप
खूप मिळवलं मी.. आता खूप खूप सोडायला हवं. इथून जायलाच हवं. या जगातलं सर्व जगून
घेतलं. आता त्या जगात काय आहे ते पहायचय मला. तहान अजूनही शांत झालेली नाही. मात्र
मला आता तेच आयुष्य नकोय. दुसरे आयुष्य हवय. इतके दिवस जिंकून मग मी हरणार आहे का?
त्या मूर्ख राकेशभाईची
मूर्ख बायको घरी येऊन धमकावून गेली आपल्याला. तेपण बंदूक वगैरे दाखवून. म्हणते की
गुन्हा कबूल कर. नाहीतर माझी सर्व स्टोरी मीडियामधे देइल.
काय देइल? की माझं लग्न
झालं होतं. मी नवर्याला सोडलं. हवी तशी वागले. देऊ देत ना.. कोण घाबरतय, पण राकेशभाई
म्हणतो की जर हे पेपरात गेलं तर शेअर मार्केटमधे झोल होइल.. नवरा बायको दोघंही
मिळून गेम करतायत माझा. आणि मी त्यांचा गेम करतेय. सालं नाहीतरी हल्ली सारखं हे
आयुष्य संपवावं असं मनात येत होतंच. मग जाता जाता या दोघाची जिंदगी खराब का करू
नये मी? मला अडकवत होते हे दोघं... घ्या आता... निस्तरा सर्व लफडं
मूर्ख राकेशभाई, त्याला समजणार
सुद्धा नाही की काय झालं कसं झालं आणि कधी झाल..
... उद्याची सकाळ. आणि तो फिनिश...
सर्व कागदपत्रं आणली मी.
सर्व व्यवथित पणे केलय. पैशाचा झोल मी आणि राकेशभाईने केला.. मी नाही म्हणत असं..
कागदं बोलतायत. कोर्टात तेच सांगतील. राकेशभाई आणि त्याची बायको माझ्या घरी आलेले
होते. वॉचमन सांगेल. तीन पेग बनवले. राकेशभाईने. हाताचे ठसे सांगतील. मी त्यात विष
त्याच दरम्यान मिसळलं. मीच सांगतेय आत्ता. आणि मी रात्री तीनच्या दरम्यान कधीतरी
संपले. पोस्टमार्टेम सांगेल. राकेश. तू मला अडकवून सुटायला निघत होतास. घे.. आता
हेराफेरी आणि पार्टनरचा खून.. अं हं... आजही मी हरले नाहिये.
इथे येऊन पण मीच जिंकले.
कधीच हारले नाही. पण सालं दु:ख एकाच गोष्टीचं राहिलं,. आयुष्य सर्व असंच
गेलं. आपलं म्हणावं असं कुणी राह्यलं नाही. मरताना कुणाचा तरी विचार करून मन
शहारून यावं असं झालंच नाही. पाय घट्ट रोतून ठेवावेत अशी जमीन कधी भेटलीच नाही.
अशीच राहिले मी. अधांतरी. .....
== समाप्त==
No comments:
Post a Comment