Friday, 9 June 2017

रहे ना रहे हम (भाग २८)

 रात्री साडेअकरा वाजता फोन वाजला. टीव्हीवर बिग बॉस बघत बसले होते. ब्रेक चालू होता, म्हणून उचलला, अन्यथा अननोन नंबरचे फोन मी उचलत नाही. सलमान खान टीव्हीवर असेल तर ओळखीचे नंबरही उचलत नाही म्हणा! “क्युंबे कहां मर गयी?” पलिकडून आवाज आला.
“बोल हरामजादी, बहोत दिन बाद याद आयी”
“है किधर?”
“घरपे!”
“किसके?”
“मेरे बाप के”
“हाय रे तेरी किस्मत. ये दिन थोडेना बाप के घर रहने के है. पडोसी के घर पे जा. यार मिलेगा, रात तो कटही जायेगी उसके बिस्तरमे” लतिका ऑलरेडी दोन पेग डाऊन असणार. आवाजावरून वाटतच होतं. मी हॉलमधून उठून माझ्या बेडरूममध्ये आले. बेडरूमचा लाईट लावताक्षणी बाजूच्या घरामधल्या वरच्या मजल्यावरच्या खिडकीमध्ये पडदा खस्सकन ओढला गेला, हे त्याहीक्षणी जाणवलं.  लतिकाला हा सगळा इतिहास माहित नसणार, मी सांगितलेलाच नाही. मी आणि तो एकत्र राहतोय हे मात्र तिला मागे कधीतरी बोलले होते.
“तू बोल, इतने लेट नाईट क्यु फोन किया?”
“क्यु? बिझी थी क्या, डिस्टर्ब तो नही किया ना!”
“नही रे. तू किधर बिझी है? कोइ फिल्म विल्म कर रही है क्या?”
“अरे, छोड आये हम वो गलिया! सुन, शादी कर रही हू! ऍंड यु हॅव्ह टू हॅव्ह टू हव्ह टू कम फ़ॉर द वेडिंग. नेक्स्ट वीक”
“व्होह!! दिस इज टू मच! थोडा डीटेल मे बताना”
“डीटेल मे बताने लायक कुछ नही. हमारी कास्ट का लडका है. बॉर्न ऍंड ब्रॉटप इन युके, सो उसे हिंदी नही आती, वो बॉलीवूड के पिक्चर नही देखता, क्या पकाऊगिरी है यार... आमिर खान को सलमान खान बोलता है, अक्षय कुमार को अजय देवगन. बट ही इज व्हेरी व्हेरी व्हेरी गूड लूकिंग. एकदम शाहिद कपूर जैसा”
“सो तेरा नमस्ते लंडन हो गया”
“हो जायेगा, मैने अभी देखा किधर बंदेको? सुन तू शादीके लिये आयेगी ना? मै और किसी फ्रेंड को इन्व्हाईट नही करनेवाली. सिर्फ तुझे!”
नंतर तासभर ती तिच्या लग्नाबद्दल सांगत राहिली. हॉस्टेलमध्ये बरेच दिवे लावून झाल्यावर आईवडील तिला दिल्लीला घेऊन गेले होते. तिथे तिनं परत मास्टर्सला ऍडमिशन घेतली. ते पूर्ण झाल्यावर इंटेरीअर डीझाईनचा कोर्स केला. (कशाचा कशाशी संबंध नाही हे मलाही माहित आहे! पण लतिकाचं ड्रॉइंग बरं होतं!) मग दोन वर्षं एका फर्ममध्ये काम करत होती. आणि हे स्थळ आलं, टिपिकल अरेंज मॅरेज. त्यानं केवळ तिचे फोटो पाहिलेले. तिनं त्याचे फॊटो फेसबूकावर पाहिले.. त्याचे आईवडील तिला बघायला आले होते. त्यांना भारतीयच बहू हवी, सुसंस्कारी वगैरे. लतिकाने पडद्यावर अभिनय केला नाहीतरी प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स दिला. त्याच्या आईवडलांसमोर तिने फार गहकृत्यदक्ष असल्याची ऍक्टिंग केली, आणि ती त्यांना चक्क आवडली.
“बेटा, नॉनव्हेज वगैरे तो नही खाते हो ना?” या होणार्‍या सासूच्या प्रश्नाला तिनं मान हलवून “मुझे वो स्मेल भी अच्छी नही लगती, हॉस्टेल मे जब कोई खाता था तभी भी मुझे उल्टी सी आती थी” असं उत्तर दिलं. त्यावर तोच धागा पकडून लतिकाच्या आईने मुंबईच्या दोन वर्षांत लतिकाच्या तब्बेतीचे कसे हाल झाले, तिला कसं तिकडचं वातावरण झेपलं नाही. इतर मुली फॅशन करत नैनमटक्का करत असताना ती बिच्चारी किती अभ्यास करायची, पण पोल्युशनमुळे इतकी आजारी पडली की परत दिल्लीला आली वगैरे सांगितलं. हे सर्व ऐकताना माझ्या नजरेसमोर गांजा ओढणारी, चिकन के साथ बीअर हवीच म्हणणारी आणि कामासाठी कुणाहीसोबत झोपणारी लतिका आली. पण ती लतिका आता अस्तित्त्वात नव्हतीच.
“अरे, क्या बोलू यार. मैने तो सर्जरी भी कराली, गेस व्हॉट!! आय ऍम व्हर्जिन नाऊ! फर्स्ट नाईट का भी टेन्शन नही” हे ऐकून मी केवळ हसू शकले. अजून काय करणार. “तो मेरी आझादी के बहोत कम दिन बचे है. इसकेबाद एकदम बडजात्याके घर मे एंट्री! लंडन मे रहू या और मार्सपे सर से घूंघट तो नही उतरना चाहिये, ” ती म्हणाली. यावेळी मात्र हसली नाही, तिचा आवाज भरून आलेला. “कमीनेने धोका दिया. तेरेको उसके बारे मे कभी बताया नही, पर बॉम्बे मे एक था, जिससे इश्क लगाया था. सीरीयसवाला इश्क. साला खुदको प्रोड्युसर बोलता है, और पैसे के लिये मुझे रेंट पे दे रहा था, यु नो व्हॉट, ही वॉज युझिंग मी लाईक अ करन्सी, कंप्लीट रांड बना दिया था. मेरे मांबाप मेरेको अगर घर नही लेके आते,  तो कामाठीपुरामे बिक गयी होती अब तक”
“पास्ट इज पास्ट.” मला लतिका कुणाबद्दल बोलत होती ते माहित होतं, हॉस्टेलच्या आसपास त्या मवालीटाईप माणसाला मी पाहिलं होतं, पण मला हे सर्व माहित आहे हे लतिकाला माहित नव्हतं, म्हणून मी काही बोलले नाही. “मांबाप कभी अपने बारेमे बुरा नही सोचते रे!”
“येहीच तो खुदको बता रही हू, पर एक बात बता, साला लाईफ मे इतने झोल होते क्यु है. जिसको जो चाहिये वो मिलता क्यु नही... मेरेको हिरॉइन बनना था, मेरेसे खद्दड लडकिया टॉप पे पहुन्ची, और मेरेको सिर्फ फालतू ऍड मिले.. गलती क्या थी मेरी? सपना देखना, वो सपना पूरा करने के लिये स्ट्रगल करना. जो चाहिये था वो नही मिला, वापस आ गयी. सपना तो अधुरा रह गया, मेरा क्या? मेरे लाईफ के वो दो साल कंप्लीटली इरेज हो गयी. उसके बारे मे अब किसीको बता नही सकती. साला दो साल मेरी लाईफ से ऍम्प्युट करके आगे की लाईफ जीना पडेगा. फिरसे साला बोल नही सकूंगी. फ्रेंड को फोन करके हरामझादी नही बोलनेका! वाट लग गयी नही बोलने का, दुर्गती हो गयी है बोलने का” तिचा रडका मूड
परत गायब झाला.
“वो भी एकदम विनम्र के साथ”
“अब ये साला विनम्र कौन है. मेरे हज्बंड का नाम तो सज्जन है”
“और तू सज्जन की सजनी” दोघीही मनमुराद हसलो. लतिका कुठंतरी दूर जाणार याहीपेक्षा परत कधी भेटणार नाही हे दोघींना उमगलं होतं. माणसाची, किंवा खरंतर स्त्री जातीच्या माणसांची एक गंमत असते, तुम्हाला डोळे दोनच असतात, ते ही केवळ समोरचे पाहू शकणारे, पण नजरेच्या संवेदना मात्र शरीरभर असतात. बसमध्ये, ट्रेनमध्ये, वर्गात, ऑफिसच्या मीटिंगमध्ये, समोरच्या घराच्या खिडकीमधून पडद्याआडून कुणीतरी सतत तुमच्याकडे एकटक बघत असलं आणि जरी पडदा ओढून घेतलेला असला तरी आणि तुमचं लक्ष तिकडे नसलं तरी मेंदूपर्यंत ती नजर बरोब्बर पोचते. लतिकासोबत हसून बोलत असताना मी उठून माझ्या खोलीचा लाईट बंद केला, खिडकी लावून घेतली.
आम्ही जवळ जवळ पहाटे तीनपर्यंत फोनवर बोललो, पण मी तिला आफताबबद्दल फार काही बोलले नाही. एकतर तिच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही होतं, माझ्याकडे फारसं नाही.
लतिकाचं लग्न लगेचच पुढच्या आठवड्यांत होतं. माझ्या तब्ब्येतीचे आणि एकूणच इतके इमोशनल सर्कस गेम्स चालू असताना इतक्या शॉर्ट नोटिसवर मला जाणं शक्य झालंच नसतं. तरीही लग्नाच्या दिवशी ऑनलाईन ऑर्डर करून एक बूके आणि नॅचरल्सचे गिफ़्ट व्हाऊचर पाठवलं. नंतर ती भेटल्यावर प्रॉपर गिफ़्ट देईन असं ठरवलं होतं.. नंतर दोन तीन दिवसांनी फेसबूकवर लग्नाचे फोटो पाहिले, एकदम शाही स्टाईल लग्न झालं. लतिका खूप गोड दिसत होती. ऑरेंज कलरचा घागरा आणि पिंक चोली मस्त वाटत होती, तिचा नवरा पण खरंच छान हॅंडसम होता. शाहिद कपूर नाही पण अर्जुन रामपाल अधिक! आईच्या भाषेत म्हणायचं तर पोरगी सुस्थळी पडली.
लतिकाने आपला सर्व भूतकाळ त्याच्यापासून लपवून ठेवला हे चांगलं की वाईट या भानगडीत मला पडायचं नाहीये, तिचं आयुष्य, तिचा निर्णय, तिचा प्रश्न! माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी इतकं खोटं बोलून लपवू शकणार नाही हे माझं मला माहित आहे. लतिकाने परफेक्ट शब्द वापरला. ऍम्प्युटेशन. आपल्या आयुष्यामधील प्रेम प्रकरणांचं हे असं ऍम्प्युटेशन करणे मला जमणार नाही. केदार असो, वा आफताब. हे दोघं तर “सीरीयस” वाले, पण अगदी विशेषसारखा (आठवला का? हॅरी पॉटरवाली डेट) मुलगा माझ्या आयुष्यात होता, हे लपवण्यात काय शहाणपणा आहे?आणि समजलं तर काय दुनिया टूट पडते?  ज्याच्यासाठी दुनिया टूट पडत असेल, उसकी गलियो मे रखेंगे ना कदम!
>>>>>>>>>>>> 
आईने सांगितलेल्या त्या स्थळाचा मला दोन तीन दिवसांनी फोन आला. खरंतर मी “उद्या मुंबईला जाते” म्हणून बाबाकडे भुणभुण करत होते. पण बाबा म्हणे, अजून आठ दिवस थांब. त्या मुलाशी- त्याचं नाव “अर्चन”!!! काय तर नावं असतात. मला ते कितीतरी वेळ “अडचण” असं वाटल्याने फोनवर बोलतानाही फार हसू येत होतं. नवर्‍यासाठी परफेक्ट नाव आहे खरंतर. असून अर्चन, नसून खोळंबा! असो, मी जास्त बोलले नाही. पण सध्या लगेच लग्नाचा विचार नाही कारण पुढे शिकायचं आहे असं सांगितलं. “पीएचडी झाल्यानंतर वाटल्यास परत बोलू”
“पीएचडी झाल्यावर? त्यापेक्षा मी आताच संन्यास घेऊन हिमालयात जातो, म्हणजे किमान तप तरी पूर्ण होईल” ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर. मी अर्चनसोबत लग्न केलं नाही, पण तो आणि मी अजूनही फेसबूक फ्रेंड आहोत. मी नाही म्हटल्यावर सहाच महिन्यांनी त्याचं लग्न ठरलं. ऑप्शन्स आधीपासून पाहून ठेवले असणार. ही नाही म्हणाली, तिला विचारायचं, ती हो म्हणाली, पुढचे प्लान. नकाराचे दु:ख नाही, होकाराचा केवळ आनंद. सर्व कसं एकदम अल्गोरिदमच्या रिदममध्ये आयुष्य बसवायचं. गूड फ़ॉर हिम.

मी नोकरी सोडायचं ठरवलंच होतं. प्रश्न केवळ इतकाच होता की कधी! बाबाला मी दोन दिवसांनी मुंबईला जाणार आणि मगच नोकरी सोडणार हे स्पष्ट सांगितलं. तो म्हणत होता की राजिनामा इथूनच ईमेल कर. तसं करून चालत नाही असं उगाच सांगितलं. हॅंड ओव्हर, इक्झिट इंटरव्यु वगैरे मोठे शब्द वापरून मी जरा त्याला गंडवला. त्यानं कधीच ऑफिसात काम न केल्याने त्याला गुंडाळणं तसं जरा सोपंय. मी आणि आई तर तसाही कित्येकदा त्याला एकटा पाडून गुंडाळतोच. घरात आमची लेडीज बायांची मेजॉरीटी आहे ना.
 घरी आठेक दिवस जरा आराम केला. आमचे शेजारी हल्ली दर आठवड्याला घरी येत होते. अझरभाई एरवी एकटा असला तर बंगल्याच्या सर्व खिडक्या उघडून रहायचा, आमचा हीरो आला की सर्वात पहिल्या आमच्या साईडकडच्या सर्व खिडक्या बंद व्हायच्या (म्हणून तर आलाय हे मला कळायचं ना! नाहीतर मी काय वॉच ठेवून थोडीच बसेन) तो नसताना अझरभाईशी माझं एकदा बोलणं झालं. त्याचं म्हणणं होतं की मी सॉरी म्हणावं आणि भांडण संपवावं.
“शक्य नाही” एवढंच उत्तर देऊन मी विषय संपवला. सॉरी म्हणण्यामध्ये फार काही कमीपणा होता अशातला भाग नाही, पण आयुष्य ट्रेनसारखं अस्तं. एखादं स्टेशन सॊडलं की परत मागे जाता येत नाही, परत ते स्टेशन येतं ते परतीच्या प्रवासामध्ये उलट्याच बाजूने. त्याच बाजूने परत कधीच नाही, आयुष्यातही तेच घडतं (आईनं लायब्ररीमधून आणलेली ही वपु वगैरे पुस्तकं वाचणं बंद करायला पायज्ये!! ताबडतोब)

रॉयसोबत मी पीचडीसाठी ऍप्लिकेशन्स मेल करत होते. जीआरई आणि टोफेलच्या परीक्षांची तयारी चालू होतीच. सर्व काही सुरळीत गेलं तर महिन्यादोन महिन्यांमध्ये अमेरिकेला जायचं की नाही हे क्लीअर झालं असतं,  अर्थात ते तितकं सोपं नव्हतं. रॉयसारख्या अतिशय हुशार मुलाची ऍप्लिकेशन्स दोन वेळा रीजेक्ट झालेली होती. मी तर पहिल्यांदा ऍप्लिकेशन करत होते. एक तर विषय बराच किचकट निवडला होता, शिवाय त्यात हवा तो गाईड मिळायचीही थोडी मारामार होती. तरीही मला एरवी असतात तश्या हाय होप्स इथेही होत्या.

त्या रविवारी आफताब घरी आला होता, हे मला माहित होतं. अझरचा मेसेज आला की जरा घरी येशील का? मी उलटा मेसेज केला, “तो घरी आहे?” त्याने “नाही, तो बाहेर आहे” असा निरोप पाठवला. “काय काम आहे?” “एक डॉक्युमेंट चेक करायचंय, पुढच्या दारानं ये, मागच्या अंगणात काम चालू आहे.”
मी पाचेक मिनिटांनी त्याच्या घरी गेले. अझरभाईंसमोर जमीर बसला होता, हा माझ्या बाबांच्या ओळखीचा. अधेमध्ये घरी येत असे, वयानं माझ्यापेक्षा फार मोठा नसेल तरीही मी त्याला अंकलच म्हणायचे. हाय हॅलो झाल्यावर तो लगेच उठला. “इमानदारीत वाचून बघ, काय वाटलं तर लगेच सांग. खुदा हाफिझ” असं म्हणून तो बाहेर गेला.
“काय?” मी अझरला विचारलं. त्यानं एक जाडजूड कॉण्ट्राक्टची कागदपत्रं माझ्याकडे दिली. “बराच मोठा प्रोजेक्ट आहे. काम जास्त आहे, सो त्यांना कॉन्ट्राक्ट साईन करून हवंय. मला यातलं फार काही समजत नाही. एक तर इंग्लिश. शिवाय लीगल भाषा, जरा वाचून बघ प्लीज”
“त्याला सांग ना. माझ्यापेक्षा त्याला हे असलं जास्त जमतं” बोलता बोलता मी हातातला पहिलाच कागद वाचायला घेतला. नाव बघून चमकलेच. “जादू, तू या बाईसोबत काम करणार आहेस?”
“काय झालं?”
“तुला माहित आहे ना. खतरा बाई आहे. मागच्याच महिन्यांत कुणालातरी कोयत्याने मारून हाफ मर्डर केला होता.”
अझर हसला, “माहित नसायला काय! अख्ख्या गावांत बातमी झाली होती. पण मी गेली दोन तीन वर्षे त्यांची अनेक कामं केलीत. तिचं लग्न होण्याआधीपासून. आता ती मोठी फॅक्टरी टाकतेय. त्याचं इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशन आणि मेण्टेनन्ससाठी ही कॉन्ट्राक्ट आहे”
“तुझा तिच्यावर विश्वास आहे?”
“तिच्या नवर्‍यावर जास्त विश्वास आहे. ही इज अ गूड पर्सन”
“पण तो तर कामाचं काहीच बघत नाही म्हणे”
“चहा घेतेस?” जादू उठून किचनकडे निघाला. “बाकी, गाव सोडून तीन चार वर्षं झाली तरी गावाची तुला अधिकच माहिती दिसतेय.”
“काय करणार? माझ्यापेक्षा त्याला गाव भानगडींमध्ये जास्त इंटरेस्ट. तोच काहीबाही सांगायचा, मी आपली ऐकायचे” जादूनं चहाचं आधण ठेवलं. “त्यानंच सांगितलं... बेकार माणूस आहे, टोटल गॉन केस. दारूडा वगैरे. आणि हिनं पैशासाठी त्याच्याशी लग्न केलं”
“मी तिला आधीपासून ओळखतोय, तिनं त्याच्याशी पैशासाठी लग्न केलं नाही हे मला चांगलंच माहिताय” जादूनं किचनचा पाठीमागचा दरवाजा उघडला. “चाय लेगा क्या?”
“आधा कप” पाठून आवाज आला. म्हणजे मागच्या अंगणात हाच काम करत असणार. मी कपाळावर हातच मारून घेतला, बिन्धास्त इतकावेळ त्याच्याबद्दल बोलत होते.
“खोटं बोललास?” मी खुसफुस करत जादूला विचारलं.
“कधीच नाही. मोबाईलमध्ये मेसेज नीट बघ”
बरोबर, जादू खोटं बोलताईच नही. त्याचा केवळ “बाहेर आहे” इतकाच मेसेज. आता ते बाहेर म्हणजे घरच्या अंगणार असावा असा अर्थ मी घेऊ शकले नाही हा मझ्या अल्पमतीचा दोष. जादूनं तोवर अडीच कप चहा गाळला होता. माझा आणि आफताबचा दूध वाला. त्याचा बिनादुधाचा. व्हेगन झाल्यापासून तो काळाच चहा घ्यायचा. अर्धाकप उचलून तोच बाहेर देऊन आला.
“मी निघू का? उगाच राडे नकोत.”
“का? मी बोलावलंय तुला!! अर्धा हिस्सा या घरात माझा आहे. तसाही तो अजून तासभर बागेत काम करेल. तो काय घरात येणार नाही”
“तरी मी आलेलं त्याला आवडणार नाही... पण खरं सांगू, तू नको प्रयत्न करूस.  जे व्हायचं ते झालंय. हेच होणार याचा विश्वास तुलाही होताच ना. सो लेट इट बी”
“मी काही प्रयत्न करत नाही, मला त्या डॉक्युमेंटसाठी मदत कर. उद्याला साईन करून द्यायचंय”
“त्याबाबतीतही माझा सल्ला सेम आहे, तिच्या नादी लागू नकोस”
“स्वप्निल, तू फक्त ऐकीव माहितीवर बोलतेस, मी प्रत्यक्ष भेटलोय. कामासाठी फार चोख आहे. कुठल्याही व्हेंडरचे पैसे कधीच अडवत नाही.”
“आय डॊंट नो. तिच्या लग्नापासून मी इतकं उलटसुलट ऐकलंय की...”
“लोक तर बोलणारच ना.. चैन थोडीच पडते. अख्ख्या जमातीचा विरोध असताना टिच्चून तिनं रजिस्टर मॅरेज केलंय. ते पण मुसलमानासोबत. पैशासाठी असो वा प्रेमासाठी. करून दाखवायची हिंमत तर केली.” तासाभरानंतर घरात येणारा आफताब आताच आला होता.
“चिखलाचे पाय साफ कर, मग आत ये” जादू वैतागून ओरडला. मी काहीच बोलले नाही. एक तर मला त्याचा कडवटपणा माहित होता. त्याचा रोख नक्की कुठे आहे तेही समजत होतं. अझर मला मागेच म्हणाला होता, की आफताबचा असा समज झालाय की आमच्या धर्मामुळे मी पॅचप करत नाहीय. मूर्खाला इतकी अक्कल असायला हवी होती की त्याचा धर्म मला आधीपासून माहित असतानाही त्याच्यासोबत राहत होते. मग पॅचप करताना तोच धर्म कसा काय आड येईल. लेम एक्सुजेस. दुसरं काही नाही.
हातातला चहाचा कप तसाच ठेवून मी किचनमधल्या दारानेच बाहेर पडले. अंगणभर चिखल करून ठेवला होता, माझे स्लीपर पुढच्या दारात राहिले होते. तरीही त्याच चिखलातून तरातरा चालत मी घरी निघून आले. नशीब इतकंच की घसरून पडले नाही.

>>>>>>>>>
मुंबईला परत आल्यानंतर घर एकदम खायला उठेल वगैरे मला वाटलं नव्हतं. पण मनाची तयारी इतकी झाली होती की, दिवसभर त्याची आठवणदेखील यायची नाही. ऑफिसमध्ये मेडिकल सर्टिफिकेट सबमिट केल्याने माझ्या रजेचा काही प्रश्न नव्हता. नेहमीच्या कामामध्ये मी परत बुडून गेले. हे काम मला आवडत नसलं तरीही आता त्यामुळे थोडाफार का होईना मला विरंगुळा मिळत होता. माझा ब्रेकप झाल्याचं मी फक्त देबजानीला सांगितलं होतं. ऑफिसच्या मूव्ही आऊटिंगला वगैरे आफताब येणार नव्हता कारण तो दोन तीन महिन्यांकरिता दुबईला गेला होता. कदाचित थोड्या दिवसांनी कायमचा दुबई रहिवासी पण केलं असतं.

अर्थात याचा एक तोटा मात्र झाला. विनाकारण आशिष मला रात्री कॉल करायचा. बोलायचा दोन तीन मिनिटंच, पण तरी रोज रात्री न चुकता “जेवलीस का?” असा कॉल किंवा मेसेज यायचा. नंतर फेसबूकवर बोकाळलेल्या “जे1 झालं का?” या कम्युनिटीचा हा आद्य पाईक!!
आशिष माझ्यावर लाईन मारतोय हे समजायला मला ज्योतिषाची गरज नव्हती, तरीही संध्याकाळी त्याचा कॉल आला की मी घ्यायचे. ऑफिसमधून आल्यावर कपभर चहा, आईला फोन, मग थोडावेळ अभ्यास आणि नंतर टीव्हीवर साराभाई बघत डिनर. आणि मग पिक्चर बघत बघत किंवा वाचत झोपी जाणे असं एक आळसावलेलं पण सोयिस्कर रूटिन माझं बसलं.
मी त्यादिवशी आफताबला थाडथाड जे बोलले ते किती सत्य होतं. हे माझं घर होतं. खर्‍या अर्थानं माझं. माझ्या एकटीचं. यामध्ये आफताब केवळ “सोबत” होता, त्याची साथ कधीच नव्हती. एकटेपणाचा वैताग मला कधीच आला नाही, ना कधी आफताबच्या इंटीमसीची आठवण झाली. फिजिकली मला त्याची गरज एरवीही फार भासली नाही, एकत्र होतो म्हणून झोपत होतो, अन्यथा फार आसुसलेपण माझ्यामध्ये एरवीही कधी नव्हतं.

माझे जीआरई स्कोअर्स ठिकठाक होते. टोफलचा स्कोअर अपेक्षेहून थोडाकमी होता, पण तरीही ठिकच. . सध्या ऎप्लिकेशनसाठी ट्रान्स्क्रिप्शनचे काम चालू होतं. सर्व पेपरवर्क व्यवस्थित फ़ॉर्मॅटमध्ये बसवून एका फोल्डरमध्ये सेव्ह करणं, शिवाय एस्सेची तयारी करणं अशी अनेक झंडेझोल मागे लागले होते. रेकंमेडशनसाठी इमेल्स चालूच होत्या. रॉय माझ्या मदतीला होता म्हणून बरंय, अन्यथा माझे वांदेच झाले असते. या सर्व कामात इतकी गुंतले होते की, अगदी स्पष्ट सांगायचं तर भलत्या इमोशनल झोलसाठी माझ्याकडे वेळ नव्हता.
“दिस इज माय लास्ट इयर. इस साल नही मिला तो ये हाथ से गया” रॉय मला एकदा म्हणाला.
“डोण्ट वरी, इस साल मेरे साथ काम कर रहा है. तेरा काम भी हो जायेगा” मी त्याला समजवलं. त्याला फायनानशिअली पण प्रॉब्लेम होता, जर सिलेक्ट झाला तर त्याला एजुकेशन लोन काढावं लाग्लं असतं, मला बापाच्या कृपेनं पैश्यांचा काही त्रास नव्हता.

मुळात प्रश्न हा येतो की मी पीएचडीसाठी अमेरिकाच का निवडलं. भारतात हवी तशी संधी नव्हती हे एक कारण. इथे स्पर्धा तगडी होती आणि त्या स्पर्धेतच मी घुसमटले असते. दुसरं माझ्या विषयाशी संबंधित अतिशय चांगलं काम अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये चालू होतं. तिसरं, मला स्वत:ला हा अनुभव घ्यायचा होता. बापाकडे पैसा होता आणि तो पैसा लेकीच्या शिक्षणावर खर्च करायची त्याची तयारी होती. लहानपणापासून मी माझ्या आजूबाजूला अशा अनेक मुली पाहिल्या. माझ्या वर्गात साधना नावाची एक मारवाडी मुलगी होती. आम्ही सातवीत असताना तिच्या बापाने तिला इंग्लिश मीडीयममधून काढून मराठी मीडीयममध्ये घातलं. प्रश्न पैशाचा नव्हता, पण तिच्या बापाला वाटलं की इंग्लिश मीडीयममध्ये शिकून मुलगी अति आगाऊ होईल. मराठी मीडीयममध्येही अति आगाऊ होण्यासाठी तिला अजिबात चान्स न देता दहावीनंतर तिचं लग्न लावून दिलं. गौतमीची कहाणी याहून वेगळी नव्हती. शिकण्यासाठी (तेही साधं बीएससी) तिला किती संघर्ष करावा लागला तो मी पाहिला होता. त्यामानानं मला फारसा त्रास जाणवला नाही. मी नोकरी सोडून पुढे शिकणार हे सांगितल्यावर बाबानं एकमेव प्रश्न विचारला. “एम एससीनंतर काय शिकायचं शिल्लक आहे?”
युएसमध्ये पीएचडी म्हटल्यावर खुशच झाला. साहिलदादा सागरदादा युएसलाच सेटल झाले होते. काका काकू दोन तीन वर्षांत इथला दवाखाना बंद वगैरे करून त्यांच्याकडे जायच्या विचारांत होते. मीपण शिकायला तिकडेच जाणार म्हटल्यावर बाबाची कॉलर टाईट. आईलाच थोडीफार चिंता लागली होती. पण मी पीएचडीनंतर लग्नच करेन, तेपण तिच्या पसंतीच्याच स्थळाशी असं वचन दिलं. वचन देऊन ते पाळलं नाही तर प्राण जायला आपलं आडनाव काय रघुकुल नाही. तसंही, मला आता लग्नाचा विचार करावासाच वाटत नव्हता. लुटुपुटीचा का होईना, संसार मांडून झाला होता. हौस फिटली होती.
खरंतर आई मनापासून खुश होती, मी इतकं शिकेन असं तिला कधीही वाटलं नव्हतं. शिकण्यासाठी इतकं लांब जाईन असंही वाटलं नव्हतं. माझ्या भविष्याची तिनं पाहिलेली स्वप्नं फार साधीसोपी होती. कसंबसं ग्रॅज्युएशन, गावातलंच एखादं स्थळ बघून थाटामाटांत लग्न आणि माझ्या आसपास राहिलेलं माहेर आणि सासर. इतकंच तिचं माझ्याबाबतीतलं स्वप्न. केदार मुळे मी त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी केवळ एकच पाऊल राहिले होते. पण फासे मनासारखे पडले नाहीत. ते मनासारखे पडले नाहीत म्हणून मला आता अज्जिबात वाईट वगैरे वाटत नाही. जे होतं ते चांगल्यासाठीच यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
यावर्षीची ३१ डिसेंबरची पार्टी आम्ही ऑफिसमध्ये एकदम जोशात केली. रॉय आणि मी दोघांनीही ही इंडियामधली यावर्षीची आपली अखेरची पार्टी आहे असं ठरवून टाकलं होतं. तसं ऑफिसमध्ये इतर कुणालाही माहित नव्हतं, तरीही देबजानीनं मला पार्टीच्या दिवशी एक सुंदरसं पेन गिफ़्ट दिलं.
“तू तो अभी जायेगी! मैने कल रातको सपना देखी.” देबजानीची भाषा हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. “तू हेलिकॉप्टरमे बैठके युएस गयी. तू और रॉय”
“हेलिकॉप्टर मे?”
“अरे, सपना थी तो ओके है ना. पॉइण्ट ये है तू तो जायेगी. आय ऍम व्हेरी शुअर, मेरी सपना कभी झूठ नही होती. बचपनसे रेकॉर्ड है”
अर्थात, स्वप्नांमध्ये येऊन भविष्याबद्दल सांगणारी देबजानी एकटीच नव्हती. हीरोने मला फेसबूकवर ब्लॉक केलं होतं. माझा नंबरही बहुतेक ब्लॉक केला होता. मी त्याला कधीच कॉल केला नाही, अथवा मेसेज टाकला नाही. पण तरी मला अंदाज होताच. गंमत म्हणजे निधीने मला फेसबूकवर ब्लॉक केलं. ये तोहफा कायको? मालूम नही.
मुंबईला आल्यावर मी माझा निर्णय परत बदलला, खरंतर मी आता नोकरी सोडून परत गावी जाऊन राहणार होते. पण इथं आल्यावर वाटलं, कशाला! मी राजिनामा दिला नाही. नोकरी कंटीन्यु ठेवली. एक तर जानेवारीपासून माझ्या कामाचं स्वरूप थोडं बदललं. इतके दिवस मी क्लेरिकल कामामध्ये पार अडकले होते, आता मला थोड्याफार रीसर्च लॅबच्या कामामध्ये सामिल केलं जाऊ शकत होते. आफ़्टर ऑल, दिस इज व्हॉट आय वॉंटेड!
मी नोकरी सोडणार नाही, हे ऐकल्यावर बाबा जरा चिडला. “तुझं असंच अस्तं” म्हणून फोनवरून ओरडला.
“मला पुढच्या महिन्यांत प्रमोशन मिळेल, म्हणून थांबलेय” मी त्याला सांगितलं. आशिषसोबत मैत्री का तोडली नाही, त्याचा आचरटपणा का सहन केला, तर तो एच आरमध्ये होता. त्यानंच मला ही न्युज सांगितली होती. यावर्षीच्या अप्रेझलमध्ये  मला प्रमोशन आहे हे त्यानंच मला सांगितलं होतं. आमच्या हीरोने कार्पोरेट पॉलिटिक्समध्ये मला चांगलंच निष्णात केलं होतं.
फेब्रूवारीचा पहिला आठवडा आला की, ऑफिसमध्ये व्हॅलेंटाईन्स डेचे वारे वाहू लागले. मागच्यावर्षीप्रमाणे “तेरा क्या प्लान?” वगैरे प्रश्न सुरू झाले. माझा बॉयफ्रेंड “दुबईला” असल्यामुळे माझा व्हॅलेंटाईन सिंगल म्हणून साजरा होईल याबद्दल माझ्यापेक्षा जास्त वाईट इतरांनाच वाईट वाटत होतं. त्यात परत यंदाचा व्हॅलेंटाईन्स शनिवारी रविवारी आलेला. मी तर आधीच ठरवलेलं. दुपारी तीन ते सहा माय नेम इज खान आणि त्यानंतर संध्याकाळी पर्सी जॅक्सन. आधी बॉलीवूड मग हॉलीवूड. अडव्हान्स बूकिंग पण करून ठेवलेलं. एकटीनंच कुठंतरी मस्त लंच. मग शॉपिंग आणि मग फिल्म्स. डिनरचा प्लान काहीही ठरवलेला नव्हता.
अर्थात आपण ठरवतोय तश्या गोष्टी घडत नसतातच ना?
१४ फेब्रूवारीला मी अजून अंथरूणात लोळत पडून हंगर गेम्सचं पुस्तक वाचत होते की, तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मोबाईलमध्ये अजून साडेआठ पण वाजले नव्हते. एवढ्या पहाटे कोण आलं असेल म्हणून दार उघडलं तर हातामध्ये दोन तीन डझन गुलाबांचा बूके घेऊन..

आफताब!

(क्रमश:)   

Friday, 12 May 2017

ये मोह मोह के धागे!


ये मोह मोह के धागे... 
.
.
.
खूप दिवसांनी असं काहीतरी ऐकलं. जीवाला गुंतवावं असं... कसा जीव गुंतला होता, नाजुक नाजुक दोर्यांअच्या वेढ्यांमध्ये. धागे सोडवावेत तरी कसे, थोडे माझ्या हातात, थोडे तुझ्या हातात. एकमेकांना स्पर्श न करता सोडवणं अशक्य... तू तिथं दूर मी इथं कुठंतरी. तरीपण एकमेकांच्या बोटांमधले गुंतलेले काहीतरी अनामिक, अपूर्ण, अर्धवट!
आजही कितीकवेळा हा अर्धवट शब्द आठवला की हमखास तुझी आठवण येते. माझ्या डोक्यात किंचित टपली मारून तू म्हणायचास, “अर्धवटच राहशील!” - तुझ्याखेरीज मी अर्धवट राहिलेच. तुझ्या गमतीत म्हटलेल्या त्या शब्दांनी स्वत:ला इतकं खरं करून दाखवलं , पण डोळ्यांत पाणी आणत म्हटलेल्या “तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही” याशब्दांनी मात्र स्वत:लाच इतकं खोटं करून दाखवल. जगलोच की आपण. कितीवर्षं झाली... आठवतदेखील नाहीत इतकी. पण तरी जगलोच. मेलो नाहीच. 
तेरी उंगलियोंसे जा उलझे..
नक्की कधी ठरवलं तू आणि मी प्रेमात पडल्याचं. खूप वेळेला आठवतेय. आठवतेय. तसं बरंच बाकीचं काहीबाही आठवत राहतं. मी पावसांत चिंब भिजून तुझ्या घरी आले तेव्हा तू केलेली बिनासाखरेची कॉफी, मला तुझं अक्षर वाचता येत नाही म्हणून तू टाईप करून दिलेल्या नोट्स- (तो जुना टाईपरायटर आहे का रे अजून?) कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या गॅदरिंगला आयुष्यात पहिल्यांदाच मी साडी नेसणार म्हणून बाईकऐवजी रिक्षा घेऊन आलेला तू (तुला अजूनही रिक्षा चालवता येते का रे?) पाहिलंस, आठवायला गेलं की लोकरीचा गुंडा हातातून खाली पडावा आणि खोलीभर सैरावैरा पळावा तश्या या आठवणी पळायला लागतात पण काही केलं तरी हातात येतच नाहीत. मी तुझ्या प्रेमात नक्की कधी पडले तो क्षण आठवत नाहीच... आठवतात हे असलेच काहीतरी कातिलाना क्षण. 
कोई टोह टोह ना लागे... 
खरंच आहे ना... कधी समजलंच नाही आपल्याला. हे गुंते सोडवायचे कसे. मुळात सोडवायचे कशाला... आपण अडकत गेलो. तू माझ्यामध्ये. मी तुझ्यामध्ये. नात्याला कसलंही भविष्य नाही हे लख्ख ठाऊक असताना! कशापायी? आकर्षण कसलं होतं. शारीरिक तर नक्कीच नाही. इतक्या वर्षांची आपली ओळख. त्या दरम्यान जे आकर्षण कधी वाटलं नाही ... मग अचानक कसं काय बदललं. तुझे आणि माझे रस्ते इतके वेगवेगळे आहेत हे माहित असूनसुद्धा... कशामुळे कधीच समजलं नाही. 
किस तरह गिरह ये सुलझे... 
गिरह म्हणजे गाठीच ना? तूच सांगितलेला अर्थ. एकमेकांशी आपली जन्माची गाठ आहे असं काहीतरी म्हणाला होतास.. कसली विचित्र गाठ आहे ही. जन्माचीच नव्हे तर मृत्यूचीसुद्धा. दोघांच्या मृत्यूनंतर कदाचित सुटेल. त्यात परत मृत्यूपश्चात काय जीवन असलंच तर तिथं परत आपली गाठ पडेल का? बापरे! आता इतक्यात नको तो विचार. आता आहे त्याच गाठी निस्तरणं होत नाहीये. हे गुंते फार हलक्या हातानं सोडवावं लागतात. जमेल का मला? कदाचित नाही. माझा स्वभावच तिरसट. हे असलं हलक्या नाजुक गोष्टींचं काम तुझं. मला समजून उमजून वागणारा तूच. ऑफिसातून आल्यावर केवळ माझ्या बेल वाजवण्यामधून तुला समजायचं की आज माझा मूड कसा आहे... त्याच्याउलट मी, तू समोर बसून मला काहीबाही सांगतानासुद्धा मला समजायचं नाही तुला नक्की काय म्हणायचं आहे ते. तू मला अति समजून घेतलंस. मी तुला समजून घेतलंच नाही. मग गाठी अडकतच गेल्या. अधिकाधिक निगरगट्ट होत गेल्याच...
है रोम रोम इकतारा बादलोंमे से गुजरे... 
आठवतंय का काही? घाटामध्ये बाईक घेऊन फिरत होतो. तुफान पाऊस पडत होता. संध्याकाळ होत आली असेल. रात्र चढायच्या आत घरी पोचायचं होतं. पावसानं इतकं भिजवलं होतं, की मला तर वाटायला लागलं की मी पाऊसच आहे. टप्प टप्प थेंब अंगावर पडत होते. केसांखांद्यावरून ओघळत होते. थंडी तर वाजत होती. घाट चढून वर आलो, इतकावेळ सोबत असलेला सूर्यमहाराज टाटा बाय करून त्यांच्या घरी गेले. रस्ता सुनसान होता. पाऊस किंचित कमी झाला. पण घाट सगळा फिकुळ पांढरलेला होता. “काय ऑस्सम ढग उतरलेत” तू मला म्हणालास. “हो ना. सावकाश चालव हां. समोरून गाडी आलेली दिसणार नाही इतक्या धुक्यात” 
“तू अतिशय अनरोमॅन्टिक बाई आहेस” किंचित वैतागून म्हणालास. 
तुझ्या रोमान्सच्या कल्पना मला कधीच झेपल्या नाहीत. एकमेकांना फुलं, फुगे, चॉकोलट्स देणं यातून कसला डोंबलाचा रोमान्स होतो रे? तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी आहोत हा विचार असला तरीही ते तितकंच आणि तेवढंच पुरेसं आहे असं मला वाटायचं. आता हल्ली तुझ्या त्याच रोमॅन्टिक आठवणींनी माझेच डोळे भरून येतात. 
हायवेला एक टपरीवाला उभा होतो. चहा घ्यायचा म्हणून थांबलो. दरी ढगांनी वेढलेली होती. वाटत होतं या रस्त्याच्या बाजूला कुणी मऊमलमली समुद्र अंथरून टाकलाय. कापसाची दुलई टाकल्यासारखे ते ढग आणि त्या ढगांमध्ये तू आणि मी. 
तू होगा जरा पागल तुने मुझ को है चुना... 
परत तोच तोच प्रश्न पडायलाय. का? कशासाठी? तू आणि मी एकत्र आलो ते नक्की कशासाठी? मी तुझ्यापासून इतक्या दूर जाणार हे तुला माहित होतं. हो ना? मग तरी तू इतक्या जवळ का आलास? “तू माझ्या आयुष्यात आलेला सुंदर क्षण आहेस” असं म्हणणारा पण तूच होतास. आपल्या दोघांमध्ये तू वेडा होतासच. आहेसच. अजूनही. अजूनही तू तस्साच आहेस. मी झराझर बदलत गेले. दिवसच्या दिवस पालटले, पण तुझी नजर मात्र तशीच राहिली. तुपातल्या दिव्याइतकी शांत स्निग्ध, माझ्याकडे एकटक बघणारी!
कैसे अनसुना तूने सब सुना... 
मी तुला कधी सांगितलंच नाही. सांगाबोलायचा प्रसंगच यायचा नाही. तरी तुला समजायचं नाही.. घाटावरच्या त्या टपरीसमोर थांबलेलो असतानाही तुला हे चांगलंच माहित होतं की ही आपली शेवटची भेट. आज घरी गेल्यावर तुझ्या वाटा मोकळ्या माझ्या वाटा मोकळ्या. याही आधी तू खूप विनवलं होतंस. मीच ऐकलं नाही. नात्याला भविष्य नाही या गोष्टीवर मी इतकी ठाम होते की, भविष्य असूही शकतं या शक्यतेचा मी विचारच केला नाही. किंबहुना असा विचारदेखील करू न शकणं हीच माझी मर्यादा. नात्यांची इतकी अलवार गुंफलेली गुंफण सोडवत जाणं मला फार सोपं वाटलं होतं. त्याक्षणी त्यावेळेला. हे अदृश्य तुझे आणि माझ गुंफलेले धागे तेव्हा दिसलेच नव्हते. तुला दिसले होते. मी न बोललेलं बरंच काही तू ऐकलं होतंस. आपल्यामध्ये काहीतरी अनामिक आहे, हे तुला माहित होतं. त्या अनामिकाला तसंच राहू द्यावंसं मग तुला का वाटलं? तुला माहित होतं ना... मग तरी का?
तू दिनसा है मै रात आ ना दोनो मिल जाये शामों की तरहा..
यापुढे हे गाणं मी ऐकणार नाहीये. यानंतर कधीच हे गाणं मी ऐकणार नाहिये. दोन वेगवेगळ्या ध्रुवावरची माणसं केवळ काही वेळासाठी एकत्र येऊ शकतात. जसं तिन्हीसांजेला किंवा पहाटेला दिवस आणि रात्र एकत्र येतात. पण त्यानंतर? एकतर दिवसाला संपून जावं लागतं, किंवा रात्रीला. दोघांनाही दोघांचं स्व्वतंत्र अस्तित्व ठेवून एकाचवेळी सोबत चालता येतच नाही. दोघांचे मार्ग भिन्न होतातच. घाटातल्या त्या टपरीवाल्याकडं फारशी गर्दी नव्हतीच. त्यात दोन इतके चिंब भिजलेले लोकं आलेली बघून त्यानं चहा परत उकळायला ठेवला. असा चहा तुझ्या खास आवडीचा. जर्मनच्या त्या भांड्यात उकळ उकळ उकळलेला. स्पेशल कटिंग चाय. मी कॉफीवाली. पण इतक्या सुनसान रस्त्यावर कॉफी मिळालीच नसती. तो चहा होईपर्यंत दोघंही दरीच्या त्या टोकावरून पसरलेले ते ढगांचं रूप बघत राहिलो. पाऊस अजून पडतच होता. पण आता त्या पावसाची जाणीवच नव्हती. तू आणि मी दोघंही पाऊसमय होऊन गेलो होतो. 
स्टीलच्या त्या एवलाश्या ग्लासमधला चहा तू माझ्या हातात दिलास, “केअरफुल, गरम आहे” तू म्हणालास. मी ग्लास धरला, चटका बसला त्यासरशी ग्लास सोडून दिला. चटके सोसायचं बळंच नव्हतं माझ्यामध्ये. पण तू तो ग्लास सोडला नव्हतास. मी सोडून देईन याची तुला पक्की खात्री होती... 
मी खरंच सोडून तर दिलं होतं... तुला, तुझ्या प्रेमाला, तुझ्या नात्याला.! सगळ्यालाच. आता सोबत चालत होतो ते केवळ अनोळखी बनून. काळोख भराभरा दाटून येत होता. चहामध्ये पावसाचे थेंब पडले. तो गोडसर घट्ट चहा मला पिता आलाच नाही. उगं एक घोट प्यायले आणि तुला परत दिला. 
टपरीवाल्याला चहाचे पैसे देऊन (थोडे एक्स्ट्रापण दिले असशीलच ना? बिचारा इतक्या थंडीपावसांत उभा आहे म्हणून!) तू बाईकजवळ आलास. मी क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या त्या ओलसर दमट घुसमटवणार्या दरीकडं बघत उभी राहिले. तू माझ्याजवळ आलास आणि हलकेच काहीच न बोलता माझा हात हातात घेतलास. 
“कितीही दूर गेलीस तरी कायम माझ्याजवळ राहशील. स्वत:ला माझ्यापासून तोडू शकणार नाहीस.... तू माझ्या अस्तित्वाचा एक भाग आहेस. जोवर मी आहे. तोवर माझ्याजवळ तू आहेस...”
आणि मी परत तुझ्यामध्येच गुंतले. तुझ्यापासून इतक दूर येऊन, इतक्या वर्षांनीसुद्धा! तुझ्याच आठवणींमध्ये स्वत:ला सॊडवायचे कितीही प्रयत्न केले तरी तिथंच अडकत राहिले. तिथंच घुटमळत राहिले. कसं सोडवायचं ते अजून समजलेलं नाही. सोडवायची इच्छाच नाही बहुतेक. 
हे असंच गुंतून राहणंच नशीबात लिहिलंय... 
ये मोहमोहके धागे तेरी उंगलियोंसे जा उलझे!

Tuesday, 9 May 2017

रहे ना रहे हम (भाग २७)

ही माझ्या ब्लॉगवरच १०१वी पोस्ट. तुम्ही सर्वांनी वारंवार दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि अभिप्रायांबद्दल मनापासून आभारी आहे. वाचत रहा आणि जे काय भलेबुरे वाटेल ते कळवत रहा... नंदिनी.

>>>>>>

रहे ना रहे हम (भाग २७)

   मी सध्या याबद्दल आईला (आणि मुख्य म्हणजे बाबाला) काहीच सांगायचं नाही असं ठरवलं होतं. दोन गोष्टी, एक तर त्या दोघांना असं वाटत होतं की माझ्या या आजाराचं कारण बाबाचं चुकीचं वागणं असावं, मला तो गैरसमज दूर करायचा नव्हता. घरापासून इतके वर्ष दूर राहिल्यावर, हॉस्टेलमध्ये लफड्यांचे नानाविध प्रकार पाहिल्यावर (माझ्या हॉस्टेलमधल्या एका मुलीची आई दोन दोन पुरूषांसोबत रहायची. त्यांच्यात  काहीतरी अंडरस्टॅंडिंग होतं म्हणे. हेही एक गजबच, अ सो!) मला माझ्या बापानं दुसरं कुठेतरी बाई ठेवली हे “तितकं” खटकत नव्हतं, प्लीज नोट! अजिबात खटकत नव्हतं असं नाही तर ज‌ऽऽरा प्रमाण कमी झालं होतं इतकंच. कदाचित माझ्या प्रकरणामध्ये त्यानं बोलू नये असं मला वाटत होतं, तसंच त्याच्याही प्रकरणामध्ये मला बोलायचा अधिकार नव्हता असं मला हल्ली वाटत होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, मी आफताबसोबत या संदर्भात काहीही बोलण्याआधी बाबाशी बोलले असते तर आता माझी रूम ते आफताबची रूम यामध्ये मांडव पडला असता आणि आम्ही दोघंही काहीही बोलू विचार करू शकण्याआत नवरा बायको झालो असतो. मला ते नको झालं होतं. मी आफतबची गर्लफ्रेंड असताना त्याची बदफैली सहन करू शकले असते, पण नात्यावर एकदा का लग्नाची मोहोर उठली आणि त्यानंतर जर तो चुकीचं वागला तर मी त्याला माफ केलं असतं का? माहित नाही. आणि सध्या या क्षणाला माहित नाही अशा कुठल्याही प्रश्नाशी लढा देण्याची माझी हिंमत नव्हती. इच्छा नव्हती.

घरी आल्यावर आईनं ताबडतोब डॉक्टरांना फोन केला. शिरस्त्याप्रमाणे ते अर्ध्या तासांत घरी आले. वीकनेस, स्ट्रेस, कसलंतरी इन्फेक्शन, पोल्युशन, खाण्यात गडबड, अतिव्यायाम, अति काम, चष्म्याचा नंबर बदलला असेल  अशा वाट्टेल ते कारणांसकट त्यांनी खंडीभर औषधं लिहून दिली. त्यातली निम्मी तर मल्टिव्हिटॅमिन्स होती. आईची बोलणी खाण्यापेक्षा गोळ्या गिळलेल्या परवडल्या.

तीन दिवसांपूर्वी माझं घर सोडून गेलेला माणूस माझापासून अवघ्या काही फुटांवर होता. कॉलेजमध्ये त्यानं सांगितलेला प्रसंग आठवला, त्याच्या खोलीमधून माझी बेडरूम सहज दिसते. मला तो दिसला नाही तरी...सकाळपासून मी आलेली आहे हे त्याला माहित असणार, तो आलाय हेही मला माहित आहे. आई तर अंगणातच म्हणाली, “तरीच फोन लागत नव्हता, हा पण इकडे गावीच आलाय.” आईनं त्याला मघाशी हाकही मारली होती, तेव्हा “बाजारांत जाऊन येतो, मग घरी येईन” असं सांगून गेटासमोरून गेला होता. त्याला माझ्याशी बोलायचं नव्हतं, हे मला मान्य आहे. मलाही खरंतर मनापासून सांगायचं तर त्याच्याशी बोलायचं नव्हतं पण बोलणं गरजेचं होतं. किमान माझ्यासाठी क्लोजर म्हणून तरी.
आईनं खास माझ्या आवडीचं थालीपीठ लावलं, बाबाला बाजारातून नुस्त्या दुधाचे पेढे आणायला पाठवले माझे फेवरेट म्हणून... बाबा बाहेर गेल्यावर आई माझ्या खोलीत आली.
“बाळा, काय झालंय ते मला तरी सांगशील?” माझ्या डोक्यावर हात फिरवत तिनं विचारलं. खरंतर मला मुसमुसून रडू आलं पण मी आवरलं.
“काही नाही गं, डॉक्टर म्हणाले तसं, कामाचा स्ट्रेस आणि वेळीअवेळी खाणंपिणं”
“यतिन म्हणतोय नोकरीच सोड. बरोबर आहे ना! इतकी दगदग आणि त्रास करून त्याचा फायदा काय... तुझी तब्बेत महत्त्वाची. लहानपणापासून तुला इतकं जपलंय ते काय असे हाल करून घ्यायला.. जमत नसेल तर सोडून दे.”
“आणि काय करू? घरी बसून राहू...रिकामटेकडी?”
“रिकामटेकडी कशाला? इतकं सारं आहे ते सांभाळ. एक विचारू का?”
“काय?”
“तुझ्यासाठी एक स्थळ आलंय, तुझ्या काकीच्या चुलत भावाचा मुलगा आहे. त्यानं तुला साहिलच्या लग्नांत पाहिलंय. स्वत:हून विचारलंय. तुला आज उद्या या संदर्भामध्ये फोन करणारच होते, फोटो वगैरे बघ, काय ते ऑनलाईन गप्पा पण मारा. पसंत असलं तर तो इंडियामध्ये येईल. तुझी आज्जी याच वर्षी गेली त्यामुळे लगेच फार थाटामाटात लग्न होणार नाही, पण तरी तुझी इच्छा असेल तर...”
“आई, प्लीज आता हा विषय नको... थोड्या दिवसांनी बोलू...” हा काकीच्या चुलत भावाचा मुलगा शिवम ऑलरेडी माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये होता आणि विनाकारण सकाळ संध्याकाळ गूड मॉर्निंगचे मेसेजेस टाकून मला पिडायचा, ते यासाठी वाटतं!!

दुपारी जेवून मी परत झोपले. किती दिवसांची झोप उरली आहे असं वाटत होतं... खरंतर प्रेमभंग अथवा भांडणं वादावादी गेल्यावर लोकांच्या रात्रीची झोप उडते, माझं उलटंच. रात्री तर झोपलेच, दुपारीपण प्रचंड झोपले. नंतर झोप उडावी म्हणून अखेर पीसीवर गोविंदा धमाल डान्स गाणी लावून बघत बसले.
संध्याकाळी आईबाबा आईच्या एका मैत्रीणीच्या नातवाच्या पहिल्या वाढदिवसाला गेले, मला येतेस का विचारलं, नाही म्हणून सांगितलं. ओळख ना पाळख, तिथे बसून मी उगाच बोर होणार! आईला मैत्रीण आहे, तिला नातवंडं पण झालेली आहेत हे लक्षात येऊन मलाच जरा हसू आलं. माझं वय वर्षं पंचवीस. केदारसोबत लग्न झालं असतं तर एव्हाना मलाही मुलं झालीच असती की! केदार सोडून इतर कुणाहीबरोबर झालं असतं तरीही... मग आई पण आज्जी झालेली असती.. आईला आज्जीच्या रोलमध्ये मी कधीही इमॅजिन करू शकले नसते. माझ्या आज्जीइतक्या खडूस आज्जीच्या रोलमध्ये तर कदापिही नाही.
घरामध्ये एकटीच असताना सहज म्हणून परत एकदा आफताबचा नंबर डायल केला. दुसर्‍याच रिंगला त्यानं चक्क फोन उचलला.
“बोल”
“घरी आहेस?”
“हं”
“बोलू या का?”
“बोल म्हटलं ना”
“घरी येतोस?”
“नको. फोनवर बोल”
“आईबाबा नाहीयेत”
“फोनवर बोल”
“मला फोनवर बोलायचं नाहीये. प्रत्यक्ष भेटू या. पाच मिनिटांसाठी ये”
“येणार नाही.”
“मग मी येऊ?”
“हं” फोन कट. म्हणजे नक्की समजायचं काय? ये कि नको? मी माझ्या मनानंच अर्थ काढला. परत फोन करून वस्कून कोण घेईल? पाचच मिनिटांत मी आवरून त्याच्या घरी गेले. आवरायचं काय, चेहरा धुतला, घरात आईचा ढगळा गाऊन घातला होता, तो बदलून साधा कॉटनचा सलवार सूट घातला. केस उगाच जरासे विंचरले, आणि माझ्या घराला कुलूप लावून त्याच्या दाराची बेल वाजवली. दारामध्ये अझरची बाईक नव्हती. म्हणजे, घरात आफताब एकटाच असणार. जवळजवळ दोन मिनिटांनी त्यानं दार उघडलं.
“किचनमधून आली नाहीस?” पहिलाच प्रश्न वसकल्यासारखा. “गेटनं येताना कुणी पाहिलं असतं तर”
“तुझ्या घरी पहिल्यांदा येत नाहीये..”
“माहित आहे. पटकन आत चल.”
इतक्या दिवसानंतरही, खरंतर इतक्या वर्षानंतरही घरावर चाचींची छाप अजूनही होती. अझर एकटाच राहत असला तरी घर कायम नीटनेटकं आवरलेलं. जिथली वस्तू तिथल्या तिथे ठेवायची, यांच्या घरात सर्वांनाच सवय. किंबहुना, माझं आणि त्याचं यावरून कित्येकदा भांडण होणार. कित्येक वर्षांत घर बदललंच नव्हतं. जुना खोक्याचा टीव्ही जाऊन फ्लॅट स्क्रीन आला, भलीमोठी होम थीएटरची सिस्टीम आली, एसी लावला तरी घराचं रूपडं मात्र जैसे थे! आता मात्र मला एक छोटासा बदल दिसला, सोफ्याच्या बाजूला एक भलामोठा खोका ठेवला होता आणि त्याच्या बाजूला साड्यांचा एक ढीग. मी येण्याआधी आफताब बहुतेक साड्या घडी करत बसलेला असणार. ढीगासमोर लॅपटॉप चालू ठेवलेला होता. त्यावरचा पिक्चर पॉझ केलेला होता. बहुतेक जोधा अकबर असणार. (तासाभरापूर्वी आफ्ताबची “वॉचिंग जोधा अकबर अगेन! व्हॉट ऍन एपिक लव्हस्टोरी” असं एफबी स्टेटस मी वाचलं होतं) टीव्हीवर कुठलीशी क्रिकेट मॅच चालू होती. अझरच्या म्युझिक सिस्टमवर कसलंसं इंग्लिश ढाणढाण गाणं वाजत होतं, माझं आणि या फिरंगी गाण्यांचं एरवीही कधी जमलं नाही त्यामुळे ते काही ओळखू आलं नाही. या इतक्या गदारोळात हा प्राणी माझ्याकडे मात्र शिंगं  रोखलेल्या गेंड्यासारखा बघत होता. गेंड्याला शिंगं असतात की नाही ते मला माहित नाही, त्यामुळे संदर्भ तपासून घ्यायला हवा. असो.
“हे काय?” मी साड्यांकडे बघत विचारलं.
“काही नाही. लवकर बोल” त्यानं हातातल्या रिमोटने म्युझिम सिस्टीम बंद केली.
“का? कुठे जायचंय तुला?”
“चहा घेणारेस?”
“नको. कॉफी करशील?”
“दूध नाहीये”
“मग चहामध्ये काय फिनाईल घालणार होतास?” त्याच्या या तुटक अनोळखी वागणुकीचा तर राग यायला लागला होता. “
नीट बोल!” तो परत वसकला, “चहाइतकंच दूध आहे म्हणून चहा विचारला हे तुला समजत नाही का? आम्ही रोज लिटरभर दुध घेत नाही हेही तुला माहित नसेलच. जगामध्ये दुसर्‍या कुणाचा विचारच कधी करत नाही ना?”
“मुळात तुला हे कळायला हवं की मी इथे चहा किंवा कॉफी प्यायला आले नाही. तुम्ही रोज लिटरभर दूध घेत नसलात तरी किमान जगामध्ये दुसर्‍याचा विचार करणार्‍या माणसा, तुला हे समजत नाही की, नक्की काय घडतंय? त्यादिवशी भांडून बाहेर पडलास, नंतर तुला समोरासमोर भेटून बोलता आलं नाही. कित्ती वेळा आईनं तिला कॉल केला. तापानं फणफणून आजारी आहे म्हणून मेसेज केला. तू भेटलास मला? कॉल केलास? विचारलंस, की ब्वा स्वप्निल.. का?”
“मी का विचारू? तू मला वाट्टेल तसं बोललीस...आठव..”
“तू आठव... माझ्याआधी तू आठव. तू काय वागलास? आय विल नॉट से की मी जे बोलले ते योग्य होतं. दोज वेर हार्ष वर्ड्स. शूड हॅव्ह नेव्हर युज्ड देम. बट व्हॉट अबाऊट यु? आफताब. तू रात्री अडीच वाजता तुझ्या एक्ससोबत बोलत होतास. ती माझ्या घरात येऊन..”
“ओह, तुझं घर नाही का?”
“हो, माझंच घर. आफताब त्या फ्लॅटची कागदोपत्री मालकी माझ्या बापाकडे आहे म्हणून ते घर माझं नाही. त्या घराभोवती, त्या तीन खोल्यांमध्ये माझा जीव गुंतला म्हणून ते घर माझं. त्या घराच्या प्रत्येक भिंतीवर माझ्या संसाराची, स्वप्नांची चित्रं आहेत म्हणून ते घर माझं. तू माझ्यासोबत तिथं होतास म्हणून ते घर माझं... आणि त्या माझ्या घरामध्ये... तू मला धोका दिलास,”
“आय ऍम टेलिंग यु दिस अगेन ऍंड अगेन... मी तुला धोका दिला नाही. पण जर तुझं हेच मत असेल तर व्हेरी गूड. मी यानंतर कधीही माझ्या वागण्याचं कसलंही जस्टिफीकेशन तुला देणार नाही..”
“मागणारही नाही. तूच मेसेज केलास ना, इट्स ओव्हर म्हणून..”
“आय वॉज ड्रंक. बट स्टिल...”
“दॅट्स नॉट एन एक्स्युज. आणि जर खरंच तसं होतं, तर उतरल्यावर मला कॉल करायचा होतास... वी वूड हॅव डिस्कस्ड इट लाईक ग्रोनप्स.”
“राहिलं... आय वॉज बिझी समव्हेर एल्स”
“ओह, तुझ्यामाझ्यापेक्षा या अशा कुठल्या कामामध्ये बिझी होतास? राईट!!! निधीच्या घरचं लग्न होतं ना, तिकडे गेला होतास? या सर्व साड्या... लग्नासाठी द्यायच्या घ्यायच्या आहेत!!! म्हणून तू घड्या घालत बसलास.”
“स्वप्निल, बरळू नकोस”
“मी बरळतेय? तू दारू पिऊन मला ब्रेकपचा मेसेज टाकतोस. कावर्ड, फोन केला तर फोन घेत नाहीस? टूच्च्या गडीमाणूस पाठवून सामान मागवतोस? तोही गावातला. गावभर माझी बदनामी करायची आयती संधी का सोडशील? ही पोरगी माझ्यासोबत बिनालग्नाची राहत होती आणि माझं मन भरल्यावर मी सोडून दिली अशी दवंडी पिटायची होती? समोरासमोर बोलायची हिंमत नाही.. आणि मला बरळू नको म्हणून सांगतोस. आय वॉज हर्ट. तू मला सोडून गेलास. धोसरा काढला तुझ्या नावाचा, पण तुला एक वेळ माझ्याकडे वळून पाहता आलं नाही.”
“तू तरी मला कॉल केलास? मी कुठे आहे ते तुला माहित होतं. मला येऊन भेटलीस? सॉरी म्हणालीस? तुला माहित होतं की माझा पाय दुखतोय. वारंवार अंधेरी पनवेल फिरू शकत नाही, सामान घ्यायला मी आलो नाही बीकॉज ब्लडी हेल, तुझ्या घराच्या त्या पायर्‍या मला चढता आल्या नसत्या. यु नो व्हॉट.. अजूनही गेले चार दिवस दुखतोच आहे.. आल्यापासून एकदातरी विचारलंस त्याबद्दल? ही तुझी काळजी!”
“रात्री घर सोडून तू गेलास. मला सोडून!! तुला किती काळजी आहे? प्रेयसी म्हणून नाही पण किमान माणूस म्हणून तरी दया दाखवायची होतीस... गेल्या कित्येक वर्षांत पडले नाही तितकी आजारी चोवीस तासांत पडले. रातोरात माझा बाप घरी घेऊन आला आणि तरीही तुला पर्वा कशाची तर मी तुला सॉरी का बोलले नाही... तुझ्या पायाची चौकशी केली नाही. फोन दे मला.”
“मध्येच काय?”
“तुझा फोन दे... मला मेसेजेस बघायचे आहेत”
“स्वप्निल, हे अति होतंय”
“होऊ देत. एकदाचं काय ते अति होऊनच जाऊ देत. माझ्या नकळत तू जर तिला मेसेजेस करत असशील तर...”
“मी तिला मेसेज केलेला नाहीये..” त्याचा आवाज चढला.
“मग फोन पाहू देत ना..” माझा आवाज त्याहून दुप्पट चढला. “इतका जर सच्चा प्रामाणिक आहेस तर बघू देत ना.”
“दिस इज टू मच! स्वप्निल, पुन्हा एकदा सांगतोय, झालं गेलं विसरून जर पुढे जायचं असेल तरच..”
“नाही, झालं गेलं काहीही मला विसरायचं नाहीये. कधीच.”
“ठिक आहे, ऍज यु विश. यापुढे मला आपल्यामध्ये काहीही संबंध् ठेवायचे नाहीत. जगण्यासाठी तुला तुझे मार्ग मोकळे आहेत आणि मला माझे.”
“ते तर आधीपासूनच होते मिस्टर आफताब. गुंतलेली तर मी होते ना, तू कधी गुंतलाच नाहीस माझ्यामध्ये..”
“हवं तर तसं समज. आणि मला कुणाचीही उधारी नकोय. एक मिनिट” त्याने सोफ्याच्या समोर ठेवलेल्या टीपॉयवरची एक फाईल उचलली. साधी प्लास्टिकची फाईल आणि आतमध्ये तीन चार प्रिंट आऊट्स होत्या. “हे घे.”
“काय आहे?”
“शाळा शिकलीस ना? वाचून बघ” म्हणत तो आत वळाला. जिन्यावरून धडाधड चढत त्याच्या खोलीत गेला. पाय दुखत असताना हे कसब त्याला कसं काय जमलं हे एक आश्चर्यच. अर्थात त्याहून पुढचं आश्चर्य माझ्या हातांत होतं. हे सर्व हिशोबाचे कागद होते. माझ्या फ्लॅटचं निम्मं भाडं, किराण्याचा त्यानं केलेला खर्च, इतर सर्व सटरफटर काहीबाही खर्च् व्यवस्थित एक्सेल शीटमध्ये लिहिलेले होते. काही पावत्यांचे स्कॅन्ड फोटो पण होते. त्यामध्ये त्यानं केलेला सर्व खर्च आणि मी केलेला खर्च असे कॉलम्स होते. मला इतकी आकडेबाजी कळत असती तर मीपण सीए नसते का झाले. केवळ वरवर नजर फिरवत गेले. त्या आकड्यांपेक्षाही मला त्यामागचा कोरडेपणा जास्त जाणवत गेला. किती अलिप्तपणे त्यानं हे सर्व लिहिलं होतं. मी गेले तीन चार दिवस पूढे काय होणार, कदाचित भांडण मिटेल, मे बी वी विल गेट मॅरीड, हे सर्व निवळेल वगैरे काहीबाही विचार मनात आणत होते. पण चुकूनही... चुकूनही मनात हा विचार आला नाही की, आफताबने सर्व आधीच तोडून मोडून टाकलंय. तो चक्क वेगळा झालाय माझ्यापासून. अगदी अलगदपणे त्याला हे जमलंसुद्धा. पायांतला काटा ज्या नाजुकपणे काढतात तसं त्यानं मला त्याच्या आयुष्यामधून बाहेर काढलंय. स्वत:ला जराही न दुखवता.
“हे घे.” त्याच्या हातात खाकी पाकीट होतं. “हिशोबानुसारच आहेत”
“हा तुझ्यामाझ्या एकत्र राहण्याचा हिशोब?”
“तुला काहीही करून ऍडजस्ट करायचं नाहीये..वेगळं व्हायचंय...”
“स्लो क्लॅप्स आफताब. मी काय करणार हे तुला आधीच माहित होतं. इतका अंतर्बाहय ओळखतोस तू मला... की आधीच, मी इथं येण्याअधीच तू हिशोब करून ठेवलास!! वेल डन. सी ए म्हणून खूप पुढे जाशील”
“स्वप्निल, मला तुझे टोमणे नकोयत. प्लीज, आता गेलीस तरी चालेल.”
“अशी कशी जाऊ? हिशोब पूर्ण करायला हवा ना... आणि या तुमच्या हिशोबामध्ये एक मेजर खर्च तुम्ही धरलेलाच नाहीये”
“गिफ़्ट्स? ऑर रेस्टॉरंटमध्ये खर्च झालेला पैसा. सी द लास्ट कॉलम, मिसलेनियस मध्ये आहेत सर्व... प्रत्येक रूपयाचा खर्च नसेल...”
“मिस्टर आफताब, गेली वर्षभर तुम्ही माझ्या चादरीत झोपताय. त्याचा हिशोब केलात? दिवसा रात्री, पहाटे, संध्याकाळी, वीकडे वीकेंड कुठल्याही दिवशी, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने, तुमच्या इच्छेनुसार, माझ्याही इच्छेनुसार, मी म्हणेल तेव्हा... त्या सर्वाचा हिशोब कुठाय?”
“स्वप्निल, दिस इज चीप”
“हे असले प्रेमाचे हिशोब मांडणं चीप नाही? मग जगामधला सगळ्यांत जुना व्यवहार म्हणून ज्या ऍक्टीव्हीटीला ओळखतात, त्याचे पैसे मी मागितले तर चीप?”
“स्वप्निल, माझ्या पेशन्सचा अंत बघू नकोस. गो!”
“तू माझ्या पेशन्सचा अंत ऑलरेडी पाहिलास, बास्टर्ड! दॅट्स व्हॉट यु आर! अ चीप बास्टर्ड. यो नो व्हॉट, यु डिइज्र्व दिस. निधी तुझ्याबरोबर ज वागली ते अतिशय योग्य होतं, तुला तसंच ट्रीट करायला हवं, कचर्‍यासारखं! ” हातातली फाईल मी त्याच्याच तोंडावर फेकायचा प्रयत्न केला, अंतराचा अंदाज जरा चुकला आणि ती समोरच टीपॉयवर जाऊन पडली. त्याच्या हातातलं पाकिट मीच खसकावून घेतलं आणि तेही तसंच जोरात फेकून दिलं. उगाचच टीपॉयला लाथेने मारलं. तो दणकट सागवानी टीपॉय इंचभरही हालला नाही, पण माझा पाय नंतर तीन चार तासांनी चांगलाच ठणकला. तशीच चालत दाराकडे आले, आधी सवयीने हॉलमधून किचनकडे जाणार होते, पण आल्या आल्या केलेलं “लोकांनी बघितलं म्हणजे?” हे स्वागत आठवलं आणि मागे फिरले. वाटेत डाव्या हाताला अझरची म्युझिक सिस्टीम होती. त्यावर जाऊन गाणं लावलं. म्युझिक सिस्टमचा आवाज जोरात फ़ुल्ल व्हॉल्युम केला, जवळच ठेवलेला रिमोट धाडकन उचलून खिडकीबाहेर फेकला आणि मी हॉलमधून पुढच्या दाराने बाहेर पडले. हे लिहायला किंवा वाचायला जेवढा वेळ लागतो त्याहून निम्म्यावेळात हे सारं घडलं होतं.
मी ज्याक्षणी आफताबच्या दाराबाहेर पडले तेव्हा त्याच्या घरामध्ये अलमोस्ट किंचाळल्यासारखी आशा गात होती, “मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है”
खरंतर मला गुलझार आणि त्याचे सिनेमा अजिबात आवडत नाहीत. प्रीटेन्शियस वाटतात, त्याच्या कथा मात्र सुंदर असतात पण लिरीक्स एकदम हटके करण्याच्या नादांत काहीतरी जांगडगुत्ता! हे गाणं पण त्यातलंच. धड काहीच नाही, तरीही आता तेच गाणं लावलं कारण “वही कहानी की मांग थी”

>>>>>>>>>>>> 
रात्री आई बाबा आले तेव्हा नऊ वाजून गेले होते. मी माझ्याच मनाने पिठलं आणि भात केला होता. आईला त्याचं जाम कौतुक वाटलं, मनात आलं, मुंबईत तर मी रोजच माझ्या हातचं रांधून खात होते. रात्री साडेनऊला आम्ही जेवायची पानं घेतच होतो तेव्हा वेदा आली.
वेदाचं लग्न डिग्रीनंतर लगेचच झालं. गावामधलाच चांगला डॉक्टर नवरा मिळाला होता, त्या वाढदिवसाच्या इथे आईनं मी घरी असल्याचं सांगितलं म्हणून मुद्दाम मला भेटायला इतक्या रात्री का होईना ती आली.
“अगं, उद्यापरवा, परत गेलीस तर.. म्हणून लगेच आले. बोल, काय म्हणतेस?”
मी हातात धरलेल्या ताटामधलं गरम गरम पिठलं गार होण्याची वाट बघताना जितपत बोलणं शक्य होतं तितकं बोलले. वेदाला मात्र भरभरून बोलायचं होतं. तशी तिनं बोलायला माझी काही हरकत नव्हती, पण प्रॉब्लेम हा होता की तिला तिच्याबद्दल कमी आणी तिच्या नवर्‍याबद्ल जास्त बोलायचं होतं. मला त्यात काही रस नव्हता. तीन चार वर्षांनी भेटलेली मैत्रीणीकडे स्वत:विषयी बोलायला काहीच विषय असू नये!! म्हटलं जेव आता इथंच तर नको “ते” वाट बघतील. मी फक्त तुला पाचेक मिनिटं भेटायला म्हणून आले असं म्हणत चक्क तासभर बसली. जेवली नाहीच, पण आईनं तिच्यासाठी डब्यात पिठलं घालून दिलं. मी केलंय हे समजल्यावर तिला मज्जाच वाटली.
ती इतक्या अप्रूपाने मला भेटायला आली याचंच मला फार ओझं झालं. मी एरवी तिला कधी फोन मेसेज पण करत नव्हते. पण आता नक्की केलं की सर्व मैत्रीणींना आठवड्यांतून एकदा तरी कॉल करायचा, भले त्यांच्याकडे नवर्‍याबद्दलच बोलण्यासारखं असेल तरी किमान ऐकायचं... कारण, जर आज वेदा आली नसती तर मी नक्की किती एकटी पडले आहे हेच मला समजलं नसतं!! त्याच्याशी बोलल्यानंतर कंप्लीट सैरभैर झाले होते, पण ती आल्यामुळे जरा परत माणसांत आले.
निघताना मी वेदाला घट्ट मिठी मारली. “आय मिस अवर ग्रूप!” मी तिला सांगितलं तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आलं होतं. तशी मी फार रडत नाही, पण वेदानं मात्र हे अचानक येऊन मला रडवलंच.
जेवण झाल्यावर मी जरा गच्चीवर फेरी मारते असं आईला सांगितलं, आणि गच्चीत आल्यावर दार व्यवस्थित कडी लावून घेतली. मला सिगरेट ओढायची होती. मी काय पक्की स्मोकर नाही, पण ज्याज्यावेळी माझ्यासमोर अश्या द्विधा परिस्थितीच्या घटना घडतात तेव्हा निकोटीन काम्स मी! पूर्ण अंधारात एकटीच कितीतरी वेळ उभी होते. गच्चीमधला लाईट लावलाही नाही.
बॅंडेज काढताना किती दुखतंय माहित आहे? पण काढून झाल्यावर काय! काहीच नाही. एक्झाक्टली तेच माझ्या या रिलेशनशिपचं झालं होतं. तोडताना त्याला नक्की काय वाटलं माहित नाही, पण मला एकच क्षण... निव्वळ एकच क्षण वेदनेची ती तीव्र धार जाणवली. त्यानंतर नाही. मी त्याच्या उंबरठ्यामधून बाहेर पडून माझ्या घरी पोचले तेव्हा, माझंच मला समजलं होतं. पिक्चर खतम हो गयी! आता क्रेडीट्स रोल करायला हरकत नाही.
वाईट वाटलं, तेवढ्यापुरतंच. डू आय स्टिल लव्ह हिम? ऑफकोर्स आय डू! आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आफताब माझ्यासाठी स्पेशल राहील. तो माझा बॉयफ्रेंड होता म्हणून नव्हे, माझा मित्र होता म्हणून.
माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. हे भान्गडीवालं फिल्मी प्रेम बसण्याहीआधीपासून तो कायमच माझा बेस्ट फ्रेंड राहिलाय..  पण त्याच्यासोबत मी आयुष्य काढू शकणार नाही. आई जशी बाबाच्या चुका समजत असूनही त्याच्यासोबत राहिली तसं मी नाही करू शकत. प्रश्न असा आहे की, जर आम्हाला एकत्र रहायचं असेल तर त्त्यानं चूक करताच कामा नये. पण ते त्याला शक्य नाही... कितीही त्यानं आटापिटा केला तरीही तो तिला विसरू शकणार नाही. मी ज्याप्रमाणे केदार चाप्टर कंप्लीटली क्लोज केला, त्याप्रमाणे तो तिचा चाप्टर कधीही क्लोज करणार नाही. एक वेळ फिजिकल लेव्हलवर ते जमेलही. पण मनाचं काय... ती मनात कायम राहणार. ही गोष्ट मला माहित असूनही मी ऎक्सेप्ट करावी अशी त्याची कदाचित अपेक्षा आहे. आय डोन्ट नो, त्याला काय वाटतं ते माहित नाही... पण मी अशी मनानं अर्धीमुर्धी कुणाचीच होऊ शकत नाही. मला व्हायचंच नाहीये. लग्न, संसार, मुलं बाळं, करीअर पैसा या सर्वांहून जास्त मला मानसिक रीतीने सुद्धा केलेली फसवणूक चालणार नाहीये.   सो आय ऍम नॉट रेडी फॉर इट! मला सगळं काही स्वत:साठी हवं असतं, मी कधीच काहीच कुणाहीसोबत शेअर करून जगू शकत नाही.
मी सिंगल चाईल्ड. लहानपणापासून मी “एकटीच” आहे हे माझ्या आईवडलांना माहित होतं. एकट्या मुलांच्या भावनिक आणि  सामाजिक गरजा इतर मुलांप्रमाणे डेव्हलप होत नाहीत असं आईनं कुठंतरी वाचलं होतं. तसं माझ्याबाबतीत होऊ नये म्हणून ती मला साहिल सागर वगैरेंकडे सुट्टीला पाठवायची, पण एक तर ते वयानं मोठे होते आणि वर्षभर काहीच संपर्क साधत नसल्याने महिनाभर काय डोंबल खेळणार? मी लगेच भोकाडं पसरून पसरून गावी परत यायचे. आईपासून दूर अजिबात जायचे नाही. आईच माझी सखीसोबती मैत्रीण सर्व काही. घरी असताना माझ्या एकटेपणावर टीव्ही हाच परफेक्ट उपाय होता. मी दिवसभर टीव्ही बघायचे, अगदी कार्टून्स, पिक्चर, सीरीयल जे काय लागेल ते... शाळेतून आलं की टीव्ही, शाळेची वेळ होईपर्यंत टीव्ही. माझा हा एकटेपणा खर्‍या अर्थाने गेला तो शेजारी रहायला आल्यावर. सर्वात आधी अरिफ, मग आफताब आणि मग अझरशी झालेल्या ओळखी. त्यांच्यासोबत जरा खेळायला- इतरांच्यात वावरायला शिकले. अरिफ आज असता तर.... मी पैजेवर सांगते, मी आणि अरिफ कधीच कपल झालो असतो. सुखी राहिलो असतो. दोघंही एकाकी होतोच, पण दोघांनाही त्या एकाकीपणाची मिजास होती. आफताबसारखं त्या एकाकीपणावर कसलाही मुलामा देऊन जगणं पसंद पडलंच नसतं. तोही एकटाच होता, एका अतिशय वेगळ्या अर्थाने. पण हा एकटेपणा त्याला अपमानास्पद वाटायचा, त्याचा नकळत केलेला उल्लेखसुद्धा त्याला खटकायचा. दोन माणसांनी एकत्र जगण्यासाठी इतकी दोन टोकं असून चालत नाही... मीपण एकटीच होते, पण मला माझ्या एकटेपणाबद्दल कधी दया किंवा कणव वाटली नाही.  आय वॉज व्हेरी कंटेंट अबाऊट इट.
यापुढे हाच एकाकीपणा मला मिरवत जगायचं होतं. इतरांसाठी नाही तर, स्वत:साठी.
सिगरेट संपली तेव्हा हातातल्या मोबाईलचं स्क्रीन अनलॉक करून पहिला फोन मी रॉयला लावला. जवळजवळ दोनेक तास  आम्ही बोलत राहिलो.
हा निर्णय खरंतर सुप्तावस्थेमध्ये कधीच झाला होता, आता केवळ अंमलबजावणी करायची होती. जणू काही, हाच निर्णय भविष्यांत घ्यावा लागेल याची माझी मलाच खात्री होती.
(क्रमश: )