Monday, 20 March 2017

रहे ना रहे हम (भाग २५)

 जिने चढत असताना डोक्यामध्ये साधासरळ विचार आला. ही त्याची नवीन कुणीतरी गर्लफ्रेंड असणार. त्यानंच तिला हे नाव वापरायचा सल्ला दिलेला असणार, कारणं दोन, म्हणजे मला कदाचित समजणार नाही सिक्युरीटी गेटवर मी ते नाव वाचेन असं दोघांपैकी कुणालाही वाटलं नसेल. अजूनही तो निधीबद्दल किती ऑब्सेस्ड होता हे मला माहित होतं- त्यामुळे तिला खोट नाव घ्यायला त्यानंच सुचवलं असेल. तिचं हे बदललेलं नाव आणि फेसबूक प्रोफाईल त्याच्याच लॅपटॉपवर मी पाहिलं होतं. त्यानं “तू तिला रीक्वेस्ट पाठव बघू एक्सेप्ट करते का” असं मला सांगितलं होतं. मी काही पाठवली नाही. भाड मे गयी!! दोन तीन दिवसांपूर्वी गावी मला भेटली होती तेव्हा मी तिला माझ्या आणि आफताबबद्दल सांगितलं होतं. तेव्हाच तिचा चेहरा पडला होता. मला खरंतर तिच्याशी काही देणंघेणं नव्हतं, पण  आज तेच नाव घेऊन एखादी मुलगी त्याला भेटायला आली होती. जिन्याची एकेक पायरी चढत असताना माझ्या डोक्यामध्ये नुसते फ्लॅशेस पडत होते. बाबा त्या बाईकडे गेला होता. आईला आता माझी गरजच काय आठवणसुद्धा उरली नव्हती. इतके दिवस तुझ्याशिवाय माझं आहे कोण म्हणणारी आई आज खुशाल माझा फोन न घेता फिरत होती. बाबाचं हे लफडं अजून चालूच होतं. तो आईला फसवत होता. आई मला फसवत होती. आफताब मला फसवत होता. माझ्या... माझ्या घरामध्ये त्याला भेटायला दुसरी एखादी मुलगी बिनदिक्कत येते. काय करत होते मी? त्याच्या प्रेमामध्ये पडून इतका मॊठा मूर्खपणा का करत होते.
दरवाज्यावरची बेल यांत्रिकपणे वाजवली.
“स्वप्निल, इज दॅट यु? तेरे चाबीसे दरवाजा खोलो यार, उठा नही जा रहा” आतून चिरपरिचित आवाज आला. बराबर है, अभी तो उठेगाही नही, दुपारभर रंगरलिया ज्या मनवल्यात. पायातल्या चपला भिरकावल्या आणि दार उघडलं. तो हॉलमध्येच, लॅपटॉपवर बसला होता. दुखरा पाय त्यानं उचलून समोर अजून एका खुर्चीवर ठेवला होता. माझ्याही नकळत मी लगेच पुढे जाऊन त्याचा पाय बघितला.
“सूज आहे, डॉक्टरकडे जाऊ या?” मी विचारलं.
“उद्या सकाळी दहा वाजताची अपॉइण्टमेंट आहे. कूरीअर आलंय का?” माझ्या हातामधल्या पाकिटाकडे बघत तो म्हणाला. “दुपारीच मी सांगितलं, खालीच ठेव. एवढे जिने उतरणार कोण? आणि महान कूरीअरवाला म्हणे, तो वर फ्लॅटपर्यंत येत नाही. लिफ्ट नसेल तर...” तो बोलत राहिला. मी हातामधलं पाकिट त्याच्यासमोर धरलं. “खास काही नाही, चेकबूक आलंय. तू चहा घेतेस का? मी मघाशी करून ठेवलाय. थर्मासमध्ये असेल पण गार झाला असेल. चारच्या सुमाराला केलाय”
 म्हणजे त्या सायली तुषार जाण्याआधी. एकदम अचानक जोरात रडू यायला लागलं. बाथरूममध्ये गेले ते मनसोक्त रडण्यासाठीच. माझ्या डॊळ्यांसमोर हा माणूस इतक्या सहजासहजी मला धोका कसा काय देऊ शकतो? मी इतकी बावळट आहे की, मी त्याला याचा जाब कसा विचारू शकत नाही... इतका दुबळेपणा माझ्यामध्ये आला कुठून.
तोंड धुवून बाहेर आल्यावर मी सिगरेट पेटवली. डोक्यामधल्या विचारांच्या काहूराला थोडंतरी शांत करायचा प्रयत्न! “क्या हुआ? बॉसके साथ फिर कोई पंगा?” त्यानं विचारलं.
मी केवळ नाही म्हणून मान डोलावली. माझं एक खुळं मन मला अजून सांगत होतं की काहीतरी होईल आणि तो स्वत:हून तुला याबद्दल सांगेल. पण तो इतका नॉर्मल वागत होता की, मला त्या नॉर्मलपणचाच अधिक राग आला. आल्यापासून माझ्याकडे त्यानं एकदोनदा पाहिलं असेल, अख्खं लक्ष लॅपटॉपमध्येच. त्याहून जास्त राग आला की त्याला माझं बिनसलंय ते समजूनही त्याला काही फरक पडत नव्हता. माझा मोबाईल वाजला. आईचा फोन होता, मी कट केला.
“कुणाचा कॉल?” त्यानं लॅपटॉपवरची नजर न हटवता विचारलं.
“कंपनीचा असेल, विनाकारण पिडत बसतात... “ मी बोलायचं म्हणून बोलले. किचनमधल्या ओट्यावर थर्मास भरून ठेवला होता. तो थर्मास मी नुसता हातांनी उचलला नाही. ओटा पुसायच्या फडक्याने उचलून आतला चहा सिंकमध्ये ओतला. जणू मला त्या थर्मासवर इतर कुणाचे फिंगर प्रिंट्स असतील तर त्या प्रीझर्व करायच्या होत्या. किचनमध्ये जाताजाता एक नजर बेडरूममध्येही टाकली होती. बेड अगदी स्वच्छ आणि टापटीप होता. कुणीतरी नुकतंच चुरगळलेलं बेडशीट व्यवस्थित झटकून घातल्यासारखा. मस्तकामधली एक शीर थाडथाड उडत होती. हातपाय गार पडल्यासारखे होत चालले होते. छातीमधली धडधड मलाच ऐकू येत होती. काय झालं? मी घाबरले होते? चिडले होते? हतबल झाले होते? हरले होते? फसवणुकीमुळे दु:खी झाले होते.  जे काय होतं ते मला माहित नाही. पण एक मात्र खरं की मी या सर्वांमध्ये फार एकटी होते. ज्या एकाच्या विश्वासावर बळावर आणि प्रेमावर मी आजवर टिकले होते, त्यानंच आज हा वार केला होता. राज कपूर राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला दोघांना उद्देशून म्हणतो, दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा... पण माझ्या बाबतीत दोस्तही तोच आणि प्यारही तोच...
चहाचं पातेलं गॅसवर चढवून मी जादूला कॉल केला. केवळ तोच एकटा आहे,ज्याला मी हे सर्व सांगू शकते. मागे गणपतीमध्ये भेटलो तेव्हा तो म्हणाला की तडजोड कायम तुलाच करायला लागेल. तडजोडीचा प्रश्न नाहीये रे, पण दरवेळी मला ही मानहानि पण सहन करावी लागेल का? त्याचं काय...
“अरे, स्वप्निल. ऐक ना मी बाहेर  आलोय गं. तुला नंतर कॉल करेन. चालेल?” इतकंच बोलून मी हो नाही म्हणायची वाटही न बघता त्यानं फोन ठेवलाही. फाडकन कुणीतरी मुस्काटात मारल्यासारखं झालं...

 माझ्या आईच्या आयुष्यामध्ये कायम “दुसरी बाई” राहिलीच. आमची एक जनरेशन पुढे असल्याने माझ्या नशीबामध्ये “दुसर्‍या अनेक बायका” असतील का? त्याला तर ऑफिशीअली परमिशन पण असेल. चार लग्नांची. कपामध्ये चहा गाळता गाळता एकदम हुंदकाच आला. गरम चहा थोडासा सांडला, थोडा बोटांवर उडाला, पण दुखलं मात्र अजिबात नाही. कदाचित मेंदूंची आता वेदना समजून घेण्याची कॅपेसिटी संपली असावी. काय मूर्ख पोरगी आहेस स्वप्निल. त्याच्यासाठी तुझं आणि त्याचं नातं हे केवळ “निस्तरून घ्यायच्या लायकीचं आहे” हे विसरलीस. यु आर नथिंग. त्याच्यादृष्टीने तू केवळ त्याचा एकाकीपणा घालवायचं साधन आहेस. यु आर जस्ट अ सेक्स टॉय फ़ॉर हिम....
हातामधला चहाचा कप बाहेर नेऊन त्याच्यासमोर ठेवला. “दुपारचं काही फारसं शिल्लक नाहीये, बाहेरून मागवतेस का? दोन तीन पोळ्या असतील.”
“नको. खिचडी करते. आधीच पायासाठी पेन किलर घेतोस, मसालेदार खाऊन पित्त वाढेल” इतकं होऊनही मी याचीच चिंता का करतेय... मलाच समजेना.
“आफताब, थोडावेळ काम बंद करशील का? मला तुझ्याशी बोलायचंय” मी अखेर विषय काढला.
“स्वीटहार्ट, गिव्ह मी टेन मिनिट्स, हा रिपोर्ट कंप्लीट मेल करतो म्हणजे माझं आजचं काम संपेल, साडेसहा होत आलेत. मगरीबची नमाझ पढतो, मग चिक्कार वेळ बोलूया. चालेल?”
तुझं काम, तुझी नमाझ, तुझं दुखणं, ते जास्त महत्त्वाचं. मी नाहीच. मी माझा लॅप्टॉप उघडला. गेम खेळताना मन लागेना. सारख्या चुका व्हायला लागल्या (खरंतर मला आता याक्षणी लिहिताना मी कूठला गेम खेळत होते तेही आठवेना. सारखी लेव्हल फेल म्हणजे फार्मविल नसावं. टेट्रीस किंवा बिज्वेल्ड असावं. असो.) तेही बंद केलं. आफताब उठून नमाझ पढायला बेडरूममध्ये गेला होता, मी एरवी त्याची नमाझ बघायचे, मला तो शांतपणे प्रार्थना करताना बघायला फार आवडायचं. पण आज मात्र तो गेल्यावर मी त्याचा लॅपटॉप उघडला. सकाळपासून त्यानं तीन ईमेल केले होते. फेसबूकवर बराच वेळ बसला असणार, वरच्या नोटिफिकेशनमध्ये “सायली तुषार हॅज लाईक्ड युअर फोटो” असं नोटिफिकेशन दिसलं. प्रोफाईलवर क्लिक केलं तर निधीचा मरिन ड्राईव वरचा फोटो. स्क्रोल करत खाली गेले तर बर्‍याच भानगडी समजल्या. पुढच्या आठवड्यांमध्ये येणार्‍या पहिल्या दिवाळसणाला नवरा बायको भारतात आले होते. शिवाय लगेचच नणंदेचं लग्नही होतं (खरेदीच्या फॊटोंवरून समजलं). आणि मग परत एकदा आठवलं. मूर्ख!! तीन दिवसांपूर्वी गावामध्ये ती तुला भेटली होती की. नवर्‍याबरोबर दुकानांत आली होती. आज्जीच्या प्रॉपर्टीच्या कामासाठी तू एकच दिवस गावी गेली होतीस तेव्हा!!!
परत  एकदा मस्तकवरची शीर ताडताड उडायला लागली. इतका वेळ मी केवळ दुसरी कुणी मुलगी असेल अशा सोयिस्कर गैरसमजात होते. पण इतकं सारं वाचून निधीच इथे आली होती हे पटायला लागलं.  हा मुलगा तिला माझ्या घरी कसं काय बोलावू शकतो? आणि ती रांड तरी लग्नानंतर आपल्या आधीच्या बॉयफ्रेंडला भेटायला कशी काय येऊ शकते... तेही मैत्रीणीच्या घरी. आज पहिल्यांदाच आली असेल का? याआधी नक्की किती वेळ अहे भेटलेत? प्रत्यक्ष नसलं तरीही ऑनलाईन? मागे कधीतरी आफताबनं त्याच्या आणि निधीच्या सेक्स चॅटचे रेकॉर्ड्स दाखवले होते. लग्नाआधीचे. प्रत्यक्षामध्ये तर करतच होते, पण कधीतरी गंमत म्हणून ऑनलाईन सेक्सपण करायचे (फ्रॅंकली स्पीकिंग, त्यात “करण्यासारखं” काय आहे ते मला कधी समजलंच नाही. तो वेगळाच मुद्दा!) तसंच काहीतरी आताही चालू असेल का? इतक्या दिवसांत मी त्याचा लॅपटॉप कधी तपासलाच नाही. गरजच भासली नाही. बाजूलाच त्याचा मोबाईल होता. तो उचलून मी मेसेजेस पाहिले. एक नंबर सेव्ह केलेला नव्हता, भारतामधलाच होता, पण नुस्ता नंबर होता. त्यानंबरवरून सकाळपासून चारपाचदा कॉल आले होते. त्याने देखील दोन कॉल केले होते. अखेरचा कॉल पाच वाजता केला होता. मेसेजेस सुद्धा केले असणार. पण सध्या ते डीलीट केलेले होते. स्क्रोल करताना खाली एक युएसचा नंबर दिसला, या नंबरवर एकदाही कॉल केला नव्हता, पण मेसेजेस चिकार होते. बहुतेक मेसेजेस फॉरवर्डेड जोक्स वगैरे होते. पर्सनल फार थोडे. पण जे होते ते... “मिस यु”, “व्हेन यु विल बी कमिंग टू इंडिया?” “आय ऎम नॉट ओके”, “दिस टाईम आय विल नॉट स्क्रू दिस रिलेशनशिप”, “यु हॅव अब्सोल्युटली नो आयडीया, हाऊ डज इट फील टू बी इन लव्ह”, “कान्ट बीलीव्ह समबडी कॅन बी बोरिंग दॅन मी”...
हजारो किलोचे दोन ठोकळे आपल्या डाव्या उजव्या बाजूने एकाच स्पीडने येत रहावेत आणि आपण जराही न हलता त्या ठोकळ्यांमध्ये मिलीमीटर बाय मिलीमीटरने चेचत जावं, पण चेचताना रक्ताचा एक थेंबही उडू नये आणि वेदनेचा एक कणही जाणवू नये, फक्त आपण मिटत जावं, असं काहीबाही वाटू लागलं. मी त्याचा फोन परत खाली ठेवून दिला.
हे आजच घडलेलं नाही, हे गेले अनेक दिवस घडतंय. आणि मला माहित नाही. एकीकडे मला मिठीत घेताना तो अजूनही तिचाच विचार करतोय. तिनं त्याच्या आयुष्यात परत यावं म्हणून विनवतोय.. मी तो फोन परत उचलला आणि भारतातल्या अनसेव्ह्ड नंबरवर डायल केला. दुसर्‍याच रिंगला फोन उचलला गेला. “फॅमिली के साथ हू. विल कॉल यु टूमॉरो!” आवाज एकशेएक टक्के निधीचाच होता.
बेडरूममधून त्याच्या आवाज आला, “स्वप्निल, मदद कर दो यार” मी त्याला हात  देऊन उठवलं. उठवल्याक्षणी त्याने मला परत त्याच्याजवळ ओढलं, माझ्या गालावर त्याचे ओठ भिडले आणि कानांत हलकेच कुजबुजत तो म्हणाला. “आज घरी आल्यापासून एकदाही जवळ आली नाहीस. ऑफिसमध्ये काही बिनसलंय का? अपसेट लग रही हो”
मी स्वत:ला दोन्ही हातांनी त्याच्यापासून दूर केलं. “आता. याक्षणी, आफताब. या माझ्या घरामध्ये तुझं जे काही सामान आहे ते उचलायचं आणि चालू पडायचं. परत कधीही मला तुझं तोंड दाखवायचं नाही”
“काय झालं?” त्याच्या कपाळावर केवळ एक सूक्ष्म आठी उठली. “घरी कुणी काही बोललं का? मी अझरभाईला सगळं सांगितलंय... तुझ्या घरी पण सांगूच. इन फॅक्ट मी तर म्हणतोय की....”
“काही म्हणू नकोस. आज मी ऑफिसमध्ये असताना निधी इथे आली होती. हे खरं आहे की खोटं या प्रश्नाचं उत्तर दे.” माझ्या या वाक्यावर मात्र तो एकदम चमकला.
“तुला कुणी सांगितलं?”
“खरं की खोटं?”
“कुणी सांगितलं”
“खरं की खोटं”
“हो. ती आज आली होती. तिला भेटायचं होतं. माझ्याकडे तिची काही पत्रं होती. फोटो होते. ते तिला परत हवे होते. मी कधीतरी तिला ब्लॅकमेल करेन असं वाटलं. मी पत्रं जाळली पण तिचे फोटो आज परत दिले”
“तुला ते फोटो ईमेल करता आले असते ना?”
“स्वप्निल, त्यासाठी ते स्कॅन करावे लागले असते. एकेकाळी डिजिटल कॅमेरा नव्हते. निगेटीव्हवर डेव्हलपर केलेले जुने फोटो आठवतात?  तिला निगेटीव्हसकट दिलेत. पत्रं पण तिनं अकरावीबारावीत असताना लिहिलेली होती. ईमेल्स इझीली फॅब्रिकेटेड आहत असं सांगता येतं. पण हॅंड रिटन लेटर्स आर व्हेरी स्ट्रॉंग एव्हिडन्स, म्हणून तिनं परत मागितली.”
“तू इतके दिवस ती पत्रं जपून का ठेवलीस?”
“इडियट, आता तर सांगितलं ना जाळली म्हणून. ठेवून काय त्यांचं लोणचं घालणार होतो का? तुझ्या घरी सामान शिफ्ट करण्याआधी मी स्वत: जाळली. तिलाही तेच सांगितलं. कितीतरी वेळ तिचा विश्वास नव्हता, तुझी शपथ घेतली तरी नाही”
“ती किती वाजता आली आणि किती वाजता गेली? पत्रंफोटो देणंघेणं यासाठी एखादतास पुरेसा असावा. खाली सीक्युरीटी लॉगमध्ये तिनं लिहिलंय की ती साडेअकरा वाजता आली आणि चारवाजता परत गेली. पाच तास... दोन पिक्चर पाहिलेत का तुम्ही? केलंत काय?”
“स्वप्निल, तुला म्हणायचंय काय? अरे, बोलत बसलो होतो.  निधी इथे आली होती हे मी तुला सांगणारच होतो. आल्यापासून तू अपसेट दिसलीस म्हणून विषय काढला नाही. निधीनं मला स्वत:हून कॉल केला की मला भेटायचंय. आम्ही खरंतर माझ्या ऑफिसजवळ लंचसाठी भेटणार होतो. पण माझा पाय अशक्य दुखत होता. जिना उतरणं पॉसिबल नव्हतं, म्हणून मीच तिला सांगितलं की इथं ये. जे काय असेल ते आपण इथं बोलू. आय वॉज होपिंग...”
“व्हॉट, व्हॉट यु वेअर होपिंग? ती परत तुझ्यासोबत येईल? नवर्‍याला सोडून? गेली अनेक वर्षं तू जो काही हा खेळ चालवला आहेस तो तिच्या लग्नानंतरही परत चालू राहील? निधी तुला परत मिळेल. सांग ना. व्हॉट यु वेअर होपिंग? निधी निधी आणि निधी. त्याखेरीज काहीच नाही ना.... एकदा तरी माझा विचार केलास?”
“आवाज चढवू नकोस! शांतपणे मी काय सांगतोय ते ऐकून घे. मी तिला फोन केला नाही. मी तिला भेटायला बोलावलं नाही. मी तिला मेसेज केला नाही. माझ्याकडे तर तिचा युएसचा नंबर सुद्धा नव्हता.”
“मग तिनं तुला कसा फोन केला? तिच्याकडे तुझा नंबर कसा काय होता?”
“या अल्ला, बचाओ मुझे इस पागलसे. माझा गेली पाच वर्षं झाली हाच तर नंबर आहे. तुझ्यासारखा दर दोन महिन्यांनी याचा प्लान चांगला म्हणून तो नंबर आणि मग बिल जास्त आलं की अजून तिसराच नंबर असं मी आजवर कधी केलंय का? तिनं दोन तीन महिन्यांपूर्वी मला मेसेज केला... कसा आहेस? मी उत्तर दिलं ठिक आहे. थोडंफार कधीतरी जीटॉकवर चॅट केलं. दॅट्स इट.  त्यानंतर तिनं काल स्वत:हून सांगितलं की तिला भेटायचंय, कशासाठी ते सांगेना. जस्ट इट्स व्हेरी इम्पोर्टंट इतकंच म्हणाली. मी बाहेर भेटलो असतो, पण माझा पाय तुझ्यासमोर आहे. ती परवा परत युएसला जाईल, म्हणून म्हटलं. घरी ये.”
“माझ्या घरी?”
“तुझ्या घरी... सीरीयसली, गेली सहा महिने आपण एकत्र आहोत तेव्हा कधीही तू हे शब्द वापरले नाहीस, बर्‍याचदा आपलं घर. हेच तर म्हणत होतीस ना?”
माझा मोबाईल वाजत होता. “कुणाचा कॉल आहे बघ.”
“आईचा असेल, मी नंतर करेन”
“दिवाना हुआ बादल. ही रिंगटोन अझरभाईची आहे... त्याच्याशी बोल. आपण नंतर हे डिस्कशन करूया”
“यात डिस्कशन करण्यासारखं काहीच नाहीये. आफताब तू मला मूर्ख समजतोयस का? हे बघ, मी ही अपेक्षा कधीच केली नाही की तू निधीवर ज्या असोशीनं प्रेम केलंस त्याच पद्धतीने माझ्यावर करावंस. निधी तुझं पहिलं प्रेम होतं, पण जेव्हा तू माझ्यासोबत आहेस.. मी असंही म्हणत नाही की, माझ्यावर प्रेम करताना, पण तू माझ्यासोबत असताना तिला भेटणं मला का खटकणार नाही? तुझं माझ्यावर प्रेम नाही हे मला माहित आहे..”
“एक मिनिट, स्वप्निल! काय बहकल्यासारखं बोलतेस? मी निधीला भेटलो हे चुकलंच. ती ज्या क्षणी या घराच्या दारातून बाहेर पडली त्याक्षणी जाणवलं की मी काय चूक केली. ती इथे येणार हे मी तुला किमान फोनवर सांगायला हवं होतं. मी तुला फोन केलासुद्धा. पण तू उचलला नाहीस. आल्यापासून सांगितलं नाही, माझ्यात हिंमत नव्हती. तुला जर हे असं बाहेरून कूठून समजलं नसतं तरी मी आज ना उद्या तुला स्वत:हून सांगितलं असतं. माझ्या लाईफमधली अशी कुठलीही गोष्ट नाही जी मी तुझ्यापासून लपवून ठेवली असेन...”
“रीअली? गेले दोन आठवडे तू कांदिवलीमध्ये जातोस. तिथल्या बिल्डरकडून तुला मेल येतायत. तू तिथे फ्लॅट विकत घेणारेस... हे तू सांगितलंस मला? आं?? गेले महिनाभर तुझ्या वेब हिस्ट्रीमध्ये मला मॅट्रीमोनिअल साईट दिसतायत. तू मुस्लिम मॅट्रीमोनिअलवर रजिस्टर केलंस हे सांगितलंस तू मला?? त्यापैकी दोन मुलींचे तुला फोनही आले होते ना... अशी कुठलीही गोष्ट नाही जी मी तुझ्यापासून लपवली असेल.... हे तू सगळं मला सांगितलंस?”
“स्वप्निल, आता तू हिस्टेरीक होतेस. शांत बस. दोन मिनिटं, रडणं थांबव मी काय सांगतो ते ऐकून घे!”
“मला नाही ऐकायचं आफताब. ज्यावेळी मी प्रेग्नन्सीच्या भितीने अर्धमेली झाले होते तेव्हा तू काय म्हणालास, आपण निस्तरून घेऊ, एकदाही तुला वाटलं नाही की असं म्हणावं मी तुझ्यासोबत आहे. आपण...”
“आपण लग्न करू! एकत्र राहू, अख्खं आयुष्य. हेच म्हणायला हवं होतं ना? या शब्दांत म्हटलं नाही पण जे म्हटलं त्याचा अर्थ तू सोयीस्कर रीत्या काढतेस. आपण. एकत्र. हे दोन शब्द तुला त्या वाक्यात महत्त्वाचे नाहीत? स्वप्निल, झक मारो आपलं रिलेशनशिप, झक मारो निधी. पण जर तू... तू माझी बेस्ट फ्रेंड.. जर अशा कुठल्याही बाबतीत अडकली असशील, तर जरी ते बेबी माझं नसतं, तरीही मी तुझ्याशी लग्न केलं असतं! विचारलंही नसतं, की कुणाचं आहे. फक्त तुझ्यासाठी... यु नो, माझा धर्म मला ऍबॉर्शनची परवानगी देत नाही. धर्मामधल्या प्रत्येक गोष्टी मी पाळत नसेन, पण ज्या पाळतो त्या कट्टरपणेच पाळतो. अशावेळी, जर माझ्यामुळे तू गरोदर राहिलीस तर मी जबाबदारी झटकेन असं तुला का वाटतंय? स्वप्निल, मी अख्खं आयुष्य तुझ्यासोबत घालवायला तयार आहे...”
“तू खोटं बोलतोयस. केवळ आज हे प्रकरण तुझ्यवर शेकलंय म्हणून. अन्यथा, इतक्या दिवसांमध्ये एकदाही तू मला लग्नासाठी विचारलं नाहीस. किंबहुना, मी घरी आपल्या नात्याबद्दल सांगणार म्हटल्यानंतर तू रातोरात माझ्यामागे आलास आणि मला सांगू दिलं नाहीस. गोडगोड बोलून तू मला गप्प बसवत राहिलास. तुला माहित आहे की, जर माझ्या घरी आणि अझरभाईला समजलं तर तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. माझा बाप तुला धरून मांडवात आणेल याची तुला भिती होती आणि आहे. तुला माझ्यासोबत गमजा मारायच्या आहेत, पण लग्न करायचं नाही. बरोबर ना?”
“स्वप्निल, यतिनकाकाचे माझ्या घरावर इतके उपकार आहेत की त्यानं सांगितलं तर डोळे मिटून कड्यावरून खाली उडी मारेन. आठवतंय ना? अरिफची बॉडी ताब्यात घेण्यासाठी पैसे नव्हते. यतिनकाकाने रात्री अडीच वाजता अम्मीकडे पन्नास हजार.. त्याकाळी.. आणून दिले. अरिफची मय्यत त्यांच्या पैश्याने झाली. नंतर कितीहीवेळा ते पैसे परत केले तर त्यांनी घेतले नाहीत. अझरभाईला गावामध्ये त्यांनी उभा केलाय. त्यांच्या एका शब्दांवर लोकांनी भाईकडे कामे दिली. तुम तो जाने देओ, यतिन काकांनी त्यांची लुळीपांगळी मुलगी जरी दिली असती ना तरी लग्न केलं अस्तं.” तो किंचित हसला. “इतक्या मॊठ्या मालदार असामीच्या मुलीबरोबर तर नक्कीच.” तो दोन पावलं पुढे आला. चेह्र्‍यावर दुखर्‍या पायाची वेदना कसमसत उठली. “जस्ट किडींग. पण असा वेड्यासारखा विचार करू नकोस. निधी प्रकरण माझ्यासाठी संपलंय. आता केवळ तू आहेस. आणि तूच राहशील. मला कायम वाटायचं, की माझं निधीवर खूप प्रेम आहे, पण तुझ्यासोबत राहिल्यावर जाणवतंय की खरं प्रेम काय असतं. ऐक, आता मी काय सांगतो. निधीला तिनं काय चूक केली ते समजलंय. जातीमधला, ओळखीतला अरेंज मॅरेज करूनही ती सुखी नाही. हॅपी नाही. दोन तास इथं मला ती हेच सर्व सांगत होती. युएसमधला एकटेपणा, बाहेर जायची सोय नाही, एक्स्ट्रीम वेदर कंडीशन्स, सोशलायझिंगच्या नावापुरतंच मर्यादित फ्रेंड सर्कल वगैरे वगैरे. प्लस नवर्‍याचा जॉब खूप डिमांडिंग. व्हिजामुळे हिला काम करता येत नाही..नवर्‍याबरोबर फार पटत नाही म्हणाली”
“आफताब, आय रीअली डोंट केअर अबाऊट हर. दोन दिवसांपूर्वी मला गावात जेव्हा भेटली तेव्हा तर नवर्‍याबरोबर जाम खुश होती.  पण तिच्या मॅरीड लाईफशी मला देणंघेणं नाही. मला तिच्याबद्दल बोलायचंसुद्धा नाहीये. तू... मला फक्त तुझ्याकडून उत्तरं हवीत. एकीकडे म्हणतोस की, मी लग्न करेन. कधी हा प्रश्न मी विचारू का?”
“सध्या नाही, इतकंच उत्तर देईन.” तो अचानक तुटकपणे म्हणाला.
“धन्यवाद. मी तुझ्याशीच लग्न करेन, म्हणत एकदा धोका सहन केलाय परत तेच नकोय. तू इथून जा.”
“स्वप्निल, चल. जेवलीस की तुला बरं वाटेल. ऑफिसमधून आल्यापासून काही खाल्लं नाहीस. खिचडी लावू की हॉटेलमधून ऑर्डर करू?”
“मला भूक नाही.”
“भूक नसली तरी जेवणं कंपल्सरी आहे. मला नंतर पेन किलर्स गिळायच्यात, तेव्हा जेवून घे. मी कूकर लावतो”
“नको, तू बस, मी लावते.”
किचनमध्ये गेले तरी डोकं भणभणतच होतं. मघाशी अझरभाईचा फोन आला तेव्हा चिडून मी फोन सायलेंटवर टाकला होता. आता पाहिलं तर सात मिसकॉल्स होते. जादूचे दोन, आईचे तीन आणि चक्क आशिषचे चार. आता या दुखियारी आत्म्याला फोन करायला काय झालं म्हणून मी लगोलग त्याला फोन लावला.
“स्वप्निल, कधीचा फोन करतोय. आहेस कुठे?”
“घरीच आहे पण जरा बिझी होते. काय झालं?”
“आवाज का असा येतोय? काही प्रॉब्लेम आहे का?”
“काही नाही, जरा सर्दी आणि असंच. बोल ना”
मी फोनवर बोलत असताना आफताब किचनच्या दारापाशी येऊन उभा असल्याचं मला जाणवलं. आमच्या ऑफिसमध्ये यंदा दिवाळीला परत ट्रॅडिशनल ड्रेस करायचे होते. पण यंदा एकेकट्याने न करता जोडीनं करायचं ठरवलं होतं. तर आशिषला माझ्यासोबत पेअरिंग करायचं होतं. मी हो म्हणून सांगितलं. आपण मद्रासी किंवा कश्मीरी कपल करू असं तो म्हणाला. आशिषचा करपट रंग आणि माझं सफरचंदासारखं गोलमटोल शरीर पाहता, कश्मीरी कपल म्हणून गेलो तर ते लोक आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावाबिवा ठोकायचे, त्यामुळे आपण मद्रासी कपल केलेलं बेस्ट. एकतर तिकडच्या हिरॉईन्स पण अशाच जाडया आणि आशिषचा रंग त्यांच्यामध्ये अगदी परफेक्ट. आईकडे काकूने आणलेली एक कांजीवरम होती, म्हणजे तोही प्रश्न नव्हता. पण खरंतर आशिषला केवळ त्यासाठीच बोलायचं नव्हतं, त्यानं आज बॉस मला कसा विनाकारण ओरडला आणि हा बंगाली परमार्थक किती घाण पॉलिटेक्स खेळतो हे त्याला सांगायचं होतं.
मी हे सर्व त्याच्याशी बोलत असताना आफताब माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. त्यानंच तांदूळ धुतले, कांदे चिरले.  मी तरीही फोनवर बोलत राहिले. मग तो बाहेर गेला. जवळजवळ दहा मिनिटांनी मी फोन बंद केला तेव्हा कूकरची एक शिट्टी झाली होती. गॅस हळू करून मी बेडरूममध्ये येऊन बसले. तो मोबाईलवर काहीतरी टाईप करत होता.
मी आलेली बघताच त्यानं मोबाईलचा स्क्रीन लॉक केला. “आशिषचा फोन? काय म्हणत होता?”
“ते मी तुला का सांगू? काय संबंध?”
“बरं नको सांगूस. ऐक ना, भाईचा मेसेज होता. तू जरा प्लीज त्याला कॉल करशील. त्याला महत्त्वाचं काही बोलायचंय”
“मी त्याला मघाशी कॉल केलाय. त्याला बोलायला वेळ नव्हता, आता माझ्याकडे वेळ नाही.”
“अजून मूड खराब आहे का? स्वप्निल, छोड ना यार. तुझ्या गळ्याची शपथ, परत कधीही निधीला भेटणार नाही”
“मेसेजेस कर, फेसबूकवर  एकमेकांच्या फोटोला लाईक करा, पोक करा, गप्पा मारा. फक्त ती इथं आसपास नाही आणि म्हणून तुला जेव्हा कधी एखादीचं शरीर हवं होईल तेव्हा माझ्याजवळ ये. कारण, मी इथं फुकटात अव्हेलेबल आहे. मी मूर्ख तर आहेच, तुला मिठीत घ्यायला, तुझ्या प्रत्येक स्पर्शावर उसासायला तयार.”
“अतिशय चीप लेव्हलवर बोलतेस, हे तरी तुला समजतंय का? निधी इज ओवर फॉर् मी”
“तिच्या लग्नाच्यावेळी तू हेच म्हणाला होतास. पण मग कसा कुणास ठाऊक तुमचा कॉंटॅक्ट झाला आणि...”
“कसा कॉम्टॅक्ट होणार नाही? आपण साठच्या दशकांत नाही. दिस इज द एज ऑफ सोशल मीडीया. आपण एखाद्या व्यक्तीपासून कितीही  दूर पळालो तरीही ती व्यक्ती आपल्या आजूबाजूलाच असते. मी तिला फेसबूकवर शोधलं नाही... कॉमन फ्रेंड्समधे दिसत राहिली. कधीतरी अचानक फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली. तिनं लगेच ऍक्सेप्ट केली. मग साधारण चॅटिंग केलं.. पण माझ्यावर विश्वास ठेव..  दिस इज ओव्हर.”
“माझा आता कशाहीवर विश्वास नाही..”
“ठिक आहे, नको ठेवूस. पण आता शांत झोप. उद्या सकाळी उठून चर्चा करूया. वाटलं तर खूप भांडूसुद्धा. माझं चुकलं असं तुला वाटत असेल तर मला तू म्हणशील ती शिक्षा मान्य आहे. फक्त एक सोडून. तू आणि मी वेगळं व्हायचं नाहीये..”
“एकत्र राहून धोका दिलेला मला सहन होणार नाही. आफताब...”
“मी यतीन नाही. मी कितीही फ्लर्ट आहे असं तुला वाटत असलं तरी मी प्रत्यक्षामध्ये माझ्या प्रत्येक नात्याबद्दल इतकाच सीरीयस आहे. तुझ्याबाबतीत तर जास्तच. नशीबाने दर वेळी माझे फासे उलटे फेकलेत. यावेळी हे फासे मला हवे तसेच पडायला हवेत. यु आर प्रेशस. मी तुला गमवणार नाही. आय विल नॉट स्क्रू दिस रिलेशनशिप...” हे वाक्य तो आधी कुणाला म्हणाला? कुणाबद्दल म्हणाला? मी विचारलं नाही. केवळ मान खाली घालून हुंदके देत राहिले. “चल,  जेव आणि झोप”
मी डोळे पुसत कसेबसे चार घास खाल्ले. त्यानेच भरवले खरंतर. मला सध्या काहीही सुचत नव्हतं. तो मला काहीतरी समजावत होता, पण संध्याकाळपासून रडून डोकं दुखायला लागलं होतं. विचित्ररीत्या भिरभिरल्यासारखं फीलिंग येत राहिलं. “आय नीड अ ड्रींक” मी त्याला सांगितलं.
“अजिबात नाही. भांडलो म्हणून प्यायची सवय लावू नकोस. आयुष्यभर सोबत राहणार, आयुष्यभर भांडणार तेव्हा प्रत्येक वेळी...”
“आयुष्यभर मी तुला माझ्या नजरेसमोर दुसर्‍या बाईबरोबर नाही बघू शकणार”
“भांडायला तेच एक कारण असतं का? आणि, नाही मी तुला सोडून कुठे जात... कितीवेळा सांगू? ते मघाशी बडबडलीस, कांदिवली साईडला फ्लॅट घेतोय ते आपल्यासाठीच. अख्खं लाईफ आपण वन बीएचकेमध्ये काढू शकत नाही. मोठा फ्लॅट हवा, तुला आधी सांगितलं नाही, कारण माझंच अजून ठरत नाहीय. सेंट्रल लाईन तुलामला दोघांनाही नको, हार्बर लाईन तुला बेस्ट, मला वेस्टर्न लाईन पण शाळा वगैरे सोयी वेस्टर्नला चांगल्या आहेत...असं अजून फक्त विचार करतोय. आता बूक केला तर पझेशन येईपर्यंत दोन तीन वर्षं जातील. तोपर्यंत आप्ण अजून सेट होऊ. तुला नंतर सांगणारच होतो.”
त्याहीक्षणी मला आफताबच्या गालावर जाऊन ओठ ठेवावेसे वाटले तर त्यात चूक काय... शाळा वगैरे सोयींचा विचार!!!  
“आणि ते मॅट्रीमोनियलवर रजिस्ट्रेशन?”
“ताई, अझरभाईंसाठी केलंय. ते स्वत: तर मुलगी बघत नाहीत तर किमान मला बघू देत. त्याच्या लाईफचं गाडं सेट झाल्याखरीज मी माझा विचार नाही करू शकत. म्हणून तर इतके दिवस तुला विचारायचं थांबलोय. त्याला मी सांगूही शकत नाही...तुझ्यामाझ्याबद्दल. स्वप्नील, त्या रात्री माझ्यामुळे त्याचं लग्न मोडलंय... मी ते सुधारल्याखेरीज माझा संसार मांडू शकत नाही.. पण असो. आता झोप. रात्र खूप झालीये. उद्या बोलू”
त्या रात्री जर आफताबनं सर्वात मॊठी चूक काही केली असेल तर ती म्हणजे, मला किमान एक पेगदेखील घेऊ दिला नाही. मी किमान गाढ झोपले असते... रात्रीचे दोन अडीच वाजले असावेत, मला जाग आली.  तशी मला रोज रात्रीच येते, बाथरूमला जाऊन येऊन पाणी पिणे आणि मग परत येऊन झोपणे इतकाच कार्यक्रम. मला माझ्या या घराची इतकी सवय झाली होती की, लाईट लावायची देखील आवश्यकता नसायची. अंधारातून मी या घराचा कोपरानकोपरा फिरू शकत होते. आज जाग आली, तेव्हा बाजूला आफताब नव्हता. इतक्या रात्रीचा तोही बाथरूमला गेला असेल असं वाटलं पण कुठलाच लाईट चालू नव्हता...
मी अंधारातच उठून हॉलमध्ये आले. तो समोरच्या खुर्चीवर अंधारात बसला होता. कानाला मोबाईल. अतिशय हळू आवाजात तो बोलत होता. “प्लीज ऐकून घे... हो मान्य आहे, पण यापुढे या नंबरवर कॉल करू नकोस. स्वप्नीलला समजतं.. ती फोन चेक करते.... पासवर्ड वगैरेची गरज नाही.. पण आता...”
संध्याकाळी रजिस्टरवर पाहिलेलं नाव. मी फोन नंबर डायल केल्यानंतर आलेला तिचा आवाज. त्याने स्वत:हून कबूल करणं की तीच इथं आली होती. या सर्वांपेक्षा आता मला आलेला संताप फार फार वेगळा होता. एका निमिषार्धात माझा पुतळा झाला. मी कोण आहे, काय करतेय, याचं काहीही भान उरलं नाही. खरंतर त्याला हाक मारायची होती, त्याला विचारायचं होतं की इतका वेळ माझ्यासोबत आयुष्यभराच्या कमिटमेंटचे इतके गोडवे गाणारा कोण आणि आत्ता माझ्या नकळत फोनवर तिच्याशी बोलणारा कोण....
कदाचित मी आल्याची चाहूल त्याला लागली असावी. त्यानं मागे वळून पाहिलं आणि फोन बंद केला.
“स्वप्नील! तू? आय मीन... सॉरी. निधीचा कॉल होता म्हणून मी घेतला. इतक्या रात्री... अर्जंट बोलायचंय असा तिचाच मेसेज होता...”
“मी गेली अख्खी संध्याकाळ तुझं बोलणं ऐकतेय, आणि फसतेय. आता नाही. आफताब, खरंच जा. प्लीज जा, माझ्यावर उपकार म्हणून जा. माझ्यावर प्रेम असलं तर जा. मी हे नाही सहन करू शकत... मी कदाचित निधी नसेन, पण मी निधीची रीप्लेसमेंट नाही... मी सेकंड हॅंड माल नाही... प्लीज... हात जोडते... पण आता हे खेळ पुरे कर... तू तिच्याशिवाय इतर कुणाहीसोबत कधीच राहणार नाहीस... तो तुझा वीकनेस आहे पण तुझ्या या वीकनेसपायी... मी माझ्या आयुष्यामध्ये इतका प्रचंड मोठा पराभव सहज स्विकारू शकत नाही..” मी रडत भेकत कशीतरी  बोलले असणार.
“स्वप्निल, तिनं मला कॉल केलाय. मला म्हणाली आठ वाजता का फोन केला होतास.. म्हटलं मी केलाच नाहीये... त्यावरून इतका वेळ बोलत होतो. तू घरी आल्यापासून मी तिला कॉल केलाय का? इन फ़ॅक्ट तिला आता फोनवर हेच सांगत होतो की यापुढे फोन करू नकोस.”
“या नंबरवर फोन करू नकोस... ऐकलंय मी ते... म्हणजे, दुसर्‍या नंबरवर फोन कर.. असंच ना? हे माझ्यासाठी असह्य आहे”
“सॉरी, खरंच स्वप्निल, मनापासून सॉरी..”
“तुझे सॉरी नेऊन घाल तिकडे खड्ड्यात. आय डोंट केअर. तुला एकदा सांगितलेलं समजलं नाही का? चालता हो. हरामखोर!!! माझ्या घरात राहून. माझ्यावर प्रेमाची नाटकं करून दुसर्‍या पोरीबरोबर फोनवर गमज्या मारतोस.... तुला लाज कशी वाटत नाही रे हरामी”
“स्वप्निल, आवाज कमी आणि शिव्या नकोय”
“का? शिव्या का नको? तू माझ्या डोळ्यांदेखत  मला फसवतोस. वर ही अपेक्षा की मी त्याला फसवणूक म्हणूसुद्धा नये. आज ज्यावेळी मी कन्फ़्रंट केलं तेव्हा लग्नाचे गोड गोड स्वप्नं दाखवतोस. इतके दिवस जे कधी बोलला नाहीस. तुझं निधीवर प्रेम होतं, आहे आणि राहील. मला त्याच्याशी देणंघेणं नाही. पण माझ्यावर प्रेम करत असताना फक्त माझ्यावर.... मी कुणाहीसोबत शेअर करणार नाही... किमान माझा पुरूष तरी.. नेमकं तेच तुझ्याकडून जमणार नाही.... म्हणून तू निघून जा.. मला तुझं तोंड बघायचं नाहीये. हरामी साला...”
“ओके, फाईन. पण यापुढे एक शब्द बोलायचा नाहीस. आव्वाज बंद. मला शिव्या नकोत. हरामी नाहीये. बापाचं नाव आहे माझ्याकडे. तुझ्या बापाइतका श्रीमंत नसेल तो, पण किमान रंडीबाज नव्हता. कळलं... आता बोलायचं नाही. जातो.” त्यानंतर पाचव्या मिनीटाला आफताब माझ्या घराबाहेर पडला. सोबत केवळ त्याचा मोबाईल, चार्जर, वॉलेट आणि लॅपटॉपची बॅग. जिन्यावरून उतरताना त्याला पाय उचलवत नव्हता तरी तो बाहेर पडला. मी त्याला थांबवलं नाही. तो कपडे बदलत असताना थांबवलं नाही. चार्जर काढून घेत असताना थांबवलं नाही. दार उघडून तो बाहेर पडला तेव्हा थांबवलं नाही. इतक्या रात्री तो कूठे आणि कसा जाईल याचा विचार करूनही मी त्याला थांबवलं नाही.

त्यावेळी घड्याळामध्ये रात्रीचे पावणेतीन वाजले होते.