Friday 7 November 2014

दरवाजा भाग 7

माही उठून किचनजवळ आली. असिफ ब्रेकफ़ास्टची तयारी करत होता. “गूड मॉर्निंग.” तिला बघताच तो म्हणाला. “बरं वाटतंय?”


माहीनं नुसती मान हलवली, काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडणार, इतक्यात थांबली आणि तोंडावर हात धरून बाथरूमकडे पळाली. ते पाहून असिफने कपाळावर हात मारून घेतला आणि दूध ठेवलेला गॅस बंद करून किचनची ओट्याजवळची खिडकी उघडली. थोडयावेळानं हॉलमध्ये सोफ्यावर डोकं टेकून बसलेल्या माहीच्या हातात चहाचा कप देत त्यानं  परत एकदा  विचारलं. “बरं वाटतंय?” 


“असिफ, चहा नको” तिनं कप खाली ठेवत म्हटलं. “आता काहीच नको” 


“ज्युस घेतेस का? लिंबूपाणी?” त्यानं हलकंच तिच्या केसांतून हात फिरवत म्हटलं. “डॉक्टरकडे जाऊन यायचं का?” 


माहीनं परत नुसती मान हलवली, “दोन दिवसांपूर्वी तर जाऊन आलोय. परत कशाला?”


“हा डॉक्टर पण ग्रेट आहे, काही विचारलं तरी “हे नॉर्मलच आहे” एवढं एक उत्तर देतोय. मी थोड्यावेळानं शैलजाला फोन करतो, आपण तिच्याकडे जाऊ..” त्यानं किचनमधून सरबताचा ग्लास आणून तिच्या हातात दिला. 
“मी फोन केला होता. त्या म्हणाल्या की मॉर्निंग सिकनेस हळूहळू कमी होइल”


“मॉर्निंग? दिवसातले चोवीस तास ओकूबोकू करतेस... आणि शैलजाला सांग. मला काही प्रेग्नन्सीमधला जास्त अनुभव नाही, पण तरी... आता काहीही हळूहळू कमी होणार नाही, जे आहे ते वाढतच जाणार आहे” असिफ हळूच म्हणाला, माहीनं त्याला एक फटका मारला, “काहीही फालतू जोक्स मारू नकोस. तुला शोभत नाहीत”


“पण सीरीयसली, दूध उकळायच्या वासानं एखद्याला इतका त्रास होतो हे मी पहिल्यांदाच बघतोय..”


“नको रे बोलूस त्या वासाबद्दल, मला परत मळमळेल.... प्लीज” माही वैतागून म्हणाली. “हे प्रेग्नन्सी वगैरे इतकं कठीण असेल असं कधी वाटलं नव्हतं. आय जस्ट हेट मायसेल्फ! ऑफिसमध्ये पण सगळे हसतात.”


“मी सांगितलं होतं या फंदात पडायला? तुलाच हौस आहे, मग निस्तरा.” पुन्हा एकदा माहीनं त्याला फटका मारला. “आता गप्प बैस, नाहीतर अजून मारेन”


“एवढी मारामारी करू नकोस. नाहीतर ते होणारं साऊथ इंडियन ऍक्शन सिनेमामधल्या हीरोंसारखं अतरंगी व्हायचं.” असिफ परत तिला चिडवत म्हणायचा. “चलो! कामं आहेत. तुम्हाला काय हक्काची रविवारची सुट्टी आहे, आम्हाला शूटिंगवर जायचंय..”

“दुपारनंतर जाणार आहेस ना?” 

“हो, पण त्याअधी घर साफ करायचं आहे, तुम्हाला फिनाईलच्या वासानं उलटी होते. मग स्वयंपाक करायचाय, तुम्हाला फोडणीच्या वासानं मळमळतं, मग कपडे वॉशिंग मशिनला लावायचेत, तुम्हाला साबणाच्या वासानं...”

“बास!!” माही चिडून म्हणाली. “समजलं. तुला माझ्यामुळं फार काम करावी लागतात.” असिफ हसला. “आराम कर. जेवण बाहेरून मागवतो.” माही टीव्हीवरचं कसलंतरी चॅनल लावून बसली. थोड्या वेळानं असिफची कुणाशीतरी मोबाईलवर चाललेली तणातणी ऐकू आल्यावर तिनं टीव्हीचा आवाज बंद केला. असिफ धुसमुसत बाहेर आला आणि चिडून हातातला मोबाईल फेकून दिला. “साला हरामखोर” तो ओरडला. 


“काय झालं? एवढा कुणावर वैतागतोस?”


“हा डीसूझा वेडा झालाय. त्याला मी मागच्या महिन्यांत सांगितलं होतं... मागच्या महिन्यात!!! यापुढे मी कुठलाही मोठा प्रोजेक्ट घेणार नाही, तर यानं माझ्या नकळत त्या एवी ईव्हेंटवाल्याला कमिट केलंय. आता म्हणे माझ्या शब्दाखातर हे काम तू करून दे. किमान महिनाभराची कसल्या कसल्या लोकांची वर्ल्ड टूर आहे. मी स्टेज डीझाईन करणार इतपत ठिक आहे, पण स्टेज मेण्टेनन्सला परत मीच हवाय. आता काय तिथं सुतारगिरी करू? लोकं परस्पर असले निर्णय घेतात ना. वैताग येतो.”


“टूर कधीपासून आहे?”


“अजून सहा महिन्यांनी.” 


“तोपर्यंत माझी डीलीव्हरी झालेली असेल. तुला महिनाभर जायला काहीच प्रॉब्लेम नाही. मी मॅनेज करू शकेन.”
“पण मलाच जायचं नाहीये ना... मी आता हातातले प्रोजेक्ट संपल्यावर एकही काम घेणार नाही. किमान वर्षभर तरी. घरबसल्या डीझाईनिंग असेल तर ठिक, नाहीतर नकोच..”


“हा तुझा हट्ट मला अजूनही समजत नाही. मी स्वत: डीलीव्हरीनंतर तीनेक महिन्यांनी ऑफिसला जाणार आहे.वर्षभर घरात बसले तर वेडी होइन. तोपर्यंत एखाद चांगली बेबीसीटर बघून घेऊ. मग...”


“कशाला? मी वर्षभर सांभाळेन. नंतर तुला ऑफिसमध्येच एक नर्सरीरूम बनवून देईन. तिथं सगळं परफेक्ट करून देईन. हवंच असेल मदत म्हणून बेबीसीटर घेऊ, पण मला वर्षभर काम करायचं नाही या निर्णयावर मात्र मी ठाम आहे”


“कशासाठी?”


असिफ माहीच्या बाजूला येऊन बसला. “कारण, आता मला स्वत:ला विश्रांती हवीय. माही, मला असा एकही दिवस आठवत नाही जेव्हा मी काम करत नसेन. आयुष्यात नक्की कधी कामाला सुरूवात केली तेच माहित नाही. जेव्हापासून जगतोय, तेव्हापासून धावतोय. आता कंटाळलोय. थांबावंसं वाटतंय. आतापर्यंत घेतलेला कुठलाही निर्णय माझ्या मतानं किंवा आवडीनं घेतलेला नव्हता. सर्व काही केलं ते मजबूरी म्हणूनच. आपखुशी म्हणून काहीच नाही. आता जरा हातात पैसा आहे, निवांतपणा आहे.... तर एक ब्रेक घेऊ देत ना.. मला वडील कसे असतात ते माहित नाहीच, किमान माझ्या बाळाला तरी समजू देत. त्याच्यासाठी भरपूर वेळ देता येऊ शकतोय, तर काय प्रॉब्लेम आहे?”


माहीनं त्याचा हात हातात घेतला. “असिफ, एकावर्षात बारा महिने असतात. एका महिन्यात तीस दिवस आणि प्रत्येक दिवसात चोवीस तास. वर्षभर ब्रेक घेतो हे म्हणणं सोपं आहे, पण एका दिवसाचे चोवीस तास घरामध्ये बसणं तुझ्यासाठी अशक्य आहे. मी तुला आज ओळखत नाही. तरी तुला ब्रेक घ्यायचाच असला तर घे.. मला काहीच प्रॉब्लेम नाही. होण्य़ासारखे छोटे प्रोजेक्ट्स करत रहा. फार मोठी हेक्टिक कामं घेऊ नकोस. सिम्पल. नंतर मला कंटाळा आलाय हा जप ऐकवू नकोस!”


“नाही ऐकवणार.... मी आणि माझं बाळ मिळून....” असिफ बोलत होता तितक्याच दरवाज्याची बेल वाजली. “गीता एवढ्या लवकर आली?” माही घड्याळांत बघत म्हणाली. 


असिफनं उठून दरवाजा उघडला तर गीताऐवजी कोण भलतीच चार पाच माणसं उभी होती. “नमस्कार” 
त्यामधल्या एका वयस्कर काकांनी हसत ओळख करून दिली. “मी मिस्टर शशिकांत सुर्वे. आपल्या सोसायटीचा चेअरमन”


“ओह. आत या ना...” असिफ म्हणाला. सगळे पाच जण आत हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. सोसायटीच्या या ना त्या कामाच्या निमित्तानं माही त्यापैकी बहुतेकांना ओळखत होती. आतापण कसलीतरी देणगी, वर्गणी मागायला वगैरे आले असावेत असं तिला वाटलं. पण एकंदरीत सर्वांचा अविर्भाव फारच गंभीर आणि शांत वाटत होता. त्यापैकी आलेल्या भुरे वहिनी आणि केतकरवहिनींनी माहीच्या वाढलेल्या पोटाकडे बघून केलेली नेत्रपल्लवी तिच्या चांगलीच लक्षात आली होती. 



“आम्ही म्हटलं, आज रविवार. तुम्ही घरी असाल म्हणून मुद्दाम आलो. माही मॅडम भेटतात, अधूनमधून. पण वर्ष झालं आजवर आपली भेट अशी झालीच नाही” सुर्वे परत एकदा म्हणाले. 


“काय करणार. कामाच्या काही निश्चित वेळा नाहीत. त्यामुळं...”


“नक्की काय काम करता आपण?” त्याचं बोलणं मधेच तोडत एक म्हातारेसे आजोबा म्हणाले. “काही चित्रपटामध्ये वगैरे आहे ना?” एकंदरीत त्यांचं बोलणं फारच शिष्टपणाचं वाटलं तरी असिफ शांतपणे म्हणाला. “मी सेट डीझायनर आहे. चित्रपट किंवा मालिकांसाठी जे मोठे मोठे सेट लागतात ते बनवून देतो. गेली बारा तेरा वर्ष झाली याच क्षेत्रात आहे...”

“बरं बरं” ते आजोबा उगाच त्याचं बोलणं थांबवत म्हणाले. 

“कितवा महिना चालू आहे गं?” भुरे वहिनींनी माहीला अचानक विचारलं. 

“पाचवा संपेल, पुढल्या आठवड्यात” ती म्हणाली. 

“पहिलंच आहे ना?” केतकरवहिनींनी विचारलं. यावर काय बोलायचं ते न सुचल्यानं माहीनं असिफकडे पाहिलं. “हो! पहिलंच.” तो शांतपणे म्हणाला. 


“मी जरा चहापाणी बघते...” म्हणून माही आत निघून गेली. 


“चहा वगैरे नको गं... पाणी आण. थंड नको” भुरे वहिनींनी आवाज दिला. माही आतमधून पाण्याचे, सरबताचे ग्लास वगैरे घेऊन येईपर्यंत कुणीच काही बोललं नाही. ट्रे ठेवून माही निघून बेडरूममध्ये गेली. असिफ शांतपणे या अवचित आलेल्या लोकांकडे बघत उभा राहिला. ते पाचहीजण आपापसामध्ये नजरानजर करून “तू बोल तू बोल” करत असल्याचं त्याला लक्षात आलं. 


शेवटी मघासचे खडूस आजोबांनीच विषय काढला. “तुमच्या मिसेस नक्की काय काम करतात?”


“त्यांचं वाशीला ऑफिस आहे. कॉल सेंटर टाईप. मला टेक्निकल डीटेल्स जास्त समजत नाही, पण बेसिकली काहीतरी आय टी रिलेटेड आहे. जास्त माहिती तुम्ही तिलाच विचारा” 


“नाही, त्याची काही गरज नाही. त्यांना आराम करू द्या. तुमचं लग्न कधी झालं?” आजोबांनी पुढचा प्रश्न टाकला. एका झटक्यात असिफला नक्की काय चाललंय ते समजलं. त्याच्या डोळ्यामध्ये संतापाची एकच लाट उसळून गेली. दुसर्‍याच क्षणी त्यानं स्वत:ला सावरलं. “दहा वर्षापूर्वी” तो आधीच्याच शांतपणे म्हणाला. 

“माफ करा, पण आम्हाला असं समजलंय की तुमचं लग्न झालेलं नाही...” आजोबा पुन्हा एकदा ठामपणे म्हणाले. 
“कुणी सांगितलं?” असिफनं त्याच सुरात विचारलं. 


“कुणीही सांगू देत... पण हे बघा, ही सभ्य मध्यमवर्गीय लोकांची सोसायटी आहे. इथं आम्ही शक्यतो अशीच लोकं ठेवतो. तुम्ही हा फ्लॅट विकत घेतलात तेव्हा तुम्ही फिल्मी धंद्यामध्ये आहात किंवा तुमची मैत्रीण रात्री अपरात्री घराबाहेर हिंडते हे तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं” आजोबा पुन्हा एकदा गरजले.


“मैत्रीण? अहो, ती माझी लाईफ पार्टनर आहे. बायको!!! आणि ती घराबाहेर कुठेही हिंडत नाही. एम बी ए शिकलेली आहे. तिच्या नावावर एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. प्रॉपर लीजवर घेतलेलं ऑफिस आहे. मीपण माझा व्यवसाय तेव्हा स्पष्टपणे लिहिलेला होता. माहीबद्दलही....”


“आजकाल कुणीही काहीही खोटं लिहून देतं. आमच्या भावाच्या सोसायटीमध्ये नाही... चार पाच युपीकडच्या मुली रहायला आल्या, स्टुडंट आहेत म्हणून. नंतर समजले त्यांचे धंदे.” भुरे वहिनी मध्ये बडबड्ल्या. 


असिफ शांतपणे म्हणाला, “आता तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे सांगा”


“आम्हाला असं समजलंय की तुमचं लग्न झालेलं नाही. तुम्ही बिनालग्नाचे एकत्र राहताय...” सुर्वे थोडं बिचकतच म्हणाले. “म्हणून जरा.... काय आहे.. शेवटी लोकं बोलतात ते चांगलं वाटत नाही..”


पण आजोबा ऐकायच्या मन:स्थितीमध्ये नव्हते. “गुळमुळीतपणे बोलू नका! हे बघ. ती आता सध्य काय करते याचा काथ्याकूट करण्यामध्ये अर्थ नाही. तिचं चालचलन पूर्वी ठिक नव्हतं असंही ऐकू येतंय. सोसायटीमध्ये हे गॉसिप खूप दिवसांपासून चालू आहे. हे जर खरं असलं तर..”



सुर्वेनं हातानंच आजोबांना थांबवलं. “आम्हाला जस्ट विचारायचं आहे, खात्री करण्यासाठी.. किंवा तसं काही नसेल तर जाणून घेण्यासाठी...”


“ओके! तुम्हाला लग्न म्हणजे काय अभिप्रेत आहे? आमचं लग्न चारचौघांसारखं झालं नाही हे मान्य... तुम्ही सगळे एक मिनिट इथं बसाल का? मी आलोच....” म्हणून असिफ बेडरूममध्ये आला. बेडवर बसलेल्या माहीनं भेदरून त्याच्याकडे पाहिलं. “हे काय चालू आहे?” ती हळूच म्हणाली. 


“माहित नाही. तुला या विषयावर बिल्डींगमध्ये कुणी काय बोललंय?” माहीनं नकारार्थी मान हलवली. “डोण्ट वरी,” हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवून असिफ म्हणाला. “तू घाबरू नकोस. हे लोक जाईपर्यंत अजिबात बाहेर येऊ नकोस, आय विल हॅन्डल देम.” म्हणत असिफने कपाटामधून एक ब्रीफकेस काढली. “तुझ्या सर्टीफिकेट्सची फाईल दे. या लोकांना तोंडावर फेकून सांगतो... दहा खर्‍यामध्ये एक खोटं कसंही खपेल” म्हणून त्यानं त्या ब्रीफकेसमधून एक लॅमिनीटेड कागद काढला. 


“हे काय आहे?” माहीनं विचारलं. असिफनं तो कागद तिच्या हातात दिला. “मॅरेज सर्टिफिकेट? कसं काय... आणि हे इतकं जुनं?” माहीनं आश्चर्यानं विचारलं. 


“माहीमॅडम, तुमचा नवरा फिल्मी धंद्यात आहे, जिथं मी महिन्याभरामध्ये लाल किल्ल्याचा खोटा सेट उभारू शकतो, गरज लागली तर करोडो रूपयाच्या खोट्या नोटा आणू शकतो. तिथं एक खोटं मॅरेज सर्टीफिकेट बनवून ठेवायला किती वेळ लागला असता? तू माझ्यासोबत रहायला आलीस तेव्हाच बनवलं होतं. इन केस कुठं लागलंच तर.. पण आज वापरायची वेळ आली. बाहेर बसलेल्या एकाही गाढवाला ते खोटं आहे हे समजणार नाही” तो हळूच कुजबुजला. 


माही अविश्वासानं त्या कागदाकडे पाहत राहिली. “हेच मी तुला खरं रजिस्टर मॅरेज करायला सांगत असते तेव्हा...”

“श्श!! तो वेगळ्या भांडणाचा विषय... निवांत भांडू” म्हणून असिफनं ते सगळे कागद घेतले आणि तो बाहेर हॉलमध्ये गेला. 


“हे माझ्या लग्नाचं रेकॉर्ड.... आमचं अक्षता टाकून आणि वाजंत्र्या वाजवून लग्न झालं नाही. मी आणि माहीनं रजिस्टर लग्न केलं. दोघांपैकी कुणालाही विधीवर लग्नामध्ये इंटरेस्ट नव्हता. पण हा कागद मात्र आहे. या रेकॉर्डमुळे आमचं लग्न झालंच नाही आणि आम्ही बिनालग्नाचे आहोत, हा तुमचा आरोप संपला. आता तुमचा दुसरा आरोप जो खरोखर खूप भयंकर आणि बदनामीकारक आहे. माहीच्या... माझ्या पत्नीच्या चालचलनाचा. मला आज इथं माझी पत्नी रात्री बाहेर कामाला का जाते या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल असं आजवर कधी वाटलं नव्हतं...”


“आम्हाला पण ज्यांनी सांगितलंय त्यांनी खात्रीपूर्वकच सांगितलंय.  हे... ती रात्री...तिचं शिक्षणसुद्धा... ”

“धंदा करायला बाहेर पडते? आणि मी माझ्या बायकोला विकून तिचे पैसे खातो... हे ज्यानं कुणी सांगितलंय त्याला माझ्यासमोर घेऊन या” असिफ एकदम चिडून म्हणाला. 


सुर्वे एकदम बिचकला. “अहो, असं आम्ही कुठं म्हणतोय. फक्त ते रात्रीचं रोज रोज... म्हणजे सोसायटीमध्ये चर्चा होते हो...”


“हो? सोसायटीमध्ये चर्चा होते? नक्की कशाची? शिक्षण माहीचं नव्हे, माझं अर्धवट आहे. मी तिच्यापेक्षा कमी शिकलेला आहे. खोटं वाटतंय? ही सर्टिफिकेट्स. माहीच्या कॉलेजची. दहावीपर्यंत तमिळनाडू, मग बारावी बंगलोर आणि डिग्री- एम बी ए इथं मुंबईत.” असिफ हातातले कागद भिरकावत म्हणाला. “या फोटो कॉपीज आहेत. प्रत्येकानं एकेक घ्या आणि वाचा. माही एम. बी. ए.ला युनिव्हर्सिटी टॉपर आहे. दोन वर्षं यु एसमध्ये काम करत होती. आणि हे लेटर्स तिनं आजवर जिथं कुठे नोकरी केली त्याचे.... हे कागद खोटे वाट्त असतील तर या सर्व ऑफिसमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जाऊन चौकशी करायला तुम्ही मुक्त आहात. सोसायटीमध्ये जे कोण बोलत असतील त्यांनाही हेच सांगा. तीन वर्षापूर्वी कर्ज काढून तिनं हा सेटप चालू केला आहे. ही त्या कर्जाची कागदपत्रं. तिच्या ऑफिसमध्ये आता या घडीला चाळीसहून जास्त लोकं काम करतात. त्या सर्वांचे कॉन्टॅक्ट डीटेल्स हवे असतील तर मी देइन. त्यांच्या घरी जाऊन चौकशी करू शकता. खरंतर कसल्याही स्पष्टीकरणाला मी अथवा माही बांधील नाही. आम्ही हा फ्लॅट आमच्या पैशानं घेतलाय, या चार भिंतीच्या आत आम्ही काय करतो हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. याउप्पर तुम्हाला काही आरोप करायचे असतील. सोसायटीचे चेअरमन या नात्यानं.. अजून काही आक्षेप असतील तर मला ते लेखी लिहून द्या. त्यावर काय कार्यवाही करायची ते मी करेन”



“हे बघा, तुम्ही या घटनेला विनाकारण वेगळं वळण देत आहात. आम्हाला फक्त खातरजमा करून घ्यायची होती. सभ्य लोकांच्या...”


“कोण सभ्य आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. सोसायटीमध्ये जर गॉसिप होत असेल तर ते कोण करतंय हेही समजतंय.” असिफ भुरेवहिनी आणि केतकरवहिनींकडे बघत म्हणाला. “मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगून झालंय. तुम्हाला अजून काही खातरजमा करायची असेल तर...”


“कुटूंब?” भुरेवहिनी मध्येच म्हणाल्या. “तुमच्या दोघांच्या कुटूंबामध्ये कोणच का नाही? वर्ष झालं तुम्हाला इथं येऊन.. तुमच्या घरामधलं इतर कुणीच का दिसत नाही?”


“माहीचं कुटुंब तमिळनाडूमध्ये आहे. तिची सावत्र आई... आणि दोन भाऊ. त्यांची तिथंच शेती वगैरे आहे. तिचे वडील आता तीन वर्षापूर्वी गेले. गावाचा पत्ता आणि फोन नंबर हवा असेल तर देऊ का? माझी आई दहा वर्षापूर्वी गेली. वडील मी खूप लहान असताना. एक मामेभाऊ इथं मुंबईमध्ये आहे, पण त्याच्याकडे फारसं जाणंयेणं नाही.. अजून एक बहिण आहे. डॉक्टर शैलजा, तिचा सायनला दवाखाना आहे. माहीच्या बाळंतपणाला तीच इथं येणार आहे, तेव्हा तुमची ओळख करून देईन.” 


बेडरूममध्ये बसलेली माही भितीनं थरथरत होती. इतक्या दिवसांमध्ये कुणाला आपल्या भूतकाळाविषयी समजलं तर काय असा प्रश्न कधी आलाच नव्हता. असिफनं आणि तिनं कधीचाच तो विषय आयुष्यामधून वजा केला होता. असिफ कायम सांगायचा, “आपण त्याबद्दल बोलायचंदेखील नाही... जे घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती.” उलट तिनंच कधी भांडताना वगैरे असा काही उल्लेख केला की तो प्रचंड दुखवायचा. चिडायचा. 
सोसायटीमध्ये तिच्या नावाचं काही चर्चा चालू असलेली तिला खरंच माहित नव्हती. एक  समोर राहणारी मीरा सोडल्यास इतर कुणाशीही तिचं फारसं बोलणं नसायचंच. मीरा कुणासोबत गॉसिप वगैरे करण्यासारखी नव्हती, उलट माहीला तिच्याबद्दल कायम आश्चर्य वाटायचं. मुलं-नवरा-घर एव्ढंच तिचं विश्व कसं काय असू शकतं. बाहेर असिफ शांतपणे बोलत होता. सुर्वे आणि ते आजोबाच मधे काहीतरी बोलले, दोन्ही बायकांचा आवाज गप्पच झाला होता. 


सुर्वे एकदम नरमाईनं म्हणाले. “हे बघा, आम्ही काही वाईट हेतू ठेवून आलेलो नाही. जेव्हा चार लोकं बोलायला लागतात तेव्हा आम्हाला काहीतरी करणं भाग आहे. तुमच्या दोघांचं एकंदरीतच वागणं एवढं वेगळं आहे, म्हणजे आंतरप्रांतीय लग्न, तुमचं मुसलमानी नाव, आणि अजूनही बरंच काही... इथं कित्येक लोकांना ते पटत नाही..”


“मग मी काय करू? माझं नाव बदलू की माहीचं राज्य बदलून घेऊ? लोकांना चर्चा करायचीच असली तर ते कशाचीही करू शकतात. तेवढा रिकामावेळ त्यांच्याकडे असेल तर. सुदैवानं मी आणि माही दोघंही खूप बिझी आहोत. आमच्या कार्यक्षेत्रामध्ये. आमच्याकडे असल्या फालतू गोष्टींना वेळ नाही” असिफ आधी जितक्या शांत सुरात बोलत होता, तित्क्याच शांतपणे म्हणाला.


“आम्ही निघतो. तुम्हाला जी काही तसदी दिली त्याबद्दल क्षमस्व. तुम्ही सर्व माहिती व्यवस्थितरीत्या दिल्यामुळं काहीच शंकेला वाव उरलेला नाही. हे फोटोकॉपीची एक प्रिंट मी मुद्दाम नेतो. कुणी काही बोललंच तर दाखवायला. चालेल?” सुर्वे उठून उभं राहत म्हणाला. त्याचबरोबर मघासचे ते आजोबा आणि अजून एक माणूस उभा राहिला. केतकरवहिनीने भुरेवहिनीला कोपरानं ढोसलं. “माही, येतो गं” त्यांनी आवाज दिला. 
“ती बाहेर येणार नाही. तिला त्रास होतोय, म्हणून थोडावेळ पडली आहे” असिफनं परस्पर उत्तर दिलं. 

ते पाचही जण निघून गेल्यावर असिफनं दरवाजा बंद केला, तरी तो तिथंच उभा राहिला. दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकून माही हॉलमध्ये आली. “असिफ” तिच्या डोळ्यांत पाणी होतं. “तू कधीच खोटं बोलत नाहीस ना? मग आज का बोललास?” ती त्याच्याजवळ येत म्हणाली. “खरं सांगितलं असतं तर प्रॉब्लेम झाले असते वगैरे ठिक आहे, पण आपण खोटं का बोलावं? तूच म्हणतोस ना... जे घडून गेलंय ते कुणाच्याही हातात नव्हतं”


“जे घडलं होतं ते जेसिकासोबत. तू माही आहेस. माझी माही. आणि तिच्यासोबत असलं काहीही वेडंवाकडं घडलेलं नाही... डोन्ट वरी” असिफ तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. “तू याबद्दल कुणाशी बोलली होतीस? रेश्माशी?” 
“रेश्मा?” नाव ऐकताच माही चमकली. “नाही.. मी फक्त एकदा मीरावहिनींना थोडं सांगितलं होतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट नाही... पण... त्या असं कुणाला बोलण्यातल्या नाहीत...” माही बोलत होती, पण असिफचं लक्ष नव्हतं. त्याला वाटलं आपल्या हृदयामध्ये कसलातरी ज्वालामुखी उकळतोय. हाताच्या मुठी त्यानं घट्ट दाबल्या आणि दरवाज्याचं हॅण्डल उघडलं. 


“काय झालं असिफ?” माहीनं विचारलं. 


“तू इथंच थांब” म्हणून असिफनं दरवाजा ओढून घेतला आणि चारेक पावलात पुढे जाऊन समोरच्या दाराची बेल वाजवली. दोनच सेकंदात दरवाजा उघडला, आणि समोर उभी असलेली रेश्मा बघून त्याचा संताप अजूनच वाढला. 
“अता... इथं...” तिनं काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण त्याआधीच असिफनं तिचे केस एका हातानं धरले, आणि दुसर्‍या हातानं तिच्या कानाखाली मारली. 


“अजून किती छळणार आहेस? कुठल्या जन्माचा बदला घेणार आहेस?” तो दात गच्च चावून म्हणाला. “आणि यात माहीचा यात काय संबंध होता? तिला का मध्ये आणलंस” आणि अजून एकदा त्यानं तिला मारलं. 


“असिफ.. प्लीज. मला काहीच माहित नाही.. काय बोलतोस?” ती कसंबसं म्हणाली. 


“काहीच माहित नाही.. बोल!” असिफ तिचं डोकं धरून भिंतीवर आपटत म्हणाला. “बोल! अजून खोटं बोल! काय बिघडवलं आहे मी तुझं... सुखानं जगतोय ते बघवत नाही. तुझ्या घरच्यांनी माझ्या बापाला मारलं होतं, तू त्यांच्याहून डेंजर आहेस. विंचवासारखी डसतेस मला. गेली सतरा वर्षं मला छळते आहेस...” रेश्मा जोरात किंचाळली. काही बोलायचं तिला सुचत नव्हतं. 


इतका आरडाओरडा ऐकून माही तिच्या घरातून बाहेर आली. असिफ रेश्माला मारत असलेलं बघून ती गडाबडली. “असिफ, काय करतोस? अरे, त्यांना सोड” ती मध्ये पडत म्हणाली. असिफने तिला हलकेच बाजूला ढकललं. 
“मध्ये पडू नकोस. हीच.. हीच ती मुलगी जी गेले सतरा वर्षं माझ्या आयुष्यामध्ये माती कालवतेय.... नक्की कशानं तिला समाधान मिळेल कुणास ठाऊक? लग्नाचं नाटक केलं, नंतर मलाच बलात्कारी म्हणून गाव सोडायला लावलं.... आणि आज इथं... का छळतेस?” परत एकदा असिफनं तिला मारलं. 


“नाही! असिफ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय..” माही त्याचा हात धरत म्हणाली. 


“तू हात सोड” असिफनं तिचा हात झटकला आणि परत रेश्माला धरून मारत म्हणाला. “बोल! माझा जीव घेऊन मग तू शांत होणार आहेस का? दोनच महिन्यापूर्वी मला हातभर लेक्चर देऊन गेलीस ना? माझ्यावर किती प्रेम आहे आणि अजूनही मीच कसा हवा आहे? तेव्हा एका क्षणाला तुझी थोडी तरी दया आली होती... कधीकाळची माझी पत्नी म्हणून आठवली होतीस... तेव्हा काय म्हणाली होतीस... असिफ एकदा तुझा स्पर्श हवाय... मग.. आता...” बोलता बोलता असिफ तिला लाथ मारत राहिला. माही परत मध्ये आली. “असिफ, स्टॉप दिस... आता बास... नक्की काय घडतंय ते मला समजत नाही. पण यापुढे एकदाही जर हात उचललास तर याद राख”


रेश्मा जमिनीवर पडून रडत राहिली. त्याच्या डोळ्यात पेटलेला वणवा अजूनची भडकलेलाच होता. असिफ माहीकडे बघून म्हणाला. “ही इथं आता जी रडत पडली आहे ती... रेश्मा आहे. माझ्याशी भातुकलीसारखं लग्नाचा खेळ मांडणारी... तू नसताना माझ्या घरात येऊन मला माझ्यासोबत झोप म्हणून सांगणारी.. .हिनंच तुझ्याविषयी बिल्डिंगमध्ये चर्चा चालू केली. हिनंच माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली. हिच्यामुळं मला माझ्या आईला दूर ठेवावं लागलं. शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.. एवढं होऊन... ” असिफ अचानक बोलायचा थांबला. 


दारामध्ये भाजीची पिशवी घेऊन मोहित उभा होता. “माझ्या घरामध्ये हे नक्की काय चालू आहे?” त्यानं कसंबसं विचारलं. “मीरा, हे मी काय ऐकतोय?” 

(क्रमशः) 


दरवाजा (भाग 8)

No comments:

Post a Comment