Monday, 29 April 2013

हाफ मर्डर

आशू बसस्टॉपवर उतरली आणि तिने घड्याळात बघितलं. दुपारचे साडेतीन वाजले होते. अजून डीडी ऑफिसमधे पोचले नसतील. बाकीचे रिपोर्टर पण तासाभरात येतीलच, मगच कँटीनमधे चहा घेऊ, असा विचार करत ती ऑफिसच्या बिल्डिंगकडे निघाली. तवर तिला "आपल्याला नुसता चहाच नको, तर भूक पण लागलेली आहे" असा संदेश तिच्या मेंदूने दिला. इच्छा नसताना पण तिने रस्त्यावरचं एक सँडविच विकत घेतलं आणि ऑफिसमधे तिच्या डेस्कवर जाऊन बसली.

"आज लवकर?" सुर्याने आल्या आल्या विचारलं..

हा माणूस पगार स्पोर्ट रिपोर्टरचा घेतो आणि काम गुरख्याचं करतो.. आल्या आल्या आशूच्या मनातला हा रोजचाच विचार.

"काही नविन स्टोरी?" तिने स्वतःचा कॉम्पुटर चालू करत करत विचारलं.

"आहे ना. सात बाय लाईन स्टोरी पेंडिंग आहेत. त्या क्लीअर होऊ देत मग नविन देइन.. तवर रूटिन."

सूर्याच्या या सात स्टोरीज गेल्या वर्षापासून पडून होत्या. डीडीने अजून बहुतेक त्या कचर्‍यात पण फेकल्या असतील. आणि रोज एजन्सीच्या बातम्या एडिट करून डीडीच्या माथ्यावर टाकायचं इतकंच काम होतं. पण काही लोकाची नशिब् जोरावर असतात. फक्त आणि फक्त स्पोर्टच्या पानासाठी पेपर विकत घेऊन वाचणारे असतातच ना!!!!

आशूने पुन्हा एकदा सँडविचच्या पिशवीकडे बघितलं. पुन्हा एकदा सकाळी बघितलेला चेहरा नजरेसमोर तरळला. जेवायचीच काय पण श्वास घ्यायची सुद्धा तिची इच्छा मरून गेली. इतकी किळस वाटली तिला तो चेहरा आठवून. दोन मिनिटे डोळे घट्ट मिटून बसून राहिली..

कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. हळू हळू तो हात तिच्या छातीकडे सरकायला लागला. कुणाच्या तरे गुटख्याचा वास तिच्या अंगाजवळून यायला लागला. . भोवतालचा अंधार अजून दाटला. कुठेतरी दूर तिची आई तिला हाक मारत होती. पण तिच्या हाकेला प्रतिसाद द्यायचे त्राण तिच्यामधे नव्हते. "कुणाला बोलशील तर याद राख" तोंडात पुटपुटल्यासारखा कानाजवळ आवाज आला ती अजूनच घाबरली. तिने अजूनच डोळे घट्ट मिटले.

"आशू, माझ्या केबिनमधे" डीडीचा आवाज धूमकेतूसारखा आला. तिने डोळे उघडले. ती तिच्या मामाच्या घरात नव्हती. तिचा मामा तिच्या अंगाशी खेळत नव्ह॑ता. ती ऑफिसमधे होती. आणि तिचा बॉस नुकताच आला होता..

ती उठून केबिनकडे जाणार इतक्यात सुश तिच्या डेस्ककडे आली. आली म्हणजे नाचतच आली.

"अभिषेक बच्चन... आय हॅव गॉट अ‍ॅन अपॉइंटमेंट. उसकी नयी फिल्म है ना उसका इंटरव्ह्यु के लिये... मेरेको क्वेश्चन्स बनाने मे मदद करो ना!!!"

"शुअर.." प्रश्नच काय तिने उत्तरं पण इथेच बसून लिहून दिली असती सुशला. या फिल्मी लोकाचे शब्दकोशच मर्यादित त्याला ते तरी काय करणार, "पहले डीडी के चरण छूने जा रही हू."
"तो फिर् चल साथ मे जायेंगे"

डीडीने त्याचा कॉम्पुटर अजून चालू केला नव्हता. तसा या बाबतीत तो पाषाण युगीन मानव होता. रिपोर्टरच्या स्टोरीज पण तो प्रिंट आऊट घेऊन मग एडिट करायचा.

"काय काय खास?" एखाद्या हॉटेलच्या वेटरला जसा नेहमीचा गिर्‍हाईक विचारतं तसं तो विचारायचा.

"बिपाशा बासू- जॉन एब्राहिम एंगेजमेंट स्टोरी. सैफ करीना का डिवोर्स" सुशने ताबडतोब उत्तर दिलं. तिच्या स्टोरीज आधी डीडीला हव्या असायच्या. क्वचित तिची स्टोरी फ्रंट पेज असायची... पण त्यात सुशला प्रॉब्लेम नव्हता. तिला स्टोरी मिळवण्यासाठी जास्त धडपड करावी लागायची नाही.

डीडीने कागदावर स्टोरीज लिहून घेतल्या.

" डिवोर्स स्टोरी बकवास आहे. अजून हनिमून चालू आहे त्यांचा. एंगेजेमेंट स्टोरी त्याहून फालतू. दोघाचे एक पण पिक्चर नाही म्हणून पब्लिसिस्टी स्टंट आहे. सकाळी कुठल्यातरी न्युज चॅनलवर सलमान खान आणि माधुरी दिक्शित स्टोरी चालू होती. संजय दत्तने काहीतरी कमेंट दिलिये ती जरा बघ आणि त्याची स्टोरी बनव.... बडजात्या हम आपके चा सेक्वेल बनवतायत हे पिल्लू जोड त्याला."

सुशचा चेहरा साफ उतरला. स्टारच्या पीआरकडून आलेली प्रेस् रीलीज काही कामाची नव्हती. आणि त्यात आता तिला स्वतःहून काहीतरी लिहायचे होते..

डीडीने प्रश्नार्थक नजरेने आशूकडे पाहिले.

"चाईल्ड रेप" एका शब्दात तिने उत्तर दिले.
 
"डीटेल्स"
"शेजारी. आईवडिल कामावर जातात. आजी दुकानात गेली होती. बाळ घरात एकटंच होतं.."
"बाळ?"
"येस्स. नऊ महिन्याचं." आशूच्या आवाजात विलक्षण थंडपणा होता.
"तुला काय वाटतं. १०० वर्ड्स, की जास्त लागतील?"
"डीडी, क्राईम ब्रीफमधे घातली तर नाही का चालणार? जास्त डीटेल्स नाहियेत. पोलिस जास्त सांगत नाही आणि बाळाचा आयडी अर्थात जाहीर केलेला नाहिये."

तिचं वाक्य संपायच्या आत विकी केबिनमधे शिरला.
"अमेझिंग स्टोरी. सीरीयल चाईल्ड रेपिस्ट. आजच दुपारी अरेस्ट झालीये. श्यामने फोटो काढलेत त्याचे. आणि हो. मुलुंडजवळ एक हाफ मर्डर झालाय. "

डीडीने हातातला पेन खाली ठेवला. "विकी, किती दिवस झाले तुला क्राईम बीट घेऊन?"

"दोन वर्षं.."
"आशूला तीन महिने झाले." या वाक्यावर सुश खिदळली. भलतीकडे भलते विनोद शोधायची सवयच होती. पण डीडीने तिकडे दुर्लक्ष केलं. "त॑री तिला क्राईम स्टोरीचा सेन्सेटिव्हपणा समजतो. तुला कधी समजणार? प्रत्येक न्युज सेन्सेशनल बनवायला हे काय न्युज चॅनल वाटलं का???"

"पण डीडी, माझ्याकडे कोट्स पण आहेत. मी बोललोय ते रेपिस्टबरोबर. त्याने कन्फेस केलेय."

"विकी, कधीतरी स्टोरी करायच्या आधी समजून घेत जा. तुझीच स्टोरी आज आशुने पण फॉलो केली. वेगळ्या अँगलने."

विकी मनातल्या मनात चरफडला. गेली दोन वर्षं तोच एकटा क्राईम करत होता. ही आशू आधी जनरल स्टोरी करायची, मधेच फिल्म्स नाहीतर आर्ट वगैरे. तिने क्राईम मागून घेतलं होतं. आणि आता तिच्याकडून बातमी कशी लिहायची ते डीडी शिकायला सांगत होता. कधीही क्राईम सीनवर न दिसणारी बया आज चक्क त्याच्यापेक्षा वेगळ्या अँगलने स्टोरी करते म्हणे.

"सर, मला वाटतं विकीला स्टोरी लिहून काढून दे. मग वाटल्यास माझी स्टोरी त्यामधे मर्ज करता येइल." आशूने हळूच सांगितलं.

विकीला दुखवून तिला चाललं नसतं. काहीही झालं तरी तो सीनीअर होता त्याचे काँटॅक्ट्स जास्त होते. आज ना उद्या त्याची गरज लागलीच असती.

"नो. मला विकीच्या स्टोरीमधे काडीचाही इंटरेस्ट नाही. मला रेपिस्टच्या तथाकथित कन्फेशनमधे तर त्याहून जास्त नाही. विकी, उद्या त्या हाय प्रोफाईल पार्टीवेअरच्या खुनाची सुनावणी आहे. त्याची बॅकग्राऊंड बनव. जमलंच तर एखादी खास स्टोरी शोध. पण ही रेपिस्ट सोडून दुसरे काहीही कर."

हे बोलण्यापेक्षा डीडीने विकीला चपलेने मारलं असतं तर बरं झालं असतं. सीनीअर क्राईम रिपोर्टरला बॅकग्राऊंड?? हे म्हणजे टेस्टमधे ओपनिंग करणार्‍या खेळाडूला रणजीमधे राखीव खेळाडू म्हणून खेळवण्यासारखं...
तितक्यात सूर्या केबिनमधे आला..
"डीडी, माझ्या आजच्या स्टोरीज.."
"माहित आहेत. एजन्सीचा टिकर माझ्याकडे पण येतो. जा, ड्राफ्ट्स घेऊन मगच ये" डीडीने त्याला केबिनबाहेर घालवला. आज डीडीचा मूड फारच विचित्र वाटत होता. वैतागलेला चिडलेला असला की तो सरळ शिव्याच्या भाषेत बोलायचा. एरवी त्याचं बोलणं म्हणजे छान शेरोशायरी किस्से असं बरंच काही असायचं. पण आज दोन वाक्याच्या पलिकडे बोलणं जात नव्हतं. कायतरी गडबड होती हे नक्की.

"डीडी, आणि ती हाफ मर्डरची स्टोरी?"विकीला आवाज सापडला.
यावाक्यावर डीडी हसला. "विकी, आजपर्यंत मला हे हाफ मर्डर काही समजले नाही. माणूस एकतर जिवंत असतो किंवा मेलेला. त्यामधे हाफ मर्डर कसा होतो?? फार तर ही जीवघेण्या हल्ल्याची केस आहे असं म्हण."

विकीचा चेहरा आता साफ पडला.. "पण स्टोरी कंम्प्लीट कर आणि मला लवकर दे. इंटरेस्टिंग असेल तर फ्रंट पेज घेता येईल. फ्रंट पेजवर एक तरी क्राईम स्टोरी लागेलच...

"
अजून थोडा वेळ डीडीने प्रत्येकाच्या बातमीविषयी चर्चा केली. आणि सगळे रिपोर्टर केबिनबाहेर पडले. सर्वाचे हात सराईतपणे आपापली स्टोरी टाईप करायला लागले. आशूने दोनेक तासाने स्टोरी डीडीकडे पाठवून दिली आणि ती ऑफिसच्या बाहेर पायरीवर येऊन बसली. दुपारपासून तिच्या पोटात अन्नाचा एकही घास नव्हता. पण आता तिची भूकच मेली होती. तिने सिगरेट पेटवली.

त्या लहानग्या बाळाला हॉस्पिटलमधे बघितल्यापासून.. तो चेहरा, ती नजर, तिला समजलं तरी असेल का काय झालं ते.. आपल्याला समजलं होतं का तेव्हा? काय वय होतं आपलं.. पाच सहा की सात?? इतक्या वर्षात कधीच आठवलं नाही हे. आज का आठवतय? का आठवतय? त्या बाळाला कधी आठवेल हे सर्व? डीडी काय म्हणालेला, "बलात्कार फक्त शरीरावर होत नाही, मनावर होतो." मग आपल्या मनावर काय परिणाम झाला? ते सर्व किळसवाणं प्रकरण आईला सांगितलं. "कुणापुढे यातला एक शब्द बोलू नकोस" हे दरडावून तिने सांगितलं. आणि आपण ते विसरून गेलो. कधीच कुणासमोर याचा उच्चार केला नाही.

त्या बाळाचं पुढे काय? आपल्यासारखंच तेही विसरून जाईल? आपली गोष्ट आईशिवाय दुसर्‍या कुणाला समजलीच नाही, त्या बाळाची कथा या क्षणाला भारतातल्या प्रत्येक न्युज चॅनलवर चालू आहे. उद्या प्रत्येक वर्तमान पत्रात बातमी येइल. विसरायचं असेल तरी तिला आजूबाजूचे लोक विसरू देतील? हॉस्पिटलमधे चेकिंगनंतर तिचा बाप म्हणालाच ना "मरूनच गेली असती तर बरं झालं असतं. हे असलं लाजिरवाणं जिणं घेऊन कसं जगेल ती?"
खरंच कसं जगेल आता ती?? तिला जगू देइल का हा समाज?
कितीतरी वेळ तिथे बसून आशू विचार करत होती. पाठीमागे कुणाची तरी चाहूल लागली.

"सँडविच?" विकी तिच्या बाजूला बसत म्हणाला.
 
तिनेच दुपारी विकत घेतलेलं आणि आता मऊ पडलेलं सँडविच त्याने तिच्यासमोर धरलं.
"नको" ती इतकंच म्हणाली. खरंतर आता तिला तिच्या आजूबाजूला दुसरं कुणीच नको हवं होतं. त्यातही विकीतर अजिबात नको हवा होता. येनेकेन प्रकारे तो आजच्या स्टोरीबद्दलच बोलणार, हे तिने ताडलं होतं.

"सो? उद्याची काही स्टोरी?" त्याने विषय काढलाच.

"सध्यातरी काही नाही,"
 
"माझं एक काम करशील? उद्या मला तुझी मदत लागेल. मला एक मुलगी हवी आहे. तो आपला घाटकोपरचा शेट्टी आहे ना त्या स्टोरीसाठी"
आशू मनातच हसली. शेट्टीची स्टोरी हा भलामोठा स्कूप होता. बारमधे चालणारे वेश्याव्यवसाय, ही स्टोरी अर्थात ती जिथे काम करत होती त्यानी छापली नसती. पण डीडीने विकीला प्रॉमिस केले होते. "तू स्टोरी आणून दे, कुठे छापयचे ते मी बघतो" त्याच साठी आपली मदत तो घेणार, म्हणजे ग्रेटच होतं.
"आर यु शुअर? म्हणजे, मी जर तुला त्या स्टोरीत मदत केली तर तितके क्रेडिट्पण मी घेईनच"
"अर्थात!" विकी हसून म्हणाला. "म्हणजे तू उद्या येशील?"
या वाल्याचा वाल्मिकी कसा झाला असेल असा प्रश्न आशूला पडला. तरीदेखील इतक्या मोट्या स्टोरीमधे तो आपणहून बोलावतोय म्हणजे काहीतरी भानगड नक्कीच असणार.
"येइन, किती वाजता?"
"मी फोन करेन. आणि हो, उद्याचा ड्रेस पण मी सांगेन तो घालून ये. कॅमेरा, टॉर्च, दोरी, ड्रायफ्रूट्स"
"ओके, मला माहित आहे सर्व. घेऊन येइन." डीडी प्रत्येक रिपोर्टरला युद्धाच्या बातम्या कव्हर करायला पाठवल्यासारखा तयार करून पाठवायचा. पण शेट्टीच्या स्टोरीमधे जर अंडरकव्हर जायचं असेल तर या सगळ्याची गरज भासेलच. "तुझ्याबरोबर सूर्या पण असेल" विकीने सांगितलं. त्यामुळे एखादा चाकू पण जवळ ठेवावा,  असा विचार आशूच्या मनात येऊन गेलाच.
" तुझ्या स्टोरीचे काय झाले? हाफ मर्डर?" तिने त्याला उगाचच चिडवले.
"डीडीच्या मते "जीवघेणा हल्ला" ज्या हल्ल्यामधे जीव जायला हवा होता, पण गेला नाही असा हल्ला!"
"पण मुळात हल्ला हा जीव घेण्यासाठीच असतो ना?"
"नॉट नेसेसरी! काही हल्ले हे जीव घेत नाहीत, आणि जगू देखील नाहीत" विकीने स्वतःची सिगरेट पेटवली.
"म्हणजे?"
"आजची तुझी बातमी, कु. अमुक तमुक वय वर्षे नऊ महिने. शेजार्‍याने केलेला बलात्कार. तो एखाद्याचा हाफ मर्डर नाही?"
"यु नो, मी आता तोच विचार करत होते. काय होइल तिचं?"
"जे नशिबात असेल तेच" विकी नशिबावर बोलतोय?? आशूने विकीच्या हातातली सिगरेट नीट बघितली, आपण चुकून काय गांजा ओढतोय की काय!!!
"विकी, नशीब म्हणजे..."
"फालतू चीज. मीच म्हणतो कायम. पण तरी कित्येकदा मनाला असे झटके बसतात की वाटतं साला कशाला जगतो मी? हे असलं सर्व बघायला. लिहायला. दुसर्‍याला वाचायला द्यायला."
"विकी, काय झालं काय नक्की तुला?
"
"तू... तू स्टोरी वेगळ्या अँगलने कव्हर केलीस ना? मग तू मला सांग. तेहतीस वर्षाच्या त्या भडव्याला काय गरज होती त्या पोरीला झवायची? काय मिळालं सुख त्याला? विचार केलास तू याचा?"
"विकी.. मला.. म्हणजे.. समजलं नाही तुला काय म्हणायचे आहे ते" आशूच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा तो अंधार तरळून गेला. तो गुटख्याचा वास. तो घाणेरडा स्पर्श.
"चाईल्ड अ‍ॅब्युज जितका तुला माहित आहे ना तितका इथे कुणाला माहित नाही... " विकीच्या तोंडावर हसू होतं आणि शब्दामधे हजार नागांचं विष.
"विकी, आय थिंक.." ती चपापून म्हणाली.
"नो, यु थिंक... तुला पुरूषाचा स्पर्श जसा जाणवतो तसा कुणाला जाणवत नाही, मी पण ऑब्जर्व केलय. दोन वर्षं क्राईम बीटमधे झक नाही मारली, कमॉन, हिंमत असेल तर अ‍ॅक्सेप्ट कर."
आशूने हातातली सिगरेट फेकून दिली आणि ती हातात चेहरा घेऊन रडायला लागली.
"दिस इज हाफ मर्डर.... समजलं तुला. माणूस जगतो पण मरत नाही, मरतो पण जगत नाही. एक आठवण आणि तुला रडायला येतय. जवर ती आठवण येत नाही, तवर तू जगतेयस. पण् मेंदूतल्या त्या आठवणींचे कप्पे खुलले की तू मेलीस. जशी आज मरतेस. त्या बाळाचा चेहरा बघून तू क्षणाक्षणाला मरतेयस."
"विकी, प्लीज स्टॉप. प्लीज..." ती अजून रडतच होती. तिने स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता की विकीसमोर ती अशी रडू शकेल. मुळात "मी खूप स्ट्राँग आहे" असं एक वलय तिनेच तिच्याभोवती निर्माण केलेलं होतं. आज ते वलय किती तकलादू आहे याची तिला जाणीव होत होती.

"नो, आशू, मी का थांबू? आज तू माझा हाफ मर्डर केलासच ना? डीडीच्या केबिनमधे?"

"विकी, मी जाणून बुजून काहीच केलं नाही. समहाऊ, मला ही स्टोरी फ्रंटपेज नको हवी होती. आणि तुला आता कारण का ते समजलेलंच आहे."
विकीने आशूच्या खाद्यावर हात ठेवला. "आणि मला ही स्टोरी फ्रंट पेजच हवी होती. कारण सांगू?"

"बायलाईन, विकीचे नाव पेपरात यायलाच हवे त्याच्या प्रत्येक बातमीसोबत" आशूने स्वत:चे डोळे पुसले.

"नाही, कारण असे लोक या जगामधे आहेत हे प्रत्येकाला समजायला हवं. यामधे आपल्या मुलीचं काहीही चुकलं नाही हे प्रत्येक आईबापाला समजायला हवं. तरीपण नाही झाली माझी स्टोरी. आय डोंट केअर. मला यापेक्षा अजून चांगली बातमी मिळेलच. उम्मीद पे तो दुनिया कायम है. पण उम्मीदपेक्षा नालायक असतो तो ईगो. आज तू माझ्या ईगो चोळामोळा करून टाकलास. माझ्यापण मेंदूमधे हे फीड राहणार. मी पण विसरलो असं दाखवणार. प्रत्यक्षात कधीतरी आजची ही आठवण लाव्हासारखी उसळत राहणार. जगू पण देणार नाही आणि मरूपण देणार नाही. हा फ म र्ड र. "

आशू हसली. नविन सिगरेट पेटवली इतक्यात विकी ओरडला.

"आयला, माझं मेमरी कार्ड एक्स्पायर झालं बहुतेक! डीडी बोलावतोय तुला. ते सांगायला आलो होतो"

"विकी??? ग्रेट आहेस तू!! त्याला अर्जंट माहिती हवी असेल"
तिने सिगरेट विझवली. आणि धावत डीडीच्या केबिनकडे निघाली.
"छान बातमी, आशना. कीप ईट अप" डीडी च्या पुढ्यात तिची स्टोरी होती. "तुझी भाषा दिवसेंदिवस सुधारत चाललेय. छोटंसं पण चांगलं लिहितेस"
"थँक्स डीडी."
"आणि आता, सगळ्यात महत्त्वाचा विषय, लेट्स गो फॉर डिनर"
"ओह!!" आशू खुशच खुश झाली. रोज रात्री डीडी ज्याची स्टोरी बेस्ट असेल त्या रिपोर्टरला घेऊन डिनरला जायचा.
आशू मनातल्या मनात खूश झाली. हाफ मर्डर. दहा वर्षापूर्वी तिचा. दहा तासापूर्वी त्या बाळाचा. आणि थोड्या वेळापूर्वी विकीचा. प्रत्येकाचा कधीना कधी होतोच, आणि प्रत्येकजण कधीना कधी करतोच, दुसर्‍या कुणाचा तरी हाफ मर्डर.

(समाप्त)





Wednesday, 24 April 2013

संन्यासी



आजचा दिवस मोठा उत्सवाचा होता. दूरदूरच्या गावावरून लोक आले  होते. आज स्वामीजीच अंतिम दर्शन! मध्यान्हकाळानंतर स्वामीजी समाधी घेणार होते. जिवंत समाधी. नदीकाठची ती छोटीशी मठी स्वामीजीच्या शिष्यांनी फुलून गेली होती.  हे छोटेसे गाव ज्या राज्यात येत होतं त्या राज्याचा प्रतिनिधी आला होता. स्वतः राजा येण्याइतके स्वामीजी मोठे नव्हते. जिवंतपणी तरी. स्वामीजींनी आपला उत्तराधिकारी निवडला होता, आता तो उत्तराधिकारी शास्त्रानुसार एका बंद खोलीत बसून ध्यान करत होता. त्याला स्वामीजींचे अखेरचे दर्शन नाही!


मठीत आलेल्या दोन-तीनशे लोकासाठी अन्नाची व्यवस्था पलिकडे एक छोटासा मंडप घालून केलेली होती. शिष्यगण इकडे तिकडे नुसते धावत होते, आजच्या कार्यक्रमामधे त्यांना कसलीच कमतरता भासू द्यायची नव्हती. स्वामीजी आज महायात्रेला प्रयाण करणार होते. आणि त्यांचे सर्व शिष्यगण मूकपणे, डोळ्यातून एक अश्रू न काढता त्यांना निरोप देणार होते. मठीच्या एका कोपर्‍यामधे काही शिष्य बसून वेदमंत्राचा घोष करत होते. सर्व वातावरण अगदी शांत, गंभीर आणि मंगल होतं.
आता स्वामीजी नदीवर स्नान करायला गेले होते.
पहाट संपून दिवस सुरू झाला होता. सूर्य त्याच्या नेमाप्रमाणे उगवला होता. नेमाप्रमाणेच अस्ताला जाईल. पण तो मी बघणार नाही! संन्यासी मनाशी हसला. आपलं आयुष्यभराचं कार्य संपलं आता कुणालाही आपली गरज नाही आणि कुणाची आपल्याला गरज नाही.. याच एका भावनेने त्यानी समाधीचा निर्णय घेतला होता. संसार सोडतानादेखील असाच निर्णय घेतला होता. अवघं सतरा अठरा वर्षाचं वय. घरामधे आई वडिल, भावंडं आणि पत्नी.
संन्यास घेणार हे ठरवल्यावर बिचारी नुसती रडत होती. मी जिवंत असताना ती विधवा झाली, मी तिचं आणि घरातल्या सर्वाचं श्राद्ध करून बाहेर पडलो, जानवं तोडलं.. आणि माझ्या गुरूच्या आश्रयाला आलो! पण म्हणून मनातले बंध तुटले? संन्याशाने स्वतःशीच प्रश्न केला. अजून असतील का माझे आईवडिल? कशी असेल ती पत्नी?? तिचं नाव देखील न आठवण्याइतकं आपण तिला विसरलो. जाणीवपूर्वक आपल्या स्मृतीच्या कक्षेतून तिला बाहेर काढली. पण तरीदेखील ती राहिली. आपल्याचसोबत. आपल्याच अवतीभवती. आपल्याला जाणवूदेखील न देता.



संन्याशाने डोळ्यांना पाणी लावलं. नको!! आजच्या दिवशी या आठवणी नकोत.. आपण पुढे निघून आलो. आपल्या गुरूचा वारसा आपण समर्थपणे चालवला. यवनांच्या आक्रमणात देखील आपण धर्म पुढे नेला. धर्मासाठी जगायचे आणि आता धर्मानुसारच पुढली वाटचाल करायची! ध्यानाला बसायचे आणि समाधी घ्यायची. मृत्यूचा स्पर्श होण्याआधीच.



संन्याशाचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात पडले होते. साठीच्या पुढचे वय. गोरापान रंग. योग, आहार आणि जीवनक्रमातील शिस्त यामुळे अजूनही कुठल्याही व्याधीपासून मुक्त असलेले शरीर. अमोघ वाणी आणि वक्तृत्व यावर संन्याशाने कित्येक धर्मसभा गाजवल्या. धर्माचे कित्येक नाजूक आणि गुंतागुंतीचे कायदे त्याने सोप्या सरळ भाषेत समजावून सांगितले. परधर्माकडे वाहणारा जनप्रवाहाचा रेटा पुन्हा स्वधर्माकडे आणला. कित्येक निरूपयोगी कर्मकांडाचे विसर्जन केले. धर्माचं मूल स्वरूप कायम ठेवत त्याने बाह्यरूप मात्र कालाला सुसंगत बनवलं.
"कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ" हे संन्याशाने सामान्यजनांना पटवून दिलं. त्याची भक्ती खरंच श्रेष्ठ होती. पहाटेच्या वेळी त्याला कृष्ण भजन म्हणायची आवड होती. स्वरचित पदं तो स्वतःच्या मधुर आणि खणखणीत आवाजात म्हणत असे, तेव्हा ती छोटीशी मठीच नव्हे, तर नदीकाठचा तो अख्खा परिसर कृष्णमय होऊन जाई. मर्त्य मानव तर होतच पण गाई गुरे पक्षीदेखील मुग्ध होत. गावातील कित्येक लोक तर काम सोडून मठीत येऊन बसत. संन्याशाच्या गोड आवाजाने गायलेली भजनं ऐकायला


आणि डोळे मिटून गात बसलेल्या संन्याशाला हे समजतच नसे... तो स्वतःच्याच भक्तीच्या साधनेमधे तवर मथुरेला पोचलेला. तो आला की कृष्ण तिथे बाळलीला खेळत असे. संन्याशाने कंसवध पाहिला होता, कालियामर्दन पाहिले होते आणि गोवर्धन पर्वत करंगळीवर तोललेला कन्हैय्यादेखील.



तोच कन्हैय्या संन्याशाला आता बोलवत होता. संपलं तुझं अवतार कार्य, जे करण्यासाठी तुला पाठवलं होतं ते साध्य झालं... आता परत फिर.


संन्याशाने नदीच्या अजून गार असणार्‍या पाण्यात डुबकी मारली. पण संन्याशाला पाणी गार वाटलेच नाही. त्याची पंचेद्रिये त्याने कधीच स्वतःच्या ताब्यात घेतली होती. तो जितेंद्रिय होता! सलग बारा वर्षे त्याने योग साधना केली होती. आता त्याच्या या पार्थिव शरीराला कसल्याच अन्नाची गरज नव्हती. त्याने गेल्या एकदशीपासूनच अन्नाचा त्याग गेला होता.


नदीच्या पाण्यात असणारे मासे त्याच्या पायांना लुचू लागले. संन्यास घेतल्यापासून त्याने इतर कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या शरीराचा स्पर्श करू दिला नव्हता, दुसर्‍या कुणीही शिजवलेले अन्न त्याने ग्रहण केले नव्हते. पण ते इवलालेसे मासे... त्याना काय माहिती हे एका भारतभूच्या महान संन्याशाचे आणि धर्मनेत्याचे पाय आहेत म्हणून!


संन्याशाला आता कसलीच काळजी नव्हती. उत्तराधिकारी निवडला होता, तोदेखील परीक्षा घेऊन तावून सुलाखून!! इतर शिष्य या निवडीबद्दल समाधानी होते, संन्याशाच्या निर्णयक्षमतेवर कुणालाही शंका नव्हती.


उन्हाची कोवळी किरणं नदीवर पडली होती. ही माझी माता.. गेल्या पंधरा वर्षापासून हिच्याच अंगाखांद्यावर खेळतोय, ही इथेच असेल.  मी परत येइपर्यंत. अजून अनादि अनंतापर्यंत


संन्यासी नदीतून बाहेर आला. त्याने सूर्याला अर्घ्य दिला. मंत्र म्हटले आणि तो परत फिरला. दूरून देखील मठी गजबजलेली दिसत होती. काय होतं इथे? या ओसाड जमिनीमधे? काहीही नाही! पण पंधरा वर्षापूर्वी संन्याशाने इथे मठी बांधली. तसा तो क्वचितच इथे रहायचा. अख्खं भारत भ्रमण त्याने पायी केलं होतं. तीर्थ यात्रा केल्या होत्या, निसर्गाचे अद्भुत चमत्कार पाहिले होते, बर्फ पाहिला, वाळवंट पाहिलं. जीवन पाहिलं आणि मृत्यू पाहिला.


आता तो नि:स्संग झाला होता. आयुष्यभर ज्या मोहमायेच्या पाशापासून दूर राहिला त्याच मोहमायेच्या कुशीत जायची वेळ. समाधी! इथे एका वर्तुळाचा अंत आणि नविन वर्तुळाची सुरूवात! काय असेल सुरूवात? कशी असेल? संन्यासी चालता चालता थबकला!


आत्ता.. या क्षणी मनात प्रश्न नकोत. पूर्णपणे मन आणि आत्मा रितं करायची ही वेळ. आपण काहीही करत नाही, करवून घेणारा तो जगन्नियंता आहे, एकदा  त्याच्या हातात आपल्या आयुष्याची दोरी दिली की संपलं..


संन्यासी परत मठीकडे चालू लागला. पण मनात आलेला एक शंकारूपी किडा त्याच्या मनाला कुरतडू लागला. इतके दिवस एखाद्या शांत डोहाकडे असणारं त्याचं मन लाटेसारखं उचंबळू लागलं.


मन शांत करायचा एकच मार्ग होता आणि योगसाधनेने संन्याशाने तो मिळवला होता

तरीही तो चालत राहिला. नदीकाठची वाळू मऊ होती. संन्याशाचे पाय त्यामधे रूतत होते, संन्यासी ते बाहेर काढत होता. मनात चाललेलं द्वंद्व अजून चालूच होतं. मठी जवळ आली होती. अजून पाचशे पावलांवर.


आता संन्याशाला निर्णय घ्यायलाच हवा होता. समाधी अवस्थेत जाण्यासाठी त्याला मनावर पूर्ण काबू हवा होता, नाहीतर त्या समाधीच्या ठिकाणी आला असता तो त्याचा वेदनेने तडफडून मृत्यू!! पण हे वार्‍यापेक्षाही जास्त चंचल मन सावरायचे कसे??
संन्याशाने डोळे बंद् केले. गुरूचे स्मरण केले. स्वतःची योगशक्ती पुन्हा एकदा आजमावून पाहिली.  "माझ्यानंतर काय?" याच प्रश्नाचे उत्तर त्याला हवे होते. संन्याशी काळाच्या मागून नाही, त्याच्या सोबत गेला आणि परत आला. त्याने डोळे उघडले. तो विषण्णपणे हसला.



आता मनाची पूर्ण तयारी झाली होती. मन शांत झालं होतं. नदीच्याकाठावरून संन्याशाने ती मठी पाहिली आणि तो परत फिरला. नदीच्या डोहात उतरला. चालतच राहिला.

==============================================
आज स्वामीजींचा उत्सव. देशविदेशातून लोक आले होते. असं म्हणतात की, स्वामीजीनी इथेच याच मठीत जिवंत समाधी घेतली होती. पाचशे वर्षापूर्वी. तेव्हाची ती छोटीशी मठी आता चार मजली इमारत झाली होती. . नदीकाठचा परिसर भक्तनिवासानी फुलला होता. पाच ते आठ हजार माणसाच्या अन्नाची व्यवस्था केलेली होती. आज राज्याच्या मुख्यमंत्री आला होता. हेलिकॉप्टरने. त्याने राज्य निधीतून मठाला भरघोस देणगी दिली होती. स्वामीजींच्या विविध पूजा या मठात होत असत. प्रत्येक पूजेसाठी चारआकडी, तीन आकडी रूपये देऊन पावती करावी लागे. आता मठाची अजून एक इमारत उठणार होती. खास विविध पूजा आणि यज्ञासाठी. आता चालू असलेल्या पूजांपेक्षा वेगळ्या आणि अधिक महागड्या पूजा आता देवस्थानातर्फे चालू होणार होत्या.



स्वामीजींनी पाचशे वर्षापूर्वी रचलेल्या पदांना नविन चाली लावून त्याच्या कॅसेट्स बाजारात आल्या होत्या. त्या हातोहात खपत होत्या. सगळीकडे स्वामीजींचे शब्द वेगवेगळ्या धुनांमधून निनादत होते. लोक येताजाता गाडी चालवताना, जेवताना स्वामीजींची भजनं कानावर पडू देत होते. त्यापैकी ऐकत किती जणं होते...


आज इथे स्वामीजी शरीररूपाने नव्हते पण त्यांच्या प्रतिकृती मात्र सर्वत्र होत्या. पेन लॉकेट, अंगठी, फोटो, मूर्ती सर्वत्र स्वामीजी होते. प्रत्येक पेनाची, लॉकेटची, अंगठीची, फोटोची, मूर्तीची किंमत ठरलेली होती... भाविक या वस्तू विकत घेऊन स्वामीजींना घरी घेऊन जात होते.


स्वामीजींचा जयघोष सर्वत्र ऐकू येत होता. स्वामीजींचे शिष्य आता विमानाने देशविदेशामधे भ्रमण करत स्वामीजींनी दाखवलेला भक्तीमार्गच कसा योग्य आहे यावर प्रवचन करत होते. या शिष्यांचा दिवसाभरातला वेळ मात्र निरनिराळी कर्मकांडे करण्यामधेच जात होता.


एका मोठ्या चॅनलने स्वामीजींच्या आयुष्यावर मालिका सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्या चॅनलकडून काही खास लोक येऊन मठाचा आणि समाधीचा अभ्यास करून गेले होते. जिथे स्वामींजींनी जिवंतपणी आपला देह ठेवला अशी वदंता होती त्या समाधीचे तर त्यांनी कितीतरी फोटो काढले होते.


स्वामीजी... स्वामीजी.. परिसरामधे सर्वत्र हेच नाव निनादत होतं.

फक्त तो संन्यासी कुठेच नव्हता.

.
तो त्या नदीच्या डोहातून या सर्वाकडे बघत होता.. काळाच्या बदलत्या रूपाकडे!!


समाप्त.

Tuesday, 16 April 2013

कधी पाहिलय तुम्ही?

जोरात कोसळणारा पाऊस.

रात्र चढत जाणारी.. पाणीच पाणी सगळीकडे, इतका वेळ गजबजणारं शहर शांत दुलईत झोपलेलं.

तो मात्र तिथेच कुडकुडत का होईना पण चाललेला. सायकल ढकलत नेत. त्या गर्द अंधारात हलकेच ओरडत. "चाय काफ़ी सिगरेट."

वरपासून तो खालपर्यंत भिजलाय. अंगावरचा रेनकोट तसाही काही उपयोगी नाही. उद्या त्याला परत दुसर्‍या कामावर जायचय. पण तरीही तो रात्री तीन वाजतासुद्धा एकटाच फ़िरतोय. मुलाला शाळेत घालायचंय, बायकोला नवीन साडी पाहिजे, गावाला पण पैसे पाठवायचे आहेत. म्हणूनच तर तो दिवसाचे वीस तास राबतोय. अपुर्‍या झोपेने डोळे खोल झाले आहेत. तब्बेत खालावलेली आहे. कधी काळी मित्रमंडळीमधे ग्रूपची "जान" असलेला तो सध्या काम असलं तरच बोलतोय.

त्या कोसळणार्‍या पावसात. सगळ्या संसाराचं ओझं खांद्यावर घेऊन वाकलेल्या आणि तरीही गुणगुणत जाणार्‍या. बिल्डिंगच्या कडेने उभ्या असलेल्या त्या चायवाल्याला....


कधी पाहिलय तुम्ही?
======================
ते चौघे रेस्टॉरंटमधे येतात. आईबाबा. पन्नाशीला आलेले. कॉलेजला जाणारी मुलगी. आणि मोठा मुलगा. त्याचा आज पहिला पगार झालाय.


आईच्या चेहर्‍यावरचं कौतुक ओसंडून वाहतय. आजवर कुणी तिला विचारलं नव्हतं. आज लेक विचारतोय. "काय मागवू आई?"


तिच्या डोळ्यासमोरून त्याच्यासाठी जागलेल्या कित्येक रात्री तरळून गेल्या. समोरचं अस्पष्ट कसं दिसायला लागलं तेच समजलं नाही.


"तुला काय हवं ते मागव. मला काय समजतंय त्यात."

ती मनाशीच हसतेय. इतक्या विक्षिप्त नवर्‍याबरोबर संसार केलाय. त्याला सोडून जायचं तर कुठे जायचं हा प्रश्न होता. सोबत पांढरपेशा समाजाची भिती. आज ती कुणालाच घाबरत नाही. तिच्या मुलाने तिला झिजताना पाहिलय. तो संभाळेल आता तिला....


त्या छोट्याशा रेस्टॉरंटमधल्या अंधुक प्रकाशात. पहिल्यांदाच मेन्युकार्डावरच्या किमतीची पर्वा न करता ऑर्डर देणार्‍या त्या मुलाला. आणि रुमालाआडून हलकेच डोळे पुसणार्‍या त्या आईला..


कधी पाहिलय तुम्ही?
=============
तो थिएटरच्या बाहेर उभा आहे. ती अजून आलेली नाही. गेली तीन वर्षे ते एकमेकाना भेटतायत. अर्थात चोरून. तिच्या घरी समजलं तर धडगत नाही.

पिक्चर चालू व्हायला अजून पाच मिनिटे आहेत. तो नेहमीच्याच ठिकाणी उभा आहे. त्याच्या चेहर्‍यावर तिची प्रतिक्षा दिसतेय. हातातली सिगरेट विझवत तो तिचा मोबाईल तो परत ट्राय करतोय. कुणीच उचलत नाही आहे.

बास झालं आता हे चोरून भेटणं. नोकरीला लागून वर्ष होत आलं. आज ती आली की पुढचं काय ते ठरवून टाकू. तो परत एकदा हातातल्या घड्याळाकडे बघत वैतागतो.

वाटेत येतानाच तिला काही झाले असेल तर... अपघात वगैरे...

शेवटी नाईलाजाने तिच्या घरच्या नंबरवर फोन करतो.

फोन तिच्या भावाने घेतलाय. त्याने काही बोलायच्या आधीच तो पलिकडून ओरडतो.

"खबरदार इथे फोन करशील तर. तंगडी तोडून ठेवीन."

एखादी वीज पडावी तसा त्याचा चेहरा झालाय. हताशपणे तो तिथेच बसलाय. त्याच्या आजुबाजुचे सगळे हसत खेळत फ़िरतायत. तो कितीतरी वेळ तिथेच बसलाय.

आज मुद्दाम तिने गिफ़्ट केलेला शर्ट घातलाय. थिएटरच्या पायर्‍यावर बसलेल्या त्याला. आता काहीतरी करायचंच हे ठरवत असलेल्या त्याला.....


कधी पाहिलय तुम्ही?
=================
ती स्वत्:शीच हसत बाहेर आलेय. रिक्शावाल्याला "स्टेशन" असं सांगतानासुद्धा तिला हसू फ़ुटतय. नवर्‍याला ऑफ़िसमधे फोन करावं की करू नये हा तिला प्रश्न पडलाय.


बिच्चारा!! कामात असेल आता...... पण तरी त्याला समजल्यावर किती खुश होईल तो..

स्टेशनवर आलावर लक्षात येतं की लोकल एका मिनिटात निघेल. ती धावते.. मग अचानक तिच्या लक्षात येतं...

आता धावपळ करायची नाही.

स्टेशनमधून त्या निघणार्‍या ट्रेनकडे बघत हसणार्‍या, हातात प्रेग्नन्सीचा पॉझिटीव्ह रीपोर्ट असणार्‍या
त्या इवलाल्या पाकिटाकडे बघत लाजणार्‍या तिला....


कधी पाहिलय तुम्ही?
===============================================
तिला आज फ़ार राग आलाय. तिच्या वर्गातल्या कुणीतरी तिचं दप्तर फ़ेकून दिलय. ती मधल्या सुट्टीत बाहेर खेळत असताना.

ती धावत तिच्या दादाकडे गेलीये. तिचा दादा पाचवीला आहे. मुसमुसत त्याला ती सांगते.

तो तिच्या वर्गात येतो. अजून बाई वर्गात आलेल्या नाहीत. प्रत्येकाला तिचं दप्तर कुणी फ़ेकलं ते दरडावून विचारतो. तिसरीच्या वर्गातली ती मुलं घाबरून गप्प आहेत. पण त्यापैकीच कुणीतरी एकजण त्या दप्तर फ़ेकणार्‍याचं नाव सांगतोच.

तिचा दादा त्या वात्रट मुलाला चांगलंच ओरडतो. "परत असं केलंस तर हेडमास्तरांकडे नेईन" हे पण सांगतो.

इतका वेळ रडून रडून तिचे डोळे सुजले आहेत. दादा वर्गात सर्वाना सांगतो

"परत माझ्या बहिणीच्या वाट्याला जाल तर बघा..."
तिला दादा तारणहार वाटतो. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत कसलीच भिती नाही हे जाणवतं. राखीचा दिवस नसतानाही तिला ओवाळणी मिळते. दादा वर्गातून जायच्या आधी तिच्या केसावरून हात फ़िरवून जातोय.

त्या चिनुकल्या बहिण्याच्या गालावरून वाहणार्‍या आसवाना पुसणार्‍या त्या भावाला....


कधी पाहिलय तुम्ही?
=================
ते सर्वजण खूप हसताहेत. खरंतर हसण्यासारखं काहीच घडलं नाही.. पण तरीही.
.
ती आज कुठेतरी इंटरव्ह्युला गेली होती. तिथल्या गमतीजमती ती सर्वाना सांगत बसलेय. रात्रीची साडेअकरा वाजून गेलेत. उद्या रविवार आहे. त्यामुळे उद्या उठायचं टेन्शन नाही. तिच्या रूममधे बसून गोंधळ घालेणे हेच काम चालू आहे.

ती सर्वाना रीसेप्शनिस्ट कसं बोलत होती. प्रत्येक प्रश्नाला तिने "मनातल्या मनात" काय उत्तरं दिली हे सांगतेय.

हॉस्टेलच्या या ग्रूपमधे बसून ती हसतेय. पण मनात ठाऊक आहे, हा जॉब तिला नाही मिळाला. घरून पैसे येणं केव्हाच बंद झालय. तीन महिने झाले आता हॉस्टेलपण सोडावे लागेल...... तिचे मन तिच्या इच्छेविरुद्ध भरून यायला लागतय...

".. आणि तो वॉचमन सारखा माझ्याकडे बघत होता. मी मनात म्हटलं.... "

परत एक हास्याचा फ़वारा फ़ुटलाय.

त्यातच हलक्या हाताने स्वत्:चे डोळे पुसून हसणार्‍या तिला...


कधी पाहिलय तुम्ही?
=========================

तिला सर्वजण खडूस सासू म्हणतात. तशी ती त्या सर्वापेक्षा लहान आहे. पण तिचा हुद्दा मोठा आहे. अर्थात इतक्या सर्व पुरुषाची ती एकटीच बॉस आहे. आणि ती अजून "मिस" आहे.

 कायम इस्त्रीचे कपडे वापरून वापरून असेल कदाचित पण तिचा चेहरापण रोज इस्त्री मारल्यासारखा दिसतो.

आजही मीटिंगमधे ती तशीच बसलेय. बाकीचे बडबड करत आहेत. ती शांतपणे ऐकतेय.

तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. खरंतर मीटिंगमधे फोन आल्यावर ती कधीच घेत नाही.

पण आज फोनवरचा नंबर बघून तिने हा फोन घेतला. तिच्या कपाळावरची आठी स्पष्ट दिसतेय.

पलीकडून कोण काय बोललं ते समजलं नाही. पण ती मात्र ओरडली.

"काय सांगतेस काय? केव्हा?" आणि बोलतच ती मीटिंगच्या बाहेर गेली.

तिच्या सोबत काम करणार्‍यांनी पहिल्यादा तिला हसताना त्यानी पाहिलय ते ही  एखाद्या लहान मुलीसारखं. इतके दिवस "बॉस" म्हणून वागणारी आज मात्र ती फ़क्त एक मैत्रीण आहे. तिच्या बालमैत्रीणीचं लग्न ठरलय.

खूप खुश असणार्‍या. मैत्रीणीच्या लग्नाला काय करायचं यात हरवलेल्या.. मीटिंग ऑफ़िस हे सर्व विसरलेल्या तिला..


कधी पाहिलय तुम्ही?
========================
किती भावना. किती चेहरे. किती प्रसंग. किती क्षणचित्रं.

प्रत्येक भाव डोळ्यात उतरतो. चेहर्‍यावर उठतो. मनातली सर्व गुपिते घेऊन. हलकेच. नकळत. कोण काढतं ही चित्रे? क्षणाक्षणाला बदलणारी..

माहीतही नसतं की बाजूचाच चेहरा इतक्या कल्लोळात असेल. भावनामधे असेल. आपण आपल्याच धुंदीत असतो. विसरून जातो की आपला चेहरापण असेच बोलतोय.

असेच बोलके चेहरे... लाजरे चेहरे, रडके चेहरे, हसरे चेहरे.. स्वत्:चेच चेहरे...

कधी पाहिलय तुम्ही?

==========
समाप्त
==========

Thursday, 11 April 2013

समुद्र

तसं त्याचं आणि माझं नातं केव्हाचं हे मलाही आठवत नाही. पण नातं आहे हे मात्र नक्की. प्रत्येक नात्याला काहीतरी नाव असावं असा अट्टाहास जेव्हा ठेवला जातो तेव्हा त्या नात्यातला अलवारपणा कधी निघून जातो ते समजत सुद्धा नाही. सुदैवाने अजून त्याच्या आणि माझ्या बाबतीत असं झालेलं नाहिये, अजून तो तसाच आहे आणि अजून मी तशीच आहे, आणि आमच्या दोघांमधला संवादही तसाच. किती शतकांपासून चालू आहे मलाच माहित नाही.


खरंतर माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नसतं, त्याच्याकडे खजिना असतो अद्भुत गोष्टींचा, पण मला फक्त ऐकायला कंटाळा येतो हे त्याला समजतं, म्हणून तो कधीतरी माझ्या गप्पा पण ऐकतो. आणि मनातल्या मनात हसतो.

माझे दु:ख त्याच्या एका लाटेएवढं. त्याची एक लाट माझ्या आयुष्याएवढी. तो उंच, खोल, गहनगंभीर धीरोदात्त.. मी चंचल अवखळ भिंगरी. तो कितीतरी काळापासून तिथेच, कुणाच्या तरी प्रतीक्षेत असल्यासारखा, आणि मी इथून तिथे, तिथून इथे... स्वतःच्या शोधात असल्यासारखी..तो मला कित्येकदा थांबायला सांगतो.. पण मी थांबत नाही थांबावंसं वाटतच नाही.  हा प्रवास सतत सुरू असल्यासारखा.. पण जाते त्याच्यापासून दूर आणि परत त्याच्यापर्यंतच येऊन पोचते.


तो कदाचित कधीतरी माझ्यावर चिडतही असावा, कुणास ठाऊक. त्याचा चेहरा बघून काहीच सांगता येत नाही. आणि त्याला तर माझा चेहरा बघायची पण गरज नसते, माझ्या मनातली प्रत्येक झुळूक त्याच्यापर्यंत अलगद पोचते. एखाद्या बासरीच्या सुराप्रमाणे... अलगद.


"माझ्यासारखे किती वेडे असतील ना तुझ्या आजूबाजूला?"मीच कधीतरी लटक्या रागाने म्हणते,
तो गालातल्या गालात हसतो..  आणि म्हणतो,"अगं, प्रत्येक जण खास आहे माझ्यासाठी. पण तू जरा जास्तच," आधी मला वाटायचं वा!! किती मी स्पेशल. पण आता लक्षात आलंय की प्रत्येकाला खुश करण्यासाठी तो असं काहीना काही तरी बोलत असणारच. सवयच असणार त्याला तशी. आधीपासूनच.


पण तरी तो मला आवडतो. कुठे ना कुठेतरी त्याचा एक तरी कोपरा माझ्यासाठी आहे हे मला माहीत आहे, तो एक कोपरा माझा, मी मात्र संपूर्णपणे फक्त त्याची.


त्याचा धीरगंभीर स्वभावाचं मला कायम आश्चर्य वाटतं, नेहमीच तो असा मनात गुंज घालणारा. माझ्या पायातले पैंजण त्याच्या फुंकरीने छनकवणारा. हळूवारपणे माझ्या केसाच्या बटा उडवणारा, माझ्या पावलाची नक्षी वाळूतून स्वतःच्या हृदयात जपणारा, माझ्यासाठी शंख शिंपल्याची आरास करणारा.. माझ्या हलक्यशा लकेरीवर शंखनाद करणारा,,



कधी कधी मात्र मला उगाच वाटतं. तो चिडलाय, तो खवळलाय. मी घाबरते. कावरी बावरी होऊन जाते. आपल्याच माणसाने असं वागणं खूप त्रास देऊन जातं. हेच कधी त्याला समजावते तर तो वर उलट मलाच हसतो.."अगं खुळाबाई,,, तुला काय वाटलं मी चिडलो? हेच का तू मला जाणून घेतलंस? हेच का तुझं माझं नातं.. ?"


माझ्या डोळ्यसमोर त्याचं रौद्र रूप उभं राहतं. "तांडव आहे ते, मिलनाचं, सृजनाचं, या सृष्टीच्या आनंदाचं तांडव आहे, मी काय रौद्र रूप दाखवणार? मी तर या सृष्ट्रीचा एक पाईक, हे चराचर ज्याच्या हातात मी त्याच्या पायाचा दास.. घाबरू नको."


"खरंच?" मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलते. मनातून मात्र पार घाबरलेली.


"अगदी तुझी शपथ.." त्याची एक लाट हलकेच माझ्या पायाला शिवून जाते.


"ए शपथ काय? सुटली म्हण.."

"नाही म्हणत जा" तो हसत दूर जातो.

"थांब,"तो अचानक ओरडतो.

"काय झालं?" मी भांबावून जाते.

"माझ्या जवळ येऊ नकोस"


"का?""जो माझ्या जवळ येतो तो माझ्यापेक्षा खूप दूर जातो..." त्याच्या आवाजातली खिन्नता मला जाणवतेय. "तोच माझा शाप आहे"

आता मात्र मी खळखळून हसतेय

"हात्तीच्या,, एवढंच ना...अरे तुला इतकंही माहीत नाही,, हेच का तुझं माझं नातं? हेच जाणलंस तू मला?"

तो शांत बसलाय, मी एक एक पाऊल पुढे टाकत त्याच्या कानात हलकेच सांगितलं.

"अरे मी कुठे तुझ्यापासून दूर जाईन. इथेच सुरू झालेलं आयुष्य इथेच संपणार.. मी जर कधी हरवले ना तर स्वतःमधेच कुठेतरी शोध मला. नक्की सापडेन मी तुला.. तुझ्यामधेच कुठेतरी तुला शोधत...."

समाप्त

Wednesday, 3 April 2013

कोरा करकरीत!

समोरचा कागद कोरा तसाच पडलाय. तास झाला, तरी माझी नजर त्या कागदाच्या कोरेपणावरच खिळलेली. काहीतरी शोधत शोधत कपाट उघडलं आणि खाली पडला तो कागद. कोराकरकरीत.


कितीतरी वर्षापूर्वी तो कागद आवडला म्हणून विकत घेतला. आवडला कागद म्हणून एकच घेतला. ढीगभर घेऊन काय करायचे होते? एकाच कागदाचा तो कोरेपणा पुरला असता आयुष्यासाठी. त्यानंतर कितीतरी कागद पाहिले, त्यातले कितीतरी आवडले, काही विकत घेतले, काहींवरती वाणसामानाच्या याद्या लिहिल्या आणि काही चुरगळून फेकून दिले. हा कागद मात्र जपून ठेवला. कायम!!


खिडकीतून बाहेर बघितलं तर समोरचं आंब्याचं झाड दिसतंय. कैर्‍यांनी पुरतं भरलेलं. उन्हाळ्याच्या रखरखाटाला वैतागून मी मघाशी कूलर लावलेला. पण माझ्या त्या कृत्रिम थंडपणापेक्षा तो उन्हात उभा असलेला आंबा अधिक गार भासतोय. समोरचा तो कोरा कागद घेऊन मी झाडाखाली येते. अहा! काय थंड आहे ही सावली. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला तृप्त करत जाणारी. झाडाखाली कधी कुण्या फकिरासाठी कुण्या सावकाराने बांधलेला पार आहे. त्या पारावर खेळत खेळत माझं आयुष्य गेलं. त्या पारावर खेळत आणि या हातातल्या कागदाचं कोरेपण जपत.


आजूबाजूला अर्ध्या-कच्च्या पडलेल्या कैर्‍या आहेत. आज्जी अशा कैर्‍यांना बाळकैर्‍या म्हणायची.... अशा कशा काय पडल्या असतील या बाळकैर्‍या? पडल्यावर रडल्या असतील का? आणि अशा कैर्‍या पडून गेल्या तरी झाडाला त्याचं काही दु:ख वगैरे वाटले असेल का? की झाडाला जाणीवच नसेल कधी या कैर्‍यांची.. शेकड्यांनी फळं डवरलेली असताना दहापंधराचा हिशोब कोण ठेवतंय??या आंब्याचं काही माझ्या मनासारखं नाही... हजारोंनी रक्ताबंबाळ जखमा झालेल्या असताना माझ्या मनाला मात्र खपली धरलेल्या काही जखमांचं कोण कौतुक...



हातातला कोरा कागद तसाच अजून आहे. या उन्हाच्या सावलीमधे तो अजूनच कोरा वाटतोय. कधी वाटतं फाडून फेकून द्यावं हे सर्व... कशासाठी जपायचं? किती जपायचं? उन्हापासून, पावसापासून, फोफाट्यापासून, पाण्यापासून.. जर कोरा कागद जपायचाच आहे तर मग लिहायचं कधी त्यावर? आणि जर लिहायचंच आहे तर मग हाच कोरा कागद हवा कशाला? काय गरज या कोरेपणाची...
सरळ काही न लिहिता चुरगाळून करून फेकून द्यावा तो कागद.. याच बाळकैर्‍यांच्या आजूबाजूला. तसाच, कोराकरकरीत.


पण नाही, हातातला हा कोरा कागद फेकवणार नाही माझ्याच्यानं. चुरगळवला तर बिल्कुल जाणार नाही.



आणि त्यावर कधी काही लिहून तर कदापि होणार नाही.

(समाप्त)