Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

Monday, 21 October 2019

ऐकण्याची गोष्ट!


आटपाट नगर होतं, तिथं एक मुलगी रहायची.. तिला गाणी ऐकायला खूप आवडायचं. तिचा आवाज एकदम बेसुरा. एक गाणं तिला कधी धड म्हणता यायचं नाही. तरीही ऐकायला मात्र प्रचंड आवडायचं. ही कहाणी तिच्याच ऐकण्याची.
माझं सांगितिक परिपोषण झालं ते फक्त आणि फक्त हिंदी चित्रपट संगीतावर. का कुणास ठाऊक, मराठी गाण्यांबरोबर भावनिक नाळ कधी जोडलीच गेली नाही. पण हिंदी चित्रपतगीते आणि तीही जुन्या काळामधली म्हणजे माझ्या भावविश्वाचा ठेवा वगैरे वगैरे. आपल्या हिंदी चित्रपट संगीताची गंमत अशी की, संगीताचा कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नसतो. शास्त्रीय संगीतापासून ते सुफीपासून ते क्लासिक रॉकपासून ते जॅझपासून ते युरोपियन लोकसंगीतापर्यंत सर्व काही आपलं चित्रपट संगीत आवर्जून सामावून घेतं, आपलंसं करतं.
म्हट्लं तर पार जुनी जुनी गोष्ट वाटेल, पण सुमारे दोन अडीच दशकांपूर्वी गाणी ऐकायचं एकमेव हक्काचं ठिकाण होतं रेडिओ. विविधभारतीनं अनेक गाणी ऐकवली, नंतर अर्थात केबलवर म्युझिक चॅनल्स आले. तेव्हा आलेले एमटीव्ही आणि व्ही आंग्लाळलेले होते. त्यांनी फिरंगी गाणी ऐकवली. काहीही समजली नाहीत तरी संगीताच्या ठेक्यानं बांधून घेतलं पण ते कधी आतपर्यंत भिडलंच नाही. ते वयही अर्थात “काय ऐकतोय” ते समजून घ्यायचंच नव्हतं. पुढं कॉलेजात गेलो तेव्हा आमच्या घरी इंटरनेट नावाची जादू आली होती. यामध्ये बरीच गाणी परत परत हव्या तेव्हा ऐकता येऊ लागली. संगीत “ऑन डीमांड” झालं. इतके दिवस रेडिओला “कहिये क्या सुनायेंगे आप” म्हणावं लागायचं, आणि तेच ऐकावं लागायचं. मग भले “तुझे जीवन को डोरसे” मध्ये पार रोमॅंटिक क्षितिजावर पोचलेलं मन पुढच्याच क्षणाला “हम थे जिनके सहारे” ऐकून धाडकन जमीनीवर आपटलं तरीही पर्याय नव्हता. आता युट्युब “हे ऐकता की ते ऐकता” करू लागलाय. नुसता रफी ऐकायचाय? नुसता मदनमोहन आणि साहिर ऐकायचाय... केवळ इन्स्ट्रुमेंटल ऐकायचंय... ऐका!!!
मोबाईल फोनमधल्या वेगवेगळ्या म्युझिक ऍप्सनी आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगनं तर संगीत कानोकानी पोचलंय. आधी केवळ हिंदी चित्रपटसंगीतावर वाढलेले कानसेनांना आता पूर्व युरोपामधल्या एका अत्यंत छोट्या देशामधल्या लोकसंगीताची धुन ऐकता येतेय. संगीताचं हे बाजारीकरण झालेलं अनेक धुरीणांना पसंद पडत नाही. संगीत ही गाभार्‍य़ामधून ठेवायची गोष्ट नाही, गल्ल्यांगल्ल्यांमधून रस्त्यांरस्त्यांमधून घराघरामधून निनादणारं तेच खरं संगीत. म्हणूनही असेल तर हिंदी चित्रपट संगीत अनेक दशकांनंतर, अनेक स्थित्यंतरानंतरही टिकून आहे ते याच कारणास्तव. पुलंनी त्यांच्या एका लेखामध्ये एकेकाळी गाणी ऐकण्यासाठी लोक किती कष्ट करायचे, कुठून कुठून यायचे वगैरे वर्णन केलं आहे. आता ती परिस्थिती राहीली नाही, हवं ते संगीत, हव्या त्यावेळी, हव्या त्या स्वरूपामध्ये ऐकता येऊ शकतं. अभिजात संगीत ही एकेकाळी ठराविक वर्गाची मक्तेदारी होती, आता ती गल्लीबोळामधल्या प्रत्येक मोबाईलवर जाऊन पोचली. साहजिकच, ऐकणारे वाढले आणि ऐकवणारेही वाढले.
काहीही आणि कितीही ऐकत नसताना एका संगीतप्रकाराकडे मात्र अजिबात वळले नव्हते. ते म्हणजे आपलं शास्त्रीय संगीत. एक तर ते आपल्याला काहीच कळत नाही याची प्रचंड खात्री होती, दुसरं ते कंटाळवाणं असेल असं वाटायचं. त्यामुळे कुणी कितीही गोडवे गायले, घरात शास्त्रीय संगीत ऐकणारे-गाणारे कितीहीजण असले तरी ये अपने बसकी बात नही असं सतत वाटायचं. पण प्रत्येक गैरसमजाची एक्स्पायरी डेट असते, तशी या गैरसमजाचीही झाली. मी तेव्हा मुंबईमध्ये रिपोर्टर म्हणून काम करत होते. मुंबई फेस्टिवल म्हणून एक भलामोठा इव्हेंट चालू होता. बरेच कार्यक्रम होते. नवीनच काम सुरू केल्यानं मला असले साधेसुधेच इव्हेंट्स आणि बातम्या करायला मिळायच्या. त्यातही मी बरीच चाप्टर असल्याने (मी, बॉस नव्हे!!) बर्‍याच बातम्या फोनवरून ईमेलवरून मिळवून काम भागायच्ं. एके दिवशी संध्याकाळी मात्र बॉसने कंपल्सरी एका इव्हेंटला जायचं म्हणून सांगितलं, हरिप्रसाद चौरासियांचं बासरीवादन ऍट बाणगंगा. संध्याकाळी आठचा इव्हेंट. संपेपर्यंत दहा वाजणार, मग येऊन बातमी करायची. बॉसला म्हटलं, जायला कशाला हवंय? फोनवर विचारते, कोणकोण आलं होतं, काय काय राग म्हटले.
बॉसनं भुवया उंचावल्या. “राग म्हटले?”
“हो, तेच काय क्लासिकलमध्ये असतं ते! व्यवस्थित विचारून घेते ना”
बॉसला माझी सांगितिक अक्कल ध्यानांत आली. “जा!” केवळ एकाच शब्दांत बोळवण झाली. जायचा मनापासून कंटाळा आलेला. त्यात परत हाकलल्यामुळे अजूनच चिडचिड. टॅक्सी पकडून इव्हेंटला गेले. रिपोर्टरसाठी आरक्षित ठिकाणी जाऊन बसले. कार्यक्रम ऑलरेडी चालू झालेला. मला हरिप्रसाद चौरासिया हे नाव फक्त ऐकून माहित. त्यातही ते बासरी वाजवतात, आणि चांदनीचं म्युझिक दिलेल्या शिव-हरिपैकी एक आहेत याहून अधिक माहिती नाही.
त्या दिवसांमधली माझी एकूणच मन:स्थिती बरीच चमत्कारिक होती. घर सोडून रहायचा फारसा अनुभव नाही. मराठी माध्यमांमधून शिकून इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जम बसवायचा प्रयत्न. घरी थोडेफार प्रॉब्लेम्स चालू. आपलं म्हणावं असं कुणीही नाही. टोटल एकाकीपणाचा असह्य अनुभव आणि त्यात करीअरमध्ये पुढं जाण्यासाठी चालू असलेली जीवघेणी स्पर्धा. कुठंतरी आपण या सर्वांमध्ये फिट नाही हे माहित होतं, पटत होतं, पण जमत मात्र नव्हतं. अशा वेळी बॉसनं मुद्दम अशा आडवाटेवरच्या इव्हेंटला आपल्याला विनाकारण पाठवलंय असं काहीतरी फिलिंग येऊन संताप संताप झाला होता.
पण आता आलोय तर किमान अर्धातास तरी बसणं भाग होतं. पंडीतजी काय वाजवतायत ते तिथं असलेल्या पीआरवाल्यांना विचारून घेतलं. रागांची नावं आणि तालांची नावं नुसती नोंदवली आणि ऐकत बसले. पंधरा मिनिटांत इथून सटकायचं हे मनात पक्कं. आपल्याला यातलं काहीही कळत नाही हे माहित होतं पण तेव्हा व्हॉट्सऍप आणि फेसबूक मोबाईलवर नसल्यानं लक्ष विचलित झालं नाही. एक तर बाणगंगेचा परिसर अतिशय जादुई. मुंबईमधून अचानक हजार वर्षं मागे जावं अशी ही जागा. ऐतिहासिक जागांमध्ये त्या जुन्यापुराण्या क्षणांचे काहीतरी काल-अवशेष टिकून असतात की काय कोण जाणे. पण या जागांचं स्वत:चं वेगळंच अस्तित्व असतं, त्या संध्याकाळी ते अस्तित्व अधिकच प्रसन्नरूपानं जाणवत होतं. अचानक हरिजी जे काय वाजवत होते ते पटकन समजलं... लताचं गाणं... बहुतेक.. तेरा मेरा प्यार अमर... मधली सुरावट. मला राग वगैरे तेव्हाच काय आजही समजत नाही... पण त्या गाण्यामधली सुरावट आणि त्या रागाचे स्वर दोन्ही एकदम मनाला स्पर्शून गेले. देखणा देव हसरी साधना डोळ्यांसमोर उभी राहिली. लता शैलेंद्रच्या शब्दामध्ये “फिर क्यु मुझको लगता है डर” म्हणत मनामध्ये येऊन राहिली. इतका वेळ सूर नुसते कानांवर पडत होते, आता कान स्वत:हून आसुसून ऐकू लागले. समजत नसलेल्या भाषेमध्ये ओळखीचा किमान एक जरी शब्द आला तरी ती भाषा आपलीशी वाटते... तसंच काहीसं झालं.
हरिजी आपल्याच तंद्रीमध्ये वाजवत होते, ऐकणारे तर ऐकतच होते. त्यात अजून एका बावीशीच्या मुलीची भर पडली. ऐकू लागले. काहीतरी अस्वस्थसं वाटत होतं. बासरीचे स्वरच मुळात आधी नाजूक. जखमेवर फुंकर मारावी तसे हळूहळू येणारे. चंद्र आकाशामध्ये उगवलेला. आजूबाजूला बाणगंगेचा तलाव... त्या तलावाच्या कडेने लावलेल्या पणत्या. त्या पणत्यांच्या स्निग्ध प्रकाशात उजाळलेला परिसर. तलावाच्या पाण्यावर वार्‍याच्या लहरीनं उठत रहावेत असे स्वरांचे तरंग. हळूहळू डोळ्यांसमोर आलेली एकएक प्रतिमा धुरकट होत गेली. उरले ते फक्त त्या सुरावटीचे काही तुकडे. ऐकताना डोळे कधी पाणावले ते समजलंही नाही.
आपण जे ऐकतोय, ते आपल्याला काहीही समजत नाही हे माहित होतंच. पण समजत नाही तरीही जे कानांवर येतंय ते थेट मनापर्यंत पोचतंय ही भावना त्याहूनही ओव्हरव्हेल्मिंग होती. कशाला करायचा अट्टहास. प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे मेंदूला. नाही समजलं तरीही मनाला भिडलं तरी चालत नाही का? तीन चार वर्षाचं टिल्लं आयुष्यात पहिल्यांदाच पावसांत भिजत असतंय, त्याला कुठे समजतं समुद्राच्या पाण्यानं वाफ होते, ते आकाशात जाते आणि तिथून ढग बनून पाऊस पडतोय, आणि त्या पावसांत आता आपण भिजतोय. त्यालाकाय करायचंय ते जलचक्र आणि मान्सून वगैरेंची माहिती. त्या बाळाला फक्त अंगावर पडणार्‍या त्या थंडगार पाण्याच्या थेंबाचं महत्त्व. त्याचं अस्तित्व त्या क्षणांपुरतंच. तसंच काहीसं या संगीताचंही असतं का? असेलही. असावंच. कारण, त्या क्षणानं मला तेही अस्तित्व दाखवून दिलं. तुला शास्त्रीय संगीत समजत नाही. हरकत नाही पण ते माझ्या मनापर्यंत भिडतंय का ते महत्त्वाचं... कायदेकानूननियमशिस्तीच्या पलिकडे जाऊन नेणीवेच्या पातळीवर जाऊन पोचतात ते खरे सूर... बाकी सब मोहमाया...
इव्हेंट करून ऑफिसमध्ये गेले, बॉसला बातमी करून दिली. निघताना त्याला फक्त “थॅंक्स” सांगितलं.
त्यानंतर तसं आयुष्यात फार काही बदललं नाही. इतर संघर्ष त्यांच्या गतीनं चालूच राहिले. बदललं काय तर... मी शास्त्रीय संगीत ऐकायला सुरूवात केली. अगदी ठरवून नाही, पण लिहिताना – काम करताना काहीतरी बॅकग्राऊंडला गाणी वाजवायची सवय होतीच, त्यात प्लेलिस्टमध्ये काही क्लासिकल वाद्यसंगीत घेतली. हिंदी चित्रपटसंगीत अजूनही अत्यंत आवडीचं आहे, त्यात फरक पडणार नाहीच. अजूनही शास्त्रीय संगीतामधलं फारसं काही कळत नाही. तरीही ते ऐकलं जातंय. नंतर पीआरमध्ये सुदैवानं अनेक शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम अटेंड करता आले. दरवेळी नवीन काहीतरी ऐकत गेले, नवीन काही तरी गवसत गेलं. समोर जे काही गायलं जातंय तो नक्की सूर कुठला ते अद्याप समजत नाही, राग ओळखायची बात तर दूरच (इतकं ऐकूनही!! काय ती सांगितिक बुद्धीमत्ता). तरीही मनाला आवडतंय या एकमेव कारणासाठी ऐकलं मात्र जातं.
ऐकायला लागल्यावर जाणवलं की अरे, आपण का ऐकत नाही? हे समजलं नाही तरी चालतंय हा समज संपुष्टात आल्यानंतर जे ऐकतोय ते आपल्याला कितपत भावतंय, ते लक्षात यायला लागलं. प्रवासामधला एक पाय पुढे पडला. ऐकलंच नाहीतर समजणार कसं!!!! मग हळूहळू शास्त्रीय संगीताबरोबरच बाऊल संगीताची गोडी लागली. ए आर रहमान आणि इलयराजाच्या स्पर्शानं तमिळ लोकसंगीत आवडायला लागलं. कोक स्टुडिओ पाकिस्ताननं तर संगीताचा नवीनच खजिना खुला केला आणि सीमेपल्याडचं लोकसंगीत हृदयात जाऊन बसलं. लयपश्चिमा हे आशुतोष जावडेकरांचं पुस्तक वाचताना कधीमधी ऐकत गेलेल्या गाण्यांनी तथाकथित धांगडधिंगावाली रॉक म्युझिकची आवड निर्माण झाली. पण या सर्व  संगीतामधला आदिम सूर म्हणजे आपल्या अभिजाततेचा वारसा मिरवणारं शास्त्रीय संगीत मात्र अजूनच लाडकं झालं.
म्हणून ऐकायलाच हवं. आवडतं ते तर आवर्जून ऐकलं जातंच. जे आवडत नाही तेही ऐकलं तर त्यातलं परत काय आवडतंय ते समजतं. जे समजत नाही म्हणून इतके दिवस ऐकलंच जात नव्हतं ते कधीतरी ऐकून बघा. माझा शास्त्रीय संगीत कंटाळवाणं असतं हा माझा समज जसा बाणगंगेच्या साक्षीनं आणि हरिजींच्या बासरीनं गेला, तसा तुमचाही गैरसमज असेल तर तोही जाईल. पण त्यासाठी वेळात वेळ काढून ऐकायला हवं. फार जास्त काही नाही... ऐकायला हवं!!!
साठा उत्तराची ही कहाणी प्रत्येक संगीतस्वराच्या साक्षीनं अशीच कायम चालत राहो.
-          नंदिनी देसाई

Saturday, 29 December 2018

तो आणि ती. (लोकसत्तामध्ये पूर्वप्रकाशित)


तो आणि ती
नंदिनी देसाई


तो आणि ती... जिथे तिथे दिसणारे. सर्वत्र असणारे. एकमेकापासून पूर्ण भिन्न आणि तरीही सतत एकमेकाच्यासोबत..
ते म्हणतात ना "तुझ्यावाचून करमेना आणि तुझ्याशिवाय राहवेना.." अगदी तीच गत. तुम्हालाही कुठेतरी भेटलेच असतील तो आणि ती.. बघा बरं आठवतायत का?

++++++++++++++++++++
तो रस्त्यावरून एकटाच बोलत चाललाय. अर्थात ती पलीकडे मोबाईलवर आहेच. तो तिला भेटायला तिच्या घरी निघालाय. तिच्या घरी तिला भेटायला. तिच्या घरी कुणीच नाही.. तिच्याशिवाय..
ती त्याला पत्ता सांगतेय. थोडा बरोबर थोडा चूक. तिला त्याने घरी यावंसं वाटतय आणि भिती पण वाटतेय. तशी फ्रीजमधे सर्व जेवण तयार आहे. खास त्याला आवडणार्‍या फ्रूट कस्टर्डसकट. तिने घर केव्हाच आवरून ठेवलय. तरीही त्याला पत्ता चुकीचा सांगतेय.

तो त्याच भागात केव्हाचा फिरतोय. ती त्याला "हे दुकान दिसलं की उजवीकडे वळ" वगैरे टाईप सूचना करतेय. आईबाबाच्या बेडरूममधून तो रस्त्यावर फिरताना दिसतोय. उन्हात पार घामेजलाय. तिने त्याला सांगितलय "कुणाला पत्ता विचारू नको. कुणीतरी घरी आईला सांगेल."

तो बिचारा आता वैतागलाय. हातातला फुलाची वाट लागलेय. ती फक्त मोबाईलवर बोलतेय. दिसत नाहीच. तितक्यात तो चालता चालता थबकतो. काहीतरी आठवल्यासारखा. डाव्या हाताकडच्या बिल्डिंगमधल्या तिसर्‍या मजल्यावर. तो सर्रकन बघतो. पडद्याची हालचाल होते. तो गालातल्या गालात हसतो. येणार्‍या रिक्षेला हात करतो. ती फोनवर ओरडते.
"अरे कुठे चाललास.."
त्याला तिची बिल्डिंग कुठली हे समजलय. तिला तो येतोय हेही समजलय.
=======================================================

हार्बर लाईनचा प्लॅटफॉर्म. दुपारी दोनची वेळ. स्टेशन बान्द्रा. अजिबात गर्दी नाही. तिथे ती दोघं येतात. सोबत अख्खं खानदान. ती असेल सोळा सतरा वर्षाचा. तोही तितकाच. ती नवीन ड्रेसमधे अवघडलेली. त्यात वर तो कधी न घातलेला बुरखा. अम्मीने आणि नानीने तिला आज सजवलय. एखाद्या बाहुलीसारखं. ती दिसतेय पण तशीच नाजुक. तिला आज "पसंतीसाठी" आणलं होतं. ती कुणालाही आवडेल अशी. पहिल्याच नजरेत तिकडच्याच्या नजरेत भरलेली.

ती गप्प बसलेय. ट्रेनचची वाट बघत. आणि त्याच्या चिडवण्याला नुसता उत्साह आलाय. एरवी असतं तर तिने त्याला चांगलंच झोडलं असतं. पण आता सोबत अब्बा आहेत नाना आहेत चाचा आहेत सगळेच मोठे आहेत. आता कसं काय बोलणार?

तो बोलतच चाललाय.. गाणं म्हणतोय. "ये चांदसा रोशन चेहरा.. जुल्फोका रंग सुनहरा.."
तिला खूप राग येतोय. पण काही बोलता येत नाहीये. आता त्या होणार्‍या नवर्‍याचं नाव रोशन आहे.. म्हणून काय मामाने या गाण्यानेच चिडवायचं.?
घरी गेल्यावर बघते तुला.. ती त्याला खुणेनेच म्हणते. तो अजूनच जोरात हसतोय. तिच्याच वयाचा आहे पण तिचा मामा आहे ना... नात्याने मोठा. म्हणूनच...
ती आतल्या आत लाजतेय. आणि हसतेय. वर वर राग दाखवतेय पण तिला त्याचं ते चिडवणं आवडत॑य. त्याला तिचं खुश होणं दिसतय. ती दूर जाणार हेही जाणवतय. म्हणून्च तो अजून तिला चिडवतोय.
"ये चांदसा रोशन चेहरा...

=====================

ती जबरदस्त घाबरलेली आहे. तरी त्याचा हात धरून उभी आहे,
"अगं आई घाबरतेस काय? ती बघ ती इतकीशी लहान मुलगी जातेय. आणि तू उगाच घाबरतेयस.."
ती त्याच्याकडे पाहते. कधीतरी एकदा ती या सरकत्या जिन्यामधे अडकून पडली होती. अजूनपण तिला या जिन्याची भिती वाटते. इतके दिवस ती ना ना कारण. देऊन लिफ्टने नाहीतर जिन्याने जायची, आता मात्र इलाजच नाही. साक्षात कॉलेजकुमार मुलगा तिला घेऊन आलाय या मॉलमधे आणि...

"आई, मी हात धरतोय ना तुझा?" त्याने तिचा हात हलकेच धरत विचारलय...
तोच स्पर्श, गेल्या सतरा वर्षाचा, कधीतरी तिने त्याचा हात धरला होता. चालताना आधार द्यायला. आज त्याने तिचा हात धरलाय. तेव्हा तो जस्सा घाबरला होता तशीच ती आज घाबरली आहे. पण तो तिला सावरतोय. आज जरी ती धडपडली तरी तो तिला नक्की धरेल. तेवढं बळ त्याच्यामधे नक्कीच आहे तिला अलगद उचलण्याइतकं.. ती विचार करतेय.. आठवतेय. लहानपणी फुलपाखराला घाबरणार्‍या त्याला. त्याचं बाळपब तिच्यानजरेसमोरून तरळतेय. डोळ्यासमोरून एक धुकं उभं राहत चाललय.

तो गालातल्या गालात हसतोय. त्याची आई इतक्या वर्षात सरकत्या जिन्यावर कधीच चढली नव्हती. आज ती चढलीये. अजून दोन पावलं बास.. पण त्याचे डोळे का भरून आलेत तेच समजत नाही त्याचं त्याला.

===========================================
 “बाई!” आलेल्या हाकेनं ती वाटेत चालतानाच थांबते. तिला सवयच आहे. आयुष्याची पस्तीस वर्षाहून अधिक तिची ओळख हीच आहे. शिक्षिका, शिक्षण सेविका, मॅडम, मॅम, मिस वगैरे नामाभिधानं खूप नंतरची. त्या आधी एकेकाळी तिची ओळख फक्त आणि फक्त “आमच्या बाई” अशीच होती.
आता रीटायर होऊनच दहा वर्षं झाली. शाळा संपली. साडेदहा ते साडेपाच गुंतून रहायची जागा संपली. शिक्षणाचं दान देता देता तिनं बरंच पुण्य कमावलं असणार कारण, एकुलता एक मुलगा खूप शिकला, परदेशात गेला. सूनही चांगली मिळाली. त्याच्या परदेशामध्ये जाण्याचं तिला फारसं वाईट वाटलं नाही. क्वचित कुणी भेटणारं तिला टोमणा मारायचं, “मुलगा आईला टाकून गेला.”
ती हसून उत्तर द्यायची. “त्याच्या विषयासाठी भारतात खरंच संधी नव्हती, तशी संधी मिळाली तर परत येईलही. आणि मी एकटी कुठं आहे? तुम्ही सारे आहातच की मला सांभाळायला.” शाळेत शिकवत असताना किंचितही आवाज न चढवता विद्यार्थ्यांना त्यांची चूक् दाखवून द्यायची करामत तिनं साधली होती. आताही तीच कामी येत होती.
“बाई!” परत आलेल्या आवाजानं ती मागं वळून पाहते.  समोर तिशी पस्तीशीचा वाटावा असा मुलगा उभा आहे. तिला नाव आठवत नाही. चेहराही ओळखीचा भासत नाही. पण त्याच्या नजरेमधली ओळख सांगून जाते की हा आपला कधीकाळचा विद्यार्थी.
ती हसते. नाव विचारते. तोही शाळेत असताना तिनं शिकवल्यासारखं संपूर्ण नाव म्हणून दाखवतो.
तिला अचानक आठवतं, हा तोच विद्यार्थी. दर वर्षी तिच्या वर्गात याच्यासारखा एकतरी असणारच. शिकण्यात रस नाही. अभ्यासात लक्ष नाही. घरी अभ्यास करवून घेणारं कुणी नाही. तिचा जीव असल्या मुलांसाठी कळवळायचा. हजारोंनी पैसे भरून ट्युशनला जाणार्‍या मुलांची तिला चिंता नसायची, ती मुलं आयुष्याच्या शर्यतीमध्ये कशीही तरली असती.
याच्यासारख्यांचं काय? याला गणीताचा जाम कंटाळा. एक बेरीज वजाबाकी धड करायचा नाही.
ती तरीही विचारते. “सध्या काय करतोस?” तो एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करत असल्याचं सांगतो.
ती तरीही सुखावते. काही का असेना, पोरगं धड नोकरीला लागलं. “तिथं काय म्हणून काम करतोस?” ती पुढं विचारते.
आता मात्र तो जरा चुळबुळतो. तिला वाटतं उगाच विचारलं.
त्त्याच्याकडून उत्तर येण्याआधीच ती म्हणून प्रश्नच बदलते. “बाकी, घरी सगळे कसे आहेत?”
“बाई, ते हॉटेल माझं आहे” तो मात्र उत्तर देतो. “तुम्ही मला वर्गात एकदा म्हणाला होतात की, अभ्यास केला नाहीस तर आयुष्यभर चहाच्या टपरीवर कपबश्या विसळशील. दहावीला नापास झालो आणि खरोखर एका वडापावच्या गाडीवर हेल्पर म्हणून लागलो. कित्येक दिवस तेच काम करत होतो. एकदा मालकानं पगाराचा हिशोब करताना मुद्दाम कमी पैसे दिले. त्यादिवशी आयुष्यामधलं गणिताचं महत्व समजलं” तो घडाघडा बोलत जातो. “मग बाई, मी खूप अभ्यास केला. मार्क मिळावेत म्हणून नाहीतर गणित यावं म्हणून.”
तो भर बाजारामध्ये तिला त्याच्या आयुष्यामधल्या संघर्षाची कहाणी ऐकवत जातो. ती ऐकत जाते. त्याच्या तोंडून तिला इतक्या वर्षांच्या कष्टाची, घसा फोडून सांगितलेल्या शिकवणीची पावती मिळत जाते.
तो तिथं रस्त्यातच वाकून तिच्या पाया पडतो. ती त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देते. तो वर बघतो, तेव्हा त्याचे डोळे डबडबलेले असतात. आयुष्यामधलं एखादं सर्वात मोठं गणित सुटल्यासारखा आनंदानं तो हसत मात्र असतो.

>>>> 
 ती आज येणार म्हणून सगळं घर गजबजून गेलंय. त्याच्या खोलीमध्ये तो केव्हाचाच एकटा बसून आहे. एरवीही त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसतो, आज तर काय हक्काचं कारण.
मध्येच कधीतरी सूनबाई येऊन डोकावून “चहा हवा का?” विचारते. तो मानेनंच नाही म्हणून सांगतो.
“किती वाजता ट्रेन येईल?” सूनबाई मागे वळायच्या आत तो अधीरतेनं विचारतो.
“ट्रेन मघाशीच आली. आता पाचेक मिनिटांत घरी पोचतीलच” सूनबाई कामाच्या लगबगीमध्ये इतकं सांगून निघून जाते. तो कसाबसा आधार घेत उठतो. खोलीच्या दारापर्यंत येतो. त्याला तिथं आलेला पाहताच साठीला पोचलेला लेक त्याच्या वयाच्या मानानं नव्वदीच्या बापाला आधार द्यायला उठतो.
“तुम्ही कशाला इथं आलात? सगळे आले की आम्ही सर्वात अधी तुम्हाला भेटायलाच येणार की.” लेक उत्तरतो.
तो काहीच बोलत नाही. तितक्यात हॉर्नचा आवाज येतो. गेटमधून गाडी आत आलेली दिसताक्षणी बापलेक दोघंही दाराकडेच जातात. गाडीमधून त्याची पाच वर्षाची पणती खाली उतरते. पहिल्यांदाच भारतात आलेली, विमान आणि रेल्वे प्रवासानं दमलेली, भांबावलेली, आणि तरीही निरागस डोळ्यानी टकामका पाहणारी.
पिढ्यानपिढ्याचं संचित त्याच्या डोळ्यांसमोर उभं आहे. तिच्या रूपामध्ये त्याला कधीकाळी मागच्या शतकामध्ये जन्मलेली त्याची लहानगी बहिण दिसते, आणि तिला मात्र समोर उभा असलेला वास्तुपुरूष. या घराण्याचा पूर्वज.
हलकेच एक पाऊल उचलून ती त्याच्याकडे येते, त्याच्या थकावलेल्या गात्रांकडे बघत, आणि बोळक्या झालेल्या तोंडामधल्या हसण्याची नक्कल करायचा प्रयत्न करत, ती सामोरी येते. तो किंचित खाली झुकतो.
“आजोबा?” ती विचारते.
तिच्यामागे उभा असलेला नातू आणि नातसून, लेक आणि सून हा सारा सोहळा पाहत उभे आहेत.
“नाही गं. तो तिकडं उभा म्हातारा आहे ना, तो तुझा आजोबा. मी तर तुझा दोस्त आहे” तो त्याच्या सावकाश आवाजात उत्तर देतो. ती खुदकन हसते. तोही हसतो.
अख्खं घर त्या चार पिढ्यांच्या मधल्या अंतराला मिटताना पाहून खुळावत जातं.


Wednesday, 15 February 2017

रात के हमसफर


काम संपस्तोवर रात्रीचे दीड दोन वाजलेले असावेत, डोक्यात संगीत कॉफीचा कैफ चढलेला असावा, यारदोस्तांसोबत चिकार खिदळणं झालेलं असावं आणि अशावेळी जग त्याच्या स्वप्नांच्या दुलईमध्ये गुरफटलेला असताना आपण रस्ताभर हिंडत सुटावं. परवा थिबा पॅलेसवरून बाहेर पडल्यावर सरळ घरी येण्याऐवजी दोघंच थिबा पॉइंटकडे गेलो. दूरवर गप्पकन फिरणारा भगवतीचा लाईट हाऊस. क्षितीजाच्या आसपास निवांत पहुडलेला समुद्र, समुद्र आणि खाडीच्या मध्ये पसरलेला भाट्याचा पूल. खाडीमध्ये डोलणार्‍या मच्छिमार बोटी. आणि त्या बोटींच्या अलिकडे झोपलेली रत्नागिरी. कुठलंही शहर त्याचं खरं रूप दाखवतं ते रात्रीच्याच वेळी. दिवसा गाड्या, माणसं, गायीगुरं, किलकिलाट यांनी लपेटलेलं शहर हा सगळा घूंघट उतरवतं ते रात्रीच्या वेळी! एखाद्या शहराच्या प्रेमांत पडायचं असेल तर ते दिवसा केवळ बघावं, पण अनुभवावं ते रात्रीच्या वेळेला. अशावेळी सोबत कुणी असो वा नसो, मनानं मी एकटीच अस्ते. माझ्याच विश्वामध्ये रात्रीच्या या नीरवतेशी माझा संवाद साधत.
रात्रीच्या मुंबईची कैक रूपं आहेत. काही सुरेख चित्रं आहेत तर काही किळसवाणी गिरबिट. मुंबईच्या कुठच्या क्षणी तुम्ही कूठे आहात यावर मुंबई “कशी?” हे ठरतं. रात्रीच्यावेळी मुंबई पहावी ती जुनी मुंबई. ही मुंबई तिथे राहताना अनेकदा अनुभवली. मुंबईच्या रात्रीचा पाऊस अंगचिंब भिजेस्तोवर झेलला, मुंबईच्या रात्रीमध्ये भूक अनावर झाल्यानं सायकलवर चहा विकणार्‍याकडून चहा  घेऊन बिस्कीटं खाल्ली, मुंबईच्या रात्रीमध्ये त्याचा हात हातात इतका घट्ट धरून ठेवला की त्याची लास्ट लोकल चुकली (चुकवलीच !!) आणि मग रात्रभर भटकत राहिलो त्या गल्ल्यांमध्ये.  मुंबईच्या रात्रीने एकटेपणा दिला. साथ दिली आणि मुंबईच्याच रात्रीने आपले अश्रू आपणच कसे पुसावेत हे शिकवल. मी मुंबईला फार मानते ते या बाबतीत. मुंबई तुम्हाला फार फार स्वतंत्र बनवते. या शहरामध्ये कुणाहीवर अवलंबून न राहता तुम्ही जगू शकता! मुंबई रात्रीसुद्धा कधी थांबलेली नस्ते, ती अखंड चालणारी मुंबई जेव्हा आळसावते तेव्हा तिचं रूप अतिशय अनोखं असतं.
मुंबईच्या अगदी उलट माझी दुसरी जीवाभावाची सखी, चेन्नई. सुरूवातीला आले तेव्हा चेन्नई कुठल्याही बाजूने कॉस्मोपोलिटन मेट्रो वाटलीच नाही. नंतर समजलं की चेन्नई मेट्रो नाहीच, आहे ते एक विशाल पसरलेलं खेडं. इथली माणसं त्याच जिव्हाळ्याची आणि मायेची. निवांत जगणं हे इथलं मुख्य सूत्र. मुंबईची धावपळ चेन्नईला मानवणारच नाही. इथे आल्यावर संध्याकाळी साडेसहा वाजता जेव्हा मला लोकलमधला लेडीज डबा अल्मोस्ट रिकामा दिसला (मी आणि अजून तीन पॆसेंजर. अख्ख्या डब्यात) तेव्हा मनापासून घाबरले होते. इतकी रिकामी लोकल बघायची सवयच नाही ना!  चेन्नई जशी फिरायला लागले तशी अधिक आवडली. मुंबईसारखी धकाधकीची नसेल, मुंबईसारखी फॅशन कॉन्शस नसेल, पण चेन्नई आहे मात्र अफलातून. थोडीशी लाजरीबुजरी वाटणारी चेन्नई नंतर नंतर काय दबंग आहे ते समजत गेलं. आता तर सध्या चेन्नई रोजच्या रोज नॅशनल न्युज मध्ये आहे. पण चेन्नईचं सर्वात सुंदर रूपडं कधी असेल तर तेसुद्धा रात्री. चेन्नईला आमच्या ड्रायव्हरचं नाव होतं बाबू. हा बाबू पण मस्त माणूस. फिरायला जायचं म्हटलं की “अम्मा, ये बी देक लो, वो बी टूरीस्ट पॉइण्ट” करत कुठेकुठे फिरवायचा. एकदा तिरूपतीला जायचं ठरलं, दर्शन तिकीट लवकर होतं म्हणून  रात्री दीडवाजता घराबाहेर पडलो. शांत, निवांत चेन्नई अशावेळी अधिकच लाडावलेल्या मांजरीसारखी पहुडलेली होती. चेन्नईच्या त्या रस्त्यावर अचानक त्याला गाडी थांबवायला सांगितली, आणि खाली उतरले. असंच सहज. रात्रीची चेन्नई गुंडुल्या बाळासारखी निवांत दिसत होती. दिवसभर गाड्यांच्या गर्दळीमध्ये रस्ता कधी असा निवांत कधी पाहिलाच नव्हता, त्यादिवशी पाहिला. चेन्नईशी ऋणानुबंधाची अजून एक घट्ट गाठ त्या रात्री मारली.
मी आतापर्यंत राहिलेल्या शहरांमध्ये सर्वात आवडतं शहर आहे मंगलोर. अतिशय सुखसमृद्ध, सुसंस्कृत आणि प्रेमळ शहर. मुंबईने मला एकटं राहून जगायला शिकवलं, तर मंगलोरने मला नवरा बायको मुलगी अशा तिकोणी संसारामध्ये रमायला शिकवलं. मंगलोर सोडलं त्या दिवशी मी खूप रडले, शहर सोडून निघाले त्याहून जास्त जीवाभावाची जमलेले सुहृद सोडून निघाले याचं जास्त रडू आलं होतं. रात्रीचं मंगलोर अनेकदा अनुभव्लं ते रेल्वेस्टेशनवरून घरी येताना. दिवसाभराचा प्रवास करून घरी येत असताना निवांत मंगलोर अजूनच आपलंसं वाटायला लागायचं. या शहराच्या डीएनएमध्येच शांतता आहे. दिवसाही मंगलोर खूप शांत वाटायचं, कितीही गजबजलेला परिसर असू देत, शहर कायम सुकूनमध्ये असायचं. रात्रीच्या वेळी तर ही शांतता अजूनच गडद व्हायची आणि काळोख्या रात्री मंगलोर अमावस्येच्या रात्रीसारखं पिठूळ चांदण्यांचं, पण चंद्राची लकलक  नसलेल्या आभाळासारखं भासायचं.
गेली अनेक वर्षं रात्रीचा कारने प्रवास करणंच सॊडलंय, पण रात्रीचा प्रवास खरा भावतो तो बसमधून. कैक वर्षांपूर्वी  एकदा बसचं तिकीट मिळालं नाही म्हनून पनवेलहून रत्नागिरीला गोवा बसने आले होते. त्याने उपकार करून मला क्लीनरची जागा बसायला दिली. अख्खी रात्र झोपले नाही. कारने काय बसने काय या एन एच १७ र्वरून कैकदा फिरले होते. पण त्या ड्रायव्हरच्या बाजूला बसून इतक्या उंचीवरून दिसणारा तो रस्ता, आणि ती घाटांमधील वळणं अनुभवणं खरंच खास होतं.... हातखंब्याला पहाटे तीन वाजता उतरल्यावर हाच तो तिठा हेच समजेना. रात्रीच्या वेळी कुठलीही जागा किती शांत आणि गूढ दिसते ना.

पण रात्रीच्यावेळी सर्वात गूढ काय दिसत असेल तर तो आपला बेस्ट फ्रेंड –समुद्र. लोकं मावळता सूर्य पाहून झाला की समुद्रकाठावरून घरी जातात. पण खरा चमत्कार सुरू होतो तो सूर्य मावळल्यावरच. कधी तुपामध्ये दिव्याची काजळी घालून काजळ बनवताना पाहिलंय? तसंच त्या दिनकराच्या अनेक रंगांनी नटलेल्या त्या समुद्रावर हळूहळू काजळी पडत राहते आणि तो समुद्र काळ्याशार काजळासारखा रंगत जातो. वार्‍याची दिशा बदलते, भरती ओहोटी बदलते, पण दूरवर क्षितीजाच्या मिठीमध्ये कुठेतरी विसावलेला हा समुद्र दिवसभर मस्ती केलेल्या बाळानं दमून कुठंतरी कोपर्‍यात दोन्ही हात डोक्यावर टाकून झोपल्यासारखा निवांत दिसतो. अपवाद अर्थात पावसाचा. रात्रीचा बेदम पावसाळा समुद्रकिनारीच पहावा. थाडथाडथाड पडणारे ते पावसाचे थेंब, फणा काढून फुत्कारणार्‍या नागासारखा समुद्र आणि तांडवामध्ये शंकराने नेऊन हात फिरवावेत तशा किनार्‍याला येऊन थडकणार्‍या लाटा. आणि या सर्व भयंकर दृश्यासमोर उभी अस्लेली मी एक क्षुल्लक मानवप्राणी. निसर्गाचा कैक लाखो वर्षं चालू असलेल्या या अव्याहत खेळामधला हा छोटासा क्षण. त्या क्षणाची धुंदी अनुभवणारी मी! या अनाहत नादाचा मनावर कुठेतरी गुंगारा बसत जातो. रात्रीचा दिवस होतो, पण मी मनानं कूठंतरी अजून त्याच क्षणामध्ये थोडीशी राहीलेली असते.
मग मी थोडीशी इथेपण असते. एका दूरवरच्या कड्यावरून खाली दिसणारा समुद्र  पहात. हाच समुद्र तो रौद्ररूप धारण करणारा आणि हाच समुद्र त्याची गाज ऐकवत बसलेला. रात्रीची वेळ हळूहळू नसानसांमध्ये चढते. गात्रं थकतात, पण थकत नाही ते मन... ते या निवांत शांत पहुडलेल्या रस्त्यांवरून भरकटतच राहतं. मेंदूच्या स्टेशनमध्ये अचानक रफी येतो आणि शम्मीच्या आवाजामध्ये कानांत हलकेच गुणगुणतो..
रात के हमसफर थक के घर को चले. झूमती आ रही है सुबह प्यार की.. 

Sunday, 6 September 2015

संंध्याकाळ

दिवसाभरामधली माझी सर्वात नावडती वेळ. संध्याकाळ. तिन्हीसांज. दिवस ढळायला आलेला असतो, रात्रीची कुठेतरी सुरूवात असते. सूर्य मावळतो, पण जाताजाता थोडाफार उजेड ठेवून जातो. हळूहळू तो उजेड काळोखानं निवळायला लागतो. आणि माझ्या मनाला कायमचीच हुरहूर लागते.
.. एक कसलीतरी अजब उदासी मनावर फिरू लागते.
संध्याकाळ नकोशी वाटते. कशाचीही अखेरच नकोशी वाटते. बहुतेक संध्याकाळी या घरात कोंडलेल्या अवस्थेमध्ये जात असतात, मच्छर येतील म्हणून दारंखिडक्या सर्व गच्च बंद करून बसायचं. बाहेर हळूहळू धूसर होत जाणारा त्या उजेडी-काळोखाचं मिलन बघायचंच नाही. श्वास रोखून धरल्यासारखं गच्च कोंडलेल्या अवस्थेमध्ये घरातच खुरटायचं...
संध्याकाळ ही प्रेमी लोकांची आवडती वेळ असते म्हणे. शाम हंसी, शाम जवां, शाम ढले वगैरे कित्येक गाण्यातून शेरोशायरीमधून ते झळकत असतंच. आमची गट्टी मात्र तलतच्या रेशमी आवाजामधून ठिबकणार्‍या शामे गम सोबतच जास्त जमणारी.  हल्लीहल्ली तर जास्तच. पण तो काळ असाहोताकी, संध्याकाळसुद्धा रोमॅण्टिक वाटायची. क्वचितच कधीतरी पण वाटायचे खरी.
सूर्यास्त झाल्यानंतर दिवस संपतो म्हणे. मग सुरू होते ती भुताखेतांची वेळ. करकरीत तिन्हीसांज चढत चढत जाते ती मध्यरात्रीपर्यंत. हा सगळा वेळ त्यांचा. जे काही अमानुष आहे, भयंकर आहे, भितीदायक आहे, आपल्या आकलनाबाहेरचं आहे- ही वेळ त्यांची. अंधाराच्या येण्याआधी देवासमोर दिवा लावायचा. शांत तुपाच्या वातीमध्ये जळत असलेली ती दिव्याची इवलाली ज्योत या सर्व अमानवी शक्तींसमोर पूर्ण शक्तींनिशी उभी ठाकून राहते. अमानवी शक्ती आहेत की नाहीत, हे मला माहित नाही, पण तरीही संध्याकाळी घरामध्ये लावलेला तो दिवा मला खूप आश्वासक वाटू लागतो.
तेवढ्यापुरतं बरं वाटतं पण तेवढ्याच पुरतं.... दबकत दबकत उदासी फेर धरून येतच राहते. किंबहुना उदासी हाच संध्याकाळचा स्थायी गुण असावा.
अशीच तीही उदासभरली संध्याकाळ.
ऑफिस सुटल्यावर घरी आले. ऑफिस सुटतं  पाच वाजून तीस मिनिटांनी मी घरी येते पाच वाजून पस्तीस मिनिटांनी, ते पण रमतगमत चालत आले तर. सकाळी ऑफिसला जाताना उशीर झाला तर तीन मिनिटांत पोचतेच. घराच्या समोर ऑफिस आणि ऑफिससमोर घर. मध्ये फक्त एक लांबच लांब पसरलेला रिकामा प्लॉट. आज दिवसभर ऑफिसात काम असं काही नव्हतंच. अख्खा वेळ याच्याशी त्याच्याशी बोलण्यात गेलेला.
घरी येऊन फ्रेश झाले. चहाकॉफीची काहीच सोय नाहीच, त्यामुळे येतानाच ऑफिससमोरच्या टपरीवरून वडापाव आणि चहा आणला होता. चहा गार व्हायच्या आधी पिऊन घ्यायला हवा. रात्री जेवणाचीही काही सोय नाही, बाहेरून ऑर्डर करावी लागेल. घरात करण्यासारखं काहीही नव्हतं. कंप्युटर नाही. टीव्ही नाही. पुस्तकं नाहीत, बोलायलापण कुणी नाही, एकाकीपणा सगळीकडून भरून आल्यासारखा. रिकाम्या घरासारखं वाईट काहीही नसतं.
फोनची बॅटरी संपत आली होती, तो चार्जिंगला लावला, त्याक्षणी शुभ वर्तमान कळाले. लाईट गेलेले होते. म्हणजे निवांत फोनवर गप्पा मारण्याचं ठरवलं होतं तेही गेलं. प्लास्टिकच्या पिशवीमधला चहा कपात ओतून घेतला. पावणेसहा होत आले होते.. हॉलमधल्या मोठ्या खिडकीला आता पडदे नाहीयेत. उघडीबोडकी दिसतेय ती खिडकी. तिथून बाहेर पहायलासुद्धा नको वाटतंय. बेडरूममधली खिडकी त्याहून लहान आहे. पण तिलाही पडदे नाहीत.
मच्छर यायची वेळ झाली म्हणून खिडक्यांच्या काचा ओढून घेतल्या. पण लगेच आता गरम होइल... खिळ्याला अडकवलेली गच्चीची चावी घेतली. मी ज्या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहते त्यांचं हे स्वत:चं टेरेस. एरवी कायम कुलूपबंदच असतं. क्वचित सुट्टीच्या दिवही कधीतरी तिथं जाऊन वारा खात बसायचं. गच्ची म्हणजे काय फार मोठी नव्हेच, एका रूमइतकीच. पण त्याला वर मोकळं आकाश आहे, आणि दोन बाजूंनी भिंती नाहीत म्हणून गच्ची म्हणायचं.


गच्चीत घरमालकाचीच एक पत्र्याची खुर्ची आहे. जेमतेम अर्धा जिना चढून चहाचा कप घेऊन मी तिथं निवांत येऊन बसलेय. समोरची दिशा पश्चिम.. इथं बसलं की छान सूर्यास्त दिसतो. बिल्डिंगला लागून एक छोटा गावठाणातला रस्ता. त्यावर फारशी रहदारी नाहीच. त्याच्या पुढें रिकामा प्लॉट आणि मग त्याच्या समोर माझ्या ऑफिसची पिरॅमिडच्या आकारात बांधलेली विचित्र बिल्डिंग. प्लॉट आणि ऑफिसमध्ये मुख्य हायवे. त्यावरून गाड्या सणाणत धणाणत उधळत जाताहेत. या रस्त्यावर अद्याप सिग्नल नाहीत.  ट्राफिकचे नियम वगैरे गोष्टी तशाही ऑप्शनलाच असतात. तिथं कुणीतरी  अपघात प्रवण क्षेत्र असा बोर्ड टांगलेला आहे. दॅट शूड सम माय लाईफ ऍज वेल. साली सगळी जिंदगीच अपघात प्रवण. जरा कुठं सावरतंय म्हणेपर्यंत काहीतरी घडतंच. अचानक. अनपेक्षित आणि मग त्यानंतर सगळंच उलट सुलट पलटून जातं.


ऑफिसच्या बिल्डिंगपाठीमागे खाडी आहे. तिथून येणारा तुफान वारा जाणवतोय. खारा समुद्राचा वारा. सूर्य हळूहळू मावळायला निघेल. क्षितिजाच्या आसपास पोचला की मला दिसणार नाही. कारण अध्येमध्ये बिल्डिंगी आहेत.


चहा निवत चाललाय, पण प्यावासा वाटत नाही. माझ्या हातचा चहा किती छान दाट मसालेदार होतो, हा खूप पांचट आहे, मीच मला सांगते. आणि मग अचानक दचकते. “माझ्या हातचा चहा” हे आक्रित नक्की घडलंय कधी? मागे कधीतरी मीच घरी पुरणपोळ्या केल्या होत्या. आठवतंय? माझं घर.. माझा संसार... माझं आयुष्य!!! सगळंच हातातून सुटून निघाल्यासारखं निघालंय. परत एकदा डोक्यामधले शंकासूर नाचायला लागतात.


चहा होता तसाच एका घोटात पिऊन टाकला. चहा प्यायल्यासारखं वाटलंच नाही... पण ठिक आहे.


हा जो समोर रिकामा प्लॉट आहे ना तो खरंतर रिकामा नाही, त्याच्यावर एक अर्धवट बांधलेली बिल्डिंग आहे. गेली कित्येक वर्षं त्या जमिनीची कसली त री कोर्ट केस चालो आहे म्हणे. मी इथं पहिल्यांदा राहिला आले तेव्हा वाटलं की जर या बिल्डिंगचं बांधकाम चालू झालं तर आपलं काही खरं नाही, हॉल आणि बेडरूम दोघांच्याही खिडक्या एकदम समोरच की, त्या मजूर लोकांना वगैरे. बांधकामाची धूळ वगैरेचे त्रास तर होणारच. तेव्हा तडक दोन तीन दिवसांत मोहम्मद अलि रोडवर जाऊन जाड कापड आणलं आणि शिवून लगेच पडदे लावले. गेल्या दोन वर्षांत सुदैवानं ते बांधकाम काही चालू झालं नाही, आणि आता चालू झालं तरी पडदे जागेवरच नाहीत. तेपडदे कालच रात्री मी खोक्यात भरलेत. नवीन घरी वेगळे पडदे आहेत, म्हणजे हे पडदे लावायची गरज नाही. लक्कन सुरीनं एखादा तुकडा कापावा असं काहीतरी अचानक वाटून येतंय.  
हळूहळू अंधार पडत चाललाय. किंवा उजेड गायब होत 


चाललाय. कसं बघाल तसं म्हणा. सूर्यास्त झाला असणार. सगळ्याच भागाचे लाईट्स गेलेत त्यामुळे एरवी यावेळेपासून दिसणारे चमकणारी दुकानांची नावं हॉटेलचे बोर्ड वगैरे काहीच नाही. सगळीकडे दाटून राहिलेला तो गच्च राखाडी अंधार.
भणाण वारा सुटलाय. केस अस्ताव्यस्त उडतायत. पण सावरावेसे सुद्धा वाटत नाहीत. डोळ्यांवरचा चष्मा काढून बाजूला ठेवला. डोळे शांत मिटून वारा अंगाखांद्यावर घेत राहिले

.
आजचा दिवस संपला. खर्‍या अर्थानं संपला. 


आता येणार रात्र. काळी काळोखानं भरलेली. दिवस आणि रात्रीच्या मध्ये कुठंतरी हिंदकळत असलेली ही संध्याकाळ. इथून पुढं जे काही आहे त्याची काहीच कल्पना नाही, जे काही घडून गेलंय त्याचं आता काहीच होऊ शकत नाही. तो भूतकाळ झाला. दिवसाचा भूतकाळ आणि रात्रीचा भविष्य काळ यांच्यामध्ये कुठंतरी असलेलं ही वर्तमानाची संध्याकाळ. डोळे मिटल्यावर क्षणाक्षणाला काहीबाही दृश्यं नजरेसमोरून जायला लागतात. या घराशी जोडलं गेलेलं पहिलं नातं. कोयरीच्या पैठणीचा पदर उलगडावा तश्या आठवणी उलगडल्या जातायत. आठवायचं म्हटलं की काहीच आठवत नाही. सहजच डोकावल्यासारख्या स्मृती येतायत आणि जातायत.



घर ताब्यात घेतल्यावर आयुष्यात पहिल्यांदा केलेली झाडू फरशी सारखी कामं. तीपण एकटीनंच. नंतर  एकटीनंच बसून केलेली ती देवपूजा आणी मग दूध उतू घालवायचा विधी. हे खरंतर उगाचच. आई म्हणाली कर म्हणून. पण मग त्यानंतर पहिल्यांदाच करून घेतलेला चहा.. ऑफिसात सर्व चिडवतात, इतका गोड बासुंदीसारखा चहा पितेस म्हणून. पण मला चहा असाच लागतो. घट्ट, गोड आणि भरपूर उकळलेला. हा फ्लॅट भाड्यानं घेताना एजंट म्हणाला होता की याचा पायगुण चांगला आहे, जो कुणी इथं राहून गेलाय त्याचं चांगलंच झालंय.




इथं राहून माझं काय झालंय? चांगलं की वाईट? मुळात दोनतीन वर्षाचा कालावधी अश्याच दोन शब्दांमध्ये वर्णन करून संपतो का? चांगलं आणि वाईट! आज्जी गेली ती याच घरात असताना. प्रमोशन झालं ते याच घरात असताना. लग्नासाठी विनाकारण नकार ऐकले ते याच घरत असताना. “लग्न करेन तर तुझ्याशीच” असं तो म्हणाला तेही याच घरात असताना. मलेरीयाच्या तापानं रात्रभर एकटीच फणफणले तेही याच घरात असताना, आणि त्याच्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांना झाला तोही याच घरात असताना. काय चांगलं आणि काय वाईट... कसं ठरवणार? दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस येतो, संध्याकाळच्या या किर्र वेळी बसून रात्र चांगली की दिवस वाईट हे कसं ठरवणार?


मुळात जे घडलंय ते चांगलं के जे यापुढं घडणार आहे ते चांगलं. भविष्याची आजवर कधी भिती वाटलीच नाही... कारण भविश्यामध्ये कसलीच अनिश्चितता नव्हती, काळजी नव्हती. एकाकी भविष्याची किती म्हणून तमा बाळगायची...

मनामध्ये अजून गणितंच चालू आहेत. संपलेल्या दिवसांचे हिशोब होत आहेत. हरवलेल्या रात्रींचे अजून बाकी आहेत. भोवतालचा उजेड सेकंदासेकंदाला कमी होत जातोय. अजून लाईट आलेले नाहीत. सूर्य मावळल्यावर जाणवतंय. मळभ दाटलंय. पाऊस तर पडणार नाही, पण या मळभानं माझ्या मनातली उदासी अजून गहिरी होतेय त्याचं काय...


खरंतर उदास वाटायला नको. आनंद वाटायला हवा, पण वाटत नाहीये हेही खरंच. कुठून्तरी मनामध्ये काहीतरी आत आत तुटत चालल्यासारखं वाटतंय. माझंच काही तरी चुकतंय़ का? किती दिवस आपण या दिवसाची वाट पाहिली. काय –काय नि कसं कसं ठरवून ठेवलंय. अमुक करू, तमुक करू. मग आज अचानक या स्वप्नांपेक्षा हा एकटेपणा अचानक का महत्त्वाचा वाटायला लागलाय? काय बदलणार आहे नक्की? आयुष्य आहे, ते पुढे जाणारच. मागे काही व्यक्ती आयुष्यातून वजा झाल्या, आता काहींची बेरीज होणार.. आयुष्य आहे, ते पुढे वाहणारच. पण गणीतासारखंच आयुष्य इतकं कॉम्प्लीकेटेड का करून ठेवलेलं असतं आपणच..


हे घर ही वास्तू... आपल्या आयुष्यामध्ये केवळ दोन वर्षांसाठी आली. त्या दोनच वर्षांनी आपलं अख्खं आयुष्य डीफाईन होऊ शकतं का..


का नाही होऊ शकत? माझ्या केवळ एका निर्णयानं जर माझं आयुष्य बद्लू शकतं तर या दोन वर्षांमुळे आयुष्याचा लेखाजोखा मांडला जाऊ शकत नाही का? या दोन वर्षांनी मला घडवलं. अगदी छोटया छोट्या गोष्टीमध्ये मी कोण आहे आणी मला काय हवंय हे मला सांगितलंय.


म्हणजे मला काय हवंय हे मला स्पष्ट माहित असतानासुद्धा मी हा जुगार का खेळतेय.. जुगारच नाहीये का? जोपर्यंत निर्णय तुमचा तुम्ही घेत असता तो पर्यंत तो जुगार नसतो,. पण ज्या क्षणापासून तुमचे निर्र्णय दुसर्‍या कुणावर अवलंबून रहायला लागतात तेव्हापासून जुगार चालू होतो. फासे पडायला सुरूवात होतेच.



रात्र अंधारी असते म्हणून इतकी गूढ असते का? की ती गूढ असते म्हणून अंधारी होऊन येते. निर्णय घेण्याआधी जी घालमेल अस्ते ती फारच सुसह्य असते. निर्णय घेऊन झाल्यावर जी वाट पहावी लागते ती मात्र जीवघेणी असते. इट्स डन. तू हे ऑलरेडी निवडलं आहेस. हा निर्णय तुझा आणी फक्त तुझाच होता. मी स्वत:लाच समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करतेय. पावसाचे चुकारमुकार थेंब आकाशामधून खाली येऊन त्यामध्ये  उगाच स्वत:ची हांजी सांगून जातात. हा असला रिप्चिप पाऊस मला बिल्कुल आवडत नाही. बावा, पडायचंय ना तर सणकून कोसळ. असा कोसळ की मनामध्ये आणि डोळ्यामध्ये केवळ तूच राहशील. मग कदाचित इतकी सैरभैर होणार नाही मी. दोन पावलं कधीचीच पुढं टाकलीत. आता कितीसं अंतर उरलंय? पण तरीहे अंतर चालताना जीव मेटाकुटीला आलाय हे मात्र खरं. इतके दिवस मनामध्ये केवल प्रश्न होते, आज आता या क्षणी मात्र त्या प्रश्नांनी वादळ चालू केलंय.



चुकलं तर मागे फिरायचा रस्ता शिल्लक नाही. निर्णय चुकला तर “वेगळं” होता येईल पण परत हे असं “एकटं” होता येणार नाही. एकाकी, एकटं, बेफाम, बेफिकीर, बिनधास्त आयुष्य. माझं आयुष्य!!
टिपिकल भारतीय मध्यमवर्गीय विचारसरणीमध्ये लहानाची मोठी होऊनसुद्धा मी का या एकाच विषयाबद्दल इतकी का साशंक आहे. बरोबरीच्या मुलींनी अगदी नेटवर चॅट करून दहा दिवसांत लग्नंसुद्धा केली. त्या खुश आहेतच की. मला ते जमणारच नाही. प्रश्न केवळ खुशीचा नाही, मुळात बेसिक प्रश्न एकच आहे... का? “लग्नच का करावं?” हा प्रश्न मी स्वत:ला कित्येक्दा विचारतेच आहे. उत्तर मिळत नाही. मी लग्नाला नकार दिलाय याचा अर्थ त्यानं सोयिस्कररीत्या “त्याला” नकार दिलाय असा लावून घेतलाय... त्यावरून चिडला,, भांडला, हातदेखील उगारला. पण मला तो हवाय पण “लग्न” हे कृत्रिम नातं नकोय हे त्याला समजत नाहीये.. कसं समजणार?


घड्याळात किती वाजले होते कुनास ठाऊक... कितीवेळची इथं एकटीच बसून आहे. काळोख पूर्ण दाटलाय. लाईट नाहीतच. अंधारातच जिन्यावरून खाली आले. चाचपडायची वगैरे काही गरज नाही. इतका हा जिना सवयीचा झालाय. दाराची कडी उघडून आत आले. माझ्या घरामध्ये मला वावरायची चांगलीच सवय. रात्रीअपरात्री जाग आली तर एकही दिवा न लावता मी घरभर आरामात फिरू शकते. आजही फिरेनच...


आईग्गं! या कळवळ्या शब्दानंतर स्वत:साठी एकच इरसाल शिवी घातली. हा खोका इथं वाटेत मीच सकाळी ठेवलाय. दोन वर्षांतल्या सवयीमध्ये पायाला या खोक्याची सवय नव्हती. चांगलाच जोरात लागलाय. आता मात्र स्वत:वरचा आत्मविश्वास थोडाडळमळतोय. हातानं चाचपडत मला खुर्ची कुठे सापडतेय का ते बघते.  हाताला टेबल लागलंय, त्यावरचा मोबाईल. अजून बॅटरीमध्ये थोडी धगधुगी आहे. काही म्हणा, हे जुने नोकियावाले मोबाईल बॅटरीच्या बाबतीत फार दणकट होते. बाहेर पाऊस अजून झिमझिमच पडतोय. दिवसभर घरात साचलेला तो कुबटपणा आता संध्याकाळपासून खिडक्या बंद असल्यानं अजून जास्त जाणवतोय.


हाताशी जवळच ठेवलेल्या सॅकमधून टॉर्च शोधते. त्यानंच काल सांगितलं होतं आयत्यावेळी अलगनार्‍या वस्तो हाताशी राहू देत. इतर सर्व सामान मी कालच पॅक केलंय.


तिन्ही सांजेच्या त्या अर्धवट काळसर उजेडामध्ये मी एकवार माझ्या घरावर नजर फिरवली. दोनच खोल्या, पण त्याही रिकाम्या, भकास. गेल्या दोन वर्षांमधला संसार सगळा खोक्यांमध्ये रचून ठेवलाय. आजची रात्र या घरामधली शेवटची रात्र..


पण त्या रात्रीच्याही आधी असह्य होत जाणारी ही जीवघेणी संध्याकाळ. कधी एकदा पूर्ण रात्र पडतेय असं वाटायला लावणारी कातर कातर संध्याकाळ. खिडकीजवळ खुर्ची आणून बसलेय. वेळ जाता जात नाहीये. पण वेळ जाण्यासाठी काही करण्यासारखंदेखील नाही.


गेली आठ दिवस पॅकिंग करतेय. आधी क्वचित लागणार्‍या वस्तू. मग कपडे. मग किचनमधलं सामान. आज सकाळी ऑफिसला जायच्या आधी गॅस सिलेंडर परत केला. शेगडी खोल्यात घालून पॅक केली. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर पाटावर ठेवलेले देव आणि असंच उरलंसुरलं सामान पॅक करायचं होतं. पण आता लाईट नाहीत म्हणून देव अजून तसेच आहेत.


तश्याच त्या काळोखामध्ये उठले. नकळत हात जोडले. मी काही फारशी देवभक्त वगैरे नाही... पण तरी आता या क्षणाला देवांचं अस्तित्व हवंहवंसं वाटत होतं. कुणीतरी माझी या आततायी निर्णयामध्ये पाठराखण करतंय असं सांगायला हवंय. अंधार असूनसुद्धा सवयीनं निरांजन लावलं. तुपातल्या निरांजनाचा स्निग्ध प्रकाश पाटावर पडला. बालगणेश तो प्रकाश पाहून गालातल्या गालात हसला. मी परत हात जोडले. “मला कधी विसरू नकोस” मी हळूच कानात सांगितल्यासारखं कुजबुजले.


तो विसरेल किंवा आठवणीत ठेवेल. पण त्याच्या भरवश्यावर मला राहता तर येणार नाही. परत एकदा मनावर उदासीची गर्द छाया अंधारून आली. अचानक माझंच मला जाणवलं. संध्याकाळ फक्त बाहेरच होत नाहीये. कुठंतरी माझ्या मनामध्ये पण होतेय. इतके दिवस असलेला आनंदाचा उजेड हळूहळू काळोखा होत चाललाय. साशंकतेची काजळी रात्र बनत चालली आहे.



मोबाईल आता मात्र बंद पडलाय. मघाशी दिसणार्‍या उजेडात पाहिलं होतं तेव्हा साडेसात वाजले होते. लाईटचा अद्यप पत्ता नव्हता. किती वाजले होते त्याच्याशी आता काही देणंघेणं नव्हतंच. घरात नेहमी घालायचा टीशर्ट पायजमा घालूनच बाहेर पडले. नाहीतरी आपल्याला उद्या इथून जायचंय. कोण काय म्हणणार आहे? इतके दिवस तरी कुणाच्या म्हणण्याला काय किंमत दिली? घराजवळच्या हॉटेलामध्ये थाळीची ऑर्डर दिली. फोनवरून हेच मागवलं असतं पण आता फोन बंद पडला होता. अवघ्या तीन चार तासांपूर्वी ठरवलेल्या प्लानचा इतका मस्त फज्जा उडताना डोळ्यांसमोर दिसत होता. आणि मी अख्ख्या आयुष्याचे प्लान रचायला बघत होते. वेड लागलंय बहुतेक मला. हॉटेलात पण लाईट नव्हते. इव्हर्टरच्या जीवावर कुठंतरी तीन चार ट्युबलाईट मिणमिणत होत्या, इतकंच. उजेड एक तर लख्ख असावा नाहीतर संपूर्ण काळा काळोख. या असलय मिणमिणत्या उजेडात माझं डोकं दुखायला लागतं. वेटरनं आणून दिलेलं जेवण मुकाट गिळलं.


संध्याकाळ आता रात्र बनली होती. पण नेहमीची प्रसन्न रातराणी वगैरे नव्हे, तर संध्याकाळचीच उदासी अजून गहिरी झाल्यासारखी रात्र. इतके दिवस आपला निर्णय कदाचित चुकीचा आहे, असं वाटत होतं. या राखाडी ढगाळ संध्याकाळीनं त्यावर जणू शिक्कामोर्तबच केलं. माझं चुकलंय का? मी माझं आयुष्य दुसर्‍या कुणाच्या हाती सोपवायचा विचारच कसा करतेय.. घरी आले तेव्हा पाऊस किंचित जोरात चालू झाला.


करण्यासारखं काहीच नसल्यामुळे बेडवर येऊन पडले. त्याला सांगावं का... नाही येत मी तुझ्यासोबत. आपण वेगळेच राहू. किंबहुना आपण वेगळेच होऊया. मला एकटंच रहायला आवडेल. किती दिवस एकटी राहशील हा प्रश्न तो विचारणारच. त्याचं उत्तर मात्र माझ्याकडेही नाही. माझ्या या एकटेपणाच्या बदल्यात मला तू हवा की नको... या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. प्रेम, रोमान्स, मोहब्बत वगैरे संकल्पनांवर माझाच काय त्याचाही विश्वास नाही. आपण उर्वरीत आयुष्य एकमेकांसोबत काढू शकतो का हाच केवळ प्रश्न. त्याचं उत्तर होकारर्थी, माझं नकारार्थी!


“एकटी राहून तू सिनिकल होत चालली आहेस” तो मधूनच मला एकदा म्हणाला होता. असेलही कदाचित. पण हा एकटेपणा मला मनापासून भावतोय हे समजायला इतकं कठीण आहे का?


विचारांचा हायवे सुरू झाला की एक बरं असतं. मेंदूला काही कामच नसतं. कंप्युटरच्या गेममध्ये कसे कुठूनही कुणीही येत राहतात तसे कुठल्याही कोपर्‍यात साठवलेल्या आठवणी येतच राहतात. डोळे मिटून पडून राहिले.


आजची ही शेवटची रात्र. उद्यापासून तो सोबत असणार...


किंवा कदाचित नाही. श्या!! फोन चालू असता तर आताच फोन करून सांगितलं असतं... नको म्हणून. लाईट असते तर आता सगळं सामान खोक्यामधून काढायला  सुरूवात केली असती. माझा संसार. माझं घर. माझं आयुष्य.


विचार करता करता कधी डोळा लागला कळलंच नाही. गेली दोन-तीन रात्री पॅकिंग करत बसल्यानं धड झोप लागलीच नव्हती...
जाग आली ती टणाटना वाजाणार्‍या बेलमुळं. जागी झाले तर दोन सेकंद कळेचना, मी कूठं आहे...माझं घर पूर्णपणे अनोळखी होऊन माझ्याकडे टक्क बघत बसलं होतं. रात्री झोप लागल्यावर कधीतरी लाईट आले होते. मी झोपताना बहुतेक सर्व दिवे चालू ठेवले असणार. बेल परत एकदा वाजली. भिंतीवर घड्याळ नव्हतं, किती वाजले माहित नाही. बाहेर पाऊस जोरजोरात बरसत होता. मध्यरात्र नक्कीच होऊन गेली होती.


दार उघडलं तेव्हा तो बाहेर चिंब भिजून उभा होता. “फोन का बंद आहे? केव्हाचा ट्राय करतोय. मेसेजेसलापण उत्तर नाही.” त्याचा आवाज माझ्यावर चिडल्यासारखा, वैतागल्यासारखा. पण त्या वैतागापाठीमागे दडलेली प्रचंड मोठी काळजी. ढगाळ संध्याकाळीमागे दडलेल्या वादळी रात्रीसारखी.


मी काही न बोलता पेंगुळल्या डोळ्यांनी त्याच्या गळ्यात हात टाकते.


निर्णय घेऊन झालाय, आता तो निभवायचाय. इथून पाठी फिरणं शक्यच नाही. दोघांनाही.


फासे फेकून केव्हाचे झालेत, आता दान काय पडतंय त्याची केवळ वाट बघायची.




Wednesday, 26 November 2014

ह्रितिक रोशन!!



नुकताच ह्रितिक रोशनचा रीलीज झालेला बॅंग बॅंग पाहिला. मुळात ज्यावरून सिनेमा ढापलाय (ओके! ऑफिशीअल रिमेक) केलाय त्याच्या कथेमध्ये काडीइतकाही जीव नव्हता. मॉडेलगत कन्फ़्युज फिरणारी कॅमेरून डिआझ, आपण  म्हातारे झालोय हे लपवण्याचा अट्टाहास करणारा टॉम क्रूझ (मला वाटलेलं हा बॉलीवूडचा पेटंटेड फंडा आहे, हॉलीवूडनं कॉपी मारली) आणि प्रचंड गंडलेली कथा यामुळे नाईट ऍण्ड डे सपाटून आपटलेला. दुर्दैवानं हिंदी बॅंग बॅंगनं याच गोष्टी जशाच्या तशा उचलल्या आणि सिनेमा बनवला (रिमेकची गरज काय होती हा वेगळाच मुद्दा). साहसदृश्यं कमालीची चित्रीत झालेली आहेत, एखाद्या हॉलीवूडपटापेक्षाही सरस असे ऍक्शन्स सीन्स या चित्रपटासाठी वापरली होती. पण ते सगळंच एकंदरीत फिकं पडत गेलंय. चित्रपटानं दोनशे करोडचा वगैरे धंदा केल्याच्या बातम्या सर्रास रीलीज झाल्याच्या वीकेंडलाच ऐकू येतात, पण म्हणून तो “चांगला चित्रपट” आहे असं हल्ली म्हणवत नाही. एकेकाळी चित्रपट यशस्वी होणं न होणं हा जुगार होता. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अर्थात चित्रपटांचं अर्थकारण हा पार वेगळा मुद्दा आहे.


बॅंग बॅंगची एकमेव उत्तम बाजू म्हणजे अर्थात कतरीनाचे फ्रेश लूक्स (तिच्या अभिनयाबद्दल बोलण्यासारखं काही असतं तर नक्की लिहिलं असतं) आणि ह्र्तिकचा जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स पण....
प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याच्या चेहर्‍यावर दिसणारं त्याचं वय. चाळीशीला टेकलेला ह्रितिक आताच पंचेचाळीशीचा दिसतोय. सतत काम करत राहणं, चुकीच्या जीवनपद्धती, वैयक्तिक आयुष्यामधले ताणतणाव आणि चित्रीकरणादरम्यान झालेले भयंकर अपघात या सर्वांची गोळाबेरीज त्याच्या देखण्या चेहर्‍यावर हलकीशी होइना का पण जाणवून गेली आणि काळजात चर्र झालं. ह्रितिक रोशन हा आमच्या टीनेजर वयामध्ये आलेला हीरो. मला शाळकरी वयापासून सलमान खान आवडायचा (अजूनही आवडतोच! तो का त्याबद्दल पुन्हा केव्हातरी) पण ह्रितिक “आवडणं” यापलिकडे होता. त्याचे लूक्स, डान्स, स्क्रीनवरचा वावर, त्याचं बोलणं यावर मी तेव्हा फिदा होते, आजही आहे.  २००० च्या दरम्यान अनेक नवीन चेहरे (त्यातही स्टारचिल्ड्रन) पडद्यावर आले, पण त्यापैकी टिकून राहिलेले म्हणजे ह्रितिक, करीना आणि अभिषेक. पैकी अभिषेकनं स्वत:च्या मर्यादा स्वत:च ओळखून त्यानुसार कामं घ्यायला सुरूवात केली. त्यामुळे त्याचे कन्सिस्टंटली सिनेमा येत राहिले पण तो “सुपरस्टार” कधीच बनला नाही, हेही तितकंच खरं. करीनाची करीअर फारच मजेदार आहे. ही ह्रितिकच्याच कहोनाप्यारहै मधून “मला फारसा वाव नाही” असे म्हणत बाहेर पडली (जरी हा निर्णय बबिताचा होता) आणि तिनं रेफ्युजीसारखा अतिशय वेगळा, बॉलीवूडच्या नवीन नायिकेच्या सर्व नियमांचा चोळामोळा करणारा सिनेमा स्विकारला. जेव्हा रेफ़्युजी पाहिला तेव्हा करीना ही कपूर घराण्याची अस्सल वारसदार आहे आणि चित्रपटसृष्टीमध्ये काहीतरी नवीन पायंडा पाडून दाखवेल अशी काहीतरी अपेक्षा वाटली होती. चमेली )())( सारख्या सिनेमांनी या अपेक्षा उंचावल्या. पण मध्येच कधीतरी ती “पू” या इमेजच्या इतक्या प्रेमात पडली की, अक्कलशून्य, सुंदर, मॉडेल दिसणारी वगैरे भूमिका तिला आवडायला लागल्या.. असो, करीनाबद्दल आपण सविस्तर कधीतरी बोलू.



आजचा विषय आहे ह्रितिक. ह्रितिक रोशनचं कहो ना प्यार है मधून पदार्पण हे काही फारसं ब्लॉकबस्टर टाईप होइल वगैरे कुणालाच अपेक्षित नव्हतं. “न्यु किड ऑन द ब्लॉक” इतकीच त्याची ओळख होती. समस्त सिनेसृष्टी त्याच्या आगमनाकडं डोळे लावून बसली आहे, वगैरे चित्र ना पब्लिसिटीमधून रंगवलं ना मीडीयामधून. बहुतेक पब्लिसिटी पाहता हा सिनेमा नायिकाप्रधान असल्याचे चित्र रंगवण्यात आले होते. राकेश रोशन याबाबतीत आधीपासून जीनीयस आहे. स्वत:ला अभिनेता म्हणून सिद्ध करण्यामध्ये जितका कमी पडला होत्या त्याहून अनेक पटीनं त्यानं स्वत:ला दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यानं यापूर्वीच सिद्ध केलं होतं. खरंतर राकेश रोशन “अभिनेता” म्हणून वाईट नव्हता. त्याच्याहून वाईट अभिनय करणारे कित्येकजण तेव्हा बॉक्स ऑफिस गाजवत होते. पण राकेश रोशनच्या कारकीर्दीमध्ये त्याला सर्वात जास्त नुकसान पोचवलं ते त्याच्या दिसण्यानं. गोरागोरा, घारोळा, (आणि लवकर टक्कल पडलेला) हा अभिनेता एकतर  सपोर्टिंग अभिनेता म्हणून किंवा नायिकाप्रधान सिनेमांमध्ये अभिनेता म्हणूनच चालून जात होता. सोलो हीरोच्या फार कमी संधी त्याला मिळाल्या. त्यामुळे त्यानं अभिनयावरचं लक्ष कमी करून निर्माते-दिग्दर्शनात उतरायचं ठरवलं. जे. ओमप्रकाश मेहरासारख्या  यशस्वी निर्मात्याचा या जावयाला सपोर्ट होताच. राकेश रोशननं अतिशय सेफ गेम खेळत नेहमीचेच हिंदी चित्रपटांचे यशस्वी फॉरम्युले थोडेसे ट्वीक करून चांगले मनोरंजकप्रधान सिनेमे दिले. काळाच्या बरोबर चालणार्‍या कथा, तगडी स्टारकास्ट, सुप्रसिद्ध संगीत आणि डोळ्य़ांत न खुपणारी तरीही ग्रेपव्हाईनसारखी पसरत जाणारी मार्केटींग स्ट्रॅटजी ही त्याच्या सिनेमांची काही वैशिष्ट्ये. ज्यावेळी राकेश रोशननं “कहोना प्यार है” करायला घेतला तेव्हा यापैकी एक मुद्दा “तगडी स्टारकास्ट” आपोआप निखळून पडला. त्यातही करीना कपूर बाहेर पडल्यानं त्याच्या सिनेमाचं थोडं नुकसानच झालं. स्वत:च्याच मुलाला लॉंच करताना कथा जास्तीत जास्तरीत्या त्याला फोकस कशी करेल तसंच प्रेक्षकांना ती आपलीशी का वाटेल हे बघणं त्याला भाग होतं. ह्रितिक रोशन लूक्सच्या बाबतीत वडलांवर गेलेला. गोरा तर आहेच, त्याखेरीज सहा फुटाची उंची, अतिशय सडपातळ शरीर, उभट ऍण्गुलर आणि अजिबात भारतीय न वाटणारा चेहरा, घारे डोळे आणि एका हाताला सहा बोटं (हे व्यंग नाही याची कल्पना आहे, पण सिनेमासृष्टीमध्ये कुठली  गोष्ट प्लस होइल आणि कुठली मायनस हे कुणीच प्रेडीक्ट करू शकत नाही). अशावेळी ह्रितिकचं पदार्पण हे सो सोच होइल अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. त्यातही अवघ्या सिनेमासृष्टीचं लक्ष लागलं होतं ते मेगास्टार अमिताभ बच्चनच्या मुलाकडे आणि करिष्माच्या बहिणीकडे. ह्रितिक तसा दुर्लक्षितच होता. इथं लक्षात घ्यायला हवं की त्याला कहोना प्यार है लॉंच होण्याआधी जे सिनेमा ऑफर झाले ते सर्व सहाय्यक अथवा दुय्यम अभिनेत्याचेच होते. मिशन कश्मिर, फिझा आणि यादेंमधले त्याचे रोल मूळ स्क्रिप्टमध्ये फार वेगळे होते. हे सिनेमे त्यानं कहो ना रीलीज व्हायच्या आधी स्विकारलेले. पण कहोना प्यार हैंच्या तुफानी यशानंतर या सिनेमांच्या स्क्रिप्टमध्ये बदल केले. इथं कुणाचं नशीब कशानं पालटेल सांगता येत नाही. पैकी मिशन काश्मिरमध्ये त्याचा रोल स्क्रिप्टला धक्का न लावता इकडे तिकडे पसरवत वाढवण्यात आला. फिझामध्ये एक रोमॅण्टिक ऍंगल देऊन आणि एखाददुसरं गाणं देऊन त्याचा वावर वाढवण्यात आला. यादेंच्या बाबतीत मात्र सुभाष घई पारच फसला. एका बापाची तीन मुलींना वाढवण्याची मूळ कहाणी ह्रितिक करीनाच्या सुपरस्टारपदाला एन्कॅश करण्याच्या नादांत स्क्रिप्ट हवी तशी वाकवत टिपिकल लव्हस्टोरी बनवायला गेला आणि सगळीकडूनच नामुष्की ओढवून बसला. तसं बघायला गेलं तर हाच तो काळ ज्यावेळी “आपल्याकडं स्टार आहेत मग ते कसेही दाखवले तरी फिल्म चालणारच” असल्या अति आत्मविश्वासाला तडा जाण्याचे दिवस चालू झाले. खानत्रयीचा चांगलाच जम बसलेला होता, तरीदेखील नवीन चेहर्‍यांची आवश्यकता जाणवत होतीच. मल्टिप्लेक्सेसचा नुकताच होत असलेला उदय. चांगले कंटेंट ड्रिव्हन सिनेमा बनत असताना मल्टिस्टार्कास्टनी यादरम्यान बराच मार खाला. (मग बिग बजेटवाल्यांनी “डीझायनर फिल्म्स” ही संकल्पना काढली आणि तीच आजही यशस्वीरीत्या चालू आहे). सिंगल स्क्रीनच्या प्रेक्षकांची पसंती लक्शात न घेता केवळ आणि केवळ एन आर आय पब्लिकवर डोळा ठेवून अनेक सिनेमा यादरम्यान निघाले आणि सपाटून आपटले.



ग्लोबल मीडीयाच्या वाढत्या प्रभावानं आपल्याकडं हीरो आणि हीरॉइन यांची जुनी प्रतिमा जाऊन नवीन लूक्सला डीमांड आली होती. पंचवीस वर्षापूर्वी ज्या राकेश रोशनचे लूक्स साजेसे वाटले नव्हते तसेच ह्रितिकचे लूक्स “ग्रीक गॉड” बनून प्रेक्षकांना आवडायला लागले. सलमान खान कृपेने याचदरम्यान बॉडीबिल्डींग हा एक नवीनच पैलू हीरोच्या बायोडेटामध्ये आला होता, आणि सलमाननंतर लगोलग ह्रितिकनं त्याला एन्कॅश करायला सुरूवात केली.  ह्रितीकमॅनिया साथीच्या रोगासारखा देशभरामध्ये पसरला. हा सिनेमा शहरी भागात चालला तसाच नंतर हळूहळू गाण्यांच्या जोरावर ग्रामीण भागातही चालला. ह्रितिक या सिनेमामध्ये नेत्रसुखद होता. स्वत:च्या कमाल आणि किमान मर्यादा ओळखून होता. या सिनेमामध्ये टिपिकल स्टीरीओटाईप रोल्स तेही डबल असताना त्याने दाखवलेली देहबोली.. ह्रितिक उत्तम अभिनेता आहे, पण त्याचा अभिनय केवळ चेहर्‍यावरचा अभिनय नव्हता. दोन पात्रांवरच्या देहबोलीवर, चालण्यावागण्यावर, दिसण्यावर त्यानं घेतलेली मेहनत जाणवत होती. त्यानं स्वत:च्या नृत्यशैलीशी अजिबात फटकून न राहता डान्सस्टेप्स केल्या होत्या आणि या डान्स स्टेप्स आजही आयकॉनिक आहेत. पण त्याच्या या यशाचा आलेख जितक्या जोरात वर गेला तितक्याच जोरात खालीदेखील आला. आप मुझे अच्छे लगने लगे, न तुम जानो ना हम, मै प्रेम कि दिवानी हू, मुझसे दोस्ती करोगे यांसारखे भलीमोठी नावं असलेले आणि सपाटून आपटलेले सिनेमे आल्यावर दुसरं काय होणार? मध्येच येऊन गेलेला “कभी खुशी कभी गमच्या” सुपरहिटपणाचे क्रेडिट घ्यायला शाहरूख आणि अमिताभ हजर होते. ह्रितिककडे आता कहो ना प्यार हैच्या पुण्याईव्यतिरीक्त काहीही नव्हतं. बहुतेक सिनेनिर्माते आता त्याला घेण्यासाठी कचरायला लागले होते. ह्रितिकनं केलेली प्रचंड मोठी चूक म्हणजे कहो ना प्यार है नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळून देखील त्यानं हातातील आधी स्विकारलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना दिलेला नकार. व्यावसायिक स्तरावर त्याचं वागणं योग्य असलं तरी याच सुमार स्क्रिप्ट असलेल्या या चित्रपटांनी त्याच्या करीअरला ग्रहण लावलं. ह्रितिक आता ऑफिशीअली वन फिल्म वंडर म्हणून ओळखला जायला लागला. याचदरम्यान कधीतरी एका प्रसिद्ध सिनेमासिकानं त्याच्यावर एक कव्हर स्टोरी केली “फिनिश्ड!” खरोखर त्याचं करीअर संपायला आलं होतं. एकही सिनेमा हिट नाही, केवळ ऍव्हरेज बॉक्स ऑफिस कलेक्शन. खर्‍या अर्थानं त्याला जाग आली. याआधी त्यानं हातात असलेले प्रोजेक्ट्स भराभर काही न विचार करता घेतले होते. केवळ गूडलूक्स आणि उत्तम डान्सवर सिनेमा चालत नाही हे त्याला जाणवलं असणार. स्क्रिप्टची गरज आणि आपला अभिनय हेच आपल्याला तारून नेणार आहेत हे त्यानं जाणलं. आता मात्र तो चूजी बनला. एकावेळी एकाच प्रोजेक्टवर काम करायचा निर्णय त्यानं घेतला. वडलांसोबत कोइ मिल गयावर त्याचं काम चालूच होतं. हा चित्रपट त्याच्यासाठी मेक ऑर ब्रेक होता.


बडजात्याचा मै प्रेम की दिवानी हूं अगदी आवाजदेखील न करता आपटल्यानं पुढ्च्याच आठवड्यात आलेल्या कोइ मिल गयाबद्दल अख्खी सिनेसृष्टी प्रचंड साशंक होती. एक तर विषय वेगळा होता. “भारतीय प्रेक्षक असा विषय समजून घेईल का?” अशी शंका अनेक लोकांना होती. पण या सिनेमाने त्याला यशाची दारं पुन्हा एकदा उघडी करून दिली. तो वन फिल्म वंडर अथवा सपोर्टींग अभिनेता याहून जास्त काही आहे, याचं हे खणखणीत उदाहरण होतं. बॉलीवूडच्या एका मेन हीरोनं नेहमीचा सरधोपट मार्ग सोडून काहीतरी वेगळं करायची ही पहिलीच वेळ नव्हती. पण बॉलीवूडला इतक्या दिवसांमध्ये प्रेमकथा आनि सूडकथांपासून निवांत मिळत नसल्यानं त्यांनी आजवर सायफाय कथांकडे लक्ष दिलंच नव्हतं. वाढत्या केबलमुळे आणि हॉलीवूड प्रभावामुळे हा जॉनर तरूणांमध्ये किती लोकप्रिय आहे आणि अजून किती लोकांना आवडू शकेल हे राकेश रोशननं बरोबर हेरलं होतं. पूर्ण सिनेमा ह्रितिकभोवती फिरता ठेवण्यात आला होता. सत्यजित रायच्या द एलियन आणि ईटीचा प्रभाव सिनेमावर स्पष्ट दिसत होता. अधूनमधून तोंडी लावायला प्रेमकथा आणि विनोद होते. टेक्नॉलॉजी का कमाल म्हणत छोटा जादू पडद्यावर भावण्यासारखाच होता. पण त्या सर्वांहून जास्त भावून गेला तो ह्रितिकची डोक्यानं अधू असणार्‍या मुलाची भूमिका. त्यानं या भूमिकेसाठी वजन कमी केलं, संवादफेक बदलली, देहबोली बदलली. डोळ्यांचा प्रभावी वापर केला. या सर्वांमधून त्यानं ह्रितिक रोशन द ग्रीक गॉड या सुपरस्टारपदापासून पूर्णपणे फारकत घेतली. प्रेक्षकांनी कोइ मिल गया डोक्यावर घेतला. २००३ चा हायेस्ट ग्रोसर बनला. बॉक्स ऑफिस कलेक्शन वधारलं तसा त्याचा आत्मविश्वासदेखील वाढला.


कोइ मिल गयानंतर ह्रितिकनं प्रत्येक सिनेमा विचारपूर्वक निवडला. तब्बल वर्षभरानं त्याचा लक्ष्य रीलीज झाला.  फरहानबरोबर दिल चाहता है ऑफर होऊनसुद्धा त्यानं नाकारला होता. लक्ष्यच्या वेळी मात्र ही चूक त्यानं केली नाही. लक्ष्यचा विषय तसा घीसापीटा होता, बदल होता तो फरहानच्या ट्रीटमेंटमध्ये. दणदणीत पात्ररचना, काटेकोर प्लॉट आणि चित्रपटामधला ताजेपणा हे फरहानची वैशिष्ट्य. ह्रितिक यामध्ये बेमालूमपणे बसला. सुरूवातीचा बेदरकार, बेफ़िकीर अर्बन युथ जितका बीलीव्हेबल होता तितकाच नंतरचा आर्मीमॅनदेखील. दुर्दैवानं हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. युद्धाची पार्श्वभूमी असूनदेखील देशभक्तीचे कडवे डोस, मेलोड्रामा इत्यादि गोष्टी नसल्यानं असेल, कदाचित. पण ह्रितिक आणि प्रीटी झिंटा यांचं काम मात्र खरंच सुंदर होतं यात वाद नसावा.


यानंतर आला सुपरहीरो क्रिश. क्रिश हा ह्रितिकसाठी टेलरमेड रोल होता. आतापर्यंत कुठल्याही मेगास्टारनं सुपरहीरो करायचा प्रयत्न केलेला नव्हता. (अजूबाला सुपरहीरो कॅटेगरीत टाकावं की नाही ते समजत नाहीये. दारा सिंग जमान्यात काही सुपरहीरो आले, पण क्रिश इतका प्रसिद्ध कोणच नाही.). शिवाय मधूनच काही बी ग्रेड सिनेमा येऊन गेलेत पण ते ढापूगिरी म्हणून. बॉलीवूडचे हीरो एरवीच इतकी सुपरहीरोगिरी करत असतात की वेगळ्या सुपरहीरोची आपल्याला आजवर गरजच भासली नव्हती. पण पुन्हा एकदा राकेश रोशननं खेळलेला जुगार यशस्वी झाला. या क्रिशवर हॉलीवूड सुपरहीरोचा बर्‍यापैकी प्रभाव होता. तरीदेखील अस्सल भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेला ओळखण्याच्या हुशारीनं क्रिश सुपर हिट गेला. या चित्रपटामध्ये उल्लेख करण्याजोगी बाब म्हणजे जादू पूर्णपणे गायब करण्यात आला. परत एकदा सगळा फोकस ह्रितिकवर आणि अख्खा सिनेमा तरून न्यायची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. जी त्यानं समर्थपणे पेलली.


ह्रितिकच्याच याच सुपरहीरो इमेजचा धूम२ ने यथोचित फायदा उठवला. यशराजच्या धूम फ्रेंचायझीमधल्या दुसर्‍या भागात ह्रितिक दिसणार या बातमीनंच सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता वाढवून ठेवली होती. वेगवान प्लॉट, साहसी पाठलागीची दृश्यं, आकर्षक नायिका याबरोबरच धूम सीरीजचा अजून एक प्लस पॉइण्ट होता. व्हिलन हाच हीरो आणि कसलाही भावनिक गोंधळ, बॅकग्राऊड स्टोरी वगैरे काहीही घोळ न घालता एक वेगवान सिनेमा. इथं चोराला कसलीही निगेटीव्ह शेड न वापरता केवळ त्याचं चोर असणं एवढंच महत्त्वाचं होतं. धूम२ मध्ये ह्रितिक छा गया. वेगवेगळे गेटप्स, स्टाईलिश देहबोली, त्याची नेहमीची दिलखेचक नृत्यं आणि सोबत ऐश्वर्या रायबरोबरचा रोमान्स. अभिषेक आणि उदय या सिनेमामध्ये सपोर्टींग ऍक्टर्स म्हणूनच शिल्लक राहीले. ऐश्वर्यासोबत लागोपाठ त्याचा जोधा अकबर आला. चित्रपटाची कथा ऐतिहासिक सत्यापासून पूर्णपणे फारकत घेतलेली होती. तरीदेखील दोन वेगवेगळ्या धर्माच्या राजा-राणीची ही प्रेमकहाणी एखाद्या जादुई परीकथेसारखी प्रेक्षकांना भावली. पृथ्वीराज कपूरनंतर पहिल्यांदाच इतका देखणा मुघल बादशाह सिल्व्हरस्क्रीननं पाहिला असणार. याआधी प्रदीपकुमार आणि झुल्फी सय्यदनं साकारलेले मुघल बादशाह बघून प्रेक्षक धन्य झालेच होते. पण गोवारीकरच्या जोधा अकबरनं मात्र ह्रितिकच्या देखणेपणाला न्याय दिला. याच सिनेमामध्ये उघड्या अंगानं तलवारबाजी करत असलेल्या बादशहाला चोरून बघणार्‍या जोधाचा एक क्लास प्रसंग आहे.


ह्रितिक आता बॉक्स ऑफिसच्या यशापलिकडचा सुपरस्टार झाला  असला तरी त्याचे काईट्स आणि  गुझारिश हे दोन चित्रपट आपटले. या दोन्ही चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांसोबत काहीच नाळ न जोडणं हे यांच्या अपयशामागचं प्रमुख कारण होतं. काईट्स आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून बनवण्यात आला होता. तो विदेशामध्ये चालला तरी भारतीय प्रेक्षकांना मात्र फारसा आवडला नाही. बरेचसे संवाद इंग्रजीमधून असल्यानं हा चित्रपट आपटला, असंदेखील म्हटलं गेलं. गुझारिश हा ह्रितिकसाठी एक माईलस्टोन आहे. क्वाड्राप्लेजिक झालेला जादूगार ही त्याची भूमिका. इच्छामरणाची अपेक्षा व्यक्त करणारा, सगळीकडून हरत येणारा, जीवनाला त्रासलेला तरीदेखील भरभरून जगणारा इथन ही त्याची व्यक्तीरेखा.  याही सिनेमामध्ये त्याची नायिका ऐश्वर्या राय होती. संजय लीला भन्सालीला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. दुर्दैवानं इतक्या सशक्त व्यक्तीरेखा आनि दमदार कथा असूनदेखील सावरीयासारख्याच कृत्रिम नाटकी ट्रीटमेंटनं सिनेमा फारच संथ आणि कंटाळवाणा बनला होता. भन्साली स्वत:च्याच सिनेम्याच्या इतक्या प्रेमात पडलेला असतो की, प्रेक्षकांचा कधी विचारच करत नाही, परिणामी सिनेमा एकसुरी आणि रटाळ होत जातो.


त्यानंतर आला जिंदगी ना मिलेगी दोबारा. झोया अख्तरनं दिल चाहता हैचीच स्टोरीलाईन आणि कॅरेक्टर्स थोडी पुढे वाढवून बनवलेलं हे कॉकटेल प्रेक्षकांना झिंगवणारं होतंच. स्पेनचे एक्झॉटिक लोकेशन्स, छोट्याछोट्या मोमेंट्सनी सजलेली स्क्रिप्ट, फरहान, अभय आणि ह्रितिकच्या तीनही व्यक्तीरेखांना न्याय देण्याची ताकद असलेला अभिनय आणि कतरीनासारखी आयकॅण्डी असताना हा सिनेमा गाजला नसता तरच नवल. जिंनामिदो मधली ह्रितिकची भूमिका पुन्हा एकदा त्याच्याच साच्यामधली होती. या भूमिकेमध्ये अनेक कंगोरे होते. सुरूवातीचा नाराजीनंच ट्रीपवर आलेला, प्रत्येक गोष्ट पैशामध्ये तोलत जाणारा, अधल्यामधल्या वर्षामधल्या कडवट आठवणींचे भार वाहणारा अर्जुन या ट्रीपदरम्यान बदलतो. हळूहळू स्वत:शीच स्वत:ला ओळख करवून देत जातो. डीप सी डायव्हिंगनंतर बॊटीवर बसलेल्या अर्जुनच्या डोळ्यांतून केवळ दोन अश्रू वाहतात. इथं एकही संवाद नाही, मेलोड्रामा नाही. (याबद्दल झोया अख्तरला शतश: धन्यवाद) तरीदेखील संपूर्ण प्रसंग ह्रितिकनं काय ताकदीनं निभावला आहे.


अग्नीपथ हा अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीमधला एक महत्त्वाचा सिनेमा. हा सिनेमा आला तेव्हा अमिताभ बर्‍यापैकी म्हातारा झाला होता. तरीदेखील त्याच्या ऍंग्रीयंगमॅन या इमेजला शोभेल अशा सूडाची कथा असलेला सिनेमा. याचा रिमेक बनवताना करन जोहर आणि करन मल्होत्रानं मूळ कथेमध्ये बरेचसे बदल केले. रौफ लालाचं अफलातून घेतलेलं निगेटीव्ह कॅरेक्टरनं नवीन अग्नीपथ अधिक झळाळून उठला. थंड डोक्याचा, आतून धुमसत असणारा, एकीकडे गुन्हेगारीच्या दलदलीमधून स्वत:चा सूड उगवणारा त्याच वेळी सर्वसामान्य तरूणासारखा प्रेमळ भाऊ, मुलगा आणि प्रियकर असणारा विजय दीनानाथ चौहान म्हणजे शिवधनुष्यच. ह्रितिकनं ते आरामात पेललं. अमिताभच्या संवादफेकीनं अग्नीपथ गाजला होता, आजही त्याचे संवाद खडाखडा म्हणून दाखवणारे फॅन्स आहेत. करण मल्होत्रानं अत्यंत हुशारीनं यामधल्या विजयला शांत दाखवून त्याची संवादफेकच काढून टाकली. त्यामुळे मूळ अग्नीपथ आणि रिमेड अग्नीपथ हे चक्क वेगवेगळे सिनेमा असल्यासारखे आहेत.
यानंतर आलेले ह्रितिकचे दोनही सिनेमा क्रिश ३ आणि बॅंग बॅंग मला व्यक्तिश: आवडले नाहीत. यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन अतिशय रीमार्केबल आहे, तरीही हे सिनेमा ह्रितिकसाठी फार चांगले नाहीत. यामध्ये त्याचं काम वाईट होतं अशातला भाग नाही. क्रिश ३ स्क्रिप्ट बेसिसवर जबरदस्त गडबडलेला होता. प्लॉट हॉलीवूडवरून इतका ढापलेला असूनदेखील त्यामधलं क्रिशच्या पुतळ्यासमोरचं गाणं वगैरे सर्वच अनावश्यक होतं. वाईट संगीत हा क्रिश३चा अजून एक मायनस पॉइन्ट. क्रिशचा सुपरहीरो खूप अविश्वसनीय वाटला आणि त्याचवेळी प्रेक्षकांपासून पूर्णपणे डीटॅच्ड वाटला. त्याउलट रोहित मेहरा मला जास्त भावला. एका सुपरहीरोचा बाप ही त्याची भूमिकाच अफलातून होती. बॅंग बॅंगवर लेखाच्या सुरूवातीलाच स्तुतीसुमनं उधळलेली आहेत म्हणून परत लिहत नाही. आधीच म्हटलं तसं अता त्याचं वय चेहर्‍यावर दिसतं. १४ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये ह्रितिकनं केवळ १८ सिनेमा केले आहेत. सुरूवातीचे कहोनाप्यार है नंतरचे त्याचे सलग पाच सहा फ्लॉप सोडले तर त्याचं बॉक्स ऑफिस रेकॉर्ड अतिशय चांगलं राहिलं आहे. वेगवेगळ्या भूमिका करायचं साहस त्यानं दाखवलं आहे. थरारक साहसीदृश्यं त्यानं केली आहेत. नृत्याच्या बाबतीत तो आजही फार वेगळा आहे. त्याला टिपिकल इंडियन स्टेप्स शोभत नाहीत, आणि तरीही त्याच्या इतका टेक्निकली परफेक्ट डान्स करणारा हीरो अजून कुठला नाही.



ह्रितिक रोशन हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा अभिनेता आहे. जेव्हा कधी त्याला उत्तम स्क्रिप्ट आणि योग्य लगाम असलेला दिग्दर्शक मिळालाय तिथं त्याचा अभिनय खुलला आहे.

यापुढे त्याचे अजून चित्रपट येतीलच. शुद्धी आणि मोहेंजो दरो सारखे वेगळे विषय त्यानं करायला घेतले आहेत. वैयक्तिकरीत्या मी मोहेंजोदरोची अधिक वाट पाहीन. त्याच्याकडून अपेक्षा तर चिक्कार आहेत. एकदातरी ह्रितिकला पूर्णपणे खलनायक म्हणून पडद्यावर पहायचे आहे. धूम २ मधला स्टाईलिश चोर वगैरे म्हणून नव्हे, तर कोल्ड ब्लडेड मर्डरर वगैरे टाईपचा खलनायक.


जाता जाता, ह्रितिकचा मला सर्वात जास्त आवडलेला एक प्रसंग.
झोयाच्याच लक बाय चान्समध्ये त्याची भूमिका खूप छोटी होती, पण जितकी होती तितकी त्यानं कमाल निभावली होती. मी आताच हे विधान करून ठेवत आहे की अजून वीस-तीस वर्षांनी लकबायचान्स हा सिनेमा क्लासिक्समध्ये गणला जाईल. एका सुपरस्टारचा किंचित निगेटीव्ह शेड असलेला (या सिनेमामध्ये प्रत्येक पात्राला ती शेड होतीच, कुणीच टू गूड टू बी ट्रू नव्हतं) थोडासा संधीसाधू आणि तरीही जमीनीवर पाय असलेला हा अलि झफर खान त्यानं ताकदीनं साकारला होता. (पुढंमागं या सिनेमावर लिहिणार आहेच तेव्हा डीटेलमध्ये बोलू) एक प्रसंग या सिनेमामधला जिथं झफर चिडून रोमीबद्दल काहीबाही बोलत असतो. अचानक एका आडरस्त्याला त्याची गाडी थांबते. रस्त्यावरची भिकारी पोरं गाडीमध्ये हीरो बसलाय म्हणून धावत येतात. तो झटकन काच वर करतो आणि त्या मुलांशी चेहरा वेडावाकडा करत हसत राहतो. एक वैतागलेला स्वत:च्याच गॉडफादरबद्दल काडीचाही आदर न दाखवत बडबडणारा स्टार ते रस्त्यावरच्या मुलांशी काचेआडून का होइना संवाद साधणारा एक साधासुधा तरूण हा त्याचा या झटक्यातला प्रवास. खास ह्रितिक स्टाईलचा प्रसंग!



ह्रितिकच्या जनरेशनच्या अभिनेत्यांकडे सुदैवाने करण्यासारखे बरेच काही आहे. छाप मोडून टाकायचे असं त्यांनी ठरवलं तर ते त्यांना सहज जमू शकतं. जे खानत्रयीला जमलं नाही, ते  ह्रितिकनं कित्येकदा करून दाखवलंय आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलेलं आहे. दुर्दैवाने हे “वेगळं काहीतरी करणं” सध्या लूक्स, ऍक्शन, फिल्म् पब्लिसिटी यांच्याच इर्दगिर्द फिरत राहतं. सिनेमाच्या मूळ कंटेंटकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. ह्रितिक हा दिग्दर्शकाचा अभिनेता आहे, जेव्हा फरहान किंवा झोयासारख्या दिग्दर्शकांनी त्याच्या शैलीचा वापर केलाय तेव्हा त्याच्यामधील अभिनेता झळाळून  उठलाय. राकेश रोशनसारख्या दिग्दर्शकांनी त्याच्या स्टारडमचा आणि स्क्रीन मॅजिकचा पुरेपूर फायदा उठवला आणि सूरज बडजात्या, सुभाष घईंनी  हाच फायदा  गरजेपेक्षा जास्त उठवून अख्ख्या सिनेमाचीच वाट लावून घेतली.



मला स्वत:ला येत्या काही वर्षांमध्ये ह्रितिककडून खूप अपेक्षा आहेत. खान लोकांची सद्दी अलमोस्ट संपत आलेली आहे. रणबीर कपूर सारखी नवीन मुलं काहीतरी वेगळं करायच्या प्रयत्नांमध्ये आहेत. ह्रितिक कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथून त्याला वेगळे आणि चॅलेंजिंग भूमिका करता येऊ शकतात. केवळ “कुछ हटके” करना है म्हणून नव्हे तर, मनापासून तो काहीतरी वेगळं करू शकतो म्हणून.

(समाप्त)