आजचा दिवस मोठा उत्सवाचा होता. दूरदूरच्या गावावरून लोक आले होते. आज स्वामीजीच अंतिम दर्शन! मध्यान्हकाळानंतर स्वामीजी समाधी घेणार होते. जिवंत समाधी. नदीकाठची ती छोटीशी मठी स्वामीजीच्या शिष्यांनी फुलून गेली होती. हे छोटेसे गाव ज्या राज्यात येत होतं त्या राज्याचा प्रतिनिधी आला होता. स्वतः राजा येण्याइतके स्वामीजी मोठे नव्हते. जिवंतपणी तरी. स्वामीजींनी आपला उत्तराधिकारी निवडला होता, आता तो उत्तराधिकारी शास्त्रानुसार एका बंद खोलीत बसून ध्यान करत होता. त्याला स्वामीजींचे अखेरचे दर्शन नाही!
मठीत आलेल्या दोन-तीनशे लोकासाठी अन्नाची व्यवस्था पलिकडे एक छोटासा मंडप घालून केलेली होती. शिष्यगण इकडे तिकडे नुसते धावत होते, आजच्या कार्यक्रमामधे त्यांना कसलीच कमतरता भासू द्यायची नव्हती. स्वामीजी आज महायात्रेला प्रयाण करणार होते. आणि त्यांचे सर्व शिष्यगण मूकपणे, डोळ्यातून एक अश्रू न काढता त्यांना निरोप देणार होते. मठीच्या एका कोपर्यामधे काही शिष्य बसून वेदमंत्राचा घोष करत होते. सर्व वातावरण अगदी शांत, गंभीर आणि मंगल होतं.
आता स्वामीजी नदीवर स्नान करायला गेले होते.
पहाट संपून दिवस सुरू झाला होता. सूर्य त्याच्या नेमाप्रमाणे उगवला होता. नेमाप्रमाणेच अस्ताला जाईल. पण तो मी बघणार नाही! संन्यासी मनाशी हसला. आपलं आयुष्यभराचं कार्य संपलं आता कुणालाही आपली गरज नाही आणि कुणाची आपल्याला गरज नाही.. याच एका भावनेने त्यानी समाधीचा निर्णय घेतला होता. संसार सोडतानादेखील असाच निर्णय घेतला होता. अवघं सतरा अठरा वर्षाचं वय. घरामधे आई वडिल, भावंडं आणि पत्नी.
संन्यास घेणार हे ठरवल्यावर बिचारी नुसती रडत होती. मी जिवंत असताना ती विधवा झाली, मी तिचं आणि घरातल्या सर्वाचं श्राद्ध करून बाहेर पडलो, जानवं तोडलं.. आणि माझ्या गुरूच्या आश्रयाला आलो! पण म्हणून मनातले बंध तुटले? संन्याशाने स्वतःशीच प्रश्न केला. अजून असतील का माझे आईवडिल? कशी असेल ती पत्नी?? तिचं नाव देखील न आठवण्याइतकं आपण तिला विसरलो. जाणीवपूर्वक आपल्या स्मृतीच्या कक्षेतून तिला बाहेर काढली. पण तरीदेखील ती राहिली. आपल्याचसोबत. आपल्याच अवतीभवती. आपल्याला जाणवूदेखील न देता.
संन्याशाने डोळ्यांना पाणी लावलं. नको!! आजच्या दिवशी या आठवणी नकोत.. आपण पुढे निघून आलो. आपल्या गुरूचा वारसा आपण समर्थपणे चालवला. यवनांच्या आक्रमणात देखील आपण धर्म पुढे नेला. धर्मासाठी जगायचे आणि आता धर्मानुसारच पुढली वाटचाल करायची! ध्यानाला बसायचे आणि समाधी घ्यायची. मृत्यूचा स्पर्श होण्याआधीच.
संन्याशाचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात पडले होते. साठीच्या पुढचे वय. गोरापान रंग. योग, आहार आणि जीवनक्रमातील शिस्त यामुळे अजूनही कुठल्याही व्याधीपासून मुक्त असलेले शरीर. अमोघ वाणी आणि वक्तृत्व यावर संन्याशाने कित्येक धर्मसभा गाजवल्या. धर्माचे कित्येक नाजूक आणि गुंतागुंतीचे कायदे त्याने सोप्या सरळ भाषेत समजावून सांगितले. परधर्माकडे वाहणारा जनप्रवाहाचा रेटा पुन्हा स्वधर्माकडे आणला. कित्येक निरूपयोगी कर्मकांडाचे विसर्जन केले. धर्माचं मूल स्वरूप कायम ठेवत त्याने बाह्यरूप मात्र कालाला सुसंगत बनवलं.
"कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ" हे संन्याशाने सामान्यजनांना पटवून दिलं. त्याची भक्ती खरंच श्रेष्ठ होती. पहाटेच्या वेळी त्याला कृष्ण भजन म्हणायची आवड होती. स्वरचित पदं तो स्वतःच्या मधुर आणि खणखणीत आवाजात म्हणत असे, तेव्हा ती छोटीशी मठीच नव्हे, तर नदीकाठचा तो अख्खा परिसर कृष्णमय होऊन जाई. मर्त्य मानव तर होतच पण गाई गुरे पक्षीदेखील मुग्ध होत. गावातील कित्येक लोक तर काम सोडून मठीत येऊन बसत. संन्याशाच्या गोड आवाजाने गायलेली भजनं ऐकायला
आणि डोळे मिटून गात बसलेल्या संन्याशाला हे समजतच नसे... तो स्वतःच्याच भक्तीच्या साधनेमधे तवर मथुरेला पोचलेला. तो आला की कृष्ण तिथे बाळलीला खेळत असे. संन्याशाने कंसवध पाहिला होता, कालियामर्दन पाहिले होते आणि गोवर्धन पर्वत करंगळीवर तोललेला कन्हैय्यादेखील.
तोच कन्हैय्या संन्याशाला आता बोलवत होता. संपलं तुझं अवतार कार्य, जे करण्यासाठी तुला पाठवलं होतं ते साध्य झालं... आता परत फिर.
संन्याशाने नदीच्या अजून गार असणार्या पाण्यात डुबकी मारली. पण संन्याशाला पाणी गार वाटलेच नाही. त्याची पंचेद्रिये त्याने कधीच स्वतःच्या ताब्यात घेतली होती. तो जितेंद्रिय होता! सलग बारा वर्षे त्याने योग साधना केली होती. आता त्याच्या या पार्थिव शरीराला कसल्याच अन्नाची गरज नव्हती. त्याने गेल्या एकदशीपासूनच अन्नाचा त्याग गेला होता.
नदीच्या पाण्यात असणारे मासे त्याच्या पायांना लुचू लागले. संन्यास घेतल्यापासून त्याने इतर कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या शरीराचा स्पर्श करू दिला नव्हता, दुसर्या कुणीही शिजवलेले अन्न त्याने ग्रहण केले नव्हते. पण ते इवलालेसे मासे... त्याना काय माहिती हे एका भारतभूच्या महान संन्याशाचे आणि धर्मनेत्याचे पाय आहेत म्हणून!
संन्याशाला आता कसलीच काळजी नव्हती. उत्तराधिकारी निवडला होता, तोदेखील परीक्षा घेऊन तावून सुलाखून!! इतर शिष्य या निवडीबद्दल समाधानी होते, संन्याशाच्या निर्णयक्षमतेवर कुणालाही शंका नव्हती.
उन्हाची कोवळी किरणं नदीवर पडली होती. ही माझी माता.. गेल्या पंधरा वर्षापासून हिच्याच अंगाखांद्यावर खेळतोय, ही इथेच असेल. मी परत येइपर्यंत. अजून अनादि अनंतापर्यंत
संन्यासी नदीतून बाहेर आला. त्याने सूर्याला अर्घ्य दिला. मंत्र म्हटले आणि तो परत फिरला. दूरून देखील मठी गजबजलेली दिसत होती. काय होतं इथे? या ओसाड जमिनीमधे? काहीही नाही! पण पंधरा वर्षापूर्वी संन्याशाने इथे मठी बांधली. तसा तो क्वचितच इथे रहायचा. अख्खं भारत भ्रमण त्याने पायी केलं होतं. तीर्थ यात्रा केल्या होत्या, निसर्गाचे अद्भुत चमत्कार पाहिले होते, बर्फ पाहिला, वाळवंट पाहिलं. जीवन पाहिलं आणि मृत्यू पाहिला.
आता तो नि:स्संग झाला होता. आयुष्यभर ज्या मोहमायेच्या पाशापासून दूर राहिला त्याच मोहमायेच्या कुशीत जायची वेळ. समाधी! इथे एका वर्तुळाचा अंत आणि नविन वर्तुळाची सुरूवात! काय असेल सुरूवात? कशी असेल? संन्यासी चालता चालता थबकला!
आत्ता.. या क्षणी मनात प्रश्न नकोत. पूर्णपणे मन आणि आत्मा रितं करायची ही वेळ. आपण काहीही करत नाही, करवून घेणारा तो जगन्नियंता आहे, एकदा त्याच्या हातात आपल्या आयुष्याची दोरी दिली की संपलं..
संन्यासी परत मठीकडे चालू लागला. पण मनात आलेला एक शंकारूपी किडा त्याच्या मनाला कुरतडू लागला. इतके दिवस एखाद्या शांत डोहाकडे असणारं त्याचं मन लाटेसारखं उचंबळू लागलं.
मन शांत करायचा एकच मार्ग होता आणि योगसाधनेने संन्याशाने तो मिळवला होता
.
तरीही तो चालत राहिला. नदीकाठची वाळू मऊ होती. संन्याशाचे पाय त्यामधे रूतत होते, संन्यासी ते बाहेर काढत होता. मनात चाललेलं द्वंद्व अजून चालूच होतं. मठी जवळ आली होती. अजून पाचशे पावलांवर.
आता संन्याशाला निर्णय घ्यायलाच हवा होता. समाधी अवस्थेत जाण्यासाठी त्याला मनावर पूर्ण काबू हवा होता, नाहीतर त्या समाधीच्या ठिकाणी आला असता तो त्याचा वेदनेने तडफडून मृत्यू!! पण हे वार्यापेक्षाही जास्त चंचल मन सावरायचे कसे??
संन्याशाने डोळे बंद् केले. गुरूचे स्मरण केले. स्वतःची योगशक्ती पुन्हा एकदा आजमावून पाहिली. "माझ्यानंतर काय?" याच प्रश्नाचे उत्तर त्याला हवे होते. संन्याशी काळाच्या मागून नाही, त्याच्या सोबत गेला आणि परत आला. त्याने डोळे उघडले. तो विषण्णपणे हसला.
आता मनाची पूर्ण तयारी झाली होती. मन शांत झालं होतं. नदीच्याकाठावरून संन्याशाने ती मठी पाहिली आणि तो परत फिरला. नदीच्या डोहात उतरला. चालतच राहिला.
==============================================
आज स्वामीजींचा उत्सव. देशविदेशातून लोक आले होते. असं म्हणतात की, स्वामीजीनी इथेच याच मठीत जिवंत समाधी घेतली होती. पाचशे वर्षापूर्वी. तेव्हाची ती छोटीशी मठी आता चार मजली इमारत झाली होती. . नदीकाठचा परिसर भक्तनिवासानी फुलला होता. पाच ते आठ हजार माणसाच्या अन्नाची व्यवस्था केलेली होती. आज राज्याच्या मुख्यमंत्री आला होता. हेलिकॉप्टरने. त्याने राज्य निधीतून मठाला भरघोस देणगी दिली होती. स्वामीजींच्या विविध पूजा या मठात होत असत. प्रत्येक पूजेसाठी चारआकडी, तीन आकडी रूपये देऊन पावती करावी लागे. आता मठाची अजून एक इमारत उठणार होती. खास विविध पूजा आणि यज्ञासाठी. आता चालू असलेल्या पूजांपेक्षा वेगळ्या आणि अधिक महागड्या पूजा आता देवस्थानातर्फे चालू होणार होत्या.
स्वामीजींनी पाचशे वर्षापूर्वी रचलेल्या पदांना नविन चाली लावून त्याच्या कॅसेट्स बाजारात आल्या होत्या. त्या हातोहात खपत होत्या. सगळीकडे स्वामीजींचे शब्द वेगवेगळ्या धुनांमधून निनादत होते. लोक येताजाता गाडी चालवताना, जेवताना स्वामीजींची भजनं कानावर पडू देत होते. त्यापैकी ऐकत किती जणं होते...
आज इथे स्वामीजी शरीररूपाने नव्हते पण त्यांच्या प्रतिकृती मात्र सर्वत्र होत्या. पेन लॉकेट, अंगठी, फोटो, मूर्ती सर्वत्र स्वामीजी होते. प्रत्येक पेनाची, लॉकेटची, अंगठीची, फोटोची, मूर्तीची किंमत ठरलेली होती... भाविक या वस्तू विकत घेऊन स्वामीजींना घरी घेऊन जात होते.
स्वामीजींचा जयघोष सर्वत्र ऐकू येत होता. स्वामीजींचे शिष्य आता विमानाने देशविदेशामधे भ्रमण करत स्वामीजींनी दाखवलेला भक्तीमार्गच कसा योग्य आहे यावर प्रवचन करत होते. या शिष्यांचा दिवसाभरातला वेळ मात्र निरनिराळी कर्मकांडे करण्यामधेच जात होता.
एका मोठ्या चॅनलने स्वामीजींच्या आयुष्यावर मालिका सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्या चॅनलकडून काही खास लोक येऊन मठाचा आणि समाधीचा अभ्यास करून गेले होते. जिथे स्वामींजींनी जिवंतपणी आपला देह ठेवला अशी वदंता होती त्या समाधीचे तर त्यांनी कितीतरी फोटो काढले होते.
स्वामीजी... स्वामीजी.. परिसरामधे सर्वत्र हेच नाव निनादत होतं.
फक्त तो संन्यासी कुठेच नव्हता.
.
तो त्या नदीच्या डोहातून या सर्वाकडे बघत होता.. काळाच्या बदलत्या रूपाकडे!!
समाप्त.
marmik likhan
ReplyDelete