Sunday, 17 April 2016

रहे ना रहे हम (भाग ७)

जॉयसने बारावीच्या वर्षासाठी टाईमटेबल आखलं होतं, पण तिच्या घरामध्ये तिला अभ्यासाला जास्त वेळ मिळायचा नाही. तिची आई कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये नर्स असल्याने तिची शिफ़्ट ड्युटी असायची, जॉयस सर्वात मोठी. त्यानंतरची कॅरोल आणि मग मायकल. शिवाय त्यांचं एकत्र कुटुंब, काकाकाकी, त्यांची मुलं आणि अजून बरंच कोण कोण. इन मिन चार खोल्यांच्या घरामध्ये एवढी सर्व माणसं. त्यामुळे ती अभ्यासाला माझ्याचकडे येऊ लागली. जादू आल्यापासून परत घरामध्ये येणारे जाणारे लोक वाढले होते, म्हणजे आफताबची चिडचिडपण. ती आणि आफताब या दोन पुस्तकी किड्यांमध्ये माझा अभ्यास झाला नसता तर तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला असता.

आईसोबत बोलायला मला खरंतर आधी फार आवडायचं. रोज शाळेत काय काय घडलंय त्याबद्दल मी सविस्तर सांगायचेच, पण आता आईला काही सांगितलं की ती भलतेच उपदेश करायची. वसीमबद्दल तिनं मला एकदोनदा चौकशी केल्यासारखं विचारलं... फार खोलात जाऊन नाही सहजच विचारल्यासारखं, पण टोकेरी प्रश्न बरोबर समजतातच की. मी तसंच काहीतरी उडवून लावलं.
आफताब बोर्ड एक्झामसोबतच सीएच्या परीक्षेसाठी तयारी करत होता. आम्हाला नुकतीच मेडीकलसाठी एंट्रन्स एक्झाम सुरू झाली होती. जॉयस त्याची तयारी करत होती.
“तू पण एक्झाम देना” आफताब मला दोन तीनदा म्हणाला.
“पण मला डॉक्टर व्हायचंच नाही.”
“का? तुझे काका आणि काकी मुंबईला डॉक्टर आहेत ना, मग तुलाही त्यांच्यासोबत काम करता येईल” आफताब आजचा विचार करतच नाही, पुढच्या पाच दहा वर्षांचा विचार करून मगच बोलतो, तरीही नशीबाचे फासे कायम विचित्र पडतच राहतात. ठरवल्यासारखी एकही गोष्ट घडत नाहीच. शाहीनशी लग्न करताना पुढं असं काही घडेल हे त्याला चुकून तरी वाटलं असेल का? 
“मला इतका अभ्यास झेपणार नाही. शिवाय मला ते इंजेक्शनं सलायनी वगैरे अजिबात आवडत नाहीत.” मी त्याला उडवून लावलं.
“डॉक्टर व्हायचं नाही तर इंजीनीअर हो” जॉयस आमच्यामध्ये पडली.
“बिल्कुल नाही. मला गणितं आवडत नाही. शिवाय...”
“सॉफ्टवेअर इंजीनीअर हो, ते बेस्ट आहे. तो शाळेजवळच्या गल्लीमधला प्रवीण माहिताय? तो मेकॅनिकल इंजीनीअर झाला. कॅंपस इंटरव्युमध्ये सीलेक्ट झाला. डायरेक्ट अमेरिका. करोडोंमध्ये कमावेल. त्याच्याकडे तर घरी कंप्युटर पण नव्हता तरी तो सॉफ्टवेअर इंजीनीअर झालाय. तुज्याकडे मस्त पीसी आहे.” जॉयसला काय सांगावं? घरात पीसी आहे म्हणून मी प्रोग्रामर व्हायचं का? अजून काय करीअर चॉइसेस नाहीतच.
“नॉट इंटरेस्टेड”
“कशामध्ये? इंजीनीअर होण्यामध्ये की, अमेरिकेला जाण्यासाठी?” आफताबनं अतिशय सीरीयसली विचारलं.
“म्हणजे?”
“इंजीनीअर व्हायचं नसेल तर ओके, तसाही अभ्यास खूप असतो. पण तुला अमेरिकेला तसंही जाता येइल. आमच्या घरात नवीन ट्रेंड चालू झालाय. पोरं अमेरिकेत जातायत. सॉफ्टवेअरमध्ये पैसे कमवायला आणि पोरी त्यांच्याबरोबर लग्न करून जातायत. जास्त शिकलेल्या नसाल तरी चालेल, फक्त “अमेरिकेतील जीवनमानाशी जुळवून घेण्याची तयारी हवी” जाहिरातीत असंच लिहितात. सिराजभाई तर पंधरा दिवसांच्या सूट्टीवर आला आणि निकाह लावून बायको नेली. गल्फ़मध्ये असता तर बायको इथंच सोडून गेला अस्ता, आमच्याकडे हल्ली बघताना असे अमेरिकन पोरंच डीमांडमध्ये आहेत. बायकोला नेतात म्हणून”
एकूणात आमच्याकडे सध्या सॉफ्टवेअर इंजीनीअरिंग आणि त्यामागोमाग अमेरिकेला जाणं हे फारच रूळत चाललं होतं. मागे मुंबईला गेले होते तेव्हा काकीची आई आली होती. त्यापण नुकत्याच त्यांच्या सुनेच्या बाळंतपणासाठी त्या बोस्टनला जाऊन आल्या होत्या. तिकडच्या थंडीच्या, भरपूर सामानाच्या आणि सगळं काम स्वत:चं स्वत:च करावं लागत असल्याच्या कायकाय गप्पा सांगत होत्या. आमच्या गावात परदेशी जाणं म्हणजे मुस्लिम लोकांसाठी गल्फ नेहमीचंच होतं. त्यातही गल्फचा पैसा म्हणजे प्रचंड! अझरभाईसारखे लोकं तिथं राबायचे ते केवळ पैशासाठीच. करीअर म्हणून नव्हे. पण अमेरिकेत जाणं म्हणजे करीअरची दिशा सेट करणं. आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं अचिव्ह करणं वगैरे. इतके दिवस पुण्या-मुंबईमध्ये नोकरी मिळणं हे फार भारी काम मानलं जायचं, इंग्लंडमध्ये वगैरे जाणारे लोक फारच हुशार पैसेवाले आणि भलतेच चिकाटीवाले. पण आता हळूहळू गेल्या दहा वर्षामध्ये अमेरिकेला जाऊन नोकरी करणं खूपच कॉमन झालं होतं.
मला डॉक्टर व्हायचं नव्हतं की अमेरिकेला जायचं नव्हतं. खरंतर मला काय करायचं आहे तेच क्लीअर नव्हतं. पुढच्या शिक्षणासाठी आईवडलांनी मला गावाबाहेर ठेवलं नसतं. मी हॉस्टेलमध्ये वगैरे राहतेय ही कल्पनाच आईला असह्य झाली असती. बाबानं काय केलं असतं माहित नाही.
त्यामुळे मी बारावी झाल्यावर गावातच बीएससी असा सुटसुटीत पर्याय डोळ्यांसमोर ठेवला होता.
“टीव्ही लगाव” आम्ही बोलत असतानाच जादूचा जोरात आवाज आला. त्यांचं केबल कनेक्शन आफताबनं गरज नाही म्हणून काढून टाकलं होतं. “जल्दी न्युज चॅनल्स लगाव” तो गडग्यावरून उडी मारत आला.
आम्ही लगेच एनडीटीव्ही लावलं. अमेरिकेमध्ये कसल्यातरी विमानांचा अपघात झाला होता. दोन्ही विमानं भल्यामोठ्या शेकडो मजल्यावरच्या इमारतींवर जाऊन धडकली होती. टीव्ही बघताना केवळ ती विमानं धडकत असल्याचं दृश्य वारंवार दिसत होतं. बाकी टीव्हीवाल्यांचं नेहमीची फालतू बकबक चालू होती, काय झालं कळायला मार्ग नव्हता. आम्हाला फक्त तो हॉलीवूडच्या पिक्चरमध्ये शोभेल असा विमानांचा स्टंट बघून मज्जा वाटली, आणि किती लोकं मेली असतील याबद्दल काळजीसुद्धा. जादू कितीतरी वेळ चॅनल्स बघत राहिला, हे सगळं घडून चार-पाच तास उलटून गेले होते. आम्हाला आत्ता पत्ता लागला होता, पण त्यात विशेष लक्ष घालण्यासारखं काही वाटलं नाही. आम्ही परत अभ्यासाकडे वळालो.
या असल्या गोष्टींचे भविष्यावर काय परिणाम होतील याचा विचार करायची आमची अक्कल नव्हती आणि तशी आवश्यकतादेखील वाटली नाही. आणि तसंही असल्या गोष्टींचे परिणाम एका दिवसात थोडीच दिसून येतात.


>>>>> 
एके दिवशी आई बाहेर गेली होती, तेव्हा पोस्टमन आला. पत्रं काही खास नव्हतीच. आता कोण पत्रं लिहितंय. एक दोन एल आय सीचे रीमाईंडर्स, बाबांच्या दुकानामधल्या मालाचे काही बोशर्स आणि आईसाठी एक लिफाफा होता. मागच्या महिन्यांत आईला अशाच लिफाफ्यामधून टप्पारवेअरचं ब्रोशर आलं होतं. मला वाटलं तेच असेल, असल्या ब्रोशरमधली चित्रं पहायला मला फार आवडाय्चं. (आताही आवडतंच, सगळे हसतात पण मी सर्व मेलर्स फ्लायर्स, ब्रोशर्स इतकेच काय टेक अवेचे मेनूसुद्धा अखंड वा्चून काढते)
 पण या मधलं ब्रोशर वेगळंच होतं. मुंबईमधल्या कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये कस्लंतरी फंक्शन होतं त्यासाठी आईला आमंत्रण होतं. कॅन्सर सर्वायवर म्हणून! आई घरी आल्यावर मी आईला ते ब्रोशर लगेच दाखवलं.. “आई! तुला कॅन्सर कधी झाला होता?” हे खरंच मला माहित नव्हतं म्हणजे एक तर मी खूप लहान असताना किंवा माझ्या जन्माच्याही आधी.
“खूप वर्षं झाली” ते ब्रोशर आईनं कचर्‍याच्या पेटीत फेकून दिलं.
“मग तू मला सांगितलं का नाहीस?”
“त्यात तुला सांगण्यासा्रखं काय आहे? अजून लहान आहेस”
“इतकी पण लहान नाही. हे बघ, आम्हाला बायोमध्ये कसले सब्जेक्ट्स आहेत. सांग की, काय झालं होतं?”
आई माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता किचनमध्ये चहा करत होती “सांग ना गं, आई” मी माझी किरकिर प्रत चालूच ठेवली. शेवटी आईनं चहाचा कप माझ्यासमोर आदळला. “लग्नानंतर मला कॅन्सर झाला. गर्भाशयाचा. केवळ तू व्हावीस म्हणून मी ट्रीट्मेंट घेत राहिले. तू जन्मल्यावर मात्र लगेच हिस्टरेक्टोमी झाली. त्यानंतर मी ठणठणीत आहे. अजून काय सांगू?” आई माझ्यावर ओरडलीच.
मी काही न बोलता चहाचा कप उचलला. माझ्या आईला कॅन्सर झाला होता, मी व्हायच्या आधीपासून. मी झाले मग तिनं ऑपरेश्न केलं. आईला एवढं सर्व काही त्रास होत असूनसुद्धा बाबानं बाहेर लफडं केलं होतं. बाई ठेवली होती.
आईनं चहा आज इतका पांचट आणि बेक्कार केला होता की.... असला चहा पिताना मला रडूच यायला लागलं.




बारावीचं वर्ष एकदाचं संपलं. काही खास नव्हतंच. क्लास, ट्युशन्स, अभ्यास इतकंच आणि एवढंच. आईच्या आजाराबद्दल समजलं होतं. नंतर बोलताना आईनं अजून काय काय सांगितलं. बाबानं आईची किती काळजी घेतली, तिला किती सपोर्ट केला वगैरे वगैरे आईनं ऐकवलं. पण त्या संध्या नावाच्या काळ्या बाईबद्दल ती काही बोलली नाही.
पण मला आता तितकं गणित येत होतं. आईचा आजार चालू झाला, माझा जन्म झाला, आईची हिस्टेरेक्टोमी झाली आणि त्यानंतर बाबानं बाई ठेवली. ऑब्व्हियसली, सेक्ससाठी. कुणी निव्वळ गप्पा मारण्यासाठी तर बाई ठेवत नाही.. पण का? आई बाबाचं काही भांडण नव्हतं. दोघांच्या नात्यात कसला कडवटपणा मला आजवर दिसला नव्हता. उलट माझ्या सर्व मैत्रीणींचे आईवडील कायम अवघडलेल्या नात्यात असायचे. प्रत्यक्षात एकत्र तर झोपायचं आहे, पण चारचौघांत मात्र आपण एकमेकांना ओळखत नसल्याचा आव आणायचा आणि हे केव्हा तर मुलं दहा बारा वर्षं झाल्यानंतरदेखील. मग एरवी इतका दांभिकपणा कशाला? नवरा बायकोच्या नात्यामधली ही गुंतवळ मला कधीच समजली नाही. माझ्या आईबाबाचं लव्ह मॅरेज होतं. तरी बाबानं केवळ झोपण्य़ासाठी वेगळ्या बाईची सोय केली होती. गणित येत तर होतं पण अजून समजत नव्हतं.
बारावीनंतर जॉयस इंजीनीअरिंगला गेली. तिला चांगली गव्हर्नमेंटची सीट मिळाली. यशस्वी पुढच्या शिक्षणाला पुण्याला गेली. गेली बीएससी करायलाच पण तरी एकूण अविर्भाव फारीनात चालल्याचा  होता. ते काय फार खोटं पण नव्हतं. नात्यामधल्याच एका मुलाबरोबर आईवडलांनी लग्न ठरवलं होतं. मुलगा युएसला होता. अजून दोन वर्षांनी लग्न आणि तोपर्यंत जमेल तितकं शिकत रहायचं. निधी आणि रझियानं आमच्याच गावातल्या कंप्युटर सायन्सला ऍडमिशन घेतली. त्यांचं कॉलेज माझ्या कॉलेजपासून पाच मिनिटाच्या अंतरावर. मी आणि पूर्वी बीएससीला गेलो. पूर्वीला मार्क जास्त नव्हते आणि मला सत्तर टक्के मार्क असूनही कुठेही जायचं नव्हतं.
आफताब सीएच्या परीक्षांची तयारी करत होता. बारावीला त्यालाही चांगले पंचाएंशी टक्के मार्क मिळाले. त्यानं पुण्याला बीकॉमसाठी ऍडमिशन घेतली. तिकडे सीए साठी क्लासेस चांगले आहेत म्हणाला. परीक्षेमध्ये पास झाला की लगेच त्याला इंटर्नशिप करावी लागणार होती.
“सो, आता पुढच्यावेळी सुट्टीत आलो की भेटू” डोळ्यांवरचा चष्मा सारखा करत तो मला म्हणाला. त्याच्या दोन तीन बॅगा आमच्या कारमध्ये ठेवल्या होत्या. बाबा पुण्याला काहीतरी कामासाठी निघाला होता. त्याच्याचसोबत आफताब जाणार होता.. माझ्या खोलीमध्ये मला बाय करायला आला होता.
“ईमेल्स करत रहा. चॅटवर भेटूच की” मी म्हटलं.
“सायाबर कॅफेमध्ये जायला तरी वेळ मिळेल का?”
“मग फोन कर” बाबानं कार गेटच्या बाहेर काढली होती. “अर्थात, निधीला फोन करण्यापासून वेळ मिळाला तर...” मी तेवढ्यात त्याला चिडवून घेतलं. बाहेरून आईचा आवाज आला. “अझरभाई दोन-तीन महिन्यांत परत येतील. तेव्हा मी इकडे चक्कर मारेनच. अभ्यास कर. काळजी घे. स्वत:ची आणि काकीची पण” तो म्हणाला. “सारखी तुडतुडत राहू नकोस. कॉलेज लाईफ एंजॉय कर.” माझ्यापेक्षा तीन महिन्यांनी लहान असलेल्या आजोबांनी मला सल्ला दिला.
“तू पण अभ्यास कर.” आफताबसाठी अत्यंत अनावश्यक असलेला सल्ला मीपण दिला.
तो नुसता हसला. “फोन करेन. अम्मीची काळजी घे.”
“आय विल मिस यु” तो दाराजवळ गेल्यानंतर मी अचानकच म्हटलं.
“आय विल मिस यु, टेक केअर” तो क्षणभर मागे वळून म्हणाला. पुढं त्याला काहीतरी सांगायचं असणार पण तेवढ्यात बाबानं कारचा हॉर्न जोरात मारला आणि आफताब तडक रूमबाहेर पडला.

माझे आणि आफताबचे रस्ते वेगवेगळे झाले.
रीझल्ट झाल्यानंतर बीएससीचं कॉलेज लगेच चालू झालं. पहिले काही दिवस कॉलेज म्हणजे बोरिंग होतं. बोरींग हा शब्द एक्सायटिंग वाटावा इतकं बोरींग. सब्जेक्ट्स इंटरेस्टिंग होते पण आमच्या नशीबानं प्रोफेसर एकदम फालतू. कसले कसले भयाण आवाजात टेप लावल्यासारखे बडबडायचे. माझ्यासारख्या इंग्लिश मीडीयमच्या मुलीला त्यांचे उच्चार समजायचे नाहीत तर मराठी मीडीयम आणि खेड्य़ापाड्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांची काय कथा? पण एक बरं होतं. प्रत्येक लेक्चर अटेंड करायलाच हवी अशी काही अट नव्हती. आमच्या कॉलेजपासून निधीचं कंप्युटर कॉलेज जवळच होतं. आमचा ग्रूप आधीसारखाच अजूनही भेटत होता. अगदी रोजच्या रोज नाहीतरी किमान आठवड्यांतून एकदा तरी. मी बारावीच्या सुट्टीत कार चालवायला शिकले होते. त्यामुळे आता आम्हाला गावामध्ये अगदी रात्री उशीरापर्यंत भटकता येत होतं. आईला रात्री मी बाहेर गेलेलं आवडायचं नाही. एकदोनदा तिनं मला यावरून बोलून दाखवल्यानंतर मी स्पष्टपणे मी अठरा वर्षांची झालीये, मला सज्ञान असल्यामुळे कसंही वागायचा हक्क आहे हे सांगितलं. त्यानंतर आईनं माझ्याशी जास्त बोलणंच सोडलं. बाबाशी तर मी कित्येक वर्षांपासून धड बोलत नव्हते.
यावर्षी माझी मैत्री गौतमीबरोबर झाली. ही आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रहायची. बारावीला मार्क चांगले होते पण ते मार्क सगळे पाठांतराचे. कसलीच कन्सेप्ट क्लीअर नव्हती. तशी ती हुशार होती. वर्गात माझ्या जवळपास बसायची, म्हणून मी तिला नोट्स वगैरे द्यायचे. एकदा कशासाठी तरी मी तिला माझ्या घरी घेऊन आले होते. माझं घर बघताच ती म्हणाली. “काय छान बंगला आहे गं!”
डोंबल. आमचं घर पंधरा वर्षांपूर्वीचं जुनं होतं. आई गेल्या कित्येक महिन्यांपासून बाबाला रीनोव्हेशन करूया म्हणून मागे लागली होती. यावर्षी करू त्यावर्षी करू करत बाबा मागेपुढे करत होता.
आणि हे असलं घर हिला सुंदर वाटतंय. घरची परिस्थिती खास नव्हती. जॉयसपेक्षाही वाईट. गौतमीचे बाबा कुठल्यातरी आमराईमध्ये गडी म्हनून काम करायचे. आई घरातच शिवणकाम. पाठीमागे अजून दोन भावंडं. तिला बीएससी करून मग बीएड करायचं होतं म्हणजे शिक्षिकेची चांगली नोकरी मिळाली असती. मला तिच्याशी बोलायला आवडायचं, पण ती लेक्चर्स सोडून एरवी कुठेही यायची नाही. अगदी चल कॅंटीनमध्ये कॉफी पिऊ म्हटलं तरी “नक्को” म्हणायची. परिस्थिती नव्हती हे मान्य आहे पण पाच पाच रूपयांच्या कॉफीकरता इतका विचार कशाला करायचा? आता मी काय फार करोडपतीची मुलगी नाही. पण तरी घरात पैशांचा काहीच त्रास नाही. मला रोजच्या रोज आई खर्चाला पैसे द्यायचीच. मग दोन कप कॉफीचे पैसे मी दिले तर काय प्रॉब्लेम, तर तेही हिला पटायचं नाही. “नक्कोच”
मी वैतागायचे तरी तिच्याशी बोलायचे. माझ्यापेक्षा ती खूप वेगळ्या लाईफस्टाईलमधली मुलगी होती. आईवडलांना लांब सोडून हॉस्टेलवर राहणारी ती एकटी मुलगी तेव्हा मला बिच्चारी वाटायची.  तिला स्वत:ला तसं कधी वाटायचं नाही. आपण आठवड्यांतून तीनदा एकच पंजाबी ड्रेस कॉलेजला घालतो, आपण रोज एकच चप्पल वापरतो, बॅगचा बंद तुटला तर तो चांभाराकडून शिवून तसाच वापरतोय यामध्ये तिला कधीही कमीपणा वाटायचा नाही. माझी एक बॅग रंग उडाल्यासारखी झाली म्हणून मी फेकेन म्हणाले तर लगेच “फेकू नकोस. इतकी फाटली नाही. मी वापरेन” असं स्वत:हून म्हणाली. त्या दिवशी मला गौतमीचं खरंच खूप आश्चर्य वाटलं. दुसर्‍याची वस्तू वापरणं मला कधीच सहन झालं नसतं, पण तिच्यासाठी “जर आपले पैसे वाचत असतील तर दोन तीन महिने वापरलेली वस्तू वापरण्यात काहीच हरकत नव्हती”. फालतूच्या इगोपेक्षा तिला प्रॅक्टिकल विचार करता येत होता. आयुष्यात एकदातरी आफताब आणि गौतमी भेटायला हवे होते. दोघंही काहीकाही बाबतीत कित्ती सारखेच होते आणि काही बाबतीत कित्त्ती वेगळे!!

कॉलेजचे पहिले सहा महिने इतके बोरिंग गेले पण नंतर गॅदरिंग आणि डेज चालू झाले. आता कॉलेज एकदम एक्सायटिंग झालं. महिनाभर सगळीकडे नुसते उत्साहाचे वारे का काय म्हणतात तेच. कॉलेजच्या समित्या बनल्या त्यामध्ये मी कशातही भाग घेतला नाही. जळ्ळं, मला काहीच येत नव्हतं. निधी ऑर्गनायझिंग कमीटीमध्ये होती. दिवाळीच्या सुट्टीत ती पुण्याला चार-पाच दिवस गेली होती. “आमचे एक परिचित आहेत, त्यांनी मला ही साडी दिली” परत आल्यावर निधीनं आम्हाला एक सोनेरी रंगाची झिरझिरीत साडी दाखवली. ही साडीडेला नेसणार होती. अर्थात हे परिचित म्हणजे आमच्याच बाजूला राहणारे चष्मीस सद्गृहस्थ हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल.. पण मलाच खूप उशीरानं समजलं. त्यांचा सीएचा रीझल्ट लागला होता. काहीतरी पहिली परीक्षा पास करून सध्यी कुठल्यातरी मोठ्या कार्पोरेटमध्ये इंटर्नशिप चालू झाली होती. आफताब महाशय “कमावते” झाले होते... तरीच डीझायनर साडी वगैरे!!!
कॉलेज डेजचा पहिला दिवस ब्लॅक ऍंड व्हाईट डे होता. मी आधीच बाबाला सांगून एक पांढराशुभ्र ड्रेस मागवला होता. दिल तो पागल है मध्ये माधुरीचे नेटेड ड्रेस होते ना, त्या टाईपमध्ये. ब्लॅक पर्ल्सचा सेट आणि हातात ब्लॅक क्लच. केस मुद्दाम मोकळेच ठेवले होते.
त्यादिवशी चाची पण म्हणाल्या, “गौरी, लेकीची नजर उतरव गं. सुभानअल्ला, आज परी दिसतेय”

कॉलेजमध्ये गेले तेव्हा अख्खं कॉलेज काय माझ्याकडे बघत राहिलं वगैरे काही झालं नाही. ते फक्त फिल्म हिरॉइन्ससोबत होतं. आज सगळ्याच जणी छान दिसत होत्या. काळी पॅंट आणि पांढरा शर्ट हा पोरांसाठी काय फारसा वेगळा ड्रेस नसल्याने ते सर्व नेहमीसारखेच चंपट दिसत होते. तशी आज लेक्चर्स फारशी नव्हतीच. इकडेतिकडे नुसते भटकत होतो. निधी कमिटीमध्ये असल्यानं ती बिल्ला लावून उगाच मिरवत होती. गौतमीनं साधाच ड्रेस घातला होता आणि त्यावर शोभत नसतानाही काळी ओढणी घेतली होती. डेजसाठी नवीन ड्रेस वगैरे घेणं तिच्या स्वप्नांतही आलं नसतं. ट्रॅडिशनल वगैरे साठी तर ती काही स्पेशल करणार नव्हती म्हणाली. माझ्या ड्रेसेस मधलं काही घालशील का तर नक्को!
बोरिंग असलं तरी ते लेक्चर एकदाचं संपलं.
“एक्स्युज मी,” मी वर्गामधून बाहेर पडताना दारात उभ्या असलेल्या एका मुलानं मला हाक मारली. “तुझं नाव स्वप्नील, राईट?”
मी मान डोलावली. हा मुलगा बहुतेक एस वायचा असावा.. वर्गामधली सगळी मुलं निघून जाताना त्यानं मला हातानं केवळ थांब असा इशारा केला. मी जरी थांबले तरी आता मला वर्गात यावरून चिडवलं गेलं असतं हे नक्की. वर्ग रिकामा झाल्यावर तो जरा दोन पावलं पुढे आला. “हाय,” तो जरा बिचकतच म्हणाला. “सॉरी, आपली आधीची ओळख नाही. पण झालंय असं की...”
मला निधीसोबत तिच्या डान्सची प्रॅक्टीस बघायला जायचं होतं. “लवकर बोला”
“माझी वर्गातल्या मुलांबरोबर पैज लागली आहे. तुला चॉकलेट द्यायची आणि... आणि... एनीवेज, मी केदार. बाजारपेठेमध्ये तुझ्या वडलांच्या दुकानाजवळचं आमचं स्वीट मार्ट आहे”
ओह, केदार मिठाईवाल्यांचा मुलगा. “मग?”
“प्लीज, हे चॉकलेट घेशील?” त्यानं हातामध्ये एक डेअरी मिल्क धरलं होतं. मी ते चॉकलेट घेतलं. तसंही मला कुठं खायचं होतं. “थॅंक्स. आज तू छान दिसतेस.”
“थॅंक्स. पण तुमची पैज नक्की माझ्यावरून का लागली? आय मीन, स्पेशल काय आहे?”
“स्पेशल काही नाही” तो एकदम गांगरला. “त्याचं काये की, आपली दुकानं जवळ असल्यानं वर्गातली मुलं मला चिडवतात. दॅट्स इट”
गोष्ट दॅट्स इट असण्याइतकीच नव्हती हे तर साफ होतं. कारण जर पैज लावलेली असती तर हा चॉकलेट देतो की मी त्याच्या कानाखाली मारते ते बघायला त्याचे मित्र आजूबाजूलाच घोटाळत राहिले असते.. तसं कुणीही दिसत नव्हतं. समोरचा मुलगा मी आधी एकदोनदा कधीतरी पाहिला होता. छान गोरासा, टिपिकल पिंगट केस आणि घार्‍या डोळ्यांचा. काळा कॉटनचा शर्ट आणि ऑफव्हाईट कलरची डेनिम. उलटंच कॉंबिनेशन, पण त्याला एकदम कातिल दिसत होतं.
“ओके” तो हसून म्हणाला. “बाय”
मी पण बाय म्हटलं. तो निघाला, आणि निघतानाच हलकेच मला ऐकू येईल अशा आवाजात कुजबुजला. “उद्यापण मी अशीच पैज लावली तर चालेल ना?”
“चालेल, पण मी चॉकलेट खात नाही.” मीही तितक्याच हळू आवाजात कुजबुजत म्हटलं.
“हरकत नाही, तसाही उद्या मिसमॅच डेच आहे”

(क्रमश:) 

Sunday, 10 April 2016

रहे ना रहे हम (भाग ६)

“म्हणजे तू आजही येणार नाहीस?” मी जॉयसला परत एकदा विचारलं. “मागच्याही आठवड्यांत तू आली नव्हतीस”

“फिजिक्सची असाईनमेंट कंप्लीट करायचीये.” जॉयसने चौथ्यांदा मला तेच उत्तर दिलं. वेदानं तर आधीच येणार नाही असं सांगितलं होतं. पूर्वी आणि रझिया परस्पर येणार होत्या. यशस्वी तिच्या स्कूटीवर आणि निधी माझ्यामागे.

नीरजच्या फ्लॅटवर आमची पार्टी ठरली होती. त्याचे आईबाबा गावाला गेले होते. प्रभात, इम्रान आणि सुयोग येणार होते. आता हे लोकं कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बरोबर आहे. हे सर्व आमच्या ग्रूपचे नवीन मेंबर्स. प्रत्येक कॉलेजामध्ये ओवाळून टाकलेली काही मुलं असतात. ही मुलं त्या कॅटेगरीमधली. हे मी आता सांगतेय,पण तेव्हा तरी हे सर्व फ्रेंड्स म्हणूनच होते! या सर्व ग्रूपमधला हीरो होता—वसीम. वसीम अख्ख्या ग्रूपची काय कॉलेजची शान होता. त्याची आणि निधीची ओळख कशी झाली माहित नाही, पण निधीमुळे आमची त्याच्यासोबत आणि त्याच्या सर्वच मित्रांशी ओळख झाली. इतके दिवस आम्ही मैत्रीणींचा ग्रूप मिळून क्वचित लेक्चर वगैरे बंक करून पिक्चरला जात होतो. आता ते नेहमीचंच झालं.
इथं मी थोडं असंही म्हणू शकते की घरामध्ये चालू असलेले आईबाबांच्या भांडणामुळे मी बहकले, पण तसं म्हणणं माझ्या आईवड्लांवर अन्याय करंण्या आहे. त्या दिवशीच्या प्रसंगानंतर आईनं आणि बाबानं सेपरेटली आणि दोघांनी मिळून मला खूप सांभाळून घेतलं. त्या दिवाळीच्या सुट्टीत खास केरळला फिरायला घेऊन गेले. बाबानं तर चक्क विमानाची तिकीटं बूक केली होती. माझ्या आयुष्यातला पहिलाच विमानप्रवास. मुंबई – कोची – मुंबई. आम्ही तिघंही दहा दिवस खूप मस्त फिरलो. एंजॉय केलं. बाबाच्या काहीबाही गमजा चालूच होत्या. आई पण एकदम खुश दिसत होती. या ट्रीपमध्ये आईनं पहिल्यांदा जीन्स घातली.
“नील्या, तुझ्यासमोर पहिल्यांदा बरंका. नाहीतर कॉलेजमध्ये असताना गौरी पॅंटी घालायचीच”
“बाबा, पॅंट्स म्हणकी. काहीतरी घाण अर्थ होतोय!” मी चिडून म्हणाले.
“बरोबर, बाबा  मराठी मीडीयमचा, लेक कान्वेंटातली” बाबानं परत मला चिडवून् घेतलं. आई जीन्समध्ये मस्तच दिसत होती. आईला मी इतकं खुश कधीच पाहिलं नव्हतं. दिवाळीची सुट्टी संपवून गावी परत आलो आणि कॉलेज परत चालू झालं. या सुट्टीमध्ये आफताब पुण्याला गेला होता, कसलासा कोर्स केला त्यानं.
कॉलेजमध्ये तर मी त्याला ओळख दाखवतच नव्हते, पण हल्ली तो घरीपण यायचा नाही. आला तरी बोलायचं काय असा प्रश्न पडलेला! दोघांमध्ये समान विषय काहीच नाहीत. अगदीच समोरासमोर भेटलो तर “बरी आहेस ना?” “चाची बर्‍या आहेत ना?” “अभ्यास कसा चालू आहे” (हा प्रश्न विचारणार केवळ आफताबच!)  बस्स इतकंच.

त्यामानानं हे नवीन भेटलेलं मित्रमंडळ फार भारी होतं. पिक्चर आणि क्रिकेट हे आवडते विषय. आम्हाला क्रिकेटमधलं काय कळायचं नाही पण मला गांगुली खूप आवडायचा, म्हणून मी क्रिकेट बघायचे. निधीला राहुल द्रविड आवडायचा, आणि इतर कुणाला तेंडुलकर. आमच्या ग्रूपमध्ये केवळ जॉयसला क्रिकेटमधलं टेक्निकल काय काय समजायचं, आम्ही बोलायला लागलो की ती मध्येच  “फ़ाईन लेगला फिल्डर ठेवला होता म्हणून तो आऊट झाला” वगैरे काहीतरी सांगायची. मग आम्ही तिची रीतसर चेष्टा करायचो. म्हणूनही असेल पण ती आमच्या ग्रूपमध्ये फार कमी येऊ लागली होती. निधीला तर ती आधीपासून आवडायची नाही. “खत्रूड दातपडकी आहे” असं ती कायम म्हणायची. खरंतर मला जॉयसच्या दात पुढे असण्यावरून केलेली चेष्टा आवडायची नाही, पण निधी म्हणते म्हणून मीदेखील म्हणायला सुरूवात केली.

“तुमी पोरी ना कदी टायमावर येत नाये” प्रभात आल्याआल्या आम्हाला म्हणाला. पार्टी म्हणजे काय? व्हीसीडीवर एखादा पिक्चर. बीअर, आणि असेच काहीबाही स्नॅक्स. वसीम असला तर एकदम मारधाड हाणामारी पिक्चर आणायचा, आम्ही व्हीसीडी भाड्यानं नेली की एकदम सॉफ्ट रोमॅंटिक पिक्चर. प्रीटी वूमन वगैरे टाईपमधले. मुलांना असले पिक्चर आवडायचे नाहीत खरंतर. पण आमच्या हट्टाखातर ते असले पिक्चर सहन करायचे. निधी दारू पिण्यात एक्स्पर्ट झाली होती. मी एकदोनदा बीअर पिऊन पाह्यली. यक्क. घाण चव. मी परत त्या वाटेला गेले नाही. पण वाईट सवय एकच लागली. सिगरेटची.

गेले पंधरा दिवस आम्ही सलग कॉलेज चुकवलं होतं. मी कॉलेजात येत नाही हे आफताबला शंभर टक्के माहित होतं, कुठे जाते हेही माहित होतं पण तो एका शब्दानं मला त्यावरून काही बोलला नव्हता. कॉलेजनं शेवटी आमच्या नावाच्या नोटीस काढून घरी फोन केले तेव्हा आईबाबाला समजलं की मी इतके दिवस कॉलेज बंक केलंय. सुदैवानं घरी केवळ मी मैत्रीणींबरोबर उंडारते इतकंच समजलं होतं.

आई मला खूप खूप ओरडली. बाबा काही बोलला नाही, पण म्हणाला की अकरावीचं वर्ष आहे. पण बारावीला अभ्यास करशील ना? मला खूप रडू आलं. मनात ठरवलं की आपण आता हे चुकीचं वागणं बंद करायचं, भरपूर अभ्यास करायचा. आईबाबा आपल्यासाठी इतकं करतात तर आपण चांगलं वागलं पाहिजे.
दुसर्‍या दिवशीपासून मी नियमित कॉलेजला जायला लागले. जॉयसला मुद्दाम घरी जाऊन भेटले आणि सॉरी म्हणाले. “माझा खूप अभ्यास चुकलाय, तू हेल्प करशील का?” असं विचारलं. तिनं लगेच तिच्या सगळ्या नोटस माझ्याकडे दिल्यापण.

माझ्या या “चांगल्या” वागण्याची सर्वात जास्त झळ पोचत होती ती निधीला. तिच्याकडे खर्च करायला पैसा कधी नसायचाच. आता मी सोबत नाही म्हटल्यावर तिचा पैशाचा हक्काचा सोर्स नाहीसा झाला. एकदोनदा ती मला घरी येऊन भेटली. मी तिला अशीच काहीबाही फालतू कारणं देऊन कटवली.
एकदा मात्र ती रविवारी सकाळी सातवाजताच आमच्या घरी आली. “स्वप्निल, मला तुझ्या केमिस्ट्रीच्या नोट्स हव्यात” असा बहाणा करून. मी माझ्या खोलीमध्ये येऊन वही शोधत होते. खरंतर तिला नॊट्स वगैरे काही नको हवं होतं, कारण माझ्या मागोमाग लगेच येऊन ती मला “प्रभातचा समुद्रकिनारी एक बंगला आहे आणि तिथं त्यानं वाढदिवसाला बोलावलंय” वगैरे काहीतरी सांगायला सुरूवात केली. आईबाबा मॉर्निंग वॉकसाठी गेले होते.

“मी येणार नाही” मी तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत सांगून टाकलं.
“अरे यार! क्यु बोअर कर रही हो? लेक्चर थोडीच बंक करायचेत. संध्याकाळी पार्टी आहे. घरी सांगूनच ये ना. इन फॅक्ट, तुझ्या बाबांना सांग की आपल्या सर्वांनाच सोडायला” निधी आपला हेका सोडत नव्हती. “वाढदिवसाची प्रॉपर पार्टी आहे. प्रभातचे आईवडील पण येणारेत”
“मग निमंत्रण प्रभातला करू देत की, तू कशाला पोस्टमन होतेस? तसंही मी येणार नाही...” आमचं बोलणं चालू असताना गडग्यावरून उडी मारून आफताब मागच्या दारांत आला.
“स्वप्निल! खुरपणी देशील का?” रविवार म्हणजे त्याचा बागेत काम करायचा दिवस. पहाटे उजाडल्यापासून काम करत होता, आता साडेसात पण वाजले नव्हते. तो घरात न येता बाहेरच थांबला होता, कारण हातापायाला सगळी चिखलमाती लागलेली होती. घामानं शर्ट अंगाला इकडेतिकडे चिकटलेला होता, बागेत काम करण्यासाठी म्हणून त्यानं पॅंट मुडपून गुडघ्याच्या वर सरकवली होती. डोक्याला एक फडका गुंडाळला तर आफताब “दहावीला शाळेत पहिला आलेला मुलगा” वाटण्याऐवजी “फलाण्या गड्याच्या हाताखाली काम करणारा पोर्‍या” वाटला असता.
“खुरपणी कशाला?”
“सरबतात घालून ढवळायला” हात चिखलानं भरले होते, म्हणून मनगटानंच डोळ्यावर आलेले केस मागे सारत तो म्हणाला. “खुरपणी कशाला वापरतात?” नेहमीच्या तुसडेपणानं त्यानं लगेच उत्तर दिलं. 
“तुझ्याकडे नाहीये? इतका वेळ बागेत काय गरबा खेळत होतास?” तुसडेपणांत हम भी कुछ कम नही!
“मोडली. दे लवकर. ऊन चढायच्या आत तणं काढून होऊ देत” याच्या पुढचं वाक्य बाय डीफॉल्ट “मला अभ्यास पण करायचाय” हेच असू शकतं पण तो पुढं काही बोलायच्या आधीच निधी म्हणाली. “हाय! तू आफताब ना?” तिनं शेकहॅंडसाठी हात पुढे केला.
“हाय!” तो दोन पावलं मागे सरकत मातीचे हात तिला दाखवत म्हणाला. “निधी. स्वप्निलची बेस्ट फ्रेंड”
“फ्रेंड” मी त्याच्या हातात कोनाड्यामधली खुरपणी देत म्हटलं. “ही माझी फ्रेंड आहे” निधीनं त्याच्या नकळत मला पाहून डोळा मारला. मला वाटलं, ती परत मला आफताबच्या नावानं चिडवतेय की काय. म्हणून मी तिला उगाचच कोपरानं ढोसलं.

ऍण्ड आय वॉज सो रॉंग!!!

आमचे दोघींचे एवढे सगळे इशारे होइपर्यंत आफताब बागेत निघून गेला होता. मी खोलीत परत येऊन केमिस्ट्रीची ती मुडदी वही शोधायला लागले, पण निधी मात्र मागच्या दारातून दिसणार्‍या आफताबकडे एकटक बघत होती...

निधी आणि आफताबच्या अजरामर प्रेमकहाणीचा तो पहिला दिवस होता.

>>>>>>>>>> 

निधी आणि आफताबची लव्हस्टोरी हा फार वेगळा विषय आहे. मला या स्टोरीची कायमच दोन व्हर्जन्स ऐकायला मिळाली आहेत. एक निधीकडून आणि दुसरं आफताबकडून. दोघांचीही व्हर्जन एकमेकांपासून भिन्न असल्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं हे मला आजवर समजलेलं नाही. निधीनं नंतर सांगितलं की त्या दिवशी ओळख झाल्यावर आफताब एकदोनदा तिच्या मागोमाग गेला आणि त्यानं दोन तीनदा तिला विचारलं- मग तिनं वैतागून हो म्हटलं. कदाचित निधीला माहित नव्हतं पण मी आफताबला ओळखून होते, जीव गेला तरी एखाद्या मुलीच्या पाठून आफताब गेला नसता. मी रात्री दोन वाजता त्याला माझ्या घरातून बाहेर काढलं तेव्हा केवळ “माझं चुकलं, मी असं वागायला नको हवं होतं” ही दोन वाक्यं म्हणून त्याला आमचं नातं वाचवता आलं असतं- पण तो तसं म्हणाला नाही. स्वत:कडे कसलाही कमीपणा न घ्यायचा त्याचा स्वभाव होताच- भले त्यासाठी मी दुरावले तरी चालेल. त्यामुळे त्याही वेळी निधी खोटं बोलत होती हे मला माहित होतं. आफताबच्या सांगण्यानुसार या लव्हस्टोरीमध्ये निधीनं त्याला योग्य ते ग्रीन सिग्नल दिले म्हणून त्यानं तिला जाऊन सरळ एकदाच काय ते  विचारलं तिनं लगेच हो सांगितलं. हे सत्य असावं असं मी मानायला तयार आहे. पण या स्टोरीमध्ये पुढं जी काय कॉम्प्लिकेशन्स घडत गेली-त्यातली अर्ध्याहून जास्त- माझ्या घरामध्ये ती मात्र एकता कपूरच्या मालिकेत शोभण्यासारखीच!! त्याबद्दल निवांत सांगेनच.

आफताब फ्लर्टी होता, पण त्याचं फ्लर्टीपण असं कट्ट्यावर बसून टवाळक्या करण्याचं कधीच नव्हतं. आफताबची प्रेमप्रकरणं चिक्कार झाली, प्रेमभंगही तितकेच झाले, पण त्यावरून एकदाही- ए क दा ही – त्यानं अभ्यासामधून लक्ष कमी केलं नाही. दिवसांतला ठराविक वेळ अभ्यासासाठी, वाचनासाठी आणि त्यातून वेळ उरलाच तर तो गर्लफ्रेंड्स (अनेकवचनच बरोबरे!!) करता.
मला हे पक्कं माहित होतं की निधीसोबत त्याचं अफेअर चालू होण्याआधी कुणाबरोबर तरी अफेअर होतं. त्याच्याच वर्गामधली ती मुलगी होती. दोनतीनदा मला आमच्या घरासमोरच्या बागेमध्ये गप्पा मारताना दिसले होते. मी त्याच्याशी त्या दरम्यान अजिबात बोलत नसल्यानं याबद्दल काहीच विचारलं नव्हतं. निधी-आफताब स्टोरीसुद्धा मला जवळजवळ दोन तीन महिन्यांनी समजली. ती पण रझियाकडून. निधीनं मला स्वत:हून काहीही सांगितलं नव्हतंच. मला जरी त्यांचं अफेअर आहे हे समजलं तरी जोवर निधी काही सांगत नाही तोपर्यंत मी हा विषय काढणारच नव्हते. अकरावी संपल्यावर लगेच बारावीसाठी व्हेकेशन बॅच चालू झाल्या. मी आधीच खूप अभ्यास करायचं असं ठरवलं होतं पण ते काय जमत नव्हतं. एकदाच, दोनदाच म्हणत परत माझं लेक्चर बंकिंग वाढलं होतं. अकरवीला जेमतेम सत्तावन्न टक्के मिळाले होते (खरेतर इतकेही कसे काय मिळाले याचं मला आजही आश्चर्य वाटतंय! मी काही म्हणजे काहीही अभ्यास केला नव्हता) वसीम, प्रभात वगैरे सर्व तर नापास झालेच होते. त्यांनी अकरावी रीपीट करण्याऐवजी बाहेरून सतरानंबरचा फॉर्म भरून परीक्षा द्यायचं ठरवल्यानं त्यांना कॉलेज ही भानगड उरलीच नव्हती. एकदा आईला माझ्या बॅगेत सिगरेटचं पाकिट मिळाल्यामुळे माझी ही सवयसुद्धा घरी समजली होती. दुसरी एखादी आई असतीतर तिनं लेकीला झोडून काढलं असतं, पण माझ्या आईनं मला सरळ दवाखान्यात नेलं. डॉक्टरकाकांनी मला सिगरेट आणि त्याचे दुष्परिणाम वगैरे बरंच काही ऐकवलं. मी ऐकून घेतलं. सिगरेट आजपासून ओढायची नाही असं मनातून पक्कं ठरवलं. माझे कुठलेच निश्चय फारसे टिकत नाहीत ही गोष्ट तेव्हा मला माहित नव्हती.


दवाखान्यामधून घरी येत असताना मला समोरून बाबाची कार येताना दिसली, आई माझ्या मागेच स्कूटीवर बसलेली होती पण तिचं लक्ष नव्हतं. पण मला बाबाची कार लगेच ओळखू आली, बाबाचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. बाजूला बसलेल्या बाईबरोबर त्याचं काहीतरी हसत बोलणं चाललं होतं. तीच बाई!! कशीबशी स्कूटी घेऊन घरी आले. माझ्या खोलीमध्ये येऊन दार घट्ट बंद केलं. बाबा तिच्यासोबत राजरोस फिरतो हे मला आजच समजलं नव्हतं. पण दिसलं मात्र पहिल्यांदाच होतं. बाबा जसा माझ्यासमोर आईसमोर हसत असतो, तसाच तिच्याहीसमोर. आज खूप दिवसांनी वाटलं की बाबा फक्त माझाच नाहीये... त्याला शेअर करणारं अजून कुणीतरी आहे. असणार. असायलाच हवं. बाबाला या बाईबरोबर दुसरा संसार वसवून नक्की किती वर्षं झाली होती कुणास ठाऊक?
घरी आल्यावर आईनं चहा करून दिला, मी पीसीवर गेम खेळत बसले.
“स्वप्निल, मी जरा भाभींकडे जाऊन येते. त्यांना थॊडं अस्वस्थ वाटतंय म्हणे. बसशील ना एकटी?” थोड्यावेळानं आईचा बाहेरून आवाज आला. डोळ्यासमोरून बाबा आणि त्याच्या बाजूला बसलेली ती बाई नजरेसमोरून जाईना. मी काहीच न सुचून माझ्या कपाटामधून एक सिगरेट काढली आणि पेटवली. दोन तीन कश मारल्यावर अस्वस्थता थोडी कमी झाली, कमी झाली तरी पूर्णपणे गेलीच नाही. खड्ड्यात गेले ते दुष्परिणाम. कितीतरी वेळ मी खोलीत बसून सिगरेट्स ओढत राहिले.
दारावर जोरात मारलेल्या थापा ऐकू आल्या तेव्हा मला दार उघडावंसं वाटतच नव्हतं. पीसीवर इंटरनेट लावून मी विनाकारण याहू ग्रूपमध्ये चॅटींग करत बसले होते. शेवटी आफताबचा आवाज खिडकीजवळून आला. “स्वप्निल. दार उघड!” माझ्याच खोलीच्या खिडकीपाशी येऊन त्यानं हाक मारल्यावर माझा नाईलाज झाला. आई आणि चाची हॉस्पिटलात गेल्या होत्या. आफ़ताबला आमच्या घरी बसायचा निरोप ठेवला होता.
“काहीतरी जळतंय” हॉलमध्ये त्याची बॅग ठेवत तो म्हणाला.
“बाहेर कुणीतरी रान पेटवलं असेल” मी डोळ्यांवर चष्मा ठेवत उत्तर दिलं पण माझ्या उत्तराची वाट न बघता आफताब सरळ माझ्या खोलीत आला होता, आणि त्यानं टेबलावर ठेवलेली सिगरेट विझवली. “सनमायका होतं म्हणून लाकूड पेटलं नाही” तो म्हणाला. “ऍश ट्रे वापरत नाहीस का?” मी सिगरेट ओढते, अथवा कधीपासून ओढते वगैरे त्यानं काहीच विचारलं नाही.
“आई आणि चाची कधी येतील?” मी विचारलं.
“माहित नाही. हॉस्पिटलला फोन करतो” त्यानं चाची कायम ज्या डॉक्टरकडे जात होत्या त्यांना फोन करून विचारलं. दोघी अजून हॉस्पिटलमध्येच होत्या, अजून डॉक्टर आलेच नव्हते म्हणे.
“चहा करतेस?” त्यानं फोन ठेवत मला विचारलं.
“आईनं करून ठेवलाय तो गरम करून देते” त्याला असा परतपरत गरम केलेला चहा खरंतर अजिबात आवडत नाही, हे मला माहित होतं पण मला परत चहा करायचा नव्हता. त्यानं बॅगमधून बिस्कीटांचा पुडा काढून खायला घेतला तरी मी घरामधून त्याला जेवायला अथवा खायला दिलं नाही. सकाळी सहाचं कॉलेज त्यानंतर ट्युशन आणि मग आता यावेळी रोज घरी येऊन जेवायचा. हे मला माहित होतं, माझा काही त्याच्यावर राग नव्हता. पण मी माझ्याच विश्वामध्ये गुरफटले होते, बाबा आणि त्याची ती बाई! आफताबला नक्की काय होतंय ते विचारण्याइतकी माझी मन:स्थिती नव्हती.
“तुझा अभ्यास कसा चालू आहे?” त्यानंच विचारलं.
“ठिक”
“ट्युशनला तर नीट जात नाहीस. लेक्चरला पण नसतेस. मग अभ्यास ठीक कसा चालू आहे?” त्यानं थेट विचारलं. तेव्हा मी इतकी बुद्दू होते की, हे सर्व काही आफताबला निधीकडून समजत असेल हे मला माहितच नव्हतं, कारण निधी आफताब ही स्टोरीच तेव्हा मला समजली नव्हती.
“म्हटलं ना ठिक चालू आहे. बारावी पास होइन” मी आई-बाबाला जितक्या मग्रूरीनं उत्तर द्यायचं तश्याच टोनमध्ये त्याला उत्तर दिलं.
“गूड. बारावीचा रीझल्ट लागेपर्यंत तुझा बर्थडे झाला असेल ना? अठरा पूर्ण होतील. मग लग्न करून टाकू”
“काय्य्य्य?” मी चमकलेच.
“आपण बारावी झाल्यावर चांगलासा मुलगा बघून तुझं लग्न करून टाकू. तुझं टोटल एमच बारावी पास होणं इतकं आहे, तर मग पुढं शिकतेस कशाला?”
“ते माझं मी बघून घेईन. तुला चिंता नको”
“कुणावर चिडतेस?” त्यानं हातातला चहा एका घोटात संपवला. “माझ्यावर? मी काय केलंय?”
“मी तुला काही म्हटलं का?”
“सिगरेट ओढत असताना मला समजणार नाही असं वाटलं? अरिफभाई रोज माझ्यासमोर तर सिगरेट ओढायचा, मी पण एकदोनदा ट्राय केलंय”
“त्याचा इथं काय संबंध? तू सिगरेट ओढलीस तर चालतं कारण तू मुलगा आहेस, राईट? बॉय्जना सगळंच अलाऊड असतं”
“बॉय आणि गर्लचा प्रश्नच कूठं येतो? आणि मी तुला सिगरेट ओढू नकोस असं म्हटलं तरी आहे का? इन फ़ॅक्ट अभ्यासाला बसायच्या आधी सिगरेट ओढली तर रात्रभर अभ्यास होतो, हे सांगतोय!”
“काय्य? अभ्यास!!! आफताब, तुझ्याकडे अजून काही विषय नाहीत का रे?”
“विषय बरेच आहेत, पण तुझ्याशी काय बोलणार? तुझा आणि अभ्यासाचा काही संबंधच राहिला नाही. प्रभात वसीम वगैरे नालायक पोरांबरोबर फिरतेस...”
“तुला कसं माहित?”
“कारण, मी मूर्ख नाहीये. गावात काय होतं ते सर्व मला समजतं. तुला एक गोष्ट सांगू की नको असा विचार करतोय...”
“कसली गोष्ट?”
“वसीमनं सर्वांना सांगितलंय की तू त्याला पटलीयेस.”
“काहीही. तो त्या निधीमागे लाळ गाळत फिरत असतो. इन फॅक्ट मला तर वाटतं की निधी अणी तो...”
“निधीचं त्याच्याबरोबर काही नाहीये” अचानक उसळून तो म्हणाला. “पण तुझं आणि वसीमचं अफेअर आहे, आणि तुमचं सर्व काही झालंय... असं तो सर्वांना सांगतोय”
“सर्व काही झालंय म्हणजे?”
“म्हणजे सर्व काही... समजत नाही का तुला? तू वसीमबरोबर..”
“माझं आणि त्याचं काहीच नाही”
“स्वप्नीलबाळा, हे मलासुद्धा माहित आहे, पण तो लोकांना खोटं सांगत फिरतोय... की त्यानं तुझ्याबरोबर...कळ्ळं का?” सीरीयलमधल्या खाष्ट सासूसारखा आफताब माझयवर खेकसला.
“मग मी काय करू? तो खोटं बोलत असेल तर..”
“कळत कसं नाही तुला? च्यायला, हा अरिफभाई इथं हवा होता. त्यानं तुझ्या डोक्यात बरोबर अक्कल ओतली असती...”
“तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट सांग,”
“तो केवळ तुझं आणि त्याचं प्रेम आहे असं सांगत नाही. तू अव्हलेबल आहेस असं सांगतोय. थोडक्यात तुझं कॅरेक्टर खराब आहे असं सांगतोय. समजलं?”
“काहीही. उगाच काहीही सांगतोस.” तेव्हा मी जरी आफताबवर चिडले असले तरी ही गोष्ट मनाला खूपच खोल टोचली होती. माझं कॅरेक्टर खराब? मी वसीमबरोबर भेटणं बोलणं याखेरीज काहीही केलं नव्हतं एकटी स्वत:हून तर कुठं त्याला भेटले पण नव्हते. त्यानं माझ्याबद्दल असं बोलावं? आणि तेव्हा माझ्या मंद बुद्धीमध्ये एक गोष्ट अजून पेटली नव्हती की या गोष्टी पसरवण्यात हातभार लावत होती ती निधी.
“नाही सांगत! फक्त तू माझी शेजारी आहेस, आपण एकत्र अभ्यास करतो म्हणून काळजीनं सांगितलं, मला माहित आहे तू असं काही वागणार नाहीस... पण बदनामी फार लवकर होते. आणि एकदा बदनामीचा डाग लागला की तो पुसला जात नाही..”
“मुलींचीच बदनामी का होते?”
“मला माहित नाही. पण बदनामी कशीही झाली तरी मुलींनच ती सोसावी लागते, म्हणून मग..”
“मुलींनीच नीट राहिलं पाहिजे, त्यांनीच संस्कारी बनलं पाहिजे”
“एक्झाक्टली, आणि ते जर जमत नसेल तर येणार्‍या प्रत्येक बदनामीला झेलण्याइतकं स्ट्रॉग असलं पाहिजे. दोनपैकी तुला काय जमतंय ते कर.”
“आफताब, तुलापण असंच वाटतंय का रे? की मी...”
“स्वप्नील, तू खूप हुशार मुलगी आहेस, दहावीला थोडासा अभ्यास करून तुला इतके मस्त मार्क्स मिळाले होते. आता बारावी आहे. चांगले मार्क्स मिळव, सुदैवानं तुझे आईवडील तुझ्या शिक्षणासाठी कितीही पैसा खर्च करू शकतात. शिकलीस, स्वत:च्या पायावर उभी राहीलीस त जगामधला प्रत्येक निर्णय स्वत: घेऊ शकशील. कुणाच्या कुबड्या घ्यायची गरज राहणार नाही. मस्तीमजा करूच नको मी म्हणत नाही, पण त्याचं प्रमाण थोडकंच ठेव” आफताब मला अक्षरश: काळजीनं समजावत होता.
“मला अभ्यास करावासाच वाटत नाही...”
“कारण, तू मन लावून करत नाहीस. थोडंसं लक्ष दे, तुला काय आवडतं ते बघ आणि मग अभ्यासात लक्ष लागेल. प्लीज.. माझी फ्रेंड आहेस म्हणून सांगतोय... असं वागत जाऊ नकोस”
मी काही उत्तर द्ययाच्या आत गेट वाजलं. आई आली होती, येताना माझ्यासाठी वडापाव आणि अजून काही खाऊ आणला होता.
“अरे, तू पण इथंच आहेस का?” आफताबला बघून ती म्हणाली. “चला, गरम चहा करते. खाऊन घ्या. आणि आफताब, आज जेवयाला पण इथंच ये, भाभींना डॉक्टरांनी ऍडमिट केलंय. बीपी नॉर्मल होइपर्यंत”
आफताबनं केवळ माझ्याकडे हसून पाहिलं. “गरम चहाची गरजच आहे सध्या, काकी. स्वप्नील आणि मी अभ्यासालाच बसत होतो”
परत एकदा, आफताब रोज माझ्याकडे अभ्यासाला येऊ लागला. आमचे विषय कॉमन नव्हते पण केवळ मी रेगुलर अभ्यास करावा म्हणून तो सोबत येऊन बसायचा.
ही गोष्ट जेव्हा निधीला समजली तेव्हा तिचं आणि आफताबचं भांडण झालं म्हणे, अर्थात मला यांचं अफेअरच असलेलं माहित नसल्यानं भांडण समजायचा प्रश्नच नव्हता.
>>>>>>>>

बारावीचं वर्ष त्यामानानं फार शांत गेलं.  वसीमचं समजल्यापासून मी त्या ग्रूपमध्ये जाणं बरंचसं बंद केलंच होतं. निधीपण फारशी जायची नाही (हा आफताब इफेक्ट असावा) मी जॉयससोबत नियमित ट्युशनला जायला सुरूवात केली. वसीमला एकदा भेटून तो माझ्याबद्दल अशा अफवा का पसरवतो याचा जाब विचारला, तेव्हा त्यानं “मै किसीको कुच नही बोला. सब मेरेको तेरे नाम से टीज करते है. पर मेरे मनमे ऐसा कुच नही” असा राग आळवायला सुरूवात केली. परत माझ्याबद्दल काही बोलूनच बघ, माझ्या बापाला सांगून नाही तुझी हाडं मोडून ठेवली तर याद राख असा त्याला दम दिला.
कुणाचीही हाडं मोडणं हे बाबाचं तसंही आवडतं काम. आई सांगते की बाबा शाळाकॉलेजमध्ये असताना एकदम गुंड होता. अमिताभ बच्चन स्टाईल मारत गावभर मारामारी करायचा. आता स्वत: मरामारी करायचा नाही, पण वेळ आली तर नक्की केली असती. शिवाय गावामधले सगळे “दादा” लोकं त्याच्या फेवरमध्ये आधीपासून होते. थोडक्यात वसीम प्रकरण तिथंच निस्तरलं म्हणून बरं झालं.
एके दिवशी खोलीत पीसीवर गेम्स खेळत होते तेव्हा खूप ओळखीचा आवाज ऐकू आला. लगेच पीसी बंद करून मी गडग्यावरून उडी मारून आफताबच्या घरी गेले, किचनमध्ये डायनिंग टेबलावर जादू बसला होता.
“कधी आलास? सांगितलं का नाहीस?” मी दारातूनच विचारलं.
“आता जस्ट आलोय. मागे चॅटवर मी म्हटलं नव्हतं का... सुट्टीला महिन्याभरात येईन”
“आज येशील हे माहित नव्हतं. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईझ” जादूला बघून खरंच सरप्राईझ वाटलं होतं. मागच्यावेळी जादू आला तेव्हा अरिफचं सावट होतं. चुकूनमाकून त्याच्यासोबत हसायलाही कसंतरी वाटत होतं, जणू अरिफच्या आठवणींचा अपमान केल्यासारखं, पण काळ सगळ्यात मोठा गेमचेंजर असतो. अवघ्या दीड वर्षांत अरिफ आठवणींमधून धुसर होत चालला होता. जादू आधीसारखाच दिसत होता, मागच्यावेळेपेक्षा अधिक ताजातवाना, अधिक प्रगल्भ वगैरे.
“तुझ्यासाठी गेम्स आणलेत. नंतर काढून देईन. चॉकलेट्स तू खाणार नाहीस, म्हणून ड्रायफ्रूट्स आणलेत” तो बॅगेमधून काहीबाही काढत म्हणाला.
“ते नंतर उपस,” चाचींचा आवाज आला, “आधी चा घे, मग गार झायली की परत मलाच काम” चाचींनी मलापण चहा आणि बशीमध्ये चिवडा दिला. चाचींची तब्बेत  अजून नरमगरमच असायची, पण जादू आलाय म्हटलं की त्या एकदम खुश दिसत होत्या. .
“छोटे मियां कधी येणार?” त्यानं विचारलं.
“दुपारनंतर. तू जेवून नीज. तवर तो येईल” चाची काम करत असतानाच म्हणाल्या. जादूनं माझ्याकडे बघून उगाच डोळा मारला. “आता यावेळी झोपेल कोण?” असं म्हणत असल्यासारखा.
“कॉलेज एकदम सूट झालंय. मस्त दिसतेस” तो म्हणाला.
“रंग पण उजळलाय पोरीचा” चाचींनी मध्येच म्हणाल्या. हे खरं होतं. बारावी सुरू झाल्यापासून सर्व म्हणायचे की, मी गोरी दिसतेय. “रब्बिश, ऍनिमीक दिसतेस. हिमोग्लोबिन चेक करून घे,” आफताब म्हणायचा.. याच्या नानाची टांग.
जादू मात्र निव्वळ हसला. मग बराच वेळ बसून मी आणि जादू कशाबशावर बोलत बसलो. जुन्या गाण्यांच्या आवडीचा विषय होताच. शिवाय काही नवीन गाणी... नवीन चित्रपट. जादूबरोबर बोलताना अभ्यासाच्या व्यतीरीक्त बोलायला इतरही काही असायचंच. कुठले कुठले नवीन पिक्चर बघितले आणि आवडले त्यावर आमची चर्चा चालू झाली.
“मला शेवट बिल्कुल आवडला नाही” मी त्याला ठणकावून सांगितलं.
“का?”
“तिचं जर त्याच्यावर प्रेम नव्हतंच, किंवा आता नवीन भेटलेल्या नवर्‍यावर प्रेम होतं तर तिनं त्याला भेटावंच कशाला? तो तिच्याशिवाय जगत होताच ना... मग मुद्दाम त्याला त्याच्या गावात जाऊन हुडकून काढून “आता मी तुझ्यावर प्रेम करत नाही” हे सांगायचं कशाला? आणि त्याला इतकं रामायण ऐकवण्यापेक्षा त्या नवर्‍याला चल आपण घरी जाऊ, हे सांगता येत नाही का?”
“कदाचित तिला मनातल्या भावना इझीली सॉर्ट आऊट करता आल्या नसतील”
“का नाही? प्रेम आहे किंवा नाही हे सांगता येणं इतकं कठिण आहे का?”
“त्यासाठी आधी प्रेम म्हणजे काय ते प्रत्येकाला समजायला हवं ना...”
“म्हणजे?”
“प्रेमाची जी व्याख्या तुझ्यासाठी, तीच माझ्यासाठी असं नसतं ना.. कदाचित जी भावना तुझ्यासाठी प्रेम असेल ती माझ्यासाठी मालकीची भावना असेल, आणि मला जे प्रेम म्हणून वाटतंय ते तुला वासना वाटू शकते. प्रेम व्यक्तीगणिक बदलतं, प्रत्येक व्यक्तीसाठी बदलतं” जादू त्याच्या नेहमीच्या शांत सुरात मला समजावत म्हणाला.
“तू मला कन्फ़्युज करतोयस”
“मग तू कन्फ़्युज होऊच नकोस. ठामपणे एखाद्यावर प्रेम कर.  ऍक्चुअली प्रेमावरच्या या डिस्कशनमध्ये आमचे छोटे मिया असायला हवेत ना?” चाचींचं लक्ष नाहीये ते बघून जादू मला हळूच म्हणाला. “इथं आल्यापासून चारेक तासांत त्याचेच कारनामे ऐकतोय. फारच फास्ट प्रोग्रेस आहे” जादू हसत म्हणाला. मी काही उत्तर देण्याआधीच “ही पोर इथं येऊन बसली का?” आईचा दारात आवाज आला, “मी समजतेय इतकावेळ कंप्युटर खेळतेय. इकडे आलीस हे सांगता येत नाही का गं?”
“तू टीव्ही बघत होतीस म्हणून सांगितलं नाही.”  मग आईचा आणि अझरचा कधी आलास कधीपर्यंत आहेस, मग चाचींसोबत कविता आली नाही का जेवायला काय, वगैरे संवाद सुरू झाला.
आईसोबतच मीपण घरी आले. जादू आला होता, किती खुशीची बात होती. तसा तो वर्षातून एकदाच सुट्टीला यायचा, पण त्याच्या येण्याचा आनंद यावेळी मला जास्त झाल्यासारखा वाटत होता.
जादू येऊन दोनच दिवस झाले होते पण आमची अख्खी गल्ली खुश झाली होती.
“स्वप्नील, मी दुकानावर जातेय. यतिनला थोडी मदत हवी आहे” दिवाळीचा सीझन जवळ आला होता, दुकानामधला नवीन माल वगैरे लावायचा होता. आईनं मला तरीही हट्टानं विचारलंच. “एकटी राहशील की माझ्यासोबत येशील?”
मला दुकानात जायला एरवीच कधी आवडायचं नाही. मी घरी बसून अभ्यास करेन असं आईला सांगितलं. “अभ्यासच कर, गेम खेळू नकोस” आईनं दटावणी दिली. मी फिजिक्सच्या नोट्स काढून वाचत बसले. बायो माझ्या अतिव आवडीचा, केमिस्ट्रीपण जमायचं, पण फिजिक्ससोबत मात्र कुस्ती खेळावी लागायची. अजिबात समजायचं नाही अशातला भाग नाही, पण समजून घ्यायला कष्ट पडायचे हे मात्र खरं. अभ्यास करताना सहज म्हणून रेडीओ लावला होता त्यावर कसलंतरी भाषण चालू होतं,  ते कानावर पडत होतं, पण मेंदूपर्यंत काय जात नव्हतं. अचानक ते भाषण थांबलं, म्हणजे संपलं असणार पण माझ्या कानावर अचानक पडला तो रफीचा आवाज- ऐसे तो ना देखो, के हमको नशा हो जायें.
हातातलं पुस्तक आपोआप बाजूला ठेवलं, जादू म्हणतो तेच खरं आहे, हा आवाज चमत्कारच आहे. किती मधाळ, रोमॅंटिक आवाज. त्याच मधाळपणाला आलेला हलकासा नशा. “खूबसूरतसी कोइ हमसे खता हो जाये” रेडीओचा आवाज चढवला.. कदमे नाझपे इक सजदा अदा हो जाये....
डोळ्यांसमोर घाटामध्ये उतरत असलेलं धुकं यायला लागलं... गाणं संपलं आणि आकाशवाणीनं आपला सेन्स ऑफ ह्युमर दाखवण्यासाठी लगोलग दुसरं गाणं लावलं शब्बीरकुमारच्या रेकत्या आवाजात. लगेच रेडीओ बंद केला. कानात रफीचा आवाज अजून गुणगुणत होता. अचानक डोळ्यासमोर जादू उभा राहिला. हे गाणं गुणगुणत असताना, माझ्या एकदम कानाजवळ. अख्ख्या अंगामध्ये कसलीतरी अस्वस्थता पसरून राहिली. एरवी असं  अस्स्वस्थ वाटलं की मी सरळ सिगरेट ओढत  असायचे, आज सिगरेट नको हवी होती, दुसरंच काहीतरी हवं होतं, काय ते माहित नव्हतं.
“मस्त दिसतेस” जादू मघाशी मला म्हणाला होता, ते अचानक आठवलं. वर्षभरानंतर त्यानं मला आज पाहिलं होतं. मी मस्त दिसतेय म्हणजे काय... आरश्यासमोर उभी राहिले. गेल्या वर्षभरामध्ये मी बरीच बारीक झाले होते. आधीचे चब्बी चीक्स आता गायब झाले होते. केस कापल्यामुळे चेहर्‍याचा शेप बराच बदलल्यासारखा वाटत होता. डोळ्यावरचा चष्मा काढला, माझे डोळे काळे नव्हते, पिंगटही नव्हते, वेगळाच रंग होता. कसा होता... माहित नाही.
अंगावरचे कपडे मीच काढत गेले. पहिल्यांदाच आरश्यामध्ये स्वत:ला अशी बघत होते. एरवी शॉवर घेताना वगैरे पाहिलं असेल... पण आज केवळ मी कशी आहे ते पाहण्यासाठी..
मी सुंदर आहे का? माहित नाही. मी कुणाला आवडू शकते का? माहित नाही. मी जादूला आवडू शकते... मनात अचानक विचार आला. डोळ्यासमोर जादू दिसायला लागला, फार दूर नव्हताच, इथं माझ्या खोलीपासून अवघ्या काही फुटांवर जादू होता, पण तरीही तो खूप हवाहवासा वाटायला लागला. अगदी नक्की कसा हवा आहे हे समजण्याइतका. घरी आई नसताना मी आणि निधी, यशस्वी वगैरेंनी मिळून दोनतीनदा ब्लूफिल्म्स पाहिल्या होत्या. ते बघत असताना हे असलं सगळं करणं किती घाण किळसवाणं वाटलं होतं. यशस्वीनं तर त्यादिवशी स्पष्ट सांगितलं हे असलं सर्व काही अजिबात करणार नाही. मलाही थोडंफार तसंच वाटलं होतं. शाळेमध्ये नववीला असताना सेक्स एज्युकेशन सेमिनार झाला होता, पण त्यावेळी हे इतकं काही वाटलं नव्हतं. आज मात्र स्पष्टपणे हवंहवंसं वाटायला लागलं. तेही जादूसोबत. जादूचा प्रेमळ आवाज, त्याच्या श्वासांना येणारा खास त्याचा गंध, त्याचा थंड तरीही ऊबदार वाटणारा हात, त्याचा कळत नकळत जाणवलेला स्पर्श सगळं सगळं सगळं मनात भिरभिरायला लागलंय..
मी कुठल्यातरी वेगळ्याच धुंदीत होते, आणि ही धुंदी क्षणाक्षणाला वाढत होती. मला त्यावेळी त्या क्षणी केवळ जादू आपल्यासोबत हवा, त्याच्या हातांमध्ये आपलं अस्तित्व कुस्करून जावं इतकंच वाटत राहिलं... कितीतरीवेळ मी त्या लाटांमध्ये पोहत राहिले, अखेर मनामध्ये कुठ्लंतरी एक कारंजं उसळी मारून वर आलं, आणि थबकत राहिलं, मग अजून एक कारंजं.... शेवटी प्रचंड दमले... मघाच्या धुंदीपेक्षाही वेगळीच ग्लानी अंगाभोवती वेढून आली, इतकावेळ शरीराच्या पेशींपेशीमध्ये गोठलेली ती अस्वस्थता निघून गेली आणि त्याऐवजी लालसेची, समाधानाची वेगळीच पुटं चढत राहिली.
मी एकटीच बेडवर पडून राहिले. जादू... हलकेच तोंडातल्या तोंडात पुटपुटले.
मग प्रचंड शरम मनात भरून आली. मी असा विचार अझरभाईंबद्दल कसा काय करू शकते? तो मला बहिण मानतो, किंवा खरंतर अजून लहान मुलगी मानतो आणि मी मात्र, त्याच्यासोबत सेक्स करण्याच्या कल्पनांमध्ये गुंतले होते....


संध्याकाळी स्कूटीची चावी मागायला जादू घरी आला, अख्खी दुपार मी त्याचाच विचार करण्यात घालवली होती, पण तो समोर आल्यानंतर दुपारच्या त्या कल्पना  डोक्यात आल्यासुद्धा नाहीत. त्याच्याबद्दल प्रचंड आकर्षण वाटत होतं हे खरं होतं, पण ते सर्व मनामध्ये, त्याच्यासमोर कधीच नाही. मला जे वाटतं ते त्याला कधीच सांगितलं नाही, कधी गरजच भासली नाही.

Tuesday, 5 April 2016

MAD-रास ५

चेन्नईमध्ये आल्यापासून मला माझे मित्रमैत्रीणी बर्‍याचदा हा प्रश्न हमखास विचारतात. “तिकडे हिंदी अजिबात बोलत नाहीत, मग तुझं कसं निभावतं?” यावर उत्तर: माझं अतिशय उत्तमरीत्या निभावतं.

आपल्याला हे ऐकून माहित असतं की दाक्षिणात्य राज्यांमध्ये त्यांच्याच भाषा बोलाव्या लागतात, अन्यथा ते लोकं फार त्रास देतात. हे एका बाजूने बरोबर आहे आणि एका बाजूनं नाहीसुद्धा. दाक्षिणात्यांना हिंदीचा इतका राग आहे कारण त्यांच्यासाठी ती भाषाच पूर्णपणे परकी आहे आणि याच भाषेची सक्ती त्यांच्यावर केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या मराठी भाषिकांना हिंदी फार सोपीची वाटते, तसं त्यांना वाटत नाही.


चेन्नईमध्ये आल्यानंतर आठेक दिवसांत मुंबईच्या सवयीने बाहेर बर्‍याचदा दुकानांतून वगैरे आपसूक हिंदी बोललं जायचं,  ते हिंदी बोललं काय आणि मराठी बोललं काय फारसा फरक पडणार नाही हे लक्षात आलं. लहानपणापासून घरात कानडी असल्याने आणि मंगळूरला दोन वर्षं काढल्याने कानडीची सणसणीत सवय होती. मग इकडे बाहेर सर्रास कानडीमधूनच बोलायला सुरूवात केली. अजिबात काही कळत नाही यापेक्षा किमान काय तीस चाळीस टक्के समजतंय तितकं तरी पुरेसं! कानडी तमिळ भाषा बर्‍यापैकी जवळच्या आहेत पण एकदा तमीळसाठी कान तयार झाला की मराठी-तमिळ-कानडी अशा तिन्ही भाषांमधल्या शब्दांची गंमत मला तरी घेता येते.


साधारण बर्‍यापैकी चांगल्या दुकानांमधून अथवा शेजार्‍यांबरोबर फार मोठा प्रश्न आला नाही. बहुतेक सर्वजण इंग्रजी माध्यमात शिकलेले असल्याने इंग्रजी झिंदाबादचा नारा देता आला. ज्यांना अजिबात इंग्लिश येत नाही अशा “काकू आंटी” वगैरेंच्या मुलांनी भाषांतरकाराचं काम केलं. ती मुलं नसली की काकू तमिळमध्ये मी इंग्लिश-कानडीमध्ये असा संवाद चालू झाला. एकंदरीत बोलायचंच असेल तर भाषेचा अडथळा कधी येत नाही, आणि बोलायचंच नसेल तर कितीही समान भाषा असली तरी संवाद साधला जात नाही, हेच खरं. आमच्या घरासमोरच एक मारवाडी फॅमिली राहते. गेली वीस वर्षे इथंच राहत असल्याने त्यांचं तमिळ उत्तम आहे, शिवाय हिंदी समजतं. त्या भाभींनी मला खूप मदत केली.

रोजच्या वापरामधले शब्द  मी एका वहीमध्ये लिहून ठेवले. वाणसामानाची नावं, फळं भाज्यांची नावं. मराठी तमिळ हिंदी कानडी अशी सापड्तील त्या भाषेमध्ये लिहून ठेवत गेले. आकड्यांचा फारसा प्रश्न आला नाही. मला तमिळमधले वर,रंडं, मुणं, नालं हे आकडे आधी पासून येत होते. पुढचे आकडे मी कानडीमधून बोलायचे. ते थोडेफार सारखेच आहेत. कानडीमधला “ह” इकडे “प” होतो. कानडी “हत्त” तमिळ पत्त (दहा), हन्नोंद-पन्नोंद (अकरा), हन्यार्ड-पन्यार्ड (बारा) असे आकडे लक्षात ठेवले. पण बर्‍याचदा पायांत पाय अडकवून तोंडघशी पाडलं ते “पांज” ने. बहुतेकदा दुकानामध्ये समोरच्याने “पांज रूपया” सांगितलं की मी पाचचं नाणं काढून द्यायचे. समोरचा माझ्याकडे “कहांकहांसे आते है” टाईप लूक द्यायला. “इन्न पत्त कोडी”. मग कानडीमधून “पाच रूपये म्हणालात ना?” समोरून तमिळमध्ये “आमा, पांज” (ज चा उच्चार “च” आणि “ज” मधला) मग लक्षात यायचं त्याला पंधरा रूपये म्हणायचं आहे. निमूटपणे अजून एक दहाची नोट द्यायची. मागे  रत्नागिरीमध्ये लिंबं घेतल्यावर ती बाई “पाच द्या” म्हणाली. मी पर्समधून मोजून पंधरा रूपयाचे सुट्टे दिल्यावर त्या बाईनं परत मझ्याकडे “कहांकहांसे आते है” टाईप लूक दिला. चालायचंच!! चेन्नई काय आणि रत्नागिरी काय.. आम्ही असलेच वेंधळे.


भाजी-फळं वगैरे घ्यायला इतका त्रास झाला नाही. अगदी पहिल्या दिवसांपासून दारावर विकायला घेणार्‍या विक्रेत्यांमुळे पुन्हा एकदा आपण गावकुसात रहायला आलोय याची जाणीव झाली. हे लोक काय ओरडतात ते समजायचं नाही, म्हणून हाक मारून नक्की काय भाजी आहे ते बघावं लागायचं. एकदा या नादांत मी स्टोव रीपेअरी आणि छत्री दुरूस्तीवाल्याला हाक मारली आहे. एकदा सकाळी साडेसहाला एक बाई अगम्यपणे काय ओरडत होती ते कळेना, म्हणून बोलावली तर ती इडियप्पम विकत होती. कोकणामधल्या लोकांना रसशेवया माहित असतील. त्याच या तांदळाच्या गरमगरम वाफवलेल्या शेवया. दहा रूपयाचे चार. ही बाई आता आमची फार आवडती झाली आहे. सकाळच्या वेळी कंटाळा आला असेल तर तिच्या “इड्डीआपै” अशा जोरदार हाकेची वाट पहायची, गरम शेवया आणि त्यावर दूध साखर हा नाश्ता पोटभरीचा तर होतोच, शिवाय डायेट फ्रेंडलीसुद्धा.


या दारी येणार्‍या विक्रेत्यांमुळे मला भाज्यांची तमिळ नावे लगेच समजत गेली. “कीरै” म्हणजे पालेभाजी. सीरीकीरै, मणतक्कालीकिरै, पुळच्चीकीरै ही लोकल पालेभाज्यांची नावं समजली. तक्काली तक्काली तक्काली असं सकाळी सकाळी ओरडत येणारा बावा टोमॅटो आणि इतर भाज्या घेऊन यायचा. तक्काली म्हणजे टोमॅटो. सोरेकाई म्हणजे दुधी. वेंडेकाई म्हणजे भेंडी. वाळेकाई म्हणजे केळी. (कानडीमधल्या बाळेकाई मुळे हे लक्षात रहायला बरंच सोपं) काई म्हणजे भाज्या-फळफळावळ. पळम म्हणजे फळं. हे तर लक्षात ठेवायला बरंच सोपं होतं. असे बरेच रोजच्या वापरातले शब्द समजल्यानंतर एकेक मजा जाणवायला लागली. मांगा म्हणजे आंबा. अरिसी म्हणजे तांदूळ. याचे मॅंगो आणि राईस हे इंग्रजी शब्द याच तमिळ शब्दांवरून आलेत असं कुठंतरी लेखामध्ये वाचलं होतं. खरंखोटं असेल का माहित नाही, पण मला लक्षात ठेवायला हे नीमॉनिक बरंच उपयोगी पडलं. पुरूप्पू म्हणजे डाळी. कडलीपुरूप्प्पू म्हणजे हरभर्‍याची डाळ. इथंही नीमॉनिक वापरलंच. J


भाषेची सर्वात जास्त अडचण जाणवली ती कामवालीच्या संदर्भात. सेल्वीला इंग्लिश समजायचं, पण तेही थोडंसंच. सेल्व्हीने महिनाभर माझ्याकडे धुणीभांडी, झाडू पोछा आणि अंगण झाडणे इतकं काम केलं. पुढच्या महिन्यापासून तीच स्वयंपाक करायला लागली. सेल्व्हीच्या हाताला जबरदस्त चव होती, मसालेदार, झणझणीत पन अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. मला मासे चिकन वगैरे काही घरी बनवता यायचं नाही. तिच्यामुळे थोडंफार करायला शिकले. पण हे करणं-शिकणं-शिकवणं फार मजेदार असायचं. किचनमध्ये ती मला काहीतरी “हवंय” किंवा “संपलंय” म्हणून सांगायची. तिला काय हवंय ते मला कळलेलं नसायचं. मग अख्ख्या  किचनमध्ये सापडलं तर ठिक अन्यथा कंप्युटर चालू करून ती जे सांगेल ते गूगल सर्च करून त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते शोधणे. मग ते इंग्रजीमधलं नाव आपल्याला समजलंतर ठिक नाहीतर त्याचं परत मराठी मध्ये काय म्हणतात ते शोधणे. इतक्या सर्चिंगमध्ये काहीतरी गमतीजमती व्हायच्यात. एकदा सेल्वी चिकन बिर्याणी करत होती. काहीतरी मसाल्याचा पदार्थ तिला हवा झाला. काय ते गूगलभाऊला विचारलं. इंग्रजी नाव मला उमगेना. त्याचं मराठी नाव काय म्हणून विचारलं. “मराथीमोगू इन मराठी” असं स्पेलिंग टाकल्यावर गूगल पण गरगरला असणार. अखेर त्याला मराठीमध्ये “नागकेशर” म्हणतात हे मायबोली.कॉमवर समजले. पण मग ह्या नागकेशराला तमीळमध्ये “मराठी” का म्हणतात ते मात्र अद्याप समजलेले नाही.


पण हे मात्र खरं आहे की, तमिळ आणि मराठी संस्कृती फार जवळच्या आहेत. वरवर पाहता त्या अजिबात तश्या जाणवत नाहीत याची मला कल्पना आहे. पण मुळातून आपली आणि तमिळ नाळ कुठंतरी खोल जुळल्यासारखी वाटते. रा. चिं ढेर्‍यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी याबद्दल बरंच लिहिलं आहे. अगदी मराठीमधला “मुलगा” हा शब्ददेखील तमिळ देव मुरूगावरून आल्याचं ढेरे यांनी लिहिलं आहे. मुरुगन म्हणजेच आपला मल्हारी असंही वाचलंय. गंमत म्हणजे मराठी टीव्हीवर सध्या चालू असणारी हिट सीरीयल “जय मल्हार” तमिळमध्ये डब करून दाखवली जाते, आणि ती बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. इथल्या इमिटेशन ज्वेलरीच्यादुकानात मला बानु नथ पण दिसली होती. मुरूगन आपल्याकडे कार्तीकेय (शिवपुत्र) समजला जातो आणि स्त्रिया त्याचे दर्शन घेत नाहीत. इकडे मात्र मुरूगनची कृष्णासारखीच प्रियकर म्हणून आळवणी केली जाते. सौभाग्यवती स्त्रिया त्याचे आवर्जून दर्शन घेतात. अशा अजबगजब कहाण्या ऐकायला मला फार गंमत वाटते.


इतक्या दूर आल्यावर सणावारांची त्यानिमित्ताने घराची आठवण होणं साहजिक आहे. सणांच्या पूजाविधीपेक्षा नैवेद्यावर आमचं जरा जास्त प्रेम. आल्यानंतर महिन्याभरातच गणपतीचा सण होता. घरून “आला असतात तर..” चे हेव्ही इमोशनल डोसेस चालू होते. आता गणपतीच्या वेळेला कोकणी माणूस गावात नसेल तर काय चिडचिड होइल.  सकाळीच आम्ही तिघं घराजवळच्या गणपती देवळात गेलो. हे देऊळ चांगलं मोठं आहे. खरंतर देवांचं हाऊसिंग संकुल आहे कारण तिथे देवळाच्या अंगणामध्ये गणपतीसोबतच देवी, विष्णू, हनुमान, कार्तीकेयन, शंकर अशा सर्वच मुख्य देवांची मंदिरं आहेत. आम्ही आत गेल्यागेल्या देवळात जाण्याआधीच पुजा्र्‍यानं आम्हाला बघून इकडे असे या, रांगेत उभे रहा असे तमिळमधून सुनावले. देवळात जायच्या आधीच आम्ही देवळाबाहेर असलेल्या प्रांगणात कशाला उभे आहोत ते समजेना. आमच्यासोबत अजून वीस पंचवीस माणसं होती. मग त्या पुजार्‍यानं आमच्या हातात एक मातीचं सुगड टाईप दिलं. त्यात पाणी, थोड्या दुर्वा आणि झाडांची पानं फुलं वगैरे होती. ती छोटी सुगड सर्वांच्या हातात दिल्यावर पुजार्‍याने आम्हाला “चला आता” असं सांगितलं. आम्हाला काहीही समजत नसल्याने आम्ही आपले हल्याहल्या करत इतर काय करतात त्यांच्यासारखे निघालो. अख्ख्या देवळाला प्रदक्षिणा घालून मग आम्ही प्रांगणाच्या दुसर्‍या टोकाला आलो. तिथे गणपतीची एक सुंदर पितळी मूर्ती बाहेर चौथर्‍यावर ठेवली होती. पुजार्‍यांनी त्या मूर्तीला मंत्र म्हणत अभिषेक चालू केला. त्याचा अभिषेक झाल्यावर ज्या लोकांच्या हातात ही सुगड होती त्यांनी त्यातलं पाणी मूर्तीवर ओतलं. आम्ही कॉपी पेस्ट केलं. मग पुजार्‍यांनी ते अभिषेकाचं पाणी ज्या मातीत मुरवलं ती थोडी माती फुलं वगैरे त्या सुगडीत घालून दिलं. “आता याचं काय करायचं” असा प्रश्नचिन्ह तोंडावर झळकलं असणार कारण शेजारी उभ्या असलेल्या बाईनं “वीडीगं पोणा सॅंड मे ऎड माडी” असं सांगितलं. घरी जाऊन मातीत मिसळा असा अर्थ. आम्हाला समजावं म्हणून तिला काय कसरती कराव्या लागल्या. गणपती विसर्जन करून आलं की त्याची मूठभर का  होइना ओली माती घरात आणून ठेवायची आपली पद्धत. इथंही थोडाफार तीच पद्धत पण किंचित फरक. पुजार्‍यांनी त्या पितळी मूर्तीची पूजा करेपर्यंत आम्ही आत देवळांत जाऊन दर्शन घेतले. 

तोवर बाहेर प्रसाद द्यायला सुरूवात झाली होती. देवळात आलेल्या प्रत्येकाला प्रसाद हा दिलाच जातो. काबुली चण्यांचे सुंडल आणि गोड पोंगल. गोडगोड गुळाचा केलेला पोंगल इतका खमंग लागतो की बास. पोंगल आणि सुंदलबद्दल नंतर सविस्तर सांगेन. “इकडे घरी गणपती बसवत नाहीत वाटतं” मी नवर्‍याला सांगितलं. त्याला देवदर्शनापेक्षा उकडीच्या मोदकांची आस अधिक लागली होती. देवळाबाहेर पडल्यावर गावच्या मुख्य बाजारात काहीतरी आणायला गेलो. तिथं तीन-चार विक्रेते रस्त्याच्या एकाकडेला गणपतीच्या मूर्ती विकत होते. पूर्ण मातीने बनवलेली ओली मूर्ती. गुंजेचे लावलेले लाल डोळे. रंग वगैरे काहीही नाही. शब्दश: पार्थिव मूर्ती. अगदी छःओट्याच्या पण गोजिर्‍या मूर्ती. विक्रेत्यांपैकीच काही लोक साच्यामध्ये ओली माते घालून फटाफट या मूर्ती घडवत पण होते. लोक या मूर्ती ताटात ठेवून घरी घेऊन जात होते. आजूबाजूला फुलाफळांची विक्री चालू होती. इकडे कुठल्याही सणाला तोरण म्हणून झावळ्यांचा एक प्रकर करतात. तोही विकायला होता. सणाचा दिवस म्हणजे केळीच्या पानांची तडाखेबंद विक्री. नेहमीचा बाजार सणासाठी छानच नटला होता.. कोकणापासून इतक्या दूर येऊन इतका सुंदर गणपतीचा सण बघायला मिळेल असं वाटलंच नव्हतं. याच बाजाराच्या रस्त्यावरून आमच्या घराकडे येताना मुरुगनचे घर आहे. हा मुरुगन नुकताच आमच्या ओळखीचा झालेला. त्याची बायको मराठी आहे, पण सध्या ती युएसला कामासाठी गेली होती. पण बायकोची भाषा बोलणारे लोक् इतकी ओळख त्याच्यासाठी पुरेशी होती. बाजारात जातायेताना तो घरी असला की हाक मारायचा, तो नसला की त्याची आई तमिळमध्येच सर्व काही कुशलमंगल विचारायची. आताही आम्ही घरी जाताना त्याने हाक मारली. “प्रसाद घ्यायला या”


त्याच्या घरात ही पार्थिव इवलाली मूर्ती सुंदर पुजून ठेवली होती. आज संध्याकाळी आम्ही घरातल्याच बादलीत विसर्जन करून ते पाणी झाडांत ओततो म्हणाला. “आमच्याकडे” सणाच्या नावाखाली हाय हैदोस घालतात ते त्याला सांगायची गरजच नाही. मुरूगन मुंबईला दोन तीन वर्षे होता. मुरूगनची आई टिपिकल तमिळ. बाहेर येऊन माझ्याशी आणि लेकीशी दोन वाक्यं बोलून गेली. मला वाटलं होतं की प्रसाद म्हणजे परत पोंगल येईल. मुरूगनच्या आईंनी ताटामध्ये वाढून आणले ते “मोदगम” त्या मोदगम म्हणाल्या तरी मी एकदम “उकडीचे मोदक” बघून उडालेच. कर्नाटकात उकडीचे मोदक फारसे मीतरी पाहिले नाहीत. महाराष्ट्रामध्ये कोकण साईडकडे उकडीच्या मोदकांचं फार असतं. घाटावर तळणीचेच मोदक. पण तरी हे तिथून ते इकडे इतक्या तमिळनाडूपर्यंत कसं आलं ते माहित नाही (का इकडून तिकडे गेलं तेही माहित नाही) पण गरम गरम वाफवलेले, साजुक तुप घातलेले, नारळागुळाचा खमंग सारण वगैरे भरलेले मोदक. नवरा एकदम खुशच झाला. गणपती बाप्पा मोरया!! फक्त इकडे या मोदकांचा कायापालट होतो. आपल्या महाराष्ट्री पद्धतीसारखे नाजुक कळीदार मोदक इकडे बनवत नाहीत. सरळ समोसाशेपमध्ये मोदक वळतात. २१ करा नाहीतर ४२. मग तसे हे झटपट होतात हे मोदक.  चवीला सेमच लागत् असल्याने केवळ रूपाने असा काही फारसा फरक पडत नाही. मोदक न जमणार्‍यांनी मोदगम करून बघा!!!


या खाण्यापिण्यावरून अजून एक गंमत आठवली. कसल्याशा स्वीट मार्टमध्ये गेलो होतो. तिथले नेहमीचे केक्स पेस्ट्रीज आणि अतिशय गोड चपचपीत बंगाली  मिठायांपेक्षा वेगळं काही आहे हा ते बघत होते. एका ट्रेमध्ये पोळ्यांची चळत ठेवली होती.  मी दुकानदाराला “वोबट्टू?” म्हणून विचारलं. मंगलोरकडे पुरणपोळ्यांना वोबट्टू म्हणतात. त्याला काय ते समजेना. मी परत कानडीतून विचारलं “हुरणद्द होळगी” तो परत नॉनप्लस. मग तोच म्हणाला. “इदु पुरणपोळी” क्काअय्य्य? मी मराठीमध्येच आले. चक्क!! पुरणपोळी (ण आणि ळ! हल्ली त्तर काही मराठी लोकंसुद्धा पुरनपोली म्हणतात). चेन्नईमध्ये ही पोळी दोन तीन प्रकाराने करतात. पैकी कोकोनट पोळी म्हणजे खोबर्‍याची पोळी तर अप्रतिम लागते. पुरूप्पू पोळी म्हणजे चणाडाळीचं पुरण वापरून केलेली पोळी. बर्‍याच स्वीट मार्टमध्ये ताज्या पुरणपोळ्या हमखास विकायला ठेवलेल्या असतात. मी लगेचच विकत घेतली हे सांगायला नको.  तमिळनाडूमध्ये आल्यावर बर्‍याच दिवसांनी आयती पुरणपोळी खाल्ली. घरगुती पोळी अजून वेगळी असणार पण एकंदर चव बरीचशी आपल्या मराठी पुरणपोळीसारखीच. आकार थोडासा लहान. पुरणपोळीला साधारण इकडे बोळीदेखील म्हणतात. प आणि ब ची हे अशी अदलाबदल कशी काय होते याबद्दल आता पुढच्या लेखात. तूर्तास मला चेन्नईमध्ये उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्या विनासायास मिळू शकतात याचा शोध लागल्याने आनंदी आनंद गडे म्हणत बागडायचंय.