मला स्वतःबद्दल बोलायला फारसं आवडत नाही, काय सांगणार? माझं नाव आणि माझं शिक्षण सोडल्यास. आता वयाची तिशी गेली तरी सांगण्यालायक इतकंच शिल्लक आहे. अजून शिकतेच आहे. नोकरी नाही. लग्न केलेले नाही. एकटीच राहते. छंद वगैरे असे
काही खास
नाहीत. आता म्हणायचं म्हणून गाणी ऐकायला आवडतं आणि वाचनाची आवड आहे असं म्हणायचं. आई. पत्रिकेसाठी कुठे
कुठे माहिती पाठवत असते तेव्हा असंच लिहिते. त्यात कुंडलीसोबत असलं सटरफटर बरंच
काही असतं. पण मुलगी (म्हणजे मी!!) अजून
दोन तीन वर्षांनी कदाचित भारतात परत येईल किंवा इथेच पोस्ट डॉक करेन हे ऐकलं की
कोण होकार देतच नाही. मग आई वैतागते. मला लग्नाखेरीज इतरही महत्त्वाची कामं आहेत
असं तिला म्हटलं की रागवते. पण मला खरंच छंद काहीच नाहीत. जुनी गाणी कायमच ऐकत
असते. आवडतात म्हणून असं नाही, तर सवय म्हणून. लिहिताना, काम
करतानासुद्धा गाणी चालूच असतात. आता हे लिहिताना पीसीवर मै पिया तेरी तू मने या ना माने वाजतंच आहे. मला अशी
गाणी आवडतात. जुनी गाणी म्हणजे अगदीच ब्लॅक अॅण्ड व्हाईट काळामधली. वाचन म्हणजे माझ्या फिल्डमधलं बरंच काही वाचते. अवांतर वाचन म्हणजे वपु
किंवा पुल
टाईप. इंग्लिशमध्ये हॅरी पॉटर लॉर्ड्स ऑफ द रिंग्स वगैरे. तर माझ्याबद्दल
सांगण्यासारखं इतकंच.
तरी मी
माझ्याबद्दल का सांगतेय? तर असंच सहज सांगावंसं वाटतंय म्हणून. माझ्याचबद्दल नाही,
तर ्जादू, आफताब, आई, केदार, मार्टीन, निधी... सगळ्य़ांबद्दलच.
मला जुन्या गाण्यांची आवड
लावली जादूने. जादूकडे जुन्या गाण्यांचा अक्षरशः खजिना आहे. तरीही अजूनही कुठून कुठून गाणी शोधत असतो. युट्युबवर काय काय व्हीडीओ त्यानेच टाकले आहेत.. तो नुसती गाणी ऐकत नाही. सगळी हिस्ट्रीबिस्ट्री पाठ. चालीपेक्षा
त्याला शब्दांचं वेड जास्त. कित्येक गाणी कविता म्हटल्यासारखा तो मला ऐकवतो. त्याच्यामुळे मला उर्दूची थोडीफार अक्कल आली. गाणी ऐकायची आवड जादूनं दिली तशी वाचनाची आवड
आफताबमुळे . मला एकेकाळी पुस्तकांचा जाम कंटाळा यायचा, वाचणं म्हणजे शिक्षा वाटायची. तेव्हा आफताब
दिवसाला एक पुस्तक वाचायचा. फडशाच पाडायचा. मग कधीतरी असंच सहज तो वाचत असलेल्या पुस्तकामधली रोज
दोन
पानं मला वाचून ऐकवायला लागला, मग हळूहळू मी कधीतरी वाचायला लागले. आता तर काय माझ्यासोबत दिवसभर पुस्तकंच पुस्तकं.
माझं नाव स्वप्निल गौरी यतीन. पैकी यतीन माझ्या बापाचं नाव. गौरी आईचं. नाव स्वप्नील का
याचं कारण फार साधं आहे. माझ्यावेळी आईला मुलगाच हवा होता. पण मी झाले. मग हौस म्हणून माझं नाव स्वप्नील.
तसंही या गरोदरपणाच्यावेळीच डॉक्टरांनी तिला यापुढे काही होणार नाही असं सांगितलं
होतं. आईची मी जीव की प्राण. आजही आहे. इतक्या लांब असूनसुद्धा माझ्याशी रोज पाच
मिनिटं का होइना बोलल्याशिवाय तिला चैन पडत नाही. माझ्याशिवाय तिच्याशी गप्पा
मारायला दुसरं कुणी तिथं नाही हेही तितकंच खरं. तसा जादू अधूनमधून येतो, पण हल्ली
तोही जरा बिझीच असतो.
मी लहानपणी फार
अशक्त होते. सारखी आजारी पडायचे. एकदोनदा तर इतकी आजारी पडले की रामनाम सत्य
पर्यंत जायची वेळ आली होती म्हणे. ताप डोक्यात वगैरे चढला होता. तेव्हा ते डॉक्टर
आईला म्हणाले की असा ताप डोक्यात चढला की कधीकधी मेंदूवर परिणाम होतो. झालं. आईनं
तेवढंच लक्षात ठेवलं. परिणामी मला शाळेत असताना एकदाही होमवर्क करावा लागला नाही
की मार्क जास्त पडावे म्हणून शिकवणी लावली नाही. आईनं शाळेत येऊन शिक्षकांना मी
डोक्यानं जरा अधू असल्याचं सांगितलं होतं. “तिला झेपेल एवढंच शिकवा” असंपण
सांगितलं. मग काय! जमतंय तितकाच अभ्यास करा. पोटापाण्यापुरते मार्क्स मिळवायचे
इतकंच धोरण होतं. तेवढे मला कसेही मिळतच होते. अभ्यास न करतासुद्धा!
मी डोक्यानं अधू
नाही तर चांगली हुशार आहे हे माझ्या आईला बारावीनंतर उमगलं. बारावीचे खणखणीत मार्क
बघितल्यावर.. मला तर आधीच माहित होतं पण कशाला पहिल्या दुसर्या नंबरसाठी
पाचवीसहावीपासूनच ऊर फ़ोडून धावायला लागा. (याचा दुष्परिणाम म्हणजे माझ्ये बहुतेक
क्लासमेट करीअरमध्ये वगैरे ऑलरेडी सेटल झालेत आणि आम्ही अजून ऊर फोडून धावतोय.
कार्मिक सिद्धांत वगैरे म्हणतात तसलं) आईनं इतर मुलींसारखं मला कधीच कामं वगैरे
शिकवली नाहीत. अगदी मुंबईला जाईपर्यंत मला गॅस पण ऑन करता येत नव्हता.
एकूणात काय तर
आईनं माझं बालपण फार सुखात आणि ऐषोआरामात घालवलं.
मी फक्त आईबद्दलच
फार बोलतेय का? साहजिक आहे. बापासोबत माझं कधी जास्त पटलंच नाही. त्याची गावामध्ये
दोन तीन दुकानं होती- म्हणजे अजूनही आहेत. शिवाय आता एक हॉटेलपण टाकलंय. त्यामुळे
पैशाने आम्ही कायम सधन. पण बाप कायम घराबाहेर. का आणि कुठे ते नंतर सांगेन. सध्या
त्याचा जास्त विषय नको. त्याच्याबद्दल बोलायला लागलं की मला विनाकारण संताप यायला
लागतो. सगळ्यांचाच. बापाचा. आईचा. माझा. आफताबचा. नूरीभाभीचा. जादूचा. शाहीनचा.
मिनूचा. निधीचा. केदारचा. सगळ्यांचाच संताप. म्हणून मी बापाबद्दल जास्त बोलत
नाही... त्याचा विचारही जास्त करत नाही.
जादू मला कायम
म्हणतो की कुणाचाही इतका द्वेष करणं चांगलं नाही. मला सल्ले द्यायला त्याचं काय
जातंय. त्याला जमू शकतं.... कुणाचाही द्वेष न करता जगणं. त्यानं नूरीभाभीला माफ
केलं. केदारलाही केलं. त्याच्या मनामध्ये कुणाहीबद्दल राग नाही. हे असं मला कधीच
जमणं शक्य नाही. थोडे दिवस प्रयत्न केला. पण नाही जमत. आपण इतके संत पदाला पोचणार्यापैकी
नाही. मी आयुष्यामध्ये फक्त आफताबला माफ केलंय. तेही माझ्यानकळत.
पण तसं बघायला
गेलं तर मी आफताबचा द्वेष करण्यासारखा तो काय वागला होता? प्रेमात पडला होता.
लग्नाला तयार होता. माझं पीएचडी होइपर्यंत थांबायला तयार होता (किंवा लग्न करून
माझ्यासोबत इथे युएसला यायला तयार होता)... त्यानं काहीच चुकीचं केलं नव्हतं.
त्याला नकार मी दिला. त्याचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं. प्रश्न केवळ आमच्या
करीअरचा नव्हता, धर्मांचा नव्हता. घरच्या विरोधाचा नव्हता. पण तरी मी नकार दिला.
गेली दहाएक वर्षाहून जास्त त्याच्यावर प्रेम करूनही.
तसाच नकार मी
केदारलासुद्धा दिला. कारणं काही असूदेत, कमिटमेंटसाठी मी घाबरते हेच एक सत्य आहे.
*****
आमच्या आजूबाजूला
असलेले शेजारी सगळेच चांगले होते. आईला सर्वांची चांगली सोबत व्हायची. आमच्या
समोरचा प्लॉट रिकामा होता. तिथं अजून कूणीच घर बांधलेलं नाही. नगरपालिकेने
त्याच्या बाजूच्या प्लॉटवर बाग बांधली होती. तिथं आम्ही कॉलनीतले सगळे मिळून
लपाछपी वगैरे खेळायचो. मला या मुलांमध्ये फारसं खेळायला आवडायचं नाही. एक तर मी या
सर्व ग्रूपमध्ये लहान होते. म्हणून मी एकटीच घरी खेळायचे.
मग मी आठवीत होते
तेव्हा बाजूच्या बंगल्यामधल्या
शास्त्रींनी त्यांचा बंगला मुंबईमधल्या कुण्या एजंटाला विकला. शास्त्री काकू
वारल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना परदेशीच घेऊन जायचं ठरवलं होतं
त्यामुळे हा व्यवहार घाईघाईमध्येच झाला होता. मुंबईमधला कोण तो एजंट आम्ही
पाहिलासुद्धा नव्हता. सहाएक महिने बंगला बंदच होता. मग एके दिवशी पेंटींग,
छोट्यामोट्या दुरूस्ती वगैरे काम झालं. आई मला एकदा बोलता बोलता म्हणाली की,
कुण्या सुर्वे नावाच्या फॅमिलीनं बंगला घेतलाय. पुण्याची लोकं आहेत.
मला या असल्या
गॉसिपमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता. पण शा्ळेतून आलं की आई देईल तो खाऊ घेऊन
टीव्हीसमोर बसायचं आणि कायबाय बघत आईच्या गप्पा ऐकायच्या. दिवसभर तिच्याशी बोलायला
कोणच नसायचं. मी संध्याकाळी आले की तेवढी तिची टकळी चालू..
“मला जरातरी सोबत
होइल नै. ही पाठीमागची चिरमुले अगदीच तोडून बोलतात. गरज असेल हाक मारतील. गोडगोड
बोलतील. एरव्ही ओळखही दाखवत नाहीत. पलिकडची काझी.. तिला तर कधीच वेळ नसतो. बॅंकेत
नोकरी करते म्हणा. येताजाता आपली हात हलवून बाय करते. शास्त्रीकाकू होत्या तेव्हा
मला जरा बरं होतं...” वगैरे वगैरे आईचं बोलणं चालूच राहिलं. मी ऐकून न ऐकल्यासारखं
करत पिक्चर बघत बसले.
दोन-तीन दिवसांनी
आईनं मला नवीन बातमी ऐकवली. “अगं, ते शेजारी आले आहेत ते मुस्लिम आहेत”
“मग काय झालं?”
मी टीव्हीवरून नजर न हटवता तसंच विचारलं.
“झालं काही नाही.
पण आडनावावरून मला वाटलेलं की.... जाऊदेत. आपल्याला काय. सोबत झाल्याशी कारण. तेपण
जरा शेजारी म्हणून. तसंही कुठं उठून रोज ते आपल्या घरात जेवायला यायचेत”
पुढं कित्येक
वर्षांनी मी आईचं हे वाक्य जादूला ऐकवलं. तो खूप हसला. अगदी काहीच गरज नव्हती इतकं
हसण्याची तरीपण. तेव्हा वाटलं उगाच सांगितलं याला. आईचं वाक्य इतक्या तंतोतंत खरं
होइल असं तिलापण कधीच वाटलं नसेल. पण एकंदरीत बाजूच्या बंगल्यामधली लगबग आणि गर्दी
बघता रहाण्यासाठी एखादं कुटुंब कमी, आणि लग्नाचं वर्हाड जास्त आल्यासारखं वाटत
होतं.
आई दुपारी
रिकाम्यावेळेत त्यांच्या घरी जाऊन आली होती. “स्वप्नील, त्यांचं घर अजून नीट लावून
झालेलं नाही. दुपारी कुणी नातेवाईकांनी डबा पाठवला होता. पण आता संध्याकाळी काही
नाश्ता नको का? थोडे जास्त पोहे केलेत ते नेऊन देशील?” मला खरंतर कंटाळा आला होता. शिवाय टीव्हीवर
कार्टून पण चांगलं चालू होतं. पण आईची दर दोन मिनिटांनी भुणभुण चालू झाली.
थोडे जास्त पोहे
म्हणजे अंडरस्टेटमेंट. आईनं पातेलंभर पोहे केले होते. “फ़ॅमिली मोठी आहे. प्लेटभर
तरी प्रत्येकाला यायला नकोत?” माझ्या चेहर्यावरचे भाव बघून ती म्हणाली. ते पातेलं
दोन्ही हातात धरून मी त्यांच्या गेटपर्यंत गेले. मी दोनतीनदा आवाज दिला. मीच गेट
उघडायचं तर पातेलं खाली जमीनीवर ठेवावं लागलं असतं. आई म्हणाली होती की मोठं
कुटुंब आहे पण घर मात्र शांत शांत होतं.
मी परत आवाज
दिला. यावेळी घराचा पुढचा दरवाजा किंचित उघडला आणि आतून आवाज आला. “कोण आहे?”
“मी स्वप्नील.
शेजारच्या बंगल्यामध्ये राहते. आईनं पाठवलंय” दरवाजा पूर्णपणे उघडला आणि आतमधून
अठरा वर्षाचा एक मुलगा बाहेर आला. “हे काय आहे?”
“आईनं पोहे
दिलेत” समोरचा मुलगा आश्चर्यानं पातेल्याकडे बघत होता. “एवढे?” त्यानं विचारलं.
“हो, जरा गेट उघडाल का?” बाबा, प्रश्नोत्तरे
कार्यक्रम नंतर करू. आधी गेट उघड. हात दुखायलाय.
त्यानं गेट
उघडलं. मी पातेलं त्याच्या हातात देण्यासाठी पुढे केलं. “आत ये” म्हणत तो मागे
वळाला आणि त्यानं पातेलं धरण्याआधीच मी सोडून दिलं. थाड्ड!! पातेलं जमिनीवर. हे
सगळं घडलं सेकंदभरात. आता मला काय माहिती घरात बोलावेल. गेटमध्ये पातेलं देऊन परत
यायचं इतकंच माझ्या डोक्यात.
“अरिफ!” आतून एका
बाईंचा आवाज आला. “काय झालं रे?”
“काही नाही.
कांदेपोहे सांडलेत” तो सहजपणे म्हणाला. सुदैवानं पातेलं सरळच खाली पडल्यानं थोडेसे
पोहे हिंदकळून बाहेर पडले होते. बाकीचे पातेल्यातच होते. त्यानं पातेलं उचलून
घेतलं.
“फेकून द्यावे
लागणार. मी घरात अजून असतील तर घेऊन येते”
“कशाला? फेकायचे
कशाला?” त्यानं रोखठोक विचारलं. “जमीनीवर सांडलेत ते कावळेचिमण्या खातील.
पातेल्यात आहे ते आपण खाऊ शकतो”
“पण पातेलं
जमिनीवर पडलं ना”
“घरात नेऊन ठेवलं
तर ती पण जमीनच असते ना. ते चालतंच की, काही बिघडत नाही. अन्न नासवायचं कशाला? आत
ये. अम्मी हाक मारतेय.” मी त्याच्यामागोमाग घरात आले. माझ्या डोक्यामध्ये या घराची
शास्त्रीकाकू असतानाची इमेज फीट्ट बसली होती. कायमच स्वच्छ आणि नीटनेटकं घर. आता
जिथे आले आहे ते घरच आहे यावर माझा विश्वास बसलाच नसता. रेल्वेची वेटींगरूम एसटीचा
फलाट परवडला. जिकडे बघावं तिकडे खोकी आणि गाठोडी. याच गाठोड्यामध्ये एक आईच्याच
वयाची बाई दिसली. “कोण गं? गौरीची मुलगी ना?” त्यांनी मला विचारलं. मी मान
डोलावली. अरिफनं पोह्याचं पातेलं नेऊन टेबलावर ठेवलं. त्यानं पातेलं ठेवल्यावर मला
समजलं की ते टेबल आहे, इतकावेळ मला ते पण भलंमोठं खोकं वाटलं होतं. “अगं, इतके
पोहे काय करायचेत?” त्या चाचींनी पतेल्याकडे बघत मला विचारलं.
“माहित नाही.
आईनं दिलेत”
“हाय अल्ला!”
चाचींनी कपाळाला हात लावला. “दुपारी ती आली होती, तेव्हा घरभर नातेवाईक आले होते,
सर्वांची ओळख करून दिली तर तिला काय वाटलं सगळेच इथे राहणारे आहेत की काय! ते
सामान उतरवायला वगैरे आले होते. आता सगळे परत गेले. किलोभर पोहे आता आम्ही तिघांना
काय करायचेत?”
“तरी आम्ही प्लेटभर पोहे कावळ्यांना काढून
बाजूला ठेवलेत” अरिफ अगदी गंभीरपणे म्हणाला आणि मला फिस्सकन हसू आलं.
ही अरिफची वाईट
सवय. अगदी काहीही पांचट जोक करतानासुद्धा याचा चेहरा इतका गंभीर. समोरचा (जास्त
करून मीच) हसून हसून वेडा झाला तरी याचा चेहरा कडक इस्त्री मारल्यासारखा.
“नाव काय गं
तुझं? कितवीला आहेस?”
“स्वप्नील!
आठवीला”
“अरे वा, छान नाव
आहे. हा माझा मधला मुलगा अरिफ. बारावीची परीक्षा दिली. धाकटा आफताब. तोपण आठवीलाच.
मोठा नोकरीसाठी बाहेर असतो.” चाचींनी लगेचच माहिती पुरवली. अरिफने किचनमधून येताना
माझ्या हातात चार-पाच चॉकलेटं आणून दिली.
“तू सेंट
जोसेफलाच आहेस ना?” चाचींनी विचारलं. “आफताबची ऍडमिशनपण तिथंच केली आहे”
“हो, मी गर्ल्स
सेक्शनला आहे. तो कोएडला असणार”
“शाळा जवळच आहेत
ना, एकत्र जायला-यायला सोबत होइल. आफताब आता मामांकडे गेलाय.”
मी मान डोलावली
आणि निघण्यासाठी उठले. “येत रहा गं अधूनमधून.” चाची सहजपणे म्हणाल्या. मी जास्त
प्रश्न विचारले नाहीत. एक तर मला तशी सवय नव्हती आणि मी काय विचारणार... तुमचा
नवरा कुठाय? पुणं सोडून इकडे कशाला आलात? तुम्हाला तीनही मुलगेच का आहेत? तुमच्या
घरात इतकं सामान का आहे? तुमचा मुलगा माझ्याचसोबत कशाला शाळेत येईल? त्याला काय
त्याचे मित्र नाहीत का वगैरे वगैरे.
मी घरी मुकाट परत आले. काय घडलं ते आईला सांगितलं. अरिफने
दिलेली चॉकलेटं तिला दिली. मी आयुष्यात काही गोष्टी कधीच खाऊ शकत नाही. ते आंबा
नावाचं गिळगिळीत फळ आणि दुधापासून
बनवलेलं काहीही... खीर, बासुंदी, श्रीखंड... यक्क!! एकदा आफताबनं खास माझ्यासाठी
बनवलेला शीरखुर्मा चमचाभर खाल्ला आणि दोन तास ओकले होते. सेम विथ चॉकलेट. त्या
फ्लेवरचं काहीही मी खायचं दूर वासपण घेऊ शकत नाही.
****
आठवीचे असलेच
फालतू ड्रॉइंग वगैरेचे पेपर झाले आणि परीक्षा संपल्या. त्यामुळे अभ्यासाचं
काही टेन्शन नव्हतं. दिवसभर मी टीवी,
कंप्युटर, गेम्स नाहीतर गाव भटकणे इतकेच
उद्योग. मी आठवीला गेल्यापासून स्कूटी चालवायला शिकले होते. त्यामूळे गावभर
फिरायला सोयीचं पडायचं.
नंतर चारपाच दिवस
शेजार्यांकडे कुणीच जास्त दिसलं नाही, एकदोनदा अरिफ फक्त बाहेर दिसला आणि हायहॅलो
वगैरे बोलला.. मी त्याला आपल्याच मनानं अरिफभाई अशी आपसूक हाक मारायला सुरूवात
केली होती. धाकटा आफताब मला काही अद्याप दिसला नव्हता..
एके दिवशी मी
टीव्ही बघत सोफ्यावर मस्त आडवी पडलेली असताना दरवाज्यात कुणीतरी आलं. एप्रिल महिना
चालू झाल्यानं पुढचा दरवाजा उघडाच टाकला होता, नाहीतर घर म्हणजे प्रेशर कूकर
व्हायचं. अरिफभाईचं वय जर तीन-चार वर्षांनी कमी केलं आणि त्याचे पिंगट केस जर
काळ्याभोर रंगाने रंगवले तर तो कसा दिसला असता तस्सा सेम हा मुलगा.
“हाय, तुझंच नाव
स्वप्नील आहे का?” तो आत येत म्हणाला. मी
उगाच सावरून वगैरे बसले. “तू पण नववीला आहेस ना?”
पाहताक्षणी हा
मुलगा मला अजिबात आवडला नाही. दिसायला अरिफभाईंसारखा होता पण आवाज वेगळाच. शिवाय
एकंदरीत बोलणं शिष्टासारखंच. डोळ्याला चष्मा. अर्थात तो काय माझ्यापण डोळ्यांवर
होताच तरीही...
“मला थोडी हेल्प
हवी होती” स्वत:ची ओळखदेख नावगाव काही न सांगता महाशय उद्गारले. “नववीची जुनी
पुस्तकं मिळतील का? शिवाय मला क्लासपण लावायचा आहे”
“जुनी पुस्तकं?
शाळेत पुस्तकवह्यांचा सेट मिळेल...”
“हो. पण ते शाळा
चालू झाल्यावर. आता मे महिन्यांत जुनी मिळाली तर जरा वाचता येतील. क्लासपण लगेच
चालू केला तर सिलॅबस कव्हर होइल ना!” बाप रे! हा मुलगा काय तुफान अभ्यासू वगैरे
आहे. “आई, याला क्लासची माहिती हवी आहे” मी लगेच आईकडं टोलवलं. माझा क्लास ट्युशन
सिलॅबस. असल्या गोष्टींशी संबंधच नव्हता. अजून आठवी पास नापासचा रीझल्ट हाती आला
नाही, नववीच्या पुस्तकांची चौकशी चालू?
“चहा वगैरे घेशील का रे?” आईनं त्याला विचारलं.
“मी चहा पित
नाही.” त्यानं तितक्याच शिष्टपणे उत्तर दिलं. मी म्हटलं. “बोर्नव्हिटा चालेल?”
त्याला टोमणा बरोबर समजला असणार.
“नको. अम्मीने
मघाशीच दिलाय” त्यानंपण तिरक्याच टोमण्यानं उत्तर दिलं. “काकी, क्लाससाठी पत्ते
वगैरे आहेत का?”
“आता कुठलेच
क्लास चालू नाहीत. सर्वांनाच सूट्ट्या आहेत.” आई बोलायच्या आधीच मी परत एकदा
म्हटलं. “पुस्तकांसाठी मी वाटलं तर विचारेन कुणाला तरी... आठवड्याभरात सांगेन”
“अरे! हे तर फार
सॅड आहे” तो डोळ्यांवरचा चष्मा नीट करत म्हणाला. “हरकत नाही. टाऊन लायब्ररीची
मेंबरशिप चालू केली आहे.. त्यामुळे थोडंफार रीडींग होत राहील”
“आफताब, जरा
स्वप्नीलसाठी काही पुस्तकं सांग ना.. तुझ्यासारखं तिचं अवांतर वाचन अजिबात नाही”
आईनं घोडं दामटलं. “पुढच्यावेळी लायब्ररीत जाशील तेव्हा हिलापण घेऊन जा”
“नक्कीच” तो
म्हणाला, आणि घराबाहेर पडला.
म्हणजे आफताबची
आणि आईची ओळख झाली होती. माझी आणि त्याची फॉर्मल ओळख अशी कधी झालीच नाही. इतका
अभ्यासू मुलगा मला आवडलाच नाही. उगाच शिष्टपणा करून माझ्याशी बोलत होता.
नंतर काय मला तो
लायब्ररीमध्ये वगैरे घेऊन गेला नाही. मलाही फारसा काही उत्साह नव्हता. आठपंधरा
दिवसांनी आईनं स्वत:च जाऊन माझ्यासाठी दुकानातूनच थोडीफार पुस्तकं आणली. मी ती
नमस्कार करून टीव्ही ठेवला होता त्याच्या वरच्या कप्प्यात ठेवून दिली.
एकदा आईनं
बनवलेला व्हेज पुलाव घेऊन त्यांच्या घरी गेले तेव्हा पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का
बसला. शास्त्रीकाकू असताना घर नीटनेटकं स्वच्छ असायचं. चाचींनी घर लावलं ते केवळ
नीटनेटकं आणि स्वच्छ नाही तर अगदी चित्रांत दाखवतात तसं सुबकपणे. इंटेरीअर डीझायनर
बोलावून लावल्यासारखं. प्रत्येक वस्तू जिथल्या तिथं मांडून ठेवलेली. शिवाय चित्रं,
फोटो, शिल्पं लावलेली. ही सगळी सजावट चाचींनी केली होती. घरामधल्या खालच्या तीन
खोल्यांपैकी एक खोली चाचींची, एक अरिफची आणि एक गेस्ट बेडरूम- खरंतर अझरची बेडरूम.
वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्यांपैकी मोठी खोली आफताबची. आता त्याला खोली म्हणणं
अपमान ठरला असता. त्या खोलीमध्ये एक टेबलखुर्ची सोडल्यास फक्त पुस्तकं होती. हा
सलग दहाबारा तास वाचायचा. कंटाळा आला तर अरिफच्या खोलीमधल्या कंप्युटरवर येऊन
गेम्स खेळायचा. क्वचित कधीतरी गच्चीवर इकडे तिकडे येरझार्या घालताना दिसायचा. मग
परत पुस्तकं वाचन चालू..
चाची माझ्याशी
खूप प्रेमाने बोलायच्या. त्यांच्या घरी
काहीही खाऊ बनवला की मला आठवणीनं द्यायच्या. एकदा आमच्या घरी दुपारी आल्या होत्या
तेव्हा आईशी बोलताना म्हणाल्या की त्यांना मुलगी हवी होती. “लेकीच्या कशा हौशी
करता येतात. या पोरांची काय हौस? चड्डी आणि शर्ट याखेरीज काय फॅशन असते का? घरात
पोरगी हवी. त्याशिवाय घर नांदतगाजत नाही”
“आता सुना येतीलच
की! त्यांचे लाड करा.”
“तीन सुनांनी
मिळून माझाच छळ केला नाही म्हणजे मिळवली...तसंपण किती म्हटलं तरी सुना दुसर्यांच्याच.
लेक कशी लहानपणापासून आपलीच असते.”
“रक्ताचं नातं
शेवटी असतंच ना” आई म्हणाली.
“काय माहित?
रक्ताची नाती पण धोका देताना बघितलीत. माझे मिस्टर गेले तेव्हा तिसर्या दिवशी
सर्व भावांनी घरावर हक्क सांगायला सुरूवात केली. म्हणून तर आम्ही इकडं निघून आलो.
रोज कोण वाद ग्घालणार? रक्ताच्या नात्यापेक्षा आपली मनापासून मानलेली नाती फार
महत्त्वाची. सांगत काय होते तर मला खरंच फार आधीपासून मुलगी हवी होती. दुकानातून
फिरताना ते प्रिन्सेसचे फ्रॉक, छोटेसे
डूल, ते क्युटसे हेअर बॅण्ड्स बघितले की वाटतं लेक असती तर घेतलं असतं सगळं.
आफताबच्या वेळेला तर मी कायम म्ह्णायचे मुलगीच होऊ देत. तर हा पोरगाच झाला. दवाखान्यात
सगळे म्हणायचे की तिसरा मुलगा झाल्यावर रडणारा पेशंट पहिल्यांदा पाहिला.”
आई दोन मिनिटं
गप्प बसली मग म्हणाली. “मला आधी वाटायचं की आपल्याला मुलगाच हवा, पण हिनं जीवच
काढला माझा. नऊ महिने बेडरेस्ट. मग प्लान करून सीझर. नंतर काही होणार नव्हतं. पण
ही झाल्यावर हातात घेतलं आणि मग वाटलं काय मुलगा आणि काय मुलगी. आपल्याच मांसाचा
तुकडा पण आपल्याहून वेगळा. आता दुसरं काही झालं नाही याचं काही वाटतच नाही. एकाच
लेकीनं सगळी हौस पुरवून घेतली. आता जे काय करायचं ते तिच्यासाठीच.”
मी आयुष्यात फार
क्वचित रडलेय. आफताब तर मला दगडी काळजाची म्हणतो. हे ऐकताना मात्र डोळ्यांमध्ये
तेव्हा पाणी आलं होतं. मला अजून आठवतंय. वालाच्या बिरड्या सोलत गप्पा मारणारी आई
आणि तिची मैत्रीण. त्यांच्याकडे पाठ करून टीव्ही बघणारी मी. आईला न समजेल अश्या
बेतानं डोळ्यांतलं पाणी पुसणारी.
****
मे महिना चालू
झाला होता.. संध्याकाळी मैत्रीणीकडे गेले होते. स्कूटी सर्व्हिसिंगला दिली होती
त्यामुळे चालत आले. येताना घरासमोरच्या बागेमध्ये कुणीतरी बसलेलं दिसलं. बर्यापैकी
अंधार झालेला दिसत होता. तरी इतक्या काळोखामध्ये कोण आहे म्हणून पुढं जाऊन बघितलं
तर अरिफभाई बसला होता.
“काय अरिफभाई?
इथं कुठे?” मी सहज विचारलं. त्यासरशी त्यानं हातातली सिगरेट विझवली. “सिगरेटी
ओढताय? तुझ्या आईला नाव सांगू?”
“मला आई नाहिये”
अरिफ एकदम गंभीरपणे म्हणाला. त्याच्या चेष्टामस्करीची मला सवय झालीच होती.
“असली चेष्टा
कुणी करतं का?”
“खरंच आहे, ती
फक्त आफताबची आई आहे” आज अरिफ एरवीसारखा चेष्टा गमतीच्या मूडमध्ये नक्कीच बोलत
नव्हता.
“हे काय बोलतोस?”
मी त्याच्या बाजूला बसत विचारलं.
“माझा खरी आई मी
सहा दिवसांचा असताना वारली. अझरभाई पण लहानच. म्हणून अब्बांनी हे दुसरं लग्न केलं”
मला आयुष्यात पहिल्यांदा समजलं की चाची अरिफची सावत्र आई होत्या. “मागच्या वर्षी
अब्बा पण गेले. आता मला आई नाही आणि बापपण!”
“चाची काही
बोलल्या का?” टीव्हीचित्रपटांमधून सावत्र आई म्हणजे दुष्ट वाईट इतकंच माहिती. पण
चाची खरंच खूप प्रेमळ होत्या. अरिफशीच काय कुणाशीच त्यांना दुष्टाव्यानं वागता
आलंच नसतं.
“तोच तर
प्रॉब्लेम आहे. ती मला काही बोलतच नाही. आत या क्षणी तू जाऊन चहाडी केलीस ना... मी
इथं बसून सिगरेट ओढत असल्याची. तर ती मला ओरडणार नाही, फक्त असं वागू नकोस वगैरे
लेक्चर देईल. आफताबनं त्याची खोली आवरली नाही तर त्याला दोन धपाटे दिले. माझ्या
खोलीत त्याच्याहून जास्त पसारा होता. पण मला धपाटे वगैरे नाही. ओरडापण नाही.
स्वत:च येऊन गुपचुप माझी खोली आवरली. पण मला काही बोलली नाही.... मी सावत्र आहे ना
म्हणून!”
“चाची तुझ्यावर
खरंच प्रेम करतात. गेले काही महिने बघतेय ना...” मी उगाच समजावलं.
“ते काय मला
माहित नाही? तीन महिन्यांचा असल्यापासून तीच सांभाळतेय. पण तरीही.. हक्क नाही ना
दाखवत. अझरशी किमान कधीतरी भांडते-चिडते.
आफताबला ओरडते. मला कधीच नाही. नक्की कशाचं वाईट वाटतंय तेच कळत नाही... पण
तिनं हक्कानं ओरडायला हवं असं वाटतं..”
“आय नो!” अचानक
मला जाणवलं. अरिफला नक्की काय खुपतंय ते मला चांगलंच जाणवतंय. माझ्या बापानं मला
आजवर कधीही ओरडलं नव्हतं की मारलं नव्हतं. उलट जे काही हवं आहे ते मागितल्यावर
लगेच दिलं. मागायच्याही आधीच. आई तर लाडकीदोडकी होतेच. पण त्यामुळे एक झालं... मला
कधी कसलाच हट्ट करावा लागला नाही. सगळं आपसूक मिळत गेलंय. अरिफचं पण असंच असेल का?
आईविना पोर म्हणून चाचींनी जरा जास्तच जपलं असणार. चुकूनही त्याला दुखावणारं काहीच
बोलायचं नाही, कायम त्याचीच बाजू घ्यायची... यानं तो दुखावला जात असणार. अशा
जपणुकीमध्येच नाती अजून ठिसूळ होत जातात.
“आमची भांडणं
झाली ना... तरी अम्मी आफताबलाच गप्प रहायला सांगायची. आता तर आम्ही भांडतच नाही.
तो त्याच्या व्यापात मग्न. अझर दोन वर्षं झाली बाहेर जाऊन. मीच एकटा!”
खरं होतं हे
वाक्य. अरिफभाई कायम एकटाच असायचा. फारसे मित्र आधीपण नव्हते. त्यात बारावीनंतर
इथं आल्यानं सगळंच विश्व बदललं होतं. आफ़ताब-अरिफ चे बाबा पुण्याला शाळेत शिक्षक
होते. चांगलं खाऊन पिऊन सुखी असलेलं मध्यमवर्गीय सुशिक्षित घराणं. तीन
वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर झाला. उपचारांपायी चिक्कार पैसा खर्च केला. पण तरी ते
गेलेच. त्यानंतर घरामध्ये सारखी भांडणं झाली म्हणून चाचींनी घराच्या वाटण्या करून
जितके पैसे मिळतील तितके घेतले आणि त्या इकडे माहेरी आल्या. त्यांनी इथंच घर
घेतलं. पण अरिफला इथं कधीच करमलं नाही. आल्या दिवसापासून तो नाराज होता.
“तू रीझल्ट लागल्यावर परत पुण्याला जा. पुढच्या
शिक्षणासाठी” मी म्हटलं.
“रीझल्टची वाट
बघायची गरज नाही. मी नापास होणार आहे...” तो शांतपणं म्हणाला.
“चल, असं काही
नसतं. रीझल्ट झाल्यावर बघू”
“खरं सांगतोय,
बोर्ड एक्झामच्या आधी पंधरा दिवस अब्बा गेले.. आधी त्यांचं हॉस्पिटलायझेशन वगैरे
अभ्यास जास्त झालेलाच नव्हता. बहुतेक पेपर कोरेच दिलेत. मी नापास होणार”
“ठिक आहे ना!
पुढच्या वर्षी एक्झाम दे. ऑक्टोबरला अटेम्प्ट करता येईल” मी आपल्या परीनं समजावलं.
मला तरी फारसं कुठे माहित होतं बारावीबद्दल?
“बघू! आता तू घरी
जा. तुझी आई वाट बघत असेल”
“तू नाही येणार?”
“एवढ्यात नाही.
थोड्यावेळाने येईन” त्यानं हातातला सिगरेटचा खोका दाखवला.
“एवढ्या सर्व
सिगरेटी ओढणार?”
“नाही गं. मी नंतर येईन. मला इथं संध्याकाळी एकटं बसायला आवडतं.”
“नाही गं. मी नंतर येईन. मला इथं संध्याकाळी एकटं बसायला आवडतं.”
मी उठून निघाले.
पुढे चार पाच पावलं आले होते, तितक्यात अरिफने आवाज दिला. “स्वप्नील, तू माझी
फ्रेण्ड आहेस ना?” मघासपर्यंत अगदी गंभीरपणं बोलणारा अरिफ आता गायब झाला होता.
त्याऐवजी नेहमी मला हसवणारा अरिफभाई होता.
“हो! का रे?”
“फ्रेण्ड्स कधीच
चहाड्या करत नाहीत. अम्मीला यातलं काही बोलू नकोस. प्लीज”
“नक्की”
“प्रॉमिस?”
“प्रॉमिस!!” मी
ही गोष्ट आजवर चाचींनाच काय आफताबला पण सांगितली नाही. त्या दिवसापासून पुढं
कितीतरी वेळा मी आणि अरिफभाई या इथं बागेत गप्पा मारत बसायचो. एकदोनदा क्वचित
आफताब आला असेल. आमच्या टाईमपास पीजेटाईप गप्पांना तो वैतागायचा. त्याचे हायक्लास
पुस्तकी फंडे आम्हाला कंटाळवाणे वाटायचे. पण इथं आल्यापासून अरिफ आफताब भाऊ कमी,
आणि मित्र जास्त बनत चालले होते.
पुढं
महिन्याभरानं रीझल्ट लागल्यावर समजलं की अरिफ खरोखरच नापास झाला होता. हे असं
होणार हे जवळ जवळ प्रत्येकालाच माहित होतं त्यामुळे कुणी फारसं काही बोललं नाही.
आफताब म्हणाला की अरिफ शाळेमध्ये कायमच हुशार होता. हे मधलं आजारपण वगैरे नसतं तर
त्यानं कसंही करून डिस्टींक्शन नक्की मिळवलं असतं. रीझल्टच्या दिवशी अरिफभाई
खोलीमध्येच बसून होता. संध्याकाळी आफताब मुद्दाम त्याला घेऊन आला. मग आम्ही बीचवर
जाऊन उगाच इकडंतिकडं फिरत खिदळत राहिलो.
अरिफ आमच्यासोबत हसत वगैरे होता. पण तरीही खूप हरवल्याहरवल्यासारखा होता.
घरी येताना मी
म्हटलं, “आता ऑक्टोबरला एक्झाम दिलीस तर फर्स्ट क्लास नक्की मिळेल”
अरिफ एकच वाक्य
म्हणाला. “यापुढे आयुष्यात कसलीच एक्झाम द्यायची नाही असं मी ठरवलंय”
आफताबची आणि माझी नववी एकदम चालू झाली. मी रोजच
शाळेत जाताना स्कूटी घेऊन जात होते. एकतर आमच्या रस्त्यापासून शाळेपर्यंत फारसं
ट्राफिक नसायचं. वर मला चालत जायचा कंटाळा यायचा.
आफताब मात्र रोज शाळेला चालत जायचा. आई मला एकदोनदा म्हणाली की तू त्याला
पण स्कूटीवर घेत जा. आईपण ग्रेटच आहे. भर शाळेमध्ये माझ्यामागे एखादा मुलगा आला तर
वर्गातल्या मुलींना निमित्तच मिळेल की
चिडवायला.
अरिफ थोड्या दिवसांसाठी पुण्याला परत गेला होता.
कॉलेजकडून लीव्हींग सर्टीफिकेट्स वगैरे आणून परत इकडेच ऍडमिशन घेणार होता. बाहेरून
परीक्षा वगैरे देण्यापेक्षा हे जास्त बरं. रीझल्टनंटर आरिफ खूप बदलला होता. एकदम
घुमा झाला होता. माझ्याशीपण फार थोडंच बोलायचा. त्याला हाच रीझल्ट येणार हे माहित
होतं, तरी त्यानं इतकं मनाला का लावून घेतलं होतं कुणास ठाऊक! तो म्हणाला तसं,
चाची त्याला काहीच बोलल्या नाहीत. पण काहीतरी
गडबड होती. अरिफ कॉलेज सुरू व्हायच्या आधी एक दिवस आला, ऍडमिशन केली आणि
परत थोड्या दिवसांसाठी म्हणून पुण्याला गेला. नक्की काय कारण ते कुणालाच माहित
नव्हतं. त्याला इथं रहायला आवडायचं नाही म्हणून सारखा तणतणायचा. पण पुण्यामध्ये या
मित्राकडे वा त्या मित्राकडे राहणं चाचींना फारसं आवडायचं नाही. जाऊ नको म्हटलं तर
तो खोलीचं दार बंद करून बसायचा. चाची मग काहीच बोलायच्या नाहीत.
शाळा चालू
झाल्यापासून आफताब अभ्यासामध्ये गुंगला होता. आमच्या शाळेमध्ये बोर्डात
येणारी अशी हुशार मुलं बघून त्यांची वेगळी बॅच बनवायचे- गर्ल्स सेक्शन आणि कोएडची
एकत्रच बॅच. पहिल्या युनिट टेस्टनंतर आफताब त्या बॅचमध्ये गेला. त्याला सगळ्याच
विषयात पैकीच्या पैकी मार्क होते. मला नेहमीसारखे फार चांगले नाही आणि फार वाईट
नसे असे मार्क. हुशार मुलांच्या बॅचमध्ये माझं काहीच काम नाही. माझं आणि आफताबचं
बोलणं जेवढ्याला तेवढंच होतं. होमवर्क्स, असाईनमेंट आणि वगैरेचं असलंच काहीतरी.
चाची आणि आईची मात्र चांगली मैत्री जुळली होती.
दोघी सुगरणी. तू चांगलं बनवतेस की मी अशी स्पर्धा केल्यासारखी काहीबाही बनवायच्या.
आम्हाला त्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. कुणीही काहीही बनवलं की एकमेकींच्या घरी
पोचवलं जायचं. आता तर समोरच्या दारामधून गेट उघडून जायचीपण गरज नव्हती. अरिफने
आमच्या आणि त्यांच्या गडग्याच्या बाजूने चारपाच चिरे लावून पायर्यांसारखं केलं
होतं.मागच्या दारानं निघालं की त्यांच्या मागच्या दारात जायचं. अर्थात हा पायरीगड
चढायचं मात्र चौघांनाच जमायचं. मी. आरिफ. आफ़ताब आणि कविता. आमच्याकडे काम करणारी कविता त्यांच्याकडे
कामाला लागली होती.
चाचींना आईसारखीच झाडांची आवड. शास्त्रीकाकूंचे
गुडघे दुखायला लागल्यावर त्यांना झाडांकडे बघणं शक्य व्हायचं नाही त्यामुळे
त्यांनी बरीच झाडे काढून टाकली होती. चाचींनी कुणीतरी माळ्याला बोलावून ती सर्व
जागा साफ करून घेतली. तिथं कसलीतरी गुलाबांची वगैरे झाडे लावली होती. आफताब एरवी
कधी बाहेर दिसायचा नाही, पण चाचींनी झाडांना रोजच्या रोज पाणी घालायचं काम मात्र
त्याला दिलं होतं. तेव्हा एक अर्धातास दिसायचा.
****
एके दिवशी मी
पीसीवर गेम खेळत बसले होते. आईनं सांगितलंकी अरिफनं बोलावलंय. आता सकाळी साडेदहा
वाजता कशाला बोलावलं असेल... मी गडग्यावरून उडी मारून त्यांच्या मागच्या दारातून
किचनमध्ये गेले. दोन्ही भाऊ जागतिक महायुद्धाची आखणी करत असल्यासारखे कशावर तरी
गंभीर चर्चा करत होते. मी आलेली बघताच आफताब म्हणाला, “बरं झालं तू आलीस. थोडावेळ
इथं आम्हाला मदत कर”
मी आणि मदत? तेही
किचनमध्ये? बरे आहेत ना दोघे? “तू काही बनवू नकोस. इथं खुर्चीमध्ये बस आणि मला ही
यादी वाचून काय काय सामान केव्हा घालायचं ते सांग.” अरिफनं सांगितलं. “आज अम्मीचा
बर्थडे आहे. सकाळपासून मामांकडे गेली आहे. तिच्यासाठी सरप्राईझ म्हणून आम्ही जेवण
बनवतोय”
आफ़ताबनं माझ्या
हातात ती जेवणाची “यादी” दिली. “हे एवढं सगळं तुम्ही दोघं बनवणार?” मी खवचटपणं
विचारलं. यादीमध्ये चिकन बिर्याणी, कोशिंबीर आणि केक असे तीन पदार्थ होते. तीन!!!
“टोमणे मारू
नकोस. चुपचाप मदत कर” इति आफताब. परत आज्ञामोडामध्ये.
“नीट प्लीज बोल.
तर मदत करेन” मीपण काही कमी नव्हते.
“ओके! आता बास.”
अरिफ आमच्या दोघांमध्ये उभं राहत म्हणाला. “स्वप्निल, मी बिर्याणी बनवेन. आणि
आफताब केक. दोघांनाही तू इन्स्ट्रक्शन्स वाचून दाखव. जी स्टेप करून होइल त्यावर
टिकमार्क कर. म्हणजे काहीही विसरणार नाही. आफताब, भांडणं नकोत. शांतपणे काम कर”
माझ्या हातात
अजून तीन कागद दिले- स्टेपवाईज कृतीचे. चिकन बिर्याणीच्या साहित्याच्या लिस्टनुसार अरिफनं सगळं
सामान जोडून घेतलं होतं. त्यानं पहाटेच चिकन मॅरीनेशनला टाकलं होतं. मग चार कांदे
बारीक चिरत होता त्या दरम्यान मी आफताबला केकचं सगळं साहित्य वाचून दाखवलं. मैदा,
बटर, साखर, अंडी आणि कोको पावडर “कोको पावडर नको. प्लेन व्हनिला केक करूया. चॉकोलट
केक तू खाणार नाहीस.” आफताब म्हणाला. मी कोको पावडरवर काट मारली.
“केक अम्मीसाठी
बनवायचा आहे हो!! स्वप्निलसाठी नव्हे” अरिफनं उगाच चिडवलं.
डबाभर मैदा होता
पण त्यातून २५० ग्राम मैदा वेगळा कसा काढणार? बरं प्रश्न केकचा होता ; सगळं काटेकोरपणे मोजून घ्यायलाच हवं. शेवटी आफताब माझी स्कूटी घेऊन गेला आणि
वाण्याकडून मोजून मैदा साखर वगैरे घेऊन आला. तो घरी आला आणि मला आठवलं आईकडे किचन
स्केल आहे.
आफताब माझ्या या
लेटकरंटगिरीवर प्रचंडच वैतागला. दोघांची झिकझिक चालूच राहिली. अरिफचा वेगळाच
प्रॉब्लेम होता. घरामधले दोन-तीन डबे काढून यापैकी बिर्याणीसाठी बासमती तांदूळ
कुठला असावा असा प्रश्न होता.. यावेळी मात्र अरिफचं अजिबात न ऐकता आफताबनं माझ्या
आईला बोलावून आणलं. तिनं तांदळासोबत आमचे
बरेच छोटेमोठे प्रश्न सोडवले. उदाहरणार्थ- केकच्या बॅटरची रिबन कन्सिस्टन्सी
म्हणजे काय? आफताब टेबलावर खांडवीसाठी पीठ पसरतात तसं घालून रिबन तयार होते का ते
बघत होता. बिर्याणीच्या खड्या मसाल्यांमध्ये कशाला नक्की काय म्हणतात ते पण माहित
नव्हतं. आई आल्यामुळे हे सर्व काम सुसह्य झालं.
पुढं कितीतरी
वर्षांनी मी इथल्या रूमवर सगळ्या मित्रमैत्रीणींसाठी बिर्याणी बनवली. एकटीच बनवणार
होते पण तेव्हा दिमतीला फोनवर जादू, युट्युबवर व्हीडीओ आणि शिवाय नेटवरच्या तीन
चार रेसिपी इतकं सगळं हजर होतं. बिर्याणी दमवर चढवली आणि मसाल्याचा तो खरपूस,
गोडसर पण भूक खवळणारा वास पसरायला लागला आणि मला अचानक भरून आलं. अरिफची आठवण एरवी
कधीच येत नाही... मी येऊच देत नाही.. पण त्याक्षणाला प्रचंड आठवण आली होती. सगळ्या
मित्रमंडळानं बिर्याणी अगदी चाटूनपुसून खाल्ली, मला मात्र एक घास हातात घेणंसुद्धा
शक्य झालं नाही. डोळ्यांसमोर किचनमध्ये घामेजलेला, मी चार चमचे मसाला म्हटल्यावर
नको जरातरी झणझणीत हवं यार म्हणत पाच-सहा चमचे मसाला घालणारा, मध्येच आफताबच्या
केकवर लक्ष ठेवणारा, माझं आणि आफताबची वादावादी चालू झाली की दोघांना शांत करणारा
अरिफ येत राहिला. माझ्या आयुष्यातला माझा पहिला मित्र.
“बिर्याणी करायला
ना अझरभाई हवा.” अरिफ मध्येच म्हणाला. “ईदीची बिर्याणी कायम तोच बनवतो.. यावेळी
सुट्टीला आला की मागच्या अंगणात चूल मांडून बिर्याणी बनवूया. चुलीवर टेस्ट एकदम
भारी लागते.”
केक ओव्हनमध्ये
ठेवल्यावर आणि बिर्याणी दमसाठी चढवल्यावर आम्ही तिघांनी मिळून किचन आवरलं. आईनं
आमची मेहनत लक्षात घेऊन आम्हाला पराठे आणून दिले. भूक लागलेलीच होती. चाची
येईपर्यंत आम्ही पीसीवर गेम खेळत बसलो.
चाची दुपारी
दोननंतर घरी आल्या. आल्याआल्या त्यांना बिर्याणीचा वास आला होता. “काय केलंत?”
थोडंसं दरडावून आणि बरंचसं आश्चर्यानं त्यांनी विचारलं. आम्ही तिघांनी लगेच हॅपी
बर्थडेचा गलका केला. केक आणि बिर्याणी
बघून त्या एकदम खुश झाल्या. इतक्या भानगडींमध्ये आम्ही कोशिंबीर करायला विसरून
गेलो होतो. बिर्याणी खालून थोडीशीच करपली होती, शिवाय मीठ थोडं कमी झालं होतं. केक
डायेटींगला गेल्यासारखा कोसळला होता.
पण तरी चाची खुश
होत्या. त्यांनी अरिफला जवळ घेतलं, त्याच्या केसांतून हात फिरवला आणि हलकेच
स्वत:च्या डोळ्यांतलं पाणी पुसलं. त्यांनी आफताबला पण जवळ घेतलं आणि त्याला एक
हलकाच फटका दिला. “आयशीला डायबेटीस असताना केवळ स्वत:ला आवडतं म्हणून केक बनवलास
ना?” त्या हसत म्हणाल्या. मग माझ्याकडे
वळून म्हणाल्या, “त्यानिमित्तानं तुला किचन कुठं असतं तेतरी समजलं”
नंतर श्रमपरिहार
म्हणून आईने आणि चाचींनी आमच्यासाठी बरंच काहीबाही बनवलं. अख्खा दिवस आम्ही
तिघांनी इतकी धमाल करत घालवला. मी जादूला एकदा म्हटलं होतं, “मला जर कधी टाईमटर्नर
मिळाला तर मी याच दिवसाकडे परत जाईन. कितीहीवेळा हा दिवस जगले तरी कंटाळणार नाही.”
खरंतर दिवसामध्ये
काहीच अविस्मरणीय घड्लं नव्ह्तं.. दोन मुलांनी मिळून आईच्या वाढदिवसाला स्वयंपाक
केला. शेजारच्या मुलीनं त्यात थोडीफार मदत केली... इतकंच तर होतं. पण नाही.. याहून
बरंच काही होतं.
खूप दिवसांनी
अरिफ मनापासून हसत होता. खूप दिवसांनी आफताब आणि अरिफ एकाच घरात राहून परक्यासारखं
न वावरता भावांसारखे चालत बोलत होते. खूप दिवसांनी चाचींनी अरिफला जवळ घेतलं होतं.
आणि मी आणि आफताब
एकमेकांशी न भांडता, टोमणे न मारता थोडावेळ का होइना एकत्र राहू शकतो हे आम्हाला
पहिल्यांदाच समजलं होतं.
पण काही गोष्टी
कायम टिकत नाहीत हेच खरं!
No comments:
Post a Comment