Tuesday, 24 December 2013

आम्ही माडिया


गेल्या महिन्यामधे कोर्सेरावरचा “मानवी इतिहास” हा ऑनलाईन कोर्स केला, त्यामधे मानवाची उत्क्रांती कशी होत गेली, तो भटक्या प्राण्यांपासून एका ठिकाणी राहून शेती करणारा प्राणी कसा बनत गेला याचा सगळा रंजक इतिहास होता. या इतिहासाकडे पाहताना लक्षात आलं, माझेदेखील पूर्वज (म्हणजे माझ्या आज्याचा आज्याचा आज्याचा आजा वगैरे वगैरे) कधीतरी या संस्कृतीचा भाग असणार. माझ्या एखाद्या पूर्वजन्मामधे या आदिम संस्कृतीमधे मी नक्की काय करत असेन वगैरे बरेच प्रश्न मला पडत असतात. त्यातच हाती आलं ते समकालीन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं एम डी रामटेके यांचं आम्ही माडिया हे पुस्तक.


रामटेके यांची प्रत्यक्ष भेट कधीही झाली नसली तरी आंतरजाल, फ़ेसबूक, त्यांचा ब्लॉग यामुळे आमची व्हर्चुअल ओळख आहे. “आम्ही माडिया” हे त्यांनी लिहिलेलं पहिलंच पुस्तक समकालीन प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. सोशल मीडीयामधे रामटेकेंनी अधूनमधून सांगितलेले त्यांच्या आयुष्यातले काही किस्से वाचून हे पुस्तक वाचण्यासाठी “मस्ट” या यादीत होतंच.  तसंही आपल्याला आदिवासी संस्कृती म्हटलं की डोळ्यासमोर काही टिपिकल इमेजेस येतात. जंगलातलं वास्तव्य, शिकारीवर अवलंबून असणारी, निसर्गपूजक आणि बॉलीवूडवाल्यांचा आवडता डोक्यावर पिसे खोवून केलेला आदिवासी डान्स. आदिवासी म्हणजे नक्की कोण? आपल्यासारखीच काही माणसं, जी जगण्यासाठी आजही निसर्गावर जास्त प्रमाणावर अवलंबून आहेत. ज्यांची संस्कृती आणी आपली संस्कृती याधे जमीन अस्मानाचा फ़रक आहे याहून जास्त काही माहित नव्हतं.


आम्ही माडिया पुस्तक वाचताना माडिया या गोंडवनातील आदिवासींच्या जीवनशैलीची एक वेगळीच ओळख होत जाते. रामटेके हे स्वत: या आदिवासी समाजाचा हिस्सा आहेत, त्यामुळे हे लिखाण “अभ्यासक” या भूमिकेतून न मांडता, रामटेके यांच्या स्वत:च्या आयुष्यातील काही प्रसंग, काही दंतकथा आणि काही पद्धतींची माहिती अशा स्वरूपात आहे. मुळात या आदिम भावजीवनाचं विश्वच वेगळं आहे, श्रद्धा-अंधश्रद्धा वेगळ्या आहेत. कुठल्याही आदिम संस्कृतीचे असतात तसे याही संस्कृतीचे काही प्रमुख रीतीरिवाज आहेत. त्यातले कितीतरी रिवाज आपल्याला गमतीशीर वाटतात, काही क्रूर वाटतात तर काही रिवाज समजल्यावर तथाकथित भारतीय संस्कृतीरक्षकांची प्रतिक्रिया काय असेल असा गमतीदार प्रश्नदेखील पडतो. गेल्या शतकभरामधे उदयाला आलेल्या ग्लोबलायझेशनच्या परिणामांमुळे इतकी शतके वेगळी राहिलेली जगभरातली आदिम संस्कृतीदेखील बदलत आहे, तसेच या आदिवासींच्या जीवनशैलीमधे मूलभूत बदल होत आहेत. त्यांचे जगणं बदलत आहे, शतकांपूर्वीपासून असलेल्या जुन्या पद्धती सहजासहजी सोडल्या  जात आहेत. नवीन विचारांचा स्वीकार करून मुख्यधारेमधे येण्याचा प्रयत्न केला आहे. पण या सर्व बदलांमधे हजारो वर्षांपासून जपून ठेवलेला अनोखा सांस्कृतिक वारसादेखील नाहीसा होत आहे, याची खंतदेखील त्यांना आहे. रामटेके यांचे आम्ही माडिया हे पुस्तक अशा स्थित्यंतरामधे असलेल्या समाजाचे एक उत्तम डॉक्युमेंटेशन करते. जिथे आजही जगण्यासाठी जंगलामधे जाऊन शिकार करावी लागते, जिथे आजही पुटुल सारख्या नागरी जीवनाला न पटणार्‍या पण माडीया समाजाच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाच्या पद्धती चालू आहेत असा समाज जेव्हा बदलतो तेव्हा कशापद्धतीने बदलतो हे वाचणं खूप रोचक आहे. ऐंशीच्या दशकामधे शाळा म्हणजे काय ते समजलेला हा समाज आज विविध क्षेत्रामधे प्रगती करत आहे, शिकत आहे, बाहेर पडून जग अनुभवतो आहे, आणि तसंच नक्षलवादसारख्या समस्या झेलतो आहे. पण काहीही असलं तरी हा समाज निराश आणि हताश असा मात्र अजिबात नाही.


सर्वसाधारण मराठी माणसाला माडिया संस्कृतीची माहिती आहे ती प्रकाश आमटे यांनी चालवलेल्या लोकबिरादरी या प्रकल्पामुळे. डॉ. प्रकाश आमटे यांनी केलेल्या नि:स्पूह कार्यामुळे या आदिवासांच्या आरोग्य, शिक्षण या बाबींमधे विकास झालेला आहेच त्याशिवाय मुख्य म्हणजे त्यांच्या परीघातल्या वर्तुळाबाहेर पडून हे आदिवासी जग पहायला शिकत आहेत. ज्या गावात आजही बस नाही, टेलीफोन नाही अशा गावातल्या एका तरूणाने जिद्दीने शिकून मल्टिनॆशनल कंपनीमधे नोकरी करतो, आणि त्याच्याच नजरेमधून दिसलेलं हे आदिवासी आयुष्य आपल्यासमोर मांडतो. इथल्या कित्येक पद्धती, श्रद्धा-समजूती यांचे मिश्किल शैलीमधे केलेले खुमासदार किस्से खरंच भन्नाट आहेत. त्यातही मेंदूला गोळी लागलेला वाघ गुरांच्या कळपात येऊन राहतो हा किस्सा अक्षरश: अविश्वसनीय आहे. अख्ख्या गावामधे आलेली भितीची लाट माझ्यासारखी शहरी मुलगी कल्पनादेखील करू शकत नाहीपण तरीही वाचताना मनापासून हसू मात्र येतं. या पूर्ण गोष्टीवर एक उत्तम ऍनिमेटेड सिनेमा तयार होऊ शकतो. डिस्नेवाले, ऐकत आहेत का?


गावातल्या बहुतेक पद्धती या अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ या मताने आजवर चालत आलेल्या आहेत, माडीयांची गोत्रपद्धती घरामधे किती देव यावरून ठरते. त्यावरून नाती ठरवली जातात. तसंच, पुटुल ही पद्धत लग्नाची पद्धत मात्र खरंच खूप विचित्र आहे, मुलीच्या मुलीला सून करून आणायची पद्धत बर्‍याच समाजांमधे दिसून येते- पण तिथे हो/नाही म्हणण्याचा पर्याय असतो. माडीयांमधे मात्र हा हक्क हो पुटुल नावाने ओळखला जातो आणि तो नाकारता येत नाही. त्यामुळे कित्येकदा विजोड वयाची जोडपी (तीदेखील सख्खी आते मामे भावंड) अशी दिसतात. नवरी नवर्‍यापेक्षा दहा बारा वर्षापेक्षा मोठी असू शकते, तरीही तिला ते लग्न करावंच लागतं. मात्र, अविवाहित तरूण तरूणींना इथे लैंगिक स्वातंत्र्य असते, तसेच लग्नाआधी गर्भार होणे ही काही सामाजिक आपत्ती वगैरे मानली जात नाही. माडिया आदिवासींच्या विवाह पद्धतीचं अजून एक वैशिष्ट्य “लोन आळियना”  (घरात घुसलेली स्त्री) वाचताना मला वेगळ्याच समाजातली पण अशीच मनमानीपणाने जगणारी गोनींदांची चिंगी डोळ्यासमोर येत होती. अशी स्त्री घरात घुसली तर मात्र तिच्या नवयाला पुटूल हक्क उपस्थित झाला तर त्याचे पैसे द्यावे लागतात. रैके तेंडणा ही मात्र थोडी विचित्र पद्धत, माडियांमधे विवाहित स्त्रीला पोलके घालायची पद्धत नाही. लग्नाच्या विधीमधे पोलके उतरवण्याचा विधी असतो तोच हा रैके तेंडणा. विवाहित मुलीने उघड्या छातीने वावरणं म्हणजे शालीनता असे हा समाज मानत असला तरी सध्या शाळेमधे शिकलेल्या मुली या पद्धतीला विरोध करत आहेत. अशीच विरोधामधे उभी राहिलेली कुम्मे जेव्हा गावामधे पोलकं घालते, आणि तिचे पाहून इतर विवाहित स्त्रियादेखील पोलके घालायला लागतात, तेव्हा एक लढा जिंकला जातो. माडिया असो वा दिल्लीमधली मुलगी तिला “आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागू द्या” यासाठी लढा हा द्यावाच लागतो हेच खरं. याच प्रकरणातला “ढगल्या” हा भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. माडियांमधे “लग्न” हा विधी वेगळा, आणि स्त्री-पुरूषाचं एकत्र सहजीवन वेगळं. त्यामुळे दोन तीन मुलं झाल्यावरदेखील लग्न केल्याचे किस्से वाचून मजा वाटते.
रामटेके यांची भाषा अगदी मिश्किल आहे, अगदी दु:खी अथवा वाईट प्रसंगाचं वर्णन करतानादेखील त्यांच्या स्वभावातला मिश्किलपणा जाणवत राहतो. माडियांच्या कित्येक श्रद्धा समजुती सांगताना  रामटेके “माझ्या या गोष्टींवर विश्वास नाही” अशी सरळ कबूली देतात. पण माडीयांच्या अंधश्रद्धांना तर्काची कसोटी लावताना कुठेही ते चॆष्टा अथवा टिंगल करत नाहीत. या श्रद्धा समजुती हजारो वर्षापासून चालत आलेल्या असूनदेखील आता माडीयांचा त्याबद्दलचा दृष्टीकोन हळूहळू बदलत असल्याचेही नमूद करतात.


या पुस्तकाच्या बाबतीत माझा छोटासा का होइना एक अपेक्षाभंग मात्र झाला. आम्ही माडिया या पुस्तकामधे माडिया संस्कृतीबद्दल जी माहिती मिळते ती लेखकाच्या अगदी फ़र्स्ट हॅन्ड अनुभवातून आलेली आहे, तरीही मधेच लेखक नुसती माहिती देत जातो ते प्रचंड खटकते. लेखकाकडे सांगण्यासारखे प्रचंड अनुभव असताना अधून मधून “आमच्यात अशी अशी पद्धत आहे” वगैरे रटाळ माहिती येत जाते. लेखकाला या आदिवासी संस्कृतीमधून बाहेर आल्यावर बसलेले काही कल्चरल शॉक्स आणि त्यातले काही किस्से-खास करून आपल्या नागरी जीवनातल्या दांभिक वागणुकीचे-  ऐकल्यावर पुस्तकामधे देखील असे काही असेल अशी फ़ार अपेक्षा होती, ती मात्र पूर्ण झाली नाही. मधेच लेखकाच्या आयुष्यातले काही प्रसंग आणि मधेच नुसती माहिती देणारी प्रकरणं यामुळे वाचताना मधेच फ़ार कंटाळा येतो.

हा एकमेव थोडासा नकारात्मक भाग सोडला तरीही एकंदर पुस्तक वाचण्यासाठी मी नक्कीच रेकमेंड करेन. माडिया संस्कृतीच्या जगण्याची, झुंजण्याची आणि तरीही आलेला प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याचा प्रयत्न करणार्‍या माडियांचं आयुष्य समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल असे आहे. 



Monday, 9 December 2013

समुद्र किनारा (भाग १०)

वीर कपूर चालत चालत कंपाऊंडच्या बाहेर आला आणि अचानक थांबला. पायातले बूट काढून त्याने कंपाऊंडच्या आत फ़ेकले आणि उघड्या पायांनी तो वाळूतून चालायला लागला. सकाळचे साडेसहापण अजून वाजले नव्हते, पण बर्‍यापैकी उजाडलेले होते. समोरचा समुद्र अजून आळसावल्यासारखाच होता. इतक्या पहाटे या प्रायव्हेट बीचवर अजून कुणीही नव्हतं, त्याच्याशिवाय. तो दूरवर वाळूमधेच बसला होता. वीर चालत चालत त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
“हॅलो, मिस्टर नदीम शेख. हीअर वी मीट अगेन” वीर म्हणाला.
त्याने मान वळवून वर पाहिलं आणि तो हसला.. “वीर. शादी मुबारक!” तो बसल्याजागीच म्हणाला.
“आल्याबद्दल धन्यवाद.” वीर म्हणाला. बोलताना “बस ना,” तो म्हणाला पण वीरची नजर त्याच्या हातातल्या सिगरेटवर होती. “स्मोकिंग?” वीरने उभं राहूनच विचारलं.
“आजची लास्ट!”
“यु आर इम्पॉसिबल!! मुद्दाम करतोस का तू हे सगळं. तुला माहित आहे आज माझं.....”
“आज तुझं लग्न आहे ही एकच गोष्ट मला माहित आहे वीर. आणि म्हणूनच या लग्नाच्या आधी मला तुला भेटायचं होतं!”
“कशासाठी? झाली तेवढी कॉम्प्लिकेशन्स बास नाही का झाली तुला? अजून काय हवंय? सुखाने जगू देत ना आम्हा दोघांना” वीर वैतागून म्हणाला. “आय ऍम सॉरी.. चुकून बोललो मी..”
“त्यासाठीच तर आज मी इथे आलोय. तुम्हाला दोघांना सुखाने जगता यावं म्हणून.”
वीर त्याच्या बाजूला वाळूत बसकण मारत बसला.
“मी इथे आलोय हे सरस्वतीला सांगितलं नाहीस ना?” त्याने विचारलं.
“तूच मला ऑर्डर केली होतीस. नको सांगूस म्हणून. पण मला माहित आहे, ती कालपर्यंत तुझा फोन ट्राय करत होती. तुझा नंबर लागला नाही म्हणून तुझ्या घरी पण फोन केला होता तिने... पण तू इथे आलास ते तिला का नाही सांगायचं?”

तो फ़क्त हसला. “माय फोन इज डेड, अनलाईक मी. मी इथे आलो होतो आणि तुला भेटलो होतो हे तिला कधीच सांगू नकोस. आणि आता यापुढे तुमच्या दोघांच्या आयुष्यामधे मी परत येणार नाही.”
“असं दर वेळेला म्हण तू. दरवेळेला. जर तुला माहिती होतं की आज आमचं लग्न आहे, तर मग....”
“तरी मी तुला का सांगितलं की मी इथे येणारच म्हणून? तू नको म्हणत असताना सुद्धा, मुद्दाम फ़क्त तुला भेटायला म्हणून मी का इथे आलो? का मी परत परत तुझ्या आणि सरस्वतीच्या आयुष्यामधे येऊन विष घालतो आहे... का मी एकदाचा मरून जात नाही? हेच सगळं म्हणायचं आहे ना तुला?”
“नदीम, प्लीज... तुला मी इथे येऊ नको म्हटलं नाही... कालपण तुझा मेसेज आल्यावर तुला ये असाच रीप्लाय केला होता. तुझ्यामधे आणि सारामधे असलेलं नातं मला चांगलंच माहित आहे... साराच्या बोलण्यामधे तिच्या साहिलचं नाव नसेल असं एकही वाक्य नसतं.. आजही ती तुझ्यावर तितकंच प्रेम करते जितकं तू तिच्यावर!”
“पण त्या प्रेमाला काहीही भविष्य नाही”

वीर हसला, “असं म्हणत म्हणत तीन वर्षं गेली, नदीम.”
“….. तोच तर प्रॉब्लेम झालाय ना. हरामखोर त्या हॉस्पिटलवर केस ठोकणार आहे मी. आधी सांगतात सहा महिने... आणि अजून मी जगतोय त्याचं काय?”
“तू नंतरचा इतका विचार करतोस की आजचं जगणं विसरून गेलास”
“जगणं? म्हणजे नक्की काय असतं रे वीर? जन्माला आलो ते हार्टमधे काहीतरी सॉलिड प्रॉब्लेम घेऊन. नंतर काय सर्जरी वगैरे झाली तरी डॉक्टर म्हणाले फ़ार तर वीस-पंचवीस वर्षं जगेल हा. आणि म्हणून ती सगळी वर्षं नुसती अशीच गेली. अम्मीअब्बाच्या चिंतेमधे, काळजीमधे.. रात्र रात्र अम्मी जागायची, नमाझ पढायची, कशासाठी तर पोरगा वाचावा म्हणून. एवढी वर्षं सगळी न जगल्यासारखी. वीर, तुला आठवतं, शाळेत असताना तू सगळ्या स्पोर्ट्समधे कायम असायचाच, आणि मी मात्र कधीच नाही. जास्त धावलं की मला दम लागायचा म्हणून अब्बांनी शाळेला पत्रच देऊन ठेवलं होतं स्पोर्ट्सबद्दल...”
“आणि त्या मूर्खांनी ते इतकं सीरीयसली घेतलं की तुला त्या वर्षी चेसमधे पण खेळू दिलं नव्हतं” त्या आठवणीने वीरला हसू आलं.
नदीम पण हसला. “स्कूलचे दिवस माझ्यासाठी बेस्ट होते. कारण आधी कितीतरी वर्षं मला अम्मीने घराबाहेर सोडलंच नव्हतं कधी. सतत घरामधे. बाहेर गेला की आजारी पडेल म्हणून. म्हणून होम स्कूलिंग. पाचवीनंतर कुठे मला स्कूल कसलं ते बघायला मिळालं. असाच तर प्रत्येक दिवस जात होता वीर, मला अजून जगवण्यासाठी अम्मी अब्बा रोज झगडत होते. पैशाला कमी नव्हती, दुआंना कमी नव्हती, कमी होती ती माझ्या नशीबात. कधी कधी असं वाटायचं हे सगळं कशासाठी? आपण आज ना उद्या मरणार.. मरायचं आहे तर आपण आपल्या टर्म्सवर का नाही मरायचं. पण ते आमच्यात मान्य नाही.. हराम आहे! म्हणजे आला दिवस जगायलाच हवा. कसा का होइना, पण कधीकधी फ़ार विचित्र घडतं रे. मुंबईमधल्या पोल्युशनचा मला त्रास होतो असं वाटलं म्हणून अम्मी मला घेऊन तिच्या गावी गेली होती. अख्खा महिनाभर. असंच काही कामधाम नव्हतंच मला तिथे. अब्बांनी तर मला कॉलेजला पाठवायचंच नाही असं आधीच ठरवलं होतं. फ़ार वेळ जात नसेल तर म्हणाले कुठल्याही ऑफ़िसमधे येऊन बसत जा. घरचेच दोन तीन न्युजपेपर, आणि वर नवीन चॅनल चालू केलं होतं तेव्हा. तसंही घरामधे कुणी मला काही बोलणारं नव्हतंच. मी काम करावं वगैरे कुणाचं काही म्हणणं नव्हतं. पण मला ते करायचं पण नव्हतं. तेव्हा गावामधे असंच दुपारचं फ़िरत असताना मला ती दिसली. एका झाडाखाली बसलेली, आपल्याच विश्वात रंगलेली. पुस्तक वाचण्यामधे हरवलेली. सरस्वती. आयुष्यातले काही क्षण असे असतात की वाटतं याच क्षणासाठी तर आपण इतके दिवस जगत होतो.. माझ्यासाठी तो क्षण होता, वीर. मी तिला कितीतरी वेळ नुसता बघत होतो. डोळ्यांमधे साठवून घेत होतो. कुणाच्या प्रेमात पडण्याची, कुणासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्नं रंगवण्याइतका खुळा तेव्हा नव्हतोच, सहा महिन्यांपूर्वी चेकप केलं होतं. सगळं नॉर्मल होतं, पण लाईफ़चं घड्याळ टिक टिक करत चाललंच होतं. तिच्याशी थांबून बोलणं म्हणजे आपलाच पाय खोलात घालणं हे पटत होतं, कळत होतं. पण वळत नव्हतं. नाही राहवलं मला. मी तिच्याकडे बघत बसलो आणि प्रेमात पडत गेलो. तिच्याकडून कसलीच अपेक्षा न ठेवता. तरीही त्यादिवशी तिच्यासोबत बोललो. बोलताना जाणवलं, ती पण आपल्या प्रेमात पडत आहे...पण तिने तोपर्यंत तिने एवढं सोसलं होतं की रस्त्याने जाणार्‍या कुणीही तिच्याशी दोन ओळी नीट बोललं असतं तरी त्याच्या प्रेमात पडली असती... पण नशीब माझंच फ़ाटकं. तेव्हा गावी असताना रोज तिला भेटायचो. मैत्री झाली, माझ्या भावना मी कधीच लपवल्या नाहीत. तिच्या भावना तिने कधीच सांगितल्या नाहीत... आणि गंमत माहीतीये, तिला मी तिच्या आयुष्यामधे मान्य होतो, पण माझा धर्म मान्य नव्हता. माझ्या नावामुळे तिच्या जुन्या आठवणींचे डंख तिला डसायचे, म्हणून तिने तिच्यापुरता मार्ग शोधून काढला, माझं नावच बदलून तिने स्वत:च्याच मनाची समजूत घातली, पण तिच्या मनातली खळबळ मला समजत होती. पण कुठल्या तोंडाने मी तिला कमिटमेंट देणार होतो? कसं तिला सांगणार होतो की धर माझा हात. मी तुला आयुष्यभर सांभाळेन, इथे माझ्याच दुसर्‍या दिवसाचा मला भरवसा नव्हता. पण कसं ते माहित नाही, त्या लढाईमधे माझ्याच प्रेमाचा विजय झाला. तिला घेऊन इथे मुंबईला आलो. माझ्या घरातला प्रत्येक जण तिला बघून खुश होता. ती स्व्त: इथे त्याहून जास्त खुश होती. तिला तिच्या मनाप्रमाणे तिला इथे जगता येत होतं. अब्बांनी सांगूनसुद्धा ती आमच्या पेपरमधे कामाला आली नाही. आधी स्ट्रगल केला, जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा कुणालाही आमच्या दोघांबद्दल न सांगताच. जगातलं प्रत्येक सुख तिच्या पायाशी टाकण्याइतका श्रीमंत होतो, पण जेव्हा... जेव्हा...” बोलता बोलता तो अचानक थांबला. “.. जेव्हा मला ऍटॅक आला, आणि डॉक्टर म्हणाले, ऑलमोस्ट ओव्हर.. तेव्हा मात्र धीर खचला. मी सरस्वतीला सोडून जाणार ही कल्पनाच मला असह्य झाली... आणि त्यानंतर थोडे दिवस तिच्यापासून लांब राहिलो, एकदाचं मी तिला आमचं नातं संपलं म्हणून सांगून घराबाहेर पडलो. तिला माझ्याशिवाय जगणं भाग होतं. तिने जगण्यासाठी मी दूर जाणं आवश्यक होतं.. मी तीळ तीळ मरत असताना तिच्या डोळ्यांत स्वत:ला कधीच बघू शकलो नसतो..”
“त्याच रात्री तू माझ्या घरी आला होतास...” वीर म्हणाला.
“हो. कुठे जाऊ काय करू समजत नव्हतं! घरी गेलो असतो तर अम्मी-अब्बांनी सरस्वतीला खरं काय तेच जाऊन सांगितलं असतं. पार गोंधळून गेलो होतो. कुणाचाच काही आधार नव्हता... आजूबाजूला इतकी माणसं असतानासुद्धा एकटा पडलो होतो....”
“नदीम...” वीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. “मी तेव्हाही तुझा मित्र होतो, आजही आहे. तेव्हाच जर मी....”
“काय करणार होतास? माझा आजार तुला माहित होता. सरस्वतीबद्दल तुला सगळं सांगितलं होतं मी....”
“नदीम, खूप आधी, जेव्हा सारा नवीन होती इथे, तेव्हा एका पार्टीमधे तिला भेटलो होतो, तिने मला नाव सांगितलं... सरस्वती केळकर, ऍन्ड आय अल्मोस्ट आस्क्ड हर, तू नदीमची गर्लफ़्रेन्ड ना? पण नाही विचारलं ते एका अर्थाने बरंच झालं... नंतर राजनला सांगून तिला आमच्या टीममधे बोलावलं. तुझ्याशी बोलताना मला असं वाटायचं की ही सरस्वती मला खूप ओळखीची वाटते. माझ्यासारखीच तर आहे ती. मला बापाने सोडलं, तिला आईने. दोघांनाही सतत स्वत:ला खूप प्रूव्ह करत राहण्याची जिद्द आहे. माझ्या लाईफ़मधे रसिका पिलर होती, आणी सरस्वतीच्या लाईफ़मधे तू.... तू जेव्हा तिच्याबद्दल माझ्याशी बोलत रहायचास तेव्हापासून...”
“तेव्हापासून तू पण तिच्या प्रेमात पडत होतास, मला माहिती होतं, ट्रीटमेंटसाठी युकेला गेल्यावर माझ्याकडे फ़ार कमी ऑप्शन्स होते, मी त्यातला सगळ्यांत सोपा ऑप्शन निवडला, मरायच्या आधीच सरस्वतीला मी मेल्याचं खोटं सांगितलं. वाटलं, ती रडेल. दोन तीन दिवस, कदाचित आठवडाभर. आणि मला विसरेल. मुंबईला आल्यावर माझा आजार तिला समजला होता. हे होणार हे तिला माहितच होतं....”
“तरीपण... मी तेव्हाही तुला म्हटलं होतं नदीम. आपण फ़िल्मची स्क्रीप्ट नाही लिहत रीअल लाईफ़मधे. तुझी सरस्वती मरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली.... तुझे सगळे अंदाज चुकले साफ़. सरस्वती एक दोन दिवस रडून मग तिच्या साहिलला विसरणार नव्हतीच....”
“आणि तेव्हा तू तिच्या आयुष्यात आलास.... माझ्या मैत्रीखातर की तिच्याखातर... ते मला माहित नाही”
“दोन्ही चूक. सारा माझ्या आयुष्यात आली तीच मुळी माझ्यासाठी. साराने माझ्या आयुष्याला एक वेगळंच परिमाण दिलं. तिचं तिच्या साहिलवर प्रेम होतं, आजही आहे आणि उद्यापण राहिल. साराच्या मनामधे तुझी जागा कधीच मिळवू शकणार नाही. ती कायम स्वत:ला समजावत राहते, की माझ्यावर तिचं साहिलपेक्षा जास्त प्रेम आहे. पण तिच्या डोळ्यांत मला खरं काय ते दिसतं, तिच्या स्पर्शात ते जाणवत राहतं. ती माझ्यावर प्रेम करत नाही. मी तिचा कधीच नाही. कधीच.. मग स्वत:वरच चिडतो मी. मलाच प्रश्न पडतो... का मी या मुलीवर इतकं प्रेम करतो... तिच्या मनामधे तर दुसरंच कुणीतरी आहे. माझ्याशिवाय दुसरंच कुणीतरी... मग मला आठवतं त्या दुसर्‍या कुणालातरी.... तुला.... तिच्या आयुष्यातून बाजूला सारून तर मी तिच्या प्रेमात पडलोय. तुझा खूप राग येतो मग नदीम... खूप राग. मग तेवढाच राग साराचा पण येतो.. आणि सर्वात शेवटी स्वत:चा राग येतो.. कशाला आपण एवढं हिच्यावर प्रेम करतो..... कशासाठी?”
“वीर, प्रेम कोण कुणावर कशासाठी करतं हे जर माहित असतं तर लाईफ़ इतकं कठिण झालं असतं का रे? सगळी इक्वेशन्सच सोपी झाली असती ना...”
वीर यावर काहीच बोलला नाही. दूरवर उठणार्‍या समुद्राच्या लाटा बघत राहिला. कितीतरी दिवसांनी तो आणि नदीम असे भेटत होते. याआधी नदीम मुंबईत आलाय हे समजलं तरी वीर पेटून उठायचा, सारा कदाचित त्याच्या आयुष्यातून निघून जाईल, या एकाच भावनेने. पण आज सारा आणि तो लग्नाच्या गाठीमधे गुंतत असतानादेखील आलेला नदीम पाहून वीर चिडला नव्हता. कदाचित या सगळ्यांमधे सर्वात जास्त अन्याय त्याच्यावरच झाला होता म्हणून असेल. समोर बसलेला नदीम गेल्या चार महिन्यांमधे अजूनच थकलेला दिसत होता. त्याच्या वडलांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला तरी होणारी गोष्ट अटळ होतीच...
नदीमने हातातल्या घड्याळात पाहिलं.
“आठ वाजता राजन माझ्या कॉटेजवर येईल. मी तिथे नसलो तर तो शोधत इकडे नक्कीच येईल” वीर म्हणाला.
“आणि मला इथे बघून लगेच पॅनिक होइल.. घाबरू नकोस, मी तेवढा वेळ थांबणार नाही. तुझ्या लग्नाचा मुहूर्त एवढा महत्त्वाचा नाही, जितका माझ्यासाठी इथून जाण्याची वेळ आहे.” बोलता बोलता नदीमने अजून एक सिगरेट पेटवली
.
“मघाशी आजची लास्ट म्हणाला होतास ना?.."

“कमॉन, आजचा दिवसच लास्ट आहे माझा. काय बेक्कार लाईफ़ आहे रे माझं. मनासारखं व्यसन पण करता येत नाही. असं तुकड्यातुकड्यातून जगताना खरंच वैतागून गेलोय.”
वीरने त्याच्या हातातली सिगरेट घेतली आणि वाळून विझवली. “नदीम, एकदा भेट साराला. लग्नाआधी भेट. पुन्हा एकदा दोघंही विचार करा. तू निघून जाणं एवढाच रस्ता असू शकत नाही...”
यावेळी नदीम हसला. “आणि तुझं काय वीर? समजा, मी आणि सरस्वतीने लग्न करायचं ठरवलं तर तुझं काय होणार?”
वीरला काहीही उत्तर सुचलं नाही. “या कथेचा दुसरा कुठला शेवट असूच शकत नाही. वीर आणि सरस्वती. हे असं ऐन मोक्याचय वेळी नवरा नाहीतर नवरी बदलणं पिक्चरमधेच शोभून दिसतं.”
“मग आता नेक्स्ट काय?” वीरने विचारलं.

“सिंपल. तू इथून उठशील, मागे फ़िरशील आणि कॉटेजकडे चालत जाशील. फ़क्त एक प्रॉमिस करून. एकदाही मागे वळून पहायचं नाही...”
“आणि तू?”
“मी? मी पण सेम... इथून उठणार आणि सरळ चालत जाणार... मागे वळून न बघता...”
“वेडा आहेस का तू? आत्ता तर म्हणालास की आत्महत्या अलाऊड नाही तुमच्यामधे म्हणून.... आणी मग सरळ तू समुद्रामधे”
नदीम हसला. “येस, वीर. आता वेळ आली आहे साहिलने किनारा सोडायची. मी आत्महत्या करत नाहीये. मी फ़क्त चालत पाण्यात जातोय..”
“बट यु डोन्ट नो स्विमिंग, आणि तुझी कंडिशन.... नदीम... प्लीज! असला काही वेडेपणा करू नकोस.”
“वेडेपणा? हाऊ मेनी टाईम्स यु विश्ड? मी मरून का जात नाही असं कितीवेळेला वाटलं तुला? मग आज तुझी ती दुआ खरंच घड्तेय”

“नदीम. नो!” वीर ओरडला, “माझ्यामधे आणि सारामधे तू कितीही असलास, तरी मी तुला असं करू देणार नाही. हात जोडतो वाटलं तर आज माझं लग्न आहे आणि आज तू...”
“डोन्ट वरी, वीर. म्हणून तर मी घड्याळ बघतोय, करंटचा टाईम चेंज होइल, मी इथे सापडणार नाही. बॉडी किमान शंभरेक किमी तरी वाहील. दोन तीन दिवसांनी सापडेल. आय होप तोपर्यंत ईझीली ओळखू येणार नाही मी... तेव्हा सरस्वतीला तू सांगू शकशील. आज आता काहीच बोलायची गरज नाही तुला.”
“तुला मी इतका वाईट आणि दगडाच्या काळजाचा वाटलो का? तू इथे मरणाच्या गोष्टी करत असताना मी तिथे आनंदात लग्न लावून घेईन? आता ताबडतोब साराला इथे फोन करून बोलावतो. हा प्रश्न फ़क्त तुझ्या आणि माझ्या आयुष्याचा नाही, तिच्यापण आहे. तिलाच याचा डीसीजन घेऊ देत” वीरने खिशामधला मोबाईल काढला, नदीमने तो फोन लगेच हिसकावून घेतला.
“वेड मला नाही तुला लागलंय. काय बोलतोस तुला तरी समजतंय. सरस्वतीला इथे बोलावून तुला तुझ्याच आयुष्यात माती कालवायची आहे का? माझी लास्ट सर्जरी फ़ेल गेलीये. तसंही माझ्याकडे जास्त दिवस नाहीत...”
“मग जेव्हढे दिवस आहेत तेवढे.... आज आता या मरायच्या गोष्टी कशाला? असं करून तुला काहीही मिळणार नाहीच... कारण तू गेल्यावरपण सारा तुझ्यावरच प्रेम करत राहणार. तुझ्याच आठवणीत जगत राहणार.. मग काय फ़ायदा आहे?”
“क्लोजर वीर क्लोजर. तुला एक क्लोजर मिळेल. मी आता या जगात नाही, सरस्वतीला तुझ्यापासून दूर घेऊन जाणारं कुणीही या जगात नाही, याचं तुला क्लोजर मिळेल.”
“मला नकोच आहे. आज सारा माझ्यासोबत जशी आहे, तेवढ्यात मी खुश आहे. तू या जगात असल्याने अथवा नसल्याने तिच्या मनामधे असलेल्या तुझ्या प्रेमामधे अथवा माझ्या प्रेमामधे काहीच फ़रक पडत नाही”
“तुला पडत नसेल, पण मला पडतोय. एनीवेज, तुला प्रत्येक गोष्ट समजावत बसण्याइतका वेळ माझ्याकडे नाही. तुला पण लग्नासाठी रेडी व्हायचं आहे ना... यु गो, ऍन्ड लेट मी गो...”
“नदीम, नाही. माझं मन मला असलं काम कधीच करू देणार नाही... तू माझ्यासोबत आता चल, आपण शांतपणे एकदा बसून बोलू या... विचार करू या”
“त्यासाठीच तर तुला इथे बोलावलं होतं ना मी वीर? तुझ्याशी बोलायचं होतं, तुला भेटायचं होतं...”
“साराला?”
“तिला भेटलो तर मरायचा निश्चय परत डळमळेल माझा.”
“मी तुला मरू देत नाहीये नदीम. विसरलास का? आय ऍम युनि चॅम्पियन इन स्विमिंग. तुला समुद्रामधून बाहेर खेचत आणण्याइतका नक्कीच....”
“ते माहित आहे वीर. पण प्रश्न असा आहे की कशासाठी? कशासाठी तू मला वाचवणार? वाचवून तरी काय होइल?”
“आणि तू मरून तरी काय होइल? आज ना उद्या साराला खरं काय ते समजेल. आणि एका सेकंदासाठी तरी तुला असं वाटतं की ती मला माफ़ करेल?”
“मी तिच्यासाठी एक लेटर लिहून ठेवलंय. योग्य वेळी तिच्याकडे पोचतं केलं जाईल. शिवाय कंपनीमधले माझे शेअर्स पण तिच्या नावावर केलेत. खरं काय ते समजल्यावर ती कदाचित मला माफ़ करणार नाही, पण तुला करेल”
“नदीम, माझा फोन दे. लेट मी कॉल समवन. तू असला अघोरीपणा करू नकोस.”

“तुला साराची शपथ आहे वीर. तुझ्या साराची. एक पाऊलपण आता पुढे येऊ नकोस.” नदीम मागे सरकत म्हणाला. अचानक त्याने खिशातली गन काढली. “पुढे आलास तर बघ..”
“नदीम थांब प्लीज...”
“नाही वीर. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या आणि सरस्वतीच्या नात्यामधे कायम दरी राहणार. मला जाऊ देत, फ़क्त जाताना मला एक वचन दे की, तू माझ्या सरस्वतीला कधीही अंतर देणार नाहीस”
वीर पुढे येत म्हणाला, “नदीम, आता हा मूर्खपणा बास. माझा फोन दे. मी सरस्वतीला कधीही अंतर देणार नाही, पण म्हणून तुला मरू पण देणार नाही, प्लीज ऐक जरा माझं.” आता वीर खरोखर घाबरला होता. समुद्राच्या लाटा नदीमच्या पायापर्यंत पोचल्या होत्या. मागे वळून साराला अथवा राजनला जाऊन बोलावणं शक्य नव्हतं, वीरचा फोन नदीमने पाण्यात फ़ेकला होता, आणि पुढे जाऊन नदीमला धरणं शक्य नव्हतं. नदीम चांगला शूटर होता, त्याचा नेम सहजासहजी चुकला नसता.
काय करावं ते वीरला सुचेना. त्याने दूरवर आजूबाजूला पाहिलं. प्रायव्हेट बीच असल्याने त्या दोघांखेरीज कुणीही नव्हतं. देव करो आणि मला शोधायला म्हणून राजन अथवा कुणीतरी लगेच येऊ देत, वीर मनातच म्हणाला.
“मला मरायची भिती नाही, वीर. मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. ही गन मी उगाच आणली नाही. तू मला विरोध करशील याची कल्पना होती. फ़िजिकली तू मला आतापण खेचत घेऊन जाशील हे माहित आहे.. पण मी ही गन चालवणारच नाही असा तुझा समज असेल तर तो खोटा आहे... कारण, मला माझ्या मरण्यापेक्षा तुझं जगणं महत्त्वाचं वाटत नाहीये सध्या.”
“यु आर जस्ट रॅम्बलिंग. तू माझ्यासाठी नाही पण सारासाठी तरी...”
“नो, यु आर रॉंग. एक पाऊल जरी पुढे आलास तरी मी गोळी चालवेन... आय विल शूट ऑन युअर नीकॅप. मग समोर पडून माझं मरण तुला बघायला लागेल”” नदीमच्या डोळ्यातला थंडपणा वीरला जाणवला. “आत्ताच मागे फ़िर, आणि तुझ्या कॉटेजमधे जा. मागे वळून पाहू नकोस. माझी शेवटची रीक्वेस्ट आहे. करंटच्या टायमिंगमधे फ़रक पडला तर बॉडी इथेच मिळेल माझी. चालेल का?”
“नदीम...” वीरने परत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. पण नदीम अजून पाठी पाण्यात जात होता, आता त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं होतं.
वीर सावकाश मागे वळला. आता मागे फ़िरण्याव्यतीरीक्त त्याला दुसरा काहीही पर्याय दिसत नव्हता,
कॉटेजपर्यंत जाऊन मदत बोलावणे किंवा नदीम पाण्यात बुडायला लागल्यावर मागे धावत जाऊन त्याला वाचवायचा प्रयत्न करणे हे शक्य होतं. वीर मनातल्या मनात नदीम समुद्राच्या खार्‍या पाण्यात किती वेळ टिकू शकेल याचं गणित करत होता.

“साहिल आता त्याच्या समुद्राकडे कायमचा चाललाय, वीर. आता मला वाचवू नकोस” नदीमचा आवाज आला. “सरस्वतीला सांग, मी कायम तिच्यावर खूप प्रेम केलंय. तिच्याशिवाय जगणं शक्य नव्हतं आणि तिच्यासमोर मरणं शक्य नव्हतं..”
नदीमचा आवाज थांबला. वीर जागच्या जागी थबकला. “चालत रहा वीर, आय कॅन स्टिल शूट यु. मागे पाहू नकोस.” परत नदीमचा आवाज आला. वीर दोन पावलं पुढे चालला. त्याच्या मनामधे एक वेगळीच लढाई चालू होती. साहिलने मरावं ही तुझी खूप दिवसापासूनची इच्छा होतीच की, तो स्वत:शीच म्हणाला, मग आता का घाबरतोस? तो मृत्यू तुझ्या डोळ्यासमोर होतोय म्हणून? की आजवर तू कुणाचा मृत्यू पाहिलाच नाहीस म्हणून?
हे असं वागून नदीमने काय मिळवलं असेल.... कदाचित माझ्या मनामधे आयुष्यभराचा गिल्ट? इतके दिवस सारा आणि साहिलच्या प्रेमामधे आपण मधे आलो याची भावना होती, सारा परत कधीतरी साहिलकडे परत जाईल याची असुरक्षितता होती.. आणि आता? सारा फ़क्त माझीच होईल अशी भाबडी अपेक्षा आपण करतोय? जे आपलं कधी नव्हतंच त्याला आपलंच मानून चालण्याचा हा आपला वेगळा अट्टहास!
वीर चालत असताना परत थांबला. नदीमचा आवाज आला नाही, आपण कितीवेळ चालतोय? कॉटेजच्या अगदी जवळ पोचला होता. गर्र्कन त्याने मागे वळून पाहिलं. समोरचा समुद्र शांत हेलकावे खात होता. अगदी शांतपणे. कदाचित त्याला खूप उशीर झाला होता, किंवा कदाचित त्याला हा उशीर हवा होता.
पण मागे वळताच वीर ओरडला आणि जीवाच्या आकांताने त्या समुद्राकडे धावत सुटला. साहिलला जगवण्यासाठी किंवा.....
(समाप्त)

Monday, 2 December 2013

समुद्रकिनारा (भाग ९)

राजन हातातला कागद उभा राहून परत परत वाचत होता. वीर तिथेच खाली जमिनीवर पडला होता. एक तर समुद्राच्या अगदी जवळ असल्याने दुपारचं ऊन भाजत होतं आणि त्यात भर म्हणून एसी काम करत नव्हता. त्यामुळे गार फ़रशीवर पडून रहायला बरं वाटत होतं. सारा बाजूलाच सोफ़्यावर पडून पुस्तक वाचत होती. परवाच्या लग्नासाठी म्हणून आजच दोन तासापूर्वी हे तिघे इथे आले होते. बाकीचा स्टाफ़ आणि गेस्ट उद्या परवा येणार होते.

“एवढंच? याला तर दीड तास पण लागणार नाही...” शेवटी त्या कादगाकडे अविश्वासाने बघत राजन म्हणाला.

“दीड तास... राजन... दीड तास लागेल या सगळ्या विधींना!!” वीर हताशपणे उठून बसत म्हणाला. वीरचं बोलणं ऐकून साराला एकदम हसूच आलं.

“दोन दिवस राहिलेत लग्नाला, आणि याचं तोंड बघ.” ती राजनला म्हणाली, “जणू काही मारून मुटकून याला लग्न करायला लावतंय. तुला काय हे पिक्चरमधलं लग्न वाटलं का? एका सीनमधे संपायला!!”

“नाहीतर काय... मारून मुटकूनच तर चालू आहे सर्व. हेच करायचं आणि तेच करायचं... तो भटजी तासभर बडबडून गेला. त्याच्या सांगण्याप्रमाणे केलं तर दोन दिवस नुसतं लग्नच करत बसावं लागेल... आणि माणसं लग्न कशाला करतात? ते सात फ़ेरे काय आणि ते मांगमधे सिंदूर काय... पिक्चरमधे सीन असला तरी मला वैताग येतो.. आता तर काय हे रीअल लाईफ़मधे. सरळ रजिस्टर करूया म्हटलं तर ऐकत नाहीस. साधी सरळ गोष्ट क्लिष्ट करणं हे लोकांचं फ़ार आवडतं काम असतं बघ.”

“तुझंच आवडतं काम आहे ते..” सारा म्हणाली, “चारचौघांसारखं लग्न करायचं सोडून तुझे भलतेच नखरे. तेपण प्रत्येक गोष्टीत.”
“ते सर्व ठिक आहे, पण मी तुझ्या ऑर्डरप्रमाणे पन्नास-साठ गेस्ट बोलावले. ते सकाळी दहा वाजेपर्यंत इथे येणार, अकराला लग्न चालू होणार. हे तुझे विधी” हातातला कागद फ़डकवत राजन म्हणाला.

“दीड दोन तासांत संपणार, तीन चार वाजेपर्यंत लंच वगैरे.. मग नंतर?”

“नंतर काय? झालं की लग्न.. अजून काय करायला हवंय?”

“अरे, पण आपलं काय ठरलं होतं मागे, संध्याकाळी मीडीया इंटर ऍक्शन ठेवायचं म्हणून... मग त्याबद्दल...”

“हा काय मीडीयाचा प्रतिनिधी इथे” वीर साराकडे बघून डोळा मारत म्हणाला. “जी काय इंटरॅक्शन होइल ती यांच्याचसोबत.. तीपण प्रायव्हेटमधे...”

राजनने कपाळावर हात मारून घेतला. “वीर, प्लीज. परत एकदा रीक्वेस्ट करतो. वाटलं तर या लग्नानंतर मला नोकरीवरून काढ. पण असं करू नकोस. तुझ्यासाठी म्हणून हा ईव्हेंट अजिबात बाहेर कळू दिलेला नाही. तुझ्या सगळ्य स्टाफ़ला माझ्या लग्नाच्या ऍनिव्हर्सरीची पार्टी आहे, असं खोटं सांगून बोलावलंय. गेस्ट लोकांना ईव्हेंट आहे एवढंच सांगितलंय, पण आता हे अति होतंय, मला फ़क्त एक चान्स दे मीडीयासाठी. प्लीज....”

राजनकडे बघून वीरला खरंच हसू आलं. “राजन, एवढा डेस्परेट होऊ नकोस. एकदा मुंबईला गेलो की नेक्स्ट वीकमधे रसिका मोठं फ़ंक्शन ठेवतेय. तिथे वाट्टेल तेवढं बोलेन, फ़ोटोला पोझ देईन. पण या लग्नासाठी नाही.”

“अरे पण, रसिका ते सर्व तिच्या पीआरसाठी करतेय. वी नीड टू वर्क ऑन युअर पीआर. नेक्स्ट मंथमधे रीलीज आहे. त्याचा जरातरी विचार कर.. लग्नाची बातमी जितकी जमेल तितकी एन्कॅश करू. तुला इथे व्हेन्युवर मीडीया नको.. फ़ाईन! पण नंतर संध्याकाळी एक दहा पंधरा मिनिटं तरी दे प्लीज!”

“ओह गॉड, आय जस्ट हेट दिस लाईन बट स्टिल, राजन, टेक अ चिल पिल” सारा उठत म्हणाली, “वीरचं म्हणणं काही चूक आहे का? लग्न हा आमचा प्रायव्हेट मामला आहे, त्याला ठराविक ग्लॅमरस पद्धतीने केलंच पाहिजे का? तुला मीडीया बिट्स हवेत ना? मग ते मीडीयामधे उडवून दे ना.  त्यासाठी वीरने मीडीया इंटर ऍक्शन केलंच पाहिजे असं काही जरूरी नाही. आपण किती स्पिन्स केलेत ते आठव ना जरा” सारा वीरच्या केसांतून हात फ़िरवत म्हणाली, पण वीर त्याच्या हातातल्या मोबाईलमधे कसलातरी मेसेज वाचत होता. “त्यातले कितीतरी स्पिन्स वीरला अजून माहितीसुद्धा नाहीत” वीरचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं.

“पण आता काय स्पिन करू? लग्नाबद्दल मीडीयाला अजूनही अजिबात माहिती नाही. तुमच्या अफ़ेअरबद्दल माहित नाही. आणि तू कायम माझी फ़ेवरेट जर्नालिस्ट होतीस, आता तू नोकरी सोडलीस, मग मी काय स्पिन करू... तूच सांग मला...”

“सिंपल. आता दोन दिवस राहिलेत लग्नाला. वीर मुंबईमधे नाही, कुठेही शूटवर नाही. मग तो मद्रासला धनुकडे मनधरणी करायला गेलाय हा एक मस्त स्पिन आहे. दे ना कुणालातरी!”

“काय??” राजनऐवजी वीरच ओरडला. पहिल्यांदाच त्याचं लक्ष साराच्या बोलण्याकडे गेलं असावं. “हे काय नवीन भलतंच?”

“ऐक तू नीट. मीडीयावाले ताबडतोब धनुकडे याची चौकशी करणार. आणि तिथे तो धनुचा बाप तमिळमधे स्सॉलिड शिव्या घालणार. त्याच्या शिव्या म्हणजे प्रचंड भारी... दर वेळेला मीच कशाला ऐकून घेऊ? यावेळेला दुसर्‍या कुणालातरी ऐकू देत. पण तेवढं झालं की वीर तिथे नाही तर कुठे आहे हा प्रश्न आपोआप येणार. सगळीकडे चौकशी सुरू होणार. या सगळ्यांमधे एक दिवस आरामात जाईल. उद्या राजन परत एक स्पिन देइल की वीर.... वीर...” सारा विचार करत म्हणाली.

“वीर वेड्यांच्या हॉस्पिटलात आहे” वीर परत एकदा मोबाईलवरून नजर न हटवत म्हणाला. पण आता त्याचं अर्ध्याहून जास्त लक्ष साराच्या बोलण्याकडे होतं.  

“नको. त्यापेक्षा डीऍडिक्शन सेंटर कसं वाटेल?” राजन म्हणाला.

“अरे, काय इज्जत उतरवताय का?  दारू काय मी साधी बीअर पित नाही.... डीऍडिक्शन सेंटर काये?..”

“येस्स.. डीऍडिक्शन सेंटर साऊण्ड्स व्हेरी हॉलीवूडिश!! परफ़ेक्ट!” सारा जणू काही वीर तिथे नसल्यासारखीच म्हणाली, “मग त्यामधे परत एक दिवस जाईल. आरामात. कारण, वीर ऍडिक्ट नाही हे माहित आहे प्रत्येकाला, त्यामुळे ही स्टोरी यायच्या आधी कन्फ़र्मेशन तर होणारच आणि तसं बघायला गेलं तर या व्यसनमुक्तीच्या स्टोरीसाठी बहुतेक मीडीया कन्फ़र्मेशनसाठी एक सोर्स नक्की वापरणार!!”

“सारा व्ही के,  तू माझी होणारी बायको आहेस आणि तू लग्नाच्या आदल्या दिवशी मी दारूडा आहे असं लोकांना सांगणार?? कसले नमुने आहेत माझ्या अवतीभवती” पण वीरकडे आता सारा आणि राजन दोघांचंही लक्ष नव्हतं.

“हे बेस्ट राहिल सारा. आणि त्याच्या नेक्स्ट डेला लग्न झाल्यावर आपण लगेच अनाऊन्स करू. म्हणजे ही डीऍडिक्शन सेंटरवाली स्टोरी पाठी जाईल, आणि ताबडतोब लग्नाची स्टोरी पूढे येईल. फ़ुल्ल कव्हरेज मिळेल. बेस्ट काम होइल.”
“राजन, थिंक अबाऊट इट! लग्नाची नुसती स्टोरी येणार नाही. मीडीया विल बी सरप्राईज्ड टू फ़ाईन्ड आऊट अबाऊट मी. वीर कपूरने एका सिम्पल जर्नालिस्टशी इतक्या तडकाफ़डकी लग्न का केलं असेल? कुणाला न सांगता!!” सारा एकदम उत्साहात म्हणाली. “साला, राजन, सगळा मसाला तुला इथेच मिळेल.”

वीर परत एकदा आलेला मेसेज बघत होता. “म्हणजे?” त्याने वर न बघता विचारलं.

राजन फ़टाफ़ट हातातल्या कागदावर लिहून घेत होता. “सो व्हॉट डू यु से विल बी बेस्ट? ब्लॅकमेल ऑर प्रेग्नंट?” राजन म्हणाला. वीरच्या हातातला मोबाईल जवळजवळ खाली पडला.

“यार, मीच स्वत:ला व्हिलन का करू? नो ब्लॅकमेल. प्रेग्नंट!” सारा म्हणाली.

“सारा, इनफ़ इज इनफ़” वीरने उठून साराचे केस धरून ओढले. “असला मूर्खपणा प्लीज नकोय मला”

सारा ओरडली. “केस ओढू नकोस. नालायक, तुला मीडीया इंटर ऍक्शन नकोय ना? मग किमान राजनला त्याला हवे तसे  स्पिन्स करू देत ना... हेही नको... तेही नको... सगळीकडे फ़क्त तुझीच मर्जी चालायला हवी का? सुपरस्टार आहेस म्हणून!”

परत एकदा वीरचा मोबाईल वाजला. साराला काहीही उत्तर न देता वीरने सगळ्यांत आधी मोबाईलमधला मेसेज बघितला आणि त्याला उत्तर टाईप करता करता तो म्हणाला, ““राजन, परवाच्या दिवशी चार पाच वाजता एक छोटीशी प्रेस इंटरऍक्शन... छोटीशी इन द सेन्स, फ़क्त पंधरा मेनलाईन मीडीया. नो कॅमेरामेन. ओन्ली फोटोग्राफर्स” वीर शेवटी म्हणाला. “आणि प्लीज...प्लीज... हे असले काहीतरी फ़ालतू रूमर्स खरंच नकोत..हात जोडून पाया पडतो वाटलं तर...”

राजन हसला. “वीर, तुला बरोब्बर बायको मिळाली आहे. सारा, थॅंक्स!”

“हेच जर आधी तयार झाला असतास तर मला अणि राजनला एवढ्या कल्पना लढवायला लागल्या नसत्या. पण राजन, मज्जा यायची असले स्पिन्स करताना. आय ऍम गोइंग टू मिस माय वर्क!”

“मिस कशाला? आता तर तुम्ही पॉलिटिक्समधे काम करणार. तिथे तर याहून मोठेमोठे कारनामे करता येतील तुला... एखाद्याला आयुष्यातून उठवायला सांगायचं असेल तर ते काम तुझ्याकडेच द्यायला हवंय...” वीर मेसेज वाचत म्हणाला. “त्या नेत्राचं काय झालं...”

“अरे हां राजन, त्यावरून आठवलं, प्लीज कुणाला तरी सांग आणि त्या नेत्राला एखादा जॉब बघून दे. जर्नालिजममधे शक्य नाही येणं, पीआरमधे शोधतेय. तिथे नाही तर कोर्पोरेटमधे लावून दे. स्टोरीवर नजर चांगली होती तिची, पण चुकीच्या माणसाला फ़ोकस करायला गेली..  वाईट झालं पण तिचं”

“वाईट झालं?” वीरने विचारलं. “तिने तुझ्या घरी येऊन तुझे आणि माझे फोटो काढले आणि तिचं वाईट झालं... तू जर मला ते आधी सांगितलं असतं ना... तर...”

“तर तू बरंच काही केलं असतंस, पण मी केलं ना ते सर्व हॅन्डल. माझ्या गावी जाऊन माझ्याबद्दल चौकशी केल्यावर ती गोष्ट माझ्या कानापर्यंत येऊच शकणार नाही, असं तिला कसं काय वाटलं कुणास ठाऊक...”

“पण सारा, अजूनही तू ऑफ़िसमधे काय सांगितलंस आणि नेत्राकडून  सर्व ओरिजिनल हार्ड डिस्क कॅमेरा डिस्क सगळं कसं मिळवलंस? तुझ्या पेपरचा ओनर पण काही बोलत नाही” वीर म्हणाला.

“माझ्या पेपरचा ओनर म्हणजे नक्की कुणाशी बोललास तू? सतराशेसाठ लोकं आहेत त्यांच्या फ़ॅमिलीमधे. सर्वच ओनर. मीडीया मोगल आहेत ना...मग काय कुणीही येऊन बॉस बनू शकतं तिथे.” सारा हातातलं पुस्तक बंद करत म्हणाली. राजनला सगळा विषय नक्की कुठे चाललाय याचा अंदाज आल्याने त्याने वीरला साराच्या नकळत “गप्प बस प्लीज” अशी खूण केली. वीरला एक सेकंदभर काही समजलेच नाही, तरी त्याने लगेच विषय बदलला.

“रसिका येईल एका तासाभरात. राजन, सगळ्यात आधी एसीचं काम करवून घे.”

“आता येतोय तासाभरात तो माणूस, आणि सारा, तुझ्यासाठी महत्त्वाचं पाचनंतर ती मेंदीवाली पण येईल. डीझाईन्स वगैरे तुझ्या डीझायनरने सिलेक्ट करून ठेवली आहेत. फोटो काढायला मीच येईन. आज बाहेरच्या कुणालाही बोलावलं नाहीये. वीर, आर यु शुअर, तुला.....”

“मी माझ्या हातावर ते काहीही घाण काढून घेणार नाही... एकदा सांगितलं ना!!”

“ओके,” राजन वरमून म्हणाला. “जशी तुझी मर्जी. आज मीडीया इंटरॅक्शनला परमिशन दिलीस तेवढंच महत्त्वाचं मला.”

“इंटरॅक्शनचे पॉइन्ट्स लिहून घे आताच. नंतर कन्फ़्युजन नको, हे बोलायचं ठरलं होतं आणि नव्हतं म्हणून” वीर मोबाईलमधे टाईप करतच म्हणाला.

“बोल.” राजन परत एकदा कागद पेन घेऊन बसला.

“फ़र्स्ट, सारा व्ही के विल बी जॉइनिंग माय मदर्स साईड इन पॉलिटिक्स. त्याशिवाय ती अजून काही लिखाण वगैरे करेल, इथे तुला काय फ़ेकायचं ते तू फ़ेक. सिनेमा, नाटक, सीरीयल पण यावर रीटर्न प्रश्न नकोत. सेकंड, हेन्सफ़ोर्थ माय नेम वील बी.....”

“वीर, आय ऍम सॉरी.... पण हे खरंच तुला करायचं आहे का? खूप विचित्र वाटतं ऐकायलासुद्धा, सारा... तू तरी सांग त्याला...”

“मी काय सांगितलं नाही का? पण त्याचं नाव आहे, त्याचा डीसीजन... नशीब समज, त्याच्या आधीच्या आयडीयामधे कपूर पूर्णपणे ड्रॉप करायचं होतं त्याला. तेवढं तरी आता करत नाहीये.”
“सारा, पण तरी... याचा ईफ़ेक्ट खूप निगेटीव्ह होइल...”

“एक मिनिट,” वीर म्हणाला, “मी इथे हजर असताना परत तुमच्या दोघांची ही टेनिस मॅच नको. मी डॉक्युमेंटमधे नाव चेंज करतोय तर स्क्रीनवर पण नक्कीच. वीर सारा कपूर. ज्याला विचित्र वाटेल तो त्याचा प्रॉब्लेम. माझा नाही. आणि मला यावर कुठलेही क्वेश्चन्स नकोत.” वीर म्हणाला. “याहून जास्त मी काहीही बोलणार नाही. फ़िल्मचे प्रश्न असतील तर उत्तर देईन. क्लीअर?”

“ऍज यु विश! यामुळे तुझाच फ़ायदा होइल वीर. बरं, तुम्हाला चहा कॉफ़ी थंड काही सांगू का? मी आता माझ्या कॉटेजवर जातोय. रसिका मॅडम यायच्या आधी बरीच तयारी करायची आहे. मीडीया इन्व्हाईट, ट्रान्स्पोर्ट सगळं अरेंज करावं लागेल. चलो बाय!!”

“माझ्यासाठी जी कॉटेज बूक केली आहे ना?” वीर परत मोबाईलमधे टाईप करत म्हणाला. “त्याचा नंबर काय आहे?”

“बारा नंबर, इथून एकदम लास्ट रोमधली कॉटेज. पण तू आज रात्री इथेच राहणार आहेस ना? ती तुला फ़क्त रेडी होण्यासाठी म्हणून बूक केली आहे...”

“नाही, रात्री मी तिथेच राहीन.. मघाशी रसिकाचा फोन आला होता, तेव्हा म्हणाली, लग्नाआधी दोन दिवस तरी बायकोपासून लांब रहा म्हणून...आता तुमच्या सर्वांच्या मर्जीनुसार वागतोय, तर मग जरा तिच्यापण मनासारखं होऊ देत... रसिका यायच्या आधी कुणालातरी माझी बॅग आणि इतर सामान तिथे नेऊन ठेवायला सांग.”

“ठिक” म्हणून राजन निघून गेला. तो गेल्यावर शेवटी साराने विचारलं. “काय चाललंय तुझं मघापासून? इकडे माझ्याशी बोलता बोलता मोबाईलवर कुणाला मेसेज पाठवतोयस?”

“आहे एक असाच शाळेतला मित्र. खूप दिवसांनी इंडियामधे परत आलाय म्हणून मेसेज करतोय. महत्त्वाचं काही नाही.”

“बोल तू खोटं माझ्याशी!! मेसेज वाचलास की लगेच डीलीट करतोयस आणि सेंट मेसेज पण लगेच डीलीट करतो आहेस, ते इथे बसून दिसतंय मला. शाळेतला मित्रच आहे की एखादी जुनी गर्लफ़्रेंड?”

“मेसेज बॉक्स फ़ुल झालाय माझा,” वीर परत एकदा मोबाईल बघत म्हणाला. “एनीवेज, ते काय महत्त्वाचं नाही.” वीर हातातला मोबाईल बाजूला ठेवत म्हणाला. “सो, तुला जसं हवं होतं तसं लग्न.. एकदम धार्मिक पद्धतीने. आहेस ना आता तरी खुश?”

“मी तुला कधी म्हटलं की मी खुश नाही... तूच तडतडत असतोस सारखा. किती चिडतोस त्या राजनवर...आणि कसले विचित्र हट्ट असतात तुझे. आपली मर्जी सांभाळणारा माणूस आजूबाजूला असतो म्हणून आपण काय वाटेल ते वागायचं का? राजन तुझा नुसता स्टाफ़ नाही, मित्रपण आहे. फ़ॅमिली मेंबर आहे तुझा.. आणि तरी तू असा वागतोस? खरंच गरज आहे का असल्या गोष्टींची?”

“हाच प्रश्न मी तुला विचारला तर? काय गरज आहे या लग्नांची, या विधींची? एकत्र तर आपण इतके दिवस होतोच. उलट वेगळे होऊनपण दूर जाऊ शकलो नाही. परत आलोच एकमेकांकडे.. मग हे असले कृत्रिम उपचार कशाला? कोर्ट मॅरेज केलं तरी चाललं असतं ना..”

“वीर!!” सारा काही न बोलता खाली बघत बसली. “मला या नात्याला माझ्या दृष्टीने शिक्कामोर्तब करणं गरजेचं आहे...”

“मग जसा हा तुझा हट्ट आहे, तसे माझे पण काही हट्ट..” बोलता बोलता वीरने साराच्या ओठांवर ओठ टेकवले. “इतके दिवस कधी बापाचं नाव लावलंच नाही, आईचं नाव होतं कारण ती सांभाळत होती, आता ही आयुष्याची दोरी तुझ्या हाती... आता हे सगळं तुझंच.. तूच सांभाळशील ना मला?”

सारा काही बोलणार तेवढ्यात परत एकदा वीरचा मोबाईल वाजला. “आर यु शुअर, हा तुझा शाळेतला मित्रच आहे की अजून कुणी?” परत एकदा साराने विचारलं.

“तेरे सर की कसम, मिसेस. शाळेतला मित्रच आहे माझा, त्याला लग्नाला ये म्हणून बोलावतोय तर तो नाही म्हणतोय.” वीर हसत म्हणाला आणि तरीपण सारापासून लांब जाऊन त्याने तो मेसेज वाचला. मेसेज काय होता त्याला माहित नव्हतं, पण वाचताना त्याच्या चेहर्‍यावर आलेलं टेन्शन मात्र साराला स्पष्ट दिसत होतं. आणि स्वत:चं लग्न एवढं टॉप सीक्रेट ठेवणारा वीर कुठल्याही शाळकरी मित्राला नक्कीच बोलावणार नव्हता.
(क्रमश: )


Thursday, 28 November 2013

समुद्रकिनारा (भाग ८)

साराने परत एकदा मागे वळून पाहिलं. वीरची कार पुढे जाऊन थांबली होती. सारा गेटमधून आत गेली की नाही ते बघायला. तिला वाटलं त्याला परत फोन करावा, आणि त्याच्यासोबत इथून निघून जावं. पण आता तसं केलं तर वीर नक्की चिडला असता. साराने हिंमत करून गेट उघडलं. समोर निरनिराळ्या फ़ुलांची बाग होती. एकीकडे आंब्याचं, फ़णसाचं झाड होतं. बंगल्याकडे जाताना परत एकदा साराच्या मनामधे भिती दाटून आली. मागच्या वेळेला तिचं आणि वीरचं भांडण झालं होतं तेव्हा रसिका तिला वाट्टेल ते बोलली होती. वीरने लग्नाबद्दल तिला सांगितल्यावर तिने सगळं ऐकून घेतलं आणि नंतर शांतपणे “एक दिवस तुझ्या होणार्‍या बायकोला माझ्या पुण्याच्या घरी यायला सांग. एकटीच” एवढंच सांगितलं होतं. याआधी रसिकाला बर्‍याचदा भेटलेली असली तरी इथे पुण्याला पहिल्यांदाच आली होती.
पण सारा यायला तयारच नव्हती, वीर आला तरच ती येईन, असा तिचा हट्ट. कसंबसं वीरने तिला समजावलं. पुण्यापर्यंत तिच्या सोबत म्हणून तो आला, पण रसिकाच्या घरी मात्र तिने एकटीनेच जायला हवं होतं.
तिनं घाबरतच बंगल्याच्या दाराची बेल वाजवल्यावर जवळ जवळ पाच मिनिटांनी दरवाजा उघडला, समोर प्रसन्न चेहर्‍याने हसत रसिका उभी होती. पन्नाशीचं वय गाठूनदेखील तुकतुकीत आणि स्वच्छ चेहरा, तेजस्वी डोळे, आणि वीरसारखीच समोरच्याला आपल्या मनामधे नक्की काय चालू आहे ते एका क्षणात सांगणारी नजर. तिच्या हसर्‍या चेहर्‍याकडे पाहून साराची भीड जरा चेपली, रसिका तिला पाहून नक्कीच खुश होती.
“ये गं, घर सापडायला प्रॉब्लेम नाही ना झाला?” रसिकाने विचारलं. “पहिल्यांदाच आलीस ना तू इथे?”
“नाही, तसं लगेच मिळालं” सारा आत येत म्हणाली.
“बरंय, नाहीतर वीर इकडे वर्षातून एकदा येतो आणि नेमका रस्ता चुकतो.. मग मला फोन करून कसा येऊ म्हणून विचारत बसतो.... यावेळेला मात्र बरोबर घेऊन आला ना तुला?” रसिका म्हणाली. साराला क्षणभर काय बोलावं ते सुचेना.. “मला माहितेय गं, वीरसोबत आलीस तू. मी टेरेसवर होते, तेव्हा त्याची कार पाहिली. आधी खाली उतरलीस, गेटपर्यंत आलीस, मग परत गेलीस. मग वीरची आणि तुझी बोलाचाली झाली, मग परत गाडीत चढलीस, परत उतरलीस, मग तू इथे घरात येइपर्यंत तो त्या रस्त्याच्या कोपर्‍यावर उभा राहून बघत राहिला... मी टेरेसवरून सगळी गंमत बघत होते. कैदाशिणीच्या घरी चालल्यागत भेदरायला काय झालं तुला? आणि तो दीडशहाणा आला असता तरी मी काही नको म्हटलं नसतं”
“पण मॅम म्हणजे... ते असं झालं... की....” सारा गडबडली.
“एरवी चांगली पटपट बोलत असतेस की, मग आज का गाडी अशी अडखळतेय? मी म्हटलं होतं एकटीच ये म्हणून कारण तुझ्याशी थोड्या गप्पा मारायच्या होत्या.. वीर आला असता तर त्याच्या कौतुकातच सगळा वेळ गेला असता, आणि मला तुझ्याशी पोटभर बोलणं झालंच नसतं..” रसिका म्हणाली, “चहा घेतेस का? आणि ब्रेकफ़ास्टला काय बनवू ते सांग”
“मॅम, तुम्ही बनवणार? आय मीन...”
“आज सगळ्यांना सुट्टी दिलीये. हे निवडणुकीचं काम चालू झाल्यापासून निवांतपणा असा नाहीच. आज म्हटलं काही गडबड नको... निवांत राहू दोघी. तुझ्या वीरला सगळा स्वयंपाक मीच शिकवलाय, त्यामुळे घाबरू नकोस माझ्या कूकिंगला. आणि हे मॅम काय नवीन? आई म्हण सरळ मला. तो एक शहाणा मला सरळ रसिकाच म्हणतो हल्ली. संध्याकाळी तुमचे होणारे यजमान तुम्हाला घेऊन जाणार आहेत का?”
रसिकाच्या या बोलण्याचं साराला हसू आलं. “नाही, ते.. आय मी तो.. म्हणजे गेले लगेच मुंबईला परत. मी बसने जाईन.”
“घे फ़िरून बसने वगैरे. एकदा मिसेस सुपरस्टारचा शिक्का बसला की मग असं राजरोस फ़िरणं मुश्किल व्हायचं. बरोबर ना?”
“तसं काही नाही म्हणा....” सारा बोलता बोलता बंगल्याचं निरीक्षण करत होती. समोरच्या भिंतीवर वीरचे लहानपणापासूनचे सर्व फोटो लावलेले होते. बंगला खूप साधेपणाने तरी निगुतीने सजवला होता. हा रसिकाच्या आईवडलांचा आणि नंतर भावाचा बंगला, तो युएसला सेटल झाल्यवर वीरने दुप्पट किंमत घेऊन विकत घेतला, याच घरातून एकदा रसिकाला बाहेर काढलं होतं म्हणे.
थोडावेळ रसिका आणि ती इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिल्या. रसिकाने चहा आणि सोबत खायला म्हणून असंच काहीबाही आणून ठेवलं. गप्पा मारता मारता हळू सारापण मोकळेपणाने बोलायला लागली.
“मग लग्नाची तारीख ठरली की नाही तुमची?” रसिकाने किचनमधे कामाला सुरूवात करत म्हटलं.
“हो. पुढच्या महिन्यात सोळा. वीरने सांगितलं आहे ना तुम्हाला...”
“म्हणाला तो असंच काहीतरी. अगदी आठवणीने लग्नाला ये असंसुद्धा म्हणालाय बरं का..” रसिका हसत म्हणाली.
“आई, प्लीज. वीरने तुमच्याशी डिस्कस केल्याखेरीज इतका मोठा निर्णय घेणार नाही हे माहित आहे मला...”
“मागच्या वेळेला केली होती चर्चा, तेव्हाच मला काय वाटतं ते मी सांगितलं होतं, पण मग तुमचं लग्न मोडल्यावर.. लग्न नाही पण साखरपुडा मोडल्यावर इथेच आला होता दोन तीन दिवस. तेव्हापण बरंच काही बोलला. आतापण रोज फोन येतोच त्याचा.... पण यावेळेला मला तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणून तुला इथे बोलावलं. सरस्वती, तू एकदा माझ्या मुलाला लग्न करते असं सांगून मग नातं तोडलं होतंस. आठवतंय ना? परत तसंच करणार नाही हे कशावरून?”
“नाही, प्लीज. खरंच तसं काहीही नाही. मागच्याही वेळेला वीर आणि माझं भांडण झालं होतं हे खरं आहे.. पण त्याला सोडून द्यायचं वगैरे असलं काहीही नव्हतं, परिस्थितीच अशी होती की.....”
“हे बघ, सरस्वती, मी तुलाच काय पण जगात कुणालाही कसल्याही नातेसंबंधाबद्दल कसलाही सल्ला देऊ शकत नाही, एक वीर सोडला तर मला माझ्या जवळचं दुसरं कुणीही नाही, त्याला कसल्याही बाबतीत दुखावलेलं मला सहन होणार नाही.... म्हणून इतकंच सांगेन, की एकदा वीरचा हात धरशील तो सोडू नकोस. विनंती समज खरंतर”
“आई, एवढ्या चढ उतारानंतर आता कुठे आमचं नातं नीट सुरू होतंय. मला जर वीरचा हात सोडायचा असता तर खूप आधी सोडला असता मी.... पण मला ते खरंच करायचं नाही, वीरने जे माझ्यासाठी केलं ते मी कधीच् विसरू शकत...”
“मुली, अगं उपकाराच्या ओझ्याने प्रेमाची नाती बनत नसतात. प्रेम मनामधून यावं लागतं.”
“ही सगळी पुस्तकी भाषा आहे. असं खरंच जगात काहीही नसतं, प्रेम वगैरे ऐकायला ठिक आहे, प्रत्यक्षात समजा असलं तरीही... “
रसिका हसली. “याबाबतीत तुझे आणि माझे विचार खरंच जुळतात... फ़रक एवढाच आहे की माझ्या आयुष्यात कुणी आलंच नाही.. प्रेम वगैरे काय आहे ते सांगायला... आणि तुझ्या आयुष्यात वीर आहे..” एक सेकंदभर थांबून ती म्हणाली, “... साहिल आहे...”
सारा काही न बोलता शांत बसून राहिली.
“काय गं? गप्प का बसलीस?” रसिकाने दोनेक मिनिटांनी विचारलं. “पोहे चालतील ना तुला? की वीरसारखे तुझेपण काही डायेटचे नखरे आहेत?”
“मला टपरीवरचा वडापाव पण चालेल, पण पोहे बेस्ट आहेत... काही मदत करू का?”
“नको. बस निवांत.”
सारा किचनच्या जवळ एक खुर्ची घेऊन बसली “काय चिरायचं वगैरे असलं तर द्या”
“खरंच नको गं. काही मदत लागली तर सांगेन मी तुला.. बरं, महत्त्वाचं बोलू, आता लग्नाचं काय काय ठरलंय तुमच्या?”
“अलिबागजवळ एक छोटंसं गाव आहे. तिथे राजन एक बंगला बूक करतोय. सगळी मिळून पन्नास साठ माणसं असतील आणि साधं लग्न करायचं. माझी इच्छा आहे म्हणून वैदिक पद्धतीने पण लग्न. नाहीतर वीर रजिस्टर लग्नावर अडून बसला होता, थोडक्यात करणार सगळे विधी. कन्यादान सुधीर देशमुख करणार, नाव काय बदलणार ते वीरने सांगितलं का तुम्हाला?
“बोललाय तो मला. पर्सनली, मला ते खूप आवडलंय, इन फ़ॅक्ट तीच पद्धत बरोबर आहे, आणि तुझ्या घरचं कुणी येणार नाही?”

साराने मान हलवली. “तू बोलावणार तरी आहेस का?”
“कुणाला बोलावणार? काका मरून गेला. काकू आली तर येईल कदाचित पण चुलत भावंडांशी काही संपर्कच नाही, गावामधेच आहेत ते. शिकले नाहीत आणि गावगुंडागर्दीत रमलेत. लग्नाला बोलावलं तर स्टार गेझिंगसाठी येतील ते. माझ्यासाठी येणारं कुणी नाही...” सारा हळू आवाजात म्हणाली.
“आणि साहिल? तो नाही का येणार?” रसिकाने अचानक विचारलं. साराने चमकून पाहिलं.
“तो आला तर वीरला चालणार आहे का? साहिलच्या नावाने सुद्धा राग येतो त्याला. साहिलला मी केव्हाच माफ़ केलंय खरंतर.. पण वीर!! तो अजून काहीच विसरला नाही... तुम्हाला माहितच असेल तुमचा मुलगा किती पझेसिव्ह आहे ते” सारा विषय बदलत म्हणाली, “शिवाय हे लग्न करून माझ्यावर उपकारच करतोय तो” ती चेहर्‍यावर मुद्दाम हसू आणत म्हणाली. “काय करायचं नाही याचीच यादी मोठी झाली आतापर्यंत. जास्त लोक नको, म्युझिक नको, लाईटींग नको, चकमकीत ड्रेस नको, इंडस्ट्रीमधलं कुणी यायला नको, हनिमूनला जायला नको, मी काम करणं सोडायला नको...”
“काही चिंता करू नकोस, तुमच्या या लग्नाचा फ़ार्स एकदा संपला की मी इथे पुण्यात मोठी पार्टी करणार आहे. सगळी साग्रसंगीत आणि व्यवस्थित, माझ्यासमोर त्याची ही नको नकोची तुणतुणी काही चालणार नाहीत. तेव्हा करेन तुझी हवी तशी हौस. बरं आठवलं मला, तुला लग्नाच्या विधीसाठी कसली साडी घ्यायची आहे?”
“छान दिसेल अशी, मराठी पद्धतीने नेसतात ना.. तसली, असा इकडचा पदर तिकडे घेऊन आणि इथे अशी पिनप करतात तसली साडी...पण ते टिकल्या जरी लावलेली नको हां,.. वीर त्याला डिस्को लाईट्स म्हणतो..” रसिकाला अचानक हसू आलं “बरंच द्न्यान आहे गं तुला साडीबद्दल..”
“प्लीज चेष्टा करू नका...” साराचा आवाज थोडा दुखावलेला होता.

“ठिक आहे, आपण जाऊ दोघी शॉपिंगला, मला तुझ्यासाठी पैठणी घ्यायची आहे... दागिने पण मीच घेईन. तुला चालेल ना?” रसिका अजून हसत होती.
“साडीमधे वगैरे... मला खरंच त्यातलं काही जास्त माहिती नाही. कुणाकुणाचे जुने कपडे घालत माझं लहानपण गेलं त्यामुळे...”

“अगं, सरस्वती” रसिकाने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला, “खरंच, मी काही चेष्टा करत नाही बाळा तुझी. तुला जशी हवी असेल तशीच साडी आपण घेऊ की. तू पण असशीलच ना माझ्यासोबत? मला तरी काय गं, वीर एकटाच! त्याच्या सुखामधेच मला सुख. त्याने तुझ्यासारखी मुलगी निवडली याचंच मला अजूनही कौतुक आहे. ग्लॅमरमधल्या नुसत्या शोभेच्या कचकड्या बाहुल्यांपेक्षा तू... स्वत:चा निर्णय स्वत: घेणारी आणि त्याहून फ़ार महत्त्वाचं म्हणजे त्याच्या स्टारडमला न भुलणारी. चुकून तुला दुखावलं असेल तर आय ऍम सॉरी बेटा..”
“एवढी पण काही मी सेम्टीमेंटल नाहीये.” सारा अचानक हसत म्हणाली, “हे असं सॉरी वगैरे म्हणू नका, आणि अगदी खरं बघायला गेलं तर त्यामधे असं वाईट वगैरे वाटून घेण्यासारखं पण काही नाही. मला खरंच काही माहित नाही त्यामधे. फ़ॅशनच्या बाबतीत कंप्लीट ढ आहे मी... दागिन्यांवरून आठवलं... वीरने खरंतर तुम्हाला सांगू नको असं बजावलं आहे, पण...” साराने तिच्या बॅगमधून एक ज्वेलरी बॉक्स काढून रसिकाच्या हातात दिला. “इंडस्ट्रीच्या सुपरस्टारने हे म्हणे त्याच्या फ़ेवरेट जर्नालिस्टला लग्नानिमित्त दिलेले गिफ़्ट आहे.”
रसिकाने बॉक्स उघडून पाहिला, “रोहितने दिलं हे तुला?”
“हो! वीर तर घराबाहेर फ़ेकायला निघाला होता. पण मी म्हटलं राहू देत. तुम्ही जे म्हणाल तसं. खरंतर मला नेकलेस वगैरे आहे हे माहित नव्हतं. इंटरव्ह्युला गेले होते तेव्हा निघताना त्यांनी दिलं. फ़िल्म प्रमोशनचं मटेरीयल असेल म्हणून मी घेतलं. घरी आल्यावर बघितलं. सोबत एक छानशी नोटसुद्धा आहे.”
“बरं केलंस. वीरने तुला सांगितलं की नाही माहित नाही, पण गेले कित्येक दिवस रोहित वीरसोबत पॅच-अप करायच्या मार्गावर आहे. त्याला भेटतोय, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. वीर आहे तसाच अडेलतट्टू. पण रोहित... रोहितपण अक्षरश: त्याच्यापाठी लागलाय. इतक्या वर्षानंतर त्याला मुलाचा कळवळा आलाय...”
“मागे ते त्याला भेटले होते तेव्हा त्यानेच लग्नाचं सांगितलं. त्यांना असं वाटतंय की वीर बोलावेल म्हणून पण वीरने त्यांना लग्नाला बोलवायचं नाही असं स्पष्ट सांगितलंय.. पण मी इंटरव्युच्या वेळेला भेटले तेव्हा ते म्हणाले की आता तू माझी फ़ॅमीली मेंबर आहेस...”
“आता म्हणून काय उपयोग? जेव्हा म्हणायचं होतं आणि ज्याला म्हणायचं होतं… तेव्हा खरं महत्त्व होतं, नाही? ” रसिका म्हणाली.
सारा क्षणभर गप्प राहिली. “मी एक विचारू तुम्हाला? तुम्हाला कधीच असं वाटत नाही की मागे जाऊन आपला भूतकाळ बदलावा? एखादी अशी गोष्ट...”
“खूप वेळा वाटतं की गं. शेवटी मी पण माणूसच आहे, अगदी वीर लहान होता ना... तेव्हा तर रोज वाटायचं.. काय मिळालं मला? माझा हट्ट होता, म्हणून वीर जन्मला. माझा हट्ट होता, म्हणून मी इंडियात परत आले... पण या सगळ्यामधे माझ्या स्वत:च्या आयुष्याचं किती नुकसान झालं.... त्याचा ताळेबंद मांडायची आता वेळ नव्हे.. पण तरी...” रसिका थांबली.
“तुम्ही मागे पण एकदा या विषयावर बोलता बोलता थांबला होतात.. आज सांगा ना.. मला खरंच जाणून घ्यायचंय.. जेव्हा… जेव्हा साहिलने मला सोडलं तेव्हा तुमच्या एवढी तर होते मी वयाने..... मी तेव्हा जीव द्यायला निघाले होते... पण तुम्ही हा सगळा प्रवास एकटीने केलात. कुणाचीही काही मदत न घेता.. मला शक्य नाही झालं ते. वीरच्या कुबड्या घेऊनच जगतेय आजपण.”
“आणि मी कुणाच्या कुबड्या घेऊन जगतेय गं? वीर होता म्हणूनच... वीरचा जन्म होइपर्यंत मात्र मलाच खात्री नव्हती. तो अगदी तीन चार वर्षाचा होईपर्यंत दिशाहीनच होते मी.. काय करू आणि काय नाही. तिथे दूर लंडनमधे होते, इथल्या कुणाशीही संपर्क नव्हता. माझ्या आईवडलांनी तर बोलणं पण नव्हतं.... तिथे राहून कामं मिळालीच असती. इथे भांडण कुणाशी तर इंडस्ट्रीच्या राजकुमारासोबत. एका फ़टक्यात मी बाहेर फ़ेकले गेले… परत आले तरी सर्वांच्या नजरेत गुन्हेगार मीच. पण एकदा मनाशी निश्चय केला.. किती दिवस पळायचं आपण आपल्यापासूनच लांब. परत यायचं. वीरला इथेच लहानाचं मोठं करायचं, मग त्यासाठी काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल. पण कुणाची मदत घ्यायची नाही, आपण आणि आपला मुलगा एवढंच विश्व ठेवायचं… हिंदीचा रस्ता तर केव्हाच बंद झाला होता. मराठीमधे काही नाटकं आणि थोडेफ़ार साईड रोल्स मिळाले, सुदैवाने तेव्हा ते मालिका वगैरे चालू झाल्या आणि मग बरंच काम सुकर झालं... प्रश्न पैशाचा नव्हता, समाजाकडून सतत मिळणार्या अपमानाचा होता, तुला माहितीये मी तेव्हा जर कधी कुठल्या फ़ंक्शनला गेले तर सगळ्या बायका जाऊन आधी आपापल्या नवर्याच्या बाजूला जायच्या, जणू काही तिथल्या तिथे मी यांचे नवरे पळवणारच होते… आणि रोहित!! तो मात्र अशा ठिकाणी ताठ मानेने फ़िरायचा… मधेच कधीतरी जास्त प्यायला की मला फोन करून माफ़ी मागायचा. वीरच्या शिक्षणाचा खर्च करेन वगैरे काय काय बडबडायचा, पण मला त्याची कधीच गरज भासली नाही… मी स्वतंत्र होते, एकटी होते, तरीपण माझं आयुष्य परीपूर्ण होतं. पण हे सगळं झालं.. केलं.. कारण वीर माझ्यासोबत होता म्हणून. आज सुखाने जगतेय. वीर आयुष्यात सेटल झाला. सगळं सुंदर झालं... आता काहीच चिंता नाही. ही निवडणूक वगैरे सर्व आता मनाच्या समाधानाचे सोहळे....निवांत जगायचं आता.” रसिका म्हणाली, “आता तर काय, सासूबाई होणार... त्या सीरीयलमधे गोड गोड आईचा रोल करून वैतागली आहे. आता प्रत्यक्षात एकदम खडूस सासू म्हणूनच वागणार..” आणि हसली. हसता हसता डोळ्यांत आलेलं पाणी तिने हलकेच पुसलं.
साराचा पण आवाज भरून आला होता, “तुम्ही जितक्या खडूसपणे वागू शकाल त्याच्या दसपट तुमचा मुलगा खडूस आहे... आणि तुम्ही किती प्रयत्न कराल तरी तुम्हाला कजाग सासू वगैरे होणं जमणार नाही..पण आई, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात… मला तुमच्यासारखं व्हायला कधीच जमणार नाही!!..”
“असं का वाटतं गं तुला? माझ्यासारखीच तर आहेस की तू. जेव्हा वीरने मला तुझी ओळख करून दिली आणि तुझ्याबद्दल सर्व सांगितलं तेव्हापासून कित्येक वेळा तुझ्यामधे मला माझाच भास झालाय..”
“खरं?? माझ्यासाठी माझी वीरशी ओळख होण्याआधीपासून तुम्ही फ़ार मोठ्या रोल मॉडेल आहातच.. तुम्हाला एक विचारू?”
“आता अजून जर्नालिस्ट आहेस का? विचार ना काय विचारायचे आहे ते, मोकळेपणाने बोलत जा, वीरसारखं मनात ठेवू नकोस सर्व.”
“मी वीरशी अजून या संदर्भात बोलले नाही. पण मला तुमच्यासोबत निवडणुकीमधे काम करायला आवडेल. म्हणजे, तुमचा स्टाफ़ म्हणून. सेक्रेटरी, प्रेस सेक्रेटरी असं काहीही काम चालेल....”
“सरस्वती? हे ऐकूनच बरं वाटलं मला... अगं, तुझ्यासारखी हुशार आणि चलाख मुलगी मला माझ्या टीममधे आलेली आवडेल, तसंही तुला पॉलिटिक्समधे आधीपासून इंटरेस्ट होता ना? स्टाफ़मधे कशाला? माझ्यासोबतच काम कर. मी बोलेन वीरशी. त्यालापण आवडेल उलट...”
नंतर लग्नाच्या गोष्टी ठरवण्याऐवजी कितीवरी वेळ दोघीजणी बसून रसिकाच्या निवडणुकीबद्दलच चर्चा करत बसल्या.
प्रभात रोडकडून निघून वीर औंध रस्त्याने हायवेला आला, हिंजवडीच्या फ़्लाय ओव्हरखालून उजवीकडे मुंबईला जायला वळण्याऐवजी अचानक डावीकडे वळाला आणि चांदनी चौकापर्यंट उलटा जाऊन मुळ्शी रस्त्याला निघाला. त्याच्या आवडत्या निवांत जागेकडे.
कधीतरी शाळेमधे असताना तो इकडे आला होता, तेव्हापासून जी काय त्याला इथे आवडलं होतं.. पण ही जागा त्याला सोडून अजून कुणालाच माहित नव्हती.
गाडी साईडला थांबवून तो खाली उतरला. थंड मोकळी हवा एकदम येऊन बिलगली.
इथे यायचं म्हणजे निरूद्देश बसून रहायचं, स्वत:शीच विचार करायचा. पण आज वीर इथे नुसता विचार करायला आला नव्हता.
त्याने कारच्या डिकीमधून सरस्वतीची डायर्‍यांचं बाड बाहेर काढलं. मागच्याच महिन्यामधे साराने त्याला हे पब्लिश करू का असं विचारलं होतं आणि वीरला ही डायरी कथा म्हणून किंवा सत्य म्हणून कुणाहीपुढे आणायची काहीही इच्छा नव्हती. त्याने सावकाशपणे खिशातला लाईटर काढला आणि डायरीचं एक एक पान जाळायला सुरूवात केली.

सर्वात पहिलं त्याने जे पान जाळलं त्यावर दोनच ओळी होत्या. अगदी गिचमिड अक्षरामधे आणि डोळ्यातल्या पाण्यांनी चिंब झालेल्या...
“साहिल, तू हे जग सोडून गेलास, तर मी कशाला जगू? मी पण तुझ्यापाठोपाठ येत आहे..”

भुरूभुरू जळत त्या पानाची राख होऊन गेली. असंच एक एक करत प्रत्येक पान जाळत वीर तिथे उभा राहिला.
फ़क्त एक पान सोडून!! ते पान जे साराच्या किंवा साहिलच्या आयुष्यात कदाचित खास नसेल.. पण वीरच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं पान!!


आज कितीतरी दिवसांनी डायरी लिहितेय. दिवसांनी इज रॉंग. महिन्यांनी लिहितेय. पण आज लिहिणार आहे, या रात्रीमधला एकही क्षण माझ्या स्मृतींमधे पुसट होण्याआधी मी हे लिहून ठेवणार आहे. जे मला आठवत नाही ते अर्थातच इतरांनी सांगितलंय मला... आजपासून पाच वर्षांनी मी कुठे असेन काय असेन माहित नाही... पण तरी ही रात्र खूप स्पेशल!

त्यादिवशी डायरीमधे एकच शेवटचं वाक्य लिहिलं आणि घराबाहेर पडले. कुठे जायचं, कसं जायचं आणि काय करायचं काहीही ठरवलं नव्हतं. आयुष्य संपवणे ही एकच गोष्ट लक्षात होती. रात्रीचे अडीच तीन वाजून गेले असावेत. घरापासून निघून चालत चालत कार्टर रोडवरून जात होते. असंच पुढे चालत जाऊन समुद्रामधेच जीव द्यायचा होता... आता आठवलं तरी हसू येतंय.. पण तेव्हा खरंच किती सीरीयस झाले होते. मरायचंच. मरायचंच.


आदल्या दिवशी दुपारी फोन आला होता. साहिल गेला. कायमचा. त्या आधी जवळ जवळ सहा महिने आधी त्याने मला शांतपणे “मी तुझ्या आयुष्यातून कायमचा जात आहे, कारण आता आपलं नातं संपलं” हे सांगितलं होतंच. आणि तितक्याच शांतपणे तो निघूनही गेला होता, माझा जराही विचार न करता. नातं संपलं तरी साहिल होता. आता तो साहिलच नाही. इतक्या दिवसांत तो कुठे आहे आणि कसा आहे तेपण मला माहित नव्हतं. काल फोनवरून समजलं तो गेला, ज्याच्यासोबत आयुष्याची इतकी स्वप्नं रंगवली तो गेला... मग कशाला आपण तरी जगायचं?

रस्त्याने चालता चालता मधेच एका हवालदाराने टोकलं. त्याला खिश्यातलं प्रेस कार्ड दाखवलं. “एवढ्या रात्री एकट्यानं फ़िरू नका, दिवस चांगले नाहीत” एवढंच म्हणून तो गेला. दिवस-रात्र काहीच चांगलं नाही. म्हणून तर मरतेय.
कार्टर रोडला येऊन एका टपरीवर सिगरेट घेतली. “कुछ और माल है क्या?” त्याला विचारलं. इतक्या रात्री दुकान उघडून बसलाय म्हणजे याच्याकडे नक्कीच काहीतरी नशापानी असणार.
“क्या मॅडम? लेट हो गया आपको. थोडी देर पहले आते तो एक नंबरका माल दे देता” तो लोचटपणे हसत म्हणाला. खोटारडा साला!! 


“देना है तो दे, नही तो भडवे और भी है इस एरीया मे” त्या दिवशी मी बार्गेनिंगच्या मूडमधे नक्कीच नव्हते. जिथे लाईफ़च संपवायचं तिथे पैशाची काय चिंता. तशीपण मी तेव्हाही आणि आजही काय गर्दुली नव्हते. अधून मधून कधीतरी मजा म्हणून पार्टीमधे वगैरे तेवढ्यापुरतंच. पण आज नशा हवीहवीशी वाटत होती. मनामधे सतत येणारा साहिलचा चेहरा कुठेतरी हरवून टाकायचा होता. 

“गांजा है, अच्छी क्वालीटी नही है! चलेगा?” मी पुढे गेल्यावर त्याने विचारलं. आपल्याला आज काहीही चालेल, पळेल, उड्या मारेल.

मरायचं तर आहे.
रस्ता पूर्ण सुनसान होता. अजून दहा मिनीटे चालायचं आणि समुद्रात उडी मारून जीव द्यायचा. सिम्पल प्लान.
चालताना अचानक बाजूने एक काळी गाडी जोरात गेली. काळीच गाडी आहे ते आता माहित आहे म्हणून पण तेव्हा दिसली नाही. पुढे गेलेली गाडी अचानक थांबली आणि रीव्हर्समधे मागे आली.
“सरस्वती?” गाडीची खिडकी खाली करत आवाज आला. “इतक्या रात्री इथे?”
गाडीमधे कुणीतरी ओळखीचं होतं बहुतेक, कोण ते आठवेना. “मरायला चाल्लेय. निघाले तेव्हा दुपार होती. पण वाटेत रात्र झाली”
“इज शी ऑन हाय?” पॅसेंजर सीटवरून आवाज आला. 


“हॅलो, वीर कपूर. हाऊ आर यु? आपकी नयी फ़िल्म फ़्लॉप हो गयी. सुनके बहोत बुरा लगा, ओके, चलो बाय. मुझे जाके मरना है. वेरी आय एम पी वर्क!! ” मी पुढे चालत निघाले. वीर आणि राजन दोघे एकमेकांशी बोलत राहिले. राजनच्या मते, मला असं रस्त्यावर सोडून जाणं चुकीचं होतं, पण तो मला त्याच्या घरी घेऊन जाऊ शकला नसता, कारण मागच्याच महिन्यात कुठल्या तरी एका लेनी नावाच्या मुलीशी – तीच मुलगी आता वीरची मेकपमन आहे. सॉरी मेकपवूमन किंवा मेकपगर्ल. तिच्याशी लफ़डं केल्यावरून त्याची बायको त्याला सोडून गेली होती, आणि आता परत तो अशी नशेतली एखादी मुलगी घरी घेऊन गेला असता तर अजूनच प्रॉब्लेम झाला असता. वीरला मला घरी न्यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण मीडीयामधल्या एका मुलीने याचा फ़ायदा घेऊन त्याच्यावर आरोप केले असते तर!! त्याचा पॉईन्ट चूक नव्हता.

पाचेक मिनिटे त्यांची चर्चा चालू असेपर्यंत मी सरळ चालत निघून गेले. मला काय पर्वा होती? पण नक्की काय ठरलं दोघांमधे मला माहित नाही, पण वीरने मला गाडीत बसायला सांगितलं.
“नो थॅंक्स. मला इथून पुढे जायचंय.. आय नीड टू डाय. लाईक टूडे, लाईक नाऊ! साहिल इज डेड, ही इज ऑलरेडी डेड, माय हजबंड, सॉरी, एक्स हजबंड इज डेड... आणि मला त्याच्यासोबत जायचंय. जर मी आता मेले नाही, तर तो कदाचित पुढे निघून जाईल... समजतंय का मी काय म्हणतेय ते? लेट मी गो!”


इतका वेळ राजनने आणि वीरने मला पोलिस स्टेशनवर सोडायचं ठरवलं होतं, पण माझी अवस्था बघून मला दोघे वीरच्या फ़्लॅटवर घेऊन गेले. राजन आम्हाला सोडून लगेच निघून गेला, रात्रभर घराबाहेर राहून त्याला चालणार नव्हतं. वीर आणि मी दोघंच होतो. वीर आणि मी त्याआधी कितीतरी वेळा पार्टीमधे, प्रेस कॉनमधे भेटलो होतो. त्याचे कित्येक एक्स्क्लुझीव इंटरव्ह्यु पण मी केले होते, पण तेवढीच ओळख होती तेव्हा. 

लिफ़्टमधून त्याच्या फ़्लॅटवर गेल्यावरपण “वीर, लेट मी गो. मला मरायचं आहे” एकच वाक्य मी पुन्हा पुन्हा म्हणत राहिले. वीरने घरात गेल्या गेल्या बाल्कनीच्या दरवाज्याला कुलूप घातलं आणि माझ्यासाठी एक भलंमोठं सॅंडविच करून आणलं. सोबत वीर स्पेशल कॉफ़ी.

“का मरायचं आहे तुला?” त्याने मला हळूच विचारलं.
आणि मी त्याला सगळं सांगितलं. माझ्याबद्दल, आईबद्दल, उस्मानबद्दल, काकाबद्दल, साहिलबद्दल आणि साहिलबद्दल... रात्रभर मी बोलत राहिले. झोपणं शक्यच नव्हतं.
रात्रभर वीर फ़क्त मला ऐकत राहिला.
आज या घटनेला आठ महिने झाले. आठ महिने. वीर त्या दिवसापासून माझ्यासोबत आहे. त्याने माझ्यासाठी ग्रिफ़ काऊन्सिलर अरेंज केला. माझं मन रमावं म्हणून माझ्यासोबत गोव्याला फ़िरायला आला. तिथल्या बीचेसवर फ़िरताना मला आजही त्या रात्रीचा माझा मरण्याचा निश्चय आठवतो. पण आता मला मरायचं नाही...


नक्की कशासाठी माहित नाही, पण आता हळूहळू जाणवतंय. हे नुसतं आकर्षण नाही. त्याहून जास्त आहे. आधीची नुसती प्रोफ़ेशनल ओळख होती, आता ती तेवढीच राहिली नाही. वीर कपूर इज माय बॉयफ़्रेंड. मी आजवर हे कुणालाही सांगितलं नाही, आज पहिल्यांदा लिहितेय. आय ऍम इन लव्ह विथ हिम. साहिल माझ्यासाठी आयुष्याचा आधार होता.. पण वीर!! वीर माझा हात हातात घेऊन सोबत चालणारा सखा आहे.

वीर माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. साहिलपेक्षाही.