Thursday, 3 March 2016

रहे ना रहे हम (भाग २)


सकाळी (रविवार असणार, मी इतक्या उशीरा उठले होते म्हणजे नक्कीच) मी मागच्या अंगणात चहा पित बसले होते. शिमगा जवळ आला होता. हळूहळू उकडायला सुरूवात झाली होती. आमच्या शाळेनं नववीच्या फायनल एक्झामचं शेड्युल दिलं होतं. मार्चमध्येच नववी संपवायची आणि एप्रिलपासून दहावी व्हेकेशन बॅच चालू. आफताबचं अभ्यासवेड बघून आईनं मलापण दिवाळीनंतर त्याच्याच ट्युशनमध्ये घातलं होतं. एकच होमवर्क दोन वेगवेगळ्या वह्यांमध्ये उतरवणे याखेरीज त्यातून काही मिळत नव्हतं, पण आईला कोण सांगणार? आता मी रविवारी टीव्हीवर काय बघायचं आणि रिकाम्या वेळेत कितपत अभ्यास करायचा याचा विचार करत होते.  बाबा घरात आईला मदत म्हणून माळ्यावरची झाडपूस करत होता. हे बाबाचं आवडतं काम.  महिन्यातून एके रविवारी तो अख्खं घर स्वच्छ करणार. आईला अजिबात असली कामं करू द्यायचा नाही. आज नाश्त्याला त्याच्या आणि माझ्या आवडीची तांदळाची धिरडी बनत होती. तितक्यात गडग्यावरून कुणीतरी उडी मारलेली दिसली. आफताब किंवा अरिफ नव्हता. कुणी दुसराच माणूस होता. इतक्या पटकन टुण्णकन उडी मारून आमच्या कंपाऊंडमध्ये आला.
“ओ! कोण हवंय?” मी ओरडलेच. इतक्या वेळा चाचींकडे जाऊन-येऊन त्यांचे इतर बरेचसे नातेवाईक ओळखीचे झाले होते. हा त्यापैकी कुणी नव्हता. त्यानं माझ्याकडं पाहिलं. “तू स्वप्ना ना?”
मला माझ्या नावाची असली मोडतोड अजिबात सहन होत नाही. “मी कुणीही असेन, तुम्ही माझ्या कंपाऊंडमध्ये का येताय?” मी ओरडून विचारलं. माझ्या ओरडण्यामुळे आई बाहेर आली. “काय गं?”
“हॅलो, काकी.” या आगंतुकानं माझ्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत आपला मोर्चा वळवला. “आईनं तुमच्याकडे विरजण आहे का ते विचारायला पाठवलंय”
“आहे की, घरात ये.” आईनं त्याला बोलावलं. एखाद्या लहान मुलाकडं लाडानं बघून हसावं तसं त्यानं माझ्याकडे पाहिलं. आईनं फ्रिजमधलं वाटीभर दही काढून त्याच्या हातात दिलं. “आई, त्यानं विरजण मागितलंय, तू दही दिलंस” मी म्हटलं.

आजही मला गप्प बसवण्यासाठी वापरण्यात येणारा हा फंडा. “तुला काय समजतं? दही आणि विरजण म्हणजे काय ते अजून तुला माहित नाही”  हे इतक्या वर्षांनंतरसुद्धा. तेव्हा तर आई कितीतरी वेळ हसलीच होती, शिवाय बाबासुद्धा. जादूसाठी तर हे आयतं कोलीतच आहे.

“कधी आलास आणि कधीपर्यंत आहेस?” आईनं त्याला विचारलं.

“काल रात्री! महिनाभर आहे.” मग माझ्या डोक्यांत प्रकाश पडला हा अरिफ-आफताबचा मोठा भाऊ, अझर. हा येणार आहे ते मला माहित होतं. आफताब आणि अरिफचं कुठल्या एका बाबतीत पटत असेल तर ते अझर. अझरची चेष्टामस्करी करणे हा दोघांचा आवडता उद्योग. त्यांचं बोलणं ऐकून मला हा अझर फार बावळट वगैरे वाटला होता, प्रत्यक्षात तीनही भावांमध्ये अझर दिसायला स्मार्ट आणि हॅंडसम! (मला खूप नंतर समजलं की तो सेम त्याच्या आईसारखा दिसतो). 

तेवढ्यात बाबा किचनमध्ये आला. मग “मी कोण तुम्ही कोण काय करतोस कधीपर्यंत आहेस जॉब करतो महिनाभर आहे गाव छान आहे ये कधीतरी निवांत गप्पा मारायला” वगैरे असा एक लांबलचक संवाद घडला. तो गेल्यावर आईबाबांमध्ये “चांगला शेजार आहे मुलं चांगली आहेत वडलांच्या आजारपणापायी शिक्षण अर्धवट सोडलं चाचींचा फार लाडका आहे मुलांची वळणं चांगली आहेत” असा अजून एक लांबलचक संवाद घडला.

थोड्यावेळानं तो परत आला. यावेळी चाचींनी त्यांच्याकडे बनवलेली कटलेट्स पाठवली होती. “दमला नाहीस का? इतक्या प्रवासातून आलास...” आईनं विचारलं.

“छे. काल रात्री आल्यानंतर मस्त झोप झाली.  आता एकदम फ्रेश वाटतंय. आईनं हे घर पण मस्त घेतलंय. मला आवडलं. पुण्यापेक्षा इथं चांगलं वाटतंय”—असं म्हणणारा मी आजवर पाहिलेला एकमेव पुणॆरी माणूस आहे. नियमाला अपवाद असतात ते असे.

मग माझ्याकडे वळून “तू आफताबच्याच वर्गात आहेस ना?” मी नुसती मान डोलावली. टीव्हीवर चंद्रकांता लागलं होतं. हे बघताना मला कुणाशीही बोलायला वेळ नसतो.

“तुझी स्कूटी आहे ना? मला नंतर जरा देशील?” त्यानं पुढं विचारलं. माझ्याऐवजी आईच कधी हवी तेव्हा घेऊन जा म्हणाली. अझर आला आणि चाचींचं घर बदलूनच गेलं. घरामध्ये सतत गाणी चालू. काहीतरी खायला स्पेशल कायम. शिवाय दिवसभर त्याला भेटायला येणारे नातेवाईक वगैरे. कायम गडबड गोंधळ. इतकी लोकं यायचे की आफताब अभ्यासाला माझ्या घरी यायचा. मला काय... त्याचा आयता होमवर्क मी कॉपी करून घ्यायचे.

अझरभाई आल्याचा एक फायदा झाला होता, चाची रोज काहीनाकाही तरी बनवायच्याच, तेपण साधंसुधं नाही. एकदम शाही वगैरे. चाची एरवी नॉनव्हेज बनवलं की आमच्याकडे द्यायच्या नाहीत. तसा बाबा अधूनमधून अंडी तळायचा. पण आईला बाकीचं काही चालत नसायचं. अंडी केलेली भांडी पण ती वेगळी ठेवून द्यायची. पण अझर शुद्ध शाकाहारी होता. अरिफनं मला सांगितल्यावर कितीतरी वेळ माझाच विश्वस बसेना. अरिफ आणि आफताब एक नंबरचे मासेखाऊ. अझर आल्यामुळे यांचे पण दिवसच्या दिवस शाकाहारी जायला लागले. मला हे ऐकून फार मज्जा वाटलेली. “पण हा शाकाहारी कशामुळे?” मी अरिफलाच विचारलं.

“अरे, शाळेत असल्यापासूनच. ऍक्च्युअली, तो प्राणिमित्र संघटनेमध्ये वगैरे होता.” म्हणजे काय ते मला माहितच नव्हतं. पुण्यामध्ये असताना त्यानं दोन कुत्री, चार मांजरी, खारी, कासवं, पोपट, सरडा वगैरे बरंच काही पाळलं होतं. पुढं तो गल्फमध्ये नोकरीला गेल्यावर चाचींनी सांभाळणं होत नाही म्हणून इथं येण्याआधी कुणाकुणाला देऊन टाकले होते.. इथं आल्या दिवसापासून किमान एक कुत्रा आणूया म्हणत होता. पण चाचींनी “तू महिन्याभरानंतर गेल्यावर कोण बघणार? काही नको” असं एकदाचं सांगून टाकलं. नंतर चारपाच वर्षांनी अझर पूर्ण व्हेगन झाला. त्यावरून मी आणि आफताब त्याला फार चिडवायचो. त्याच्या व्हेगन होण्यानं नूरीभाभीचा तर केवळ संताप झाला होता.
अझर आल्यावर आठेक दिवसांनी दिसलाच नाही. चाची म्हणाल्या की पुण्याला गेलाय. आधीच्या सर्व मित्रांना वगैरे भेटायला. अरिफ पण त्याच्यासोबतच गेला होता. अझरचा स्वभाव खूप शांत. 
अरिफसारखा अस्वस्थ किंवा आफताबसारखा तडतड्या नव्हता. माझं त्याच्याशी काही बोलण्याचा जास्त संबंध आलाच नाही. तो त्याच्या व्यापात मग्न. मी माझ्या अभ्यासात.

एका संध्याकाळी आई आणि चाची बाजारात गेल्या होत्या. अचानक अझर माझ्या घरी आला.

“स्वप्निल,” एखादं मोठं रहस्य सांगावं तसं तो मला म्हणाला. “अम्मीनं आणि अरिफनं फोनवर बोलताना जेव्हा कधी तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा मला वाटलं की तू मुलगा आहेस”

“मग?”
“पण तू तर मुलगी आहेस. आणि मला सध्या एका मुलीची अत्यंत गरज आहे....”

>>>>>>>

“हे बघ, कुणी विचारलंच तर तुझं नाव स्वप्ना सांग. प्लीज. ती फोनवर येईपर्यंत कुणीही काही बोलत राहिलं तर जास्त बोलू नकोस” अझरच्या सूचना चालूच राहिल्या.

“आईला समजलंतर..” मी शंका विचारली.

“मी काकीला ऑलरेडी माझ्या एका मैत्रीणीला तुमच्या लॅण्डलाईनवरून फोन करू का? इतकं विचारलंय. त्यामुळे ती काही बोलणार नाही... प्लीज. माझ्यासाठी...”

“ओके!” मी रीसीव्हर उचलला. “पण आईला समजलं तर तुझी जबाबदारी. माझ्यावर काही  ढकलायचं नाही”

“बच्चू. गर्लफ्रेन्ड माझी आहे. मग जबाबदारीपण माझीच. तू फक्त “हॅलो, मी अश्विनीची मैत्रीण स्वप्ना बोलतेय, तिला जरा फोन द्याल का?” इतकं एकच वाक्य बोल. ती फोनवर आल्यानंतर माझ्या हातात रीसीव्हर दे. तुम्हारा काम हो गया”

त्यानं सांगितल्याबरहुकूम मी केलं. पलिकडचा फोन कुण्या पुरूषानं घेतला होता. “कोण स्वप्ना?” असं दरडावून मलाच विचारलं. “तिची मैत्रीण” मी कसंबसं उत्तर दिलं. मग दोनेक मिनिटांनी फोनवर कुण्या मुलीचा आवाज आला. “हॅलो. कोण बोलतंय?” मी तडक रीसीव्हर अझरच्या हातात दिला.

आजवर असं खोटं कधीच बोलले नव्हते.  जोरजोरात धडधडत होतं. अझर फोनवर काय बोलत होता ते ऐकलंसुद्धा नाही, आणि मी माझ्या खोलीमध्ये आले. पुढ्यात हिस्ट्रीचं वर्कशीट घेऊन बसले होते पण काही लिहिता येत नव्हतं इतकी घाबरले होते. खरंतर दहा मिनिटांनी पण मला त्यावेळी वाटलं की जवळजवळ तासाभरानं अझरनं फोन बंद केला. हे मी सांगतेय तेव्हा गल्लोगल्ली मोबाईल बोकाळलेले नव्हते. एखाद्याशी बोलायचं तर घरचा लॅन्डलाईन स्वस्त पर्याय होता, पण त्यासाठी असल्या बर्‍याच युक्ती कराव्या लागायच्या.

“थॅंक्स” अझर माझ्यासमोर बसत म्हणाला. “अक्षर छान आहे” माझ्या वर्कशीटकडं बघत तो म्हणाला. “उद्या परत याच वेळी फोन करेन असं मी सांगितलंय. प्लीज. उद्यापण मदत करशील?”
“आई घरी असेल तर मला ओरडेल. असलं काही केलेलं तिला आवडणार नाही...त्यापेक्षा तूच का बोलत नाहीस... मित्र म्हणून फोन करता येईल की. अभ्यासाचं विचारायचं असेल तर आफताब त्याच्या मैत्रीणींना फोन नाही का करत?”

तो हसला. “आफताब बर्‍याच मैत्रीणींना फोन करतो. पण ते केवळ अभ्यासासाठी नाही... एनीवेज, माझा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. ती नुसती मैत्रीण नाहिये ना! तिच्या घरी समजलं तर अजून वाट लागेल.” 

“चाचींना समजलं तर...” या वयापर्यंत पोचले तोपर्यंत माझा पक्का समज होता की, अशी प्रेमप्रकरणं वगैरे चांगल्या मुलामुलींची कामं नव्हेत, आमच्या गर्ल्स स्कूलमध्ये काही मुलींची कोएडमधल्या मुलांबरोबर अफेअर्स होती. पण त्या मुलींबद्दल फारसं कुणी चांगलं बोलायचं नाही. आमच्या वर्गातल्या जाह्नवीचं तर एका रिक्षेवाल्याबरोबर अफेअर होतं. तिच्या घरी समजल्यावर आईनं चांगलं झोडपलं होतं.

अझर मला चांगला मुलगा वाटला होता, पण तोही असं भानगडी करत असेल ते बघून कसंतरी झालं. नंतर खूप दिवसांनी “प्रेम करणं” आणि चांगलं असाणं या दोन भिन्न गोष्टी आहेत हे समजलं. तोपर्यंत मी केदारच्या प्रेमात पडले होते. पण या डीपार्टमेंटमध्ये खरा महाचालू आफताब. अझरचं किंवा माझं जे काय होतं ते एकाचसोबत. आफताब म्हणजे दिलफेंक होता. कॉलेज संपायच्या आधी त्याची दहाबारा अफेअर तरी झाली होती. तेही एकाच वेळी अनेकांसोबत. मी गावात कुणाला असं म्हटलं की मुली मलाच येड्यात काढायच्या. वरकरणी अतिशय अभ्यासू दिसणारा हा पोरगा किती खालमुंड्या होता हे मला चांगलंच माहित होतं. दिसतं तसं नसतं हेच खरं! पुढं मुंबईला गेल्यावर अशाच एका प्रेमप्रकरणामुळे माझं आणि आफताबचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.... पण ते खूप नंतर!

“आईला काही बोलू नकोस. तिला मी अजून सांगितलं नाहीये” अझर मला विनवत म्हणाला. मला क्षणभर वेगळीच गंम्मत वाटली. चाचींना अझर आई म्हणायचा, अरिफ अम्मी, आणि आफताब एरवी अम्मी, पण फार लाडात आला की मां!! “ऍक्च्युली, ती माझ्या कॉलेजमध्ये होती. तेव्हा.. आमची ओळख झाली. पण मी तीन वर्षापूर्वी कॉलेज सोडलं. जॉबसाठी... आता मी रियाधमधून तिला रोज फोन करू शकत नाही. तिच्या घरी समजलं तर कॉलेज बंद करतील..”

“ते ठिक आहे. पण चाचींना...”

“तिचं कॉलेज संपून तिला नोकरी लागू देत. तेव्हा आईला सगळं सांगेन. तोपर्यंत मात्र प्लीज हे तुझं आणि माझंच सिक्रेट!” अरिफ बागेत बसून सिग्रेटी ओढतो हे माझंच सिक्रेट, आफताबनं एका युनिट टेस्टला अभ्यास केला नाही म्हणून कॉपी केली हेही माझंच सीक्रेट (हुशार मुलं कॉपी करत नाही ही निव्वळ अंधश्रद्धा आहे) आता अझरचं लफडं म्हणजे पण माझं सिक्रीट.

 “आणि अजून एक रीक्वेस्ट. याबाद्दल अरिफ किंवा आफताबला काही बोलू नकोस. मी पुण्यात होतो तेव्हा अश्विनी एकदोनदा घरी आली होती तेव्हापासून त्यांना संशय आहे. पण अजून मी सांगितलं नाही. त्यांना समजलं तर माझा जीव हैराण करतील”

वास्तविक अझर मोठा, आणि हे दोघं लहान. पण दोन्ही लहान भाऊ मिळून सतत याची टांग खेचायचे. अरिफ तर कधीच अझर म्हणायचा नाही, कायम लॉरेन्स ऑफ अरेबिया. अरिफला जर हे समजलंच तर अझरला जातायेता यावरून ऐकाव्ं लागलं असतं. वेट! एक मिनिट. अरिफला याबद्दल नक्की माहिती होती. ते मराठी गाणं आहे ना “अश्विनी येना” ते सारखं जोरजोरात ओरडून मुद्दामच म्हणायचा!!! “ओके! प्रॉमिस” मी हसू लपवत म्हटलं.

मग  हे रोजचंच होऊन बसलं. आई बाहेर गेली की अझर घरी यायचा. मी अश्विनीला फोन लावून द्यायचे, आणि मग हा फोनवर बोलायचा. दरम्यान, मी निवांत टीव्ही बघत बसलेले असायचे.
असंच एके दिवशी मी टीव्हीवर चॅनल  टाकटूक बदलत होते. मध्येच त्यानं मला हाक मारली. “स्वप्निल, आधीचं चॅनल लाव”
मी चॅनल बदललं. कुठलंतरी ब्लॅक ऍण्ड व्हाईट गाणं लागलं होतं. “अश्विनी, मी तुला पाच मिनिटांत फोन करतो” म्हणून त्यानं फोन बंद केला. मी टीव्ही म्युटवर ठेवला होता, आवाज वाढवला. अगदी भक्तीभावानं त्यानं ते गाणं बघितलं.

“तुला जुनी गाणी आवडतात?”

“प्रचंड, त्यात हे गाणं तर माझं अतिशय आवडतं. किती दिवसांनी टीव्हीवर पाहिलं. आता दिवसभर डोक्यात गुणगूणत राहील.”
मी हे आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं होतं तरी मला गाणं आवडलं होतं... “मला परत ऐकायचंय.”

“अरे फिकर नॉट. माझ्याकडे कॅसेट आहे. तू म्हणशील तेव्हा ऐकवेन.”

आफताबच्या खोली बाजूची लहान खोली अझरची. आफताबच्या खोलीत पुस्तकांचा ढीग. याच्या खोलीत कॅसेटींचा. त्यानं ढिगार्‍यामधली एक कॅसेट शोधून प्लेअरमध्ये लावली.

“या सर्व कॅसेट्स तू घेतल्यास?”

“बाबांच्या आहेत. मी बहुतेक कॅसेट डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करतोय..”
त्याच्या हातातलं कॅसेटचं कव्हर मी घेतलं “रफी का जादू” प्लेअरमध्ये गाणं वाजायला लागलं. “अभी न जाओ छोडकर दिल अभी भरा नही”

“खरंच जादू आहे रे” मी त्याला म्हटलं.

“मी आज रात्री तुला याच्या गाण्यांची एमपीथ्री सीडी बनवून देतो. यु विल लाईक इट. रफीचा आवाज या जगातली सर्वात बेस्ट गोष्ट आहे. मला जर कुणी विचारलं ना की देव आहे याला पुरावा काय? तर मी म्हणेन हा आवाज. हा आवाज कधीकाळी या जगात अस्तित्त्वात होता, हाच एक चमत्कार आहे. रफी गाणं म्हणत नाही, तो आपल्याला ते गाणं जगायला लावतो. अत्यंत अरसिक माणसालासुद्धा हा आवाज प्रेमात पडायला भरी पाडेल.”

त्या दिवसांपासून अझर माझा मित्र राहिलाच नाही. आमचं एक भलतंच किचकट नातं तयार होत गेलं. कितीही वर्णन केलं तरी रफीचा आवाज शब्दांत पकडता येणार नाही, तसं कितीही सांगितलं तरी माझं आणि जादूचं हे नातं समजावता येणार नाही. मी अझरचं नावच जादू करून टाकलं. मला संगीताच्या या नादमयी जादूच्या दुनियेची ओळख करून दिली म्हणून.

अजून एक गोष्ट लक्षात आली का? अश्विनीला त्यानं पाच मिनीटांत फोन करतो म्हणून फोन कट केला होता. त्या गोष्टीला दोन तास उलटून गेले तरी आम्ही दोघं जादूच्या खोलीमध्ये गाणी ऐकत त्यावर बोलत राहिलो. दुसर्‍या दिवशी नेहमीच्या वेळी  जादूनं तिला फोन केल्यावर ज्या काय खास शिव्या पडल्या होत्या!!!

>>>>>>>

अझरची महिन्याभराची सुट्टी अगदी लवकरच संपली. तो आला तेव्हा त्यांचं घर किती खुश होतं, हळूहळू त्याचं सामान पॅक व्हायला सुरूवात झाली तसे चाचींचे डोळे पाणावलेले दिसायला लागले. गेली तीन वर्षं तो देशाबाहेर होता. पैसा भरपूर पण कामसुद्धा भरपूर.  अझरनं दहावीनंतर इंजीनीअरिंगचा डिप्लोमा केला होता, मग डिग्रीला ऍडमिशन घेतली होती. पण त्याचे वडील आजारी पडले. कॅन्सरचा प्रचंड खर्च होता. त्यानं डिग्रीची हौस सोडून ही गल्फमधली नोकरी पत्करली. चाची त्याला एकदोनदा म्हणाल्या की, आता जास्त आर्थिक चणचण नाही, तर इथंच रहा.. पण आफताबनं मला सांगितलं की, आजारपणाच्या खर्चापायी थोडंफार कर्ज झालंच होतं, शिवाय अब्बा गेल्यावर त्याच्या काकांनी पुण्यातल्या घरावर लगेच हक्क सांगून यांना घराबाहेर काढलं होतं. अब्बांचे पीएफ़चे आणि लाईफ पॉलिसीचे पैसे घालून हे घर घेतलं होतं. अजून थोडी वर्षं तरी अझरला नोकरी करावीच लागली असती. शिक्षण संपल्यात जमा होतं.

अझर आला होता, तेव्हा अरिफ एकदम खुलला होता. बर्‍याचदा हसत बोलत असायचा. त्याची बारावीची बोर्ड एक्झाम जवळ आली होती. अभ्यास वगैरे पण नियमित चालू होता. अझर गेला तसा अरिफ पण एकदम गप्पगप्प झाला. दिवसभर खोलीतच असायचा. परीक्षा जवळ आली म्हनून चाची पण काही बोलायच्या नाहीत.
माझी आणि आफताबची नववीची परीक्षा संपली होती. व्हेकेशन बॅच चालू झाल्या होत्या.

पण एक मध्येच प्रॉब्लेम झाला.

माझ्या वर्गामधल्या बहुतेक मुलींचे पीरीयड्स केव्हाच आले होते. त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता मला थोडंफार माहित झालं होतं. आईनं मला थोडीफार माहिती दिली होती. शाळेत यावर लेक्चर्स झाली होती. पण नववी संपली तरी माझे पीरीयड्स काही आले नव्हते. एके दिवशी रात्री टीव्ही बघताना अचानक काहीतरी गडबड वाटली, उठून बाथरूममध्ये जाऊन पाहिलं तर ड्रेस खराब झाला होता. बाबा तेव्हा घरातच होता. आईनं त्याला पण सांगितलं. सुदैवानं मला पॅड कसा घेतात वगैरे ते माहित होतं. आईला काही शिकवावं लागलं नाही.

“नील्या, काही त्रास वाटला तर सांग हां” बाबा मला म्हणाला. आईनं ही गोष्ट बाबाला सांगितली त्याचा मला राग आला होता. बाबा रोज रात्री जेवणं झाली की कुठंतरी जायचा, कुठं ते मला तेव्हा माहित नव्हतं. कित्येकदा जेवायला पण नसायचाच. आज रात्री मात्र तो घरीच थांबला. मला झोप लागेपर्यंत आई आणि बाबा मला सारखे काही त्रास होत नाही ना ते बघत होते. मला त्रास काहीच नव्हता, ते एक सॅनीटरी पॅडचं विचित्र धांडोळं ओझं सोडल्यास. अजिबात कंफर्टेबल वाटत नव्ह्तं, नीट झोपताच येत नव्हतं. खूप वेळानं कशीबशी झोप लागली.

सकाळी नेहमीसारखी जाग आली तोपर्यंत सगळीच रंगपंचमी झालेली होती. आई म्हणाली, “होतं असं. जास्त टेन्शन घेऊ नकोस. बाथरूममध्ये जाऊन शॉवर घे. शाळेला नाही गेलीस तरी चालेल”
शाळेला सुट्टी म्हटल्यावर एरव्ही आनंदानं उड्या मारल्या असत्या, पण आता तितकं त्राण नसल्यासारखं वाटलं प्रचंड दमल्यासारखं वाटत होतं. दिवस सगळा झोपून टीवी बघण्यात घालवला. बाबा तासाभरात घरी परत आला. दुपारनंतर मला थोडं बरं वाटत होतं तरी बाबा म्हणत होता की डॉक्टरकडे जायचं. 

हे सगळं भलत्याच डॉक्टरला दाखवायचं! अयाईगं, कल्पनेनं सुद्धा कसंतरी झालं. दुसर्‍या दिवशी मीच आईला म्हटलं, शाळेत जाते. काल रात्रीपासून ब्लीडींग फारसं नव्हतं. तरी बाबा म्हणाला की स्कूटी नेऊ नकोस, मी सोडतो. संध्याकाळी न्यायला पण येतो म्हणत होता, म्हट्लं नको मी रिक्षा करून येते. ट्युशनला अजून एक दिवस दांडी मारेन.

दिवसभर शाळेत बेचैन बेचैन होत राहिलं. प्रत्येक लेक्चर संपलं की वॉशरूमकडे जात होते. डाग पडायची भिती होती.. कोण गाढवं स्कूल युनिफॉर्म ठरवतात? पूर्ण व्हाईट स्कर्ट आणि व्हाईट शर्ट. तरी एक बरं होतं की आमची शाळा फक्त मुलींची होती. पलिकडच्या कोएडमधल्या मुलींची हालत किती बेक्कार! वर्गामध्ये बहुतेक मुलींचे पीरीयड्स येऊन कित्येक वर्षं झाले होते. मीच सर्वात लास्ट! माझ्या बाजूला बसणार्‍या नाहिदाचे पीरीयड्स तर पाचवीत असतानाच आले होते. मी तिला सांगितल्यावर तिनं वर्गामध्ये सर्वांना सांगून टाकलं. अनाऊन्सच केलं म्हणा!

“सीरीयसली स्वप्नील. आम्हाला वाटायला लागलं होतं की तू डॅमेज्ड माल आहेस की काय.”

“हो ना, नाव मुलाचं, लक्षणं पण बॉयजचीच आहेत की काय..”
“तुला भारी माहितीये बॉयजच्या लक्षणांबद्दल!!”

मग बराच वेळ लंच ब्रेकमध्ये यावरून जोक्स होत राहिले. मी पण यात सामील होतेच. एकमेकांना चिडवत चिडवत गमती करत राहिलो. एक झालं, की त्यामुळे माझं लक्ष थोडावेळ का होइना, या एकंदरीत पीरीयड्सवरून उडालं. संध्याकाळी शाळा सुट्ल्यावर गर्दीमध्ये रिक्षा मिळेना, म्हणून मी चालत थोडी पुढे आले. पाठीमागून आफताबचा आवाज आला. “चालत जातेस?”

“हो. आज स्कूटीला थोडा प्रॉब्लेम होता” याला दुसरं काय कारण देणार? “रिक्षा करेन. तुला आज ट्युशन नाही?”

“आज सुट्टी दिलीये. उद्या निवडणुका आहेत. अरे हां, त्या निवडणुकांची आता सभा वगैरे आहे, रिक्षा मिळणं कठीण!”
“अरे बाप्रे!!!” मी धसकले.
“अरे बापरे काय...  चालत जाऊ या.. रोजचा रस्ता आहे..”
“नको, मी इथल्या एस्टीडीमधून बाबाला दुकानावर फोन करते. तो येऊन पिकप करेल” मला इतकं अंतर एरवीच चालवलं नसतं. आज तर काय, आनंदच! बाबाला फोन केला तर लग्गेच येतो म्हणाला.
“तू रोज जरातरी चालत जा. ऑलरेडी टम्मापुरी झालीयेस!” आफताबनं मला चिडवलं. माझ्या वजनावरून चिडवायची ही काही पहिलीच वेळ नव्हती पण त्याला उलटं चिडवण्याइतकं मला सुधरत नव्हतं. अचानक खूप जोरात ब्लीडींग होत असल्यासारखं वाटायला लागलं. उभं राहता येईना, जवळपास कुठं बसता येईना आणि बसलं तर ड्रेस खराब व्हायची भिती. आफताब पुढं काही बोलत होता. माझं लक्षच नव्हतं. “स्वप्नील, हरवलीस का? मी घरी जाऊ ना, तू काका येईपर्यंत थांबशील?” माझ्या कानात येऊन तो ओरडला.
“आफताब, मला बरं वाटत नाहिये. किंचित चक्कर येतीये” मी परत खोटंच सांगितलं. “बाबा येइस्तोवर थांब, मग कारमधून आपण दोघंही जाऊ..” मी कसंबसं म्हटलं.

“ओके! स्कूलबॅग माझ्याकड दे आणि तिथं बस”

“नको, ठिक आहे” माझी बॅग त्याचा हातात देत मी म्हटलं. त्यानं त्याच्या बॅगमधली पाण्याची बाटली आणि सुकामेवा काढून दिला. चाची रोज शाळेत जाताना त्याला द्यायच्या. त्यांचं बघून आईनं मला पण असाच सुकामेवा द्यायला सुरूवात केली होती. मी तो न खाता तसाच परत आणायचे. शाळा सुटली की ट्युशनच्या आधी आम्ही चार पाच मैत्रीणी मिळून बाहेरच काही खायचो.ते कोरडं काजूबदाममनुके रोज कोण खाईल? “काल रात्री अझरभाईचा फोन आला होता, तुला विचारलंय” आफताब म्हणाला. मी नुसती मान डोलावली.

“काय होतंय स्वप्नील? तू थोडावेळ इथं बस ना. खूप चक्कर येतेय का?” त्यानं माझा चेहरा बघून काळजीनं विचारलं. खूप वर्षांनी मी आफताबला येताना सॅनीटरी पॅड्स आणायला सांगितले. तेव्हा हा किस्सा मला आठवला. “मग तेव्हाच का नाही सांगितलंस? तेव्हा मी किती घाबरलो होतो. तुला असं आजारी वगैरे कधीच पाहिलं नव्हतं.”

तेव्हा का नाही सांगितलं? काय माहित. लाज वाटत होती म्हणण्यापेक्षा “कसंतरी” वाटलं असतं. आणि सांगून तरी काय फायदा होता. हा काय करणार होता? आता इंटरनेटवर सर्रास पीरीयडमधले टॅबू वगैरे विषयांवर वाचायला मिळतं. असलं काही मलाच महित नव्हतं तर घरात केवळ दोन मोठे भाऊ असलेल्या या पोराला तेव्हा काय माहित असणार? आता इतक्या सहजपणे लॅबमध्ये काम करताना कुठंही फिरताना मित्राला कलीगला, सीनीअरला “आज सेकंड डे आहे, त्रास होतोय.” हे आरामात सांगितलं जातं, तेव्हा ही अशी साहजिकता एकूणातच नव्हती. त्या दिवशी मी आफताबला यातलं काहीच सांगितलं नाही.


याचदरम्यान अरिफनं चाचींना भलतीच डोकेदुखी देऊन ठेवली. वर्षभर त्यानं बारावीची लेक्चर्स अटेंड केली. व्यवस्थित अभ्यास केला. पण दोन पेपर्स गेल्यावर चाचींना समजलं की त्यानं पेपर दिलेच नाहीत. घरून परीक्षेला निघायचा, पण वाटेत कुठं जायचा माहित नाही. चाची कॉलेजमध्ये जाऊन आल्यावर समजलं की लेक्चर्स पण यथातथाच अटेंड केली होती.

घरी आल्यावर त्यांनी अरिफला याबद्दल विचारलं. मी आणि आफताब त्याच्या खोलीमध्ये अभ्यास करत बसलो होतो. त्यांनी दोन तीनदा विचारलं तरी अरिफनं काहीच उत्तर दिलं नाही. केवळ “माझं डोकं दुखतंय” म्हणाला आणि घराबाहेर निघून गेला. चाची हताश होऊन बसल्या.

अरिफनं पुढचे पेपर दिलेच नाहीत. म्हणाला, “मी पुढच्यावर्षी अझरभाईसारखा डिप्लोमा करेन. मला बारावी करायची नाही”
आफताब म्हणाला की तो परीक्षा द्यायला घाबरतोय. अझरभाईनं फोनवर बरंच काही समजावलं. पण त्यानं ऐकलं नाहीच. पेपर शिल्लक असतानाच तो पुण्याला निघून गेला. चाचींना नक्की काय करावं ते सुचत नव्हतं. त्यांचे सर्व भाऊबहिणी- ज्यांची मदत होइल म्हणून त्यांनी या गावात घर घेतलं होतं- त्यांनी काहीच मदत केली नाही. अरिफ त्यांचा अपना थोडीच होता!! अरिफच्या चुलत्यांनी तर आधीच हात काढून घेतला होता. चाचींना आधार असा कुणाचाच राहिला नव्हता. येऊनजाऊन मन मोकळं करणार तरी कुणासमोर तर माझ्या आईसमोर. आई तरी काय करू शकणार? अरिफच्या शिक्षणाची दोन वर्षं वाया गेली होती. तो वाईट वागत नव्हता, संगत वाईट नव्हती. अभ्यासामध्ये खूप सीन्सीअर होता, अगदी प्रीलीमलासुद्धा चांगले मार्क पडले होते. तरी असा का वागत होता माहित नाही...  

बागेमध्ये चोरून सिगरेट ओढायचं आता त्यानं बंद केलं होतं. घरीच बिनदिक्कत ओढायचा. चाचींनी एकदोनदा त्यावरून त्याला चांगलंच सुनावलं पण होतं. इतके दिवस “अम्मी मला काहीच बोलत नाही” म्हणणारा आरिफ तेव्हा मात्र निगरगट्टासारखा बाल्कनीमध्ये बसायचा. मीपण हल्ली त्याच्याशी फारसं बोलत नव्हते. एक तर दिवसभर शाळा आणि ट्युशन यातून वेळ मिळायचाच नाही, मिळाला तरी माझंच मला निस्तरता येत नव्हतं.

पहिले पीरीयड्स इतक्या उशीरानं आले, पण सुखासुखी नाहीच. मला बहुतेकांनी सांगितलं होतं की पीरीयड्स महिन्याभरानं येतात. माझ्याबाबतीत दर दहा दिवसांनी, दर आठ दिवसांनी किंवा महिनाभर सलग ब्लीडींग असलं काही विचित्र चालू झालं. हे असं होइल असं कोण म्हणालं नव्हतं. वर्गात इतका त्रास झालेलं कुणीच नव्ह्तं. तीन महिन्यांत माझी हालत खराब. पीरीयड यायच्या आधी पोटात दुखायचं.. आल्यावर दुखायचं. नंतर पण दुखायचं. भरीसभर प्रचंड ब्लीडींग. दोन महिन्यानं ब्लड टेस्ट केली तर हिमोग्लोबिन लो झालेलं.

शेवटी बाबाच मला डॉक्टरकडं घेऊन गेला. “सगळं नॉर्मल आहे म्हणताय, मग असं का होतेय?” त्यानं दरडावलंच. डॉक्टरनं हार्मोनल चेंजेस वगैरे काहीतरी सांगितलं.  “पण.. हा हेरीडेटरी त्रास नाही ना? तुम्ही एकदा सोनोग्राफी वगैरे करून का बघत नाही” वगैरे म्हणाला. आई त्याला नजरेनं झापत होती ते मलापण समजलं. शेवटी डॉक्टरनं मला बाहेर जाऊन बसायला सांगितलं आणि दोघांना काय ते समजावलं.

मी घरी आल्यावर आईला बाबा इतका का टेन्शन घेतोय? असं विचारलं. तर आई म्हणाली “त्याचं डोकं फिरलंय. त्याला वाटतं, माझ्यासारखंच तुलापण त्रास होइल.”
“म्हणजे?”
“नंतर सविस्तर सांगेन.. आता होमवर्क पूर्ण कर. ट्युशनला जायचं नाही का?” आईनं विषय बदलला. पण आईनं बदलला म्हणून विषय संपला नाही.

एक तर दहावीचं वर्ष. रोजरोज शाळा ट्युशन बुडवून चाललं नसतं. स्कूटी घेऊन जाणं शक्य  नव्हतं. बाबा रोज कारनं सोडायला-न्यायला यायचा. आई चाचीला म्हणाली, आफताबला पण सोबत येऊ देत, कशाला चालवायचं?  तोपर्यंत चाचींना माझा नक्की काय प्रॉब्लेम आहे ते माहित झालं होतं. चाचींनाच काय अख्ख्या गल्लीला आणि शाळेला समजलं होतं. नर्सरीच्या पोरांसारखं एक्स्ट्रा ड्रेस आणि पाचसहा सॅनिटरी पॅड्स घेऊन शाळेत जायचे. बाबानं मला  गर्ल्स सेक्शनला घातल्याबद्दल एरवी राग यायचा, पण या दरम्यान वाटलं बरं आहे, कोएडला अस्ते तर!!!!   

आफताब दहावीचा अभ्यास टाईमटेबल आखून करत होता, मला तितकं शक्यच नव्हतं. आफताबचा मार्ग सेट होता. त्याला अकरावीला कॉमर्सला ऍडमिशन घ्यायची होती. सी ए किंवा सी एस व्हायचं त्यानं ठरवलं होतं. आफताबचं हे एक कायम भारी प्रकरण. पुढं काय करायचं ते आतापासून ठरवून ठेवायचं. आमच्यासारखं इकडेतिकडे भिरभिरून मग त्यानं करीअर पाथ आखला नाही. मी तर काहीच ठरवलं नव्हतं. दहावी झाल्यावर बारावी. बारावी झाल्यावर ग्रॅज्युएशन असाच आणि इतकाच माझा करीअर प्लान होता. शिक्षण-लग्न वगैरेसाठी आईबाबाचं काही म्हणणं नव्हतं. शिक्षणासाठी आर्थिक अडचण काहीच नव्हती. माझंच मला अजून काही माहित नव्हतं. तेव्हा पीएचडी वगैरे करेन कुणी म्हटलं अस्तं तर वेड्यातच काढलं असतं. तसं बघायला गेलं तर मधेच केदार प्रकरण उद्भवलं नसतं तर एव्हाना मी लग्नबिग्न करून दोन पोरांची आई बनले असते. ते एक असो. केदारबद्दल जितकं कमी बोलू तितकं बरं.

अरिफनं जूनमध्ये खरंच डिप्लोमाला ऍडमिशन घेतली. त्याला हवी तशी कंप्युटर्सलाच ऍडमिशन मिळाली. बारावीच्या परीक्षेच्या वेळी जे काय झालं ते झालं पण आता तरी नीट शिक म्हणत चाचींनी त्याला समजावलं. पण अजून काहीतरी नक्कीच बिनसलेलं होतं. चाचींनी त्याच्या सर्व मित्रांची खबरबात ठेवली. अरिफ कुठंही वावगं वागत नव्हता. सिगरेट आणि मित्रांबरोबर अधूनमधून चालणार्‍या पार्टी (त्यातही अरिफ क्वचित प्यायचा असं सर्व मित्रांनी छातीठोकपणे सांगितलं) सोडल्यास अरिफ व्यवस्थितच होता. पण काहीतरी गडबड होतीच..

अझरचा अधूनमधून मलासुद्धा फोन यायचा. तो आणि मी ईमेल आणि चॅटींगवर बर्‍याच गप्पा मारायचो. मी बाबाकडून मुद्दाम नेट कनेक्शन घ्यायाला लावलं त्यासाठी. आमच्यात जुनी गाणी आणि सिनेमा हा कॉमन दुवा होताच. अझरबरोबर बोलताना मला पहिल्यांदा शमशाद बेगम, के एल सैगल, राम गांगुली, रोशन, लता, वगैरे नावं आणि त्यांची गाणी समजली.. मी पीसीवर गाणी लावली की बाबापण गुणगुणायचा.  त्याला इतकी जुनी गाणी आवडतात हे मलाच पहिल्यांदा कळालं.

आफताब मला या गाण्यांवरून कायम चिडवायचा “अझरभाई एक जुन्या जमान्याचा आहे, तू पण त्याच्याच जोडीला?” त्याची आवड इंग्लिश गाण्यांची. अभ्यास करताना मी जुनी गाणी लावायचे तर हा हट्टानं काहीतरी अगम्य गाणी लावायचा. आज इतक्या वर्षांनीसुद्धा माझी नाळ त्या इंग्लिश गाण्यांशी जोडली नाही. त्यामानानं वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल मात्र हल्ली बरंच ऐकलं. अर्थात ती मार्टीनची आवड.
अधूनमधून मी चॅटवर कधीतरी अझरभाईला अश्विनीबद्दल विचारायचे. ते तेवढ्यापुरतंच. नंतर तिचं आणि माझं बोलणं कधी झालंच नाही.

>>>>>>>
रविवारी दुपारी आईनं केलेली उंधियोची भाजी (हा प्रकार मला बिल्कुल आवडला नव्हता. नंतर कितीहीवेळा खाल्ला तरीही) घेऊन चाचींकडे गेले तर अरिफ आणि आफताब दोघं कशावरून तरी खिदळत होते. फार कमी वेळा हल्ली हे दोघं भाऊ एकत्र दिसायचे, इतकं हसणं तर नाहीच. मी “काय झालं” म्हणून विचारलं तर अजून हसायला लागले.
“काय माहित नाही. गेले दोन-तीन तास असंच चालू आहे. मलापण सांगत नाहीत” चाची म्हणाल्या.
“स्वप्निल, कंप्युटरकडे ये. तुला धम्माल दाखवतो.” आफताब म्हणाला.
“ते ईमेलवर आलेले काही फालतू जोक्स असतील आय ऍम नॉट इंटरेस्टेड”
“बघ तर!!” कुणाच्यातरी लग्नाचे स्कॅन केलेले दोन तीन फोटो होते. “ही कोण?”
“श्श!! हळू बोल” अरिफ कुजबुजत म्हणाला. “अम्मीला समजलं तर उगाच ओरडा बसेल. इतक्यांदा फोनवर बोललीस तरी ओळखलं नाहीस? ही तुझी मैत्रीण अश्विनी” आफताब हसतच होता.
“क्काय्य? तिचं लग्न झालं? अझरभाई... त्यांना माहित आहे?”
“ते आम्हाला कसं माहित असणार? त्यांनी आम्हाला लफडं थोडीच सांगितलं. अरिफच्या मित्राला माहित होतं त्यानं हे फोटो पाठवलेत. आता अझरभाईला हे फोटो तू फॉरवर्ड करणार आहेस.”
“मी कशाला? आणि त्याला किती वाईट वाटेल... आय मीन... तिचं असं जबरदस्तीनं लग्न लावून दिलेलं बघून...” मला खरंच अझरभाईची काळजी लागली होती. “पण तिनं असं लग्न केलंच कसं?”
“वेडाबाई, जरा विमान खाली उतरवा” अरिफ मला समजावत म्हणाला. “जबरदस्तीनं वगैरे काही नाही. चांगलं ठरवून बघून लग्न झालंय. नवरा मुलगा दोन वर्षं युएसला असतो. पत्रिका वगैरे जमल्या, मग दोघं चॅटींगवर बोलले आणि लग्न ठरवलंय...”
“ती तर अझरबरोबर...”
“लग्नाला कधीच तयार झाली नस्ती” आफताब मध्येच म्हणाला. “आम्हाला आधीपासून माहित होतं. बहुतेक अझरभाईलासुद्धा! कमॉन, इतकी पण शॉक होऊ नकोस. एक तर धर्माचा प्रॉब्लेम. घरचे कधीच तयार होणार नाहीत वर डिप्लोमा आणि साधी नोकरी. ती कंप्युटर इंजीनीअर... हे आलेलं स्थळ युएसचं. सॉफ्टवेअरमध्ये काम करतो. इतका गोल्डन चान्स सोडून ती इथं गावात येणार होती का?”
“पण मला वाटलं होतं की... ते दोघं रोज फोनवर बोलायचे... वगैरे.. इतका व्यावहारिक विचार करायचा तर मग बोलायचंच कशाला? अझरभाईला समजल्यावर त्याला किती वाईट वाटेल!”
“हायला!” अरिफ ओरडला. “स्वप्निल तू इतका भाबडा असशील असं वाटलं नव्हतं. दोघांचं अफेअर होतं पण इतकंही सीरीयस नव्हतं. अझरभाईला हे नक्की अपेक्षित असणार.” त्यानंतर परत दोघांचं खिदळणं चालू झालं. “मला तर केव्हाचंच माहित होतं... हे काय फार पुढं जाणार नाही.. तिनं बरोबर गेम केला याचा”
मला खरंच मनापासून वाईट वाटलं होतं. पण या दोघांना त्याचं काहीच नाही. फालतू जोक्स परत चालू झाले. संध्याकाळी अझरभाईला मेल केलं. कसा आहेस काय आहेस विचारण्यासाठी. तासाभरात त्याचा रीप्लाय आला, चॅटवर असलीस तर ये. बोलूया.
“मला अरिफनं पाठवलेले फोटो मिळाले.” त्यानं पहिलाच मेसेज टाकला.
“तुला माहित नव्हतं?”
“मला आठ दिवसांपूर्वीच समजलं होतं. मी फोन केला तर म्हणाली की घरचे कधीच तयार होणार नाहीत. त्यांनी एवढे पैसे देऊन मला इंजीनीअर केलंय, आता मी असं काही केलं तर त्यांचा विश्वासघात ठरेल वगैरे वगैरे...”
“मग?”
“मग काय.. मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया.. हर फिक्रको...”
“तुला वाईट वाटलं असेल ना?” मी एकदमच अतिबावळट प्रश्न विचारला.
“ऑफकोर्स बच्चू. वाईट तर वाटणारच ना. पण ठिके... प्रत्येकाला स्वत:च्या आयुष्याचा मार्ग कसा आखावा याचं स्वातंत्र्य असायलाच हवं ना...”
“पण मग तिनं आधीच सांगावं ना.. उगाच इतके दिवस तुझ्याशी इतकं गोड बोलून.. मग आयत्यावेळी...”
“निर्णय घेण्याची वेळ जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत त्या स्थितीमध्ये आपण कसं वागू हे कुणीच सांगू शकत नाही. कदाचित महिन्याभरापूर्वी तिच्या डोक्यात असं काही नसेलसुद्धा, मग हे स्थळ आलं, त्याला भेटली आणि कदाचित तिला वाटलं की अझरपेक्षा हा माणूस जोडीदार जास्त चांगल आहे...”
“अजिबात नाही!! जादूपेक्षा जास्त चांगलं कुणी असूच शकत नाही.”
“हे वाक्य मी फ्रेम करून ठेवेन. उद्या दुसर्‍या कुणाशी लग्न करशील तेव्हा तुला दाखवेन”
“??????”
“मजाक करतोय बच्चू! तुझ्या लग्नापर्यंत मी म्हातारा झालो असेन.”
“इतका पण वयोवृद्ध माणूस नाहीयेस.”
“पण तू बच्चू आहेस ना.. तू अश्विनीसारखं करू नकोस हां. आयुष्यभर साथ द्यायची हिंमत असेल तरच प्रेमात पड. उगाच टाईमपास म्हणून करू नकोस. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं”
“ह्म!!”
“ह्म काय? उलटं पण लक्षात ठेव. समोरचा तुझ्याच प्रेमात पडलाय की टाईमपास करतोय ते ओळख. काय कटकट आहे. इथं दुसर्‍या विंडोमध्ये अरिफ पिडतोय.”
“काय झालं??”
“मला ऐकाय्ला गाणी सुचवतोय. अरे, ते “दोनो ने किया प्यार मुझे याद रहा तुम भूल गई” या सिच्युएशनला फिट बसत नाहीये. जरा उठून लगेच जा आणि माझ्यातर्फे त्याला चार दोन रट्टे हाण”
“त्यालाच कशाला? आफताबलापण हाणायला हवेत. दोघं तुझी चेष्टा करत होते, मला इतका राग आला ना. प्रसंग काय आणि यांचं खिदळणं काय!”
“ते तर एक्स्पेक्टेडच होतं. पण जर परत कधी असे चिडवायला लागले ना अरिफला विचार प्राजक्ता काय म्हणते..”
“प्राजक्ता कोण?”
“आमच्या बिल्डिंगजवळ रहायची. अरिफ फुल्ल लाईन मारून होता. प्रत्यक्ष विचारायची कधी हिंमत झाली नाही. तिचा बाप आयपीएस आहे” मला हसूच आवरेना. आई खोलीच्या दारापर्यंत आली. “काय गं? एकटीच कंप्युटरकडे बघून काय हसतेस?”
“काही नाही. जादूबरोबर चॅटींग करतेय. अशीच गंमत”
“आटप लवकर. अभ्यास करायचाय ना!” आईनं आठवण करून दिली. मग थोडावेळ मी आणि जादू अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिलो. जादूसाठी पण अश्विनीप्रकरण फारसं सीरीयस नव्हतं हे बघून जरा बरं वाटलं. नंतर थोड्या दिवसांनी मी पण अरिफ आफताबसारखं त्याला या गोष्टीवरून चिडवायला लागले. आजपण चिडवते.

दोन तीन दिवसांनी आफताबसोबत मी त्याच्या पीसीवर गेम खेळत होते आणि अरिफभाई काहीतरी लिहत बसले होते. मी सहज म्हटल्यासारखं आफताबला म्हणाले, “माझ्या वर्गात ती प्राजक्ता आहे ना, तिचे बाबा पोलिसांत आहेत” हे म्हणताना एक नजर अरिफवर होतीच. माझं वाक्य ऐकल्याबरोबर लिहितानाच अरिफ खुदकन हसला. त्याचं ते हसणं बघून मला फार मजा वाटली. आफताब समोरच्या एलियनवर गोळ्या चालवण्यात मग्न असल्यानं त्याचं लक्ष नव्हतंच. पुढं अशीच मी दोनतीनदा अरिफला या प्राजक्तावरून असंच चिडवलं. तेव्हाही तो असाच हसला होता. मग कधीतरी पाठीमागच्या चिरमुल्यांच्या अंगणातल्या प्राजक्ताच्या फुलांची परडी भरून त्याला नेऊन दिली. तो परत नुसताच हसला.

आज इतक्या वर्षानंतर मला त्याचं ते हसणं आठवतं. स्वत:शीच. एकट्यानंच. याबद्दल मी त्याला इतकं चिडवत असूनही त्यानं मला तिच्याबद्दल कधीच काहीच सांगितलं नाही. मला हे कसं समजलं हे पण विचारलं नाही. आम्ही सगळे जणं समजत होतो की हा मामला एकतर्फीच आहे. अगदी आफताबलासुद्धा असंच वाटलं होतं. नक्की काय होतं ते आम्हाला कधीच कळलं नाही. 

No comments:

Post a Comment