Sunday, 2 November 2014

चेहरा

अजून तिचा चेहरा लक्षात आहे. आता तर आयुष्यात कधी विसरणार नाही.

बघायला गेलं तर अवघ्या काही तासाची भेट पण अजून तिचा चेहरा मनात एखाद्या लेण्यासारखा कोरलेला आहे. सतत ड्ळ्यासमोर नसतो पण जेव्हा मनाची कवाडे हलकेच मिटतात तेव्हा कधीतरी अंधुकपणे डोळ्यासमोर येतो. अगरबत्तीच्या मंद धुरासारखा.
किती लोक आपल्याला ट्रेनमधे भेटतात. त्यापैकी कितीजण लक्षात राहतात. ओळख होते... गप्पा होतात. एकत्र खाणं पिणं होतं. क्वचित पत्ता फोन नंबर दिला घेतला जातो. पण किती वेळा ही ओळख पुढे जाते??? कितीवेळा असा भेटलेला चेहरा त्रास देतोय??
होय, मला सध्या तिच्या चेहर्‍याचा त्रास होतोय. आणि खूप त्रास होतोय. माझ्या रूम मेटच्या मते मी तिचा खूप विचार करतेय. असेलही कदाचित. तसा मला तिचा विचार करायची काहीही गरज नाही... पण म्हटलं ना मला तिचा चेहरा खूप त्रास देतोय.

साधारण तीन वर्षापूर्वीची गोष्ट.. साधारण कशाला म्हणायला हवं?? २ जानेवारी २००५ ची गोष्ट. वेळ सकाळची. सालाबादाप्रमाणे मी ३१ डीसेंबरच्या पार्टीला गोव्याला गेले होते. रात्रभर पार्टीकरून नवीन वर्षाचा पहिला दिवस झोपण्यात घालवून मी परत येत होते. एकटीच. कारण माझा कॉलेजच ग्रूप पुढे कुठेतरी जाणार होता. कारवर वगैरे फिरायला. मला तितकेच दिवस घरी रत्नागिरीला राहता आलं असतं. सकाळची मांडवी पकडली. अगदी आयत्यावेळेला हा असा उलट सुलट कार्यक्रम मीच ठरवल्याने स्टेशनवर पण एकटीच आलेले. पहाटेची झोप अजुन डोळ्यावर होती.

लेडीज जनरलचा डबा. झोप उडवायला हे पण कारण पुरेसे नसेल तर मग कोकणी मराठी भाषेतून शिव्या. आणि हे धमाल भांडणं. अर्थात जागेसाठी. मला मात्र काही आरडा ओरडा न करता चांगली खिडकीची जागा मिळाली होती.

बाजूला कुणीतरी म्हातारी बाई बसली होती. समोरच्या सीटवर ती. लांबसडक केस. मोठे बदामी डोळे. साधारण केतकी वर्ण. थोडीशी बुटकी पण सुडौल. तिने  टिपिकल गोवन मुली घालतात तसा फ्रोक घातला होता. फुलाफुलाचा. सोडायला आलेल्या बाईबरोबर बोलत होती. बहुतेक तिची आई असावी. त्या बाईच्या हातात एक छोटं तीन चार वर्षाचं लेकरू होतं. त्या दोघीचा कोकणीतून काहीतरी संवाद चालला होता. काहीतरी गंभीर विषय असल्यासारखा. का कुणास ठाऊक तिचा चेहरा एकदम मलूल वाटत होता.

तरीपण सकाळी सकाळी तिचा चेहरा सतत बघावासा वाटत होता. माझी एकटक नजर तिला जाणवली असावी. तिने वळून माझ्याकडे पाहिलं. आणि हसली.
मी पण हसले. परत तिचा खिडकीबाहेर कोकणी संवाद सुरू झाला. तितक्यात ट्रेन निघण्याचा हॉर्न ऐकू आला. बाहेर उभ्या असणार्‍या बाईने तिचा हात घट्ट धरला.
"मारिया..." हुंदका आवरत ती कशीबशी म्हणाली.
" प्रे फॉर मी..." ट्रेन निघता निघता ती म्हणाली.

ट्रेन निघाली. मांडवी एक्स्र्प्रेस. मडगाव ते सीएस टी. दुपारी बाराच्या दरम्यान रत्नागिरी आलं असतं. मी बॅगेतून पुस्तक काढलं. एक तर सकाळची वेळ. थंडीचा महिना. अशा वेळेला माझी झोप अर्थात उडाली.

पण माझ्या बाजूला बसलेल्या काकूना स्वस्थ बसवेना. त्याचं आपलं सर्वाचं नाव गाव विचारणं चालू झाल. जुजबी ओळखी झाल्या. माझ्या समोर बसलेली ती मारिया. चेहर्‍याला नाव मिळालं की ओळख अजूनच पक्की होते.

मारिया साधारण एकविशीची होती. ऍग्लो इंडियन. जन्म सर्व भुसावळला गेला. वडील रेल्वेमधे मोटरमन. वडील गेल्यावर ती तिच्या मोठ्या बहीणीकडे मडगावला आली. त्यानंतर पुण्यामधे जॉब करत होती. साधासा रीसेप्शनिस्टचा. पण पुण्यामधल्या त्या कंपनीमधल्या भावामधे भांडणे होउन कंपनी बंद पडली. मग काय?? परत बहीणीकडे आली. पण बहीणीच्या सासरी तिचं असं राहणं आवडले नाही. परत मुंबईला जॉब शोधायला चालली होती.

"बेस्ट लक" मी म्हटलं.
"बेस्ट लक कायको? लक पे कुच नहि होता. अपना अपना फेथ होता तोहि काम होता. तुम मेरेवास्ते प्रे करो. हम तुम्हारे वास्ते प्रे करेगा. गॉड फिर अपनी बात जरूर सुनेगा."

"जरूर..." मी पण हसून उत्तर दिलं.
"कशामधे जॉब शोधतेस गं तू??" बाजूच्या काकूनी तिला विचारलं.
"नक्की कुच नही आहे. पण रीसेप्शनमधे नको. वहापे सब लोग बहोत गंदा गंदा देखते है..."
मग एकूणच पुरुष जात त्याची नजर वगैरे बाबतीत गरमागरम चर्चा झाली.

वाटेत चहा वडापाव आदि पोटपूजा झाली. गप्पा मारत असतानाच रत्नागिरी कधी आले कळलेच नाही. मी प्लॅटफॉर्मवर उतरून खिडकीत बघितलं.
"फिर मिलेंगे.." मी हसत हसत सांगितलं.
"हा.. ऐसाही ट्रेनमे मिलेंगे. बहुत मजा आता है तुम्हारेसाथ घुमनेको.." ती पण हसत हसत म्हणाली.

२००५ च्या नवीन वर्षाची सुरुवात अशीच झाली. तिच्या भेटण्याने. नंतर कधी तिचा विषय आलाच नाही. किंबहुना असं कुणी आपल्याला ट्रेनमधे भेटलं होतं हे मलाच आठवलं नसतं.... जर ती परत दिसली नसती तर...

माझगावचा गजबजलेला रस्ता. मी संध्याकाळी ऑफिस संपवून हॉस्टेलला निघाले होते.

समोरच्या गर्दिमधे तोच चेहरा. कधीकाळी पाहिलेला. पण अजूनही तसाच. ओळखीची एक वीज नजरेपासून मेंदूपर्यंत गेली. मारिया... मेरी.. काय बरं हिचं नाव.. कुठे पाहिलय हिला??


ती समोरून गेली. किंचित वजन वाढलं होतं. पण बांधा अजूनही तितकाच सुडौल होता. पण केस अजूनही तसेच लांब होते. तेच धारदार डोळे. तोच चेहरा. पण काहीतरी हरवल्यासारखा. एखादं सुंदर फूल प्लास्टेकच्या पिशवीत घालून ठेवल्यासारखा.

ती माझ्या समोरून निघून गेली. आणि रस्त्यावर मी तरी तिला काय विचारणार?
"आपको पहलेभी कही देखा है" टाईप... किती विचित्र वाटलं असतं ते.

पण तो चेहरा मात्र मनात घोळत राहिला. हळू हळू सर्व आठवायला लागलं. मारिया सेराओ. भुसावळ, मडगाव. मांडवी एक्स्प्रेस..

नशीब तरी काय काय खेळत असतं. इतक्या वर्षापूर्वी ट्रेनमधे भेटलेली. आज मला मुंबईत दिसली होती.

त्या रात्री परत ती मला दिसली. रात्री मी जेवायला मेसमधे गेले होते तिथे. म्हणजे ही माझ्याच हॉस्टेलमधे होती...

त्यानंतर सात आठ दिवसात दिसलीच नाही. कदाचित गावाला गेली असेल..

त्यानंतर ती दिसली.

त्या दिवशी मी रूमवरच होते. दुपारच्या सुमारास हॉस्टेलच्या ऑफिसमधे गेले होते. वॉर्डन कुणालातरी ओरडत होती. "ये अच्छे लडकियो का हॉस्टेल है. तुझे ऍडमिशन दिया तभी बोला था. आज... अभी हॉस्टेल छोडना पडेगा. धंदा करना है तो रस्ते पे जाके रहना. हमारा हॉस्टेलका आम खराब नही करनेका.."

मी रूममधे वाकून पाहिलं. ती खाली मान घालून उभी होती. डोळ्यामधे पाणी होतं.
मी तिथून मागे फिरलं. कसला धक्का बसला होता.. मलाच समजलं नाही.

रात्री मेसमधे हाच विषय चर्चेला.

"मुझे त पहले से शक था. कही जॉब नही. कुछ नही और हाथमे पैसा हमेशा"

"अच्छा हुआ निकाल दिया.":

"नाहीतर काय? चांगल्या घरच्या मुली राहतात.."

मी सुन्न बसून होते. सतत तिचा ट्रेनमधला चेहरा आठवत होता. तिचं ते अत्तर शिंपडल्यासारखं हसणं. तिचे ते भुरु भुरू उडणारे केस. तिचे ते काळे डोळे.

अजून तिचा चेहरा नजरेसमोर आहे.
"फिर मिलेंगे.." मी तिला सांगितलं होतं.


नसती भेटली तर किती बरं झालं असतं.

No comments:

Post a Comment