Saturday, 8 April 2017

रहे ना रहे हम (भाग २६)

 दुपारचे पावणेतीन वाजले होते. माझा जरा कुठे डोळा लागला होता. दारावरची बेल टणाटणा वाजल्याने जाग आली.
रात्री तो बाहेर पडल्यावर झोपलेच नाही. थोडावेळ टीव्ही पाहिला, मग फेसबूकवर टाईमपास केला. साहिलदादा ऑनलाईन होता, त्याच्याशी चॅटवर उगाच कायबाय गप्पा मारल्या. पहाटे सातवाजता नेहमीसारखा आईचा फोन आला. काल संध्याकाळी फोनवर का बोलली नाहीस कूठे होतीस वगैरे. बाबानं मध्येच फोन घेतला, “निल्या, काल रात्री स्वप्नांत दिसलास रे. सारखा हाका मारत होतास. तब्बेत ठिक आहे ना तुझी?” मी फक्त हो म्हटलं. रात्रभर झोपलेच नाही तर बाबाच्या स्वप्नांत कशी काय गेले असेन...
त्या दिवशी बॉसला आज ऑफिसला येत नाही म्हणून मेसेज केला. खरंतर ऑफिस चुकवायचं तसं काही कारण नव्हतं, पण  वाटलं, चुकूनमाकून तो परत आला तर... घराची चावी त्याने नेली नव्हती. मी त्याला पहिला फोन केला तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. त्यानं उचलला नाही. मी मेसेज केला. “whr r u?” त्यावरही उत्तर आलं नाही. दहा वाजता त्याचं फेसबूक स्टेटस अपडेट आलं. “Listening to sad songs. No idea why!”  मी त्याचं स्टेटस लाईक केलं. थोड्यावेळाने पेज रीफ़्रेश केलं तेव्हा त्याचं स्टेटस मला दिसत नव्हतं, एक तर पोस्ट डीलीट केली असावी, किंवा मला न दिसेल अशी सेटींग. पण किमान अजून फ्रेंडलिस्टमध्ये होते. मी उगाचच सलमान खानचं “क्या हुआ तुझे” गाण्याची लिंक स्टेटस म्हणून टाकली. पिक्चरचं नाव तुमको भुला न पायेंगे. परत त्याला फोन केला. यावेळी रिंग कट झाली.
सकाळपासून फक्त एक चहा घेतला होता. दहा वाजता कामवाली बाई आली. घर साफ करून गेली, तेव्हाच फोनवरून नाश्ता मागवला. इडली अतिशय आंबट्ट होती आणि चटणी खराब झालेली होती. फेकून दिली. पोळ्यावाल्या मावशींनी किती पोळ्या विचारल्यावर नेहमीच्या हिशोबाने दहा सांगितल्या. कदाचित लंचच्या वेळेपर्यंत तो परत येईलही. भाजीमध्ये फ्रीझमध्ये काय होतं तेही मला माहित नव्हतं. मावशींनीच शोधाशोध करून कोबी काढला. कोबीची भाजी हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे यावर माझं आणि त्याचं एकमत होतं. तरी मावशींनी कोबीची भाजी केली. तो आलाच तर अंडी तळून घेईल... मी अंडी खातच नाही त्यामुळे मला काही झालं तरी कोबीची भाजी खावीच लागेल.
अकरा पंचवीसला त्याचा मेसेज आला “r u in ofc?” मी नाही म्हणून लगेच उत्तर पाठवलं. “K! b at home by 3pm” त्याचा मेसेज आला. म्हणजे काय? तीनपर्यंत कदाचित परत येणार असेल. तेवढ्यात अझरभाईचा फोन आला. “सॉरी, तू काल फोन केलास आणि तेव्हा भलत्याच भानगडीत होतो. बोलताच आलं नाही. काही अर्जंट मॅटर होता का?”
मी नाही म्हणून सांगितलं. पण तरीही त्याला माझ्या आवाजावरून समजलं असावं, कारण त्यानं लगेच “आफताबला फोन दे” असं सांगितलं “तो घरी आहे, मी ऑफिसमध्ये.”
“ठिक आहे, हा कॉल कट कर आणि ऑफिसच्या लॅंडलाईनवरून मला कॉल कर”
“अरे कशाला? बोल ना. मला अनलिमिटेड प्लान आहे...”
“प्रश्न तुझ्या मोबाईलच्या बिलाचा नाही. खरं सांग”
“तू त्याच्याशी आज बोललास का?”
“हो. पहाटेच मला कॉल केला होता.... काय झालंय?”
“ही इज चीटिंग ऑन मी...” काल संध्याकाळपासून घडलेला सर्व प्रसंग मी त्याला सांगितला. त्यानं काही न बोलता ऐकून घेतलं. अखेर मात्र, ज्या वाक्यावरून आफताब घर सोडून गेला, ते मी त्याला सांगू शकले नाही. अर्थात ते त्याला समजलेलं असणारच.
“हे बघ, मी आता दोघांचंही ऐकून घेतलेलं आहे. तेही शांतपणे. मला पोस्टमन व्हायची अजिबात इच्छा नाही. तरीही त्याला जे सांगितलं तेच तुला सांगेन. शांत रहा. एकत्र भेटा आणि बोला. पूढे जे व्हायचं आहे ते होईल पण सध्या या घडीला जास्त विचार करू नका. तुझा तापटपणा त्याला सहन करावा लागेल आणि त्याचा हा असला चंचल मूर्खपणा...”
“दिस इज डेफ़िनेटली नॉट मूर्खप...”
“स्वप्नील, ही इज नॉट चीटिंग ऑन यु... हे मी तुला सांगतोय म्हणून तरी विश्वास ठेव. निधीसोबत तो किती सीरीयस होता ते मला माहित आहे आणि सध्या त्याचं काय चालू आहे तेही मला माहित आहे. तिला केवळ खिजवतोय. तुझ्यावाचून माझं काही अडलं नाही हे दाखवायचा प्रयत्न आहे. आय नो, हास्यास्पद आहे, चाइल्डिश आहे. पण आहे...प्रत्येकाचा स्वभाव असतो. सध्या शांत रहा. मी त्याला लगेच कॉल करतोय. त्याने फोन केला तर फक्त ऐकून घे. बोलू नकोस”
त्यानंतर कुणाचाही फोन आला नाही. जेवून मी थोडावेळ टीव्ही पाहिला. फेसबूकवर चक्कर मारली तेव्हा, निधी (म्हणजे सायली तुषारने) रात्री तीन वाजता (म्हणजे आमची भांडणं चालू असताना) “आज फिर तुमपे प्यार आया है, बेहद और बेहिसाब आया है” असा स्टेटस म्हणून टाकली होती. खाली ह्रितिक रोशनचा फोटो. तिचा आवडता हीरो. मी स्टेटस लाईक केलेली नावं पाहिली त्यात आफताबचं नाव नव्हतं.
झोपले तेव्हा दीड वाजला असावा. जाग आली ती बेल वाजण्यानंच. तोच असेल याची इतकी खात्री होती कीहोलमधून पाहिलंसुद्धा नाही. समोर कुणी भलताच माणूस उभा होता.
“सलाम आलेकूम. भाईसाबने भेजा है. पैचाना क्या?” तो हसत म्हणाला. मला हा माणूस पाहिल्यासारखा वाटला तरी ओळख आठवेना. “मै सलामत. वो अझरभाईके साईटपे काम करता था. आप तबी कॉलेजमी थे ना. अभी मै इधर बंबई आ गया. इधरहेच काम करता है. वो आफताबभाईने सुबह फोन किये था. मेरा छॊटा हत्ती है ना. कुछ सामान लाने का बोले. शिफ़्टिंग कररे क्या?” तो धडाधड बोलत सुटला... मला अचानक आठवलं, अझरभाईच्या हाताखाली काम करणारा कामगार. पाहिलंय खरं. पण याला का पाठवलाय?
त्यानं स्वत:चा मोबाईल काढून नंबर फिरवला. कॉल कनेक्ट करून झाल्यावर खांद्याजवळ मोबाईल उगाच घासला आणि माझ्याकडे दिला. “बात किजिये”
“हॅलो.”
“सलामत आलाय. माझं सामान घेईन. त्याच्याकडे लिस्ट दिली आहे. त्याला जे मिळणार नाही ते फेकून दे..”
“आपण जरा दोन मिनिटं बोलू या का? इतक्या घाईने....” फोन कट झाला होता. सलामतच्या खिश्यामधून आफताबच्या हॅंडरायटिंगमधला कागदाचा कपटा आला होता. “ये सब सामान बोले थे... आप बस दिखाओ, मेरा तो काम ही अभी पॅकिंग मूव्हींग का है. ठिक से लेके जायेगा... कोई टेन्शन नही” त्याने सोबत आणलेला कार्डबोर्डचा गठ्ठा उघडून बॉक्सेस बनवायला सुरूवात केली.
मी कपाटामधून त्याचे कपडे काढून दिले. त्याची पुस्तकं, सीडी, गेम्स, जिमचं सामान, अलार्म क्लॉक, बाथरूममध्ये ठेवलेलं शेव्हींग किट, त्याचा शाम्पू, त्यानं आणलेली इस्त्री, थर्मास, त्याचे पेन, जुना कॅल्क्युलेटर, सगळं कसं व्यवस्थित लिस्टमध्ये लिहिलं होतं. त्याने किचन नाईव्ह्ज घेतले होते, ते पण लिस्टमध्ये होते.... त्यानं आणलेले बोन चायनाचे बोल्स, प्लेट्स, सगळं काही. सलामत तासाभरामध्ये चार खोक्यांमध्ये सगळं सामान भरून निघाला पण... त्याचे धुवायला वॉशिंगमशिनमध्ये पडलेले काही कपडे आणि त्याचा एक पेन ड्राईव सोडल्यास. पेन ड्राईव्ह मध्ये माझे फोटो होते. ते डीलीट करून फॉर्मट कर आणि मग फेकून दे असा निरोप होता.
इतकावेळ मी घरात एकटीच होते. काल  रात्रीपासून.. पण आता तो एकटेपणा अक्राळविक्राळ हसू लागला.  एकच क्षण का होईना, पण मी घाबरले. तो माझ्या आयुष्यामधून कायमचा दूर जाईल या कल्पनेने मी घाबरले. मी त्याला परत फोन केला. प्लीज... दोन मिनिटे बोल माझ्याशी. त्यानं रिंग कट केली. हातातला फोन सर्र्कन फेकून दिला. (नोकियाचा असल्याने तो टिकून राहिला. आताच्यासारखा मायक्रोमॅक्स, लावाम सॅमसंग असता तर मला इतर कामधाम सोडून आधी नवीन मोबाईल घ्यावा लागला असता!)

मी परत मेसेज केला. त्यावर काही उत्तर आलं नाही. परत कॉल केला. तो कट झाला. समजतो कोण हा स्वत:ला? स्वत: आधी नाही ते धंदे केले आणि आता मला ऍटीट्युड दाखवतोय. साला! हरामी! एकदा नाही शंभरदा म्हणेन. माझ्या घरामध्ये राहून माझ्या पाठीमागे दुसर्‍या मुलीला भेटतो आणि वर म्हणतो मी समजून घेऊ. याचा भाऊही तसलाच. मलाच शांत रहायला सांगतोय... गेले खड्ड्यात. दोघंही. मला गरज नाही. कितीही प्रेम अस्लं तरीही मी माझा सेल्फ रीस्पेक्ट गमावून तुझ्यासोबत रोमान्स करू शकत नाही. मी गौरी नाही... मला तू गृहित धरू शकत नाहीस.
अर्ध्या तासांनी परत फोन वाजला, अझरभाईंचा. मी तोही कॉल रीजेक्ट केला. मला आता कुणाकडून शहाणपणाचे बोल नको हवे होते. शांत रहा, बी काम! चा उपदेश नको हवा होता. मी मोबाईल स्विच ऑफ केला आणि भलामोठ्ठा मग भर कॉफी घेऊन शांत बसून राहिले. रात्रीचं जागरण, कालचा आरडाओरडा आणि भांडणं यामुळे प्रचंड पित्त उफाळून आलं. कॉफी सगळी उलटून पडली. तरीही डोकं भणभणतच राहिलं. ठणकतच राहिलं. तिन्हीसांज होऊन गेली, तरी मला भान नव्हतं. अंधारात तशीच बसून राहिले. रात्र झाल्याचं समजलं ते समोरच्या घरामधल्या माणसाचे दारू पिऊन आरडाओरडा चालू झाल्यावर. मग लाईट लावले. भूक लागली होती म्हणून दुपारचीच एक पोळी जॅम लावून खाल्ली. त्याला घर सोडून अख्खा दिवस लोटला होता, तरी मला अजून रडू आलं नव्हतं. मला इतक्या सहजासहजी रडू येत नाही, आणि एकदा आलं की थांबत नाही...
टीव्ही बघत थोडावेळ बसले , अचानक आठवलं की दुपारी चिडून मी मोबाईल स्विच ऑफ केला होता. तो चालू केला. मेसेजेसच मेसेजेस. एकापाठोपाठ धडाधडा येऊन आदळणारे मेसेजेस. बरेचसे फॉरवर्डेड जोक्स. काही माहितीपर. एक अझरभाईचा आणि एक आफताबचा. अझरभाईचा फक्त “कॉल मी” इतकाच. आफताबचा “डोंट कॉल मी अगेन. इट्स ओव्हर”
बस्स. सो इट वॉज ओव्हर. त्याच्याकडून. काल रात्री हे रिलेशनशिप त्याला का तोडायचं नाही, फासे त्याच्याच बाजूने पडावेत वगैरे सर्व काहीही असूनही इट वॉज ओव्हर. अगदी आतमधून आपण कचकड्याच्या बाहुलीसारखं चेपत गेल्यासारखं वाटायला लागलं. एक एक श्वास जाणवायला लागला, हातपाय आपोआप थरथरू लागले. काल यावेळेला तो निधीसोबत होता. आज माझ्यासोबत नाही. त्यानं मला फसवलं का.... याचं उत्तर त्यानं कितीहीवेळा दिलं नाही म्हणून तरीही मी ओरडून ओरडून फक्त होच म्हणेन. फसवणूक फक्त शारिरीक असते का? व्हॉट अबाऊट युअर सोल? मि. आफताब. माझ्यासोबत असतानाही जर तुम्ही तिचा विचार करत असाल तर ती प्रतारणा होत नाही का?
मी त्याला परत कॉल केला नाही. मी अझरभाईलाही कॉल केला नाही फेसबूकवर आफताबचं नवीन स्टेटस होतं. “ The heart was made to be broken” – Oscar Wilde.  खाली सत्तावीस कमेंट्स होत्या, बहुतेक त्याच्या ऑफिसमधल्या कुणाच्यातरी. त्यात एकाने “तेरा पैर टूटा के दिल?” अशी कमेंट टाकली होती. मी त्याला लाईक केलं. स्मायली टाकली. लगोलग मीही गूगल उघडलं.  फेमस कोट्स फॉर मूव्हिंग ऑन असं सर्च केलं. शंभरेक कोट्स स्क्रीनवर झळकले. त्यातले बहुतेक अगदीच बेकार होते, पण एक कोट खरंच खूप मला आवडला, माझ्या सिच्युएशनला तर परफेक्ट होता. “Never allow someone to be your priority while allowing yourself to be their option.”- Mark Twain. माझं इंग्रजी वाचन तसं जेमतेम असल्याने मला मार्क ट्वेन हा मोठा लेखक असल्याखेरीज इतर काहीही माहित नव्हतं, हे वाक्य नक्की कुठल्या पुस्तकामधलं आहे तेही माहित नव्हतं. पुस्तकात आहे की पिक्चरमधल्या कुठल्या सीनमध्ये आहे तेही माहित नव्हतं तरीही मला ते आवडलं. हेच तर मी करत होते ना? त्याच्यासाठी मी केवळ एक ऑप्शन होते. प्रायोरीटी कधीच नव्हते. निधी आणि मी दोघांमध्ये जर त्याला निवड करता आली असती तर त्यानं कधीही निधीचीच निवड केली असती. मी मूर्ख. ज्याप्रमाणे केदारचं लग्न झाल्यानंतर मी त्याचा विचार सोडून दिला तसंच माझ्या मूर्ख विचार होता की, तो निधीला विसरेल. नात्यांच्या या गुंतागुंतीचा मी विचार केलाच नाही. निधी गेल्यावर तो माझ्याजवळ आला. माझ्यासोबत आला, पण तरीही निधी त्याच्या मनातून कधी गेलीच नाही. कालची प्रेमाची, लग्नाची बोलणी सच्ची होती, हेही मला माहित आहे पण मला त्याचवेळी हेही समजलं की त्याच्या मनामध्ये निधी कायम राहणारच आहे... मी असो वा नसो.
रात्री कितीवाजता झोपले ते आठवत नाही पण जाग आली तेव्हा उठवत नव्हतं, अंगभर दुखणं भरून राहिलं होतं. रात्री जेवले नव्हतेच. सकाळी उठून बाथरूमपर्यंत गेले, आणि दुनियाच हलायला लागली. भिंत्तीचा आधार घेत परत बेडवर येऊन बसले. ग्लासभर पाणी प्यायले आणि परत थोडावेळ झोपले. पाचच मिनीटांनी धावत बाथरूमपर्यंत गेले. भडभडून उलटी झाली. हार्टब्रेकपेक्षाही ऍसिडीटी जास्त सतावते. फ्रीझमधलं गार दूध थोडं प्यायले. जरा बरं वाटलं. अंग तापानं फणफणलं होतं. झोपेतच होते मी.
नेहमीसारखाच आईचा फोन आला. हॅलोबिलो म्हणायच्या भानगडीत न पडता मी इतकंच म्हटलं, “आई गं, मला घेऊन जा. मला नाही रहायचं इकडे”
मी खरंतर फोन कट केला, पण पाच मिनीटांनीच बाबानं फोन केला. “मी कार घेऊनच निघतोय, निल्या. गौरीपण येतेय.. डॉक्टरकडे जाऊन ये. काहीतरी खा.”
“तुम्ही यायची तशी काही गरज नाहीये बाबा. मला बरं आहे, थोडं ताप आणि आता ऑक्टोबर हीट. सीझन चेंज”
“निल्या, तुझा आवाज बघ. मी येईन म्हटलंय ना. रोज मला स्वप्नांत दिसतोस... आज तर ताप आलाय म्हणतोस... दुखणं अंगावर काढशील वगैरे. संध्याकाळपर्यंत पोचेन तोपर्यंत नीट रहा.” आईचा पाठीमागून आवाज आला. “एक मिन इकडे दे, मला बोलू दे”
“स्वप्निल, हे बघ. मी आफ्ताबला फोन करू का? तुझ्या घरी यायला जमेल का म्हणून... एकटीच आहेस राणी. सोबत येऊ देत का?”
“आई प्लीज नको. तू ये. लगेच ये” बाबाला यायची काही गरज नाही असं म्हटलं खरं, पण आईचा आवाज ऐकताच ती हवी झाली. आता याक्षणी. निधी,अझर, आफताब, बाबा कुणाहीपेक्षा आई हवी. केवळ तीच आहे जी मला धीर देऊ शकेल...
पोळ्यावाल्या मावशींना मऊ खिचडीभात करायला सांगितला. कालच्या शिल्लक पोळ्या घरी न्यायला सांगितल्या. “साब नही है क्या? टूअर पे गये है?” तिनं विचारलं. मी मान डोलावली. “आपको इस हालत मे छोडके गये. ये मर्द ना, कामके आगे बिवी दिखतीच नै” तिनं आपली टकळी चालू केली. मी आजही सिकलीव्ह टाकली.
तिन्हीसांजेवेळी आई आली. मी त्यावेळेला उठून जेमतेम दरवाजा उघडू शकले. उलटसुलट जागरणं, रडणं, टेन्शन, खाण्यापिण्याचे हाल, मी एकदम टोटल अवतात दिसत असणार. पण मला खरंच त्याचं काहीच भान नव्हतं. आई घरात आल्यावर मी तिच्या गळ्यांत पडून कितीतरीवेळ नुसती बसून राहिले. आई घरून येताना माझ्यासाठी कोथींबीर वड्या घेऊन आली होती. बाबानंच त्या तळल्या. मऊ वरणभात केला आणि आईनं मला भरवला. खूप वर्षांनी एकदम लहान झाल्यासारखं वाटलं. इतके दिवस वाटायचं, की मी मोठी झाले, स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचं बळ आलं. पण त्या निर्णयांचं ओझं पेलण्याचं बळ मात्र नव्हतं. हालत इतकी बेकार होती की बाबानं कुणालातरी काहीबाही फोन करून एका डॉक्टरलाच घरी बोलावलं. त्यानं उगाच बीपी कमी, पित्त जास्त करून दोन चार गोळ्या लिहून दिल्या. दिवसभरच्या प्रवासाने आईबाबा लगेच झोपले. मी आईच्या कुशीमध्ये स्वत:ला गुरफटून कधी झोपले तेच माहित नाही.
सकाळी उठले तेव्हा बरंच बरं वाटत होतं. आईनं उठून पोहे केले. “किचन छान मॆंटेन ठेवलंयस गं. सगळं जागच्या जागी सापडतंय... घरही बरंच साफ आहे”
“कामाला बाई आहे, स्वयंपाकाला बाई आहे...”
बाबाचा असा समज झाला होता की ऑफिस पॉलिटिक्समुळे माझी अशी हालत झाली आहे. ऍक्च्युअली आईसोबत गप्पा मारताना मी बर्‍याचदा फक्त ऑफिसच्या भानगडी सांगायचे. घरचं काही सांगण्यासारखं असेल तेच. घरामध्ये आफताबचं आता काहीही सामान नव्हतं, त्याचा प्रेझेन्स सांगणारी एकही खूण नव्हती, त्यामुळे आईबाबाला तसा संशय काही आला नाही. एकदाच फक्त आई म्हणाली, “आफताब काय मुंबईबाहेर आहे का? कालही फोन केला तेव्हा उचलला नाही.” मी माहित नाही असं म्हणून मोकळी झाले. तर बाबाचा समज.... तो म्हणे, सोड नोकरी आणि चल गावी.
“निल्या, काही गरज नाहीये. आपलं चांगलं चालू आहे. एवढी दुकानं आहेत. हॉटेल काढतोय. शिवाय तुला काही हवा असेल तर बिझनेस काढून देईन. तेही नको असेल तर घरात निवांत रहा. तू कमवायचे किती आणि त्यात टेन्शन किती... लोकाचं कशाला ऐकून घ्यायचं. तुझा तो काय बॉस आहे, चुका काढतोस म्हणून गौरीला सांगत होतीस ना... त्याला तोंडावर सांगून ये. तुझा महिन्याचा पगार आहे ना, तितक्याची उलाढाल माझा बाप एक दिवसात करतो. चल, घरी!”
“बाबा, तब्बेत खराब आहे.. जास्त काही नाही. हल्लीच्या काळामध्ये नोकर्‍या मिळणं इतकं स्वस्त झालंय का? तसंही मी थोडा वेगळा विचार करतेय. मला पुढे शिकायचंय.”
“एम एस्सीनंतर काय शिकतात?” बाबानं खरंतर  खूप साधा प्रश्न विचारला, पण इतक्या निरागसपणे. मला आणि आईला तर जामच हसू आलं. आणि आम्ही का हसतोय ते त्याला समजेना म्हणून तो वैतागला. उगाचच. “बाबा, नंतर सांगेन. पण आता नोकरी सोडणार नाही.”
“पण थोडे दिवस सुट्टी घे आणि घरी चल. आराम कर. गणपतीला आलीस तेव्हाही विनाकारण धावपळ झाली. जरा विश्रांती घे.” एरवीमी आईचं अजिबात ऐकलं नस्तं, वाद घातले असते. पण आज इच्छाच नव्हती. ऑफिसला फोन करून चार दिवसांची सुट्टी टाकली. आई म्हणाली आता दुपारून निघण्यापेक्षा उद्या पहाटे निघू.
त्यारात्री जेवणं करून झोपायची तयारी चालू होती. मी आणि आई माझ्या बेडवर. बाबा सतरंजीवर. मी उशीवर डोकं ठेवून झोपले होते. किंचित झोप लागतच होती. आई मला थोपटत माझ्या बाजूलाच बसली होती.
“एकदम सुकून गेलीये. तिला इकडं एकटीनं राहणं झेपत नाही.” बाबा सांगत होता.
“चार वर्षं झाली घराबाहेर. आधी त्या हॉस्टेलमध्ये आणि आता इथे. शिवाय या कार्पोरेटमध्ये फार शर्यत असते म्हणे... यतिन, तिच्या लग्नाचं जरा सीरीयसली मनावर घे ना. मी इकडे तिकडे चौकश्याकरते, पण जर तू शोधलंस तर लवकर होईल”
“मी काय अल्लद्दिनचा चिराग आहे का? फटाफट सगळं काम संपवायला? हवा तसा पोरगा मिळायला नको. आणि लग्नाचं काय! आज ना उद्या होईल. पण तब्बेतीची अशी अवस्था नको. मी परवापासून सांगतोय, नोकरी सोडून दे. घरी चल, तर ऐकत नाही. तुझ्यासारखीच हट्टी आहे..”
“यतिन, तुला चांगलंच माहितीये ती इतकी अपसेट का आहे. त्या दिवशी फोनवर... तिने मोबाईल उचलला होता हे तूच सांगितलंस ना? तुला माहित आहे की तिला हे पटत नाही. शाळेत असताना किती विचित्र प्रकार झालेत ते आठवत नाही का? तिच्या मनावर परिणाम होतो. अजून इतकी मोठी झाली तरी ती अशा गोष्टी ऍक्सेप्ट नाही करू शकत?”
“मी काय मुद्दाम केलं का? हज्जारदा सांगितलंय माझा फोन उचलत जाऊ नकोस. तरी आगाऊपणा करते. काही गरज नव्हती त्या दिवशी हिचा फोन घ्यायची. नाव दिसत होतं तरी घेतला. आता निस्तरायला मला लागतंय ना... हौस नाहीये मला पण तिच्याकडे जायची. घर खाली करून देत म्हणून गेलो होतो. शब्द दिला होता त्याप्रमाणे तिच्यासाठी गावात फ्लॅट बघून दिलाय. पण आता त्या वस्तीमधून हायवे जातोय. तर मला म्हणे, अजून पैसे द्या नाहीतर खोली रिकामी करत नाही...”
“सौदेबाजीच्या व्यवहारामध्ये अजून काय होणार?”
“तू आता मला टोमणे मारू नकोस. चुकलं हे कबूल केलंय. चूक निस्तरण्यासाठी तिला पैसे दिलेत. परत तिच्या अंगाला हात लावला नाही. तुझ्याकडे माफी मागितली. तिच्यामुळे निल्याचा परत काही प्रॉब्लेम झाला तर आईच्यान गावभर वरात काढून मिरविन... समजते काय!”
आईबाबाला वाटलं होतं की मी झोपलेय पण मी जागीच होते. आईच्या भाषेत टळ्ळंजागी. नंतरही खूप वेळ झोप आली नाही. कोण बरोबर कोण चूक तेच मला ठरवता येईना.  बाबा तिच्याकड गेला होता, पण मला वाटत होतं तसं नव्हतं. आफताब निधीला भेटला होता, पण तेव्हाही मला वाटलं होतं तसं नव्हतं. मला नक्की काय वाटलं होतं. प्रतारणा, फसवणूक, विश्वासघात की अजून काही.. आणि गेला तरी तो त्याचा प्रश्न आहे ना? मी आणि आफताब एकत्र  होतो हा जसा आमच्या दोघांचा प्रश्न होता.. पण मग आईचं काय... तिचं स्थान काय.. आफताब निधी आणि मी. यतिन गौरी आणि संध्या. तीन त्रिकोणांची प्रमेयं. सुटता सुटत नाहीत. आणि जमता जमत नाहीत... या सर्वांमध्ये शरीराची गणीतं किती महत्त्वाची आणि मनाची किती!

दुसर्‍या दिवशी मी आईबाबासोबत घरी आले. आमची कार पार्क करत असताना मला दिसलेली, समजलेली आणि जाणवलेली एकच गोष्ट. आफताबची कार त्याच्या घराबाहेर उभी होती. 

(क्रमश:)