आशू बसस्टॉपवर उतरली आणि तिने घड्याळात बघितलं. दुपारचे साडेतीन वाजले होते. अजून डीडी ऑफिसमधे पोचले नसतील. बाकीचे रिपोर्टर पण तासाभरात येतीलच, मगच कँटीनमधे चहा घेऊ, असा विचार करत ती ऑफिसच्या बिल्डिंगकडे निघाली. तवर तिला "आपल्याला नुसता चहाच नको, तर भूक पण लागलेली आहे" असा संदेश तिच्या मेंदूने दिला. इच्छा नसताना पण तिने रस्त्यावरचं एक सँडविच विकत घेतलं आणि ऑफिसमधे तिच्या डेस्कवर जाऊन बसली.
"आज लवकर?" सुर्याने आल्या आल्या विचारलं..
हा माणूस पगार स्पोर्ट रिपोर्टरचा घेतो आणि काम गुरख्याचं करतो.. आल्या आल्या आशूच्या मनातला हा रोजचाच विचार.
"काही नविन स्टोरी?" तिने स्वतःचा कॉम्पुटर चालू करत करत विचारलं.
"आहे ना. सात बाय लाईन स्टोरी पेंडिंग आहेत. त्या क्लीअर होऊ देत मग नविन देइन.. तवर रूटिन."
सूर्याच्या या सात स्टोरीज गेल्या वर्षापासून पडून होत्या. डीडीने अजून बहुतेक त्या कचर्यात पण फेकल्या असतील. आणि रोज एजन्सीच्या बातम्या एडिट करून डीडीच्या माथ्यावर टाकायचं इतकंच काम होतं. पण काही लोकाची नशिब् जोरावर असतात. फक्त आणि फक्त स्पोर्टच्या पानासाठी पेपर विकत घेऊन वाचणारे असतातच ना!!!!
आशूने पुन्हा एकदा सँडविचच्या पिशवीकडे बघितलं. पुन्हा एकदा सकाळी बघितलेला चेहरा नजरेसमोर तरळला. जेवायचीच काय पण श्वास घ्यायची सुद्धा तिची इच्छा मरून गेली. इतकी किळस वाटली तिला तो चेहरा आठवून. दोन मिनिटे डोळे घट्ट मिटून बसून राहिली..
कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. हळू हळू तो हात तिच्या छातीकडे सरकायला लागला. कुणाच्या तरे गुटख्याचा वास तिच्या अंगाजवळून यायला लागला. . भोवतालचा अंधार अजून दाटला. कुठेतरी दूर तिची आई तिला हाक मारत होती. पण तिच्या हाकेला प्रतिसाद द्यायचे त्राण तिच्यामधे नव्हते. "कुणाला बोलशील तर याद राख" तोंडात पुटपुटल्यासारखा कानाजवळ आवाज आला ती अजूनच घाबरली. तिने अजूनच डोळे घट्ट मिटले.
"आशू, माझ्या केबिनमधे" डीडीचा आवाज धूमकेतूसारखा आला. तिने डोळे उघडले. ती तिच्या मामाच्या घरात नव्हती. तिचा मामा तिच्या अंगाशी खेळत नव्ह॑ता. ती ऑफिसमधे होती. आणि तिचा बॉस नुकताच आला होता..
ती उठून केबिनकडे जाणार इतक्यात सुश तिच्या डेस्ककडे आली. आली म्हणजे नाचतच आली.
"अभिषेक बच्चन... आय हॅव गॉट अॅन अपॉइंटमेंट. उसकी नयी फिल्म है ना उसका इंटरव्ह्यु के लिये... मेरेको क्वेश्चन्स बनाने मे मदद करो ना!!!"
"शुअर.." प्रश्नच काय तिने उत्तरं पण इथेच बसून लिहून दिली असती सुशला. या फिल्मी लोकाचे शब्दकोशच मर्यादित त्याला ते तरी काय करणार, "पहले डीडी के चरण छूने जा रही हू."
"तो फिर् चल साथ मे जायेंगे"
डीडीने त्याचा कॉम्पुटर अजून चालू केला नव्हता. तसा या बाबतीत तो पाषाण युगीन मानव होता. रिपोर्टरच्या स्टोरीज पण तो प्रिंट आऊट घेऊन मग एडिट करायचा.
"काय काय खास?" एखाद्या हॉटेलच्या वेटरला जसा नेहमीचा गिर्हाईक विचारतं तसं तो विचारायचा.
"बिपाशा बासू- जॉन एब्राहिम एंगेजमेंट स्टोरी. सैफ करीना का डिवोर्स" सुशने ताबडतोब उत्तर दिलं. तिच्या स्टोरीज आधी डीडीला हव्या असायच्या. क्वचित तिची स्टोरी फ्रंट पेज असायची... पण त्यात सुशला प्रॉब्लेम नव्हता. तिला स्टोरी मिळवण्यासाठी जास्त धडपड करावी लागायची नाही.
डीडीने कागदावर स्टोरीज लिहून घेतल्या.
" डिवोर्स स्टोरी बकवास आहे. अजून हनिमून चालू आहे त्यांचा. एंगेजेमेंट स्टोरी त्याहून फालतू. दोघाचे एक पण पिक्चर नाही म्हणून पब्लिसिस्टी स्टंट आहे. सकाळी कुठल्यातरी न्युज चॅनलवर सलमान खान आणि माधुरी दिक्शित स्टोरी चालू होती. संजय दत्तने काहीतरी कमेंट दिलिये ती जरा बघ आणि त्याची स्टोरी बनव.... बडजात्या हम आपके चा सेक्वेल बनवतायत हे पिल्लू जोड त्याला."
सुशचा चेहरा साफ उतरला. स्टारच्या पीआरकडून आलेली प्रेस् रीलीज काही कामाची नव्हती. आणि त्यात आता तिला स्वतःहून काहीतरी लिहायचे होते..
डीडीने प्रश्नार्थक नजरेने आशूकडे पाहिले.
"चाईल्ड रेप" एका शब्दात तिने उत्तर दिले.
"डीटेल्स"
"शेजारी. आईवडिल कामावर जातात. आजी दुकानात गेली होती. बाळ घरात एकटंच होतं.."
"बाळ?"
"येस्स. नऊ महिन्याचं." आशूच्या आवाजात विलक्षण थंडपणा होता.
"तुला काय वाटतं. १०० वर्ड्स, की जास्त लागतील?"
"डीडी, क्राईम ब्रीफमधे घातली तर नाही का चालणार? जास्त डीटेल्स नाहियेत. पोलिस जास्त सांगत नाही आणि बाळाचा आयडी अर्थात जाहीर केलेला नाहिये."
तिचं वाक्य संपायच्या आत विकी केबिनमधे शिरला.
"अमेझिंग स्टोरी. सीरीयल चाईल्ड रेपिस्ट. आजच दुपारी अरेस्ट झालीये. श्यामने फोटो काढलेत त्याचे. आणि हो. मुलुंडजवळ एक हाफ मर्डर झालाय. "
डीडीने हातातला पेन खाली ठेवला. "विकी, किती दिवस झाले तुला क्राईम बीट घेऊन?"
"दोन वर्षं.."
"आशूला तीन महिने झाले." या वाक्यावर सुश खिदळली. भलतीकडे भलते विनोद शोधायची सवयच होती. पण डीडीने तिकडे दुर्लक्ष केलं. "त॑री तिला क्राईम स्टोरीचा सेन्सेटिव्हपणा समजतो. तुला कधी समजणार? प्रत्येक न्युज सेन्सेशनल बनवायला हे काय न्युज चॅनल वाटलं का???"
"पण डीडी, माझ्याकडे कोट्स पण आहेत. मी बोललोय ते रेपिस्टबरोबर. त्याने कन्फेस केलेय."
"विकी, कधीतरी स्टोरी करायच्या आधी समजून घेत जा. तुझीच स्टोरी आज आशुने पण फॉलो केली. वेगळ्या अँगलने."
विकी मनातल्या मनात चरफडला. गेली दोन वर्षं तोच एकटा क्राईम करत होता. ही आशू आधी जनरल स्टोरी करायची, मधेच फिल्म्स नाहीतर आर्ट वगैरे. तिने क्राईम मागून घेतलं होतं. आणि आता तिच्याकडून बातमी कशी लिहायची ते डीडी शिकायला सांगत होता. कधीही क्राईम सीनवर न दिसणारी बया आज चक्क त्याच्यापेक्षा वेगळ्या अँगलने स्टोरी करते म्हणे.
"सर, मला वाटतं विकीला स्टोरी लिहून काढून दे. मग वाटल्यास माझी स्टोरी त्यामधे मर्ज करता येइल." आशूने हळूच सांगितलं.
विकीला दुखवून तिला चाललं नसतं. काहीही झालं तरी तो सीनीअर होता त्याचे काँटॅक्ट्स जास्त होते. आज ना उद्या त्याची गरज लागलीच असती.
"नो. मला विकीच्या स्टोरीमधे काडीचाही इंटरेस्ट नाही. मला रेपिस्टच्या तथाकथित कन्फेशनमधे तर त्याहून जास्त नाही. विकी, उद्या त्या हाय प्रोफाईल पार्टीवेअरच्या खुनाची सुनावणी आहे. त्याची बॅकग्राऊंड बनव. जमलंच तर एखादी खास स्टोरी शोध. पण ही रेपिस्ट सोडून दुसरे काहीही कर."
हे बोलण्यापेक्षा डीडीने विकीला चपलेने मारलं असतं तर बरं झालं असतं. सीनीअर क्राईम रिपोर्टरला बॅकग्राऊंड?? हे म्हणजे टेस्टमधे ओपनिंग करणार्या खेळाडूला रणजीमधे राखीव खेळाडू म्हणून खेळवण्यासारखं...
तितक्यात सूर्या केबिनमधे आला..
"डीडी, माझ्या आजच्या स्टोरीज.."
"माहित आहेत. एजन्सीचा टिकर माझ्याकडे पण येतो. जा, ड्राफ्ट्स घेऊन मगच ये" डीडीने त्याला केबिनबाहेर घालवला. आज डीडीचा मूड फारच विचित्र वाटत होता. वैतागलेला चिडलेला असला की तो सरळ शिव्याच्या भाषेत बोलायचा. एरवी त्याचं बोलणं म्हणजे छान शेरोशायरी किस्से असं बरंच काही असायचं. पण आज दोन वाक्याच्या पलिकडे बोलणं जात नव्हतं. कायतरी गडबड होती हे नक्की.
"डीडी, आणि ती हाफ मर्डरची स्टोरी?"विकीला आवाज सापडला.
यावाक्यावर डीडी हसला. "विकी, आजपर्यंत मला हे हाफ मर्डर काही समजले नाही. माणूस एकतर जिवंत असतो किंवा मेलेला. त्यामधे हाफ मर्डर कसा होतो?? फार तर ही जीवघेण्या हल्ल्याची केस आहे असं म्हण."
विकीचा चेहरा आता साफ पडला.. "पण स्टोरी कंम्प्लीट कर आणि मला लवकर दे. इंटरेस्टिंग असेल तर फ्रंट पेज घेता येईल. फ्रंट पेजवर एक तरी क्राईम स्टोरी लागेलच...
"
"
अजून थोडा वेळ डीडीने प्रत्येकाच्या बातमीविषयी चर्चा केली. आणि सगळे रिपोर्टर केबिनबाहेर पडले. सर्वाचे हात सराईतपणे आपापली स्टोरी टाईप करायला लागले. आशूने दोनेक तासाने स्टोरी डीडीकडे पाठवून दिली आणि ती ऑफिसच्या बाहेर पायरीवर येऊन बसली. दुपारपासून तिच्या पोटात अन्नाचा एकही घास नव्हता. पण आता तिची भूकच मेली होती. तिने सिगरेट पेटवली.
त्या लहानग्या बाळाला हॉस्पिटलमधे बघितल्यापासून.. तो चेहरा, ती नजर, तिला समजलं तरी असेल का काय झालं ते.. आपल्याला समजलं होतं का तेव्हा? काय वय होतं आपलं.. पाच सहा की सात?? इतक्या वर्षात कधीच आठवलं नाही हे. आज का आठवतय? का आठवतय? त्या बाळाला कधी आठवेल हे सर्व? डीडी काय म्हणालेला, "बलात्कार फक्त शरीरावर होत नाही, मनावर होतो." मग आपल्या मनावर काय परिणाम झाला? ते सर्व किळसवाणं प्रकरण आईला सांगितलं. "कुणापुढे यातला एक शब्द बोलू नकोस" हे दरडावून तिने सांगितलं. आणि आपण ते विसरून गेलो. कधीच कुणासमोर याचा उच्चार केला नाही.
त्या बाळाचं पुढे काय? आपल्यासारखंच तेही विसरून जाईल? आपली गोष्ट आईशिवाय दुसर्या कुणाला समजलीच नाही, त्या बाळाची कथा या क्षणाला भारतातल्या प्रत्येक न्युज चॅनलवर चालू आहे. उद्या प्रत्येक वर्तमान पत्रात बातमी येइल. विसरायचं असेल तरी तिला आजूबाजूचे लोक विसरू देतील? हॉस्पिटलमधे चेकिंगनंतर तिचा बाप म्हणालाच ना "मरूनच गेली असती तर बरं झालं असतं. हे असलं लाजिरवाणं जिणं घेऊन कसं जगेल ती?"
खरंच कसं जगेल आता ती?? तिला जगू देइल का हा समाज?
कितीतरी वेळ तिथे बसून आशू विचार करत होती. पाठीमागे कुणाची तरी चाहूल लागली.
"सँडविच?" विकी तिच्या बाजूला बसत म्हणाला.
"सँडविच?" विकी तिच्या बाजूला बसत म्हणाला.
तिनेच दुपारी विकत घेतलेलं आणि आता मऊ पडलेलं सँडविच त्याने तिच्यासमोर धरलं.
"नको" ती इतकंच म्हणाली. खरंतर आता तिला तिच्या आजूबाजूला दुसरं कुणीच नको हवं होतं. त्यातही विकीतर अजिबात नको हवा होता. येनेकेन प्रकारे तो आजच्या स्टोरीबद्दलच बोलणार, हे तिने ताडलं होतं.
"सो? उद्याची काही स्टोरी?" त्याने विषय काढलाच.
"सध्यातरी काही नाही,"
"सध्यातरी काही नाही,"
"माझं एक काम करशील? उद्या मला तुझी मदत लागेल. मला एक मुलगी हवी आहे. तो आपला घाटकोपरचा शेट्टी आहे ना त्या स्टोरीसाठी"
आशू मनातच हसली. शेट्टीची स्टोरी हा भलामोठा स्कूप होता. बारमधे चालणारे वेश्याव्यवसाय, ही स्टोरी अर्थात ती जिथे काम करत होती त्यानी छापली नसती. पण डीडीने विकीला प्रॉमिस केले होते. "तू स्टोरी आणून दे, कुठे छापयचे ते मी बघतो" त्याच साठी आपली मदत तो घेणार, म्हणजे ग्रेटच होतं.
"आर यु शुअर? म्हणजे, मी जर तुला त्या स्टोरीत मदत केली तर तितके क्रेडिट्पण मी घेईनच"
"अर्थात!" विकी हसून म्हणाला. "म्हणजे तू उद्या येशील?"
या वाल्याचा वाल्मिकी कसा झाला असेल असा प्रश्न आशूला पडला. तरीदेखील इतक्या मोट्या स्टोरीमधे तो आपणहून बोलावतोय म्हणजे काहीतरी भानगड नक्कीच असणार.
"येइन, किती वाजता?"
"मी फोन करेन. आणि हो, उद्याचा ड्रेस पण मी सांगेन तो घालून ये. कॅमेरा, टॉर्च, दोरी, ड्रायफ्रूट्स"
"ओके, मला माहित आहे सर्व. घेऊन येइन." डीडी प्रत्येक रिपोर्टरला युद्धाच्या बातम्या कव्हर करायला पाठवल्यासारखा तयार करून पाठवायचा. पण शेट्टीच्या स्टोरीमधे जर अंडरकव्हर जायचं असेल तर या सगळ्याची गरज भासेलच. "तुझ्याबरोबर सूर्या पण असेल" विकीने सांगितलं. त्यामुळे एखादा चाकू पण जवळ ठेवावा, असा विचार आशूच्या मनात येऊन गेलाच.
" तुझ्या स्टोरीचे काय झाले? हाफ मर्डर?" तिने त्याला उगाचच चिडवले.
"डीडीच्या मते "जीवघेणा हल्ला" ज्या हल्ल्यामधे जीव जायला हवा होता, पण गेला नाही असा हल्ला!"
"पण मुळात हल्ला हा जीव घेण्यासाठीच असतो ना?"
"नॉट नेसेसरी! काही हल्ले हे जीव घेत नाहीत, आणि जगू देखील नाहीत" विकीने स्वतःची सिगरेट पेटवली.
"म्हणजे?"
"आजची तुझी बातमी, कु. अमुक तमुक वय वर्षे नऊ महिने. शेजार्याने केलेला बलात्कार. तो एखाद्याचा हाफ मर्डर नाही?"
"यु नो, मी आता तोच विचार करत होते. काय होइल तिचं?"
"जे नशिबात असेल तेच" विकी नशिबावर बोलतोय?? आशूने विकीच्या हातातली सिगरेट नीट बघितली, आपण चुकून काय गांजा ओढतोय की काय!!!
"विकी, नशीब म्हणजे..."
"फालतू चीज. मीच म्हणतो कायम. पण तरी कित्येकदा मनाला असे झटके बसतात की वाटतं साला कशाला जगतो मी? हे असलं सर्व बघायला. लिहायला. दुसर्याला वाचायला द्यायला."
"विकी, काय झालं काय नक्की तुला?
"
"
"तू... तू स्टोरी वेगळ्या अँगलने कव्हर केलीस ना? मग तू मला सांग. तेहतीस वर्षाच्या त्या भडव्याला काय गरज होती त्या पोरीला झवायची? काय मिळालं सुख त्याला? विचार केलास तू याचा?"
"विकी.. मला.. म्हणजे.. समजलं नाही तुला काय म्हणायचे आहे ते" आशूच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा तो अंधार तरळून गेला. तो गुटख्याचा वास. तो घाणेरडा स्पर्श.
"चाईल्ड अॅब्युज जितका तुला माहित आहे ना तितका इथे कुणाला माहित नाही... " विकीच्या तोंडावर हसू होतं आणि शब्दामधे हजार नागांचं विष.
"विकी, आय थिंक.." ती चपापून म्हणाली.
"नो, यु थिंक... तुला पुरूषाचा स्पर्श जसा जाणवतो तसा कुणाला जाणवत नाही, मी पण ऑब्जर्व केलय. दोन वर्षं क्राईम बीटमधे झक नाही मारली, कमॉन, हिंमत असेल तर अॅक्सेप्ट कर."
आशूने हातातली सिगरेट फेकून दिली आणि ती हातात चेहरा घेऊन रडायला लागली.
"दिस इज हाफ मर्डर.... समजलं तुला. माणूस जगतो पण मरत नाही, मरतो पण जगत नाही. एक आठवण आणि तुला रडायला येतय. जवर ती आठवण येत नाही, तवर तू जगतेयस. पण् मेंदूतल्या त्या आठवणींचे कप्पे खुलले की तू मेलीस. जशी आज मरतेस. त्या बाळाचा चेहरा बघून तू क्षणाक्षणाला मरतेयस."
"विकी, प्लीज स्टॉप. प्लीज..." ती अजून रडतच होती. तिने स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता की विकीसमोर ती अशी रडू शकेल. मुळात "मी खूप स्ट्राँग आहे" असं एक वलय तिनेच तिच्याभोवती निर्माण केलेलं होतं. आज ते वलय किती तकलादू आहे याची तिला जाणीव होत होती.
"नो, आशू, मी का थांबू? आज तू माझा हाफ मर्डर केलासच ना? डीडीच्या केबिनमधे?"
"विकी, मी जाणून बुजून काहीच केलं नाही. समहाऊ, मला ही स्टोरी फ्रंटपेज नको हवी होती. आणि तुला आता कारण का ते समजलेलंच आहे."
विकीने आशूच्या खाद्यावर हात ठेवला. "आणि मला ही स्टोरी फ्रंट पेजच हवी होती. कारण सांगू?"
"बायलाईन, विकीचे नाव पेपरात यायलाच हवे त्याच्या प्रत्येक बातमीसोबत" आशूने स्वत:चे डोळे पुसले.
"नाही, कारण असे लोक या जगामधे आहेत हे प्रत्येकाला समजायला हवं. यामधे आपल्या मुलीचं काहीही चुकलं नाही हे प्रत्येक आईबापाला समजायला हवं. तरीपण नाही झाली माझी स्टोरी. आय डोंट केअर. मला यापेक्षा अजून चांगली बातमी मिळेलच. उम्मीद पे तो दुनिया कायम है. पण उम्मीदपेक्षा नालायक असतो तो ईगो. आज तू माझ्या ईगो चोळामोळा करून टाकलास. माझ्यापण मेंदूमधे हे फीड राहणार. मी पण विसरलो असं दाखवणार. प्रत्यक्षात कधीतरी आजची ही आठवण लाव्हासारखी उसळत राहणार. जगू पण देणार नाही आणि मरूपण देणार नाही. हा फ म र्ड र. "
आशू हसली. नविन सिगरेट पेटवली इतक्यात विकी ओरडला.
"आयला, माझं मेमरी कार्ड एक्स्पायर झालं बहुतेक! डीडी बोलावतोय तुला. ते सांगायला आलो होतो"
"विकी??? ग्रेट आहेस तू!! त्याला अर्जंट माहिती हवी असेल"
तिने सिगरेट विझवली. आणि धावत डीडीच्या केबिनकडे निघाली.
"छान बातमी, आशना. कीप ईट अप" डीडी च्या पुढ्यात तिची स्टोरी होती. "तुझी भाषा दिवसेंदिवस सुधारत चाललेय. छोटंसं पण चांगलं लिहितेस"
"थँक्स डीडी."
"आणि आता, सगळ्यात महत्त्वाचा विषय, लेट्स गो फॉर डिनर"
"ओह!!" आशू खुशच खुश झाली. रोज रात्री डीडी ज्याची स्टोरी बेस्ट असेल त्या रिपोर्टरला घेऊन डिनरला जायचा.
आशू मनातल्या मनात खूश झाली. हाफ मर्डर. दहा वर्षापूर्वी तिचा. दहा तासापूर्वी त्या बाळाचा. आणि थोड्या वेळापूर्वी विकीचा. प्रत्येकाचा कधीना कधी होतोच, आणि प्रत्येकजण कधीना कधी करतोच, दुसर्या कुणाचा तरी हाफ मर्डर.
(समाप्त)
Heinous crime of child abuse
ReplyDeleteAshu's mind did get confuse
She's emotional with a short fuse
Gotta forget past ,new life to infuse.