Friday, 13 June 2014

दरवाजा (भाग १)

सकाळी स्कूलबसमधून जाणार्‍या चैत्रा आणि अश्विनला रेश्माने बाय करून हात हलवला आणि निवांतपणे तिच्या बिल्डिंगकडे परत निघाली. दिवसाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. आता दुपारी तीनपर्यंत निवांतपणा.
बिल्डिंगजवळ आल्यावर सवयीने लिफ्टजवळ गेली. तेवढ्यात मागच्या महिन्यांत उसवायला लागलेले दोन ब्लाऊज डोळ्यासमोर आले, आणि तिने जिन्याने वर चढायला सुरूवात केली. चार मजले म्हणजे काही फार नाही. नवरा तर रोज म्हणायचा, "घराबाहेर पडत असलीस तर समजलं असतं, इथे प्लॅटफॉर्मचे जिने केव्हा चढतो आणि केव्हा उतरतो आम्हाला समजतदेखील नाही. तुला या चार जिन्यांचं एवढं कौतुक." बिल्डिंगमधल्या बाकीच्या बायका जिमला वगैरे जायच्या, पण जिमची महिना दीड हजार फी ऐकून तिने तो बेत कॅन्सल केला होता. "तेवढ्यात घरांत व्यायाम होइल" असा तिचा इरादा, पण त्या व्यायामाला मुहूर्त काही मिळत नव्हता हे नक्की.
दोन मजले चढून झाले होते तेवढ्यात केतकरांचा दरवाजा उघडा दिसला. केतकरवहिनी हॉलमधेच उभ्या होत्या. "मीरावहिनी, तुम्ही आहात होय! तरी मी म्हटलं जिन्यातून कोण चाललंय" तिला बघताच तोंडभर हसत म्हणाल्या.
"हो, चैत्रा अश्विनच्या शाळेची वेळ. बाकी, काम झालं?" तिने बोलायचं म्हणून बोलायचं असतं असलं एक वाक्य म्हटलं.
"कामाचं काय होतच राहतं. तुमचे नवीन शेजारी आले की नाही?" केतकरवहिनी म्हणाल्या.
"काय की, गेले महिनाभर रिनोव्हेशन चालू आहे. पेण्टिंग झालं, आणि काय काय बरंच केलंय. मी काय आत जाऊन पाह्यलं नाही"
"अहो, ते सर्व झालंच. मला भुरेवहिनी म्हणाल्यात की, आज उद्यांत राह्यला येणार आहेत. नवरा बायको दोघंच आहेत. अद्याप अपत्य वगैरे नाही... म्हणजे तुम्हाला तशी चांगली सोबत म्हणायची"
मागच्या महिन्यांत तिच्या फ्लॅटसमोर राहणार्‍या कामत आज्जी वारल्यावर त्यांच्या परदेशांत स्थायिक झालेल्या मुलाने फ्लॅट विकला होता. नवीन मालक कोण ते अद्याप तिने एकदाही पाहिलं नव्हतं. केवळ फ्लॅट रिनोव्हेशनला येणारे कामगार वगैरे सोडल्यास दोघेही कधी दिसले पण नव्हते.
"आजी होत्या तेव्हा बरं होतं. आता नुसते नवरा बायको म्हणजे कठीणच. त्यात नोकरी करणारी वगैरे मुलगी असली तर कसली सोबत नी कसलं काय." ती म्हणाली.
"हो, तेही आहेच. पण पार्टी चांगली मालदार आहे हां! फ्लॅट पूर्ण चेक देऊन घेतला. एकही पैसा ब्लॅकने देणार नाही असं सांगून. शिवाय कालपासून सामान येतंय ना ते सगळं शोरूममधूनच. अगदी भांडीसुद्धा नवीकोरी आली आहेत." केतकरवहिनी बहुतेक कालपासून याच ड्युटीवर असाव्यात.
"नवीन संसार असेल. चला, येऊ मी. गीता कामावर यायची वेळ झाली. परत घर लॉक दिसलं की दांडी मारून पळेल" म्हणत ती जिन्याने वर निघाली.
चौथ्या मजल्यावर जिन्यामधेच ठेवलेल्या सामानाने वाट अडवली होती. बाजूला उभा असलेला कामगाराने ते बघताच पुढे येऊन "सॉरी" म्हणत त्याने भराभरा सामान बाजूला केलं. केतकरवहिनी म्हणाल्या तसं सगळंच सामान नवंकोरं दिसत होतं.
दरवाज्याजवळ येऊन कुलूप उघडणार एवढ्यात कानांवर आवाज आला. "अरे, काय पेंटचा वास येत नाही. बास झाली तुझी नाटकं. सगळं सामान आज रात्रीपर्यंत लावून होइल. तू उद्या दुपारच्या फ्लाईटने परत ये"
रेश्माच्या हातातली चावी खाली पडली. इतका ओळखीचा आवाज!!!
"बिल्कुल नाही. किती दिवस राहणार आहेस? ताबडतोब परत ये. तुझ्याशिवाय कंटाळा आलाय!!"
शक्य नाहीये रेश्मा. तो इथे येणं शक्य नाही. तिने परत एकदा स्वतःला सावरलं. धडधडत्या अंत:करणाने तिने दरवाजा उघडला आणि ती तिच्या घरामधे आली.
हे शक्य नाही.
चेहर्‍यासारखा चेहरा असतो, मग आवाजासारखा आवाज का नसेल?
दिवसभर ती घराबाहेर पडली नाही. अगदी चैत्रा अश्विनला आणायलासुद्धा गीताला पाठवून दिलंय. "माझं डोकं दुखतंय" असं खोटंच सांगत.
संध्याकाळी मोहित परत आला तोपर्यंत समोरच्या फ्लॅटमध्ये पूर्ण शांतता होती. दुपारी आलेले कामगार परत गेले असावेत, घराचं कुलूप लावलेलं नव्हतं पण घरामध्ये पूर्ण काळोख मात्र दिसत होता.
"आले का हे नवीन लोक रहायला?" मोहितने विचारलं.
"हो, आजच,," तिने तुटकपणे सांगितलं. मोहितला तसाही फार जास्त इंटरेस्ट नव्हता, त्याने बातम्यांचे चॅनल लावलं आणि रोजच्यासारखा चैत्रा अश्विनबरोबर मस्ती करण्यामध्ये रंगून गेला.
दोन-तीन दिवसांनी रेश्मा या नवीन शेजार्‍यांबद्दल सगळं विसरून पण गेली होती. तो ओळखीचा वाटलेला आवाजसुद्धा.
नेहमीसारखी मुलांना शाळेत पोचवून आल्यानंतर ती किचनमधलं आवरत होती, एवढ्यात बेल वाजली.
गीता एवढ्या लवकर कशी आली असा विचार करत तिने दरवाजा उघडला, पण समोर गीता नव्हती.
"हाय! आय अ‍ॅम माही, हम लोग रीसेण्टली यहापे शिफ्ट हो गये." समोरच्या मुलीने हसत ओळख करून दिली.
"हाय, आय अ‍ॅम मिसेस मीरा. कम इन..." तिने लगेच म्हटलं. "मुझे तो लगा आप लोग रहने आये ही नही. घर तो बंद था.."
"हां.. वो मे गांव गयी थी, और ..उसको तो वैसेभी ऑफिसमे रहने का बहाना चाहिये"
इतक्यात तिला आठवलं, तो फोनवर बोलणारा... मराठी आवाज. "तू मराठी आहेस ना?" रेश्माने विचारलं.
"अरे, आप भी मराठी.. सॉरी. तुम्हीपण मराठी?" माहीने एखादं अद्भुत आश्चर्य असावं असा चेहरा केला "काय मज्जाय ना? बरं, मी कशाला आले होते, तेच विचारायचं विसरले. मला ना प्लीज दूधवाला, पेपरवाला आणि कामवाली वगैरेचे नंबर हवेत. प्लीज द्याल का?"
"एवढंच ना?" रेश्माने टेबलवरचा मोबाईल उचलून त्यामधले नंबर सांगायला सुरूवात केली. "गीता म्हणून माझ्याकडे कामाला येते, तुझ्याकडे पण तिलाच सांगेन. स्वच्छ काम करते आणि मुख्य म्हणजे दांडी मारत नाही,. कुठल्या वेळात तुझ्याकडे यायला हवी?"
"कधीही चालेल. .... माझी जनरली नाईट शिफ्ट असते. त्यामुळे मी दिवसभर घरी असते"
"नाईट शिफ्ट म्हणजे? कॉल सेंटरमध्ये वगैरे काम का?"
"तसंच, पण मी काम करत नाही. आय मीन... मी कॉल सेंटरची ओनर आहे... टेक सपोर्टचा छोटासा सेटप आहे"
रेश्माला मनातल्या मनात खूप आश्चर्य वाटलं, तीशी बत्तीशीची.... अवघ्या तिच्याच वयाची असेल ही मुलगी.
"दॅट इज व्हेरी गूड. म्हणजे गीता कधीही आली तरी चालेल. तुला स्वयंपाकाला कुणी हवंय?"
"नको. दोघांचाच स्वैपाक मॅनेज होतो..."
"तुला फुलवाल्याचा पण नंबर हवाय का? रोज पहाटे येऊन फुले देऊन जातो. पूजेसाठी वगैरे"
"नको आम्ही दोघंही पूजा वगैरे काही करत नाही. असिफचा तर विश्वासच नाही, आणि त्याच्यासोबत राहून राहून....पण हा फुलवाला रोज मोगर्‍याची किंवा चाफ्याची फुलं देईल का? असिफला फार आवडतात..."
पण माही काय म्हणतेय त्याकडे रेश्माचं लक्ष नव्हतं. असिफच्या उल्लेखासरशीच ती केव्हाच हरवून गेली होती. नजरेसमोर दिसत होता तो पंधरा वर्षापूर्वीचा असिफ. रोज पहाटे त्यांच्या बंगल्यामध्ये येणारा. लोखंडाच्या सळीने चाफ्याच्या झाडवर चढून फुलं तोडून घेणारा. मोगर्‍याच्या सर्व कळ्या संध्याकाळी तोडून न्यायचा, आणि मग त्याचे गजरे करून देवीच्या देवळासमोर विकायला.
"कधीतरी झाडावर एक तरी फूल वासासाठी म्हणून तरी ठेव रे." एकदा ती वैतागून त्याला म्हणाली होती.
"एक रूपया दे, दहा फुलं ठेवीन. एक रूपयाला दहा तेवढीच या फुलांची माझ्या दृष्टीने किंमत. आणि फुकट नेत नाही. तुझ्या वडलांना महिन्याचे दोनशे रूपये देतो" एवढंच बोलून तो सरळ निघून गेला होता.
समोर बसलेली माही काहीतरी बोलत होती. अचानक भानावर येत रेश्माने माहीला विचारलं, "चहा घेशील?" आता या क्षणी तिला असिफबद्द्ल काहीही बोलायचं नव्हतं. "चहा नको.. चला मी निघते."
"बस गं, चहा नको तर सरबत तरी घे" म्हणत ती किचनमध्ये गेली. नंतर माही कितीतरी वेळ बसून गप्पा मारत राहिली. माहीला कदाचित तिच्याबद्दल माहीत नसाव,, आणि माहित असलं तरी रेश्माबद्दल माहित असेल, मी तर मोहितची मीरा आहे.... तिने स्वतःचीच समजूत घातली.
पण माही गेल्यावर परत एकदा असिफचा विषय मनामध्ये यायला लागलाच.
असिफ इथेच पलीकडच्याच घरात रहायला आला होता, नक्की कशाला? सूड उगवायला, मी तुझ्यापेक्षा किती सुखी आहे हे सांगायला, तू ज्याला सोडून दिलंस, तो तुझ्याशिवाय देखील किती पुढे गेलाय हे ठसवायला...
पण हे असिफचं वागणं नव्हे. असिफ असा कधीच वागला नसता.
चार-पाच दिवसांत असिफ-माहीच्या घरामधे गीता कामाला यायला लागली. दूध, पेपर आणि फुलांचे रतीब चालू झाले. शिवाय रोजच्या रोज गाडी धुवायला म्हणून गीताच्याच भावाला सांगितलं. गीताकडून अलगदपणे तिने असिफच्या जाण्यायेण्याच्या वेळा कुठल्या हे विचारून घेतलं. तो सकाळी सात साडेसात वाजता जायचा आणि रात्री नऊनंतर घरी परत यायचा.
या दोन्ही वेळांमध्ये रेश्माला दरवाज्यामध्ये यायचं काही कारणच नव्हतं. माही मात्र, अधून मधून दुपारच्या वेळेमध्ये येऊन गप्पा मारायची. असिफने माहीला निवडलं होतं यात काहीच आश्चर्य नसावं, इतकी ती असिफसारखीच होती. स्वावलंबी, स्वतःचे न्निर्णय स्वतः घेणारी. शक्यतो समोरच्याला न दुखावता स्वतःचं काम करून घेणारी, हुशार. फार लहान वयापासून जबाबदारी घेणारी. माहीचं मूळचं गाव तमिळनाडूमधलं. घरामध्ये प्रचंड गरिबी पण चर्चच्या मदतीने शिकायला म्हणून चेन्नईला गेली, तिथून बंगळूरू आणि मग मुंबईमध्ये चार वर्षं नोकरी करून हे स्वतःचं छोटासा बिझनेस चालू केला होता.
आणि असिफ तिचा नवरा नव्हता, दोघांनीही अजून लग्न केलेलं नव्हतं.
माही असिफबद्दल काही बोलायला लागली की रेश्मा मुद्दाम वेगळा विषय काढायची.
ही दोघं तिथे रहायला येऊन महिना झाला तरी रेश्माने एकही दिवस असिफला पाहिलेलं नव्हतं. त्याला आपण इथे राहतोय की नाही तेच कदाचित माहित नसावं. त्याने आपल्या घरासमोर अरहायला येणं हा निव्वळ योगायोग. तिने स्वतःलाच सांगितलं.
पण महिन्याच्या पहिल्या रविवारी हा फुगा फुटलाच.
सकाळीच मोहितने दोन्ही मुलांना त्याच्या बहिणीकडे नेऊन सोडलं होतं. परत आल्यावत तिने बनवलेला थालिपीठाचा नाश्ता खाऊन तो टीव्हीवर लागलेली मॅच बघत होता. ती आतमध्ये संडे स्पेशल स्वयंपाकाची तयारी करत होती.
दरवाज्याची बेल वाजली म्हणून मोहितने दरवाजा उघडला, "मीरा, ए मीरा!! पेपरवाला आलाय.... बिल न्यायला. किती पैसे द्यायचेत?"
"आलेच" म्हणून हात धुवून ती बाहेर आली. दरवाज्यात असिफ उभा होता.
(क्रमशः)


दरवाजा (भाग २)

No comments:

Post a Comment