Wednesday, 15 February 2017

रात के हमसफर


काम संपस्तोवर रात्रीचे दीड दोन वाजलेले असावेत, डोक्यात संगीत कॉफीचा कैफ चढलेला असावा, यारदोस्तांसोबत चिकार खिदळणं झालेलं असावं आणि अशावेळी जग त्याच्या स्वप्नांच्या दुलईमध्ये गुरफटलेला असताना आपण रस्ताभर हिंडत सुटावं. परवा थिबा पॅलेसवरून बाहेर पडल्यावर सरळ घरी येण्याऐवजी दोघंच थिबा पॉइंटकडे गेलो. दूरवर गप्पकन फिरणारा भगवतीचा लाईट हाऊस. क्षितीजाच्या आसपास निवांत पहुडलेला समुद्र, समुद्र आणि खाडीच्या मध्ये पसरलेला भाट्याचा पूल. खाडीमध्ये डोलणार्‍या मच्छिमार बोटी. आणि त्या बोटींच्या अलिकडे झोपलेली रत्नागिरी. कुठलंही शहर त्याचं खरं रूप दाखवतं ते रात्रीच्याच वेळी. दिवसा गाड्या, माणसं, गायीगुरं, किलकिलाट यांनी लपेटलेलं शहर हा सगळा घूंघट उतरवतं ते रात्रीच्या वेळी! एखाद्या शहराच्या प्रेमांत पडायचं असेल तर ते दिवसा केवळ बघावं, पण अनुभवावं ते रात्रीच्या वेळेला. अशावेळी सोबत कुणी असो वा नसो, मनानं मी एकटीच अस्ते. माझ्याच विश्वामध्ये रात्रीच्या या नीरवतेशी माझा संवाद साधत.
रात्रीच्या मुंबईची कैक रूपं आहेत. काही सुरेख चित्रं आहेत तर काही किळसवाणी गिरबिट. मुंबईच्या कुठच्या क्षणी तुम्ही कूठे आहात यावर मुंबई “कशी?” हे ठरतं. रात्रीच्यावेळी मुंबई पहावी ती जुनी मुंबई. ही मुंबई तिथे राहताना अनेकदा अनुभवली. मुंबईच्या रात्रीचा पाऊस अंगचिंब भिजेस्तोवर झेलला, मुंबईच्या रात्रीमध्ये भूक अनावर झाल्यानं सायकलवर चहा विकणार्‍याकडून चहा  घेऊन बिस्कीटं खाल्ली, मुंबईच्या रात्रीमध्ये त्याचा हात हातात इतका घट्ट धरून ठेवला की त्याची लास्ट लोकल चुकली (चुकवलीच !!) आणि मग रात्रभर भटकत राहिलो त्या गल्ल्यांमध्ये.  मुंबईच्या रात्रीने एकटेपणा दिला. साथ दिली आणि मुंबईच्याच रात्रीने आपले अश्रू आपणच कसे पुसावेत हे शिकवल. मी मुंबईला फार मानते ते या बाबतीत. मुंबई तुम्हाला फार फार स्वतंत्र बनवते. या शहरामध्ये कुणाहीवर अवलंबून न राहता तुम्ही जगू शकता! मुंबई रात्रीसुद्धा कधी थांबलेली नस्ते, ती अखंड चालणारी मुंबई जेव्हा आळसावते तेव्हा तिचं रूप अतिशय अनोखं असतं.
मुंबईच्या अगदी उलट माझी दुसरी जीवाभावाची सखी, चेन्नई. सुरूवातीला आले तेव्हा चेन्नई कुठल्याही बाजूने कॉस्मोपोलिटन मेट्रो वाटलीच नाही. नंतर समजलं की चेन्नई मेट्रो नाहीच, आहे ते एक विशाल पसरलेलं खेडं. इथली माणसं त्याच जिव्हाळ्याची आणि मायेची. निवांत जगणं हे इथलं मुख्य सूत्र. मुंबईची धावपळ चेन्नईला मानवणारच नाही. इथे आल्यावर संध्याकाळी साडेसहा वाजता जेव्हा मला लोकलमधला लेडीज डबा अल्मोस्ट रिकामा दिसला (मी आणि अजून तीन पॆसेंजर. अख्ख्या डब्यात) तेव्हा मनापासून घाबरले होते. इतकी रिकामी लोकल बघायची सवयच नाही ना!  चेन्नई जशी फिरायला लागले तशी अधिक आवडली. मुंबईसारखी धकाधकीची नसेल, मुंबईसारखी फॅशन कॉन्शस नसेल, पण चेन्नई आहे मात्र अफलातून. थोडीशी लाजरीबुजरी वाटणारी चेन्नई नंतर नंतर काय दबंग आहे ते समजत गेलं. आता तर सध्या चेन्नई रोजच्या रोज नॅशनल न्युज मध्ये आहे. पण चेन्नईचं सर्वात सुंदर रूपडं कधी असेल तर तेसुद्धा रात्री. चेन्नईला आमच्या ड्रायव्हरचं नाव होतं बाबू. हा बाबू पण मस्त माणूस. फिरायला जायचं म्हटलं की “अम्मा, ये बी देक लो, वो बी टूरीस्ट पॉइण्ट” करत कुठेकुठे फिरवायचा. एकदा तिरूपतीला जायचं ठरलं, दर्शन तिकीट लवकर होतं म्हणून  रात्री दीडवाजता घराबाहेर पडलो. शांत, निवांत चेन्नई अशावेळी अधिकच लाडावलेल्या मांजरीसारखी पहुडलेली होती. चेन्नईच्या त्या रस्त्यावर अचानक त्याला गाडी थांबवायला सांगितली, आणि खाली उतरले. असंच सहज. रात्रीची चेन्नई गुंडुल्या बाळासारखी निवांत दिसत होती. दिवसभर गाड्यांच्या गर्दळीमध्ये रस्ता कधी असा निवांत कधी पाहिलाच नव्हता, त्यादिवशी पाहिला. चेन्नईशी ऋणानुबंधाची अजून एक घट्ट गाठ त्या रात्री मारली.
मी आतापर्यंत राहिलेल्या शहरांमध्ये सर्वात आवडतं शहर आहे मंगलोर. अतिशय सुखसमृद्ध, सुसंस्कृत आणि प्रेमळ शहर. मुंबईने मला एकटं राहून जगायला शिकवलं, तर मंगलोरने मला नवरा बायको मुलगी अशा तिकोणी संसारामध्ये रमायला शिकवलं. मंगलोर सोडलं त्या दिवशी मी खूप रडले, शहर सोडून निघाले त्याहून जास्त जीवाभावाची जमलेले सुहृद सोडून निघाले याचं जास्त रडू आलं होतं. रात्रीचं मंगलोर अनेकदा अनुभव्लं ते रेल्वेस्टेशनवरून घरी येताना. दिवसाभराचा प्रवास करून घरी येत असताना निवांत मंगलोर अजूनच आपलंसं वाटायला लागायचं. या शहराच्या डीएनएमध्येच शांतता आहे. दिवसाही मंगलोर खूप शांत वाटायचं, कितीही गजबजलेला परिसर असू देत, शहर कायम सुकूनमध्ये असायचं. रात्रीच्या वेळी तर ही शांतता अजूनच गडद व्हायची आणि काळोख्या रात्री मंगलोर अमावस्येच्या रात्रीसारखं पिठूळ चांदण्यांचं, पण चंद्राची लकलक  नसलेल्या आभाळासारखं भासायचं.
गेली अनेक वर्षं रात्रीचा कारने प्रवास करणंच सॊडलंय, पण रात्रीचा प्रवास खरा भावतो तो बसमधून. कैक वर्षांपूर्वी  एकदा बसचं तिकीट मिळालं नाही म्हनून पनवेलहून रत्नागिरीला गोवा बसने आले होते. त्याने उपकार करून मला क्लीनरची जागा बसायला दिली. अख्खी रात्र झोपले नाही. कारने काय बसने काय या एन एच १७ र्वरून कैकदा फिरले होते. पण त्या ड्रायव्हरच्या बाजूला बसून इतक्या उंचीवरून दिसणारा तो रस्ता, आणि ती घाटांमधील वळणं अनुभवणं खरंच खास होतं.... हातखंब्याला पहाटे तीन वाजता उतरल्यावर हाच तो तिठा हेच समजेना. रात्रीच्या वेळी कुठलीही जागा किती शांत आणि गूढ दिसते ना.

पण रात्रीच्यावेळी सर्वात गूढ काय दिसत असेल तर तो आपला बेस्ट फ्रेंड –समुद्र. लोकं मावळता सूर्य पाहून झाला की समुद्रकाठावरून घरी जातात. पण खरा चमत्कार सुरू होतो तो सूर्य मावळल्यावरच. कधी तुपामध्ये दिव्याची काजळी घालून काजळ बनवताना पाहिलंय? तसंच त्या दिनकराच्या अनेक रंगांनी नटलेल्या त्या समुद्रावर हळूहळू काजळी पडत राहते आणि तो समुद्र काळ्याशार काजळासारखा रंगत जातो. वार्‍याची दिशा बदलते, भरती ओहोटी बदलते, पण दूरवर क्षितीजाच्या मिठीमध्ये कुठेतरी विसावलेला हा समुद्र दिवसभर मस्ती केलेल्या बाळानं दमून कुठंतरी कोपर्‍यात दोन्ही हात डोक्यावर टाकून झोपल्यासारखा निवांत दिसतो. अपवाद अर्थात पावसाचा. रात्रीचा बेदम पावसाळा समुद्रकिनारीच पहावा. थाडथाडथाड पडणारे ते पावसाचे थेंब, फणा काढून फुत्कारणार्‍या नागासारखा समुद्र आणि तांडवामध्ये शंकराने नेऊन हात फिरवावेत तशा किनार्‍याला येऊन थडकणार्‍या लाटा. आणि या सर्व भयंकर दृश्यासमोर उभी अस्लेली मी एक क्षुल्लक मानवप्राणी. निसर्गाचा कैक लाखो वर्षं चालू असलेल्या या अव्याहत खेळामधला हा छोटासा क्षण. त्या क्षणाची धुंदी अनुभवणारी मी! या अनाहत नादाचा मनावर कुठेतरी गुंगारा बसत जातो. रात्रीचा दिवस होतो, पण मी मनानं कूठंतरी अजून त्याच क्षणामध्ये थोडीशी राहीलेली असते.
मग मी थोडीशी इथेपण असते. एका दूरवरच्या कड्यावरून खाली दिसणारा समुद्र  पहात. हाच समुद्र तो रौद्ररूप धारण करणारा आणि हाच समुद्र त्याची गाज ऐकवत बसलेला. रात्रीची वेळ हळूहळू नसानसांमध्ये चढते. गात्रं थकतात, पण थकत नाही ते मन... ते या निवांत शांत पहुडलेल्या रस्त्यांवरून भरकटतच राहतं. मेंदूच्या स्टेशनमध्ये अचानक रफी येतो आणि शम्मीच्या आवाजामध्ये कानांत हलकेच गुणगुणतो..
रात के हमसफर थक के घर को चले. झूमती आ रही है सुबह प्यार की.. 

No comments:

Post a Comment