Thursday, 30 July 2015

स्पर्श (भाग १)

त्यानं मोबाईल हातात घेतला. कसलंही नोटिफिकेशन आलेलं नाही ते बघून परत चार्जिंगला लावला. फ्रीझमधल चहाचा कप घेऊन मायक्रोवेव्हमध्ये गरम केला. बाहेर येऊन फेसबूकवर कुणीतरी शेअर केलेली लिंक वाचत बसला. आज एकूणच कसलीतरी अस्वस्थता मनामध्ये साचली होती. वातावरण पण असलं बेकार होतं. अजून सव्वापाच वाजले नव्हते. बाहेर प्रचंड काळोख दाटून आलेला. इतक्या अंधारात आज बाहेर फिरायला जाता आलं नसतं. “मघाशी उगाच तासभर गेम खेळत बसला नसतास तर वॉकला जाता आलं असतं.” त्यानं स्वत:लाच टोकलं. वास्तविक, हे रोज संध्याकाळी फिरायला जायचे त्याचे बेत गेले तीन वर्षं नुसते शिजत होते. प्रत्यक्षात गेला असेल एकदा किंवा दोनदा. रोजची संध्याकाळ नेटवर टाईमपास करण्यामध्येच जायची. आज तर दुपारपासून कम्युनिकेशन डाऊनचा सिग्नल होता. काहीच काम नसल्यामुळे तो साईटवरून घरी आला होता. आता युट्युबवर काहीतरी जुनी गाणी लावून स्क्रीनकडं रिकाम्या नजरेनं पाहत राहिला.
तितक्यात मोबाईल वाजला. त्याच्या कॉलेजमधल्या तन्मयचा मेसेज. गेल्या दोन दिवसापासून तन्मय कसल्याशा कॉलेज रीयुनियनसाठी मेसेज करत होता. उदयपूरला अख्खी बॅच जमणार होती. जाणं अशक्य नव्हतं, पण त्याला जायचंच नव्ह्तं. “तुला रीयुनैयनला यावांच लागेल. श्रीकांत आणि सुनयना यु एसवरून येणार आहेत. तर तुला तमिळनाडूच्या जंगलामधून यायला काहीच प्रॉब्लेम नको. तुझ्या बेस्ट फ्रेंडने येणार नाही असं मेल केलंय. त्याच्याऐवजी तू आलाच पाहिजेस” त्यानं मेसेज वाचला.
वास्तविक हे असले रीयुनियन वगैरे जयचे आवडते फंडे. कॉलेजचा तर हीरो होताच. रीयुनियनची आयडीयापण त्याचीच. आता तो काय बोस्टन सोडून इकडं तिकडं हलेल! सिंधुला सातवा महिना चालू आहे. विचारासरशी त्यानं हसून फेसबूकवर जयचं प्रोफाईल काढलं. पट्ठ्यानं महिन्याभरात काहीही अपडेट केलेलं नव्हतं. पण कव्हर फोटो म्हणून त्यानंच क्लिक केलेला जय आणि सिंधुचा एअर्पोर्टवरचा फोटो होता त्याच्या लग्नानंतर तीन की चार दिवसांनी काढलेला. नकळत सर्चबॉक्समध्ये सौम्या टाईप केलं आणि लगेच डीलीट केलं. लग्नानंतर मुलीचं नाव बदलतात विसरलास काय? तो म्हणाला. फोल्डरमध्ये शोधून त्यानं त्याचा आणि सिंधुचा लहान्पणीचा एक फोटो काढला. आणि फेसबूकवर कव्हर फोटो लावला. दोघंही जेमतेम आठनऊ महिन्याचे असताना काढलेला फोटो. तेव्हा दोघं जरातरी सारखे दिसायचे आता त्यानं जुळं म्हणून ओळखलं पण नसतं. मोबाईलवर व्हॉट्सऍप ग्रूपमध्ये जोक पाठवला होता तो त्यानं आधी वाचलेला असूनसुद्धा परत वाचला आणि इतर ग्रूप्मध्ये फॉरवर्ड करत बसला.
तितक्यात दरवाज्यावर थाप ऐकू आली. नाकातली चमकी चमकवत आणि पांढरेशुभ्र दात दाखवत पन्नाशीची पोन्नीअम्मा दातात उभी होती. त्याच्या चेहर्याचवर ही इतल्या लवकर कशी काय आश्चर्य आलेलं पाहून म्हणाली. “सार! मळे जास्तीया वरूंपोलिरूक्कु अदां सीक्किरमा वंदुट्टें” त्यानं दरवाज्यामधून बाहेर नजर टाकली तर ढगांचा काळोख भरला होताच. दोन दिवसापासून वादळाची सूचना होती. म्हणून नेहमीपेक्षा पोन्नीअम्मा लवकर आली होती. ती किचनमधे निघून गेली तेव्हा तो आता व्हॉट्सऍपवर कसल्याश्या ग्रूपमध्ये ढकलून आलेली मुलगीच का हवी यावरची अतिशय तरल (म्हणजे नक्की काय ते त्यालाही माहित नव्हतं, पण प्रसादसरांचा आवडता शब्द) कविता वाचण्यामध्ये तो गुंगला होता. “खाना क्या बनाना?” तिनं परत किचनच्या दरवाज्यात येऊन त्याला विचारलं. हिंदी लिमिटेडच होतं, पण जेवढं होतं तेवढं अगदी खणखणीत.
“ज्यादा कुछ नही” त्यानं उत्तर दिलं. “समथिंग ग्रेव्ही. थोडे पापड फ्राय कर दो.”
“चपाती नही?” तिनं दरडावून विचारल्यासारखं विचारलं. इथून पाचेक किमी परिसरामध्ये त्यांचा आवाज ऐकणारं दुसरं कुणीही नव्हतं म्हणून अन्यथा या घरात नक्की नोकर कोण असा प्रश्न ऐकणार्याइला हमखास पडला असता. “आफ़्टरनूनका चपाती इरुक्कु” त्यानं मोबाईलमधलं तोंड वरदेखील न करता उत्तर दिलं. हल्ली आपण जरा जास्तच तमिळ बोलतोय असं त्याचं त्यालाच वाटलं. मघासची कविता सगळ्यांना फॉरवर्ड करायचं काम चालू होतं. वास्तविक त्याला स्वत:ला मुलगीच का व्हायला हवी वगैरे काहीही नव्हतं, मुळातइतका विचार त्यानं कधी केलाच नव्हता. आता तर लग्नच करायचं नाही असं ठरवलं होतं, शिवाय आपल्याला आलेला प्रत्येक मेसेज अमुक जणांना फॉरवर्ड करायलाच हवा असंही त्याचं काही म्हणणं नसायचं. पण वेळ घालवायचं याहून दुसरं काही साधन सध्या त्याच्याकडं नव्हतं.
“क्या सार? मध्यान्नं ना सेंज मूणु चपातीले ओन्नुदां सापट्रिकिंग. अच्छा नै जी.” म्हणत पोन्नीअम्मानं दुपारच्या तीन चपात्यांपैकी दोन शिल्लक होत्या म्हणून जेवण किती जेवायचं त्यावर एक लेक्चर तमिळमधून सुरू केलं.. तीन वर्षापूर्वी बरं होतं. ती काय म्हणते त्यातलं एक अक्षर त्याला समजायचं नाही, पण आता त्याला इथं राहून बर्यारपैकी तमिळ समजत होतं. पोन्नीअम्मा आज कुठल्या शब्दांमध्ये आपला कसा उद्धार करतेय इतपत तरी नक्कीच. त्याच्याशी बोलत असतानाच पोन्नीअम्मानं किचनमध्ये परत कामाला सुरूवात केली. त्यानं समोरच्या पीसीच्या स्क्रीनवर परत डोकं खुपसलं आणि फेसबूकवर “आय कॅन स्पीक तमिळ, वॉक तमिळ. डान्स तमिळ बीकॉज तमिळ इज अ व्हेरी फन्नी लॅंग्वेज” असं स्टेटस अपडेट केलं.
मग्तो फॉलो करत असलेल्या दीडेकशे ब्लॉगपैकी कुणी तरी नुतक्तीच टाकलेली ब्लॉगपोस्ट त्यानं ती वाचायला घेतली. युरोपमध्ये नवीनच चालू झालेल्या कुठल्याश्या अर्थशास्त्रीय कायद्यामधल्या संभाव्य चुकांचा ऊहापोह (परत एकदा प्रसादसरांचा शब्दच) करणारी ती ब्लॉगपोस्ट होती. त्याला काहीही समजलं नव्हतं तरी त्यानं पूर्ण वाचून झाल्यावर लगेचच “वॉव. व्हॉट अ डीटेल्ड ऍनालिसिस. अजून यावर वाचायला आवडेल” अशी कमेंट टाईप करून टाकली. तेवढाच बिचार्याव पोस्ट लिहिणार्यािला समाधान. लगोलग दुसरा ब्लॉग वाचायला घेतला, कुणीतरी नवीन झालेल्या आयफोनचा रीव्ह्यु टाकला होता. आता हा त्याच्या इंटरेस्टचा मामला होता. त्यानं तो रीव्ह्यु दोनतीनदा वाचला. मग त्यामधले गडबड झालेले मुद्दे शोधून काढले. वेगळ्याच एका आयडीने लॉगिन झाला आणि लगोलग अतिशय चिडक्या टोनमध्ये त्यानं “हा रीव्ह्यु पेड आहे” अशी सुरूवात करून त्या ब्लॉगकर्त्याचे धिंडवडे काढले. कोणे एकेकाळी तो अशा टेक्निकल बाबतींमध्ये लिहिताना अतिशय सभ्य भाषेमध्ये व्यवस्थित मुद्देसूद लिहून कमेंट टाकत असे,पण मग त्याच्या लक्षात आलं की परस्पर आपली कमेंटच लेख म्हणून पब्लिश होतेय तेव्हापासून त्यानं हे असं चिडक्या संतापी भाषेमध्ये लिहायला सुरूवात केली होती. त्यासाठी खास वेगळा आयडीपण बनवला होता. सरासर टाईप करून त्यानं कमेंट प्रसिद्ध केली. मग परत फेसबूक उघडलं आणि प्रसादसरांना “तुमची कविता वाचली, भालो सुंदर (उग्गाच्च बंगाली शब्द वापरायची सवय, प्रसादसरांचीच स्टाईल) मेसेज टाकून तो इकडे तिकडे बातम्या वाचत बसला.
पोन्नीअम्मा परत त्याच्या मागे येऊन उभी राहिली होती. हातामध्ये भाताचं पातेलं. “ये क्या? सब राईस वैसाही. मध्यान्नं सापडेवे इल्लिया?” तिनं विचारलं. तो काहीच न बोलता नुसता हसला. पोन्नीअम्मा जेवण लेक्चर पार्ट टू चालू झालं होतं. आज दुपारच्या जेवणामध्ये पोन्नीअम्मा नेहमी करते तीकेळीच्या गाभ्याची भाजी होती. इथं यायच्या आधी त्यानं ती भाजी खाणं दूर, असली भाजी करतात हेही त्याला माहित नव्हतं. पण आता ती त्याच्या खूप आवडीची भाजी होती, म्हणून त्यानं दुपारी बसून तीन वाट्या खरंतर पातेलंभर ती भाजीच खाल्ली होती. चपाती आणि भाताकडं लक्षच दिलं नव्हतं. त्याच्या मते तो पोटभर जेवला होता पण पोन्नीअम्माच्या मते भात खायलाच हवा त्याशिवाय जेवण कसलं? आता त्यानं काही न बोलता मघासचा रिकामा झालेला चहाचा कप तिच्यासमोर धरला. अजून एक कप चहा दे म्ह्णून.
“खाली चाया पिना, खाना मत खाओ” ती ओरडलीच. पण लगेच चहा ठेवायला किचनमध्ये गेली. त्या ओरडण्यामागे गेल्या तीन वर्षाची माया दाटली होती. पोन्नीअम्मानं शहरामध्ये कुणाच्याना कुणाच्या घरात कामं करून आयुष्य काढलं होतं. पण पाच वर्षापूर्वी नवरा वारला आणि शेती ताब्यात घेण्यासाठी म्हणून ती लेकीला घेऊन गावात येऊन ठाण मांडून बसली.इथं आल्यावर या जंगली खेडेगावामध्ये कामं मिळणार किती... काहीतरी सरकारच्या उपग्रहांचं काम तिच्या गावाजवळ चालू झालं होतं चार वर्षाआधी हा सरकारनं इथं हा बंगला आणि अजून दोन तीन बिल्डिंग बांधल्या. गावामधल्या मुरूगैय्यानं कितीतरी खटपटी करून स्वत:ला इथं असिस्टंट म्हणून चिकटवून घेतलं होतं.सुरूवातीला चांगली दहा-बारा माणसं होती, पण त्यांचं काम झाल्यावर ते सगळे निघून गेले आणि मग हाच एकटा पोरगा रहायला आला. मग मुरूगैय्यानं तिला “एकट्या माणसाचं दोन वेळेला स्वयंपाकपाणी आणि कापडे भांड्यांचं” काम करशील का विचारलं. मुंबईवरून आलेला पोरगा. जेमतेम बत्तीस तेहतीस वर्षाचा. त्याला तमिळ भाषा ओ की ठो येत नाही. तिचं हिंदी मोडकंतोडकं पण तरी गावामध्ये शहराचा अनुभव असलेली ती एकटीच. तिला फार काही वेगळे पदार्थ बनवता यायचे नाहीत.. पण पगार चांगला भरभक्कम होता, म्हणून मागचापुढचा काही विचार न करता तिनं काम घेतलं होतं. तसंही एका पुरूषाचा स्वयंपाक किती असणार. तिच्या गावापासून बंगल्यापर्यंत चालत जायला दीड तास लागायचा. सुरूवातीला ती दुपारी एकदाच येऊन दोन्ही वेळेचा स्वयंपाक एकदम करून जायची. तो दिवसभर त्या सॅटेलाईट्सच्या बिल्डिंगमध्येच काहीतरी करत असायचा, फक्त झोपायला घरी यायचा. पहिल्या दिवशी स्वयंपाक झाल्याचा निरोप पाठवल्यावर तो दुपारी जेवायला आला. तिनं तिच्या पद्धतीनं आणि घरात असलेल्या सामानामधून सुचेल ते केलं होतं. त्याला पहिल्याच घासाला ठसका लागला. नाकाडोळ्यांतून पाणी वहायला लागलं, इतकं तिखट त्याला सोसत नाही ते बघून तिनं लगेचच गॅसवर दूध चढवून त्याला खीर करून दिली. तिला वाटलं झालं, हे काम हातातून आता जाणारच. पणत्या दिवशी दुपारी त्यानं नुसती खीर खाल्ली पण तिला एका शब्दानं तिला काही बोलला नाही. बोलला असता तरी तिला समजलं नसतं हाभाग अलाहिदा.
तिनं दुसर्याए दिवसापासून कमी तिखट वापरायला सुरूवात केली.नंतर साताठ दिवसामध्ये त्याला “इतकं” तिखट सोसत नाही पासून ते हळूहळू “त्याला अजिबात” तिखट सोसत नाही या निकषावर ती आली. भाषा येत नसतानाही त्याची खाण्यापिण्यामधली आवड तिला समजत गेली. त्यानं मधूनच कधीतरी सुट्टीच्या दिवशी तिला त्याचे आवडते पदार्थ कसे करायचे ते शिकवले. अगदी सुरूवातीला तिचं काम फक्त स्वयंपाक आणि भांडी घासणं इतकंच ठरलं होतं. पण हळूहळू तिनं त्याचं घर आवरणं, अंगण झाडणं, रांगोळी घालणं. अंगणामध्ये फुलंझाडं आणून लावणं, अशी कामं करायला सुरूवात केली. एकमेकांची भाषा अजिबात समजत नसतानापण दोघांचे संवाद सुरू झाले होते. इतक्या दिवसांमध्ये पोन्नीला त्याच्याबद्दल फार थोड्या गोष्टी समजल्या होत्या. त्याला वडील नव्हते. एक बहिण होती, जी लग्न करून युएसला रहात होती.मागे दोन वर्षापूर्वी त्याची आई इथं आली होती. सहज लेकाला भेटायला म्हणून पाचसहा दिवस. पण ती आल्यावर एक दिवस घरामध्ये शांततेमध्ये गेला नव्हता. एरवी अत्यंत शांत, आपल्या दहा शब्दांला एक शब्द बोलणारा तेव्हा मात्र सतत धुसफुसत असायचा. बोलण्यामधून तिला थोडंफार कारण समजलंसुद्धा होतं. त्याच्या आईचं म्हणणं होतं की त्यानं असं इथं एकटं रहाण्यापेक्षा अमेरिकेला जावं. चांगली नोकरी करावी, लग्न करावं, सुखानं रहावं. “मी इथं सुखातच आहे” हे त्याचं एकमेव ठरलेलं उत्तर.
पोन्नीनं चहाचा कप नेऊन त्याच्यासमोर ठेवला. अंधार खूपच झाला म्हणून तिनं हॉलचा दिवा लावला.तो नेहमीसारखा त्या कंप्युटरच्या डबड्यामध्ये हरवला होता. नजर जेव्हा त्या कंप्युटरच्या स्क्रीनवर नसेल तेव्हा त्या मोबाईलच्या थोबाडामध्ये. दिवसाचे चोवीस तास त्याच्यामध्ये पाहण्यासारखं काय असतं ते तिला आजवर उमगलेलं नव्हतं.
तिनं दुपारच्या भाताला फोडणी घालून त्याचा लेमन राईस केला. फ्रीझामध्ये शोधाशोध करून दोन गाजरं आणि तीन चार छोटी वांगी काढली. वांग्यांचं कोळंबू केलं आणि गाजरं किसून त्याची कोशींबीर. उद्याच्या नाश्त्याच्या तयारीसाठी इडलीचं पीठ ग्राईंडरमध्ये वाटायला घातलं. खोबरं खवून घेतलं, तिचं तासभर काम चालू असताना तो पीसीवरच काहीबाही टाईप करत होता. पण मध्येच झटका आल्यागत उठून त्यानं पुस्तकांच्या मांडणीमधलं कसलंसं जाडं पुस्तक घेतलं आणि त्यामधलं काहीतरी दुसर्याध एका वहीमध्ये उतरवून घ्यायला सुरूवात केली. इतर सतत वेळी त्याच्या हातामध्येच असलेला मोबाईल आता मात्र बाजूला ठेवला होता. त्याला अशीच मन मानेल तेव्हा अभ्यासाला बसायची सवय होती, आणि एकदा तो त्याच्या आवडीच्या विषयामध्ये हरवला की त्याला आजूबाजूचं अजिबात भान नसायचं. सगळं काम आटोपल्यावर तिनं भांडी बाहेर नेऊन घासली तेव्हा साडेसहा वाजून गेले होते. सगळीकडं काळोख पसरला होता. आकाशामध्ये काळे ढग इतके पसरले होते की एक चांदणी दिसत नव्हती. दोन- तीन दिवसांपूर्वी वादळाची सूचना आली होती. त्यामुळं तिला होता होइल तितक्या लवकर घरी जायचं होतं.भांडी आत आणून ठेवल्यावर तिनं थोडंफार घर आवरलं आणि ती जायला निघाली. “सार, पोईटा!” ती दरवाज्यातून त्याला म्हणाली. त्यानं पुस्तकातून मानदेखील वर न करता नुसता हात हलवला. “दार लावून घ्या. जनावरं वगैरे आत येतील. पावसाचे दिवस आहेत” असं काहीतरी ती म्हणाली. पण त्याचं लक्ष नव्हतंच. पोन्नीअम्मा निघून गेल्यावर जवळ्जवळ तासभर तो त्याच्याच विश्वात हरवला होता. खूप दिवसापासून एक टेक्निकल प्रॉब्लेम त्याला सतावत होता, आता इंटरनेटवर काहीतरी वाचताना त्याला काहीतरी आठवलं आणि त्यानं धडाधड लिहायला सुरूवात केली होती. सोल्युशन दृष्टीक्षेपात होतं. इन्स्ट्रुमेंट्सवर एक दोन दिवसांतऍक्च्युअल टेस्ट केली असती तर नक्की कन्फर्म झालं असतं. इतका वेळ मेसेजेसनी वाजणार्याए मोबाईलनी किंवा नोटिफिकेशन्सनी वाजणार्यात पीसीनं त्याचं चित्त विचलित केलं नव्हतं. भारावल्यासारखा तो त्याच्याच विश्वात हरवला होता. अखेर एकदा त्याच्या मनाचं समाधान होण्यासारखं सोल्युशन त्याला मिळालं. त्यानं भराभरा तो डेटा एक्सेल शीटमध्ये भरला.रेफरन्ससाठी घेतलेली तीन-चार पुस्तकं मिटली. स्वत:शीच तो प्रचंड खुश होता.त्याच्या नोट्सनी भरलेले पंधरा सोळा कागद त्यानं व्यवस्थित नंबर लावून स्टेपल केले. ते सगळं बाड पुस्तकांसोबत मांडणीवर ठेवून दिलं.नंतर अंग मोडून त्यानं जांभई दिली.त्यासरशी अचानक कुणीतरी धाडकन आपटून खाली फेकावं तसा तो सत्यात आला.
संपूर्ण घर शांत होतं. घरामध्ये त्याच्याशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. पोन्नीअम्मा केव्हाच निघून गेली होती. बाहेर काळाकाळा काळोख दाटला होता. अधेमध्ये वीजा चमकत होत्या तेवढाच काय तो बाहेर लखलखाट. आता याक्षणी बोलायला किमान “मला हे जमलं” हे सांगायलातरी कुणी हवं होतं... तो स्वत:शीच पुटपुटला. आज कितीतरी दिवसांनी त्याला स्वत:च ओढून घेतलेला एकाकीपणा असह्य झाला. पटकन उठून त्यानं सीडीप्लेअर चालू केला, किशोरचं मैं हूं झूम झूम झूमरू अख्ख्या घरात जोरजोरात दणकायला लागलं आणि त्या आवाजानं इतका वेळचा तो सन्नाटा घाबरून निघून गेला. तरी त्याची अस्वस्थता कमी होइला. तो पीसीसमोर बसला, पण तारा ऑनलाईन नव्हती, सानिया ऑनलाईन नव्हती, गुलशन, प्रसादसर, आता या क्षणी कुणीकुणीच ऑनलाईन नव्हतं. हजारच्या वर फ्रेण्डलिस्ट असतान आता याक्षणी त्याच्याशी बोलायला कुणीच नव्हतं. मोबाईल उचलून व्हॉट्सऍपवर आलेले फॉरवर्ड जोक वाचत बसला. पण तो साला एकटेपणा काही कमी होइना.
“घरात कुणीही नाही” तो स्वत:लाच जोरात म्हणाला. घरामध्ये एक हॉल सोडल्यास अजून कसलाही दिवा चालू नव्हता. त्यानं उठून किचन आणि बेडरूममधला दिवा लावला. मघापासून बाहेर जोरात पावसाला सुरूवात झाली होती. वादळाचा धोका काय आहे ते बघायसाठी त्यानं हवामान खात्याची वेबसाईट उघडली. अजून पाच-सहा तासांत वादळ आतल्या भागाकडे सरकण्याची शक्यता होती. पण वादळ इकडं सरकलं नसतं तरीही रात्रभर पाऊस पडणारच होता. बाजूची खिडकी उघडून पाहिली तर पाऊस अजून इतकाहीजोरात नव्हता, हातामध्ये टॉर्चलाईट घेऊन त्यानं दरवाजा उघडला. थोड्याच अंतरावर त्याची इन्स्ट्रुमेण्ट्स ठेवलेली खोली होती. तिथं येऊन त्यानं सर्व काही तपासून पाहिलं. रात्रभर येणार्याअ पावसाच्या दृश्टीनं दरवाजे खिडक्या चेक केल्या. हेड ऑफिसला आवश्यक सिग्नल्स पाठवले. फोन लावून दूर पंचवीस किमीवर असणार्यां स्टेशनवरच्या ऍनालिस्ट लोकांना थोड्याफार सूचना केल्या. त्यां सर्वांनी पण वादळाची सूचना म्हणून बरंचसं काम कमीच केलं होतं.
घरी परत येईपर्यंत पावसाचा जोर बराच वाढला होता. एवढंसं अंतर धावत येताना पण तो चांगलाच भिजला. आत येऊन त्यानं केसांवरचं पाणी टॉवेलनं पुसलं, कपाटामध्ये शोधून जाड टीशर्ट घातला. पावसासोबतच गारवा पण आला होता. एक तर या जंगलामध्ये एरवीपण थंडी असायचीच. सलग पाऊस पडल्यावर तर मग अगदीच कुडकुडवणारी थंडी पडायची. घड्याळामध्ये आताशी साडेसात वाजले होते. त्याच्या टीव्हीवर तमिळ चॅनलशिवाय काहीही दिसलं नसतं. तरी न्युज चॅनल लावून ठेवलं. त्यावर तावातावानं ओरडणारे दोन तीन लोकं (हे बहुतेक राजकारणी या जमातीचे असावेत) दिसले म्हणजे यांच्यापर्यंत वादळाची काहीही बातमी पोचलेली दिसत नव्हती. वैतागून त्यानं टीव्ही बंद केला. “आमच्या गावाला वादळानं झोडपलं तरी जगालाकाही फरक पडत नाही. ऑसम पाऊस आणि वारा!! टाईम फॉर कांदाभजी आणि गरमगरम चा.” त्यानं फेसबूकवर स्टेटस अपडेट केलं. पण त्याचा कांदाभजी वगैरे खाण्याचा त्याहून जास्त बनवायचा, बिल्कुल इरादा नव्हता. किचनमध्ये जाऊन एक ड्रिंक बनवून घेतलं. काचेच्या ग्लासामध्ये ओतलेल्या त्या व्हिस्कीचा त्यानं मोबाईलमध्येच एक फोटो काढला आणि कॉलेजच्या व्हॉटसऍप ग्रूपमध्ये पाठवला. तोपर्यंत त्याच्या कांदेभजीच्या फेसबूक स्टेटसला पंधरा लाईक्स आणि चार कमेंट्स आल्या होत्या. त्या प्रत्येक कमेंटला न वाचताच तो लाईक करत गेला.
हॉलमध्ये येऊन बसला खरा, पण आज खूप दिवसांनी हा एकटेपणा सतवायला लागला. रोजच्या कामच्या धबडग्यामध्ये दिवस कसा सुरू होऊन संपायचा तेच समजायचं नाही. गावामध्ये त्याचं फारसं येणंजाणं नसायचंच. भाषेचा अडसर होताच, शिवाय कुणाशी काय बोलणार? इथल्या ओळखी तीन वर्षांत जेमतेमच राहिल्या होत्या. नाही म्हणायला तो इथं नव्यानं आला तेव्हा त्यानं मुरूगैय्याला दारू आणून द्यायला सांगितली तेव्हा मुरूगैय्यानं “अजून काही खास सोयी हव्या असतील तर त्याही मिळतील” हे डोळे मिचकावत सांगितलं होतंच. भाषेचा कितीही अडसर असला तरी याबाबतीत मात्र समोरच्याला काय हवंय ते लोकांना बरोबर समजत असणार.. त्यानं नको म्हणून तेव्हाच सांगितलं. हो म्हटलं असतं तर मुरूगैय्यानं किमान अंगाखाली झोपण्यासाठी म्हणून काहीतरी सोय करून दिली असती. आज तिच्याशी किमान दोन-चार वाक्यं गप्पा तरी मारता आल्या असत्या. हा विचार त्याच्या मनात आला आणि तो एकटाच हसला. सौम्यासोबत साडेसहा वर्षाच्या अफेअरमध्ये आपण किती अशा उगीचच गप्प्पा मारल्या असतील? आपल्या मनातल्या गोष्टी कितीवेळी तिला सांगितल्या असतील? मुळात त्याचा स्वभावच कमी बोलायचा, गरज असेल तेव्हाच आणि तितकंच. लहानपणी तर सिंधु सतत बोलत असायची आणि तो शांत. इतका की त्याला लोक चक्क मुका समजायचे. सौम्याचं आणि त्याचं अफेअर चालू झाल्यानंतर तो जरातरी बोलायला लागला होता तरीही जास्त नाहीच. तिची आणि आपली विश्वंच इतकी भिन्न होती की दोघामंध्ये बोलण्यासाठी कधीच काही नसायचं. ती सतत बोलायची, काहीबाही सांगायची. तो ऐकायचा, पण कधी स्वत:च्या मनातलं तिला सांगेल.. ते मात्र कधीच शक्य झालं नाही. तरी त्याचं तिच्यावर प्रेम होतं.... पण आता त्याच्या बर्यातचशा गप्पा या ऑनलाईन फ्रेण्ड्ससोबत चालू असाय्च्या. सौम्याशी मारल्या नसतील इतक्या गप्पा रोज तारासोबत व्हायच्या. पण त्या गप्पा वरवरच्याच. काय केलंस जेवलीस का? हे वाच्लंस का ते पाहिलंस का टाईप. स्वत:च्या मनातल्या आतल्या गप्पा कधीच नाही. कुणाचसोबत, एक जय सोडल्यास. पण आता जय त्याच्या व्यापात मग्न होता, सिंधुचा कॉल आला की जय थोडावेळ त्याच्याशी बोलायचा. कामाचं काही असेल तर जरा जास्त. पण आता तसंही जायला तो काय सांगणार होता. त्याला सगळंच माहित होतं. किंबहुना, त्याला एकट्यालाच तर सगळं माहित होतं.
ग्लासमधल्या व्हिस्कीकडे बघत असताना तो स्वत:शीच पुन्हा एकदा पुटपुटला “आपल्याला आत ही रोजची सवय झालिये. रोज दारू प्यायची”. आणि मग हसला. “एवढ्या हळू बोलायची गरज काये? इथं दूरवर आपला आवाज ऐकणारं कुणीही नाही. जोरात बोलणंच काय जीव जातोय म्हणून ओरडलो तरी कुणाला कळायचं नाही. उद्या सकाळी मुरूगैया येईपर्यंत आपण असेच पडून राहू.” यावेळी मात्र तो खरंच जोरात बोलत म्हणाला. “ही पण रोजचीच सवय झालीये, एकट्यानं बडबडायची!”
पीसीसमोर बसून प्रसाद सरांच्या नवीन कवितेच्या जन्माविषयी त्यांनीच स्वत: लिहिलेलं रसास्वाद कम परीक्षण कम कविता कशी वाचावी हे लेक्चर त्यानं वाचत ड्रिंक संपवलं. खरंतर त्याला प्रसाद सरांच्या लिखाणामधलं बरंच काही समजायचं नाही. पण त्यांच्या फेसबूक अवतारानुसार ते मराठीमधले महानोत्तम कवी होते. त्याला वाटायचं की कवी आणि लेखक हे फार हुशार आणि कलाकार मंडळी असतात. म्हणून तो अशा लोकांच्या पोस्ट्स मनोभावे फॉलो करायचा. कवितेमधलं काही समजो वा न समजो तो मन लावून वाचायचाच. ते वाचल्यावर तो बर्या चदा भंजाळायचा. आताही तेच झाल्यावर अजून एक ड्रिंक घ्यावं की नाही या विचारात असतानाच त्याला तारानं पिंग केलं.
“हाय”
तो मेसेज बघताच त्याच्या चेहर्याावर हसू आलं. त्यानं लगेच उत्तर टाईप केलं “हाय. कशी आहेस? दिवसभर ऑनलाईन दिसली नाहीस”
“अरे हो. आज खूप बिझी होते. आता थोडा वेळ मिळाला तेव्हा ऑनलाईन आले. तू बोल”
“मी काय बोलणार? दिवसभर तेच काम तेच रूटिन. तुच सांग. बडे जर्नालिस्ट हो. यहावहा घूमते हो.”
“तुझं टेक्निकल फिल्डमधलं काम जितकं बोरिंग आहे तितकंच माझं पण. आज कुठं फिरायचं नव्हतं, दोन तीन इण्टरव्ह्यु होते. बस. तुझं काय चालू आहे?”
“काही नाही. इकडं आज वादळ आहे त्यामुळे कम्युनिकेशन संध्याकाळपासून डाऊन केलंय. निवांत काम.”
“जेवलास?”
“अजून नाही. तू?”
“मी सातवाजताच जेवते. विसरलास का?” तो विसरणं शक्यच नव्हतं. ताराबद्द्लचे छोटे छोटे डीटेल्स त्याच्या अफाट स्मरणशक्तीमधे केव्हाचेच कोरले गेले होते. तारा अवास्तव हेल्थ फ्रीक होती. पत्रकारितेसारख्या कामामध्ये असूनसुद्धा जेवणाखाण्याच्या वेळा तंतोतंत पाळायची. ही एकेकाळी शाळेमध्ये त्याच्या वर्गात होती, त्यावेळी तो तिच्याशी पाच वर्षामध्ये एक वाक्यदेखील बोलला नसेल. तिच्याशीच काय अख्ख्य वर्गामध्ये तो फारच कुणाशी बोलायचा नाही. कॉलेजमध्ये असताना मग अचानक एके दिवशी क्लासच्या ऑरकुट ग्रूपमध्ये ती दिसली, काहीतरी पेपरमध्ये प्रसिद्ध झालेल्या कविता वगैरे टाकल्या होत्या. आपल्या वर्गामधली एक मुलगी कवयित्री झालीये याचा त्यालाच आभिमान वाटला आणि त्यानं तिला लगेचच फ्रेंड रीक्वेस्ट पाठवून ऍड केलं. तेव्हापासून ती त्याच्या टचमध्ये होती. (प्रसाद सरांच्या मते, अत्यंत चुकीचा वाक्प्रयोग आहे. टच म्हणजे स्पर्श. हजार किमीवर व्हर्च्युअल गप्पा मारल्यावर कसला आलाय डोम्बलाचाटच. फार तर आमच्यात कम्युनिकेशन आहे असं म्हणावं, पण त्याला कम्युनिकेशन म्हटलं की सॅटेलाईट्सचे लॉग्ज डोळ्यांसमोर यायचे. त्यापेक्ष टच म्हटलेलंच बरं. किमान ताराच्या बाबतीततरी.) तर रोज तारासोबत थोडावेळ तरी ऑनलाईन चॅट करणं हा त्याच्या दिनक्रमाचाच एक भाग होता म्हटलं तरी चालेल. त्यानं पुन्हा एकदा तिच्या प्रोफाईल पिकवर नजर फिरवली. प्रत्यक्षात पाहिलेलीशाळेतली लुकडीसुकडी चष्मीस तारा ही नव्हतीच. या नवीन ताराला त्यानं फक्त ऑरकूट- फेसबूकवरच्या फोटोंमध्ये पाहिलं होतं. तिथं जेवढं दिसत होतं त्यावरून तरी तो या तारावर बेहद्द खुश होता, फिटनेसची इतकी काळजी घेतल्यानं तारा जर्नालिस्ट कमी आणि सुपरमॉडेल जास्त वाटायची तेसुद्धा त्या झीरो साईझच्या कांडक्या नव्हे.सगळे ऍसेट्स जागच्याजागी असलेली. तिनं फेसबूकवर अपलोड केलेले फोटो तो कित्येकदा न्याहाळत बसायचा. अर्थात तिच्याशी गप्पा मारण्याचं तेच एक कारण नव्हतं. तिची क्रीएटीव्ह साईड पण त्याला आवडायचीच. गेल्या काही वर्षांमधे तो तिच्याशीच जरा मोकळेपणानं बोलायचा.
“नवीन काही लिहिलंस?” त्यानं विचारलं.
“आज फक्त पोटापाण्यापुरत्या बातम्या लिहिल्या. बाकी काहीही नाही”
“लिहत जा की. तुझ्या कविता मस्त असतात”
“चल, काहीतरीच. बरं, तुझं पीएचडीचं काम कुठवर आलं?”
“चालू आहे. सहामहिन्यांत संपेल. तू रोज रोज विचारलं म्हणून काम लवकर संपणारं नाही.”
तिनं हसरा स्मायली पाठवला. “पाऊस खूप आहे कारे?”
“प्र चं ड! मस्त वारापण सुटलाय.”
“ह्म्म. मला असा पाऊस खूप आवडतो. खास करून रात्रीच्यावेळी”
“मग ये ना इकडे. तुला लिहायला मस्त निवांतपणा आहे”
“आणि राहू कुठं?”
“काहीही विचारतेस? इथं मस्त चांगला चार खोल्यांचा बंगला आहे. शिवाय सगळ्या कामाला नोकर आहेत. दिवसरात्र लिहत बसशील.”
“ह्म्म. जसमीत आणि मी खरंच एखाद्या व्हेकेशनसाठी नक्की येऊ”
एकटीच ये ना, मी पण इथं एकटाच आहे असं त्यानं टाईप केलं. पण सेण्ड मात्र
केलं नाही. उगाच ताराला आवडलं नाही म्हणजे. तिला एक दोन स्मायली उत्तर म्हणून टाईप केल्यावर त्यानं उठून ग्लासमध्ये अजून व्हिस्की ओतून घेतली. पाऊस पडत असताना थोडं जास्त प्यायलं तर काय बिघडलं? तसंही उद्या सिग्नल येईपर्यंत काही काम नव्हतं. मग ताराशी असंच इकडतिकडच्या काहीबाही गप्पा मारत बसला. तिच्याकडं माहितीचा अफाट खजिना होता. त्यात रोजचा संपर्कच बॉलीवूडच्या लोकांशी असल्यानं गॉसिपची काही कमी नसायची. त्याला फारसं काही पिक्चर वगैरे बघायला आवडायचं नाही, पण उद्या तारानं त्याच्यासोबत “कापूस एकाधिकार योजनेमधील त्रुटी आणि त्यावर इशान्य भारतामधील जनतेच्या समस्या” या विषयावर जरी गप्पा मारायच्या ठरवल्या असत्या तरी तो आनंदानं तयार झाला असता. तारा महत्त्वाची. चॅटींगचा विषय कुठला ते नाही. तिला उत्तरं टाईप करत असतानाच डोळ्यांसमोर पूर्णपणे निर्वस्त्र तारा त्याच्या मिठीमध्ये आहे,आणि त्याच्या कानांत काहीबाही कुजबुजत (इथंही कापूस एकाधिकर योजना चालालं असतं. मिठीमधली तारा महत्त्वाची!) गप्पा मारतेय असं दृष्य त्याच्या नजरेसमोर येऊन गेलं.
नेहमीसारखाबरोबर आठ वाजता नेहमीसारखा आईचा फोन आला. फोनची रिंग वाजायला लागल्यावर त्यानं दोन सेकंद थांबून सुस्कारा सोडला, ताराला “१ मिन फोन” टाईप केलं आणि कॉल ऍक्सेप्ट केला.
“बोल.”
“काय अर्णव? एक दिवस मी फोन केला नाहीतर तुला करता येत नाही का? टीव्हीवर काय ते वादळाचं दाखवत आहेत... ते वादळ तुझ्या भागात कुठं आलंय का?”
“नाही. आमच्याकडं फक्त रात्रभर वारा आणि पाऊस.. तू बोल.” आपला आवाज शक्य तितका नॉर्मल येईल याची काळजी घेतल्यासारखा तो बोलत होता. तशीपण अजून इतकी काही चढलेली नव्हती.
“मी ठिक आहे. तुझीच काळजी लागली होती. वार्याढपावसाचा घराबाहेर पडू नकोस. काय तरी जंगलामध्ये असल्यासारखा आहेस. जेवलास का?”
“नाही. आता घेतच होतो. ताट... ताट वाढून घेत होतो.”
“अर्णव..” आईचा जरबीचा आवाज ऐकू आल्यासरशी तो जागच्या जागी नीट बसला. आज नाटक पकडलं गेलं होतं. “प्यायलास का?”
“नाही गं. रोज रोज काय...”
“मग आवाज असा का येतोय?”
“पाऊस आहे इथं. त्या पावसाच्या आवाजानं तसं ऐकू येतंय...” त्यानं उगाच सारवासारव केली. काही गरज नसताना, आपण पकडलो गेलोय हे चांगलंच माहित असूनपण.
“बाळा, असं करू नकोस रे. एक तर इतक्या लांब अडनीड गावामध्ये आहेस. हल्ली रोज तुला या वेळेला फोन केल्यावर तू प्यायलास हे लक्षात येतंय” त्यानं पलिकडे स्वत:च्या कपाळावर हात मारून घेतला, आधी का सुचलं नाही. यापुढं प्यायचंच झालं तर आईचा फोन येऊन गेल्यावर, त्यानं मनातच एक नोट बनवून त्यावर नोंदवलं. सिम्पल.
“आई, उगाच ड्रामा करू नकोस. रोज काही पित नाही. साईटवरून घरी यायलाच नऊ वाजतात. आज वादळाची वॉर्निंग आहे, म्हणून कम्युनिकेशन डाऊन आहे. सो आय ऍम ऍट होम. संध्याकाळभर अभ्यास करत होतो. आता जेवेन आणि झोपेन..” तो आवाजामध्ये जास्तीत जास्त वैताग आणत म्हणाला.
“तुला दिप्तीवहिनीनं एक मेल केलंय ते पाहिलंस का?”
त्यानं मेल पाहिलं होतं आणि लगेच डीलीट पण केलं होतं. “नाही”
“चेक कर. पुण्याची मुलगी आहे. एम. कॉम पर्यंत शिकली आहे. युनिव्हर्सीटी टॉपर आहे. तुझ्या हुशारीला शोभून दिसेल अशी आहे. गायनाच्या परीक्षा दिल्यात. शिवाय नोकरी करायचीच अशी काही हौस नाही. तुझ्यासोबत तिकडं तमिळनाडूत पण ऍडजस्ट करेन म्हणाली.”
“तुमचं सगळंच ठरवून झालंय का?”
“तसं नाही रे. तू हो म्हटल्याशिवाय आम्ही पुढं कसं बोलणार? हे बघ, मला दररोज तेच तेच बोलायचा कंटाळा आलाय. चार वर्षं झालीत. किती दिवस त्या जंगलात एकटा राहणार आहेस? तुझ्या वर्गामधले सगळे युरोप अमेरिकेला सेटल झाले. करोडोंमध्ये कमवायला लागले. पैशाचं जाऊ देत, तुझापण पगार चांगलाच आहे. पण एकटा किती दिवस राहशील...”
“आई, खरंच नको ना. रोज तुला तेच तेच बोलायचा कंटाळा येतो. तेच मला ऐकायचा पण कंटाळा येतो. कशाला ही असली स्थळं वगैरे शोधत बसतेस. एकदा सांगितलं ना, मला लग्न करायचं नाही. सध्यातरी.” तो एक एक शब्द सावकाश उच्चारत म्हणाला. कितीही चिडलेला असला तरी आवाजाची पट्टी एक कण वर न सरकवता बोलायची त्याला सवय होती.. “आणि हे असं ठरवून वगैरे तर बिल्कुल नाही...”
पण पलिकडॆ आईला त्याचा संताप जाणवलेला असणार. “अरे मग, लव्ह मॅरेज करायचं असेल तर तिथं जंगलात राहून कसं चालेल? इकडं ये. इथं तुला कोण तरी भेटेल किमान. तिथं कोण आहे?” ती उगाचच हसत म्हणाली. तिला शक्य असेल तितका विषय हलकेपणानं घ्यायचा होता.
“लव्ह मॅरेज? एकदा झाला तो तमाशा पुरेसा नाही झाला का?” त्याच्या आवाजामधील हताशपणा आईलादेखील जाणवला असणार.“थोडे दिवस तरी सुखानं जगू देत ना आई!”
आईचा आवाज लगेच गंभीर झाला.“तुझी काळजी वाटते रे. खरंतर मी आयुष्यभर सिंधुची काळजी केली...तिचं कसं होइल म्हणून. तुझ्याबाबतीत कायम निर्धास्तच होते.तुम्ही दोघं जुळी भावंडं, ती लहानपणापासून थोडी अशक्त, अभ्यासात थोडी मागे. तुझी तसली चिंता कधीच नव्हती.पण आता बघ. तिचं सगळं नीट चालू आहे.. लग्न संसार मुलं सगळं व्यवस्थित. जयसारखा चांगला नवरा मिळाला. पण तू... काय करू रे मी? मनातली गोष्ट कधी घडाघडा बोलत नाहीस. इतक्या वर्षांनीसुद्धा नाही.तुला कसं सावरू तेच मला कळत नाहीये. एकट्यानं जगणं वाटतं तेवढं सोपं नसतं. मी अनुभवलंय.... तुझे बाबा गेल्यानंतर... पण मला तुमच्या दोघांचा आधार होता...” आईच्या आवाजातली चिंता त्याला जाणवत होती, तिचा आवाज भरून आलाय हेही समजत होतं तरी त्यानं काही न बोलता फोन बंद केला.
दोन मिनिटं तो तसाच खुर्चीत बसून राहिला. मनामध्ये फक्त आणि फक्त संताप दाटून आला. आईचं म्हणणं समजत नव्हतं अशातला भाग नव्हता. त्यानं दिल्ली- मुंबई सोडून इथं बदली मागून घेतली, इथंच एकट्यानं रहायचं ठरवलं त्यावेळी ती जास्त काही बोलली नाही. तिच्या मते एक-दोन वर्षात सगळं नीट होइल. पण तसं घडलं नव्हतं... उलट तो इथंच जास्त रुळला होता. “अर्णव, तुला एकट्यानं रहायची सवय झालीये” तो परत एकटाच बडबडला. “माणसांत जावंसंच वाटत नाहीये. तुला लवकरच वेड लागेल” तो हसला. तारा ऑफलाईन दिसत होती. किचनमध्ये जाऊन त्यानं ताट वाढून घेतलं.
हॉलमध्ये येऊन पीसीसमोर बसला. युट्युबवर नवीन येणार्याु पिक्चरचे ट्रेलर एकामागोमाग बघत बघत जेवायला लागला. जेवण अर्धवट झालं होतं तेव्हा स्काईपवर कॉल आला. “गूड मॉर्निंग सिंधु” त्यानं वेबकॅम चालू करत म्हटलं.
“गूड मॉर्निंग.” समोरच्या स्क्रीनवर नुकतीच झोपेतून उठलेली त्याचीबहिण बसली होती. “काय चालूये?”
“नथिंग. जेवत होतो. तू मागच्या आठवड्यापेक्षा जाड दिसतेस... दुर्वा कशी आहे? आणि जय?”
“मी ठिक आहे रे!” सिंधुच्या पाठीमागून जयचा आवाज आला. “सालेसाब, आप कैसे हो?”
“ठिक. बोल गं” तो बहिणीला म्हणाला.
“आईचा जस्ट फोन आला होता” ती हाताची घडी घालून अगदी गंभीरपणं म्हणाली. “तुमची खरडपट्टी काढायची आज्ञा झाली आहे.”
“तू बोल. मी ऐकतो” तो खाताखाताच म्हणाला.
“म्हणजे इकडून तिकडून गेले वारे.”
“तरी तुम्ही नळ्या फुंकायचं सोडणार आहात का? बोला.”
“अर्णव. आईला तुझी काळजी आहे. माझ्या बाळंतपणाला येण्यासाठी पण तिनं नाही म्हणून सांगितलं. मी हजारदा ये म्हणून सांगून पण”
“त्यातलं लॉजिक काय आहे? मी इथं मुंबईपासून हजार किमीवर आहे. ती मुंबईत असली काय आणी युएसमध्ये असती तरी काय फरक पडतो? मी तिला जाऊ नको म्हटलेलं नाही. उलट तुला तिथं सोयिस्कर पडेल म्हणून जा हे कायम सांगितलंय.”
“हो ना? मला इथं सोयीचं पडेल ना? मग तिला घेऊन तूच येना. तिची चिंतापण मिटेल. तुलापण थोडा चेंज होइल.”
“पीएचडीचं सबमिशन आहे.”
“तू नं नुसती कारणं देत रहा. सबमिशन अजून चार महिन्यांनी केलं तरी चालेल हे माहित असूनसुद्धा खोटं बोल” यावेळी सिंधु चांगलीच चिडली. “तिथं आईचा जीव किती जळतोय याची तुला जरातरी कल्पना आहे? काय मिळतं रे तुला असं वागून? आं? सगळ्यांनी तुलाच समजून घ्यायचं? तुझ्याच तालावर नाचायचं? आई काय जगावेगळं मागतेय का? लग्न नसेल करायचं तर करू नकोस. पण किमान तिच्या समाधानाखातर तरी मुली बघ”
“काय दुकानांत मांडलेल्या वस्तू आहेत विंडो शॉपिंग करायला. नॉट इंटरेस्टेड. हेच आणि हेच उत्तर कायम आहे” तिच्या चढलेल्या आवाजाला त्यानं तितक्याश शांतपणे उत्तर दिलं.. तिचा चढलेला आवाज ऐकून बाहेरच्या खोलीत गेलेला जय येऊन सिंधुच्या बाजूला येऊन बसला.
“काम डाऊन यार. सिंधु, जरा हळू बोल. दुर्वा उठेल. आणि अर्णव, तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. ती हल्ली अशीच चिडका डब्बा झालीये.” लागलेल्या आगीवर पाणी मारायच्या उद्देशानं तो म्हणाला. “तिकडं आमच्या सासूबाई टेन्शन घेणार आणि त्यावरून या बाईसाहेब टेन्शन घेणार...”
“दोघी मिळून माझ्यावर हल्ला करतायत. तिचा फोन झाला नाही की हिचा इथं कॉल!”
जय हसला. “अरे, तू तितक्या लांब तरी आहेस.. इथं माझ्यावर तर पावलापावलाला हल्ले होतात. जिणं मुश्किल केलंय... अजून दोन महिने प्रेग्नन्सी आणि नंतरचं बाळंतपण. शिवाय दुर्वाला मीच बघायला हवं. सगळं झेलायला मी एकटाच...”
तोपण हसला. “तुला जमेल रे. ही सिंधु जरा समजूतदारपणाने वागेल तर...”
“ह्या! काय तर फार अनुभवी माणसासारखा सल्ले देतोस.” सिंधु मध्येच म्हणाली. “म्हणे आताही जमेल. दुर्वाच्या वेळी आई आली होती. तिची किती मदत झाली माहिताय.. यावेळी फक्त तुझ्या आडमुठेपणामुळं ती येत नाही. समजलं?” ती परत ओरडली. त्यानं काही न बोलता ताटातला घास उचलून खाल्ला. त्याचा शांतपणा बघून ती अजूनच चिडली. “अर्णव. मी तुझ्याशी बोलतेय. मला उत्तर दे.”
“मी काय बोलू? मी आईला जाऊ नको सांगितलेलं नाही. याआधी मला सोडून ती कधीच तिकडं गेली नाही असं पण नाही. मी काय कुक्कुलं बाळ आहे असं पण नाही. मी एकटा इथं व्यवस्थित मॅनेज करतोय. सध्या पीएचडी कंप्लीट होइपर्यंत लग्नाचा विचार नको असं हात जोडून सांगून झालंय. त्यानंतर आपण विचार करू असं सांगितलंय. पण रोज कुठल्याना कुठल्या मुलीचे फोटो मला मेल करणं आणि पत्रिका पाठवणं यानं मला चिडीला आणणं याखेरीज काय साध्य होतंय?”
सिंधु स्क्रीनकडे एकटक बघत होती. “आई म्हणते ते खोटं नाहीये. मी स्वत: मघापासून ऑब्झर्व करतेय. यु आर ड्रंक. किती नाटक केलंस तरी मला इथं माझ्या डोळ्यांना दिसतंय.” त्यानं हातातलं ताट खाली ठेवलं. “सिंधु, जस्ट ट्राय टू अंडरस्टॅण्ड.”
“नो. आय ऍम डन. आम्ही सर्वजण तुला समजून घेण्याच्या पलिकडे गेलोय. आता तुला ठरवायचं आहे काय करायचं ते. तुला एकट्यानं आयुष्य काढणं आता फार गंमतीचं एंजॉयमेंटचं वाटत असेल पण ते तसं नसतं. यु नीड समबडी इन युअर लाईफ. मी काय आईसारखं आज-उद्या लग्नच कर असं म्हणत नाहीये... अफेअर कर. प्रेमात पड. कुठेतरी फिरायला जा. कुठंतरी एंजॉय करायला जा. माणसांसारखा वागत जा.”
“सिंधु, आता बास” पाठीमागून जयचा आवाज आला. “जास्त बोलू नकोस” तो हळूच तिला म्हणाला. "दूर्वा उठली का बघ" मग वेब कॅमकडे बघून हस्त म्हणाला. “और अर्णव.. काम कसं चालू आहे ते सांग. तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला?”
“आज कम्युनिकेशन डाऊन आहे. वादळाची वॉर्निंग आहे. आणि....रीडींच चुकली आहेत. डेटा गडबडलाय, पण मघाश्हीच एक आयडीया आली आहे, तसं करून पाहिलं तर... मी तुला ते सगळ्या नोट्स मेल करतो. बघ आणि सांग. नेक्स्ट वीक दिल्लीला जातोय, तिथं रेपोर्ट सबमिट करायच्या आधी टेस्टींग करायचंय...” दोन क्षण थांबून तो म्हणाला “प्लीज आई आणि सिंधुला सम्जाव ना. कितीवेळा सांगू, मला लग्नच करायचं नाही, नकोच झालंय सगळं”
“अर्णव मी परत सांगतो. जे झालं ते विसर. त्या गोष्टी जुन्या झाल्यात. इक्डं येतोस का? इथं तुझ्या फिल्डसाठी परफेक्ट जॉब्स आहेत. आम्ही दोघं आहोत. काकीपण येतील. सगळेच एकत्र राहू. विसर आधीचं”
“पण मला विसरायचंच नाहीये” तो म्हणाला “काही गोष्टी आयुष्यामधे न विसरणंच चांगलं असतं.”
“किती दिवस एकटा राहणार आहेस? अर्णव आय ऍन नॉट अगेन्स्ट एनीथिंग. इन फॅक्ट, आय नो तुला तिथं काम करणं आवडतंय. तुला त्या ब्रेकपमधून रीक्व्हर होण्यासाठी वेळ हवा होता, पण आता चार वर्षं झाली. इट्स ओव्हर. ड्रिंक्स वगरे घेण्याबद्दल तर मला बोलायचा हक्कच नाही आफ्टर ऑल पहिलं ड्रिंक तू माझ्यासोबत घेतलंस. माझा चेला आहेस. पण तरी तुला समजतंय ना, की तू रेग्युलर होत चालला आहेस. दॅट्स नॉट अ गूड थिंग. आयुष्यात प्रत्येकाला काहीनाकाही त्रास असतोच...”
“जय, मी इथं राहतोय कारण मला हे काम आवडतंय कुनापासून पळण्यासाठी अथवा कुणावर चिडून मी इथं अराहत नाहीये.जर प्रत्येक दान मनासारखं पडत गेलं अस्तं तरीही कदाचित मी लग्नानंतर इथं येऊन राहिलो असतो. दिस इज माय पॅशन”
“आय नो, अर्णव. मी त्याबद्दल बोलतोय का? पण तू दिवसेंदिवस माणूसघाणा होत चालला आहेस हे तरी कबूल आहे ना?”
“जय, क्मॉन. मी आधी फार सोशल ऍनिमल होतो आणि आता एकदम घुमडतोंड्या झालोय का?”
“तुला लहानपणापासून ओळखतोय. म्हणूनच... तुझ्या बहिणीचा नवरा म्हणून अन्व्हे तर तुझा बेस्ट फ्रेंड म्हणून सांगतोय. दिस इज नॉट यु. तू फारसा लोकांमध्ये रमणारा नाहीस. सोशन ऍनिमल नाहीस पण तरी हा भलत्याच विश्वामध्ये रमलेला अर्णवसुद्धा तू नाहीस. तुला खरंच जाणवत नाही का? डू यु रीअलाईझ गेल्या चार वर्षांत तू फक्त तीनदा घरी गेलास. काकी तिकडे आली होती, तेही तुला आवडलं नाही. महिनाबह्र रहायच्याऐवजी आठदिवसांत परत गेली. कुणाशीच अगदी कुणाशीच तुझा संपर्क नाही. शाळाकॉलेजमधल्या मित्रांशीसुद्धा नाही. नातेवाईकांशी नाही. चोवीस तास त्या फेसबूकवर पडीक असतोस.. पण तुझ्या सख्ख्या मामेभावाचा अपघत झाला तेव्हा फोन करून खुशाली विचारली नाहीस. हे सर्व तुलाच विचित्र वाटत नाही का? निव्वळ एकटाच राहिला असतास तर इतकी चिंता वाटली नसती. पण तू ऑनलाईन आरामात मजा करत असतोस आणि प्रत्यक्षत कुणाशीच बोलत नाहीस. दॅट्स द प्रॉब्लेम सालेसाब. आपल्या कॉलेजच्या रीयुनियनला पण तू जाणार नाहीस. सिंधुची डीलीव्हरी नसती तर मी आलो असतो, पण तू इंडियात असून जाणार नाहीस. काय कारण?”
तो काही न बोलता शांत बसला. त्याचा चेहरा बघून जय स्वत:च पुढे म्हणाला. “मला समजतंय. जगात कुणाचे ब्रेकप होतच नाहीत का? लोक प्रश्न विचारतील, विनोद करतीस. हसतील म्हणून आपण चार लोकांत जायचंच नाही का? घरी असं एकलकोंड्यासारखं बसून इंटरनेट ऍडिक्ट व्हायचं का? तसंही...”
“मी कसलाच ऍडिक्ट नाही. टाईमपास म्हणून थोडावेळ..”
“ओह रीअली? चोवीस तासांत तुझा हा टाईमपास किती वेळ चालतो ते तरी मला समजू देत. इथं दिवसभर मला ऑनलाईन दिसतोस. रात्रीतर असतोसच. अर्णव, जागा हो. दिस इज नॉट रीअल वर्ल्ड. लोकांनी लिहिलंय ते वाचत बसणं, त्यावर कमेंट करत बसणं. त्यावरून वादविवाद घालणं अनोळखी लोकांशी चॅटवर गप्पा मारणं इज नॉट अ रीअल थिंग. सगळंच आभासी आहे. तिथं रीअल अर्णवला कुणी ओळखत नाही, आम्ही ओळखतो. आय नो व्हॉट यु हॅव गॉन थ्रू. त्या जगामध्ये तुला इतकं गुंतून चालणार नाही, कुठल्याही माणसाला कम्युनिकेशनची भूक असते, आहार झोप आणि सेक्स इतकंच कम्युनिकेशन आपल्याला गरजेचं आहे पण हा खोटा संवाद...”
“एक मिनिट जय. जी गोष्ट तुला रीअल वाटत नाही, ती माझ्यासाठी पण रीअल का नसेल? लूक ऍट यु तू स्वत: हायपोथेसिसवर कामं करतोस. अशा गोष्टी ज्या आज रीअल नाहीत किंवा बहुतेकांसाठी रीअल नाहीत पण त्यांना तुझ्यालेखी अस्तित्व आहे. सेम थिंग अप्लाईज हीअर. तुझ्यासाठी माझं हे आभासी जग सोशल मीडीया वगैरे रीलेव्हंट नसेल पण माझ्यासाठी ते आहे. माझी कम्युनिकेशनची सो कॉल्ड भूक इथे भागतेय. मला खरी माणसं माझ्या आजूबाजूला नकोत. माझा दम घुसमटतो. इथं मी या माझ्या राज्यामध्ये सुखी आहे. इथं अर्णव एकटाच का राहतो आणि त्याचं लग्न का मोडलं हे कुणीच विचारत नाही. मी कुणालाच ऎन्सरेबल नाही. आणि आता मला असंच जगाय्चं आहे.” तो वैतागून बोलत सुटला. अधलेमधले शब्द बरळले जात होते, पण गेल्या चार वर्षांमध्ये तो पहिल्यांदाच इतका संतापलेला होता. पण त्यानं कसाबसा स्वत: वर कंट्रोल मिळवला. शेवटी तो हताश होऊन म्हणाला “जय लोकं ह्सतात मला. लग्नाला महिना उरला होता. तुला कारण माहित आहे तरीही... मी आई आणि सिंधुला तर सांगू शकत नाही. त्यांना तूच सम्जाव. तू किमान मला समजून घेऊ शकतोस ना... यु नो, इट्स नेव्हर बीन इजी...” डोळ्यांतलं पाणी आज त्यानं लपवलं नाही, नकळ्त त्यानं हात पुढे केला, आणि मग त्याच्या लक्षात आलं, समोर स्क्रीन आहे, मित्र फार दूर आहे.
“अर्णव, दॅट इज पास्ट” जय परत समजावत म्हणाला. “तो चाप्टर कधीच क्लोज झालाय, तुला कुणीही हसत नाहिये. जे घडलं त्यात तुझी चूक काहीच नव्हती. शी वॉज अ बिच. ती तुझ्यालायकच नव्हती. फ़र्गेट अबाऊट इट, तू त्तिथून खूप पुढे आला आहेस. जे झालं ते झालं. कदाचित चांगल्यासाठीच. त्या एका गोष्टीमुळे मी तुला तुझं आयुष्य बरबाद करू देणार नाही. तू खरंच ये इकडे. मी पण कंटाळलोय. एकुलता मित्र आहेस तू माझा.” अर्णव काही उत्तर द्यायच्या आधी विषय बदलत तो म्हणाला, “लग्न करू नकोस. मी त्यासाठी अजिबात म्हणत नाही, मी तुझ्या बहिणीसोबत इतक्या लव्कर लग्न करून पस्तावलोच आहे ना.. पण यार आता बास. एखादी पोरगी पटव. लाईफ तरी एंजॉय कर. पॉर्न मोव्हेज देखना और खुदखुशी करना सालेसाब ये भी कोइ लाईफ है? जवानी बरबाद कर रहे हो..” अर्णवनं हातातला घास परत ताटात ठेवला.
“कमॉन, माझी इतकी पण वाईट अवस्था नाही..” तरी त्याच्या चेहर्याीवर हसू आलंच.
“काय अवस्था वाईट नाही,, साल्या, तीन वर्षं झाली तुला त्या जंगलात जाऊन. बाईचं नख तरी दिसतंय़ का? टोटल उपवास. इथं माझी बायको प्रेग्नंट आहे म्हणून मी कासावीस. कधी एकदा हिचं बाळंतपण..” परत एकदा तो आणि अर्णव कॉलेजमधले मित्र असल्यासारखे बोलत होते.
“डूड. स्टॉप यु आर टॉकिंग अबाऊट माय सिस्टर”
“येस्स,” त्याचं हसणं बघून जयच्या चेहर्याेवर समाधान आलं. “तिनं चुकून ऐकलं तर डायरेक्ट मर्डरच होइल” तो बोलत असतानाच त्याच्या मांडीवर अडीच वर्षाची लेक डोळे चोळत येऊन बसली. “दुर्वा! कशी आहेस?” त्यानं विचारलं. तिनं डोळे किलकिले करून स्क्रीनकडे पाहिलं. “अल्नवमामा” ती हात दाखवून म्हणाली.
“गूड मॉर्निंग, मेरा बाबल्ला बच्चा. तुला अल्नवमामानं बूक्स पाठवली ती आवडली का? अजून पाठवू?”
“तू तिच्याशी बोलून विषय बदलू नकोस.” परत खोलीत आलेली सिंधु म्हणाली. “आईला फोन कर. सॉरी म्हण. ती ज्या मुलीबद्दल बोलतेय ते सगळं एकदा बघून घे. आणि फटके देईन तुला. पुस्तकं काय पाठवतोस. लेकरू दोन वर्षाची झाली तरी एकदाही तिला भेटलेला नाहीस. स्काईपवर गप्पा मारणं म्हणजे भेटणं नव्हे. खबरदार तिला परत पुस्तकं पाठवलीस तर... घराची लायब्ररी केली आहेस. दुर्वा म्हणते अल्नवमामा लॅपटॉपमध्ये राहतो. जरा प्रत्यक्ष येऊन तिला दाखव हाडामांसाचा मामा कसा दिसतो ते. इकडं ये,आणि दोन्ही भाच्यांची मामेगिरी कर. ऐकलंस ना?”
“येस. सिंधु! मी ट्राय करेन आणि आईशी पण बोलेन. आता मी कट करतोय. पाऊस खूप वाढलाय. बाय. लव्ह यु”
त्यानं वेबकॅम ऑफ केला. तारानं त्याला मघाशी कधीतरी “हाय” केलं होतं. त्यानं लगेच तिला उत्तर टाईप केलं. मग किचनमध्ये जाऊन थोडा भात वाढून घेतला. बाहेर मघाशी झिमझिम चालू असलेला पाऊस आता जोरात कोसळत होता. दूरवर कुणाच्यातरी शेताच्या बांधावर असलेले माड वेडेवाकडे हालताना दिसत होते.किचनची किंचित उघडी असलेली खिडकी त्यानं बंद केली. तो परत हॉलमध्ये पीसीसमोर येऊन बसला. फेसबूकवर कोणीतरी दोघं कशावरून तरी पेटलेले होते. मूळ विषय कसलातरी राजकारणावरून होता. पण आता ते राजकारण चुलीत गेलं होतं आणि दोघं एकमेकांची पक्ष, जात, धर्म, गाव, राज्य, इतकंच काय पण आईबापबहिण भाऊ काढण्यामध्ये गुंतले होते. दीडशेच्या वर कमेंट्स पोचल्या होत्या. नळावरची भांडणं मन लावून ऐकावीत तसं त्यानं ते अख्खं पोस्ट वाचून काढलं. “लोकं इतकं निगेटीव्ह विचार करूच कसा शकतात?” त्यानं स्वत:लाच प्रश्न केला आणि मग त्याच्या कॉलेजच्या ग्रूपमध्ये गेला. तिथं काही खास चालू नव्हतं, उगाच कुणीतरी बॅंकेच्या क्लार्क पोस्टसाठी आलेली जाहिरात पेस्ट करून ठेवली होती. त्यावर त्यानं “चलो इंजीनीअर ना सही, क्लार्क जरूर बनेंगे” अशी एक वायफळ कमेंट टाकली. मग एका फिल्मी ग्रूपमध्ये कुणीतरी लिहिलेलं नवीन चित्रपटाचं परीक्षण वाचत बसला. तेवढ्यात ताराचा रीप्लाय आला.
“ऐक ना, मला चेरी ऑन द केक साठी भाषांतर हवंय. थोडं सिमिलर. तुला काही सुचलं तर पटकन सांग”
त्यानं लगेच “दुधात साखर चालेल?” असं उत्तर लिहिलं.
“ओह. दॅट्स परफेक्ट. जस्ट परफेक्ट. नेक्स्ट टाईम भेटलो की माझ्याकडून तुला चॉकलेट”
“केक पण चालेल” त्यानं डोळा मारणारा स्मायली पाठवला.
तिनं हसरा स्मायली पाठवला. “पण आपण भेटायचं ना? यावेळी मुंबईमध्ये आलास की आपण नक्की भेटूया”
तुझा बॉयफ्रेण्डशी ब्रेकप झालेला कळव, मी लगेच मुंबईला येतो तो मनातच म्हणाला. पण टाईप करताना मात्र त्यानं लिहिलं. “नक्कीच. बाय द वे, कालचं तुझं आर्टिकल वेळ मिळाला नाही म्हणून आज सकाळी वाचलं. मस्त लिहिलं आहेस”
“थॅंक्स.”
तो पुढं काहीतरी उत्तर देणार तेवढ्यात दारावरची बेल ऐकू आली. घड्याळात रात्रीचे साडेदहा वाजले होते. रात्रीएवढ्या वादळांत त्याच्या घरी कुणीही येण्याची शक्यता नव्हती. त्यानं टेबलावर ठेवलेला टॉर्च हातात घेतला.
“कोण आहे?” त्यानं दार उघडायच्या आधी जोरात विचारलं. मग कपाळावर हात मारून घेतला “यारदु?” असं तमिळमधून विचारलं.
बाहेरून कुणी काही उत्तर दिलं असतं तरी याला ऐकू आलं नसतं इतका पाऊस पडत होता. बेल परत एकदा वाजली. यावेळी बाहेर कुणीतरी चोर दरोडेखोर असायची शक्यता कमी आणि पावसानं भिजून त्याच्याकडं आडोश्याला आल्याची शक्यता जास्त. त्यानं दार उघडलं. त्याला वाटलंच होतं तसं बाहेर मिट्ट काळोखामध्ये कुणीतरी रेनकोटमधूनदेखील नखशिखांत भिजून उभं होतं.स्पर्श (भाग २)

No comments:

Post a Comment