Wednesday, 3 April 2013

कोरा करकरीत!

समोरचा कागद कोरा तसाच पडलाय. तास झाला, तरी माझी नजर त्या कागदाच्या कोरेपणावरच खिळलेली. काहीतरी शोधत शोधत कपाट उघडलं आणि खाली पडला तो कागद. कोराकरकरीत.


कितीतरी वर्षापूर्वी तो कागद आवडला म्हणून विकत घेतला. आवडला कागद म्हणून एकच घेतला. ढीगभर घेऊन काय करायचे होते? एकाच कागदाचा तो कोरेपणा पुरला असता आयुष्यासाठी. त्यानंतर कितीतरी कागद पाहिले, त्यातले कितीतरी आवडले, काही विकत घेतले, काहींवरती वाणसामानाच्या याद्या लिहिल्या आणि काही चुरगळून फेकून दिले. हा कागद मात्र जपून ठेवला. कायम!!


खिडकीतून बाहेर बघितलं तर समोरचं आंब्याचं झाड दिसतंय. कैर्‍यांनी पुरतं भरलेलं. उन्हाळ्याच्या रखरखाटाला वैतागून मी मघाशी कूलर लावलेला. पण माझ्या त्या कृत्रिम थंडपणापेक्षा तो उन्हात उभा असलेला आंबा अधिक गार भासतोय. समोरचा तो कोरा कागद घेऊन मी झाडाखाली येते. अहा! काय थंड आहे ही सावली. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला तृप्त करत जाणारी. झाडाखाली कधी कुण्या फकिरासाठी कुण्या सावकाराने बांधलेला पार आहे. त्या पारावर खेळत खेळत माझं आयुष्य गेलं. त्या पारावर खेळत आणि या हातातल्या कागदाचं कोरेपण जपत.


आजूबाजूला अर्ध्या-कच्च्या पडलेल्या कैर्‍या आहेत. आज्जी अशा कैर्‍यांना बाळकैर्‍या म्हणायची.... अशा कशा काय पडल्या असतील या बाळकैर्‍या? पडल्यावर रडल्या असतील का? आणि अशा कैर्‍या पडून गेल्या तरी झाडाला त्याचं काही दु:ख वगैरे वाटले असेल का? की झाडाला जाणीवच नसेल कधी या कैर्‍यांची.. शेकड्यांनी फळं डवरलेली असताना दहापंधराचा हिशोब कोण ठेवतंय??या आंब्याचं काही माझ्या मनासारखं नाही... हजारोंनी रक्ताबंबाळ जखमा झालेल्या असताना माझ्या मनाला मात्र खपली धरलेल्या काही जखमांचं कोण कौतुक...हातातला कोरा कागद तसाच अजून आहे. या उन्हाच्या सावलीमधे तो अजूनच कोरा वाटतोय. कधी वाटतं फाडून फेकून द्यावं हे सर्व... कशासाठी जपायचं? किती जपायचं? उन्हापासून, पावसापासून, फोफाट्यापासून, पाण्यापासून.. जर कोरा कागद जपायचाच आहे तर मग लिहायचं कधी त्यावर? आणि जर लिहायचंच आहे तर मग हाच कोरा कागद हवा कशाला? काय गरज या कोरेपणाची...
सरळ काही न लिहिता चुरगाळून करून फेकून द्यावा तो कागद.. याच बाळकैर्‍यांच्या आजूबाजूला. तसाच, कोराकरकरीत.


पण नाही, हातातला हा कोरा कागद फेकवणार नाही माझ्याच्यानं. चुरगळवला तर बिल्कुल जाणार नाही.आणि त्यावर कधी काही लिहून तर कदापि होणार नाही.

(समाप्त)