Wednesday 10 February 2021

फिरूनी नवी (भाग 4)

 

फिरूनी नवी भाग 3


भल्या पहाटे सात वाजता त्यानं कार गेटसमोर लावली. गेटला लावलेलं कुलूप अजून उघडलेलंही नव्हतं त्यानं दोन तीनदा गेट खडाखडा हलवून आवाज दिला. पण, कोणाचही उत्तरं आलं नाही. काल रात्री आईचा ताबडतोब घरी ये इतकाच फोन आला होता.

एरवी आई बाबा भल्या पहाटे पाच वाजता उठतात. आणि आज कायं झालयं. अखेर वैतागून त्यानं खिशातला मोबाईल काढला आणि आईला फोन लावला. रिंग पूर्णपणे वाजून संपत होती तेव्हा फोन उचलला.

“आई, मी बोलतोय”

”सकाळी सकाळी तुझा फोन” तिच्या आवाजातला वैताग स्पष्ट जाणवत होता.

”आई दारं उघड मी केव्हाचा गेट बाहेर उभा आहे. ”

आईनं बाबांना हाक मारून गेट उघडायला सांगितलं. गेट उघडताना बाबा म्हणाले ”काय राजे कॉलेजचे दिवस विसरलात का? रात्रभर उडंगून याच वेळेला गेटवरून उडया मारून मागच्या दाराने घरात येत होतात. ”

पण तेव्हा निहाल माझ्यासाठी मागचं दार उघड ठेवत होता या तपशीलाची त्यानं आठवण करून दिली नाही. घरी गेल्यावर आईने स्वागत थंडपणे केलं. तिच्याकडून त्याला तशीही काही अपेक्षा नव्हती.

डायनिंग टेबलावर ठेवलेल्या एक कप चहानं त्याची सकाळ उजाडली. खरतर रात्रभर प्रवास करून आल्याने भूक लागली होती. पण आईने अजून नाश्ता बनवला नव्हता.

”नुस्ता चहा काय देतेस अजून काहीतरी खायला दे, ” बाबा म्हणाले.

”थोडया वेळाने पोळया करायला मावशी येतील, तेव्हा त्यांनाच काहीतरी बनवायला सांगेन” आईने विषय बंद केला. त्यानं निमुटपणे समोर ठेवलेल्या गारेगार  चहाचा घोट घेतला. “बेस्ट चहा” तो म्हणाला.

“चला, तुझ्याकडून कौतुक ऐकलं आता मी सुखाने मरायला मोकळी.” तिच्या टोमण्यावर काही न बोलता त्यानं अजून एक घोट घेतला.

”आई, इतक्या तातडीने मला का बोलवून घेतलंस? ” चहा संपता संपता त्यानं विचारलं.

हातामधला न्यूजपेपर बाजूला ठेवत त्याचे बाबा म्हणाले, “बोलूया! सगळा विषय सावकाश बोलूया, आधी आंघोळ करून घे. वाटल्यास तासभर झोप काढ, मग बोलू.” 

“काही गरज नाही.” आई म्हणाली. “आधी विषय क्लीअर करू आणि मग त्याला वाटेल तेवढा वेळ आराम करू दे नाहीतर झोपा काढूदेत.”

“पूजा, जरा सबूरीने घे,” बाबा तिला समजावत म्हणाले.

तो आता प्रचंड वैतागला. “बाबा, आईचं बरोबर आहे. जो वर मला इकडे बोलवण्याच कारणं कळत नाही तोवर मी आराम काय करेन? बाबा, सारं ठीक आहे ना. काही अडचण नाही ना?”

“का? अडचण अस्ती तर तू काय मदत केली असती?”  आईच्या प्रश्नात टोकेरी बाणाचा ईफेक्ट होता.

“नाही, अडचण कसली नाही.” बाबा, म्हणाले.

निमिष पुन्हा एकदा गोंधळात पडला. दोघांच्याही तब्येती व्यवस्थित होत्या. आर्थिक दृष्टीने बाबा चांगलेच भरभक्कम होते मग तरीही त्याला बोलावून घेण्यासारखं काय घडलं होतं?

“निमिष, आम्ही हा बंगला विकणार आहोत.” बाबा माझी नजर चुकवत बोलले.

“ओके,”

“बंगला विकून जे पैसे येतील त्या मधून निहालच्या नावाने ट्रस्ट फंड चालू करायचा विचार आहे.” 

ओके,   त्यानं परत तेच उत्तर दिलं.

हा बंगला बांधून पंचवीस एक वर्ष झाली होती. पण  सात आठ वर्शांपूवी बाबांनी खोल्या वाढवायच्या म्हणून वर मजला काढला होता. तिथं दोघा भावांची सेपरेट बेडरूम, गेस्टरूम, लायब्ररी आणि एक छोटं किचन केलं होतं. दुर्दैवाने दोन्हीं भावांमध्ये भांडण झाली. पटलं नाही, तर कुणीतरी वेगळं राहून घर करण्यापेक्षा आहे त्याच घरात दोन सेपरेट घर करता यावीत अशी त्याच्या आईची ही योजना.

पण, निहालनंतर आता गरजच उरली नव्हती. निमिष गावी परत यायचे तसे काही चान्सेस नव्हते. त्यामुळे त्यांनी हा बंगला विकला तरी त्याला काहीच फरक पडत नव्हता.

“पण मग मला का बोलावून घेतलं?”

“कोर्टात लिहून दयायला की  तुझा हया बंगल्यावर काहीही हक्क नाही आणि हा बंगला विकून जे काही पैसे येतील त्यावरही तुझा काही हक्क नाही.” त्याच्या आईनं विषय क्लीअर करून टाकला. 

“बाबा, या कारणासाठी तुम्ही मला काही न सांगता रातोरात बोलावून घेतलत. लेट मी गेस आपल्याला कोर्टात आज लगेच जायचंय. बरोबर?”

“निमिष, अरे!!”  बाबा किंचित गोंधळत म्हणाले

घटनाक्रम लक्षात आल्यावर तो चिडला. “मी वकीलाकडे जावून त्याचा सल्ला घेउन तुमच्या या खरेदीविक्रीच्या व्यवहारामध्ये काही अडचण निर्माण करेन किंवा बंगल्यावर हक्क सांगेन अशीच तुम्हाला भीती आहे ना?” त्याचा आवाज खूप शांत होता, पण मनात धुमस्त असलेला संताप त्याला स्वत:लाच जाणवत होता.  “हीच किंमत करता काय माझी?”

आई माझ्या  समोरून ताडकन उठली “जास्त बोलू नकोस. जगातल्या कुठल्याही वकीलाकडे जा किंवा तुझे गुंड मित्र घेवून ये, मी कुणालाही घाबरत नाही. या बंगल्यातली एक विट किंवा आलेल्या पैशंमधला एक रूपयासुध्दा तुला देणार नाही.”

“आजवर मी तुमच्याकडे कधी पैसे मागितलेत?”

“एजंटने या बंगल्याची आणि आजूबाजूच्या प्रॉपर्टीची किंमत दोन कोटी ठरवली आहे. किती! दोन कोटी. इतका पैसा पाहिलास तर तुझी नियत बदलेलसुध्दा तुझा काय भरवसा?”

“बाबा, आईला समजावून सांगा, मला पैसे नकोत. माझ्यापुरतं मी कमावून खातोय.” 

“हो ना, पण आयते मिळाले तर कोणाला नकोयत.”

“बाबा, आईला समजवा. माझ्या संयमाची फार परीक्षा घेउ नका. मी जगाच्या कुठल्याही कोप-यावरती असलो तरी माझ्यासाठी घर म्हणजे हे घरं! माझं अख्ख लहानपण हया घरात गेलयं. या घराबद्दल तुमची अनेक स्वप्न होती. हे घर गाजतं रहावं अशी तुमची इच्छा होती. माझ्याच एका चुकीमुळे निहाल हे जग सोडून गेला कबूल आहे मला. पण तरीही… आजही हे घर त्याचं आणि माझं आहे. आपल्या चौघांचं आहे. तुम्हांला हे घर विकून निहालसाठी फंड चालू करायचाय तर माझी काहीच हरकत नाही. हया घरावर किंवा हयाच्या पैशांवर मी कसलाही दावा सांगणार नाही. तुम्ही म्हणाल त्या कागदावर मी सही करेन. वाटल्यास गेल्या पाच वर्षांत कमावलेला माझा प्रत्येक रूपयाही मी या फंडसाठी देईन. पण प्लीज माझ्यावर इतके घाणेरडे दोषाआरोप करू नका.”

तिरीमिरीत उठून तो दाराबाहेर निघाला. पाठीमागून बाबा आवाज देत होते. पण काही न बोलता तो कारमध्ये बसला.

सुमारे दोन एक तास गावातल्या रस्त्यांवर असाच बेभान गाडी चालवत भटकत राहिला.

फोनची रिंग सतत वाजत राहिली, पण त्यानं तिकडे लक्ष दिलं नाही. दहा वाजता गावामधल्या एसटी स्टॅंडजवळच्या एका अतिशय साध्या हॉटेलमध्ये जाऊन  स्वस्तातली नॉन एसी रूम घेवून फ्रेश झाला. बरोबर अकरा वाजता तो कोर्टात पोचला. आई बाबा तिथंच बसले होते. निमिषने त्यांना पाहून न पाहिल्यासारखं केलं. मग वकीलानेच त्याच्यासमोर काही कागदपत्र ठेवली. काय आहे ते बघायचे कष्टही न घेता त्यानं दोन चार सहया करून त्या बंगल्यावरचा स्वत:चा हक्क सोडला.

निघताना त्याचे बाबा त्याला काहीतरी सांगत होते, पण त्याचं त्याकडे काही लक्ष नव्हतं. गावाबाहेर पडण्याआधी मात्र त्यानं कार बंगल्यासमोर आणली. दोन कोटी रूपये म्हणे. या जागेची, या वास्तूची किंमत दोन कोटी रूपये. पण, इथल्या आठवणींच काय त्याची किंमत कशी काढणार. त्याच्या नजरेसमोर  या बंगल्याच्या भूमीपूजनाचा दिवस उभा राहिला. आम्ही पहिली कि दुसरीला होतो. तेव्हा इथंल बांधकाम सुरू झालं. भूमीपूजनाचा मान अर्थात त्याचा आणि निहालचा. इवलारी कुदळ घेवून काढलेले त्यांचे फोटो इथंच आसपास घरात कुठेतरी असतील. सगळे फोटो कधीतरी एकदा शोधायला हवेत...

गाडी वळवून तो परत मुंबईच्या वाटेला लागला. पनवेलला पोहचला, तेव्हा रात्रीचे सात वाजले होते. सकाळपासून निव्वळ एक चहावर असूनही त्याला भूक लागली नव्हती.

पनवेलच्या आधी कितीतरी वेळ गाडी थांबवून तो हातातल्या मोबाईलकडे बघत राहिला. गेल्या महिन्यात झालेल्या त्या अचानक भेटीनंतर त्याने तिला फोनही केला नव्हता, आणि भेटलाही नव्हता.

तरीही त्याने अनिशाला मेसेज केला. मी अर्ध्या तासात येतोय चालेल?

तिचा लगेच रिप्लाय आला. “ओके. लवकर ये. जेवण्यासाठी तुझी वाट बघेन.” 

तो मेसेज वाचताना त्याचं मन भरून आलं. इतका वेळ चुकारमुकारपणे डोळयांमधून येणारे अश्रू आता मात्र कसल्याही बंधनांची पर्वा न करता सलग जुलैच्या पावसाळी रात्रीसारखे वाहत राहिले. आज त्याचं घर हरवलं होत.

पण त्याच वेळी कुणीतरी त्याची वाटही पाहात होतं.

आणि जिथं कुणी तुमची वाट पाहणार असतं तेच तुमचं घरं असतं. नाही का?

<<<<<<<<

दरवाजा उघडल्या उघडल्या ती थबकली. तो येतो म्हणाला होता, तरी येईलच असं तिला वाटलं नव्हतं. अजिबातच काहीच संपर्क न ठेवलेल्या निमिषकडून आज आलेला फोन अनपेक्षित होताच. त्याहून जास्त अनपेक्षित होतं त्याचं लगेच येणं.

तिनं दार उघडल्याक्षणी आपण इतक्या रात्री असे अचानक तिच्या घरी आलो याचा त्याला पश्चाताप झाला. मागच्या वेळी काहीही विचार न करता, तो थेट तिच्या घरी आला होता त्यावेळी त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते. आज त्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतानाही त्यानं इथं यायला हवं होतंच का?

“आत तरी ये” ती म्हणाली.

“दरवाजामधून बाजूला तरी हो” त्यासरशी तो म्हणाला. दोघांच्याही चेहर्‍यावर एकच स्माईल आलं. ती दारामधून मागे सरकली. तो घरात आला. मागच्यावेळेसारखा पसारा घरभर होताच, पण किमान आज घरभर लाईट लावलेले होते. खिडक्या उघड्या होत्या. घर जरा एक टक्का का होईना प्रसन्न वाटत होतं. समोर उभी असलेली अनिशाही किंचित बदलल्यासारखी. म्हणजे अंगामध्ये तो ढिगळ गाऊन होताच, पण किमान आता तो धुतलेला तरी वाटत होता.

“सामान कुठाय तुझं” तिनं विचारलं.

“सामान? म्हणजे?” त्याने दार बंद करत विचारलं.

“गावाला घरी गेला होतास ना?”

“एकच छोटी बॅग. कारमध्येच ठेवलीये.”

“मग आता फ्रेश कसा होशील? दुपारपासून ड्राईव्ह करतोयस, तर पटकन चेंज करून घे. तोवर मी जेवण ऑर्डर करेन. तुला नॉन व्हेज मध्ये काय हवंय ते माहित नव्हतं म्हणून मी ऑर्डर केलं नाही. नाहीतर….” ती भराभरा बोलत सुटली.

“अनी, ऐक! मी तुला असाच सहज कॉल केला होता. खूप दिवसांत आपण भेटलो नव्हतो किंवा फोनवर पण नीट बोलणं झालं नव्हतं म्हणून. डीनरचा प्लान करायलाच हवं असं काही नाही.” तिचा नर्व्हसनेस कमी करायला तो म्हणाला.

“ओह!” ती एकदम वरमली.

“किंवा आपण असं करू! पटकन तूच चेंज कर. कुठेतरी बाहेर डिनरला जाऊ! चालेल?” त्यानं बाजू किंचित सावरायचा प्रयत्न केला.

“नको.” ती अचानक म्हणाली. “त्यापेक्षा मी.. आपण.. आय मीन..”

“ठीक. मग तुझा पहिलाच प्लान परफेक्ट होता असं म्हणू. तुला जे हवं ते ऑर्डर कर. माझ्यासाठी फक्त दाल खिचडी. बाकी काही नको”

“ओके” तिने मोबाईल उचलला. स्पीड डायलवरून नंबर डायल करून तिनं दोन दाल खिचडीची ऑर्डर दिली. ऑर्डर देतानाच पलिकडच्याला “गरमागर्म भेजना वर्ना मै पेमेंट नै करेगी” वगैरे धमकी पण तिनं दिलेली ऐकून तो गालातल्या गालात हसला. ही काय कुणाला पैसे न देता राहील. बारावीत असताना  हिशोबात काहीतरी गल्लत झाली आणि दुकानदाराने हिला वीस रूपये जास्त दिले होते. रात्री साडेआठ वाजता अभूतपूर्व गोंधळ घातला होता. “उद्या सकाळी जाऊन पैसे परत येऊन देऊ” या तिच्या आईवडीलांच्या आणि निहालच्या समजावण्याला अजिबात बधली नव्हती.

अखेर त्यानं बाईक काढली, तिला दुकानात घेऊन गेला. ते जास्तीचे वीस रूपये परत दिले तेव्हा कुठं इतरांना सुटकेचा श्वास घेता आला.

बाथरूममध्ये जाऊन त्यानं तोंडावर पाणी मारलं. सवयीने डोळ्यावर चष्मा तसाच राहिला होता. तो ओला चष्मा काढून पुसत तो बाहेर आला तेव्हा अनिशा खिडकीजवळ उभी होती.

“चष्मा कधी लागला तुला?” तिनं अगदी सहजपणे विचारलं.

शिट! ही गोष्ट त्याच्या लक्षात आलीच नव्हती. गेल्या दोनेक वर्षांतच आलेला हा चष्मा. एरवी तो कायम कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यामुळे, चष्मा लावतच नाही.

“गेल्या दोन वर्षांत” त्याने परत चष्मा डोळ्यावर ठेवत उत्तर दिलं. तिनं एकवेळ पुन्हा त्याच्या चेहर्‍याकडे निरखून पाहिलं. “सेम निहाल दिसतोस” ती बोलून गेली.

तिच्या या वाक्यावर काय उत्तर द्यावं ते त्याल सुचेना. “चार्जर कुठाय?” म्हणत त्यानं वेळ मारून नेली.

“घरी सहज गेला होतास? काही काम होतं?” तिनं पुढचा प्रश्न विचारला.

“काही खास नाही. असंच आईनं बोलावलेलं?”

“कसे आहेत दोघे?”

“ठीक आहेत. तुझा काहीच टच नाहिये का?”

“अगदी सुरूवातीला थोडाफार होता. मग नंतर मी ही नोकरी पकडली. आईबाबा तयार नव्हते. इव्हन पूजाकाकी पण वैतागली होती. मला म्हणाली, तुला काय गरज आहे नोकरीची? आयुष्यभर तुझी जिम्मेदारी आम्ही घेऊ. मग ते वेगवेगळ्या मॅरेज पोर्टलवर रजिस्टर केलं. स्थळं बघायला पण लागले. माझ्यासाठी ते खूपच इरिटेटिंग होतं. आय मीन… “

“अनी, आय अ‍ॅम रीअली सॉरी, या दरम्यान मी तुझ्यासमोर येण्याची हिम्मत पण केली नाही. मला..”

“एका अर्थाने बरंच आहे ना? निमिष, अरे मला लोकं मनमोकळेपणानं बोलू पण देत नाहीत रे. निहाल आता या जगात नाही हे सत्य मला पक्कं ठाऊक होतं. तेव्हाच, त्याच रात्री. पण तरीही मला सतत त्याचे आजूबाजूला असल्याचे भास होत राहतात. हे नॉर्मल नाही हे मलाही माहित होतंच की. पण लोकांनी मला वेड लागल्यासारखंच ट्रीट करायला सुरूवात केली. म्हणजे, क्लीअर कट एकच सोल्युशन. आपण तिचं लग्न लावून देऊ, मग ती सेटल होईल. आपल्या संसारात आणी आपल्या घरात. मला थोडा वेळ हवा होता. मुक्तपणे माझं दु:ख मला सहन करण्यासाठी…. तोही मिळेना. म्हणून मग सरळ घर सोडून इकडे आले. नवीन नोकरी, नवीन घर, नवीन माणसं. आता कूठे गाडी रूळावर येतेय. प्रॉपर काऊंसिलिंग पण घेतेय. त्याचाही फायदा होतोय. म्हणजे भास जरा कमी झालेत. पूर्ण थांबले नाहीत. पण आता समजतं…. आता सुरूवातीला व्हायचा तितका त्रास होत नाहीये”

“अनी, यार! यातलं काहीच मला माहित नव्हतं. आईला जेव्हा तुझ्याबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, की तू युएसला निघून गेलीस… एका अर्थाने बरं पण आहे म्हणा. कदाचित तेव्हा तुला भेटलो असतो तर…”

“जर तरच्या गणितांना काहीच अर्थ नसतो निमिष!” ‘’तितक्यात दारावरची बेल वाजली. हॉटेलमधून ऑर्डर आली होती. त्यानंच दार उघडून पार्सल घेतलं. सवयीनुसार तो पैसे द्यायला गेला तेव्हा पाठीमागून अनिषाचा आवाज आला. “पाकिट ठेव खिशात. दादाचा आणि माझा महिन्याचा एकदम हिशोब असतो!”

पार्सल देताना समोरचा पंचवीस किलो वजनाचा ऐवज असलेला दादा सगळे दात दाखवत हसला. “दिदी, गर्मागर्म खिचडी लाये है, खा लो. फ्रीझ में रख के तीन दिन यही मत खाना”

तिनं पुढे येऊन त्याच्या हातून पार्सल घेतलं. किचनमध्ये जाऊन ताटं वाढायला घेतली.

हॉलमध्येच खुर्च्या ओढून दोघं जेवायला बसले. खिचडी चवीला बेफाट होती. त्याला केव्हाची भूक लागलेलीच होती, त्यामुळे काही न बोलता तो शांतपणे खात राहिला. ती ताटामधले दोन तीन घास तशीच चिवडत बसली होती.

त्यानं दुसर्‍यांदा खिचडी वाढून घेतली, तेव्हा अखेर तो तिला म्हणाला. “अगं, जेव ना.”

“जेवतेय की”

“व्यवस्थित पोटभर जेव. मी हावर्‍यासारखा मघापासून खात सुटलोय आणि तुझं एखाद घास खाणं चाललंय”

“मला आज फारशी भूक नाहीच आहे. पण तू पोटभर जेव. दुपारी घरून निघालास तेव्हा पूजाकाकीने डबा बांधून दिला नाही का?” ही त्याच्या आईची आवडती सवय होती. कुणी कुठे बाहेर निघालं की, दोन दिवस पुरेल इतका खाऊ बांधून द्यायची. निहालचं कॉलेज तर गावापासून तीन साडेतीन तासांच्या अंतरावर. घरून जेवून निघाला तरी वाटेत असूदेत म्हणून त्याच्यासोबत पराठे आणि चटणी द्यायची.

अर्थात हे सर्व निहालसाठीच होतं म्हणा. त्याच्यासाठी नाही.

पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी तराळलं.

तिच्या लक्षात न येऊ देता, त्यानं हलकेच डोळे पसले.

“काय झालंय निमिष? सांगशील मला?” तिनं मात्र ते बरोबर हेरलं होत.

अखेर बांध फुटल्यासारखा तो बोलत राहिला. गेल्या पाच वर्षात कधीच कुणाशी बोलला नव्हता इतकं. आपल्याच घरात परका झाल्याची भावना इतके दिवस फक्त तो बाळगून होता. आज ती त्याने कुणाला तरी बोलून दाखवली.

“पण हे रॉंग आहे. पूजाकाकी आणि अमितकाका असं कसं करू शकतात? तुझ्याच घरामध्ये? आणि हा निहालच्या नावाने ट्र्स्ट फंड चालू करायला घर कशाला विकलंय?”

“प्रॉपर्टीची किम्मत दोन करोड झालीये. त्यांना आता इतकं मोठं घर नकोय. मी काय येऊन राहणार नाही… आणि..”

“निहालच्या आणि तुझ्या आठवणी आहेत त्या घरामध्ये. घर हे नुसतं सिमेंट कॉन्क्रीट आणि दगडावाळूचं नसतं. आठवणी पण असतात आणि त्या जपायलाच हव्यात.”

“मला घर विकायचा किंवा ट्रस्ट फंड चालू करायचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण मला अचानक काही न सांगता, मी प्रॉपर्टीत हिस्से मागेन वगैरे बोललं ते जास्त हर्टींग होतं. एनीवेज…”

“मी बोलू का? पूजाकाकीशी?” तिनं दबकत विचारलं.

“अजिबात नको. तू आणि मी. मी तुझ्या समोर जरी आलोय असं तिला समजलं तरी ती माझा जीव घेईल. इन फॅक्ट, मला दर वेळेला विचारते. मी मरत का नाही एकदाचा!” तो सटकन बोलून गेला.

“निमिष!” ती ओरडली. “प्लीज असं बोलू नकोस. प्लीज! मरण म्हणजे जोक नसतो रे”

“हे तू मला सांगतेस? अनिषा, त्या रात्री तू आणि मी होतो. निहालसोबत. त्या रात्री फक्त माझ्या चुकीमुळे निहाल गेलाय. आईचा माझ्यावरचा राग एका परीने योग्य पण आहे म्हणा. तिचा गूड बॉय गेला. तेही माझ्यासारख्या बॅड बॉयमुळे. माझ्या चुकीमुळे”

अनीशाने हातातलं ताट नेऊन सिंकमध्ये ठेवलं आणी हात धुतले. किचनबाहेर ती आली तेव्हा, निमिषने चार्जिंगला लावलेला त्याचा मोबाईल काढून घेतला होता.

“येतो, अनीशा. खूप दिवसांनी तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून आलो. पण साला, आपलं आयुष्य एका विचित्र लूप होलमध्ये अडकलं आहे. कितीही दूर गेलो, तरी त्याचा विषय येणारच. आणि तुला त्रास होणारच.”

<<<<<<<<

“निमिश, इतकं लिहून झाल्याशिवाय तू इथून उठणार नाहीस. समजलं?”  निहालचा शांत तरी ठाम आवाज ऐकून अनिशाने मान वर करून पाहिलं. आज कधी  नव्हे ते तिघे एकत्र अभ्यासाला बसले होते. एरवी निहाल आणि अनिशा कायम एकत्रच अभ्यास करायचे. पण आज दहा मिनिटांपूर्वी काकींनी निमिषला  त्यांच्यासोबत अभ्यासाला पिटाळलं होतं. आधी बराचवेळ स्टडी टेबलाच्या एका बाजूला बसून त्याने पुस्तकामध्ये चित्र विचित्र आकृत्या काढल्या. नंतर थोडया वेळाने निहालने गणित सोडवण्यासाठी वापरलेल्या रफ कागदांच्या घडया घालून विमान आणि मोर बनविला. मग त्याला चहा हवा झाला. काकींनी चहाएवजी दोन चार फटके देण्याची ऑफर दिल्यावर परत निमूटपणे येऊन तो टेबलावर बसला होता.

कॉलेजला दिवाळीची सुट्टी लागली होती. निहालचं बारावीचं वर्ष म्हणून तो तसाही दिवसामधून आठ ते दहा तास अभ्यास सहज करत होता. दुपारच्या वेळी स्वयंपाक घरातल्या डायनिंग टेबलवर बसून आम्ही जर्नल पूर्ण करीत बसलो होतो. बाहेर ऑक्टोबर हिटने हैराण केलं होतं. त्यात आई आणि काकींनी मिळून सकाळभर करंज्या तळल्या होत्या. किचनमध्ये अजूनही तो करंजीचा गोडसर वास पसरून राहिला होता. अनिषाच्या जर्नलमधल्या फक्त आकृत्या काढायचं शिल्लक होतं.

“निहाल, तुझा अभ्यास झाला की, प्लीज मला या आकृत्या काढून देना.” तिनं त्याच्याकडे भुणभुण लावली.

“तुझ्या तू काढ ना, परीक्षेमध्ये काय मी येणार आहे?” त्यानं मान पण वर न करता उत्तर दिलं.

“अरे, मी बेडूक काढला तरी तो शहामृगासारखा दिसतो त्यामुळे प्लीज”

हे बोलणं होईपर्यंत निमिषने तिच्यासमोरचं जर्नल ओढून घेतलं आणि आकृत्या काढायला सुरूवात केली. जेमतेम दोन की तीन आकृत्या काडःऊन झाल्यावर त्याला तहान लागली म्हणून तो जागचा उठला. लगेच निहालने त्याच्याकडे भुवई वर करून पाहिलं.

“पाण्यासाठी तहानलेल्या व्याकुळ जीवाला तू का सतावतोयस?”

“ड्रामेबाजी बंद कर आणि होमवर्क पूर्ण कर. त्या अनिशाकडे बघ!! मुलगी असूनही किती वेळ न बोलता शांत वाचत बसली आहे.”

लगोलग अनिषाने पुस्तकांतून मान वर काढली. “मुलगी असूनही म्हणजे काय?”

“अगं म्हणजे, वर्गातल्या मुली कशा उगाचच इकडे तिकडे बागडत असतात, बोलत असतात. पण तू मात्र अभ्यासाला बसलीस की अजिबात बोलत नाहीस.”  निहाल तिला समजावत म्हणाला.

“म्हणजे तू बोरिंग आहेस. काय? बोरिंग” हातातली वही फाटकन् मिटत निमिष म्हणाला.

“तू मला बोअरिंग म्हणालास? मी निहालला विचारलं.

“नाही गं राणी मी असंच आपलं.” परत पुस्तकामध्ये मान खाली घातलेला निहाल पटकन बोलून गेला. तिचा स्वत:च्या कानांवर विश्वासच बसत नव्हता.

“रा . . णी” तिनं विचारलं. आता मात्र निमिशला हसू आवरत नव्हतं तिनं हातातल्या पुस्तकाचा फटका त्याच्या हातावर मारला. पण नेमकेपणाने त्याने तेवढयात हात उचलला आणि तिचं पुस्तक टेबलावर धाडकन आपटलं.

“काय रे निमिष? अभ्यासाची पुस्तकं घेउन आदळआपट कशाला करतोयस?” आतून पूजाकाकीचा आवाज आला.

“मी नाही गं, ही तुझी लाडकी अनिशा” त्यानं लगेच ओरडून उत्तर दिलं.

तिनं टेबलाखालून निमिषला जोरात पाय मारला. पण निमिष ऐवजी आई गं करून ओरडला ते मात्र निहाल. हे पाहून निमिषला आता मात्र हसू आवरेना. आतमधून परत एकदा काकींचा आवाज आला. “निमिष, आता धपाटे घालेन हां. ते दोघं सिन्सीअरली अभ्यास करतायत तर त्रास देऊ नकोस”

“आई, मस्ती ते दोघं करताहेत त्यांना बोल की, सारखं आपलं माझ्याच नावाचा उध्दार! मरेनात का तो अभ्यास.” इतका वेळ हसत खेळत बसलेला निमिष आता मात्र ताडकन खुर्चीवरून उठला. खुर्चीच्या बाजूला ठेवलेले दप्तर खसक करून ओढलं आणि त्यात टेबलावरची पुस्तक भरायला सुरूवात केली.

“निमिष, तू काय चालवलंयस?” निहालने विचारलं

तो काही न बोलता दप्तरात पुस्तक कोंबत होता. त्या कोंबाकोंबीत त्याच्या दप्तराची झोप उघडली आणि त्यामधून गुटख्याची दोन तीन पाकीटे बाहेर आली.

“निमिष, हे तुझ्याकडे कसं काय आलं?” ते चंदेरी पाकिट उचलत निहाल म्हणाला.

“माझं नाहीए ते मित्राचं आहे.” निमिषने पाकिट हिसकावून परत दप्तरामध्ये कोंबलं.

“खोटं बोलू नकोस.” निहाल शांतपणे म्हणाला. 

“निमिष, फेकून दे ते. चांगली सवय नाहीय.” अनीशा समजावणीच्या स्वरात म्हणाली. 

“तुला काय करायचंय? एकदा सांगितलंय नां मित्राच आहे. त्यानं लपवायला माझ्या दप्तरात ठेवलंय त्याच्या घरी मिळाल तर मार बसेल म्हणून.” निमिष तिच्यावर एकदम वसकला.

“नीट बोल, आणि ही तुझ्या घरी  मिळाली तर तुझा काही जाहिर सत्कार होणार आहे?”  निहालने विचारलं.

“जा ना जा!! आईला जाउन सांग. तू मम्माचा गुड बाॅय आहेस ना? ताबडतोब तिला जाऊन सांग. मग ती तुला शाब्बासकी देईल आणि माझी गाढवावरून धिंड काढेल. हेच तर तुला हवंय ना.?” निमिष पाठीला दप्तर लावत म्हणाला.

“वाटेल ते बोलू नकोस! निमिष, ही सवय चांगली नाही. दात किडतील, तोंडाला घाण वास येइल.” अनीशा पुन्हा त्याला समजावत म्हणाली.

“येऊ देत ना आम्ही काही स्कॉलर विद्वान नव्हे की, आमची गर्लफेंड असेल आणि ती आम्हाला किस करेल.”

यावर अनिशा आणि निहालने काही बोलण्याआधी तो दप्तर घेउन स्वयंपाक घराच्या मागच्या दाराने बाहेर पडला देखील होता.

*****

हातामधली सिगरेट त्यानं न पेटवताच परत ठेऊन दिली. दारामध्ये चावी फिरल्याचा आवाज झाला पण तो जागचा उठला नाही. दार लोटून निलम आत आली तरी तो अंधारात तसाच बसून होता.

“काय रे!, असा का बसलायस?” निलमने दिवा लावत विचारलं. तिच्या त्या हाकेबरोबर तो भानावर आला.

“तू कधी आलीस?” त्याने विचारलं.

“हे काय आता जस्ट येतेच तर आहे.”, निलम म्हणाली, “आज नं, शूट खूप वेळ चालू राहिलं. पार कंटाळा आला. कधी एकदा घरी येते असं मला झालं होतं. तू जेवलायस का?” पण तिच्या या बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हतंच.

“काय? काय म्हणालीस?”

“अरे मी विचारलं तू जेवलायस का? तसे अकरा वाजून गेलेत तरी ही तुझ जेवण झालं नसेल तर मी काय तरी बनवते. नाही तर मॅगी करून खाते.”

“फ्रीजमध्ये मी आणलेला पुलाव असेल बघ.” तो परत खिडकीबाहेर बघत म्हणाला.

तिच्या बोलण्याकडे त्याचं खरंच लक्ष नव्हतं. खरं तर तिनं संध्याकाळीच फोन करून आज येऊ का? विचारलं होतं. पण तो हो का म्हणाला हे मात्र त्याला माहित नव्हतं. पण आता रात्री साडेबारा वाजता निलम त्याच्या घरात आली होती. थोड्याच वेळात निलम फ्रेश होवून आली. येताना तिने स्वतःसाठी पुलाव आणि माझ्यासाठी एक चिल्ड बियर आणली होती.”

“किती वेळचा बसलायस इथे. कसला विचार करतोयस?”, तिनं विचारलं. थंड बियरचा एक घोट घेतला. खरं तर तो गेले तासभर कसला विचार करत होता हे त्यालाही आठवत नव्हतं. तो काही तरी बोलेल म्हणून अपेक्षेने निलम त्याच्याकडे पहात होती. मायक्रोव्हेवमध्ये गरम केलेला पुलाव चमच्याने चिवडत ती बसली होती. त्याचं लक्ष तिच्या प्लेटकडे गेलेलं बघताच ती एकदम बावरली.

“झालंच! पाच मिनिटात जेवून घेते. देन आय विल् बी रेडी.” ती त्याला म्हणाली. तो हॉटेलमधनं आणलेला भात कदाचित तिला आवडलेला नसावा.

“चांगला लागत नाही का? नको असेल तर ठेवून दे आणि मॅगी बनवून खा.” तो म्हणाला.

“नाही, ठीक आहे. आय विल मॅनेज.”

अचानक त्याला जाणवलं. इतकी वर्षं त्याच्या घरी येत असूनही निलम आजही स्वतःला परकीच समजते. त्यानं बियर टेबलवर ठेवली आणि किचनमध्ये गेला. ओटया खालच्या ट्रॉलीमध्ये किरणामालाच्या दुकानात असतात तशा मॅगीच्या माळा भरून ठेवलेलया होत्या. त्यापैकी एक पॅकेट काढून त्यानं शिजवायला ठेवली. त्याच्या मागोमाग निलम आत आली.

“अरे खरंच कशाला? मी भात संपवेन ना”. ती म्हणाली.

“चवीला फार ग्रेट नाहीए. तू खाऊन घे. तोपर्यंत मी जरा पुस्तक वाचत पडतो.” तो तुटकपणे म्हणाला.

दहा बारा मिनिटानंतर निलम जेव्हा त्याच्या बेडरूममध्ये आली तेव्हा तो खरंच रिडरवर पुस्तक वाचत पडला होता. डोळ्यावर प्रचंड झोप तर होतीच, पण निलमने आता  क्रीम कलरची पातळ झिरझिरीत नाईटी घातलेली होती. शॉवर घेतल्यानंतर तिचे एरव्ही सरळ असणारे केस आता किंचित कुरळे झाले होते. तिच्या गोल सटोल चेहर्‍यावर हा कुरळेपणा बेहद्द खुबसुरत दिसत होता. ओठांवरच्या त्या किंचित हसणार्‍या स्मितासह एक एक पाउल शांतपणे टाकत ती त्याच्याजवळ आली. त्याच्या हातातला रिडर तिने काढून नाईट स्टॅण्डवर ठेवला.

त्याच्या केसांमधून हात फिरवत तिनं त्याचा चेहरा जवळ घेतला आणि ओठांवर ओठ ठेवले.

नीलम त्याच्या घराला कितीही परकं मानत असली तरी त्याला मात्र ती अजिबात परकं मानत नाही.

त्यानं निलमला ओढून मिठीत घेतलं आणि स्वत:च्या दातांनी तिचा खालचा ओठ किंचित चावला त्याबरोबर तिच्या तोंडून एक नाराजीचा एक सूर बाहेर पडला. त्यानं पुन्हा एकदा तिचा ओठ तसाच चावला मात्र यावेळी तिच्या डाव्या दंडात त्याची पाचही बोटंही रूतवली.

सेक्सचा खेळ आता रंगात आला होता.

गेले दोन दिवस मनामध्ये सतत येणारे अनिशाचे विचार आणि आठवणी जर विसरायच्या असतील तर कदाचित हेच कामी येऊ शकेल.

रात्री दोन अडीचच्या सुमारास त्याला जाग आली. त्याच्या मिठीमध्ये निलम तशीच अंगावर एक कपडा न घालता पहूडलेली होती. त्यानं नाईट स्टॅंडवरचा त्याचा मोबाईल उचलला. व्हॉट्सॅप वर मेसेजेस स्क्रोल करत असताना अचानक त्याला अनिशाचं नाव दिसलं. त्याखाली बारीक अक्षरामध्ये ऑनलाईन!

कसलाही विचार न करता त्यानं ताबडतोब तिचा नंबर डायल केला.




(क्रमश:)

नंदिनी देसाई

3 comments:

  1. नमस्कार, आमच्या येत्या दिवाळी अंकासाठी लेख अगर कथा पाठवता येईल का? अभिप्राय कळवावा. नियमावली ची लिंक खालील प्रमाणे आहे.
    https://www.marathicultureandfestivals.com/invitation-diwali-2021

    ReplyDelete
  2. माझा इमेल: kokatayash@gmail.com

    ReplyDelete
  3. Please upload 5th part of the story.

    ReplyDelete