दहावीचं वर्ष
चालू झालं आणि आफताब जणू बोलायचंच विसरला. सकाळी सहा ते नऊ कोचिंग क्लास. मग
साडेसहा ते पाच शाळा. संध्याकाळी सहा ते नऊ क्लास आणि मग घरी येऊन होमवर्क.
त्याखेरीज दुसरं आयुष्य नाहीच. मला आई पण असंच दोन कोचिंग क्लासला जा म्हणत होती,
मी मात्र माझी तब्बेत ठिक नसते, मला झेपणार नाही वगैरे सांगून सरळ नकार दिला.
सकाळी पाच वगैरे वाजता उठायला उत्साह बिल्कुल नव्हता. तसंही इतकं धावाधाव करून
कुणाला बोर्डात यायचं होतं. पोटापाण्यापुरते मार्क्स मिळाले तरी बास म्हणायची वेळ
होती.
आफताब बोर्डात
येणार हे जवळजवळ नक्कीच झालं होतं- शाळेमध्ये तर या हुशार मुलांचा स्पेशल वर्गच
केला होता. हा त्यांच्यापुढं एक पाऊल. शाळावाल्यांनी पोर्शन संपवायच्या आधीच
त्यानं मागच्या वर्षांचे क्वेश्चन पेपर्स सोडवायला घेतले होते. आमच्या बॅचच्या
थोडं आधी सिलॅबसमध्ये बदल झाले होते. मॅथ्समध्ये ए बी सी डी असे चार ग्रूप असायचे.
ए आणि बी एकदम सोपे. सी थोडा कठीण आणि डी
फारच कठिण. आफताब काकडी कोचवल्यासारखा सटासट डी ग्रूपमधली गणितं सोडवायचा.
कित्येकदा तर तोंडीच! माझं आणि गणिताचं
फारच वाकडं होतं. त्यापेक्षा भाषा, सोशल सायन्स आणि ड्रॉइंग आवडीचे विषय. नाही!!
ड्रॉइंग दहावीच्या विषयांमध्ये नव्हता. असाच माझा छंद होता. मी कधीमधी स्केचेस करत
बसलेली असले की आफताब मला “वेळ वाया कशाला घालवतेस? त्यापेक्षा सायन्सच्या आकृत्या
तरी काढ!” असा सल्ला द्यायचा. नानाची टांग!
दहावीला मी
काहीही झालं तरी पास होइन याची खात्री होती. त्यामुळे दिवसातला थोडावेळ अभ्यास करत
माझं निवांत चाललं होतं. अरिफभाईचा डिप्लोमा पण नीट चालू असावा. हल्ली भेटायचाच
नाही, तो आधीसारखा बागेत बसून गप्पा वगैरे मारायचा नाही. घरातही क्वचित दिसायचा.
मात्र कॉलेजला नियमित जायचा. मागच्या वर्षीच्या बारावीच्या अनुभवावरून चाची स्वत:च
महिन्यातून एकदा कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करून यायच्या. अरिफभाईचा अभ्यास आफताबसारखा
सलग नसायचा. मनाला येईल तेव्हा रात्रभर जागून अभ्यास करायचा. कंटाळा आला की
पुस्तकंवह्या उचलून चक्क गाठोड्यांत बांधून माळ्यावर ठेवून द्यायचा.
अझरभाई चॅटवर
अधून मधून भेटायचा. त्याच्याही कामाचं शेड्युल फार विचित्र झालं होतं. कुठल्याशा
रेसीडेन्शील टॉवरसाठी तो इलेक्ट्रीकल सुपरवायझर म्हणून काम करायचा. प्रचंड
मेहनतीचं काम. शिवाय रात्रंदिवस कामं चालूच. सुट्ट्यापण फारश्या नाहीत. आठवड्यातून
एक सुट्टी मिळाली की कपडे धुणे आणि झोपा काढणे यांतच जाणार. गावाची आठवण पण यायची.
खायचे प्यायचे तर प्रचंड हाल. त्यातून अझरभाई इतका वैतागला की शेवटी त्यानं
स्वत:चं घेतलेला शाकाहारीपणा सोडला. त्यानं ज्या दिवशी चॅटवर मला सांगितलं त्या
दिवशी मलाच कसंतरी वाटलं.
“रोज रोज तेच
खावं लागतंय. सेम भाजी, सेम चव. सेम सेम. गेले दोन तीन दिवस अन्नाचा नॉशिया बसला
होता, म्हणून आज थोडं मटण खाल्लं.” स्क्रीनवर ते वाचून मला शेकडो मैल दूर असलेल्या
जादूची अवस्था काय झाली होती त्याचा अंदाज येत होता, त्याच्या मनाला एखादी गोष्ट
पटकन खुपायची.
“इट्स ओके.
सर्वायवल हेच फार महत्त्वाचं!”
“सुरूवात तिथूनच
होते ना. माझं सर्वायवल. माझ्या कुटुंबाचं सर्वायवल. माझ्या जातीचं सर्वायवल. मग
याच सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट मधून संघर्ष चालू होतो. मला जगायलाच हवं. मग माझ्या
जगण्यासाठी मी दुसर्या कुणालातरी मारायलाच हवं. आज एक प्राणी मारला, उद्या कदाचित
अजून एखादा प्राणी. माणूस नावाचा.” जादू पलिकडून भराभर टाईप करत होता. त्याला
नक्की काय म्हणायचं आहे ते मला समजत नव्हतं.... थोडंफार लक्षात येत होतं. जाणवत
होतं. “मी शाकाहारी झालो कारण मला दुसर्या कुणाला मारायचं नव्हतं. दुसर्या
एखाद्याचा जीव घेणं हे मला फार क्रौर्य वाटायचं. पण आज मी मांस खाल्लं कारण मला
जगायचं होतं. त्या प्राण्याचा जीव मी घेतला नाही. ती हिंमत माझ्यात नाहीच. पण
कुणीतरी केलेल्या क्रौर्यामध्ये मी माझी भूक भागवली. मला समाधान मिळालं... मग मी
पण तितकाच क्रूर आहे की नाही?”
“माहित नाही. पण
मांस खाणं म्हणजे क्रूरता नव्हे जादू!”
“मग तुझी
क्रूरतेची व्याख्या काय?”
“व्याख्या?”
“ओह! द इंग्लिश मीडीयम. तू आणि आफताब! डेफ़िनेशन!!” स्क्रीनवरच्या त्या उमटणार्या काळ्या अक्षारांमधून पलिकडे जादूचा मूड थोडा लाईट झालेला मला इथे समजला. अरिफ आणि अझर मराठी मीडीयममध्ये शिकलेले. आफताब मात्र इंग्लिश मीडीयमचा.. चाची म्हणाल्या की आफताबला शाळेत घालताना अझरने हट्टानं इंग्लिश मीडीयमला घालायला लावलं होतं. पण वेळ आली की तिघंही एकमेकांची त्यावरून चेष्टा करायचे.
“ओह! द इंग्लिश मीडीयम. तू आणि आफताब! डेफ़िनेशन!!” स्क्रीनवरच्या त्या उमटणार्या काळ्या अक्षारांमधून पलिकडे जादूचा मूड थोडा लाईट झालेला मला इथे समजला. अरिफ आणि अझर मराठी मीडीयममध्ये शिकलेले. आफताब मात्र इंग्लिश मीडीयमचा.. चाची म्हणाल्या की आफताबला शाळेत घालताना अझरने हट्टानं इंग्लिश मीडीयमला घालायला लावलं होतं. पण वेळ आली की तिघंही एकमेकांची त्यावरून चेष्टा करायचे.
“मला माहित नाही.
पण जेव्हा जाणूनबुजून आपण दुसर्याला दुखवतो... म्हणजे केवळ फिजिकलीच नाही तर
मेण्टलीसुद्धा... ईव्हन इमोशनलीसुद्धा! त्याला क्रूरपणा म्हणतात. ऍम आय राईट?”
“वाचत जा गं. तू
छान लिहिशील. आफताब नुसती पुस्तकं खातो. त्यातलं त्याच्या डोक्यांत किती जातं
माहित नाही. तुला मात्र ती देण आहे. जितकं वाचशील तितका जास्त विचार करशील” त्यानं
चर्चेला पूर्ण टॅंजंट मारला (जमलं!! गणितामधली एकतरी उपमा मला द्यायला जमलं! तरी अजून टॅंजंटचा चाप्टर मला करायचाय!)
मग मी नुसती
स्मायली टाईप करून पाठवली—तेव्हा आजच्यासारखे शेकडो इमोजी नव्हतेच.. जादूनं मला
परत “कीप रीडींग” असा मेसेज पाठवला. इथं अभ्यासाची पुस्तकं वाचताना कंटाळा येतो,
तिथं इतर काय पुस्तकं वाचणार!
यावर्षी रमझान ईद
आणि दिवाळी लागोपाठ आले होते. रमझानचा पूर्ण महिना चाची आणि अरिफने उपवास केले.
संध्याकाळी इफ़्तारीला चाची माझ्यासाठी रोज गरमगरम खाऊ पाठवायच्या. आफताबनं अधलेमधले एक दोन करत उपवास
केले. दिवसभर लक्ष अभ्यासातच.. या ईदीला अझरभाईला सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे
अरिफ थोडासा खट्टूच होता. चाचींनी दोन्ही मुलांसाठी कपडे टेलरकडे शिवले.
माझ्यासाठी मात्र त्यांनी एक छान बेबी पिंक कलरचा फ्रॉक स्वत: शिवला होता. शिवाय
त्याला मॅचिंग हेअर क्लिप्स वगैरे. फ्रॉक तसा थोड्या जुन्याच फॅशनचा होता.
तो फ्रॉक पाहून
मी आईला म्हटलं, “मी काय लहान आहे का गं? असा फ्रॉक घातलेला पाहिला तर वर्गात मुली
हसतील”
“कुणी हसत नाही.
हसल्या त्यांचे दात दिसतील. त्यांची आवड म्हणून त्यांनी शिवला, छानच दिसतोय. दुसर्याचं
मन राखणं जास्त महत्त्वाचं असतं ना?” तरीपण मला परत एकदोनदा कुरकुरताना बघून एकदा
बाबा म्हणाला. “नील्या, असला फ्रॉक खरंतर आम्ही कॉलेजध्ये असताना फॅशनमध्ये होता.
गौरी घालायची तेव्हा काय आयटम दिसायची.” आई एकेकाळी फ्रॉक वगैरे घालत असेल असं मला
कधी वाटलंच नव्हतं. साडीखेरीज मी तिला कधी पाहिलंच नव्हतं. आई आणि बाबा दोघं एकाच कॉलेजमध्ये होते. आई
कॉमर्सला, बाबा आर्ट्सला. बाबा तिला दोन वर्षं सीनीअर. आईनं डिग्री पूर्ण
होण्याआधीच त्याच्याशी लग्न केलं. लव्ह मॅरेजच. घरून बराच विरोध वगैरे होता.
त्यानंतर पाच वर्षांनी माझा जन्म. लहानपणापासूनच मला आई आणि बाबा घरात एकमेकांशी
फारसे कधीच बोलताना दिसायचे नाहीत. आता मात्र बाबानं आईला आयटम (तेही माझ्यासमोर)
म्हटल्यानं आई चिडली आणि तिनं बाबाला चक्क एक धपाटा घातला. “काय जरा मुलीसमोर तरी
बोलायची अक्कल आहे की नाही! मोठी झालीये ती!”
माझ्या
अंदाजानुसार त्या फ्रॉकवरून वर्गात कुणीच हसलं नाही. कारण मी तो शाळेत घालून गेलेच
नाही. ईदीच्या दिवशी मात्र मला बघून आफताब खूप हसला होता. मी म्हणे, मैदा भरलेल्या
गुलाबी पोत्यासारखी दिसत होते. सारखा मला म्हणायचा, तुलाच उपवास करायची गरज आहे,
ते पण चांगले वर्षभर. इतकी पण मी काही जाड
नव्हते, तरी दोन तीनदा त्यानं तसं चिडवल्यावर मला रागच आला, तेव्हा अरिफभाई
म्हणाला, “तो इडियट आहे! कशाला ऐकतेस त्याचंण. तू या ड्रेसवर केस मोकळे सोडलेस ना
तर एकदम बार्बी डॉल दिसशील. चप्पू केस बांधात जाऊ नकोस. आणि तू लेन्सेस घाल ना!” झालं, आफतबला चिडवायला
अजूनच निमित्त मिळालं. तेव्हा ते एक बार्बी डॉलचं कसलंतरी एक इंग्लिश गाणं फार
फेमस झालं होतं. येताजाता ते गाणं ऐकवून मला चिडवायचा.
त्यातही सुख
इतकंच की चाचींनी सारखा मला चिडवतो म्हणून त्यालाच दोन चार धपाटे हाणले.
ईदच्या दिवशी
अझरभाईंचा फोन आला होता, पण चाचींच्या घरात इतकी गडबड होती की मला फोनवर ्त्याच्याशी
बोलताच आलं नाही. राहूनच गेलं. मी चॅटवर इन मुबारकचा मेसेज दोन तीनदा टाकला तरी
त्याला रीप्लाय आला नाही.
ईद होऊन बरोबर
पंधरा दिवस झाले होते. मी सगळा होमवर्क संपवून टीव्ही बघत जेवत होते. बाबाचं नुकतं
जेवण झालं होतं आणि तो कपडे बदलून बाहेर जायच्या तयारीमध्ये होता. आई किचनमध्ये
आवरत होती. अचानक पलिकडून आफताबची जोरात हाक आली. “गौरीकाकी, यतिनकाका, लवकर या”
दोन तीनदा तशी हाक ऐकून आईनं मागचा दरवाजा उघडला. बाबाला वाटलं साप आलाय, म्हणून
त्यानं हातात काठी घेतली. मग मी मागे थोडीच राहणार!
पण घरात चाची
जमीनीवर बसल्या होत्या. अरिफ बाजूलाच पडला होता. चाचींनी त्याचं डोकं हलकेच धरलं
होतं. “आता इथं बोलत बसला होता! अचानक खाली पडला. डोळेच उघडत नाहीये” आफताब
म्हणाला. चाचींच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. आई लगेच अरिफच्या बाजूला बसली. तो
बहुतेक बेशुद्ध झाला होता. डोळे एकदम पांढरे झाले होते. बाबा म्हणाला, मी लगेच कार
काढतो आणि हॉस्पिटलमध्येच नेऊया.
आई, बाबा आणि
चाची तिघं त्याला घेऊन हॉस्पिट्लध्ये गेले.
मी आणि आफताब घरीच टीव्ही बघत थांबलो. आई म्हणाली होती, की ती हॉस्पिटलमधून
फोन करेल. पण दोनेक तासांनी रात्री अकरा वाजता आफताबच्या दोन मामी घरी आल्या.
पुढची तयारी करायला.
अरिफ कायमचा
निघून गेला होता!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
रात्री नऊ वाजता
हॉस्पिटलमध्ये गेलेला अरिफभाई परत आणला तो कपड्यांत गूंडाळूनच. संध्याकाळी साडेसहा
वाजता तर मला कॉलेजवरून येताना दिसला होता. त्यानं मला हात दाखवला आणि “काय?
अभ्यास नाही का?” असं उगाचच विचारलं होतं. आणि मग असा का निघून गेला? अचानकच!
अझर गल्फला जायला
निघाला की अरिफ सारखा येऊन येऊन त्याच्या गळ्यांत पडायचा, मी तुला नंतर बाय करायला
विसरलो म्हणजे असं म्हणायचा. आणि तोच अरिफ आता निघून गेला. कुणाचाही निरोप न घेता.
आफताबचं डोकं
बधीर झालं होतं. कितीतरी वेळ तो मामींना “फिर से बोलो! काय झालंय़ अरिफला? कुठं आहे
तो?” हाच प्रश्न विचारत होता. त्याच्या मोठ्या मामींनी त्याला खुर्चीवर बसवलं आणि
शांतपणे सांगितलं. “हॉस्पिटलला जाईपर्यंतच तो गेला होता. इतकंच डॉक्टरांनी
सांगितलंय. पण आता सरकारी हॉस्पिटलात नेलंय. पुढचं सर्व...”
पोस्ट मार्टेम.
इतका हट्टाकट्टा मुलगा असा अचानक गेल्यावर...
तो लिहत असलेलं वर्कबूक अजून टेबलवर तसंच उघडं पडलेलं होतं. बशीमध्ये
चाचींनी त्याच्या आवडीचा लाडू काढून ठेवला होता, अरिफला जेवणानंतर काहीतरी गोड
लागतं. रोजच. त्याचं जेवलेलं ताट अजून सिंकमध्ये तसंच होतं. इतकावेळ अवतीभवती
असलेला अरिफ गेला? कुठं गेला? का?
रात्रभर मी आणि
आफताब जागेच होतो. कुणीकुणी नातेवाईक येत होते. सर्वांसाठी खरंच खूप धक्कादायक
होतं. नातेवाईक म्हणजे सर्व चाचीच्या माहेरकडचे. पुण्याला अरिफच्या काकांना
कुणीतरी फोन केला. मग अजून कुणाचा फोन आला. गल्लीमधले पण लोक यायला लागले. मध्येच
कुणीतरी बाई मला येऊन म्ह्णाल्या, “बेटी, घरला जाऊन जरा नीज. इथं थांबून काय..” मी
आफताबकडे पाहिलं. तो मान खाली घालून मुकाट बसला होता. मी वळून त्या काकींना
सांगितलं “थोड्य़ा वेळानं जाईन...” आणि उठून आफताबकडे गेले.
“अझरभाईला....”
“कुणीतरी फोन
केलाच असेल.. येऊ तर शकणार नाही. सगळं मलाच करावं लागेल.” एक एक शब्द तो थंडपणे
म्हणाला. येणार्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यांत पाणी होतंच. अगदी चाचींचे
म्हातारे काका आले तेसुद्धा रडत. याच काकांनी अरिफनं बारावीची परीक्षा दिली नव्हती
त्यादरम्यान चाचींना बरंच काही ऐकवलं होतं. त्यांच्या ओरडण्याचा आवाज पार आमच्या
घरापर्यंत आला होता. “त्याला पुण्याला परत पाठवून देस, इथं राहिला तर आफताबला
बिघडवेल.” ते सारखे म्हणत होते.
पहाटे कधीतरी आई
आली, आणि मला घरी घेऊन गेली. बाबा हॉस्पिटलमध्येच होता. अरिफच्या मेंदूमध्ये
कसलीतरी गाठ होती, ती अचानक फुटली म्हणून तो गेला. आईनं मला समजेल अश्या भाषेमध्ये
समजवायचा प्रयत्न केला. पण मला काहीच समजत नव्हतं. समजूनच घ्यायचं नव्हतं. अरिफचा
खूप म्हनजे खूप राग आला होता. असा कसा काय वागतो? बारावीला नापास झाला, मग पुढच्या
वर्षी परीक्षाच दिली नाही, आणि आता डिप्लोमाची परीक्षा जवळ आली तर याचं हे अस्लं
वागणं. आफताब म्हणायच्या, की त्यच्या मनात परीक्षेची भिती आहे... पण भिती आहे
म्हणून असं निघून जायचं? काही न सांगताच.
चाचींच्या आणि
आमच्या घरासमोर ही गर्दी जमली होती. गाड्या भरभरून लोक येत होते. मला खाली जाणं
शक्यच नव्ह्तं.
अरिफला सकाळी
ऍंब्युलन्समधून घेऊन आले तेव्हा मी आमच्याच घराच्या गच्चीवर उभी होते. अरिफला तिथं
खाली गेटजवळ ठेवलं आणि तिथंच हा मला पहिल्यांदा भेटला होता. प्लेटभर पोहे
कावळ्याचिमण्यांना काढून ठेवलेत म्हटलेला अरिफ. आपण खाली ठेवतो तिथे जमीनच असते
ना, काही बिघडत नाही म्हणणारा अरिफ. त्या दुपारी फक्त एकटा होता. आता
त्याच्याभोवती सर्वांचाच गराडा होता. आफताब
त्या गर्दीमध्ये होता, केवळ कुणीतरी सांगतंय म्हणून उभा असल्यासारखा.
ऎंब्युलन्सपाठोपाठ चाची कारमधून आल्या, त्यांनी आफताबला बघून हंबरडा फोडला.
त्यांच्या त्या आवाजानं प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आलं. माझ्यासुद्धा. रडला नाही
तो फक्त आफताब. आईला घट्ट धरून थोपटत राहिला, पण तोंडानं काहीच बोलला नाही. पुढं
मग अरिफला उचलून आत नेलं... आई म्हणाली आता अंघोळ घालतील आणि मग जनाजा उचलतील...
चाची रोज अरिफला
ओरडायच्या, कधी वेळेत अंघोळ करायचा नाही. कॉलेजला जायची वेळ झाली की मग उडतउडत दोन
मिनिटांची अंघोळ उरकायची. “मेल्या, अरे जरा लवकर उठत जा. नीट वेळेवर आवरत जा. दाढी
कर. कसा गुंडासारखा दिसतोय” चाची ओरडायच्या. अरिफ ऐकून न ऐकल्यासारखा करायचा...
आतापण त्यानं तसंच केलं असेल का? पण नाही, एरवी तो चाचींना कधीही दुखवायचा नाही,
सावत्रपणाचं नातं अवघड होतंच पण तरी तो चाचींना असं रडवणार नाही. शक्यच नाही.
आईनं घरामध्ये
इतर सर्वांसाठी चहा केला. बिचारे लोक रात्रीपासून आले होते. थोड्या वेळानं
पुण्यावरून अरिफचे काका आणि अजून कोण नातेवाईक आले. त्यांनी चाचींना कधीच धड
वागवलं नव्ह्तं, त्यामुळे अरिफ-आफताबला हे लोकं अजिबात आवडायचे नाहीत. त्यांनी
आपापसांतच कुणाला ड्रॅगन, कुणाला सामरीतर कुणाला रिछा अशी नावं ठरवून टाकली होती.
अरिफ म्हणाला, “कधीनाकधी ही लोकं इकडे येतील तेव्हा तुला ओळख करून देईन, मग सांग आम्ही
कधी शोधून शोधून नावं ठेवली आहेत. परफेक्ट!!” आज ते सर्व इकडे आले, पण परफेक्ट
नावं सांगणारा अरिफ नव्हता. ज्या लोकांनी अफताबचे वडील वारल्यावर महिन्याभरात
अक्षरश: घराबाहेर काढलं होतं ते लोक मात्र या क्षणाला फार महत्त्वाचे झाले होते.
आणि मी मात्र माझ्याच मित्राला परकी झाले होते.
वेळीअवेळी
ज्याच्यासोबत फिरत होते, गप्पा मारत होते, कधीही त्याच्या खोलीमध्ये जात होते, तो
आज माझा मित्र मलाच दूरचा झाला होता. प्रेत झाला होता. आता मी तिथं जाऊन त्याला
भेटू शकत नव्ह्ते. एरव्हीसारख्या गप्पा मारू शकत नव्हते. त्याच्यासोबत आफताबला
कशावरून पण चिडवू शकत नव्हते. हसू शकत नव्हते, खेळू शकत नव्हते. अरिफ गेला.
कायमचा. अवघ्या काही फुटावर असलेला माझा मित्र आता कुणाचाच काहीच लागत नव्हता.
मृत्यू एका सेकंदात सगळी नाती अशी तोडून टाकतो ना... डोक्याला रूमाल बांधलेला,
अरिफच्या प्रेताला उजवीक्डून उचलणारा आफताब अजूनही बधीरच होता.... पण
त्याच्याकडेही बघायला कुणाला वेळ नव्हता, त्याच्या दु:खापेक्षा आता अरिफचा मान
मोठा होता.
आफताब अभ्यासाला
बसला की त्याला सारखं कॉफी लागायची. चाची वैतागायच्या, एकदाच थर्मासमध्ये करून
ठेवते तर ते आफताबला चालायचं नाही. मग अरिफ उठून कॉफी करायचा. “इतका वेळ वाचताना
तुला त्रास होत नाही? मला तर पाचेक मिनिटांनी सगळी अक्षरं एकसारखीच दिसायला
लागतात” गरम कॉफीचा कप आफताबच्या टेबलावर ठेवताना विचारायचा.... कालच संध्याकाळी
त्यानं असं विचारलं होतं... पण तो आता भूतकाळ झाला. आता अरिफ कधीच कॉफी करणार
नाही, की आफताबला चिडवणार नाही... बाबा म्हणाला की, आता त्याला मशिदीत नेतील. तिथं
परत एक नमाझ होइल आणि मग पुढं.. बाबा एव्हाना घरी आला, आईनं त्याला अंघोळीसाठी
पाणी वगैरे दिलं.. बाबा गच्चीवर येऊन मला म्हणाला “नील्या, झोप थोडावेळ. रात्रभर
जागाच आहेस ना? ऊन पण फार वाढलंय” मी नुस्ती मान हलवली. अरिफ जाताना मला दिसत
होता. आता यापुढे तो परत कधीही दिसणार नाही....
आम्ही तिघं
दहावीची परीक्षा झाल्यवर पुण्याला जाणार होतो. असंच फिरायला. आम्ही तिघं पुढच्या
महिन्यांत परदेस बघायला जाणार होतो. आधी एकदा केबलवर बघितला होता, पण थेटरमधेय
आल्यावर आम्ही परत बघणार होतो. अरिफला ती हीरॉइन फार आवडली होती, आफताबनं तिचं
नामकरण स्क्रीची केलं होतं. मला शाहरूख तसाही आवडत नाही... पण तरीही अरिफसाठी
आम्ही तो पिक्चर परत बघणार होतो. अगदी नक्की हा!! आयत्यावेळी जमणार नाही म्हटलंस तर
फटके देईन. अरिफ म्हणाला होता. मग आता फटके कोण देईल?
मृत्यू या
गोष्टीशी माझा इतके दिवस काहीच परिचय नव्हता.... अरिफनं ती ओळख करून दिली.
(क्रमश:)
रहे ना रहे हम (भाग ४)
(क्रमश:)
रहे ना रहे हम (भाग ४)
मी ही कथा किती वेळा वाचलीये ते सांगता नाही येणार पण प्रत्येक वेळेला हा भाग वाचताना मी तितकीच रडते. काय बोलू नंदिनी. You are blessed !
ReplyDelete