गेल्या महिन्यामधे
कोर्सेरावरचा “मानवी इतिहास” हा ऑनलाईन कोर्स केला, त्यामधे मानवाची उत्क्रांती
कशी होत गेली, तो भटक्या प्राण्यांपासून एका ठिकाणी राहून शेती करणारा प्राणी कसा
बनत गेला याचा सगळा रंजक इतिहास होता. या इतिहासाकडे पाहताना लक्षात आलं,
माझेदेखील पूर्वज (म्हणजे माझ्या आज्याचा आज्याचा आज्याचा आजा वगैरे वगैरे) कधीतरी
या संस्कृतीचा भाग असणार. माझ्या एखाद्या पूर्वजन्मामधे या आदिम संस्कृतीमधे मी
नक्की काय करत असेन वगैरे बरेच प्रश्न मला पडत असतात. त्यातच हाती आलं ते समकालीन
प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं एम डी रामटेके यांचं आम्ही माडिया हे पुस्तक.
रामटेके यांची
प्रत्यक्ष भेट कधीही झाली नसली तरी आंतरजाल, फ़ेसबूक, त्यांचा ब्लॉग यामुळे आमची व्हर्चुअल
ओळख आहे. “आम्ही माडिया” हे त्यांनी लिहिलेलं पहिलंच पुस्तक समकालीन प्रकाशनाने
प्रसिद्ध केले आहे. सोशल मीडीयामधे रामटेकेंनी अधूनमधून सांगितलेले त्यांच्या
आयुष्यातले काही किस्से वाचून हे पुस्तक वाचण्यासाठी “मस्ट” या यादीत होतंच. तसंही आपल्याला आदिवासी संस्कृती म्हटलं की
डोळ्यासमोर काही टिपिकल इमेजेस येतात. जंगलातलं वास्तव्य, शिकारीवर अवलंबून
असणारी, निसर्गपूजक आणि बॉलीवूडवाल्यांचा आवडता डोक्यावर पिसे खोवून केलेला आदिवासी
डान्स. आदिवासी म्हणजे नक्की कोण? आपल्यासारखीच काही माणसं, जी जगण्यासाठी आजही
निसर्गावर जास्त प्रमाणावर अवलंबून आहेत. ज्यांची संस्कृती आणी आपली संस्कृती यामधे जमीन अस्मानाचा फ़रक आहे याहून जास्त काही माहित नव्हतं.
आम्ही माडिया पुस्तक
वाचताना माडिया या गोंडवनातील आदिवासींच्या जीवनशैलीची एक वेगळीच ओळख होत जाते.
रामटेके हे स्वत: या आदिवासी समाजाचा हिस्सा आहेत, त्यामुळे हे लिखाण “अभ्यासक” या
भूमिकेतून न मांडता, रामटेके यांच्या स्वत:च्या आयुष्यातील काही प्रसंग, काही
दंतकथा आणि काही पद्धतींची माहिती अशा स्वरूपात आहे. मुळात या आदिम भावजीवनाचं
विश्वच वेगळं आहे, श्रद्धा-अंधश्रद्धा वेगळ्या आहेत. कुठल्याही आदिम संस्कृतीचे
असतात तसे याही संस्कृतीचे काही प्रमुख रीतीरिवाज आहेत. त्यातले कितीतरी रिवाज
आपल्याला गमतीशीर वाटतात, काही क्रूर वाटतात तर काही रिवाज समजल्यावर तथाकथित
भारतीय संस्कृतीरक्षकांची प्रतिक्रिया काय असेल असा गमतीदार प्रश्नदेखील पडतो. गेल्या
शतकभरामधे उदयाला आलेल्या ग्लोबलायझेशनच्या परिणामांमुळे इतकी शतके वेगळी राहिलेली
जगभरातली आदिम संस्कृतीदेखील बदलत आहे, तसेच या आदिवासींच्या जीवनशैलीमधे मूलभूत बदल
होत आहेत. त्यांचे जगणं बदलत आहे, शतकांपूर्वीपासून असलेल्या जुन्या पद्धती
सहजासहजी सोडल्या जात आहेत. नवीन
विचारांचा स्वीकार करून मुख्यधारेमधे येण्याचा प्रयत्न केला आहे. पण या सर्व
बदलांमधे हजारो वर्षांपासून जपून ठेवलेला अनोखा सांस्कृतिक वारसादेखील नाहीसा होत
आहे, याची खंतदेखील त्यांना आहे. रामटेके यांचे आम्ही माडिया हे पुस्तक अशा
स्थित्यंतरामधे असलेल्या समाजाचे एक उत्तम डॉक्युमेंटेशन करते. जिथे आजही
जगण्यासाठी जंगलामधे जाऊन शिकार करावी लागते, जिथे आजही पुटुल सारख्या नागरी
जीवनाला न पटणार्या पण माडीया समाजाच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाच्या पद्धती
चालू आहेत असा समाज जेव्हा बदलतो तेव्हा कशापद्धतीने बदलतो हे वाचणं खूप रोचक आहे.
ऐंशीच्या दशकामधे शाळा म्हणजे काय ते समजलेला हा समाज आज विविध क्षेत्रामधे प्रगती
करत आहे, शिकत आहे, बाहेर पडून जग अनुभवतो आहे, आणि तसंच नक्षलवादसारख्या समस्या
झेलतो आहे. पण काहीही असलं तरी हा समाज निराश आणि हताश असा मात्र अजिबात नाही.
सर्वसाधारण मराठी
माणसाला माडिया संस्कृतीची माहिती आहे ती प्रकाश आमटे यांनी चालवलेल्या लोकबिरादरी
या प्रकल्पामुळे. डॉ. प्रकाश आमटे यांनी केलेल्या नि:स्पूह कार्यामुळे या
आदिवासांच्या आरोग्य, शिक्षण या बाबींमधे विकास झालेला आहेच त्याशिवाय मुख्य
म्हणजे त्यांच्या परीघातल्या वर्तुळाबाहेर पडून हे आदिवासी जग पहायला शिकत आहेत.
ज्या गावात आजही बस नाही, टेलीफोन नाही अशा गावातल्या एका तरूणाने जिद्दीने शिकून
मल्टिनॆशनल कंपनीमधे नोकरी करतो, आणि त्याच्याच नजरेमधून दिसलेलं हे आदिवासी
आयुष्य आपल्यासमोर मांडतो. इथल्या कित्येक पद्धती, श्रद्धा-समजूती यांचे मिश्किल
शैलीमधे केलेले खुमासदार किस्से खरंच भन्नाट आहेत. त्यातही मेंदूला गोळी लागलेला
वाघ गुरांच्या कळपात येऊन राहतो हा किस्सा अक्षरश: अविश्वसनीय आहे. अख्ख्या
गावामधे आलेली भितीची लाट माझ्यासारखी शहरी मुलगी कल्पनादेखील करू शकत नाहीपण
तरीही वाचताना मनापासून हसू मात्र येतं. या पूर्ण गोष्टीवर एक उत्तम ऍनिमेटेड
सिनेमा तयार होऊ शकतो. डिस्नेवाले, ऐकत आहेत का?
गावातल्या बहुतेक
पद्धती या अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ या मताने आजवर चालत आलेल्या आहेत,
माडीयांची गोत्रपद्धती घरामधे किती देव यावरून ठरते. त्यावरून नाती ठरवली जातात.
तसंच, पुटुल ही पद्धत लग्नाची पद्धत मात्र खरंच खूप विचित्र आहे, मुलीच्या मुलीला
सून करून आणायची पद्धत बर्याच समाजांमधे दिसून येते- पण तिथे हो/नाही म्हणण्याचा
पर्याय असतो. माडीयांमधे मात्र हा हक्क हो पुटुल नावाने ओळखला जातो आणि तो नाकारता
येत नाही. त्यामुळे कित्येकदा विजोड वयाची जोडपी (तीदेखील सख्खी आते मामे भावंड)
अशी दिसतात. नवरी नवर्यापेक्षा दहा बारा वर्षापेक्षा मोठी असू शकते, तरीही तिला
ते लग्न करावंच लागतं. मात्र, अविवाहित तरूण तरूणींना इथे लैंगिक स्वातंत्र्य
असते, तसेच लग्नाआधी गर्भार होणे ही काही सामाजिक आपत्ती वगैरे मानली जात नाही.
माडिया आदिवासींच्या विवाह पद्धतीचं अजून एक वैशिष्ट्य “लोन आळियना” (घरात घुसलेली स्त्री) वाचताना मला वेगळ्याच
समाजातली पण अशीच मनमानीपणाने जगणारी गोनींदांची चिंगी डोळ्यासमोर येत होती. अशी
स्त्री घरात घुसली तर मात्र तिच्या नवयाला पुटूल हक्क उपस्थित झाला तर त्याचे पैसे द्यावे लागतात. रैके तेंडणा ही
मात्र थोडी विचित्र पद्धत, माडियांमधे विवाहित स्त्रीला पोलके घालायची पद्धत नाही.
लग्नाच्या विधीमधे पोलके उतरवण्याचा विधी असतो तोच हा रैके तेंडणा. विवाहित मुलीने
उघड्या छातीने वावरणं म्हणजे शालीनता असे हा समाज मानत असला तरी सध्या शाळेमधे
शिकलेल्या मुली या पद्धतीला विरोध करत आहेत. अशीच विरोधामधे उभी राहिलेली कुम्मे
जेव्हा गावामधे पोलकं घालते, आणि तिचे पाहून इतर विवाहित स्त्रियादेखील पोलके
घालायला लागतात, तेव्हा एक लढा जिंकला जातो. माडिया असो वा दिल्लीमधली मुलगी तिला
“आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागू द्या” यासाठी लढा हा द्यावाच लागतो हेच खरं. याच
प्रकरणातला “ढगल्या” हा भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. माडियांमधे “लग्न” हा विधी
वेगळा, आणि स्त्री-पुरूषाचं एकत्र सहजीवन वेगळं. त्यामुळे दोन तीन मुलं
झाल्यावरदेखील लग्न केल्याचे किस्से वाचून मजा वाटते.
रामटेके यांची भाषा
अगदी मिश्किल आहे, अगदी दु:खी अथवा वाईट प्रसंगाचं वर्णन करतानादेखील त्यांच्या स्वभावातला
मिश्किलपणा जाणवत राहतो. माडियांच्या कित्येक श्रद्धा समजुती सांगताना रामटेके “माझ्या या गोष्टींवर विश्वास नाही”
अशी सरळ कबूली देतात. पण माडीयांच्या अंधश्रद्धांना तर्काची कसोटी लावताना कुठेही
ते चॆष्टा अथवा टिंगल करत नाहीत. या श्रद्धा समजुती हजारो वर्षापासून चालत आलेल्या
असूनदेखील आता माडीयांचा त्याबद्दलचा दृष्टीकोन हळूहळू बदलत असल्याचेही नमूद
करतात.
या पुस्तकाच्या बाबतीत
माझा छोटासा का होइना एक अपेक्षाभंग मात्र झाला. आम्ही माडिया या पुस्तकामधे
माडिया संस्कृतीबद्दल जी माहिती मिळते ती लेखकाच्या अगदी फ़र्स्ट हॅन्ड अनुभवातून
आलेली आहे, तरीही मधेच लेखक नुसती माहिती देत जातो ते प्रचंड खटकते. लेखकाकडे
सांगण्यासारखे प्रचंड अनुभव असताना अधून मधून “आमच्यात अशी अशी पद्धत आहे” वगैरे
रटाळ माहिती येत जाते. लेखकाला या आदिवासी संस्कृतीमधून बाहेर आल्यावर बसलेले काही
कल्चरल शॉक्स आणि त्यातले काही किस्से-खास करून आपल्या नागरी जीवनातल्या दांभिक
वागणुकीचे- ऐकल्यावर पुस्तकामधे देखील असे
काही असेल अशी फ़ार अपेक्षा होती, ती मात्र पूर्ण झाली नाही. मधेच लेखकाच्या
आयुष्यातले काही प्रसंग आणि मधेच नुसती माहिती देणारी प्रकरणं यामुळे वाचताना मधेच
फ़ार कंटाळा येतो.
हा एकमेव थोडासा
नकारात्मक भाग सोडला तरीही एकंदर पुस्तक वाचण्यासाठी मी नक्कीच रेकमेंड करेन. माडिया
संस्कृतीच्या जगण्याची, झुंजण्याची आणि तरीही आलेला प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याचा
प्रयत्न करणार्या माडियांचं आयुष्य समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी
पडेल असे आहे.
No comments:
Post a Comment