Sunday, 10 April 2016

रहे ना रहे हम (भाग ६)

“म्हणजे तू आजही येणार नाहीस?” मी जॉयसला परत एकदा विचारलं. “मागच्याही आठवड्यांत तू आली नव्हतीस”

“फिजिक्सची असाईनमेंट कंप्लीट करायचीये.” जॉयसने चौथ्यांदा मला तेच उत्तर दिलं. वेदानं तर आधीच येणार नाही असं सांगितलं होतं. पूर्वी आणि रझिया परस्पर येणार होत्या. यशस्वी तिच्या स्कूटीवर आणि निधी माझ्यामागे.

नीरजच्या फ्लॅटवर आमची पार्टी ठरली होती. त्याचे आईबाबा गावाला गेले होते. प्रभात, इम्रान आणि सुयोग येणार होते. आता हे लोकं कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बरोबर आहे. हे सर्व आमच्या ग्रूपचे नवीन मेंबर्स. प्रत्येक कॉलेजामध्ये ओवाळून टाकलेली काही मुलं असतात. ही मुलं त्या कॅटेगरीमधली. हे मी आता सांगतेय,पण तेव्हा तरी हे सर्व फ्रेंड्स म्हणूनच होते! या सर्व ग्रूपमधला हीरो होता—वसीम. वसीम अख्ख्या ग्रूपची काय कॉलेजची शान होता. त्याची आणि निधीची ओळख कशी झाली माहित नाही, पण निधीमुळे आमची त्याच्यासोबत आणि त्याच्या सर्वच मित्रांशी ओळख झाली. इतके दिवस आम्ही मैत्रीणींचा ग्रूप मिळून क्वचित लेक्चर वगैरे बंक करून पिक्चरला जात होतो. आता ते नेहमीचंच झालं.
इथं मी थोडं असंही म्हणू शकते की घरामध्ये चालू असलेले आईबाबांच्या भांडणामुळे मी बहकले, पण तसं म्हणणं माझ्या आईवड्लांवर अन्याय करंण्या आहे. त्या दिवशीच्या प्रसंगानंतर आईनं आणि बाबानं सेपरेटली आणि दोघांनी मिळून मला खूप सांभाळून घेतलं. त्या दिवाळीच्या सुट्टीत खास केरळला फिरायला घेऊन गेले. बाबानं तर चक्क विमानाची तिकीटं बूक केली होती. माझ्या आयुष्यातला पहिलाच विमानप्रवास. मुंबई – कोची – मुंबई. आम्ही तिघंही दहा दिवस खूप मस्त फिरलो. एंजॉय केलं. बाबाच्या काहीबाही गमजा चालूच होत्या. आई पण एकदम खुश दिसत होती. या ट्रीपमध्ये आईनं पहिल्यांदा जीन्स घातली.
“नील्या, तुझ्यासमोर पहिल्यांदा बरंका. नाहीतर कॉलेजमध्ये असताना गौरी पॅंटी घालायचीच”
“बाबा, पॅंट्स म्हणकी. काहीतरी घाण अर्थ होतोय!” मी चिडून म्हणाले.
“बरोबर, बाबा  मराठी मीडीयमचा, लेक कान्वेंटातली” बाबानं परत मला चिडवून् घेतलं. आई जीन्समध्ये मस्तच दिसत होती. आईला मी इतकं खुश कधीच पाहिलं नव्हतं. दिवाळीची सुट्टी संपवून गावी परत आलो आणि कॉलेज परत चालू झालं. या सुट्टीमध्ये आफताब पुण्याला गेला होता, कसलासा कोर्स केला त्यानं.
कॉलेजमध्ये तर मी त्याला ओळख दाखवतच नव्हते, पण हल्ली तो घरीपण यायचा नाही. आला तरी बोलायचं काय असा प्रश्न पडलेला! दोघांमध्ये समान विषय काहीच नाहीत. अगदीच समोरासमोर भेटलो तर “बरी आहेस ना?” “चाची बर्‍या आहेत ना?” “अभ्यास कसा चालू आहे” (हा प्रश्न विचारणार केवळ आफताबच!)  बस्स इतकंच.

त्यामानानं हे नवीन भेटलेलं मित्रमंडळ फार भारी होतं. पिक्चर आणि क्रिकेट हे आवडते विषय. आम्हाला क्रिकेटमधलं काय कळायचं नाही पण मला गांगुली खूप आवडायचा, म्हणून मी क्रिकेट बघायचे. निधीला राहुल द्रविड आवडायचा, आणि इतर कुणाला तेंडुलकर. आमच्या ग्रूपमध्ये केवळ जॉयसला क्रिकेटमधलं टेक्निकल काय काय समजायचं, आम्ही बोलायला लागलो की ती मध्येच  “फ़ाईन लेगला फिल्डर ठेवला होता म्हणून तो आऊट झाला” वगैरे काहीतरी सांगायची. मग आम्ही तिची रीतसर चेष्टा करायचो. म्हणूनही असेल पण ती आमच्या ग्रूपमध्ये फार कमी येऊ लागली होती. निधीला तर ती आधीपासून आवडायची नाही. “खत्रूड दातपडकी आहे” असं ती कायम म्हणायची. खरंतर मला जॉयसच्या दात पुढे असण्यावरून केलेली चेष्टा आवडायची नाही, पण निधी म्हणते म्हणून मीदेखील म्हणायला सुरूवात केली.

“तुमी पोरी ना कदी टायमावर येत नाये” प्रभात आल्याआल्या आम्हाला म्हणाला. पार्टी म्हणजे काय? व्हीसीडीवर एखादा पिक्चर. बीअर, आणि असेच काहीबाही स्नॅक्स. वसीम असला तर एकदम मारधाड हाणामारी पिक्चर आणायचा, आम्ही व्हीसीडी भाड्यानं नेली की एकदम सॉफ्ट रोमॅंटिक पिक्चर. प्रीटी वूमन वगैरे टाईपमधले. मुलांना असले पिक्चर आवडायचे नाहीत खरंतर. पण आमच्या हट्टाखातर ते असले पिक्चर सहन करायचे. निधी दारू पिण्यात एक्स्पर्ट झाली होती. मी एकदोनदा बीअर पिऊन पाह्यली. यक्क. घाण चव. मी परत त्या वाटेला गेले नाही. पण वाईट सवय एकच लागली. सिगरेटची.

गेले पंधरा दिवस आम्ही सलग कॉलेज चुकवलं होतं. मी कॉलेजात येत नाही हे आफताबला शंभर टक्के माहित होतं, कुठे जाते हेही माहित होतं पण तो एका शब्दानं मला त्यावरून काही बोलला नव्हता. कॉलेजनं शेवटी आमच्या नावाच्या नोटीस काढून घरी फोन केले तेव्हा आईबाबाला समजलं की मी इतके दिवस कॉलेज बंक केलंय. सुदैवानं घरी केवळ मी मैत्रीणींबरोबर उंडारते इतकंच समजलं होतं.

आई मला खूप खूप ओरडली. बाबा काही बोलला नाही, पण म्हणाला की अकरावीचं वर्ष आहे. पण बारावीला अभ्यास करशील ना? मला खूप रडू आलं. मनात ठरवलं की आपण आता हे चुकीचं वागणं बंद करायचं, भरपूर अभ्यास करायचा. आईबाबा आपल्यासाठी इतकं करतात तर आपण चांगलं वागलं पाहिजे.
दुसर्‍या दिवशीपासून मी नियमित कॉलेजला जायला लागले. जॉयसला मुद्दाम घरी जाऊन भेटले आणि सॉरी म्हणाले. “माझा खूप अभ्यास चुकलाय, तू हेल्प करशील का?” असं विचारलं. तिनं लगेच तिच्या सगळ्या नोटस माझ्याकडे दिल्यापण.

माझ्या या “चांगल्या” वागण्याची सर्वात जास्त झळ पोचत होती ती निधीला. तिच्याकडे खर्च करायला पैसा कधी नसायचाच. आता मी सोबत नाही म्हटल्यावर तिचा पैशाचा हक्काचा सोर्स नाहीसा झाला. एकदोनदा ती मला घरी येऊन भेटली. मी तिला अशीच काहीबाही फालतू कारणं देऊन कटवली.
एकदा मात्र ती रविवारी सकाळी सातवाजताच आमच्या घरी आली. “स्वप्निल, मला तुझ्या केमिस्ट्रीच्या नोट्स हव्यात” असा बहाणा करून. मी माझ्या खोलीमध्ये येऊन वही शोधत होते. खरंतर तिला नॊट्स वगैरे काही नको हवं होतं, कारण माझ्या मागोमाग लगेच येऊन ती मला “प्रभातचा समुद्रकिनारी एक बंगला आहे आणि तिथं त्यानं वाढदिवसाला बोलावलंय” वगैरे काहीतरी सांगायला सुरूवात केली. आईबाबा मॉर्निंग वॉकसाठी गेले होते.

“मी येणार नाही” मी तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत सांगून टाकलं.
“अरे यार! क्यु बोअर कर रही हो? लेक्चर थोडीच बंक करायचेत. संध्याकाळी पार्टी आहे. घरी सांगूनच ये ना. इन फॅक्ट, तुझ्या बाबांना सांग की आपल्या सर्वांनाच सोडायला” निधी आपला हेका सोडत नव्हती. “वाढदिवसाची प्रॉपर पार्टी आहे. प्रभातचे आईवडील पण येणारेत”
“मग निमंत्रण प्रभातला करू देत की, तू कशाला पोस्टमन होतेस? तसंही मी येणार नाही...” आमचं बोलणं चालू असताना गडग्यावरून उडी मारून आफताब मागच्या दारांत आला.
“स्वप्निल! खुरपणी देशील का?” रविवार म्हणजे त्याचा बागेत काम करायचा दिवस. पहाटे उजाडल्यापासून काम करत होता, आता साडेसात पण वाजले नव्हते. तो घरात न येता बाहेरच थांबला होता, कारण हातापायाला सगळी चिखलमाती लागलेली होती. घामानं शर्ट अंगाला इकडेतिकडे चिकटलेला होता, बागेत काम करण्यासाठी म्हणून त्यानं पॅंट मुडपून गुडघ्याच्या वर सरकवली होती. डोक्याला एक फडका गुंडाळला तर आफताब “दहावीला शाळेत पहिला आलेला मुलगा” वाटण्याऐवजी “फलाण्या गड्याच्या हाताखाली काम करणारा पोर्‍या” वाटला असता.
“खुरपणी कशाला?”
“सरबतात घालून ढवळायला” हात चिखलानं भरले होते, म्हणून मनगटानंच डोळ्यावर आलेले केस मागे सारत तो म्हणाला. “खुरपणी कशाला वापरतात?” नेहमीच्या तुसडेपणानं त्यानं लगेच उत्तर दिलं. 
“तुझ्याकडे नाहीये? इतका वेळ बागेत काय गरबा खेळत होतास?” तुसडेपणांत हम भी कुछ कम नही!
“मोडली. दे लवकर. ऊन चढायच्या आत तणं काढून होऊ देत” याच्या पुढचं वाक्य बाय डीफॉल्ट “मला अभ्यास पण करायचाय” हेच असू शकतं पण तो पुढं काही बोलायच्या आधीच निधी म्हणाली. “हाय! तू आफताब ना?” तिनं शेकहॅंडसाठी हात पुढे केला.
“हाय!” तो दोन पावलं मागे सरकत मातीचे हात तिला दाखवत म्हणाला. “निधी. स्वप्निलची बेस्ट फ्रेंड”
“फ्रेंड” मी त्याच्या हातात कोनाड्यामधली खुरपणी देत म्हटलं. “ही माझी फ्रेंड आहे” निधीनं त्याच्या नकळत मला पाहून डोळा मारला. मला वाटलं, ती परत मला आफताबच्या नावानं चिडवतेय की काय. म्हणून मी तिला उगाचच कोपरानं ढोसलं.

ऍण्ड आय वॉज सो रॉंग!!!

आमचे दोघींचे एवढे सगळे इशारे होइपर्यंत आफताब बागेत निघून गेला होता. मी खोलीत परत येऊन केमिस्ट्रीची ती मुडदी वही शोधायला लागले, पण निधी मात्र मागच्या दारातून दिसणार्‍या आफताबकडे एकटक बघत होती...

निधी आणि आफताबच्या अजरामर प्रेमकहाणीचा तो पहिला दिवस होता.

>>>>>>>>>> 

निधी आणि आफताबची लव्हस्टोरी हा फार वेगळा विषय आहे. मला या स्टोरीची कायमच दोन व्हर्जन्स ऐकायला मिळाली आहेत. एक निधीकडून आणि दुसरं आफताबकडून. दोघांचीही व्हर्जन एकमेकांपासून भिन्न असल्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं हे मला आजवर समजलेलं नाही. निधीनं नंतर सांगितलं की त्या दिवशी ओळख झाल्यावर आफताब एकदोनदा तिच्या मागोमाग गेला आणि त्यानं दोन तीनदा तिला विचारलं- मग तिनं वैतागून हो म्हटलं. कदाचित निधीला माहित नव्हतं पण मी आफताबला ओळखून होते, जीव गेला तरी एखाद्या मुलीच्या पाठून आफताब गेला नसता. मी रात्री दोन वाजता त्याला माझ्या घरातून बाहेर काढलं तेव्हा केवळ “माझं चुकलं, मी असं वागायला नको हवं होतं” ही दोन वाक्यं म्हणून त्याला आमचं नातं वाचवता आलं असतं- पण तो तसं म्हणाला नाही. स्वत:कडे कसलाही कमीपणा न घ्यायचा त्याचा स्वभाव होताच- भले त्यासाठी मी दुरावले तरी चालेल. त्यामुळे त्याही वेळी निधी खोटं बोलत होती हे मला माहित होतं. आफताबच्या सांगण्यानुसार या लव्हस्टोरीमध्ये निधीनं त्याला योग्य ते ग्रीन सिग्नल दिले म्हणून त्यानं तिला जाऊन सरळ एकदाच काय ते  विचारलं तिनं लगेच हो सांगितलं. हे सत्य असावं असं मी मानायला तयार आहे. पण या स्टोरीमध्ये पुढं जी काय कॉम्प्लिकेशन्स घडत गेली-त्यातली अर्ध्याहून जास्त- माझ्या घरामध्ये ती मात्र एकता कपूरच्या मालिकेत शोभण्यासारखीच!! त्याबद्दल निवांत सांगेनच.

आफताब फ्लर्टी होता, पण त्याचं फ्लर्टीपण असं कट्ट्यावर बसून टवाळक्या करण्याचं कधीच नव्हतं. आफताबची प्रेमप्रकरणं चिक्कार झाली, प्रेमभंगही तितकेच झाले, पण त्यावरून एकदाही- ए क दा ही – त्यानं अभ्यासामधून लक्ष कमी केलं नाही. दिवसांतला ठराविक वेळ अभ्यासासाठी, वाचनासाठी आणि त्यातून वेळ उरलाच तर तो गर्लफ्रेंड्स (अनेकवचनच बरोबरे!!) करता.
मला हे पक्कं माहित होतं की निधीसोबत त्याचं अफेअर चालू होण्याआधी कुणाबरोबर तरी अफेअर होतं. त्याच्याच वर्गामधली ती मुलगी होती. दोनतीनदा मला आमच्या घरासमोरच्या बागेमध्ये गप्पा मारताना दिसले होते. मी त्याच्याशी त्या दरम्यान अजिबात बोलत नसल्यानं याबद्दल काहीच विचारलं नव्हतं. निधी-आफताब स्टोरीसुद्धा मला जवळजवळ दोन तीन महिन्यांनी समजली. ती पण रझियाकडून. निधीनं मला स्वत:हून काहीही सांगितलं नव्हतंच. मला जरी त्यांचं अफेअर आहे हे समजलं तरी जोवर निधी काही सांगत नाही तोपर्यंत मी हा विषय काढणारच नव्हते. अकरावी संपल्यावर लगेच बारावीसाठी व्हेकेशन बॅच चालू झाल्या. मी आधीच खूप अभ्यास करायचं असं ठरवलं होतं पण ते काय जमत नव्हतं. एकदाच, दोनदाच म्हणत परत माझं लेक्चर बंकिंग वाढलं होतं. अकरवीला जेमतेम सत्तावन्न टक्के मिळाले होते (खरेतर इतकेही कसे काय मिळाले याचं मला आजही आश्चर्य वाटतंय! मी काही म्हणजे काहीही अभ्यास केला नव्हता) वसीम, प्रभात वगैरे सर्व तर नापास झालेच होते. त्यांनी अकरावी रीपीट करण्याऐवजी बाहेरून सतरानंबरचा फॉर्म भरून परीक्षा द्यायचं ठरवल्यानं त्यांना कॉलेज ही भानगड उरलीच नव्हती. एकदा आईला माझ्या बॅगेत सिगरेटचं पाकिट मिळाल्यामुळे माझी ही सवयसुद्धा घरी समजली होती. दुसरी एखादी आई असतीतर तिनं लेकीला झोडून काढलं असतं, पण माझ्या आईनं मला सरळ दवाखान्यात नेलं. डॉक्टरकाकांनी मला सिगरेट आणि त्याचे दुष्परिणाम वगैरे बरंच काही ऐकवलं. मी ऐकून घेतलं. सिगरेट आजपासून ओढायची नाही असं मनातून पक्कं ठरवलं. माझे कुठलेच निश्चय फारसे टिकत नाहीत ही गोष्ट तेव्हा मला माहित नव्हती.


दवाखान्यामधून घरी येत असताना मला समोरून बाबाची कार येताना दिसली, आई माझ्या मागेच स्कूटीवर बसलेली होती पण तिचं लक्ष नव्हतं. पण मला बाबाची कार लगेच ओळखू आली, बाबाचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. बाजूला बसलेल्या बाईबरोबर त्याचं काहीतरी हसत बोलणं चाललं होतं. तीच बाई!! कशीबशी स्कूटी घेऊन घरी आले. माझ्या खोलीमध्ये येऊन दार घट्ट बंद केलं. बाबा तिच्यासोबत राजरोस फिरतो हे मला आजच समजलं नव्हतं. पण दिसलं मात्र पहिल्यांदाच होतं. बाबा जसा माझ्यासमोर आईसमोर हसत असतो, तसाच तिच्याहीसमोर. आज खूप दिवसांनी वाटलं की बाबा फक्त माझाच नाहीये... त्याला शेअर करणारं अजून कुणीतरी आहे. असणार. असायलाच हवं. बाबाला या बाईबरोबर दुसरा संसार वसवून नक्की किती वर्षं झाली होती कुणास ठाऊक?
घरी आल्यावर आईनं चहा करून दिला, मी पीसीवर गेम खेळत बसले.
“स्वप्निल, मी जरा भाभींकडे जाऊन येते. त्यांना थॊडं अस्वस्थ वाटतंय म्हणे. बसशील ना एकटी?” थोड्यावेळानं आईचा बाहेरून आवाज आला. डोळ्यासमोरून बाबा आणि त्याच्या बाजूला बसलेली ती बाई नजरेसमोरून जाईना. मी काहीच न सुचून माझ्या कपाटामधून एक सिगरेट काढली आणि पेटवली. दोन तीन कश मारल्यावर अस्वस्थता थोडी कमी झाली, कमी झाली तरी पूर्णपणे गेलीच नाही. खड्ड्यात गेले ते दुष्परिणाम. कितीतरी वेळ मी खोलीत बसून सिगरेट्स ओढत राहिले.
दारावर जोरात मारलेल्या थापा ऐकू आल्या तेव्हा मला दार उघडावंसं वाटतच नव्हतं. पीसीवर इंटरनेट लावून मी विनाकारण याहू ग्रूपमध्ये चॅटींग करत बसले होते. शेवटी आफताबचा आवाज खिडकीजवळून आला. “स्वप्निल. दार उघड!” माझ्याच खोलीच्या खिडकीपाशी येऊन त्यानं हाक मारल्यावर माझा नाईलाज झाला. आई आणि चाची हॉस्पिटलात गेल्या होत्या. आफ़ताबला आमच्या घरी बसायचा निरोप ठेवला होता.
“काहीतरी जळतंय” हॉलमध्ये त्याची बॅग ठेवत तो म्हणाला.
“बाहेर कुणीतरी रान पेटवलं असेल” मी डोळ्यांवर चष्मा ठेवत उत्तर दिलं पण माझ्या उत्तराची वाट न बघता आफताब सरळ माझ्या खोलीत आला होता, आणि त्यानं टेबलावर ठेवलेली सिगरेट विझवली. “सनमायका होतं म्हणून लाकूड पेटलं नाही” तो म्हणाला. “ऍश ट्रे वापरत नाहीस का?” मी सिगरेट ओढते, अथवा कधीपासून ओढते वगैरे त्यानं काहीच विचारलं नाही.
“आई आणि चाची कधी येतील?” मी विचारलं.
“माहित नाही. हॉस्पिटलला फोन करतो” त्यानं चाची कायम ज्या डॉक्टरकडे जात होत्या त्यांना फोन करून विचारलं. दोघी अजून हॉस्पिटलमध्येच होत्या, अजून डॉक्टर आलेच नव्हते म्हणे.
“चहा करतेस?” त्यानं फोन ठेवत मला विचारलं.
“आईनं करून ठेवलाय तो गरम करून देते” त्याला असा परतपरत गरम केलेला चहा खरंतर अजिबात आवडत नाही, हे मला माहित होतं पण मला परत चहा करायचा नव्हता. त्यानं बॅगमधून बिस्कीटांचा पुडा काढून खायला घेतला तरी मी घरामधून त्याला जेवायला अथवा खायला दिलं नाही. सकाळी सहाचं कॉलेज त्यानंतर ट्युशन आणि मग आता यावेळी रोज घरी येऊन जेवायचा. हे मला माहित होतं, माझा काही त्याच्यावर राग नव्हता. पण मी माझ्याच विश्वामध्ये गुरफटले होते, बाबा आणि त्याची ती बाई! आफताबला नक्की काय होतंय ते विचारण्याइतकी माझी मन:स्थिती नव्हती.
“तुझा अभ्यास कसा चालू आहे?” त्यानंच विचारलं.
“ठिक”
“ट्युशनला तर नीट जात नाहीस. लेक्चरला पण नसतेस. मग अभ्यास ठीक कसा चालू आहे?” त्यानं थेट विचारलं. तेव्हा मी इतकी बुद्दू होते की, हे सर्व काही आफताबला निधीकडून समजत असेल हे मला माहितच नव्हतं, कारण निधी आफताब ही स्टोरीच तेव्हा मला समजली नव्हती.
“म्हटलं ना ठिक चालू आहे. बारावी पास होइन” मी आई-बाबाला जितक्या मग्रूरीनं उत्तर द्यायचं तश्याच टोनमध्ये त्याला उत्तर दिलं.
“गूड. बारावीचा रीझल्ट लागेपर्यंत तुझा बर्थडे झाला असेल ना? अठरा पूर्ण होतील. मग लग्न करून टाकू”
“काय्य्य्य?” मी चमकलेच.
“आपण बारावी झाल्यावर चांगलासा मुलगा बघून तुझं लग्न करून टाकू. तुझं टोटल एमच बारावी पास होणं इतकं आहे, तर मग पुढं शिकतेस कशाला?”
“ते माझं मी बघून घेईन. तुला चिंता नको”
“कुणावर चिडतेस?” त्यानं हातातला चहा एका घोटात संपवला. “माझ्यावर? मी काय केलंय?”
“मी तुला काही म्हटलं का?”
“सिगरेट ओढत असताना मला समजणार नाही असं वाटलं? अरिफभाई रोज माझ्यासमोर तर सिगरेट ओढायचा, मी पण एकदोनदा ट्राय केलंय”
“त्याचा इथं काय संबंध? तू सिगरेट ओढलीस तर चालतं कारण तू मुलगा आहेस, राईट? बॉय्जना सगळंच अलाऊड असतं”
“बॉय आणि गर्लचा प्रश्नच कूठं येतो? आणि मी तुला सिगरेट ओढू नकोस असं म्हटलं तरी आहे का? इन फ़ॅक्ट अभ्यासाला बसायच्या आधी सिगरेट ओढली तर रात्रभर अभ्यास होतो, हे सांगतोय!”
“काय्य? अभ्यास!!! आफताब, तुझ्याकडे अजून काही विषय नाहीत का रे?”
“विषय बरेच आहेत, पण तुझ्याशी काय बोलणार? तुझा आणि अभ्यासाचा काही संबंधच राहिला नाही. प्रभात वसीम वगैरे नालायक पोरांबरोबर फिरतेस...”
“तुला कसं माहित?”
“कारण, मी मूर्ख नाहीये. गावात काय होतं ते सर्व मला समजतं. तुला एक गोष्ट सांगू की नको असा विचार करतोय...”
“कसली गोष्ट?”
“वसीमनं सर्वांना सांगितलंय की तू त्याला पटलीयेस.”
“काहीही. तो त्या निधीमागे लाळ गाळत फिरत असतो. इन फॅक्ट मला तर वाटतं की निधी अणी तो...”
“निधीचं त्याच्याबरोबर काही नाहीये” अचानक उसळून तो म्हणाला. “पण तुझं आणि वसीमचं अफेअर आहे, आणि तुमचं सर्व काही झालंय... असं तो सर्वांना सांगतोय”
“सर्व काही झालंय म्हणजे?”
“म्हणजे सर्व काही... समजत नाही का तुला? तू वसीमबरोबर..”
“माझं आणि त्याचं काहीच नाही”
“स्वप्नीलबाळा, हे मलासुद्धा माहित आहे, पण तो लोकांना खोटं सांगत फिरतोय... की त्यानं तुझ्याबरोबर...कळ्ळं का?” सीरीयलमधल्या खाष्ट सासूसारखा आफताब माझयवर खेकसला.
“मग मी काय करू? तो खोटं बोलत असेल तर..”
“कळत कसं नाही तुला? च्यायला, हा अरिफभाई इथं हवा होता. त्यानं तुझ्या डोक्यात बरोबर अक्कल ओतली असती...”
“तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट सांग,”
“तो केवळ तुझं आणि त्याचं प्रेम आहे असं सांगत नाही. तू अव्हलेबल आहेस असं सांगतोय. थोडक्यात तुझं कॅरेक्टर खराब आहे असं सांगतोय. समजलं?”
“काहीही. उगाच काहीही सांगतोस.” तेव्हा मी जरी आफताबवर चिडले असले तरी ही गोष्ट मनाला खूपच खोल टोचली होती. माझं कॅरेक्टर खराब? मी वसीमबरोबर भेटणं बोलणं याखेरीज काहीही केलं नव्हतं एकटी स्वत:हून तर कुठं त्याला भेटले पण नव्हते. त्यानं माझ्याबद्दल असं बोलावं? आणि तेव्हा माझ्या मंद बुद्धीमध्ये एक गोष्ट अजून पेटली नव्हती की या गोष्टी पसरवण्यात हातभार लावत होती ती निधी.
“नाही सांगत! फक्त तू माझी शेजारी आहेस, आपण एकत्र अभ्यास करतो म्हणून काळजीनं सांगितलं, मला माहित आहे तू असं काही वागणार नाहीस... पण बदनामी फार लवकर होते. आणि एकदा बदनामीचा डाग लागला की तो पुसला जात नाही..”
“मुलींचीच बदनामी का होते?”
“मला माहित नाही. पण बदनामी कशीही झाली तरी मुलींनच ती सोसावी लागते, म्हणून मग..”
“मुलींनीच नीट राहिलं पाहिजे, त्यांनीच संस्कारी बनलं पाहिजे”
“एक्झाक्टली, आणि ते जर जमत नसेल तर येणार्‍या प्रत्येक बदनामीला झेलण्याइतकं स्ट्रॉग असलं पाहिजे. दोनपैकी तुला काय जमतंय ते कर.”
“आफताब, तुलापण असंच वाटतंय का रे? की मी...”
“स्वप्नील, तू खूप हुशार मुलगी आहेस, दहावीला थोडासा अभ्यास करून तुला इतके मस्त मार्क्स मिळाले होते. आता बारावी आहे. चांगले मार्क्स मिळव, सुदैवानं तुझे आईवडील तुझ्या शिक्षणासाठी कितीही पैसा खर्च करू शकतात. शिकलीस, स्वत:च्या पायावर उभी राहीलीस त जगामधला प्रत्येक निर्णय स्वत: घेऊ शकशील. कुणाच्या कुबड्या घ्यायची गरज राहणार नाही. मस्तीमजा करूच नको मी म्हणत नाही, पण त्याचं प्रमाण थोडकंच ठेव” आफताब मला अक्षरश: काळजीनं समजावत होता.
“मला अभ्यास करावासाच वाटत नाही...”
“कारण, तू मन लावून करत नाहीस. थोडंसं लक्ष दे, तुला काय आवडतं ते बघ आणि मग अभ्यासात लक्ष लागेल. प्लीज.. माझी फ्रेंड आहेस म्हणून सांगतोय... असं वागत जाऊ नकोस”
मी काही उत्तर द्ययाच्या आत गेट वाजलं. आई आली होती, येताना माझ्यासाठी वडापाव आणि अजून काही खाऊ आणला होता.
“अरे, तू पण इथंच आहेस का?” आफताबला बघून ती म्हणाली. “चला, गरम चहा करते. खाऊन घ्या. आणि आफताब, आज जेवयाला पण इथंच ये, भाभींना डॉक्टरांनी ऍडमिट केलंय. बीपी नॉर्मल होइपर्यंत”
आफताबनं केवळ माझ्याकडे हसून पाहिलं. “गरम चहाची गरजच आहे सध्या, काकी. स्वप्नील आणि मी अभ्यासालाच बसत होतो”
परत एकदा, आफताब रोज माझ्याकडे अभ्यासाला येऊ लागला. आमचे विषय कॉमन नव्हते पण केवळ मी रेगुलर अभ्यास करावा म्हणून तो सोबत येऊन बसायचा.
ही गोष्ट जेव्हा निधीला समजली तेव्हा तिचं आणि आफताबचं भांडण झालं म्हणे, अर्थात मला यांचं अफेअरच असलेलं माहित नसल्यानं भांडण समजायचा प्रश्नच नव्हता.
>>>>>>>>

बारावीचं वर्ष त्यामानानं फार शांत गेलं.  वसीमचं समजल्यापासून मी त्या ग्रूपमध्ये जाणं बरंचसं बंद केलंच होतं. निधीपण फारशी जायची नाही (हा आफताब इफेक्ट असावा) मी जॉयससोबत नियमित ट्युशनला जायला सुरूवात केली. वसीमला एकदा भेटून तो माझ्याबद्दल अशा अफवा का पसरवतो याचा जाब विचारला, तेव्हा त्यानं “मै किसीको कुच नही बोला. सब मेरेको तेरे नाम से टीज करते है. पर मेरे मनमे ऐसा कुच नही” असा राग आळवायला सुरूवात केली. परत माझ्याबद्दल काही बोलूनच बघ, माझ्या बापाला सांगून नाही तुझी हाडं मोडून ठेवली तर याद राख असा त्याला दम दिला.
कुणाचीही हाडं मोडणं हे बाबाचं तसंही आवडतं काम. आई सांगते की बाबा शाळाकॉलेजमध्ये असताना एकदम गुंड होता. अमिताभ बच्चन स्टाईल मारत गावभर मारामारी करायचा. आता स्वत: मरामारी करायचा नाही, पण वेळ आली तर नक्की केली असती. शिवाय गावामधले सगळे “दादा” लोकं त्याच्या फेवरमध्ये आधीपासून होते. थोडक्यात वसीम प्रकरण तिथंच निस्तरलं म्हणून बरं झालं.
एके दिवशी खोलीत पीसीवर गेम्स खेळत होते तेव्हा खूप ओळखीचा आवाज ऐकू आला. लगेच पीसी बंद करून मी गडग्यावरून उडी मारून आफताबच्या घरी गेले, किचनमध्ये डायनिंग टेबलावर जादू बसला होता.
“कधी आलास? सांगितलं का नाहीस?” मी दारातूनच विचारलं.
“आता जस्ट आलोय. मागे चॅटवर मी म्हटलं नव्हतं का... सुट्टीला महिन्याभरात येईन”
“आज येशील हे माहित नव्हतं. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईझ” जादूला बघून खरंच सरप्राईझ वाटलं होतं. मागच्यावेळी जादू आला तेव्हा अरिफचं सावट होतं. चुकूनमाकून त्याच्यासोबत हसायलाही कसंतरी वाटत होतं, जणू अरिफच्या आठवणींचा अपमान केल्यासारखं, पण काळ सगळ्यात मोठा गेमचेंजर असतो. अवघ्या दीड वर्षांत अरिफ आठवणींमधून धुसर होत चालला होता. जादू आधीसारखाच दिसत होता, मागच्यावेळेपेक्षा अधिक ताजातवाना, अधिक प्रगल्भ वगैरे.
“तुझ्यासाठी गेम्स आणलेत. नंतर काढून देईन. चॉकलेट्स तू खाणार नाहीस, म्हणून ड्रायफ्रूट्स आणलेत” तो बॅगेमधून काहीबाही काढत म्हणाला.
“ते नंतर उपस,” चाचींचा आवाज आला, “आधी चा घे, मग गार झायली की परत मलाच काम” चाचींनी मलापण चहा आणि बशीमध्ये चिवडा दिला. चाचींची तब्बेत  अजून नरमगरमच असायची, पण जादू आलाय म्हटलं की त्या एकदम खुश दिसत होत्या. .
“छोटे मियां कधी येणार?” त्यानं विचारलं.
“दुपारनंतर. तू जेवून नीज. तवर तो येईल” चाची काम करत असतानाच म्हणाल्या. जादूनं माझ्याकडे बघून उगाच डोळा मारला. “आता यावेळी झोपेल कोण?” असं म्हणत असल्यासारखा.
“कॉलेज एकदम सूट झालंय. मस्त दिसतेस” तो म्हणाला.
“रंग पण उजळलाय पोरीचा” चाचींनी मध्येच म्हणाल्या. हे खरं होतं. बारावी सुरू झाल्यापासून सर्व म्हणायचे की, मी गोरी दिसतेय. “रब्बिश, ऍनिमीक दिसतेस. हिमोग्लोबिन चेक करून घे,” आफताब म्हणायचा.. याच्या नानाची टांग.
जादू मात्र निव्वळ हसला. मग बराच वेळ बसून मी आणि जादू कशाबशावर बोलत बसलो. जुन्या गाण्यांच्या आवडीचा विषय होताच. शिवाय काही नवीन गाणी... नवीन चित्रपट. जादूबरोबर बोलताना अभ्यासाच्या व्यतीरीक्त बोलायला इतरही काही असायचंच. कुठले कुठले नवीन पिक्चर बघितले आणि आवडले त्यावर आमची चर्चा चालू झाली.
“मला शेवट बिल्कुल आवडला नाही” मी त्याला ठणकावून सांगितलं.
“का?”
“तिचं जर त्याच्यावर प्रेम नव्हतंच, किंवा आता नवीन भेटलेल्या नवर्‍यावर प्रेम होतं तर तिनं त्याला भेटावंच कशाला? तो तिच्याशिवाय जगत होताच ना... मग मुद्दाम त्याला त्याच्या गावात जाऊन हुडकून काढून “आता मी तुझ्यावर प्रेम करत नाही” हे सांगायचं कशाला? आणि त्याला इतकं रामायण ऐकवण्यापेक्षा त्या नवर्‍याला चल आपण घरी जाऊ, हे सांगता येत नाही का?”
“कदाचित तिला मनातल्या भावना इझीली सॉर्ट आऊट करता आल्या नसतील”
“का नाही? प्रेम आहे किंवा नाही हे सांगता येणं इतकं कठिण आहे का?”
“त्यासाठी आधी प्रेम म्हणजे काय ते प्रत्येकाला समजायला हवं ना...”
“म्हणजे?”
“प्रेमाची जी व्याख्या तुझ्यासाठी, तीच माझ्यासाठी असं नसतं ना.. कदाचित जी भावना तुझ्यासाठी प्रेम असेल ती माझ्यासाठी मालकीची भावना असेल, आणि मला जे प्रेम म्हणून वाटतंय ते तुला वासना वाटू शकते. प्रेम व्यक्तीगणिक बदलतं, प्रत्येक व्यक्तीसाठी बदलतं” जादू त्याच्या नेहमीच्या शांत सुरात मला समजावत म्हणाला.
“तू मला कन्फ़्युज करतोयस”
“मग तू कन्फ़्युज होऊच नकोस. ठामपणे एखाद्यावर प्रेम कर.  ऍक्चुअली प्रेमावरच्या या डिस्कशनमध्ये आमचे छोटे मिया असायला हवेत ना?” चाचींचं लक्ष नाहीये ते बघून जादू मला हळूच म्हणाला. “इथं आल्यापासून चारेक तासांत त्याचेच कारनामे ऐकतोय. फारच फास्ट प्रोग्रेस आहे” जादू हसत म्हणाला. मी काही उत्तर देण्याआधीच “ही पोर इथं येऊन बसली का?” आईचा दारात आवाज आला, “मी समजतेय इतकावेळ कंप्युटर खेळतेय. इकडे आलीस हे सांगता येत नाही का गं?”
“तू टीव्ही बघत होतीस म्हणून सांगितलं नाही.”  मग आईचा आणि अझरचा कधी आलास कधीपर्यंत आहेस, मग चाचींसोबत कविता आली नाही का जेवायला काय, वगैरे संवाद सुरू झाला.
आईसोबतच मीपण घरी आले. जादू आला होता, किती खुशीची बात होती. तसा तो वर्षातून एकदाच सुट्टीला यायचा, पण त्याच्या येण्याचा आनंद यावेळी मला जास्त झाल्यासारखा वाटत होता.
जादू येऊन दोनच दिवस झाले होते पण आमची अख्खी गल्ली खुश झाली होती.
“स्वप्नील, मी दुकानावर जातेय. यतिनला थोडी मदत हवी आहे” दिवाळीचा सीझन जवळ आला होता, दुकानामधला नवीन माल वगैरे लावायचा होता. आईनं मला तरीही हट्टानं विचारलंच. “एकटी राहशील की माझ्यासोबत येशील?”
मला दुकानात जायला एरवीच कधी आवडायचं नाही. मी घरी बसून अभ्यास करेन असं आईला सांगितलं. “अभ्यासच कर, गेम खेळू नकोस” आईनं दटावणी दिली. मी फिजिक्सच्या नोट्स काढून वाचत बसले. बायो माझ्या अतिव आवडीचा, केमिस्ट्रीपण जमायचं, पण फिजिक्ससोबत मात्र कुस्ती खेळावी लागायची. अजिबात समजायचं नाही अशातला भाग नाही, पण समजून घ्यायला कष्ट पडायचे हे मात्र खरं. अभ्यास करताना सहज म्हणून रेडीओ लावला होता त्यावर कसलंतरी भाषण चालू होतं,  ते कानावर पडत होतं, पण मेंदूपर्यंत काय जात नव्हतं. अचानक ते भाषण थांबलं, म्हणजे संपलं असणार पण माझ्या कानावर अचानक पडला तो रफीचा आवाज- ऐसे तो ना देखो, के हमको नशा हो जायें.
हातातलं पुस्तक आपोआप बाजूला ठेवलं, जादू म्हणतो तेच खरं आहे, हा आवाज चमत्कारच आहे. किती मधाळ, रोमॅंटिक आवाज. त्याच मधाळपणाला आलेला हलकासा नशा. “खूबसूरतसी कोइ हमसे खता हो जाये” रेडीओचा आवाज चढवला.. कदमे नाझपे इक सजदा अदा हो जाये....
डोळ्यांसमोर घाटामध्ये उतरत असलेलं धुकं यायला लागलं... गाणं संपलं आणि आकाशवाणीनं आपला सेन्स ऑफ ह्युमर दाखवण्यासाठी लगोलग दुसरं गाणं लावलं शब्बीरकुमारच्या रेकत्या आवाजात. लगेच रेडीओ बंद केला. कानात रफीचा आवाज अजून गुणगुणत होता. अचानक डोळ्यासमोर जादू उभा राहिला. हे गाणं गुणगुणत असताना, माझ्या एकदम कानाजवळ. अख्ख्या अंगामध्ये कसलीतरी अस्वस्थता पसरून राहिली. एरवी असं  अस्स्वस्थ वाटलं की मी सरळ सिगरेट ओढत  असायचे, आज सिगरेट नको हवी होती, दुसरंच काहीतरी हवं होतं, काय ते माहित नव्हतं.
“मस्त दिसतेस” जादू मघाशी मला म्हणाला होता, ते अचानक आठवलं. वर्षभरानंतर त्यानं मला आज पाहिलं होतं. मी मस्त दिसतेय म्हणजे काय... आरश्यासमोर उभी राहिले. गेल्या वर्षभरामध्ये मी बरीच बारीक झाले होते. आधीचे चब्बी चीक्स आता गायब झाले होते. केस कापल्यामुळे चेहर्‍याचा शेप बराच बदलल्यासारखा वाटत होता. डोळ्यावरचा चष्मा काढला, माझे डोळे काळे नव्हते, पिंगटही नव्हते, वेगळाच रंग होता. कसा होता... माहित नाही.
अंगावरचे कपडे मीच काढत गेले. पहिल्यांदाच आरश्यामध्ये स्वत:ला अशी बघत होते. एरवी शॉवर घेताना वगैरे पाहिलं असेल... पण आज केवळ मी कशी आहे ते पाहण्यासाठी..
मी सुंदर आहे का? माहित नाही. मी कुणाला आवडू शकते का? माहित नाही. मी जादूला आवडू शकते... मनात अचानक विचार आला. डोळ्यासमोर जादू दिसायला लागला, फार दूर नव्हताच, इथं माझ्या खोलीपासून अवघ्या काही फुटांवर जादू होता, पण तरीही तो खूप हवाहवासा वाटायला लागला. अगदी नक्की कसा हवा आहे हे समजण्याइतका. घरी आई नसताना मी आणि निधी, यशस्वी वगैरेंनी मिळून दोनतीनदा ब्लूफिल्म्स पाहिल्या होत्या. ते बघत असताना हे असलं सगळं करणं किती घाण किळसवाणं वाटलं होतं. यशस्वीनं तर त्यादिवशी स्पष्ट सांगितलं हे असलं सर्व काही अजिबात करणार नाही. मलाही थोडंफार तसंच वाटलं होतं. शाळेमध्ये नववीला असताना सेक्स एज्युकेशन सेमिनार झाला होता, पण त्यावेळी हे इतकं काही वाटलं नव्हतं. आज मात्र स्पष्टपणे हवंहवंसं वाटायला लागलं. तेही जादूसोबत. जादूचा प्रेमळ आवाज, त्याच्या श्वासांना येणारा खास त्याचा गंध, त्याचा थंड तरीही ऊबदार वाटणारा हात, त्याचा कळत नकळत जाणवलेला स्पर्श सगळं सगळं सगळं मनात भिरभिरायला लागलंय..
मी कुठल्यातरी वेगळ्याच धुंदीत होते, आणि ही धुंदी क्षणाक्षणाला वाढत होती. मला त्यावेळी त्या क्षणी केवळ जादू आपल्यासोबत हवा, त्याच्या हातांमध्ये आपलं अस्तित्व कुस्करून जावं इतकंच वाटत राहिलं... कितीतरीवेळ मी त्या लाटांमध्ये पोहत राहिले, अखेर मनामध्ये कुठ्लंतरी एक कारंजं उसळी मारून वर आलं, आणि थबकत राहिलं, मग अजून एक कारंजं.... शेवटी प्रचंड दमले... मघाच्या धुंदीपेक्षाही वेगळीच ग्लानी अंगाभोवती वेढून आली, इतकावेळ शरीराच्या पेशींपेशीमध्ये गोठलेली ती अस्वस्थता निघून गेली आणि त्याऐवजी लालसेची, समाधानाची वेगळीच पुटं चढत राहिली.
मी एकटीच बेडवर पडून राहिले. जादू... हलकेच तोंडातल्या तोंडात पुटपुटले.
मग प्रचंड शरम मनात भरून आली. मी असा विचार अझरभाईंबद्दल कसा काय करू शकते? तो मला बहिण मानतो, किंवा खरंतर अजून लहान मुलगी मानतो आणि मी मात्र, त्याच्यासोबत सेक्स करण्याच्या कल्पनांमध्ये गुंतले होते....


संध्याकाळी स्कूटीची चावी मागायला जादू घरी आला, अख्खी दुपार मी त्याचाच विचार करण्यात घालवली होती, पण तो समोर आल्यानंतर दुपारच्या त्या कल्पना  डोक्यात आल्यासुद्धा नाहीत. त्याच्याबद्दल प्रचंड आकर्षण वाटत होतं हे खरं होतं, पण ते सर्व मनामध्ये, त्याच्यासमोर कधीच नाही. मला जे वाटतं ते त्याला कधीच सांगितलं नाही, कधी गरजच भासली नाही.

Tuesday, 5 April 2016

MAD-रास ५

चेन्नईमध्ये आल्यापासून मला माझे मित्रमैत्रीणी बर्‍याचदा हा प्रश्न हमखास विचारतात. “तिकडे हिंदी अजिबात बोलत नाहीत, मग तुझं कसं निभावतं?” यावर उत्तर: माझं अतिशय उत्तमरीत्या निभावतं.

आपल्याला हे ऐकून माहित असतं की दाक्षिणात्य राज्यांमध्ये त्यांच्याच भाषा बोलाव्या लागतात, अन्यथा ते लोकं फार त्रास देतात. हे एका बाजूने बरोबर आहे आणि एका बाजूनं नाहीसुद्धा. दाक्षिणात्यांना हिंदीचा इतका राग आहे कारण त्यांच्यासाठी ती भाषाच पूर्णपणे परकी आहे आणि याच भाषेची सक्ती त्यांच्यावर केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या मराठी भाषिकांना हिंदी फार सोपीची वाटते, तसं त्यांना वाटत नाही.


चेन्नईमध्ये आल्यानंतर आठेक दिवसांत मुंबईच्या सवयीने बाहेर बर्‍याचदा दुकानांतून वगैरे आपसूक हिंदी बोललं जायचं,  ते हिंदी बोललं काय आणि मराठी बोललं काय फारसा फरक पडणार नाही हे लक्षात आलं. लहानपणापासून घरात कानडी असल्याने आणि मंगळूरला दोन वर्षं काढल्याने कानडीची सणसणीत सवय होती. मग इकडे बाहेर सर्रास कानडीमधूनच बोलायला सुरूवात केली. अजिबात काही कळत नाही यापेक्षा किमान काय तीस चाळीस टक्के समजतंय तितकं तरी पुरेसं! कानडी तमिळ भाषा बर्‍यापैकी जवळच्या आहेत पण एकदा तमीळसाठी कान तयार झाला की मराठी-तमिळ-कानडी अशा तिन्ही भाषांमधल्या शब्दांची गंमत मला तरी घेता येते.


साधारण बर्‍यापैकी चांगल्या दुकानांमधून अथवा शेजार्‍यांबरोबर फार मोठा प्रश्न आला नाही. बहुतेक सर्वजण इंग्रजी माध्यमात शिकलेले असल्याने इंग्रजी झिंदाबादचा नारा देता आला. ज्यांना अजिबात इंग्लिश येत नाही अशा “काकू आंटी” वगैरेंच्या मुलांनी भाषांतरकाराचं काम केलं. ती मुलं नसली की काकू तमिळमध्ये मी इंग्लिश-कानडीमध्ये असा संवाद चालू झाला. एकंदरीत बोलायचंच असेल तर भाषेचा अडथळा कधी येत नाही, आणि बोलायचंच नसेल तर कितीही समान भाषा असली तरी संवाद साधला जात नाही, हेच खरं. आमच्या घरासमोरच एक मारवाडी फॅमिली राहते. गेली वीस वर्षे इथंच राहत असल्याने त्यांचं तमिळ उत्तम आहे, शिवाय हिंदी समजतं. त्या भाभींनी मला खूप मदत केली.

रोजच्या वापरामधले शब्द  मी एका वहीमध्ये लिहून ठेवले. वाणसामानाची नावं, फळं भाज्यांची नावं. मराठी तमिळ हिंदी कानडी अशी सापड्तील त्या भाषेमध्ये लिहून ठेवत गेले. आकड्यांचा फारसा प्रश्न आला नाही. मला तमिळमधले वर,रंडं, मुणं, नालं हे आकडे आधी पासून येत होते. पुढचे आकडे मी कानडीमधून बोलायचे. ते थोडेफार सारखेच आहेत. कानडीमधला “ह” इकडे “प” होतो. कानडी “हत्त” तमिळ पत्त (दहा), हन्नोंद-पन्नोंद (अकरा), हन्यार्ड-पन्यार्ड (बारा) असे आकडे लक्षात ठेवले. पण बर्‍याचदा पायांत पाय अडकवून तोंडघशी पाडलं ते “पांज” ने. बहुतेकदा दुकानामध्ये समोरच्याने “पांज रूपया” सांगितलं की मी पाचचं नाणं काढून द्यायचे. समोरचा माझ्याकडे “कहांकहांसे आते है” टाईप लूक द्यायला. “इन्न पत्त कोडी”. मग कानडीमधून “पाच रूपये म्हणालात ना?” समोरून तमिळमध्ये “आमा, पांज” (ज चा उच्चार “च” आणि “ज” मधला) मग लक्षात यायचं त्याला पंधरा रूपये म्हणायचं आहे. निमूटपणे अजून एक दहाची नोट द्यायची. मागे  रत्नागिरीमध्ये लिंबं घेतल्यावर ती बाई “पाच द्या” म्हणाली. मी पर्समधून मोजून पंधरा रूपयाचे सुट्टे दिल्यावर त्या बाईनं परत मझ्याकडे “कहांकहांसे आते है” टाईप लूक दिला. चालायचंच!! चेन्नई काय आणि रत्नागिरी काय.. आम्ही असलेच वेंधळे.


भाजी-फळं वगैरे घ्यायला इतका त्रास झाला नाही. अगदी पहिल्या दिवसांपासून दारावर विकायला घेणार्‍या विक्रेत्यांमुळे पुन्हा एकदा आपण गावकुसात रहायला आलोय याची जाणीव झाली. हे लोक काय ओरडतात ते समजायचं नाही, म्हणून हाक मारून नक्की काय भाजी आहे ते बघावं लागायचं. एकदा या नादांत मी स्टोव रीपेअरी आणि छत्री दुरूस्तीवाल्याला हाक मारली आहे. एकदा सकाळी साडेसहाला एक बाई अगम्यपणे काय ओरडत होती ते कळेना, म्हणून बोलावली तर ती इडियप्पम विकत होती. कोकणामधल्या लोकांना रसशेवया माहित असतील. त्याच या तांदळाच्या गरमगरम वाफवलेल्या शेवया. दहा रूपयाचे चार. ही बाई आता आमची फार आवडती झाली आहे. सकाळच्या वेळी कंटाळा आला असेल तर तिच्या “इड्डीआपै” अशा जोरदार हाकेची वाट पहायची, गरम शेवया आणि त्यावर दूध साखर हा नाश्ता पोटभरीचा तर होतोच, शिवाय डायेट फ्रेंडलीसुद्धा.


या दारी येणार्‍या विक्रेत्यांमुळे मला भाज्यांची तमिळ नावे लगेच समजत गेली. “कीरै” म्हणजे पालेभाजी. सीरीकीरै, मणतक्कालीकिरै, पुळच्चीकीरै ही लोकल पालेभाज्यांची नावं समजली. तक्काली तक्काली तक्काली असं सकाळी सकाळी ओरडत येणारा बावा टोमॅटो आणि इतर भाज्या घेऊन यायचा. तक्काली म्हणजे टोमॅटो. सोरेकाई म्हणजे दुधी. वेंडेकाई म्हणजे भेंडी. वाळेकाई म्हणजे केळी. (कानडीमधल्या बाळेकाई मुळे हे लक्षात रहायला बरंच सोपं) काई म्हणजे भाज्या-फळफळावळ. पळम म्हणजे फळं. हे तर लक्षात ठेवायला बरंच सोपं होतं. असे बरेच रोजच्या वापरातले शब्द समजल्यानंतर एकेक मजा जाणवायला लागली. मांगा म्हणजे आंबा. अरिसी म्हणजे तांदूळ. याचे मॅंगो आणि राईस हे इंग्रजी शब्द याच तमिळ शब्दांवरून आलेत असं कुठंतरी लेखामध्ये वाचलं होतं. खरंखोटं असेल का माहित नाही, पण मला लक्षात ठेवायला हे नीमॉनिक बरंच उपयोगी पडलं. पुरूप्पू म्हणजे डाळी. कडलीपुरूप्प्पू म्हणजे हरभर्‍याची डाळ. इथंही नीमॉनिक वापरलंच. J


भाषेची सर्वात जास्त अडचण जाणवली ती कामवालीच्या संदर्भात. सेल्वीला इंग्लिश समजायचं, पण तेही थोडंसंच. सेल्व्हीने महिनाभर माझ्याकडे धुणीभांडी, झाडू पोछा आणि अंगण झाडणे इतकं काम केलं. पुढच्या महिन्यापासून तीच स्वयंपाक करायला लागली. सेल्व्हीच्या हाताला जबरदस्त चव होती, मसालेदार, झणझणीत पन अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. मला मासे चिकन वगैरे काही घरी बनवता यायचं नाही. तिच्यामुळे थोडंफार करायला शिकले. पण हे करणं-शिकणं-शिकवणं फार मजेदार असायचं. किचनमध्ये ती मला काहीतरी “हवंय” किंवा “संपलंय” म्हणून सांगायची. तिला काय हवंय ते मला कळलेलं नसायचं. मग अख्ख्या  किचनमध्ये सापडलं तर ठिक अन्यथा कंप्युटर चालू करून ती जे सांगेल ते गूगल सर्च करून त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते शोधणे. मग ते इंग्रजीमधलं नाव आपल्याला समजलंतर ठिक नाहीतर त्याचं परत मराठी मध्ये काय म्हणतात ते शोधणे. इतक्या सर्चिंगमध्ये काहीतरी गमतीजमती व्हायच्यात. एकदा सेल्वी चिकन बिर्याणी करत होती. काहीतरी मसाल्याचा पदार्थ तिला हवा झाला. काय ते गूगलभाऊला विचारलं. इंग्रजी नाव मला उमगेना. त्याचं मराठी नाव काय म्हणून विचारलं. “मराथीमोगू इन मराठी” असं स्पेलिंग टाकल्यावर गूगल पण गरगरला असणार. अखेर त्याला मराठीमध्ये “नागकेशर” म्हणतात हे मायबोली.कॉमवर समजले. पण मग ह्या नागकेशराला तमीळमध्ये “मराठी” का म्हणतात ते मात्र अद्याप समजलेले नाही.


पण हे मात्र खरं आहे की, तमिळ आणि मराठी संस्कृती फार जवळच्या आहेत. वरवर पाहता त्या अजिबात तश्या जाणवत नाहीत याची मला कल्पना आहे. पण मुळातून आपली आणि तमिळ नाळ कुठंतरी खोल जुळल्यासारखी वाटते. रा. चिं ढेर्‍यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी याबद्दल बरंच लिहिलं आहे. अगदी मराठीमधला “मुलगा” हा शब्ददेखील तमिळ देव मुरूगावरून आल्याचं ढेरे यांनी लिहिलं आहे. मुरुगन म्हणजेच आपला मल्हारी असंही वाचलंय. गंमत म्हणजे मराठी टीव्हीवर सध्या चालू असणारी हिट सीरीयल “जय मल्हार” तमिळमध्ये डब करून दाखवली जाते, आणि ती बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. इथल्या इमिटेशन ज्वेलरीच्यादुकानात मला बानु नथ पण दिसली होती. मुरूगन आपल्याकडे कार्तीकेय (शिवपुत्र) समजला जातो आणि स्त्रिया त्याचे दर्शन घेत नाहीत. इकडे मात्र मुरूगनची कृष्णासारखीच प्रियकर म्हणून आळवणी केली जाते. सौभाग्यवती स्त्रिया त्याचे आवर्जून दर्शन घेतात. अशा अजबगजब कहाण्या ऐकायला मला फार गंमत वाटते.


इतक्या दूर आल्यावर सणावारांची त्यानिमित्ताने घराची आठवण होणं साहजिक आहे. सणांच्या पूजाविधीपेक्षा नैवेद्यावर आमचं जरा जास्त प्रेम. आल्यानंतर महिन्याभरातच गणपतीचा सण होता. घरून “आला असतात तर..” चे हेव्ही इमोशनल डोसेस चालू होते. आता गणपतीच्या वेळेला कोकणी माणूस गावात नसेल तर काय चिडचिड होइल.  सकाळीच आम्ही तिघं घराजवळच्या गणपती देवळात गेलो. हे देऊळ चांगलं मोठं आहे. खरंतर देवांचं हाऊसिंग संकुल आहे कारण तिथे देवळाच्या अंगणामध्ये गणपतीसोबतच देवी, विष्णू, हनुमान, कार्तीकेयन, शंकर अशा सर्वच मुख्य देवांची मंदिरं आहेत. आम्ही आत गेल्यागेल्या देवळात जाण्याआधीच पुजा्र्‍यानं आम्हाला बघून इकडे असे या, रांगेत उभे रहा असे तमिळमधून सुनावले. देवळात जायच्या आधीच आम्ही देवळाबाहेर असलेल्या प्रांगणात कशाला उभे आहोत ते समजेना. आमच्यासोबत अजून वीस पंचवीस माणसं होती. मग त्या पुजार्‍यानं आमच्या हातात एक मातीचं सुगड टाईप दिलं. त्यात पाणी, थोड्या दुर्वा आणि झाडांची पानं फुलं वगैरे होती. ती छोटी सुगड सर्वांच्या हातात दिल्यावर पुजार्‍याने आम्हाला “चला आता” असं सांगितलं. आम्हाला काहीही समजत नसल्याने आम्ही आपले हल्याहल्या करत इतर काय करतात त्यांच्यासारखे निघालो. अख्ख्या देवळाला प्रदक्षिणा घालून मग आम्ही प्रांगणाच्या दुसर्‍या टोकाला आलो. तिथे गणपतीची एक सुंदर पितळी मूर्ती बाहेर चौथर्‍यावर ठेवली होती. पुजार्‍यांनी त्या मूर्तीला मंत्र म्हणत अभिषेक चालू केला. त्याचा अभिषेक झाल्यावर ज्या लोकांच्या हातात ही सुगड होती त्यांनी त्यातलं पाणी मूर्तीवर ओतलं. आम्ही कॉपी पेस्ट केलं. मग पुजार्‍यांनी ते अभिषेकाचं पाणी ज्या मातीत मुरवलं ती थोडी माती फुलं वगैरे त्या सुगडीत घालून दिलं. “आता याचं काय करायचं” असा प्रश्नचिन्ह तोंडावर झळकलं असणार कारण शेजारी उभ्या असलेल्या बाईनं “वीडीगं पोणा सॅंड मे ऎड माडी” असं सांगितलं. घरी जाऊन मातीत मिसळा असा अर्थ. आम्हाला समजावं म्हणून तिला काय कसरती कराव्या लागल्या. गणपती विसर्जन करून आलं की त्याची मूठभर का  होइना ओली माती घरात आणून ठेवायची आपली पद्धत. इथंही थोडाफार तीच पद्धत पण किंचित फरक. पुजार्‍यांनी त्या पितळी मूर्तीची पूजा करेपर्यंत आम्ही आत देवळांत जाऊन दर्शन घेतले. 

तोवर बाहेर प्रसाद द्यायला सुरूवात झाली होती. देवळात आलेल्या प्रत्येकाला प्रसाद हा दिलाच जातो. काबुली चण्यांचे सुंडल आणि गोड पोंगल. गोडगोड गुळाचा केलेला पोंगल इतका खमंग लागतो की बास. पोंगल आणि सुंदलबद्दल नंतर सविस्तर सांगेन. “इकडे घरी गणपती बसवत नाहीत वाटतं” मी नवर्‍याला सांगितलं. त्याला देवदर्शनापेक्षा उकडीच्या मोदकांची आस अधिक लागली होती. देवळाबाहेर पडल्यावर गावच्या मुख्य बाजारात काहीतरी आणायला गेलो. तिथं तीन-चार विक्रेते रस्त्याच्या एकाकडेला गणपतीच्या मूर्ती विकत होते. पूर्ण मातीने बनवलेली ओली मूर्ती. गुंजेचे लावलेले लाल डोळे. रंग वगैरे काहीही नाही. शब्दश: पार्थिव मूर्ती. अगदी छःओट्याच्या पण गोजिर्‍या मूर्ती. विक्रेत्यांपैकीच काही लोक साच्यामध्ये ओली माते घालून फटाफट या मूर्ती घडवत पण होते. लोक या मूर्ती ताटात ठेवून घरी घेऊन जात होते. आजूबाजूला फुलाफळांची विक्री चालू होती. इकडे कुठल्याही सणाला तोरण म्हणून झावळ्यांचा एक प्रकर करतात. तोही विकायला होता. सणाचा दिवस म्हणजे केळीच्या पानांची तडाखेबंद विक्री. नेहमीचा बाजार सणासाठी छानच नटला होता.. कोकणापासून इतक्या दूर येऊन इतका सुंदर गणपतीचा सण बघायला मिळेल असं वाटलंच नव्हतं. याच बाजाराच्या रस्त्यावरून आमच्या घराकडे येताना मुरुगनचे घर आहे. हा मुरुगन नुकताच आमच्या ओळखीचा झालेला. त्याची बायको मराठी आहे, पण सध्या ती युएसला कामासाठी गेली होती. पण बायकोची भाषा बोलणारे लोक् इतकी ओळख त्याच्यासाठी पुरेशी होती. बाजारात जातायेताना तो घरी असला की हाक मारायचा, तो नसला की त्याची आई तमिळमध्येच सर्व काही कुशलमंगल विचारायची. आताही आम्ही घरी जाताना त्याने हाक मारली. “प्रसाद घ्यायला या”


त्याच्या घरात ही पार्थिव इवलाली मूर्ती सुंदर पुजून ठेवली होती. आज संध्याकाळी आम्ही घरातल्याच बादलीत विसर्जन करून ते पाणी झाडांत ओततो म्हणाला. “आमच्याकडे” सणाच्या नावाखाली हाय हैदोस घालतात ते त्याला सांगायची गरजच नाही. मुरूगन मुंबईला दोन तीन वर्षे होता. मुरूगनची आई टिपिकल तमिळ. बाहेर येऊन माझ्याशी आणि लेकीशी दोन वाक्यं बोलून गेली. मला वाटलं होतं की प्रसाद म्हणजे परत पोंगल येईल. मुरूगनच्या आईंनी ताटामध्ये वाढून आणले ते “मोदगम” त्या मोदगम म्हणाल्या तरी मी एकदम “उकडीचे मोदक” बघून उडालेच. कर्नाटकात उकडीचे मोदक फारसे मीतरी पाहिले नाहीत. महाराष्ट्रामध्ये कोकण साईडकडे उकडीच्या मोदकांचं फार असतं. घाटावर तळणीचेच मोदक. पण तरी हे तिथून ते इकडे इतक्या तमिळनाडूपर्यंत कसं आलं ते माहित नाही (का इकडून तिकडे गेलं तेही माहित नाही) पण गरम गरम वाफवलेले, साजुक तुप घातलेले, नारळागुळाचा खमंग सारण वगैरे भरलेले मोदक. नवरा एकदम खुशच झाला. गणपती बाप्पा मोरया!! फक्त इकडे या मोदकांचा कायापालट होतो. आपल्या महाराष्ट्री पद्धतीसारखे नाजुक कळीदार मोदक इकडे बनवत नाहीत. सरळ समोसाशेपमध्ये मोदक वळतात. २१ करा नाहीतर ४२. मग तसे हे झटपट होतात हे मोदक.  चवीला सेमच लागत् असल्याने केवळ रूपाने असा काही फारसा फरक पडत नाही. मोदक न जमणार्‍यांनी मोदगम करून बघा!!!


या खाण्यापिण्यावरून अजून एक गंमत आठवली. कसल्याशा स्वीट मार्टमध्ये गेलो होतो. तिथले नेहमीचे केक्स पेस्ट्रीज आणि अतिशय गोड चपचपीत बंगाली  मिठायांपेक्षा वेगळं काही आहे हा ते बघत होते. एका ट्रेमध्ये पोळ्यांची चळत ठेवली होती.  मी दुकानदाराला “वोबट्टू?” म्हणून विचारलं. मंगलोरकडे पुरणपोळ्यांना वोबट्टू म्हणतात. त्याला काय ते समजेना. मी परत कानडीतून विचारलं “हुरणद्द होळगी” तो परत नॉनप्लस. मग तोच म्हणाला. “इदु पुरणपोळी” क्काअय्य्य? मी मराठीमध्येच आले. चक्क!! पुरणपोळी (ण आणि ळ! हल्ली त्तर काही मराठी लोकंसुद्धा पुरनपोली म्हणतात). चेन्नईमध्ये ही पोळी दोन तीन प्रकाराने करतात. पैकी कोकोनट पोळी म्हणजे खोबर्‍याची पोळी तर अप्रतिम लागते. पुरूप्पू पोळी म्हणजे चणाडाळीचं पुरण वापरून केलेली पोळी. बर्‍याच स्वीट मार्टमध्ये ताज्या पुरणपोळ्या हमखास विकायला ठेवलेल्या असतात. मी लगेचच विकत घेतली हे सांगायला नको.  तमिळनाडूमध्ये आल्यावर बर्‍याच दिवसांनी आयती पुरणपोळी खाल्ली. घरगुती पोळी अजून वेगळी असणार पण एकंदर चव बरीचशी आपल्या मराठी पुरणपोळीसारखीच. आकार थोडासा लहान. पुरणपोळीला साधारण इकडे बोळीदेखील म्हणतात. प आणि ब ची हे अशी अदलाबदल कशी काय होते याबद्दल आता पुढच्या लेखात. तूर्तास मला चेन्नईमध्ये उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्या विनासायास मिळू शकतात याचा शोध लागल्याने आनंदी आनंद गडे म्हणत बागडायचंय.




Monday, 28 March 2016

रहे ना रहे हम (भाग ५)

या सर्व गडबडीमध्ये माझ्या हेल्थचे तीन तेरा चालूच होते. महिन्यातून दोन तीन वेळा ब्लीडींग व्हायचंच. बाबा परत एकदोनदा डॉक्टरकडे जाऊया म्हणत होता, पण मला बाबाशी बोलायचंच नव्हतं. तो घरात असला की मी खोलीच्या बाहेरच पडायचे नाही. आईनं मला इतकी का सारखी त्याच्यावर चिडतेस असं विचारलं. मी उत्तर दिलं नाही. काय सांगणार?


दहावीची प्रीलिम तोंडावर आली होती तेव्हा आमच्या आज्जीनं नवीनच खेळ सुरू केला. आज्जी म्हणजे बाबाची आई. हिला एरवी आमच्या घरी यायला आवडत नाही. आईसोबत एक मिनिट तिचं पटत नाही. ती काकाकाकूसोबत मुंबईलाच राहते. आमच्याकडे गेली चार पाच वर्षं आलेली पण नाही. पण आता मात्र दर दोन दिवसांआड फोन करत होती. का तर माझे पहिले पीरीयड्स आल्यावर फंक्शन करायचंय म्हणून. आधी मला वाटलं की घरगुती काहीतरी असेल. पण एकदा फोनवर तासभर बोलून झाल्यावर आई बाबाला सांगत होती ते मी ऐकलं. आई म्हणे, “काकूला पण बोलवावं लागेल. शिवाय केटरर बूक करावा लागेल. मग मांडववाल्याचं बघून घे”

मी उडालेच. हायला काय लग्नाचं ठरवताय की काय?

आईला विचारलं तर म्हणाली, हो. अशी पद्धत आपल्यात असते. पण इकडं कुणी करत नाही म्हणून मी करणार नव्हते. पण आज्जी म्हणतेय तर करावंच लागेल. म्हटलं, पण इतकं मोठं कशाला?

“कारण, गावातली इकडची तिकडची नातेवाईक म्हणजे शंभर लोकं होणार. तितक्यांचा स्वयंपाक मला जमणार नाही, इतकी लोकं जेवायला कुठे वाढणार?”

“पण इतक्यांना बोलावतेस का?”

“तुझ्या आज्जीची आज्ञा झाली आहे. एकुलतीच नात आहेस.” 

माझ्या काकाला दोन्ही मुलगेच. आत्याला पण एक मुलगा. मुलगी तशी मी एकटीच.

“पण कशाला?” माझा वैताग मीटर क्षणाक्षणाला वाढतच होता.

“मी तरी काय करू? मला पण काही हौस नाही. तसंही या अख्ख्या कार्यक्रमात मला आतच थांबावं लागेल.”

“ते का?”

“परत, तुझ्या आज्जीची आज्ञा” सगळाच वैताग. एरवी मी बाबाकडे मोर्चा वळवून मला हवं तसं करवून घेतलं असतं पण आता मला बाबाशी बोलायचं नव्हतं.

एक गंमत मात्र वाटली, पीरीयड्स आलेत याबद्दल कुणाकडे काही बोलायचं नाही, देवाकडे जायचं नाही, इतर कुणाच्या घरी जायचं नाही. पण हेच पीरीयड यायला लागले म्हणून शंभर लोकांना बोलवायचं.. मग ते आपली ओटी भरणार- ते मात्र जगजाहीरपणे सर्वांना बोंबलून सांगायचं.

वर्गामधल्या काही मैत्रीणींच्या माता माझ्या मातेच्या मैत्रीणी होत्या. त्यांना पण आई बोलावणार... मग नववीमध्ये ती अर्चू आहे ती तर माझी दूरची नातेवाईक लागते, तिच्या आईला पण बोलावणार आणि कोएडमध्ये दहावीलाच तो अभिषेक आहे तो तर माझा मावस-चुलत भाऊ. म्हणजे राधाकाकूला आई बोलावणार... म्हणजे माझा हा जो काही प्रोग्राम आहे तो शाळाभर सगळ्यांना कळणार. इतर मुलींचे असले फंक्शन फार आधी आटोपलेले, तेव्हा त्यांना काय इतकी लाज वाटलेली नसणार. आता माझे पीरीयड्सच लेट आले. आणी ती आता अशी सर्वांसमोर बोलायची गोष्ट.. त्यात परत आईबाबा घरासमोर मांडव वगैरे घालायच्या वार्ता करतायत... म्हणजे अख्ख्या गल्लीला समजणारच! शेजारीच इतकं मॊठं फंक्शन आहे, लोकांची कलकल होतेय, म्हणून आफताब वैतागणार!


शिवाय माझं कसलं काय फंक्शन आहे तेसुद्धा त्याला समजणार. देवा! त्या सीतामाईनं नक्की कुठल्या जपाचा वापर करून धरणीमातेच्या पोटात गुडूप व्हायचे स्पेशल ट्रीक केले होते... तसंच काहीतरी करायला हवं होतं.


मला आता प्रीलीमचं काही टेन्शन आलं नव्हतं. मी पास होईनच याची खात्री झाली होती. आफताबनं माझ्याकडून अभ्यासच तसा करवून घेतला होता. रोजचे क्लासेस ट्युशन शाळा वगैरेंचा वेळ वगलता सलग तीन तास बसून आम्ही हल्ली पेपर सोडवत होतो. त्याच्याबरोबर लिहून माझे कित्येक विषय खरंच सोपे झाले होते.
पण आमचं बोलणं क्वचित अभ्यासाव्यतिरीक्त इतर काहीतरी.

“हे बघ, सेव्हटीटूचे फॅक्टर्स पाड आणि मग एक्सची किंमत इथं अशी.... लक्ष आहे की नाही तुझं?” आफताब माझ्यावर ओरडला. मी खाली मान घालून तेच गणित सोडवत होते, खरंतर. पण त्याला आज चिडचिड करायची हौसच आली होती. मघापासून माझ्यावर दोन तीनदा ओरडला होता. “तेच लिहितेय ना... तुझ्यासारखी तोंडी गणितं येत नाहीत. कागदावर सोडवतेय. दोन मिन्टं धीर धर की” मी पण आता वैतागले. च्यायला, आई बाबा पुण्याला जाऊन साडी आणूया (तेच ते माझ्या त्याच फंक्शनसाठी) वगैरे ठरवत होते. मोठ्या मिनतवारीनं आईनं दहावीची बोर्ड एक्झाम झाल्यावर फंक्शन करू असं आज्ज्जीच्या गळी उतरवलं होतं. पण इतर तयारी चालूच होती.


“सॉरी,” माझ्या ओरडण्यावर तो एकदम वरमून म्हणाला. “खरंतर आज सकाळपासून माझाच मूड ठिक नाहीये...”

“काय झालंय?”

“अझरभाई येतोय. पुढच्या महिन्यात.”

“हायला, मस्तच” मी अभावितपणे बोलून गेले. आणि मग लक्षात आलं... जी जखम नुकतीच कुठं भरत आली आहे,परत त्याच्यावरची खपली निघणार. अझर आला की घरात परत येणारेजाणारे लोक. त्यात परत अरिफचा विषय.

“बोर्ड एक्झाम जवळ आली. मीच त्याला मागे म्हटलं होतं... 
परीक्षेच्या दरम्यान ये, त्यानुसार त्यानं सुट्टी अरेंज केली... पण आत्ता”

तो पुढं बोलला नाही.. पण मला समजलं. गेल्या दोनतीन महिन्यांत हळूहळू का होइना पण आम्ही अरिफच्या जाण्याला विसरत चाललो होतो. आठवण यायची, पण तेवढ्यापुरतीच. अझर आल्यावर मात्र परत ते सर्वच... “तू तुझ्या मामांकडे का जात नाहीस? थोडे दिवस? म्हणजे अभ्यासाच्या...”

त्यानं चिडून माझ्याकडे पाहिलं. “तुम्हाला सर्वांनाच मी इतका कोल्ड हार्टेड वाटतो का? इतकं सर्व झाल्यावर पण मला अभ्यासाचीच चिंता असेल?”

“मी तसं म्हटलंय का? तुला इथं त्रास होइल... आय नो, व्हॉट यु हॅव गॉन थ्रू”

“नो.. स्वप्निल, यु डोंट नो. कुणालाच माहित नाही. लोकांसाठी फक्त माझा सावत्र भाऊ गेलाय. माझ्यासाठी माझा बेस्ट फ्रेंड आणि आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती गमावली आहे... आणि हे गमावणं दुसर्‍या कुठल्याही गोष्टीनं भरून निघणारं नाही.... माझं जाऊ देत, पण त्याचं काय?.. मी किंवा अम्मी त्याला काय सांगणार आहोत? त्याची सख्खी आई गेली, सख्खे बाबा गेले. सख्खा भाऊ गेला. कुटुंब म्हणून राहिलो कोण तर मी आणि अम्मी... त्याचा लॉस फार मोठा आहे. माझ्यामध्ये त्याला फेस करायची हिंमत नाही.”

अशावेळेला नक्की काय बोलून समोरच्याला कंफर्ट करायचं असतं याचे कुठं क्लासेस वगैरे असतात का? कारण, त्यानं पुढं काही बोलण्याआधी मीच घळाघळा रडायला लागले. आफताबनं त्याचं शाईचं पेन बंद केलं. वही पुस्तकं उचलून बॅगमध्ये ठेवली.

“चल, आज खूप अभ्यास केला. स्कूटीची चावी घेऊन ये. आपण इथंच कुठंतरी फिरून येऊ”

“तू जा फिरायला. मी नाही येत” मी डोळे पुसत उत्तर दिलं.

“काय झालं?” तोच मला कंफर्ट करत म्हणाला. “तू ना हल्ली फार चिडचिड करतेस.”

एकदा वाटलं त्याला सांगावं बाबाबद्दल जे काय समजलंय ते, मग लक्षात आलं की कदाचित माझ्याही आधी ही गोष्ट त्याला समजलेली असणारच. तो शेवटी आफताब होता. माझ्याइतका बुद्दू नव्हता. “जास्त टेन्शन घेऊ नकोस. माझ्याकडं बघ. तुझ्याहीपेक्षा माझी परिस्थिती वाईट आहे. बट आय ऍम कोपिंग अप. दॅट्स व्हॉट लाईफ इज, कोपिंग अप” माझ्या खांद्यावर हात ठेवून तो मला समजावत म्हणाला.

पुढं आफताब म्हणाला तसा परीक्षेच्या वेळी अझर आला, पण मला भेटलाच नाही. दोन दिवस इथं राहून तो पुण्याला गेला. तो आल्यापासून चाचींच्या डोळ्यांना सुमार नव्हता. सारख्या रडायच्या.
दहावीचे पेपर सुरू झाले आणि संपले. मला मार्क चांगलेच मिळतील याची खात्री होती. शेवटचा पेपर हिस्ट्रीचा होता, घरी आले तर आईनं खास माझ्यासाठी कलाकंद बनवला होता. “आफताबकडे पण देऊन ये” मी खायला घेण्याआधी मला ऑर्डर मिळाली.
आईनं समोर ठेवलेली वाटी घेऊन मी गडग्यावरून उडी मारून पलिकडे गेले. स्वागतालाच उभे असल्यासारखा जादू उभा होता.
“कसे गेले पेपर?”
“मस्तच गेले”
“उद्यापासून सुट्टी ना?”
“हो, आफताब घरी आला नाही?” दोघांनाही अरिफचा विषय बोलायचा नव्हता, इकडचे तिकडचेच विषय बोलणं गरजेचं.
“अजून नाही. आज काहीतरी मित्रांसोबत पिक्चर बघायला जाईन म्हणालेला”
“ओह. मी येऊ? आई वाट बघत असेल!” मी हातातली वाटी त्याच्याकडे दिली. अरिफबद्दल मी त्याच्याशी तेव्हाच काय नंतरही कधी बोलू शकले नाही. मी आणि आफताब कित्येकदा अरिफच्या आठवणींबद्दल बोलायचो. कित्येकदा तरी त्या आठवणी आम्हाला हसवायच्याच. क्वचित रडू यायचं, पण तरीही आरिफ माझ्या आणि आफताबच्या आयुष्यामधला एक अलिखित दुवा बनून राहिला. पुढे आम्ही दोघं खूप जवळ आलो त्यामागेही अरिफच्याच आठवणी होत्या. आणि कितीही भांडून एकमेकांपासून लांब गेलो तरी दोघांना सांधणार्‍या अरिफच्याच आठवणी होत्या.

जादूचं मात्र तसं कधीच नाही. त्यानं नंतर आयुष्यात कधीही अरिफचं नावसुद्धा काढलं नाही...जणू काही अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसावीच असा तो वागत राहिला. पण एखाद्याला असं डीलीट करताच कसं येऊ शकतं. जादूला जमतं ते. अरिफच्या बाबतीत नाही तर प्रत्येक वेळी. नूरीभाभीच्या वेळी. शाहीनच्या वेळी. परीच्या वेळी. चाचींच्या वेळी. प्रत्येक् वेळी तो या सर्वांना डीलीट करून जगत राहिला. डोळ्यांत दु:खाचे अश्रू आले पण ते तेवढ्यापुरते. मनात कडवटपणा कधीच नाही.
आमचा रफी साहिरच्या शब्दांत म्हणतो, तसाच हा जादू...
जो मिलगया उसीको मुकद्दर समझ लिया...
जो खो गया मै उसको भुलाता चला गया..
मै जिंदगी का साथ निभाता चला गया..
चला, दहावीची परीक्षा संपली. आयुष्यातला एक मोठा टप्पा पार पडला, असं घरी आल्यावर कितीतरी वेळ वाटत राहिलं. तेव्हा कुठं माहित होतं, आयुष्याच्या लढाईमध्ये दहावीची परीक्षा वगैरे सर्व केवळ चकमकी असतात, खरी युद्धं तर अजून खेळायचीच आहेत.

>>>>>>>>>

“एवढे मार्क मिळाल्यावर तू कॉमर्सला का जाणार?” मी राहून राहून आफताबला दोनदा हा प्रश्न विचारला. एकोणनव्वद टक्के. शंभराला फक्त अकरा टक्के कमी. मार्कलिस्ट बघून तरीही आफताब नाखुशच होता. जेवढे मिळालंय त्याहून जे मिळालं नाही त्याबद्दल कुढत बसायचा त्याचा हा स्वभावच.

“आधीच ठरलंय. मी आयदर लॉ करेन किंवा सी ए - सी एस. सायन्सला जाऊन मला काही उपयोग नाही” त्यानं वैतागून उत्तर दिलं.

“पण तुला बारावीला पण इतकेच मार्क पडले तर तू मेडीकल इंजीनीअरिंग करशीलना.. ते जास्त...” मी माझं लॉजिक पुढं चालवलं. रीझल्ट लागून दोन दिवस झाले होते. घरात आणि इतर नातेवाईकांमध्ये मला सत्त्याहत्तर टक्के मिळालेत याचं खूप कौतुक सुरू होतं. आईनं तेव्हापासून पंचपक्वान्नांचा धडाका लावला होता. बाबानं तर त्याच्या दुकानात पेढ्यांचा रतीब लावला होता. येईल त्या गिर्‍हाईकाला पाव किलो पेढ्याचा खोका. लेक पास झाली, तेपण चांगल्या मार्कांनी. इतके मार्क पडतील असं कुणालाही वाटलं नव्हतं- मलाही.  पण याचं अर्ध्याहून जास्त श्रेय खरंतर आफताबचं होतं. माझ्या मार्कांवरून इतकी दिवाळी चालू अस्ताना आफताबचे मात्र नुसते हाल चालू होते. 

रीझल्ट लागला त्या दिवशी चाचींना बरं नव्हतं म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. चाचींची तब्बेत कायमच खराब असायची. महिन्यातून एकदा तरी ऍडमिट करावं लागायचं. अशावेळी सगळं घर एकटा आफताब सांभाळायचा. रीझल्ट घेऊन आफताब एकटाच घरी आला. तेव्हा तोंडभरून त्याचं कौतुक करायलाही घरी कुणी नव्हतं. आईनंच त्याला खीर केली म्हणून जेवायला बोलावलं. त्याचा अगदी थोडक्यासाठी बोर्ड चुकला होता म्हणून नाराजी होतीच. अझरभाईचा दुपारी फोन येऊन गेला एवढ्यापुरता आफताब हसला. पण दिवसभर इवलालं तोंड करून बसला होता.
अरिफ असता तर एव्हाना आफताबला घेऊन घरभर नाचला असता... अरिफ असता तर...

रीझल्ट लागल्यावर बाबानं माझी ऍडमिशन लगेच दुसर्‍या दिवशी करवून टाकली. इतके मार्क म्हटल्यावर प्रशनच नव्हता,  सायन्स. पण आफताबनं कॉमर्सचा फॉर्म भरला.

“मेडीकल इंजीनीअरिंग शिकण्याइतके पैसे नाहीयेत. अझरभाईंचं कॉंट्रॅक्ट पुढच्यावर्षी संपेल. इतकी पाच वर्षं त्यानं काम केलंय ते आम्हाला पोसायलाच. अजून किती घेणार त्याच्याकडून. सी ए वगैरे करायला बरंय”

“पण परीक्षा फार कठीण असते ना?”

“हो. अभ्यास खूप असतो. पण तो काय प्रॉब्लेम नाही” आयुष्यात आफताबला एकाच गोष्टीचा कधीही काहीही प्रॉब्लेम नव्हता. अभ्यास करणे.

इथून माझ्या आणि त्याच्या वाटा वेगळ्या व्हायला सुरूवात झाली. कितीही वेगळ्या वाटा झाल्या तरी आम्ही एकमेकांना या ना त्या नात्यामध्ये भेटत राहिलोच.

... अकरावीचं कॉलेज चालू झालं. आफताबची मॉर्निंग शिफ्ट आणि माझं कॉलेज दहाचं. पहिल्या दिवसापासूनच वेगवेगळ्या टायमिंगमुळे आमची भेट होणं मुश्किल. इतके दिवस माझ्या अभ्यासाच्या शंकांमुळे तरी आम्ही एकत्र बोलायचो. आता तर तेही नाही. केवळ भाषेचे विषय कॉमन. मार्क चांगले पडतात म्हणून त्यानं संस्कृत ठेवलं होतं. हिंदी किंवा मराठी मध्ये उत्तरं फार लिहावी लागतात म्हणून माझं संस्कृत.

दरम्यान घरी आई-बाबांशी माझं आधीइतकं नसलं तरी थोडंफार भांडण चालूच होतं. बाबाशी तर जास्त बोलायचेच नाही. गरज असेल तितकंच. एक गोष्ट मात्र जाणवली होती. बाबा हल्ली रात्रीचा बाहेर जायचा नाही. घरीच असायचा. मी नाराज आहे हे त्याला बहुतेक समजलं होतं. आईशीसुद्धा आधीपेक्षा जास्त गप्पा वगैरे मारत असलेला दिसायचा. रात्री तर आईऐवजी कित्येकदा तोच स्वयंपाक बनवायचा. पहिल्यांदा आफताबनं त्याला पोळ्या लाटताना पाहिलं तेव्हा मज्जाच वाटली होती.

“अरे,  काय सांगू राजा!” बाबानं त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सुरूवात केली. “माझ्या आईला आम्ही दोनच मुलगे. तेव्हा ती बाजूला बसायची पद्धत होती. आता कुणी पाळत नाही... पण पूर्वी फार असायचं.” मी आणि आई कपाळावर हात मारून एकमेकांकडं पाहिलं. ही काय बोलायची गोष्ट असते का...पण बाबाचं काय... “मग स्वयंपाक करणार कोण? तर मी आणि यमराज.” यमराज हे काय माझ्या काकाचं नाव नाही. बाबा त्याला यमराज म्हणतो. तो मुंबईमध्ये डॉक्टर आहे म्हणून. “मग काय! शिकलो दोघं सगळा स्वयंपाक करायला”

“अझरभाई पण करतोच. पण पोळ्या वगैरे त्यानंही कधी केल्या नाहीत” आफताब तव्यावर टम्म फुगलेली पोळी पाहून पुरेशा आदरानं म्हणाला.

“तुझे बाबा ग्रेट आहेत” तो माझ्याकडे वळून म्हणाला. माझ्या बापाच्या ग्रेटपणाचे किस्से तुला काय सांगू!
तर असा हा बाबा.

परीक्षा झाल्यावर आई आणि मी काकाकडे मुंबईला गेलो होतो. खास शॉपिंगसाठी. नवनवीन फॅशनचे कपडे, बॅग शूज काय वाट्टेल ते. तिथंच आज्जीचं फार चालू होतं म्हणून माझं ते साडीचोळीचं छोटंसं फंक्शन करून टाकलं. काका काकी आणि साहिल-सागर हे दोन चुलत भाऊ सोडल्यास ओळखीचं कुणीच नव्हतं. त्यामुळे मला जरा तरी बरं वाटलं. घरी मांडव वगैरे घालण्यापेक्षा हे बरंय. त्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे  आज्जीनं मला सोन्याचा नेकलेस गिफ़्ट दिला. “पीरीयडस येण्याचे फायदे” मध्ये हे नमूद करून ठेवायला हवंय.

कॉलेज चालू झाल्यावर आमचा दहावीचा ग्रूप पुन्हा एकाच वर्गात आला होता. आता धमाल होतीपण. अकरावीच्या वर्गामध्ये मी जॉयस, वेदा, पूर्वी शिवाय दुसर्‍या शाळेंमधून आलेली निधी, रझिया आणि यशस्वी असा आमचा मॊठा ग्रूप झाला होता. कॉलेजमध्ये आम्हाला रेनबो म्हणून ओळखायचे.  अकरावी अर्धी होण्याआधीच आमची मैत्री खूप घट्ट झाली होती.

कॉलेजला सकाळी निघायच्या अधी आम्ही एकमेकींना फोन करून तू कुठल्या रंगाचा ड्रेस घातलास याची सखोल चौकशी करायचो. अकरावी बारावीच्या दोन वर्षात एकदाही आम्ही सातजणींपैकी कुणीही सेम रंगाचे ड्रेस घातले नाहीत. माझा तर काही प्रश्नच नव्हता. आमचंच कपड्यांचं दुकान होतं. मी म्हणेल तो फॅशनचा ड्रेस बाबा माझ्यासाठी आणि माझ्य मैत्रीणींसाठी मागवून द्यायला. गावामध्ये कुणाहीकडे कहोनाप्यार है स्टाईल ड्रेसेस आले नव्हते तेव्हा आम्ही तसले ड्रेस वापरायचो.

अकरावीत आल्यावर आयुष्यातल्या बर्‍याच गोष्टी पहिल्यांदा केल्या. लेक्चर बंक करून पिक्चर पाह्यला. इतके दिवस स्कूल युनिफॉर्ममध्ये स्कूटी चालवताना दिसली की नवीन पोलिस हमखास पकडायचा, मग बाबाला फोन करून बोलावून घ्या वगैरे भानगडी. पण आता स्कूल युनिफॉर्म नसल्यानं कुणीही अडवायची भिती नव्हती.  आधी युनिफॉर्ममध्ये फिरत असल्यानं शाळा ते घर सोडल्यास इतर कुठं फिरता यायचं नाही. पण आता तेही बंधन नव्हतं. मज्जा!!

अर्थात कितीही स्वातंत्र्य म्हटलं तरी त्याला फारसा काही अर्थ नव्हता कारण आम्ही लेक्चर बंक करून पिक्चरला गेलो हे बाबाला समजणारच. गावच तसलं छोटंसं होतं. पण तरी या गावात लपून छपून चालणार्या बर्‍याच गोष्टी होत्या. आम्ही रेनबो ग्रूपमध्ये एकमेकांपासून काहीही लपवायचं नाही अशी फ्रेंडशिपडेच्या दिवशी शपथ घेतली होती... ती शपथ फार दिवस काही टिकली नाही.
आफताब म्हणायला आमच्याच कॉलेजमध्ये होता, पण मला क्वचित दिसायचा. दिसला तरी जास्त करून लायब्ररीमध्ये. लायब्ररीमध्ये तसंही माझं फारसं काम नसायचंच. घरी रविवारी वगैरे असला तर अधूनमधून बोलायचा. चाचींची तब्बेत दिवसेंदिवस खराब झाली होती. दोनदा मुंबईला नेऊन आणलं एकदा पुण्याला नेऊन ऍंजीओग्राफी केली. बायपास सर्जरी करायचं डॉक्टर म्हणत होते. त्यासाठी पैशाची जमवाजमव चालू होती. नाही म्हटलं तरी घरामधल्या आजारपणाला तो कंटाळलाच होता. चाचींना फारसं काम झेपायचं नाही. सकाळी लवकर उठून केर काढणं वगैरे कामं आफताब करायचा. कविताला – कामवालीला सगळ्याच कामाला ठेवण्यासारखं परवडलं नसतं.

गेले काही दिवस माझं आणि अझरचं चॅटींग पण जरा कमीच झालं होतं. त्याला बर्‍याचदा वेळ नसायचा. क्वचित ऑनलाईन दिसायला आणि दुसरं त्याहून जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्याकडे आता बोलायला फारसे विषयच नव्हते. जुन्या गाण्यांवर वगैरे बोलायचो, पण आता मलाच त्यात जास्त रस नव्हता. म्हणजे गाणी ऐकायचे, पण त्यावर त्याच्यासोबत बोलावंसं वाटायचं नाही. 
एकदा कॉलेज कॅण्टीनमध्ये मी आणि आफताब समोर आलो तर तो माझ्याकडे पाहून सहज हसला आणि हॅलो म्हणाला.. मी पण हसले. बघायला गेलं तर किती क्षुल्लक बाब. पण यशस्वी आणि रझियानं दिवसभर माझा नुसता पिट्टा पाडला. “आमच्या शेजारी राहतो, आम्ही मित्र आहोत” हे हज्जारदा सांगून झालं तरी त्यांना पटेनाच. पूर्वी आणि वेदापण त्यांचं बघून चिडवायला लागल्या. निधीतर सारखी “एक लडका और एक लडकी कभी दोस्त हो नही सकते” हे वाक्य तर्‍हेतर्‍हेच्या आवाजामध्ये मला ऐकवून दाखवत होती.  त्यानंतर आफताब चुकूनजरी कॉलेजमध्ये दिसला की मी तोंड फिरवायला लागले. हे त्याच्या बहुतेक लक्षात आलं असणार कारण, मी एकदोनदा त्याच्या घरी गेले तेव्हा मी आलेलं पाहून तो सरळ उठून स्वत:च्या खोलीत निघून गेला.

अकरावीची परीक्षा जवळ आली होती, आमचा अभ्यास यथातथाच चालू होता. आई कसल्याशा फंक्शनसाठी बाहेर गेली होती. मी घरात एकटीच टीव्ही बघत बसले होते. दुपारचे तीन साडेतीन वाजले असावेत. गेटचा आवाज झाला म्हनून पाहिलं तर बाबा घरी आला होता.

“इतक्या लवकर?”

“बाजारांत राडा झालाय, निवडणुका जवळ आल्यात ते कुणाचीतरी कुणासोबततरी मारामारी झाली. म्हणून दुकानं बंद केली. गौरी कुठाय?”
“आठलेकरांकडे गेलीये. उशीरा येईल.” मी टीव्हीचं चॅनल बदलत उत्तर दिलं.
बाबा त्याच्या खोलीमध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊन आला. “निल्या, चहा घेतोस?” त्यानं किचनमधून हाक मारून मला विचारलं.
“आईनं करून ठेवलाय. तुला हवा असेल तर गरम करून घे”
“छी! करून ठेवलेला चहा बेक्कार लागतो. मीच गरम चहा बनवतो. तुझ्यासाठी पण.” मी काहीच उत्तर दिलं नाही. खरंतर आई घरी नाही, म्हटल्यावर मी निवांत टीव्ही बघणार होते, नंतर जमलंच तर तासभर गेम्स खेळता आले असते. आत्ताच या बाबाला घरी यायची गरज होती... आणि आलाच होता तर इकडे कशाला आला? जायचं होतं त्या बयेकडे. ती “ठेवलेली” बाई होती ना... मग तिच्याकडे अचानक जाऊन तिच्या ठरलेल्या प्रोग्रामची वाट लावायची.  पुन्हा एकदा मनाचा संताप झाला. हातातला रिमोटे मी अचानक फेकून दिला.
त्या आवाजानं बाबा किचनमधून बाहेर आला.
“काय झालं रे?”
“तुला मुलगा हवा होता!” मी ओरडले. अचानक. काहीच न ठरवता. “पण मी झाले. मुलगी. म्हणून तू मला मुलग्यासारखी हाक मारतोस. मी तुला नको हवी होते. मी तुझ्या घरात जन्मून चूक केली. होय ना?” मी बडबडत सुटले. बाबा किचनच्या दारामधून समोर माझ्याकडे आला, आणि त्यानं फाडकन माझ्या मुस्काटात मारली.

 “काय बोलतोस तुला समजतं तरी का?” तो माझ्यावर जोरात ओरडला. इतक्या दिवसांत पहिल्यांदा बाबानं मला मारलं होतं. इतक्या जोरात की मी जागच्या जागी भेलकांडले होते. खाली पडतच होते तेव्हा बाबानंच धरलं. “काय झालंय स्वप्नील? मला सांग.” त्याचा आवाज थोडा कमी झाला होता.

मी काही न बोलता डोळ्यांतलं पाणी पुसलं आणि माझ्या खोलीमध्ये येऊन दार लावून रडत बसले. बाबाचा तर खूपच राग आला होता, तितकाच राग आईचापण आला होता. मला एकटीला  सोडून गेली म्हणून- खरंतर ती चल म्हणत होती पण मलाच कंटाळा आला होता. त्यात हा बाबा घरी लवकर आला.
“दार उघड!” बाबाचा आवाज बाहेरून ऐकू आला.
“नाही” मी हुंदके देतच उत्तर दिलं.
“निल्या, दोन मिनिटांत दार उघड नाहीतर मी दार मोडून टाकेन. उघड” मघाशी त्याहून जास्त आता त्याचा आवाज संतापलेला होता. बाबाचा असला आवाज मी आजवर कधीच ऐकला नाही. त्याची भितीच वाटायला लागली. मी उठून दरवाजा उघडला.
बाबा आत आला. माझ्या गालावर त्याची बोटं उठली होती. गाल सुजलेपण असणार. रडून रडून डोळे तर हमखास सुजले होते. माझ्या गालावर त्यानं कसलंसं क्रीम लावलं. बोलला मात्र काहीच नाही. मी अजून रडतच होते.
“गौरीला फोन केलाय. ती अर्ध्या तासात येईल” तो खोलीबाहेर पडताना मला म्हणाला. मी अजूनच जोरात रडायला लागले. आई घरी येणार म्हणून नाही, असंच जोरात रडू आलं म्हणून.
माझं रडणं बघून बाबा दोन क्षण थांबला. “स्वप्नील, वर माझ्याकडे बघ” तो म्हणाला. मी मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. “आजवर कधीही मी मला मुलगा हवा असं म्हटलेलं नाही. माझ्या बायकोला मूल व्हायलाच हवं असं मला कधीही वाटलं नाही. तुझ्या जन्माआधी काय काय घडलंय हे तुला माहित नाही. पण मला त्यावेळी तू नसतीस झाली तरी चाललं असतं. तू झालीस. बरं वाटलं. तू गौरीला आणि मला कायम एकत्र बांधून ठेवलंस. तू झाली नसतीस तर...”
“तू आईला सोडलं असतंस. दुसरं लग्न केलं असतंस... होय ना? मी झाल्यावर पण मग तू तेच केलंस ना... आईला सोडून दुसरी बाई...” मी मुसमुसत उत्तर दिलं.

बाबा एकदम गप्प बसला. दोन मिनिटांनी तो म्हणाला.. “ओह, ती गोष्ट समजली आहे. म्हणून तुझी ही अशी चिडचिड चालू आहे? म्हणून माझ्याशी बोलत नाहीस...”
“मला मागच्याच वर्षी समजलं होतं. तू असं का केलंस?”
बाबा माझ्या डोक्यावर हात फिरवून बाजूला बसला. “मी गौरीला आधीही म्हटलं होतं, स्वप्नीलला सगळं सांगून टाक. पण तिचं आपलं एकच टुमणं. ती लहान आहे रे...”
“मी इतकी पण लहान नाहीये”
“ते दिसतंच आहे. निल्या, परत एकदा सांगतो. विश्वास ठेव. मी तुला मुलग्यासारखी हाक मारतो ती गंमत म्हणून. गौरीनं तुझं नाव स्वप्नील ठेवलं म्हणून सुरूवातीला मजा म्हणून मी तुला निल्या म्हणायला लागलो. नंतर तीच सवय पडली. तू चार पाच वर्षाचा झालास तेव्हा तुला कधी मी स्वप्नील म्हटलं तर तू रूसायचीस. “मी निला अये” असं म्हणून भांडायची. आठवतं का तुला? बास. त्यामध्ये तुझा मुलगी असण्याचा अथवा मुलगा नसण्याचा काहीच प्रश्न नव्हता आणि आजही नाही.”
“पण मग तू... तुझं आईवर प्रेम नाही का?” सतरा वर्षाच्या माझ्या मेंदूमध्ये त्यावेळी नात्यांचे अनेक पदर अथवा वेगळी रूपं समजून घेण्याची कुवत नव्हतीच. बाबानं दुसरीकडे भानगड केली म्हणजेच दुसरीकडे कुठंतरी प्रेमच केलं आणि आता त्याचं माझ्या आईवर प्रेम नाही असं काहीतरी एक लीनीअर गणित डोक्यामध्ये तेव्हा फिट्टं बसलं होतं.
“मी हे असं का केलं ते मला तुला सांगता येणार नाही... कदाचित गौरी नीट समजावेल. पण मी आयुष्यात फक्त दोन मुलींवर प्रेम केलंय. तुझ्या आईवर. आणि दुसरी तू...बाकीच्या इतर गोष्टी म्हणजे लफडी किम्वा भानगडी, तितकंच त्यांचं महत्त्व!”
मी अजून रडतच होते. बाबानं माझे डोळे पुसले. “तोंड धू. गौरी घरी येईल. तुला असं रडताना बघून मला फाशीवर चढवेल. मग मी तिला सांगितलं की मी तुला मारलंय तर फासावरून काढून मला परत फाशीवर चढवेल. आज माझी काही धडगत नाही गं बायो. खूप संतापलो म्हणून हात उचलला, सॉरी”
पण बाबानं मला केवळ सॉरी म्हणून काही उपयोग झाला नाही. खरंच दहा मिनिटांत आई घरी आली. काय झालं ते सगळं बाबानंच सांगितलं. त्यानंतर जे काय घडलं ते मी आजवर विसरणार नाही.
आई हॉलमधल्या सोफ्यावर बसून बाबाचं बोलणं ऐकत होती. त्याचं बोलून झाल्यावर आईनं त्याच्याकडे असल्या रागानं बघितलं. ते देवीच्या वगैरे नजरेमध्ये आग दाखवतात ना.. तसली आईची नजर दिसत होती. “मी रागावलो, मी मारायला नको हवं होतं” असं काहीतरी बाबा म्हणत होता. “यतीन, परत हे घडता कामा नये.” एकच वाक्य पण कसल्या सॉलिड ताकदीनं.
मघाशी आयुष्यात पहिल्यांदा बाबाचा इतका संतापलेला आवाज ऐकला होता. आता आईचा इतका निर्धारी आवाज ऐकला. बाबा शांतपणे तिचं बोलणं ऐकून घेत होता. चुकूनही एकदासुद्धा तो तिला काही म्हणाला नाही... आईनं उठून मलाच जवळ घेतलं. पण बोलली काहीच नाही. नंतर किचनमध्ये जाऊन ती कामाला लागली. बाबा त्याच्या खोलीत गेला, मी कंप्युटरवर गेम खेळत बसले. नंतर दिवसभर आई आणि बाबा एकमेकांशी एक शब्द बोलले नव्हते. आई माझ्याशीपण फक्त कामाचं तेवढंच बोलत होती. मी पण फार खोलीबाहेर गेलेच नाही.
मी नववीत असताना बाबानं माझ्यासाठी कंप्युटर घेतला. खरंतर कंप्युटरचा मला फारसा काही उपयोग नव्हता, पण बाबाची हौस होती!
बाबाची हौस. माझ्यासाठी. आणि आज मी त्याच बाबाला वाट्टेल तसे बोलले होते. बाबा वाईट नव्हता. माझे तर खूप लाड करायचा. तरीपण गावाच्या दुसर्‍या टोकाला राहणारी ती काळीसावळी संध्या नावाची बाई काय माझ्या नजरेसमोरून जाईना. आणी ते जेव्हा जेव्हा नजरेसमोर आली की माझा केवळ संताप संताप होत होता. केवळ संताप संताप.

(क्रमश:) 
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा:


रहे ना रहे हम (भाग ६)