Monday, 2 December 2013

समुद्रकिनारा (भाग ९)

राजन हातातला कागद उभा राहून परत परत वाचत होता. वीर तिथेच खाली जमिनीवर पडला होता. एक तर समुद्राच्या अगदी जवळ असल्याने दुपारचं ऊन भाजत होतं आणि त्यात भर म्हणून एसी काम करत नव्हता. त्यामुळे गार फ़रशीवर पडून रहायला बरं वाटत होतं. सारा बाजूलाच सोफ़्यावर पडून पुस्तक वाचत होती. परवाच्या लग्नासाठी म्हणून आजच दोन तासापूर्वी हे तिघे इथे आले होते. बाकीचा स्टाफ़ आणि गेस्ट उद्या परवा येणार होते.

“एवढंच? याला तर दीड तास पण लागणार नाही...” शेवटी त्या कादगाकडे अविश्वासाने बघत राजन म्हणाला.

“दीड तास... राजन... दीड तास लागेल या सगळ्या विधींना!!” वीर हताशपणे उठून बसत म्हणाला. वीरचं बोलणं ऐकून साराला एकदम हसूच आलं.

“दोन दिवस राहिलेत लग्नाला, आणि याचं तोंड बघ.” ती राजनला म्हणाली, “जणू काही मारून मुटकून याला लग्न करायला लावतंय. तुला काय हे पिक्चरमधलं लग्न वाटलं का? एका सीनमधे संपायला!!”

“नाहीतर काय... मारून मुटकूनच तर चालू आहे सर्व. हेच करायचं आणि तेच करायचं... तो भटजी तासभर बडबडून गेला. त्याच्या सांगण्याप्रमाणे केलं तर दोन दिवस नुसतं लग्नच करत बसावं लागेल... आणि माणसं लग्न कशाला करतात? ते सात फ़ेरे काय आणि ते मांगमधे सिंदूर काय... पिक्चरमधे सीन असला तरी मला वैताग येतो.. आता तर काय हे रीअल लाईफ़मधे. सरळ रजिस्टर करूया म्हटलं तर ऐकत नाहीस. साधी सरळ गोष्ट क्लिष्ट करणं हे लोकांचं फ़ार आवडतं काम असतं बघ.”

“तुझंच आवडतं काम आहे ते..” सारा म्हणाली, “चारचौघांसारखं लग्न करायचं सोडून तुझे भलतेच नखरे. तेपण प्रत्येक गोष्टीत.”
“ते सर्व ठिक आहे, पण मी तुझ्या ऑर्डरप्रमाणे पन्नास-साठ गेस्ट बोलावले. ते सकाळी दहा वाजेपर्यंत इथे येणार, अकराला लग्न चालू होणार. हे तुझे विधी” हातातला कागद फ़डकवत राजन म्हणाला.

“दीड दोन तासांत संपणार, तीन चार वाजेपर्यंत लंच वगैरे.. मग नंतर?”

“नंतर काय? झालं की लग्न.. अजून काय करायला हवंय?”

“अरे, पण आपलं काय ठरलं होतं मागे, संध्याकाळी मीडीया इंटर ऍक्शन ठेवायचं म्हणून... मग त्याबद्दल...”

“हा काय मीडीयाचा प्रतिनिधी इथे” वीर साराकडे बघून डोळा मारत म्हणाला. “जी काय इंटरॅक्शन होइल ती यांच्याचसोबत.. तीपण प्रायव्हेटमधे...”

राजनने कपाळावर हात मारून घेतला. “वीर, प्लीज. परत एकदा रीक्वेस्ट करतो. वाटलं तर या लग्नानंतर मला नोकरीवरून काढ. पण असं करू नकोस. तुझ्यासाठी म्हणून हा ईव्हेंट अजिबात बाहेर कळू दिलेला नाही. तुझ्या सगळ्य स्टाफ़ला माझ्या लग्नाच्या ऍनिव्हर्सरीची पार्टी आहे, असं खोटं सांगून बोलावलंय. गेस्ट लोकांना ईव्हेंट आहे एवढंच सांगितलंय, पण आता हे अति होतंय, मला फ़क्त एक चान्स दे मीडीयासाठी. प्लीज....”

राजनकडे बघून वीरला खरंच हसू आलं. “राजन, एवढा डेस्परेट होऊ नकोस. एकदा मुंबईला गेलो की नेक्स्ट वीकमधे रसिका मोठं फ़ंक्शन ठेवतेय. तिथे वाट्टेल तेवढं बोलेन, फ़ोटोला पोझ देईन. पण या लग्नासाठी नाही.”

“अरे पण, रसिका ते सर्व तिच्या पीआरसाठी करतेय. वी नीड टू वर्क ऑन युअर पीआर. नेक्स्ट मंथमधे रीलीज आहे. त्याचा जरातरी विचार कर.. लग्नाची बातमी जितकी जमेल तितकी एन्कॅश करू. तुला इथे व्हेन्युवर मीडीया नको.. फ़ाईन! पण नंतर संध्याकाळी एक दहा पंधरा मिनिटं तरी दे प्लीज!”

“ओह गॉड, आय जस्ट हेट दिस लाईन बट स्टिल, राजन, टेक अ चिल पिल” सारा उठत म्हणाली, “वीरचं म्हणणं काही चूक आहे का? लग्न हा आमचा प्रायव्हेट मामला आहे, त्याला ठराविक ग्लॅमरस पद्धतीने केलंच पाहिजे का? तुला मीडीया बिट्स हवेत ना? मग ते मीडीयामधे उडवून दे ना.  त्यासाठी वीरने मीडीया इंटर ऍक्शन केलंच पाहिजे असं काही जरूरी नाही. आपण किती स्पिन्स केलेत ते आठव ना जरा” सारा वीरच्या केसांतून हात फ़िरवत म्हणाली, पण वीर त्याच्या हातातल्या मोबाईलमधे कसलातरी मेसेज वाचत होता. “त्यातले कितीतरी स्पिन्स वीरला अजून माहितीसुद्धा नाहीत” वीरचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं.

“पण आता काय स्पिन करू? लग्नाबद्दल मीडीयाला अजूनही अजिबात माहिती नाही. तुमच्या अफ़ेअरबद्दल माहित नाही. आणि तू कायम माझी फ़ेवरेट जर्नालिस्ट होतीस, आता तू नोकरी सोडलीस, मग मी काय स्पिन करू... तूच सांग मला...”

“सिंपल. आता दोन दिवस राहिलेत लग्नाला. वीर मुंबईमधे नाही, कुठेही शूटवर नाही. मग तो मद्रासला धनुकडे मनधरणी करायला गेलाय हा एक मस्त स्पिन आहे. दे ना कुणालातरी!”

“काय??” राजनऐवजी वीरच ओरडला. पहिल्यांदाच त्याचं लक्ष साराच्या बोलण्याकडे गेलं असावं. “हे काय नवीन भलतंच?”

“ऐक तू नीट. मीडीयावाले ताबडतोब धनुकडे याची चौकशी करणार. आणि तिथे तो धनुचा बाप तमिळमधे स्सॉलिड शिव्या घालणार. त्याच्या शिव्या म्हणजे प्रचंड भारी... दर वेळेला मीच कशाला ऐकून घेऊ? यावेळेला दुसर्‍या कुणालातरी ऐकू देत. पण तेवढं झालं की वीर तिथे नाही तर कुठे आहे हा प्रश्न आपोआप येणार. सगळीकडे चौकशी सुरू होणार. या सगळ्यांमधे एक दिवस आरामात जाईल. उद्या राजन परत एक स्पिन देइल की वीर.... वीर...” सारा विचार करत म्हणाली.

“वीर वेड्यांच्या हॉस्पिटलात आहे” वीर परत एकदा मोबाईलवरून नजर न हटवत म्हणाला. पण आता त्याचं अर्ध्याहून जास्त लक्ष साराच्या बोलण्याकडे होतं.  

“नको. त्यापेक्षा डीऍडिक्शन सेंटर कसं वाटेल?” राजन म्हणाला.

“अरे, काय इज्जत उतरवताय का?  दारू काय मी साधी बीअर पित नाही.... डीऍडिक्शन सेंटर काये?..”

“येस्स.. डीऍडिक्शन सेंटर साऊण्ड्स व्हेरी हॉलीवूडिश!! परफ़ेक्ट!” सारा जणू काही वीर तिथे नसल्यासारखीच म्हणाली, “मग त्यामधे परत एक दिवस जाईल. आरामात. कारण, वीर ऍडिक्ट नाही हे माहित आहे प्रत्येकाला, त्यामुळे ही स्टोरी यायच्या आधी कन्फ़र्मेशन तर होणारच आणि तसं बघायला गेलं तर या व्यसनमुक्तीच्या स्टोरीसाठी बहुतेक मीडीया कन्फ़र्मेशनसाठी एक सोर्स नक्की वापरणार!!”

“सारा व्ही के,  तू माझी होणारी बायको आहेस आणि तू लग्नाच्या आदल्या दिवशी मी दारूडा आहे असं लोकांना सांगणार?? कसले नमुने आहेत माझ्या अवतीभवती” पण वीरकडे आता सारा आणि राजन दोघांचंही लक्ष नव्हतं.

“हे बेस्ट राहिल सारा. आणि त्याच्या नेक्स्ट डेला लग्न झाल्यावर आपण लगेच अनाऊन्स करू. म्हणजे ही डीऍडिक्शन सेंटरवाली स्टोरी पाठी जाईल, आणि ताबडतोब लग्नाची स्टोरी पूढे येईल. फ़ुल्ल कव्हरेज मिळेल. बेस्ट काम होइल.”
“राजन, थिंक अबाऊट इट! लग्नाची नुसती स्टोरी येणार नाही. मीडीया विल बी सरप्राईज्ड टू फ़ाईन्ड आऊट अबाऊट मी. वीर कपूरने एका सिम्पल जर्नालिस्टशी इतक्या तडकाफ़डकी लग्न का केलं असेल? कुणाला न सांगता!!” सारा एकदम उत्साहात म्हणाली. “साला, राजन, सगळा मसाला तुला इथेच मिळेल.”

वीर परत एकदा आलेला मेसेज बघत होता. “म्हणजे?” त्याने वर न बघता विचारलं.

राजन फ़टाफ़ट हातातल्या कागदावर लिहून घेत होता. “सो व्हॉट डू यु से विल बी बेस्ट? ब्लॅकमेल ऑर प्रेग्नंट?” राजन म्हणाला. वीरच्या हातातला मोबाईल जवळजवळ खाली पडला.

“यार, मीच स्वत:ला व्हिलन का करू? नो ब्लॅकमेल. प्रेग्नंट!” सारा म्हणाली.

“सारा, इनफ़ इज इनफ़” वीरने उठून साराचे केस धरून ओढले. “असला मूर्खपणा प्लीज नकोय मला”

सारा ओरडली. “केस ओढू नकोस. नालायक, तुला मीडीया इंटर ऍक्शन नकोय ना? मग किमान राजनला त्याला हवे तसे  स्पिन्स करू देत ना... हेही नको... तेही नको... सगळीकडे फ़क्त तुझीच मर्जी चालायला हवी का? सुपरस्टार आहेस म्हणून!”

परत एकदा वीरचा मोबाईल वाजला. साराला काहीही उत्तर न देता वीरने सगळ्यांत आधी मोबाईलमधला मेसेज बघितला आणि त्याला उत्तर टाईप करता करता तो म्हणाला, ““राजन, परवाच्या दिवशी चार पाच वाजता एक छोटीशी प्रेस इंटरऍक्शन... छोटीशी इन द सेन्स, फ़क्त पंधरा मेनलाईन मीडीया. नो कॅमेरामेन. ओन्ली फोटोग्राफर्स” वीर शेवटी म्हणाला. “आणि प्लीज...प्लीज... हे असले काहीतरी फ़ालतू रूमर्स खरंच नकोत..हात जोडून पाया पडतो वाटलं तर...”

राजन हसला. “वीर, तुला बरोब्बर बायको मिळाली आहे. सारा, थॅंक्स!”

“हेच जर आधी तयार झाला असतास तर मला अणि राजनला एवढ्या कल्पना लढवायला लागल्या नसत्या. पण राजन, मज्जा यायची असले स्पिन्स करताना. आय ऍम गोइंग टू मिस माय वर्क!”

“मिस कशाला? आता तर तुम्ही पॉलिटिक्समधे काम करणार. तिथे तर याहून मोठेमोठे कारनामे करता येतील तुला... एखाद्याला आयुष्यातून उठवायला सांगायचं असेल तर ते काम तुझ्याकडेच द्यायला हवंय...” वीर मेसेज वाचत म्हणाला. “त्या नेत्राचं काय झालं...”

“अरे हां राजन, त्यावरून आठवलं, प्लीज कुणाला तरी सांग आणि त्या नेत्राला एखादा जॉब बघून दे. जर्नालिजममधे शक्य नाही येणं, पीआरमधे शोधतेय. तिथे नाही तर कोर्पोरेटमधे लावून दे. स्टोरीवर नजर चांगली होती तिची, पण चुकीच्या माणसाला फ़ोकस करायला गेली..  वाईट झालं पण तिचं”

“वाईट झालं?” वीरने विचारलं. “तिने तुझ्या घरी येऊन तुझे आणि माझे फोटो काढले आणि तिचं वाईट झालं... तू जर मला ते आधी सांगितलं असतं ना... तर...”

“तर तू बरंच काही केलं असतंस, पण मी केलं ना ते सर्व हॅन्डल. माझ्या गावी जाऊन माझ्याबद्दल चौकशी केल्यावर ती गोष्ट माझ्या कानापर्यंत येऊच शकणार नाही, असं तिला कसं काय वाटलं कुणास ठाऊक...”

“पण सारा, अजूनही तू ऑफ़िसमधे काय सांगितलंस आणि नेत्राकडून  सर्व ओरिजिनल हार्ड डिस्क कॅमेरा डिस्क सगळं कसं मिळवलंस? तुझ्या पेपरचा ओनर पण काही बोलत नाही” वीर म्हणाला.

“माझ्या पेपरचा ओनर म्हणजे नक्की कुणाशी बोललास तू? सतराशेसाठ लोकं आहेत त्यांच्या फ़ॅमिलीमधे. सर्वच ओनर. मीडीया मोगल आहेत ना...मग काय कुणीही येऊन बॉस बनू शकतं तिथे.” सारा हातातलं पुस्तक बंद करत म्हणाली. राजनला सगळा विषय नक्की कुठे चाललाय याचा अंदाज आल्याने त्याने वीरला साराच्या नकळत “गप्प बस प्लीज” अशी खूण केली. वीरला एक सेकंदभर काही समजलेच नाही, तरी त्याने लगेच विषय बदलला.

“रसिका येईल एका तासाभरात. राजन, सगळ्यात आधी एसीचं काम करवून घे.”

“आता येतोय तासाभरात तो माणूस, आणि सारा, तुझ्यासाठी महत्त्वाचं पाचनंतर ती मेंदीवाली पण येईल. डीझाईन्स वगैरे तुझ्या डीझायनरने सिलेक्ट करून ठेवली आहेत. फोटो काढायला मीच येईन. आज बाहेरच्या कुणालाही बोलावलं नाहीये. वीर, आर यु शुअर, तुला.....”

“मी माझ्या हातावर ते काहीही घाण काढून घेणार नाही... एकदा सांगितलं ना!!”

“ओके,” राजन वरमून म्हणाला. “जशी तुझी मर्जी. आज मीडीया इंटरॅक्शनला परमिशन दिलीस तेवढंच महत्त्वाचं मला.”

“इंटरॅक्शनचे पॉइन्ट्स लिहून घे आताच. नंतर कन्फ़्युजन नको, हे बोलायचं ठरलं होतं आणि नव्हतं म्हणून” वीर मोबाईलमधे टाईप करतच म्हणाला.

“बोल.” राजन परत एकदा कागद पेन घेऊन बसला.

“फ़र्स्ट, सारा व्ही के विल बी जॉइनिंग माय मदर्स साईड इन पॉलिटिक्स. त्याशिवाय ती अजून काही लिखाण वगैरे करेल, इथे तुला काय फ़ेकायचं ते तू फ़ेक. सिनेमा, नाटक, सीरीयल पण यावर रीटर्न प्रश्न नकोत. सेकंड, हेन्सफ़ोर्थ माय नेम वील बी.....”

“वीर, आय ऍम सॉरी.... पण हे खरंच तुला करायचं आहे का? खूप विचित्र वाटतं ऐकायलासुद्धा, सारा... तू तरी सांग त्याला...”

“मी काय सांगितलं नाही का? पण त्याचं नाव आहे, त्याचा डीसीजन... नशीब समज, त्याच्या आधीच्या आयडीयामधे कपूर पूर्णपणे ड्रॉप करायचं होतं त्याला. तेवढं तरी आता करत नाहीये.”
“सारा, पण तरी... याचा ईफ़ेक्ट खूप निगेटीव्ह होइल...”

“एक मिनिट,” वीर म्हणाला, “मी इथे हजर असताना परत तुमच्या दोघांची ही टेनिस मॅच नको. मी डॉक्युमेंटमधे नाव चेंज करतोय तर स्क्रीनवर पण नक्कीच. वीर सारा कपूर. ज्याला विचित्र वाटेल तो त्याचा प्रॉब्लेम. माझा नाही. आणि मला यावर कुठलेही क्वेश्चन्स नकोत.” वीर म्हणाला. “याहून जास्त मी काहीही बोलणार नाही. फ़िल्मचे प्रश्न असतील तर उत्तर देईन. क्लीअर?”

“ऍज यु विश! यामुळे तुझाच फ़ायदा होइल वीर. बरं, तुम्हाला चहा कॉफ़ी थंड काही सांगू का? मी आता माझ्या कॉटेजवर जातोय. रसिका मॅडम यायच्या आधी बरीच तयारी करायची आहे. मीडीया इन्व्हाईट, ट्रान्स्पोर्ट सगळं अरेंज करावं लागेल. चलो बाय!!”

“माझ्यासाठी जी कॉटेज बूक केली आहे ना?” वीर परत मोबाईलमधे टाईप करत म्हणाला. “त्याचा नंबर काय आहे?”

“बारा नंबर, इथून एकदम लास्ट रोमधली कॉटेज. पण तू आज रात्री इथेच राहणार आहेस ना? ती तुला फ़क्त रेडी होण्यासाठी म्हणून बूक केली आहे...”

“नाही, रात्री मी तिथेच राहीन.. मघाशी रसिकाचा फोन आला होता, तेव्हा म्हणाली, लग्नाआधी दोन दिवस तरी बायकोपासून लांब रहा म्हणून...आता तुमच्या सर्वांच्या मर्जीनुसार वागतोय, तर मग जरा तिच्यापण मनासारखं होऊ देत... रसिका यायच्या आधी कुणालातरी माझी बॅग आणि इतर सामान तिथे नेऊन ठेवायला सांग.”

“ठिक” म्हणून राजन निघून गेला. तो गेल्यावर शेवटी साराने विचारलं. “काय चाललंय तुझं मघापासून? इकडे माझ्याशी बोलता बोलता मोबाईलवर कुणाला मेसेज पाठवतोयस?”

“आहे एक असाच शाळेतला मित्र. खूप दिवसांनी इंडियामधे परत आलाय म्हणून मेसेज करतोय. महत्त्वाचं काही नाही.”

“बोल तू खोटं माझ्याशी!! मेसेज वाचलास की लगेच डीलीट करतोयस आणि सेंट मेसेज पण लगेच डीलीट करतो आहेस, ते इथे बसून दिसतंय मला. शाळेतला मित्रच आहे की एखादी जुनी गर्लफ़्रेंड?”

“मेसेज बॉक्स फ़ुल झालाय माझा,” वीर परत एकदा मोबाईल बघत म्हणाला. “एनीवेज, ते काय महत्त्वाचं नाही.” वीर हातातला मोबाईल बाजूला ठेवत म्हणाला. “सो, तुला जसं हवं होतं तसं लग्न.. एकदम धार्मिक पद्धतीने. आहेस ना आता तरी खुश?”

“मी तुला कधी म्हटलं की मी खुश नाही... तूच तडतडत असतोस सारखा. किती चिडतोस त्या राजनवर...आणि कसले विचित्र हट्ट असतात तुझे. आपली मर्जी सांभाळणारा माणूस आजूबाजूला असतो म्हणून आपण काय वाटेल ते वागायचं का? राजन तुझा नुसता स्टाफ़ नाही, मित्रपण आहे. फ़ॅमिली मेंबर आहे तुझा.. आणि तरी तू असा वागतोस? खरंच गरज आहे का असल्या गोष्टींची?”

“हाच प्रश्न मी तुला विचारला तर? काय गरज आहे या लग्नांची, या विधींची? एकत्र तर आपण इतके दिवस होतोच. उलट वेगळे होऊनपण दूर जाऊ शकलो नाही. परत आलोच एकमेकांकडे.. मग हे असले कृत्रिम उपचार कशाला? कोर्ट मॅरेज केलं तरी चाललं असतं ना..”

“वीर!!” सारा काही न बोलता खाली बघत बसली. “मला या नात्याला माझ्या दृष्टीने शिक्कामोर्तब करणं गरजेचं आहे...”

“मग जसा हा तुझा हट्ट आहे, तसे माझे पण काही हट्ट..” बोलता बोलता वीरने साराच्या ओठांवर ओठ टेकवले. “इतके दिवस कधी बापाचं नाव लावलंच नाही, आईचं नाव होतं कारण ती सांभाळत होती, आता ही आयुष्याची दोरी तुझ्या हाती... आता हे सगळं तुझंच.. तूच सांभाळशील ना मला?”

सारा काही बोलणार तेवढ्यात परत एकदा वीरचा मोबाईल वाजला. “आर यु शुअर, हा तुझा शाळेतला मित्रच आहे की अजून कुणी?” परत एकदा साराने विचारलं.

“तेरे सर की कसम, मिसेस. शाळेतला मित्रच आहे माझा, त्याला लग्नाला ये म्हणून बोलावतोय तर तो नाही म्हणतोय.” वीर हसत म्हणाला आणि तरीपण सारापासून लांब जाऊन त्याने तो मेसेज वाचला. मेसेज काय होता त्याला माहित नव्हतं, पण वाचताना त्याच्या चेहर्‍यावर आलेलं टेन्शन मात्र साराला स्पष्ट दिसत होतं. आणि स्वत:चं लग्न एवढं टॉप सीक्रेट ठेवणारा वीर कुठल्याही शाळकरी मित्राला नक्कीच बोलावणार नव्हता.
(क्रमश: )


No comments:

Post a Comment