Tuesday, 11 November 2014

बाप

छोटासाच प्रसंग.. प्रसंग पण नव्हे दृश्य.

गौरी गणपती आले की कोकणात चाकरमानी कसे निघतात हे काय सांगायला हवं? रेल्वे, प्रायव्हेट गाड्या, एस्टी सर्व सर्व अगदी भरून तुडुंब वाहत असतात. त्यातून यंदा गणपती आले रविवारी. म्हणजे ज्याना सुट्टी मिळत नाही असा देखील गावाला जायला निघाला.

गणपती येतात गावच्या घरी आणि खरेदी असते ती मात्र मुंबईत. मग थर्माकोलचे मखर, वेगवेगळे लाईट्स आणि असंच काही ना काही सजावटीचं सामान. चाकरमान्याची शान काही वेगळीच असते. त्याला देण्यासाठी म्हणून त्याची आई, काकी, वहिनी वेगवेगळे पदार्थ करून ठेवते. आणि त्याच्या येण्याकडे अख्खं घर वाट बघत असतं.

आम्ही खेडला गणपतीला शनिवारी जायला निघालो. रीझर्वेशन केलेले नव्हते. त्यामुळे आयत्या वेळेला कुठल्याच बसमधे आम्हाला चढता येइना. मग आम्ही वाशी ते पनवेल. पनवेल ते पेण. पेण ते महाड, महाड ते पोलादपूर आणि पोलादपूर ते खेड अशा गाड्या बदलत बदलत प्रवास केला. (गंमत म्हणजे पोलादपूरला आम्ही पकडली ती मुंबई खेड एस्टी.)

पूर्ण प्रवासात पाऊस कुठेच मिळाला नाही. पण कशेडी घाट सोडल्यावर मात्र तूफान पाऊस. रात्र पण होत आली होती. गाडी घाट उतरल्यावर प्रत्येक स्टॉपवर थांबायला लागली. पेंगुळल्या डोळ्यानी पण उत्साहानी चाकरमानी उतरायला लागले. बोरघर कशेडी अशी छोटी छोटी गावं लागत होती

अशाच कुठल्या तरी एका स्टॉपला गाडी थांबली. खेड अवघ्या पंधरा मिनिटावर आलं होतं. बाहेर एक म्हातारा उभा होता. एंशीच्या आसपास वय, अर्धवट पडलेलं टक्कल, सर्वच दाताचा झालेला "अण्णू गोगट्या" आणि हिरवट मिचमिचे डोळे. अंगावर एक फाटका बनियन आणि धोतर. हातात एक काठी आणि एक बॅटरी.

गाडी थांबल्या थांबल्या त्याची नजर दाराकडे वळली. उतरणारे उतरले. पण त्याची ती नजर तशीच. डोळ्यामधली ती प्रतिक्षा तशीच. किती वेळ उभा होता तो कुणास ठाऊक? अजून किती वेळ थांबला असता कुणास ठाऊक. पाऊस कोसळतच होता. आणि तरीपण म्हातारा हातातली बॅटरी घेऊन उभाच होता.
वाट बघत!!

बहुतेक कुणाचा तरी बाप असावा तो!! हो ना?

No comments:

Post a Comment