Friday 9 September 2022

काय लायटिंग!! काय झकापक!! पण स्टोरीचा पत्त्याच न्हाई!!

काय लायटिंग!! काय झकापक!! पण स्टोरीचा पत्त्याच न्हाई!! 


- नंदिनी देसाई भारतामध्ये भलीमोठी फिल्म इंडस्ट्री आहे, बॉलीवूड तर आहेच आहे, पण त्याहूनही अनेक तर प्रादेशिक भाषांचे स्वत:चे फिल्म जगत आहे. याहून पलिकडे गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये उदयाला आलेली एक भलीमोठी इंडस्ट्री आहे अ‍ॅनिमेशन आणि सीजीआयची. अनेक हॉलीवूड सिनेमा स्टुडिओ कंप्युटर जनरेटेड इमेजरीसाठी त्यांचे काम भारतात आउटसोर्स करतात. इंग्रजी सिनेमा पाहताना जर एंड क्रेडिट्स पाहिले तर अनेक भारतीय सीजीआय कंपनी आणि भारतीय तंत्रज्ञांची नावे दिसू शकतील. 


नमनाला घडाभर तेल घालायचे कारण असे की, हे सर्व तंत्रज्ञान भारतात उपलब्ध असूनही, आपली सीजीआय अक्कल ही हॉट हीरो दाखवण्यासाठी त्याच्या अंगावरचा शर्ट जळणे, नाहीतर हिरॉइनच्या केसांचे क्लोजप घेताना ते केस अधिकाधिक चमकदार दाखवणे इतपतच मर्यादित राहते. त्यामुळे ब्रह्मास्त्रची घोषणा झाली तेव्हा जरा भितीच वाटली होती. करण जोहरने बाहुबलीला मिळालेले यश पाहून ते बॉलीवूडमध्ये रेप्लिकेट करण्याचा प्रयत्न केलाय असे तेव्हा वाटले होते. भरीसभर सिनेमा बनायला इतकी वर्षे लागली, आणि रीलीजच्या जवळ आला तेव्हा काहीही कॉन्ट्रोव्हर्सी यायला लागल्या होत्या, त्यामुळे मच अवेटेड सिनेमा बनलाय. मला सुरुवातीपासूनच ब्रह्मास्त्र हे अश्विन संगी- अमिशटाईप काहीतरी मायथॉलॉजिकल जत्रा आणि महाभारत-रामायण मालिका टाईप असेल अशी भिती वाटत होती. 


अयान मुखर्जीने ही भिती दुर्दैवाने साधार ठरवलेली आहे पण एकाच बाबतीत. या सिनेमाचा भारतीय पुराणकथांशी अथवा मिथकांशी दुरान्वयेही संबंध नाही. अस्त्राव्हर्स हे भारतीय मिथकांची नावे वापरून बनवलेले अव्हेंजर्सचे हिंदी व्हर्जन आहे. आपल्याकडे भारतीय मिथकांमध्ये अनेक प्रभावी कथानके आहेत. पण त्याऐवजी, अयान आणि रणबीरने मिळून हे हे स्पेशल इफेक्ट्स इथे आपल्याला हवेत, हा हा शॉट आपल्याला इथे असा हवा, आणि एक कार चेस सिक्वेन्स हवा, एक उड्या मारायचा शॉट हवा, एक पाण्यातली लढाई हवी आगीचे असे हे सीक्वेन्स हवेत असे बसून ठरवलेत आणि मग त्याच्या आजूबाजूला कथा बसवण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. मग त्यात तीन मेगा स्टार घेऊन त्यांना थोडे थोडे फुटेज दिले. मग त्यात थोडे अव्हेंजर्स अ‍ॅड केलेत, थोडा कॅम्प हाफ ब्लड, थोडा डॅन ब्राउन आणि मग थोडासा हॅरी पॉटर. मग मनमोहन देसाईंना साकडे घातले आणि त्यांच्याकडून थोडा मसाला उधार घेतला. आता उरलेला सगळा वेळ आलिया भट्टचे क्लोजप्स आणि रणबीरचे गोडमिट्ठास हसू. झाला ब्रह्मास्त्र तयार. 


यामधले सीजीआय आणि स्पेशल इफेक्ट्स भारी आहेत. प्रचंड पैसा खर्च केलेला दर शॉटला जाणवत राहतो, पण हे इफेक्ट्स कुठेही मनाला भावत नाहीत, ते कायम खोटे खोटे चिकटवलेलेच वाटत राहतात. त्यातून ते सातत्याने इतके आदळत राहतात की त्या नादात समोर दिसत असलेली सुंदर सिनेमेटोग्राफी अथवा अभिनेत्यांचा अभिनय हेदेखील विरून जायला लागते. सिनेमा कुठेही प्रेक्षकांना आपलासा करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे आपण कायम भांबावलेलेच राहतो. भई ये हो क्या रहा है? सिनेमामध्ये अचानक काही पॅचेस येतात, आणि निघून जातात. शिवाचे ते दोन बेस्ट फ्रेंड्स त्यांचे काय झाले? आणि ती लहान मुलं? त्यांचा नंतर काहीच उल्लेखदेखील नाही. त्या आलियाची फॅमिली कुठे आहे? पोरगी इतके दिवस गायब असून त्यांना काहीच फरक कसा पडत नाही? अगदी सुरुवातीला आलेला मोहन भार्गवचा रेफरन्स एकदम झकास वाटला होता. त्या आधारावर इतरही काही कॅरेक्टर्स येतील अशी आशा होती. पण तेही बहुतेक दिग्दर्शक विसरून गेला वाटतं. त्या गुरुकुलमधले इतर मुलांनाही अगदी कमी स्क्रीन टाईम दिला आहे. इन फॅक्ट, आलिया रणबीरपेक्षाही अयानने लायटिंगच्या माळांनाच जास्त स्क्रीन टाईम दिलाय असं सारखं वाटत राहतं. 


चुकीच्या ठिकाणी आलेली गाणी हाही एक या सिनेमाचा प्रॉब्लेम आहे. केसरिया गाणे सुंदर आहे, पण त्याची प्लेसमेंट फारच वाईट झालेली आहे. सुरुवातीचे भूत चढेया गाणे बढिया आहे, त्याची कोरीओग्राफीदेखील धमाल आहे. पण या गाण्यामुळे आणि एकंदरीत त्या पूजा पेंडालच्या माहौलमध्ये इतका भव्यदिव्यपणा आणला आहे की, त्यानंतरच्या अनेक शॉट्समध्ये काहीही भव्य वाटतच नाही, खुजेच वाटत राहते. ओपनिंगलाच दाखवलेली ही भव्यता सिनेमाला प्रचंड मारक ठरते. 


सिनेमाची पहिली 25 मिनिटे अत्यंत बॉलीवूडीय आहेत. बॉय मीट्स गर्ल. अमीर लडकी, अनाथ लडका. मग तो कसा गोल्ड-हार्टेड. ती कशी त्याच्या गरिबीच्या प्रेमात पडते वगैरे वगैरे. हा सर्व भाग नसता, तर कथानक कदाचित इतके ठिसूळ राहिले नसते. दैवी शक्ती असलेला शिवा (एक क्लॅरिफिकेशन- याचे नाव शिवा असले तरी तो महादेव शंकराचा अंश नाही, किंबहुना बहुत चालाखीसे अयानने यामध्ये कुठल्याही भारतीय देवाचे थेट नाव घेतलेले नाहीये.) याच्या अवतीभवती काहीतरी भयंकर घडतं आहे, आणि मध्येच नेहमीचा टिपिकल हिंदी फिल्म्सवाला रोमॅंटिक ट्रॅक सुरू होतो, यामध्ये प्रेक्षकाची त्या कथानकाशी लागत असलेली लिंक पूर्ण तुटून जाते. काळवेळेचे काही भान नसतेच का या हिंदीवाल्यांना? अगदी सुरुवातीपासून त्या कथानकामध्ये अथवा नायकाबद्दल जराही कनेक्शन प्रेक्षकांना वाटू नये याची अतीव काळजीच घेण्यात आली आहे... 


या सिनेमाचे एकूण तीन भाग असणार आहेत, पहिल्या भागामध्ये अयानने कथानकाची केवळ मांडणी केली असती तर पुढचे दोन भाग अधिक रंजक झाले असते. इथे पहिला भाग पूर्ण कथानक मांडतही नाही आणि उत्सुकताही ताणत नाही , त्यामुळे प्रेक्षकांना आता पुढे काय हे कुतुहल राहतच नाही. त्यातून दुसर्‍या भागासाठी हृतिक रोशन तयार नसल्याची बातमी नुकतीच वाचली. मुळात, तीन भागाचा सिनेमा काढताना पुढच्या सिनेमाचा मुख्य नायक जर किंचित दाखवला असता तरी प्रेक्षकाशी एक इमोशनल कनेक्ट लगेच तयार झाला असता. या फंड्यासाठी आमच्या मार्व्हलवाल्याना मानायला हवं. एंड क्रेडिटनंतर पुढची छोटीशी चुणुक दाखवून हे लोकांना कायम गुंगवून ठेवतात. 


अर्थात, इतके सारे लिहिले तरीही, ब्रह्मास्त्र हा वन टाईम वॉच नक्कीच आहे. किंबहुना, मसाला चित्रपटांवर पोसलेल्या आमच्यासारख्या लोकांसाठी तरी नक्कीच. सिनेमा सुपरहिट जाईल अशी चिन्हे आता तूर्तास तरी दिसत आहेत. बॉक्स ऑफिस सक्सेससाठी तरसलेल्या बॉलीवूडसाठी ब्रह्मास्त्र काही आशा दाखवेल असे वाटतंय तरी. 
सिनेमाची सेव्हिंग ग्रेस म्हणजे, याचे संगीत आणि ऑफ कोर्स कलाकार. रणबीर कपूरच्या खांद्यावर अख्खा सिनेमा आहे, आणि त्याने तो भार लीलया पेलला आहे. सुरुवातीचा एकटा, भांबावलेला तरूण ते स्वशक्तीची जाणीव झाल्यावर त्याच्यामध्ये उगवलेली धग हे सर्व ट्रांस्फॉर्मेशन त्याने परफेक्ट निभावलेले आहे. आलियासोबतचा त्याचा रोमान्सदेखील खूप सच्चा वाटतो, (ते ऑफ स्क्रीन रीअल पेअर आहेत म्हणून त्यांचा ऑन स्क्रीन रोमान्स सुंदरच वाटायला हवा अशी अपेक्षा असणार्‍यांनी कृपया करीना सैफचा एजंट विनोद किंवा काजोल अजयचा राजूचाचा हे सिनेमा पहावेत. धन्यवाद!!) रणबीर स्वत: अग्नीवर नियंत्रण ठेवायला शिकतो तो सीन मला प्रचंड आवडला आहे. तिथे रणबीरचा अभिनय तर जाणवतोच, पण त्याचे पदलालित्यही विशेषत: खूप कौशल्याचे आहे.


शाहरूख खानने पहिली दहा मिनिटे अक्षरश: गाजवली आहेत. एकहाती सिनेमा त्याने यापूर्वी अनेकदा ओढला आहे, इथे बिचारा केवळ एक सीन स्वजोरावर ओढतो. नागार्जुनाला अजून थोडा वाव द्यायला होता... त्याने अ‍ॅक्शन सीनमध्ये मात्र फुल्ल धमाल केली आहे. मौनी रॉय नागीन मालिकेच्या सेटवरून इकडे ब्रह्मास्त्रच्या सेटकडे वाट चुकून आल्यासारखी वाटते. तिचे ते बॉटॉक्स ओठ आणि एकसुरी संवादफेक कंटाळा आणते. 


आलिया भट्ट सुंदर दिसते आणि अभिनयही तितकाच सुंदर करते. अ‍ॅक्शन सीनमध्ये ती प्रचंड फिट वाटते. तिचे सर्व कॉस्च्युम्स मला विशेषकरून आवडले. ट्रेण्डी तरीही, कंफर्टेबल असे सर्व कॉस्च्युम्स आहेत. आलियाच्या स्क्रीन प्रेझेन्समध्ये एक फ्रेशनेस असतो, तो या सिनेमासाठी अतिशय आवश्यक ठरला आहे.  


माझ्यासारखे जर फुल्ल बच्चन फॅन असाल तर एक गोष्ट अवश्य मान्य कराल. जेव्हा बच्चनची एण्ट्री होते, तेव्हा असं वाटतं की आता सिनेमा खर्र्‍या अर्थाने सुरू झाला. मग तो सुरुवातीला येऊदेत, मध्यंतरामध्ये किंवा एकदम लास्टला. बच्चन आला की सिनेमा वाचला. हीरोची एंट्री म्हणजे काय ते आज या वयातही बच्चनकडे बघून समजतं. ब्रह्मास्त्रमध्ये तर बच्चन फायटींग करतो तेव्हा कसल्याही जादुई अस्त्राची आणि तलवारीची गरज भासणार नाही हे जाणवत राहतं. डोळेच काफी आहेत बॉस. 


मनमोहन देसाईच्या अनबिलिव्हेबल कथानकामध्येही बच्चन बिलिव्हेबल वाटायचा. तो मारतो ते केवळ ढिशुम ढिशुम नसून खरोखर व्हिलनला बुकलतोय असं वाटायचं. त्याकाळी कसलेही स्पेशल इफेक्ट्स नसताना, मनमोहन देसाई केवळ आपल्या स्टोरीटेलिंगवर प्रेक्षकांना पूर्ण गुंगवून टाकायचा. दुर्दैवाने, बॉलीवूडचा हा मसाला फॉर्‍म्युला आता पूर्ण फेल जाताना दिसतो आहे. आज कदाचित मनमोहन देसाई असते तर या अखंड स्पेशल इफेक्ट्सचा त्यांनी काय वापर केला असता देव जाणे. अयान मुखर्जी बॉलीवूडच्या आपल्या कथानकशैलीशी प्रामाणिक राहून व्हीएफएक्सचा वापर करू पाहत आहे. पण, कोबीच्या भाजीवर कोथींबीर घालण्याऐवजी त्याने अखंड कोथिंबीरीची जुडी वाटीभर कोबीच्या भाजीत घातली आहे. ते काय म्हणतात ना, चाराण्याची कोंबडी नी बाराण्याचा मसाला. त्यातली गत. सिनेमाचे अजून दोन भाग येणार आहेत, (ते यावेत अशी प्रचंड अपेक्षा आहे) त्यामध्ये तरी त्याच्याकडून हा मसाला व्यवस्थित रांधला जावा इतकीच अपेक्षा. नंदिनी देसाई. 

No comments:

Post a Comment