Showing posts with label चित्रपट. Show all posts
Showing posts with label चित्रपट. Show all posts

Monday, 26 December 2022

अवतार: कथा समुद्रमंथनाची!!

 



 2009 साली आलेला अवतार हा जेम्स कॅमेरूनचा मेगा ड्रीम प्रोजेक्ट. खरंतर 1995 पासून कॅमेरूनच्या डोक्यात असलेला हा विषय. पण त्याला अनुलक्षून असलेली तांत्रिक करामत उपलब्ध नसल्याने बाजूलाच राहिलेला हा विषय. अखेर 2004 नंतर मोशन कॅप्चर आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर संगणकीकृत करामती दिमतीला हजर झाल्यावर, कॅमेरूनने या त्याच्या आवडत्या विषयाला हात घातला होता. अवतार हा आतापर्यंतच्या जगभरामध्ये गाजलेल्या सिनेमांपैकी एक. अगदी ब्लॉकबस्टर म्हणून ऑलटाइम क्लासिक सिनेमा. या सिनेमाने अनेक नवीन रेकॉर्ड बनवले, आणि तसेच, नवनवीन तांत्रिक कौशल्येही उपलब्ध करून दिली. थ्रीडी सिनेमाला जगभरामध्ये मिळालेला प्रतिसाद पाहून यानंतर अनेक अ‍ॅक्शन मारधाडपट थ्रीडीमध्ये आले. अर्थात हा सर्व झाला पूर्वेतिहास. अवतार – द वे ऑफ वॉटर हा त्या चित्रपटमालिकेमधला दुसरा चित्रपट. एकूण चार चित्रपट प्रदर्शित करायचा दिग्दर्शकाचा मानस आहे. पैकी, तिसर्‍या सिनेमाचे शूटिंगदेखील पूर्ण झाल्याची बातमी आहे. ट्रेलरदेखील येण्यापूर्वीच “हा चित्रपट मी बघणारच” असे आपण ठरवून टाकतो त्यापैकी एक असा हा अवतार.

जेम्स कॅमेरूनचा प्रत्येक सिनेमा हा अप्रतिमच असतो. त्याचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर जितके गाजतात, तितकेच ते समीक्षकांच्याही पसंतीस पडतात.  हे असे यश मिळवणारे फार थोडकेच दिग्दर्शक सध्या कार्यरत आहेत. द टर्मिनेटरसारखा जॉनर डिफायनिंग सिनेमा असो, ट्रू लाइज सारखी अ‍ॅक्शन कॉमेडी असो किंवा टायटॅनिकसारखा मास हिस्टेरीया देणारा सिनेमा असो, त्याच्या प्रत्येक सिनेमामध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन असतंच. अगदी छोट्या छोट्या फ्रेम्समधून त्याच्या सिनेमाची कथा उलगडत जाते, त्याचवेळी तंत्रज्ञानावर त्याची असलेली पकड इतकी मजबूत आहे की, इतक्या वर्षांनीही त्याचे सिनेमा फ्रेश वाटत राहतात.



अवतार – द वे ऑफ वॉटर त्याबबातीत मात्र अजिबात निराशा करत नाही. तंत्रज्ञान इतके कमालीचे वापरले आहे की, पॅन्डोरा या एका चंद्रावरची ही वसाहत अगदी सच्ची वाटत राहते. सायन्स फिक्शनमध्ये सायन्स आणि फिक्शन दोन्ही जमून येतात तेव्हाच ती कलाकृती खर्‍या अर्थाने परिपूर्ण होते. इथे, एकंदरीत, पाण्याखाली असणारे सर्व सीन शूट करण्यासाठी वापरलेली तंत्रज्ञाने, मोशन कॅप्चर टेक्निक, पॅण्डोरावरचे प्राणी, निसर्ग, पाण्याखालचे जग सर्व काही बेस्ट असतानाही, कुठेतरी काहीतरी उणीव राहून जाते.

 


अवतार म्हणजे काय हे आपण भारतीयांना समजावून सांगायची आवश्यकता नाही. भारतीय मिथकांमध्ये असलेले देवादिकांचे अवतार आणि त्यांचे अवतार कार्य यामधूनच कॅमेरूनला ही “अ‍ॅव्हटार” संकल्पना सुचली होती. एरवी हॉलीवूडपटांमध्ये असलेली कल्पना ही साधारण – पृथ्वीवर(म्हणजे केवल आम्रिकेत) आक्रमण करणारे परकीय एलियन्स, मग ते सर्व कसे दुष्ट दुष्ट, अमेरिकन लोक कसे हीरो हीरो इत्यादि. कॅमेरूनने ही संकल्पनाच उलट केली होती. त्याच्या नॅरेटिव्हमध्ये मानव हा यामधला खलनायक आहे. या पृथ्वीवरच्या मानवाने दूर कुठल्यातरी ग्रहावरच्या एका चँद्रावरच्या वस्तीवर आक्रमण केलेले आहे. ही परग्रहीय वस्ती अत्यंत सुंदर आहे, विलक्षण आहे. इथे असणारा निसर्ग हा पृथ्वीवरच्या निसर्गासारखाच विविधरंगी, विविधढंगी आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे तिथले मानव म्हणजे नावी लोक. हे लोक निळे आहेत, कॅमेरूनला ही रंग संकल्पना कृष्णाच्या रंगावरून सुचली असे म्हणतात. उंच आहेत, प्रचंड शक्तीशाली आहेत. पण तांत्रिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या मानवाने त्यांना नमवले आहे. पॅन्डोरावर मानवाने स्वत:ची कॉलनी प्रस्थापित केलेली आहे. इथली हवा मानवासाठी विषारी आहे, पण या ठिकाणी मिळणारी नवीन खनिजे मात्र मानवासाठी मौल्यवान आहेत. इथे टिकून राहण्यासाठी नावी लोकांसोबत त्याचा संघर्ष अद्याप सुरूच आहे. हा संघर्ष कमी व्हावा म्हणून शास्त्रज्ञांनी अवतार तयार केले आहेत. म्हणजे, मानव चक्क नावी अवतारामध्ये अवतीर्ण होतो, आणि त्यांच्यासारखाच दिसू-वागू लागतो. या अवताराचा आत्मा मात्र मानव आहे. या अवतारांनी मूळ नावी लोकांमध्ये मिसळून जावे, त्यांना आपलेसे करावे, थोडक्यात कॉलनायझेशनला मदत करावी असा त्यांचा सुप्त हेतू. या ग्रहावर आलेला जॅक सली हा अपंग सैनिक मात्र अवतार रुपामध्ये नावी टोळीमध्ये पूर्ण मिसळून जातो, त्यांच्यापैकीच एक होतो, आपले मानवरूप सोडून तो स्वत:ला नावी म्हणून स्विकारतो, आणि त्यांच्याच दुनियेत जगतो. पहिल्या भागामधला हा सर्वात रोचक भाग. दुसर्‍या भागामध्ये जॅक सली हा नावी झाला आहे, इथे त्याचे स्वत:चे कुटुंब आहे, मित्रमंडळी आहेत. मानव वस्ती आता पॅण्डोरावरून निघून गेली आहे. सर्व आलबेल आहे पण.... मानवाचा लोभीपणा काही कमी होत नाही.

 


मानवाचा इतिहास हा आपापसातल्या लढायांचाच राहिलेला आहे. आपल्यापेक्षा तांत्रिक दृष्ट्या मागासलेल्या मानववंशावर हल्ले करून त्यांना नामोहरम करतच होमो सेपियन आजवर इथे पोचलेला आहे. अगदी सतराव्या अठराव्या शतकापर्यंत एका मानव टोळीने दुसर्या मानव टोळीला टाचेखाली ताबून ठेवणे, त्यांचे भूभाग बळकावत लूट करणे इतकेच काय, एका मानवाने दुसर्‍या मानवाला विकणे-विकत घेणे हे सुरूच होते. या अस्सल इतिहासाचे रोपण कॅमेरूनने सायन्स फिक्शनच्या रुपात केलेले आहे. इथे पॅंडोरावर असलेली नावी जमात ही निसर्गाशी एकरूप झालेली आहे. त्यांच्या मनामध्ये असलेली निसर्गदेवी आयवा ही सर्वच चराचरामध्ये अखंड वाहते आहे, असा त्यांचा गाढ विश्वास आहे. पृथ्वीवरून आलेल्या प्रगत मानवाला मास्त्र हे थोतांड मान्य नाही, त्यांच्या दृष्टीने पैसा हेच काय ते खरे दैवत. या अशा मानवाचा आणि नावी अवतारामधील मानवाचा हा संघर्ष अवतार 1 मध्ये होता.

 


अवतार 2 मध्ये हा संघर्ष अधिक तीव्र व्हायला हवा होता, पण दुर्दैवाने तो तसा होत नाही. पहिल्या भागामध्ये असलेली अवतार आणि त्यामागची तात्त्विक बैठक दिग्दर्शक या भागामध्ये प्रकर्षाने दाखवत नाही. तांत्रिक करामती दाखवण्याच्या नादामध्ये कथेमधल्या काही महत्त्वाच्या बाजूंकडे लक्ष किंचित कमी पडतं, आणी मग एकदम प्रेडिक्टेबल कथा सुरू होते. कथेमध्ये एक मेजर झोलदेखील झालेला आहे. (स्पॉयलर असल्यामुळे इथे लिहत नाही). अख्खी कथा ही जॅक सली विरूद्ध मानव अशी सुरू होते. खरंतर, वास्तविक, भारतीय मिथकांमध्ये समुद्र, सामुद्रिक जीव यांच्याशी संबंधित अवतार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपली सृष्टी समुद्रामध्ये जन्म घेते, आपला सर्जक विष्णु समुद्रामध्येच स्थित आहे. समुद्रमंथन हा आपल्या पौराणिक मिथकांमधला एक महत्त्वाचा भाग. त्यामधले अमृत मात्र अवतार 2 मध्ये आणताना अतिशय ओढून ताणून आणले आहे, आणि त्याचे पुरेसे स्पष्टीकरण देखील येत नाही.




अवतार 1 मध्ये पृथ्वीवर परत गेलेले लोक या सिनेमाच्या सुरुवातीला पॅन्डोरावर परत येतात. ते नक्की का येतात हे समजत नाही. पण नावी बनलेल्या जॅक सलीला मात्र स्वत:चे शांत कौटुंबिक जीवन सोडून या स्काय पीपलविरूद्ध उठाव करावा लागतो. या प्रयत्नामध्ये त्याला आणि त्याच्या कुटुंबाला स्वत:चे मूळ स्थान सोडून परागंदा व्हावे लागते आणि समुद्रकिनारी दलदलीत राहणार्‍या एका टोळीकडे आश्रय मागावा लागतो. जॅक सली, नेतिरी आणि त्यांची मुलं ही डोंगराळ भागामधली आहेत, त्या जीवनाशी, तिथल्या निसर्गाशी एकरूप झालेली आहेत, आता त्यांना हा बदल सहन करावा लागतो. एका वेगळ्या निसर्गाशी, प्राणीजीवनाशी समरूप व्हावे लागते. इथे जगायचे तर इथलेच व्हावे लागते. आणि यामधून घडत असणार्‍या एका आगळ्यावेगळ्या नात्यांची इथे सुरुवात होताना दिसते. देवमासा हा यामधला एक महत्त्वाचा दुवा ठरतो. केवळ मानव अथवा मानवस्वरूपच नव्हे, तर इतर प्रत्येक चराचरामधल्या निसर्गाची ही कहाणी बनत जाते. ही केवळ स्वअस्तित्वाचीच लढाई नाही, तर ती भवतालाच्या अस्तित्वाचीदेखील लढाई आहे, आणि म्हणूनच या लढाईमध्ये केवळ जिंकून चालणार नाही तर पूर्ण बळाने शत्रुला नामोहरम करावे लागणार आहे.

 


इतकी सुंदर तात्विक पार्श्वभूमी असलेल्या या कथानकामध्ये कॅमेरूनने विनाकारण टीनेजर हायस्कूल हॉलीवूड ड्रामा का आणला आहे ते तोच जाणे. या अशा नाटकी फटकार्‍यांमधून उभे राहणारे कथेचे चित्र  फार ढोबळ आहे. अर्थात या कथामालिकेचे अजून दोन भाग येणार आहेत, आणि त्यांचे प्रमुख चित्रीकरणदेखील आटोपलेले आहे अशी बातमी नुकतीच वाचली आहे. त्यामुळे अखंड चार चित्रपट पाहताना कदाचित आज जाणवणारे लूपहोल्स त्यामध्ये बुजवलेलेदेखील असू शकतात. त्यामुळे त्यावर फारसे  भाष्य करण्यात अर्थ नाही. मात्र, सिनेमा म्हणून पाहत असताना यामधला भपका प्रचंड प्रमाणात जाणवतो, आणि कथामूल्य किंचित कमी पडते हे मात्र निश्चित.

 


मात्र हा सिनेमा मोठ्या प्रमाणात पकड घेतो, ते त्याच्या तांत्रिक बाजूमध्ये. पाण्याखाली केलेल्या चित्रीकरणासाठी वापरलेले अत्याधुनिक मोशन कॅप्चर तंत्रज्ञान असो, अथवा बखुबीने केलेले एडिटिँग असो, आपण सिनेमा पाहताना एक वेगळेच विश्व अनुभवत आहोत, हे प्रेक्षकांना वारंवार जाणवत राहते. अनेक समीक्षकांनी अवतार 2 ला करोडों डॉलर्सचा स्क्रीनसेव्हर म्हणून चिडवलेले आहे. अवतार 2 मधले पाण्याखालचे अद्भुत विश्व मला स्वत:ला मात्र जिवंत रसरशीत आणि अस्सल वाटले. फार क्वचित इतके सुंदर आणि तपशीलवार काल्पनिक विश्व उभारलेले दिसून येते.

 

सिनेमा म्हणून अवतार 2 बॉक्स ऑफिसवर गाजत आहेच. अवतार 1 च्याही पुढे तो मजल मारेल अशी चिन्हे आता दिसत आहेत. तसे घडल्यास अवतार 3 आणि 4 कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा काय्च्याकाय उंचावलेल्या असतील. त्या सर्वांना जेम्स कॅमेरून यशस्वीपणे पुरा पडेल याची खात्री आतातरी वाटत आहे, पण पुढल्या सिनेमांमध्ये स्क्रीनसेव्हरपेक्षा आणि तांत्रिक करामतींपेक्षाही कथा आणि त्यामधल्या घटकांचे परस्परसंबंध अधिक विस्तृतरीत्या दाखवल्यास अधिक उत्तम.

 

नंदिनी देसाई

Tuesday, 18 November 2014

अब के बरस...










 तशी मी काही फारशी इमोशनल वगैरे व्यक्ती नाही. उगाच कुणीतरी काहीही कारण इक्कुल्या कारणासाठी मला रडू वगैरे येत नाही. क्वचितच रडणार्‍यांचा एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे एकदा रडू आलं की काही केल्या थांबत नाही.... मग आधीचंमागचंपुढचंगेल्यातीनचार वर्षांमधलं जे काय रडणं शिल्लक असतं तो सगळा इमोशनल धबधबा एकदमच सुरू होतो. “टचकन डोळ्यांत पाणीआलं” वगैरे नाहीच. डायरेक्ट जुलै महिन्यातला पाऊसच.

याचा अर्थ मनाचे काही हळवे कोपरे नसतातच असं नाही. असतात ना. पण हे हळवे कोपरे फार सांभाळून ठेवावे लागतात. एकदा का त्यावरची खपली निघाली की जखम सारखी ठुसठुसत राहते. नक्की काय बिनसलंय तेही समजत नाही आणि कशामुळं बिनसलंय तेदेखील. आज पहिल्यांदाच अशा एका हळव्या आठवणीविषयी लिहिणार आहे.

मला स्वत:ला लग्न, पाठवणी आणि त्यानंतरची ती सगळी सासर माहेरची गाणी हे सर्व प्रचंड बोअर होतं. कधीकाळच्या बायकांच्या भावविश्वामध्ये त्याला प्रचंड स्थान असेलही. पण आजच्या काळामध्ये “कारल्याचा वेल लावला सासू बाई आता तरी जाऊ द्या माहेरा” किंवा “अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारतं, अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं” वगैरे “आऊटडेटेड” वाटतं. डिट्टो ते लग्नानंतर भसाभसा रडणार्‍या मुलींबद्दल. आता काही पूर्वीसारखं माहेर अगदीच परकं झालेलं. सासर पूर्णपणे अनोळखी वगैरे असलं काही राहिलं नाही.  मुलीपण आता सुशिक्षित आणि कर्तबगार असतात. अरे ला कारे करायची हिंमत ठेवणार्‍या असतात. तरीही लग्नाअधी वर्षभर अमेरिकेमध्ये नोकरी करून एकट्या राहिलेल्या मुली लग्नाच्या दिवशी मात्र रडतात हे मला कायमच फार चमत्कारिक वाटत राहतं.  


आता माझे याबद्दलचे विचार इतके विखारी आणि जहाल असतानादेखील आशाचं एक गाणं असलं आहे की ते ऐकताना हमखास माझ्या डोळ्यांत पाणी येतं. हे गाणं मी शक्यतो पाहतच नाही, पाहिलं एक अनामिक दडपण यायला लागतं. प्रचंड डिप्रेसिंग वाटायला लागतं... काहीच नाही यार! जगण्यामध्ये असलं काहीतरी वाटायला लावणारं हे गाणं. 

बिमल रॉयचा बंदिनी सिनेमा अफाट आहे. एक स्त्रीप्रधान कथा, त्यातही एका खून केलेल्या स्त्रीची कथा. तिचा संघर्ष, तिच्या वेदना, तिचा लढा आणि तिचा बंदीवास समर्थपणे चित्रित केलेला हा सिनेमा. “मै बंदिनी पिया की, मै संगिनी हूं साजन की” म्हणणार्‍या कल्याणीची ही कथा. जास्त करून हा सिनेमा घडतो जेलमध्ये. म्हणूनच ही एकट्या कल्याणीची कथा नाही.


स्त्रियांच्या या जेलमध्ये सगळाच ड्रामा आहे. स्वभावाचे वेगवेगळे नमुने आहेत. कुणी भांडखोर, कुणी चिडखोर, कुणी हसरं तर कुणी सतत दु:खी. या तुरूंगामधल्या प्रत्येकीला स्वातंत्र्याची आस आहे. उंचच्या उंच भिंतीच्या पलिकडच्या जगामध्ये काय घडतंय ते जाणून घ्यायची इच्छा आहे. पण ते शक्य नाही. इथली प्रत्येक जण ही बंदिनी आहे. इथल्या बंदिवासामधून मुक्त होऊन बाहेरच्या विश्वातही आपल्या नशीबी बंदिवासच आहे हे जाणूनही मुक्तता हवीच आहे.

अशाच एका टळटळीत दुपारी कुणीएक बंदिनी जात्यावर दळत बसली आहे. जात्यावर दळतानाचा आवडता टाईमपास म्हणजे ओव्या वा तत्सम लोकगीतं. आताही एकटीच जात्यावर दळताना तिच्या मुखातून गाण्याच्या ओळी बाहेर पडतात.
“अब के बरस भेज भैय्याको बाबुल सावन ने लीजो बुलाय रे
लौटेंगी जब मेरे बचपन की सखिया दीजो संदेसा भिजाय रे”

दुपारच्या उन्हामध्ये एकटीच जात्यावर कष्टानं हात फिरवत बसलेली ती. जेलमध्ये आहे म्हणजे कसल्यातरी गुन्ह्यामध्ये शिक्षा वगैरे झालेलीच. आता आपल्या पराकोटीच्या दांभिक समाजामध्ये अशा स्त्रीची काय किंमत असणार आहे हे सांगायला हवंच का? तरीही यांत्रिकपणे ती हे जे लोकगीत म्हणतेय ते वडलांना श्रावणामध्ये माहेरी बोलवायलाच. माझ्या लहानपणच्या सगळ्या मैत्रीणी जमतील खेळ खेळतील, तेव्हा मला बोलाव असं विनवणारी ही लेक.

आशाचा आवाज ही एक अत्यंत जीवघेणी चीज आहे हे इथं लगोलग नमूद करून टाकते. लोक जेव्हा तिच्या आवाजाला खेळकर, खोडकर, सेन्सुअस वगैरे लेबलं लावतात तेव्हा त्यांनी ही असली रत्नं ऐकलेली नसणार. या गाण्यामध्ये सुरूवातीपासून शेवटपर्यंत तिचा आवाज असा काही लागलाय... की ज्याचं नाव ते. गोल गोल फिरणार्‍या जात्यासारखा हा आवाज तसाच फिरून तिथंच येत राहतो आणि काळीज कापत राहतो. एसडीची ही चाल बरीचशी लोकगीताच्या चालींजवळ जाणारीच आहे. शैलेंद्रच्या शब्दांमधून प्रसंगामधला सगळा विरोधाभास प्रतीत होतोय. अख्खं गाणं चित्रित करताना बिमलदांनी खूप कमी (अगदी जवळजवळ नाहीच म्हणता येतील) अशा हालचाली असलेल्या फ्रेम्स ठेवल्या आहेत. त्या प्रत्येक फ्रेममधला मोकळेपणा, रखरखीतपणा, एकाकीपणा अंगावर येण्यासारखाच आहे. पडद्यावर हे गाणं जी मुलगी म्हणतेय तिच्या चेहर्‍यावर कसलेही भाव नाहीत (म्हणजे कतरीना कैफचा अभिनय नव्हे!!!) तर अगदीच शुष्क आणि निर्जीव चेहरा घेऊन ती गाणं म्हणतेय. हात एखाद्या यंत्रासारखे जातावर चालत आहेत, ओठांतून गाणं फुटतंय पण त्या सर्वांमध्ये तिथलं कुणीही असून नसल्यासारखंच.

अंबुवा तले फिर से झूले पडेंगे रिमझिम पडेंगी फुहारे
लौटेंगी फिर तेरे आंगन में बाबुल सावन की ठंडी बहारे
छलके नयन मोरा कसके रे जियरा बचपन की जब याद आये रे

कधीतरी असंच रेडिओवर लागलेलं हे गाणं ऐकताना अचानक जाणवलं. जाणवलं म्हणजे काळजाच्या आतपर्यंत घुसलंच. ही बंदिनी म्हणजे केवळ त्या तुरूंगामधली गुन्हेगार नाही. हे गाणं केवळ “सासरी गेलेल्या मुलीला लागलेली माहेरची ओढ” इतकंच नाही. तर कधीतरी आयुष्यामध्ये येऊन गेलेल्या त्या वळणावरचं गाणं. प्रत्येकीच्याच आयुष्यामध्ये थोड्याफार फरकानं हे वळण येतंच. “आता तू लहान राहिली नाहीस” हे ते वळण. आणि याचा संबंध शारीरिक किंवा हार्मोन्सच्या मॅच्युरीटीशी जोडायची कहीही गरज नाही. कुणीच्या आयुष्यात अगदी तीन चार वर्षाची असल्यापासून हे ऐकावं लागतंच की. आपल्या समाजाची एक गंमत असते. पुरूषांनी लहान मुलांसारखं वागलं की त्यांचं फार कौतुक होतं. “आमच्या यांना की नै अजून दर रविवारी क्रिकेट खेळायची हौस असते” “आमच्या बाब्याला अज्जून मीच केलेला चहा लागतो हां” आणि हीच वाक्यं बायांच्या बाबतीत म्हणून बघा... लगेचच व्हॉट्सऍपवर पाठवण्यासारखे ते ढकलविनोद तयार होतील.

बैरन जवानीने छीने खिलौने और मेरी गुडीया चुराई
बाबूल थी मैं तेरे नाजों की पाली फिर क्युं हुयी मै पराई
बीते रे जुग कोइ चिठीया न पाती  ना कोइ नैहर से आये रे

मुलीनं लहान रहायचंच नाही, तिनं मोठं व्हायचं, समजूतदार व्हायचं. अगदी मनाविरूद्ध झालं तरी मन मारून जगायचंच. कितीवेळा हे आपण आजूबाजूला ऐकत असतो? अशावेळी लहानपणच्या त्या मुक्त अनिर्बंध जीवनामधल्या असलेल्या थोड्याफार आठवणी म्हणजेच आयुष्यभराची जपणूक असणार ना? प्रत्येक मुलीला अशीच एक बंदिनी म्हणून तर घडवलं जात असतं. “तू अश्शीच वागली पाहिजेस, तुझे नियम अस्सेच असले पाहिजेत, तुझं चारित्र्य असलंच पाहिजे” एक ना दोन अनेक नियम. तुरूंगात मारूनमुटकून जगायला लावायचं आणि वर त्याच पिंजर्‍यावर तिनं प्रेमही केलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवायची. केवळ समाजाचे नियम सांगतात म्हणून पोटच्या पोरीचा गळा चिरणारा बाप असो वा “आता तुझा या घराशी काहीही संबंध नाही” सांगणारी सख्खी आई असो. रक्ताच्या मायेपेक्षा समाजाच्या या शृंखला अधिक जड ठरतात. मन मानेल तसं जगू देणारी, निर्णयस्वातंत्र देणारी, झाल्याच् चुका तर त्यामधून पुढं येऊ देणारी एक समाजव्यवस्था निर्माण करणं आपल्याला अजूनही शक्य होत नाही? आजही मुलगी असणं म्हणजे आईवडलांच्या मनावरचं दड्पणच का असतं?
प्रत्येक वेळी पडतं घेऊन, प्रत्येक वेळी झुकून दोन पावलं पाठी सरूनच तिनं जगायचं. स्वत:ला जसं हवं तसं न जगता दुसर्‍याच्या नियमाप्रमाणं जगायचं. तुरूंगच असतो की हा सगळा. अख्खं आयुष्य दुसर्‍याच्या जीवावर ढकलायचं. जन्मठेपच....
असो. आज सकाळी हे गाणं टीव्हीवर लागलं आणि बघता बघता आलेले सगळे विचार लिहत सुटलेय. कदाचित काही गोष्टी बदलल्या असतील. माझ्या बाबतीत तरी. मला आयुष्यामध्ये प्रत्येक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं होतं हे माझं नशीब. तरी आजूबाजूला बघताना अशा कित्येक बंदिनी आजही दिसतात. त्यांच्या हातापायांतल्या बेड्या आजही खुपतात. त्यांच्या पंखांमधली उडण्याची भरारी आजही जाणवते.


अशा सर्व बंदिनींना त्यांचं स्वातंत्र्य, त्यांची जीवनोत्सुकता नक्कीच मिळायला हवी. हो ना?









Wednesday, 10 July 2013

रांझणा

 
मागल्या  रविवारी धनुष - सोनम कपूरचा रांझणा बघायचा योग आला
.
मी आणि माझ्या शेजारणीने या पिक्चरला जायचं असं प्रोमो पाहिल्यावरच ठरवलं होतं. तिचा धनुष अतिशय आवडता हिरो आहे. तिचे तसे इतरदेखील आवडते हीरो आहेत आणि तिच्या फॅनपणाचे किस्से अचाट आहेत. अगदी टिपिकल मद्रासी. असो. मलापण मंगळूरामध्ये त्याचे एक दोन चित्रपट पाहून तो आवडला होताच. नंतर आलेल्या कोलावेरी डी ने तो प्रचंड फेमस झाला म्हणा.
 
 
तर आम्ही नेहमीप्रमाणे मिंजूरला न जाता टॅक्सी  घेउन अण्णानगरला सिनेमा बघायला गेलो. एवढ्या लांब जायचे कारण की मिंजूरला तमिळ डब व्हर्जन लागलेलं होतं आणि अण्णानगरला हिंदी. वनिताला धनुष हिंदी कसा बोलतो याची जाम उत्सुकता होती, मला तमिळ मध्ये बर्‍याचदा काय चाललंय ते समजत नाही म्हणून मला पण हिंदीच बघायचा होता. एबीसीडी बघताना अख्खं थीएटर खिदळत असताना मी अधून मधून अंज म्हणजे पाच का? मग तो असं काय म्हणाला वगैरे लॉजिक लावत बसले होते. रांझणाचं तमिळमध्ये नाव अम्बिकापती असे ठेवले आहे, कुठल्या लॉजीकने कुणास ठाउक!! कारण सिनेमामधे तर अंबिका नावाचं एक पण कॅरेक्टर नाही. त्याच लॉजिकने हिंदीमधे रांझणा नाव का ठेवलंय कुणास ठाऊक? पंजाबी लोकसंगीतातल्या रांझा वरून असावं बहुतेक. सिनेम्याच्या नावाचा आणि कथेचा काहीही संबंध नसले तरी तेच नाव का ठेवतात कुणास ठाऊक?
 
 
बनारसमधल्या एका तमिळ पंडीताचा मुलगा एका मुसलमान मुलीच्या प्रेमात पडतो. मुलगी दिसायला अतिशय सुंदर आणि अभ्यासात हुशार. मुलगा वाया गेलेला, शिक्षणात यथातथा, दिसायला अत्यंत सामान्य आणि काटकुळा. आठवी नववीच्या वयातलं हे प्रेम. पुढे मुलीच्या घरच्यांना ही भानगड समजते. मग ते मुलीला शिकायला बाहेर पाठवतात. मुलगी आठ वर्षानी जेव्हा परत येते तेव्हा मुलगा अजून तिच्या प्रेमात वेडा राहिलेला असतो. मुलगी मात्र दुसर्याच्या प्रेमात पडलेली असते. आणि त्या दुसर्याशी लग्न करायला ती पहिल्याची मदत घेते. नंतर बरंच काही पहिल्याच्या मनाविरुद्ध जाणते-अजाणतेपणी घडत राहतं आणि बनारसमधला एक साधा तरूण एक राजकीय प्यादं बनून जातो.
 
 

अनेक घटनाच्या घडण्यामुळे  पूर्ण  सिनेमा अत्यंत गोंधळलेला आहे. वास्तविक दिग्दर्शकाकडे तीन अफाट व्यक्तीरेखा होत्या, दोन जबरदस्त प्लॉट होते, दोन उंच ताकदीचे अभिनेते होते. एक सुंदर दिसणारी अभिनेत्री  (आणि अभिनयाला शून्य असलेली) होती. पण तरीदेखील या सर्वाची भेळ केल्याने (कदाचित म्हणूनच) रांझणा गोंधळतो. पहिल्या भागातील कथेमधे काहीही नावीन्य नाही. उत्तरार्धात मात्र खूप घटना घडतात त्याही खूप वेगाने आणि त्यामुळे कुठलाच प्रसंग सलग वाटत नाही, त्यामध्ये एकसंधता येत नाही, पूर्ण पटकथा ढिली धाली वाटते.
 
 
सुरुवातीचा हिंदी सिनेमामधे वारंवार येऊन गेलेला ते "सोलह बरसकी बाली उमर को सलाम" टाईप टीनेज रोमान्स. पाठी लागलेला मुलगा आणि छुईमुई मुलगी. मात्र, एकमेव फरक टीनेज रोमान्स अगदी वास्तविक पातळीवर घडतो. पहिल्यांदाच भेटल्यावर आधी आय लव्ह यू म्हणायचं आणि नंतर मुलीचं नाव विचारायचं. ग्रीटींग कार्ड देऊन शायरी ऐकवायची वगैरे प्रसंग खूप अफलातून जमलेले आहेत. धनुष दहावीतला मुलगा म्हणून शोभतो. सोनम या भागात उंचीमुळे थोराड वाटते. पण तिला युनीफॉर्ममधला लूक फार शोभलाय. मुरारी आणि बिंदिया (झीशान अयुब आणि स्वरा भास्कर) या दोघांचे काम अतिशय सुंदर आहे. पण त्यांच्या व्यक्तीरेखा फार साचेबद्ध आहेत. सिनेमामधला हा भाग छोट्या छोट्या प्रसंगातून जाम खुलत जातो. "झोया"ला प्रपोज करायला जाताना कुंदन देवळातून आशीर्वाद घेउन निघतो आणि तिला भेटायच्या आधी कपाळावरचा टिळक पुसतो किंवा झोया यायच्या आधी कुंदन फेसपॅक लावून बसलेला आहे वगैरे शॉट एकदम सही घेतले आहेत.
 
 

अभय देओलचे पात्र आल्यापासून सिनेमा फार वेगात घडायला लागतो. इथे राजकारण, त्यामागचे विचार, सिस्टीम आणि त्या सिस्टीमला बदलायचे प्रयत्न करणारे तरूण तरुणी हे फार परीणामकारक घेतले  आहे.  खास करून दिल्लीची राजकीय आणि सामाजिक विचारांनी भारलेली  तरुणाई यामध्ये दिसत राहते आणि सिनेमा रोम्यान्टिक ट्रॅक सोडून राजकीय सिनेमा बनत जातो. पण या सर्वांमधे सिनेमाचा जो मूळ गाभा आहे तोच हरवून जातो. सत्य, न्याय वगैरे गोष्टीसाठी लढणारी झोया स्वतःच लग्नासाठी जलजीतला खोटं बोलायला सांगते आणि तोही कबूल होतो, हे मला काही पचनी पडले नाही. भले घरच्यांचा विरोश असेल तर रजिस्टर मॅरेज करा ना. पण खोटं बोलून तेही कुंदनच्या जीवावर कशाला तो लग्नाचा अट्टहास?अजून मला प्रचंड आवडलेला प्रसंग म्हणजे कुंदन झोयाला घेउन पंजाबात जातो, आणि तिथे गेल्यावर त्याला जे दृश्य दिसतं, त्यावरची त्याची प्रतिक्रिया.... मला नाही वाटत असा सीन आजवर कधी हिंदी सिनेमामध्ये दाखवला गेला आहे. 





कुंदनला पकडल्यावर रात्रभर त्याच्या आजूबाजूला बसून तो चोर का बनला असावा यावर चर्चा करणारी मुलंमुली बघून मला आमच्या मायबोलीची फार फार आठवण आली होती. कुंदन या राजकीय पक्षामधे झोयासाठी परत येतो, आणि नुसता परत येत नाही तर एक प्रमुख लीडर देखील बनतो. हा अशिक्षित पंडित ते लीडर प्रवास फार झपाट्याने घडतो. नुसत्या एक दोन चमकदार प्रसंगांनंतर पूर्ण पक्षाचे कुंदनवर भार टाकणे पटत नाही, झेपत नाही. शिवाय नंतर झोयाने त्याच्या वापर करून घेणे, आणि स्फोटांनंतर स्वत: जबाबदारी स्वीकारणे फार अनाकलनीय वाटले. ती कुंदनचा सूड घ्यायला असं करते का? की ती सी एम बाईना अडकवण्यासाठी असं करते का? हे करून तिला नक्की काय फायदा होतो? अथवा तिच्या पक्षाला यातून काय फायदा होतो? शिवाय, या राजकीय पक्षाचं काम नक्की कशाच्या जोरावर चालतं? त्यांना पैसा कुठून मिळतो, इकडे तिकडे फिरणं भटकणं स्ट्रीट प्लेज करणं, सामाजिक कामं करणं याव्यतिरिक्त हा राजकीय पक्ष असं काय महत्त्वाचा असतो की ज्याची भिती मुख्यमंत्र्यांना वाटायला लागते. या प्रश्नांची उत्तरं पटकथेतून मिळत नाहीत आणि सिनेमा अविश्वसनीय बनत जातो.
 
 



चित्रपटामध्ये काही प्रसंग विनाकारण आल्यासारखे वाटले. उदा: बिंदिया आणि मुरारी कुंदन जाऊन त्या डॉक्टरचे फोटो काढून आणतात त्याची काही विशेष आवश्यकता नव्हती, त्यातून झोयाचं मॅनिप्युलेटिव्ह कॅरेक्टर दाखवायचं असेल तर सोनमला ते काही नीट जमलेलं नाही. मुळात तिला अभिनय जमत नाही ही काही आता नवीन बातमी राहिली नाही. या चित्रपटामध्ये ती किमान अभिनय करायचा प्रयत्न तरी करते. पूर्ण सिनेमाभर तिने लुक्स आणि मेकपवर प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याहून निम्मी मेहनत तरी तिने संवादफेक आणि मुद्राभिनायावर घेतली असती तर बरे झाले असते. खरंतर झोयाची ही भूमिका कुठल्याही अभिनेत्रीसाठी ड्रीम रोल ठरवा अशी आहे. पण इतका मिटी रोल मिळून सोनमला काही झेपलेला नाही.
 
 
संपूर्णपणे भरकटलेली पटकथा असूनदेखील सिनेमा पहात रहावासा वाटतो याचे कारण, धनुष आणि ए आर रहमान. पैकी धनुष पूर्ण सिनेमाभर कुंदन म्हणूनच वावरलेला आहे. २६ सिनेमांचा अनुभव असलेला, राष्ट्रीय पारितोषिक मिळवलेला, प्रचंड लोकप्रियता असलेला हा अभिनेता या सिनेमामधे केवळ कुंदन म्हणूनच दिसत राहतो. सुरूवातीचे त्याचे स्कूल युनिफॉर्ममधले लूक्स इतके परफेक्टरीत्या जमले आहेत की बास. अर्थात हे निम्मे कौशल्य छायादिग्दर्शक उर्फ सिनेमॅटोग्राफरचेदेखील आहेच. कुंदनची व्यक्तीरेखा मुळातच हिंदी हीरोच्या व्याख्येला साजेशी नाही, तरीदेखील तो पूर्ण सिनेमाभर हीरो बनून जातो. भाषा कुठलीही असो, संवादफेक ही किती टेक्निकल गोष्ट आहे ते त्याच्या संवादफेकीकडे बघून समजतं. त्याचे हिंदी उच्चार बरेचसे शुद्ध नाहीत. बनारसी पंडिताच्या मानाने तर ते अजिबातच नाहीत, पण तरीही तो संवादफेकीवर जो कंट्रोल ठेवतो त्याला तोड नाही. खास करून "हम बनारस के पंडित ऐसेही सालोंसे लोगोंको डराते आये है.."सारखा हलकाफुलका संवाद असो वा झोयाच्या लग्नाआधी तो तिला मिठीत घेऊन बोलतो तो संवाद असो. धनुष रॉक्स. संवादाइतकाच त्याचा अभिनयदेखील उच्च आहे. धनुषला कास्टिंग करून मग ती व्यक्तीरेखा विकसित केली की व्यक्तीरेखा विकसित करून मग त्यानुसार धनुषला कास्ट केले माहित नाही. पण जे काय जमलंय ते अफलातून आहे. कुंदनचं वागणं बरोबर की चूक हा इथे प्रश्नच नाही, कारण दिग्दर्शक कुठेही त्याचं वागणं जस्टीफाय करतच नाही. पूर्ण सिनेमाभर झोया त्याचा वापर करून घेते, आणि तो वापर होऊ देतो हे फार व्यवस्थितरीत्या जमले आहे. (सोनमचा अभिनय चांगला असतात तर हे अजूनच उत्तम रीत्या पोचले असते)
चित्रपटाचे संवादलेखन एकदम खुसखुशीत आणि क्रिस्प आहे. शेवटचा संवाद तर केवळ महान आहे.
 
 

ए आर रहमान हा पुन्हा एकदा जीनीयस आहे हे सिद्ध करतो. त्याची सर्वच गाणी अफलातून आहेत. आणि टिपिकल रहमान स्टाईलने चढत जातात, पण हल्ली त्याच्या गाण्यांना अर्थांच्या दृष्टीने पण फार वेगळेपण लाभत जात आहे. हल्ली म्हणजे दिलसे पासूनच, मात्र नव्या सिनेमांमधे त्याची गाणी नुसती संगीतासाठीच नव्हे तर शब्दांसाठी पण ऐकावीशी वाटत राहतात.
 
 
पहिल्यांदा बना रसिया आणि रांझणा ऐकलं तेव्हा तुफान आवडलं होतं. पण "तुम तक" ऐकलं आणि प्रेमातच पडले. इरशाद कामिलने काय जीवघेणं लिहिलं आहे हे गाणं. मुळात तालातले शब्द घेऊन त्यातून परफेक्ट अर्थनिर्मिती करत गाणं बनवणं हा खेळ नव्हे.
 

चला हू तुमतक चलूंगा तुम तक
मिला हू तुमतम मिलूगा तुम तक... काय ओळी आहेत. याच गाण्याच्या शेवटी असलेलं

नैनो की घाट लेजा नैनोकी नैय्या
पतवार तू है मेरी तू खेवय्या
जाना है पार तेरे तूही भंवर है
पहुंचेगी पार कैसे नाजूकसी नैय्या
 
 
या ओळी अक्षरशः कलेजा काटके आहेत. याच ओळींचा म्युझिक पीस जेव्हा शेवटच्या सीनला बॅकग्राऊंडला वाजतो तेव्हा शब्दांचा अर्थ जिवंत होतो. माझ्यामते तरी इर्शाद कामिल सध्या असलेल्या गीतकारांपैकी सर्वोत्कृष्ट गीतकारांपैकी एक आहे. वेगळे तरीही सोपे शब्द वापरून त्याची गाणी क्लास अपार्ट ठरत आहेत.

रांझणामधे जर पटकथा अजून थोडी सशक्त असती आणि नायिकेचा अभिनय बराच उत्तम असता तर सिनेमा कुठल्या कुठे पोचला असता, पण दुर्दैवाने तसं होत नाही. म्हणून रांझणा अ‍ॅव्हरेज सिनेमा ठरतो आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने धनुष सिनेमाच्या कॅन्व्हासपेक्षा मोठा होत जातो, आपल्या हिंदी सिनेमांचं हेच तर सर्वात मोठं दुर्दैव आहे.
 
 
अजून एक:  एका प्रसंगामधे धनुष जेव्हा पटकन पुढे येऊन तमिळ बोलतो, तेव्हा अख्खं थिएटर जे काही सणकून उसळलं होतं त्याला तोड नाही. आजवर असा दंगा मी फक्त दिल चाहता है च्या वेळेला पाहिला होता. पण त्याहीपेक्षा कालचा दंगा सॉल्लीड होता. मज्जा आली. हीरोच्या एंट्रीला आणि रांझणा गाण्यावेळेला पण पब्लिक म्याड झालं होतं. शिट्ट्या बिट्टया एकदम जोशात.