Thursday, 13 November 2014

दरवाजा (भाग 9)

असिफ त्याच्याकडच्या चावीनं दरवाजा उघडून आत आला. हॉलमधला दिवा लावून हळू आवाजात चालू असलेला टीव्ही बंद केला. माही सोफ्यावर बसल्या बसल्याच झोपलेली होती. टीव्ही बघत असतानाच कधीतरी तिचा डोळा लागलेला असणार. घामानं डबडबलेल्या तिच्या गालांवरून त्यानं हलकेच हात फिरवला, तिची झोप जराशी का होइना पण चाळवलेली बघून लगेच मागे सरकला. तिथंच उभं राहून दोन क्षण तिच्याकडे बघत राहिला.  गेल्या कित्येक दिवसांमध्ये त्यानं पहिल्यांदा तिला इतक्या स्वस्थ निजलेलं पाहिलं होतं. ती परत गाढ झोपलेली बघून त्यानं शॉवर घेतला, किचनमध्ये जाऊन स्वत:चं ताट वाढून तिथंच जेवला, तरी तिला जाग आली नाही. परत तिच्याजवळ आला, तिला दोन्ही हातांवर उचलून नेऊन बेडवर झोपवायचं, पण या अवस्थेमध्ये असं उचलणं सेफ असतं की नाही, या प्रश्नावर त्याची गाडी अडली. शेवटी त्यानं स्वत: झोपायला जायच्या आधी तिला हलकंच जागवलं. “माही, बेडवर झोपतेस का?”


त्याच्या आवाजानं तिची झोप चाळवली. “आलास? किती वाजलेत?” तिनं डोळे चोळत विचारलं. “येऊन अर्धा तास झाला, आणि आता साडेबारा वाजलेत. काही जेवलीस का?” तो तिच्या बाजूला बसत म्हणाला. ती त्याला बिलगून हळूच म्हणाली. “किती उशीर?” 


“झालंच ना, उद्यापासून सुट्टीच...” तिला अजून जवळ घेत तो म्हणाला. 


त्याच्या बोलण्यानं ती व्यवस्थित जागी झाली. त्यासरशी एकदम दूर झाली. तिच्या वागण्यातला हा बदल त्याला जाणवला, “माही, तब्बेत ठिक आहे?” त्यानं परत तितक्याच काळजीनं विचारलं. तिनं काहीही उत्तर दिलं नाही. त्यानं तिच्या केसांतून हात फिरवला. ती अजूनच थोडी मागे सरकली. 


त्यानं उठून त्याच्या तिच्या हातात एक चेक दिला. “डीसूझाचं पेमेंट झालं, बहुतेक सर्व ड्युज क्लीअर झाले. तो आज देत नव्हता, पण मी हटून बसलो. बाऊन्स झालातर कापून काढेन त्याला” 


“बॅंकेत तुलाच टाकावा लागेल. मी घराबाहेर थोडीच जातेय” माही अगदी कोरड्या आवाजात म्हणाली. तिनं चेक घेतला नाही. 


“कमॉन, दरवेळेला देवासमोर वगैरे तूच ठेवतेस ना?” 


“पण तुझा देवावर विश्वास कुठाय? मग कशाला?”


“तुझ्यावर विश्वास आहे, म्हणून.” त्यानं शांतपणं तो चेक परत तिच्या हातात ठेवला. सावकाश उठून ती बेडरूममध्ये आली. “तुला उद्या ऑफिसमध्ये जायचंय का? मी आता रोज ड्रायव्हर म्हणून येऊ शकेन.” तो लगेच तिच्यापाठून येत म्हणाला “आता पूर्णवेळ घरी असेन तर... तुला काही ऑफिसमध्ये मदत..” पण माहीचं त्याच्या बोलण्याकडं लक्ष नव्हतं. “आज रशिदभाईंशी बोललोय. त्यांचा सांताक्रूझमध्ये एक फ़्लॅट रिकामा आहे. थ्री बीएचके आहे, आणि फ़ुल्ली फ़र्निश्ड. तू एकदा येतेस का बघायला?” त्यानं कितीही उसनं अवसान आणून उत्साहानं बोलायचा प्रयत्न केला तरी त्यातला फोलपणा त्यालाच जाणवत होता. आठच दिवसांपूर्वी त्यानं दुसरं घर किमान भाड्यानं का होइना घ्यायचं ठरवलं तेव्हापासून माही त्याच्याशी जास्त बोलत नव्हती. डॉक्टरांच्या मते, माहीनं आता अतिविचार करणं ताण घेणं बंद केलं पाहिजे, पण घडत मात्र त्याच्या उलट होतं. त्यानं कितीही समजावलं तरीही पेच येऊन येऊन परत तिथंच अडत होता. 


बेडवर बसल्याबसल्या तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. पुन्हा एकदा गेल्या महिन्याभरातल्या संभाषणांची त्याला आठवण झाली. आता आज तरी परत हा विषय त्याला नको हवा होता. होता होईतो तिला दुखवायचं नव्हतं. “माही, जगातल्या कुठल्या भाषेमध्ये मी तुझी माफी मागू?” तो तिच्या बाजूला बसत म्हणाला. “प्लीज स्वत:ला इतका त्रास करून घेऊ नकोस. माझं चुकलं हे मी मान्य करतो. मी तुला सांगायला हवं होतं. मी त्या दिवशी रागाच्या भरामध्ये.. मी वागायला नको हवं होतं...!” 


माहीनं काही न बोलता फक्त मान फिरवली. ते पाहून तो पुन्हा एकदा हताश झाला. “माही, ऐक ना! ए माही... प्लीज. माझ्याशी बोल” तो हळूच तिला म्हणाला. “मला माझी चूक सुधारायची संधी तर दे. ऐक, आता मी खरं सांगतो. मी आता मोहितला भेटून आलोय. घरी नव्हे, बाहेर कुठंतरी. जे घडलं होतं ती प्रत्येक गोष्ट त्याला सांगितली. त्याचबरोबर त्याचा संसार विस्कटू नये म्हणून समजावलं. त्याला हे सगळं इतकं अचानक आणि अनपेक्षित होतं... तरी मी स्वत: यामध्ये तिची काहीही चूक नाही हे पटवून दिलं. तो तिला माफ करायला तयार झालाय. किंबहुना त्यानं मनातल्या मनात कधीच माफ केलं होतं. आतातरी तू मला माफ कर. माझ्याच्यानं एवढं करणं शक्य होतं, तेवढंच केलं. पण आता जे घडलंय ते विसर ना. आपल्या भविष्यासाठी.. आपल्या दोघांसाठी.. आपल्या बाळासाठी.. प्लीज!”


“कुठलं भविष्य? कसलं भविष्य? मी आजवर जे काही माझं भविष्य समजत होते ते माझं नव्हतंच..” 


“असं तुला का वाटतंय? गेले कित्येक दिवस मी तुला हेच समजवायचा प्रयत्न करतोय. हे असले फालतू विचार करून तू तुझी काय अवस्था करून घेतलीस ते दिसतंय का तुला? तुझ्या तब्बेतीची इतकी हेळसांड, कामामध्ये लक्ष नाही. पंधरा दिवस झाले तू ऑफिसला गेलेली नाहीस. घरामध्ये बसूनबसून निव्वळ हाच एक विचार चालू आहे. काय मिळणार आहे तुला यामध्ये? माही, मला तुला कायम आनंदी बघायचं आहे. हे असं रडलेलं खचलेलं नाही.”


“मी नक्की काय करू? काही घडलंच नाही असं समजून हसत बसू? आय थिंक, हीच माझ्या लाईफची टॅगलाईन असायला हवी ना? काही घडलंच नाही. माही, तुला कधी विकलं गेलंच नाही. माही, तुझ्यावर कधी बलात्कार झालाच नाही. माही, तू कधी वेश्या नव्हतीच. माही, तुला असिफनं कधी विकत घेतलंच नाही. माही, काही घडलंच नाही... हो ना?”


“हे बघ, तो विषय संपलेला आहे. त्यावर आपण कधीच बोलणार नाही. आपण भूतकाळ बदलू शकत नाही...”
“एक्झॅक्टली, असिफ. आपण भूतकाळ बदलू शकत नाही पण तो विसरू शकतो. मी इतके दिवस विसरले होतेच ना? पण जे तू मला सतत सांगत असतोस तीच गोष्ट तू स्वत:बद्दल का नाही करत?”


“मी ऑलरेडी सगळं सोडून आलोय. इतक्या दिवसामध्ये कधीतरी यावर काही बोललोय. ती समोर... अगदी समोरच्या घरामध्ये रहायला असतानासुद्धा एकदादेखील...”


“एकदादेखील तुला मला त्याबद्दल सांगावंसं वाटलं नाही. तुला ती गोष्ट इतकी महत्त्वाची नव्हती. मान्य आहे. किमान मला सांगता आलं नाही.. ठिक आहे. तेही मान्य. तुला काही नसताना मला हे सर्व सांगायला सहा वर्षं लागली होती. आता ती समोरच असल्यावर तुला सांगणं जमलं नाही. तो तुझा स्वभाव नाही. मी ते मान्य करते. पण खरं सांग. तू खर्‍या अर्थानं तिला विसरलास? जमलं तुला?” 


असिफ उठला. “झोप आता, खूप उशीर झालाय. आपण दोघं या विषयावरती कितीही बोललो तरी तिढा सुटणार नाही. ती काय चीज आहे... साला तिची सावली पडली तरी मी बरबाद होतोय. एवढ्या लांब येऊन, आज काहीही गरज नसताना इतक्या वर्षानंतर तुझ्या आणि माझ्या नात्यामध्ये... तिच्यामुळं दुरावा आलाय..”


“दुरावा तिच्यामुळं आलेला नाही.. तुझ्या कडवटपणानं आलाय. जर तुझ्यासाठी ती इतकी महत्त्वाचीच नव्हती, तर मला तेव्हाच सांगायचं होतंस. माही, समोर राहते ती रेश्मा. एवढे तीन चार शब्द बोलला असतास तर कदाचित मी हसले असते, तुला त्यावरून चिडवलं असतं किंवा तो विषय पूर्ण बंद केला असता. तिच्याशी अजिबात बोलले नसते... काय केलं अस्तं ते माहित नाही, पण हे तू केलं नाहीस. आणि जेव्हा तुला तिचा राग आला तेव्हा तू राग तिच्यावर काढलास. कुठल्या हक्कानं.  म्हणून मला वाईट वाटतंय? आज जे काही सहन करतेय...”


“मी खोटं बोललो, मी लपवलं तर त्यात तू का सहन करतेस तेच मला समजत नाही” असिफ एकदम आवाज चढवत म्हणाला, “काय खुपतंय तुला? सांग एकदा. मी कसलाही आरोप ऐकून घेईन. तू देशील ती शिक्षा भोगेन.. पण तिच्यामुळं माझं आयुष्य परत एकदा नासवणार नाही. तिच्यामुळं तू दूर गेलेली मला चालणार नाही. मला आधीची माही परत हवी. माझ्याशी भांडणारी, माझ्यावर वैतागणारी... माझी माही. मला हे असं तुझं दूरदूर राहणं झेपत नाही. सांग एकदा. आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकूया. काय खुपतंय तुला?”


“असिफ, मला एकच खुपतय...  यु आर स्टिल मॅरीड टू हर.” माही एक एक शब्द स्पष्टपणे उच्चारत म्हणाली. 
ते ऐकताच त्याच्या चेहर्‍यावर परत एकद संताप दाटून आला. “काहीही बोलू नकोस.... त्या गोष्टीला पंधरापेक्षा जास्त वर्षं होऊन गेलीत...”


“तरीही.. तरीही... असिफ, हेच सत्य आहे. कधीतरी स्वत:शी कबूल कर. तू आणि मी लग्नाच्या विषयावरून कितीतरी वेळा वाद घातलेत. तेव्हा तू एकदा मला म्हणाला होतास, की जेव्हा तुमच्या मनाच्या प्रतलावरचा सगळ्यांत मोठा भाग एकाच व्यक्तीच्या विचारांनी व्यापला जातो तेव्हाच खरंतर तुमचं लग्न होतं. कारण ती व्यक्ती तुमच्यासाठी तितकी महत्त्वाची असते”


“तिच्याबद्दल माझ्या मनात काहीही नाही.”


“कसं काहीही नाही? हा प्रचंड मोठा तिरस्कार आहे. संताप आहे. घृणा आहे. असिफ तुझ्या मनाचा इतका मोठा भाग तिनं व्यापून ठेवलाय, की माझ्यासाठी तिथं जागाच नाही. मी इथं एकटीच आहे. मी काय आहे तुझ्यासाठी? तुझी सोय? तुझी सवय? तुझी स्वप्नं पूर्ण करणारं मशिन?मी तुझ्या आयुष्यात आहे पण तुझ्या मनात मी कुठं आहे?”
“माही, तू माझी लाईफ पार्टनर आहेस, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझ्याशिवाय मी आजवर कधीही कुणाचाही विचारसुद्धा केलेला नाही.”


“परत तेच खोटं! सतत असिफ सतत!!! सतत तिचा विचार असतो. जितकं प्रेम तू माझयवर करतोस त्याहून जास्त तिचा द्वेष करतोस. आणि ते मला खुपतंय. तुझ्या आयुष्यामध्ये तिचा विचारदेखील असणं मला खुपतंय. वास्तविक आज तुझ्याइतका यशस्वी माणूस दुसरा नसेल. फिल्म इंडस्ट्रीमधल्या जेन्युइन लोकांची यादी काढली तर त्यात तुझं नाव हमखास येईल. ज्या मुलाकडं एकेकाळी शाळेचं दप्तर आणायला पैसे नव्हते, जो मधल्या सुट्टीमध्ये घरी येऊन जेवायचा कारण त्याच्याकडे एक डबा नव्हता, आज तो असिफशेखर करोडोंची कामं करतोय. हे सगळं त्यानं त्याच्या कर्तृत्त्वावर मिळवलेलं यश आहे. तरीही तू खुश आहेस का? तर नाही. सतत स्वत:ला कसल्यातरी न्युनगंडामध्ये अड्कवून ठेवलं आहेस. मी इथं असायला नको हवा होतो, पण तिच्यामुळं मी आज इथं आलोय. माझ्या प्रत्येक अपयशाला ती जबाबदार आहे हा जप मनामध्ये सतत चालू असतो. तुझ्या यशाचं मोजमाप कधी केलंस? तू स्वत:च्या एकातरी अचिव्हमेंटवर खुश असतोस? इतक्या दिवसांमध्ये कधीतरी “हे मी कमावलं” याचा तुला अभिमान वाटलाय? जितका अभिमान तुला माझ्या शिक्षणाचा वाटतो, माझ्या कामाचा वाटतो तितका तुला स्वत:चा वाटलाय?”


“हा काही प्रश्न आहे का? तू माझ्यापेक्षा जास्त शिकलेली...”


“नाही! “मी” त्यात नाही. वयाच्या १९व्या वर्षी जेव्हा तू मला घेऊन त्या हॉस्टेलमध्ये गेलास, माझी कॉलेज ऍडमिशन केलीस तेव्हा मला इतकी अक्कल आली होती, की इतके दिवस आपलं शरीर विकलं जात होतं. आजपासून आपलं भविष्य विकलं जाणार आहे हे मी तेव्हाच समजून गेले. मी तुझ्यासाठी फक्त एक साधन होते. खूप शिकायचं, प्रतिष्ठित नोकरी मिळवायचं तुझं स्वप्न पूर्ण करणारं. तू जेसिकासाठी काही केलं नाहीस, केलंस ते तुझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी..”


आपण काय ऐकतोय त्यावर असिफचा विश्वास बसेना. इतके दिवस माहीच्या मनातच हे सर्व होतं, की आता तिला हे प्रश्न पडतायत? “मला ते सर्व मान्य आहे. त्यावेळी मला लागलेली रूखरूख दूर करण्यासाठी मी सर्व केलं. पाण्यासारखा पैसा कमावूनसुद्धा समाधान वाटलंच नाही, जितकं समाधान तुझ्या प्रत्येक सेमीस्टरची मार्कलिस्ट हातात आल्यावर वाटलं. पैशानं प्रत्येक गोष्ट तोलता येत नाही, पण  पैशांनी स्वप्नं पूर्ण करता येतात. पण् माझं फक्त  तेच स्व्प्न नव्हतं. जर मी माझ्या लग्नाचं खोटं सर्टिफिकेट बनवून आणू शकत होतो, तर माझ्यासाठी शिक्षणाची वाट्टेल ती सर्टीफिकेट्स बनवता आली असती. मी ते केलं नाही. त्याऐवजी माझं स्वप्न तुझ्यामार्फत पूर्ण केलं, कदाचित माझं तेही वागणं चुकलं असेल. त्याक्षणी त्यावेळेल मला तेवढंच सुचलं. तेव्हा तुझं आणि माझं काय नातं होतं हे मला माहित नव्हतं, विचारही केला नाही. आई गेली, आणि खर्‍या अर्थानं अनाथ झालो तेव्हा तू माझ्यासोबत होतीस.. माही, सोबत चालताना तू माझा आधार बनलीस. कसाही वेड्यासारखा या दुनियेत हरवून गेलो असतो. मला कशाचीच फिकीर नव्हती, काळजी नव्हती... वाहवत गेलो असतो तर स्वत:लासुद्धा सापडलो नसतो. तू माझे पाय घट्ट जमिनीवर बांधून ठेवलेस. माझ्या वेड्यावाकड्या आयुष्यामध्ये तू शिस्त आणलीस. आज मी जे काही आहे, ते तुझ्यामुळे आणि म्हणूनच मला कायम तुझा अभिमान वाटत आलाय. माझं प्रत्येक अपयश माझी कमाई आहे, पण माझं प्रत्येक यश हे तुझ्या सोबतीमुळं शक्य झालंय. तुझं आणि माझं नातं मला स्वत:ला अजून समजलेलं नाही. पण त्या नात्याशिवाय माझं अस्तित्व नाही, हे मात्र खरं. आपण दोघांनीही भूतकाळ विसरायचं ठरवलं होतं ना? मग तरीही परत तेच का उगाळतोय? काय मिळणार यातून?”


“मी परत काहीही उगाळत नाहीये. उलट इतके दिवस सगळं काही विसरून गेले होते. जगाला जे खोटं सांगितलं होतं, की आम्ही सहज भेटलो आणि एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्या खोट्यालाच खरं मानायला लागले होते. या तुझ्या असल्या रानटी वागण्यानं पुन्हा एकदा मनामधल्या जखमा ताज्या झाल्यात. असिफ इतका तिरस्कार कशासाठी? इतके दिवस ज्या गोष्टींचा विचार केलेलाच नव्हता, तो आता करतेय. कदाचित मी कृतघ्न असेन, पण मी माझ्या विचारांशी फारकत घेऊ शकत नाहीये. पहिल्यांदा असिफ, पहिल्यांदा हा प्रश्न विचारतेय. माझं तुझ्यावर प्रेम आहे का?” 


“ते मी कसं सांगणार? तुझं तुला माहित नाही?” त्यानं चिडून विचारलं. 



“तूच सांगायला हवंस, तू माझा मालक आहेस. सगळ्याच अर्थांनी” 


असिफनं पुढं येऊन माहीच्या डोळ्यांमधलं पाणी पुसलं. “असलं बोलत जाऊ नकोस. मी आजवर तसं कधीही मानलेलं नाही. पहिल्या दिवसापासून सांगतोय.” त्याचा आवाज प्रचंड दुखावलेला होता. इतक्या वेळाचा त्याचा संताप निघून गेला होता, त्याऐवजी याक्षणी त्याला काय वाटत होतं तेच त्याला समजेना. 


“म्हणजे, तुझा माझ्यावर काही अधिकार आहे की नाही?” माहीनं तिच्या चेहर्‍यावरचा त्याचा हात दूर करत विचारलं. 


“अधिकार? कसला अधिकार? माही, तू मला जर शब्दांत अडकवणार असशील तर तू जिंकलीस. मला नाही जमत. पण मला काही गोष्टी पक्क्या माहित आहेत. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं आयुष्य जगायला तू स्वतंत्र आहेस. उद्या जर तू उठून म्हणालीस, की मी तुला सोडून जाते. तर मी तुला अडवेन. हमखास, पण माझं प्रेम आहे म्हणून. अधिकार आहे म्हणून नव्हे!”


“उद्या जर मी काही चुकीचं वागले, तुला हर्ट केलं तर... हाच अधिकार म्हणून मला मारशील? लाथा घालशील?” 
“परत तेच. रागाच्या भरात वागलो होतो. चुकलं, त्यासाठी तिनं किंवा तिच्या नवर्‍यानं पोलिस तक्रार केली असती तर मी जेलमध्येसुद्धा गेलो असतो. तिची माफी मागितली, तुझी मागितली. तिचा संसार मोडू नये म्हणून आज माझ्या मनाविरूद्ध जाऊन प्रयत्न केलेत. पण तुझ्या तोंडून असे प्रश्न का येतात? कसं समजावू? तू तिला माफ केलंस, मग मला का नाही? तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही मला माहित नाही पण गेली इतकी वर्षे माझ्यासोबत आहेस... तेव्हा कधीतरी तुला हा प्रश्न पडला? कधीतरी माझं वागणं वावगं वाटलं नाही... मग आजच का?”


“कारण, तेव्हा मी तुला देवघरामध्ये बसवून ओवाळत होते. तुझ्या उपकारांच्या कृतद्न्यतेसाठी स्वत:ला झिजवत होते. पण आता मला त्या चांगल्या असिफच्या चेहर्‍यामागचा हा दाहक चेहरा दिसतोय. आणि मी त्याला घाबरतेय. माझा असिफ मनामध्ये इतकं विष ठेवून माझ्यासोबत जगत होता या विचारानं मी अस्वस्थ होतेय. तुझ्यासारखा माणूस माझ्या नशीबात आला हे माझं भाग्य. तुझे ते उपकार मी कधीही विसरणार नाही. पण या माणसावर मी प्रेम करते का? इतक्या वर्षांपूर्वी  निमिषाचाही अवधी न घेता हो म्हटलं अस्तं. पण आज त्याचं उत्तर नकारार्थी येतंय असिफ. ज्या माणसाच्या मनामध्ये कुणाहीबद्दल इतका पराकोटीचा राग असेल, संताप असेल त्या माणसावर मी कसं प्रेम करू शकते. अशा माणसानं माझ्यावर कितीही प्रेम केलं तरी त्याला काय अर्थ आहे... तो माणूस खर्‍या अर्थानं कधीच कुणावर प्रेम करू शकत नाही. ती भावनाच तो समजून घेऊ शकत नाही. मग आज माझ्या मनात तुझ्याबद्दल जे आहे ते प्रेम आहे की अजून काही? मी तुझ्या लपवून ठेवल्यानं दुखावले नाही. मी घरात नसताना जर तुझे आणि तिचे कसलेही शारीरिक, भावनिक संबंध आले तरीही इतकी दुखावले नसते, जितकी तुझ्या वागण्यानं दुखावली आहे.”



“पण मी माफी मागितली आहे ना? अजून काय करू?”


“माफी मागू नकोस!! आता माफ कर. तिला. तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीला. तुझ्या भूतकाळाला. त्या भूतकाळामधल्या असिफला. आपला दोघांचाही भूतकाळ फार वाईट आहे. पण तो घडून गेलाय, इट्स गॉन. आता त्यावर कुढत बसण्यानं.. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्येचं खापर तिच्यावर फोडल्यानं काहीही हाती लागणार नाही. फक्त माती मिळेल.”


“हे सगळं झालंय. जसं मी तुला सांगितलंय, तसंच मी प्रत्येक गोष्ट विसरलो होतो. इथं रहायला येईपर्यंत... इथं ती समोर आल्यावर.. पहिल्याच दिवशी मला तिला पाहताच इतका संताप आला होता. माझं जीवन बरबाद करून ती सुखात आहे..पण तो भूतकाळ होता, मी त्याकडे कधीच लक्ष दिलं नाही..”


“थांब, तुझं जीवन बरबाद करून? काय बरबाद झालास? आयुष्यात यशस्वी नाहीस का? हो. गेला काही काळ कष्टाचा गेला पण मांजरीला जसं कुठूनही फेकलं तरी ते आपल्या चार पायांवर उभं राहतंच तसं परिस्थितीनं आपल्याला कितीही फेकलं असलं तरी आपण परत उभेच राहिलोय ना? असिफ काय काय आपण सहन करत आलोय? माझ्या कामामध्ये, तुझ्या बिझनेसमध्ये कमी का टक्केटोणपे खाल्ले, जगलोच ना आपण. कदाचित एकेकाळी पाहिलेली स्वप्नं तू पूर्ण केली नसशील. कुणाची होतात? मी शाळेत असताना मला वाटायचं डॉक्टर व्हावं, गावामधेच एक चार पाच बेडचं हॉस्पिटल चालवावं, आमच्या गावात नव्हतं. पण ते शक्य झालं नाही. वेगळंच शिकले. कधी विचार पण केला नव्ह्ता अशा क्षेत्रात आले. मधली चार पाच वर्षं मरणप्राय वेदना भोगत नरकामध्ये खितपत पडले. पण तिथून बाहेरही आले. पुढे आज यशस्वी झालेच. काय बिघडलं? हाच विचार तू तुझ्याबाबतीत का करू शकत नाहीस? तुला इंजीनीअर व्हायचं होतं, त्याऐवजी सेट डीझायनर झालास. पण काम मनासारखं करतो आहेस ना? कुणाला लबाड्या करून कसली बेकायदेशीर कामं करून तर जगत नाही. कुणाच्या फेकलेल्या तुकड्यांकडे लाचारीनं बघत नाहीस.... मग तुला तुझ्याच या जगण्याचा इतका तिटकारा का आहे? प्रत्येक वेळेला स्वत:ला इतकं खालच्या दर्जाचं का समजतोस?”


“माही, माझ्या लहानपणी...”


“खड्ड्यात गेलं ते लहानपण.” माही त्वेषानं ओरडली. इतक्या दिवसांत पहिल्यांदा त्यानं तिचा इतका संतापी आवाज ऐकला होता. “फार कौतुकं झाली. कष्टात गेलं. वडील नव्ह्ते. आईची काळजी होती. गावामध्ये दहशत होती. पण ते संपलंय. इट्स ओव्हर. आता त्यातून बाहेर ये. तिला विसर. तिला माफ कर. बी अ बिगर मॅन आणि पुढे चालत ये. ज्या क्षणी तुझ्या मनामधून हा सगळा विखारीपणा बाहेर पडेल ना... त्या दिवशी तुला जाणवेल की तुझं आयुष्य किती सुंदर आहे”


“माही, तू माझ्या आयुष्यात आहेच तर हे सुंदरच आहे. पण तिला माफ करणं एवढं सोपं नाहीये”


“माफ करणं किती कठीण आहे किती सोपं आहे ते मला सांगू नकोस. माझ्या सावत्र आईनं मला पैशांसाठी विकलं होतं. त्याच बाईच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी मी लाखो रूपये खर्च करतेय. कशासाठी मी तिला माफ केलं? ज्या दिवशी माझ्या आयुष्यात असिफ शेखर आला, मला नको असलेल्या त्या नरकातून मला बाहेर घेऊन आला. ज्या दिवशी त्यानं माझा हात पकडून मला तू माझी लाईफ पार्टनर आहेस हे सांगितलं त्या दिवशी मी तिला माफ केलं. कारण ज्या गोष्टीसाठी माझा तिच्यावर राग होता, ते कारणच माझ्या आयुष्यातून निघून गेलं होतं. मग मी माझ्या मनामध्ये तिच्याविषयी घाण का ठेवू?”


“प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही. तुझ्याइतकं माझं निर्मळ मन कधीच होणं शक्य नाही... पण तरीही... मी प्रयत्न करेन”


“नाही, गेली पंधरा वर्षं प्रयत्नच करतोस. आज मला तुझ्या नजरेमधला हा शिळेपणा, हा विषारीपणा निघून गेलेला बघायचाय. कधीतरी एकदा तिच्या नजरेकडे बघ. किती शांत आणि समाधानी आहे. तिचंही चुकलं ती खोटं बोलली. तुझ्याशीच नव्हे तर नवर्‍याशी, माझ्याशी, किंबहुना प्रत्येकाशीच. तरीही ती कायम स्वत:शी प्रामाणिक आहे. स्वत:च्या भावनांशी प्रामाणिक आहे. अजूनही तुझी आसक्ती आहे, हे तिला माहित आहे. त्याचवेळेला तिला तू कितीही हवा झालास तरीही तिचं पाऊल वाकडं पडणारच नाही याची तिला खात्री आहे. नवर्‍याशी खोटं बोलली म्हणून वाईट वाटतंय, पण सत्य सांगायची आपल्यात हिंमत नव्हती हेही तिला माहित आहे. तिच्याइतका नाही, पण थोडातरी स्वत:शी प्रामाणिक हो. तिच्याबद्दल मनातल्या पराकोटीच्या भावना आहेत.. ते स्वत:शी कबूल कर. मला जेव्हा तिनं सांगितलं ना, की माझ्या मनामध्ये असिफ कायम असतो... मी प्रत्येक क्षणी  त्याचा विचार करते, तेव्हा मला बिल्कुल आश्चर्य वाटलं नाही. उलट एक गोष्ट तीव्रतेनं जाणवली, गेली सतरा अठरावर्शं असिफ पण तेच करतोय. फरक इतकाच की तिनं भूतकाळाला प्रेम समजून मिठी मारली आहे, आणि तू भूतकाळाशी दुष्मनी घेऊन बसला आहेस.”  


“माही, प्लीज विषय बास. मला आता यावर काही बोलायचं नाही. स्पष्ट सांगतो, मी तिला माफ करू शकत नाही. करणारही नाही. ती तुझ्याशी कितीही चांगली वागली तरीही.. माझ्या मनात तिच्याबद्दल काहीही असलं तरी त्यानं तुला फरक पडू देऊ नकोस. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तू माझ्यासोबत हवीस. आपलं एकत्र असणं हवंय. मला आपल्या बाळासाठी आई आणि वडील दोघंही हवेत. प्लीज, माझ्यावर तेवढे उपकार कर.” 

एवढं बोलून तो उठून हॉलमध्ये निघून गेला. टेबलावर ठेवलेलं कसलंसं पुस्तक उघडून बसला. ते पुस्तक मराठी आहे की तमिळ हेसुद्धा त्याच्या डोक्यांत शिरत नव्हतं, तरी त्या पांढर्‍यावर उमटलेल्या काळ्या अक्षरांकडे बघत राहिला. शी हॅज डन इट अगेन, तो स्वत:शीच पुटपुटला. अगदी विनासायासपणे काहीही न चुकता तिनं एकाच क्षणामध्ये त्याचं भावविश्व परत उधळून लावलं होतं. इतके दिवस त्यानं माहीसोबतचं नातं नाजुकपणे जपलं होतं.. या नात्याला कुणीही समजून घेणं शक्यच नव्हतं. त्यानं अपेक्षाही केली नव्हती, सुरूवातीला प्रत्येक जण हसला होता, मस्करी उडवली होती. पहिल्यांदा रशीदभाईला तिला घरी घेऊन यायचा निर्णय सांगितला तेव्हा तो कितीतरी चिडला होता. “पैर की जूती पैर मे, सर की टोपी सरपे” तीनतीनदा हेच सांगत राहिला. तसंही त्याच्या मनात कित्येक दिवसापासून असिफला जावई करून घ्यायचं होतंच. पण असिफ त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. नंतर खूप वर्षांनी माहीला भेटल्यावर रशीदभाई खुश झाला. हीच ती पैर की जूती हेसुद्धा तो विसरून गेला. पुढं माहीनं आयटी सर्व्हिसचं ऑफिस टाकलं तेव्हा स्वत: हून आर्थिक मदतीला तयार झाला. ओळखीच्या प्रत्येकाला असिफ आणि माही एकमेकांसाठी किती योग्य आहेत हे सांगत राहिला. त्या दिवशी पार्टीमध्ये जेसिकासोबत वाट्टेल ते करणारे लोकंच नंतर तिला “भाभीजी” म्हणून आदर द्यायला लागले. पाठीमागून अश्लील कमेंट्स मारत असतील, पण असिफसमोर कधीच नाही. या लोकांना त्याच्या मनातल्या भावनेची कदर होती, ती कदर जी या समोरच्या बाईकडून कधीच झाली नाही. वर्षभर खपून एखादं चित्र रंगवावं आणि कुणीतरी ते कात्रीनं टराटरा फाडून टाकावं, तसंच हेसुद्धा. त्यानं इतक्या नेटानं जपलेलं त्याचं नातं असं कणाकणाला दूर जाताना दिसत होतं. 

त्यानं प्रत्येक वेळी माहीच्या भावनांचा विचार केला होता, तिला सोबत रहायला विचारलं तेव्हाही “तुला यायचं असेल तर...” हे सांगूनच. ती नाही म्हणाली असती तर तसंच मागे फिरून तिच्या आयुष्यामधून कायमचा बाहेर पडला असता, पण ती सोबत आली. नुसतीच आली नाहीतर त्याच्या हातात हात देऊन चालत राहिली. कुठल्या शब्दांमध्ये तो हे नातं तोलू शकणार होता. माहीच्या हुशारीचा, तिच्या मेहनतीचा, तिनं आजवर मिळवलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान तो तिलाच कसा समजावणार होता? माहीनं आज केवळ त्याला “माझं तुझ्यावर प्रेम आहे का?” या गोष्टीला नकारार्थी  उत्तर येतंय एवढंच सांगितलं नव्हतं, कुठंतरी त्याच्या जगण्याच्या आशेची दोर कापली होती. 
त्याच्या मनामध्ये कामाविषयी, त्याच्या सामाजिक दर्जाविषयी न्यूनगंड कधीच नव्हता. होता तर तो केवळ एक प्रश्न. कशासाठी? आपण एवढं सगळं कशासाठी करतोय? जगण्यसाठी त्याला इतक्या पैशांची गरज नव्हती. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी इतकं धावायची गरज नव्ह्ती. तरीही हे सगळं आपण कशासाठी केलं? माहीसाठी! केवळ तिच्यासाठी. 


अचानक त्याला आपण खूप दमलोय, थकलोय असं वाटायला लागलं. हातातलं पुस्तक धरण्याइतकं पण त्राण राहिलं नाही, पुस्तक पडल्यावर त्यानं टेबलावर डोकं ठेवलं. नजरेसमोर परत एकदा त्या रेश्माचा चेहरा आला. प्रचंड मोठ्या कष्टानं त्यानं तो चेहरा दूर सारला. आता त्याला तिच्याबद्दल विचार करायचा नव्हता. माहीच्या आणि त्याच्या नात्यामधला गुंता सोडवणं फार गरजेचं होतं. तिच्याइतकं महत्त्वाचं कुणीच नव्हतं. “तुला माझ्या आयुष्यात काहीही किंमत नाही” तो  स्वत:शीच म्हटल्यासारखा तिला म्हणाला. 

“पण तिला विसरूसुद्धा शकत नाहीस” माहीचा आवाज आला. त्यानं नजर वर करून पाहिलं. अख्खा फ्लॅट अंधारामध्ये बुडालेला होता. थोडंसं पुढे वाकून त्यानं बेडरूममध्ये झोपलेल्या माहीकडे पाहिलं. ती शांत गाढ झोपेत होती. भिंतीवरचं घड्याळ पहाटेचे साडेचार वाजल्याचं सांगत होतं. म्हणजे एवढा वेळ इथंच त्याचा डोळा लागलेला असणार, पण तो झोपला नव्हता हे निश्चित. बाथरूममध्ये जाऊन त्यानं चेहर्‍यावर पाण्याचे हपकारे मारले. डोळ्यांतली जळजळ तरी थांबली नाही. आरश्यात त्यानं स्वत:चाच चेहरा पाहिला. खूप वर्षांनी पाहत असल्यासारखा निरखून. आपणच आपल्याला ओळखू येत नाहीये हे जाणवून परत अस्वस्थ झाला. नक्की कधी हरवलास? त्यानं आरश्यामधल्या प्रतिबिंबाला विचारलं. उत्तर दोघांकडंही नव्हतं. 


काहीच न सुचल्यासारखा तो परत बेडरूममध्ये आला. माहीच्या बाजूला बसून त्यानं तिच्या पोटावरून हात फिरवला. “इथं आतमध्ये नवीन तरारून येणार्‍या जीवनाचा एक अंश आहे.. आणि इथं बाहेर एका सडून गेलेल्या नात्याचं ओझं बाळगणारा एक वेडा” त्यानं माहीच्या गालांवर त्याचे ओठ टेकवले. पुन्हा एकदा तिच्या शांत चेहर्‍यावर पसरलेली ती स्निग्धता तो बघत राहिला.. “कसं जमलं माही तुला? कुणाहीबद्दल.. अगदी ज्या बाईनं तुला विकलं होतं, तिलासुद्धा माफ करणं कसं जमलं? कुठून आणतेस ती शक्ती...” 


तो असाच चौदा पंधरा वर्षाचा असेल. आरती एकदा त्याला घेऊन गावाजवळच्या कुठल्यातरी देवळांत गेली होती. त्याला जायचं नव्हतं, पण तिनं दोन तीन महिने खूप हट्ट केला, म्हणून तो घेऊन आला होता. एस्टीमधून उतरायचं आणि मग चालत तासभर. जंगलामधलं देवीचं देऊळ. तिचं नावसुद्धा कदाचित आसपास कुणाला माहित नसणार. “इथं आसपास झाडं जळाल्याचा वास येतोय, वणवा पेटलाय, परत जाऊ या.” तो वाटेमध्ये चालताना तिला सांगत होता. पण तिचं त्या पायवाटेवरून चालताना लक्षच नव्हतं. “पाऊस येईल” मध्येच कधीतरी ती एकदा  म्हणाली. 

आडरानात एकाकी असलेलं ते देऊळ. केव्हातरी असंच पडून झडून गेलेलं. आतमध्ये कसल्यातरी देवीचा तांदळा. वर्षानुवर्षं कुणीही पूजा न केलेला. तिनं मात्र पद्धतशीर रीत्या बसून देवीची ओटी भरली, निरांजन लावलं, अगरबत्त्ती लावली, त्याच्या हातात तिनं दिलेला नारळ त्यानं देवीसमोर फोडला. त्याचा मुळातलाच अबोलपणा हल्ली खूपच वाढला होता. इतका की त्याला व्यवस्थितेपणे न ओळखणारे लोक “मौना” समजायला लागले होते. आताही तो एकही शब्द न बोलता देवळांतून बाहेर आला, आणि परतीच्या वाटेवर चालू लागला. 


“इथं थोडावेळ थांब” आरती सहजपणे म्हणाली. तिची नजर आजूबाजूला भिरभिरत फिरली. “ही शेखरची फार आवडती जागा होती. आम्ही दोघं लग्नाआधी इथंच भेटायचो” तो हसला. आरती फार क्वचित त्याच्या वडलांविषयी बोलायची, पण जेव्हा बोलायची तेव्हा ते ऐकायला त्याला फार आवडायचं. गावामध्ये फारसं कुणी त्याला शेखरविषयी बोलताना दिसायचं नाही. गावच्या सध्या असलेल्या मालकांची दहशतच तेवढी होती. लहान असताना “तुझ्या आईला तुझा बाप असिफ की शेखर ते माहित नव्हतं, म्हणून तिनं दोन्ही बापांची नावं तुला दिली” असल्या विनोदांमधूनच त्याला बाप भेटत गेला होता. आता थोडं समजायला लागल्यावर तो फार भला माणूस होता, इथपासून ते त्यानं गावासाठी प्राण दिले वगैरे बरंच काही ऐकत गेला. पण तरीही “आपले वडील कसे होते” हे त्याला आजवर कधीही कळलं नव्हतं. देवळाच्या आसपास कुठंतरी दूरवरून धुमसणार्‍या ज्वालेचा वास येत राहिला, पण आता त्याला त्याची अजिबात तमा नव्हती. आरती पुढं कितीतरी वेळ बोलत राहिली. शेखरच्या गप्पा, शेखरचं वागणं, शेखरच्या डोक्यामधल्या वेगवेगळ्या कल्पना त्याला सांगत राहिली. आज ती कदाचित वेडी आरती नव्ह्ती. मनाच्या कोपर्‍यामधे कुठंतरी तिनं स्वत:च्या हातानं पुरून टाकलेली ही आरती आज परत जिवंत झाली होती. या आरतीच्या विश्वामधला शेखर अजून जिवंत होता. गावाच्या भल्यासाठी काहीबाही योजना बनवणारा शेखर तिथं अजून जगत होता. तिच्यासारख्या उच्च जातीमधल्या मुलीनं त्याच्याबरोबर संसार करून आयुष्याचं वाटोळ करू नये, म्हणून तिला समजावून परत फिरणारा शेखर आणि तरीही हट्टानं, निग्रहानं त्याचाच हात धरून सोबत चालणारी आरती. स्वत:च्या घरामध्ये कसल्याही सुखाची कमतरता नसलेली आरती शेखरच्या झोपडीमध्ये येऊन चुलीसाठी लाकडं फोडायला शिकली. त्याच्याबरोबर पंचक्रोशीमध्ये फिरून चार लोकांशी बोलायला शिकली. त्याच्या प्रत्येक स्वप्नाला तिनं नुसतं तिच्या नजरेमध्ये पाहिलंच नाही तर, त्या स्वप्नपूर्तीसाठी झटायला शिकली. बॅंकेमध्ये नोकरी करणारी ती, आणि एकही पैसा न  कमावता केवळ समाजसेवेचा ध्यास घेतलेला तो. हा संसारच जगावेगळा होता. तरीही तिनं निभावला होता. “इथं दर आठवड्याला आम्ही चालत यायचो, आणि मध्यरात्र होइपर्यंत गप्पा मारायचो. गप्पा नाहीच, आमचे वादविवाद जास्त. एरवी शेखरला माझ्याकडं बघायलासुद्धा फुरसत नसायची. पण इथं आला की तो वेळ फक्त माझा आणि त्याचा. आम्ही खूप ठरवलं होतं, आपल्याला एकच मुलगी हवी. तिला खूप शिकवायचं. स्वत:च्या पायावर उभं करायचं... मी जे नाव सुचवायचे ते त्याला आवडायचं नाही. आणि तो तर बाराखडीमधली वाट्टेल ती अक्षरं घेऊन नाव बनवायचा.... काहीही मनात येईल ते. मग आमची भांडणं व्हायची. त्याला धार्मिक अर्थ असलेलं संस्कृत नाव नको हवं होतं, आणि मला नाव अर्थपूर्ण, काहीतरी सांगणारं असं हवं होतं.” आरती बोलत राहिली. “आम्ही असे भांडायला लागलो की त्याचा बेस्ट फ्रेण्ड असिफ खूप हसायचा, म्हणायचा बघ आरती, तुला मुलगाच होणार.”


तिचं बोलणं ऐकत असताना त्याच्या डोळ्यांमधून पाणी कधी आलं ते समजलंच नाही. “असिफचंच म्हणणं खरं ठरलं. जेव्हा बर्थ सर्टिफीकेट्वर तुझं नाव घालायची वेळ आली तेव्हा तो आणि शेखर दोघंही आसपास नव्हते. अन्यथा मी त्यांना चिडवून दाखवलं असतं की पाहिलंत, हे मी आधीच ठरवलं होतं. मला मुलगा झाला तर मी त्याचं नाव असिफच ठेवणार होते. असिफ... कसलंही धार्मिक अर्थ नाही. संस्कृत तर बिलकुल नाही. आणि अर्थ... माझ्या मुलाच्या नावाचा अर्थच मुळात क्षमा आहे.”


ती बोलत असतानाच अचानक मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तिचा हात धरून तो धावत देवळामध्ये आला. मागे जंगलात कुठंतरी पेटलेला वणवा आता शांत होणार होता. देवीच्या समोर पेटवलेलं निरांजन मात्र एकटक मंद प्रकाशात तेवत होतं. कितीतरी वेळ तो त्या निरांजनाकडं बघत राहिला. माहीच्या नजरेसारखंच दिसणारं ते निरांजन. अंधार्‍या जागी असतानाच त्याची ज्योत किती शक्तीमान आहे ते समजतं. तो निर्मळपणा, निखळपणा, त्याच्या अस्तित्त्वामध्ये तिचं अस्तित्त्व विरघळून जाणं. या नात्याचं बदललेलं प्रत्येक रूप तिच्यासाठी अनपेक्षित होतं, हवंहवंसं वाटणारं होतं. पण मग तरीही तिला सतत डाचत राहणारं असं काहीतरी होतंच या नात्यामध्ये. नक्की काय होतं!!! काय खुपतंय तुझ्या मनामध्ये? त्यानं परत एकदा विचारलं. देवळामधलं निरांजन त्याच्याकडे बघून केवळ हसलं. 

कसल्यातरी तिरीमिरीत तो उठला.  त्याच्या स्टडीरूममध्ये येऊन त्यानं दिसेल तो कॅनव्हास पुढं ओढला. बाजूला पडलेल्या रंगांच्या ट्युब हातात घेतल्या. समोर लालपिवळ्याकेशरी रंगांमध्ये वणवा पेटलेला होता. त्यानं रंग हातावर घेतला, आणि खसाखसा त्या कॅनव्हासवर माखायला सुरूवात केली.  पेटलेल्या वणव्यावर हिरव्यानिळ्या रंगांचा पाऊस बरसायला सुरूवात झाली होती.  

(समाप्त) 

No comments:

Post a Comment