Sunday, 2 November 2014

दरवाजा (भाग 4)

"मीरावहिनी,” माही दरवाजा उघडल्या उघडल्या ओरडली, “प्लीज, तुमची हेल्प हवी आहे”
रेश्माला माहीकडे बघून एक क्षण काही सुचलंच नाही. माझी अखंड कणकेमध्ये खेळून आल्यासारखी दिसत होती. “का? काय झालं?”
“तुम्ही जरा माझ्या किचनमध्ये या. इमर्जन्सी आहे.”
“आलेच!” म्हणून रेश्मानं तिच्या किचनमध्ये जाऊन गॅस बंद केला आणि दरवाजा पुढे ओढून ती माहीच्या फ़्लॅटमध्ये आली. माहीच्या अगदी अत्याधुनिक किचनची अवस्था बघितल्यावर रेश्माला हसू आलं “देवीच्या जत्रेत भंडारा उधळतात तशी कणीक उधळलीस की काय?” अख्ख्या किचनभर कणीक सांडली होती. गॅसवर एक पराठा काळा होऊन बसला होता. ओव्हनवर ठेवलेल्या लॅपटॉपवर कसलासा रोटीमेकिंगचा व्हीडीओ चालू होता. माहीनं तव्यावरचा पराठा उचलून फेकला आणि पोळपाटावर मघाशी लाटून ठेवलेला वाकडातिकडा पराठा उचलायच्या वगैरे भानगडीत न पडता सरळ पोळपाट उचलून तव्यावर उपडा केला. ही अजब पद्धत पाहून रेश्मा जोरात हसली.
“मीरावहिनी, प्लीज चेष्टा करू नका ना, मघाशी एक तास गेलाय, तरी मला हे पराठे काही जमेना, म्हणून तुम्हाला हाक मारली,आय स्वेअर, आय ऍम नॉट अ बॅड कूक. पण हे प्रकरण काही केल्या आटपत नाही” माही हसतच म्ह्णाली, “याआधी बर्याचदा पराठे केलेत, पोळ्या केलेत पण हे मेथी पराठे एवढी का परीक्षा बघत आहेत रे देवा”
रेश्मानं माहीनं भिजवून ठेवलेली कणिक पाहिली, “एवढी सैल कणिक भिजवलीस तर कसे काय लाटता येतील? एक काम कर, मला अजून थोडी कणिक दे, ती मिक्स करून ….”
“मघापासून तेच तर करतेय. ते आमच्याकडे म्हण्तात तसं, आचार अळ्ळ्हीटं मजगी झालंय. घट्ट झालं की पाणी, सैल झालं की कणिक. आठवडाभर पुरेल एवढी कणिक झाली आता.”
“घाबरू नकोस. मला वाटीभर कणीक दे, मी नीट मळून देते. थोडं तेल दे आणि मीठ.” रेश्मानं नेहमीच्या सरावानं कणिक मळायला घेतली. माहीनं तोपर्यंत फ्रीझमधून सरबत काढून दोघींसाठी ग्लासात ओतून घेतलं “तुम्हाला किती छान स्वयंपाक जमतो ना… हे असे फियास्को कधी होतच नसतील” माही म्हणाली.
“हं! नुकतं लग्न झालं तेव्हा बघायचं होतंस. रोज एक पराक्रम करायचे, पण सासूबाई आणि नणंद चांगल्या होत्या, त्या सांभाळून घ्याय्च्या. स्वयंपाकाचं काय गं. सरावाचा प्रश्न.”
“हो, ते तर आहेच. मला मुळात काही आधीपासून आवड नाहीच. गावाकडे थोडंफार बनवायला शिकले तेवढंच.”
“तू तमिळ म्हणजे, सांबार आणि भात”
“हो. शिवाय नॉनव्हेज!! इथं असिफकडे आल्यापासून टोटली बंद. म्हणजे तो काही खाऊ नको म्हणत नाही. पण मलाच नकोसं वाटतं. आपण मारे चिकन टिक्का आणि बटर चिकन खायचं आणि त्यानं उकडलेल्या बटाट्याची भाजी” असिफच्या उल्लेखासरशी रेश्मा थबकली. मघाशी या फ़्लॅटमधे आल्यापासून पहिल्यांदा जाणवलं, इथलं असिफचं अस्तित्त्व. हे तिच्या असिफचं घर होतं. चेहर्‍याचा गोरामोरेपणा लपवत ती हळूच म्हणाली. “आज मेथी पराठ्याचा प्लान कसा काय?”
“असंच. नेटवर रेसिपी वाचत होते. सोपी वाटली म्हटलं करून बघावी. असिफने असं किचन पाहिलं ना, तर असला संतापेल. इकडची वस्तू जरा त्याला तिकडे झालेली सहन होत नाही. सगळं कसं जागच्या जागी हवं” माही म्हणाली.
रेश्मा हसली, “आमच्या यांचं पण तसंच तर आहे पण मुलं म्हणजे असा पसारा करून ठेवतात, मग मला ते यायच्या आधी सगळं घर आवरावं लागतं.”
“मी त्याबाबतीत लकी आहे. मला काही आवरावं लागत नाही. पसारा बघितला की, असिफमिया स्वत:च आवरतात. फक्त असा संतापानं खदखदत असतो तेव्हा. सहसा चिडत नाही, आणि चीडला की संपलंच, डायरेक्ट तांडवडान्स” माही म्हणाली, “माय गॉड! मीरावहीनी.. तुमच्या हातात जादू आहे. काय भराभरा लाटताय.”
“म्हटलं ना सवयीचा प्रश्न असतो...” खरंतर माहीनं विषय बदललेला तिला बिल्कुल रूचलं नाही. तिनं असिफबद्दल बोलत बसायला हवं होतं. अखेर तिनं विचारलं.
“माही, कधीतरी मला तुझी लव्हस्टोरी सांग ना... कसे भेटलात, कशी ओळख झाली” या वाक्यावर माही अचानक बावरली. “लवस्टोरी? अशी काही लवस्टोरी वगैरे नाही. एका कॉमन मित्राच्या घरी भेटलो, नंबर एक्स्चेंज केले, मग भेटत राहिलो... मग सॉर्ट ऑफ प्रेमात पडलो. बास इतकंच.”
“तू त्याच्या घरातल्यांपैकी कुणाला भेटलीस?” रेश्मानं पुन्हा एक खडा टाकला.
“हो. त्याच्या आईला. मी भेटले तेव्हा, त्या अगदीच गॉन केस होत्या. कुणालाच ओळखायच्या नाहीत. ऍक्चुअली, त्यांना थोडासा मानसिक प्रॉब्लेम होता.” रेश्मानं हे सगळं पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखा चेहरा केला पण नजरेसमोर गोड चेहर्‍याची, विस्कटलेल्या केसांची आणि डोळ्यांमधल्या त्या हरवलेपणाची आरतीकाकी आलीच. “असिफच्या जन्माआधी त्या ठिक होत्या. बॅंकेत काम करायच्या. खूप हुशार होत्या, पण नंतर डोक्यावर थोडासा परिणाम झाला. आणि मग....” माही त्यांच्या आठवणीनं किंचित हळवी झाली. “पण त्या माझे खूप लाड करायच्या, असिफ मला मुद्दाम त्यांना भेटायला आठवड्यातून एकदा घेऊन जायचा. मी गेले की मला जवळ बसवून घ्यायच्या. काहीही सांगत असायच्या. कित्येकदा असिफच्या लहानपणच्या गोष्टी. असिफने मला कधीच सांगितलं नव्हतं, पण त्याच्या आईच्या तोंडून मला पहिल्यांदा समजलं की त्यानं किती कष्टात लहानपण काढलंय. मी त्यांना भेटल्यावर सहाएक महिन्यातच त्या गेल्या...” तिच्या डोळ्यामध्ये आपसूक पाणी आलं. “त्या दिवशी पहिल्यांदा असिफ मला म्हणाला की इतके दिवस आईला फक्त माझी काळजी होती, तिच्यानंतर माझं कसं म्हणून तिचा जीव अडकलेला, तू भेटलीस, आता तिला माझी काळजी नाही, म्हणून ती गेली!” रेश्मानं तिच्याही नकळत पुढे येऊन माहीचे डोळे पुसले. “फर्स्ट टाईम असिफ असं काहीतरी म्हणाला होता.. त्याच दिवशी ठरवलं काही झालं तरी मी असिफचा हात सोडणार नाही. असिफ भेटेपर्यंत मला वाटायचं की जगण्यासाठी माझ्याइतका संघर्ष कुणीच केला नसेल. मीही खूप कष्टात दिवस काढले, पण असिफला भेटल्यावर जाणवलं की माझं जीवनच किती क्षुल्लक आहे. चड्डी सावरता येत नाही त्या वयात अशा वेड्या आईला सांभाळणं शिकला. अख्खा गाव विरोधात असताना शाळा शिकला....”
“माहित आहे” रेश्मा नकळत म्हणाली, आणि अचानक भानावर येऊन सावरली “परवा घरी आले होते.... तेव्हा... तेव्हा म्हणाले की.. त्यांचे वडील..अपघातात....”
“नाही, मीरावहिनी! अपघातात नव्हे. त्या दोघांचा भर गावात खून केला होता. कारण त्यांनी अथक प्रयत्नांनी गावामध्ये इंजीनीअरिंगचं कॉलेज चालू करायची परवानगी आणली होती. गावातल्या, आसपासच्या गावातल्या लोकांना फायदा व्हावा म्हणून, मुलांना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून पण गावातल्या काही दीडशहाण्यांनी “यामुळे मुलं बिघडतील, इथली संस्कृती बुडेल” वगैरे भिती घातली आणि असिफच्या वडलांना आणि त्यांच्या मित्राला दोन दिवस मारलं होतं. तेव्हा असिफ अजून जन्मला पण नव्हता. या सर्व घटनेचा परिणाम म्हणूनच त्याच्या आईच्या डोक्यावर... आणि आज पस्तीस वर्षांनी ज्या माणसांनी त्यांना ठार केलं होतं, त्यांचाच सख्खा मुलगा त्या कॉलेजचा चेअरमन आहे... खोर्‍यानं पैसे ओढतात”
... आणि तो माझा सख्खा मामा आहे, रेश्मा मनातच म्हणाली. लहानपणापासून कित्येकवेळा तिनं कुणानाकुणाकडून तरी ही घटना ऐकलीच होती. एक असिफ सोडला तर प्रत्येकासाठी ही एक तर क्रूर किंवा गंमतीची कहाणी होती. असिफ याबद्दल कधीच बोलायचा नाही. एकदा तर ती असिफला भेटायला त्याच्या खोलीवर गेली तेव्हा अचानक आरतीकाकी तिला असिफच्या जन्माची कहाणी सांगायला लागली होती. नऊ महिन्याच्या गरोदर बाईला कसं तिच्या नवर्‍याचे हाल बघायला लागले होते. भर दुपारी बारावाजता ती कशी गावभर मदत मागत हिंडत राहिली. घरामधल्या बायाबापड्या तिचीच समजूत घालत राहिल्या. “कशाला पोटुशी फिरतेस? घरी जाऊन बस.” सल्ले देत राहिल्या. कुठेतरी चक्कर येऊन पडली, आणि जाग आली तेव्हा तिला कुणीतरी परत जिथं शेखरला मारलं होतं तिथं आणून टाकलं होतं. शेखर आणि असिफ गेलेच होते की नाही ते माहित नव्हतं, पण गावातल्या रानटी कुत्र्यांनी लचके मात्र तोडायला सुरूवात केली होती.... ते सगळं सगळं रेश्माला आता आठवलं आणि अंगावर शहारा आला.
“इट्स ओके माही” रेश्मा म्हणाली. “जगात असं घडतच असतं”
“यु नो व्हॉट? मला आधी खूप राग यायचा, जेव्हा हे सगळं ऐकलं तेव्हा... वाटायचं की त्या गावात जावं आणि प्रत्येकाच्या कानाखाली फडाफडा माराव्यात आणि विचारावं.... काय बिघडवलं होतं माझ्या असिफने? काय पाप केलं होतं म्हणून त्याला अशी शिक्षा दिलीत.. त्या मुलीला...... तिला तर सुर्‍यानं भोसकून भोसकून मारायचं आहे... मी जगामध्ये कुणालाही माफ करेन. पण त्या हरामखोर बाईला कधीच नाही...” माही अचानक त्वेषानं म्हणाली. रेश्मा काही न सुचून गप्प उभी राहिली. “आय ऍम सॉरी... मी उगाच एकदम तुमच्यावर ओरडल्यासारखं म्हणाले. ऍक्चुअली... ती एक वेगळीच स्टोरी आहे. या स्टोरीपेक्षाही वाईट..”
“असिफचं आधी काही...” रेश्मा एक एक अक्षर मोजत म्हणाली.
“फार लंबी कहाणी आहे. मला त्या बाईबद्दल बोलायलापण आवडत नाही. तिच्यामुळे... तिच्यामुळे असिफने जे सहन केलंय. करतोय.. ते मी विसरू शकत नाही.” बेडरूममध्ये ठेवलेला माहीचा मोबाईल वाजल्याचा आवाज आला. “एक मिनीट हां मीरावहिनी. ऑफिसचा कॉल असणार.” ती किचनच्या बाहेर गेल्यावर रेश्मानं आतापर्यंत केलेले पराठे तिथंच ठेवलेल्या डब्यात काढून ठेवले. पोळपाट लाटणं सिंकमध्ये ठेवलं आणि किचन ओटा पुसून घेतला. “असिफचं घर, असिफचं किचन....आणि असिफची माही” ती स्वत:शीच पुटपुटली. किचनमध्ये उभं राहून तिला असिफ-माहीची बेडरूम दिसत होती. भिंतीवर लावलेलं पेंटींग असिफनंच काढलेलं असणार. त्याला धगधगत्या आगीची, वणव्याची चित्रं काढायला फार आवडायचं, “का?” असं तिनं विचारल्यावर तो नेहमीच्या पद्धतीनं हसून म्हणायचा, “तुला नाही कळणार," बाजूच्या खोलीमध्ये पुस्तकांचे कप्पेच्या कप्पे भरलेले कपाटं होती. त्याचा एक शर्ट बेडवर ठेवलेला होता. पुन्हा एकदा शरीरामधली नस खणकली. असिफ अगदी आपल्याच आसपास वावरत असल्यासारखी ती धुंदावली.
आता या क्षणी घरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये असिफ जाणवत होता.
“अरे, मीरावहिनी. मी आवरेन ना.” माही पाठीमागून येत म्हणाली. “तुम्ही आज मला इतक्या गहन प्रसंगामधून वाचवलंत त्याबद्दल तुम्हाला खूप सारे थॅंकयु. तुमचं जेवण झालंय का? नाहीतर आपण एकत्रच बसू. आमच्याकडे आज यम्मी मेथी पराठ्यांचा मेनू आहे” माही हसत म्हणाली.
“मी मघाशीच जेवले. तू जेवून घे. मी निघते आता”
“असं नको. थांबा माझ्यासोबत! रोज एकटी जेवते तर कंटाळा येतो. बसा ना.”
मग कितीतरी वेळ दोघीजणी गप्पा मारत राहिल्या. माहीनं असिफचा विषय परत काढला नाही, तिलाही पुन्हा एकदा त्याच्याबद्दल विचारायला मुद्दा मिळेना. कशावरून तरी विषय माहीच्या गावाबद्दल चालू झाला, आणि बोलता बोलता पहिल्यांदाच माहिनं रेश्माला तिची कहाणी सांगितली. ऐकताना रेश्मा जितकी हादरत गेली, तितकीच आश्चर्यचकितसुद्धा.
सगळी कहाणी संपल्यावर माहीला रडू आवरेना, रेश्मानं तिची समजूत काढली. तिच्या मनात पुन्हा एकदा असिफबद्दल प्रचंड अभिमान उफाळून आला.
बरोबर आहे, केवळ असिफच असा वागू शकतो. त्यालाच हे जमू शकेल.
“मीरावहिनी, मी तुम्हाला हे सांगितलं हे प्लीज कुणाला बोलू नका हां!” माही थोड्यावेळानं म्हणाली.
“वेडी आहेस का? तू माझी सख्खी मैत्रीण आहेस ना? मग असे सीक्रेट्स कधी कुणाला सांगतं का?” रेश्मा हलकेच म्हणाली.
+++++++
“असिफ, काय रे डायेटींग करत असलेल्या बाईसारखं जेवतोस? तुला आवडतात म्हणून मी काहीतरी बनवलं तर तुला नीट जेवता येत नाही का?” माही कुरबुरली. “दीड पराठा खायला लाज कशी वाटत नाही?”
“आवडला म्हणून दीड, नाहीतर एकच खाल्ला असता” तो परत तिलाच चिडवत म्हणाला. “तुझ्या बोस्टनच्या फ्लाईट बूकिंगचं काय झालं? पुढल्या महिन्यामध्ये जाणार आहेस ना?”
“हो. मला जावंच लागेल. हा क्लायंट फार झोल करतोय. पेमेंटमध्ये, बिलिंगमध्ये, सगळीकडेच गडबड! व्हीडीओ कॉन्फ़रन्स आणि मेलामेलीवर काम होणार नाही. पंधरा दिवसाची ट्रीप होइल. आता अर्धं जग ओलांडून गेलेच आहे तर बिझनेस डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं थोडंफार जाऊन येईन. तूपण चल ना..आपण हे घर घेतल्यापासून कुठंही फिरायला गेलोच नाही”
“इकडे माझं शेड्युल आहे, ते कॅन्सल झालं तर नक्की येईन... पण चान्सेस फार कमी आहेत. तसंही तुझ्या बिझनेस मीटींगमध्ये मी येऊन कंटाळेनच.”
“काही कंटाळत नाहीस. तुला एकट्यानं रहायला चान्स तर हवाच असतो. मी सोबत असले काय आणि नसले काय... तू कायमच तुझ्या विश्वांत.”
असिफ यावर काही बोलला नाही. थोड्यावेळानं परत तीच म्हणाली, “हे पराठे टेस्टी झालेत ना?”
त्यानं नुसती मान हलवली. “मी तुला एक सांगू?” माही परत दोन मिनिटांनी म्हणाली. “खरंतर मी नाही केलेत. समोरच्या मीरावहीनींनी केले. मी आज किचनमध्ये इतका घोळ..” माहीचं वाक्यदेखील पूर्ण व्हायच्या आधी असिफनं हातातला घास खाली ठेवला आणि ताटातला उरलेला पराठा उचलून परत डब्यात ठेवला.
“अरे काय झालं?” तिनं विचारलं.
“मला जेवण बास.” म्हणून तो टेबलवरून उठला. त्याच्यामागोमाग तीपण उठली. तो बेडरूममध्ये जाऊन कसलंतरी पुस्तक वाचत बसला होता. “काय झालं ते सांगशील? मी मुद्दाम तुला आवडतात म्हणून आज स्वयंपाक केला तर... तुला नाही का आवडलं? अरे, दुपारी सर्व गडबड झाली म्हणून त्यांना मदतीला बोलावलं... चूक झाली का?” ती बोलत राहिली. “हे बघ, तुला जे म्हणायचंय ते स्पष्टपणे बोलत जा, हे असं गप्प बसून आणि घुम्यासारखी चिडचिड करून मला काहीही समजणार नाहीये..”
असिफनं हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं. “माही, मी काही चिडचिड करत नाहीये. मला जेवण बास झालं, थोडी तब्बेत खराब आहे. दॅट्स ईट. अजून काही नाही. पण जर मी काही सांगितलेलं ऐकणारच असशील तर प्लीज त्या बाईला घरात जास्त येऊ देऊ नकोस. जास्त बोलत जाऊ नकोस”
“का?”
“असंच, मला नाही आवडत कुणी माझ्या किचनमध्ये येऊन काम केलेलं.”
“मग इथं आल्यावर माझ्यामागे स्वयंपाकाला एखादी बाई लाव म्हणून मागे का लागला होतास?”
“पगारावर एखादी बाई ठेवणं वेगळं आणि असं कुणालातरी बोलावून. आय ऍम नॉट कंफर्टेबल..”
“म्हणजे तुझ्या घरात तुझ्या किचनमध्ये कुणी आलं तर तुला आवडत नाही... हे घर फक्त तुझंच आहे ना?”
“माही, आता परत भांडणार आहेस का? रजिस्ट्रेशनवर तुझं नाव आहे. बॅंकेचे हप्ते दोघंही मिळून भरतोय. तरी हा प्रश्न विचारतेस?” तो ओरडला. “एक क्षुल्लक गोष्ट सांगितली, जी मला नाही पटत. काहीतरी कारण असेल म्हणूनच ना... उगाच बोलता बोलता कायतरी समजलं तर..” तो हे वाक्य पुटपुटला.
“ओह.. करेक्ट! नाऊ आय गॉट इट. म्हणजे माझ्याबद्दल आपल्या शेजार्‍यांना काही समजलं तर.. होय ना?”
“माही, हे तू स्वत:वर का ओढून घेतेस? मी तुझ्याबद्दल काहीही म्हटलेलं नाही. स्पष्टपणे साम्गू? मला ती बाई आवडत नाही. तिचं येणंजाणं आवडत नाही. त्यामागे कारण वगैरे काहीही नाही. आय जस्ट डिस्लाईक हर...”
“मि. असिफ शेखर, जर यदाकदाचित तुम्ही विसरत असाल तर मी आठवण करून देते, मी तुमची बायको नाही.. तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही, यावर मी जगत नाही. मला माझ्या प्रायोरीटीज आहेत, आवडीनिवडी आहेत. कुणाशी काय बोलायचं किती बोलायचं ते माझं मीच ठरवेन. तू सांगायची गरज नाही”
“ओके, मी माझी चूक कबूल करतो. यापुढे मी याबद्दल काहीही बोलणार नाही, जस्ट मेक इट शुअर की माझ्यासमोर तिचं नाव काढणार नाहीस... ठिक आहे?”
“नाही, ठिक नाही. असिफ किती दिवस आपण असं राहणार आहोत... मी गेले कित्येक वर्षं एक साधीशी गोष्ट मागतेय. मला काही तुझं ते टिपिकल बॉलीवूड स्टाईल लग्न नकोय. मला रजिस्टर लग्न चालेल. तू म्हणशील त्या पद्धतीनं, पण मला कमिटमेंट हवी आहे..”
“माही,” तो तिच्याजवळ येत म्हणाला. “मी हे घर तुझ्यासोबत घेतलंय. अजून वेगळी काय कमिटमेंट हवी आहे? मी लग्न वगैरे काही करणार नाही, हे तुला सांगितलंच होतं ना.. मग परत परत तू तोच एक विषय काढून का भांडतेस?”
“कारण, मला इतक्या वर्षापूर्वी ते इतकं महत्त्वाचं वाटलं नव्हतं, पण आता आयुष्याची पस्तीशी गाठल्यावर आयुष्यामध्ये कमिटमेंट असावी असं वाटतंय, मला स्वत:चं मूल हवं असं वाटतंय... असं वाटणंदेखील चूक आहे का?”
“मुलाच्या संदर्भामध्ये....”
“हो, तेही तू आधीच क्लीअरली सांगितलंस... जर मूल झालंच तर तू सगळी जबाबदारी घेशील. एक बाप म्हणून सगळी जबाबदारी. हे तू सांगितलंस, आणि तू निभावशील याचीपण मला खात्री आहे. पण मग एक नवरा म्हणून का नाही?”
“माही, मी तुझा लाईफ पार्टनर आहे. त्या नात्याला नवरा बायकोचं नाव देणं इतकं गरजेचं आहे का? मला वाटत नाही. माझ्यादृष्टीनं तुझा माझ्यावर असलेला विश्वास आणि कूठल्याही क्षणी... कुठल्याही कठिण क्षणी तू माझा धरून ठेवलेला हात... हे मला फार महत्त्वाचं आहे.. त्याहून जास्त काहीही नाही. जगातलं कुठलाही कागद, कुठलाही कायदा आणि कुठलाही धर्म ते देऊ शकत नाही... आय ऍम रीअली सॉरी. तुला काय हवंय ते समजतंय.. तुझी मागणी फार अवास्तव आहे असं नाही.. पण माझ्याच्यानं शक्य नाही.” त्यानं तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तो उठून बेडरूमच्या बाहेर आला. त्यानं लॅपटॉपवरची कारची चावी उचलली.
“निघालास? तुला हे बोलासांगायचं होतं.. तेवढं झालं की निघालास.. मला काय म्हणायचंय ते ऐकूनदेखील न घेता..”
“माही, प्लीज. भांडू नकोस...”
“रोज हेच ऐकते.. रोज स्वत:ला हेच समजावते.. भांडू नकोस. असिफला दुखवू नकोस. त्याला काही बोलू नकोस. आणि गप्प बसते... कारण शेवटी मलाच बोलायला तोंड नाही...कारण..” बोलताना हुंदका दाटून आला.
“माही. आता खरंच शांत बस.. फार बोललीस.” असिफचा आवाज दरडवल्यासारखा आला. “बोलू नकोस”
“का? कधीकधी वाटतं, असिफ, तू माझ्याशी लग्न करत नाही याचं कारण तुझा भूतकाळ नाही... माझा भूतकाळ आहे”
“माही, दॅट्स इनफ!” असिफ आता खरंच ओरडला. “किती वेळा सांगितलंय...”
“तुला तुझ्या भूतकाळाचं कौतुक घेऊन रडणं अलाऊड आहे, मी मात्र बोलायचंसुद्धा नाही. एकदा... असिफ... एकदा स्वत:शी कबूल कर. तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये. तुला एका वेश्येशी... एका कॉलगर्लशी लग्न करायचं नाहीये!!!”

No comments:

Post a Comment