Thursday 7 September 2017

शब्द २

पुन्हा एकदा... शब्द!!!

धाडकन दरवाजा आपटला आणि मी घराबाहेर पडले. डोळ्यातलं पाणी पुसत पुसत लिफ्टकडे आले. अकराव्या मजल्यावर लिफ्ट होती.. आणि खाली यायला तयार नव्हती. तेवढ्यात एशान पाठून आला..

"तू जरा प्लीज माझं ऐकून घेशील का?" मी पाठी वळून पण पाहिलं नाही. त्याने येऊन चक्क माझा दंड धरला.
"शान प्लीज, इथे लॉबीत तमाशा करू नकोस. मला जाऊ दे."

"तू घरात चल. काय बोलायचय ते तिथे बोलू या. समजलं?"

"शान, माझी काहीही बोलायची आणि ऐकायची तयारी नाही, खूप ऐकून घेतलं आजच्या दिवसांत"

तेवढ्यात लिफ्ट आली. "तू कुठेही जात नाहियेस. मला सोडून!! समजलं?" एशानने लिफ्टचा दरवाजा बंद केला आणि तो घरामधे निघून गेला.  मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. बोलायचं एक आणि करायचं भलतंच ही त्याची खूप दिवसापासूनची सवय.

मी सरळ ग्राऊंडचं बटण दाबलं. खूप वैताग आला होता. परत एक हुंदका दाटून आला. पण मी रडले नाही. एशान घरी परत गेला तर जाऊ देत. मी माझं पुरेसं सामान भरून घेतलं होतं. पैसे पण होते. सकाळचे नऊ साडेनऊ वाजले होते. इथून वाशी ब्रिजला जायचं. तिथून पनवेल आणि मिळेल ती गाडी पकडून जायचं. आपल्या स्वतःच्या घरी. लिफ्टमधून बाहेर पडले. दरवाज्यात एशान उभा. सोसायटीच्या बिल्डिंगला दोन लिफ्ट.
"कुठे चाललीयेस?"
"मसणात. तुला काही प्रॉब्लेम?"
"ओके.. पावसाळ्याचे दिवस आहेत. छत्री घेऊन जा." त्याने माझ्या हातात ती छत्री जवळ जवळ कोंबलीच. मी तरातरा निघून चालायला लागले. समजतो काय हा माणूस स्वतःला? काल रात्रभर हा माझ्याशी भांडत होता.. तुझं आणि माझं लग्न ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे असं म्हणाला. आणि आता मी घर सोडून माहेरी चाललेय. तर याला काळजी कसली तर छत्रीची!!!

सोसायटीच्या बाहेर रिक्षा पकडली आणि तडक वाशी ब्रिज गाठलं. दोन की तिन मिनिटे झाली असतील.. एशान माझ्या बाजूला उभा होता. "आज गर्दी फार आहे ना?"
"शान???तू काय करतोयस?? प्लीज असा माझा पाठलाग करणं सोड."

"मॅडम, मी एका अमावस्येला तुमचा हात हातात धरून तुम्हाला शब्द दिला होता. की तुला कधीच सोडणार नाही.. मग मी हा शब्द का मोडू?? तेही आत्ताच? जहां जाईयेगा, हमे पाईयेगा"

शान अगदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होता. ही त्याची ती जीवघेणी नजर. या नजरेने त्याने एखाद्याला शिर जरी मागितलं तरी तो क्षणात धडावेगळं करून देइल इतकी जादुई नजर. क्षणभर मी त्याच्या नजरेत हरवले... पण क्षणभरच.. माझं मन लगेच मला ताळ्यावर घेऊन आलं. बाई, हाच तो माणूस ज्याने तुझ्या आयुष्याची इतकी वाट लावली. याच्यासाठी काय काय केलं नाही मी... तरीही आज हा म्हणतो की आपलं लग्न ही एक चूक होती.
मी त्याच्या हातातून हात सोडवून घेतला. समोरून पनवेल बस येत होती. कसलाही विचार न करता मी त्या बसमधे चढले. एशान अजून तिथेच उभा होता. माझ्याकडे बघत आणि चक्क गालातल्या गालात हसत!!!

काय माणूस आहे हा?? माझ्या संतापाची जागा आता हताशेने घेतली. बस निघाली तरी मी मागे वळून बघतच होते. पाठोपाठ आलेल्या दुसर्‍या बसमधे एशान चढला. म्हणजे पाठलाग अजून चालूच होता....

माझं आणि एशानचं लग्न होऊन जवळ जवळ दोन वर्षे झाली होती. आमचा प्रेमविवाह. एशानला मी कॉलेजात असल्यापासून ओळखते. मी मराठी ब्राह्मण तर तो सिंधी. अर्थात घरून विरोध होताच पण तरी आम्ही लग्न केलं. माझ्या इच्छेप्रमाणे रजिस्टर लग्न केलं. मला ते टिपिकल सिंधी भपकेबाजपणा, ते पैसे उधळणं नको हवं होतं. लग्नानंतर दोघाचे सुरूवातीचे काही दिवस खूप सुखात गेले. दोघांचं फिरणं, भटकणं चालूच होतं एशानची स्वतःची अ‍ॅड एजन्सी होती, त्यामुळे पैशाचा पण काही प्रश्न नव्हता. पण तरी का कुणास ठाऊक.. दोघांमधे कुरबुरी चालू झाल्या होत्या. सुरूवातीला अगदी छोट्याशा वादातून हळू हळू भांडणापर्यंत!!! रोज संध्याकाळी ऑफिस संपवून घरी जायला नकोसं वाटायचं. रोज रोजची कटकट मिटवण्याचा आम्ही दोघानी खूप प्रयत्न केला. पण कधी त्याचा तोल जायचा तर कधी माझा. परत येरे माझ्या मागल्या. 

काल रात्री मात्र या भांडणाने अगदी टोकच गाठलं. कधी नव्हे ते एशान खूप भडकला. मला नाही नाही ते बोलला. मी पण त्याला उलट उत्तरं दिलीच.. नाही असं नाही.. पण तरी पहाटे पहाटे माझा निर्णय झाला होता. मी घरी चालले होते. आता मला एशानसोबत एक क्षण रहायचं नव्हतं. बहुतेक त्याला त्याच्या चुकीची जाणीव झालेली असावी म्हणून तो इतका माझ्या पाठून येत होता.

येऊदेत.. मला नाही आता त्याची काळजी. कधीतरी त्याला बायकोची किंमत समजायलाच हवी ना.

पनवेल एस टी स्टँडला उतरून मी रत्नागिरीच्या गाड्या लागतात त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन थांबले. दहा वाजले होते. एखादी एस टी आली की त्यात चढायचं.. सू देत त्या एशानला मला शोधत. मी कुठे जातेय याचा आता त्याला बहुतेक अंदाज आलेलाच असणार. पण तरीही...

"पाणी??" एशान बाजूला उभा होता. हातात पाण्याची बाटली. मला तहान लागलेलीच होती. म्हणून मी पाणी घेतलं.

"एस टीची वाट बघतेयस का?" हा प्रश्न एशानने इतर कधी विचारला असता तर हातातली पाण्याची बाटली त्याच्या डोक्यावर उपडली असती... पण आता मी लक्ष दिलं नाही.

मुद्दम इकडे तिकडे बघत राहिले. स्टँडवर प्रचंड गर्दी होती. प्रचंड म्हणजे कायच्याकाय!! इतकी गर्दी मी पनवेलला कधी पाहिलीच नव्हती. का बरं इतकी गर्दी असेल? बाया बापड्या, पोरं बाळं आणि सामान सुमान... बोचकीगाठोडी....

परत एकदा अख्ख्या स्टँडवरून नजर फिरवली. कुंभच्या मेळ्याला असते तशी गर्दी दिसत होती. एस्टीच्या बसेस तुडुंब भरलेल्या दिसत होत्या. कित्येक तर ओसंडून वाहत होत्या. अचानक कुणाच्या तरी सामानामधे एलेक्ट्रिक लाईटची एक माळ दिसली आणि माझी ट्युबलाईट पेटली.

उद्या गणपती येणार.. अख्ख्या मुंबईतले जितके चाकरमानी असतील ते सगळे कोकणात जाणार. एस्टी रीझर्वेशन फुल्ल. रेलवे फुल्ल, ज्यादा आरक्षित गाड्या फुल्ल, प्रायव्हेट गाड्या फुल्ल..

आणि या सगळ्यामधे मी एक एफ डबल ओ एल फुल्ल. नवर्‍याशी भांडून एसटीने माहेरी जायला निघालेय!!
ते रामायण महाभारत सीरीयलमधे जसं स्पेशल एफेक्ट्स म्हणून तारे पडतात, तसं काहीसं माझ्या डोळ्यासमोर व्हायला लागलं. एकताताईच्या सीरीयलसारखं हात कानावर ठेवून "नहीSSSS" असं ओरडावंसं वाटलं.

"ऑफिसला फोन करून सांग आज तू येणार नाहीस म्हणून.." माझ्या बाजूला उभा असलेला माझा हीरो.

मी काकुळत्या का काय म्हणतात तशा नजरेने त्याच्याकडे पाह्यलं.

"गणपती.." कसा बसा एकच शब्द मी उच्चारला.

"कुठाय?"

"अरे, उद्या गणपती आहे. खूप गर्दी आहे."

" ओह.. आत्ता आठवलं का तुला?? तुमच्याकडे पण असतो ना पाच दिवस.. अच्छा, म्हणून तू घरी निघालीस का?? मग सांगायचं ना तसं... कारने गेलो असतो की.. चल परत जाऊ या!! "

आईशप्पथ!! एकच क्षण माझ्या मनात विचार येऊन गेला की सरळ घरी जावं. पण एशानचे हे नेहमीचं असंच कुत्सित बोलणं. कायम माझा मजाक उडवणं. आता मात्र हद्द झाली. गर्दी असो वा नसो. गणपती असो वा शिमगा. मी आता घरी जाणारच.

खड्ड्यात जाऊदेत या एशानला. काही गरज नाही मला!!!

मी येणार्‍या प्रत्येक एस्टीकडे आशाळभूत नजरेने बघायला लागले. जळलं मेलं एक एस टी थोडी रिकामी येइना!!!
अर्धा पाऊण तास असाच गेला. आजूबाजूचे कित्येक लोक आमच्या अजब जोडीकडे पाहत होते. मी किमान सलवार सूट घातला होता. पण एशान.. चक्क बर्मुडावर आणि घरातल्याच टीशर्टवर!! दोघाकडे मिळून एक सॅक आणि एक पाण्याची बाटली. मला खरंतर खूप भूक लागली होती.
काल रात्री ऑफिसमधून यायला उशीर झाला. आल्यावर कूकर लावला आणी जेवणाची तयारी केली. पण त्याआधीच शानची बडबड चालू झालेली.
"रोज रोज काय उशीर करतेस?" एकतर माझी नोकरी नविन, त्यातून खडूस बॉस नशिबात. थोडे दिवस जरा मदत केली तर काय बिघडतं याचं. सगळा स्वयंपाक स्वतःला करता येतो. माझं लग्न झालं तेव्हा मला एक मॅगी आणि चहा सोडल्यास काहीही येत नव्हतं. आताही फार काही करता येतं अशातला भाग नाही.. उशीर झालाच  होता, शिवाय स्वयंपाकवाली मावशीनं दांडी मारलेली. एरवी एशान अशावेळी स्वत:हून काहीतरी बनवतो, पण आज काय धाड भरली होती कुणास ठाऊक...
माझापण पट्टा चालू झाला, आणि जेवण राहिलंच बाजूला!! वादाला वाद, आणि शब्दाला शब्द वाढतच गेला. रात्रभर भांडण. एकमेकाची अक्कल, एकमेकाचं घराणं, एकमेकाची जात, शिक्षण सगळं सगळं काढून झालं. पहाटे कधीतरी एशान झोपला. मला झोप आलीच नाही. घर सोडून जायचं हा निर्णय मी पक्का केला. सकाळी अंघोळ वगैरे आवरली. एक कप दूध प्यायले आणि घराबाहेर पडले. एशान इतका डाराडूर झोपला होता की त्याला मी घरातून निघून गेलेले समजले पण नसतं.

पण निघताना मलाच काय वाटलं कुणास ठाऊक... हलकेच त्याच्या केसावरून हात फिरवला, अगदी रहावलं नाही म्हणून.

आणि.. एशानला जाग आली. हरदासाची कथा परत चालू. कुठे निघालीस? का निघालीस? घर सोडून जायचं नाही!! मला अडवणारा तू कोण? मी माझ्या घरी निघाले? मग हे घर कुणाचं??? इत्यादि इत्यादि इत्यादि..

शेवटी मी घर सोडून निघाले खरी. पण हे लटांबर अजून माझ्यासोबतच होतं.

"काय पीडा आहे माझ्यामागे" मी जोरात म्हटलं.
"पेढा??तुला पेढा हवाय? गणपतीला न्यायला?"
हे राम!!!! का का मी या माणसाशी लग्न केलं???

वैतागून मी एस्टी कंट्रोलरकडे गेले. मुंबईवरून येणार्‍या गाड्या भरलेल्या होत्या, पण एखादी पनवेलवरून सुटणारी गाडी आहे का विचारायला. गाडी होती साडेबाराला. आणि पूर्णपणे आरक्षित.

"चिपळूणपर्यंत स्टँडिंग जावे लागेल"
"दुसरा काही मार्ग?" मी त्याला विचारलं. बहुतेक त्याला माझी दया वगैरे आली असावी.
"मुली एक काम कर, पेणला दर दहा मिनिटानी गाड्या सुटतायत. ती पकड आणि पेणवरून काही साधन मिळतय का बघ"

हा उपाय चांगला होता. पेणच्या गाड्याना गर्दी होती. पण सतत गाड्या असल्याने किमान बसायला जागा तरी मिळाली असती. मी पेणच्या गाडीकडे निघाले. पाठोपाठ एशान. छे!! आता याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा.
"शान प्लीज, मी घरी जातेय. मला जाऊदे. माझं आणि तुझं दोघाचंही डोकं फिरलय. घरी गेले तर जरा शांत होईन. मी थोड्या दिवसानी परत येइन, मग आपण शांतपणे अगदी शांतपणे.. या सर्व विषयावर चर्चा करू. वाटल्यास तुझ्या मम्मी डॅडीशी पण बोलू. मग काय तो मार्ग काढू. आत्ता असा विनाकारण त्रास देऊ नकोस. घरी जा. प्लीज" शान हसला. अगदी लहान मुलं असतात ना तस्सा!!
"हे बघ, मी तुला असं एकटं सोडणार नाही. तुझं किंवा माझं डोकं कितीही फिरलेलं असलं तरीपण! मी तुझ्याबरोबर येणार. आपल्याला जी काय चर्चा करायची आहे, ती आपण नंतर करू. वाटल्यास परत परत भांडूही पण तू अशी मला सोडून तुझ्या घरी निघून गेलेली मला चालणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुझ्या माहेरी सणाच्या दिवशी तू एकटी गेलेली कुणालाच आवडणार नाही. जाम टोमणे बसतील"

मी तशीच शांत उभी राहिले. मी अशी तडकाफडकी निघून आलेली बघून  घरचे थोडेतरी गडबडले असते, पण मी आधीच विचार केला होता. तोही येणार होता पण अचानक काहीतरी काम निघालं. वगैरे काहीतरी सांगून वेळ मारली असती.

"गेली" शान म्हणाला.

"काय"
"पेणची एसटी गेली. आता १० मिनिटं निवांत."

मी शांतपणे एका बाकावर जाऊन बसले. शान माझ्यासोबत घरापर्यंत येणार यात काही वाद नव्हता. आता मला आमच्या भांडणापेक्षा जास्त व्यवहारी विचार डोक्यात नाचायला लागले. गणपती असल्यामुळे घरी आलोय, हे कारण परफेक्ट होतं पण जावयाचं सामान काहीच सोबत नाही.. जरी हरवलं असं सांगितलं तरी जावई चड्डीमधे घरी आलाय??? घरातल्या एकेकाचे चेहरे इंमॅजिन करायला लागले मी. आज्जी आजोब, आई बाबा..ताई.. आगीतून सुटून फुफाट्यात अशी अवस्था!!

तेवढ्यात पेणची अजून एक एस्टी लागली. मी आणि एशान चढलो. अर्थात मी एशानकडे अजिब्बात लक्ष दिलं नाही. जणू काही हा माणूस माझ्यासोबत नाहीच आहे. असा माझा एकंदर भाव होता.

नशिबाने मला खिडकीची जागा मिळाली. आणि त्याच नशिबान बाजूला एशान पण दिला.

तितक्यात पाऊस चालू झाला. श्रावण भादव्याचा पाऊस. थोडासा पडणार आणि थोडा लपणार. काल रात्रीपासून अजिबात पाऊस नव्हता आता मात्र अचानक पावसाचे वातावरण तयार झाले होते. स्टँडवरून बाहेर आल्यावर ट्रॅफिक जाम होताच. पनवेलच्या या रस्त्यावर रात्री दोन वाजता पण ट्रॅफिक जाम असणार याची मला पूर्ण खात्री आहे.

पण गाडीने पनवेल सोडल्यावर खूप बरं वाटलं. पाऊस थांबला होता पण ऊन नव्हतं. छान वारा सुटला होता. मस्तपैकी बाहेर हिरवं हिरवं दिसत होतं. भाताची शेती, रस्ताभर उगवलेलं गवत, त्या रानगवताची ती इवलालीशी रंगीबेरंगी फुलं. सगळं वातावरणच कसं अगदी रोमँटिक वाटत होतं. रात्रभराचं जागरण होतंच. वर इतका छान वारा. झोपूनच गेले मी!!

ड्रायव्हरमामाला मला उठवावंसं वाटलं बहुतेक. हायवेवरून जिथे पेणला गाडी वळते तिथे त्याने कच्चकन ब्रेक दाबला. आणि मी जागी झाले.
'एशान मोबाईलवर गेम खेळत होता. माझं तिकिट पण बहुतेक त्यानेच काढलं असावं.

"पेण आलं, आपण इथे जेवू या. मला भूक लागलिये." तो मोबाईलवरून नजर न हटवता म्हणाला. मी काहीच बोलले नाही. भूक तर मला पण लागली होतीच, त्यानं तर ब्रेकफास्ट पण केला नाही.

"तुझ्याकडे पैसे किती आहेत?" त्यानं मला विचारलं.
"असतील पाच सहाशे रूपये. पर्समधे होते तितकेच घेतले मी"
"माझ्याकडे दोन अडीच असतील."
"शान, एवढे पुरतील आपल्याला?" घर गाठायचं तर पाचशे रूपये लागले असते, शिवाय जेवण वगैरे म्हणजे अजून तीनशे रूपये. आणि परत येताना?? तसं एटीएम कार्ड होतं.. पण तरी मला हातात कॅश पैसे नसले की अस्वस्थ व्हायला होतं. बॅन्केत किती का असेनात.. हातात नोटा पाहिजेत. शानने मोबाईल खिशात ठेवला.
"मॅडम, माझ्याकडे दोन अडीच हजार रूपये आहेत, शिवाय तुझं आणि माझं दोघाचंही कार्ड आहे."

मी चमकून त्याच्याकडे पाह्यलं.
"ओह येस, तुझं कार्ड तू घरात विसरली होतीस, नशिबाने मी तुला लिफ्टमधे सोडून घर लॉक करायला म्हणून परत आलो, तेव्हा मी चेक केलं. कार्ड, छत्री, चष्मा बरंच काही विसरली होतीस" तो गालातल्या गालात हसत होता.

मी खिडकीतून बाहेर बघायला लागले.
"तुला समजलं होतं की मी कुठे जातेय ते?" मी विचारलं.
"नोप. मला वाटलं की तू माझ्या मॉमकडे जाशील. पनवेलची बस पकडली तेव्हा लक्षात आलं की तू तुझ्या घरी जातेयस. हरकत नाही. खूप दिवस झाले आपण तुझ्या घरी गेलोच नव्हतो. ते लोकं पण खुश होतील.  दिवाळीला येणारा जावई गणपतीला आला म्हणून."

माझ्या नकळत मी हसले. दोन वर्षापूर्वी मी दिवाळीच्या पहाटे एशानला घरी घेऊन गेले होते. भावी जावई अशी ओळख करून द्यायला! घरामध्ये काय गहजब उडाल होता.. दिवाळी कसली??? शिमगा साजरा झाला होता. अर्थात नंतर त्यानी लग्न लावून दिलं. पण तरी मनातून कुठेतरी नाराज होतेच. एशानच्या स्वभावामुळे आता गेल्या काही दिवसात वातावरण निवळलं होतं.
"शान, चांगला चान्स आहे, आज माझ्या आईवडिलाना सांगून टाक."
"काय?"
"माझ्याशी लग्न करणं ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती."
"कोण म्हणालं??"
"तूच. काल रात्री नाही का म्हणालास!!" नकळत माझा आवाज चढला. कालचा संताप. कालचं भांडण सगळं आठवायला लागलं.
"मग मी चुकीचं काय म्हटलं?" मी काहीतरी बोलणार होते ते विसरूनच गेले!! नालायक माणूस. हलकटपणे मलाच विचारतो काय चुकलं म्हणून. या माणसासाठी मी माझं घर सोडून आले होते ना??? आणि हाच मला हे ऐकवत होता.

"मग आता माझ्या पाठून कशाला येतोस? जा ना... तुझी चूक निस्तर. डिवोर्स मी. मी काही तुझ्या पाठी लागून लग्न केलय नाही! तू पाठी लागला होतास माझ्या. तू मला प्रपोज केलं होतंस. तुझ्यामुळे माझ्या लाईफमधे इतके प्रॉब्लेम्स आहेत. तुझ्यामुळे..... "

पुढे अजून बरंच काही बोलणार होते मी. तितक्यात एस्टी स्टँडमधे शिरली. आणि मला गप्प बसावं लागलं.

स्टँडच्या जवळचं एक छोटंसं उडुप्याचं हॉटेल होतं. तिथं जाऊन त्या स्पेशल पंजाबी थाळी नामक भयंकर जेवणाची ऑर्डर दिली.. आता एशान काहीच बोलत नव्हता. जणू त्याचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. अगदी एखाद्या पॅलेसमधे आल्यासारखं त्याचं त्या हॉटेलच्या इंटेरीअरचं निरीक्षण चाललं होतं. मघासच्या बोलण्यामुळे मला परत रडायला येत होतं.

"तू झोपली होतीस तेव्हा कांचनचा फोन आला होता." कांचन म्हणजे एशानची आई, माझी सासू!! "ती आज उद्या येणार होती आपल्याकडे, मी येऊ नको म्हणून सांगितलं. बाहेर जातोय. तुला नंतर फोन करायला सांगितलय" मी निमूट डोळे पुसले. अवघे तीन फुटावर बसून जर याला माझ्या डोळ्यातले अश्रू दिसत नसतील तर मीतरी काय करणार? माझ्या मनाच्या वेदना वगैरे त्याला समजणं तर फार दूर.

"तुला माझ्याशी लग्न केल्याचा कधी पश्चाताप होतो का?" त्यानं अनपेक्षित रीत्या मला विचारलं.

"क्काय्य?" हा प्रश्न मी कधी मनात आणलाच नव्हता. खोटं कशाला बोलायचं?? होत होती आमची रोज भांडणं, चिडाचिड व्हायची. पण म्हणून लग्नाचा पश्चाताप???

"एशान, मला कधीच वाटलं नाही तसं. एक नवरा म्हणून तू खरंच खूप छान आहेस"

"मी तुझ्या आयुष्यात फक्त तुझा नवरा म्हणूनच आहे की.... "
"म्हणजे?"
"तुझा नवरा व्हायचा आधी मी तुझा फ्रेंड होतो. आता आहे का नाही??"
मी समोरची पाण्याची बाटली उगाच उचलली. काय बोलायचं ते न सुचल्याने.

शान माझा मित्र होता की नव्हता? नवरा-मित्र अशी काही संकल्पना असते का? मित्रच नवरा बनला की तो बदलून जातो की आपण बदलतो?? की दोघाचाही दृष्टीकोन बदलतो??
"शान, कधी याचा विचार केला नाही."
"मी करतोय, काल रात्रीपासून. समहाऊ आय फील, आपलं नातं गेल्या काही दिवसापासून बदलतय. आणि वाईट रीतीने बदलतय"

"आपली भांडणं होतात म्हणून?"
"नाही.. म्हणून आपली भांडणं होतात. तुला आठवतं, कधीकाळी तू मला उशीर होणार अस्ला की फोन करायचीस, कूकर लाव, भाजी करून ठेव. आणि मी करायचो... हल्ली का करत नाही?"

"कारण, तुझ्या अंगात नवरेपण भिनलय म्हणून... "
"नाही, कारण तू आता माझ्यावर हक्क दाखवत नाहीस म्हणून. आठव ना जरा.. "एशान कूकर लावून ठेव" हे आधी आणि आता "शान, मला उशीर होणार आहे, अजून अर्धा तास लागेल. तू प्लीज कूकर लावशील.. प्लीज" हे असतं तुझं बोलणं... तुझ्या अंगात बायको असल्याचा गिल्टीनेस आलाय.."

"असेलही तसं. कारण, मी एखादं काम तुला करायला सांगितलं तर तुला लगेच राग येतो."
"हो, आणि त्यालाही कारण असेल ना? राग आला हे तुला समजलं... का आला ते नाही समजलं?? का तू लक्षात घेतलं नाहीस,"

तेवढ्यात वेटर थाळी घेऊन आला. खूपच्या खूप भूक लागली होती. त्यामूळे जेवण कसं आहे, काय आहे याचा विचार न करता आम्ही दोघानीपण जेवायला सुरूवात केली. पण मनात मात्र, एशानचं बोलणं पिंगा घालतच होतं.

खरंच, एशानला राग आला तरी मी कधी विचारलं त्याला की "तुला राग का आला?"
बाहेर आलो तेव्हा हलका हलका पाऊस पडत होता. पण छत्री उघडावीशी वाटत पण नव्हती. इथेपण अर्थात प्रचंड गर्दी होती. दुसर्‍या दिवशीच्या गणपतीच्या तयारीसाठी लोक काय काय खरेदी करत होते.

"आता काय करायचं?" मी शानला विचारलं.
"बस कूठली आहे ते बघू आणि ठरवू! नाहीतर थांब.. " त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. आता काय हा बहुतेक मला घरी परत चल असे म्हणणार!!

"ह्म्म... गूड आयडिया, मी आधी का नाही विचार केला याचा. चल!" असं म्हणत तो जवळ जवळ माझा हात धरूनच ओढून घेऊन चालला. स्टँडकडे नव्हे. बाजाराकडे! अर्धा तास या दुकानातून त्या दुकानात असं फिरत फिरत त्याने त्याच्यासाठी जीवनावश्यक असलेल्या वस्तूची खरेदी केली. दाढीचं सामान, कंगवा, टूथब्रश, कपडे इत्यादि इत्यादि.

घरी गणपतीसाठी म्हणून थोडे पेढे, आणि अजून असंच काय काय सजावटीचं सामान घेतलं. हे सर्व ठेवायला म्हणून एक डफल बॅग घेतली. सर्व सामान अत्यंत स्वस्तात! मला एशानचं खरंच आश्चर्य वाटत होतं. एरवी मॉलमधेच खरेदी करणारा. कमालीचा ब्रँड कोशस असलेला इथे मात्र चक्क बार्गेनिंग करत होता. आणि हाच एशान काल रात्री मला माझ्या टिपिकल मिडल क्लास माईंडसेटवरून बडबडत होता. एका दिवसात किती बदल होतो ना!!! किमान माझ्या घरी आता काहीतरी विचित्र वाटणार नव्हते.

स्टँडवर पोचून चिपळूण गाडीची चौकशी केली तर इथे पण पनवेलसारखीच हालत होती. नशिबाने जादा महाड गाड्या सोडत होते. त्यातल्याच एका गाडीमधे आम्ही बसलो.

"काय म्हणत होतास तू मघाशी हॉटेलमधे?" माझ्या मनातला पिंगा काही मला शांत बसू दीना.
"काही नाही, काही काही विषय असतात ना, तेव्हाच संपवावे. नाहीतर शिळी कढी बनत राहते."
"खरं सांग, एशान, तुला माझा हल्ली इतका राग का येतो?"
"तुला असं का वाटतं?की मला तुझा राग येतो म्हणून, कदाचित मला माझा राग येत असेल, माझ्या क्लायंटचा राग येत असेल आणि तो राग मी तुझ्यावर काढत असेन असं तुला कधीच वाटत नाही का?"
"शान, तू दुसर्‍याचा राग माझ्यावर कसा काय काढू शकतोस?"
"हे बघ, परत तू तिथेच चाललीस. मी काय करू शकतो किंवा मी काय करतो याला बघणं सोड. मी असं का करतो याचा विचार कर. मला तुझ्या उशीरा यायचा प्रॉब्लेम आहे? नाही. माझा तुझ्यावर संशय आहे? नाही. मला किचनमधे काम करायचा प्रॉब्लेम आहे? अजिबात नाही. मग मला प्रॉब्लेम काय आहे?? मला प्रॉब्लेम हा आहे की तू माझ्याजवळ नाहीस. दिवसभर मी घरात असतो. माझं ऑफिसच तिथे आहे. मग संध्याकाळी जर मला असं वाटलं की तू माझ्यासोबत असावीस, आपण दोघानी कॉफी घ्यावी, कुठेतरी फिरावं... बाकीचं सगळं सोड. फक्त आपण दोघानी बसून गप्पा माराव्या तर माझं काय चुकलं??"

"काहीच नाही, फक्त मी ज्या दिवशी घरी लवकर येते त्या दिवशी आपण फिरायला जात नाही. बसून गप्पा मारत नाही. तू लॅपटॉपवर काम करत राहतोस आणि मी टीव्ही बघत राहते." मी आवाज शक्य तितका शांत ठेवत म्हटलं. म्हणजे हा सारी चूक माझ्यावर ढकलून "बिच्चारा नवरा" बनू पाहत होता!!

"राईट. म्हणजे तेव्हा माझं चुकतं. कधी तू चूक करतेस कधी मी.,,, पण या चुकीचा त्रास आपल्या दोघानापण होतो. ना तू खुश आहेस ना मी!!"

"शान, याचं तुझ्याकडे सोल्युशन काय आहे?आपण दोघं खुश नाही, सो लेट्स सेपरेट"
माझ्या या वाक्यावर तो ख़ळखळून हसला.
"तुझ्याकडे हेच एक उत्तर आहे का?जर आपलं नातं तुटत असेल, तर जोडायला आपण काहीच प्रयत्न करायला नको?"
पुन्हा तीच नजर. तीच भेदकता, समोरच्याला वितळवून स्वतःमधे हरवून टाकणारी. या नजरेसमोर याआधी कित्येकदा हरलेय मी. किंबहुना, एशान म्हटलं की माझ्यासमोर कायम येते ती ही नजरच!! त्याला जे हवं ते समोरच्याकडून वदवून घेणारी... त्याची नजर!

"करायला हवेत एशान, पण आधी आपलं भांडणं कशात आहेत ते तरी एकमेकांना समजू देत."
"ओह! त्याचा विचार मी केलाय, ऑलरेडी म्हटलं ना, रात्रीपासून विचारच करतोय, आय थिंक मला प्रॉब्लेम समजला."

"काय आहे प्रॉब्लेम?"
"शब्द!!!"
"क्काय्य?"
"आय मीन, .मला सतत असं वाटतय की तुझ्या आणी माझ्यामधे.. यु नो.. असं एकमेकासमोर बसून.. हा.. दोन शब्द प्रेमाचे किंवा असंच काहीतरी बोलणं किंवा म्हणजे भांडणं नव्हे, आपण चिक्कार बोलतो तेव्हा.. पण हे असं यु नो. तुला काय वाटतं मला काय वाटतं.. तुझ्या आणि माझ्यामधे डायलॉग."

"शान तुला आपल्यामधला संवाद असं म्हणायचं आहे का?"
"एक्झॅक्टली, तेच ते. चार शब्द प्रेमाचे.. आणि..."
"ओके, समजलं. तुला असं म्हणायचं आहे की तू आणि मी एकत्र बसून एकमेकाना समजून घेत नाही. आपण एकमेकाशी पुरेसा संवाद ठेवत नाही.. बरोबर?"
शानने माझ्या केसातून हात फिरवत म्हणाला "स्वीटु, मला काय म्हणायचं असतं हे असं दरवेळेला तू असंच समजून घेतलंस, तर आपल्याला भांडायची वेळ येणार नाही..खूप खूप खूप दिवसानी मी आणि एशान असे एकत्र हसलो. अख्खी बस आमच्याकडे बघायला लागली.
"म्हणजे, जर आपल्याला भांडायचं नसेल तर दर वेळेला तुझं बोलणं मला असं डीकोड करावं लागेल?" मी अजून हसतच होते.

"हो. आणि मला तुझं!! मी कांचनला कायम विचारायचो.. काय अस्तं गं हे नवरा बायको म्हणून रहायचं? किती दिवस? कंटाळा येणार नाही का? त्याच माणसाचा सतत सतत? तेव्हा ती म्हणालेली. त्या माणसाची आपल्याला इतकी सवय होते की उलट ते माणूस जवळ नसलं त्या माणसाचाच राग येतो, आणि मला तुझी दोन वर्षात खूप सवय झालिये."

मी मनातल्या मनात हसले. एशानची खूप जुनी सवय, समोरच्याला अगदी स्पेशल वाटावं असं बोलायचं..

"इतकी सवय झाली तरी तुला आपलं लग्न अजून एक चूक वाटते ना?ती पण आयुष्यातली मोठ्ठी चूक!"
"किती वेळा तेच बोलशील. एखादेवेळेला चिडून म्हटलं की लगेच ते खरं मानलंस. त्याआधीच कितीवेळा मी तुला म्हटलं की, तू माझ्या लाईफमधली सर्वात सुंदर गोष्ट आहेस,, तेव्हा तुला ते पटलं नाही. आता वाईट बोललो की ते लक्षात आहे!!"
मी बाहेर बघायला लागले. दूरवर डोंगर दिसत होते. खूप दिवसापूर्वी कधीतरी आम्ही याच रस्त्याने महाबळेश्वरला गेलो होतो. खूप मजा आली होती. शानची तुफान ड्रायव्हिंग आणि जून महिन्याचा पाऊस!!

"शान, हे बघ... या इथे... याच रस्त्यावर आपली कार पंक्चर झाली होती..." मी बसमधे बाहेर हात दाखवत त्याला सांगितलं.
"मला नाही आठवत, पण असेल इथेच कुठेतरी. महाडच्या आधीच बहुतेक. तुला इतकं कसं काय लक्षात राहतं?"
"शान, तुझ्याबरोबर रहायचं म्हणजे एकही क्षण विसरून कसं चालेल?दर वेळेला तुझा नविन फंडा."

"तुझ्या उजव्या बाजूला बघत रहा... "
"माहित आहे, तुझा तो रस्ता, जिथे नेऊन तू मला प्रपोज केलं होतंस!!"
"ह्म्म.. काय रात्र होती ना ती...जाम टरकली होतीस.”

"शान, तेव्हा जितकी तुझी भिती वाटली नव्हती, तितकी काल रात्री वाटली. क्षणभर वाटलं की खरंच बोलतोयस. मला खरंच सोडून देशील. तुझ्याशिवाय..." माझ्या नकळत घशातून एक हुंदका दाटून आला.
"अगं माऊ, असं कसं सोडेन मी तुला?हा... आता तुझ्याचबरोबर रहायचं म्हणजे मला त्रास होतो,. होईल... पण तरी तुला सोडून जगण्यापेक्षा तुझ्यासोबत तुझे सगळे नखरे सहन करणं जास्त चांगलय." मी शानच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
"असाच राहशील् ना कायम?"
"नाही, तसं होणारच नाही गं. कधी भांडणार. कधी रडणार, कधी मारामारी करणार. आपलंच माणूस असतं ना मग त्याला आपलंच समजून राहणार ना?"

"पण तू माझ्याशी अजिब्बात भांडणार नाहीस असं प्रॉमिस करशील?"
"बिल्कुल नाही, उलट आपण रोज भांडायचं. भरपूर, एकमेकाना शिव्या घालायच्या. पण असं तू मला सोडून कधीच जायचं नाही. प्रॉमिस?"

मी नुसतीच हसले. जर मी त्याला आज सोडून निघाले नसते, तर अजून भांडतच बसलो असतो, कदाचित आजचा तीढा परत कधी सुटलाच नसता.

बाहेर मस्त ऊन पडलं होतं. मघाशी असलेलं मळभ कुठल्या कुठे निघून गेलं होतं. बाहेर मस्त हिरवाई होती. आमची एसटी सुसाट वेगाने पळत होती. मी एशानकडे पाहिलं. तो माझ्याकडे बघून हसला.
"महाडवरून परत घरी जायचं का?" मी त्याला विचारलं.
"नको, ससुरालवाल्याना तू झोपलीस तेव्हा मी फोन केला होता. आम्ही येतोय"
"अरेवा!!! जावई फारच सज्जन झाला म्हणायचा!"
"जावई आधीपासूनच सज्जन आहे, पोरगी मात्र महाचालू आहे. माहेरी जायचं म्हणून भांडणाचं निमित्त काढते"

आम्ही दोघं पुन्हा हसलो. एखाद्या डोंगरातून वाहत येणार्‍या झर्‍यासारखं!!!
शेवटी काय, आयुष्यात शब्द महत्त्वाचे. मग तो एशानने मला दिलेला शब्द असो वा माझे त्याच्यासाठीचे चार शब्द प्रेमाचे असो!!!





समाप्त.

1 comment: