Thursday, 26 May 2016

रहे ना रहे हम (भाग १०)

अखेर सेकंड इयर पार पडलं. मला फारश्या अपेक्षा नव्हत्याच पण तरी पेपर बर्‍यापैकी चांगले गेले होते. केदारची युनिव्हर्सिटी एक्झाम असल्याने त्यानं पण बराच अभ्यास केला होता. क्वचित कधीतरी फोन करायचा अथवा मला भेटायला बोलवायचा. पण त्याच्या परीक्षेच्या काळात आम्ही फारसे भेटलो बोललोच नाही.
अझरभाई गल्फमधून परत आला होता. त्याचं कॉंट्राक्ट संपलं  होतं आणि परत रीन्यु करण्याऐवजी तो सरळ भारतात परत आला होता. इथेच एखादी साधी नोकरी करायची त्याची इच्छा होती. तो आल्यामुळे नूरीभाभीला माहेरामधून या घरात यावं लागलं होतं. आफताब परत पुण्य़ाला गेला. त्याचं आणि नूरीचं भांडणं नक्की कशामुळे झालं हे मला माहित नव्हतं. त्यानं सांगितलं नाही. मी विचारलं नाही. अझरभाई माझ्याशी जेवढ्यास तेवढंच बोलायचा. नूरीभाभी आधीसारखीच आमच्यापासून लांब असायची.
केदारचं थर्ड इयर संपल्याने तो आता पूर्ण वेळ रिकामाच होता. पुढं शिकायचं नाही हे नक्की होतं. त्याच्या बाबाच्या सांगण्यावरून तो संध्याकाळी पूर्ण वेळ दुकानातच असायचा. सकाळी अगदीच वेळ जाण्यासाठी म्हणून कसलातरी हार्डवेअरचा कोर्स करत होता. आधी तोच कॉलेजात असायचा तेव्हा आम्ही दिवसाभरात कधीही एकमेकांना भेटू शकत होतो. आता मात्र अगदी अपॉइंटमेंट वगैरे ठरवावी लागायची. अगदी बर्‍याचदा तो कॉलेज सुरू होण्याआधीच मला येऊन भेटायचा. “काऊ, तुला सकाळीच भेटलं की दिवस फार मजेत जातो” या मखलाशीसकट.
मला इथे जर लिहायचंच झालं तर मी केदारला किती वाटेल तितकी दूषणं देऊ शकते. पण देणार नाही. आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काही ना काहीतरी शिकवते. मग केदार तर तीन वर्षं माझ्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा होता.
मघाशी मी म्ह्टलं की आमच्या प्रेमकथेची ही दोन-तीन वर्षं माझ्या मेंदूमध्ये तीन चार सेकंदात झर्रकन जातात. जात नाहीत खरंतर मी घालवते. कारण जिथे जिथे त्याच्या आठवणी येतात तिथे तिथे मी पॉझचं बटण दाबल्यासारखी अडकून राहते...
केदारनं मला प्रेम करायला शिकवलं. प्रेमामध्ये बेभान व्हायला शिकवलं. त्याचबरोबर माझ्या स्वत:च्या व्यक्तीमत्त्वाची जाणीव त्यानं मला करून दिली. तो भेटण्याआधी मी चारचौघी टीनेजर असतात तसली होती. माझ्या व्यक्तीमत्त्वाला काही वेगळेच कंगोरे नव्हतेच म्हटलं तरी चालेल. मला कसलीच ठाम मतं नव्हती. केदारनं मला केवळ हे कंगोरे दिले नाहीत तर स्वत:च मत बनवायला शिकवलं.
प्रेम म्हणजे केवळ लफडं नाही, सेक्स नाही तर त्याहीपलिकडे जाऊन कसलातरी गूढ पण गुंतागुंतीच्या धाग्यांचा होणारा मोहक घोळ आहे हे त्याच्यामुळे मला जाणवलं. कितीतरी बाबतीत केदार “टिप्पिकल” होता. त्याची मतं पारंपारिक होती. पण वेळ आल्यास ती पारंपारिक मतं बाजूला ठेवण्याचीदेखील त्याची तयारी होती. काही गोष्टींमध्ये त्याचं आणि माझं बिल्कुल पटायचं नाही. मी खरंच खूप हट्टी होते, आजही आहे, पण वेळ आली तर तो माघार घ्यायचा. आमच्या लग्नानंतर त्याला घरात खूप प्रॉब्लेम झाले असते हे सांगायला कुण्या भविष्याची गरज नव्हती. रोजच्या बोलण्यातूनही ते आम्ही दोघांना जाणवायचं. पण हे प्रॉब्लेम आपण निस्तरून घेऊ असा त्याला प्रचंड विश्वास होता.
मी एकुलती एक. आईच्या पदराखाली अगदीच लाडाकोडांत वाढलेली. त्याउलट तो वीस पंचवीसजणांच्या कुटुंबात वाढलेला. सर्वांत मोठा नातू म्हणून आज्जीआजोबांचा लाडका. गंमत म्हणजे केदारची पणजी अजून होती. वयाची नव्वदी आली तरी त्या अतिशय तरतरीत होत्या. त्यांच्या घरामध्ये सर्व निर्णय त्यांच्याच कलानुसार व्हायचे. माझ्या घरात बाबा मी आणि आई असे तिघेच. घरामध्ये भाजी कुठली करायची इथपासून दिवाळीला दुकानाला रंग कुठले द्यायचे इथवर सर्व निर्णय माझ्या मतानुसार. मनाविरूद्ध वागणं म्हणजे काय ते मला माहितच नाही.
आज आठवलं तरी गंमत वाटते. पण केदारला भेटेपर्यंत मी एकदाही कधी रस्त्यावर पाणीपुरी खाल्ली नव्हती. त्याच्या दुकानामध्ये पाणीपुरी संध्याकाळी मिळायची. पण तिथं खाणं शक्य नव्हतं. केदारला अख्ख्या गावात कुठे पाणीपुरी मिळते आणि कशी मिळते याचे सर्व डीटेल्स माहित होते., आम्ही एकदा असंच सहज हायवेवर एका छोट्याशा पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी खाल्ली. आजारी पडेन म्हणून आई मला कधी बाहेर खाऊ द्यायचीच नाही. हवी असेल तेव्हा घरी बनवायची. शाळेत असताना बाहेर वडापाव वगैरे खात होते. पण पाणीपुरी म्हणजे बिग नो नो. केदारमुळे मी पाणीपुरी खायला शिकले.
वसीम प्रभातच्या ग्रूपमुळे मी खरंच किती बिघडले होते ते मला आज जाणवत होते. केदारला अर्थत हे सर्व मी कधीच सांगितलं होतं. असं वागू नये म्हणून केदारनं मला लेक्चरपण दिलं होतं. मी सिगरेट ओढते हेही त्याला सांगितलं. त्यानं मला त्याची शपथ घातली. हे शपथ घालणं प्रकरण मला आजवर समजलेलं नाही. केवळ एखाद्यी व्यक्ती अमुक वागली तर मी मरेन. म्हणून तू असं वागू नकोस. या अटीला काही अर्थ तरी आहे का? पण मी त्याची शपथ घेतली. नंतर त्यानं घेतलेल्या सगळ्याच शपथा मोडल्या तरी मी माझी शपथ मोडली नाही.
आजही मी माझ्या आजूबाजूला जेव्हा खुज्या मेंदूचे अनेक नवरे बघते तेव्हा मला केदार किती प्रगल्भ होता हे सतत आठवत राहतं.  एकदा मी असंच चिडून त्याला बाबाविषयी काहीतरी सांगत होते. बाबानं बाई ठेवली आहे वगैरे मी त्याला सांगितलं होतंच.
“माझ्या आईनं ना असल्या नवर्‍याला सोडून द्यायला हवं होतं” मी चिडून म्हटलं.
“हे बघ, काही झालं तरी तो त्यांचा संसार आहे. नवरा-बायकोच्या नात्यामध्ये तिसर्‍या व्यक्तीने कधीच बोलू नये. अगदी मुलांनीपण नाही” इतकंच बोलून त्यानं विषय संपवला. हाच नियम सगळीकडे लागू पडला तर या समाजासमोरचे किती प्रॉब्लेम कमी होतील. नवरा बायकोच कशाला, दोन व्यक्ती ज्या एकमेकांच्या प्रेमामध्ये आहेत त्यांच्या नात्यामध्ये इतर कुणी पडूच नयेत... त्यांच्या नात्यांची चिंता त्यांची त्यांनी वहावी. ज्याची लफडी त्यानेच निस्तरावीत.
केदारमुळे मला भटकायची आवड लागली. तो दर वीकेंडला कुठेतरी ट्रेकला जायचा. त्यांचा ट्रेकवाल्यांचा वेगळाच ग्रूप  होता. दोन-तीनदा मी त्यांच्यासोबत गेले पण तो ग्रूप मला फारसा काही कंफर्टेबल वाटेना. मी आणि केदार एकमेकांशी बोललोच काय अगदी बघितलं तरी ते चारपाच जणं अगदी फिल्मी स्टाईलने “काय चाल्लंय? बघतांव हा” वगैरे चिडवायचे. वैताग यायचा. आम्ही दोघं कपल आहोत म्हणजे काय दिवसाचे चौवीस तास रोम्यांटिक चान्स मारायच्या मूडमध्ये असतो की काय...
मला हे आवडत नाहीये हे केदारला मी स्पष्ट सांगितलं. मग नंतर आम्ही दोघंच कुठं फिरायला गेलो तरच... त्या ग्रूपसोबत कधीच नाही. पण तरी केदारने माझ्यासारख्या घरकोंबड्याला घराबाहेर काढलं. रविवारचा दिवस हा विधात्यानं आपल्याला सकाळपासून अखंड टीव्ही पाह्यला दिलाय अशी माझी प्रामाणिक समजूत होती. त्यात बारावीनंतर घरात केबल आल्याने ठराविकच प्रोग्राम पहायचे अशी काही अटपण नव्हती. त्यात जुने पिक्चर पण मस्त लागायचे. तरी केदारमुळे मी अख्खा रविवार कुठल्या तरी गडाच्या पायथ्यावरून कड्याकडे चालत घालवलेत. आमच्या दोघांच्याही सॅक तोच घ्यायचा, मी मस्त फिरायचे.
सुरूवातीला सेक्स खूप हवाहवासा वाटायचा, त्यावेळी अल्मोस्ट रोजच आम्ही दोघं कारमधून लॉंग ड्राइव्हला जात होतो. सेक्सचं नावीन्य होतं, एक्साईटमेंट होती. पण हळूहळू ती कमी झाली. म्हणजे असं अगदी ठरवून नाही... पण कमी झालीच. केदार अगदी सुरूवातीला मला खूप लिंगपिसाट वगैरे वाटला होता. सलग दोन चार वेळेला करूया म्हणायचा. पण मग त्यालाही ते फारसं काही वाटेनासं झालं. मला वाटतं कुठल्याही कमिटेड रिलेशनमधली ही स्टेज फार मस्त आणि भन्नाट असते. तुम्ही एकमेकांना शारिरीकरीत्या जाणता, भावनिकरीत्या एकमेकांवर अवलंबून आहात आणि भविष्यामध्ये तुम्हाला एकत्र रहायचं आहे. खळाळता ओढा जसा येऊन नदीमध्ये शांत होतं. तसं काहीसं या स्टेजला होतं. अगदी सुरूवातीला केदारनं माझ्या बॊटामधली अंगठी नीट करण्यासाठी जरी हात धरला तरी अंगामध्ये काहीतरी सळसळायचं, पण आता ते स्पर्शाचं नावीन्य राहिलं नाही. पहाटेच्यावेळी निवांतपणे डोळे उघडावेत आणि आपल्या अंगाभोवती त्याचा हात वेढलेला असावा, याचंही नंतर अप्रूप वाटेनासं होतं. पण तरीही नातं शिळं बनत नाही. ते वाहत राह्तं. नवनवीन वळणं घेत राहतं.
मला आयुष्यात मोठेभाऊ बहिण कोणच नाही. दोन्ही चुलत भाऊ साधारण माझ्या वयाचे. आतेभाऊ तर खूपच लहान. केदार मात्र मला मोठ्या भावासारखा होता. हे वाक्य कितीही ट्विस्टेड वाटलं तरी तसंच होतं. म्हणजे तो मला आवडत होता. सेक्शुअल रिलेशनशिप होतंच. लाईफ पार्टनर म्हणून तर तोच हवा होता. पण तरीही तो मला दादासारखा वाटायचा. असं नक्की का ते मला सांगता येणार नाही. मोठा भाऊ कधी अस्तित्त्वात नसल्याने माझ्या मनामध्ये त्याची अशी इमेज का झाली माहित नाही. तसं तो माझी फार काळजी घ्यायचा वगैरे अशांतला भाग नाही. उलट मी जास्तीत जास्त स्वावलंबी झालं पाहिजे असं त्याचं म्हणणं. “अगं, माझ्या घरात स्वयंपाकाला बाई आहे. मीही बनवेन. पण तुझं तुला काहीतरी करता यायला नको का? हलवायाच्या बायकोला अगदीच अडाणी राहून कसं चालेल?” तो मला चिडवायचा.  त्याची कटकट ऐकून मी आईकडून चहा, मॅगी आणि खिचडी या राष्ट्रीय डिशेस शिकून घेतल्या. त्याच्या घरामध्ये माझा विषय वारंवार येत होता त्यावरून तरी मी घरात सर्वांना पसंत होते असं त्याच्या बोलण्यावरून मला वाटलं होतं. माझ्या वाढदिवसाला तर त्याच्या आईनं मला चक्क फोन करून हॅपी बर्थडे पण म्हटलं होतं.
माझ्यामुळे केदारच्या आयुष्यावर इतकाच प्रचंड फरक पडला असेल का? माहित नाही. मी त्याला कधी विचारलंच नाही. पण त्याच्या डोळ्यांमध्ये माझ्याविषयी काळजी सतत दिसायची. म्हणजे “आजारी पडलेल्याची काळजी” किंवा “वाया गेलेल्या मुलाची काळजी” अशी नाही. तर “कसं होणार आहे या पोरीचं” छाप काळजी. अगदी पहिल्या दिवसापासून सायीसारखी ही काळजी त्याच्या डोळ्यांमध्ये तरळताना मी पाहिली आहे. पुढे कित्येक वर्षांनी त्या फनफेअरमध्ये त्यानं मला पाहिलं तेव्हाही हीच काळजी त्याच्या डोळ्यांमध्ये लगेच अवतरली. पुढच्याच मिनिटाला ती हळूहळू निवळलीदेखील, कदाचित आता माझी काळजी करायचं काहीच कारण उरलं नसेल. तो एक रूपया माझ्यावर कधीचा उधार राहिलाय!!!
मी फारसं केदारबद्दल कधीच बोलत नाही. जितकं मी अरिफबद्दल बोलेन, निधीबद्दल बोलेन, अझरबद्दल बोलेन. आफताबचं नाव तर सतत ओठांवर असतंच... पण केदारचं क्वचित. भळभळणारी जखम आहे ती. कधीही उघडली तरी तेवढ्याच आणि तितक्याच वेदना होतात. अश्या जखमा कधीच भरत नाहीत. भराव्यात अशी अपेक्षादेखील नसते.
केदारने मला या जखमा दिल्या. आयुष्यभराची संचित म्हणून. केदार माझं पहिलं प्रेम होता. त्याला विसरणं आयुष्यातून घालवून देणं कधीही मला जमलं नाही. आजही रिकाम्या वेळेमध्ये मी कधीतरी विचार करते. काळाचं चक्र मागं फिरवावं. त्या रात्री. दीड वाजता मला फोन करणारा केदार. त्याचा रडका आवाज ऐकून गडबडलेली मी.
“एकच वर्ष काय... स्वप्नील.. अख्खं आयुष्य घेऊन टाक. पण सोडव मला या द्विधेमधून ... तूच सांग मी काय करू?”
आणि मी त्याला सांगतेय.. “आपण लग्न करू केदार. तुझे घरचे लोक म्हणतात तसंच करू” मग तो हसतो. मी पण हसते. आम्ही दोघंही हसतो. तो फोन ठेवतो. दुसर्‍या दिवशी आमच्या लग्नाचे बेत ठरतात.
पण असं घडणं शक्य  नाही. कारण असं घडलंच नाही.
त्या रात्री मी फोनवर त्याला येऊ नकोस असं सांगितलं. मग तो आलाच नाही. त्यारात्रीपण. दुसर्‍या दिवशीपण. तिसर्‍या दिवशीदेखील. चौथ्या दिवशी मला त्याच्या लग्नाची आमंत्रणपत्रिका निधीने आणून दाखवली.
माझ्या आणि केदारच्या प्रेमकहाणीचा हा अंत. छोटीशी प्रेमकहाणी. पण त्याचा अंत मात्र आतपर्यंत जाऊन चिरफाळणारा.
>>>

माझं थर्ड इयर खरंतर अजून चालू व्हायचं होतं. एप्रिलचा महिना चालू होता. एके दिवशी आईनं मला टीव्ही बघत असताना पाठीत धपाटा घातला.
“का गं! त्रास देतेस” मी पाठ चोळत म्हटलं.
“आळशाराम, उठ. सकाळी उठल्यापासून तिथंच बसून आहेस. घर आवरायला मला मदत कर. बाबाला मी फोन केलाय तो दुपारी घरी येतोच आहे”
“कशाला?”
“क शा ला? लाज तरी वाटते का गं?” आई अशी भडकली की तिला भडकवायला मला अजून मजा येते. “मीनावहिनींचा फोन आला होता. उद्या सकाळी घरी येतायत. तुला बघायला”
माझ्या हातातला रिमोट खाली पडता पडता राहिला. मला बघायला? आईला केदार प्रकरण माहित होतंच तरीही ही काय भानगड होती.. माझा चेहरा बघून आई चक्क हसली. “केदारची आई. कळ्ळं? त्यांचा फोन आला होता. उद्या ते सर्वजण येतायत. बोलणी ठरवायला.”
चांगला एच बी ओ वर अलादिन लागला होता ते बंद करून मला आईसोबत घर आवरणे या कार्यक्रमात सहभागी व्हायला लागलं याबद्दल नाही म्हटलं तरी मला थोडं हसू आलंच की.
“हसतेस काय? उद्या छान साडी नेस. ब्लाऊज ठीक आहेत ना ते बघ. इस्त्री करून घे. जमत नसेल तर बाबाला सांग.” आमचा बाबा कपड्याला इस्त्री करणार म्हणजे काय विचारायचंच नाही. धोबीघाटवाल्यांना पछाड मारेल. आईच्या एकामागोमाग सूचना चालू झाल्या. खरतर याबद्दल केदार मला काहीच बोलला नव्हता. संध्याकाळी आमच्या घरात पुरेसा हलकल्लोळ उडालेला बघून अझरभाई डोकावून गेला. तेव्हा बाबा कोळिष्टकं काढायला स्टुलावर उभा होता. आई चायनाची क्रोकरी धुवत होती आणि मी टीव्हीवर प्यार किया तो डरना क्या बघत होते. सलमानचा पिक्चर मी चुकवेन तरी का!
“उद्या सकाळी दहा वाजता येतात. तेव्हा तूही ये. नूरीला पण घेऊन ये.” आईनं त्याला सांगितलं.
“आम्ही कशाला?”
“अरे, ते किमान दहाजणं येतील असा अंदाज आहे. आमच्याकडे तिघंच ते बरं दिसत नाही. मुलीकडचे थॊडेतरी पाहुणे नकोत का?” आई बहुतेक उद्या बोलणी झाल्याझाल्या लगेच लग्न करायचंय अशा तयारीमध्ये होती. मघाशी तिनं कपाटामधली चांदीची ताटवाटी आणि कुंकवाचे करंडे काढून ठेवलेले पाहिले.
पण तसं काही झालं नाही. सकाळी आम्ही अगदी सुसज्ज होऊन केदार आणि फॅमिलीची वाट पाहत होतो. मी आईची एक मोरपंखी साडी नेसले होते. अझरभाईने सकाळी मोगर्‍याची भरपूर फुलं आणली होती. आईने त्याचा गजरा पण घातला होता. एकदम तमिळ हीरॉइन झाल्यासारखं वाटावं म्हणून आईनं सापडतील तितके दागिने मला घातले होते. सांगितल्यासारखा अझरभाई आला. नूरी काही आली नाही.
आईचा दहाजणांचा अंदाज साफ खोटा ठरला. मोजून चार जणं आले होते. केदार. केदारची आई. केदारचे बाबा. केदारची धाकटी काकी. या काकीला काही मूलबाळ नव्हतं म्हणून तिनं केदारला अथवा केदारच्या मुलाला दत्तक घ्यायचं ठरवलं होतं म्हणे!
आल्याआल्या या बसा. वगैरे गप्पा झाल्या. हळूहळू बाबा आणि केदारचे बाबा बाजारपेठ या त्यांच्या आवडत्या विषयावर बोलायला लागले. अझरभाई आणि केदार काहीबाही बोलत बसले. आईनं चहा पोहे वगैरे काय काय आणून दिलं. केदारची आई माझ्याशी थोडंफार बोलत होती. एकंदरीत बाकीचं सर्व बोलतोय, पण “आपल्या पोरांचं लफडं आहे म्हणून त्यांचं लग्न लावूया” हा विषय कसा काढावा हे कुणालाच समजत नव्हतं. केदारची काकी मात्र जरा फुरंगटून बसली होती. का ते मलाही माहित नव्हतं.
अखेर, केदारच्या आईनेच विषय काढला. “केदारनं सांगितलेल्या जन्मतारखेवरून आणि वेळेवरून हिची पण पत्रिका काढून घेतली. आमचे गुरूजी म्हणाले की सत्तावीस गुण जमतायत. तर काही हरकत नाही”
“बरं केलंत. मी तिची पत्रिकाच बनवली नाहीये. लहानपणी आजारी म्हणून सासूबाई म्हणाल्या की पाहूच नकोस. तेव्हा राहून गेलंच” इथून पुढे सर्वांना व्यवस्थित ट्रॅक मिळाला.
“अम्हाला काय? हा एकुलता एक. चुलत्यांत पण सर्वात मोठा हाच. मोठी बहिण आहे त्याला, पण तिचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं. कॅनडाला असते.”
“अच्छा. स्वप्निलला इतक्या लांब कुठे द्यायची म्हटलं की माझा जीव कासावीस होतो. इथं गावातच राहिली तर बरी”
“हो. मुली फार लांब गेल्या की सारखं जाणंयेणं पण होत नाही. सणवार नाही की दिवाळसण नाही. आता कावेरीचं बाळंतपण आहे. तर मलाच तिकडे जायला लागणार बघा! कालच फोन आला होता. ती डिसेंबरमध्ये ड्यु आहे”
“अगं बाई! थंडी मरणाची म्हणे तिकडे”
“काय करणार. म्हणून म्हटलं तुम्हाला भेटावं आणि ही बोलणी तरी ठरवून घ्यावीत. म्हणजे इकडे सर्व निस्तरून मी तिकडे जायला मोकळी. जूनमध्ये मुहूर्त आहेत चांगले. एखादा ठरवू या का?”
इतकावेळ बाबा हे बोलणं केवळ ऐकत होता. पण आता मात्र तो बोलला. “अहो, तिचं एक वर्ष आहे”
“असू देत की” केदारचे बाबा म्हणाले. “लग्नानंतर करेल. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही”
“हे फारच लवकर होतंय हो” आई पण म्हणाली. खरंतर आमचा अंदाज होता की माझं फायनल इयर झाल्यानंतर लग्नाचा विषय सुरू होइल. केदार पण तसंच म्हणाला होता.
“हे बघा, आमच्या काहीच अपेक्षा नाहीत. देणंघेणं सर्व तुमच्या मर्जीवर. काहीच दिलं नाहीत तरी चालेल. घरादाराबद्दल आमचा काही प्रश्न नाही. मुलं एकमेकांना पसंद करतायत. आपण काय केवळ अक्षता टाकायच्या आहेत. अहो, साध्यातलं साधं लग्न लावून द्या. आमचं काही म्हणणं नाही.” केदारचे बाबा म्हणाले. “मस्त हॉल बूक करू आणि सर्व ऑर्डर देऊन टाकू. आमचा परांजपे बेस्ट माणूस आहे याबाबतीत. आठ दिवसांत लग्न लावून देतोय. आपल्याकडे अजून दोन महिने हातात आहेत”
आई बाबा एकदम गप्पच झाले. इतक्या लवकर लग्न!
“हे बघा, खोटं सांगत नाही. आमच्या आजेसासूबाई आजून आहेत. पण फार थकल्यात. पणतवाचं लग्न बघण्याचं पुण्य़ मिळेल. त्यांची तितकीच हौस. शिवाय लग्न झालं म्हणून काही कॉलेज बंद करणार नाही. डिग्री होऊ देत. नंतरही शिकायचं तर शिकूदेत. छोटासा बिझनेस वगैरे करायचा असला तरी आम्हाला चालेल. आमच्या घरात तुमच्या लेकीला काही कमी पडू देणार नाही याची खात्री बाळगा.”
“ महत्त्वाचं म्हणजे तिसरं लवकर येऊ द्या, तेवढंच आमच्या बाई खापरपणतू बघतील” केदारच्या काकी म्हणाल्या. सगळेजण हसले.
“आम्हाला थोडा वेळ द्या. मी माझ्या मोठ्या भावाशी आणि आईशी बोलतो. त्यांना वाटलं तर एकदा बोलावून घेतो. इतक्या घाईगडबडीमध्ये ठरवूया नको. तिचं शिक्षणाचं एकच वर्ष शिल्लक आहे. ते पूर्ण होऊ दे.”
“नको.” परत केदारच्याच काकीने ठामपणे सांगितलं “जितक्या लवकर होतंय तितक्या  लवकर होऊ देत. तरणीताठी पोर आहे. तुम्हाला जराही काळजी वाटत नाही का? उद्या काय म्हणता काय होऊन बसलं तर कोण निस्तरणार? आमचा एक पोरगा संस्कारी आहे म्हणून इतक्या व्यवस्थितपणे घरी सर्वांना त्यानं सांगितलंन. पण विस्तवाची परीक्षा कोण घेणार? ते काही नाही. उगाच फट म्हणता काही झालं म्हणजे गावात मान खाली जायची. आमचं जाऊ द्या हो. तुमची तर मुलगी आहे.” त्यांच्या या थाडथाड बोलण्यावर आईबाबाच काय पण केदारचे आईबाबा पण चकित झाले.
“वहिनी, अहो असं काय. मुलं गुणी आहेत” केदारचे बाबा म्हणाले. गुणीतर आहेतच शिवाय या जगात कंडोमसारख्या वस्तू आहेत हे त्यांना माहित आहे. म्हणून तर गेल्या दीड वर्षांत फट काय सट म्हणता काही झालं नाही! मी केदारकडे पाहिलं तर त्यानं गालातच हसून मला “शांत रहा” असं डोळ्यांनीच सांगितलं.
पण सुरूवातीचा गप्पांचा मूड आता पूर्ण बिघडला होता. केदारच्या काकीचं म्हणणं लवकरात लवकर लग्न करून द्या. चारपाच वेळा तेच तेच बोलणं झाल्यावर शेवटी त्या केदारच्या आईला एकदम उसळून म्हणाल्या. “जाऊबाई, पाहिलंत. ही यांची पद्धत. मुलीचं लग्न करायला नको. मुलगी गाव बोंबलत फिरते ते चालतं. शेवटी खाण तशी माती. बापच असला”
माझा बाबा काही म्हणायच्या आधी आई म्हणाली. “आम्ही लग्नाला नाही म्हटलेलं नाही. केदार आम्हालाही पसंद आहे. आमच्या मुलीमध्ये तर खोट काढण्यासारखं काही नाही. फिरतेय ती तुमच्याच मुलासोबत.”
“हो क्का? त्याच्याआधी उधळलेले गुण विसरलात की काय!” आता केदारच्या या काकींनी एकदम नळावरच्या भांडणाचाच आवेश घेतला. “त्या मुसलमान पोरासोबत....”
“कोणासोबत?” अझरभाई इतक्या वेळात पहिल्यांदा बोलला. “काही वाट्टेल ते आरोप लावू नका”
“हे बघा, तुम्ही या देशात नसता त्यामुळे तुम्हाला माहित नसेल. पण मी या मुलीची चौकशी केली तेव्हा मला सर्व खरं समजलंय. कोण तो हेकना वसीम की काय....” ओह!! ती फालतू गोष्ट इथपर्यंत पोचली. मी अकरावीनंतर त्या वसीमला भेटलेसुद्धा नव्हते. रस्त्यात दोनतीनदा पाहिलं होतं.
“ते काही खरं नाहीय” मी बोलायचा प्रयत्न केला. पण माझं बोलणं यायच्याआधीच बाबा उठला पण त्यालाही बोलू न देण्याची संधी न देता काकीच पुढे म्हणाल्या. “ते सर्व प्रकरण आम्हाला माहित आहे. तरी केवळ केदारच्या हट्टासाठी आम्ही या लग्नाला तयार झालो तर तुम्ही चक्क नाहीच म्हणताय.” काकीबाई सतत “तुम्ही लग्नाला नाही म्हणताय” हेच एक वाक्य तीन तीनदा म्हणत होत्या. “एवडी घोडी मुलगी झाली तरी... अहो, गाव उंडारतेय. कुणाहीसोबत फिरतेय”
“मीरावहीनी, आता पुरे!” अखेर केदारचे बाबा म्हणाले. “माझा केदारवर विश्वास आहे. त्याची पसंद उत्त्तमच आहे. अम्हाला तुमची मुलगी पसंद आहे. यतिन, लग्न लव्कर करूया, जुलैमध्ये चातुर्मास चालू होइल आणि तो संपायच्या आधीच केदारची आई कॅनडाला जाईल. ती परत येईपर्यंत म्हणाजे पुढचा मार्च उजाडेल.”
“अहो, मग आता ठरवून ठेवू आणि पुढच्या वर्षी करू. आम्हालाही ते सर्व सोयीस्कर पडेल. साखरपुडा करून ठेवू.” बाबा म्हणाला. शेवटी अजून थोडावेळ चर्चा करून “पुढच्या आठवड्यांत परत भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरात मोठ्यांशी काय ते बोलून ठेवा” असा मार्ग निघाला. एकंदरीत सुखासुखी काहीच चालू नव्हतं हे साफ दिसत होतं. केदारच्या आईबाबांचा प्रश्न नव्हता. पण काकीबाई सॉलिड वट दाखवत होत्या.
संध्याकाळी मला केदारचा भेटायला ये म्हणून फोन आला. मी मनापासून चिडले होते. गेल्या गेल्या लगेच त्याला विचारलं. “ती काकी मला काय वाट्टेल ते बोलत असताना तू काय गप्प बसलास. यु नो वेरी वेल की मी फर्स्ट टाईम तुझ्यासोबत केलंय..मग तरी?”
“शांत काऊ शांत. काकी घोळ घालणार आहे याचा अंदाज मला आधीपासून होताच. मी तिथे जर हे सांगितलं असतं की आपण ऑलरेडी सुहागरात साजरी केली आहे, तर त्याचा अर्थ पुन्हा एकदा तू वाईट आहे असाच झाला असता. समजतंय का तुला? म्हणून मी गप्प राहिलो. काकीला तर हातात कारण दिलं असतं की ही मुलगी कशी उठवळ आहे वगैरे बोलायला”
“उठवळ म्हणजे?”
“मला नाही माहित. पण घरात हंगामा चालू आहे. काकीने तुझ्याबद्दल नक्की कुठून माहिती काढली माहित नाही, किती खरी ते माहित नाही. पण गेल्यावर्षीच्या गॅदरिंगला अख्खं कॉलेजभर तू कुण्या मुलासोबत हातात हात घेऊन फिरत होतीस इथपासून हा कोण वसीम आहे तिथवर इतिहास खणलाय... आजोबांना तर ती काहीही सांगून बहकवतेय”
“पण का?”
“आमच्या इस्टेटीच्या वाटण्या होतायत. माझ्या बाबांना मी आणी ताई. दोन नंबरच्या काकांना दोन्ही मुली. महेशकाकाला तर काही झालंच नाही. मग आजोबांनी ठरवलंय की आता वाटण्या करून तिन्ही मुलांना हिस्से द्यायचे. घराचे हिस्से आधीच झालेत. दुकान माझ्याकडे येतंय. पण त्या बदल्यात बाबा दोन्ही काकांना काही पैसे देतील. काकीची मोठ्या भावाची मुलगी माझ्याबरोबरीची आहे. तिच्या मनात आमचं लग्न लावून द्यायचं आहे. आताच नाही, फार आधीपासून. म्हणजे आमच्या इस्टेटीमध्ये तिच्या माहेरकडच्यांना वाटा मिळेल. मला दत्तक घेणार, म्हणजे महेशकाकाचा वाटापण मलाच मिळेल – म्हणून त्या पैशासाठी आईबाबा हे लग्न लावून देतील असा तिचा अंदाज. पण मी आईला तुझ्याबद्दल खूप आधी सांगितलं होतं. प्लीज. लग्नाला लवकर हो म्हण. एकदा लग्न झालं की मी वेगळंच घर घेणार आहे. पण आता तू विनाकारण उशीर केलास तर घरात प्रॉब्लेम होइल. आजोबांच्या निर्णयावर सर्व अवलंबून आहे. त्यांनी नाही म्हटलं तर..”
“तू मला सोडून देशील...”
“वेडी आहेस का? असा कसा सोडून देईन. पळून जाऊ. रजिस्टर लग्न करू. काहीही करू. पण गोष्टी तितक्या चिघळवायच्याच कशाला? तू हो म्हण. महिन्याभरात लग्न करू. घरी तुझ्या आईवडलांना ही परिस्थिती सांग. काकी माझं लग्न मोडायला बसली आहे. तिच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा.”

पण काकीच्या बोलण्याकडे आम्हाला दुर्लक्ष करावं लागलंच नाही. त्या काकीने हे लग्न मोडूनच मग दम घेतला.




No comments:

Post a Comment