Saturday, 25 May 2013
Wednesday, 22 May 2013
त्रिकोणाचे तीन कोन
ऑफिसमधे येऊन अर्धा तास पण झाला नव्हता पण कंटाळा शुक्रवार संध्याकाळ इतका आला होता. जुलैचा महिना त्यात बाहेर तूफान पाऊस पडत होता, त्यामुळे ट्रेन उशीरा धावत होत्या. मध्य रेल्वे तर कधीही बंद पाडायच्या मार्गावर होती. आज ऑफिस अगदी सुनसान होते. सीक्युरीटी गार्ड बसल्याबसल्या चक्क पेंगत होता. बहुधा ऑफिसमधे मीच एकटी वेळेत आले होते. दुसरे कुणीच दिसेना. मेलबॉक्स चेक करून बघितला तर काही नविन मेल नव्हतं. मग उगाच फेसबूक वगैरे उघडून बसले. पण वेळ जाता जात नव्हता. तसं आजच्या दिवसाभराच्या कामाचं माझं काहीच जास्त टारगेट नव्हतं. माझा बॉस ठाण्याला रहायला होता, इतका मुसळधार पाऊस बघता आज बहुतेक त्याने सुट्टीच टाकली असावी. त्याला फोन ट्राय केला तर पठ्ठ्याने तो बंद ठेवला होता.
कुणीच दिसेना तेव्हा वाटलं, आयला सर्वानी संगनमत करून सुट्टी घेतलीये की काय. पण हळूहळू दुसर्या डीपार्टमेंटमधे पण माझ्यासारखे काही एकांडे शिलेदार आलेले दिसले. शेवटी वैतागून कॅन्टीनमधे जाऊन बसले. सुदैवाने कँटीनवाला हजर होता. एका कॉफीची ऑर्डर दिली. तेवढ्यात मोबाईल वाजला म्हणून बघितला तर चक्क पाच एसेमेस. बहुतेक स्टाफ रजेवर गेला होता, आणि ते कळवण्याचं पुण्यकर्म मात्र केलं होतं. पण त्यामधे एक मेसेज निधीचा पण होता. आज हिला कशी काय आठवण आली म्हणून बघितलं तर कॉल मी इतकाच तुटक मेसेज.
तसं मला काम काहीच नसल्याने मी लगेच तिला फोन लावला. निधी माझी कॉलेजमैत्रीण. फॅशन डीझायनिंगच्या एका कोर्सला आम्ही एकत्र होतो. तसा आमचा फार् मोठा ग्रूप होता, पण मी,निधी, गझल आणि सायली अशा आम्ही एकदम घट्ट मैत्रीणी होतो. कॉलेज संपलं आणि आमच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. मी फॅशन डीझायनिंगनंतर अजून एक दोन कोर्स केले आणि एका मासिकामधे फॅशन रीपोर्टर म्हणून काम सुरू केलं. गझल लग्न करून लंडनला गेली. सायली बॉलिवूडमधे छोट्यामोठ्या असाईनमेंट्स करत होती. निधीला काही करण्याची गरजच नव्हती. तिच्या वडलांची रेडीमेड कपड्यान्ची मोठी फॅक्टरी होती. ती एकुलती एक मुलगी. जुहूला बंगला होता. आलिशान गाड्या होत्या. निधी आमच्या ग्रूपची राजकुमारी होती.
रिन्ग पूर्ण वाजली तरी निधीने फोन उचलला नाही. बहुतेक ती काही कामामधे बिझी असेल असा विचार करून मी माझ्या डेस्कवर परत आले. निधीचे वडील मागच्याच महिन्यामधे वारले होते. अगदी अचानक हार्ट अॅटॅकचे निमित्त होऊन. निधी सध्या घरच्या बिझीनेसमधे लक्ष घालायचं ठरवत होती. तसे तिचे दोन काका होतेच पण तरी आता तिला वडलानंतर कंपनीमधे लक्ष घालणे जरूरीचे आहे, असे मागच्या वेळेला एकदा फोनवर म्हणाली होती. हल्ली आमचं बरंचसं बोलणं एक तर चॅटवरती व्हायचं नाहीतर फोनवर. माझ्या ऑफिसपासून तिचं ऑफिस अगदी चालत जायच्या अंतरावर होतं.
डेस्कवर बसून या महिन्याच्या एका रीपोर्टवर नजर टाकत होते, तितक्यात मोबाईल वाजला. रफीच्या अगदी खोडकर आवाजातलं गाणं.. 'जाने कहा मेरा जिगर गया जी'. ही रिंगटोन अगदी सुरूवातीला मोबाईलवर घेतली तेव्हा तर पूर्ण रिंग वाजली तरी मी फोन घ्यायचेच नाही. आता मात्र लगेच उचलला. निधीचाच फोन होता. दोघीच्या कामाच्या वेळा बघून आज दुपारी एक वाजता लंचला कॉपर चिमनीमधे भेटायचं ठरलं.
मी ओके म्हणून उत्तर पाठवलं. एरवी कधीतरी नंतर बघूया म्हणून ठेवलेले फोल्डर्स काढले आणि थोडंफार वाचन करत बसले. दहानंतर पाऊस जरा कमी झाला आणि ऑफिसमधले एक एक तारे उगवायला लागले. तरी पावसाची मरगळ असल्याने सर्व काम कसं अगदी हळूहळू चालू होतं. साडेबाराला पीसी बंद केला आणि मी टॅक्सी पकडली. मी हॉटेलमधे पोचले तरी निधीचा पत्ता नव्हता.
तिला फोन करत होते इतक्यात तिची हाक ऐकू आली.
"जोई, इधर देख" मी वळून बघितलं. निधी माझ्याचकडे येत होती. गेल्या महिन्याभरात कितीतरी बदलली होती. पूर्वीची निधी म्हणजे ट्रेंडसेटर होती. तिला जे आवडेल ते ती घालायची. अगदी हिल रोड किंवा कुलाबा कॉजवेवरची अॅक्सेसरी ती परफेक्टली कॅरी करायची, तेही एखाद्या परदेशी ब्रँडसोबत. ती कुठल्याच ब्रँडची भक्त नव्हती आणि मिक्सअॅन्मॅच तिच्या इतकं परफेक्ट कुणालाच जमायचे नाही. तिच्याइतकी चपखल नजर कुणाचीच नव्हती. निधी फॅशन डिझायनिंगमधेच राहिली असती तर आतापर्यंत कितीतरी पुढे गेली असती. निधी वडलांच्या कंपनीमधे डीझायनिंग करत होती. पण ते काम म्हणजे काही क्रीएटीव्ह काम थोडीच.
आताची ही निधी मात्र डोक्यापासून पायापर्यंत कॉर्पोरेट वाटत होती. फॉर्मल स्कर्ट आणि शर्ट, सोबत एक बॅग. राल्फ लॉरें, लुई व्हितों आणि बरबेरी- मी फॅशन रीपोर्टरच्या कौशल्याने सर्वच ब्रँड्स ओळखले. तिच्या पिंगट केसांचा पोनीटेल बांधला होता. हातामधे महागडा भलामोठा सेलफोन. हलकासा पण जाणवणारा मेकप. आणि करड्या रंगाच्या काँटॅक्ट लेन्स.
"हेलो." मी हसत म्हटलं. निधीच्या समोर मी म्हणजे गबाळशिरोमणी. फॅशनजगताशी इतका जवळचा संबंध असूनपण मी अजून सुधरले नव्हते. जीन्स कुडता आणि मोकळे सोडलेले कुरळे केस हेच माझं जागतिक स्वरूप होतं. निधी माझ्या टेबलवर येऊन बसली.
"काय ऑर्डर केलंस?" तिने मेनू वाचत विचारलं. मी फक्त स्टार्टर्सची ऑर्डर दिली होती, निधीने पुढची ऑर्डर दिली. वेटर निघून गेल्यावर थोड्यावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग अचानक निधी मला म्हणाली.
"तुला खास कामासाठी बोलावलं आहे, जोई. आता मी जे तुला सांगणार आहे ते तू कुणालाही चुकूनसुद्धा बोलू नकोस."
निधीचं इतकं काय खास काम असावं माझ्याकडे?
"हे बघ निधी. आपण एकमेकीना चार पाच वर्षे ओळखतो. जे काही असेल ते बिन्धास्त सांग. माझ्याकडून जे शक्य होईल ते मी करेनच."
"ते माहित आहे मला, म्हणून तर मुद्दाम हे काम मी फक्त तुला सांगणार आहे."
वेटर आमची ऑर्डर घेऊन आला. खाण्यामधे निधीचे लक्षच नव्हते.प्लेटमधले सॅलड नुसते चिवडत होती. तिला नक्की काय सांगायचे आहे मी याचा अंदाज बांधत होते. काहीतरी बिझनेस रीलेटेड असे वाटत होते.
"जोई.... मला जिगरशी लग्न करायचं आहे." निधीने शेवटी हा बॉम्ब टाकला. मी जवळ जवळ उडालेच. माझ्या हातातला चमचा खालीच पडला. पण अर्थात ही काही तशी ब्रेकिंग न्युज नव्हती. जिगर निधीचा लहानपणापासूनचा मित्र. मित्र म्हणण्यापेक्षा काहीतरी अतिदूरचा नातेवाईक होता. कॉलेजमधे असताना आम्ही त्याला कित्येकदा भेटलो होतो. पण तेव्हा कधी जिगर आणि निधी कपल असतील असे वाटले नव्हते. आणि आता इतक्या वर्षांनी हे ऐकून मी अगदीच भंजाळले.
"कॉन्ग्रॅट्स निधी" मी स्वत:ला सावरत म्हटलं.
"क्या कॉन्ग्रॅट्स? मेरी पूरी बात तो समझ यार. मला जिगरबरोबर लग्न करायचे आहे. अजून जिगरला यामधले काहीही माहित नाही.. आणि जिगरला पटवायचे काम तुला करायचे आहे."
आता मात्र हे माझ्यासाठी सर्वच बाऊन्सर्स होते. मला खरंच काहीही समजेनासं झालं होतं.
"निधी, अगदी शांतपणे मला व्यवस्थित समजाव, आय अॅम कन्फ्युज्ड."
निधी त्यानंतर जवळजवळ अर्धा तास बोलत होती. तिचा प्रॉब्लेम मला लक्षात आला. आणि त्या प्रॉब्लेमवर शोधलेले तिने सोल्युशन देखील जबरी होते.
निधीच्या वडलांच्या मृत्यूनंतर घराची आणि कंपनीची सर्व जबाबदारी तिच्या काकांनी उचलली होती. त्याचबरोबर निधीच्या लग्नाचे वय झाल्याने तिच्यासाठी स्थळे शोधायची जबाबदारीदेखील आपखुशीने घेतली होती. निधीची अणि तिच्या आईची लग्नासाठी अजिबात इच्छा नसताना.. त्यांचा हेतू स्पष्ट होता, निधीच्या वडलानी स्वतःच्या मृत्यूपत्रामधे निधीला वारस केले होते पण एकदा का निधी लग्न करून आपल्या घरी गेली की बिझनेसमधे तिचा संबंध येणार नाही. आपखुशीने ती बिझनेस सोडून देइल. तिला दहेज वगैरे भरपूर दिलं की नंतर ईस्टेटीमधे वाटा द्यायला नकोच किंवा दिला तरी मामुली देऊन चालेल. यासाठी तिच्या काकांनी एन आर आय आणि अतीश्रीमंत खानदानामधले मुलगे शोधायला सुरूवात केली होती. निधी परदेशात गेली असती म्हणजे उत्तमच झाले असते. निधीच्या समाजामधे पैसा कितीही असला तरी मुलीसंदर्भातली मानसिकता अजून पुरातनकाळातलीच होती.
"म्हणजे बघ, मला काही बोलता येणार नाही. कारण त्यांचा हेतू खूप चांगला असंच सर्वाना वाटेल. मला मुंबई सोडून जायचं नाही तरी हे नातेपण तोडता येणार नाही. कंपनी चालवायला मला त्यांची मदत लागेलच. मला ही कंपनी सोडायची नाही. माझा डॅडनी खूप कष्ट केले आहेत. शिवाय मी आयुष्यात चूल आणि मूल न करता काहीतरी करावं हे त्यांचं स्वप्न होतं. माझे काका मला दूर सारून सर्व कंपनी स्वतःकडे घ्यायला बघत आहेत. आय हॅव टू डू समथिंग"
निधीचा प्रॉब्लेम समजत होता, पण या सर्व झमालझोल्यामधे जिगरशी लग्न हा उपाय कसा काय बसत होता हे मला अजून उमगलं नव्हतं.
"जोई, जिगर आमच्याच जातीतला आहे. शिकलेला आहे, मुख्य म्हणजे इथलाच आहे. त्याच्याशी लग्न केल्यावर मला मुंबई सोडून जायची गरज नाही. त्याचा ग्राफिक डीझायनिंगचा बिझनेस आता कुठे सुरू होतोय. तो त्याच्या बिझनेसमधे आणि मी माझ्या बिझनेसमधे लक्ष देऊ शकतो.."
"निधी, तू एक विसरतीयेस. जिगर तुझ्यापेक्षा गरीब आहे, तुझा बंगला जुहूला आहे आणि त्याचा वन बीएचके फ्लॅट बोरीवलीला. तुझे काका या लग्नाला तयार होतील?"
"अरे यार, आधी जिगर तरी हो म्हणू दे. मग दोन्ही काका-काकी-दादा-दादी सर्वाना तयार करू, प्रेम विवाह आहे म्हटलं की थोडे नाराज वगैरे होतील, पण शेवटी ऐकावंच लागेल त्यांना, मुख्य प्रॉब्लेम जिगरला कसे विचारू हा आहे. आणि त्यासाठी तुझी मदत हवी आहे. प्लीज... तू माझ्यासाठी जिगरला विचारशील? त्याला सर्व काही सांगितलेस तरी चालेल. पण प्लीज त्याला या लग्नासाठी तयार कर. माझ्याकडे वेळ फार थोडा आहे. काकीने ऑलरेडी युएसमधले रिश्ते शोधायला सुरूवात केली आहे."
वेटर येऊन प्लेट्स घेऊन गेला. दुसर्या एका वेटरने डेझर्ट आणून ठेवले. मी आणि निधी शांतपणे त्या डेझर्टच्या प्लेटकडे बघत होतो. दोघीच्याही मनात कॅलरीचे पाढे चालू असणारच.
वेटर निघून गेल्यावर मी म्हटलं. "तूच का नाही विचारत सरळ त्याला? तुझा लहानपणापासूनचा मित्र आहे ना?"
"एक्झॅक्टली. तो माझा फक्त मित्र आहे. अगदी नर्सरीमधे असल्यापासून आम्ही एकमेकाना ओळखतो. मैत्री आहे आमची. आणि एका दिवशी अचानक मी त्याला "जिगर माझ्याशी लग्न करशील का?" हे विचारू? कसं वाटेल ते? नको. त्यापेक्षा तू विचार."
"मग मी नक्की काय करू? त्याला जाऊन भेटू आणि म्हणू. "जिगर तू निधीशी लग्न कर. तिला तिची कंपनी चालवायची आहे." ते कसं वाटेल??"
"म्हणून तर तुला इथे बोलावलं आहे की. तूच सजेस्ट कर आता पुढचा गेम प्लान"
"ओके. मी तुला एकदोन दिवसात फोन करते आणि मग सांगते. तू मात्र तुला व्यवस्थित सांभाळ, सर्व ठिक होइल." निधीला जर जिगरशी लग्न करायचं असेल तर माझ्याकडून होईतो मदत मी केली असती, माझ्याकडून किमान तेवढंच करून झालं असतं.
"होप सो" निधी म्हणाली.
लंचचे बिल मीच पेड केले. मॅगझिनमधे काम करण्याच्या अनंत फायद्यापैकी एक. माझ्या पब्लिकेशनने "बिझनेस मीटिंग" म्हणून मला पैसे रीईम्बर्स केले असते.
ऑफिसमधे परत आले तरी जिगर-निधी हा विषय डोक्यातून काही केल्या जात नव्हता. जिगरला आज रात्री फोन करायचा आणि उद्या परवा भेटायचे हे मनात ठरवलेच होते. पण भेटायला काहीतरी ठोस कारण हवे होते. त्याचा विचार करता करताच मी मेलबॉक्स चेक करत होते. काय करायचे ते नक्की ठरत नव्हते. जिगरला आधी दोन तीनदा नुसतं भेटून मग त्याच्याशी जरा ओळख अजून वाढवून मग एके दिवशी त्याला निधीबद्दल सांगावं असं मला वाटत होतं. जरी कॉलेजमधे त्याला भेटलेले असले तरी गेल्या दोन तीन वर्षात अजिबात भेटले नव्हते. असंच विचार करत करत मेलबॉक्समधले मेल चेक बघत होते. एक अनपेक्षित मेल अचानक माझ्या नजरेला पडला, आता काम सोपं झालं होतं मी स्वत:शीच हसले. त्या मेलला लगोलग रीप्लाय केला. आता जिगरला फोन करण्यासाठी खास कारण हातात होते.
"हेलो. जुई बोलतेय"
"कौन जुई?" पलिकडून पंचामृतासारखा गोडमिट्ट आणि हृदयाचे ठोके चुकवणारा आवाज आला.
मी एक सुस्कारा सोडला. कॉलेजच्या ग्रूपमधे आणि त्यामधून झालेल्या माझ्या सर्व ओळखीमधे माझे नामकरण जोई ट्रीबियानी असे झाले होते. तिथे जुई नावाने ओळखणारे कुणीच नव्हते. जिगर निधीचा मित्र असल्याने त्यालापण जुई माहितच नसणार. आणि ही गोष्ट जर फोन लावल्या लावल्या माझ्या लक्षात आली असती तर माझे नाव जोई ठेवायची कुणाला गरजच नसती..
"जोई, निधी की दोस्त" मी आवाज शक्य तितका प्रोफेशनल ठेवत म्हट्लं.
"ओह, कैसी हो?" यानंतर आमचं एकमेकाना 'तू मजेत मी मजेत' हे विचारून झालं. शेवटी मी ज्या विषयासाठी जिगरला फोन केला होता त्या विषयाबद्दल बोलायला सुरूवात केली. सायलीचा एक बॉलीवूडी फ्रेंड नविन टीव्ही सीरीयल काढत होता. त्या सीरीयलच्या व्हिज्युअल्ससाठी कुणाची तरी गरज होती. नविनच प्रोजेक्ट असल्याने "कमीतकमी पैशात काम" ही प्रमुख अट असणार. सायलीने हा मेल निधीलासुद्धा पाठवला होता. निधी आणि जिगरची फ्रेंडशिप लेव्हल लक्षात घेता निधीनेपण या विषयावर त्याला माहिती दिली असण्याची शक्यता होती.
तरीपण मी त्याला "तुला भेटायचं आहे कारण एक महत्त्वाचं काम आहे." हे सांगितलं. मात्र भेटण्यासाठी त्याने "मेरे ऑफिस आ जाओ" हे ऐकवलं तेव्हा मी बेशुद्ध पडता पडता राहिले. त्याचं ऑफिस बोरीवलीला होतं. एवढ्या लांब जाणं तेही पावसातून ट्रेन उशीरा असताना. त्यापेक्षा निधी जिगरचे लग्न लावणे सोपे काम वाटलं. शेवटी त्याला "नको नको तूच बांद्र्याला ये" हे विनवून सांगितलं.
लगोलग निधीला फोन केला आणि सायलीच्या या ईमेलबद्दल तू जिगरला काही बोलू नकोस हे ऐकवलं. तिचे आणि जिगरचे दिवसातून वीसेकवेळा बोलणं असतं असं तिनेच सांगितलं होतं. नशिबाने या विषयावर त्यांचं काही बोलणं झालं नव्हतं. जगाच्या गावगप्पा मारता येतात मग स्वतःच्या लग्नाचं बोलायला काय धाड भरते कुणास ठाऊक? मी सायलीला फोन केला आणि त्या बॉलीवूड मित्राला घेऊन संध्याकाळी बांद्र्यामधे बोलावलं.
हे सर्व करून झाल्यावर मनात पुन्हा एकदा विचार आलाच, "हे सर्व का करतेय मी? मीच हे करायची काही गरज आहे का?"
मी जिगरला फार व्यवस्थित ओळखत नव्हते. निधीचा हँडसम मित्र इतकीच ओळख. तीही कॉलेजपुरतीच. कॉलेज संपल्यावर त्याला फार तर एक दोनदा भेटले असेन. त्यामुळे आता लगेच भेटल्या भेटल्या लगेच "तू निधीशी लग्न कर" असं आचरटासारखं बोलणं अगदीच विचित्र दिसलं असतं. म्हणून आधी तीनचारदा त्याला काहीतरी कामानिमित्त भेटावं आणि नंतर हळूहळू "तुझं निधीवर प्रेम आहे" असं त्याचं ब्रेनवॉशिंग करावं प्लान डोक्यात तयार होता.
निधीने आधीच जिगरची "सध्या" कुणीही गर्लफ्रेन्ड नाही हे मला सांगितलं होतं. यातला सध्या शब्द महत्त्वाचा. ती व्हेकन्सी भरून येण्याआधी मला तिथे निधीचा वशिला लावायचा होता.
संध्याकाळी ऑफिसमधून लवकरच निघून मी बांद्र्याला गेले. सायली आणि तिचा मित्र आयुष्मान (याचे आडनाव भव असेल का?) अर्ध्या तासात येणार होते. तितक्यात जिगर बाईकवरून उतरताना दिसला.
काही काही माणसं अशी असतात की त्याना बघितल्याबरोबर तुमच्या काळजाचा ठोका चुकतो. अशांपैकी एक जिगर होता. फॅशनविश्वाशी संबंधित असल्याने तथाकथित हँडसम हंक्स रोज बघायचेच. पण जवळ जवळ सहा फुटाची उंची, शांपूच्या अॅडमधे दाखवतात तसे सरळ आणि सिल्की केस, पिंगट डोळे. आणि चेहर्याच्या मानानं छोटंसं पण सुंदर नाक. जिममधे पैसे घालवून मिळवलेली बॉडी आणि पांढरा शर्ट आणि निळी जीन्स. या सगळ्या हॉटपणाला छेदणारा डोळ्यावरचा सोनेरी चष्मा. बॉय नेक्स्ट डोअर. निधीच्या "डिवा इमेजपेक्षा" याची अगदी उलट याची इमेज. जिगरला बघितलं की माझ्या हृदयात धकधक सुरू व्हायचं अगदी कॉलेजात त्याला पहिल्यांदा बघितल्यापासून.
"हाय, कैसी हो?" तोच गोडमिट्ट आवाज. फोनपेक्षा प्रत्यक्षात ऐकताना तर अजूनच.
"मी ठिक." काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेले. सायली येईपर्यंत आम्ही कॉफीची ऑर्डर दिली आणि उगाचच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो.
"निधी कशी आहे?" मी उगाचच विषय काढायचा म्हणून विचारलं.
"मी परवाच एकदा भेटलो होतो तिला. बिचारी टेन्शनमधे आहे. आधीच तिचे पपा गेले. खूप वाईट झालं त्यात परत तिच्या त्या काकानी वैत्ताग आणलाय. लग्नासाठी."
"ओह, म्हणजे नक्की काय ते मला समजलं नाही" मी मुद्दाम काही माहित नसल्यासारखं बोलले.
मग जिगरने सकाळी निधीने मला ऐकवलेली टेप परत ऐकवली. अर्थात निधीचा तो महाभयानक लग्नाचा प्लान सोडून.
"मग तुला काय वाटतं? तिने काय करायला हवं?" पाहुण्याच्या चपलेने विंचू मारून बघू या.
"मला वाटतं तिने सरळ लग्न करावं. आय मीन, बिझनेस वगैरे सर्व ठिक आहे. पण कधीनाकधी तिला लग्न करावंच लागेल ना? मग आताच का नको? बिझनेसमधली समझबूझ असणारा मुलगा बघायला हवा तिने. कारण लग्नासाठी बिझनेस सोडणं पण मला पटत नाही. त्याचसोबत तिच्यावर भरपूर प्रेम करणारा पण हवा. आफ्टर ऑल, प्रेमाशिवाय जीवन व्यर्थ आहे. " त्याने हे बोलून झाल्यावर एक क्षणभर विचार केला आणि अचानक मला म्हणाला. "जोई, तुझ्या आयुष्यात कुणी स्पेशल आहे का?"
मी काहीतरी बोलायला हवं होतं. पण नाही बोलू शकले. गरम गरम कॉफी एकदम प्यायली की जीभ असली भाजते. बोलायला काहीच सुचत नाही, दोन तीन सेकंद मी अशीच त्याच्याकडे बघत होते..
शेवटी तोच म्हणाला, "आय मीन, तुला राग नाही ना आला?"
"छे छे!!!" जमलं एकदाचं बोलायला... "त्यात रागावण्यासारखं काय? सध्या माझ्या आयुष्यात कुणीच स्पेशल नाही. असण्याची सुतराम शक्यतापण नाही. कामात इतकी बिझी आहे की विचारू नकोस"
"सेम हीअर"
तेवढ्यात सायली आणि तिचा तो आयुष्मान आले. थोड्याफार कामाच्या गप्पा झाल्या. बहुतेक जिगरला हे काम मिळेल असे वाटत होते. पण पूर्ण मीटिंग संपेपर्यंत मी थांबले नाही. कारण पाऊस परत सुरू झाला होता. हार्बर लाईन सकाळपासून चालू होती. त्यामुळे आता ती कधीही बंद पडली असती. आणि बंद पडल्यावर चालू व्हायला किती वेळ लागला असता कुणास ठाऊक. ट्रेन्स बंद झाल्या तर बांद्यावरून माझगांवला येणं मुश्किलच होतं. मी घरी आले तेव्हा जवळ जवळ आठ वाजून गेले होते. जिगरला भेटल्यामुळे सातव्या आसमानात वगैरे तर होतेच मी.
घरी आल्यावर लगेच निधीला फोन केला. म्हटलं काय घडलं ते तिला सांगू या.
निधीने फोन उचललाच नाही. त्यानंतर दोन तीनदा फोन केला तरी तिचा काहीच रिस्पॉन्स नव्हता. मधेच एक दोन एस एम एस जिगरचे आले होते. व्यवस्थित पोचलीस का वगैरे. सायलीने "लक्की यु" असा मेसेज पाठवला. ती संध्याकाळच्या पावसात अडकली असावी बहुतेक असं मला वाटलं... पण तसं नव्हतं.
शेवटी अकरा वाजता निधीचा फोन आला. तिचा आवाज एकतर खूप रडल्यासारखा होता किंवा खूप चिडल्यासारखा.
"जोई. काय केलंस तू?" हे एकच वाक्य दोन तीनदा म्हणाली तेव्हा वाटलं हिने काय दारू वगैरे प्यायली आहे की काय...
"निधी, तू काय बोलतेस ते समजत नाहीये? नीट सांग"
"नीट काय सांगू? जिगरचा मेसेज आलाय. थांब तुला फॉरवर्ड करते" इतके म्हणून तिने फोन कट केला.
दोन मिनीटानी निधीकडून एक फॉरवर्डेड मेसेज आला.
"निधी, आय लाइक युअर फ्रेंड जोई. उससे बात आगे बढाने के लिये मेरी कुछ मदद करोगी क्या?"
माझ्या हातातून फोन खाली पडला. जिगर लाईक्स मी? दॅट हँडसम बॉय लाईक्स मी? उड्या मारायच्याच शिल्लक होत्या माझ्याकडून. मोबाईल हातात घेऊन तो मेसेज दोन तीनदा परत मोठ्याने वाचला.
अणि नंतर पाच मिनिटांनी भानावर आले. वस्तुस्थिती काय आहे ते लक्षात आलं आणि जिगरचा मनापासून राग आला. हा चक्क मूर्खपणाचा कळस होता. या जिगरला जरा तरी अक्कल हवी होती की नाही?
मी निधीसाठी त्याच्याकडे सेटिंग लावत होते आणि हा माझ्याकडे बात आगे करायला बघत होता. की याच्याशी बोलताना माझ्याकडूनच काही गडबड झाली का? मी त्याच्यामधे इंटरेस्टेड असेन असं त्याला का वाटलं असेल? माझ्यातर्फे मी काही चुकीचे बोलले होते का? मनातल्या मनात त्याच्या आणि माझ्या भेटीचे सर्व संवाद मी आठवून पाहिले. पण तसं काही जाणवलं तर नाही. पण एकूणातच सगळाच घोळ झाला होता.
मी खुर्चीवरून उठले आणि रूमचे लाईट बंद केले. झोप तर येतच नव्हती. आज दिवसभर माझा अक्षरशः रोलरकोस्टर झाला होता. निधीला दुपारी भेटले तेव्हा तिने हा लग्नासाठीचा बॉम्ब टाकला. बॉम्ब नव्हे माझ्यासाठी तर परमाणूबॉम्ब होता. तो धक्का सहन करून जिगरला भेटायला गेले तर जिगरने हा दुसरा बॉम्ब टाकलेला.
मी सध्या स्वतःवरतीच खूप चिडले होते. खरंतर काहीच गरज नव्हती. पण मी चिडले होते हे मात्र खरं. याआधी किती वेळ जिगरला भेटले असेन. कितीवेळा बोलले असेन. पण तेव्हा त्याला माझ्या मनात काय आहे ते अजिबात समजू दिलं नव्हतं. आज असं नेमकं काय झालं की इतक्या वर्षानी जिगरला मी आवडले. मी काय रूपसुंदरी नव्हे की हॉट चिक नव्हे. निधीच्या बाजूला मी म्हणजे करीना कपूरच्या बाजूला कंगना रानावत. ती कंगना जरातरी परवडली, मी म्हणजे, जाऊ दे आता आत्मनिर्भत्सना तरी किती करायची? या जिगरला कॉलेजमधे असताना किंवा त्यानंतर कधी मी दिसले नव्हते? मग आजच का?
मला निधीला जाणूनबुजून काय अजाणतेपणी पण दुखवायचे नव्हते. नुकतीच ती तिच्या वडलांच्या निधनातून सावरत होती. त्यानंतर बिझनेसचे टेन्शन. त्यातून आता हे? असलं प्रकरण.
जिगरने हाच मेसेज जर आधी पाठवला असता तर... कदाचित निधीने लग्नासाठी जिगरचा विचार केला नसता, कदाचित माझ्या आयुष्यामधे जिगर आला असता... पण आता या जर तरला काहीच अर्थ नव्हता. निधीला जिगरशी लग्न करायचे होते. प्रेम्-अफेअर्-भानगड नव्हे. लग्न. शेवटचा शिक्का मोर्तब. आणि मी निधीला पुरेपूर ओळखून होते. तिच्या मनात एकदा एखादी गोष्ट बसली की ती काही केल्या स्वस्थ बसण्यातली नव्हती. तिच्यासाठी जिगरशी लग्न हा कंपनीसाठी आणि नातेवाईकांना कटवण्यासाठी योग्य निर्णय होता, कुणी कितीही मनवलं तरी ती बधली नसती.
आणि का बरे तिला कुणा मनवावे? जिगर तिचा बेस्ट फ्रेंड होता. माझा नव्हे. जिगर आणि निधी एकमेकासोबत आयुष्य घालवू शकत होते. निधीला तिच्या बिझनेसच्या दृष्टीने पण हा सौदा अति फायद्याचा होता. शिवाय जिगरच्या मनात निधीबद्दल कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर असणारच. मी म्हणजे जिगरसाठी सध्याचा एक टाईमपास असणार. नक्कीच.
सगळं आयुष्य म्हणजे टिपिकल बॉलीवूड लव्ह ट्रँगल झाल्यासारखंच.
तेवढ्यात मोबाईल पुन्हा वाजला.
निधीचा एसेमेस. "सॉरी". मी पण तिला "आय अॅम अल्सो सॉरी. कल बात करेंगे" असा मेसेज पाठवून टाकला. बिचारी, तिची तरी यामधे काय चूक? जिगर आणि त्याच्या या सर्व गर्लफ्रेंड्स हे सगळं निधीला आधीपासून माहित होतं की. त्यात नवीन काय? जिगर किती मोठा चालू आहे हे तिनेच मला कितीदातरी सांगित्लं होतं. तरी आता त्याच जिगरशी ती लग्नाचा विचार करत होती. बिझनेससाठी....
झोप तर येतच नव्हती. बेडवर नुसती बसून होते. डोक्यात विचारचक्र चालू होतेच. अचानक दिवा पेटला. रूममधला नव्हे. डोक्यातला. ही एवढी साधीसरळ गोष्ट माझ्या डोक्यात का आली नाही? मी डोक्यात इतकी राख का घालून घेत होते. जिगर मुळातच भानगडीबाज होता. त्याला मी आवडले काय, आणि सायली आवडली काय दोन्ही सारखंच. पण निधीच्या बाबतीत इतकी छोटी आणि महत्त्वाची बाब माझ्या नजरेत का आली नाही हे समजलं नाही. शेवटी एकदा "धिक्कार हो तुम्हारी दोस्तीका" असं मीच स्वतःला ऐकवलं. या सर्व प्रकरणाचा काय छडा लावून निकाल लावायचा हे मनाशी पाच मिनीटात ठरवून पण टाकलं. त्यानंतर निवांत झोपून गेले.
सकाळी उठले तर पावसाचा नामोनिशाण नव्हता. मलापण मनावरचं मळभ दूर झाल्यासारखं वाटत होतं. टीव्हीवरती चॅनलवाला ओरडून ओरडून पाणी कुठेकुठे भरले आहे ते सांगत होता.
शांतपणे ब्रेकफास्ट उरकला आणि निधीला फोन केला.
"निधी, काल रात्री..."
"जोई, आय अॅम सॉरी, खरंच. मी तुला असं काही म्हणायला नको हवं होतं. जिगरचा स्वभाव मला माहित आहे. तुझी यामधे काहीच चूक नसणार."
बरोबरे, जिगरला मी आवडले यात माझी काहीच्च चूक नाही, त्याला आवडले नसते तरी काहीच्च चूक नव्हतं... पण हे निधीला बोलून काय उपयोग?
"ते सर्व जाऊ दे. एवढी पण काही मोठी गोष्ट नाही. साधं त्याने "मी आवडते" एवढंच म्हटलय ना. लग्नाची मागणी नाही घातलीये. आपण दोघी काल यावर ओव्हर रीअॅक्ट झालो"
"हो म्हणून तर...सॉरी.. "
"हे बघ ते बाकीचं सर्व राहू दे. आता शांतपणे ऐक. मी काय सांगतेय ते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातलं काहीही जिगरला सांगू नकोस"
"ओके"
मी बोलत असेपर्यंत ती शांतपणे ऐकत राहिली. माझे म्हणणे तिला पूर्णपणे पटले असेल किंवा कदाचित नसेल. पण ती मला काहीच म्हणाली नाही.
फोन झाल्यावर मी ऑफिसची तयारी करायला लागले. तितक्यात मेसेज आला. जिगरचा मेसेज.
"आज मी टाऊनमधे आहे. आपण आज दुपारी लंचला भेटू या का?" अर्थात, आजच मला तुला भेटायचंच आहे रे बाबा. मी घराबाहेर पडून टॅक्सी केली आणि जिगरला मेसेज पाठवला. सिल्क रूट. दोन वाजता. जिगरचं अगदी आवडतं रेस्टॉरंट. निधीने मला सांगितलं होतं. त्याने स्वतःहून लंचला भेटायचं ठरवल्याने एक काम चांगलं झालं होतं. मला त्याला भेटण्यासाठी बोलवावं लागणार नव्हतं.
रात्रीपासून पाऊस जरा कमी झाला होता. मी घरातून बाहेर पडले तेव्हा जरासा रिपरिपत होता. म्हणजे अजूनच वैताग. या पावसाचं एक असत, जेव्हा मुसळधर कोसळत असतो त्यावेळेला भिजत जायला काही वाटत नाही. असा रिपरिपत असला की अगदी नकोसा वाटतो.
काल दिवसभर ऑफिस अगदी निवांत होतं. आज मात्र सर्वांना अंगात आल्यासारखं काम करायचं होतं. बॉसने मला खंडीभर फोटो सॉर्टिंगसाठी दिले. नजर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर असली तरी मनामधे निधीचे आणि जिगरचेच विचार चालू होते. मी काय बोलणार कसं बोलणार याची मनातल्या मनात उजळणी करत होते. शाळेत असताना भाषण पाठ करायचे अगदी तशीच. डोक्यात फारच घोळ व्हायला लागला तसं सगळं कागदावर लिहून काढलं. आणि मग तो कागद वाचत बसले. मधेच एकदा रेस्टॉरंटला फोन करून रीझर्वेशन कन्फर्म करून घेतलं.
या नादामधे एक कधी वाजला ते समजलंच नाही. निधीचा कॉल आला तेव्हा एकदम आठवलं. मग लगेच सगळं काम आवरलं. बॉसला काहीतरी गुळमुळीत कारण सांगितलं आणि लंचला बाहेर पडले. घड्याळात पाहिलं तेव्हा दीड वाजला होता. पाऊस अजिबात नव्हता त्यामुळे टॅक्सी पकडायच्या ऐवजी मस्त चालत जावंसं वाटलं.
रेस्टॉरंटला
पोचले तेव्हा जिगर दरवाज्यातच माझी वाट बघत होता.
त्याला बघितल्या बघितल्या मी काय बोलणार होते इत्यादि विसरूनच गेले. माझं हे असंच होतं कायम. त्यातून जिगरला बघितल्यावर तर..
.
असो. टेबलवर बसलो तेव्हा जिगर म्हणाला.
"जोई, तुला कॉलेजमधे बघितलं होतं तेव्हापासून आतापर्यंत तू जराही बदलली नाहीस"
काय वाट्टेल तो अर्थ घ्या या वाक्याचा. तू आधीसारखीच स्मार्ट आहेस, हुशार आहेस, सडपातळ आहेस, किंवा बावळट आहेस. कसाही अर्थ घ्या. उगाच बोलायचं म्हणून बोलायची जी वाक्य अस्तात त्यापैकी हे एक वाक्य.
मी नुसतीच हसले. मनातल्या मनात मघाशी लिहून ठेवलेला कागद डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात नजरेसमोर जिगर असताना अजून काही आठवणार कसं?
वेटर ऑर्डर घेण्यासाठी समंधासारखा फिरत होता. जिगरला ऑर्डर द्यायला सांगितली. तितक्यात मोबाईलची रिंग वाजली. "जाने कहा मेरा जिगर गया जी"
समोर बसलेला जिगर हसला. "माय फेवरेट सॉंग" मी कसंबसं पुटपुटले. सकाळी मोबाईलची रिंग टोन बदलायचीच असं ठरवलं होतं तरी विसरले. उगाच नाही माझं नाव जोई पडलं.
निधीचा फोन होता. तिला अगदी एक दोन शब्दांत काहीतरी सांगून मी फोन ठेवला. जिगरने ऑर्डर दिली होती.
"जोई, मी काल दुपारपासून फक्त तुझाच विचार करतोय." जिगर माझ्या डोळ्यात (खरंतर लेन्समधे पण असो) बघत म्हणाला.
विषय भलतीकडे जायच्या आत मला माझं म्हणणं मांडायला हवं होतं.
"जिगर. एक मिनिट थांब. तुला काय म्हणायचं आहे ते मला माहित आहे. पण आज आपण भेटण्याचा उद्देश वेगळा आहे,"
जिगरच्या चेहर्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह दिसले
"निधी. जिगर, मी इथे निधीसंदर्भात बोलायला आले. काही बोलायच्या आधी मी जे सांगते ते नीट ऐक. जिगर, मला तुझ्यामधे काहीही इंटरेस्ट नाही. कारण, अगदी कॉलेजमधे असल्यापासून मला एक गोष्ट माहित आहे" खोटं बोलण्यासाठी कुणी ऑस्कर देणार असेल तर माझे नॉमिनेशन पाठवून टाका प्लीज.
"जोई, निधी तुला काही म्हणाली का? आय मीन.. मला तसं..."
"हे बघ जिगर, आधी मी बोलतेय ते ऐकून घे. निधीचे वडील अचानक गेले. तिच्यावर किती मोठी जबाबदारी येऊन पडली आहे ते स॑र्व तुला माहित आहे. मी परत तुला ते सांगत बसत नाही. पण मला एक सांग. तू निधीला किती दिवसांपासून ओळखतोस?"
"दिवसांपासून? जोई, मला माझ्या आयुष्यातला एकही असा दिवस आठवत नाही जेव्हा निधी माझ्या लाईफमधे नव्हती."
"आणि तरीदेखील ती तुझी "गर्लफ्रेंड" होती का? " इथे गर्लफ्रेंड म्हणताना मीपण बर्याचदा मॉडेल्स करत असतात तसे कोट्स चे हातवारे केले. नंतर वाटलं उगाच!!! अगदी विचित्र दिसतं ते. आपल्याच डोक्यावर शिंगं काढल्यागत.
"काहीतरीच काय तुझं?" जिगर अगदी वैतागून म्हणाला. "निधी माझी फ्रेंड आहे. तिच्याबाबतीत मी असं कधी.. " त्याआधीच मी माझं बोलणं सुरू केलं.
"का नाही? जिगर, तू तिला इतक्या दिवसापासून ओळखतोस.. ती तुला ओळखते. तुम्ही दोघं एकमेकांबरोबर का खुश राहू शकत नाही. आय मीन, तुमच्या लग्नामुळे किती तरी प्रॉब्लेम.."
जिगरचा चेहरा भूत बघितल्यासारखा झाला.
"लग्न? लग्नाबद्दल कोण बोलतय?" तो जवळजवळ किंचाळलाच. आजूबाजूची सर्व माणसं आमच्याकडे वळून बघायला लागली.
अरे देवा!! कुठे गेला तो कागद? त्याच्यावर मी कसं अगदी हळूवारपणे जिगरला सर्व समजवायचं, त्याच्या मनामधे निधीबद्दल प्रेम आहे हे त्यालाच पटवून द्यायचं, मग लग्नाविषयी बोलायचं असं ठरवून ठेवलं होतं. सगळ्यावरती अक्षरश:.. सांगितलं ना, माझं हे कायम असंच होतं म्हणून. पण आता प्रसंग सावरायला हवा होता. अजून पंधरा मिनिटानी निधी आली असती. तोपर्यंत तरी बाजी मारत रहायला हवं होतं.
"हे बघ, जिगर, निधीला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तिच्या मते, आयुष्यामधे तिला तुझ्याइतकं समजून घेणारा दुसरं कोणी नाही... " इथून पुढे मला माझ्या भाषणची लिंक मिळाली. "निधी तुझी फक्त मैत्रीण नाही. ती मनातल्या मनात तुझ्यावर प्रेम करते. फक्त हे प्रेम आहे हे तिला नुकतंच उमगलय."
"पण जोई, माझं तिच्यावर प्रेम नाही." जिगर अगदी शांतपणे म्हणाला.
"असं तुला वाटतं. पण कधीतरी स्वतःलाच विचार. जिगर, तासनतास तिच्याशी फोनवर बोलत असतोस. तिच्या प्रत्येक सुख दु:खामधे तू तिच्यासोबत असतोस. जगामधे तुला सर्वात जास्त काळजी तिची. हे प्रेम नाहीतर काय आहे?"
"जोई, याला मैत्रीसुद्धा म्हणता येइल ना? प्रेम आणि मैत्रीमधे फरक आहे."
"आहे ना... नक्कीच फरक आहे. प्रेमाची सुरूवात कधीही मैत्रीपासूनच होते. आणि जिगर निधी सारख्यांच्या मैत्रीचा शेवट हा प्रेमामधेच होतो. किंबहुना तो व्हायला हवा. आयुष्याचा जोडीदार निवडणे हे फार सोपे काम नाही. त्यातून आयुष्याचा योग्य जोडीदार निवडणे हे तर अजूनच कठीण. निधी आणि तू नशीबवान आहात आपलं आयुष्य कुणाबरोबर काढायचं हे एकदा ठरवून मग नात्याला सुरूवात केली की नुसतीच नाटकं होतात. तू निधीला आणि निशी तुला या मुखवट्याच्या पलिकडे एकमेकाना ओळखता."
"पण जोई, लग्नासारखा मोठा निर्णय प्रेम वगैरे.."
"काय असतो रे लग्नाचा मोठा निर्णय? आज ना उद्या तुला घ्यावाच लागेल. निधीला तर तिच्या काका लोकांमुळे सहासात महिन्यात लग्न करावे लागेल. तेव्हा हे असे निर्णय घेण्यासाठी वाट बघत बसणार आहात का? जिगर, कधीतरी निधी दुसर्या कुणाची झाली, तुझ्यापासून दूर गेली तर.. हा विचार करून बघितला आहेस?"
जिगरच्या चेहर्यावर॑चे रंग उडत जात होते. मी पण काही न बोलता गप्प बसून राहिले. वेटर येऊन काहीबाही टेबलावर ठेवून गेला.
"जोई, पण निधी माझ्यावर प्रेम करते. हे तिने मला का नाही सांगितलं?"
"कदाचित तिला भिती वाटली असेल किंवा तिला असं वाटलं असेल की तू नकार देशील. काहीही कारण असलं तरी निधीचं तुझ्यावर निस्सीम प्रेम आहे. आणि मला असं मनापासून वाटतय की तुम्ही दोघं सुखाने एकत्र रहाल"
"सुखाने एकत्र रहायचा प्रश्न नाही जोई, निधीची आणि माझी अवस्था माहित आहे ना तुला? ती किती श्रीमंत आणि मी बोरीवलीत राहणारा.. हे लग्न कसं होइल?"
मला अत्यानंदाने टेबलवर चढून उड्या मारावाश्या वाटत होत्या. मिशन फत्ते झालं होतं. किमान जिगर "लग्न कसे होइल?" या प्रश्नापर्यंत आला होता. माझे काम निम्म्याने झाले होते. मुळात मला काल रात्रीपासून वाटत होतं तेच खरं होतं. निधी आणि जिगर एकमेकांवर प्रेम करत होते. पण त्याची त्यांना स्वतःलाच खबरबात नव्हती. माझं नशीब थोर म्हणून या असल्या टिपिकल बॉलीवूड लव्ह स्टोरीमधे मी तिसरा कोन म्हणून होते. या तिसर्या कोनाच्या मनात काय आहे ते मात्र या दोघांना माहितच नव्हतं, आता सांगूनदेखील उपयोग नव्हता.
"हे बघ जिगर, त्या सर्वाचा विचार तू आणि मी करून उपयोग नाही. तू निधीसोबत याची चर्चा कर. मी यापुढे यामधे काहीच बोलू शकणार नाही."
"जोई, हे सर्व फारच फास्ट घडतेय, आय मीन, मला काहीच समजत नाही"
"घाबरू नकोस." मी पुढे काही बोलणार तेवढ्यात निधी आमच्या टेबलजवळ आली. तिच्या चेहर्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं.
मला मात्र आता कसलंच टेन्शन राहिलं नव्हतं. "जिगर, निधी, तुम्ही दोघांनी आता तुमच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. माझं काम फक्त तुम्हाला तुमच्या प्रेमाची ओळख करून देणे इतकंच होतं."
निधीच्या चेहर्यावर आता मात्र अचानक आश्चर्य उमटलं.
"हो निधी. तुम्हाला दोघांना अजून कदाचित समजलं नाही. मला मात्र समजलं. तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. फक्त इतके दिवस तुम्ही या प्रेमाला मैत्री समजताय. निधी बिझनेससाठी तुझ्या मनात जिगरशीच लग्न करायचा विचार आला तेव्हाच खरंतर तुलापण समजायला हवं होतं. पण नाही लक्षात आलं. हरकत नाही. कधीकधी आपलं प्रेम एखाद्या व्यक्तीवर आहे हे समजायला एखादा क्षण पुरेसा असतो आणि कधीकधी आयुष्यभराची असलेली संगत असूनसुद्धा आपल्या मनामधे काय आहे ते समोरच्याला ठाऊक नसतं. "
निधी हसली. "जोई, मला खरंच माहित नाही.. मी काय बोलू?"
"काही बोलू नकोस. तू आणि जिगर खुश रहा एवढीच इच्छा. आता मी निघते. "
निधी आणि जिगरने काही बोलायच्या आत मी तिथून उठले आणि बाहेर पडले.
जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. निधी आणि जिगर दोघं मेड फॉर ईच अदर होते, अशीच मनाची समजूत घालत टॅक्सीत बसले. बाहेर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस चालू झाला होता. टॅक्सीवाल्याला ऑफिसचा पत्ता सांगितला आणि लगेच मोबाईल उघडून माझी रिंग टोन चेंज केली. "जाने कहा मेरा जिगर गया जी" गेली पाच वर्षे माझी रिंगटोन होती. जिगरला कॉलेजमधे पहिल्यांदा भेटले त्या दिवसापासून.... इतक्या दिवसानंतर आजच बदलली. "रूलाके गया सपना मेरा....."
(समाप्त)
Thursday, 2 May 2013
सूड
सुमतीबाई शांतपणे येऊन सोफ्यावर बसल्या. आतल्या खोलीतून सुधीरराव बडबडतच होते. त्यांचा आवाजदेखील सुमतीबाईना आत्ता नकोसा झाला होता. तिरीमिरीत त्यांनी बाजूचा रिमोट उचलला आणि टीव्ही लावला. टीव्हीवरती कुठलातरी साऊथचा मारधाडीचा सिनेमा चालू होता. त्याचा आवाज त्यांनी इतका वाढवत नेला की अख्ख्या फ्लॅटमधे तो धडाम धडाम आवाज दणदणायला लागला. बेडरूमममधून येणारा सुधीररावांचा आवाज ऐकू येईना झाला तरी त्या तशाच तिथे बसून राहिल्या.
पाचेक मिनिटानी त्यांनी टीव्ही बंद केला. सुधीररावांच्या बडबडण्याचा आवाज आता येत नव्हता. बहुतेक बोलून बोलून दमले असावेत. सुमतीबाईंनी डोळ्यात आलेले पाणी पदराने पुसले आणि उठून किचनमधे गेल्या. किचनमधल्या कपाटांमधे खाण्यासारखं कीही नव्हतं. मागच्या आठवड्यात दुबईवरून त्यांचा मुलगा श्रीधर आला होता तेव्हा सगळी कपाटं, डबे रिकामे करून गेला. चक्क नेऊन सगळं बाहेर रोहिणीला देऊन टाकलं. आपल्या आईने जास्त खाऊ नये ही त्यामागची काळजी की आईला जास्तीत जास्त त्रास कसा व्हावा म्हणून केलेले प्रयत्न? सुमतीबाईना पुन्हा एकदा भरून आलं. डॉक्टरांचं काय? ते सांगायचं तसं सांगतात, या वयात आहाराची काळजी घ्या म्हणून. पण त्यासाठी जराही खायला नको? अधेमधे तोंडात टाकण्यासाठी काहीतरी हवंच. आजच संध्याकाळी बेकरीमधे जाऊन थोडाफार खाऊ घेऊन येऊ या असं त्यांनी मनाशी ठरवलं. फ्रीझ उघडून बघितला तर त्यामधे चीज स्लाईसेस होते. त्यातले दोन स्लाईसेस त्यानी गबागबा खाल्ले. मग पेलाभर पाणी प्यायल्या. आता त्यांना जरा बरं वाटलं.. घड्याळात बघितलं सकाळचे आठच वाजत होते. अजून आजचा अख्खा दिवस जायचा होता.
सुमतीबाईंनी फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि समोरच्या फ्लॅटची बेल वाजवली.
बेलचा आवाज झाल्याबरोबर आतमधून एका अडीच वर्षाच्या आवाजाने "आन्नी आन्नी आन्नी"चा गजर चालू केला. चला, कुणालातरी आपली आठवण आहे म्हणायचं, त्या आवाजानेच त्यांचा सकाळपासून खराब झालेला मूड सुधारल्यासारखं वाटलं. सायलीने दरवाजा उघडला, त्याबरोबर तिची छोटी लेक राही धावत आली.
"या" सायली म्हणाली.
"आवरलं का सर्व" सुमतीबाई आत येऊन रोजच्या सवयीप्रमाणे खुर्चीवर बसत म्हणाल्या. राही लगेच उडी मारून त्यांच्या मांडीवर चढून बसली.
"कुठे काय? अजून आवरतंच आहे. ही महामाया लवकर आटपेल तर ना." सायलीने मोर्चा राहीकडे वळवला. "हे बघ. आंटी आल्या आहेत ना. चल आता वरणभात संपव पटकन." सायली एकीकडे राहीचं दप्तर भरत होती आणि दुसरीकडे तिला भरवत होती.
सुमतीबाईंनी तिथेच टेबलावर ठेवलेला वरणभात घेतला आणि तिला भरवायला सुरूवात केली. एक घास खाल्ला आणि लगेच इकडे तिकडे पळायला सुरूवात. या लहान मुलांना इतकी एनर्जी तरी कुठून येते कुणास ठाऊक? आपण जरा जिने चढलो की दमतो असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला.
"काल काय शिकवलं मग शाळेत?" सुमतीबाईंनी राहीला विचारले.
राही तिच्या बोबड्या भाषेत कुठलंतरी नर्सरी र्हाईम म्हणायला लागली. सोबत छान हातवारे.
"ब्रेकफास्ट झाला?" सायलीने विचारलं. कुणी बघत असू दे अथवा नसू दे, राहीचं करमणूक स्टेशन चालूच राहिलं.
"हो. अगं आज घारगे केले होते. तुला द्यायचेच राहिले. थांब राहीला शाळेत सोडून आलं की तुला आणून देते. "
"अहो, राहू देत हो आंटी. तुमच्या आधीच्याच कितीतरी प्लेट्स आहेत माझ्याकडे. मी काही खास करत नाही आणि तुम्हाला कधीच काही देत नाही. तसंही मला तुमच्याइतके प्रकार कुठे करता येतात?"
"का ग? तुझ्यासारखे केक आणि ते पास्ताफिस्ता कुठलं जमतय आम्हाला"
सायली हसली. सुमतीबाईनी राहीला पुन्हा एकदा घास भरवला.
"रेसिपी वाचून वाचून करते. तुमच्याइतकी एक्स्पर्ट नाही कशातच."
"सवयीचा प्रश्न असतो गं. माझ्या वयाची होशील तेव्हा तू पण एक्स्पर्टच होशील."
सायली परत हसली. आपल्याला पण एखादी मुलगी असती तर किती बरं झालं असतं. मनातलं काहीबाही लेकीला सांगता येतं. एकुलत्या एका लेकाला काही सांगायला गेलं की त्याची "तुला काही कमी आहे का?" इथेच सुरूवार. कधी कधी काही कमी आहे म्हणून नाही तर जास्त आहे म्हणून पण मनाला त्रास होत असतो हे त्याच्या लक्षातच येत नाही, त्याला कोण काय करणार?
सायलीने सुधीररावांचा आवाज ऐकलाच असेल. त्यांचा चिडलेला आवाज म्हणजे अख्ख्या बिल्डिंगला ऐकू जाणारा. पण सायलीने एका शब्दाने कधी त्यांना विचारलं नव्हतं.. बिल्डिंगमधे इथे रहायला आली तेव्हाच सुधीरराव आपले शेजारी आहेत हे ऐकून तिला किती आनंद झाला होता. तशी सुधीररावांची पुस्तकं तिने वाचली होती अशातला पण भाग नाही.
"माझं वाचन थोडं कमीच आहे. पण आम्हाला शाळेत सुधीररावांचा एक धडा होता. मराठीच्या पुस्तकात" तिने आल्याआल्या दुसर्या दिवशी सुमतीबाईंना ऐकवून टाकलं होतं. सायलीच्या नवर्याचं साहिलचं वाचन मात्र अफाट होतं. सुधीररावांची कितीतरी पुस्तकं त्यानं वाचली होती, पण इथे रहायला आल्यावर सुधीररावांना भेटायची वगैरे काही तसदी घेतली नव्हती. एकदोनदा सहज पार्किंग लॉटमधे वगैरे दिसल्यावर मान हलवून हॅलो म्हटलं असेल तेव्हढंच. सुमतीबाईंना मनोमन वाटायचं की कदाचित, पुस्तकांमधून दिसणारा सुधीर रावांचा खोटा चेहरा साहिलने ओळखला असावा.
सुधीर राव फार मोठे लेखक होते. कित्येक पुरस्कार मानसन्मान त्यांनी मिळवलेले होते. काही पुस्तकांच्या निमित्ताने देशापरदेशात फिरून आलेले होते. पण सुमतीबाई मात्र याच गावात आणि याच फ्लॅटमधे कायम. कित्येकदा सपत्निक आमंत्रण असूनदेखील सुधीरराव तिला कुठे नेत नसत. "मला तुला कुठे न्यायची लाज वाटते" हे त्यांनी कित्येकदा बोलून दाखवलं होतं. त्यामागे नक्की कारण काय असावं हे सुमतीबाईंना कधीच समजलं नव्हतं. लग्न झालं तेव्हा त्या अगदी बारीक सडपातळ होत्या, नंतर काही वर्षांनी वजन वाढलं तसं सुधीर रावांनी "ही असली जाडी बायको घेऊन लोकांमधे वावरायला शरम वाटते" हे तुणतुणं चालू केलं. सुमतीबाई किचनमधे येऊन भराभरा तोंडात काहीतरी कोंबून अपमान गिळून टाकायच्या, वजन वाढतंच राहिलं. त्याचबरोबर अपमानाचे डोसदेखील.
राहीचं सर्व आवरून सायली आणि सुमतीबाई बाहेर पडल्या. तिला प्लेस्कूलमधे सोडून दोघींनी रोजच्या क्रमाने भाजीखरेदी केली. घरी परत येत असताना सुमतीबाईंचा खाऊ आणायची आठवण आली.
"संध्याकाळी आज टेकडीवर नको गं जाऊस, जरा त्या शिवम बेकरीमधे जाऊ या" जिना चढताना त्यांनी सायलीला सांगितलं. अवघे दोन जिने चढताना पण त्यांना दम लागायचा. सायली मात्र त्यांची आणि स्वतःची भाजीची पिशवी घेऊन चटचट चढून जायची. शिवाय रोज संध्याकाळी साहिल घरी आला की बिल्डिन्गजवळच्या टेकडीवर वॉकसाठी म्हणून ट्रॅक सूट घालून, शूज घालून एकटी जायची. राहीला खुशाल साहिलसोबत सोडून. मला मेलं इतकं स्वतःसाठी कधी काही करताच आलं नाही... सतत नवरा आणि मुलगा यांच्याच व्यापात राहिले, पुन्हा एकदा सुमती बाईंच्या मनामधे कडवट विचार येऊन गेला. "कशाला नसती नाटकं वजन कमी करायची? त्यापेक्षा खाणं कमी करा, चार माणसांचं जेवण तुला एकटीला लागतं" असं सुधीर रावांनी ऐकवल्यावर मग कशाला उत्साह राहतोय चालण्याचा?
फ्लॅटचा दरवाजा उघडून आत आल्याची चाहूल सुधीररावांना लागली असावी पण त्यांचा काही आवाज आला नाही. सुमतीबाईंनी ते जागे आहेत का हे बेडरूमच्या दारापर्यंत जाऊन बघितलं, ते बेडवरती शांत बसून होते... पण आत्ता सुधीरराव काहीच बोलले नाहीत.. सुमतीबाईंकडे पाहून त्यांनी न पाहिल्यासारखं केलं. सकाळच्या एवढ्या तमाशानंतर आता काय बोलायला शिल्लक राहिलं असेल- असं मनातच म्हणत सुमतीबाईंनी आणलेली सगळी भाजी निवडून फ्रीझमधे ठेवली. त्यातला पालक अगदी ताजा आणि कोवळा होता म्हणून निवडायला बाजूला ठेवला. भाताचा कूकर लावला. काल मळून ठेवलेली कणिक बाहेर काढून ठेवली.
सुमतीबाई बेडरूममच्या दाराशी जाऊन पुन्हा उभ्या राहिल्या. सुधीरराव टीव्हीचे चॅनल बदलत राहिले.
"चहा घेणार का?" त्यांनी हळू आवाजात विचारलं होतं.
सुमारे तीन तासापूर्वी त्यांनी हाच प्रश्न विचारला तेव्हा सुधीरराव उसळून म्हणाले होते. "चहा कशाला? विष घेऊन ये थोडं. ते पितो आणि उलथतो एकदाचा" त्यानंतरची त्यांनी बडबड अखंड चालू होती. सुधीर रावांची बडबड चालू होण्यासाठी आपण काही चूक केलेली असायलाच हवी असं नाही हे सुमतीबाईंच्या केव्हाच लक्षात आलं होतं, अगदी लग्नानंतर दहापंधरा दिवसांतच.
आता मात्र शांतपणे "दे" इतकंच म्हणाले.
गेल्या वर्षी जीपमधे बसताना ड्रायव्हरने अचानक जीप चालू केल्याने सुधीर रावंचा अपघात झालेल होता. तेव्हापासून दोनदा त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं होतं. पण या सर्जरीनंतर सुधीर राव आधीसारखे चालू फिरू शकत नव्हते. घरातल्या घरातच वॉकर घेऊन चालणं जमत होतं. पण हा अपघात झाल्यापासून सुमतीबाईंची साडेसाती मात्र चालू झाली होती. सुधीर रावांचं सगळं चिडणं, ओरडणं आता चोवीस तास घरी बसूनच. कारण, एरवी सुधीर राव दिवसभर घराबाहेर जात, कधी बाहेरगावी दौर्यावर जात पण या आजारपणामुळे त्यांचं बाहेर जाणंच थांबलं होतं. दुबईला असणारा श्रीधर आणि त्याची बायको एक दोनदा येऊन गेले होते. पण त्यांच्या येण्या अथवा जाण्याने सुमतीबाईंना फारसा फरक कधीच पडायचा नाही.
सुमतीबाई किचनमधे आल्या. चहाचं पातेलं गॅसवर चढवलं होतं. तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली. वैजू आली असणार. आल्या आल्या लगेच तिच्या तोंडाचा पट्टा चालूच झाला. वैजू आली की सगळ्या बिल्डिंगच्या बातम्या घेऊन येणार. बिल्डिंगच्या खालीच असलेल्या छोट्याशा खोलीत वैजू आणि तिची आई रोहिणी रहायच्या. बिल्डिंगमधल्या बारा फ्लॅटपैकी दहा फ्लॅटमधे दोघी घरकाम करायच्या. रोहिणी आली की गुपचुप काम करून निघून जायची. तोंडातून एक अक्षरदेखील न काढता. वैजू मात्र जणू रेडीओ. अख्ख्या बिल्डिंगची माहिती तिच्याकडे असायची. सुमतीबाई पण टाईमपास म्हणून तिच्याकडून गॉसिप ऐकून घ्यायच्या.
वैजूने झाडू मारायला घेतलं आणि सुमतीबाईंनी तिला घासायची भांडी बाजूला काढून ठेवली. चहाच्या आधणात अजून थोडं पाणी घालून वाढवलं.
"काकी, तुम्हाला माहिताय समोरचे आहेत ना, ते रोज सकाळी चहा करतात" सुमतीबाईंना हसूच आलं. वैजूचा हा सगळ्यात कुतूहलाचा विषय होता. वैजू जवळजवळ पस्तीशीला आली होती. लग्नानंतर तीन की चार दिवसांत नवर्याचा खून झाला, तेव्हापासून ही बिल्डिंगच तिचं घर झालं होतं.
पण वैजूला सायलीच्या घराचं कसलंतरी जबरदस्त आकर्षण होतं, कदाचित थोडाफार हेवादेखील वाटत असेल. सायलीचा नवरा मराठी नव्हता, उत्तरप्रदेशकडचा होता. पण चांगलं मराठी बोलायचा, सायली त्याला नावाने हाक मारते, तो घरामधे सगळी कामं करतो. स्वयंपाक करतो. सकाळी उठून चहा करतो, सायली लेकीला त्याच्याकडे ठेवून स्वत: बिनधास्त फिरायला जाते, अशा अनेक गोष्टींचं वैजूला आश्चर्य वाटायचं आणि हे सगळं ती मनमोकळेपणाने सुमतीबाईंना ऐकवत असायची. तिने तर कुठल्याच संसाराचा अनुभव घेतला नाही, म्हणून तिला हेवा वाटत असेल. पण आपलं काय? कळत नकळत का होईना, आपण पण मनातल्या मनात कधीतरी सायलीची आणि आपल्या संसाराची तुलना करतोच की. सुखाचा संसार, प्रेमाचा संसार कसा असतो याचं जणू ते जोडपं आदर्श रूप होतं. आपल्या संसारासारखं नाही, एकाने सांगायचं आणि दुसर्याने कायमच ऐकायचं... त्यांच्यात पण कुरबुरी होत असतील, भांडणं होत असतील पण तरी किमान बायकोच्या मताला काहीतरी किंमत द्यायचा मोठेपणा तरी त्या साहिलजवळ आहे. सुमतीबाई स्वतःशीच हसल्या, कारण मनातच त्यांनी साहिल बायकोचं ऐकू शकतो याला "मोठेपणा" बहाल केला होता.
वैजूची बडबड ऐकत सुमतीबाई सोफ्यावर बसून राहिल्या. बोलण्याइतकाच वैजूचा हात कामामधे पण चालत होता. तिचं झाडून झाल्यावर सुमतीबाईंनी तिला कपभर चहा दिला. सुधीरराव टीव्ही बघत बसले होते, सुमतीबाई ट्रेमधे चहाचा कप घेऊन त्यांच्या रूममधे गेल्या. सुमतीबाईंनी चहा त्यांच्या हातात देण्याआधीच सुधीरराव करवादले.
"आताच फोन आला होता, आज दुपारी ते भावे येणार आहेत. तेव्हा खायला काहीतरी ताजं बनव. मागच्या वेळेसारखं ट्रेमधे बिस्कीटं आणून ठेवून लोकाच्या घरात जाऊन बसू नकोस." आता सुधीररावांनी परत नेहमीचा आवाज चढवला होता. सुमतीबाई वैजूला किंवा रोहिणीला काम सांगताना याहून अधिक मवाळपणे सांगायच्या. त्या महिन्याच्या रोजंदारीवर काम करायच्या, आपल्यासारखं मंगळसूत्राच्या मजूरदारीवर नव्हे, आता हे भावे नक्कीच पुस्तकांच्या कामासाठी येणार असतील. मागच्यावेळेला पंधरावीस दिवसांपूर्वी आले होते तेव्हा सुधीररावांची आणि त्यांची काहीतरी वादावादी झाली होती. सुमतीबाई नेमक्या सायलीकडे जाऊन बसल्या होत्या, अचानक एकाएकी सुधीर रावांचा चढलेला आवाज ऐकू आला आणि भावे ताडताड घराबाहेर निघून गेले होते. नंतर सुधीर रावांना एक दोनदा त्यानी विचारलं या भांडणाबद्दल, तर सुधीररावांनी काहीही उत्तर दिलं नव्हतं. नक्की काय घडलं असावं यांचा त्यांना थोडातरी अंदाज आला होता... भाव्यांनी मागे एकदा सुमतीबाईंनाच विचारलं होतं. "तुम्ही सुधीररावांवर एखादं पुस्तक लिहाल का म्हणून... सध्या अशा पुस्तकांना फार मागणी आहे..." सुधीररावांनी सुमतीबाईंना बोलायचादेखील चान्स न देता परस्पर "तिला वाचनाची आवडसुद्धा नाही.. लिखाण काय करणारे ती?"
त्या क्षणाला सुमतीबाईंना जो अपमान वाटलेला, तितक्या तोडीचा अपमान सुधीर रावांनी गेल्या कित्येक वर्षात केला नव्हता. त्या अपमानाने सुमतीबाईंच्या मनामधली जानकी जिवंत झाली. त्या एका वाक्याने सुमतीबाईंच्या मनामधे आठवणींच्या अनेक धाग्यांचा गुंता सुटून एक एक प्रसंग डोळ्यासमोर यायला लागला. कॉलेजमधे खूप हुशार म्हणून एमए पर्यंत शिकायचंच ही जिद्द ठेवलेली जानकी. त्यानंतर वर्गातल्याच सुधीर नावाच्या शांत, हुशार आणि मितभाषी मुलाशी ओळख झाली. खूपशा आवडीनिवडी सारख्या. दोघांनाही वाचनाची आवड, लिखाणाची आवड, जानकीच्या एक दोन कविता तेव्हा मसिकातून छापून आल्या होत्या. सुधीरचं बहुतेक लक्ष कथाकादंबरीकडे असायचं. जानकी बोलता बोलता बर्याचदा त्याला कथेमधे सुधारणा सुचवायची. सुधीर तेव्हा तिला "इतकं छान सुचतं तुला, तू पण लिहीत जा की" म्हणायचा. जानकी तेव्हा नुसती हसायची. तिचा खरा ओढा कवितेकडेच होता. तिला कवयित्री व्हायचं होतं. दोघांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात वगैरे व्हायच्या आधीच घरच्यांना यांच्याबद्दल समजलं. त्याचदरम्यान सुधीरला बँकेमधे नोकरीदेखील लागली होतीच. जातपात, शिक्षण, रंगरूप या कशावरूनही काहीही अंतर येत नसल्याने दोघांच्या घरच्यांनी लग्नाचं ठरवून टाकलं. जानकीने त्यावेळेला शिक्षणापेक्षा लग्न महत्त्वाचं मानलं. नाहीतरी आजनाउद्या लग्न करायचंच होतं की. कुणातरी अनोळखी माणसासोबत संसार करण्यापेक्षा मित्रासारखा असलेला सुधीर चांगला असा तेव्हा तिने विचार केला.
त्या वेळेला सुमतीला यामधे चूक काही वाटलंच नाही. सुधीरवर तिचं प्रेम होतं का? तिलाही माहित नव्हतं. सुधीरचं तिच्यावर प्रेम होतं का? त्यालाही माहित नव्हतं. पण आपल्या आवडीनिवडी इतक्या सारख्या आहेत तर दोघांचंही आयुष्य खूप सुखाचंच जाईल असं तिला वाटलं होतं हे मात्र निश्चित. पण ज्या दिवशी तांदळाच्या दाण्यांमधे जानकी पुसून गेली, आणि सुमती सुधीर राव जन्माला आली तेव्हाच तिचं स्वतःसाठी जगणं संपून गेलं होतं. सुमतीबाईंचा संसार सुखाचा झाला हे मात्र खरं. पण त्यातलं किती सुख त्यांच्या वाट्याला आलं याचा हिशोब फक्त त्यांनाच माहिती होता.
लग्नानंतर हळूहळू सुधीर रावांचे कथासंग्रह, कादंबर्या गाजू लागल्या. 'स्त्रियांचं दु:ख आणि वेदना नेमकेपणाने शब्दांत मांडणारे लेखक' अशी त्यांची ओळख बनत गेली आणि घरामधे सुमती एक गृहकृत्यदक्ष गृहिणी बनत गेली. श्रीधरचा जन्म झाला, घराण्याला वंशज मिळाला आणि तिच्या आयुष्याचं कृतकृत्य झालं. अर्थात लग्नानंतर तिनेदेखील अधूनमधून कविता केल्या, पण त्या प्रसिद्धीला पाठवायच्या आधीच सुधीररावांकडून "काहीही लिहितेस तू, हे असलं भिकारडं कुणी वाचणार आहे का?" ही टिप्पणी ऐकून फाडून फेकल्या. त्यानंतरच्या कित्येक कविता मनातच विरत गेल्या, नंतर नंतर कागदपेनाचा उपयोग वाण-सामानाच्या याद्या लिहिण्यापुरताच राहून गेला.
नक्की कशानं झालं आपलं आयुष्य असं? सुमतीबाई विचार करत होत्या. काय चुकत गेलं? जगाच्या दृष्टीने आपण कायम "नवर्याची खंबीर साथ देणारी, घरसंसार व्यवस्थित टुकीने करणारी" राहिलो. पण मनाच्या दृष्टीने? मनाच्या दृष्टीने आपण कायम पराभूत राहिलो. आश्रीत राहिलो. स्वतःला विसरून दुसर्याच कुणाच्या तरी सावलीमधे बांडगूळ बनून जगत राहिलो. असं जगताना इकडे तिकडे थोडासा विरंगुळा शोधायचा. त्या विरंगुळ्यालाच जगण्याचं कारण मानत जगायचं. अख्खं आयुष्य सरून गेलं आता काय... विचार करायचा? कशाचा विचार करायचा आणि किती विचार करायचा?
कधीकाळी वाचनाची-लिखाणाची आवड होती, नंतर नंतर फक्त वाचनाची आवड राहिली, आणि गेल्या वीस वर्षामधे तर तीपण आवड राहिली नाही.. सुधीर रावांचं म्हणणं काही चूक नव्हतं. सुमती बाई हल्ली काही वाचतच नव्हत्या, पण ही आवड नक्की कशामुळे राहिली नव्हती हे सुधीर रावांना माहित नव्हतं अशातला भाग नाही.
सतत अपमान.. अपमान.. अपमान..
दरवेळेला आयुष्यामधल्या त्यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेसोबत हा अपमान कायमचा होताच. अगदी लग्न झाल्यापासूनच. किंबहुना लग्नातल्या मांडवात असल्यापासूनच, तेव्हा जानकी अजून सुमती झाली नव्हती.
सुमतीबाईंना आजही तो प्रसंग आठवला की लाजिरवाणं वाटायचं. जानकीचा मात्र संताप संताप व्हायचा.
सकाळीच देवक बसवलं होतं. दुपारी मंगलाष्टका झाल्या होत्या, त्यानंतर बाकीचे विधी वगैरे चालूच होतं. जेवायला वाजले होते दुपारचे चार.
चारवाजता नवरा-नवरी आणि इतर पाहुणे जेवायला बसले तेव्हा चेष्टामस्करीला ऊत आला होता. जानकीच्या घरच्यांकडून सर्व काही रीतीभातीप्रमाणे व्यवस्थित लग्न झाल्याने सुधीरकडचे लोक पण आनंदात होते. एकूणात कुणालाच नावं ठेवायला काही जागा नव्हती. पंगत बसली आणि सर्वांनी "नाव घ्या नाव घ्या" असा आग्रह सुरू केला. जानकीने एक छानसा सुंदरसा उखाणा स्वतःच रचून ठेवला होता या प्रसंगासाठी. सुधीरने जानकीला एक जिलेबीचा तुकडा भरवला. नाव वगैरे काही घेतलं नाहीच. पण त्याला भरवायला म्हणून जानकीने जिलेबी उचलली तेव्हा सुधीरने सर्वांच्या समोर "मला कुणाचं उष्टं खाल्लेलं चालत नाही," असं सांगितलं. उपस्थितांपैकी कुणीतरी "अरे त्यात काय? ती काय उष्टं थोडीच भरवतेय. ताटातलं तर आहे तिच्या, पद्धतच आहे ती" असं म्हटलं.
"मला आवडत नाही, दुसर्याच्या ताटातलं खायला" एवढं म्हणून सुधीरने सरळ त्याच्या ताटातला वरण भात कालवून जेवायला सुरूवात केली. जानकीच्या हातातली जिलेबी तशीच राहिली. आणि मनातला तो खास त्याच्यासाठी रचलेला उखाणदेखील. त्याच दिवशी संध्याकाळी जानकीची सुमती बनून गेली; आणि ही आठवण मनामधे कुठेतरी विरून गेली. अगदी मागच्या महिन्यापर्यंत सुमतीबाईंना हा प्रसंग कधीच आठवला नव्हता.
एकदा असंच कधीतरी सायलीच्या घरामधे त्या अळूवड्या घेऊन गेल्या होत्या. तेव्हा तिने "साहिल, काय ऑस्सम झाल्यात बघ या वड्या" म्हणत ती खात असलेली वडी त्याला भरवली, तेव्हा सुमतीबाईंना हा मांडवातला प्रसंग लख्खपणे आठवून गेला होता.
'मला कुणाचं उष्टं खाल्लेलं चालत नाही' असं म्हणाला होता ना सुधीर तेव्हा. मग आता? आता कसं काय चालतं?
सुमतीबाई स्वतःशीच हसल्या. अगदी मनापासून आनंदाने हसल्या.
त्यांच्या हातामधे सुधीर रावांसाठी बनवलेला चहा होता. आणि मघाशी स्वयंपाकघरातून बेडरूममधे आणण्याआधी सुमतीबाई त्या चहामधे पच्चकन थुंकल्या होत्या.
समाप्त
Wednesday, 1 May 2013
स्लॅमबुक
रत्नागिरीला मागच्या वेळेला गेले होते तेव्हा माझं पुस्तकांचं कपाट आवरत असताना अचानक माझी बारावीची स्लॅमबुक मला मिळाली. गेले दहा बारा वर्षं ही स्लॅमबुक इथेच असूनपण मला कशी काय दिसली नव्हती कुणास ठाऊक.. कपाट आवरायचं सोडून मी ती स्लॅमबुक वाचण्यातच गर्क झाले. किती आठवणी, किती मित्र-मैत्रीणी... ही स्लॅमबूक वाचल्यावर अगदी शोधशोधून दहावीची आणि नंतर ग्रॅज्युएशनची (ही अगदी इस्टमन कलर शोभेल इतक्या कलरफुल रंगांनी भरलेली) स्लॅमबूक शोधून काढली आणि वाचतच बसले. ग्रॅज्युएशननंतर स्लॅमबूक्स लिहिण्याचा उत्साह संपला कारण तेव्हा ऑर्कुट नामक व्हर्च्युअल स्लॅमबूक अस्तित्त्वात आलं होतं. हल्लीची शाळा कॉलेजची मुलं अशी स्लॅमबूक लिहितात तरी की नाही, कुणास ठाऊक!!
खरंतर या स्लॅमबुक घेतल्या होत्या त्या मित्रमैत्रीणींच्या आठवणी जपण्यासाठी.. प्रत्यक्षात स्लॅमबुक वाचायला घेतली आणि डोक्यामधे आठवायला लागलं भलतंच काहीतरी.... हे स्लॅमबूक म्हणजे स्वीट, लव्हेबल( की लव्हली???) अँड आफेक्शनेट मेमरीज बूक. त्यावेळेला असं जेन्युईनली वाटायचं की आठवणी अशा वहीमधे नोंदून ठेवता येतील. पण मैत्रमैत्रीणींच्या आठवणी त्या स्लॅमबूकच्या कागदामधे मावणं अशक्यच हे तेव्हा कधी लक्षातच आलं नाही हे आता इतक्या वर्षानंतर जाणवतंय..
आपण दहावीची परीक्षा देऊन किती वर्षं होऊन गेली ते सहज मोजून पाह्यलं तर माझाच विश्वास बसेना, इतकी वर्षं... तपापेक्षा जास्त काळ उलटून गेला... कशी काय गेली इतकी वर्षं? काल परवा तर आपण युनिफॉर्म घालून दप्तरामधे डबा-चष्मा-पाण्याची बाटली घालून शाळेला जात होतो. वाढत्या वयासारखा चष्म्याचा नंबर पण वाढत गेला आणि कायमचाच नाकावर येऊन बसला. दहावीमधे लांबसडक असणारे केस जाऊन तिथे बॉबकट कधी आला आणि तेव्हा "हवा आली तर उडून जाशील" अशा शरीराची मी सध्या कॅलरीकाट्याकडे बघून जेवतेय.... बदल तर खूप झाले पण इतक्या वर्षांनी हातामधे धरलेल्या त्या तीन स्लॅमबुक्सनी मला परत एकदा शिर्के शाळेच्या त्या दहावी 'अ'च्या वर्गातून गोजोच्या त्या बारावी सायन्सच्या वर्गातून मग महर्षी कर्वेच्या वर्गांमधे घुमवून आणलं. ही सगळी स्लॅमबुक्स माझ्यासाठी तरी आठवणींचं एक दालन उघडणारीच. पण त्या आठवणी मात्र माझ्या मनातल्या, त्या स्लॅमबुकवर फक्त अक्षरांची मांडामांड तेवढीच.
बोर्ड परीक्षेचं वर्ष "म्ह्त्त्वाचं वर्ष" असलं तरी परीक्षेच्या जस्ट आधी वर्गभरामधे या स्लॅमबुक्सची देवाण घेवाण सतत चालू असायची. मग त्यामधे नाव, गाव, आवडता हीरो, आवडता सिनेमा, तुझ्याबद्दल काय वाटतं, बेस्ट मेमरी इत्यादि इत्यादि सर्व मजकूर लिहावा लागायचा. आमच्यासारखे चित्रकलेमधले ढ लोकं आर्चिस अथवा तत्सम दुकानांमधून ही स्लॅमबुक विकत घ्यायचे. अधिक आर्टिस्टिक लोकं एखादी साधी डायरी घेऊन त्यावर चित्रं काढून, रंगवून मग अगदी स्टाईलमधे "स्लॅमबुक" अशा एकदम विविध "फॉन्टमधे" लिहून स्वतःची स्लॅमबुक बनवायचे.
आर्चिसमधे जाऊन अशा स्लॅमबूक विकत घेणं हा पण सोहळाच असायचा. आमच्या गावामधे तेव्हा "आर्चिस्" नुकतंच चालू झालं होतं. त्यामुळे वाढदिवसांसाठी वगैरे ग्रीटिंग घ्यायचे तर तिथूनच घ्यायचं हे नवीन फॅड आलं होतं. इतर स्टेशनरीच्या दुकानात दहा-पाच रूपयाला मिळणार्या साध्या ग्रीटिंगपेक्षा अगदी शंभर दीडशे रूपयांपर्यंत असलेली रंगीबेरंगी, चित्रविचित्र आणि अगदी खुसखुशीत, इमोशनल, सेन्टीमेन्टल, रोमँटिक अशी वेगवेगळ्या पद्धतीची मेसेजेस लिहिलेली ग्रीटींग्ज आम्ही पहिल्यांदा आर्चिसमधेच पाहिली. शिवाय इथे विकणारे लोक अगदी हसतमुखाने वगैरे वस्तू विकणार ( हे नव्याचे नऊ दिवस इतकंच चाललं, नंतर इथल्या सेल्सगर्लनापण गावच्या मातीचा गुण लागला आणि अगदी 'परवडत असेल तरच वस्तू बघा' असा आंबट चेहरा करता यायला लागला- ते असोच) . पण तेव्हा आम्हाला छान सजवून ठेवलेली ग्रीटिन्ग्ज, गिफ्ट आर्टिकल्स, दुकानामधे कायम वाजत असणारी रोम्यांटिक गाणी आणि विकत घेतल्यावर रंगीबीरंगी कागदामधे करून दिलेलं गिफ्ट रॅपिंग यामुळे हे अगदी "पॉश" वाटायचं. आमच्या बारावीच्या वेळेला ते अब्बास असलेलं "छुईमुईसी तुम लगती हो" गाणं अतिफेमस झालं होतं आणि त्याचसोबत ते टिल्लं टेडीबेअरदेखील. वर्गात प्रत्येकाकडे तरी ते आर्चिसमधून घेतलेलं टेडीबेअर होतंच तेव्हा. (यावरून मी किती साली बारावी झाले त्याचं गणित आरामात काढता येईल ना?)
प्रीलीम्स झाल्या की क्लासेस अथवा अभ्यासामधून जरा ब्रेक म्हणून आम्ही या दुकानात जायचं... छान वेगवेगळ्या रंगातली स्लॅमबुक चाळून बघायची.. पण जे आवडलं ते घेतलं इतकं साधंसोपं नसायचं कारण दोनच दिवसापूर्वी वर्गातल्याच कुणीतरी "सेम अश्शीच" स्लॅमबूक घेतलेली असायची... त्यामुळे जरा वेगळं डीझाईन दाखवा, वेगळा रंग दाखवा असं करत तासा-दीडतासाने स्लॅमबूक (आणि इतर बर्याच वस्तू-- ज्यांची कदाचित गरज पण नसायची) घेऊन परत यायचं. ही भावी आयुष्यातल्या "शॉपिंग" नामक प्रकरणाची प्रीलिम म्हणायला हरकत नाही. मी काऊंटरवरच बहुतेक कुणीतरीए रीजेक्ट करून ठेवलेली एक छान लाल गुलाबाच्या कळ्यांचं चित्र असलेली स्लॅमबूक ताबडतोब विकत घेतली होती. आणि इतर मैत्रीणींची खरेदी होईपर्यंत दुकानाचं निरीक्षण करत बसले होते. आजही फारसा फरक पडलेला नाही यामधे. कुठल्याही दहा ते पंधरा मिनिटांत वस्तू घेऊन दुकानाबाहेर पडलंच पाहिजे असा नियम मी तेव्हापासूनच आचरणात आणते बहुतेक.
एकदाची ती रंगीबेरंगी स्लॅमबूक घरी आली की मग उत्साहाला भरतंच भरतं.. त्यावर आधी आपलं नाव्-गाव आणि इथे लिहा तुमच्याबद्दल् वगैरे टाईप्स पहिल्यांदा आपणच लिहून काढायचं, एक प्रकारे हे त्या स्लॅमबूकचं होमपेजचकी. मग कुणी राष्ट्रभाषेचा (म्हणजे शुद्ध हिंदी नव्हे, बॉलीवूडी हिंदी ही आपली वरिजिनल राष्ट्रभाषा!!) आधार घेत प्रस्तावना लिहायचं, अगदीच कवी मनाची लोकं छान छान कविता लिहून काढत, कुणी शेरोशायरी वापरत, आर्टिस्टिक लोकं चित्र काढून, कुणी व्यंगचित्रं काढून, वगैरे होमपेज सजवायचे. बर्याच स्लॅमबूकमधे फोटो चिकटवायला जागा दिलेली असायची तिथे आम्ही फेवरेट हीरोचे वगैरे फोटो चिकटवायचो. सगळ्या स्लॅमबूकमधे चिकटवायला एवढे सारे पासपोर्ट साईझ फोटो कोण काढून आणणार? त्यात परत काही उत्साही लोकांकडे पूर्ण पानभर आवडत्या हिरोहिरॉइनची स्टिकर्स लावायची फॅशनपण एकदम जोरात होती. माझ्या एका मैत्रीणीने इतर मैत्रीणींच्या स्लॅमबूकभर "मेला" पिक्चरचे स्टिकर लावले होते. माझ्या स्लॅमबुकमधे त्या मैत्रीणीकडून "कमरिया लचकेरे" गाण्यातल्या एका फ्रेमचा फोटो चिकटवलेला आहे. हे आज आमिर खानला समजलं (आणि हा मेला पिक्चर नक्की कुठला हे त्याला आठवलंच) तर त्याला गहिवरून येईल. (मेला पिक्चर कधी आला यावरून आम्ही बारावीला कुठल्यावर्षी होतो याचे गणित काढू नये, मेला त्यानंतर दोन तीन वर्षांनी आला. त्याचे फोटो पाच सहा वर्षं आधीपासून येत होते बाजारात!!!)
ही अशी सजावट- रंगावट झाली की एक छोटासा यक्षप्रश्न समोर उभा ठाकलेला.
पहिल्यांदा या स्लॅमबुकमधे लिहायचा मान कुणाचा?
कारण, हा पहिला लिहायचा मान फक्त "स्पेशल" बेस्ट फ्रेंडचाच. पण हिला लिहायला सांगितलं की तिला राग येणार आणी तिला लिहायला सांगितलं की ही नोट्स देताना हजार कारणं देणार!! अजून कुणी "त्याला" लिहायला सांगायचं का? पण घरच्यांनी कुणी वाचलं तर काय घ्या.. अशा द्विधा मनःस्थितीत.
त्यातून मी काढलला सोपा सुटसुटीत मार्ग म्हणजे सरळ पहिल्यांदा पप्पांकडून लिहून घ्यायचं. एक तर पप्पा आपले "फ्रेण्ड" आहेत असं त्यांनाच कठीण प्रसंगी ऐकवता येतं- आपको इस स्लॅमबुक के हर पेजकी कसम!!! दुसरं म्हणजे जरी "हर एक फ्रेंड जरूरी होता है" तरी पप्पांसारखा बँकभक्कम फ्रेंड औरभी जरूरी होता हय! माझ्या तीनही स्लॅमबूकमधे माझ्या वडलांचीच फर्स्ट एंट्री आहे. आणि म्हणूनच त्यांच्या क्रेडिट्-डेबिट कार्डावर माझा वहीवाटीचा हक्क आहे.
या स्लॅमबूकमधे ठराविक कॉलम्स असायचेच, त्यातलं पहिलं म्हणजे नाव्-गाव्-पत्ता-फोन नंबर आमच्यावेळेला ईमेल आणि मोबाईल नंबर नव्हते हो!! आणि घरचा नंबर कुणाच्या स्लॅमबुकमधे लिहायचा आणि कुणाच्या नाही याचे स्ट्रीक्ट नियम होते. मग फेवरेट कलर-फूड्-फिल्म-हीरो-हीरॉइन्स असा एक मामला असायचा. अगदी क्वचित त्यामधे फेवरेट बूक अथवा ऑथर असायचं (हे आत्ता वाचताना आठवलं पण तेव्हा कधीच जाणवलं नाही), मग मधेच माय बेस्ट फ्रेंड, माय रीसेन्ट क्रश असलं काहीतरी मजेदार पण असायचं. तिथे लिहिलेले रीस्पॉन्सेस वाचणे हे सर्वात धमाल काम. मग अवर बेस्ट मेमरी (याला चारपाच ओळी) आणि युअर कमेंट्स ऑण मी (याला परत चारपाच ओळी) शेवटी, "से समथिंग अबाऊट मी" याला पानामधे उरली असेल तेवढी जागा. ही जागाभरून कुणी लिहायचं नाही ते सोडाच.
मग वर्गामधे सगळ्यांकडे ही स्लॅमबूक फिरायला लागायची. वर्गामधे कधीतरी तासाला बसून, कट्ट्यावर बसून एकमेकांना "तू लिही रे" "प्लीज तू लिहून घे तिच्याकडून" अशा विनवण्या चालू व्हायच्या...
बेस्ट फ्रेंड्स, मग क्लासमधे एकत्र असणारे, मग वर्गात नुसतेच ओळखीचे असलेले, असं करत करत स्लॅमबुकची पानं कधी भरायची ते समजायचं सुद्धा नाही.
त्यामधे सर्वात जास्त गंमत असायची ती आपला क्रश असलेल्या व्यक्तीकडून स्लॅमबूकमधे लिहून घेताना. अगदी त्याला न समजेल अशा बेतामधे "रीक्वेस्ट" करून स्लॅमबूक लिहायला द्यायची, त्याचा हातातून अगदी सरळ चेहरा करून थँक्स म्हणत ती स्लॅमबूक घेतली आणि त्याची पाठ फिरली की लगेच अत्यानंदाने उड्या मारायच्या. या स्लॅमबुकचा छुपा उद्देश हा "आपल्या क्रशला अधिकाधिक रीत्या जाणून घेणे" असादेखील असायचाच.
मी तर माझ्या स्लॅमबूकमधे अशा "क्रशित" म्हणजे माझा ज्यांच्यावर क्रश होता अशा मुलांनी लिहिल्यावर त्या पानांवर मस्त गुलाबी रंगाचे हार्टवाले स्टिकर चिकटवले होते. अजूनही ते क्रश आठवले की हसू येतं. त्यावेळेला क्रश जडायला आणि मोडायला अगदी क्षुल्लक कारणदेखील पुरायचं. माझा एक अतिसीरीयस क्रश मोडायला माझीच ही स्लॅमबुक पण कारणीभूत होती. अतिसीरीयस म्हणजे किती तर धूममधे तो उदय चोप्राचा एक सीन आहे की नाही, तसं हा दिसला की माझ्या डोळ्यासमोर आमच्या भावी आयुष्याचे सीन्स दिसायचे. पण स्लॅमबुकमधे त्याच्याकडून लिहून घेतलं मग "दिलके टुकडे हजार हुवे" कारण, पठ्ठ्याने स्वतःचं नाव इंग्लिशमधे लिहिलं होतं पण अगदी चुकीच्या स्पेलिंगसकट!! इसके बाद आगे बात बढही नही सकती थी बॉस. आजही त्याचं ते पान वाचलं की लगेच ते चुकीचं स्पेलिंग डोळ्यांना टोचत राहतं आणि त्यावेळेला आपल्याला किती राग आला होता त्या व्यक्तीचा ते आठवतं... तुम ऐसा करही कैसे सकते हो मेरे साथ इत्यादि इत्यादि इत्यादि.
एका माणसाने माझी स्लॅमबुक माझ्या हातात परत देत "पण मी तुम्हांला(प्लीज नोट द आदरार्थी बहुवचन) ओळखत नाही, तर तुमच्या वहीमधे कसं लिहिणार?" असं स्पष्ट सांगत परत दिली होती. आणी आता तोच मुलगा सातजन्माचा साथीदार!! पण हल्ली ते आदरार्थी बहुवचन काही ऐकायला मिळत नाही मला.
स्लॅमबूकमधले कॉलम्स बाय डीफॉल्ट इंग्रजीत असले तरी तेवढं इंग्रजी लिहिणं हे प्रत्येकाला जमायचंच असं नाही. कारण इंग्रजीमधे आम्हाला लेटर रायटिंग, कॉपी रायटिंग, समरी वगैरे असले लिखाणकाम असलं तरी स्लॅमबूक रायटिंग नव्हतं त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात काय आहे ते स्पष्टपण लिहिण्यासाठी आवश्यक असणारं स्किल कधी शिकवलं नव्हतं. नाव गाव पत्ता एवढं इंग्लिशमधून लिहून व्हायचं पण आम्ही बहुतेक जण "बेस्ट मेमरी" वगैरे मोठे प्रश्न आले की मराठीत लिहायला सुरूवात करायचो. मराठीमधे लिहिताना पण बहुतेकांची उत्तरं अगदी छापील स्वरूपाचीच, "तू एकदम छान मुलगी आहे, आयुष्यात फार यशस्वी होशील इत्यादि इत्यादि इत्यादि.."
या स्लॅमबुक वाचत असताना खरंतर त्या प्रत्येक मित्र-मैत्रीणीसोबत घालवलेल्या आठवणी मनात नाचत होत्या, पण या सर्व आठवणी कुठेच त्या स्लॅमबुकच्या पानांमधे नव्हत्या. होत्या त्या फक्त स्मृतींमधेच. सध्याच्या फेसबूक आणि जीटॉकच्या काळामधे हे बहुतेक शाळूसोबती "फ्रेंड्स लिस्ट"मधे आहेतच त्यामुळे आमच्या आधीच्या पिढ्यांनी बर्याचदा वापरून वापरून क्लिशे झालेलं ते "मित्र हरवले" वगैरे आमच्या पिढीला कधी वाटतच नाही, उलट साखरपुडा, लग्न, पुत्र-कन्याजन्म, बारसं, इतकंच काय पण कोण सुट्टीला कुठे गेलं आणि आज कुणाकडे काय खास पदार्थ बनलाय ते देखील या सोशल मीडीयामधून समजतं. एका अर्थाने बघायला गेलं तर आम्ही कुणीच अगदी मित्र-नातेवाईक वगैरे कितीही भौगोलिक अंतरावर लांब असलो तरी या सोशल मीडीयामधून जवळपासच असतो. म्हणून परदेशांत एकटं असू दे, नाहीतर भारताच्याच एखाद्या खेड्यामधे असूदे, मित्रमैत्रीणी सतत आजूबाजूला असतात. त्यांचा आधार, मैत्री आणि सल्ले कायम सोबत असतात.
अशा काळामधे या स्लॅमबुक्स केवळ एक जुन्यापुराण्या वह्याच राहिल्यात. पण याच जुन्यापुराण्या वह्यांनी त्या तरूणाईचा एक निरागस आणि भाबडा असा कुठलातरी एक अनामिक क्षण कैद करून ठेवलाय.. या वह्या वाचताना तोच क्षण सतत जाणवत राहतो.... आसपास वावरत राहतो.
समाप्त.
Subscribe to:
Posts (Atom)