दारावरची बेल तीनचारदा वाजल्यावर रेश्मानं उठून दरवाजा उघडला. बाहेर उभी असलेल्या माहीकडं बघून ती एकदम चमकली. “आत ये ना” ती कशीबशी म्हणाली.
माही आतमध्ये येऊन खुर्चीवर बसली. “बरं वाटतंय?” रेश्मानं विचारलं. माहीनं फक्त मान हलवली.
“तुला बेडरेस्ट सांगितली ना? हा चेहरा काय झालाय? काही खाल्लंस?” तिनं परत एकदा विचारलं.
“काहीच जात नाहीये.. गेले तीन दिवस.. डॉक्टरकडे जाऊन एक सलाईन लावलं.. पण तरीही..” माही थकल्या आवाजात म्हणाली. रेश्मानं पुढं येऊन माहीचा हात हातात घेतला. “आताच अशी सुकलीस तर कसं चालेल? अजून पुढचं निभवायचं आहे... थोडी दालखिचडी देऊ तुला? खाशील?”
“खरंच, मला काहीच खावंसं वाटत नाहीये. जबरदस्त नॉशिया... अगदी विचार केला तरी मळमळतं. जीव नकोसा झालाय...”
“मी गरम करून आणते. जितकं जाईल तितकं खा. उलटी झालीच तर आपण निस्तरू. उपाशीच राहिली तर कसं चालेल..” बोलत रेश्मा किचनच्या दारापर्यंत गेली. पण अचानक वाटेत थांबली आणि मागे वळून म्हणाली.
“माझ्या... माझ्या हातचं चालेल ना तुला?” ते ऐकताच माहीच्या डोळ्यांतून पाणी आलं. “असं मी कधी म्हणेन तरी का?” ती कशीबशी बोलली. “मला खिचडी वगैरे नको. तुम्ही कायम बनवता तसा दहीभात करून द्याल? अगदी थोडासा. मी खाईन”
“माझ्या... माझ्या हातचं चालेल ना तुला?” ते ऐकताच माहीच्या डोळ्यांतून पाणी आलं. “असं मी कधी म्हणेन तरी का?” ती कशीबशी बोलली. “मला खिचडी वगैरे नको. तुम्ही कायम बनवता तसा दहीभात करून द्याल? अगदी थोडासा. मी खाईन”
रेश्मा हसली. “करते. तू इथं पडतेस का? बेडरेस्ट आहे ना?”
“नाही. बसते थोडावेळ. गेले पंधरा दिवस घरातच आहे. त्यामुळे फार कंटाळलेय.” रेश्मानं फ्रीझमधून दही दूध बाहेर काढलं. “चैत्रा अश्विन दिसले नाहीत?”
“ वन्संकडे सोडलय. चैत्राची परीक्षा चालू आहे. नववीचं वर्ष. उगाच घरामधले प्रॉब्लेम्स..” रेश्मा कूकरमधला भात चमच्यानं काढताना अचानक थांबली.
“आणि मोहितदादा?”
“बॅंकेत गेलेत. संध्याकाळी येतीलच” रेश्मानं विषय संपवला. माहीपण गप्प बसली.
किचनमधून मोहरी तडतडल्याचा आवाज आल्यावर माहीला वाटलं, परत तो जबरदस्त नॉशियाचा त्रास होणार. ती पुढं काही बोलणार इतक्यात त्या फोडणीत हिंग पडल्याचा खमंग वास आला, आणि माहीला इतक्या दिवसांनी भुकेची जाणीव आली. खुर्चीवर डोकं मागे टेकवून तिनं डोळे बंद केले आणि तो घरभर पसरलेला वास श्वासानं ओढून घेतला. असिफ तिला जे आवडेल ते बनवत होता, बाहेरून मागवत होता, पण गेले पंधरा दिवस काहीही खायची इच्छा होत नव्हतीच. समोर अन्न दिसलं तरी मळमळायचं, तोंडातला घास तसाच फिरायचा. तिला दर दोन दिवसांनी डॉक्टरकडं घेऊन जात होता. तिची मनस्थिती सुधारावी म्हणून त्याच्यापरीनं कायकाय करत रहायचा.
रेश्मानं तिच्यासमोर एका छोट्या ताटलीत दहीभात ठेवला. “मुद्दाम कमी दिलाय हां, कधीकधी ना भरलं ताट बघितलं की जास्त त्रास होतो.. मला अश्विनच्या वेळेला तसं व्हायचं. मग आई असं तीन चार घासाचं खायला द्यायची...”
माहीनं एक घास खाल्ला. “तुम्ही किती छान बनवता हो.. मला तुमच्यासारखं असं कधीच बनवता यायचं नाही” ती म्हणाली.
“मागच्यावेळी काय सांगितलं तुला? सरावाचा प्रश्न असतो.. बाकी काही नाही” माही शांतपणे ताटलीतला दहीभात खात राहिली. “अजून देऊ?” रेश्मानं विचारलं. माहीनं नको म्हणून सांगितलं. “मी जाताना घरी घेऊन जाईन. रात्री भूक लागली तर खाईन”
“कशाला? जेव्हा भूक लागेल तेव्हा मी ताजं बनवून देत जाईन. तुला काय खावंसंप्यावंसं वाटतंय ते मला बिनधास्त सांग. तुझ्यासाठी मला कुणी काही बोललं तरी ऐकून घेईन, पण तुझे असे हाल झालेले मला बघवणार नाहीत.. मी कितीही वाईट आणि खोटारडी असले तरी दुष्ट नक्कीच नाही.” रेश्मा डोळ्यांतलं पाणी पुसत म्हणाली.
माही क्षणभर गप्प बसली. मग नंतर हळू आवाजात तिनं विचारलं. “मोहितदादा नीट वागतायत ना?”
“ते बोलतच नाहीत माझ्याशी. गेले पंधरा दिवस... एक अक्षरदेखील नाही. मी सगळं खरं काय ते सांगितलं. आता खोटं बोलून काय उपयोग? त्यांनी ऐकून घेतलं. मुलांना बहिणीकडे सोडून आले. रवीदादाला बहुतेक फोन केला होता. तो इकडे यायचं म्हणत होता तर त्यांनीच नको म्हणून सांगितलं. मला काहीच म्हणत नाहीत. रवीदादा येणार म्हणजे गावातले गुंड घेऊन यांनाच धमकावणार, म्हणून भिती वाटत होती. आईला फोन केला आणि सर्व नीट झालं म्हणून सांगितलं.”
“आय ऍम सॉरी. मी खरंतर आधीच येणार होते. पण असिफ कायम घरातच. चोवीस तास नजरकैदेत पडल्यासारखं झालं होतं. आज जरा कुठं बाहेर गेलाय म्हणून मी आले. त्या दिवशी असिफ जे काही वागला, त्यासाठी मी... मी त्याला माफ नाही करणार. माझ्यासमोर तो लाख वेळा सॉरी म्हणाला असेल... पण तरी नाहीच.”
“आताच नाही, आधीपासूनच त्याचा स्वभाव थोडासा असाच आहे. खूप शांत आहे असं वाटतं, पण ज्वालामुखी एकदा भडकला की काय खरं नाही! माही, मी माझ्या दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगते.... मी तुझ्याबद्दल कुणासमोरही काही बोलले नाही. मला कधीच..”
“मला माहित आहे. ही चर्चा गीतानं चालू केली. तिनं माझं आणि असिफचं काहीतरी बोलणं ऐकलं होतं- मी मध्यंतरी त्याच्याशी खूप भांडले होते तेव्हा, त्याचा हवा तसा अर्थ लावला आणि सर्वांना सांगितलं. मी परवा तिला असिफसमोरच चांगलंच खडसावलं तेव्हा कुठे कबूल झाली. तुम्ही माझ्याविषयी काही बोलणर नाहीत हे मला माहित आहे... अन्यथा मी तुम्हाला काही सांगितलंच नसतं ना? तेवढा तुमच्यावर विश्वास आहे.”
“एवढा विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद...” रेश्मा माहीच्या समोरची ताटली उचलत म्हणाली. “सरबत घेशील?”
“नको. खरंच... मीरावहिनी, मी एकदा मोहितदादांशी बोलू? त्यांचा जो काही राग आहे तो...”
“नको. खरंच... मीरावहिनी, मी एकदा मोहितदादांशी बोलू? त्यांचा जो काही राग आहे तो...”
“तो राग संताप मला पूर्णपणे मान्य आहे. तू बोलून काय फायदा आहे, सांग? माझं चुकलंय. गेली पंधरा वर्षं चुकत होतं हे मला माहितच आहे. मी त्यांच्याशी खोटं बोलायला नको हवं होतं. तेव्हाच खरं काय ते सांगितलं असतं तर... तर कदाचित जे आज घडतंय तेच तेव्हाही घडलं असतं. आताही मला माहेरी पाठवायचा विचार चालू आहेच. तेव्हाच पाठवलं असतं. अताही मी फसवणारी, कुल्टा, नालायक बाई ठरलेच आहे. तेव्हाही ठरले असते. कशासाठी मी हे लपवून ठेवलं तेच समजत नाही. ते जे काही देतील ती शिक्षा मला कबूल असेल. घर सोडून जा म्हणाले तर एका क्षणाचाही विलंब न करता बाहेर पडेन. जीव दे म्हणाले तर तेही करेन... पण आता खरंच बास झालं हे दुहेरी आयुष्य. आता मी काहीही न लपवता काहीही खोटं न बोलता स्पष्टपणे स्वत:शीच आणि जगाशी कबूल करून टाकते. माझं असिफवर प्रेम आहे. मला असिफ हवा आहे. हे म्हटल्यामुळं, असं वागल्यामुळं जर मी वाईट ठरत असेन, मी नालायक ठरत असेल तर तेच ठिक. तसंही मी इतके दिवस जगापासून लपवून ठेवलं तरी काय झालं ते तू पाहिलंस...”
“मीरावहीनी, त्याचा खरंच असा गैरसमज झाला होता की....”
“गैरसमज नाही. माही, त्याला ठाम विश्वास होता की मीच तुमच्यामध्ये येतेय. मीच व्हिलन असणार याची त्याला जबरदस्त खात्री होती. तू घर सोडून गेली होतीस तेव्हा मी त्याला भेटले, माझ्या मनांत काय आहे ते स्पष्ट सांगितलं, तर मला म्हणाला की, मला फक्त ईझी वे हवा असतो. मग काय करायला हवं होतं? तरूणपणाच्या उंबरठ्यावर तो मला आवडला. आजही आवडतो. मला तो हवा झाला. आजही हवा आहे. माझ्या मनामध्ये ही इच्छा असणं म्हणजे मीच वाईट आहे. मीच व्यभिचारी आहे..”
“असं कुणीह्च म्हटलेलं नाही.... पण तुम्ही ही गोष्ट मला आधी का नाही सांगितलीत? इतके दिवस आपण बोलतोय, मी तुम्हाला खरं सांगितल्यावर... तेव्हा तरी काय ते सांगायचं. मला इतक्या दिवसांत कधीच जाणवलं नाही... की तुम्ही..”
“... पाहिलंस, मी किती उत्तम अभिनेत्री आहे. तू पहिल्यांदा घरी आलीस आणि असिफचं नाव घेतलंस तेव्हाच मला समजलं होतं. पण तुला काय सांगणार होते? मी असिफला आधीपासून ओळखते. त्याच्यावर प्रेम करत होते. आम्ही लग्न केलं होतं. तेव्हा मला सर्वात जास्त भिती होती की असिफ यांना काहीतरी म्हणेल. माही, मी तुझ्याइतकी किंवा असिफइतकी हुशार नाही. तू तर किती शिकलीस, असिफलाही संधी मिळाली असती तर... मला साधं बी ए पास करणं जमलं नाही... माझ्यात तेवढी अक्कलच नाही. तितकी चलाखीपण नाही. तेवढ्या लांबचा विचार मी नाही करू शकत. मी खोटं बोलले.. मी गोष्टी लपवून ठेवल्या. पण मी व्यभिचारी आहे का? मी असिफवर प्रेम करते. मला तो हवा आहे. पण माझं लग्न मोहितसोबत झालंय. त्याच्यासोबत मी कायम प्रामाणिक राहिले. माझं असिफवर प्रेम असतानासुद्धा... मोहितवर पण केलं ते प्रेमच होतं ना? त्यामध्ये काय खोटं आहे? आज मोहित मला म्हणतो की तू मला समजलीच नाहीस.. मी तरी मला स्वत:ला कुठं समजलेय? फक्त आता सगळे म्हणतात म्हणून मीपण म्हणते. हो, मी खरंच खोटारडी आहे. फार वाईट आहे. एका र्थानं झालं ते चांगलंच झाल. आता सगळ्यांना सगळं माहित आहे. कुणाशीच काही खोटं बोलायची गरज नाही. आता मोकळेपणानं श्वास घेऊन म्हणू शकते.. माझं असिफवर प्रेम आहे.. अगदी तुझ्यासमोरसुद्धा”
“खरंच इतकं प्रेम करता....”
“फक्त प्रेम करते. ते निभवण्याची हिंमत नाही... एकदाच हिंमत केली, असिफला लग्नासाठी तयार करून.. किती विनवलं, किती मिनत्या केल्या.. तीच हिंमत आयुष्यभर दाखवली असती... पण घाबरले. असिफला असं वाटतं की मी फक्त फिजिकल लेव्हलवर प्रेम केलं. असं वेगळं काढता येतं का.. फिजिकल लेव्हलवरचं प्रेम आणी इमोशनल लेव्हलवरचं प्रेम... असं वेगवेगळं असतं का?”
“मला आजवर कधी माहितच नाही. एखादी व्यक्ती “हवी असणं” म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे काय.. तेरा वर्षाची होते, प्रेम वगैरे विषय फक्त सिनेमामधले.... चन्नाम्माचा एक चुलत भाऊ घरी आला होता, त्या रात्री पहिल्यांदा तो घाणेरडा अनुभव घेतला. या सेक्सचा आणि प्रेमाचा काही संबंध असू शकतो हेच मला खूप वर्षांनी समजलं. चन्नाम्मानं मला बंगलोरला पाठवलं, तेव्हा हे रोजच चालू झालं. डोक्यामध्ये एक गोष्ट क्लीअर कट बसली होती, हेच जगणं असतं. याहून दुसरं काही असूच शकत नाही. यामध्ये आपण एंजॉय करण्यासारखं काही नसतं. आपण फक्त सहन करायचं. जेव्हा सहन होत नाही, तेव्हा नशा करायची, कसलीही... पण असंच जगायचं. माझी कहाणी तिथंच संपली असती जर असिफ भेटला नसता...”
“पण तुला असिफ भेटला ना...”
“हो, काहीतरी मागच्या जन्माची पुण्य़ाई म्हणून. त्याला त्याचं एक स्वप्न पूर्ण करायचं होतं. खूप शिकण्याचं. त्याच्यासाठी मी ते स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी त्यानं मला विकत घेतलं. अजून दुसरा कुठलाही मार्ग नाही..विकत घेणं. बाजारात जाऊन वस्तू घेतात तसं, मी त्याच्यासाठी एक वस्तू होते.”
“तू असिफबद्दल इतक्या कडवटपणे का बोलतेस?”
“कडवटपणे नाही. खरं तेच सांगतेय. मी असिफच्या प्रेमात पडले नाही. माझ्याकडे दुसरा कुठलाही रस्ताच नाही. त्याच्याशिवाय कुठं जाण्याचा. आज एवढं शिकल्यावर.. स्वत:च्या पायावर उभं राहिल्यावरसुद्धा. असिफकडे दुसरा रस्ता आहे. त्याला सोयिस्करपणे त्याच्या भूतकाळाविषयी, रेश्माविषयी बोलता येऊ शकतं. मला नाही. मी तो भूतकाळ कधीच घडला नाही, असं समजून जगायचं आहे. पण कसं विसरणार? तो काळ मी कसं विसरू शकेन... हे आजवर असिफ कधीच समजून घेत नाही. मग मी चिडते. छोट्याछोट्या गोष्टीमध्ये हट्ट करून मलादेखील काहीतरी स्वतंत्र अस्तित्व आहे हे दाखवायचा प्रयत्न करत राहते. पण सत्य आम्हा दोघांनाही माहित आहे... असिफशिवाय मला अस्तित्व नाही. असिफ मला हवा की नाही असा प्रश्नच माझ्यासमोर येऊ शकत नाही. आय ऍम सपोज्ड टू लव्ह हिम.”
“माही, असिफनं तुझ्यावर कधी जबरदस्ती वगैरे?”
“कधीच नाही. आजवर नाही. आम्ही एकत्र रहायला लागलो तेव्हा तर पहिले सहा महिने त्यानं मी घरात आहे की नाही याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. मी कंफर्टेबल व्हावं म्हणून.. पण तो कितीही चांगला वागला, कितीही परफेक्ट असलातरी तो माझा स्वत:हून निवडलेला ऑप्शन नाही हे खरं.. तुम्ही जसं त्याच्यावर... त्याच्या निव्वळ असण्यावर, त्याच्या कल्पनेवर प्रेम करू शकता तसं मी कधीच केलं नाही. कुणावरही. उद्या जर माझ्या आयुष्यात असिफ नसेल तर मी जगूच शकणार नाही. कारण, मला जगणंच माहित नाही. मी कालही असिफच्य सहाय्यानं जगणारं बांडगूळ होते, आजही आहे, उद्याही राहीन. मी काय बडबडतेय मलाही समजत नाही... पण जेव्हापासून मला हे तुमच्या दोघांबद्दल समजलंय तेव्हापासून माझं अख्खं नातंच डळमळलंय.. मला त्यानं सांगितलं नाही... कारण, त्याला ते सांगावंसं वाटलं नाही. इट वॉज नन ऑफ माय बिझनेस. जर हे प्रकरण इतकं क्षुल्लक होतं तर कुठल्या अधिकारानं त्यानं येऊन तुमच्यावर हात उगारला? काहीतरी हक्क होता म्हणूनच ना...मग जर हा हक्क मनात कुठंतरी होता... तर इतके दिवस कशाला नाटकं केली, जे होतं ते माझ्यासमोर कबूल करायचं होतं. चिडले असते, रडले असते... कदाचित त्याच्या जखमा भळभळलेल्या बघून परत त्याच्यावर इतकंच तुटून प्रेम करत राहिले असते. पण आज त्याचा जो राग येतोय.. तसा राग तर आला नसता. कुठल्याही नात्यामध्ये सर्वात वाईट काय असतं समोरच्याला गृहित धरलं जाणं. असिफनं हे माझ्याबाबतीत केलंय आणि तुमच्याबाबतीतसुद्धा”
“मला असिफनं जितकं गृहित धरलं तितकंच मी पण त्याला गृहित धरलं ना? हे लग्न वगैरे तो इतकं मनाला लावून घेईल असं कधी वाटलंच नव्हतं. त्याचा स्वभाव इतका चांगला माहित असूनही. पण मी खोटं बोलले नसते तर माझ्या आईबापांनी त्याचा आणि माझा दोघांचाही मुडदा पाडला असता... मी लग्नाला तयार झाले नसते तर बाबांनी असिफचं आयुष्य संपवलं असतं.. ही गोष्ट त्यानं आजवर लक्षात घेतलेली नाही. बाबांकडे त्यानं पैसे मागितले होते. मला सोडायची किंमत म्हणून.. त्याच रात्री असिफला संपवायचे बेत चालू होते. मला ते समजल्यावर मी अजून एक खोटं बोलले. आईला सांगितलं असिफचं मूल आहे. त्याला गावाबाहेर जाऊ द्या, मी मूल पाडायला तयार होइन. अन्यथा नाही... सुदैवानं तालुक्याला ऍबॉर्शनसाठी नेऊन हे खोटं आहे समजलं तोपर्यंत असिफ निघून गेला होता. त्या दिवसापासून स्वत:शी, सगळ्यांशी खोटंच बोलत राहिले. मोहितला खरं सांगण्यासाठी खूप धीर गोळा केला होता, पण कधीच जमलं नाही. मनामध्ये असिफवर प्रेम करत राहिले. पण एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून, एक आई म्हणून कसल्याही कर्तव्यामध्ये कसूर केली नाही...तरीही आज माझंच चुकलंय. आयुष्य संपवायचे विचार पण येतात पण मुलांपायी जीव अडकलाय. त्यांना माझ्याशिवाय कोण करणार?”
माहीनं पुढं येऊन रेश्माचे डोळे पुसले. “प्लीज असं कहीतरी बोलू नका. मला तुमची अवस्था चांगली समजतेय.. आणि तुमचं काहीही चुकलेलं नाही. चूक असलीच तर ती नशीबाची आहे. मलापण हेच घर घ्यावंसं वाटलं, आणि असिफच्या मनात नसताना त्यानं केवळ माझ्या हट्टाखातर....”
“नशीबाचे खेळ असतात... असो. किती चर्चा केली तरी हा विषय संपण्यासारखा नाही... पण एका अर्थानं जे झालं ते बरंच झालं. मी कदाचित माहेरी जाईन. या सर्वांची सुरूवात तिथून झाली होती.. आईवडलांच्या सामाजिक प्रतिष्ठेपायी, त्यांच्या इज्जतीपायी. अता मी माघारी गेल्यावर त्यांची ती इज्जत तशीही धुळीला मिळणार आहे. मुलांचाच प्रश्न आहे... तशी दोघं मोठी आहेत.. सांभाळतील स्वत:ला.. तू मात्र व्यवस्थित रहा. स्वत:ची काळजी घे.. असिफची काळजी घे. त्याच्यासारखा माणूस मिळणं फार भाग्याचं असतं”
“मीरावहिनी, तुम्ही घातलेली शपथ मोडा ना, एकदा मला असिफला सांगू देत.. मी याहीवेळेला हे बाळ पाडणार होते.. मागच्या दोन वेळेसारखं. घाबरले होते. कितीहीवेळा म्हणाला असला तरी प्रत्यक्षात असिफनं ही जबाबदारी घेतली नसती तर... तुम्ही मला थांबवलंत. किमान मी त्याला सांगावं म्हणून तुम्ही माझी समजूत घातलीत.. आज असिफ बाप होण्याच्या कल्पनेनंसुद्धा खुश आहे.. त्यामागे खरं कारण तुम्ही आहात.”
“त्यानं काय होइल? मी अचानक व्हिलनची हीरो होईन. शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार होइल? मी काही फार ग्रेट काम केलेलं नाही. माझ्या असिफचं मूल तू पाडणार ही कल्पनाच मला असह्य करून गेली. म्हणून मी तुला इतकं समजावलं वगैरे... मी फार स्वार्थी आहे गं.. उगाच कुठून तरी मला महान दाखवायचा प्रयत्न करू नकोस. खुश रहा. आनंदी रहा. इतकं टेन्शन घेऊ नकोस. आणि असिफ माझ्याशी जे काही वागलाय त्यासाठी त्याला माफ कर. माझ्या गुन्ह्यांकडे पाहता त्याची चूक फार छॊटी आहे...”
माहीचा मोबाईल वाजला. “असिफचा मेसेज. पाच मिनिटांत घरी पोचतोय. काही आणायचं का..” तिनं लगेच “काही नको” म्हणून उत्तर पाठवून दिलं.
लगेच गडबडीनं ती उठली.. “मी येते मीरावहिनी. उगाच..”
“उगाच इथं बघून चिडेल..” रेश्मानं उठून दरवाजा उघडला. “आज आलीस तेवढंच बरं वाटलं. किमान तुझ्या मनातला राग तरी गेला हे बघून...काळजी घे.”
“तुम्हीपण. एकदा मोहितदादांशी मोकळेपणानं बोला. सगळं ठिक होइल”
“नाही, इतके दिवस सर्व ठिक होतं, आता सगळं विस्कटलंय” रेश्मा हसून म्हणाली.
No comments:
Post a Comment