Friday, 12 May 2017

ये मोह मोह के धागे!


ये मोह मोह के धागे... 
.
.
.
खूप दिवसांनी असं काहीतरी ऐकलं. जीवाला गुंतवावं असं... कसा जीव गुंतला होता, नाजुक नाजुक दोर्यांअच्या वेढ्यांमध्ये. धागे सोडवावेत तरी कसे, थोडे माझ्या हातात, थोडे तुझ्या हातात. एकमेकांना स्पर्श न करता सोडवणं अशक्य... तू तिथं दूर मी इथं कुठंतरी. तरीपण एकमेकांच्या बोटांमधले गुंतलेले काहीतरी अनामिक, अपूर्ण, अर्धवट!
आजही कितीकवेळा हा अर्धवट शब्द आठवला की हमखास तुझी आठवण येते. माझ्या डोक्यात किंचित टपली मारून तू म्हणायचास, “अर्धवटच राहशील!” - तुझ्याखेरीज मी अर्धवट राहिलेच. तुझ्या गमतीत म्हटलेल्या त्या शब्दांनी स्वत:ला इतकं खरं करून दाखवलं , पण डोळ्यांत पाणी आणत म्हटलेल्या “तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही” याशब्दांनी मात्र स्वत:लाच इतकं खोटं करून दाखवल. जगलोच की आपण. कितीवर्षं झाली... आठवतदेखील नाहीत इतकी. पण तरी जगलोच. मेलो नाहीच. 
तेरी उंगलियोंसे जा उलझे..
नक्की कधी ठरवलं तू आणि मी प्रेमात पडल्याचं. खूप वेळेला आठवतेय. आठवतेय. तसं बरंच बाकीचं काहीबाही आठवत राहतं. मी पावसांत चिंब भिजून तुझ्या घरी आले तेव्हा तू केलेली बिनासाखरेची कॉफी, मला तुझं अक्षर वाचता येत नाही म्हणून तू टाईप करून दिलेल्या नोट्स- (तो जुना टाईपरायटर आहे का रे अजून?) कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या गॅदरिंगला आयुष्यात पहिल्यांदाच मी साडी नेसणार म्हणून बाईकऐवजी रिक्षा घेऊन आलेला तू (तुला अजूनही रिक्षा चालवता येते का रे?) पाहिलंस, आठवायला गेलं की लोकरीचा गुंडा हातातून खाली पडावा आणि खोलीभर सैरावैरा पळावा तश्या या आठवणी पळायला लागतात पण काही केलं तरी हातात येतच नाहीत. मी तुझ्या प्रेमात नक्की कधी पडले तो क्षण आठवत नाहीच... आठवतात हे असलेच काहीतरी कातिलाना क्षण. 
कोई टोह टोह ना लागे... 
खरंच आहे ना... कधी समजलंच नाही आपल्याला. हे गुंते सोडवायचे कसे. मुळात सोडवायचे कशाला... आपण अडकत गेलो. तू माझ्यामध्ये. मी तुझ्यामध्ये. नात्याला कसलंही भविष्य नाही हे लख्ख ठाऊक असताना! कशापायी? आकर्षण कसलं होतं. शारीरिक तर नक्कीच नाही. इतक्या वर्षांची आपली ओळख. त्या दरम्यान जे आकर्षण कधी वाटलं नाही ... मग अचानक कसं काय बदललं. तुझे आणि माझे रस्ते इतके वेगवेगळे आहेत हे माहित असूनसुद्धा... कशामुळे कधीच समजलं नाही. 
किस तरह गिरह ये सुलझे... 
गिरह म्हणजे गाठीच ना? तूच सांगितलेला अर्थ. एकमेकांशी आपली जन्माची गाठ आहे असं काहीतरी म्हणाला होतास.. कसली विचित्र गाठ आहे ही. जन्माचीच नव्हे तर मृत्यूचीसुद्धा. दोघांच्या मृत्यूनंतर कदाचित सुटेल. त्यात परत मृत्यूपश्चात काय जीवन असलंच तर तिथं परत आपली गाठ पडेल का? बापरे! आता इतक्यात नको तो विचार. आता आहे त्याच गाठी निस्तरणं होत नाहीये. हे गुंते फार हलक्या हातानं सोडवावं लागतात. जमेल का मला? कदाचित नाही. माझा स्वभावच तिरसट. हे असलं हलक्या नाजुक गोष्टींचं काम तुझं. मला समजून उमजून वागणारा तूच. ऑफिसातून आल्यावर केवळ माझ्या बेल वाजवण्यामधून तुला समजायचं की आज माझा मूड कसा आहे... त्याच्याउलट मी, तू समोर बसून मला काहीबाही सांगतानासुद्धा मला समजायचं नाही तुला नक्की काय म्हणायचं आहे ते. तू मला अति समजून घेतलंस. मी तुला समजून घेतलंच नाही. मग गाठी अडकतच गेल्या. अधिकाधिक निगरगट्ट होत गेल्याच...
है रोम रोम इकतारा बादलोंमे से गुजरे... 
आठवतंय का काही? घाटामध्ये बाईक घेऊन फिरत होतो. तुफान पाऊस पडत होता. संध्याकाळ होत आली असेल. रात्र चढायच्या आत घरी पोचायचं होतं. पावसानं इतकं भिजवलं होतं, की मला तर वाटायला लागलं की मी पाऊसच आहे. टप्प टप्प थेंब अंगावर पडत होते. केसांखांद्यावरून ओघळत होते. थंडी तर वाजत होती. घाट चढून वर आलो, इतकावेळ सोबत असलेला सूर्यमहाराज टाटा बाय करून त्यांच्या घरी गेले. रस्ता सुनसान होता. पाऊस किंचित कमी झाला. पण घाट सगळा फिकुळ पांढरलेला होता. “काय ऑस्सम ढग उतरलेत” तू मला म्हणालास. “हो ना. सावकाश चालव हां. समोरून गाडी आलेली दिसणार नाही इतक्या धुक्यात” 
“तू अतिशय अनरोमॅन्टिक बाई आहेस” किंचित वैतागून म्हणालास. 
तुझ्या रोमान्सच्या कल्पना मला कधीच झेपल्या नाहीत. एकमेकांना फुलं, फुगे, चॉकोलट्स देणं यातून कसला डोंबलाचा रोमान्स होतो रे? तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी आहोत हा विचार असला तरीही ते तितकंच आणि तेवढंच पुरेसं आहे असं मला वाटायचं. आता हल्ली तुझ्या त्याच रोमॅन्टिक आठवणींनी माझेच डोळे भरून येतात. 
हायवेला एक टपरीवाला उभा होतो. चहा घ्यायचा म्हणून थांबलो. दरी ढगांनी वेढलेली होती. वाटत होतं या रस्त्याच्या बाजूला कुणी मऊमलमली समुद्र अंथरून टाकलाय. कापसाची दुलई टाकल्यासारखे ते ढग आणि त्या ढगांमध्ये तू आणि मी. 
तू होगा जरा पागल तुने मुझ को है चुना... 
परत तोच तोच प्रश्न पडायलाय. का? कशासाठी? तू आणि मी एकत्र आलो ते नक्की कशासाठी? मी तुझ्यापासून इतक्या दूर जाणार हे तुला माहित होतं. हो ना? मग तरी तू इतक्या जवळ का आलास? “तू माझ्या आयुष्यात आलेला सुंदर क्षण आहेस” असं म्हणणारा पण तूच होतास. आपल्या दोघांमध्ये तू वेडा होतासच. आहेसच. अजूनही. अजूनही तू तस्साच आहेस. मी झराझर बदलत गेले. दिवसच्या दिवस पालटले, पण तुझी नजर मात्र तशीच राहिली. तुपातल्या दिव्याइतकी शांत स्निग्ध, माझ्याकडे एकटक बघणारी!
कैसे अनसुना तूने सब सुना... 
मी तुला कधी सांगितलंच नाही. सांगाबोलायचा प्रसंगच यायचा नाही. तरी तुला समजायचं नाही.. घाटावरच्या त्या टपरीसमोर थांबलेलो असतानाही तुला हे चांगलंच माहित होतं की ही आपली शेवटची भेट. आज घरी गेल्यावर तुझ्या वाटा मोकळ्या माझ्या वाटा मोकळ्या. याही आधी तू खूप विनवलं होतंस. मीच ऐकलं नाही. नात्याला भविष्य नाही या गोष्टीवर मी इतकी ठाम होते की, भविष्य असूही शकतं या शक्यतेचा मी विचारच केला नाही. किंबहुना असा विचारदेखील करू न शकणं हीच माझी मर्यादा. नात्यांची इतकी अलवार गुंफलेली गुंफण सोडवत जाणं मला फार सोपं वाटलं होतं. त्याक्षणी त्यावेळेला. हे अदृश्य तुझे आणि माझ गुंफलेले धागे तेव्हा दिसलेच नव्हते. तुला दिसले होते. मी न बोललेलं बरंच काही तू ऐकलं होतंस. आपल्यामध्ये काहीतरी अनामिक आहे, हे तुला माहित होतं. त्या अनामिकाला तसंच राहू द्यावंसं मग तुला का वाटलं? तुला माहित होतं ना... मग तरी का?
तू दिनसा है मै रात आ ना दोनो मिल जाये शामों की तरहा..
यापुढे हे गाणं मी ऐकणार नाहीये. यानंतर कधीच हे गाणं मी ऐकणार नाहिये. दोन वेगवेगळ्या ध्रुवावरची माणसं केवळ काही वेळासाठी एकत्र येऊ शकतात. जसं तिन्हीसांजेला किंवा पहाटेला दिवस आणि रात्र एकत्र येतात. पण त्यानंतर? एकतर दिवसाला संपून जावं लागतं, किंवा रात्रीला. दोघांनाही दोघांचं स्व्वतंत्र अस्तित्व ठेवून एकाचवेळी सोबत चालता येतच नाही. दोघांचे मार्ग भिन्न होतातच. घाटातल्या त्या टपरीवाल्याकडं फारशी गर्दी नव्हतीच. त्यात दोन इतके चिंब भिजलेले लोकं आलेली बघून त्यानं चहा परत उकळायला ठेवला. असा चहा तुझ्या खास आवडीचा. जर्मनच्या त्या भांड्यात उकळ उकळ उकळलेला. स्पेशल कटिंग चाय. मी कॉफीवाली. पण इतक्या सुनसान रस्त्यावर कॉफी मिळालीच नसती. तो चहा होईपर्यंत दोघंही दरीच्या त्या टोकावरून पसरलेले ते ढगांचं रूप बघत राहिलो. पाऊस अजून पडतच होता. पण आता त्या पावसाची जाणीवच नव्हती. तू आणि मी दोघंही पाऊसमय होऊन गेलो होतो. 
स्टीलच्या त्या एवलाश्या ग्लासमधला चहा तू माझ्या हातात दिलास, “केअरफुल, गरम आहे” तू म्हणालास. मी ग्लास धरला, चटका बसला त्यासरशी ग्लास सोडून दिला. चटके सोसायचं बळंच नव्हतं माझ्यामध्ये. पण तू तो ग्लास सोडला नव्हतास. मी सोडून देईन याची तुला पक्की खात्री होती... 
मी खरंच सोडून तर दिलं होतं... तुला, तुझ्या प्रेमाला, तुझ्या नात्याला.! सगळ्यालाच. आता सोबत चालत होतो ते केवळ अनोळखी बनून. काळोख भराभरा दाटून येत होता. चहामध्ये पावसाचे थेंब पडले. तो गोडसर घट्ट चहा मला पिता आलाच नाही. उगं एक घोट प्यायले आणि तुला परत दिला. 
टपरीवाल्याला चहाचे पैसे देऊन (थोडे एक्स्ट्रापण दिले असशीलच ना? बिचारा इतक्या थंडीपावसांत उभा आहे म्हणून!) तू बाईकजवळ आलास. मी क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या त्या ओलसर दमट घुसमटवणार्या दरीकडं बघत उभी राहिले. तू माझ्याजवळ आलास आणि हलकेच काहीच न बोलता माझा हात हातात घेतलास. 
“कितीही दूर गेलीस तरी कायम माझ्याजवळ राहशील. स्वत:ला माझ्यापासून तोडू शकणार नाहीस.... तू माझ्या अस्तित्वाचा एक भाग आहेस. जोवर मी आहे. तोवर माझ्याजवळ तू आहेस...”
आणि मी परत तुझ्यामध्येच गुंतले. तुझ्यापासून इतक दूर येऊन, इतक्या वर्षांनीसुद्धा! तुझ्याच आठवणींमध्ये स्वत:ला सॊडवायचे कितीही प्रयत्न केले तरी तिथंच अडकत राहिले. तिथंच घुटमळत राहिले. कसं सोडवायचं ते अजून समजलेलं नाही. सोडवायची इच्छाच नाही बहुतेक. 
हे असंच गुंतून राहणंच नशीबात लिहिलंय... 
ये मोहमोहके धागे तेरी उंगलियोंसे जा उलझे!

No comments:

Post a Comment