तशी मी काही फारशी इमोशनल वगैरे व्यक्ती नाही. उगाच कुणीतरी काहीही कारण इक्कुल्या
कारणासाठी मला रडू वगैरे येत नाही. क्वचितच रडणार्यांचा एक प्रॉब्लेम असतो तो
म्हणजे एकदा रडू आलं की काही केल्या थांबत नाही.... मग
आधीचंमागचंपुढचंगेल्यातीनचार वर्षांमधलं जे काय रडणं शिल्लक असतं तो सगळा इमोशनल
धबधबा एकदमच सुरू होतो. “टचकन डोळ्यांत पाणीआलं” वगैरे नाहीच. डायरेक्ट जुलै
महिन्यातला पाऊसच.
याचा अर्थ मनाचे काही हळवे कोपरे नसतातच असं नाही. असतात ना. पण हे हळवे कोपरे
फार सांभाळून ठेवावे लागतात. एकदा का त्यावरची खपली निघाली की जखम सारखी ठुसठुसत
राहते. नक्की काय बिनसलंय तेही समजत नाही आणि कशामुळं बिनसलंय तेदेखील. आज
पहिल्यांदाच अशा एका हळव्या आठवणीविषयी लिहिणार आहे.
मला स्वत:ला लग्न, पाठवणी आणि त्यानंतरची ती सगळी सासर माहेरची गाणी हे सर्व
प्रचंड बोअर होतं. कधीकाळच्या बायकांच्या भावविश्वामध्ये त्याला प्रचंड स्थान
असेलही. पण आजच्या काळामध्ये “कारल्याचा वेल लावला सासू बाई आता तरी जाऊ द्या
माहेरा” किंवा “अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारतं, अस्सं माहेर सुरेख बाई खायला
मिळतं” वगैरे “आऊटडेटेड” वाटतं. डिट्टो ते लग्नानंतर भसाभसा रडणार्या मुलींबद्दल. आता काही
पूर्वीसारखं माहेर अगदीच परकं झालेलं. सासर पूर्णपणे अनोळखी वगैरे असलं काही
राहिलं नाही. मुलीपण आता सुशिक्षित आणि
कर्तबगार असतात. अरे ला कारे करायची हिंमत ठेवणार्या असतात. तरीही लग्नाअधी
वर्षभर अमेरिकेमध्ये नोकरी करून एकट्या राहिलेल्या मुली लग्नाच्या दिवशी मात्र
रडतात हे मला कायमच फार चमत्कारिक वाटत राहतं.
आता माझे याबद्दलचे विचार इतके विखारी आणि जहाल असतानादेखील आशाचं एक गाणं
असलं आहे की ते ऐकताना हमखास माझ्या डोळ्यांत पाणी येतं. हे गाणं मी शक्यतो पाहतच
नाही, पाहिलं एक अनामिक दडपण यायला लागतं. प्रचंड डिप्रेसिंग वाटायला लागतं...
काहीच नाही यार! जगण्यामध्ये असलं काहीतरी वाटायला लावणारं हे गाणं.
बिमल रॉयचा बंदिनी सिनेमा अफाट आहे. एक स्त्रीप्रधान कथा, त्यातही एका खून
केलेल्या स्त्रीची कथा. तिचा संघर्ष, तिच्या वेदना, तिचा लढा आणि तिचा बंदीवास
समर्थपणे चित्रित केलेला हा सिनेमा. “मै बंदिनी पिया की, मै संगिनी हूं साजन की”
म्हणणार्या कल्याणीची ही कथा. जास्त करून हा सिनेमा घडतो जेलमध्ये. म्हणूनच ही
एकट्या कल्याणीची कथा नाही.
स्त्रियांच्या या जेलमध्ये सगळाच ड्रामा आहे. स्वभावाचे वेगवेगळे नमुने आहेत.
कुणी भांडखोर, कुणी चिडखोर, कुणी हसरं तर कुणी सतत दु:खी. या तुरूंगामधल्या प्रत्येकीला
स्वातंत्र्याची आस आहे. उंचच्या उंच भिंतीच्या पलिकडच्या जगामध्ये काय घडतंय ते
जाणून घ्यायची इच्छा आहे. पण ते शक्य नाही. इथली प्रत्येक जण ही बंदिनी आहे. इथल्या
बंदिवासामधून मुक्त होऊन बाहेरच्या विश्वातही आपल्या नशीबी बंदिवासच आहे हे
जाणूनही मुक्तता हवीच आहे.
अशाच एका टळटळीत दुपारी कुणीएक बंदिनी जात्यावर दळत बसली आहे. जात्यावर
दळतानाचा आवडता टाईमपास म्हणजे ओव्या वा तत्सम लोकगीतं. आताही एकटीच जात्यावर
दळताना तिच्या मुखातून गाण्याच्या ओळी बाहेर पडतात.
“अब के बरस भेज भैय्याको बाबुल सावन ने लीजो
बुलाय रे
लौटेंगी जब मेरे बचपन की सखिया दीजो संदेसा
भिजाय रे”
दुपारच्या उन्हामध्ये एकटीच जात्यावर कष्टानं हात फिरवत बसलेली ती. जेलमध्ये
आहे म्हणजे कसल्यातरी गुन्ह्यामध्ये शिक्षा वगैरे झालेलीच. आता आपल्या पराकोटीच्या
दांभिक समाजामध्ये अशा स्त्रीची काय किंमत असणार आहे हे सांगायला हवंच का? तरीही यांत्रिकपणे
ती हे जे लोकगीत म्हणतेय ते वडलांना श्रावणामध्ये माहेरी बोलवायलाच. माझ्या
लहानपणच्या सगळ्या मैत्रीणी जमतील खेळ खेळतील, तेव्हा मला बोलाव असं विनवणारी ही
लेक.
आशाचा आवाज ही एक अत्यंत जीवघेणी चीज आहे हे इथं लगोलग नमूद करून टाकते. लोक
जेव्हा तिच्या आवाजाला खेळकर, खोडकर, सेन्सुअस वगैरे लेबलं लावतात तेव्हा त्यांनी
ही असली रत्नं ऐकलेली नसणार. या गाण्यामध्ये सुरूवातीपासून शेवटपर्यंत तिचा आवाज
असा काही लागलाय... की ज्याचं नाव ते. गोल गोल फिरणार्या जात्यासारखा हा आवाज
तसाच फिरून तिथंच येत राहतो आणि काळीज कापत राहतो. एसडीची ही चाल बरीचशी
लोकगीताच्या चालींजवळ जाणारीच आहे. शैलेंद्रच्या शब्दांमधून प्रसंगामधला सगळा
विरोधाभास प्रतीत होतोय. अख्खं गाणं चित्रित करताना बिमलदांनी खूप कमी (अगदी
जवळजवळ नाहीच म्हणता येतील) अशा हालचाली असलेल्या फ्रेम्स ठेवल्या आहेत. त्या
प्रत्येक फ्रेममधला मोकळेपणा, रखरखीतपणा, एकाकीपणा अंगावर येण्यासारखाच आहे. पडद्यावर
हे गाणं जी मुलगी म्हणतेय तिच्या चेहर्यावर कसलेही भाव नाहीत (म्हणजे कतरीना
कैफचा अभिनय नव्हे!!!) तर अगदीच शुष्क आणि निर्जीव चेहरा घेऊन ती गाणं म्हणतेय.
हात एखाद्या यंत्रासारखे जातावर चालत आहेत, ओठांतून गाणं फुटतंय पण त्या
सर्वांमध्ये तिथलं कुणीही असून नसल्यासारखंच.
अंबुवा तले फिर से झूले पडेंगे रिमझिम पडेंगी
फुहारे
लौटेंगी फिर तेरे आंगन में बाबुल सावन की ठंडी
बहारे
छलके नयन मोरा कसके रे जियरा बचपन की जब याद आये
रे
कधीतरी असंच रेडिओवर लागलेलं हे गाणं ऐकताना अचानक जाणवलं. जाणवलं म्हणजे
काळजाच्या आतपर्यंत घुसलंच. ही बंदिनी म्हणजे केवळ त्या तुरूंगामधली गुन्हेगार
नाही. हे गाणं केवळ “सासरी गेलेल्या मुलीला लागलेली माहेरची ओढ” इतकंच नाही. तर कधीतरी
आयुष्यामध्ये येऊन गेलेल्या त्या वळणावरचं गाणं. प्रत्येकीच्याच आयुष्यामध्ये
थोड्याफार फरकानं हे वळण येतंच. “आता तू लहान राहिली नाहीस” हे ते वळण. आणि याचा
संबंध शारीरिक किंवा हार्मोन्सच्या मॅच्युरीटीशी जोडायची कहीही गरज नाही. कुणीच्या
आयुष्यात अगदी तीन चार वर्षाची असल्यापासून हे ऐकावं लागतंच की. आपल्या समाजाची एक
गंमत असते. पुरूषांनी लहान मुलांसारखं वागलं की त्यांचं फार कौतुक होतं. “आमच्या
यांना की नै अजून दर रविवारी क्रिकेट खेळायची हौस असते” “आमच्या बाब्याला अज्जून
मीच केलेला चहा लागतो हां” आणि हीच वाक्यं बायांच्या बाबतीत म्हणून बघा... लगेचच
व्हॉट्सऍपवर पाठवण्यासारखे ते ढकलविनोद तयार होतील.
बैरन जवानीने छीने खिलौने और मेरी गुडीया चुराई
बाबूल थी मैं तेरे नाजों की पाली फिर क्युं हुयी
मै पराई
बीते रे जुग कोइ चिठीया न पाती ना कोइ नैहर से आये रे
मुलीनं लहान रहायचंच नाही, तिनं मोठं व्हायचं, समजूतदार व्हायचं. अगदी
मनाविरूद्ध झालं तरी मन मारून जगायचंच. कितीवेळा हे आपण आजूबाजूला ऐकत असतो? अशावेळी
लहानपणच्या त्या मुक्त अनिर्बंध जीवनामधल्या असलेल्या थोड्याफार आठवणी म्हणजेच
आयुष्यभराची जपणूक असणार ना? प्रत्येक मुलीला अशीच एक बंदिनी म्हणून तर घडवलं जात
असतं. “तू अश्शीच वागली पाहिजेस, तुझे नियम अस्सेच असले पाहिजेत, तुझं चारित्र्य
असलंच पाहिजे” एक ना दोन अनेक नियम. तुरूंगात मारूनमुटकून जगायला लावायचं आणि वर
त्याच पिंजर्यावर तिनं प्रेमही केलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवायची. केवळ समाजाचे
नियम सांगतात म्हणून पोटच्या पोरीचा गळा चिरणारा बाप असो वा “आता तुझा या घराशी
काहीही संबंध नाही” सांगणारी सख्खी आई असो. रक्ताच्या मायेपेक्षा समाजाच्या या
शृंखला अधिक जड ठरतात. मन मानेल तसं जगू देणारी, निर्णयस्वातंत्र देणारी, झाल्याच्
चुका तर त्यामधून पुढं येऊ देणारी एक समाजव्यवस्था निर्माण करणं आपल्याला अजूनही
शक्य होत नाही? आजही मुलगी असणं म्हणजे आईवडलांच्या मनावरचं दड्पणच का असतं?
प्रत्येक वेळी पडतं घेऊन, प्रत्येक वेळी झुकून दोन पावलं पाठी सरूनच तिनं
जगायचं. स्वत:ला जसं हवं तसं न जगता दुसर्याच्या नियमाप्रमाणं जगायचं. तुरूंगच
असतो की हा सगळा. अख्खं आयुष्य दुसर्याच्या जीवावर ढकलायचं. जन्मठेपच....
असो. आज सकाळी हे गाणं टीव्हीवर लागलं आणि बघता बघता आलेले सगळे विचार लिहत
सुटलेय. कदाचित काही गोष्टी बदलल्या असतील. माझ्या बाबतीत तरी. मला आयुष्यामध्ये प्रत्येक
निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं होतं हे माझं नशीब. तरी आजूबाजूला बघताना अशा
कित्येक बंदिनी आजही दिसतात. त्यांच्या हातापायांतल्या बेड्या आजही खुपतात.
त्यांच्या पंखांमधली उडण्याची भरारी आजही जाणवते.
अशा सर्व बंदिनींना त्यांचं स्वातंत्र्य, त्यांची जीवनोत्सुकता नक्कीच मिळायला
हवी. हो ना?
No comments:
Post a Comment