Monday, 28 August 2017

रहे ना रहे हम (भाग ३०) – समाप्त

 “थॅंक्स, यार. तू नसतीस तर..”
“बस्स काय? आता पैसेही पाठवणार आहेस का?”
“तसं नाही गं... पण... बाबांसाठी..”
“स्वप्निल, माझे सासरे महिन्यातून दोनदा तरी हॉस्पिटल गाठतात, त्यांच्यासाठी डबा करतेच ना. एरवेही त्यांचं डायेट फ़ूडच बनवते गं. मग त्यातच थोडंसं तुझ्या बाबांना दिलं तर लगेच थॅंक्स... जाम अमेरिकन झालीस हां!” वेदा माझ्यासोबत व्हीडीओ चॅटवर म्हणाली.
गेले आठ दिवस बाबा हॉस्पिटलमध्ये होता, आणि त्याला वेदा रोज डबा नेऊन देत होती. लांब असलं की अशा गोष्टींचं खरंच जाम वाईट वाटतं, म्हणजे मी काय डबा वगैरे बनवला असता असं नाही... तरीही!
“तरीही तुला थोडासा का होईना त्रास..”
“काही त्रास होत नाही बायो. रोज दहा वाजता तुमचा ड्रायव्हर येऊन डबा नेतो. चार वाजता छान घासून पुसून आणून देतो. तसंही हार्ट पेशंटला काय... कमी तेलाची भाजी, वरण आणि भात. मी तर काकूंसाठी पण डबा देत होते. पण त्याच नको म्हणाल्या. तुझा शेजारी आहे ना, तो त्यांच्यासाठी काहीतरी आणतो.”
“अझरभाईला आईसाठी डबा बनवता येतो, आणि बाबासाठी नाही? तसाही तो कायम काहीतरी हेल्दी खात असतो.”
“येडू! त्याला वेळ कुठाय! चार चार कन्स्ट्रक्शन साईटवर इकडून तिकडे उड्या मारत असतो शिवाय नगरसेवक. रोज पेपरांत फोटो असतोच. जाम बिझी माणूस झालाय. त्याची बायकोपण नेमकी ट्रेनिंगला गेलीये.” वेदा जरा आवाज विनाकारण कमी करत म्हणाली. “निधीचा बॉयफ्रेंड गं, आफताब. त्याची बायको. ती काकूंना डबा बनवून देते”
वेदाला अधलेमधले काय किस्से माहित नाहीत, त्यामुळे तिला या सर्वांमागची इमोशनल हिस्ट्री माहितच नाही. त्यामुळे मला एखादं गॉसिप सांगत असल्यासारखं ती म्हणाली, “काय नमुना आहे, म्हणजे, तशी वागाबोलायला बरीये, पण जरा एक आटा कमीच आहे. अगं, पहिल्या दिवशी डबा दिला तर त्यात अंड्याची भुर्जी. तीपण हे तेल घातलेली. म्हणून काकू म्हणाल्या, की मी सरळ हॉस्पिटलमधलंच जेवण घेत जाईन. तिला डबा देऊ नको असं तरी कसं म्हणणार ना? तशी एकदम सिंपल आहे गं. त्या टोणग्या आफताबला असलीच गरीब गाय बरोबर शोभते. मग मीच काकूंना म्हटलं कशाला? मी काकांपुरता पाठवते. त्याचा मला काही त्रास नाही.”
“म्हणूनच म्हटलं ना...”
“ए परत आता थॅंक्सचा जप करू नकोस हां! अति होइल”
“मी आता तिथं असायला हवं होतं ना. पण येऊही शकत नाही गं.. परीक्षा, असाईनमेंट्स, आणि.. एकुलती एक मुलगी आहे मी. बाबाला किती वाईट वाटत असेल.”
“खरं सांगू? त्यांना तुझा जाम अभिमान आहे गं. हॉस्पिटलमध्ये कोण ना कॊण भेटायला आलं की सांगतात, माझा लेक दूर गेलाय पण सायन्समध्ये पीएचडी करतोय. खूप हुशार आहे... काय मस्त वाट्तं ऐकायलाही, आपल्या अख्ख्या ग्रूपमध्ये तूच एकटी अशी वेगळी निघालीस. शाळेत असताना कधीच वाटलं नव्हतं की तू इतकी पुढे जाशील. आम्ही तर अड्कलो गं, घर नोकरी मुलं प्रमोशन अशा चक्करमध्ये. तू मात्र सुम्मडीत झपकन पुढे गेलीस. काका मला परवा म्हणाले की, एकच मुलगी आहे पण काय खणखणीत नाणं आहे.”
चश्म्याचा नंबर बहुतेक वाढला असावा, खूप वेळ लॅपटॉपकडे पाहिलं की डोळ्यांतून असं अचानक पाणी येतंय हल्ली... “वेदा, ऐक ना. मी नंतर कॉल करते. मीनव्हाईल प्लीज टेक केअर. काही लागल्ं तर सांग”
“कशाला काळजी करतेस? तुझ्या बाबांनी खूप माणसं जोडलीय. सतत कुणीनाकुणी अस्तंच... चल, नंतर बोलू या. तुला वेळ असेल तेव्हा कॉल कर”
मी कॉल कट केला, तेव्हा आमच्याकडे नुकतं उजाडत होतं. अमेरिकेत उजाडणारी सकाळ यावर दहाबारा ओळींचं काहीतरी खरडलं आणि फेसबूकवर टाकलं. हे एक नवीनच. हल्ली जरा लिहायचा छंद लागला होता. गौतमीचं ब्लॉग वगैरे वाचल्यापासून आपणही लिहायला सुरूवात करावी असं फार वाटत होतं. वेळही मिळायचा, म्हणून अधूनमधून काहीतरी लिहायचं. लोकं पण लाईक वगैरे करतात.
माझ्या प्रत्येक पोस्टला शाहीनचा लाईक असणारच. अधूनमधून कधीतरी मेसेजपण. कमेंट मात्र कधीच नाही. आफताब आणि शाहीनच्या लग्नाचा अफलातून किस्सा अजून आठवला की मला आधी हसू येतं आणि मग तिच्यासाठी वाईट वाटतं. बिचारी शाहीन.
मला इकडे येऊन जेमतेम वर्ष झालं होतं. बर्‍य़ापैकी रूळले होते. मी लॅबमधून बाहेर येत होते तेव्हा मला अझरभाईचा फोन आला. खरंतर मी फोन घेतलाच नसता पण इंडियामध्ये तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजलेले असतील... इतक्या उशीरा का फोन म्हणून की कॉल घेतला. तर पलिकडे आफताब.
“हॅलो” मी युएसला आल्यापासून आलेला हा पहिला फोन. “बोलायला वेळ आहे का?”
“बोला!” दोन गोष्टी क्लीअर होत्या, त्यानं मुद्दाम अझरच्या फोनवरून फोन केला होता, म्हणजे मी कॉल घेणार आणि दुसरं म्हणजे प्रचंड प्यायलेला होता. आफताब दारू पिऊन बरळत नाही. उलट स्पष्ट आणि एक एक शब्द व्यवस्थित उच्चारत बोलतो. त्याला ओळखत नसणार्‍या माणसाला समजणारही नाही, की हा माणूस पिऊन बोलतोय. पण अर्थात मी त्याला व्यवस्थित ओळखते आणि मला त्याचा हा आवाज चांगलाच चिरपरिचित आहे. “वेळ आहे. इतक्या रात्री कॉल केलास?”
“परत कधी येशील?”
“मला इथं येऊन अवघं वर्ष झालंय. अजून माझं रीसर्च चालू आहे... आणि...”
“परत. कधी. येशील?”
“आफताब, रीअली, मी आता काहीच सांगू शकत नाही...”
“सांग ना. परत येणारच नाहीस ना? तिकडेच राहयाचं ठरवलंयस. हो ना?”
“हे बघ, मी नाही सांगू शकत. मी तितका विचारही केला नाहीय आणि आता असं अचानक कसं सांगू?” अचानक पलिकडून अझरचा आवाज आला. त्यानं बहुतेक आफताबच्या हातामधला मोबाईल घेतला. अगदी अस्पष्ट तरीही व्यवस्थित मला इकडे ऐकू आलं. “इडियट! किया उतना कांड कम नही था क्या? बोला ना उसको फोन मत लगाव, इसिलिये तेरा मोबाईल ले लिया तो मेरे फोन से....” दोनेक क्षण शांतता आणि मग अझरचा आवाज आला. “हॅलो स्वप्निल, मी तुला नंतर कॉल करू का? जरा इकडे थोडा प्रॉब्लेम झालाय”
“नंतर नाही, आताच सांग. काय झालंय? किती प्यायलाय... काय केलंय त्यानं?”
“ड्रिंक्स जास्त नाही पण रेग्युलरच. आणि... स्वप्निल, उद्या त्याचं लग्न आहे.”
“काय?” मी एकता कपूरची हिरॉइन आहे असं समजा आणि हे “काय” वेगवेगळ्या रंगामध्ये आणि ढनाणट्याण म्युझिकमध्ये इमॅजिन करा. सीरीयसली मेंदूमध्ये ठिकर्‍या उडाल्या होत्या. “हे कधी ठरलं?”
“आज दुपारी.. उद्या निकाह”
“त्याला अभिनंदन सांग.”
“स्वप्निल, प्लीज ट्राय टू अंडरस्टॅंड. मलाही अपेक्षा नव्हती की अस्ं काही घडेल.. शिट यार. दिस इज अ कंप्लीट मेस..”
“आता जरा इतकं सांगतोच आहेस तर जरा सविस्तर मला समजेल असं सांग”
परत पलिकडे क्षणभर शांतता. आणि मग आफताबचा आवाज.
“स्वप्निल, सॉरीपण... मी आयुष्यभर तुझी वाट नाही बघू शकत. खूप प्रयत्न केला मी. स्वत:ला हे सांगण्याचा... की यु लव्ह हर. यु लव्ह स्वप्निल. आफताब लव्ह्ज स्वप्निल. हे खरंच आहे. आय लव्ह यु. पण माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी एकटा नाही ना जगू शकत. आय नीड समबडी. आय नीड अ फ्रेंड, अ कंपेनियन..... एकटं राहण्यापेक्षा...म्हणून मी आज हा डीसीजन घेतलाय..”
“आज?”
“ऑफ कोर्स. गावामधली मुलगी आहे. दूरच्या सही पण रिश्त्यातली आहे. मला ठिक वाटली. उद्या निकाह”
“अभिनंदन”
“साला, काय पोरगी आहेस. सीने में दिल है भी या नही... एकक्षण वाटलं होतं तू म्हणशील असं करू नकोस”
“मी सांगितलं तर तू निर्णय बदलणार आहेस का?”
“सांगून तर बघ..”
“आणि त्या मुलीचं काय? जी तुला आज ठिक वाटली, तिचं काय... तू उद्याच्या लग्नाचं प्रॉमिस केलंस ना? मग ते मोडशील? पुढं काय... मी अजून दोन चार वर्षं तर येणार नाही... तू इकडे येशील? नंतर काय... आपलं नातं संपलंय हे तुला अजून समजत नाहीये का? आफताब, आयुष्यात तुला सोडल्याचा पश्चाताप करत शंभर नरकात जळेन, पण एखाद्या मुलीचं लग्न मोडणार नाही... गॉट इट! कमीने मेरेको पूछ्ता है सीने मे दिल है या नही... सीने मे दिल नही होता तो भी किसीका सपना नही उजाडती.. फोन ठेव आणि झोप. किमान निकाहसाठी मशीदीत जाशील तेव्हा तरी शुद्धीत आलेला असशील..” त्यानं फोन कट करण्याऐवजी मीच कट केला.
रूमवर येऊन फरीदा खानुमचं आज जाने की जिद ना करो ऐकत बसले. बाईंचा आवाज आहे की सरळ सुरी! चिरत चिरत आतपर्यंत जाणारा आवाज... तासाभराने पण अझरचाच फोन. “डिस्टर्ब करतोय का?” अझरचा आवाज.
“ऑलरेडी प्रचंड डिस्टर्ब्ड आहे, तरी बोल ना”
“बोलायचं काय... मला काहीच सुचत नाहीये. एक तर इतक्या तडकाफडकी डीसीजन घेतला, मला न सांगता आणि आता लगेच उद्या लग्नपण...”
“मग माझ्याशी का बोलत बसलायस. लग्नाची तयारी कर जा...”
“काय तयारी? नवीन कपडे पण  आता संध्याकाळी आणलेत. नवरीला साडी घेतली तर ब्लाऊस वगैरे भानगडी करायला वेळ नाही म्हणून रेडीमेड घागरा घेतला.”
“तुमच्यांत तेच घालतात ना?”
“आमच्यात? छान! परके झालो का आम्ही? एनिवेज, ये तो होना ही था! अम्मीचे दागिने लॉकरमधून आणलेत. त्यावरच वेळ निभवू.. नंतर काय जमेल तसं. छोटेमियांकडे काय पैशाला कमी नाही. करतील बायकोची हौस.”
“तू इतका सॅड का?”
“कमॉन!! आनंदानं नाचू का? आफताबच्या लग्नाची चिकार स्वप्नं पाहिली होती. त्या प्रत्येक स्वप्नांमध्ये फक्त एक गोष्ट कॉमन होती. माझ्या घराच्या गेटपासून ते शेजारच्या घराच्या गेटपर्यंत घातलेला मांडव. त्याचं आयुष्य त्याचा निर्णय हे मान्य आहे. पण हे जाम खटकतंय. स्वप्निल, ती मुलगी खूप गरीब आहे. कमी शिकलेली आहे. दिसायला खास नाही पण ठिकठाक”
“ओके”
“ओके काय! कान्ट यु सी समथिंग?  शाहीन वाईट नाहीय, पण बारावी नापास! एकदा नाही दोनदा. अभ्यासांत कमी म्हणून घरचे लग्न लावून देत होते. बरेच दिवस कुणीही पसंद केलं नाही. न जाणो कसं काय आमच्याकडे रिश्त्यासाठी बात आली. खरंतर जाणारच नव्हतो पण हा एवीतेवी गावी आला होता म्हटलं घरात दारू पित बसेल त्यापेक्षा तिकडे तर जाऊ. आयते पोहे आणि मिठाई खाऊ. गेल्यानंतर पाचच मिनिटंत यानं मुलगी पसंद आहे सांगितलं. वर म्हणाला, उद्याच्या उद्या निकाह करत असाल तरच मी तयार आहे. काहीतरी कामाचा कॉल आला म्हणून मी नेमका बाहेर अंगनात गेलेलो. तोपर्यंत छोटेमिया सर्व ठरवून मोकळे झाले....”
“एकदम फिल्मी स्टोरी आहे...”
“अरे, नुसती पसंद आहे म्हट्लं तर बात अलग. हा सरळ मामुजान, कल का दिन अच्छा है. निकाह कर लेते है म्हणून मोकळा! अल्लाकसम, स्वप्निल, मी जागच्या जागी गरगरलो. काय बोलावं सुचेना. अफताब कुठल्याही गोष्टीचा असा आततायी निर्णय घेत नाही.”
“असं तुला वाट्तं. मी ज्या आफताबला ओळखते त्यानं सर्वच निर्णय असेच घेतलेत. रात्री माझ्या घरून निघून जाणं, किंवा एखाद्या रात्री माझ्या फ्लॅटवर येणं... तो इमोशनली खूप अन्स्टेबल आहे. खूप सारे इशूज आहेत... काहीही असो. त्याचा डीसीजन झालाय. त्याला निभवावा लागेल. तू का टेन्शन घेतोस?”
“स्वप्निल, दोघांमध्ये काहीही कॉमन नाहीये, आणि अशा लग्नांचा अंजाम काय होतो ते माहित आहे ना?”
“जे तुझ्या बाबतीत घडलं ते फारच वाईट होतं, लेट्स होप ही शाहीन काहीतरी वेगळी असेल.”
“आमेन.”
“स्पीकींग अबाऊट वेडिंग्ज, राही कशी आहे? तीपण येईल ना उद्या?”
“ओह! मी मेलो! ठार मेलो” मला एकदम हसू आलं. आफताबचं लग्न हा प्रश्न जणू मी आणि अझर दोघांनीही क्षुल्लक करून टाकला. अजून दुसरं काय करणार?
“तू तिला अजून सांगितलंच नाहीस?”
“कंप्लीट विसरलो. दिवसभर इतका फिरलोय.. तिला मेसेज करेन म्हटलं आणि राहिलं. आता रात्रीचे बारा वाजलेत. झोपली असेल. पण मेसेज करून ठेवतो... उद्या मी मार खाणार.”
“भोग आपल्या भावाच्या कर्माची फळं.”
“नाहीतर काय... मी तिला सांगितलं की आपण दोन तीन महिन्यांत लग्न करू. जरा थोडं सेटल होऊ देत. हा एक देवदास संभाळायचा होता.... पण आता छोटेमियां स्वत: सेहरा बांधतायत आणि आम्ही मागेच!!”
राहिला शेखला मी लहान पणापासून ओळखते. माझ्याच शाळेत होतीपण मला खूप सीनीअर. बाबांच्या दुकानाजवळच तिच्या वडलांचं दुकान होतं. अतिशय हुशार आणि शांत मुलगी. ती आर्ट्स कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होती. चार-पाच वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. महिन्याभरातच तिचा नवरा बाईकच्या ऍक्सिडंटमध्ये गेला. लग्नानंतर कधी सासरी राहिलीच नाही, माहेरी परत आली. दुसरं लग्न करायला तिची स्वत:चीच तयारी नव्हती.  हे तिचं लव्ह मॅरेज होतं. पण कुणीतरी योग्य जोडी जमतेय हे बघून अझरची आणि तिची ओळख करून दिली. सुदैवानं दोघं एकमेकांना आवडले. थोडे दिवस भेटून स्वभावचा अंदाज घेऊन त्यांनी नुकताच लग्नाचा डीसीजन वगैरे घेतला होता. फार भपकेबाज लग्न करायची इच्छा दोघांचीही नव्हती तरी काल ठरवलं आणि आज लग्न केलं असं कोण करतंय का? एक आपले सन्माननीय हीरो सोडल्यास!!!
खरंतर मला वाटलं होतं की त्याचं लग्न झाल्यावर मला फार वाईट वगैरे वाटेल. अगदी खरं सांगू. तसं काही वाटल्ंच नाही. मनानं कुठंतरी मी त्याच्यापासून विभक्त झाले होते. आता केवळ त्या विभक्तपणाला सबळ कारण मिळालं. नवरा म्हणून आफताब वाईट कधीच वागला नसता. केदारसारखं वर्षभर बायकोला दुसर्‍या खोलीत झोपायला लावून नंतर दोनेक वर्षांनी “नातवंड हवंच” या आचरट सल्ल्यामुळे (किंवा फिजिकल नीड्सही असतील. त्याला जाऊन कुणी विचारलंय!!) मुलगा जन्माला घालणे वगरे प्रकार त्यानं केले नसते. (केदारच्या पर्सनल लाईफचे भलतेसलते डीटेल्स मला मिळतच होते!!आपल्या समाजाचा हा एक फार प्लस पॉइंट असतो. गॉसिपिंगला लोकं एव्हररेडी असतात. असो. ) आफताबला शाहीन आवडली होती की नाही माहित नाही. पण एका गोष्टीची खात्री होती, एकवेळ त्यानं तिच्यावर प्रेम केलं नस्तं पण त्यानं तिला कधीच वाईट वागवलं नसतं.
अझरभाई एका अर्थानं म्हणत होते ते बरोबर होतं, तरी मला हल्ली हे पटत नाही. दोन व्यक्तींनी एकत्र जगायला त्यांच्यात काहीतरी कॉमन असायलाच हवं का? मी आणि मार्टिन एकत्र राहतोय. एका धर्माचे काय एका भाषेचे पण नाही. तरी दोघं एका घरात राहतो. वेळ पडेल तसं सांभाळून घेतो. त्याच्या घरून फोन आला तर मी दोनेक मिनिटं बोलते. एकत्र जेवतो. म्हणायला आम्ही एका घरात राहतो, पण तरीही स्वत्तंत्र जगतो कारण आमच्यात कसलंही सेक्शुअल बॉंडिंग नाही. आमच्या या घराच्या पलिकडे मार्टिन काय करतो याचं मला देणंघेणं नाही. सेम तेच त्याच्याहीबाबतीत. आमच्यामध्ये कसलंही रिलेशनशिप नाही तरीही वेळ पडलीच तर आम्ही एकमेकांचे आधार बनतोय.
मग रिलेशनशिप्स का इतकी कॉम्प्लीकेटेड असतात. त्यामध्येच ऑनेस्टी, लॉयल्ट्री, बीट्रेयल अशा संकल्पना का असतात... दोन वेगवेगळ्या व्यक्ती ठराविक काळापुरत्या एकत्र असतात, त्यावेळी दोघांमध्ये काहीही इमोशनल, मेण्ट्ल किंवा फिजिकल इंटरऍक्शन असेल... पण एकदा का त्या दोन व्यक्ती एकमेकांपासून वेगळ्या झाल्या की स्वतंत्र जगू शकत नाहीत का? किंवा त्यामध्ये एखादी व्यक्ती चुकूनमाकून धोका देत असेल तर समोरची व्यक्ती त्याची चूक माफ करू शकत नाही का? अगदी सत्य सांगायचं तर हे प्रश्न आता पडून काही उपयोग नाही. आणि त्यांची उत्तरं मिळवूनही काही उपयोग नाही.
आफताबच्या लग्नाचे फोटो मी फेसबूकवर पाहिले. एकदम छोटासा घरगुती समारंभ होता. त्यानं व्हाईट शेरवानी घातली होती. शाहीनचा फोटो मात्र त्यात नव्हता. नंतर दोन चार दिवसांनी मुंबई की पुण्यामधल्या कुठल्याशा (काय फरक पडतो? सगळे मॉल एकसारखे तर दिसतात) मॉलमध्ये दोघांचा सेल्फी पाहिला. नवरी अशी वाटलीच नाही. अझरभाई म्हणाला तशी त्याला अजिबात न शोभणारी होती. गबाळी अजागळ नव्हती, पण किंचित बावळट होती. खरं सांगायचं तर, आफताबच्या बाजूला कुठलीही मुलगी बावळटच दिसते. यांच्या देखण्या चेहर्‍यावर बुद्धीमत्तेचं तेज वगैरे.

मला आफ़ताबनं मी युएसला गेल्यावर (त्याच्या लग्नाच्याही खूप आधी) कधीतरी फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली होती. मी ती ऍक्सेप्ट केली. पण त्याच्या वॉलवर शक्यतो कधीच काही लिहिलं नाही. बाबांच्या आजारपणामध्येच आम्ही एकमेकांशी परत बोलायला लागलो. सुरूवातीला एकदम फॉर्मल. नंतर हळूहळू काहीतरी चेष्टामस्करी.
बाबाला आता बरं वाटत होतं, घरी आला होता. आठवड्यामधून एकदा तरी माझ्याशी बोलायचा. मीपण हल्ली त्याच्याशी बरंच काहीबाही बोलत होते. आईसोबत रोजचा एक फोन कॉल चालूच होता. आईबाबा दोघांनाही माझी काळजी होतीच, पण त्याहून जास्त अभिमान होता असं वेदा म्हणाली ते खरंच होतं. बाबानं एके दिवशी मला फेसबूकवर फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली (आणि वर फोन करून सांगितलं!). “निल्या, अधिकृतरीत्या आपण आता फ्रेंड्स झालो हां” तो मला फोनवर म्हणाला. मी रीक्वेस्ट ऍक्सेप्ट केल्यावर लगेचच.
पण नुसता फ्रेंड राहिला तर मला काहीच हरकत नव्हती, बाबाच्या अचाटपणाला सीमाच नाही. माझी प्रत्येक पोस्ट शेअर करायचा, वर त्यात मलाच टॅग करायचा. सोबत अजून कोणकोण गावामधले. बरं, या टॅग करण्यामध्ये काय लॉजिक असेल तर तेही नाही. मी सहज एकदा कुठल्यातरी पेजवरच्या ज्वेलरीची जाहिरात आवडली म्हणून मी शेअर केली. बाबानं ती जाहिरात शेअर केली ते केलीच वर त्यात केदारला टॅग केलं. हसावं की रडावं?? आधी मुळात केदार बाबाच्या फ्रेंडलिस्टीत कसा काय जाऊन बसला हा मला पडलेला ब्लॉकबस्टर प्रश्न. त्याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.
एकूणात इकडे गावाकडे सर्व मज्जा चालू होती. आणि या सर्व घडामोडी मला तिकडे दूर युएसमध्ये बसूनही आरामात समजत होत्या-आईमार्फत!. बाबा नगरसेवक म्हणून इलेक्शनला उभा राहणार होता.  त्याच्या पार्टीकडून त्याला तिकीट मिळालं होतं म्हणून विरूद्ध पार्टीनं अझरभाईला तिकीट द्यायचं ठरवलं. तेव्हा अझरभाईनं नको म्हणून सांगितलं. मग बाबानं अझरभाईला घरी बोलावून “खुळा आहेस का?” असं विचारलं. तो म्हणाला. “मी तुमच्याविरूद्ध कसा लढणार?” तर बाबा म्हणाला, “अरे शाण्या, मी जिंकलो तरी वॉर्ड आपल्या हातात आणि तू जिंकलास तरी वॉर्ड आपल्याच हातात. काही झालं तरी फायदा आपलाच ना!” असं सांगितलं. “तरूण तडफ़दार नेतृत्व म्हणून तुझे जिंकायचे चान्स जास्त आहेत, बिनधास्त उभा रहा, काय प्रचाराला पैसा बिसा कमी पडू देऊ नकोस!”
अझरभाई जिंकला आणि बाबा हरला. तरी बाबाचं फार काय नुकसान झालं नाही. त्याला हवी ती कामं अझरभाईनं करून दिलीच. आईनं हा किस्सा मला अगदी रंगवून सांगितला. एकूणात भारतीय लोकशाही नक्की कशी चालते याचं थोडंफार प्रात्यक्षिक बघायला मिळालं असं पण आई म्हणाली. आमच्या आईला टोमणेबहाद्दर किताब आज्जीनं फार आधीच का दिला होता ते आता पटलं.
आफ़ताबच्या लग्नानंतर तीन महिन्यांनी अझर राहीचं पण लग्न झालं. एकदोनदा राहीसोबत मी व्हीडीओ चॅटही केलं. आईनं मला सांगितलं की खूप चांगली आहे, शांत आणि समजूतदार आहे. आफताबच्या बायकोशी पण नीट वागते. तिला सांभाळून घेते. आईलाही आता ही सोबत चांगली झाली होती.
आफताबच्या लग्नांतर दोन तीन महिन्यांनी मला फेसबूकवर मेसेज आला. शाहीनचा, “तुमचा व्हॉट्सएप नंबर द्याल का?” मला प्रायव्हसीचं इतकं काही अडलेलं नाही. तसंही आफताबकडे माझा नंबर होताच, तरी तिनं मागितला म्हणून मी दिला. दोन चार दिवसांनी तिचा मेसेज आला. “हॅलो” इतकाच. मी पण तेवढाच रीप्लाय केला. मग परत आठेक दिवसांनी तिचा मेसेज आला. “मी तुम्हाला मेसेज केला म्हणून राग नाही ना आला?”
“नाही, त्यात राग येण्यासारखं काय आहे? आणि मला सरळ स्वप्निल म्हण, अहोजाहो नको”
त्यावर तिनं केवळ एक स्मायली पाठवली. मग परत चार दिवसांनी मेसेज. “मी तुम्हाला फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली नाही, कारण म्युचुअल फ्रेंड्समध्ये आफताबना तुम्ही दिसाल. प्लीज रागावू नका” आता यात रागावण्यासारखं काय आहे ते मला समजलंच नाही त्यामुळे मी ही थंब्जअप आणि स्मायली पाठवली. नंतर हळूहळू तिचे मेसेजेस येत राहिले. अर्थात आफताबच्या नकळत. मग एके दिवशी मी तिला मेसेज करून मग कॉल केला.
“मला  लग्नाच्या दिवशी आफताबनी तुमच्याविषयी सर्व सांगितलंय. म्हणाले की, तुम्हाला कधी विसरणार नाहीत...”
“शाहीन, जे घडलंय ते होऊन गेलंय. हे बघ, माझ्याकडून मी तुला पूर्ण खात्री देते की मी कुठलाही संबंध त्यच्याशी ठेवणार नाही. तुला जर तसं काही वाटत असेल तर मी त्याला ब्लॉक करेन आणि फोन नंबर डीलीट करेन”
“तसं काही नाही! त्यांनी आणि तुम्ही काय करावं हा तुमचा प्रश्न आहे. मी त्यात पडणार नाही, माझा काय संबंध?”
आईशप्पथ! हातातनं मोबाईल खाली पडता पडता राहिला. कुठल्या जगामधली ही मुलगी आहे? वयानं माझ्यापेक्षा कमी. शिक्षणानं कमी. एकूण जगरहाटीलाही कमी पण काय खणखणीत बोलते.
“असं काहीही नाहिये. इन फ़ॅक्ट, त्यानं तुला नक्की काय सांगितलं ते मला माहित नाही पण सध्या गेली दोनेक वर्षं तरी तो आणि मी सेपरेट आहोत”
“सेपरटे असणं वेगळं आणि सेपरेट होणं वेगळं. सच्ची बात हीच की ते तुम्हाला विसरलेले नाहीत. कधी विसरतील असं वाटतही नाही.”
“शाहीन, आफताबच्या लाईफमधली मी एकमेव गर्लफ्रेंड नाही हे तुला माहित असेलच! सांगितलंय ना त्यानं? भलीमोठी लिस्ट आहे, काही नावं तर त्याला आठवतही नसतील.”
“हो, पण इतर कुणाहीपेक्षा तुमच्याविषयी अधिक बोलतात. कायम सांगतात की स्वप्निल माझी एकमेव बेस्ट फ्रेंड होती. ब्रेकपचं दु:ख कसंही कमी होतं, पण इतका जिवलग फ्रेंड गमावल्याचं दु:ख मात्र कधीच कमी होणार नाही.”
“ग्रेट! म्हणजे हे बघ, तो आता मला फ्रेंडसुद्धा मानत नाही. याऊप्पर तुला काय हवंय?”
“काहीच नकोय. खरंतर मी तुम्हाला फोन का करावा हेही मला माहित नाही. पण सतत वाटत राहतं की मी या सर्वांमध्ये अगदी चुकीच्या ठिकाणी आलेय. इथं मी असणं हेच गलत. पण या सगळ्यामधून स्वत:ला बाहेर कसं काढायचं हेही मला कळत नाही. इतका हुशार पैसेवाला सुंदर नवरा मिळाला म्हणून सगळे माझ्या किस्मतची वाहवा करतात. हे स्वत: कित्येकदा म्हणतात की हे सगळं इतकं आता फक्त तुझं आहे.  पण मला वाटत राहतं की या सर्वांवर माझा अधिकार नाही. कुण्या दुसर्‍याचं काहीतरी बळकावल्यासारखं वाट्तं. मी तुमच्याइतकी किंवा यांच्याइतकी शिकलेली नाही. मला तर तो फूड प्रोसेसर का काय ते वापरायचा कसा तेही माहित नव्हतं. राहीभाभी मला सारखं काही शिकवत असतात. त्यांत चूक नाही, पण मग मला काहीच येत नाही, हे सारखं जाणवतं. मी तर यांना म्हट्लंपण मला गावाकडेच राहू द्या, मुंबईमध्ये मला कंटाळा येतो.”
“मग?”
“चिड्ले. म्हणाले, मला कंटाळा येतो म्हणून तर मी लग्न केलं... तुला गावाकडे ठेवायची तर मी लग्नच कशाला केलं असतं?”
क्षण असाच शांततेमध्ये गेला. “सॉरी, मी तुम्हाला फोन करून हे सर्व सांगणं म्हणजे.... पण अजून कुणाकडे बोलू ते कळत नाही.”
“डोन्ट वरी, मला नक्की काय बोलायचं ते सुचत नाहीय. अक्च्युअली, इतकं कॉम्प्लीकेटेड खरंच नाहीये. तुला वाटलं तर तू मला मेसेज कर, कॉल कर. पण त्याच्यापासून लपवून करू नकोस. त्यानं उगाच घोळ जास्त होतील. थोडा वेळ दे,स्वत:लाही आणि त्यालाही. स्वत:ला इतकं कमी लेखणं बंद कर. त्यातून हाती काहीच लागणार नाही. मी मुंबईला आले तेव्हा माझीही हीच हालत झाली. लहानपणापासून गावातच राह्यलेय. एकदम इतक्या मोठ्या शहरामध्ये खूप गोंधळायला होतं, मी पण गेलेय यामधून”
याला खरंतर आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी म्हणतात. शाहीनला नक्की काय म्हणायचंय ते मला माहित होतं. मुंबईमध्ये कंटाळा येतो किंवा गोंधळल्यासारखं होतं वगैरे गोष्टी उगाच सांगण्यासाठी. ती मला फोनवर सुरूवातीला म्हणाली तेच एक खरं. आपण दुसर्‍याच्या अधिकारावर अधिक्रमण करतोय, असं जर तिला वाटत असेल तर त्यात तिचं काहीच चुकीचं नाही. हा विश्वास तिला आफताबनं द्यायला हवा, त्यानं केवळ माझं आधी एका मुलीवर प्रेम आहे हे सत्य सांगून काहीच उपयोग नाही. यापुढे मी काय वागेन याचा विश्वास त्यानं द्यायला हवा. पण विश्वास आणि आफताब म्हणजे.. सलमान आणि शर्ट. एक असला तर दुसरा असेलच याची खात्री नाही...
शाहीनच्या या प्रश्नावर मी इकडे हजारो मैल लांब राहून काय करणार होते? एकवेळ मी केवळ त्याची मैत्रीण असते तर शाहीनला काहीतरी मदत करू शकले असते... किंवा केवळ आफताबची एक्स गर्लफ्रेंड असते तर सर्व संबंध तोडून सुखानं जगले असते, जसं केदारसोबत केलं होतं. पण इतकं सोपं नव्हतंच ना.
एके दिवशी, आफताबचा मेसेज आला. “टीव्हीवर खुशी लागलाय, बघणार का? की ब्लॅकने तिकीटं काढू परत?” नुसता मेसेज वाचला तरी तासभर हसत बसले. त्यानं आणि मी ब्लॅकने तिकीटं काढून पाहिलेला पिक्चर. आता सांगायलाही लाज वाटते पण त्याकाळी मला फरदीन खान आवडायचा. त्याचा नवीन पिक्चर म्हणून अगदी कौतुकानं गेलो होतो. पिक्चर वाईट नव्हता, पण करीनाची ओव्हरॅक्टिंग बघून डोकं दुखलं. आफताब नंतर कितीतरी दिवस तिला करीना कमर म्हणत होता. आठवणींचे हे असले गुंते मनातून काढता येत नाहीत, कुणी किती प्रयत्न केला तरीही. अशावेळी त्या आठवणींसोबत जगण्यातच शहाणपणा असतो. मी इतकी का हसतेय हे मार्टिनला कळेना, शेवटी या पिक्चरचा रेफ़रन्स दिल्यावर तो पण चिक्कार हसला. त्यानं तमिळ खुशी पाहिला होता, दोन्ही पिक्चरमध्ये आचरटपणा सेम लेव्हलला होता!
मार्टिन आणि मी काय कमी लग्नत्रस्त नव्हतो.  मार्टिनच्या  घरून रोज फोन यायचे. त्याच्या घरच्यांनी मुलगी पसंद केली होती. याला केवळ जाऊन लग्न करायचं होतं. त्याच्याकडचे हुंड्याचे (म्हणजे “गिफ़्ट्स”चे) आकडे ऐकले तरी मला भोवळ येत होती. एकदा आईला फोनवर बोलता बोलता सांगितलं की, मार्टिनला लग्नांत मुलीकडचे ऐंशी तोळं सोनं घालणार आहेत, म्हणजे किती गं? तर आई म्हणाली. आठशे ग्राम. बापरे!!! सरळ लिलावच का करत नाहीत हे लोकं लग्नाऐवजी?
मार्टिन मात्र जाम वैतागलेला होता, एक तर त्याचा थिसीस विनाकारण अडकला होता. शिवाय, घरून रोज एक दडपण. आज काय आजी जेवली नाही. उद्या आजोबा घर सोडून जातो म्हणाले. रोज प्रचंड वैतागलेला असायचा.
“घरून कॉल आला की वाटतं, फोन घेऊयाच नको. रोज तेच तेच टेन्शन. तमिळ फिल्म्स बघून यांना वाटतं की आम्ही इकडे अमेरिकेत मजा मारतोय. पैसे कमावतो पण वाचवून खर्च करतो ते त्यांना समजतच नाही.” एरवी कधीही न चिडणारा मार्टिन त्यादिवशी मात्र प्रचंड भडकला होता. “मी माझ्या मेन्टॊरसोबत बोलत होतो. माझा प्रॉब्लेम झालाय, थिसीसचा. ते सर्व सुटायला अजून चार दोन महिने जातील. हे मी बोलत असताना अम्माने मला पंचवीस मिसकॉल दिलेत. वर म्हणे, संध्याकाळी आठ वाजता तू कुठे होतास? घरी का आला नाहीस! म्हणून तुझं लग्न लावून द्यायला हवंय. जरातरी लॉजिक लावून बोला. मला लग्नच करायचं नाही इतकीशी गोष्ट त्यांना का कळत नाही?” मी हातातली सिगरेट त्याच्या पुढ्यांत धरली. त्यानं ती घेतली, “स्वप्निल, आय ऍम नॉट गोइंग बॅक. दॅट इज फ़ॉर शुअर” युएसमध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार एकदाना एकदा तर येतोच, कित्येकांच्या मनात कायमचाच.
“इतकं सोपं नाहीये, आपण आपल्या घरच्यांपासून दूर राहू शकत नाही”
“तू नाही राहू शकणार. मी राहू शकेन. इन फ़ॅक्ट मी इकडे यायचं कारणही हेच आहे, मला घरापासून दूर  जायचंय. माझा दम घुसमटतो. कितीहीवेळा एकच गोष्ट त्यांना सांगितली तरी ती पटत नाही, समजत नाही. मला सायकॉलॉजिस्टकडे जायचा सल्ला देतात, आय मीन, ब्लडीहेल, आय ऍम वन ऑफ द बेस्ट स्टुडन्ट्स ऑफ इंडिया. पण माझ्या फॅमिलीला ती गोष्ट अभिमानाची वाटत नाही. दे आर अशेम्ड ऑफ मी. ऑफ हू आय ऍम. वाटल्यास काहीही ट्रीटमेंट घे, पण एकदाचं लग्न कर आणि सर्व काही नीट होईल, हीच एक कॅसेट लावून ठेवलीये”

“ऍक्च्युअली, आपल्याकडे ही कन्सेप्ट फार भारीये, लग्न झालं की सर्व नीट होईल. आणि दुर्दैवानं माझ्या दोन्ही सीरीयस एक्सच्या बाबतीत ते खरंय. केदार इज हॅपी, आफताब तो अल्वेज हॅपी.”
“ऍंड यु?”
“आय डोंट मेजर माय हॅपीनेस इन अ मॅरेज. आय ऍम हॅपी. माझ्या आयुष्याचं सुख किंवा दु:ख मी लग्नाच्या परिमाणांत मोजत नाहीये. एकेकाळी मी भरभरून प्रेम केलंय. आता कुणाचीही गरज नकोशी वाटते. नंतर कधी थोड्या वर्षांनी तशी गरज भासलीच तर... पुढ्चं पुढे. पण म्हातारपणी कुणाची तरी सोबत हवी म्हणून आतापासून गळ्यांत धोंडे बांधून घेणार नाही पण माझ्याही घरचे सेम विषय लावून आहेत, मुलं बघ. आवडला तर लग्न कर. नाहीतर मग बघू!! माझी ना एक फ्रेंड बॉलीवूड स्ट्रगलर होती,  ती फिल्म्सच्या ऑडिशनचं सांगायची, आत गेलं की तिथं बसलेली एक बाई अथवा बाबा यांच्याकडे आपादमस्तक निहाळून बघायला आणि लगेच म्हणायचा “नेक्स्ट” थोडक्यात तुम्ही रीजेक्टेड. हे अरेंज मॅरेजकरता मुलं बघताना मी स्वत:ला त्या बाईच्या खुर्चीत इमॅजिन करते. तासाभरात भेटून हा माणूस आयुष्यभर आपल्यासोबत राहू शकेल का? आपली मुलं सांभाळू शकेल का? जेनेटिकली हा आपल्यासाठी योग्य जोडीदार आहे का? इमोशनली सपोर्ट देईल का? फिजिकली खुश ठेवील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवायची. क्रुएल प्रॅक्टीस!!”
“लकी फ़ॉर यु,  किमान तुला हे सगळं समजून घेणारे पॅरेण्ट्स आहेत. आमच्याकडे मी जर परत गेलो तर मद्रास एअरपोर्टवरच ब्राईडला आणून उभं करतील. इतकी तयारी करून ठेवलीये पण मला नाही ना करायचंय. ऍट लीस्ट आस्क मी, मला कुणासोबत आयुष्य काढायला आवडेल?”
“कुणासोबत?” मी दुसरी सिगरेट पेटवत विचारलं.
“तुझ्यासोबत! इथं आमच्या अख्ख्या लाईफची सॅड स्टोरी ऐकवायची आणि तुम्ही वाईट पीजे मारायचे. चलो, इट्स लेट. उद्या पहिलं लेक्चर आहे. गूड नाईट”
“गूड नाईट आणि लवकर झोप. उगाच अभ्यास करतो म्हणत सिगरेटी फुंकू नकोस.”
“सेज द चिमनी” मार्टिन आपल्या बेडरूममध्ये निघून गेला. गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये आम्ही जरा तरी निवांतपणे बोलायला लागलो होतो. त्याच्या कामाचा लोड प्रचंड वाढला होता, पण मुळातच थोडा घुमडतोंड्या असल्याने फार कुणाशी बोलायचा नाही. सुरूवातीला तर अगदी केवळ फॉर्मॅलिटीपर्यंतच. खरंतर तो माझ्याशी जास्त बोलत नव्हता तेव्हाच नॉर्मल वाटायचा, आताचा त्याच्या बोलण्यामध्ये कितीही मोकळेपणा आला असला तरी मला तो मोकळेपणा नाटकी वाटायचा. मार्टिन वाईट नव्हता, पण या अश्या अत्यंत स्ट्रेसफ़ुल वातावरणामध्ये तो तग धरून राहू शकला नसता. त्याला जबरदस्त इमोशनल सपोर्टची गरज होती... हे मला दिसत होतं, पण काही करता येत नव्हतं. मार्टिनच्या रूममधून थोड्याच वेळांत सीडीवर कूठलंतरी अगम्य तमिळ गाणं ऐकू यायला लागलं. मी आईने इतका वेळ व्हॉट्सऍप वर पाठवलेले मेसेजेस डाऊनलोड करायला घेतले. हा आमचा या आठवड्याचा होमवर्क. यामधल्या मुलांचे फॊटो बघा, माहिती वाचा आणि त्यावर मत प्रदर्शन करा!

>>>>>>>>>>>>>>> 
खरंतर कितीही वर्षांनी घरी परत आलं की घर हे घरासारखंच वाटायला हवं, पण आज तसं वाटत नव्हतं.
बाबा आता बर्‍यापैकी थकलेला दिसत होता. आई मात्र अजून आहे तशीच होती.  दोन वर्षांनी परत आले होते, पण सगळंच बदलल्यासारखं वाटत होतं. आमच्या घरासमोरचा रिकामा प्लॉट विकला होता आणि तिथे तीन मजली बिल्डिंग उभी राहिली होती, त्यामुळे आमचा हॉल आणि आईबाबांच्या रूममध्ये काळोख भासत होता. त्यामानानं माझी खोली बरीच उजेडाची राहिली होती, म्हणून आईबाबांनी त्यांची खोली माझ्या खोलीत शिफ़्ट केली होती, हे मला माहित होतं तरी चिडचिड झालीच.
मुंबई एअरपोर्टला आईबाबा मला न्यायला आले होते. तिथून काकाकडे गेलो, एक दिवस तिथेच थांबलो आणि दुसर्‍या दिवशी कारने घरी आलो. आल्यान्ंतर दोन दिवस मी एकच काम केलं- झोपणे.
आई तर ओरडली. “किती वर्षांच्या झोपेचा कोटा पूर्ण करायचाय?” मी दोन थालीपीठं आणि लोण्याचा गोळा मटकावल्यानंतर अशा प्रश्नांना माझ्या कानांपर्यंत येऊच देत नाही.

 “उठ! बाजारात जा. नवीन ड्रेस घेऊन ये! दिवाळी जवळ आलीये, फटाके आण. मी फराळ यंदा करणार नाहीये. रानड्यांच्या दुकानांत ऑर्डर दिलीये, ती घेऊन ये. ऐकलंस का?” लेक येऊन दोन दिवस  लाडबिड झाल्यावर आईबाई एकदम नॉर्मल मोडात आल्या होत्या. “आता उठतेस का की फटका देऊ?” अशी परवानगी वगैरे विचारायचं नाटक करून नंतर फटका जिथं द्यायचा तिथं देत आई ओरडली. “ताबडतोब”
“झोपू दे ना गं” मी पांघरूण तोंडावर घ्यायचा प्रयत्न केला. आईनं एखाद्या मार्शल आर्ट्सवाल्या माणसाला लाज वाटावी अशा चपळाईनं ते पांघरूण माझ्या हातातनं खस्स्कन ओढून घेतलं. आता नाईलाजच झाला.
“बाबा कुठाय?”
“दुकानांत गेलाय. दुपारी जेवायला येईल. उठ, पाच मिनिटांत शॉवर घेऊन ये. चांगले कपडे घाल”
“का? कुणी मला बघायला येणार आहे?”
“येतील ना! लवकरच तुला बघायला लोक येतील. हा कोण नमुना आलाय यांच्या घरी म्हणून, आणि काय गं! ए टवळे!” आता आईचा टोन बदलला होता, काहीतरी घणाघाती विषयांची सुरूवात होती, आधीच उठून बाथरूममध्ये घुसणं शहाणपणाचं. पण बॅट्समन की जोरदार कोशीश पर नाकामयाब “बस इथं, तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? आं!! ते लग्नासाठी स्थळं पाठवते त्या प्रत्येकाला काय स्टोरी ऐकवतेस? तुझं एक लग्न मोडलंय आणि दुसरं होता होता मोडलं! तुझ्या जीभेला काही हाड!”
“मग? खॊटं बोलून लग्न करू? हे आहे ते सत्यच सांगते ना?”
“सत्य सांगायलाही वेळ्काळ  नको? आधी मुलगा बघ, भेट, काय ते तुमचं स्काईप का काय ते करा, आणि मग नंतर सर्व योग्य वाटलं तर सांग! पत्रिका जमते म्हणून मेसेज आला की तुला लगेच आत्मचरित्र सांगायची गरज नाही. तो भास्कर मुलगा काय चांगलाय. त्याची आई आणि मी एकाच वर्गात होतो. सेम आईसारखाच दिसतो. शिवाय अतिशय शांत आणि चांगला वागणारा मुलगा. त्याला किमान भेटायला तरी हवं होतंस, तुझ्यासारखाच हुशार आहे. लंडनला असतो”
“आई, आता मला प्लीज ही ऍडिशनल माहिती देऊ नकोस. विषय मिटलाय.”
“हो, आता इतकं मोठं रामायण ऐकवल्यावर अजून काय होईल? पण याद राख! परत असला आगावपाणा करू नकोस. चल, आवरून घे”
चांगल्या झोपेचं खोबरं केलं असलं तरीही त्या दिवशी आईनं रगडा पॅटीस करायचं ठरवलं होतं म्हणून मी निमूट आवरून ब्रेकफास्टला किचनमध्ये आले. समोर ताटलीत कांदेपोहे.
“का गं आई? असा अन्याय का करतेस?”
“आव्वाज बंद. बाबासाठी गरमगरम पोहे केलेत ते खा. थोड्यावेळात रगडापॅटीस करेन. आणि हां, एक काम कर. राहिलाकडे जा. तिनं काल बोलावलं होतं तर तू हातभट्टीची झोकल्यासारखी बेशुद्ध.” ताटलीत पोहे पण आईच्या भाषेत काय खत्तरनाक उपमा!
पण कांदेपोहे हा पदार्थ जगामध्ये बॅन करायला हवाय. एक तर काय चव नाही, शिवाय विनाकारण त्याला आलेल्ं ग्लॅमर. आयुष्य म्हणजे चुलीवरचे पोहे म्हणे. तुमची आयुष्यं असतील अशी फुळकट बेचव. आमचं आयुष्य म्हणजे झणझणीत कट मारलेलं मिसळपाव.
मी अझरभाईंच्या घराकडे जायला निघाले तर आई परत ओरडलीच. “गडगा ओलांडून काय जातेस? नीट गेटकडून जा. पहिल्यांदाच भेट्तेस ना तिला?”
“काहीही! राहीभाभीसोबत रोज गप्पा मारते. आणि अझरभाईला भेटायला काय फॉर्मऍलिटी.” मी हट्टानं गडगा ओलांडूनच गेले. किचनचा दरवाजा पुढे ढकललेला होता.
“भाभी?” मी दार ढकलत विचारलं.
“कौन?” आतून आवाज आला.. फोटोमध्ये कित्येकदा पाहिलं असलं तरी समोर उभ्या असलेल्या शाहीनला मी पटकन ओळखलंच नाही.
“या! आत या” माझं येणं तिच्यासाठीही तितकंच अनपेक्षित होतं. तीही गडबडली.
“राहीभाभीला भेटायला आले होते...”
“त्या कॉलेजला गेल्यात. घंट्याभरात येतील.”
“ठिक आहे, मी नंतर येईन”
“आत तरी या. चाय ठेवलीच आहे”
“चहा नको, आता जस्ट ब्रेकफास्ट झालाय” मी डायनिंग टेबलची खुर्ची ओढून बसले. आता परत जाणं वाईट दिसलं असतं. ही होती म्हणजे हीरो असतीलच घरात. “कधी आलात?”
“काल रात्री! तुम्ही आज मुंबईला परत जाणार होतात ना?”
“हो, प्रोग्राम तसाच होता. पण कॅन्सल झाला” खरंतर आम्हाला मुंबईला तोच भास्कर मुलगा बघायला जायचं होतं. मी सुट्टीसाठी पंधरा दिवस आले तरी आईनं भरगच्च प्रोग्राम ठेवला होता. पण मी परस्पर मुलांना मेसेज करून आईच्या भाषेत “आत्मचरित्र” कळवलं होतं त्यामुळे हे सारे प्रोग्राम आपसूक कॅन्सल झाले होते. ही आयडीया खरंतर मार्टिनची. त्यानं घरच्यांना कंटाळून फोन करून त्यांनी ठरवलेल्या मुलीला फोन करून सांगितलं होतं, ते ऐकून अर्थात लग्नाला नकार आलाच. “दुनिया ना सच्चई से बओत डरती हय” मार्टिन त्याच्या टिपिकल तमिळ उच्चारांमध्ये मला सांगत होता. “सत्य सांगितलं नाही तर उलट जास्त प्रॉब्लेम येतात, खरं काय ते सांगितलं की प्रॉब्लेम उलट लव्कर सॉल्व्ह होतात.” मीही मार्टिनचा कित्ता गिरवला होता. त्यावरून आताच आईकडून चिकार बोलणीपण खाल्ली होती.
“पण बरं झालं ना. मुंबईत काय आपण भेटलो नसतो, इथे आलात म्हणून भेटले तरी. सुट्टी कशी चालू आहे?”
“आईची बोलणी खात आणि बाबाकडून ज्ञान ऐकत... अशीच सुट्टी संपणार”
“तुमचं तिकडचं काम झालं?”
“अजून नाही. दोन वर्षं शिल्लक आहेत...”
“खूप अभ्यास करावा लागत असेल ना. मला अभ्यास करायचा फार कंटाळा. हे म्हणतात घरात इतकी पुस्तकं आहेत तर वाचना... पण मला माही आवडत. मग वैतागतात. चायमध्ये शुगर किती?”
“एक चमचा” शाहीनला खरंतर पहिल्यांदा भेटतेय असं वाटलंच नव्हतं, याआधी फोनवर बोलले होतेच. मुळात तिचा स्वभाव फार एकमार्गी होता. या मुलीला कुणीही दोन चार गोड शब्द बोलून फ़सवलं असतं, इतकी साध्यासरळ स्वभावची होती. आफताबसारख्या मुलाला अशीच बायको आवडावी यात नवल ते काय...
“अझरभाई कुठं गेलेत?”
“मटण मार्केटला. हे दोघंही तिकडेच गेलेत. खरेदी आटोपून येतीलच. आज आमच्याकडे बिर्याणी बनवायचीय.”
“कमॉन शाहीन, आफताब मटण मार्केटला गेला असेल, अझरभाई चुकून तिकडे फिरकत नाही” यावर ती हसली. “तुम्ही इकडून गेल्यापासून बरंच बदललंय. अझरभाई हल्ली रोज मटण मार्केट नाहीतर मच्छी मार्केटला जातात.”
“लहानपणापासून बघतेय तो व्हेज आहे, मध्यंतरी तो व्हेगन झाला होता.”
“आतापण व्हेगनच आहे. मटण मासे मात्र रोज आणतो. कशासाठी बघायचंय? या इकडे”
तिनं किचनचा दरवाजा उघडला, या घराच्या पलिकडच्या भागामध्ये आधी नुसती झाडं आणि बाग होती. बहुतेक झाडं आफताबनं लावलेली. आता त्यामधली निम्मी झाडं गायब होती आणि नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेली झापांची झोपडीसारखं काहीतरी बांधलं होतं. “हे टेम्पररी आहे हां. लवकरच इकडे खोली काढणार आहोत” तिनं त्या झोपडीचं दार उघडलं. अझरभाईनं इथं लिटरली कोंडवाडा उघडला होता.
“रस्त्यावर लोकं कुत्र्यांमांजरांना सोडून जातात, कुणी गायीबैल सोडून जातात. मुक्या प्राण्यांना कोण बघणार? हे वर्षभरापासून चालू केलंय. अझरभाईंचंच काम! आता तर लोक स्वत: घेऊन येतात. सध्या पाच शिकारी कुत्रे आहेत, त्यांच्यासाठी मटण आणतात. अझरभाई नगरसेवक म्हणून झाल्यापासून याच कामांत फार बिझी असतात. लोक तर चिडवतात पण तुम्ही आमचे कमी आणि प्राण्यांचे जास्त लाड करता”
हे अस्लं तिरपागडं काम करणारा माणूस अझरभाई असू शकतो.  
“आमच्याकडे गावात मोप गुरंढोरं आणि पक्षी, त्यामुळे इकडे सांभाळायला मीच मदत करते. आठवड्यातून एकदा तरी येतेच. जीव खरंतर जास्त इकडंच अडकलाय”
“पण आफताबची झाडं कापली म्हणून चिडला असेल ना?”
त्यावर ती काही बोलली नाही, मीपण बोलले नाही. दोघी परत येऊन किचनमध्ये बसलो. “चाय सोबत काही देऊ? आज ब्रेकफास्टला चॉकलेट पॅनकेक बनवलेत. राहीभाभींची रेसोपी”
“अज्जिब्बात नको. माझं आणि चॉकलेटचं वाकडं आहे”
“मग काय देऊ?”
“नुसता चहा चालेल. तू पण बैस. केव्हाची उभी राहून काम चालू आहे, पाय दुखत वगैरे नाहीत का?” ती हसली. आईला विचारलं तर आईनं बरोबर सांगितलं असतं, पण मला या प्रकाराच्या अंदाजांची फार सवय नाही पण पाचवा किंवा सहावा महिना नक्कीच चालू असावा. वेल डन आफताब!
“मला उलट कामाची सवय आहे, नुसतं घरात बसून राहिलं की कंटाला येतो. त्यापेक्षा इकडे चार कामं जास्त केली तर परवडतं.”
“बाळंतपण कुठे?”
“इकडेच. माहेरी कोण करणार?”
“म्हणजे?”
“आई लहानपणीच गेली. बाबांनी दुसरं लग्न केलं पण ती बाई “आई” कधीच नसते. मग काय.... आता तर मी माहेरी गेले की मला चिडवतात... काय जादू केली आणि असला नवरा मिळाला... मी कधीच मागितला नव्हता, पैसेवाला, शिकलेला वगैरे असल्या काही मागण्याच नव्हत्या. तरी मिळाला. पण त्यावरूनही टोमणे. त्यापेक्षा मी तिकडे जातच नाही. इथे राहीभाभी म्हणाल्या की मी सर्व करेन. शिवाय मदतीला गौरीकाकी आहेतच.”
“गूड” काहीतरी बोलावं म्हणून मी बोलले. गौरीकाकींचा एकंदरीत बाळंतपणाचा अनुभव चहा पित बसलाय इथं समोरच. “चहा ऑस्सम केलायस.”
“तुम्ही दुपारी जेवायला पण या ना.”
“बिर्याणी तू करणार आहेस की आफताब?”
“त्यांना थॊडीच बनवता येते?” एका क्षणामध्ये त्याच ठिकाणी बसून मी अलमोस्ट पंधरा वर्षं मागे गेले. इथंच मी अरिफ आणि आफताब चाचींसाठी सरप्राईझ बर्थडे मेनू बनवत होतो. अचानक, केकची रिबन कन्सिस्टन्सी म्हणजे टेबलावर पीठ पसरून रिबन तयार होते का असं विचारणारा आफताब डोळ्यांसमोर आला आणि फिस्स्कन हसू आलं.
“काय झालं?” शाहीननं विचारलं.
“काहीतरी आठवलं. आम्ही एकदा इथे चाचींसाठी बर्थडे सेलीब्रेट केला होता. त्यादिवशी बिर्याणी बनवली होती.”
“यांनी?”
“नाही, अरिफने. तुम्हाला कदाचित माहित असेल..”
“बोलतात कित्येकदा. त्यांच्या डेथमुळे खूप डिप्रेस झाले होते ना?”
“हं!”
“हे मागेच बोलले होते, मुलगा झाला तर नाव अरिफच ठेवायचं..” आणि मुलगी झाली तर परी! मी आणि आफताब एकमेकांच्या प्रेमात पडण्यापूर्वीच त्यानं हे स्वत:शी ठरवलेलं होतं. अरिफच्या जाण्यामुळे त्याचं उद्ध्वस्त होणं मी पाहिलं होतं. अरिफच्या जाण्यानं आफताबला संपूर्ण बदललं, कमी वयांत आलेली जबाबदारी, एकटेपणा, घरामध्ये कायम स्वत:ला परकं मानायची वृत्ती, लवकरात लवकर पैसे कमावणे इतकंच साध्य ठेवून केलेले जीवापाड कष्ट. अरिफ गेला नसता, तर कदाचित आफताब वेगळाच झाला असता, सतत सहार्‍यासाठी या खांद्याकडून त्या खांद्याकडे जात राहिला नसता.
“अरे, हिरॉइन इकडे आली?” दारातून आवाज आला. मान वळवून बघायचीही गरज नाही.
“तुला भेटायला म्हणूनच आले तर तू गायब!” मी टोमणा रीटर्न केला, आणि उभं राहून मागे पाहिलं. अगदी निमिषभराचाच विश्राम, त्यानं आणि मी एकमेकांना पाहिलं, मग तो हसला, कुजकट किंवा छद्मी नाही तर अगदी मनमोकळेपणानं, मीही हसले. एकमेकांना प्रत्यक्ष भेटताना कधीकाळचे प्रेमी म्हणून भेटायचं की लहानपणचे मित्र म्हणून हा प्रश्न दोघांनाही एकाच क्षणी पडला, आणि त्याचक्षणी उत्तरही देऊन गेला. आम्ही एकमेकांचे मित्र आधी, मग बाकीचे काय इमोशनल झोल असतील ते.
“शाहीनची ओळख झाली?” त्यानं विचारलं.
“हो, चहाच घेतोय”
“अझरभाई किधर?” शाहीननं विचारलं. त्यानं हातातली पिशवी तिच्या हातात दिली. “क्या पागलपंती मालूम नै. उसको किसीका फोन आया, किधरतोभी पानी नही आया करके लोग गाली दे रहे थे. वो माजरा देखनेको गया. घंटेभर मे वापस आया बोला है. चाय बनाया?” म्हणत त्यानं शाहीनचा तिथं ठेवलेला कप उचलला आणि तोंडाला लावला.
मघाशी म्हटलं तसं मला शाहीन आणि आफताबबद्दल कधीच जेलसी वाटली नाही, पण त्याक्षणी मात्र वाटली. त्यानं तिचा कप उचलून सहज चहाचा घोट घ्यावा, यात इतकं वाटण्यासारखं काय आहे ते मला माहित नाही, पण मला वाईट वाटलं हे नक्की.. ऍक्चुअली वाईट पण नाही वाटलं, काहीतरी एकदम खळबळजनक वाटलं, तेवढंच, तेवढ्यापुरतंच. पण काहीतरी मनामध्ये हडबडून गेलं हे मात्र नक्की. आफताब इतका सहज वागलेला मला फारसा आठवत नाही... मग अचानक डोक्यात क्लिक झालं. शाहिन आणि अरिफ. दोघंही एकाच घडणीचे. सावत्र आई, कमी शिक्षण त्यामुळे आलेला न्युनगंड.. आफताबनं हा निर्णय आततायीपणा मुळे घेतलाच नव्हता. कुठंतरी त्याला शाहीनमध्ये अरिफ भासला होता, जाणवला होता. हे लग्न केवळ त्यानं स्वत:ची सेक्शुअल सोय म्हणून केलं नव्हतं, तर मनापासून त्याला शाहीनबद्दल काहीतरी जाणवलं म्हणून केलं होतं.
“ठंडी हो गयी तो फिर बनाऊ?” तिनं त्याला विचारलं.
“नही, रहने दो! चाय बनाया के मस्करी. कितनी कम शक्कर डालते!” त्यानं उत्तर दिलं. नंतर मोर्चा माझ्याकडे वळवला. “कधी आलीस?”
“दोन दिवस झाले.”
“अझरभाई म्हणालेला. बाकी युएस काय म्हणतंय?”
“ते ओबामाला विचार. मला काय माहीत?”
“खडूसपणा गेला नाहीच ना तुझा?”
“तुझ्याचकडून शिकलेय. सहजासहजी थोडीच विसरेन”
“मी इतका खडूस अजिबात् नाही. का गं शाहीन?”
“तू तिची साक्ष घेऊ नकोस. ती जितके महिने तुला ओळखते ना, तितकी वर्षं मी तुला ओळखते”
“तुमच्या दोघांची भांडणं चालू द्या, मला मोप कामं आहेत, मी आलेच पाच मिनिटांत.” शाहीन ती मटणाची काळी पिशवी घेऊन किचनमधून बाहेर गेली. मी आणि आफताब दोघंच राहिलो. माझ्या समोरची खुर्ची ओढून तो बसला.
“जाड झालीस!”
“बायको चांगली आहे. नीट वाग तिच्यासोबत”
“मी नीट वागणार नाही असं तुला वाटलं कसं काय? आय हॅव अल्वेज बीन अ गूड बॉय”
“असं तुला वाटतं!”
“शाहीनला पण असंच वाटतं... विचार वाटल्यास”
“मी कशाला विचारू? क्लीअरली तुझ्यापेक्षा जास्त अक्कल तिच्याकडे आहे, आपल्या दोघांना बोलायला मिळावं म्हणून ती बाहेर गेली.”
“हाच सीन तीन वर्षांपूर्वी घडला होता, स्वप्नील. पण त्यावेळी तुझ्या मनांत जो संशय आला तो शाहीनच्या मनात शंभर वर्षांत येणार नाही.”
“मी खोटं बोलून आली नाही, आणि येणारही नाही. गरीब गाय आहे ती, तुझ्यासारख्या कसायाच्या हाती सापडलीय”
“असेलही, पण या कसायाला तिनं कायमचं बांधून ठेवलंय हेच एकमेव सत्य..”
“जे कदाचित मला जमलं नाही”
“जमलं असतं पण तुझा विश्वास नव्हता, माझ्यावरही आणि स्वत:वरही”
“आता यावर चर्चा करून उपयोग काय आहे?”
“तेव्हा तरी चर्चा करून काय उपयोग होता?” त्याचा मोबाईल वाजला. तो मेसेज वाचत असतानाच मी उठले.  
“चलो, मी निघते. आई वाट पहात असेल.”
“हं!” त्यानं मान वर न करता म्हटलं. “शाहीनला बाय सांग. नंतर निवांत येईन” त्याचं लक्ष नव्हतं.
मी बाहेर पडताना किचनमधून बाहेर न पडता पुढच्या दरवाज्यानं बाहेर आले. खरंतर मला त्या गेटमध्ये दोन क्षण थांबावंसं वाटलं, अरिफसाठी. तो पहिल्यांदा इथंच भेटला. त्याही दिवशी आईनं कांदेपोहेच केले होते आणि पातेलंभर पोहे घेऊन मी इथंच तर उभी होते. अरिफची आठवण एरवी कधीच येत नाही. पण जेव्हा कधी येते तेव्हा या माणसानं आपल्या आयुष्यात काय भलीमोठी पोकळी सोडली आहे याची जाणीव होते.. आफताबला खरं कधीतरी विचारायला हवं, अजूनही तो स्वप्नांत येतो का म्हणून...
विचार करत मी गेटबाहेर आले. इथून मोजून पंचवीस तीस पावलांवर माझं घर. हे घर नक्की कुणाचं? इथे कधीकाळी शास्त्रीकाकू रहायच्या, मग हे चाचींचं घर झालं, थोडे दिवस अरिफचं होतं, मग कधीतरी ते आफताबचं झालं, मग नंतर ते अझरभाईचं झालं. आता मात्र हे घर राहीचं आणि शाहीनचं. चाचींना आई कधीतरी चिडवायची, तीन तीन सुना आल्या की तुमची सद्दी संपलीच. तीन नाही तर दोन सुना या घरात आल्याच. आपापल्या परीनं घराला सावरणार्‍या. राही आणि अझरचा प्रश्नच नव्हता, परिस्थितीनं होरपळलेले दोघंहीजण, एकमेकांना सावरून घेत होते. शाहीन आणि आफताब दोघं दोन ध्रुवावरचे प्राणी. लग्नाच्या गाठी म्हणे, स्वर्गात बांधतात. यांची गाठ बांधताना देवाजीमहाराज नक्की तारक मेहता का उल्टा चष्मा बघत बसले असणार. तरीही, दोघं सुखी होते.
आयुष्याकडून अजून दुसर्‍या अपेक्षा तरी काय असतात.... गोष्ट संपत आल्यासारखी का वाटतेय? खरंतर गोष्ट कधीच संपत नाही. माझी गोष्ट तरी का संपावी? कालच फेसबूकवर गौतमीनं पोस्ट टाकली होती की, तिच्या पुस्तकाला प्रकाशक मिळालेला आहे. तिच्या इतक्या दिवसांच्या कष्टाचं सार्थक झालं वगैरे वगैरे. तिचीतरी गोष्ट कुठं संपली आहे? तरी तिनं संपवली. बाबानं ठेवलेली बाई दोन वर्षांपूर्वी मेली. तिचा अंत्यसंस्कार बाबानंच केला. त्या नात्याची गोष्टही संपली. नूरीनं दुसरं लग्न केलंय, अझर आणि नूरीची गोष्ट संपली. अरिफ आम्हा सर्वांना सोडून अचानक गेला, त्याची गोष्टही संपली. पण अजून काही दिवसांनी अरिफची गोष्ट परत सुरू होईल, शाहीन आणि आफताबचा मुलगा म्हणून. नाती संपतात, नात्यांची गोष्ट संपते. चालू राहते... ती मात्र एक जिवंत रसरशीत कहाणी.
खरंतर माझ्या कहाणीमध्ये वेगळं काय आहे? कसलाही संघर्ष वगैरे नाहीच. समाजाच्या उच्च मध्यमवर्गामध्ये जन्माला येऊन शिक्षण नोकरी करीअर कशाही बाबतीमध्ये मला त्रास झाला नाही. अगदी परधर्मीय व्यक्तीबरोबर लग्न केलं असतं तरी माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला असता. जातधर्मलिंग याहून अधिक काहीतरी जास्त महत्त्वाच्या गॊष्टी जगण्यामध्ये असतात... सुदैवानं हे ओळखणारे लोकंच आजूबाजूला कायम भेटत गेले. मग तरी माझी कहाणी मी का सांगतेय? वयाची तिशी जवळ आली, बहुतेकांच्या दृष्टीनं हा “सेटल” होण्यासाठी अगदी योग्य वय. मी अजून सामाजिक मान्यतेच्या चौकटींमध्ये बघितलं तर “सेटल” झाले नाही. पुढे मागे कदाचित होईनही. इथवर येऊन पोचेन असं कधी वाटलंच नव्हतं त्यामुळे इथून पुढे कुठे जाईन तेही माहित नाही. पण जिथं कुठं जाईन तिथं मात्र माझ्या मर्जीनं माझ्या निर्णयानं इतकं मात्र निश्चित.
मी घराकडे चालत असतानाच पाठीमागून आफताबचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं. “मोबाईल विसरलीस”
“थॅंक्स” शाहीनशी बोलता बोलता टेबलावर ठेवला होता तो तिथंच विसरले.
“कुणाचा तरी कॉल आला, म्हणून मला समजलं की तुझा मोबाईल राहिलाय. कमॉन, आता तरी ही रिंगटोन चेंज कर”
“गेल्या बारा वर्षांत केली नाही. यापुढेही कधी करणार नाही..”
“अशीच हट्टी रहा! मी मघाशी जास्त बोललो नाही म्हणून प्लीज रागावू नकोस. खरंतर समोरासमोर बसून बोलण्यासारखं काही राहिल्ंच नाहीये असं मला का कुणास ठाऊक वाटलं.”
“आय नो, तरीही, मेसेंजरवर बोलूच”
“आय रीअली प्रेफर दॅट. संवादही राहतो, आणि डिस्टन्सही.”
“संवाद बंद होणारच नाही ना?”
“का? का बंद करायचाय? स्वप्नील, यु आर माय ओन्ली फ्रेंड. फेसबूकच्या लिस्टमध्ये हजारो लोक आहेत, पण तू माझा एकमेव मित्र आहेस. ही वेवलेंग्थ इतर कुणाशीही जुळली नाही, यापुढे जुळणार नाही. माझ्यासाठी तू एक ओऍसिस आहेस. मिळणार तर कधीच नाही... पण किमान समोर आहे म्हणून चालत तरी राहीन” मी काही बोलायच्या आत माझा मोबाईल परत वाजला, अननोन नंबर! मी कॉल कट केला.
“मी घरी सोडू का तुला?” त्यानं विचारलं.
“आता असं अंतर किती राहिलंय? निम्मं अंतर एकटीनंच पार केलं” मी जायला निघाले. परत मघासच्याच नंबरवरून कॉल आला. रहे ना रहे हमची रिंग टोन परत वाजायला लागली. समोर उभा असलेला आफताब गुणगुणत राहिला. “महका करेंगे, बनके कली बनके सबा बाग ए- वफामे...”
“खरंच ही रिंगटोन कधीच बदलू नकोस” तो म्हणाला. “बाय!”
मी कॉल ऍक्सेप्ट केला, आणि मागे वळून त्याला बाय केलं. त्यानं उगाचच जरा झुकून वगैरे मला आदाब केला आणि तो मागे फिरला.
पलिकडे एकदम सेक्सी कुणीतरी बोलत होतं. “हॅलो.. मला जरा स्वप्निलसोबत बोलायचं होतं!” काय आवाज आहे. बेनेडिक्ट कंबरबॅच एकदम शुद्ध पुणेरी उच्चारांत बोलला तर कसं वाटेल. सेम तेच फीलिंग. “हॅलो... मिस स्वप्निलचा नंबर आहे ना?”
“बोलतेय”
“तुमच्याकडे आता बोलायला जरा वेळ आहे का? मी डिस्टर्ब तर करत नाहिये ना?”  
“नक्की कशासंदर्भात बोलायचंय?”
“मी भास्कर. माझ्या आईनं तुमचा फोटो आणि इतर माहिती पाठवली होती, तुमचे एक दोन मेसेज पण आलेत” मी चालत चालत घराच्या गेटपर्यंत पोचले होते. आईच्या जगप्रसिद्ध रगडा पॅटीसचा वास अंगणभर येत होता. खरंतर आता या इसमाला अजिबात वेळ नाही अजून अर्ध्या तासाने फोन कर असं सांगावं वाटलं. पण त्याचा तो आवाज!!! मी गेटपासून परत मागे फिरले आणि रस्त्यावरून चालत राहिले. आईसमोर याच्याशी बोलायचं वगैरे म्हणजे ती शकुनाच्या करंज्याच करायला घेईल!!
“बोला ना, सुट्टीवरच आलेय त्यामुळे चिक्कार वेळ आहे.”
“तसं फार महत्त्वाचं काही नाही. पण तुमचे मेसेजेस वाचले पण त्याचा कंटेक्स्ट मला समजला नाही. जर आपण आता अरेंज मॅरेज या कन्सेप्टला शरण जाऊन एकमेकांना जाणून घेणार असू तर आय विल बी मोअर इंटरेस्टेड इन यु. तुमच्या लाईफमध्ये आधी काय घडलं याची चर्चा करून काय उपयोग? तुम्हाला अधिक जाणून घ्यावंसं वाटेल.... तुमची काही हरकत नसेल तरच हां....”
“माझी कशाला काय हरकत.. पण बेसिकली, मला काही लपवून ठेवायला आवडत नाही. आणि असाच प्रामाणिकपणा मलाही अपेक्षित आहे...”
तो हसला, “माझ्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही... तरी तुम्हाला विचारा काय हवं ते..”
मी त्याच्याशी बोलत राहिले... मनाच्या कुठल्यातरी एका कोपर्‍यात गाणं वाजतच राहिलं.
खोये हम ऐसे, क्या है मिलना क्या बिछडना नही याद हमको,
कूंचे मे दिल के जबसे आये सिर्फ दिल की जमीं है याद हमको
इसी सरजमीं पे हम तो रहेंगे, बनके कली....
रहे ना रहे हम महका करेंगे बनके कली बनके सबा....

(समाप्त)


Sunday, 30 July 2017

रहे ना रहे हम (भाग २९)

 “हॅलो” माझ्यापेक्षा तोच जास्त अवघडलेला असणार.
“हॅलो!” मी कसंबसं उत्तर दिलं. अजून उठून माझं काहीसुद्द्धा आवरलं नव्हतं. हा कसा काय आला याहीपेक्षा मी घरच्या कपड्यांमध्ये असताना हा का आला याप्रश्नाने मला जास्त सतावलं. समोरासमोर काही फ़ुटांवर असलेल्या माणसांच्या नात्यामध्ये कित्येक मैलांचं अंतर कसं पडलं असतं त्याचं हे उत्तम उदाहरण. अचानक, अझरच्या घरी त्याच्यासमोर चेहरा लपवून वागणारी नूरी इल्लॉजिकल वाटली नाही. मला चेहरा लपवून काही फायदा नव्हता. बरंच काही लपवावं लागलं असतं, मी शॉर्ट्स आणि गंजी अशा जागतिक वेषामध्ये होते.
“आत येऊ?” त्यानंच विचारलं. मनांतले विचार तुफान स्पीडने चालू असले तरी तोंडाने “येना” असं म्हणून वेळ मारून नेली. तो आत आला, त्यानं नजर इकडेतिकडे फिरवली. घरभर पसारा. प सा रा! हॉलमधल्या खुर्चीवर फेकलेला टॉवेल. पीसीच्या टेबलावर ठेवलेला चिवड्याचा डबा. (आईने दोन किलो चिवडा घालून दिलेला!) त्याच्याच बाजूला पडलेलं सुनीताबाईंचं “आहे मनोहर तरि” त्याच्यावर ठेवलेलं सिडनी शेल्डनचं ब्लड्लाईन (काय तरी चॉइस!) त्याच्या बाजूला पाण्याची अर्धवट बाटली. पीसीवर चालू असलेलं “ऊंची है बिल्डिंग” (सलमान खान प्लेलिस्ट!!) त्याची नजर खोलीभर फिरून परत माझ्यावर आली. हातामधली फुलं त्यानं माझ्यासमोर धरली. “कुठे ठेवू?”
आता मी काय हिंदी पिक्चरची हिरॉइन आहे का? माझ्या घरामध्ये इतकी फुलं ठेवायला व्हास (गमला म्हणा आणि स्वत:ला काजोल समजा!) असणार आहे का? नाहीये हे त्यालाही माहित होतंच ना? तरी किचनमधून एक मोठा ग्लास अणून मी समोर धरला.
पिंगट डोळे सरळ माझ्यावर रोखत म्हणाला. “तो येलो जग घेऊन ये”
हां! आता आठवलं. किचनमध्ये एक प्लास्टिकचा जग होता त्यात फुलं राहिली असती. मी किचनमध्ये जाऊन जग शोधला, त्या भानगडीत जास्त काही नाही. चारपाच भांडी पडली हातातून वगैरे. तेवढ्यांत पीसीवरचं ते कर्कश्श गाणं संपून दुसरं लागलं “रात का नशा अभी आंख से गया नही” (ओह, ही अनु मलिक प्लेलिस्ट चालू होती होय!)  सीन काय, गाणं काय!!
मी तो जग बाहेर आणून देईपर्यंत हा आत येऊन दारांतच थांबला होता. फक्त दार बंद केलं होतं. माझ्या हातातून जग हिसकावून घेतल्यासारखाच त्यानं घेतला. त्यात फुलं नीट ठेवली, मग पीसीच्या टेबलावरची पुस्तकं उचलून खुर्चीवर ठेवली (त्याआधी टॉवेल काढला!) चिवड्याचा डबा पुस्तकांवर ठेवला आणि तो फुलांचा बूके तिथे ठेवला. पीसीवरचं गाणं बंद केलं. बाटलीतलं पाणी जगमध्ये ओतलं आणि मला म्हणाला “ऍस्पिरिन आहे?”
“आं?” इतका वेळ त्याच्याकडे टक लावून बघत असल्यामुळे तो काय म्हणाला ते मला क्षणभर कळलंच नाही.
“ऍस्पिरिन?”
“नाही, पण टायगर बाम आहे. देऊ?”
काहीतरी म्हणायला त्यानं सुरूवात केली, पण मग कपाळावर हात मारल्यासारखा केसांतून हात फिरवत गप्प बसला. कदाचित,  त्याची डोकेदुखी कमी झाली असावी. फार कशाला विचारा?
“येण्यापूर्वी तुला फोन करत होतो. स्विच ऑफ लागत होता”
रात्री फोनची बॅटरी वीस टक्के होती, सकाळी उठल्यावर चार्जिंगला लावेन म्हटलं होतं. विसरले, स्विच ऑफ झाला असेल.
“चार्जिंगला लावते” मी बेडरूममध्ये येऊन फोन हॉलमध्ये आणला. माझा चार्जर तिथे होता. चार्जिंग सुरू झाल्यावर फोन स्विच ऑन केला. मी मेसेजेस वाचत बसले.
“किती वाजता बाहेर पडणार आहेस?” त्यानं बेडरूमच्या दारात उभं राहून विचारलं.
“निवांत अकरानंतर. शॉपिंगला तर जायचंय...” मी रात्रभरात आलेले मेसेजेस बघत होते, नकळतपणे बोलून गेले. बोलून झाल्यावर समजलं माझा आजचा प्लान काय आहे ते समजून घेण्यासाठी त्यानं हा प्रश्न विचारला असणार. ही ट्रीक यापूर्वीही त्यानं माझ्यावर वापरली होती. तरी मला अक्कल आलेली नाहीच.
“ब्रेकफ़ास्ट?”
“बाहेरून ऑर्डर करणार आहे. तुझ्यासाठी?”
“चालेल.”
“घरातून किती वाजता बाहेर निघालास?”
“सात वाजता. ट्राफिक जास्त नव्हतं म्हणून लवकर पोचलो, इतक्या लवकर येईन असं वाटलं नव्हतं. तू शॉपिंगला एकटीच जाणार आहेस की कुणी सोबत येणार आहे?”
“कुणी कशाला, मीच एकटी जाईन. तुझा प्लान काय आहे?”
कशासाठी आलास, हा प्रश्न ओठांपर्यंत येऊनही मी विचारला नाही. त्याला माझं हे घर सोडून अल्मोस्ट सहा महिने झाले होते. सहा महिन्यांत एक फोन नाही, मेसेज नाही, समोरासमोर भेटणं दूर. गावी आला तरी लांबच राहिला, आणि आज न सांगता-सवरता असा अचानक आलाय.
“माझा काय प्लान असेल? तुला भेटायला म्हणून आलोय. तुला वेळ नसेल तर परत जाईन. वेळ असेल तर एकत्र फिरू, शॉपिंग, लंच, मूव्ही, व्हॉटेव्हर यु से.”
“मी मूव्हीची तिकीट काढलीत. पण एकच.”
“यु नो व्हेरी वेल, मला मूव्ही वगैरेपेक्षाही तुझ्याशी बोलायचंय म्हणून मी आलोय. शक्य असेल तर... प्लीज, बोलूया का?”
“तू ब्रेकफास्टची ऑर्डर दे, मी आवरून येते. बाहेरच जाऊ” विषय परत एकदा टोलवला.
मी बेडरूममध्ये येऊन चक्क दार लावून घेतलं. एरवी मी असं कधीच केलं नसतं, आफताब इतका परका होता का? ज्याला आपल्या शरीराच्या कणाकणाची ओळख आहे, त्याच्यापासून नक्की कशासाठी? लाज वगैरेंपेक्षाही परकेपणा अति दुर्दैवी. त्याच्या आणि माझ्यामध्ये आता ती परकेपणाची भिंत उभी होती. एकवेळ द ग्रेट वॉल ऑफ चायना कोसळेल, पण अशा अविश्वासाच्या भिंती कधीच ढासळत नाहीत. बाथरूममध्ये शॉवर वगैरे घेऊन आल्यानंतर परत एक पेच उभा ठाकला. मी एकटीनेच बाहेर जायचं म्हणून कंफर्टेबल ब्लू जीन्स आणि व्हाईट शर्ट काढून ठेवला होता. बाहेर आमचे आलेले हीरो पण ब्लू जीन्स आणि व्हाईट शर्टमध्ये. अगदीच बॅंडवाले वाटलो नसतो तरी मुद्दाम इतकं सेम्सेम नको वाटलं, कपाटभर खरंतर कपडे होते, पण एकही मनास येईना. हा पिंक नको (व्हॅलेंटाईन्स डे!!), हा ब्लॅक नको (एकदम फ़्युनरलला निघाल्याचं फिलींग येईल), हा कॉफी कलर तर बिल्कुल नको (त्यानंच गिफ़्ट केलंय), हा स्काय ब्लू नको, त्याला अजिबात आवडत नाही.... कपाटामधून कपड्यांचा ढीग उपसला. एकही मनास पसंद पडेना. त्यानं माझ्या दारावर येऊन टकटक केली. “ब्रेकफास्ट आलाय . आवरलं?”
“यप्प. दोन मिनिटं” डोळे बंद केले आणि हाताला येईल तो टॉप उचलला. हिरव्या कलरचा आईच्या मैत्रीणीने गिफ़्ट दिलेला एकदम साडीबिडी मटेरीअलचा शिवलेला भयाण टॉप होता. फिटिंगला लूज, शिवाय रंग बेक्कार. परत डोळे बंद केले, यावेळी हाताला ग्रे कलरचा टॉप आला. मस्तच होता, पण.... मला फार आवडत नाही. पण असो!
तोच घातला. केस विंचरताना माझंच मला हसू आलं. अख्ख्या आयुष्याच्या प्रश्न असलेली व्यक्ती दाराच्या पलिकडे उभी आहे आणि मी त्याचा विचार करण्याऐवजी काय कपडे घालू यावर इतका विचार करतेय! आयुष्यात आपल्या प्रायोरीटी चेंज झाल्यात हे नक्की.
बाहेर आले तेव्हा इडली, डोसा आणि चटणी सांबार वगैरे सर्व प्लेट वाट्यांमध्ये घेतलं होतं.  त्यानं माझ्याकडे रोखून पाहिलं.
“रडत होतीस की काय?”
“रडायला काय धाड भरली? लेन्स घालताना जरा धक्का लागला!”
“ओके, लेन्स जुन्या झाल्यात, बदलून घे. मी कॉफी बनवलीये. आय होप यु डोंट माईंड”
“ओके, बाकी कामाचं कसं चालू आहे?”
“ठिक, तुझं? कधी निघणार आहेस? रीझाईन केलंस?”
“आं?” हातातली इडली डायरेक्ट कॉफीमध्ये बुडता बुडता वाचली. मी जाणार आहे हे याला माहित आहे? अर्थात सांगणार कोण? अझरच!!
“दचकायला काय झालं? अख्ख्या गल्लीला माहित आहे! गौरीकाकीनं मला स्वत:हून सांगितलं. तुला कॊन्ग्रॆट्स म्हणून फोन करणार होतो पण तुझा फोन यायची वाट बघत होतो, वाटलं होतं, किमान गूड न्युज कळवण्यासाठी तरी फोन करशील”
“बाबाच्या दुकानासमोर ठेवलेला कॉइन बॉक्सवाला फोन काढून टाकला, नाहीतर त्या नंबरवरून कॉल दिला असता. कारण तू माझा मोबाईल नंबर तर ब्लॉक केलास ना.”
त्यानं उत्तर दिलं नाही. मीही विषय पुढे वाढवला नाही.
“बाहेर जाणं गरजेचं आहे का? थोडावेळ इथंच बोलू, वाटल्यास लंचसाठी...” तो थोड्यावेळानं म्हणाला.
“नाही, आफताब! बोलण्यासारखं काहीही नाही, हे तुलाही माहित आणि मलाही. परत परत त्याच विषयावर गोल फिरत बसण्यांत काही शहाणपणा नाही. बाहेरच जाऊ. किमान चार लोकांत असलो तर भांडणार तरी नाही. इथं उगाच शब्दाला शब्द वाढत बसेल आणि सर्वच अनप्लेझंट होईल”
शॉपिंग मॉल नुकताच उघडलेला असल्याने फारशी गर्दी नव्हती. तरीही, मी उगाचच फिरत राहिले. तो माझ्या बाजूलाच होता, पण आवर्जून त्याच्याशी काही बोलावं असं वाटेना. लाईफस्टाईलमधून दोन फ़ॉर्मल शर्ट्स घेतली. त्यानं स्वत:साठी एक वॉलेट घेतलं. अशीच फुटकळ खरेदी करत फिरत राहिलो. पाय दुखले तेव्हा फूड मॉलमध्ये जाऊन कॉफी घेतली.
“स्वप्निल, तुझं जायचं अलमोस्ट फायनल झालंय ना?” त्यानं कपात साखर ढवळत विचारलं.
“अर्थात! खूप विचार करून हा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी कष्ट तर त्याहून सॉलिड केलेत. कुणाहीसाठी... अगदी कुणाहीसाठी मी निर्णय बदलणार नाहीये” मेसेज सेण्ट. लाऊड ऍंड क्लीअर.
“मी इतका स्वार्थी नाहीये, तुझ्याकडून इतकी चांगली संधी नाकारण्याची अपेक्षा ठेवेन. आय ऍम प्राऊड ऑफ यु.” या वाक्यावर मी फक्त हसले. “हसू नकोस. स्वप्निल, तुला पहिल्यांदा पाहिलं होतं, तेव्हापासून आजपर्यंत.... काय जबरदस्त चेंज झालीस.”
“म्हातारा अंकल स्टाईलने बोलू नकोस. माझ्यापेक्षा लहान आहेस हे लक्षात ठेव”
“तीन महिन्यांनी. पण मूळ मुद्दा इतकाच की, तू तुझं लाईफ काय मस्त घडवतेस. चुकूनही कधी वाटलं नव्हतं की...”
“आफताब, मी घडवत नाहीये. हे सारं आपोआप घडतंय. इतर कुणाला नाही किमान तुला तरी हे माहित असायला हवं.”
“यु मीन टू से, आपल्या या भांडणामुळं तू यु एसला जायचा डीसीजन घेतलास? माझ्या माहितीप्रमाणे हे तुझ्या डोक्यांत आधीपासून होतंच”
“होतं, पण केवळ एक ऑप्शन म्हणून. त्या ऑप्शनलाच परमनंट सोल्युशन बनवलं.”
“भांडलो नसतो तर जायचा प्लान केला नसतास?”
“तिला माझ्या घरी बोलावलं नसतंस तर भांडलोही नसतो!”
“विषय परत...”
“विषय परत येऊन जाऊन तिथंच येणार आहे.”
“मला विषय परत तिथं आणायचा नसेल तर... स्वप्निल, या स्टेजला येऊन मी तुला जाऊ नको म्हणणार नाही. ही संधी परत येत नाही हे माहिताय. पण जाण्यापूर्वी गिव्ह मी अ चान्स. इतकंच मी मागतोय.”
“सोपं नाहीये. आफताब, आय रीअली लव्ह यु.. कदाचित आयुष्याच्या अंतापर्यंत माझ्या आयुष्यात केवळ तूच असशील. पण म्हणून मी इथंच अडकून नाही ना राहू शकत?”
“तुला अडकायला कोण सांगतंय. प्लीज गो. तीन चार पाच किती वर्षं लागतील, आय डोण्ट केअर. मी थांबायला तयार आहे. पण जाण्यापूर्वी या रिलेशनशिपला काहीतरी डेफ़िनेट नाव देऊ या.”
“म्हणजे नक्की काय करू या?”
“लग्न! सिम्पल. मॅरी मी, स्वप्निल.”
“गेले सहा महिने मी तडफडत असताना माझा अंत पाहत होतास, त्यावेळी जे तुला सुचलं नाही ते आता विचारतोयस?”
“कदाचित तू जायला निघाल्यावर मला जाणीव झालीये की, हे नक्की माझ्यासाठी काय आहे. आय अल्वेज थॉट की, निधी माझं सच्चं प्रेम आहे. तू केवळ टाईमपास कम बेस्ट फ्रेंड कम रूम पार्टनर. बट आय वॉज रॉंग. निधी माझं ऑब्सेशन आहे. तू मात्र माझ्यासाठी त्याहून खूप वेगळं काही आहेस. गेले खूप दिवस मी फक्त विचार करतोय.”
“इतके दिवस विचार करण्यांत घालवलेस ना? त्यात खूप उशीर झालाय. मी दोन महिन्यांत निघेन. त्याआधी लग्न केलं तर तू इकडे. तुझ्या गुलफामगिरीवर रोकटोक कुणाचीच नाही. मी तिथं कायम या संशयामध्ये की तू मला सोडून इतर कुणाहीकडे..... हे मला परवडण्यासारखं नाही.”
“जर मी तुला वचन दिलं की, तुझ्याखेरीज मी...”
“हे वचन तुला कधीच पाळता येणार नाही... आफ़ताब, मला माझ्या नवर्‍याकडून हा धोका नकोय. यावरूनच आप्लं भांडण झालं होतं, यावरूनच वेगळे झालो होतो. जे झालंय ते चांगल्यासाठीच. व्हाय यु शूड चेंज युअर लाईफ़स्टाईल फ़ॉर मी? माझ्या हट्टासाठी तू बदलू नकोस, आणि मी तुझं वागणं सहन करायलाही नको. कदाचित तू आणि मी इतक्या दूरवरच्या टोकांवर आहोत की, आपण कायम एकत्र नाही राहू शकत”
“ट्राय तर करू... गिव्ह मी अ चान्स. स्वप्निल, यापुढे अशी चूक होणार नाही. आताही जे घडलं ते तसं बघता काही चूक नव्हतंच ना! मी निधीला फक्त भेटलो होतो, पण तेही तुला आवडलं नाही...” मी बोलण्यासाठी तोंड उघडण्याआधी तो म्हणाला.
“ठिक आहे, मान्य करतो. चूक झाली.    तुझा हट्ट पटतोय. त्याची कारणं माहित आहेत. यापुढे अशी काहीही चूक न होण्याचं वचनही देतो. आता लगेच उत्तर देऊ नकोस. विचार कर, ठरव आणि मग परत बोलू. तुला जायच्या आधी लग्न करायचं असेल तरी माझी तयारी आहे. केवळ एंगेजमेंट करूया म्हटलं तरी चालेल. तेही न करता फक्त हे नातं चालू ठेवूया इतकं तरी मला किमान सांग. तू हवीयेस, स्वप्निल. माझ्या आयुष्यामध्ये, मला तू हवीयेस. तुझ्या दृष्टीने गुल्फामगिरी असेल पण जितक्या असोशीनं तुझ्यावर प्रेम केलंय तितकं इतर कुणाहीवरही नाही. तू केवळ माझी पार्टनर नाहीयेस. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तुझ्याखेरीज इतर कुणाहीसमोर मी... मी सच्चा नसतो. तुझ्याजवळ असताना मला कसल्याही मुखवट्याची, नावाची, अभिधानांची गरज भासत नाही. आय फील कंप्लीट विथ यु. स्वप्निल, दिस इस नॉट अबाऊट लव्ह. हे त्याहून जास्त आहे, हे तुला तरी समजतंय ना? माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी कायम कसल्या तरी वादळामध्ये अडकलोय. स्वत:वर, स्वत:च्या अस्तित्त्वावर, अगदी नावापासून ते धर्मापर्यंत, प्रत्येक गोष्टीने मला छळलंय. उधारीचं आयुष्य जगलोय आजवर. पण केवळ तुझ्याबरोबर असताना   मला माझं आयुष्य “माझं” वाटतं. संपूर्ण वाटतं, काहीतरी अर्थ असेल असं वाटतं. यु मेक मी फील कंप्लीट. ही जी शांती आहे, ती फक्त आणि फक्त तू देऊ शकतेस. म्हणून मला तू हवीयेस.” तो बोलत राहिला, मी ऐकत राहिले. त्याच्या डोळ्यांमध्ये आलेल्या पाण्यानं त्याच्या शब्दांची सारी सच्चाई सांगितली. मी ट्रेमधला कॉफीसोबत आलेला टिश्युपेपर त्याच्या हातात दिला.
चष्मा काढून त्यानं डोळे पुसले. दोन क्षण दोघंही काही न बोलता इकडे तिकडे बघत बसलो. मॉलमध्ये प्रचंड गर्दी वाढली होती. अल्मोस्ट लंच टाईम होत आल्याने फूड कोर्टही भरत चाललं होतं. मी मोबाईल चेक केला. कुणाचाही मेसेज नव्हता. तरी परत एकदा चेक केला. तो अतिशय शांतपणे बसून होता. गार झालेली कॉफी पिण्यासाठी त्यानं ओठांजवळ नेली पण परत खाली ठेवली.
“निघू या?” तोच म्हणाला.
“थांब, काहीतरी खाऊन घेऊ. घरी काहीच बनवलं नाही.”
“मी गेल्यापासून अशीच राहतेस? फ्लॅट तर जंकयार्ड झालाय.” त्याच्या या टोमण्यावर मी काहीतरी उत्तर देणार तेवढ्यांत ओळखीचा चेहरा तर दिसला पण नाव आठवेना.
“ती गौतमी आहे का?” मी विचारलं.
आफताबनं वळून पाहिलं आणि म्हणाला. “प्लीज, इग्नोअर कर” पण त्याचं वाक्य येण्या आधीच मी हाक मारली.
“गौतमी... ओळखलंस?” तिच्या चेहर्‍यावर आश्चर्य नव्हतं, उलट गोरीमोरी झाल्यासारखी वाटली.
 “तू स्वप्नील ना? अगं, कित्ती दिवसांनी दिसतेस.”

“ तू इकडे कशी काय... गावाला होतीस ना?”
“अगं नाही, चार पाच वर्षं झाली इकडेच आहोत.” बाजूला उभ्या असलेल्या माणसाशी तिनं ओळख करून दिली. “हे माझे मिस्टर. इंजीनीअर आहेत, इथेच वाशीमध्ये जॉब करतात. आम्ही इकडंच फ्लॅट बूक केलाय. तुझं काय चालूये?”
“मीपण पनवेलला जॉब करतेय. याला ओळखलंस ना? आफताब”
गौतमीच्या चेहर्‍यावर अचानक आनंदीआनंदच झाला. “आफताब म्हणजे तुझा नेबर ना?” तिनं माझ्या कानात खुसपुसत विचारलं. “तुम्ही मॅरीड आहात का??”
 “नाही गं, फ्रेण्ड्स आहोत. संडेला भेटतो अधून मधून.” कधी एकता कपूरच्या टिपिकल सीरीयल्स बघता का? त्यामध्ये एक खडूस भाभी असतेच, हिरॉइनची जराशी चूक जरी झाली तरी ही भाभी चेहर्‍यावर अपरंपार आनंद घेऊन थुई थुई चेहर्‍याने कॅमेर्‍याकडे बघत असते. अगदी सेम तश्याच चेहर्‍याने गौतमी माझ्या आणि आफताबकडे बघत होती.
“खरंच की आपलं असंच? मला वाटलं आज व्हॅलेन्टाईन्स डे म्हणून की काय!”
 अगदी खरं सांगायचं तर गौतमीकडून या अश्या टोमण्याची अपेक्षा नव्हतीच. कॉलेजमधली गौतमी आणि आताची गौतमी यात चिक्कार फरक होता. केस कापलेली, अंगात टीशर्ट आणि जीन्स घातलेली (पण गळ्यांत भलंमोठं टिपिकल मंगळसूत्र) आणि हातात भलामोठा मोबाईल फोन या वेषातली गौतमी मी ओळखली नाही, यांत माझी काय चूक!!
“हाय गौतमी” आफताब उठून म्हणाला. “नाईस टू सी यु! तुम्ही दोघं काय लंच डेटवर? व्हॅलेंटाईन्स डे म्हणून?” आफताबच्या बोलण्याचा काटकोन त्रिकोणाच्या कर्णाइतका तिरकसपणा.
“नाही, असंच शॉपिंग वगैरे. आठवड्यांतून एक वेळ मिळतो गं, किराणा भरायचा आणि अशीच कामं. म्हणून बाहेर पडायचं. हेच म्हणाले की जातोच आहोत तर पिक्चर पण बघू आणि बाहेरच लंचही करू”
“ओह येस, शाहरूख खानचा पिक्चर तू बरा चुकवशील?” कॉलेजमध्ये असताना माझं आणि गौतमीचं यावरून बरंच वाजायचं. मी सलमान खान फॅन आणि ती एस आरके. (निधी आमिरखानवाली. तिचं सगळंच असलं दांभिक!) “तुझा नंबर तरी दे”
“फेसबूकवर आहेस का? काय नावाने आहेस? मी ऍड करते” गौतमीचा नवरा मात्र एकूण या गप्पांना कंटाळला होता. ते पाहून तिनंही लगेच काढता पाय घेतला.
“आहे ना, फेसबूक वर. माझ्याच नावाने. मी रीक्वेस्ट पाठवते
“चलो आफताब. बाय.”
दोघं निघून गेल्यावर मात्र, कधी नव्हे ते आफताब म्हणाला. “सुपर डुपर बिच”
“काय?”
“नालायक पोरगी आहे. मी तिला मघाशीच पाहिलं होतं, अर्धा तास झाला त्या तिकडच्या टेबलवर बसून तुला आणि मला बघतेय. स्कूपच मिळालाय ना तिला. कधी एकदा घरी जाते आणि कीबोर्ड बडवते असं झालं असेल”
“तू काय बडबडतो आहेस मला काहीही समजत नाहीये. आई तर मला म्हणाली होती की हिचं लग्न खेडेगावात कुण्या शिक्षकासोबत झालंय, मुंबईत आलेली माहितच नाही. पण एकदम चेंज झालीये ना? छान दिसते”

“स्वप्निल, तू खरंच इतकी मूर्ख आणि बावळट आहेस का? मी तुला गौतमीचा ब्लॉग पाठवला होता. वाचलास का?”
“कदाचित वाचला असेन, कदाचित नाही. आठवत नाही का?”
“नक्कीच वाचला नाहीस. नंतर लिंक मेल करेन. निवांत वाच. आणि ऐक, तिला रीक्वेस्ट वगैरे पाठवू नकोस. ती ऍड करणार नाही. मला तर ब्लॉक केलंय. निधीनं पब्लिकली तिला थोबडवलं होतं, त्यामुळे तिलाही ब्लॉक केलंय”
“काय बडबडतोस!!! गौतमीनं तुला ब्लॉक करायचा प्रश्न येतोच कुठं. डोन्ट टेल मी, तू तिलाही फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली होतीस.. तुझ्या लिस्टमध्ये नक्की किती पोरी आहेत?”
“स्वप्निल,” माझ्या डोळ्यांसमोर टिचकी वाजवत तो म्हणाला. “जागी हो. एवढं सगळं रामायण घडलेलं तुला माहितच नाहीये, गौतमीचा ब्लॉग, त्यावरून निधीने तिला शिव्या घातलेल्या, मी निधीला डिफेंड केलं म्हणून मला बसलेल्या शिव्या हे तुला माहितच नाही.”
“मी तुम्हा दोघांनाही ब्लॉक केलंय. आणि गौतमीनं काय लिहिलं माझ्याबद्दल?”
“घरी जाऊन वाच. चला, निघू या ना?”
काय गंमत असते, दहा मिनिटांपूर्वी हा माणूस डोळ्यांत पाणीबिणी आणून मला पाठ केलेलं भाषण थडाथडा म्हणून दाखवत होता. (आफताब सारख्या पढाकू पोराकडून दुसर्‍या अपेक्षा तशाही नाहीत. भावना सच्च्या असतील. पण आयत्यावेळी बोलताना एखादा मुद्दा राह्यला नको म्हणून रात्रभर त्यानं प्रॅक्टीस केली असणार. मला पक्की गॅरंटी) आणि आता त्या गौतमीमुळे मला चक्क टोमणे मारतोय.
अखेर आम्ही फूड मॉलमध्येच हक्का नूडल्स आणि आईस्क्रीम खाल्लं. नंतर पन्टालून्समध्ये सेल लागला होता म्हणून तिथे थोडी खरेदी केली. घरी यायला निघालो तेव्हा अलमोस्ट चार वाजले होते, आणि परत भूकही लागली होती म्हणून परत एक कॉफी घेतली. आता मॉलमध्ये चांगलीच गर्दी वाढली होती. मॉलच्या ग्राऊंड फ़्लोअरला काहीतरी व्हॅलेंटाईन्स डेचं सेलीब्रेशन चालू होतं. कॉलेजमध्ये वगैरे असताना व्हॅलेंटाईन्स डे वगैरे एकदम क्युट वाटायचे, आता नुसता भंपकपणा वाटायला लागले.
इतक्या गर्दीमध्ये निवांत बोलायचं राहू देत, एकमेकांचा हात धरून चालणंही मुश्किल झालं, म्हणून मॉलमधून बाहेर पडून पाम बीच रोडने घरी आलो. आफताब तसा एरव्हीही गप्पगप्पच असतो, आताही होता. मध्येच त्याला एक दोन फोन आले. एक फोन हमखास अझरभाईचा होता, हे मला समजलं. दुसरा कुणाचा होता माहित नाही त्यानं “थोड्यावेळानं फोन केला तर चालेल का? ड्राईव करतोय” म्हटलं फोन कट केला. कार साईडला थांबवली, आणि कॉल लॉगमधून तो नंबर डीलीट केला आणि मगच फोन परत डॅशबोर्डवर ठेवला. आणि याच्या वचनावर मी विश्वास ठेवावा अशी याची इच्छा.
घरी पोचेपर्यंत सात वाजले होते. रात्रीसाठी फारशी भूक नव्हतीच, तरीही मी टोस्ट सॅंडविच पार्सल करून घेतले. त्यानं मला “तुला घरी सोडून मी लगेच निघेन” असं सांगितलं होतं. पण बिल्डिंगच्या दारापाशीच उतरून त्याला बाय करणं जमेना, म्हणून म्हटलं, वर ये. थांब थोडा वेळ आणि मग जा.
“तुझी तयारी झाली? पॅकिंग वगैरे?” मी कुलूप काढत असताना त्यानं विचारलं.
“आता कुठे? अजून शॉपिंग चालू आहे. तशी फारशी चिंता नाही. साहिलदादा जवळच राहतो. तो म्हणाला की, सगळी मदत करेल, तशीपण तिथं इण्डियन कम्युनिटी चिक्कार आहे, स्टुडंट्स आहेत मोस्टली. त्यामुळे फार त्रास होणार नाही”
“इतक्या लांब जाशील असं कधी वाटलंही नव्हतं. कायमच समजत आलो की, स्वप्निल म्हणजे काय, आपल्या पलिकडच्या घरात तर राहते. इथंच तुझ्या आसपास रहायची इतक्या वर्षांची सवय... फार मिस करेन तुला.”
“मीपण!”
“चलो, किमान इतकं तरी म्हणालीस. मी निघतो. तुझा नकार सेलीब्रेट करत जरा टल्ली तरी होता येईल. अर्थात उद्या ऑफिस आहे म्हणा, तरी किमान दो पेग तो बनता है”
“नकार? मी तुझ्या प्रपोझलला काहीच उत्तर दिलं नाहीये”
“ज्याक्षणी तुझ्याबद्दल बोलत असताना माझ्या डोळ्य़ांत पाणी आलं आणि त्यावेळी इतर काहीही न बोलता तू फक्त तो फालतू टिश्यु पेपर माझ्यासमोर धरलास, तेव्हाच मला उत्तर मिळालं होतं. तुला अजून दुविधेमध्ये टाकणार नाही, आय विल गो.”
“व्हेरी गूड! कित्ती ओळखून आहेस मला? फक्त एक सांग, कारमध्ये कुणाचा कॉल आला?”
“तू अजूनही माझ्यावर संशय घेतेस?”
“संशय घेण्यासारखं वागतोयस ना? खरं काय ते सांग, आफताब”
“तुझ्या आईचा कॉल होता. मी इथं येणार हे गौरीकाकीला माहित होतं. मी तुला लग्नासाठी विचारणार हेही माहित होतं, तुझं उत्तर काय आहे हे विचारायला फोन केला होता. फार आस लावून बसले होते, तुझे वडील, आई, अझर. ही लव्हस्टोरी गोडगोड होऊन संपणार याचा विश्वास त्यांनाच होता.”
“हे सर्व त्यांच्यापर्यंत कसं पोचलं? अझरनं सांगितलं?”
“स्वप्निल, कुणी सांगायला कशाला हवं? तुझा बाप अख्ख्या गावावर हुकुमत गाजवतो तो अशीच? यतिन काकांना गणपतीच्या दिवशीच समजलं होतं... कुणीही न सांगता, त्यांनी तेव्हाच मला विचारलंही होतं, मी अशीच उडवाउडवीची उत्तरं दिली पण त्यांचा विश्वास बसला नाही. तुझ्या दादीची डेथ झाली, म्हणून तो विषय तेव्हा मागे राहिला. आपलं भांडण झालं तेव्हाही त्यांनी मला विचारलंच. प्रेमानं वगैरे अजिबात नाही, यु डॊन्ट नो व्हॉट युअर फादर इज केपेबल ऑफ. मलातर हातपाय मोडायची फुल्ल गॅरंटी होती. पण मी सांगितलं की आम्ही सीरीयस आहोत आणि आज ना उद्या लग्न करणार, तेव्हा कुठे जीव वाचलाय. त्यानंतर अर्थात तुमचा यु एस चा प्लान पक्का झाला तेव्हा परत माझीच गचांडी पकडली. कारण तुला तर ते काहीच बोलत नाहीत. मग मीच त्यांना सांगितलं की, आम्ही अजून एकत्र आहोत आणि तिनं यु एसला जावं अशी माझी पण इच्छा आहे. इन फ़ॅक्ट मी पण तिकडेच जॉब ट्राय करतोय, रेसेशनमुळे पटकन मिळणार नाही, पण ऍट लीस्ट स्वप्निल ला तरी जाऊ देत.. अन्यथा, त्यांनी तुला परमिशन दिली नसती आणि सगळंच त्रांगडं झालं असतं.”
“ग्रेट! म्हणजे तू माझ्यासाठी खोटं बोललास, किती महान आहेस तू. तुझं हे खोटंपण निभावण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागेल असं म्हणतोयस का?” 
“महान आहे की नाही तो विषय सोडून देऊ. स्वप्निल, तुझं माझं लग्न आणि नातं हा विषय सेपरेट. तुझं शिक्षण आणि करीअर हा विषय सेपरेट. तुला किमान ही गुंतागुंत तरी लक्षात येतेय का? मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, कारण मला आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. तुझ्या आईवडलांना असं वाटतं की माझ्यासारखा जावई त्यांना मिळणार नाही. धर्माचा इतका मोठा अडसर असतानाही त्यांना असं वाटतं की...”
“आफताब, खोटेपणाचा मला इतका राग असतानाही तू परत खोटंच बोललास ना? का असं वागतोस?”
“मी काय करायला हवं होतं? आमचा ब्रेकप झालाय म्हणून रागावून ती निघाली असं सांगू? ज्या माण्साने माझ्या भावाला इतका सक्सेसफुल बनवला त्याच्याच मुलीसोबत मी धोकाधडी केली असं सांगू? प्रश्न माझा एकट्याचा नाहेये, अझरचा पण आहे. तुझाही आहे. मी सत्य काय ते सांगून मोकळा होईन, तुझ्या जाण्यावर त्याचा परिणाम होईल. याचं काय. तुझा प्रचंड राग आला होता त्या रागाच्या भरात तुला सोडून गेलो, पण हे सर्व तुझ्या आईवडलांना सांगून तुझ्या करीअरमध्ये काटे पसरले असते का? स्वप्निल, ट्राय टू अंडरस्टॅंड दिस, तू मला जितका व्हिलन समजतेस तितका वाईट मी नाहिये. आय नो, मी याआधी अफेअर्स केलीयेत.  पण जेव्हापासून तुझ्यासोबत आहे तेव्हापासून तुझ्याशिवाय इतर कुणाचाही विचार केलेला नाही. हेच सत्य आहे. दॅट वॉज माय पास्ट. एक फेज असते, आणि माझी ती फेज गेली आहे. आता मला सेटल व्हायचंय. तुझ्यासोबत. म्हणूनच तुला दुपारीच विचारलेला प्रश्न परत विचारतोय... मला आता लगेच लग्न नाही केलं तरी चालेल. फक्त तू हो म्हण.”
“तुला माझा निर्णय आधीच माहित आहे.”
“मग तो निर्णय बदल. प्लीज. स्वप्निल, माझ्यावर एकदा, फक्त एकदा विश्वास ठेव. मी जर चुकलो तर तू देशील ती सजा मान्य असेल पण प्लीज... एकदा या नात्याला नवीन चान्स दे”
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++




दोन दिवस नुसतं भिरभिरल्यासारखं होत होतं. अख्खं शरीर नुसतं आंबल्यासारखं झालं होतं. दिवसभर झोप यायची आणि रात्री डोळे टक्क जागे. मला एअरपोर्टवर न्यायला साहिलदादा आला होता, त्याच्या घरी चार दिवस राहून मग मला युनिव्हर्सिटीमध्ये जायचं होतं. माझी डॉर्ममध्ये सोय झाली होती. आठवड्याभरामध्ये सेमीस्टर चालू होणार होतं आणि माझं रीसर्च वर्क पण. साहिलदादाच्या बायकोला आरूषीला मी लग्नांत भेटले होते त्यानंतर डायरेक्ट आताच. खरंतर वास्तविक मला असं कुणाच्या घरी वगैरे रहायला आवडत नाही. अनोळखी नातेवाईकांकडे तर बिल्कुल नाही. साहिलदादा दिवसभर बिझी असायचा, आरूषीचं पण ऑफिस टायमिंग होतं. पण ती  खूपच गोड होती. मला तिनं अजिबात ऑकवर्ड वाटू दिलं नाही. तीपण इंजिनीअरिंगनंतर युएसला एम एस करायला आलेली, स्टुडंट लाईफची तिला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे तिने मला येण्याआधीही बर्‍याच टिप्स दिल्या होत्या. बेबी कूकर नक्की घेऊन ये, या सूचनेने आम्हाला बरंच बुचकळ्यांत टाकलेलं. एवढ्या मोठ्या अमेरिकेत बेबी कूकर मिळत नाहीत का या आईच्या प्रश्नाला साहिलदादाकडे  पण उत्तर नव्हतं. असो.
माझं सामान डॉर्ममध्ये नेण्यासाठी वीकेंडला साहिलदादा स्वत: येणार होता. त्याला हॉस्पिटलमधून खरंतर सुट्टी मिळत नव्हती, तर आरूषी म्हणाली की मीच सोडेन. कशाला एवढी चिंता! नवीन फोन कनेक्शन, इतर लागणारं जुजबी सामान वगैरे घेण्यासाठी तिनंच मदत केली. डॉर्ममध्ये कूकिंगची सोय होती, पण एकंदरीत त्यावर माझा फारसा उत्साह नव्हता, तिनं मला सोप्प्या अमेरिकन डिनरची ट्युशन दिली. कमीतकमी जिन्नसांमध्ये एकच पण पोटभरीचा पदार्थ कसा करावा, हे तिनंच शिकवलं. तसंपण खिचडी आणि वरणभात असल्यावर मला इतर काही लागत नाही. स्वत: बनवून खायचं असेल तर बिल्कुलच नाही.
साहिलदादाकडे पोचल्यावर आईला फोन करून नीट आल्याचं कळवलं. बाबा तेव्हा घरी नव्हता, असला तरी मी बोलले नसते. इकडे येण्यापूर्वी जे घडू नये तेच घडलं होतं. माझं आणि बाबाचं कडाक्याचं भांडण! आईबाबाला वाटत होतं की मी रीझाईन देऊन घरी येऊन रहावं, पण मला तेच करायचं नव्हतं.  मी माझी सर्व शॉपिंग पनवेलच्या फ्लॅटमध्येच आणून ठेवली. बॅगही तिथंच पॅक केली आणि तिथूनच एअरपोर्टला आले. माझ्या आईबाबाला माझा हा हट्ट समजत नव्हता, बाबा मला एके दिवशी फोनवरून ओरडला. मग मी पण उलट उत्तर दिलं. शब्दाला शब्द वाढत गेला आणि मग भांडण झालं. मी निघायच्या आधी दोन दिवस आईबाबाच पनवेलला आले. आल्यानंतर बाबा जरा गप्प गप्प होता, आई मात्र मनमोकळेपणानं बोलत होती. बाबा बाहेर गेला होता तेव्हा मी आईजवळ आफताबचा विषय काढला. सगळं सगळं सांगितलं. काही न लपवता, तेवढं सर्व ऐकूनही आई मला म्हणे, “पण पोरगा सोन्यासारखाय. तुझी फार काळजी घेईल म्हणून आम्हा दोघांनाही वाटतं की तुम्ही लग्न करावं. काही चुकीचं आहे क त्यात? आणि भांड”
निघण्याआधी एक् दिवस अझरचा फोन आला. हॅपी जर्नी वगैरे. जुजबीच बोलणं झालं. जास्त बोलले नाही.
मी निघेपर्यंत आफताबचा फोन आला नाही, फ्लाईटच्या जस्ट आधी तासभर फक्त मेसेज आला. “विल मिस यु”
मी रीप्लाय केला नाही.

++++++++++++++++++++
युएसमध्ये सेटल होण्याचा अनुभव फारच मजेदार होता. पहिली गोष्ट म्हणजे, इतके दिवस इंग्लिश मीडीयममध्ये शिकल्याचा तोरा एकदम धुळीला मिळाला. कोण काय बोलतंय तेच समजायचं नाही. लक्षपूर्वक ऐकून ऐकून (आणि अमेरिकन सीरीयल्सच्या कृपेने) थोडाफार उच्चार समजू लागले पण बोलायचं काय! मी काय बोलते ते कुणाला समजेल तर शप्पथ. त्यात चांगली गोष्ट एकच होती की माझा रूममेट नावानं मार्टिन असला तरी प्रत्यक्षात तमिळ होता. त्याचे तमिळ उच्चार समजावून घेणं हा दुसराच मोठा प्रॉब्लेम होता. कितीतरी दिवस मी त्याचं नाव मारूतीच समजत होते. तो सांगताना तसंच सांगतोय असं वाटायचं!!
मार्टिन मॅथ्स डीपार्टमेंटचा होता. साहिलदादाच्या मित्राचा हा भाऊ. असं एकदम अनोळखी माणसासोबत साहिलदादाने मला राहू दिलं नसतं, पण मार्टिन त्याच्या चांगल्या ओळखीचा होता. वयानं माझ्यापेक्षा एक दोन वर्षं लहान असेल पण इथे येऊन त्याला तीन वर्षे झाली होती. त्याला एक क्लास सवय होती, अभ्यासाला बसला की शिट्टीवर गाणी वाजवायचा. आवाजही छान होता, पण शिट्टी मात्र एकदम फर्मास. एकदा मी काहीतरी वाचताना मोबाईलवर “ठंडी हवाये लहराके आये” लावलं होतं. ते गाणं त्यानं परत लावायला सांगितलं आणि नंतर शिट्टीवर वाजवलं. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसून आवडीचं गाणं असं लाईव्ह मजेदार पद्धतीनं ऐकताना जाम मज्जा वाटली.
त्याच्यासोबत रूम शेअर करायचं नाही म्हटलं तरी थोडं टेन्शन आलं होतं, पण मार्टीन एकदम कूल होता. आपण भलं आणि आपला लॅप्टॉप भला! क्वचित कधीतरी गप्पा वगैरे मारायचा. त्याचा विषय मला अगम्य असला तरी तो बोलताना ऐकायला खूप मजा वाटायची. तमिळ लोकांचं एक बरं असतं, जगाच्या पाठीवर कुठंही जाऊ देत, त्यांना सांबारसादम आणि कर्डराईसखेरीज चैन पडत नाही. परिणामी, त्यानं रोज स्वयंपाकाचं मनावर घेतलं होतं. मला आयतं मिळालेलं काहीही चालत असल्याने आंबट्ट सांबार (मुंबईतली सांबार गूळ घालून बाटलेली आहेत!) आणि भात मला चालायचा. एके दिवशी स्काईपवर त्यानं मला त्याच्या फॅमिलीशी ओळख करून दिली. एकाच घरामध्ये वीस तीस माणसं रहात असावीत असा मला दाट संशय आला. इतकी मोठी फॅमिली मी बडजात्याच्या पिक्चरसमध्येच पाहिलेली. पण नंतर तो म्हणाला की खास त्याच्याशी बोलायला म्हणून गावामधले इतके लोक येतात. त्याच्या गावामधून इतका शिकून युएसमध्ये आलेला तो पहिलाच.
मी आईशी अधूनमधून बोलत होते, पण बाबाशी नाही. त्यानंही मला कधी फोन केला नाही. आमच्या भांडणाचा विषय अर्थात या स्टोरीचा हीरो. बाबानं माझ्या अपरोक्ष आफताबसोबत ही सारी बोलणी करावीत हे मला पटलेलं नव्हतं. बाबाचा स्टॅंड होता की, माझा बाप म्हणून त्याचा हक्क होता की त्यानं आफताबचे इंटेन्शन्स काय आहेत ते तपासून बघावं. प्रॉब्लेम हा झाला की, इण्टेन्शन्स तपासतानाच बाबाने आफताबला अलमोस्ट हुकूमच सोडला. अझरमुळे आधीच आफताब बाबाच्या दबावामध्ये होता. त्याचं लग्नाचं प्रपोझल हे मनापासून होतं हे मला माहित आहे... तरीही बाबानं जे केलं ते चूकच होतं.
माझे लेक्चर्स आणि लॅब रोटेशन चालू झाले, आणि इतक्या दिवसांची खरंतर वर्षांची मरगळ एकदम नाहीशी झाली. एकदम टीवायला अभ्यासाचा जो मूड आला होता तो परत आला. लायब्ररीमध्ये वेळ कसा जायचा कळायचंच नाही. जॉब करत असताना आपल्याला नेमका काय क्म्टाळा यायचा ते आता कुठे जाणवू लागलं. साहिलदादाकडे एका वीकेंडला गेले होते, तेव्हा तो म्हणाला पण, “स्वप्निल, तुझा पिण्डच ऍकेडेमिक आहे. इतर कुठे तुझा जीव लागणं मुश्किल आहे. यतिन काकाकडे बघता हे जरा आश्चर्यच खरंतर. आरूषी म्हणाली, यात सरप्रायझिंग काय? तू आणि सागर दोघेही तसेच आहात.
आरूषी आमच्या बाबाला आजवर भेटलेली नाही. काकूकाकांनी साहिल-सागरवर लहानपणापासून मेहनत घेतली. अभ्यासासाठी कसले कसले क्लास लावले. ब्रेन डेव्हलपमेंटच्या सेमिनार्सना घेऊन गेले. माझ्यासाठी तशी मेहनत आईने घेतलीच नाही, तरीही मी इथे आले, याचं साहिलदादाला जाम कौतुक होतं. बाबाबद्दल काय बोलायचंच नाही, तो शाळा-कॉलेजला जात होता तेच आधी उपकार केल्यासारखं.. त्याचं मन चार भिंतींच्या वर्गात कधी रमलंच नाही. आयुष्यात यशस्वी झाला तो त्याच्या धडाडीवर. पण मी बाबावर गेले नाही, झोकून द्यायची बेफ़िकिर वृत्ती, चलो जो होगा देखा जायेगा म्हणत रिस्क घ्यायची वृत्ती माझ्यात नाही. मी आईवर गेलेली.
मध्ये एका लेक्चरसाठी काही जुन्या वैज्ञानिकांची लिस्ट बघत होते, सर्वच नावं पुरूषांची. बाईचं नाव एखाददुसरं. बायका हुशार नसतात का? असतात की. पण त्यांची हुशारी कोमेजून जाते, त्याला कधी वाव मिळतच नाही. आईन्स्टाईनपेक्षा जास्त आय क्यु असलेल्या कित्येकजणी चुलींमधले निखारे फुलवत आणि पाळण्याला झोके देत खपल्या याची गणती कुणाकडे आहे. आई हुशार नव्हती का? होती. पण समाज, संस्कृती, परंपरा या जोखडामध्ये कुठेतरी हरवूनच गेली. ज्या वयात तिनं प्रेम केलं, त्या वयात ते योग्यच होतं, पण प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टी लागोपाठ व्हायलाच हव्यात हा नियम मला कायम जाचक वाट्तो. प्रेम आहे तर आहे. त्याचा शिक्षण-करीअरशी काय संबंध? आईची  हुशारी अशीच माझ्या संगोपनामध्ये संपून गेली. साहिलदादाला तिचं काय कौतुक नसणार. त्याला कौतुक त्याच्या काकाचंच. “यतिनकाका ना कधीकधी ब्रिलियंट विचार करतो. त्यानं सॉफ्ट ड्रिंकची एजन्सी घेतली तेव्हा गावात सर्व नको म्हणत होते, पण त्यानं हिमतीनं त्याच एजन्सीमधून लाखो करोडो रूपये कमावले. पप्पा कायम म्हणतात, की यतिन खूप इंटेलीजंट आहे, पण तो बुद्धी योग्य ठिकाणी वापरत नाही”
बाबानं आयुष्यात चिक्कार पैसा कमावला, बुद्धी योग्य ठिकाणी वापरली असती तर याहून दुसरं काय मिळालं असतं. साहिलदादानं असं कौतुक केलं की मला जरा कानकोंडं व्हायचं, पण मग मी लगेच त्यावर उतारा म्हणून गौतमीचा ब्लॉग वाचायला घ्यायचे.
या ब्लॉगसाठी निधी आणि आफताब तिच्यासोबत भांडले होते म्हणे. गौतमीचा ब्लॉग म्हणजे खोटेपणाची हद्द होता. तिच्या शालेय आणि गावामधल्य आठवणींविषयी मला काही माहित नाही, पण कॉलेजच्या आठवणींचा भाग म्हणजे किळसवाणा प्रकार होता.
तिनं माझ्याविषयी लिहिलं म्हणून मी त्याला किळसवाणं म्हणत नाही. खोटं असलं, फिक्शन असलं तरी ते समजून घेता येऊ शकतो. पण ब्लॉगच्या सुरूवातीलाच तिनं ही सत्यकथा आहे असा डिस्क्लेमर टाकला होता. आणि नंतर आपल्या मनाचं घुसडलं होतं. पोरीनं उगाच सायन्स घेतलं, आर्ट्स घेऊन हिस्ट्रीत ग्रॅज्युएशन केलं असतं तर इतिहासकार म्हणून मिरवली असती.
नुकत्याच आलेल्या ब्लॉगचं टायटल होतं, “व्हॅलेण्टाईन्स डे!” रीप्लेस वाशी विथ अंधेरी, किरण विथ स्वप्निल, आफताब विथ बिलाल.

“यु वोण्ट बीलीव्ह गाय्ज्ज, या व्हॅलेण्टाईन्सडेला माझ्याबाबतीत काय अजब घडलं. मागे मी तुम्हाला माझ्या कॉलेजफ्रेंड किरणबद्दल बोलले होते ना? तीच ती, जाडी श्रीमंत पोरगी. ती मला आज अंधेरीच्या मॉलमध्ये भेटली. मी आधी लक्ष दिलंच नाही. जिनं कॉलेजची तीन वर्षं मला चहा पिते म्हणून हिणवलं आणि स्वत: कॉफी पिते म्हणून मोठेपणा मारला, माझ्याकडे कल्चरल डेच्या दिवशी ड्रेस नाहीम्हणून मला चिडवचिडव चिडवलं. (इथे दोन लिंक होत्या, त्या या दोन्ही गोष्टींच्या एपिसोडकडे घेऊन जात होत्या), ती किरण तिच्या जुन्या आशिकबरोबर मॉलमध्ये बसली होती. मला बघताच हातामधली सिगरेट विझवत (पब्लिक प्लेसमध्ये अलाऊड तरी आहे का बायो?) तिनं मला हाक मारली. मी आधी ओळख दाखवणार नव्हते, माझा स्वभाव तर माझ्या वाचकांना माहित आहेच की. पण तिनं हाक मारल्यावर शिष्टाचार म्हणून मी थांबले. हातामधली कसल्या कसल्या ब्रॅंडच्या पिशव्या माझ्या डोळ्यांसमोर दाखवत ती म्हणाली. “शॉपिंगला आले”. (मॉलमध्ये लोक इतर काही कामाला येतात का? माझ्या आठवणीनुसार मी पिशव्या चेअरवर ठेवलेल्या होत्या.) मला म्हणाली, “तू इथे कशी काय?”
माझ्या डोळ्यांत खरंतर टच्कन पाणी आलं. तिचा एकंदर अविर्भाव होता जणू,  तू या चकाचक मॉलमध्ये कशी? मला सांगावंसं वाटलं, परिस्थिती तशीच राहत नाही. मला दैवकृपेने चांगली नोकरी आहे. नवरा उत्तम कमावता आहे. देवासारखे सासूसासरे आहेत. महिन्याच्या एखाद दिवशी बाहेर जाऊन जेवण्याइतके पैसे आम्हीही कमावतो हो. पण मी यातलं काहीच बोलू शकले नाही. माझ्या नवर्‍याने येऊन माझ्या पाठीवर हात ठेवून मला सपोर्ट केलं, त्याला माझी मन:स्थिती व्यवस्थित समजली असणार. (नवरा हिच्यापासून फूटभर उभा होता)

इतक्यात बिलाल माझ्याशी बोलायला लागला. हा मुलगा मला कधीच आवडला नाही. (गौतमी आणि बिलाल... आपलं... आफ्ताब भेटले कधी होते!!!) एक नंबरचा गुंड आणि मवाली. त्याच्या गुंडपणामुळे मला फेसबूकवर मागे झालेला मनस्ताप तुम्हाला आठवत असेल (अजून एक लिंक!) तो आता तोंडातला गुटखा चघळत (आफताब आणि गुटखा!! पहिल्यांदा हे वाचलं तेव्हा संतापानं धुमसले होते. सीए शिकलेला, कार्पोरेटमध्ये उच्च पदावर असणारा आणि अतिशय वेल्ड्रेस्ड मुलाबद्दल हे असले उद्गार) त्यानं मला ओळख दाखवली. विचारलं, “काय व्हॅलेंटाईन्स डे का?”
मला तिथल्या तिथे किंचाळून त्याला सांगावंसं वाटलं, “होय रे लांड्या, व्हॅलेंटाईन्स डे म्हणून!! लग्नाच्या नवर्‍यासोबत राजरोस हातात हात घालून फिरतोय. तुमच्यासारखं उठसूट कुणाहीसोबत झोपत नाही”
किरणचं कॉलेजमध्ये असतानाही याच मुलासोबत अफेअर होतं, पण ते कुणाला समजू नये म्हणून त्यांनी उगाच माझं नाव बदनाम केलं (आं!!!) नंतर तिनं अतिशय हुशारीनं एका हिंदू मुलाला जाळ्यांत ओढलं,. त्याच्या आयुष्याची पार दैना झाली. अखेर, त्यानं आईवडलांनी ठरवून दिलेल्या मुलीशी लग्न करून संसार सुखानं केला. (मी केदारला जाळ्यांत ओढलं? काय मच्छिमार वाटले का?) बापाच्या गुंडाईमुळे अख्खा गाव त्रस्त होताच, लेकीनं त्याच्याहीपुढे जाऊन दिवे लावले. कधीकधी वाटतं, एखाद्याबद्दल इतकं वाईट बोलू नये, पण जिनं मला स्वत:ची फाटकी बॅग “तू वापर” म्हणून खुश्शाल दिली, कारण माझ्याकडे पैसे नव्हते तर मी तिच्याबद्दल चांगलं का बोलावं. हल्ली गावी गेल्यानंतर तिच्याविषयी काहीबाही ऐकू येतं, ती वाईट मार्गाला लागली आहे, व्यसनी झाली आहे, हे तर एक दिवस् खरंतर होणारच होतं. संस्कार नसले की काय होतं. मी गरीब घरात जन्मले, फार ओढाताणींत दिवस काढले, हॉस्टेलमध्ये आईवडलांपासून दूर शिकले, सुट्टीत घरी गेल्यावर आईसोबत शेतात कामं केली. पण शिक्षण हे ध्येय कायम ठेवलं, आज मला लेखिका म्हणून, जे काही लोक ओळखतत ते याच जोरावर..”
इथून पुढचं लिहिण्यांत पॉइंट नाही. मतितार्थ माझ्या लक्षात आला. मी या स्टोरीमध्ये व्हिलन होते. बॅड गर्ल होते. हरकत नाही. माय लाईफ माय रूल्स. माय ब्लॉग, माय स्टोरी.
मी कधी गौतमीला हिणवलं नाही, जाणूनबुजून तर कधीच नाही. तिच्या लाईफस्टाईलची मला ओळखच नव्हती, तर मी तिला काय चिडवणार? उलट, माझ्या नोट्स कायम तिला दिल्या. तिचा अभ्यास म्हणजे केवळ पाठांतर होतं, मी तिला पुस्तकं वाचून नोट्स काढायला शिकवलं, कित्येकदा मराठी मीडीयमची असल्यामुळे तिला कन्सेप्ट्स क्लीअर व्हायला वेळ लागत होता. त्यावेळी तिला समजावलं.
तिनं हा ब्लॉग दोन तीन वर्षांपूर्वी चालू केला. निधी आफ्ताब एकत्र असताना. सुरूवातीचे काही भाग त्यांनी अर्थात वाचले असतील किंवा नसतील. पण जिथपासून माझे उल्लेख चालू झाले, तिथे त्यांनी कमेंट्स टाकल्या. त्या लगोलग डीलीट झाल्या. निधीने फेसबूकवर लिंक देऊन हे चुकीचं आहे वगैरे भलंमोठं लिहिलं. (त्या भागामध्ये निधीला – तिचं नाव आनंदी केलं होतं आणि बिलालच्या भावाच्या गर्लफ्रेंडचा रोल दिला होता. भडकेल नाय तर काय!!!) त्यावर आफताबनेही चिक्कार लिहिलं. (बिलाल दहावी नापास होता, त्याच्या भावाचा फ़्रूट स्टॉल होता हेही एकवेळ ठिक. पण त्याला एकंदर चार अजून भाऊ होते. सत्याचा विपर्यास करणे म्हणजे काय हे गौतमीकडून शिकावं, अरिफबद्दल खरंतर तिला काहीही माहित नव्हतं, अजाणतेपणानं का होईना तिनं आफताबची दुखरी नस दाबली होती) दोघांनाही ब्लॉक केलं आणि गौतमी आपल्याच बबलमध्ये परत सुखी होऊन लिहू लागली. व्हिक्टिमायझेशनचं कार्ड खेळत असताना तिनं माझ्याविषयी काहीही लिहिलं होतं. मी वाईट्ट मुलगी होते. सिगरेट ओढायचे, दारू प्यायचे, मुलांसोबत फ्री होते वगैरे वगैरे.
सत्याला अनेक बाजू असतात, त्यापैकी कुठली बाजू तुम्ही सत्य मानता यावर सत्य आणि असत्याची बाजू ठरते. गौतमीने स्वत:पुरतं सत्य निवडलं होतं. मुळात, हे सर्व सगळंच खॊटं आहे असं मी म्हणू शकत नाही. मी सिगरेट ओढत होते, आय वॉज सेक्शुअली ऍक्टीव्ह इन माय कॉलेज डेज. पण म्हणून मी कधी तिला हिणवलं नाही की कमीपणा दाखवला नाही. ती तिच्या जागी, मी माझ्या जागी. प्रत्येकाची स्वतंत्र जीवनशैली असते, ती त्या त्या व्यक्तीपुरतीच वर्क करते, इतरांसाठी नाही.
.. आणि माझ्या आजवरच्या जीवनशैलीवर मी खुश आहे. माझ्या प्रत्येक निर्णयावर मी म्हणूनच ठाम राहिले असेन. व्हॅलेंटाईनच्या दिवशी माझ्या रूमबाहेर पडताना आफताब रडला, अगदी हमसून हमसून. माझ्याही डोळ्यांत पाणी आणलं, पण ते अगदी इतकुसंच. त्याच्यासमोरच काय पण इतर कुणाहीसमोर मी अशी रडू शकले नसते. माझे अश्रू माझ्यासाठी. म्हणून मला तो “दगडी काळजाची” म्हणतो. मान्य आहे.
असेनही मी दगडी काळजाची. पण दगडाला वेदना होत नाहीत, असं थोडीच आहे. मला गौतमीचा हल्ली राग येत नाही, उलट जेव्हा कधी खूप एकटं वाटतं, असहाय्य वाटतं तेव्हा मी तिचा ब्लॉग वाचते. त्या ब्लॉगमधली वन डायमेन्शनल किरण मीच आहे म्हटलं की मला जरा बरं वाटतं. माझ्या आजूबाजूला घडत असलेल्या इमोशनल ड्रामा अस्तित्त्वातच नाहीत आणि मी वाईट मुलगी आहे, असं मानलं की काम झालं.
अपेक्षाभंगाचं दु:ख नाही. एकाकीपणाची भावना नाही, दुबळेपणाची जाणीव नाही. केवळ ओठांत सिगरेट धरून सिक्स्टीजमधल्या व्हॅम्पसारखं गोल्डन आयशॅडो लावून सेक्सा कटाक्ष टाकत जगायचं. जगण्याची तीच आणि तेवढीच चौकट. काश, मी पण किरणसारखीच असते!!!

++++++++++++++++++++++++++++++++
रात्रीचे अडीच वाजून गेले होते. मी टक्क जागी. मार्टिन त्याच्या खोलीमध्ये. लॅपटॉपवर फेसबूक ऑन केलं. अझर ऑनलाईन होता. त्याच्याकडे दिवस चालू असणार.
“झोप जा, मी नंतर कॉल करेन. सविस्तर बोलू.” त्यानं मेसेज टाकला.
मी काहीही उत्तर दिलं नाही. स्क्रीनकडे नुसती बघत बसले. दोन चार मिनिटांनी परत त्याचा मेसेज आला. “स्वप्निल, लिसन टू मी. झोप, आम्ही आहोत ना सर्व इथे!”
झोप येणं शक्यच नव्हतं, तरी लॅपटॉप बंद केला. किचनमध्ये जाऊन कॉफी बनवली. मार्टीनच्या रूममधला दिवा चालू होता. तसाही तो कित्येकदा रात्रभर जागा असायचा.  त्याच्या दारावर टकटक केली.
“व्हॉट हॅपन्ड?” तो झोपेतून नुकताच जागा झाला असावा.
“सॉरी आय थॉट यु वेर अवेक. लाईट चालू दिसला म्हणून. सॉरी.”
“ओह, मी वाचताना झोपलो. लाईट बंद करायला विसरलो. तू कशी काय जागी?” त्यानं डोळे चोळत विचारलं.
“काही नाही अशीच. कॉफी बनवत होते, म्हटलं तू जागा असलास तर तुलाही विचारेन. पण विनाकारण झोप डिस्टर्ब केली. सॉरी”
“चार पाच वेळा सॉरी म्हणून डिस्टर्ब झालेली झोप परत येणार नाही. मला ही वाईट सवय आहे, एकदा जाग आली की परत झोप येत नाही. एक कप कॉफी मलाही. एकदम स्ट्रॉंग”
“सॉरी, मार्टीन” आणि एकदम मला रडू आलं, अचानक. न ठरवता. न सांगता न सवरता.
“हे!! काय झालंय नक्की? एव्हरीथिंग ऑलराईट?” त्यानं मला बाजूच्या खुर्चीवर बसवलं. पाण्याचा ग्लास माझ्या हातात दिला.
“बाबाला हार्ट ऍटॅक आलाय. ऍडमिट केलंय. मघाशी फोन आला.”
“ओह, तुला इंडियात जायचंय का? म्हणजे, तितकं सीरीयस??”
“माहित नाही. उद्या किंवा परवा एंजिओग्राफी करतील. ही इज ऑलराईट पण.... मी इकडे येताना त्याच्याशी खूप भांडले होते... अलमोस्ट बोलतच नव्हते. काल संध्याकाळी पण त्यानं कॉल केला, पण मी घेतला नाही. आता एकदम गिल्टी वाटतंय”
“सर्व ठिक होईल. आय विल प्रे टू द गॉड. ही विल बी ओके. थोडावेळ जाऊन झोप. अगदीच झोप आली नसेल तर युट्युबवर फिल्म्स बघ. पण चिंता करू नकोस.” तो बोलत असतानाच माझा फोन वाजला. आईचा नंबर. अधीरपणे आधी फोन घेतला.
“हॅलो, मी बोलतोय” पलिकडे आफताबचा आवाज. “आता आयसीयुमध्ये शिफ़्ट केलंय. डॉक्टर म्हणतात की सर्व ठिक आहे. उद्या सर्जरी करतील. स्टेण्ट वगैरे बसवावा लागेल, पण डोण्ट वरी.”
“ओके!”
“रडू नकोस, स्वप्नील. मी आहे ना इथे.”
“तू कधी आलास?”
“पहाटे अझरभाईचा फोन आला, की काकांच्या छातीत दुखतंय म्हणून रात्री ऍडमिट केलंय. तसाही रविवार होता, तर मला सुट्टी आहे. मी आणि शाहीन लगेच निघालो पण गडबडीत माझा मोबाईल गाडीमध्येच राहिलाय, म्हणून काकींच्या नंबरवरून कॉल केलाय. सर्व ठिक आहे हे सांगायला.” शाहीन, आफताबची बायको! दोन महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालंय.
“बाबाशी बोलायचंय”
“आता लगेच अलाऊड करणार नाहीत. मी थोड्यावेळानं कॉल करेन तेव्हा बोल. तुझ्या इथे किती वाजलेत? रात्रभर जागीच आहेस का?”
“आई कुठाय?”
“इथंच आहे. शाहीन तिच्यासोबत बसलीये. आता जस्ट तिला थोडं ज्युस वगैरे दिला. जाम टेन्शनमध्ये आहे. बाकी काही नाही. स्वप्नील, आम्ही आहोत सर्वजण. आणि खरं सांगू का? फार सीरीयस नाहीये. माईल्ड अटॅक आहे. बरे होतील काका. ठिक आहे! ठेवू फोन?”
“आईला फोन करायला सांग”
“नक्की सांगतो. तू अशी रडत वगैरे बोलू नकोस, ती अजून घाबरेल. काय? काळजी घे. चल बाय”
मार्टिननं कॉफीचा कप माझ्यासमोर ठेवला. ते तास दोन तास त्यानं आणि मी असेच बसून घालवले. काहीबाही बोलत. त्याला झोप येत नव्हती, माझ्या झोपेचा प्रश्नच नव्हता. इथं येऊन अवघं वर्ष झालं होतं, परत जायला लगेच मिळालं नस्तं, शिवाय अभ्यासाचा लोड होताच. तरी अनेकदा वाटलं की साहिलदादाला फोन करून सांगावं काहीही कर, माझं तिकीट बूक कर आणि मला जाऊ देत. बाबाशी मी आयुष्यभर भांडत राहिले, पण तरीही त्याला एवढुसं जरी काही झालं तरी मला सहन झालं नस्तं. मी निघताना बाबाशी तोंडभरून बोलले नाही की हसले नाही. अगदी एअरपोर्टवरही त्यानं मला जवळ घेतलं तेव्हा मी तोंड फिरवलं.
कशाचं भांडण? त्यानं आईला धोका दिला म्हणून? आफताबच्या आणि माझ्या नात्यामध्ये ढवळाढवळ केली म्हणून... अशाक्षणी, या सर्व बाबी किती क्षुल्लक वाटत राहतात ना!

बाबा सुखरूप रहावा, म्हणून मी त्या दिवशी पहिल्यांदा देवाची प्रार्थना केली.