Tuesday, 3 June 2014

दुपार

गणपतीपुळ्यामध्ये दर्शन घेऊन परत निघाले. येताना आपल्या जुन्या कॉलेजवरून जाता यावं आणि जरा वेगळा रस्ता म्हणून माझ्या घराला जवळ पडणारा निवळीचा हायवे न पकडता चाफ़्याकडून शिरगांवला जाणारा रस्ता पकडला. मे महिन्यातली दुपारची टळटळीत वेळ. खरंतर मे महिना म्हणजे आमच्या गावाकडे पूर्वी आंबे काजू फ़णसाचा आणि त्याचबरोबर चाकरमान्यांच्या पाहुणचाराचा महिना. पण हल्ली हाच महिना “टूरीस्ट सीझन” असतो. कुठून कुठून लोकं “कोकण फ़िरायला” म्हणून येतात. इथल्या समुद्राची, निसर्गाची आणि माशांची अप्रूपाने स्तुती करतात. स्थानिक बापडे त्यांची निव्वळ मजा बघत असतात. त्यांना या कशाचं काहीही कौतुक नसतंच. मुळात कोकणी माणसाला कौतुक कशाचं असतं हा एक संशोधनाचा विषय. इतके दिवस गावात असताना आम्हाला तरी कधी कौतुक होतं या सगळ्याचं. पण गेले कित्येक वर्षं मी कोकणाबाहेर असल्यापासून मात्र मलादेखील अधूनमधून नॉस्टॅल्जियाचे झटके येत असतात. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी...
सुट्टीत गावाला गेलं की एकदा तरी पुळ्याच्या गणपतीला जाऊन येणं होतंच. श्रद्धा म्हणण्यापेक्षा सवय किंवा परंपरा!! परंपरा म्हटलं की कसा भारदस्त शब्द वाटतो. खरंतर, कॉलेजमधे असताना “गणपतीपुळे हायवे” आमचा हॅंगआऊट पॉइन्ट होता. त्यामुळे रस्ताभर काहीनाकाही आठवणी जोडलेल्या आहेत, त्या आठवणी जागवत आणि एकटीने भटकायचं म्हणून हे फ़िरायला जाणं. नाहीतर कुटुंबकबिला घेऊन बाहेर पडलं की आपलं फ़िरणं कमी आणि इतर गडबडच जास्त!
दुपारची वेळ असल्याने आज रस्ता अगदी मोकळा होता. कसलंही ट्राफ़िक नसताना गाडी चालवायला जरा बरं वाटत होतं. वाटेमधले चुकारमुकार आंबे विकायला उभे असलेल्या माम्या सोडलं तर अजून कुणी दिसत नव्हतं. आमच्या कोकणातला उन्हाळा नुसता भाजत नाही, उकडूनपण काढतो. त्यातून पुळ्यासारख्या समुद्राच्या खूप जवळ असलं तर घाम विचारायलाच नको. असल्या घामट आणि चिकट वातावरणामधे दुपारच्या वेळेला ताणून देणे हा सगळ्यांत वेळेचा खरा सदुपयोग. त्यामुळे सर्वत्र निवांतपणा असतो. या रस्त्याला चढ चढून आल्यावर एक मोठाच्या मोठा माळ लागतो, पुळ्याचा समुद्र खाली दिसायला लागतो.. आजूबाजूला नुसता विस्तीर्ण पसरलेला माळ. याचंच नाव बहुतेक ढोक्याचा माळ. ही अशी चित्रविचित्र नावं कशी मिळत असतील एखाद्या ठिकाणाला कुणास ठाऊक. सहज गाडी थांबवली आणि खाली उतरले. खरंतर गाडी चालवायचा कंटाळा आला होता असं नाही, पण तरी थांबावंसं वाटलं. आकाशातला सूर्य आग ओकत होता असं म्हणणं म्हणजे फ़ार मवाळ ठरलं असतं. अख्खं आकाश त्या आगीने खरंतर पेटून उठलं होतं. माथ्यावर आलेल्या त्या सूर्याकडे बघणं अशक्य होतं, अगदी गॉगलच्या काचेआडूनसुद्धा. आजूबाजूला कुठेही एक झाड दिसत नव्हतं. सगळा कोरडा भाग. कातळी परिसर. पावसाळ्यांतून याच माळावर छान हिरवं पोपटी गवत उगवलेलं असतं. आणि मग साधारण पावसाळा संपत आला की गवतांवर कोवळी कोवळी फ़ुलं आलेली असतात. रंगीबेरंगी. त्यादरम्यान याच रस्त्यावरून जाताना किती नाही म्हटलं तरी पाचसात मिनिटं थांबणं होतंच. असल्या पावसाळी गवतामधून पायांत चप्पल न घालता धावणं हे माझं खूप आवडतं काम. नवरा मात्र “जनावर वगैरे येईल पायांमधे” असं ओरडत असतो. पण आज सोबत नवरा आलेला नव्हता, आणि समोर हिरवं गवत नव्हतं. होतं ते निव्वळ पसरलेलं भगभगीत काळं कातळ. चटका देण्याइतपत तापलेलं. आणि त्या कातळाला मधेमधे पॅचवर्क केल्यासारखे दिसणारे सुकलेल्या गवताचे पांढरट पिवळे पुंजके. अगदी दूरवर कुठेतरी करवंदीची भलीमोठी जाळी होती. पण तिथपर्यंत चालणं जीवावर आलं होतं. तसंपण सीझनमधे मुलं पहाटेच करवंदं तोडून नेतात विकण्यासाठी.
माझी नजर फ़क्त समोरच्या आकाशावर लागली होती. खालच्या काळ्या कातळाचं वर असलेलं हे निळं प्रतिबिंब म्हणावं असं आकाश. पण कातळ जितकं खडबडीत होतं तितकंच आकाश तलम. मुळात आकाश असतं का तिथे? पृथ्वीच्या आजूबाजूला पसरलेल्या या विशाल अवकाशामधला आपल्या नजरेला जो चिमुकला तुकडा दिसतो त्यालाच तर आपण आकाश म्हणतो. आज त्या तुकड्याकडे नजर टाकता येत नव्हती इतकं ते जळजळीत दिसत होतं. जिथवर आपली नजर जाते त्याला क्षितीज म्हणायचं की आपली नजर क्षितीजापर्यंतच जाते असं म्हणायचं माहित नाही. पण नजरेच्या त्या टप्प्यापलिकडे एक वेगळंच विश्व असलं तरी सध्या नजरेला दिसते त्या क्षितीजाचीच सीमारेषा खरी. आता अजून तीन चार तासांमधे सूर्यनारायण थोडे निवळतील. शांत होतील. थकल्या भागल्या हळूहळू क्षितीजाकडे सरकत जातील. त्यावेळी मात्र याच क्षितीजाकडे हजारो नजरा लागलेल्या असतील. मावळत्या आणि उगवत्या सूर्याला पाहणं लोकांना आवडतं पण जेव्हा तोच सूर्य आकाशामधे आपल्या खर्‍या शक्तीचं प्रदर्शन करत असतो, ती वेळ मात्र कुणाच्याच आवड्डीची नाही. आपलं पण असंच असतं ना... जेव्हा अंगात जोश असतो धमक असते तेव्हा सोबत कुणी नको हवं असतं, आपणच एकटे आपल्या साम्राज्याचे सम्राट. आणि जशीजशी ही धमक कमी होत जाते तेव्हाच कोणतरी सोबत असावंसं वाटतं, आपल्याला सांभाळून घेणारं, आपल्या पावलासोबत पाऊल टाकून चालणारं. आणि मग मनाच्या याच अवस्थेमधे तर रंगाची उधळण होते. संध्याकाळी क्षितीजावर झालेली असते तशी. लाल, तांबडा, केशरी, गुलाबी. सॉरी मी अजून म्हातारी वगैरे झालेली नाही. तरी उगाच असं वाटलं खरं.
मी जिथे उभी होते तिथून पुळे खालच्या बाजूला राहिलं होतं. मागे वळून पाहिलं तर खाली समुद्र दिसत होता. दिवसाच्या रात्रीच्या कुठल्याही वेळेला मला समुद्र कायम राजबिंडाच दिसतो. आता तरी का अपवाद? त्याच्या पोटामधे काय रत्नं बित्नं असतील ती असो, पण अंगावर आज राखाडी रंगाची कांती उन्हामुळे जी काय चमकत होती त्याला उपमा नाहीच. आणि अगदीच उपमा द्यायची झाली तर याच समुद्राच्या लेकींच्या अंगासारखा चमकत होता हा समुद्र. किंवा मग असंही असेल की समुद्राचा हाच रंग घेऊन मासोळ्यांनी आपला मेकप केला असेल. वार्‍याच्या प्रत्येक लहरीवर शांत हिंदकळणारं पाणी त्या पाण्यावर पडलेले उन्हाचे किरण, सोनेरी-चंदेरी रंगाचे. संथ एकाच लयीत. पण हे असं इतकं शांतगंभीर असणारं प्रकरण किनारा जवळ आला की अवखळपणे शुभ्र रंगामधे फ़ेसाळत धावत पुढे येणारं. शाळेमधे अगदी “शांत” असलेलं टिल्लू घरी जाताना आई दिसली की जसं धावत जातं अगदी तसंच. आणि मग त्याची आई कशी दोन्ही हात पसरून त्याला कवेत घेते, तशी समोरची जमीन येणार्या प्रत्येक लाटेला तितक्याच उत्साहाने आपल्या कुशीत घेतेय. इथून इतक्या वरून हा खेळ बघणं ही एक वेगळीच गंमत. आजूबाजूला असलेली सुरूची हिरवी झाडं, किनार्‍यावरची फ़िक्कट पांढरी वाळू, धवल रंगाच्या उफ़ाळलेल्या लाटा आणि त्यामागे पसरलेलं ते काळसर राखाडी पाणी आणि त्यावर चमकणारं चंदेरी ऊन. एखाद्या चित्रासारखं दिसत होतं हे दृष्य.
किती वेळ मी इथे उभी आहे कुणास ठाऊक? भान हरपले असणार माझे नक्कीच. नाहीतर या असल्या टळटळीत दुपारच्या ऊन्हामधे कोण शहाणं माणूस असं रस्त्यावर उभं राहणार आहे? एवढा वेळ आहे तरी एकदेखील गाडी गेली नाही.... इतकं सुनसान, निर्जन, एकाकी!!
किती दिवसांनी अशी मी स्वत:सोबतच होते... कायम माणसांच्या गराड्यात राहिलं की आपणच हरवून गेलेलो असतो. असा निवांतपणा मिळतात कुठे जगायला? आपल्याच स्वत:च्या धुनकीमधे जगायची एक नशा असते.. मी कुणाहीसाठी नाही.. कुणीही माझ्यासाठी नाही. मी स्वतंत्र, मी माझी... असे लख्ख जाणवून देणारे काही क्षण असतात आयुष्यामधे. असाच हा एक क्षण. स्वत:साठी स्वत:सोबत स्वत:भोवती, जगण्याचा, अनुभवण्याचा.
कुणाच्या तरी येण्याने ती जादू हरवली. रस्त्यावरून एक बाईक येताना दिसली.
“काही प्रॉब्लेम आहे का? गाडी वगैरे बंद पडलीये का?” बाईकवर बसलेल्या दोन तरूणांपैकी एकाने विचारलं. असतील पंचवीस सव्वीसची. बाईकची नंबरप्लेट पुण्याची, म्हणजे हे कोकण फ़िरायला म्हणून आलेले असणार.
“नाही, तसं काही नाही. सहज थांबले होते” मी उत्तर दिलं.
“मॅडम, काहीही प्रॉब्लेम असेल तर सांगा, आम्ही नक्की मदत करू. आम्ही चांगल्या घरातली मुलं आहोत.” आता दुसरा म्हणाला.
मला हसू आलंच. अगदी मनापासून. “खरंच काहीही प्रॉब्लेम नाहीये. गाडी व्यवस्थित आहे, थोडा वेळ कंटाळा आले म्हणून थांबले होते. डोंट वरी, मी याच गावाची आहे. आता घरीच निघतेय. विचारल्याबद्दल थॅन्क्स!!”
दोघांनाही मी हात हलवून बाय केलं. दोघं आपल्या वाटेने निघून गेली. दूरवर जाताना त्यांची बाईक धुरकट दिसत दिसत नाहीशी झाली.
“आम्ही चांगल्या घरातली मुलं आहोत” या वाक्याने मला परत एकदा हसू आलं. रस्त्यामधे एखादी मुलगी उभी आहे, आपण तिला मदत करावी असं ज्यांना वाटलं त्यांना परत आम्ही चांगल्या घरातली मुलं आहोत असं का सांगावंसं वाटलं असेल? किंवा मग दुपारच्या अशा वेळेला एखादी मुलगी रस्त्यामधे काहीही कारण नसताना थांबलीच कशी असेल हा प्रश्न पडला असेल का त्यांना? हे असं “मै और मेरी तनहाई” टाईप मोमेंट्स फ़क्त कथा कादंबयामधेच असतात असं लोकांना का वाटत असतं कुणास ठाऊक?
ही दोन्ही मुलं निघून गेल्यावर आजूबाजूला पुन्हा एकदा ती शांतता पसरली. दूरवर कुणीही नाही, मी, कातळ, समुद्र आणि आकाश सोडल्यास. आणि या सर्वांसोबत मी होते. कशासाठी थांबले होते मी? निसर्गसौंदर्य अथवा सृष्टीसौंदर्य बघण्यासाठी नक्कीच नाही? कारण डोळ्याच्या समोर होता तो कोरडाठाक माळ. बघण्यासारखं काहीही नसलेला, तरी या सगळ्या रूक्षपणामधे एक आगळा डौल होता, बेफ़िकीरी होती, एक माज होता.
मनाला जे कायम आनंद देतं असं दृष्य कायम बघावंसं वाटतं यात नवल ते काय...पण त्याहून जास्त मनाला ज्याची हुरहुर लागते असं दृष्य कायम नजरेसमोर हवं असतं. समोरचा निसर्ग पण असाच होता, उघडाबोडका, पण तरीही मला कोड्यात टाकणारा. काहीतरी अपूर्ण असलं की पूर्णत्वाची लागलेली आस का हवीशी वाटते? मध्यान्हीचा सूर्य त्याच्या शेड्युलप्रमाणे चालला होता. उन्हाळा त्याच्या शेड्युलप्रमाणे चालला होता. दुपारनंतर संध्याकाळ येणार, उन्हाळ्यानंतर पावसाळा येणार... हे त्यांना चांगलंच माहिती होतं. आपल्यानंतर काय या प्रश्नाचं उत्तर माहित असलं की या चक्रावरचं हे धावणं सोपं पडतं का? मुळात या चक्रावर सतत धावत रहायला हवंच का? या दुपार उन्हाळा वगैरे मंडळीचं जाऊन द्या, पण आपण? आपण तरी थांबू शकतो ना असं धावणं. हे झालं की ते झालं मग परत हे हवं म्हणून त्याच्यापाठी. धावत रहायचं. सतत धावत रहायचं. अजिबात कधीही न थांबता..
जगातले सगळे तत्त्वज्ञ कायम सांगत असतात, आयुष्य एकदाच मिळतं ते उपभोगून घ्या. पण आम्ही उपभोगापेक्षाही सेव्हींगवर जास्त नजर ठेवणारे लोक. आज कमावून घेऊ. उद्या म्हातारपणी आयुष्याचा आनंद घेऊ. म्हातारपण येतं की नाही त्याची कल्पनासुद्धा नसताना वर्तमानकाळाला दूर सारत भविष्यासाठी जगणारे. पण आजचा हा वर्तमान आणि त्या वर्तमानातला हा क्षण किती सुंदर आहे, किती महत्त्वाचा आहे याची जरादेखील तमा न बाळगता.
आज जर मी या अशा दुपारी इथे न थांबता गाडीच्या काचा वर चढवून एसी लावून या रस्त्यावरून या माळावरून निघाले तर या माळाला काही फ़रक खचितच पडणार नाहीये. मी इथे थांबून या उन्हामधे अशी एकटीच उभी राहून माझ्यापण आयुष्यामधे काही फ़ार मोठा फ़रक तसाही पडत नाहीये तरी मी इथे उभी आहे. स्वत:चीच सोबत घेऊन. स्वत:शीच संवाद साधत. हा क्षण महत्त्वाचा. संवादाचा. स्वत:शीच चालणार्या संवादाचा. आपल्याच मनाच्या डोहाचा तळ गाठत जाण्याच. स्वत:चीच ओळख करून घ्यायचा. हा क्षण महत्त्वाचा.
अजून जगण्यासाठी. अजून धावण्यासाठी. अजून प्रश्न पडण्यासाठी. अजून उत्तरं शोधण्यासाठी.
महत्त्वाचा आहे तो हा क्षुल्लक क्षण. या कडकडीत उन्हाच्या दुपाराने मला हा क्षण दिला.
गाडीत वाजलेल्या मोबाईलने माझी तंद्री भंग पावली. आईचा “कधीपर्यंत येतेस?” विचारायला फोन.
“निघालेच आहे. वाटेत आहे” मी उत्तर दिलं.
वाटेत तर आपण सारेच आहोत, प्रश्न हा आहे की वाटेवरून बाजूला सरून आजूबाजूला बघणार आहोत की नाही.
गाडी चालू केली, आणि माळावरून पुढे आले. हा सरळ रस्ता संपला, कोकणातल्या गर्द झाडीने वेढलेला वळणावळणावरचा रस्ता चालू झाला. पण ती दुपार तशीच तिथेच त्या माळावर पडून राहिली. त्या उन्हासकट, कातळासकट, निळ्या तलम आकाशासकट आणि चमचमणार्‍या समुद्रासकट.
फ़क्त मीच एकटी पुढे निघून आले होते.


No comments:

Post a Comment