Wednesday, 14 September 2016

विधीलिखित

"आई, परत मला या फालतू भानगडीमधे गुंतवू नकोस. मी कोणालाही भेटायला वगैरे जाणार नाही,तुझे नमुने तुझ्याचजवळ ठेव"
मी जोरजोरात ओरडत होते. आई खाली मान घालून निमूट बसली होती. काय करेल ती? माझ्या तणतणण्याचा तिला मानसिक त्रास होतो हे मला माहित होते, पण तरी तिचे हे माझ्या लग्नाविषयीचे उद्योग मात्र मला सहन व्हायच्या पलिकडे जात होते. दर दोन-तीन महिन्यानी तिचे एक एक नविन टुमणे चालू व्हायचे. आता कोण तरी या इंजीनीअर मुलाचे स्थळ आले होते आणि तो म्हणे मला एकटीने कुठेतरी भेटू बघत होता.
मला हे मुलगे बघून बघून फार वैताग आला होता. तेच ते प्रश्न आणि तीच तीच उत्तरं. तसं बघायला गेलं तर माझ्यामधे नकार देण्याचं कुणालाच काही कारण नव्हतं. पण नकार मिळायचे हे मात्र खरं. तशी माझी नोकरी चांगली होती. शिक्षण व्यवस्थित होतें. पाच आकडी पगार हातात यायचा. दिसायला मी काय अगदीच कतरीना कैफ नसले तरी शूर्पणखा नव्हतेच हे नक्की. स्वैपाक करता येत नाही, ही एक वजेची बाजू होती म्हणा.
तरीपण दर वेळेला कुठे ना कुठे माशी शिंकायचीच. कुणाच्या मते मी फार काळी होते. कुणामते फारच बारीक. कुणाला चष्मेवाली मुलगी नको हवी होती तर कुणाला सॉफ्टवेअरमधेच काम करणारी मुलगी हवी होती. कारणं काहीही असोत, मला या कारणाचा आता भरपूरच वैताग आला होता.
"हे बघ, सायु, माझं ऐकून घे" आई मधेच कधीतरी म्हणाली. आई पुढे काय म्हणते ते ऐकूनदेखील न घेता मी बाहेर बाल्कनीमधे आले.
संध्याकाळचे सात वाजून गेले होते. आईने देवापुढे दिवा लावला. संथ आवाजातील तिचे शुभंकरोति ऐकू यायला लागले. मी पण आत आले. आणि आईच्या बाजूला जाऊन बसले.
"सायु, कसं होणार गं तुझ?" आई मधेच श्लोक थांबवून मला म्हणाली.
"जे नशिबात असेल तेच होइल आई."
आई हसली. माझा नशिब वगैरे गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता, हे तिला चांगलंच माहित होतं. फक्त आणि फक्त तिला खुश करण्यासाठी दिलेल्या या उत्तराची तिला आता सवय झाली होती.
मनातल्या मनात मी पण हसले. नशीब?? काय अस्ते ही गोष्ट? इतके लोक मानतात.. माझाच विश्वास नाही. पत्रिका, भविष्य अशा गोष्टीवर तर बाबाचाही विश्वास नाही. पण माझ्या लग्नाचं बघायला सुरूवात केल्यावर त्याना माझी पत्रिका करून आणावी लागली. काय करणार?
"सायु, आज काकडीची कोशिंबीर करतेय. काकडी कोचवून देशील?" आईचा किचनम्धून आवाज आला. काकडीची कोशिंबीर हा घरातल्या सर्वाचा आवडता पदार्थ. त्यातल्या त्यात मी तिला मदत करून कधीतरी किचनमधे पाऊल टाकावं असं तिचं म्हणणं.
अर्थात आता आई मला किचनमधे का बोलावते हे कारण मला चांगलंच माहित होतं. येनकेनप्रकारे तिला पुन्हा एकदा त्या "स्थळाविषयी" बोलायचं होतं. मुलगा फार हुशार आहे, इंजीनीअर आहे, फॉरेनात जाऊन आलाय, एकुलता एक आहे, निर्व्यसनी आहे इत्यादि इत्यादि गुणविशेष तिने मला सकाळपासून सांगितले होतेच. त्यात आता अजून एखाद्या माहितीच्या तुकड्यात भर घालायची असेल. .
मी आईचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि कॉम्प्युटर चालू केला. माझा कार रेसिन्ग गेम लोड होत होता, तितक्यात बाबा ऑफिसमधून आले.
बाबानी येताना माझ्या आवडीची (आणि सागरच्या नावडीची) कांदाभजी आणली होती.
"
आई कुठाय?सागर कुठाय?" बाबा विचारते झाले. घरात आल्या आल्या सर्वानी त्याचे हॉलमधे बसून स्वागत करावे असं त्याना वाटत असावं.
आई किचनमधे आणि सागर अजून सोसायटीमधे क्रिकेट खेळतोय हे माहित असले तरी विचारणारच.
"काय हे?आणलीत का भजी या महामायेसाठी? आता स्वैपाक उरेल त्याचं काय?" आईची नेहमीची धुसफुस चालू झाली. तितक्यात सागर खेळून आला. मातीमधे प्रचंड लोळून आल्यासारखा दिसत असल्याने आईने "कॉलेजात गेला तरी त्याला अक्कल कशी नाही" याचे एक वेगळेच आख्यान लावले. बाबानी न्युज चॅनल लावला आणि तेही गप्प बसले.
एकंदरीत मी ऑफिसमधून आल्या आल्या घरामधे झालेल्या वादळ आता पूर्ण शांत झाले होते.
पण रात्री अंथरूणात पुस्तक वाचत पडले पण आई काय माझा पिच्छा सोडायला तयार नव्हतीच.
"झोपलीस का गं?" आईने खोलीचा दरवाजा हळूच लोटत विचारलं.
"नाही गं.." मी हातातलं पुस्तक खाली ठेवले.
आई माझ्या बेडवर येऊन बसली.
ती येऊन काय बोलणार याचा अंदाज आलाच मला.
"मुली, हे बघ. अगं तुला तुझा संसार नको का? किती दिवस असं टॉम बॉय बनून राहशील. लहान नाहीस तू. याच मुलाशी लग्न कर असा काही दबाव नाही तुझ्यावर्, पण किमान मुलगा तरी बघ. तुझ्या निर्णय शेवतचाच गं. पण आम्ही काय आयुष्यभराचे सोबती आहोत का? अजून दोन वर्षानी सागर कमावता होइल. त्याचं लग्न होइल. आम्ही आज आहोत, उद्या नाही.. " असं बराच वेळ तिने मला समजावलं. तिच्या या लोण्यासारख्या मऊ आवाजाने मला याहीआधी कित्येक वेळा विरघळलवय.
शेवटी काय, तर या मुलाला "बघण्यासाठी" मी तयार झाले.
याच्या आधी पण फक्त आणि फक्त आईच्या या आग्रहाखातर हा कार्यक्रम केलाच होता. मग अजून एकदा केलं तर काय बिघडतं? किमान तिचं समाधान तरी होतंच ना. पण मी माझी अट घातली यावेळेला. मी त्या मुलाला एकटीला वगैरे कुठे भेटायला जाणार नाही. यायचं असेल तर त्याला येऊ देत आपल्या घरी.
हे कुठेतरी कॉफी शॉपमधे रेस्टॉरंटमधे भेटणं म्हणजे निव्वळ वेळ काढूपणा अस्तो असं माझं एकंदरीत अनुभवावरून मत झालं होतं. निर्णय आईबाबाना विचारून मगच घ्यायचा मग त्याच्या समक्षच मुल्गी बघावी सरळ. मागे एकदा एक मुलगा मला असा कॉफी शॉपमधे येऊन "तूच मला नकार दे, मला दुसर्‍या मुलीशी लग्न करायचय" असं विनवून गेला होता. आणि घरी जाऊन त्याच्या आईला "ही मुलगी फारच आगाऊ वाटली " असं सान्गितलं होतं. त्यापेक्षा त्याचे आणि माझे घरचे समोरासमोर असले की बरं.
शनिवारी संध्याकाळचा कार्यक्रम ठरला होता. घर अगदी चकाचक होऊन बसले होते. सागरदेखील क्लास चुकवून घरी थांबला होता. आईने माझ्यामागे दोन दिवसापासून साडीच नेस गं म्हणून भुणभुण लावली होती.
शेवटी सागर मदतीला धावला.
"ए आई, साडीबिडी नको., मागे ते कुणाच्या तरी घरी नेली होती तिथे पायर्‍यावरच धप्पकन पडली होती. ड्रेस घालू दे तिला."
आईने मस्तपैकी उपमा केला होता. बाबानी "कांदेपोह्याच्या कार्यकमाला उपमा करायची तुझी आयडिया एकदम क्रांतीकारकच आहे" असे न्हणत म्हणत उपम्यावर घालण्यासाठी ठेवलेले ओले खोबरे मूठभर खाल्ले. एरव्ही आई त्याना बडबड बडबडली असती पण आज तिचं बाबाकडे लक्षच नव्हतं.
पाहुणे यायच्या आधी मी थोडाचा "चव बघत बघत" खाऊन घेतला. आईने त्यातल्यात्यात संधी बघून मला पुन्हा एकदा मुलाविषयी परत एकदा माहिती दिली. राहुल जोशी. वय वर्षे तीस. यु एसला चार वर्षे होता. आता पाच वर्षे पुण्यात राहणार. इत्यादि इत्यादि. हे कसं मला अगदी पंचवार्षिक योजनेसारखं वाटत राहिलं.
पण तो राहुल यायच्या आधी पाटिलकाका घरी आले. आमच्या मातोश्रीना "स्थळं" शोधण्यामधे हेच फार मदत करत असतात. आणि हे स्थळ सुद्धा त्याच्याच माहितीतलं आलं होतं.
"तुम्हाला सांगतो या मुलाची तुम्ही काळजीच करू नका. अहो, दिसायला वगैरे मस्त आहे. एकुलता एक. शिवाय पैसा भरपूर. नोकरीचे इन्कम काय घेऊन बसलाय. ज्यादाची पण कमाई आहे"
सरकारी नोकरीत कामाला नसताना ज्यादा कमाई?? आमच्या सर्वाच्या चेहर्‍यावर पडलेला प्रश्न बघून पाटिलकाका हसले.
"अहो. चांगल्या घराण्यातला मुलगा आहे. वेदशास्त्रसंपन्न घराणे हो. वेळ असेल तेव्हा भटाची कामे पण करतो"
आईशप्पथ. माझा वरचा श्वास वर आणि खालचा खाली राहिला. हा इंजीनीअर असणारा मुलगा भटजीगिरी करतो. आईने माझ्याकडे गप्प रहा अशा नजरेने बघितलं.
सागर तर कधीचाच खुसुखुसु हासत आतल्या रूममधे गेला होता. बाबा पाटिलकाकाना अजून काही विचारावं की गप्प बसलेलं जास्त चांगलं या प्रश्नामधे अडकले होते.
माझा देवावर कसल्याच कर्मकांडावर विश्वास नाही. आणि हा मुलगा धोतर नेसून पूजा सांगायला जातो. मी मनातल्या मनात त्याला एक निगेटिव्ह मार्क देऊन टाकला.
मी आईला काहीतरी बोलणार तितक्यात दारावरची बेल्वाजली.
"या या या" वगैरे उत्साहात स्वागत झालं.
"घर सापडायला काही त्रास नाही ना झाला?" पाटिलकाका दर् वेळेला न चुकता हा प्रस्श्न विचारतातच. मुंबईमधे माणूस चुकूच शकत नाही असा बाबाचं ठाम म्हणणं असल्याने ते कधीच विचारत नाहीत.
नवरा मुलगा त्याची आई वडिल आणि अजून एक काकूबाई टाईप बाई एवढेच लोक आले होते. ते बघून जरा बरं वाटलं. मागे एकदा एक मुलगा "बघायला" आलाय की लग्नाची वरातच घेऊन आलाय हेच आम्हाला समजलं नव्हतं.
याचे बाबा बँकेमधे कामाला होते आणि आई शिक्षिका. बाप रे!! त्यानी माझ्याकडे नुसतं बघितलं तरी मी मान खाली घातली. आता लोक याला विनय अथवा लाज म्हणू देत पण शाळेतल्या बाईंबद्दल माझ्या मनात जी काय भिती बसलिये ती बसलिये. सोबत आलेल्या त्याच्या नात्यातल्याच पण रहायला त्याच्याच बिल्डिंगमधल्या होत्या म्हणे.
हा राहुल जोशी दिसायला खरंच छान होता. उचं आणि गोरा. अगदी अंकुश चौधरीचा भाऊ शोभला अस्ता. इथे आपण रंगाने मार खल्लेला असल्याने मी मनातल्या मनात स्वत:लाच एक निगेटिव्ह पॉइंट देऊन मो़कळी झाले.
आईने लगबगीने पाण्याचे ग्लास बाहेर आणून ठेवले. त्या काकूबाईची आणि आईची काहीतरी एक टकळी चालू झाली होती. "काय उकडतय ना?" "अहो, सकाळी आमची बाई उशीरा आली" अस्ल्या टाईपची.
"एक्स्युज मी" आईला आणि त्या काकूला बंद करणारा आवाज आला. अर्थात नवरा मुलगा स्वत:चाच.
"तू सायली कुलकर्णी ना?"
फार महत्त्वाचा प्रश्न विचारल्यगत आवाजात त्याने मलाच डायरेक्ट विचारलं. हा प्राणी मुलगी बघायला म्हणून येतो. आणि मुलीलाच तिचे नाव विचारतो. कायतरी भानगड आहे हे नक्की.
"हो, म्हणजे..." मी कायतरी बोलणार इतक्यात त्या मुलाचा चेहरा बघून माझी डोक्यात पेटली.
"राहुल जोशी, आठवलं? "
या दोन वाक्याच्या मधे माझ्या घरचे राहुलकडे आणि राहुलच्या घरचे माझ्याकडे टकामका बघत होते.
हा राहुल जोशी. माझ्या शाळेत होता. माझ्यापेक्षा दोन इयत्ता पुढे. आणि रोज... अक्षरश: रोज शाळा सुटायच्या आधी माझ्या सायकलमधली हवा काढायचा. तो हा गुंड टपोरी मुलगा.
"अगं आई, ही आपल्या शाळेत होती. आपण कोल्हापुरात होतो ना तेव्हा"
मग माझ्या आईची आणि त्याच्या आईची एक वेग़ळीच टकळी चालू झाली. कोल्हापुरात कुठे राहायचो वगैरे वगैरे.
"अहो, आम्हाला पण पाच सहा वर्षंच झाली कोल्हापूर सोडून. यानी नोकरी बदलली मग आम्ही इकडे मुंबईत आलो,"
"अहो, राहुलची दहावी होती ना म्हणून यानी बँकेमधे पुण्याला बदली मागून घेतली. पुण्याला कसं हो, आमचे नातेवाईक भरपूर.." इत्यादि इत्यादि इत्यादि.
सागर अगदी शहाण्या मुलासारखा उपम्याच्या प्लेट घेऊन बाहेर आला. आई माझ्याकडे वारंवार बघून काहीतरी सांगत होती. हा... आता वास्तविक नवरी मुलीने या प्लेट्स देणं अपेक्षित असतं, नाही का?
"मग कशी काय वाटली मुलगी?" पाटिलकाका. दुसरं कोण?
वास्तविक मला आता ताबडतोब इथून निघून जावंसं वाटत होतं. काय वेडपटपणा होता? शाळॅत असताना माझा आणि अजून दोन तीन मैत्रीणीचा ग्रूप होता. आणि आम्ही मिळून पवार सराच्या क्लासला जायचो. आमचा क्लास संपला की वरच्या इयत्त्तांचा तास चालू व्हायचा.
आणि क्लासच्या बाहेर हा राहुल जोशी आणि त्याचे चार पाच मित्र कायम उभे असायचे. सतत काहीनाकाही बडबडायचे आणि खिदळायचे.
हे सगळं मला आठवेस्तोवर समस्त बायकांची टकळी परत चालू झाली होती. राहुल जोशी मात्र मोबाईलवर मेसेज बघण्यात गुंग झाला होता. मी आईला "आटप आता" अशी खूण केली. अचानक मला राहुल जोशी नकार देणार हे भवितव्य का कुणास ठाऊक समोर दिसायला लागले होते.
तेवढ्यात पाटिलकाकानी त्याचे आवडीचे वाक्य म्हटलेच. "अरे, राहुल सायली, तुम्हाला दोघाना आपापसात काही बोलायचे असेल तर बोलून घ्या. हल्लीची मुलं तुम्ही.. ह्यॅ ह्यॅ ह्यॅ "
"हो, सायली, बाल्कनीत जाऊन गप्पा मारता का तुम्ही?" आई. दुसरं कोण?
नाही मारत जा.. असं म्हणायचं तोंडावर आलं होतं. पण करणार काय आलिया भोगासी असावे सादर.
आमच्या फ्लॅटच्या बाल्कनीमधे जायला मला जास्त आवडत नाही. एकतर ती टीचभर बाल्कनी. त्यात आईने आणि सागरने कुठून कुठून कसली कसली झाडं आणून ठेवली आहेत. त्यामधे संध्याकाळच्या वेळेला डासाचे कविसंमेलन चालू झालेले असतं. नुसती गुणगुण आणि त्याची कविता आवडली नाही आवडली तरी चावायचं काही सोडत नाहीतच.
"शाळेत असताना वेगळी दिसायची एकदम."
बाल्कनीत आल्याआल्या राहुल जोशी म्हणाला..
मी काहीच बोलले नाही. मला बोलावंसंच वाटत नव्हतं. राहुल जोशीकडे एकंदर बघता त्याने मला "हो" म्हणणं कदापि शक्य नव्हतं असंच मला सतत वाटत होतं. तसे एरव्ही मी या "स्थळाना" काहीही प्रश्न विचारायचे. पण आज राहुल जोशीबरोबर काहीही बोलावं वाटत नव्हतं. त्याऐवजी हा इथून निघून जाईल तर बरं होइल.
"शाळेत असताना दिसायचीस अजून तशीच दिसतेस. केस कापलेस?"
शाळेत असताना आई दोन वेण्या बांधायची. लांबसडक केस होते तेव्हा. नंतर नोकरीला लागल्यावर मात्र मीच एकदा पार्लरमधे जाऊन केस कापले. आणि हायलाईट्स रंगवले होते. आईबाबाना बिल्कुल आवडले नव्हते. आणि सागर मला चट्टेरीपट्टेरी झेब्रा म्हणून आठ दिवस चिडवित होता. पण याला माझे केस लांब होते हे आठवतय म्हणजे कमालच म्हणावी,
"हो कापले. जॉबमुळे सांभाळता येत नाहीत ना" कायतरी बोलावं म्हणून बोलले.
"नक्की तुझा जॉब काय आहे. म्हणजे ते पाटिलकाका म्हणाले की तू कॉपी रायटर आहेस. म्हणजे नक्की काय करतेस?"
"मी अ‍ॅड फिल्डमधे आहे. जाहिरात क्षेत्रात."
"पण कॉपी रायटर म्हणजे क्लासमधे चाचणी मधे मैत्रीणी मिळून एकमेकीचे पेपर सोडवायचे तसे असते की,.,,
खरं सांगायचे तर मला हसू आवरले नाही.
"अरे तसं नव्हे काही. जाहिरातीचे लिखाण करते मी. पोस्टर्स, बॅनर्स किंवा रेडिओ अ‍ॅड्स वगैरे. खूप वेगळं क्षेत्र आहे. पण मी एंजॉय करते."
"ओह.. मस्तच आहे मग,"
संध्याकाळचे सहा वाजून गेलेले. सूर्य अस्ताला निघाला होता. बाहेर मस्त सोनेरी प्रकाश पडला होता. आता मुंबईमधे राहिल्यानंतर निसर्गसौंदर्य इतकेच दिसायचे.
"तुला अजून पाणीपुरी खायला आवडते?" राहुल जोशीने दुसरा एक बाऊन्सर टाकला.
"हो.. पण तुला कसं माहित?"
"शाळा सुटल्यावर क्लासला जायच्या आधी तुम्ही त्या नाक्यावर उभे राहून रोज पाणी पुरी खायचा ना?"
आता इतक्या वर्षानंतर मला आठवत नसलेल्या गोष्टी याला आठवतात म्हणजे मेंदू आहे का कॉम्पुटर?
"खाते ना?आणि तू... आय मीन तुम्ही..?"
"मला बाहेरचं खायला आवडत नाही. आई घरीच बनवते. आणि तू म्हणूनच हाक मार ते जास्त कॅज्युअल वाटेल."
आई गं.. अजून हे कुक्कुलं बाळ आईच्या हातची पाणीपुरी खातं. मी मनातल्या मनात अजून एक निगेटिव्ह पॉइंट दिला. आणि कॅह्युअल वाटायला हे काय ऑफिसमधले डिस्कशन आहे का?
"तुझ्या मैत्रीणी प्राची आणि मीनल कुठे असतात?"
"प्राचीचे लग्न झालं. ती कोल्हापुरात असते. मीनलची काहीच माहिती नाही. दहावीनंतर कुठे गेली समजलंच नाही."
वास्तिविक त्याचे मित्र कुठे असतात हे आता मी विचारावं असं वाटलं पण मी काहीच बोलले नाही. मुळात मला त्याची नावं पण आठवत नव्हती. तितक्यात माझ्या आईचा आवाज आला.
"सायु, अगं तुझी चित्र दाखव.."
श्या.. हे प्रदर्शन दरवेळेला करायची गरज आहे का? मी काय फार मोठी चित्रकार वगैरे नाही, उगाच आपली एखाद दुसरी स्केचेस काढलेली. ती पण वेळ मिळाली तर.
"अजून चित्र काढतेस?"
अजून म्हणजे.. ओह आठवलं. शाळेत असताना पण स्पर्धेत चित्रं काढायचे. तेही याला आठवतय. आश्चर्यच आहे.
मला मात्र हा राहुल जोशी आठवणीने रोज माझ्याच सायकलमधली हवा काढायचा हेच आठवत होतं. शाळेमधे कदाचित हुशार वगैरे असेल पण अजून मला दुसरं काहीच आठवत नव्हत..
"चित्रं दाखवतेस ना?"
"खरं सांगू. एकही चित्र बघण्यालायक नाही. हल्ली मला वेळ मि़ळत नाही."
"इतकं काम असतं?"
आता काय उत्तर देणार कप्पाळ. होय बाबा. ऑफिसमधलं काम संपलं की घरी यायला दीड तास जातो. घरी आल्यावर मला गेम्स खेळायचे असतात, नेटवर टाईमपास करायचा असतो. हे असं उत्तर मी एका स्थळाला दिलं होतं या आधी. पण आता राहुल जोशीला मात्र "काम जास्त नसतं. पण तरी वेळ मिळत नाही" असं काहीतरी गुळमुळीत उत्तर दिलं.
"तुला मी एक प्रश्न विचारू?" इथून पुढे गाडी लग्नाविषयीचे तुझे मत पासून तुला घरकाम करायला आवडते का?इथवर कुठल्याही वळणावर जाऊ शकते. मी आपलं गपगुमान "विचार ना" म्हणून मोकळी झाले.
"तुला खरंच माझं नाव ऐकून आठवलं नव्हतं?" हायला, हा कुठला प्रश्न. बरं राहुल जोशी हे नाव काय ह्रिथिक रोशन अथवा अभिषेक बच्चन याच्यासारखे युनिक नाव आहे का?
"नव्ह्तं आठवलं." मी खरं काय ते सांगून मोकळी झाले. आठवलं होतं असं म्हणावं तरी पंचाईत. हा पुढे काय बाऊन्सर टाकेल त्याचा नेम नाही.
"मला जेव्हा आईने तुझा फोटो दाखवला तेव्हाच मी ओळखलं. पण आईला काहीच बोललो नाही. म्हटलं आधी तुला प्रत्यक्ष भेटावं, आणि मग खात्री करावी.. पण तुमच्या बाबांनी सांगितलं की.. "
बरं झालं मी याला भेटायला एकटीच गेले नाही ते. मला अजूनही बोलायची हिंमत होत नाही. नक्की का ते सांगता येत नाही. पण राहुल जोशीची नजर मात्र सतत माझ्या चेहर्‍यावर रोखून आहे असं वाटत होतं. अजून तरी राहुल जोशीने मला ते टिपिकल लग्नवाले "यु एस्मधे अ‍ॅडजस्ट करशील का?" किंवा "आमच्या घरातले कुलाचार करणे जमेल का?" असले काहीच प्रश्न विचारले नव्हते. कि,ंबहुना त्याने विचारले असते तर बरे झाले असते असं म्हणायची वेळ आली असती.
दुसरं काहीही चालेल पण ही मनामधे खोल खोल रुतत जाणारी नजर नको.
"तुला काही विचारायचं असेल तर विचार ना." तो म्हणाला.
खरंतर मला खूप प्रश्न विचारायचे होते. पण विचारलेच नाहीत. क्षण दोन क्षण असेच शांततेत गेले..
"तू भटजीची कामं पण करतोस?" मी माझ्याच मनात सलत असलेला एक प्रश्न बोलून दाखवला.
"ओह, ते. मी उगाच पाटिलकाकाना म्हणालो. तसा मी काही कुठे रेग्युलर भटजी म्हणून जात नाही. पण अगदीच एकादश्णी अथवा सत्यनारायण सांगता येतो मला. आजोबाकडून शिकलो."
मला उगाच हा प्रश्न विचारला असं वाटलं. दुसरं काहीही चाललं असतं. पण भटजी नवरा? तोही माझा?
"पण तू काळजी करू नकोस. पाटिलकाकानी मला सांगितलय. तुझा असल्या गोष्टीवर विश्वास नाही म्हणून."
ग्रेट. माझा देवावर विश्वासच नाही म्हटल्यावर काळजी मी कशाला करू? करायचीच असेल तर ती तू करायला हवीस ना? अर्थात हा प्रश्न मी मनातल्या मनातच ठेवला.
"सायली, एक विचारू?"
आता परत काय विचारणार?
"मला सतत असं का वाटतय की तू या सर्व कार्यक्रमाला नाखुश आहेस. आय मीन, आपण लग्नाच्या निमित्ताने भेटतोय. आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे, तरी तू या सर्वामधे इतकी अलिप्त का आहेस?"
पहिल्यांदा कुणीतरी हा प्रश्न मला विचारला. पहिल्यांदा कुणाला तरी हे जाणवलं.
"असं का वाटतं तुला?"
"तुला मघाशी बघितल्यापासून वाटतय, खरं सांगायचं तर मला पण हे असं मुलगी बघून लग्न करणे वगैरे पसंद नाही. पण ममी पप्पा खूपच मागे लागलेत. त्याना सारखं नाही म्हणणं पण बरं वाटत नाही. मग काय करणार?"
"म्हणजे तुला लग्न करायचं नाहिये का?"
"करायचय.. पण बाजारात जाऊन भाजी घेतल्यासारखं मुली बघून नाही करायचं."
"मग तुला काय प्रेमविवाह वगैरे करायचाय की काय?" बहुतेक या राहुल जोशीने मुलगी पटवलेली असावी आणि आता आईवडलाना सांगण्याचं धाडस होत नाहिये. असा नमुना मला मागे एकदा भेटला होता, “प्लीज प्लीज प्लीज तुमीच नक्कार द्या ना” म्हणून् मागे लागलेला. पोरींच्या पाठी पोरं होकार द्यावी म्हणून मागे लागतात. आमचं नशीबच असलं!!
"नाही. प्रेमविवाह वगैरे नाही म्हणता येणार. पण हा... ज्या मुलीशी लग्न करायचं आहे तिच्यावरती प्रेम मात्र जरूर करायचं आहे." तो हसत म्हणाला. हे उत्तर जरा अनपेक्षितच होतं.
"तुझ्या बायकोकडून अपेक्षा काय आहेत?" मी पण माझा नेहमीचा प्रश्न विचारूनच घेतला.
"बायकोकडून अपेक्षा?असा विचार कधी केला नाही. मी लग्नासाठी बघणारी पहिली मुलगी तूच. पण तरी बायकोशी तिच्याशी भरपूर बोलता यावं. तिच्याबरोबर फिरता यावं. शिकलेली तर असावीच, स्वतंत्र विचाराची असावी. नुसतं मिसेस राहुल म्हणून मिरवण्यात तिला मोठेपणा वाटू नये, असं बरंच काहीबाही." मनातल्या मनात मी राहुल जोशीला पाच पॉइंट दिले. इतक्या वेगळ्या अपेक्षा. आणि त्याही इतक्या स्पष्टपणे सांगणं..
"स्वैपाक किंवा घरकाम वगैरे?" मी जरा घाबरत घाबरत विचारलं. कारण एरव्ही मी नापास होणार त्याचं हेच एक मोठं कारण.
"येतो ना. मला सगळा स्वयंपाक करता येतो. मला भाऊ बहिण नाही, त्यामुळे मम्मीला मीच लहानपणापासून मदत करतो. घरकाम पण सगळं येतं." काहीतरी घोटाळा झाला होता हे निश्चित. पण मी उगाच स्पष्टीकरण द्यायला गेले नाही. त्याने आपल्याला विचारलं ते आपण उत्तर देऊ.
तेवढ्यात बाहेरून राहुल जोशीच्या आईचा आवाज आला.
"आटपलं का रे बोलून?निघायचय आपल्याला"
राहुल जोशी माझ्याकडे बघत पुन्हा एकदा त्याचे ते चॉकलेटी डोळे माझ्यावर रोखून धरत म्हणाला,
"पण सायली एक सांगू?माझ्या नशिबात काय आहे ते मला माहित नाही. जाणून घ्यायची पण इच्छा नाही. पण तरीही कधी कधी आपल्याला सारखं असं वाटत रहातं. की हेच माझं विधीलिखित आहे. हेच आहे हे जे मी शोधतोय. तुझा फोटो पाहिला आणि त्याक्षणी तू आठवलीस. सायकल घेऊन जाताना. आम्ही रोज कुणाच्याना कुणाच्या लेडिज सायकलमधली हवा काढायचो. सगळ्याच मुली रडायला लागायच्या. फक्त तू कधीच रडली नाहीस. चिडलीही नाहीस. शिव्या घातल्या नाहीस, कुणाकडे तक्रार पण केली नाहीस. फक्त सायकल सोबत चेनला बांधून पंप घेऊन यायला लागलीस.रडण्याऐवजी चिडण्याऐवजी.. मला अजून आठवतं. तू म्हणशील की तुला त्याला कसं काय आठवतय हे सर्व. आठवण्यासाठी विसरावं लागतं. आणि मी तुला कधीच विसरलो नाही.
"तेव्हा कदाचित वाटलं नाही पण नंतर मोठं झाल्यावर कधीही वाटलं की आपण आपलं आयुष्य कोणासोबत घालवायला आवडेल तर ते अशाच मुलीसोबत. तुझी ती छबी मनात तशीच राहून गेली. आणि गंमत.. ही खरंच फार मोठी गंमत आहे. मी भारतात परत आल्यावर मम्मीने पहिला फोटो जो मला दाखवला तो.. सायली, माझा निर्णय झालाय. तुझ्या निर्णयाची वाट बघतोय. "
राहुलच्या एकाएका वाक्याने एक एक शब्दाने माझ्या अंगावर शहारे उमटत होते. कित्येक वर्षापूर्वी शाळेत घडलेला प्रसंग, मी तर कधीचीच विसरून गेले होते. आता मला समजलं, नशिब म्हणजे काय.. योगायोग म्हणजे काय ते.
खरं तर माझ्या घशातून शब्दच फुटत नव्हते. कसंबसं मी बोलण्यासाठी शब्द गोळा केले.
"राहुल, तू फार लवकर निर्णय घेतलायस असं नाही का वाटत तुला?"
"नाही, आणि माझा निर्णय बरोबरच आहे हे मला तुझ्या चेहर्‍यावरून समजतय." राहुल हसला. हसताना त्याच्या उजव्या गालाला खळी पडते हे मला पहिल्यांदाच दिसलं.
हळू हळू अंधार पडू लागला होता. मुंबादेवी वेगवेगळ्या रंगाच्या दिव्यानी लुकूलुकू लागली होती. पण माझ्या मनात मात्र श्रावणसर पडून गेल्यानंतर पडतं तसं चकचकीत ऊन पडलं होतं. सप्तरंगी इंद्रधनुष्यासकट.
आई बाल्कनीमधे आली.
"झालं का बोलून?"
"हो, आम्ही बाहेरच येत होतो." असं म्हणत म्हणत राहुल जोशी हॉलमधे निघून पण गेला.
आई माझ्याजवळ येऊन अगदी हळू आवाजात म्हणाली. "सायूबाई, चेहरा सांगतोय हा सर्व काही तुमचा..."आणि हसली.


समाप्त
(माहेर फेब्रूवारी २०१२ मध्ये पूर्वप्रकाशित) 

No comments:

Post a Comment