खरंतर प्रेमात पडणं ही फीलींग काय सुंदर असते. त्याहून
जास्त सुंदर असतं जेव्हा तुम्ही ही फीलींग प्रत्यक्षात मुळापासून अनुभवता. माझ्या
आयुष्यामधले कित्येक निर्णय मी नकळत घेतलेत, काही निर्णय नाइलाजाने घ्यावे लागले.
पण आफताबच्या प्रेमात पडायचा निर्णय मात्र माझा स्वत:चा होता. लव्ह इज ब्लाईंड असं
म्हणतात, पण मी नीट डोळे उघडे ठेवून हा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय मला कधी डीफ़ेंड
करावासा वाटला नाही. लाईफमधली प्रत्येक गोष्ट बदलत गेली, पण ही भावना कधीच बदलली
नाही. रात्री दोन वाजता आफताब माझ्याशी भांडून आम्ही मांडलेला संसार मोडून जात
असतानाही मी आफताबवर प्रेम करतच होते. पण तरी मी त्याला थांबवलं नाही. केदारच्या
प्रेमाला लग्नाचा ऑप्शन होता, आफताबबद्दल कधी तसं वाटलंच नाही. बायॉलॉजिकली स्पीकींग,
आपण प्रेमात पडतो, त्याचं मुख्य कारण रीप्रॉडक्शन असतं. आफताबबद्दल तितका विचार मी
कधीच केला नाही. लग्न, मुलं, घरदार असल्या गोष्टींसाठी मी आफताबवर मी कधी प्रेम
केलंच नाही. तसं असतं तर, मी जाऊन त्याला माझ्या भावना स्पष्टपणे सांगितल्या नसता
का? तो माझ्या हॉस्टेलच्या अगदी जवळ राहत होता. कधीही त्याला भेटून मला माझ्या
फीलींग्ज सांगता आल्या असत्या. पण मी सांगितल्या नाहीत. अगदी स्पष्ट सांगायचं तर
मला गरज वाटली नाही. मला माहित होतं की माझं त्याच्यावर प्रेम आहे, पण मला त्या
प्रेमासाठी आफताबकडून काहीही नको हवं होतं. मी सिंगल म्हणूनच खुश होते त्याचवेळी
मनामध्ये कुठंतरी आफताबवर प्रेम करत होते. त्या प्रेमाला तेव्हाही कधी भविष्य
नव्हतं. नंतर आफताब आणि मी सगळ्याच बाबतीत जवळ आल्यावरही नव्हतं. आय गेस, हे असलं
प्रेम जोवर एकतर्फी असतं तोवरच मज्जा. कारण हे प्रेम केवळ आपल्याच मालकीचं असतं
आफताब निधीसोबत खुश होता. कितीही ब्रेकप आणि भांडणंतंडणं
झाली तरी दोघं कायमच परत एकत्र येत होते. अशावेळी मलाकाय वाटतंय ते आफताबला जाऊन
सांगणं म्हणजे टिपिकल बॉलीवूड लव्ह ट्रॅंगलचा झोल!!. शिवाय अजून एक मोठ्ठा झमेला
होता.
आपल्याकडे समाजामध्ये काही फूटपट्ट्या कायमच लावलेल्या
असतात. त्यामध्ये तुम्ही कधी खाली उतरता तर कधी वर जाता. आफताबचे कष्ट म्हणा, नशीब
म्हणा किंवा हुशारी म्हणा पण तो यापैकी एका फ़ूटपट्टीवर वेगानं वर चढत होता. मी
अजून शिकत होते आणि आफताब प्रचंड खोरे लावून पैसा कमावत होता. त्याच्या आणि
माझ्यामधली आर्थिक दरी आम्हा दोघांनाही याहीआधी कित्येकदा जाणवली होती. पण आता या
क्षणाला त्या दरीच्या टोकावरून आमची अदलाबदली सुरू होती. काही झालं तरी माझ्याकडे
बापाचा पैसा जास्त होता, पण तरीही आफताब जास्त कमावत होता. अशावेळी मी त्याला मी
तुझ्यावर प्रेम करते हे सांगणं म्हणजे मी त्याच्या पैशाला भुलून असं म्हणतेय असं
कुणालाही वाटलं असतं! निधीच्या मनामध्ये तर हा विचार नक्कीच आला असता.
धर्माचा प्रश्न खरंतर मनात यायला हवा, पण कधीच आला नाही. एक
तर मी आणि आफताब एकमेकांना इतक्या लहानपणापासून ओळखत होतो की, धर्म हा प्रश्न
वाटलाच नाही. लहान असताना तुम्ही या गोष्टींचा इतका विचारही कधी करत नाही, आणि
मोठं झाल्यावर विचार करून हाती काही लागत नाही.
मला अधेमध्ये आफताब कधीतरी वीकेंडला भेटायचा. जास्तकरून
पुस्तक खरेदी, एखादा मस्त पिक्चर किंवा शो बघायला असाच. सोबत त्याच्या ऑफिसमधले
कुणीतरी असायचंच. एकदोनदा क्वचित निधीपण आली होती. ती अल्मोस्ट प्रत्येक वीकेंडला त्याला भेटायला मुंबईला यायची.
घरी सांगताना मी स्वप्निलच्या हॉस्टेलवर राहणार हे सांगायची
आणि प्रत्यक्षात मला यातलं काहीच माहित नसताना ती बिनधास्त आफताबच्या फ्लॅटवर
रहायची. एकदा मी गावाला गेले होते, आणि निधीची आई मला बाजारात भेटली. “ती या
रविवारी तुझ्याकडे आली होती नं? मग तू इकडं कशी?”
माझी तपतपत्ततप!! मग लगेच सावरलं, निधी आलीये, पण साझियाकडे
राहतेय. मला अचानक गावाला यावं लागलं लगेच “साझिया कोण?”
वर्गामध्येच काय, एकूणातच जगामध्ये मला साझिया नावाची एक
मैत्रीण क्रीएट करावी लागली. ती माझ्याच हॉस्टेलवर रहायची, माझ्याच कॉलेजमध्ये
शिकते,. आपल्याच गावाची आहे, त्या खाडीच्या पुलामागे वस्ती आहे तिथं तिचं घर आहे,
आणि ती माझी आणि निधीची चांगली मैत्रीण आहे. काय नी काय!!! लहानपणी खोटं बोललं की
आई म्हणायची की रात्री झोपेत देवबाप्पा कान कापतो. इतकं खोटं ऐकून देवब्बाप्पा
क्युंकी सांस भी कभी बहू थी मधल्या मिहिरसारखा माझा पार चेहराच बदलून देणार.
क्युंकि रोनित रॉय भी कभी अमर उपाध्याय था! पण काय करणार. मैत्रीसाठी खोटं बोलावं
लागतं!! आणि आमच्या अकला कायम शेण खायला गेलेल्या. केदारच्या काकूला माझे
अकरावीमधले उद्योग जाऊन मुद्दाम सांगणार्या बाईला मी तिच्या पोरीचे उद्योग
सांगायची चांगली आयती संधी असून सांगितले नाहीत.
हो! केदारच्या काकूला मी किती नालायक आहे हे सर्व निधीच्या
आईने (आणि तिला निधीने अर्थात) सांगितलं होतं. निधीची आई आणि केदारची खडूसकाकी
मैत्रीणी होत्या. म्हणून तर निधीकडे केदारची लग्नपत्रिका पण आली होती. हे मला सर्व
नंतर समजलं होतं. त्यावरून आफताबला फोनवरून तडतडतडतड ऐकवली पण होती, तो म्हणे, हे
मला समजलं तेव्हा मी निधीसोबत भांडलो आणि ब्रेकप केला होता. आता हे मला सांगायची
तसदी कोण घेणार? तसंही आफताब आणि निधीचा ब्रेकप म्हणजे निव्वळ जोकच.
असो. तर अशी ही भानगड झाली होती. हे सर्व निस्तरल्याचं मी
निधीला फोनवरून सांगितलं तर ती माझ्यावरच भडकली. म्हणे, आईला भेटलीसच का? बाजारात
ती दिसली की तू पळून जायचंस. आता हिची आई मला दिसल्यावर मी माझ्याच दुकानांमधून
नक्की कुठं पळून जायचं!!
अशावेळी मला आफताबची केवळ अतीव दया येते. का म्हणून हा
मुलगा या मुलीच्या इतक्या प्रेमांत पडलाय. इतक्या हुशार मुलाला ही अशी
मॅनिप्युलेटीव्ह आणि सेल्फिश मुलगी दिसत नसेल का? प्रेम आंधळं असतं म्हणतात ते खरं
असावं! इतक्या होपलेस रोमॅंटिक माणसाबरोबर माझ्यासारख्या दगडीधोंड्या काळजाच्या
मुलीची जोडी जमावी तरी कशी?
हे झालं प्रेमाचं तत्त्वज्ञान, पण आयुष्यात तेच एकमेव काम
नस्तं ना!!!
एम एस्सीचं सेकंड इयर म्हणजे खर्या अर्थाने राईड टू हेल.
रोज लेक्चर्सचा पिट्ट्य़ा, प्रॅक्टीकल्सचा गोंधळ. शिवाय मध्येच प्रेझेंटेशन आणि
अस्लंच कायबाय. मला सब्जेक्ट्स आवडत होते, अभ्यास मनासारखा होत होता, पण आता
कंटाळा आला होता. गेली कित्येक वर्षं आपण शिकतोच आहोत असं वाटायला लागलं होतं.
मी सुब्रमण्यम सरांना काही एम एस्सीनंतर पीएचडी व्यतीरीक्त
अजून काही चांगले ऑप्शन आहेत का ते विचारलं होतं. त्यांनी माझा रेझुमे वगैरे तयार
करून दिला. कुठे रीसर्च असिस्टंट वगैरे जॉब मिळेल म्हणून. पण आता त्यावर जास्त
लक्ष देऊ नको, कारण एक्झाम्सवर जास्त फोकस ठेव असं पण तेच म्हणाले.
मी तर बाबाला सांगूनही टाकलं. एम एस्सी झाल्यावर मी काय
पीएचडीला वगैरे जाणार नाही. नेट सेटच्या परीक्षा देईन. गावातच लेक्चररशिप मिळाली
तर ठीक नाहीतर सरळ दुकानं सांभाळेन. पण आता हॉस्टेलमध्ये एकटीनं रहायची हौस फिटली
होती. घरी परतावंसं वाटत होतं. बाबानं घराला लायटिंग लावून डीजे आणायचाच शिल्लक
ठेवला!
इकडे मी अभ्यासाच्या आणि एकंदरीत करीअरच्या या इतक्या
गर्तेमध्ये अडकलेली असताना लतिका मात्र बेफाम झाली होती. गेल्या वर्षा-दीडवर्षामधल्या
घडामोडी आणि तिचा स्ट्रगल पाहता तिला फारशी कुठे संधी मिळेल असं वाटत नव्हतं. मी
अधून मधून स्मोक करत होते पण लतिका अलमोस्ट चेन स्मोकर झाली होती. कसल्याशा
पार्टीमध्ये जाऊन दारू पिणं तर नित्याचंच झालं होतं. अजून एक अतिशय वेगळा फरक
लतिकामध्ये दिसत होता, ती खूप चीप वाटायला लागली होती. दिल्लीवरून आलेली लतिका
एकदम क्लासी होती, तिचं वागणं बोलणं तिच्या खानदानाला शोभेल असं होतं, कपडे कितीही
रीव्हीलिंग घातले तरीही त्याच्यात ती चीप वाटायची नाही. पण हल्ली तसं नव्हतं.
कपडेच काय तिचं बोलणंही फार विचित्र झालं होतं. तिच्याच काय माझ्याही तोंडात फची
बाराखडी बसलेलीच होती, पण लतिका लवकरच बंबैय्या स्लॅंग शिकली, एम्सी बीसीसारख्या
शिव्या जाऊच देत, अजूनही काही भयंकर बोलायची. तिच्या काही शिव्यांचं ट्रान्स्लेशन
मी आफताबकडून करवून घेतलं. त्याला असल्या शिव्या कशा माहित ते विचारायचं नाही,
त्याला माहित नसलेली अशी जगात कुठली गोष्ट नसतेच.
>>>>>>>>>
“दिस इज टेरीबल यार” मी हॉस्टेलच्या बेडवर लोळत पडले होते. पोटात
जाम दुखत होतं, पहिलाच दिवस. गेल्या कित्येक वर्षांमध्ये हा त्रास जरा कुठे कमी
झाला होता, पण गेल्या दोन चार महिन्यांमध्ये परत पीरीयड पेन्स चालू झाले होते. “भगवानने
लेडीज को ये बात बहुत गंदी बनाई है”
लतिका मोबाईलमध्ये डोकं खुपसून गेम खेळत होती. “कुछ नहि
यार. पेन किलर ले” तिनं मला सुनावलं.
“पेनकिलर घेऊनच अर्धातास झाला. झराझर ब्लीडींग हो गया तो
इतना प्रॉब्लेम नही, नॅपकिन्स चेंज करो. बाकी टेन्शन नही. स्टमक पेन इन वर्स”
“सुट्टा मारले. ठिक
लगेगा” मी नको म्हणून मान हलवली. त्याच्यानंही बरं वाटलं नसतं याची खात्री होती.
लतिकाने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. “चॉकलेट खा ले” ती
परत म्हणाली.
“यक्क”
“क्या याक्क? टेस्टसाठी सांगत नाही. चॉकलेट इज वंडरफ़ुल
मेडीसीन. स्पेशली फ़ॉर दीज पेन्स. एक तुकडा खा, बरं वाटेल. माझी गॅरंटी.” तिनं समोर
धरलेल्या कॅडबरीमधला एक तुकडा मी घेतला. बरं वाटलं तर ठिक, नाहीतर किमान उलट्या
होतील आणि बरं वाटेल.
मी एरवी चॉकलेटच काय पण त्या फ्लेवरचं काहीच खाऊ शकत नाही.
पण त्या दिवशी पहिल्यांदा तो कॅडबरीचा तुकडा कसाबसा खाल्ला. लतिकाच्या
गॅरंटीप्रमाणे मला फार काही बरं वाटलं नाही, पण दुखणं थोडं कमी आलं. कडूजार औषध
घेतात तशी मी पीरीयड्सच्या दरम्यानं पोटात दुखायला लागलं की चॉकलेटचा तुकडा
चघळायचे. पुढे आम्ही एकत्र असताना आफताबने शोध (गूगल, वेब एम्डी आणी इतर
साईट्सवरून) लावला की, चॉकलेटपेक्षा आईस्क्रीम खाऊन मला जास्त बरं वाटेल. ही वॉज
राईट (“मी कधी चुकीचं काही सांगूतरी शकेन का?” काय आत्मविश्वास!) व्हॅनिला
आईस्क्रीम माझ्यासाठी ते “वंडरफ़ुल मेडीसीन” होतं.
एक दोनदा आईसमोर मी अशीच पीरीयडबद्दल तक्रार केली, तेव्हा
आई मला म्हणाली की, ही गोष्ट आहे म्हणून बाईचं बाईपण असतं. म्हटलं, तुझे पीरीयड्स
जाऊन किती वर्षं झाली, तुझं बाईपण काय कमी झालंय गं!
“ते तुला कसं कळेल” आईनं विषय मिटवला. आईला काय म्हणायचं
होतं ते मला समजत होतं. आता इतकी पण लहान राहिले नव्हते. तसं बघायला गेले तर
माझ्या या वयाला आईला मी झाले होते. मी जिथं अजून घरामध्ये “लहान आहे अजून” चा
शिक्का मिरवत होते, त्या वयाला आई मला सांभाळत होती, बाबाच्या बिझनेसमध्ये मदत करत
होती. मला कुणी माझ्या आईला होममेकर अशा गोग्गोड नावानं ओळखलं की मला राग येतो. आई
जास्त करून घरीच असलीतरी बाबाच्या धंद्यामधल्या प्रत्येक स्ट्रॅटजिक निर्णयमध्ये
आई सामिल असायची. किंबहुना आई होती, म्हणूनच बाबा आजवर टिकला होता.
आईच्या पर्सनालिटीमधले असले हिडन जेम्स मला अधूनमधून कधीतरी
दिसायचे. एकदा सुट्टीला मी गावी गेले होते. पूर्वीकडे सहज
भेटायला गेले होते, तेव्हा परत येत असताना वाटेत
अमृता दिसली, ती बीकॉमची स्टुडंट, पण कॉलेजमध्ये आम्ही एकमेकांना चांगल्या
ओळखत होतो.
“इतक्या उन्हातून कुठं
निघालीस?” मी स्कूटी थांबवत विचारलं.
“थोडं काम होतं गं. तू
कधी आलीस?”
“दोन दिवस झाले.
संध्याकाळी निघेन. तुला कुठं सोडू का?” ती क्षणभर थांबली. बोलू कि नको असा विचार
केल्यासारखी. अखेर म्हणाली. “स्वप्नील, तुझ्या वडलांकडे माझं एक काम होतं. म्हणजे
मी गेले काही दिवस नोकरी शोधतेय. आजच्या पेपरला तुमच्या दुकानामध्ये हिशोबासाठी
हवंय अशी ऍड आहे. मी उद्या तशी दुकानात जाणार आहे, पण जर तू आजच..”
“इतकंच ना, मग घरी चलकी..
आज रविवार म्हणजे बाबा घरीच असतो. येतेस का?”
मी आणि अमृता घरी आलो
तेव्हा बाबा नेमका बाहेर गेला होता. आईनं तिला पाणी वगैरे दिलं, अमृतानं रीतसर
आईलाच बायोडेटा वगैरे लिहिलेला कागद दिला. तिनं आपलं वाचायचं म्हणून ते वाचलं.
“हे सर्व ठिक आहे मुली.”
आई अगदी लाडिक आवाजात म्हणाली. हा आवाज आला की समजायचं आपल्याला कटवलं जाणार आहे
तेपण गुलकंदात माखवून! अर्थात हे अमृताला समजलं नसतं. “पण आम्ही दुकानांत मुली
ठेवत नाही”
“जाहिरातीत तसं काही...”
“जाहिरातीत लिहिलं
नाहीये, पण आम्ही नाही ठेवत.” खरंतर अमृताला नोकरीची गरज असणार हे मलाही माहित
होतं. तिनं पण तेच सर्व काही सांगितलं. वडील नाहीत. आई स्वयंपाकाची कामं करते, दोन
बहिणी आहेत वगैरे.
“तुला गरज आहे हे मलाही
मान्य आहे पण दुकानामध्ये शक्य नाही. तुला अगदी काम हवंच असेल तर तितक्याच
पगारामध्ये आमच्या घरी काम करणं जमेल का?” आईनं अचानक विचारलं. अमृता काय मी पण
गडबडलेच. हे काय बोलणं!
“काकी, अहो मी बीकॉम झालेय.
मला धुणीभांडी कशी?”
“त्यासाठी दुसरी बाई आहे.
तुला फक्त सकाळी येऊन घर आवरायचं, स्वयंपाक करायचा, थोडाफार बाजार करायचा, सांगतील
तेव्हा चहा करायचा, इतकीच कामं.”
“ग्रॅज्युएट झाल्यावर
असली कामं. लोक हासतील मला”
“तुझ्या आईनं पोळ्या
करूनच तुझं शिक्षण केलं ना, मग त्यात लाज कसली वाटते? दुकानात सकाळपासून संध्याकाळपर्यंत
मान मोडेपर्यंत गिर्हाईकांना कपडे दाखवलं तर चालेल, काही गिर्हाईकं अपमान करत्तात
तोही सहन करा. पण त्याच वेळेत इथं घरकाम केलं तर चालणार नाही? यांच्याकडे बराच
रिकमावेळ मिळेल त्यात मी एखादा कोर्स करेन पुढे शिकेन वगैरे डोक्यात येत नाही,
येतं काय तर लोकं हसतील! ह्या हसणार्या लोकांचा इतका विचार तुझी आई करत राहिली असती
तर तू कशी शिकली असतीस” आई तडातडा बोलत होती. अमृता काही न बोलता उठून निघून गेली.
“आई, ती इतक्या दुपारी
आली आणि तू तरी काय बोलतेस?”
“चुकीचं बोलले का? घरकाम
केलं तर लाज वाटते म्हणे. मला घरकामाला तसंही कुणी नकोच आहे, तरी म्हटलं विचारून
पहावं. उचलून महिन्याला पैसे देता येत नाही, अशीच कुणाचीतरी मदत केल्यासारखं पण
होइल. पण आजकालचे तुमचे तोरेच भारी. बीकॉम झालेय म्हणे. त्या आफताबकडे बघा, पोरगा
इतका शिकालाय पण घरातली सगळी कामं करतो. इथं गावाला आला की अझरच्यानं होत नाही
म्हणून अख्खा बंगल्याची फरशी पुसतो. त्याला कशी लाज वाटत नाही. बरं आठवलं, तो
बायोडेटाचा कागद नंतर अझरला दे, त्याच्या ओळखीमध्ये कुठंतरी असेलच. तो पण तुझ्या
बाबासारखा जगन्मित्रच. हजार लोकं ओळखतात.”
“आई, हे आपण दुकानात मुली
ठेवत नाहीत हा नियम मी पहिल्यांदाच ऐकते हां”
“का? कित्येक
वर्षांपूर्वी एक कामगार कायम खाडे करायचा, म्हणून त्याच्याऐवजी त्याची बायको कामावर यायला लागली. आपण अजून इतक्या
वर्षांनीही ती “ठेवलीच आहे की, ते पुरेसं नाही?” आई उठत म्हणाली. पहिल्यांदा तिनं
त्या काळ्या बाईचा उल्लेख माझ्यासमोर इतक्या स्पष्टपणे केला होता.
“आई, बाबाचा राग नाही
आला? तुला समजलं तेव्हा?”
“समजायचं काय त्यात?
त्याचे रंग गावभर उधळत होते, मीच म्हटलं कुणीतरी एकच शोध आणि तिच्याशीच काय ते
रासलीला कर. सगळीकडे तमाशे नकोत. त्यानंतर दुकानात बायका कामावर नकोत हेपण मीच
सांगितलं.”
“बाबानं ऐकलं?”
“ऐकलं म्हणजे काय? तू
तुझ्या आईला काय लेचीपेची समजतेस का? मी इतकी पण कमकुवत नाही. आधी खूप भांडले,
चिडले, कशाला या माणसाबरोबर आले असं वाटलं, पण नंतर एक गोष्ट समजली, जर मी याला
सोडून गेले तर माझं आणि माझ्या लेकीच्या आयुष्याचं काही भलं होणार नाही. आपल्या
दोघींचं जाऊ देत, हा तुझा बाबा चुन्नीलालसारखा कुठंतरी बाईबाटलीवर पैसे उधळत बरबाद
झाला असता. आपल्या तिघांच्या आयुष्याचा विचार करून मी हा निर्णय घेतला. त्यानं
तिला ठेवून घेतली, असं लोक म्हणतात. ती म्हणते की त्यानं तिच्याशी लग्न केलंय.
तिला काय म्हणायचं ते म्हणून देत, पण मी यतिनला काही अटी घातल्या. त्या बाईला मूल
होता कामा नये. स्वप्निलच्या एका पैवरही हक्क सांगायला कुणी असता कामा नये. त्याला
बाई दुसरी मिळाली, माझा हक्क विभागला, पण “बाप” तो केवळ तुझाच राहिला. बाकीची नाती
रिप्लेस करता येतात गं, रक्ताची कधीच नाही. तसंच झालं की, सुरूवातीला काही वर्षं
त्यानं संसार मांडला, रोज तिथंच रहायचा, पण हळूहळू तू मोठी झालीस. वयात आलीस, तसं
आपलं वागणं चुकतंय हे त्याच्याच लक्षात आलं. मग घरी रहायला लागला, आता तू इथे
नसतेस तरीसुध्दा तिकडे जात नाही.”
“पण तरी आई, तेव्हा तुला
थोडातरी त्रास झाला असेल ना?”
“थोडा? खूप झाला, मग
फारसं काही वाटेना झालं. एकदा का माणूस आपलाच आहे याची खात्री पटली की मग त्रास
होत नाही”
“म्हणजे?”
“म्हणजे, हा माणूस किती
गाव भटकून आला तरी येणार घरीच. त्याचा स्वभाव तोच आहे. चल, त्याला यायला उशीर
होइल. तुला जेवायला वाढते.”
अमृताचा बायोडेटा मी
संध्याकाळी अझरकडे दिला तर त्याने दोन दिवसांत तिच्यासाठी कुठल्याशा ऑटो
वर्कशॉपमध्ये अकाऊंटंट्ची नोकरी लावून दिली. पगार फारच कमी होता, पण वर्षभराने
वाढवू असं सांगितलं होतं. अमृताने अझरला शंभरदा धन्यवाद दिले, पण गावामध्ये
सर्वांना माझी आई किती खडूस आणि जुन्या विचारांची आहे हे मात्र ती अजूनही इतक्या
वर्षांनी सांगत असते.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
एम एस्सीचं सेकंड इयर संपतानाच एके दिवशी मला सुब्रमण्यम
सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. नेहमीसारखं प्रॅक्टिकल किंवा जर्नल संदर्भामध्ये
असेल असं मला वाटलं. पण तसं काही नव्हतं, सर म्हणाले की संध्याकाळी चारवाजता
कॉलेजसमोरच्या सीसीडीमध्ये येऊन भेट. काही काम आहे आणि कुणाला याबद्दल काही बोलू
नकोस. हे एक चमत्कारिकच होतं. पण मी याबद्दल आमच्या स्टडी ग्रूपमध्येपण कुणाला
काही बोलले नाही.
सीसीडीमध्ये गेले तेव्हा सर माझीच वाट पहात होते. कॉफीचं
भलंमोठं टंपाळं घेऊन बसल्यावर मला इथं कशाला बोलावलं ते त्यांनी सांगितलं. सरांनी
लेक्चररशिपचा राजिनामा दिला होता. नवी मुंबईजवळच्या एका फार्मा कंपनीमध्ये त्यांना
चांगला जॉब मिळाला होता. रीसर्च टीम हेड म्हणून. त्याखेरीज त्याच कंपनीमध्ये
त्यांना रीसर्च असिस्टंटची एक नवीन टीम तयार करायची होती.
“वूड यु लाईक टू जॉइन?” त्यांनी मला विचारलं.
“आय डोंट नो. मी अजून नोकरीचा विचार केला नाही. आय मीन...”
“इव्हन आय डिंडंट थिंक अबाऊट ईट. बट इट्स अ व्हेरी गूड
चान्स. फार्मामध्ये पगार चांगला आहे. शिवाय पर्क्स बेनेफ़िट्स आहेत. मागे तूच
म्हणाली होतीस की, तुला नंतर डॉक्टरेटमध्ये इंटरेस्ट नाही. ही टीम मला बनवायची
आहे, म्हणजे नंतरही तू माझ्याच सोबत काम करशील. तुझ्या क्लासमध्ये मला तू आणि रॉय
सोडल्यास कुणी योग्य दिसत नाही पण रॉय बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये ट्राय करतोय.
ते झालं तर ठीक नाहीतर तो जॉइन व्हायला तयार आहे. मी तुझा रेझुमे ऑलरेडी एच आरकडे
फॉरवर्ड केलाय. पोस्ट ग्रॅडला फर्स्ट क्लास हवा अशी त्यांची अट आहे. तो तुला
मिळणारच. त्याव्यतिरीक्त हा खूप मस्त चान्स आहे.” सुब्रमण्य़म सर त्यांच्या तमिळ
इंग्लिशमध्ये मला बराच वेळ समजावत होते. “शिवाय, याचाच फायदा तुला उद्या
पीएचडीसाठी पण होईल. याचाही विचार कर. घरून तुला सपोर्ट असेल का?”
“साधारण पगार किती असेल?” घरचा सपोर्ट हा पगाराच्या
आकड्यावर ठरेल हे नक्की.
तरीही सीसीडीच्या बाहेर आल्याआल्या मी पहिला फोन आफताबला
लावला. त्याच्याशिवाय कोण मला गाईड करणार
“पटकन बोल. मीटींगमध्ये आहे.” मी पटकन त्याला फक्त इतक्या
पगाराची नोकरीची ऑफर आहे इतकंच सांगितलं.
“कुठाय?”
“नवीमुंबई”
“अल्लाकसम, विचार काय करतेस? मस्त पॅकेज आहे शिवाय ऑफिस नवी
मुंबईमध्ये. पनवेलला तुझा स्वत:चा फ्लॅट आहे. तिथे राहशील की आरामात” मीटींगमध्ये
बिझी असूनही हा प्राणी इतकी पटापट माहिती देत होता. मला माझ्याच घराबद्दल सांगत होता. इतक्या
वेळामध्ये हा पॉइंट माझ्या लक्षातच आला नव्हता. च्यायला, मला हॉस्टेलमध्ये रहायचा
वैताग आला होता. पण पनवेलमध्ये आमचा जो फ्लॅट आहे तिथे रहायचे म्हणजे....
एक्झाम्स दोन महिन्यांवर आल्या होत्या. त्यामुळे मी यावर
फारसा विचार करायचा नाही असं ठरवलं तसंही सुब्रमण्यम सर मला म्हणाले होते की,
एक्झाम्स झाल्यावरच कंपनीमध्ये इंटरव्यु होतील. इंटरव्यु म्हणजे केवळ फॉर्मलिटी.
सरांच्या शब्दावर मला एच आरने अल्मोस्ट सिलेक्ट केलं होतंच. मला फक्त एच आरमध्ये एक
राऊंड आणि मेडीकल फिटनेस वगैरे पूर्ण करायचं होतं.
तर एम एससीची परीक्षा संपल्यानंतर बरोबर दोन दिवसांनी मी
नवीन नोकरीमध्ये जॉइन झाले. इतके दिवस विद्यार्थी असलेली मी अचानक रीसर्च असिस्टंट
टीममध्ये गेले. फारच एक्सायटिंग होतं. आई तर खुशच झाली, आणि बाबापण. पनवेलच्या
त्या फ्लॅटमध्ये एक भाडेकरू फॅमिली होती, त्यांना काढून बाबानं फ्लॅट रंगवला. रंगवला
म्हणजे, स्वत: ब्रश घेऊन रंगवला, आमच्याकडे आम्ही पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रीशीयन
वगैरे लोकांवर पैसे खर्च करत नाही, याबाबतीत संपूर्ण स्वावलंबी. आई तर माझ्यासोबत पंधरा
दिवस रहायला होती. मी जेवणासाठी खानावळीचा डबा लावायच्या विचारात होते. आईनं तो
बेत हाणून पाडला, बाजारातून छोटा फ्रीज, मिक्सर, आणि मायक्रोवेव घरी आले. शिवाय
आईनं गावामधून भांडी, गॅसची शेगडी आणि इतर बर्याच वस्तू आणल्या होत्या. किराणातर
आमच्याच दुकानांतून आला होता. आईनं माझा स्वयंपाकात क्रॅश कोर्स घेतला. खिचडी,
चहा, मॅगी, फुलके, पिठलं आणि प्रेशर कूक केलेल्या भाज्या इतपत जमू लागलं.
नोकरीचे पहिले चार पाच दिवस फर निवांत गेले. सुरूवातीला दोन
दिवस ओरीएंटेशन, मग सर्वांची ओळखपाळख अशा भानगडीत गेले. खरोखर कामाला सुरूवात झाली
तेव्हा आई बाबा गावाला परत गेले होते. रोज सकाळी उठून पनवेल स्टेशनला जायचं, तिथून
लोकल पकडून वाशीला उतरायचं आणि मग कंपनीची बस! ब्रेकफास्ट स्टेशनवर व्हायचा, दुपारचं
जेवण कंपनीच्या कॅंटीनमध्ये, संध्याकाळी परत स्टेशनवर खादंती. आणि मग घरी येऊन
खिचडीभात नाहीतर फार कंटाळा आला असेल तर, जवळच्या साऊथ इंडियन हॉटेलमधून काहीतरी
ऑर्डर. आई मला म्हणाली, की कंपनीमध्ये कुणी मुलगी सोबत रहायला तयार असेल तर रूममेट
म्हणून ठेव. तसा वनबीएचकेचा फ्लॅट होता, पण
दोघींना निवांत राहता आलं असतं.
पण मला आता परत लतिकाटाईप झमेला नको हवा होता. लतिकाने
फायनलची एकझाम दिलीच नाही. मी एके दिवशी कॉलेजवरून हॉस्टेलमध्ये आले तर तिचं सामान
गायब होतं. वॉर्डन म्हणाली की तिचे पॅरेंट्स येऊन तिला सोबत घेऊन गेले. आता परत
इकडे आणणार नाहीत. तिचे सर्व कारनामे त्यांच्यापर्यंत पोचले होते. लतिका ड्रग्ज
घेत होती आणि काम मिळावं म्हणून शी वॉज स्लीपींग अराऊंड वगैरे वगैरे. मला या गोष्टी
आधीच माहित होत्या, पण मी काय वॉर्डनला सांगितलं नाही. किंबहुना, माझ्यासमोर हॉस्टेलमध्येच
तर लतिका वीड ओढायची, मला पण ऑफर केलं होतं पण मी आपलं अजून कॅफीन आणि निकोटीन
सुटत नाही, ते अजून एक व्यसन कुठे ओढवून घ्या, म्हणून नको म्हटलं. तर ते एक असो!!!
अशारीतीने लतिका परीक्षेच्या आधी महिनाभर घरी गेली. पेपर द्यायला सुद्धा आली नाही.
सारांश काय तर मला आता काही कुणी रूममेट नको हवी होती.
एकटीच मस्त राहत होते. बाबानं मला टीव्ही आणि केबल कनेक्शन दिलं होतं. आधीच्या
भाडेकरूंनी बेड आणि कपाट मागे सोडलं होतं. ते जिथे रहायला गेले तिथं जागा नव्हती
म्हणून इथंच ठेवलं होतं. एकूणात आईच्या भाषेत सांगायचं झालं तर माझा संसार सगळा
सजला होता.
“कंपनीत कुणी
चांगला मुलगा असेल तर बघून टाक. म्हणावं, घर आहे, सगळं सामान आहे. लग्न करायचं आणि
माझ्या घरीच रहायला यायचं.” बाबानं मला विनाकारण चिडवलं.
“का? घरजावई आणायचाय?” आईनं परत त्याला टोमणा मारला.
“घरजावई कशाला? हे सगळं यांच्या हाती सोपवून तू आणि मी सरळ
वृद्धाश्रमाचा रस्ता धरायचा”
“चल, तू झाला असशील म्हातारा. माझं इतकं काही वय झालेलं
नाही. लेकीसोबत अजून बरीच वर्षे राहीन. काय गं? चालेल ना तुला आणि तुझ्या नवर्याला?”
आईनं माझ्याकडे रोख वळवला.
“यांना विचारून काय ते सांगते” मी पण उगाच ड्रॅमेटिक होत
म्हटलं. आईबाबा जोरात हसायलाच लागले, मी पण.
चेष्टागमतीचा विषय सोडला तरी मला हे घर खरंच खूप आवडलं.
खिडकीमधून बाहेर पाहिलं की डोंगर दिसायचा, नुकताच पावसाळा सुरू झाला होता, हिरव्या
रंगाचा तो डोंगर आणि त्यावरून वाहत येणारे छोटे छोटे धबधबे इतके सुरेख दिसायचे,
कित्येकदा मी पहाटेच उठून कॉफीचा कप घेऊन या खिडकीमध्ये येऊन बसायचे. सगळीकडे
संपूर्ण शांतता, आणि हळूहळू सूर्य उगवत आला की येणार्या प्रकाशासोबत उजळणारा तो
डोंगर. पावसाचं खिडकीमधून उडणारं पाणी, आणि ती पहाट अख्खी अनुभवत बसलेली मी. आजही
मला “निवांत” हा शब्द व्हिज्युअलाईज करायचा झाला तर मी स्वत:ला याच खिडकीमध्ये बसलेली
पाहते. खर्या अर्थानं माझ्या आयुष्यामधला हा सर्वात निवांत काळ. मला कधी टाईम
टर्नर मिळाले तर मी याच काळात परत जाईन. माझ्या एकटीच्या घरामध्ये.
टीम नवीन होती,
त्यामुळे काम थोडं होतं. ऑफिसमध्ये बसून इतर काही न करता आल्याने वाचन भरपूर
व्हायचं, कामासंदर्भातही आणि अवांतरही. कॉलेजमधला आमचा ग्रूप तसा अजूनही टचमध्ये
होता. गावामधले सगळे मित्रमैत्रीणी पण आता मोबाईल किंवा फेसबूकमुळे टचमध्ये होते.
ऑर्कुटवर तर काहीही नमुने दिसायचे. त्यामानाने फेसबूक जरा शांत आणि कोझी होतं माझ्या
शाळेमध्ये माझ्यापेक्षा दोन वर्षं सीनीअर असलेली सारिका आता नेदरलॅंड्सला होती.
तिचा नवरा तिथं काम करत होता, तिथं तो आयटीमध्ये होता याव्यतिरीक्त इतर काहीही मला
समजलं नाही पण सारिका मात्र ऑनलाईन चॅट करताना एकदम खुश होती. “मस्त वाटतं,
जुन्यामैत्रीणी भेटल्याकी” ती दोन तीनदा टाईप करून म्हणाली.
जुन्या मैत्रीणी? मला सारिका आपल्या शाळेत होती याहून अधिक
काही आठवत नव्हतं आणि शाळेमध्ये तर मी तिच्याशी एकही वाक्य बोलले नव्हते हे नक्की.
पण तरी आम्ही ऑनलाईन फ्रेंड्स.
मैत्रीचीच काय सगळ्यांच नात्यांची व्याख्या बदलण्याचा हा
काळ होता. माझं आणि आफताबचं नातं बदललं तेपण याच काळामध्ये!
(क्रमश:)
No comments:
Post a Comment