Monday, 21 October 2019

ऐकण्याची गोष्ट!


आटपाट नगर होतं, तिथं एक मुलगी रहायची.. तिला गाणी ऐकायला खूप आवडायचं. तिचा आवाज एकदम बेसुरा. एक गाणं तिला कधी धड म्हणता यायचं नाही. तरीही ऐकायला मात्र प्रचंड आवडायचं. ही कहाणी तिच्याच ऐकण्याची.
माझं सांगितिक परिपोषण झालं ते फक्त आणि फक्त हिंदी चित्रपट संगीतावर. का कुणास ठाऊक, मराठी गाण्यांबरोबर भावनिक नाळ कधी जोडलीच गेली नाही. पण हिंदी चित्रपतगीते आणि तीही जुन्या काळामधली म्हणजे माझ्या भावविश्वाचा ठेवा वगैरे वगैरे. आपल्या हिंदी चित्रपट संगीताची गंमत अशी की, संगीताचा कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नसतो. शास्त्रीय संगीतापासून ते सुफीपासून ते क्लासिक रॉकपासून ते जॅझपासून ते युरोपियन लोकसंगीतापर्यंत सर्व काही आपलं चित्रपट संगीत आवर्जून सामावून घेतं, आपलंसं करतं.
म्हट्लं तर पार जुनी जुनी गोष्ट वाटेल, पण सुमारे दोन अडीच दशकांपूर्वी गाणी ऐकायचं एकमेव हक्काचं ठिकाण होतं रेडिओ. विविधभारतीनं अनेक गाणी ऐकवली, नंतर अर्थात केबलवर म्युझिक चॅनल्स आले. तेव्हा आलेले एमटीव्ही आणि व्ही आंग्लाळलेले होते. त्यांनी फिरंगी गाणी ऐकवली. काहीही समजली नाहीत तरी संगीताच्या ठेक्यानं बांधून घेतलं पण ते कधी आतपर्यंत भिडलंच नाही. ते वयही अर्थात “काय ऐकतोय” ते समजून घ्यायचंच नव्हतं. पुढं कॉलेजात गेलो तेव्हा आमच्या घरी इंटरनेट नावाची जादू आली होती. यामध्ये बरीच गाणी परत परत हव्या तेव्हा ऐकता येऊ लागली. संगीत “ऑन डीमांड” झालं. इतके दिवस रेडिओला “कहिये क्या सुनायेंगे आप” म्हणावं लागायचं, आणि तेच ऐकावं लागायचं. मग भले “तुझे जीवन को डोरसे” मध्ये पार रोमॅंटिक क्षितिजावर पोचलेलं मन पुढच्याच क्षणाला “हम थे जिनके सहारे” ऐकून धाडकन जमीनीवर आपटलं तरीही पर्याय नव्हता. आता युट्युब “हे ऐकता की ते ऐकता” करू लागलाय. नुसता रफी ऐकायचाय? नुसता मदनमोहन आणि साहिर ऐकायचाय... केवळ इन्स्ट्रुमेंटल ऐकायचंय... ऐका!!!
मोबाईल फोनमधल्या वेगवेगळ्या म्युझिक ऍप्सनी आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगनं तर संगीत कानोकानी पोचलंय. आधी केवळ हिंदी चित्रपटसंगीतावर वाढलेले कानसेनांना आता पूर्व युरोपामधल्या एका अत्यंत छोट्या देशामधल्या लोकसंगीताची धुन ऐकता येतेय. संगीताचं हे बाजारीकरण झालेलं अनेक धुरीणांना पसंद पडत नाही. संगीत ही गाभार्‍य़ामधून ठेवायची गोष्ट नाही, गल्ल्यांगल्ल्यांमधून रस्त्यांरस्त्यांमधून घराघरामधून निनादणारं तेच खरं संगीत. म्हणूनही असेल तर हिंदी चित्रपट संगीत अनेक दशकांनंतर, अनेक स्थित्यंतरानंतरही टिकून आहे ते याच कारणास्तव. पुलंनी त्यांच्या एका लेखामध्ये एकेकाळी गाणी ऐकण्यासाठी लोक किती कष्ट करायचे, कुठून कुठून यायचे वगैरे वर्णन केलं आहे. आता ती परिस्थिती राहीली नाही, हवं ते संगीत, हव्या त्यावेळी, हव्या त्या स्वरूपामध्ये ऐकता येऊ शकतं. अभिजात संगीत ही एकेकाळी ठराविक वर्गाची मक्तेदारी होती, आता ती गल्लीबोळामधल्या प्रत्येक मोबाईलवर जाऊन पोचली. साहजिकच, ऐकणारे वाढले आणि ऐकवणारेही वाढले.
काहीही आणि कितीही ऐकत नसताना एका संगीतप्रकाराकडे मात्र अजिबात वळले नव्हते. ते म्हणजे आपलं शास्त्रीय संगीत. एक तर ते आपल्याला काहीच कळत नाही याची प्रचंड खात्री होती, दुसरं ते कंटाळवाणं असेल असं वाटायचं. त्यामुळे कुणी कितीही गोडवे गायले, घरात शास्त्रीय संगीत ऐकणारे-गाणारे कितीहीजण असले तरी ये अपने बसकी बात नही असं सतत वाटायचं. पण प्रत्येक गैरसमजाची एक्स्पायरी डेट असते, तशी या गैरसमजाचीही झाली. मी तेव्हा मुंबईमध्ये रिपोर्टर म्हणून काम करत होते. मुंबई फेस्टिवल म्हणून एक भलामोठा इव्हेंट चालू होता. बरेच कार्यक्रम होते. नवीनच काम सुरू केल्यानं मला असले साधेसुधेच इव्हेंट्स आणि बातम्या करायला मिळायच्या. त्यातही मी बरीच चाप्टर असल्याने (मी, बॉस नव्हे!!) बर्‍याच बातम्या फोनवरून ईमेलवरून मिळवून काम भागायच्ं. एके दिवशी संध्याकाळी मात्र बॉसने कंपल्सरी एका इव्हेंटला जायचं म्हणून सांगितलं, हरिप्रसाद चौरासियांचं बासरीवादन ऍट बाणगंगा. संध्याकाळी आठचा इव्हेंट. संपेपर्यंत दहा वाजणार, मग येऊन बातमी करायची. बॉसला म्हटलं, जायला कशाला हवंय? फोनवर विचारते, कोणकोण आलं होतं, काय काय राग म्हटले.
बॉसनं भुवया उंचावल्या. “राग म्हटले?”
“हो, तेच काय क्लासिकलमध्ये असतं ते! व्यवस्थित विचारून घेते ना”
बॉसला माझी सांगितिक अक्कल ध्यानांत आली. “जा!” केवळ एकाच शब्दांत बोळवण झाली. जायचा मनापासून कंटाळा आलेला. त्यात परत हाकलल्यामुळे अजूनच चिडचिड. टॅक्सी पकडून इव्हेंटला गेले. रिपोर्टरसाठी आरक्षित ठिकाणी जाऊन बसले. कार्यक्रम ऑलरेडी चालू झालेला. मला हरिप्रसाद चौरासिया हे नाव फक्त ऐकून माहित. त्यातही ते बासरी वाजवतात, आणि चांदनीचं म्युझिक दिलेल्या शिव-हरिपैकी एक आहेत याहून अधिक माहिती नाही.
त्या दिवसांमधली माझी एकूणच मन:स्थिती बरीच चमत्कारिक होती. घर सोडून रहायचा फारसा अनुभव नाही. मराठी माध्यमांमधून शिकून इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जम बसवायचा प्रयत्न. घरी थोडेफार प्रॉब्लेम्स चालू. आपलं म्हणावं असं कुणीही नाही. टोटल एकाकीपणाचा असह्य अनुभव आणि त्यात करीअरमध्ये पुढं जाण्यासाठी चालू असलेली जीवघेणी स्पर्धा. कुठंतरी आपण या सर्वांमध्ये फिट नाही हे माहित होतं, पटत होतं, पण जमत मात्र नव्हतं. अशा वेळी बॉसनं मुद्दम अशा आडवाटेवरच्या इव्हेंटला आपल्याला विनाकारण पाठवलंय असं काहीतरी फिलिंग येऊन संताप संताप झाला होता.
पण आता आलोय तर किमान अर्धातास तरी बसणं भाग होतं. पंडीतजी काय वाजवतायत ते तिथं असलेल्या पीआरवाल्यांना विचारून घेतलं. रागांची नावं आणि तालांची नावं नुसती नोंदवली आणि ऐकत बसले. पंधरा मिनिटांत इथून सटकायचं हे मनात पक्कं. आपल्याला यातलं काहीही कळत नाही हे माहित होतं पण तेव्हा व्हॉट्सऍप आणि फेसबूक मोबाईलवर नसल्यानं लक्ष विचलित झालं नाही. एक तर बाणगंगेचा परिसर अतिशय जादुई. मुंबईमधून अचानक हजार वर्षं मागे जावं अशी ही जागा. ऐतिहासिक जागांमध्ये त्या जुन्यापुराण्या क्षणांचे काहीतरी काल-अवशेष टिकून असतात की काय कोण जाणे. पण या जागांचं स्वत:चं वेगळंच अस्तित्व असतं, त्या संध्याकाळी ते अस्तित्व अधिकच प्रसन्नरूपानं जाणवत होतं. अचानक हरिजी जे काय वाजवत होते ते पटकन समजलं... लताचं गाणं... बहुतेक.. तेरा मेरा प्यार अमर... मधली सुरावट. मला राग वगैरे तेव्हाच काय आजही समजत नाही... पण त्या गाण्यामधली सुरावट आणि त्या रागाचे स्वर दोन्ही एकदम मनाला स्पर्शून गेले. देखणा देव हसरी साधना डोळ्यांसमोर उभी राहिली. लता शैलेंद्रच्या शब्दामध्ये “फिर क्यु मुझको लगता है डर” म्हणत मनामध्ये येऊन राहिली. इतका वेळ सूर नुसते कानांवर पडत होते, आता कान स्वत:हून आसुसून ऐकू लागले. समजत नसलेल्या भाषेमध्ये ओळखीचा किमान एक जरी शब्द आला तरी ती भाषा आपलीशी वाटते... तसंच काहीसं झालं.
हरिजी आपल्याच तंद्रीमध्ये वाजवत होते, ऐकणारे तर ऐकतच होते. त्यात अजून एका बावीशीच्या मुलीची भर पडली. ऐकू लागले. काहीतरी अस्वस्थसं वाटत होतं. बासरीचे स्वरच मुळात आधी नाजूक. जखमेवर फुंकर मारावी तसे हळूहळू येणारे. चंद्र आकाशामध्ये उगवलेला. आजूबाजूला बाणगंगेचा तलाव... त्या तलावाच्या कडेने लावलेल्या पणत्या. त्या पणत्यांच्या स्निग्ध प्रकाशात उजाळलेला परिसर. तलावाच्या पाण्यावर वार्‍याच्या लहरीनं उठत रहावेत असे स्वरांचे तरंग. हळूहळू डोळ्यांसमोर आलेली एकएक प्रतिमा धुरकट होत गेली. उरले ते फक्त त्या सुरावटीचे काही तुकडे. ऐकताना डोळे कधी पाणावले ते समजलंही नाही.
आपण जे ऐकतोय, ते आपल्याला काहीही समजत नाही हे माहित होतंच. पण समजत नाही तरीही जे कानांवर येतंय ते थेट मनापर्यंत पोचतंय ही भावना त्याहूनही ओव्हरव्हेल्मिंग होती. कशाला करायचा अट्टहास. प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे मेंदूला. नाही समजलं तरीही मनाला भिडलं तरी चालत नाही का? तीन चार वर्षाचं टिल्लं आयुष्यात पहिल्यांदाच पावसांत भिजत असतंय, त्याला कुठे समजतं समुद्राच्या पाण्यानं वाफ होते, ते आकाशात जाते आणि तिथून ढग बनून पाऊस पडतोय, आणि त्या पावसांत आता आपण भिजतोय. त्यालाकाय करायचंय ते जलचक्र आणि मान्सून वगैरेंची माहिती. त्या बाळाला फक्त अंगावर पडणार्‍या त्या थंडगार पाण्याच्या थेंबाचं महत्त्व. त्याचं अस्तित्व त्या क्षणांपुरतंच. तसंच काहीसं या संगीताचंही असतं का? असेलही. असावंच. कारण, त्या क्षणानं मला तेही अस्तित्व दाखवून दिलं. तुला शास्त्रीय संगीत समजत नाही. हरकत नाही पण ते माझ्या मनापर्यंत भिडतंय का ते महत्त्वाचं... कायदेकानूननियमशिस्तीच्या पलिकडे जाऊन नेणीवेच्या पातळीवर जाऊन पोचतात ते खरे सूर... बाकी सब मोहमाया...
इव्हेंट करून ऑफिसमध्ये गेले, बॉसला बातमी करून दिली. निघताना त्याला फक्त “थॅंक्स” सांगितलं.
त्यानंतर तसं आयुष्यात फार काही बदललं नाही. इतर संघर्ष त्यांच्या गतीनं चालूच राहिले. बदललं काय तर... मी शास्त्रीय संगीत ऐकायला सुरूवात केली. अगदी ठरवून नाही, पण लिहिताना – काम करताना काहीतरी बॅकग्राऊंडला गाणी वाजवायची सवय होतीच, त्यात प्लेलिस्टमध्ये काही क्लासिकल वाद्यसंगीत घेतली. हिंदी चित्रपटसंगीत अजूनही अत्यंत आवडीचं आहे, त्यात फरक पडणार नाहीच. अजूनही शास्त्रीय संगीतामधलं फारसं काही कळत नाही. तरीही ते ऐकलं जातंय. नंतर पीआरमध्ये सुदैवानं अनेक शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम अटेंड करता आले. दरवेळी नवीन काहीतरी ऐकत गेले, नवीन काही तरी गवसत गेलं. समोर जे काही गायलं जातंय तो नक्की सूर कुठला ते अद्याप समजत नाही, राग ओळखायची बात तर दूरच (इतकं ऐकूनही!! काय ती सांगितिक बुद्धीमत्ता). तरीही मनाला आवडतंय या एकमेव कारणासाठी ऐकलं मात्र जातं.
ऐकायला लागल्यावर जाणवलं की अरे, आपण का ऐकत नाही? हे समजलं नाही तरी चालतंय हा समज संपुष्टात आल्यानंतर जे ऐकतोय ते आपल्याला कितपत भावतंय, ते लक्षात यायला लागलं. प्रवासामधला एक पाय पुढे पडला. ऐकलंच नाहीतर समजणार कसं!!!! मग हळूहळू शास्त्रीय संगीताबरोबरच बाऊल संगीताची गोडी लागली. ए आर रहमान आणि इलयराजाच्या स्पर्शानं तमिळ लोकसंगीत आवडायला लागलं. कोक स्टुडिओ पाकिस्ताननं तर संगीताचा नवीनच खजिना खुला केला आणि सीमेपल्याडचं लोकसंगीत हृदयात जाऊन बसलं. लयपश्चिमा हे आशुतोष जावडेकरांचं पुस्तक वाचताना कधीमधी ऐकत गेलेल्या गाण्यांनी तथाकथित धांगडधिंगावाली रॉक म्युझिकची आवड निर्माण झाली. पण या सर्व  संगीतामधला आदिम सूर म्हणजे आपल्या अभिजाततेचा वारसा मिरवणारं शास्त्रीय संगीत मात्र अजूनच लाडकं झालं.
म्हणून ऐकायलाच हवं. आवडतं ते तर आवर्जून ऐकलं जातंच. जे आवडत नाही तेही ऐकलं तर त्यातलं परत काय आवडतंय ते समजतं. जे समजत नाही म्हणून इतके दिवस ऐकलंच जात नव्हतं ते कधीतरी ऐकून बघा. माझा शास्त्रीय संगीत कंटाळवाणं असतं हा माझा समज जसा बाणगंगेच्या साक्षीनं आणि हरिजींच्या बासरीनं गेला, तसा तुमचाही गैरसमज असेल तर तोही जाईल. पण त्यासाठी वेळात वेळ काढून ऐकायला हवं. फार जास्त काही नाही... ऐकायला हवं!!!
साठा उत्तराची ही कहाणी प्रत्येक संगीतस्वराच्या साक्षीनं अशीच कायम चालत राहो.
-          नंदिनी देसाई

No comments:

Post a Comment