Tuesday, 29 October 2019

तळ्यात मळ्यात!


ही कथा माहेर मासिकाच्या फेब्रूवारी २०११ अंकात प्रसिद्ध झाली होती. इथे पुनर्प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल माहेर मासिकाचे आभार.
=================================================
रात्रीचे नऊ वाजले असावेत. खरंतर मला भूक लागली होती पण माझ्या टीममेट्सचे ड्रिंक राऊंड्स अजून काही संपले नव्हते. हॉटेलमधल्या त्या मंद प्रकाशात मला का कुणास ठाऊक अजूनच उदास वाटत होत.. तसं उदास व्हायचं काहीच कारण नव्हतं. पण तरीही..
"रिया, चल ना." मी पुन्हा एकदा रियाला आवाज दिला. कुणाशी तरी फोनवर बोलण्यात ती गुंग झाली होती. हातानेच खूण करून तिने मला "दोन मिनिटे" असे सांगितले.
मी परत निवांत बसून राहिले. पुन्हा एकदा काहीतरी आठवल्यासारखं झालं. सतत आपण काहीतरी आठवतोय, काहीतरी स्मृतीमधून वर यायचा प्रयत्न करतेय पण काय ते नक्की आठवत नव्हतं.
रियाचं फोनवर बोलणं अजून चालूच होतं. घड्याळात साडेनऊ वाजले होते. मी पण माझा मोबाईल चेक केला. मला कुणाचाच फोन किंवा मेसेज आलेला नव्हता. पण सतत मला कोणतरी काहीतरी सांगणार आहे असं वाटत होतं.
तेवढ्यात आशिष कसल्यातरी स्टार्टरची प्लेट घेऊन आला. "किती वेळ चालणार रे तुमचं? म्हणून मला तुमच्या टीमसोबत यायला आवडत नाही. माझ्या रूममेट्स बरोबर अ‍ॅट लिस्ट मूव्ही बघायला तरी गेले असते" मी चीडून म्हणाले.
त्याने तोंडभरून काहीतरी खाल्ल्याने तो काय बोलला ते मला समजलं नाही पण बहुतेक "डीनर आपटलं की आपण पण मूव्हीलाच जाऊया" असं म्हणाला असावा. आता जेवायला अकरा वाजल्यावर याला थेटर झाडायला तरी कुणी आत घेइल का? पण नाही, बोलायचं म्हणून काहीतरी बोलायचं.
मी पुन्हा रियाला हाक् मारली. तिने फोन बंद केला. मी म्हटलं "चल जेवू या.. वाटल्यास नंतर टाईमपास करू"
ती माझ्याकडे जरा निरखून बघत होती.
"तू आज जरा वेगळी दिसतेयस."
"म्हणजे कशी?" गेले आठ तास ही माझ्याचबरोबर ऑफिसमधे होती मग आता तिला मी वेगळी कशी आणि काय दिसतेय?
"तू केसाना ऑइल लावलं आहेस का?"
मी सहज केसातून हात फिरवला, सकाळी तर चांगले शांपू कंडिशन वापरले होते. मग आता कसे तेलकट झाले? मग अचानक आठवलं, आज घरातला शांपू संपला म्हणून नुसतेच धुतले ना केस.. पण मग सकाळी इतके कोरडे कसे वाटत होते केस? आणि केसाना शांपूचा वास कसा काय येतोय??? तशी मी अत्यंत टापटीपीची व्यक्ती आहे. मला ग्लॅमरस रहायला भयंकर आवडतं. आत्ताच मी ऑफिसपार्टीला सुद्धा चांगला डीझायनर ड्रेस, गुचीची बॅग, कॅटवॉकचे शूज आणि शनेल कोकोचे परफ्युम लावून आलेय. मेकपमधे तर मी इंडियन ब्रँड वापरतच नाही. शांपूसुद्धा नाही.. मग आता रिया असं का विचारतेय?
काहीतरी आठवतय... पण नक्की काय ते समजत नाही. मी रियाला काहीच उत्तर दिलं नाही. तिने पण विषय सोडून दिला.
आम्ही दोघीजणी डायनिंग एरियामधे आलो. ऑफिसमधले तुरळक लोक इथे दिसत होते. बाकीचे सर्व अजून बारमधेच. आम्ही प्लेट्स घेऊन बुफे वाढून घ्यायला सुरूवात केली.
"रिया, तुला काय वाटतय?" मी सकाळपासून रियाला विचारेन विचारेन म्हणत असतानाच प्रश्न आता विचारला. ऑफिसच्या अ‍ॅन्युअल मीटिंगमधे प्रमोशन लेटर्स मिळणार होती. रिया एच आरमधे असल्याने तिला काहीतरी माहित असेलच की. असं विचारणं योग्य नाही हे पटत होतं. पण तरी मला धीर धरवत नव्हता.
तितक्यात आम्ही ज्या टेबलवर बसलो होतो, तिथे वेटर सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन आला.
"खरं सांगू.. मला नक्की माहित नाही. पण तुझे रेटिंग चांगले होते. आता बॉस लोकानी काही झोल घातला असेल तर डोंट नो. पण तू डिझर्विंग आहेस हे नक्की" ते काय मलाही माहित होतंच की. ऑफिसमधे अठरा वीस तास बघून काम करायचे. गेल्या पाच सहा वर्षात माझ्या नावाचा मी ऑफिसमधे दबदबाच तयार केला होता. मी नक्की काय काम करायचे हे मी अजून ठरवलं नव्हतं पण काहीतरी महत्त्वाचं काम असणार हे नक्की. इतक्यात माझ्या ग्लासमधे कोल्ड्रिक ओतताना वेटरने माझ्याकडे एक तुच्छ् कटाक्ष टाकला.
"डिझर्विंग आणि ही? घरातलं एक काम धड करता येत नाही. दोन वर्षात कधी मला पूर्ण स्वैपाक करून वाढता आला नाही आणि म्हणे प्रमोशन हवं. आधी घर सांभाळायला शिका." आणि तो निघून गेला.
माझ्या हातातला घास तसाच राहिला. रियाचं आमच्या दोघांकडे लक्षच नव्हतं. मला क्षण दोन क्षण काहीच समजलं नाही. तितक्यात डोक्यात वीज चमकली. हा वेटर माझा नवराच होता!! पण तो तर वेटरचं काम करत नाही. तसं तो कुठलंच काम धड करत नाही. बायकोला मारहाण करणे सोडून.
"रिया, मला आता आठवलं. मी इथे मस्तपैकी जेवत बसलीये, पण बाळाला काहीच भरवलं नाही. झोपलं असेल गं ते. आता उठल्यावर मला शोधत बसेल. माझा नवरा पण नाहिये घरात."
रियाचा चेहरा अचानक भूत बघत असल्यासारखा झाला. "बरी आहेस ना तू? अगं, तुझं लग्न कुठे झालय अजून?"
मीच थबकले. खरंच अजून माझं लग्न कुठे झालय? आणि बाळ?? काय बडबडत होते मी? तो वेटर काय तरी दुसरंच म्हणाला असेल. मी तर ऑफिसमधे काम करते. एखाद्या झुरळाला झटकावं तसा मी वेटरचा विचार मनातून काढून टाकला. हां.. आता आठवलं. काल ती कसलीतरी सीरीयल बघत झोपले होतेना. ते स्वप्नात दिसतय बहुतेक.
रिया अजूनच संशयाने माझ्याकडे बघत होती. "अगं, मला खूप भूक लागली ना की असं काहीतरी बडबडायची सवय आहे. पोटात भूक असली की माझा ब्रेन अजिबात काम करत नाही. ते सर्व जाऊ दे."
"नाही, असं कसं जाऊ दे? हे बघ, मला नक्की सांग. काय होतय तुला? तू बर्‍याचदा अशी बडबडतेस. तुला काही मानसिक त्रास वगैरे होतोय का?" रिया माझ्याकडे अगदी सहानुभूतीने बघत होती.
एकदा वाटलं, सरळ सांगून टाकावं हिला. किती दिवस लपवणार तिच्यापासून. आणि तिच्याचपासून का. प्रत्येकापासून किती लपवणार? सगळाच वैताग आहे.
पण काय सांगायचं? हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलाच. मला सतत असं वाटत राहतं की माझं लग्न झालय, मला एक सहा सात महिन्याचं बाळ आहे (मुलगा की मुलगी ते आत्ता या क्षणी आठवत नाहिये पण काहीतरी आहे हे नक्की), माझा नवरा मला खूप मारतो, असं मला वाटत असतं. पण हे सांगून तिचा विश्वास बसणार आहे का? काही झालं तरी ते एच आर मधे काम करते. उद्या माझं मानसिक संतुलन ठिक नाही म्हणून तिने रिपोर्ट पाठवला तर...
त्याबरोबर मी एक आवंढा गिळला. अजून एक दोन तीन दिवसात प्रमोशनचे लेटर मिळतील, तेवढ्यात रियाला असलं काहीतरी सांगणं म्हणजे स्वतःच्याच पायावर मोठ्ठा धोंडा पाडून घेणं. आणि ती तरी माझ्यावर का विश्वास ठेवेल? कोण तरी माझ्यावर विश्वास का ठेवेल?
"तसं काही नाही गं. खूप काम करते ना म्हणून थोडेसे टेन्शन आल्यासारखे वाटते., आय थिंक आय डीझर्व अ व्हेकेशन" मी विषय बदलत म्हटलं.
"मला खूप दिवसापासून तुला एक विचारायचं आहे. विचारू?" रिया हातातला पाण्याचा ग्लास खाली ठेवत ठेवत म्हणाली.
"विचार ना!"
"तुला रितेश कसा वाटतो?"
रियाच्या तोंडून हा प्रश्न ऐकताना माझ्याच हृदयाचा एक ठोका चुकला. रितेश म्हणजे... माझा डार्लिंग.. तो मला खूप आवडतो.. हे मी अजून कुणालाच सांगितलेले नव्हते. रितेश एच आर मधेच कामाला आहे. तिथे या रियाने पटवले की काय??? छे.. असे होणारच नाही. मी आयुष्यात आतापर्यंत कधीच हरलेली नाही. रियाने जर त्याला भुरळ घातलीच असेल तर त्या भुरळीचं झुरळ केल्याखेरीज मी गप्प राहणार नाही.
वरकरणी तोंडावर हसू आणत मी विचारले.
"का गं?"
"माहित नाही, पण त्यानेच मला तुला असं विचारायला सांगितलं."
ओह!! म्हणजे मला वाटलं तसं नव्हतं तर.... रितेश अजून माझाच होता. मी त्याला माझ्याशिवाय दुसर्‍या कुणाचा होऊच देणार नाही.
रिया माझ्याकडे बघून हसत होती. बहुतेक माझ्या मनातले भाव माझ्या चेहर्‍यावर उतरले...
"त्याला भेटायचय तुला... आता.. तो बघ तुझ्या पाठच्या टेबलवर बसलाय. बोलावू त्याला इकडे?"
मी पाठी वळून बघितलं. रितेश, माझ्या स्वप्नाचा राजा तिथेच बसला होता. आज त्याच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं. आपल्या मनात काय आहे ते त्याला बिनदिक्कत सांगायचं, मी माझ्याच मनाशी ठरवलं.
++++++++++++++++++++++++++++++++
दारावरची बेल टणाटण वाजत होती.
त्या आवाजाने बाळ रडायला लागलं. ती धडपडत उठली. घड्याळात पाहिलं तर साडेनऊ वाजून गेले होते. नवरा दरवाजा उघडल्या उघडल्याच ओरडायला लागला.
"आधी तिच्या नरड्यात काहीतरी घाल. घरी आलो नाही तर रडणं चालू"
तिने धावत बाळाला उचलून घेतले. "अहो, कितीदा सांगितलय तुम्हाला दरवाजा हळू वाजवा. इतका वेळ झोपली होती, आता तुम्ही आलात आणि उठली."
बाळाला मांडीवर घेत तिने बाळाला शांत करत होती तेव्हा. नवर्‍याने पिशवीतून दारूची बाटली काढली आणि त्याच्या नेहमीच्या जागी ठेवली, हे तिने पाहिलं.
"भाजी नाही आणली?" त्याच्या बाटलीकडे बघत रागानेच विचारले. उत्तर काय असेल ते तिलाही ठाऊकच होते.
"विसरलो." त्याने निर्ढावलेल्या आवाजात सांगितले.
"आता स्वैपाक काय करू?" आज सकाळी निघताना भाजीसोबतच शांपू आणि फिनाईलची बाटली सांगितली होती, नवरा आणणार नाही माहित असूनही. उद्या सकाळी समोरच्या दुकानदाराकडून पुन्हा एकदा एक रूपयाचे पाकिट आणून केस धुवून टाकावे लागतील. आज नुसत्याच पाण्याने केस धुतले तरी अजून तेलकट वाटतच होते.
हे रोजचंच झालय नवर्‍याचं. घरामधे महिन्याला किराणा आणायचा तोही लिमिटेड, त्यामधे जास्त किमतीची एकही वस्तू आणायची नाही. बाळाची औषधं जास्त आणायची नाहीत. भाजी जास्त आणायची नाही. जास्त स्वैपाक बनवायचा नाही. जास्त जगायचं नाही. जास्त मरायचं नाही. आहे तितकंच आणि तेवढंच रहायचं. या दीड खोल्यामधे रमलेला तिचा संसार. ती स्वतःशीच चरफडली. कुठले इंपोर्टेड शांपू आणि काय... तिच्या डोळ्यासमोर रितेशचा चेहरा तरळून गेला. स्वत:शीच ती खुदकन हसली.
"येडाचे झटके आलेत का तुला?" नवर्‍याने दरडावून विचारले. ती जरा जरी हसली तरी त्याला अजिब्बात सहन व्हायचे नाही.
"बाळाला खेळवतेय." ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली. जोजवून जोजवून बाळाला झोपवलं आणि मग ती उठून स्वैपाकाला लागली. नवरा उशीरा आला की स्वैपाकाला पण उशीर व्हायचाच. भाजीचा पत्ता नव्हताच, आजपण बटाटे चिरले आणि फोडणीत घातले, डाळ भाताचा कूकर लावला. कणिक भिजवत होती तेव्हाच बाळ परत जागं होऊन रडायला लागलं. स्वत:च्या फाटक्या गाऊनला हात पुसत ती बाहेर आली. बाळाने सगळ्या अंथरूणभर शी करून ठेवली होती.
"आहो, हाक तरी मारायची मला. किमान उचलून तरी घ्यायची तिला"
"च्यायची, तुझीच अवलाद आहे ती. घाण करून ठेवती. आधी ते सर्व साफ कर. वास मारतोय घरभर" नवर्‍याचे आतापर्यंत तीन चार पेग मारून झाले असावेत हे त्याच्या आवाजावरून तिला समजलं.
काही न बोलता तिने अंथरूण नेऊन मोरीमधे टाकले. पाण्यात भिजवले. बाळाला स्वच्छ पुसून घेतले.
"जरा लक्ष ठेवा, आता पालथं पडून पुढे सरकते ती" नवर्‍याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. ती आतल्या स्वैपाकघर नामक छोट्याशा खोलीत आली.
काय झालं असेल्?रितेशला पण ती आवडत असेल का? तिने आत्ताच बोलायला नको त्याच्याशी. जरा धीर धरायला हवा. किमान प्रमोशनचे लेटर मिळेपर्यंत तरी. तिने स्वतःशीच ठरवलं.
नवरा वचावचा करत पोट फुटेस्तोवर गिळला. उरलंसुरलं तिने खाऊन घेतलं. तेव्हा नवरा बहुतेक डाराडूर झोपला होता. मोरीमधे तिने बाळाचे अंथरूण स्वच्छ धुवून वाळत घातलं. तिचा गाऊन चप्प भिजून गेला होता. दोरीवरचा दुसरा गाऊन काढून तो अंगात घातला आणि आधीचा गाऊन पुन्हा धुवून वाळत घातला. सकाळी हा गाऊन सुकेपर्यंत तिला बिन अंघोळीचं रहावं लागणार होतं.
चुळबूळ करणार्‍या बाळाला तिने छातीशी घेतलं. पाच दहा मिनिटात बाळ झोपून गेलं. मग ती अंथरूणावर पडली तरी तिला झोप लागेना. किती तरीवेळ ती विचार करत पडली होती. काय मिळालं असेल तिला प्रमोशन? की नुसता पगार वाढला असेल? नुसता पगार वाढला तर काय उपयोग? सोबत्त हुद्दा पण वाढायला नको का? खरंतर नवरा यायच्या आत आपण रियाला काय ते विचारून घ्यायला हवं होतं. आज केला तसा टाईमपास रोज करून चालणार नाही.
कुशीवर वळून तिने डोळे मिटले. डोळ्यासमोर तो अंधारलेला बार, तिचे हसणारे खिदळणारे मित्र मैत्रीण, अत्यंत सुंदर असलेली ती असं सगळं तरळायला लागलं.जाहेरातीतल्या बायकासारखी ती पण रोज ऑफिसला जायची, पैसे कमवायची. हवे तसे पैसे उधळायची. तिच्या डोळ्यासमोर तिचे स्वतःचे विश्व पुन्हा चालू झाले.
बाळाच्या पलिकडे झोपलेला नवरा अजून जागाच होता. त्याने एक दोनदा तिला हाक मारली. पण तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाही तसा तो अंथरूणातून उठला. मोरीमधे नळ बारीक ठिबकत होता, तो बंद केला. तिने दिवा तसाच चालू ठेवला होता तो विझवला. रात्री बाळ उठलं तर दिसायला हवं म्हणून छोटा झेरो बल्ब चालू केला. बाळाच्या डोक्यावर हात ठेवला. मागे तीन महिन्यापूर्वी बाळाला उलटी जुलाबाचा त्रास झाला आनी तेव्हापासून ते बाळ सुकतच चालले होते. आता तर अगदी अशक्त आणि खुरटलेलं दिसायचं बाळ. किती तरीवेळा त्याने बायकोला दुसर्‍या डॉक्टरला दाखवू म्हटलं होतं. पण आताच्याच डॉक्टरचा हातगुण चांगला आहे असं तिचं मत होतं.
त्याने बायकोकडे एक नजर टाकली. दोन्ही पाय कुशीत घेऊन ती झोपली होती. चेहर्‍यावर दिवसभराचा शीण दिसत होता. अस्ताव्यस्त पसरलेले केस. चांगले कमरेच्याखाली लांब होते तिचे केस. काळेभोर एखाद्या नागबनासारखे दिसायचे ते केस.
तो अंथरूणावर बसला. हलकेच तिच्या केसांतून हात फिरवत. तिला उठवावं, आपल्या कुशीत घ्यावं असं खूप वाटून गेलं त्याला. अवघी वर्षं दीडवर्षापूर्वी केवड्याच्या पावलांनी ही त्याच्या आयुष्यात आली. त्याने इंजीनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. आणि इथे मुंबईमधे ही नोकरी मिळाली. पगार तसा जास्त नव्हता पण गावातल्या आईवडलाना तेव्हढा पगार म्हणजे कितीतरी वाटला होता. अजून तीन चार वर्षें नोकरी करून मग लग्न करायचा त्याचा विचार होता. पण आईला आता कधी एकदा लग्न करेन याचं अशी घाई लागली होती. त्याच्या॑ नकळत त्यानी बाजूच्याच गावातली मुलगी पसंत करून साखरपुडा पण केला.
मुलगी दिसायला छान आणि एकदम हुशार. कॉलेजच्या दुसर्‍या वर्गात शिकणारी. घरचं सगळं काम येणारी. आईबाबानी स्वतःच्या अनुभवाच्या फूटपट्ट्या लावून हीच मुलगी त्याच्यासाठी योग्यच आहे हे आपापसात ठरवून टाकलं. अर्थात तिच्यामधे खोट काढण्यासारखी काहीच गोष्ट नव्हती. पण त्याचं काय?
मुलगा इंजीनीअर. भरपूर पगार, मुंबईत खोली अशा गुणविशेषानी ती भुललीच नव्हती. तिला अजून शिकायचं होतं. नोकरी करायची होती, पैसे कमवायचे होते. तिची स्वतःची अशी काही स्वप्ने होती. या सर्व स्वप्नाचा बळी देत ती त्याच्या आयुष्यात आली. मात्र इथे आली तीच मुळात करपून गेल्यासारखी. लग्नाआधी हसण्यतून चांदणं सांडायची. त्याच्या घरात आल्यावर मात्र तिचं हसणं हरवतच गेलं. सुरूवातीला कित्येकदा ती त्याच्यावर चिडायची, तिच्या आयुष्याची वाट लागली असं म्हणायची. पण नंतर ती निर्जीव प्रेतासारखी वावरायची. सगळी कामं करायची, बाळाचं सर्व काही करायची पण ती इथे असून मात्र इथे नसल्यासारखी वागायची.
तिला रिझवण्यासाठी त्याने कितीतरी प्रयत्न केले. पण तिने कधीच दाद दिली नाही. त्याने आतापर्यंत चुकून एकदाही तिच्यावर हात उचलला नव्हता, पण ती कित्येकदा त्याला "मारहाण करता ते सहन करतेच ना" हे म्हणायची. खरंतर त्याला तिला शिकवायचं होतं, त्यासंबंधी चौकशी पण त्याने करून ठेवली होती. त्याच दरम्यान तिला दिवस गेले आणि सर्वच राहून गेलं. बाळ थोडं मोठं झालं की मग डिग्रीची फायनल दे असे त्याने तिला सांगितले होते. ती कुत्सितपणे हसून "आता काय उपयोग त्या डिग्रीचा?" असं म्हणायची. तिच्यातला विक्षिप्तपणा रोज वाढतोय असं त्याला वाटायचं. पण त्यावर उपाय काय ते समजत नव्हतं. तिला थोडे दिवस गावी सोडून यावं असं त्याने ठरवलं होतं. पण ती जायला बिल्कुल तयार नव्हती. कसंही करून तिला परत हसतं खेळतं करायचं हे त्याने ठरवलं.
विचाराची साखळी तोडत तो अंथरूणात आडवा पडला. उद्या काहीही करून हिच्यासाठी कायम म्हणत असते तसला त्या टीव्हीतला शांपू आणायचाच असा त्याने निश्चय केला. फक्त त्या शांपूचं नाव काय ते तिलाच विचारून घ्यायला पाहिजे.
तितक्यात बाळ उठलं. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून ती पण जागी झालीच. तसंच झोपेतच तिने बाळाचं दुपटं बदललं. बाळाला जोजवलं आणि हळूवारपणे झोपवलं.
नवरा उठून बसला होता. "पाणी देशील?" त्याने विचारलं.
ती उठून स्वयंपाकघरात गेली. पाण्याचा पेला आणून दिला. आणि ती आडवी पडली.
"ऐक ना," तो काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाला.
"ऊ?" तिने डोळे बंद ठेवूनच विचारलं.
"ऑफिसमधल्या त्या सावंतानी पुन्हा विचारलं आज मला. दुपारी चार ते सहा. त्याच्या दोन मुलं शिवाय आजूबाजूची चार पाच अशी मिळून येतील इकडे. सगळे पाचवी-सातवीचेच आहेत. जमेल का तुला?"
ती जागी होऊन बसली. नवरा गेले महिनाभर तिला या शिकवणीसाठी विचारत होता. तसं तिला शिकवण्या घेण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता. तशी ती शाळेत असताना हुशारच होती. दहावीला तर बोर्डात आलेली. बारावीला अवघ्या काही मार्कासाठी बोर्डातला नम्बर चुकला.
"नंतर सांगते." तिने कूस वळवून म्हटले.
शिकवण्या म्हणे. महिन्याला हजारोनी पगार घेणारी मी. काही शेकड्या रूपयासाठी दोन दोन तास घसा फोडत बसू? हे वाक्य तिच्या ओठांवर आलं होतं. पण तिने ते आवरलं. मागे एकदा असंच काहीतरी ती बोलली होती आणि नवरा कितीतरी वेळ तिला कायतरी बडबडत होता. तो काय बोलत होता याच्याकडे तिने लक्ष दिलंच नव्हतं. फक्त आपण नोकरी करतो ही गोष्ट त्याला आवडत नाही, तेव्हा त्याच्यासमोर याविषयी कधीच बोलायचे नाही, हे तिने मनोमन ठरवून टाकले होते.
नवरा झोपून गेला. तिची झोप मात्र उडाली ती उडालीच. कधीतरी त्याला समजेलच ना? कधीतरी त्याला कुणीतरी सांगेल. मग आपणच का सांगू नये अस विचार कितीतरी वेळ तिच्या मनात घर करून राहिला होता. मध्यरात्र टळून गेली तेव्हा कुठे तिचा डोळा लागला.
सकाळी साडेपाचचा अलार्म झाला तशी ती पुन्हा उठली. बाळ आणि नवरा उठायच्या आत तिने अंघोळ आटपली. भांडी घासून घेतली आणि नवर्‍याचा डबा बनवायला लागली. तोपर्यंत नवर्‍याने उठून स्वतःचं सगळं आवरलं होतं. तीन तीनदा तिला हाक मारून तो काहीतरी विचारत होता. पण तिने त्याकडे लक्ष दिलंच नाही. ऐकून न ऐकल्यासारखं केलं. हल्ली त्याचा आवाज ऐकला तरी तिला संताप यायचा. मनातल्या मनात शिव्याची लाखोली वाहत ती चटचट काम आवरायला लागली.
बाळ उठेपर्यंत तिचं दिवसाभराचं सगळं काम करून झालं होतं. बाळाची शू काढून कपडे बदलले. तिनं त्याला गरम पाण्याने पुसून घेतलं आणि थोडी खिमटी भरवली. सकाळी तिच्या नवरा बहुतेक चांगल्या मूडमधे असावा कारण त्याने स्वतःहून बाळाला उचलून घेतलं. तोपर्यंत तिने कचरा फरशी वगैरे करून घेतलं.
"सकाळच्या वेळेला कशाला इतके काम करतेस? जरा विश्रांती घे. दुपारी बाळ झोपलं की कर ना" नवर्‍याने तिला म्हटलं. तिला कधी एकदा नवरा घराबाहेर जातोय असं झालं होतं.
तिने कचरा पिशवीत भरला आणि पिशवी दरवाज्याबाहेर ठेवली. तोंडातून एक शब्द न काढता तिचं काम चालूच होतं. दहा वाजले तसा नवरा कामावर निघून गेला. जाताना त्याने तिला पुन्हा एकदा काहीतरी विचारलं किंवा सांगितलं. पण तिचं आता लक्षच नव्हतं.
लहानपणी तिला तळ्यात मळ्यात हा खेळ फार आवडायचा. एकदा इकडे एकदा तिकडे. कुठेही गेलं तरी तीच ती. आतापण हाच खेळ. फक्त एके ठिकाणी तिची मर्जी चालायची. एके ठिकाणी नाही. थोडे दिवस गेले तर दोन्ही ठिकाणी तिचीच मर्जी चालली असती.
दुपट्यावर खेळणार्‍या बाळाकडे तिने एकदा बघितलं. बाळाला डॉक्टरानी उलटीसाठी दिलेले ड्रॉप्स बाळाला उलटी होत नसताना दिले तर ते सलग सहा-सात तास झोपतं हे तिला फारच सोयीचं झालं होतं. नाहीतर आधी अधेमधे रडणारे बाळ सतत तिचा खेळ मोडायचं. आता तिला कुणाचीच आडकाठी नव्हती.
अर्थात थोड्या दिवसानी या औषधापेक्षा दुसरे काहीतरी करून बाळाचा अडथळा तिला दूर करावा लागणार होता. ते कसं करायचं याचाच विचार ती इतका वेळ करत होती. पण आता बास झाले ते विचार. बास झालं या घरासाठी मरणं. बास झाली या दीड खोलीतल्या संसाराची वणवण.
आज प्रमोशन लेटर घ्यायचेच, रितेश(हे नाव तिला फारसं आवडलं नव्हतं, बदलावं का?" असा विचार मनात येऊन गेलाच) कायमचा आपल्या आयुष्यात आणायचाच, हे तिनेच मनाशी ठरवलं.
आज पुन्हा एकदा कुणाची तरी बायको किंवा आई म्हणून न जगता "मी" म्हणून जगायचं होतं.
आता ती पुन्हा एकदा स्वतःच्या जगात जायला सिद्ध झाली होती.
(समाप्त)


Monday, 21 October 2019

ऐकण्याची गोष्ट!


आटपाट नगर होतं, तिथं एक मुलगी रहायची.. तिला गाणी ऐकायला खूप आवडायचं. तिचा आवाज एकदम बेसुरा. एक गाणं तिला कधी धड म्हणता यायचं नाही. तरीही ऐकायला मात्र प्रचंड आवडायचं. ही कहाणी तिच्याच ऐकण्याची.
माझं सांगितिक परिपोषण झालं ते फक्त आणि फक्त हिंदी चित्रपट संगीतावर. का कुणास ठाऊक, मराठी गाण्यांबरोबर भावनिक नाळ कधी जोडलीच गेली नाही. पण हिंदी चित्रपतगीते आणि तीही जुन्या काळामधली म्हणजे माझ्या भावविश्वाचा ठेवा वगैरे वगैरे. आपल्या हिंदी चित्रपट संगीताची गंमत अशी की, संगीताचा कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नसतो. शास्त्रीय संगीतापासून ते सुफीपासून ते क्लासिक रॉकपासून ते जॅझपासून ते युरोपियन लोकसंगीतापर्यंत सर्व काही आपलं चित्रपट संगीत आवर्जून सामावून घेतं, आपलंसं करतं.
म्हट्लं तर पार जुनी जुनी गोष्ट वाटेल, पण सुमारे दोन अडीच दशकांपूर्वी गाणी ऐकायचं एकमेव हक्काचं ठिकाण होतं रेडिओ. विविधभारतीनं अनेक गाणी ऐकवली, नंतर अर्थात केबलवर म्युझिक चॅनल्स आले. तेव्हा आलेले एमटीव्ही आणि व्ही आंग्लाळलेले होते. त्यांनी फिरंगी गाणी ऐकवली. काहीही समजली नाहीत तरी संगीताच्या ठेक्यानं बांधून घेतलं पण ते कधी आतपर्यंत भिडलंच नाही. ते वयही अर्थात “काय ऐकतोय” ते समजून घ्यायचंच नव्हतं. पुढं कॉलेजात गेलो तेव्हा आमच्या घरी इंटरनेट नावाची जादू आली होती. यामध्ये बरीच गाणी परत परत हव्या तेव्हा ऐकता येऊ लागली. संगीत “ऑन डीमांड” झालं. इतके दिवस रेडिओला “कहिये क्या सुनायेंगे आप” म्हणावं लागायचं, आणि तेच ऐकावं लागायचं. मग भले “तुझे जीवन को डोरसे” मध्ये पार रोमॅंटिक क्षितिजावर पोचलेलं मन पुढच्याच क्षणाला “हम थे जिनके सहारे” ऐकून धाडकन जमीनीवर आपटलं तरीही पर्याय नव्हता. आता युट्युब “हे ऐकता की ते ऐकता” करू लागलाय. नुसता रफी ऐकायचाय? नुसता मदनमोहन आणि साहिर ऐकायचाय... केवळ इन्स्ट्रुमेंटल ऐकायचंय... ऐका!!!
मोबाईल फोनमधल्या वेगवेगळ्या म्युझिक ऍप्सनी आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगनं तर संगीत कानोकानी पोचलंय. आधी केवळ हिंदी चित्रपटसंगीतावर वाढलेले कानसेनांना आता पूर्व युरोपामधल्या एका अत्यंत छोट्या देशामधल्या लोकसंगीताची धुन ऐकता येतेय. संगीताचं हे बाजारीकरण झालेलं अनेक धुरीणांना पसंद पडत नाही. संगीत ही गाभार्‍य़ामधून ठेवायची गोष्ट नाही, गल्ल्यांगल्ल्यांमधून रस्त्यांरस्त्यांमधून घराघरामधून निनादणारं तेच खरं संगीत. म्हणूनही असेल तर हिंदी चित्रपट संगीत अनेक दशकांनंतर, अनेक स्थित्यंतरानंतरही टिकून आहे ते याच कारणास्तव. पुलंनी त्यांच्या एका लेखामध्ये एकेकाळी गाणी ऐकण्यासाठी लोक किती कष्ट करायचे, कुठून कुठून यायचे वगैरे वर्णन केलं आहे. आता ती परिस्थिती राहीली नाही, हवं ते संगीत, हव्या त्यावेळी, हव्या त्या स्वरूपामध्ये ऐकता येऊ शकतं. अभिजात संगीत ही एकेकाळी ठराविक वर्गाची मक्तेदारी होती, आता ती गल्लीबोळामधल्या प्रत्येक मोबाईलवर जाऊन पोचली. साहजिकच, ऐकणारे वाढले आणि ऐकवणारेही वाढले.
काहीही आणि कितीही ऐकत नसताना एका संगीतप्रकाराकडे मात्र अजिबात वळले नव्हते. ते म्हणजे आपलं शास्त्रीय संगीत. एक तर ते आपल्याला काहीच कळत नाही याची प्रचंड खात्री होती, दुसरं ते कंटाळवाणं असेल असं वाटायचं. त्यामुळे कुणी कितीही गोडवे गायले, घरात शास्त्रीय संगीत ऐकणारे-गाणारे कितीहीजण असले तरी ये अपने बसकी बात नही असं सतत वाटायचं. पण प्रत्येक गैरसमजाची एक्स्पायरी डेट असते, तशी या गैरसमजाचीही झाली. मी तेव्हा मुंबईमध्ये रिपोर्टर म्हणून काम करत होते. मुंबई फेस्टिवल म्हणून एक भलामोठा इव्हेंट चालू होता. बरेच कार्यक्रम होते. नवीनच काम सुरू केल्यानं मला असले साधेसुधेच इव्हेंट्स आणि बातम्या करायला मिळायच्या. त्यातही मी बरीच चाप्टर असल्याने (मी, बॉस नव्हे!!) बर्‍याच बातम्या फोनवरून ईमेलवरून मिळवून काम भागायच्ं. एके दिवशी संध्याकाळी मात्र बॉसने कंपल्सरी एका इव्हेंटला जायचं म्हणून सांगितलं, हरिप्रसाद चौरासियांचं बासरीवादन ऍट बाणगंगा. संध्याकाळी आठचा इव्हेंट. संपेपर्यंत दहा वाजणार, मग येऊन बातमी करायची. बॉसला म्हटलं, जायला कशाला हवंय? फोनवर विचारते, कोणकोण आलं होतं, काय काय राग म्हटले.
बॉसनं भुवया उंचावल्या. “राग म्हटले?”
“हो, तेच काय क्लासिकलमध्ये असतं ते! व्यवस्थित विचारून घेते ना”
बॉसला माझी सांगितिक अक्कल ध्यानांत आली. “जा!” केवळ एकाच शब्दांत बोळवण झाली. जायचा मनापासून कंटाळा आलेला. त्यात परत हाकलल्यामुळे अजूनच चिडचिड. टॅक्सी पकडून इव्हेंटला गेले. रिपोर्टरसाठी आरक्षित ठिकाणी जाऊन बसले. कार्यक्रम ऑलरेडी चालू झालेला. मला हरिप्रसाद चौरासिया हे नाव फक्त ऐकून माहित. त्यातही ते बासरी वाजवतात, आणि चांदनीचं म्युझिक दिलेल्या शिव-हरिपैकी एक आहेत याहून अधिक माहिती नाही.
त्या दिवसांमधली माझी एकूणच मन:स्थिती बरीच चमत्कारिक होती. घर सोडून रहायचा फारसा अनुभव नाही. मराठी माध्यमांमधून शिकून इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जम बसवायचा प्रयत्न. घरी थोडेफार प्रॉब्लेम्स चालू. आपलं म्हणावं असं कुणीही नाही. टोटल एकाकीपणाचा असह्य अनुभव आणि त्यात करीअरमध्ये पुढं जाण्यासाठी चालू असलेली जीवघेणी स्पर्धा. कुठंतरी आपण या सर्वांमध्ये फिट नाही हे माहित होतं, पटत होतं, पण जमत मात्र नव्हतं. अशा वेळी बॉसनं मुद्दम अशा आडवाटेवरच्या इव्हेंटला आपल्याला विनाकारण पाठवलंय असं काहीतरी फिलिंग येऊन संताप संताप झाला होता.
पण आता आलोय तर किमान अर्धातास तरी बसणं भाग होतं. पंडीतजी काय वाजवतायत ते तिथं असलेल्या पीआरवाल्यांना विचारून घेतलं. रागांची नावं आणि तालांची नावं नुसती नोंदवली आणि ऐकत बसले. पंधरा मिनिटांत इथून सटकायचं हे मनात पक्कं. आपल्याला यातलं काहीही कळत नाही हे माहित होतं पण तेव्हा व्हॉट्सऍप आणि फेसबूक मोबाईलवर नसल्यानं लक्ष विचलित झालं नाही. एक तर बाणगंगेचा परिसर अतिशय जादुई. मुंबईमधून अचानक हजार वर्षं मागे जावं अशी ही जागा. ऐतिहासिक जागांमध्ये त्या जुन्यापुराण्या क्षणांचे काहीतरी काल-अवशेष टिकून असतात की काय कोण जाणे. पण या जागांचं स्वत:चं वेगळंच अस्तित्व असतं, त्या संध्याकाळी ते अस्तित्व अधिकच प्रसन्नरूपानं जाणवत होतं. अचानक हरिजी जे काय वाजवत होते ते पटकन समजलं... लताचं गाणं... बहुतेक.. तेरा मेरा प्यार अमर... मधली सुरावट. मला राग वगैरे तेव्हाच काय आजही समजत नाही... पण त्या गाण्यामधली सुरावट आणि त्या रागाचे स्वर दोन्ही एकदम मनाला स्पर्शून गेले. देखणा देव हसरी साधना डोळ्यांसमोर उभी राहिली. लता शैलेंद्रच्या शब्दामध्ये “फिर क्यु मुझको लगता है डर” म्हणत मनामध्ये येऊन राहिली. इतका वेळ सूर नुसते कानांवर पडत होते, आता कान स्वत:हून आसुसून ऐकू लागले. समजत नसलेल्या भाषेमध्ये ओळखीचा किमान एक जरी शब्द आला तरी ती भाषा आपलीशी वाटते... तसंच काहीसं झालं.
हरिजी आपल्याच तंद्रीमध्ये वाजवत होते, ऐकणारे तर ऐकतच होते. त्यात अजून एका बावीशीच्या मुलीची भर पडली. ऐकू लागले. काहीतरी अस्वस्थसं वाटत होतं. बासरीचे स्वरच मुळात आधी नाजूक. जखमेवर फुंकर मारावी तसे हळूहळू येणारे. चंद्र आकाशामध्ये उगवलेला. आजूबाजूला बाणगंगेचा तलाव... त्या तलावाच्या कडेने लावलेल्या पणत्या. त्या पणत्यांच्या स्निग्ध प्रकाशात उजाळलेला परिसर. तलावाच्या पाण्यावर वार्‍याच्या लहरीनं उठत रहावेत असे स्वरांचे तरंग. हळूहळू डोळ्यांसमोर आलेली एकएक प्रतिमा धुरकट होत गेली. उरले ते फक्त त्या सुरावटीचे काही तुकडे. ऐकताना डोळे कधी पाणावले ते समजलंही नाही.
आपण जे ऐकतोय, ते आपल्याला काहीही समजत नाही हे माहित होतंच. पण समजत नाही तरीही जे कानांवर येतंय ते थेट मनापर्यंत पोचतंय ही भावना त्याहूनही ओव्हरव्हेल्मिंग होती. कशाला करायचा अट्टहास. प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे मेंदूला. नाही समजलं तरीही मनाला भिडलं तरी चालत नाही का? तीन चार वर्षाचं टिल्लं आयुष्यात पहिल्यांदाच पावसांत भिजत असतंय, त्याला कुठे समजतं समुद्राच्या पाण्यानं वाफ होते, ते आकाशात जाते आणि तिथून ढग बनून पाऊस पडतोय, आणि त्या पावसांत आता आपण भिजतोय. त्यालाकाय करायचंय ते जलचक्र आणि मान्सून वगैरेंची माहिती. त्या बाळाला फक्त अंगावर पडणार्‍या त्या थंडगार पाण्याच्या थेंबाचं महत्त्व. त्याचं अस्तित्व त्या क्षणांपुरतंच. तसंच काहीसं या संगीताचंही असतं का? असेलही. असावंच. कारण, त्या क्षणानं मला तेही अस्तित्व दाखवून दिलं. तुला शास्त्रीय संगीत समजत नाही. हरकत नाही पण ते माझ्या मनापर्यंत भिडतंय का ते महत्त्वाचं... कायदेकानूननियमशिस्तीच्या पलिकडे जाऊन नेणीवेच्या पातळीवर जाऊन पोचतात ते खरे सूर... बाकी सब मोहमाया...
इव्हेंट करून ऑफिसमध्ये गेले, बॉसला बातमी करून दिली. निघताना त्याला फक्त “थॅंक्स” सांगितलं.
त्यानंतर तसं आयुष्यात फार काही बदललं नाही. इतर संघर्ष त्यांच्या गतीनं चालूच राहिले. बदललं काय तर... मी शास्त्रीय संगीत ऐकायला सुरूवात केली. अगदी ठरवून नाही, पण लिहिताना – काम करताना काहीतरी बॅकग्राऊंडला गाणी वाजवायची सवय होतीच, त्यात प्लेलिस्टमध्ये काही क्लासिकल वाद्यसंगीत घेतली. हिंदी चित्रपटसंगीत अजूनही अत्यंत आवडीचं आहे, त्यात फरक पडणार नाहीच. अजूनही शास्त्रीय संगीतामधलं फारसं काही कळत नाही. तरीही ते ऐकलं जातंय. नंतर पीआरमध्ये सुदैवानं अनेक शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम अटेंड करता आले. दरवेळी नवीन काहीतरी ऐकत गेले, नवीन काही तरी गवसत गेलं. समोर जे काही गायलं जातंय तो नक्की सूर कुठला ते अद्याप समजत नाही, राग ओळखायची बात तर दूरच (इतकं ऐकूनही!! काय ती सांगितिक बुद्धीमत्ता). तरीही मनाला आवडतंय या एकमेव कारणासाठी ऐकलं मात्र जातं.
ऐकायला लागल्यावर जाणवलं की अरे, आपण का ऐकत नाही? हे समजलं नाही तरी चालतंय हा समज संपुष्टात आल्यानंतर जे ऐकतोय ते आपल्याला कितपत भावतंय, ते लक्षात यायला लागलं. प्रवासामधला एक पाय पुढे पडला. ऐकलंच नाहीतर समजणार कसं!!!! मग हळूहळू शास्त्रीय संगीताबरोबरच बाऊल संगीताची गोडी लागली. ए आर रहमान आणि इलयराजाच्या स्पर्शानं तमिळ लोकसंगीत आवडायला लागलं. कोक स्टुडिओ पाकिस्ताननं तर संगीताचा नवीनच खजिना खुला केला आणि सीमेपल्याडचं लोकसंगीत हृदयात जाऊन बसलं. लयपश्चिमा हे आशुतोष जावडेकरांचं पुस्तक वाचताना कधीमधी ऐकत गेलेल्या गाण्यांनी तथाकथित धांगडधिंगावाली रॉक म्युझिकची आवड निर्माण झाली. पण या सर्व  संगीतामधला आदिम सूर म्हणजे आपल्या अभिजाततेचा वारसा मिरवणारं शास्त्रीय संगीत मात्र अजूनच लाडकं झालं.
म्हणून ऐकायलाच हवं. आवडतं ते तर आवर्जून ऐकलं जातंच. जे आवडत नाही तेही ऐकलं तर त्यातलं परत काय आवडतंय ते समजतं. जे समजत नाही म्हणून इतके दिवस ऐकलंच जात नव्हतं ते कधीतरी ऐकून बघा. माझा शास्त्रीय संगीत कंटाळवाणं असतं हा माझा समज जसा बाणगंगेच्या साक्षीनं आणि हरिजींच्या बासरीनं गेला, तसा तुमचाही गैरसमज असेल तर तोही जाईल. पण त्यासाठी वेळात वेळ काढून ऐकायला हवं. फार जास्त काही नाही... ऐकायला हवं!!!
साठा उत्तराची ही कहाणी प्रत्येक संगीतस्वराच्या साक्षीनं अशीच कायम चालत राहो.
-          नंदिनी देसाई

Wednesday, 9 October 2019

शून्य



(खूप दिवसांनी नवीन कथा अप्रकाशित कथा पोस्ट करते आहे. नवीन पोस्ट्सची माहिती तुम्हाला ताबडतोब मिळण्याकरिता कृपया ब्लॉग फॉलो करावा ही विनंती. तसेच, कथेबद्दल जे काही वाटेल तसा अभिप्रायदेखील अवश्य द्यावा!!! आपली एकेक कमेंट लेखिकेचा हुरूप वाढवते!!!) 



“आजची रात्र फार मुश्किल आहे..निघणार नाही.” तिच्या पाठीमागून आवाज आला. तिनं कपामधली कॉफी विनाकारण ढवळली. एकतर ती मशिनची घाणेरडी कॉफी. हॉस्पिटलच्या कॅंटीनमध्ये याहून वेगळं काय मिळणार? त्यात परत सर्वत्र हाच विषय चालू. मृत्यू. सर्वत्र! “पहाटेपर्यंत बघू, नाहीतर घरी घेऊन जाऊ. जायचाच जीव इथं काय आणि तिथं काय...” कुठल्यातरी पेशंटच्या मुलाने की नातवाने एका आयुष्याचा निर्णय घेतला होता.
तिनं उठून तो प्लास्टिकचा कप डस्टबिनमध्ये फेकला. एक एक पाऊल ओढत ती परत आयसीयुच्या दारात येऊन थांबली. आयसीयुच्या भल्यामोठ्या दारासमोर यावेळेला अजिबात गर्दी नव्हती. मघाशी चालू असलेला कलकलाट आता पूर्ण थांबला होता. रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. तिथंच ठेवलेल्या एका खुर्चीवर ती बसली. मोबाईल वाजायला लागला. नंबर पाहून तिनं कट केला, परत वाजायला लागला. नाईलाजाने तिनं कॉल घेतला.
“घरी ये. ताबडतोब” पलिकडे आईचा दरडावल्यासारखा आवाज.
“आई, मी हॉस्पीटलमध्ये आहे. येणं शक्य नाही” ती होईल तितक्या शांत आवाजात म्हणाली.
“काय गरज आहे गं तुला? लाजबिज विकून खाल्लीस का? त्या कार्ट्याला घेऊन सारखी हॉस्पिटलात जातेस. लागतो कोण तो तुझा?” हे अपेक्षितच होतं.
“आई, मी फोन ठेवतेय. आयसीयुच्या समोर आहे, जास्त बोलता येणार नाही”
“जास्त बोलायला तोंड शिल्लकच कुठं ठेवलंयस? दारूडा, गंजाडा कसला भणंग माणूस तो...त्याच्यासाठी तू पदरमोड खर्च करणार? यासाठी शिकवलं तुला? कुणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतेस? कशासाठी कमावतेस? तुला आई नको वडील नको. त्याच्या जीवावर उधळायला... कार्टे रांडे. लफडंच करायचं होतंस तर जरा चांगल्या घरातला पोरगा तर बघायचा, या असल्या भिकार्‍यासोबत तुझे धंदे...” आईचं बोलणं असह्य झाल्यासरशी तिनं फोन कट न करता तसाच पर्समध्ये ठेवून दिला. बोलत बसेनात का..
हातात असलेल्या पर्समधून पाण्याची बाटली काढून ती घटाघटा पाणी प्यायली. दुपारपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. कॉलेजातली लेक्चर्स संपवून ती घरी आली तेव्हा अमर बेशुद्ध पडलेला होता.  लगेच ऍंब्युलन्सला फोन करून त्याला इथे आणेपर्यंत तास गेला. आल्यापासून डॉक्टरांनी हे इंजेक्शन, त्या गॊळ्या म्हणत नाचवत ठेवलं होतंच. एरवी “नॉर्मल दिसतोय आज” म्हणणारे डॉक्टर मात्र यावेळी गंभीर वाटत होते. “पहाटेपर्यंत पाहू. कठीण आहे” आरती एकदा म्हणून गेली. नर्स असलेली आरती आता तिची मैत्रीणच झाली होती. अमरची हॉस्पीटलायझेशन्सच इतकी.
आयसीयुच्या दारामध्ये थांबण्यासारखं काहीच काम नव्हतं. डोळ्यांवर पेंग आली होती. आतल्या पेशंट्सना काय आणि डॉक्टर्सना काय दिवस-रात्र सारखेच. अमर अजून बेशुद्धीतच होता. त्याला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालू होते... “अमर, प्लीज! नको रे असं करत जाऊ” ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली.
अचानक तिला जाणवलं. इत्क्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या असताना कुणीतरी तिच्या अगदी बाजूला खेटून बसलंय. तिनं मान वळवून पाहिलं. तिशीचा असेल तर फारफारतर. पिंगट सरळ केस, दाढीची किंचित खुरटं वाढलेली. धारदार नाक आणि पाणीदार डोळे. हॉस्पिटलच्या त्या सगळ्या कोरड्या रूक्ष आणि भयंकर वातावरणाशी फटकून असलेलं त्याच्या चेहर्‍यवरचं स्मित.
“ही लास्ट वेळ. यापुढं तो असलं काहीही करणार नाही” तो सहजपणे म्हणाला. त्याचा आवाज तिला फार ओळखीचा वाटला, पण याआधी कधी ऐकला होता ते आठवेना.
“एक्स्युज मी,” ती किंचित वैतागली. “तुम्ही कोण?”
तो परत गालात हसला. “मी कोण? या प्रश्नाचं उत्तर फार कठीण आहे...”
ती त्याच्यापासून लांब सरकली. रात्रीच्या इतक्या उशीरादेखील तो नुकताच अंघोळ करून आल्याइतका ताजातवाना दिसत होता. त्या पांढरट फिकुळ ट्युबलाईटमध्ये त्याचे ओलसर केस अजूनच चमकत होते. तो परत म्हणाला. “डोण्ट वरी. ही आजची त्याची शेवटली हॉस्पिटलभेट. यापुढं नाही”
“तुम्हाला कसं माहित?” तिनं अविश्वासानं विचारलं.
“मला बरंच माहित आहे. इफ यु डोंट माईण्ड, आपण जरा  कॉफी घेऊ या का? रात्रभर तुम्हाला इथं जागायचं आहे, मला माझी ड्युटी करायची आहे... कॉफी घेऊन थोडे फ्रेश होऊ!”
“नको! नर्स बाहेर येऊन मध्येच औषधं आणायला सांगतात... तसंही मला भूक नाहिये” परत मोबाईल वाजायला लागला होता. तिनं पर्समधून काढून पाहिला तर घरचा नंबर. आता याक्षणी तिला आई, बाबा, आणि दादा यापैकी कुणाहीकडून काहीही ऐकून घ्यायचं नव्हतं. तिनं फोन कट केला. आता फोन घेतला नाही तर पुढचा फोन सतत येत राहणार.. तिनं फोन सायलेंटवर टाकला.
“प्लीज, एक कप कॉफी. ही रात्र फार मोठी आहे. संपता संपणार नाही, आणि तुमचा पेशंट आता या क्षणाला स्टेबल आहे. बीलीव्ह मी”
“तुम्ही आहात तरी कोण?” तिनं जरा जास्तच वैतागून विचारलं.
“तेच तर सांगायचंय, प्लीज जरा बाहेर जाऊ या का?” त्यानं डोळे तिच्या डोळ्यांत मिसळत म्हटलं. क्षणभर तिला वाटलं ती स्वत:च्याच डोळ्यांत खोलवर उतरत चालली आहे.
हॉस्पिटलच्या कॅंटीनकडे जायला ती उजवीकडे वळत होती, त्यानं तिचा दंड धरला. “तिकडे फार भयाण कॉफी आहे, इकडे चल” दोघं चालत हॉस्पिटलच्या गेटबाहेर आले. पार्किंगच्या जवळच एक टपरीवाला इतक्या रात्री स्टोवला वारा घालत उभा होता. “काय पाहिजे ताई?” त्यानं विचारलं. तिनं “दोन कॉफी” सांगितल्यावर तो जरा गडबडला.
“काफी नाय, चा तयार आहे.” तो म्हणाला. तिनं नको म्हणून मान हलवली आणि परत चालत गेटमधून आत आली. तेव्हा जाणवलं, तोही तिच्याच बाजूनं चालतोय.
“तुमचं नाव काय म्हणालात?” तिनं अचानक विचारलं.
“मला नाव नाही.” तो चालताना थांबत म्हणाला. “ऐक, दोन मिनिटं इथंच थांब, मी काय सांगतोय ते नीट ऐक” त्यानं तिचे दोन्ही खांदे धरले. “मी एक फार वाईट निरोप घेऊन आलोय. मृत्यूचा निरोप”
तिनं त्याचे हात झिडकारले. “काय बोलताय? कोण आहात तुम्ही? हे बघा, मी फार टेन्शनमध्ये आहे, माझ्यासोबत मला कसलीही मस्करी नकोय” ती ओरडली. अंधार्‍या पार्किंगमध्ये तिचा आवाज घुमला. “प्लीज माझा पाठलाग सोडा, नाहीतर मी सीक्युरीटीला बोलवेन” तो पुढं काहीतरी बोलण्याच्या प्रयत्नांमध्ये असतानाच ती तरातरा चालायला लागली. जिना चढून परत आयसीयुजवळ आली, तेव्हा तिथं बाहेर कुणीही नव्हतं. दोन तीन मंद प्रकाशामधले दिवे तेवढे लुकलुकत होते. तिनं दरवाज्यावर टकटक केली. एका नर्सनं दरवाजा उघडला. “अय्या! तुम्ही गेला नाहीत का?” तिला पाहिल्यावर आश्चर्यानं म्हणाली.
“अमर कसा आहे?”
“आता स्टेबल आहे. अजून शुद्धीवर आला नाही. पण अजून एक इंजेक्शन द्यायचं आहे. तुम्ही उद्या सकाळी आलात तरी चालेल. तसा काही प्रॉब्लेम नाही. चिंता करू नका.” नर्स म्हणाली.
ती रात्रभर याच खुर्चीत बसून जागणार आहे हे त्या नर्सलाही खरंतर माहित होतं. “यंदा जरा जास्तच केलं ना त्यांनी?” नर्स गप्पा मारायला लागली. “तुम्ही कंट्रोल का करत नाही? व्यसनमुक्ती केंद्रात वगैरे...”
काहीही उत्तर द्यायचं तिच्यामध्ये त्राणच नव्हतं. तरीही ती उगाच हसून म्हणाली. “गेले चार वर्षं किती प्रयत्न केलेत? तुमच्या डॉक्टरांनाच विचारा. पुण्याला नेलं, बंगळूरला नेलं. माझा विश्वास नसतानापण कुठल्या बाबांकडे नेलं. तरी याचं असंच.”
“तुमच्या सहनशक्तीची कमाल म्हणायची. हे आधीपासून असे आहेत की..” नर्सला आता विषय जरा पर्सनल बाबींकडे न्यायचा असणार हे तिच्या ध्यानांत आलं. पण आता तिला नकोसं झालं होतं. “मी आलेच हं” म्हणत तिनं आयसीयुचा दरवाजा लोटला.
हॉस्पिटलच्या त्या बकाल बाथरूममध्ये ती चेहर्‍यावर सपासप पाणी मारून घेत होती. झोप आली होती, भूक लगली होती, याहून जास्त अमरचं टेन्शन होतं. एव्हाना तो शुद्धीत यायला हवा होता. दोन तीन दिवसांनी डिस्चार्ज. मग आठेक दिवस घरातच सेवा. ते झालं की मग थोडे दिवस तो सरळ असायचा, मग हळूहळू एखाद दिवस, एकच दम, अजून एखाद दिवस आणि अजून एकच दम. मग एखाद दिवस उजाडायचाच नाही. नशाच त्याचं दिवसरात्र बनून जायची. अशाच नशेमध्ये मग कधीतरी अति व्हायचं, आणी मग सुरू व्हायचा हा असला जीवनमृत्यूचा संघर्ष.
“माझी आठवण काढलीस?” मघासचा परिचित आवाज आला.चेहर्‍यावर पाणी मारताना अचानक ती थबकली. परत एकदा तो तिच्या बाजूला उभा होता.
“हे लेडीज वॉशरूम आहे. इथं आत कसे आलात?”
“मला कुठेही यायलाजायला बंदी नाही.” त्यानं तिचा हात धरून मनगटावरचं घड्याळ पाहिलं. “११:५५ झालेत. पाचेक मिनिटांत आजचा दिवस संपेल.”
“तुम्ही माझ्या मागोमाग का फिरताय?” यावेळी तिच्या आवाजात मघासची जरब नव्हती. भिती मात्र प्रचंड होती.
“सांगितलं ना, ड्युटी आहे. मी निरोप घेऊन आलोय”
“कुणाचा?”
“मरणाचा”
“चेष्टा करताय?”
“समोरच्या आरश्यात बघ.” तो परत एकदा तिच्या डोळ्यांत हरवत म्हणाला. तिनं मान वळवून बेसिनवरच्या आरश्याकडे पाहिलं. प्रतिबिंबामध्ये तीच एकटी भकास नजरेनं तिच्याकडे पाहताना दिसली. तिनं लगेच मान वळवून बाजूला पाहिलं. अवघ्या काही श्वासांच्या अंतरावर तो उभा होता. पण आरश्यात मात्र दिसत नव्हता.

“तू भूत आहेस?” ती तोंडातच पुटपुटली.
“नाही. मी भविष्य आहे. मी मृत्यू आहे” तो पुन्हा एकदा त्या आश्वासक आवाजानं तिला म्हणाला. ती दोघं एका दाट जंगलात उभे होते. दूरवर चांदण्या चमकत होत्या, अमावस्येची रात्र असल्यासारखी काळी काळी रात्र.. थंड गार वार्‍यानं तिला शिरशिरी भरली.
एक मन म्हणत होतं ही सर्व भास आहेत. दुसर्‍या मनाला मात्र, हे सारं पटत होतं. किंबहुना याच क्षणांची आपण इतके दिवस वाट बघत होतोच की. बाजूला असलेलं झाड पानांची सळसळ करत तिला समजावण्याचा क्षीण प्रयत्न करत होतं.  
“हे काय घडतंय?”
“तेच सांगतोय! प्लीज समजून घे.”
“आय डोंट बीलीव्ह यु.”
“विश्वास ठेवला नाहीस तरी चालेल. पण लक्षात घे. सर्व काही आधीपासून ठरलेलं आहे. त्यात काहीही बदल होऊ शकत नाही.”
बाथरूममध्ये रात्रपाळीची एक आया आतमध्ये फिनाईलची बादली घेऊन आली. एकट्याच उभ्या असलेल्या तिच्याकडे बघून ओळखीचं हसू हसली. “साह्येब ऍडमिट आहेत का?” तिनं नजर भोवताली फिरवली. तो अजूनही तिच्यासमोर उभा होता. तसाच!
ती काहीच बोलली नाही. आयाला बाजूला असलेला हा दिसत कसा नाही, वगैरे प्रश्न यावेळी तिच्या मनात आले नाहीत. मघाशी अचानक भरलेली शिरशीरी आता अंगभर पसरली होती. पर्स उचलून ती बाथरूमबाहेर पडली.
हॉस्पिटलच्या कॅंटीनमध्ये सर्व दिवे मालवलेले होते, पण कॉरीडॉरमधल्या दिव्याचा उजेड एका टेबलवर पडला होता. तिनं व्हेंडींग मशिनमधून एक चिप्सचं पॅकेट आणि दोन कॉफी घेतल्या. तोपर्यंत तो तिच्या टेबलजवळ येऊन बसला होता. “शांतपणे ऐकून घे. मी तुला स्वत:हून काहीही सांगू शकत नाही. पण तू विचारलेल्या प्रश्नांचं खरंखुरं उत्तर मात्र मी देऊ शकतो.”
“तुझं नाव काय?” तिनं विचारलं.
“तू देशील ते, मला माझं नाव नाही.”
“कधी?” उत्तर नको असलेला प्रश्न तिनं अखेर विचारला.
“उद्या पहाटेनंतर. एक्झाक्ट वेळ अर्थात ठरलेली आहे पण ती मात्र मी सांगणार नाही….” त्याचा मघासचा मिश्किलपणा आता गायब झाला होता. तिच्या मनांतला गंभीरपणा त्याच्या डोळ्यांत तरळला होता.
“मग मला आताच का सांगतोस?”
“कारण ती माझ्या कामाची पद्धत आहे...”
“वेल, यु आर रॉंग. डॉक्टर म्हणालेत की अमरला काहीही होणार नाही. यावेळी सीरीयस आहे, पण तरीही ही विल बी ओके” बोलता बोलता तिचा आवाज भरून आला.
“येस्स, ही विल बी ओके. मी मघाशीच म्हटलं ना...”  तिनं कॉफीचा एक घोट घेतला.
“मला वाटलेलं यमराज रेड्यावर येऊन प्राण नेतात” ती म्हणाली.
“तुला हवं तर मी तसा कॉस्ट्युम घालून येईन. मी कुठलंही रूप घेऊ शकतो. पण शक्यतो मी ब्लेंड व्हायचा प्रयत्न करतो. त्यामुळे लोकांमधला हिस्टेरीकपणा जरा कमी होतो. अन्यथा, लोकं इतकी आरडाओरड करतत की काम करणं मुश्किल होतं. बघ ना, आता मी टिपिकल हॉरर फिल्म्समध्ये दाखवतात तसा काळा ड्रेस, काळा घूंघट वगैरे घेऊन आलो असतो तर माझ्याशी एक वाक्य तरी बोलली असतीस का? किंचाळत गावभर सुटली असतीस..”
“आय स्टील डोण्ट बीलीव्ह दिस... कदाचित अमरची नशा मी केलीय, आय ऍम हॅल्युसिनेटींग.”
“तुला हवं असेल तर आपण अख्खी रात्र माझ्या सच्चेपणावर चर्चा करण्यात घालवू. त्यातून हाती काहीच लागणार नाही, पण जर तू एका क्षणासाठी जरी माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुझ्या लक्षात येईल की... ही रात्र अखेरची रात्र आहे.”
“मी का विश्वास ठेवू? तो फक्त अट्ठावीस वर्षाचा आहे. हे त्याच्या मृत्यूचं वय तरी आहे का”
“मृत्यूला कधीच वय नसतं, असतो तो फक्त श्वासांचा हिशोब. आणि हा हिशोब मी ठरवत नाही”
“मग तू करतोस काय? प्राण काढून घेतोस?”
“तेही नाही. मी फक्त वाटाड्या आहे, या जगामधून त्या जगामध्ये नेणारा”
“तू आता या क्षणी माझ्याजवळ आहेस. म्हणजे जगात इतरत्र कुणाचेच मृत्यु होतच नाहीयेत?”
“मी संपूर्ण इथं नाहीये, मी अनेक रूपं घेऊ शकतो, माझ्या अंशाचा एक भाग आता तुझ्याजवळ आहे.. मागे जेव्हा आपण भेटलो तेव्हा…” हे वाक्य त्यानं अर्धवट टाकलं. त्यानं चिप्सचं पाकिट फोडून काही चिप्स तोंडात टाकले. “मी आज तुझ्यापर्यंत आलोय, तसाच मी या क्षणाला अमरजवळ आहे. दुनियेच्या लाखोकरोडो लोकांपाशी आहे. माझं काम कधीच थांबत नाही.......प्रकाशाचा एक किरण अख्खी दुनिया व्यापू शकतो. तसाच मीही.”
“त्याला प्लीज वाचव. प्लीज” अखेर तिचा संयम संपला. डोळ्यांतून पाणी धरण फुटलेल्या बांधासारखं वाहायला लागलं. ती रडत असताना तो शांतपणे तिच्यासमोर बसून राहिला. “प्लीज, मी विनंती करते.”
“तुला या प्रश्नाचं उत्तर माहित आहे. मी कुणालाही वाचवू शकत नाही.”
“मग आत्ताच का आलास मला सांगायला? मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही...मलाही त्याच्यासोबत घेऊन जा.” ती कसंबसं म्हणाली.
“या वाक्याला काहीच अर्थ नाहीये. कुणी जगायचं आणि कुणी नाही याचे नियम फार आधी ठरलेत.” तो किंचित पुढं झुकत म्हणाला. “ऐक, माझं ऐक! आजवरचे माझे सारे नियम मोडून मी तुला काहीतरी सांगतोय. आयसीयुकडे परत जा. तुझी तिथं गरज आहे. आता या क्षणाला. त्याचा हात हातात घे. त्याला सांग- जे तुझ्या मनात आहे ते. त्याच्या मनामधला सगळा पश्चात्ताप निघून जाऊ दे, नात्यामध्ये खूप काही गुंतलंय, शक्य असतील तितके धागेदोरे उसव.”
तिनं मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. “तुला नक्की काय काय माहित आहे?”
“सगळंच. जा. ताबडतोब” त्याच्या या शब्दांनिशी ती तडक उठली, जिना जवळ जवळ धावतच चढली. आयसीयुच्या दारापर्यंत येईपर्यंत तिला तिथला गोंधळ जाणवला. डॉक्टर आणि असिस्टंट डॉक्टर आलेले होते. दोन तीन नर्स उभ्या होत्या. डॉक्टर दबक्या आवाजात काहीतरी सांगत होते. ती आलेली पाहतच म्हणाले, “अरे. तुम्हा आहात होय़. मला वाटलं आज घरी गेलात.” त्यांच्या आवाजामध्ये एरवी असणारा निवांतपणा आता नव्हता. “पेशंट सीरीयस झालाय.” शक्य होइल तितक्या शांतपणं डॉक्टर म्हणाले तरी  तिला अचानक त्यामागचं गांभीर्य जाणवलंच. नकळत तिनं मनगटावरचं घड्याळ पाहिलं. रात्रीचा दीड वाजला होता. “उद्या पहाटेनंतर” त्याचे शब्द तिला आठवले.
“मी बघू का?” तिनं विचारलं. आपण भेटू का म्हटलं नाहीतर बघू का असं विचारल्याबद्दल तिनं मनातल्या मनात स्वत:लाच टोकलं.
डॉक्टरांची आपापसांत नजरानजर झाली. कधी नव्हे ते मोठे डॉक्टर पुढे आले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. “जेमतेम अर्धा तास आहे. अर्थात, आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवणार आहोत. पण यावेळी तो ट्रीटमेंटला हवा तसा रीस्पॉन्स देत नाहिये. सारखं तुमचं नाव घेतोय. तुम्ही आत बसा, पण आम्हाला आमचं कामही करू द्यात”
आयसीयुच्या एका कोपर्‍यामध्ये झोपलेला तो, आजूबाजूला नर्सेसची लगबग. तिनं बाजूला ठेवलेल्या मॉनिटरवर नजर टाकली. बीपी ७०. हार्ट रेट ३०. तो डोळे मिटून श्रांत पडून असलेला. तिच्या नजरेसमोरून त्याची कितीतरी रूपं येऊन गेली. हसणारा तो, तिच्यासाठी दुपारभर खपून केक बनवणारा तो, ती कॉलेजमधून यायच्या वेळी गेटपर्यंत येऊन तिची वाट बघणारा तो, रात्री अपरात्री ती भितीनं किंचाळत उठल्यावर तिला शांत करणारा तो. नशेमध्ये असताना ती घरात आहे की नाही याची फिकीरदेखील न बाळगत आपल्याच मस्तीमध्ये जगणारा तो. ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये निपचित पडलेली अस्ताना तिला हलकेच कवेत उचलून घरी घेऊन येणारा तो.
.. आणि हे तर नेहमीचंच रूप. हॉस्पीटलच्या बेडवर बेशुद्ध असलेला तो.
ती त्याच्या बाजूला एका स्टूलावर बसली. नर्सनं येऊन सलाईनमध्ये कसलंसं इंजेक्शन दिलं. “डॉक्टर आहेतच. ते लक्ष ठेवून आहेत” नर्स म्हणाली. तिनं त्याचा डावा हात धरला. हा त्याचा कामाचा हात. डावखुरी लोकं आपल्याला आधीपासूनच आवडायची, की अमर आयुष्यात आल्यानंतर आवडायला लागली, ते तिला आताही माहित नव्हतं. तिनं त्याचा हात किंचित उचलला. तो काहीतरी पुटपुटला. “काय अमर?” तिनं विचारलं. त्याचं उत्तरही पुटपुटण्यातच होतं. तिनं आपले कान त्याच्या ओठांजवळ नेले. तो तिचंच नाव पुटपुटत होता. गेल्या काही महिन्यांत त्यानं तिचं नाव घेणंच सोडलं होतं. मागे हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर तिचे आईबाबा आले होते, तिला घरी न्यायला. तिनं येणार नाही असं स्पष्ट सांगितल्यावर त्यांनी बरच तमाशा केला. सगळा तमाशा त्यानं आतल्या खोलीत बसून ऐकला. ते लोकं निघून गेल्यावर तो तिला म्हणाला. “माझ्यापायी तुझं नुकसान नको. मीच जाऊन मरतो कुठंतरी” एरवी त्याच्या कुठल्याही शब्दाला उत्तर न देणार्‍या तिनं यावेळी मात्र, त्याच्या कानाखाली वाजवली होती. “तुला जगवण्यासाठी मी इतकं करतेय, तरी तुला हेच शब्द सुचताहेत?” ती नंतर म्हणाली. “आईबाबांपेक्षा तू जास्त मोलाचा आहेस, माझ्यासाठी. त्यांनी दिलेलं नाव सोडता माझ्याजवळ आता त्यांचं काहीही नाही”
त्या क्षणापासून त्यानं तिचं नाव कधीही घेतलं नाही. आतापर्यंत.
“अमर, मी इथंच आहे, बघ!” ती स्वत::चे ओठ त्याच्या कानापर्यंत नेऊन म्हणाली. पण तो अजून त्याच्याच विश्वामध्ये होता. “मला सोडून जाऊ नकोस” तो म्हणाला. तिला भडभडून रडू आलं. कसंबसं तिनं ते आवरलं. “मी कुठंही जात नाहीये”
सोडून तर तू चालला आहेस- ती स्वत:शीच म्हणाली. तिनं त्याचा हात घट्ट दाबून धरला. ओठ हलकेच त्याच्या कपाळा्जवळ नेले आणि टेकवले. पुन्हापुन्हा. इतक्या वर्षांत आपली शारीरिक जवळीक इतकीच. त्याला अगदी पहिल्यांदा ती स्वत:च्या खोलीवर घेऊन आली, तेव्हपासून ते आतापर्यंत.
नर्सनं सांगितलं नाही तरी तिला समजलं. इथं जास्त वेळ थांबू नका, ती पर्स उचलून परत बाहेर येऊन बसली. डॉक्टरांची अगम्य धावपळ चालूच होती. खुर्चीवरच हातात डोकं खुपसून ती शांत बसून राहिली. “मला सोडून जाऊ नकोस” म्हणालाय अमर. इतक्या वर्शात, इतक्या दिवसांत पहिल्यांदा कधीतरी... असं काहीतरी म्हणालाय.
खांद्यावर तो चितपरिचीत स्पर्श परत जाणवला. “प्लीज त्याला वाचव.” डोकं वर न करताच ती म्हणाली.
“ते माझ्या हातात आहे का?” त्याचा आवाज आला.
“प्लीज, त्याच्याऐवजी...”
“असली कुठलीही एक्सेंज ऑफर नसते. ज्याचा हिशोब ज्यानं त्यानं पूर्ण करायचा.” तिनं मान वर करून त्याच्याकडे पाहिलं.
“मी एकटीच बडबडतेय ना? आजूबाजूच्या नर्सेस माझ्याकडे विचित्र नजरेनं बघत असतील”
“नाही, तू अजूनही मघासारखीच हातात डोकं खुपसून बसलीयेस. त्यांच्या दृष्टीनं”
“मग हे सर्व माझ्या मनाचे खेळ आहेत. काल्पनिक?”
“मनाचे खेळ आहेत. पण काल्पनिक नक्कीच नाहीत. माझ्याहून दुसरं उत्त्कट सत्य काय असू शकेल?”
तिच्या मनामध्ये लहानपणी कधीतरी ऐकलेली कहाणी उभी राहिली.
“तू एकदा सावित्रीच्या विनंतीवरून तिच्या पतीचे प्राण वाचवले होतेस ना?”
“ती दंतकथा आहे, हे तुलाही माहित आहे. तुझा या गोष्टींवर विश्वासच नाही.”
“म्हणजे असं कधीच घडलं नाहिये, की तू कुणाचाही जीव वाचवू शकला आहेस...”
“यु नो, जेव्हा कधी मी माझं काम करायला जातो तेव्हा ह्मखास मला ही सावित्रीचं उदाहरण दिलं जातं... सुरूवातीला मी वैतागायचो, मग संतापायचो, आता फक्त हसू येतं. तीच कथा...प्रत्येक वेळी. सपोझेडली यमराजांनी तिच्या नवर्‍याचे प्राण तिनं यमराजाला शब्दांत अडकवून परत घेतले. आता हे यमराज म्हणजे खरंतर मृत्यू नाही. मृत्यू कुठल्याच धर्माचा नसतो. पण यमराज म्हणजे धर्माचे नियम बनवणारे देव! लीगल एक्स्पर्ट!! आणि एखाद्या लीगल एक्स्पर्टला शब्दांत अडकवणं इतकं सोपं असतं का?”
“पण मग सत्यवानाचे प्राण वाचले कसे?”
“कारण त्याच्या श्वासांचा हिशोब अजून शिल्लक होता, सावित्रीने वरदान मागितलं नसतं तरी तो जगला असता. त्याक्षणी त्याचे प्राण वाचले, कायमचे नाही. कधीनाकधी प्रत्येक घड्याळ बंद पडतंच. आणि तसंही, सावित्रीचं उदाहरण देताना हे लक्षात ठेव की, नात्याने अमर तुझा नवरा नाही”
“नातं असण्यासाठी त्यानं आणि मी नवरा बायको असणं गरजेचंच आहे का? त्याव्यतिरीक्त काहीच नातं असू शकत नाही”
“असतं ना. एक नवरा आणि बायको. एक पुरूष आणि एक स्त्री यांच्यामध्ये नातं असू शकतं. असतं. पण तसंही काही नाहिये ना... आय नो एवरीथिंग. मला प्रत्येक गोष्ट माहित आहे..”
“नाही.. तुला प्रत्येक घटना माहित आहे. त्या घटनांच्यादरम्यान काय घडलंय. माझ्या किंवा त्याच्या मनात हे माहित नाही... त्याच्या मनात काय आहे ते तर मला अजूनही माहित नाही. का असं करतो.. का असं वागतो..” बोलता बोलता ती थांबली.
“बोल!” तो हलकेच तिच्या खूप जवळ येत म्हणाला. “बोलत रहा. कदाचित तुझ्या या बोलण्यामधूनच तुला काही प्रश्नांची उत्तरं सापडतील.”
“तुला माहित आहे ना?” तिनं त्याला विचारलं.
“माहित!! मी त्याही वेळी तुझ्या आजूबाजूलाच होतो. तुझा हिशोब त्यावेळी शिल्लक होता.”
“म्हणून इतक्या मरणप्राय वेदना होऊनही तू मला घेऊन गेला नाहीस…”
भरून आलेले डोळे तिनं पुन्हा एकदा पुसले. “तुला माहित असेल तरी सांगते… नुकतीच बारावीची परीक्षा झाली होती, मी मैत्रीणीकडे गेले होते, परत येताना खूप उशीर झाला. मैत्रीणीचे बाबा म्हणाले मी सोडतो, म्हटलं कशाला स्कूटी घेऊन जाईन. फार नाही, रात्रीचे दहा साडेदहा वाजले असावेत. मैत्रीणीच्या घराबाहेर पडले आणि एकाकी सुनसान रस्त्यावर वाटलं कुणीतरी आपला पाठलाग करतंय. भितीनं अचानक ठरवलं की नेहमीच्या रस्त्यानं न जाता वेगळ्या रस्त्यानं जाईन.. आणि मग.. मग...” बोलताना ती अचानक थांबली. त्या आठवणीनंही तिच्या अंगावर शहारा आला. “एके दिवशी मी घर सोडलं.. आईवडलांना सोडलं. मग गावात कुणी मला भाड्यानं खोली द्यायला तयार नव्हतं. अमरची ही खोली इतकंच माझं घर. एके दिवशी सगळं सामान घेऊन इथं रहायला आले. मी आणि अमर.. आम्ही लिव्ह इन पार्टनर नाही.. नवरा बायको नाही. त्याचं माझ्यावर प्रेमसुद्धा नाही. त्यानं माझ्या अंगाला आजवर एकदाच हात लावलाय... मला उचलून घेतलं होतं तेव्हा. मी पूर्ण बेशुद्ध होते, नागडी होते. कारण त्या रात्री त्या आडरस्त्याने जाताना सहासात जण माझ्या अंगावर आले. आय वॉज रेप्ड. गॅंगरेप्ड. कितीक तास त्यांचा तो खेळ रस्त्यावरच चालू होता. जेव्हा त्यांचे विकृतीचे तमाशे संपले तेव्हा, मला तसंच टाकून निघून गेले.” अचानक तिचा आवाज चढला. “हरामखोरा! त्यावेळी आला नाहीस! शरीराच्या प्रत्येक पेशीमधून मरण यावं अशी विनंती होत असताना आला नाहीस. त्यावेळी माझ्या मदतीला केवळ अमर आला. अख्ख्या गावानं त्याला वाळीत टाकलं होतं. गर्दुला होता, वाईट होता पण तरीही, माझ्या किंकाळ्या ऐकून तो आला. मला घेऊन त्याच्या खोलीवर गेला. वाहत असलेलं रक्त पुसलं. जखमा पुसल्या आणि मग मला घेऊन डॉक्टरकडे गेला. तिथं माझे आईवडील येईपर्यंत थांबून राहिला. त्या रात्री का आला नाहीस रे? आणि त्या श्वासांच्या बुलशीट मला वारंवार ऐकवू नकोस. आय डोंट केअर. माझ्यादृष्टीने मी त्याच दिवशी मेले होते… पण अमरनं मला जगवलं होतं. आईवडीलांनी पोलिस केस केली नाही. किंबहुना या बलात्काराची हकीकत तो डॉक्टर आणि अमर सोडल्यास कुणालाही माहित नाही.” ती अचानक थांबली, आणि मग आवंढा गिळत म्हणाली. “चूक! त्या लोकांना माहित आहे की. ज्यांनी माझ्यासोबत…. तू माझ्या प्रत्येक प्रश्नाचं खरंखुरं उत्तर देणार आहेस ना? मग या प्रश्नाचं उत्तर दे… त्यांना काय सजा मिळणारे? इथले कायदे, इथली मूल्यं या सगळ्यातून ते वाचलेत…”
“त्यांना काय सजा मिळणार हे तू ठरवशील. लवकरच. कारण, त्यांनी गुन्हा तुझा केलाय” तो शांतपणे म्हणाला.
“आणि अमर? तो कसली सजा भोगतोय? का?”
“या प्रश्नांची उत्तरं तुला मी देऊ शकतो पण तो हक्क अमरचा आहे.”
ती उठून परत एकदा आयसीयुमध्ये आली. “आता ठीक आहेत. बोलतायत” नर्स तिला पाहताच म्हणाली. तिनं घड्याळात पाहिलं. चार वाजून गेले होते. ती अमरच्या बेडजवळ आली. तो शांत डोळे मिटून तसाच पडून होता. तिनं त्याच्या कपाळावर हात ठेवला. तिच्या त्या स्पर्शासरशी त्यानं डोळे उघडले.
“अमर!” ती म्हणाली. “बरं वाटतंय का तुला?”
“आय अ‍ॅम सॉरी” तो थकल्या आवाजात म्हणाला. “रीअली सॉरी”
काही न बोलता तिनं हलकेच तिच्या केसांमधून हात फिरवला.
“यापुढं नाही. कधीच नाही” तो परत म्हणाला. “दरवेळी स्वत:ला हे प्रॉमिस करतो आणि मग… पण यापुढे कधीच मला कसलीच नशा नकोय.”
“इट्स ओके. आपण दोघं सोबत लढणार आहोत!” हे बोलताना प्रचंड कष्टानं आवरलेलं पाणी मात्र तिच्या डोळ्यामधून बाहेर आलं. त्यानं डावा हात किंचित पुढे करून ते पाणी पुसलं.
“माझ्यासारख्या वाया गेलेल्या माणसासोबत का आयुष्याचं मातेरं करतेस? कितीकवेळा तुला सांगितलंय, मला सोडून जा.”
“आणि मी दर वेळी तुला हेच सांगितलंय की मी जाणार नाहिये. कूठेच. तुला सोडून. कधीच.” ती तिच्या गालावरून फिरणारा त्याचा हात हलकेच धरत म्हणाली. “आय लव्ह यु, अमर. आजवर तुला मी हे कधीच सांगितलं  नाही, पण आज सांगतेय. प्लीज. मला सोडून जाऊ नकोस. इथंच थांब. माझ्यासाठी… त्या रात्री मला नरकामधून तू परत घेऊन आलास… माझ्यासाठी तू माझं सर्व काही आहेस. प्लीज मला सोडून जाऊ नकोस” ती पुन्हा म्हणाली.
“नाही जाणार. आय प्रॉमिस. आजवर तुला जे वचन कधीच दिलं नाही ते आज देतोय. आय प्रॉमिस. आजपासून नशा करणार नाही. आजपासून तुला सोडून कुठंही जाणार नाही. आजपासून माझ्या या नवीन आयुष्याचा पहिला दिवस आहे. आज उगवणारा सूर्य माझ्यासाठी पूर्ण नवीन असेल. यापुढे तू अमरला कधीही हॉस्पिटलमध्ये घेऊन येणार नाहीस. मी माझं अख्खं आयुष्य तुझ्यासाठी बदलेन. बीकॉज आय लव्ह यु! आय लव्ह यु सो मच!!” गेल्या दहा वर्षामध्ये पहिल्यांदा त्याच्या तोंडून हे शब्द आज तिनं ऐकले होते. पुढं झुकून तिनं त्याच्या कपाळावर स्वत:चे ओठ टेकवले. “मी तुझ्यासाठी कुणाहीसोबत लढायला तयार आहे! अगदी मृत्यूशीसुद्धा” ती हलकेच पुटपुटली. त्यानं शांतपणे डोळे मिटले. नर्स येऊन त्याला तपासून गेली. “औषधांमुळे झोप लागलीये” म्हणाली.
तरीदेखील ती त्याच्या उशाशी बसून राहिली. तासभर की दोन तास तिला माहित नाही. चारचे साडेचार झाले, साडेपाच झाले. हॉस्पिटलच्या बाहेर जग हळूहळू जागं होत राहिलं. ती बसल्या जागी अवघडली होती. पुन्हा एकदा नर्स येऊन तपासून गेली.
“तुम्ही फ्रेश होऊन या, अजून थोड्या वेळात जागे होतील. कदाचित त्यांना भूक लागलेली असेल. काहीतरी नाश्ता घेऊनच या” नर्सने सूचना केली.
ती आयसीयुच्या बाहेर आली. इतकावेळ स्वत:ला मृत्यू म्हणवणारा तो इसम मात्र आता तिला कुठंही अजिबात दिसत नव्हता. हॉस्पीटलच्या व्हेंडिंग मशिनमधली ती सिंथेटिक चवीची घाण कॉफी पिण्यापेक्षा तिनं बाहेर टपरीवरची कॉफी आणायचं ठरवलं. सोबत अमरच्या आवडीचा कोकोनट बिस्कीटचा पुडा.
खड्ड्यात गेला हा मृत्यू.
डॉक्टरांनी तिला मघाशीच सांगितलं होतं. अमर आता पूर्णपणे आऊट ऑफ डेंजर होता. दोन तीन दिवसांनी डिस्चार्जही मिळाला असता.
रात्री तिच्या मनावर साचलेलं मळभ आता पूर्ण दूर झालं होतं. अमर आणि ती. ती स्वत:शी हसली. भविष्याच्या कोवळ्या चाहूलीनं का होईना, पण तिच्या ओठांवर हसू आलं. त्याच्या त्या आश्वासक स्पर्शानं तिला दिलेलं वचन तो पूर्ण निभावेल याची तिला खात्री होती. ती चालत हॉस्पिटलच्या गेटबाहेर आली. दोन कप कॉफी आणि बिस्कीटाचा पुडा घेऊन परत वळाली.
तो गेटच्या बाजूला उभं राहून तिला बघत होता. “आजूबाजूला बघ” तो स्वत:शी पुटपुटला. तिचं लक्ष नव्हतंच. मरणाची घाई... वापरून वापरून गुळगुळीत झालेला शब्द. ती झराझर रस्ता क्रॉस करत आली, समोरून रात्रीची एस्टी येत होती. तिचं लक्ष नव्हतंच, आणि नेमकं ड्रायव्हरचंही लक्ष नव्हतं.
पण तरी ड्रायव्हरने ब्रेक मारले. तीन सेकंद उशीर झाला होताच. ब्रेक्सचा खस्सकन आवाज झाला, आणि पहाटे मॉर्निंग वॉकला निघालेले लोक जोरात ओरडले.  
तो कोलाहल ऐकू आला तेव्हा, त्यानं गप्प्कन डोळे मिटून घेतले. उद्या वर्तमानपत्रांमधून जरी ऑन द स्पॉट मृत्यू असं लिहून येणार असलं तरी त्याला माहित होतं, तिच्याजवळ अजून काही श्वास शिल्लक होते. त्यानं सावकाश डोळे उघडले. तिच्या डोळ्यांसारखेच पिंगट मधासारखे खोल डोहासारखे डोळे. एक चुकार अश्रू पापणीच्या कडेवर येऊन थांबलेला, त्यानं तो पुसला.
“फक्त एकदा विचारायचं होतंस, मी कुणासाठी आलोय...!!”
हिशोब संपत आला होता. त्याला पुढच्या तयारीला लागणं भाग होतं. रस्ता क्रॉस करत तिच्याजवळ आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती. अजूबाजूला गर्दी जमायला लागली होती. समोरच्याच हॉस्पिटलमधलं कुणीतरी तिला ओळखलं होतं. कुणीतरी मदतीसाठी ओरडत होतं. किंचाळत होतं. तिच्या शरीराला कुणीतरी स्ट्रेचरवर ठेवत होतं. पण त्याच्यासाठी ती अजूनही रक्ताच्या थारोळ्यात तिथंच पडली होती. डोळे मिटून. त्यानं हलकेच उचलून तिला कवेत घेतलं... तिचा आणि त्याचा हा प्रवास संपला.
.. आता केवळ तिचा पुढचा प्रवास चालू झाला होता. तिच्या दृष्टीनं सगळ्याचंच अस्तित्व शून्य झालं होतं. अगदी त्याचंसुद्धा.

<<< 

(समाप्त) )

कथा आवडल्यास ही लिंक कृपया व्हॉट्सप आणि फेसबुकवर अवश्य शेअर करा. धन्यवाद.