नुकताच ह्रितिक रोशनचा रीलीज झालेला बॅंग बॅंग
पाहिला. मुळात ज्यावरून सिनेमा ढापलाय (ओके! ऑफिशीअल रिमेक) केलाय त्याच्या
कथेमध्ये काडीइतकाही जीव नव्हता. मॉडेलगत कन्फ़्युज फिरणारी कॅमेरून डिआझ, आपण म्हातारे झालोय हे लपवण्याचा अट्टाहास करणारा
टॉम क्रूझ (मला वाटलेलं हा बॉलीवूडचा पेटंटेड फंडा आहे, हॉलीवूडनं कॉपी मारली) आणि
प्रचंड गंडलेली कथा यामुळे नाईट ऍण्ड डे सपाटून आपटलेला. दुर्दैवानं हिंदी बॅंग
बॅंगनं याच गोष्टी जशाच्या तशा उचलल्या आणि सिनेमा बनवला (रिमेकची गरज काय होती हा
वेगळाच मुद्दा). साहसदृश्यं कमालीची चित्रीत झालेली आहेत, एखाद्या
हॉलीवूडपटापेक्षाही सरस असे ऍक्शन्स सीन्स या चित्रपटासाठी वापरली होती. पण ते
सगळंच एकंदरीत फिकं पडत गेलंय. चित्रपटानं दोनशे करोडचा वगैरे धंदा केल्याच्या
बातम्या सर्रास रीलीज झाल्याच्या वीकेंडलाच ऐकू येतात, पण म्हणून तो “चांगला चित्रपट”
आहे असं हल्ली म्हणवत नाही. एकेकाळी चित्रपट यशस्वी होणं न होणं हा जुगार होता.
आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अर्थात चित्रपटांचं अर्थकारण हा पार वेगळा मुद्दा
आहे.
बॅंग बॅंगची एकमेव उत्तम बाजू म्हणजे अर्थात
कतरीनाचे फ्रेश लूक्स (तिच्या अभिनयाबद्दल बोलण्यासारखं काही असतं तर नक्की लिहिलं
असतं) आणि ह्र्तिकचा जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स पण....
प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याच्या
चेहर्यावर दिसणारं त्याचं वय. चाळीशीला टेकलेला ह्रितिक आताच पंचेचाळीशीचा
दिसतोय. सतत काम करत राहणं, चुकीच्या जीवनपद्धती, वैयक्तिक आयुष्यामधले ताणतणाव
आणि चित्रीकरणादरम्यान झालेले भयंकर अपघात या सर्वांची गोळाबेरीज त्याच्या देखण्या
चेहर्यावर हलकीशी होइना का पण जाणवून गेली आणि काळजात चर्र झालं. ह्रितिक रोशन हा
आमच्या टीनेजर वयामध्ये आलेला हीरो. मला शाळकरी वयापासून सलमान खान आवडायचा
(अजूनही आवडतोच! तो का त्याबद्दल पुन्हा केव्हातरी) पण ह्रितिक “आवडणं” यापलिकडे
होता. त्याचे लूक्स, डान्स, स्क्रीनवरचा वावर, त्याचं बोलणं यावर मी तेव्हा फिदा
होते, आजही आहे. २००० च्या दरम्यान अनेक
नवीन चेहरे (त्यातही स्टारचिल्ड्रन) पडद्यावर आले, पण त्यापैकी टिकून राहिलेले
म्हणजे ह्रितिक, करीना आणि अभिषेक. पैकी अभिषेकनं स्वत:च्या मर्यादा स्वत:च ओळखून
त्यानुसार कामं घ्यायला सुरूवात केली. त्यामुळे त्याचे कन्सिस्टंटली सिनेमा येत
राहिले पण तो “सुपरस्टार” कधीच बनला नाही, हेही तितकंच खरं. करीनाची करीअर फारच
मजेदार आहे. ही ह्रितिकच्याच कहोनाप्यारहै मधून “मला फारसा वाव नाही” असे म्हणत
बाहेर पडली (जरी हा निर्णय बबिताचा होता) आणि तिनं रेफ्युजीसारखा अतिशय वेगळा,
बॉलीवूडच्या नवीन नायिकेच्या सर्व नियमांचा चोळामोळा करणारा सिनेमा स्विकारला.
जेव्हा रेफ़्युजी पाहिला तेव्हा करीना ही कपूर घराण्याची अस्सल वारसदार आहे आणि
चित्रपटसृष्टीमध्ये काहीतरी नवीन पायंडा पाडून दाखवेल अशी काहीतरी अपेक्षा वाटली
होती. चमेली )())( सारख्या सिनेमांनी या अपेक्षा उंचावल्या. पण मध्येच कधीतरी ती
“पू” या इमेजच्या इतक्या प्रेमात पडली की, अक्कलशून्य, सुंदर, मॉडेल दिसणारी वगैरे
भूमिका तिला आवडायला लागल्या.. असो, करीनाबद्दल आपण सविस्तर कधीतरी बोलू.
आजचा विषय आहे ह्रितिक. ह्रितिक रोशनचं कहो ना
प्यार है मधून पदार्पण हे काही फारसं ब्लॉकबस्टर टाईप होइल वगैरे कुणालाच अपेक्षित
नव्हतं. “न्यु किड ऑन द ब्लॉक” इतकीच त्याची ओळख होती. समस्त सिनेसृष्टी त्याच्या
आगमनाकडं डोळे लावून बसली आहे, वगैरे चित्र ना पब्लिसिटीमधून रंगवलं ना
मीडीयामधून. बहुतेक पब्लिसिटी पाहता हा सिनेमा नायिकाप्रधान असल्याचे चित्र
रंगवण्यात आले होते. राकेश रोशन याबाबतीत आधीपासून जीनीयस आहे. स्वत:ला अभिनेता
म्हणून सिद्ध करण्यामध्ये जितका कमी पडला होत्या त्याहून अनेक पटीनं त्यानं
स्वत:ला दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यानं यापूर्वीच सिद्ध केलं होतं. खरंतर राकेश
रोशन “अभिनेता” म्हणून वाईट नव्हता. त्याच्याहून वाईट अभिनय करणारे कित्येकजण
तेव्हा बॉक्स ऑफिस गाजवत होते. पण राकेश रोशनच्या कारकीर्दीमध्ये त्याला सर्वात
जास्त नुकसान पोचवलं ते त्याच्या दिसण्यानं. गोरागोरा, घारोळा, (आणि लवकर टक्कल
पडलेला) हा अभिनेता एकतर सपोर्टिंग
अभिनेता म्हणून किंवा नायिकाप्रधान सिनेमांमध्ये अभिनेता म्हणूनच चालून जात होता. सोलो
हीरोच्या फार कमी संधी त्याला मिळाल्या. त्यामुळे त्यानं अभिनयावरचं लक्ष कमी करून
निर्माते-दिग्दर्शनात उतरायचं ठरवलं. जे. ओमप्रकाश मेहरासारख्या यशस्वी निर्मात्याचा या जावयाला सपोर्ट होताच.
राकेश रोशननं अतिशय सेफ गेम खेळत नेहमीचेच हिंदी चित्रपटांचे यशस्वी फॉरम्युले
थोडेसे ट्वीक करून चांगले मनोरंजकप्रधान सिनेमे दिले. काळाच्या बरोबर चालणार्या
कथा, तगडी स्टारकास्ट, सुप्रसिद्ध संगीत आणि डोळ्य़ांत न खुपणारी तरीही
ग्रेपव्हाईनसारखी पसरत जाणारी मार्केटींग स्ट्रॅटजी ही त्याच्या सिनेमांची काही
वैशिष्ट्ये. ज्यावेळी राकेश रोशननं “कहोना प्यार है” करायला घेतला तेव्हा यापैकी
एक मुद्दा “तगडी स्टारकास्ट” आपोआप निखळून पडला. त्यातही करीना कपूर बाहेर
पडल्यानं त्याच्या सिनेमाचं थोडं नुकसानच झालं. स्वत:च्याच मुलाला लॉंच करताना कथा
जास्तीत जास्तरीत्या त्याला फोकस कशी करेल तसंच प्रेक्षकांना ती आपलीशी का वाटेल हे
बघणं त्याला भाग होतं. ह्रितिक रोशन लूक्सच्या बाबतीत वडलांवर गेलेला. गोरा तर आहेच,
त्याखेरीज सहा फुटाची उंची, अतिशय सडपातळ शरीर, उभट ऍण्गुलर आणि अजिबात भारतीय न
वाटणारा चेहरा, घारे डोळे आणि एका हाताला सहा बोटं (हे व्यंग नाही याची कल्पना
आहे, पण सिनेमासृष्टीमध्ये कुठली गोष्ट
प्लस होइल आणि कुठली मायनस हे कुणीच प्रेडीक्ट करू शकत नाही). अशावेळी ह्रितिकचं
पदार्पण हे सो सोच होइल अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. त्यातही अवघ्या सिनेमासृष्टीचं
लक्ष लागलं होतं ते मेगास्टार अमिताभ बच्चनच्या मुलाकडे आणि करिष्माच्या बहिणीकडे.
ह्रितिक तसा दुर्लक्षितच होता. इथं लक्षात घ्यायला हवं की त्याला कहोना प्यार है
लॉंच होण्याआधी जे सिनेमा ऑफर झाले ते सर्व सहाय्यक अथवा दुय्यम अभिनेत्याचेच
होते. मिशन कश्मिर, फिझा आणि यादेंमधले त्याचे रोल मूळ स्क्रिप्टमध्ये फार वेगळे
होते. हे सिनेमे त्यानं कहो ना रीलीज व्हायच्या आधी स्विकारलेले. पण कहोना प्यार
हैंच्या तुफानी यशानंतर या सिनेमांच्या स्क्रिप्टमध्ये बदल केले. इथं कुणाचं नशीब
कशानं पालटेल सांगता येत नाही. पैकी मिशन काश्मिरमध्ये त्याचा रोल स्क्रिप्टला
धक्का न लावता इकडे तिकडे पसरवत वाढवण्यात आला. फिझामध्ये एक रोमॅण्टिक ऍंगल देऊन
आणि एखाददुसरं गाणं देऊन त्याचा वावर वाढवण्यात आला. यादेंच्या बाबतीत मात्र सुभाष
घई पारच फसला. एका बापाची तीन मुलींना वाढवण्याची मूळ कहाणी ह्रितिक करीनाच्या
सुपरस्टारपदाला एन्कॅश करण्याच्या नादांत स्क्रिप्ट हवी तशी वाकवत टिपिकल लव्हस्टोरी
बनवायला गेला आणि सगळीकडूनच नामुष्की ओढवून बसला. तसं बघायला गेलं तर हाच तो काळ
ज्यावेळी “आपल्याकडं स्टार आहेत मग ते कसेही दाखवले तरी फिल्म चालणारच” असल्या अति
आत्मविश्वासाला तडा जाण्याचे दिवस चालू झाले. खानत्रयीचा चांगलाच जम बसलेला होता,
तरीदेखील नवीन चेहर्यांची आवश्यकता जाणवत होतीच. मल्टिप्लेक्सेसचा नुकताच होत
असलेला उदय. चांगले कंटेंट ड्रिव्हन सिनेमा बनत असताना मल्टिस्टार्कास्टनी यादरम्यान
बराच मार खाला. (मग बिग बजेटवाल्यांनी “डीझायनर फिल्म्स” ही संकल्पना काढली आणि
तीच आजही यशस्वीरीत्या चालू आहे). सिंगल स्क्रीनच्या प्रेक्षकांची पसंती लक्शात न
घेता केवळ आणि केवळ एन आर आय पब्लिकवर डोळा ठेवून अनेक सिनेमा यादरम्यान निघाले
आणि सपाटून आपटले.
ग्लोबल मीडीयाच्या वाढत्या प्रभावानं आपल्याकडं
हीरो आणि हीरॉइन यांची जुनी प्रतिमा जाऊन नवीन लूक्सला डीमांड आली होती. पंचवीस
वर्षापूर्वी ज्या राकेश रोशनचे लूक्स साजेसे वाटले नव्हते तसेच ह्रितिकचे लूक्स
“ग्रीक गॉड” बनून प्रेक्षकांना आवडायला लागले. सलमान खान कृपेने याचदरम्यान
बॉडीबिल्डींग हा एक नवीनच पैलू हीरोच्या बायोडेटामध्ये आला होता, आणि सलमाननंतर
लगोलग ह्रितिकनं त्याला एन्कॅश करायला सुरूवात केली. ह्रितीकमॅनिया साथीच्या रोगासारखा देशभरामध्ये
पसरला. हा सिनेमा शहरी भागात चालला तसाच नंतर हळूहळू गाण्यांच्या जोरावर ग्रामीण भागातही
चालला. ह्रितिक या सिनेमामध्ये नेत्रसुखद होता. स्वत:च्या कमाल आणि किमान मर्यादा
ओळखून होता. या सिनेमामध्ये टिपिकल स्टीरीओटाईप रोल्स तेही डबल असताना त्याने दाखवलेली
देहबोली.. ह्रितिक उत्तम अभिनेता आहे, पण त्याचा अभिनय केवळ चेहर्यावरचा अभिनय
नव्हता. दोन पात्रांवरच्या देहबोलीवर, चालण्यावागण्यावर, दिसण्यावर त्यानं घेतलेली
मेहनत जाणवत होती. त्यानं स्वत:च्या नृत्यशैलीशी अजिबात फटकून न राहता
डान्सस्टेप्स केल्या होत्या आणि या डान्स स्टेप्स आजही आयकॉनिक आहेत. पण त्याच्या
या यशाचा आलेख जितक्या जोरात वर गेला तितक्याच जोरात खालीदेखील आला. आप मुझे अच्छे
लगने लगे, न तुम जानो ना हम, मै प्रेम कि दिवानी हू, मुझसे दोस्ती करोगे यांसारखे
भलीमोठी नावं असलेले आणि सपाटून आपटलेले सिनेमे आल्यावर दुसरं काय होणार? मध्येच
येऊन गेलेला “कभी खुशी कभी गमच्या” सुपरहिटपणाचे क्रेडिट घ्यायला शाहरूख आणि
अमिताभ हजर होते. ह्रितिककडे आता कहो ना प्यार हैच्या पुण्याईव्यतिरीक्त काहीही
नव्हतं. बहुतेक सिनेनिर्माते आता त्याला घेण्यासाठी कचरायला लागले होते. ह्रितिकनं
केलेली प्रचंड मोठी चूक म्हणजे कहो ना प्यार है नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी
मिळून देखील त्यानं हातातील आधी स्विकारलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना दिलेला
नकार. व्यावसायिक स्तरावर त्याचं वागणं योग्य असलं तरी याच सुमार स्क्रिप्ट
असलेल्या या चित्रपटांनी त्याच्या करीअरला ग्रहण लावलं. ह्रितिक आता ऑफिशीअली वन
फिल्म वंडर म्हणून ओळखला जायला लागला. याचदरम्यान कधीतरी एका प्रसिद्ध
सिनेमासिकानं त्याच्यावर एक कव्हर स्टोरी केली “फिनिश्ड!” खरोखर त्याचं करीअर
संपायला आलं होतं. एकही सिनेमा हिट नाही, केवळ ऍव्हरेज बॉक्स ऑफिस कलेक्शन. खर्या
अर्थानं त्याला जाग आली. याआधी त्यानं हातात असलेले प्रोजेक्ट्स भराभर काही न
विचार करता घेतले होते. केवळ गूडलूक्स आणि उत्तम डान्सवर सिनेमा चालत नाही हे
त्याला जाणवलं असणार. स्क्रिप्टची गरज आणि आपला अभिनय हेच आपल्याला तारून नेणार
आहेत हे त्यानं जाणलं. आता मात्र तो चूजी बनला. एकावेळी एकाच प्रोजेक्टवर काम
करायचा निर्णय त्यानं घेतला. वडलांसोबत कोइ मिल गयावर त्याचं काम चालूच होतं. हा
चित्रपट त्याच्यासाठी मेक ऑर ब्रेक होता.
बडजात्याचा मै प्रेम की दिवानी हूं अगदी
आवाजदेखील न करता आपटल्यानं पुढ्च्याच आठवड्यात आलेल्या कोइ मिल गयाबद्दल अख्खी सिनेसृष्टी
प्रचंड साशंक होती. एक तर विषय वेगळा होता. “भारतीय प्रेक्षक असा विषय समजून घेईल
का?” अशी शंका अनेक लोकांना होती. पण या सिनेमाने त्याला यशाची दारं पुन्हा एकदा
उघडी करून दिली. तो वन फिल्म वंडर अथवा सपोर्टींग अभिनेता याहून जास्त काही आहे,
याचं हे खणखणीत उदाहरण होतं. बॉलीवूडच्या एका मेन हीरोनं नेहमीचा सरधोपट मार्ग
सोडून काहीतरी वेगळं करायची ही पहिलीच वेळ नव्हती. पण बॉलीवूडला इतक्या दिवसांमध्ये
प्रेमकथा आनि सूडकथांपासून निवांत मिळत नसल्यानं त्यांनी आजवर सायफाय कथांकडे लक्ष
दिलंच नव्हतं. वाढत्या केबलमुळे आणि हॉलीवूड प्रभावामुळे हा जॉनर तरूणांमध्ये किती
लोकप्रिय आहे आणि अजून किती लोकांना आवडू शकेल हे राकेश रोशननं बरोबर हेरलं होतं.
पूर्ण सिनेमा ह्रितिकभोवती फिरता ठेवण्यात आला होता. सत्यजित रायच्या द एलियन आणि
ईटीचा प्रभाव सिनेमावर स्पष्ट दिसत होता. अधूनमधून तोंडी लावायला प्रेमकथा आणि
विनोद होते. टेक्नॉलॉजी का कमाल म्हणत छोटा जादू पडद्यावर भावण्यासारखाच होता. पण
त्या सर्वांहून जास्त भावून गेला तो ह्रितिकची डोक्यानं अधू असणार्या मुलाची
भूमिका. त्यानं या भूमिकेसाठी वजन कमी केलं, संवादफेक बदलली, देहबोली बदलली. डोळ्यांचा
प्रभावी वापर केला. या सर्वांमधून त्यानं ह्रितिक रोशन द ग्रीक गॉड या
सुपरस्टारपदापासून पूर्णपणे फारकत घेतली. प्रेक्षकांनी कोइ मिल गया डोक्यावर
घेतला. २००३ चा हायेस्ट ग्रोसर बनला. बॉक्स ऑफिस कलेक्शन वधारलं तसा त्याचा
आत्मविश्वासदेखील वाढला.
कोइ मिल गयानंतर ह्रितिकनं प्रत्येक सिनेमा
विचारपूर्वक निवडला. तब्बल वर्षभरानं त्याचा लक्ष्य रीलीज झाला. फरहानबरोबर दिल चाहता है ऑफर होऊनसुद्धा त्यानं
नाकारला होता. लक्ष्यच्या वेळी मात्र ही चूक त्यानं केली नाही. लक्ष्यचा विषय तसा
घीसापीटा होता, बदल होता तो फरहानच्या ट्रीटमेंटमध्ये. दणदणीत पात्ररचना, काटेकोर
प्लॉट आणि चित्रपटामधला ताजेपणा हे फरहानची वैशिष्ट्य. ह्रितिक यामध्ये बेमालूमपणे
बसला. सुरूवातीचा बेदरकार, बेफ़िकीर अर्बन युथ जितका बीलीव्हेबल होता तितकाच नंतरचा
आर्मीमॅनदेखील. दुर्दैवानं हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. युद्धाची
पार्श्वभूमी असूनदेखील देशभक्तीचे कडवे डोस, मेलोड्रामा इत्यादि गोष्टी नसल्यानं
असेल, कदाचित. पण ह्रितिक आणि प्रीटी झिंटा यांचं काम मात्र खरंच सुंदर होतं यात
वाद नसावा.
यानंतर आला सुपरहीरो क्रिश. क्रिश हा ह्रितिकसाठी
टेलरमेड रोल होता. आतापर्यंत कुठल्याही मेगास्टारनं सुपरहीरो करायचा प्रयत्न
केलेला नव्हता. (अजूबाला सुपरहीरो कॅटेगरीत टाकावं की नाही ते समजत नाहीये. दारा सिंग जमान्यात काही
सुपरहीरो आले, पण क्रिश इतका प्रसिद्ध कोणच नाही.). शिवाय मधूनच काही बी ग्रेड
सिनेमा येऊन गेलेत पण ते ढापूगिरी म्हणून. बॉलीवूडचे हीरो एरवीच इतकी सुपरहीरोगिरी
करत असतात की वेगळ्या सुपरहीरोची आपल्याला आजवर गरजच भासली नव्हती. पण पुन्हा एकदा
राकेश रोशननं खेळलेला जुगार यशस्वी झाला. या क्रिशवर हॉलीवूड सुपरहीरोचा बर्यापैकी
प्रभाव होता. तरीदेखील अस्सल भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेला ओळखण्याच्या
हुशारीनं क्रिश सुपर हिट गेला. या चित्रपटामध्ये उल्लेख करण्याजोगी बाब म्हणजे
जादू पूर्णपणे गायब करण्यात आला. परत एकदा सगळा फोकस ह्रितिकवर आणि अख्खा सिनेमा
तरून न्यायची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. जी त्यानं समर्थपणे पेलली.
ह्रितिकच्याच याच सुपरहीरो इमेजचा धूम२ ने
यथोचित फायदा उठवला. यशराजच्या धूम फ्रेंचायझीमधल्या दुसर्या भागात ह्रितिक
दिसणार या बातमीनंच सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता वाढवून ठेवली होती. वेगवान प्लॉट,
साहसी पाठलागीची दृश्यं, आकर्षक नायिका याबरोबरच धूम सीरीजचा अजून एक प्लस पॉइण्ट
होता. व्हिलन हाच हीरो आणि कसलाही भावनिक गोंधळ, बॅकग्राऊड स्टोरी वगैरे काहीही
घोळ न घालता एक वेगवान सिनेमा. इथं चोराला कसलीही निगेटीव्ह शेड न वापरता केवळ
त्याचं चोर असणं एवढंच महत्त्वाचं होतं. धूम२ मध्ये ह्रितिक छा गया. वेगवेगळे
गेटप्स, स्टाईलिश देहबोली, त्याची नेहमीची दिलखेचक नृत्यं आणि सोबत ऐश्वर्या
रायबरोबरचा रोमान्स. अभिषेक आणि उदय या सिनेमामध्ये सपोर्टींग ऍक्टर्स म्हणूनच
शिल्लक राहीले. ऐश्वर्यासोबत लागोपाठ त्याचा जोधा अकबर आला. चित्रपटाची कथा
ऐतिहासिक सत्यापासून पूर्णपणे फारकत घेतलेली होती. तरीदेखील दोन वेगवेगळ्या
धर्माच्या राजा-राणीची ही प्रेमकहाणी एखाद्या जादुई परीकथेसारखी प्रेक्षकांना
भावली. पृथ्वीराज कपूरनंतर पहिल्यांदाच इतका देखणा मुघल बादशाह सिल्व्हरस्क्रीननं
पाहिला असणार. याआधी प्रदीपकुमार आणि झुल्फी सय्यदनं साकारलेले मुघल बादशाह बघून
प्रेक्षक धन्य झालेच होते. पण गोवारीकरच्या जोधा अकबरनं मात्र ह्रितिकच्या
देखणेपणाला न्याय दिला. याच सिनेमामध्ये उघड्या अंगानं तलवारबाजी करत असलेल्या
बादशहाला चोरून बघणार्या जोधाचा एक क्लास प्रसंग आहे.
ह्रितिक आता बॉक्स ऑफिसच्या यशापलिकडचा
सुपरस्टार झाला असला तरी त्याचे काईट्स आणि गुझारिश हे दोन चित्रपट आपटले. या दोन्ही
चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांसोबत काहीच नाळ न जोडणं हे यांच्या अपयशामागचं
प्रमुख कारण होतं. काईट्स आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून बनवण्यात आला
होता. तो विदेशामध्ये चालला तरी भारतीय प्रेक्षकांना मात्र फारसा आवडला नाही. बरेचसे
संवाद इंग्रजीमधून असल्यानं हा चित्रपट आपटला, असंदेखील म्हटलं गेलं. गुझारिश हा
ह्रितिकसाठी एक माईलस्टोन आहे. क्वाड्राप्लेजिक झालेला जादूगार ही त्याची भूमिका.
इच्छामरणाची अपेक्षा व्यक्त करणारा, सगळीकडून हरत येणारा, जीवनाला त्रासलेला तरीदेखील
भरभरून जगणारा इथन ही त्याची व्यक्तीरेखा. याही सिनेमामध्ये त्याची नायिका ऐश्वर्या राय
होती. संजय लीला भन्सालीला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. दुर्दैवानं इतक्या
सशक्त व्यक्तीरेखा आनि दमदार कथा असूनदेखील सावरीयासारख्याच कृत्रिम नाटकी
ट्रीटमेंटनं सिनेमा फारच संथ आणि कंटाळवाणा बनला होता. भन्साली स्वत:च्याच
सिनेम्याच्या इतक्या प्रेमात पडलेला असतो की, प्रेक्षकांचा कधी विचारच करत नाही,
परिणामी सिनेमा एकसुरी आणि रटाळ होत जातो.
त्यानंतर आला जिंदगी ना मिलेगी दोबारा. झोया
अख्तरनं दिल चाहता हैचीच स्टोरीलाईन आणि कॅरेक्टर्स थोडी पुढे वाढवून बनवलेलं हे
कॉकटेल प्रेक्षकांना झिंगवणारं होतंच. स्पेनचे एक्झॉटिक लोकेशन्स, छोट्याछोट्या
मोमेंट्सनी सजलेली स्क्रिप्ट, फरहान, अभय आणि ह्रितिकच्या तीनही व्यक्तीरेखांना
न्याय देण्याची ताकद असलेला अभिनय आणि कतरीनासारखी आयकॅण्डी असताना हा सिनेमा
गाजला नसता तरच नवल. जिंनामिदो मधली ह्रितिकची भूमिका पुन्हा एकदा त्याच्याच
साच्यामधली होती. या भूमिकेमध्ये अनेक कंगोरे होते. सुरूवातीचा नाराजीनंच ट्रीपवर
आलेला, प्रत्येक गोष्ट पैशामध्ये तोलत जाणारा, अधल्यामधल्या वर्षामधल्या कडवट
आठवणींचे भार वाहणारा अर्जुन या ट्रीपदरम्यान बदलतो. हळूहळू स्वत:शीच स्वत:ला ओळख
करवून देत जातो. डीप सी डायव्हिंगनंतर बॊटीवर बसलेल्या अर्जुनच्या डोळ्यांतून केवळ
दोन अश्रू वाहतात. इथं एकही संवाद नाही, मेलोड्रामा नाही. (याबद्दल झोया अख्तरला
शतश: धन्यवाद) तरीदेखील संपूर्ण प्रसंग ह्रितिकनं काय ताकदीनं निभावला आहे.
अग्नीपथ हा अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीमधला एक
महत्त्वाचा सिनेमा. हा सिनेमा आला तेव्हा अमिताभ बर्यापैकी म्हातारा झाला होता.
तरीदेखील त्याच्या ऍंग्रीयंगमॅन या इमेजला शोभेल अशा सूडाची कथा असलेला सिनेमा.
याचा रिमेक बनवताना करन जोहर आणि करन मल्होत्रानं मूळ कथेमध्ये बरेचसे बदल केले.
रौफ लालाचं अफलातून घेतलेलं निगेटीव्ह कॅरेक्टरनं नवीन अग्नीपथ अधिक झळाळून उठला. थंड
डोक्याचा, आतून धुमसत असणारा, एकीकडे गुन्हेगारीच्या दलदलीमधून स्वत:चा सूड
उगवणारा त्याच वेळी सर्वसामान्य तरूणासारखा प्रेमळ भाऊ, मुलगा आणि प्रियकर असणारा
विजय दीनानाथ चौहान म्हणजे शिवधनुष्यच. ह्रितिकनं ते आरामात पेललं. अमिताभच्या
संवादफेकीनं अग्नीपथ गाजला होता, आजही त्याचे संवाद खडाखडा म्हणून दाखवणारे फॅन्स
आहेत. करण मल्होत्रानं अत्यंत हुशारीनं यामधल्या विजयला शांत दाखवून त्याची
संवादफेकच काढून टाकली. त्यामुळे मूळ अग्नीपथ आणि रिमेड अग्नीपथ हे चक्क वेगवेगळे
सिनेमा असल्यासारखे आहेत.
यानंतर आलेले ह्रितिकचे दोनही सिनेमा क्रिश ३
आणि बॅंग बॅंग मला व्यक्तिश: आवडले नाहीत. यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन अतिशय
रीमार्केबल आहे, तरीही हे सिनेमा ह्रितिकसाठी फार चांगले नाहीत. यामध्ये त्याचं
काम वाईट होतं अशातला भाग नाही. क्रिश ३ स्क्रिप्ट बेसिसवर जबरदस्त गडबडलेला होता.
प्लॉट हॉलीवूडवरून इतका ढापलेला असूनदेखील त्यामधलं क्रिशच्या पुतळ्यासमोरचं गाणं
वगैरे सर्वच अनावश्यक होतं. वाईट संगीत हा क्रिश३चा अजून एक मायनस पॉइन्ट. क्रिशचा
सुपरहीरो खूप अविश्वसनीय वाटला आणि त्याचवेळी प्रेक्षकांपासून पूर्णपणे डीटॅच्ड
वाटला. त्याउलट रोहित मेहरा मला जास्त भावला. एका सुपरहीरोचा बाप ही त्याची
भूमिकाच अफलातून होती. बॅंग बॅंगवर लेखाच्या सुरूवातीलाच स्तुतीसुमनं उधळलेली आहेत
म्हणून परत लिहत नाही. आधीच म्हटलं तसं अता त्याचं वय चेहर्यावर दिसतं. १४
वर्षाच्या कारकीर्दीमध्ये ह्रितिकनं केवळ १८ सिनेमा केले आहेत. सुरूवातीचे
कहोनाप्यार है नंतरचे त्याचे सलग पाच सहा फ्लॉप सोडले तर त्याचं बॉक्स ऑफिस रेकॉर्ड
अतिशय चांगलं राहिलं आहे. वेगवेगळ्या भूमिका करायचं साहस त्यानं दाखवलं आहे. थरारक
साहसीदृश्यं त्यानं केली आहेत. नृत्याच्या बाबतीत तो आजही फार वेगळा आहे. त्याला
टिपिकल इंडियन स्टेप्स शोभत नाहीत, आणि तरीही त्याच्या इतका टेक्निकली परफेक्ट
डान्स करणारा हीरो अजून कुठला नाही.
ह्रितिक रोशन हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा अभिनेता
आहे. जेव्हा कधी त्याला उत्तम स्क्रिप्ट आणि योग्य लगाम असलेला दिग्दर्शक मिळालाय
तिथं त्याचा अभिनय खुलला आहे.
यापुढे त्याचे अजून चित्रपट येतीलच. शुद्धी आणि
मोहेंजो दरो सारखे वेगळे विषय त्यानं करायला घेतले आहेत. वैयक्तिकरीत्या मी
मोहेंजोदरोची अधिक वाट पाहीन. त्याच्याकडून अपेक्षा तर चिक्कार आहेत. एकदातरी
ह्रितिकला पूर्णपणे खलनायक म्हणून पडद्यावर पहायचे आहे. धूम २ मधला स्टाईलिश चोर
वगैरे म्हणून नव्हे, तर कोल्ड ब्लडेड मर्डरर वगैरे टाईपचा खलनायक.
जाता जाता, ह्रितिकचा मला सर्वात जास्त आवडलेला एक
प्रसंग.
झोयाच्याच लक बाय चान्समध्ये त्याची भूमिका खूप
छोटी होती, पण जितकी होती तितकी त्यानं कमाल निभावली होती. मी आताच हे विधान करून
ठेवत आहे की अजून वीस-तीस वर्षांनी लकबायचान्स हा सिनेमा क्लासिक्समध्ये गणला
जाईल. एका सुपरस्टारचा किंचित निगेटीव्ह शेड असलेला (या सिनेमामध्ये प्रत्येक
पात्राला ती शेड होतीच, कुणीच टू गूड टू बी ट्रू नव्हतं) थोडासा संधीसाधू आणि
तरीही जमीनीवर पाय असलेला हा अलि झफर खान त्यानं ताकदीनं साकारला होता. (पुढंमागं
या सिनेमावर लिहिणार आहेच तेव्हा डीटेलमध्ये बोलू) एक प्रसंग या सिनेमामधला जिथं
झफर चिडून रोमीबद्दल काहीबाही बोलत असतो. अचानक एका आडरस्त्याला त्याची गाडी
थांबते. रस्त्यावरची भिकारी पोरं गाडीमध्ये हीरो बसलाय म्हणून धावत येतात. तो झटकन
काच वर करतो आणि त्या मुलांशी चेहरा वेडावाकडा करत हसत राहतो. एक वैतागलेला स्वत:च्याच
गॉडफादरबद्दल काडीचाही आदर न दाखवत बडबडणारा स्टार ते रस्त्यावरच्या मुलांशी
काचेआडून का होइना संवाद साधणारा एक साधासुधा तरूण हा त्याचा या झटक्यातला प्रवास.
खास ह्रितिक स्टाईलचा प्रसंग!
ह्रितिकच्या जनरेशनच्या अभिनेत्यांकडे सुदैवाने
करण्यासारखे बरेच काही आहे. छाप मोडून टाकायचे असं त्यांनी ठरवलं तर ते त्यांना
सहज जमू शकतं. जे खानत्रयीला जमलं नाही, ते
ह्रितिकनं कित्येकदा करून दाखवलंय आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर
घेतलेलं आहे. दुर्दैवाने हे “वेगळं काहीतरी करणं” सध्या लूक्स, ऍक्शन, फिल्म्
पब्लिसिटी यांच्याच इर्दगिर्द फिरत राहतं. सिनेमाच्या मूळ कंटेंटकडे जास्त लक्ष
दिलं जात नाही. ह्रितिक हा दिग्दर्शकाचा अभिनेता आहे, जेव्हा फरहान किंवा
झोयासारख्या दिग्दर्शकांनी त्याच्या शैलीचा वापर केलाय तेव्हा त्याच्यामधील
अभिनेता झळाळून उठलाय. राकेश रोशनसारख्या
दिग्दर्शकांनी त्याच्या स्टारडमचा आणि स्क्रीन मॅजिकचा पुरेपूर फायदा उठवला आणि
सूरज बडजात्या, सुभाष घईंनी हाच
फायदा गरजेपेक्षा जास्त उठवून अख्ख्या
सिनेमाचीच वाट लावून घेतली.
मला स्वत:ला येत्या काही वर्षांमध्ये
ह्रितिककडून खूप अपेक्षा आहेत. खान लोकांची सद्दी अलमोस्ट संपत आलेली आहे. रणबीर
कपूर सारखी नवीन मुलं काहीतरी वेगळं करायच्या प्रयत्नांमध्ये आहेत. ह्रितिक
कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथून त्याला वेगळे आणि चॅलेंजिंग भूमिका करता
येऊ शकतात. केवळ “कुछ हटके” करना है म्हणून नव्हे तर, मनापासून तो काहीतरी वेगळं
करू शकतो म्हणून.
(समाप्त)
No comments:
Post a Comment