ही माझ्या ब्लॉगवरच १०१वी पोस्ट. तुम्ही सर्वांनी वारंवार दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि अभिप्रायांबद्दल मनापासून आभारी आहे. वाचत रहा आणि जे काय भलेबुरे वाटेल ते कळवत रहा... नंदिनी.
>>>>>>
रहे ना रहे हम (भाग २७)
मी
सध्या याबद्दल आईला (आणि मुख्य म्हणजे बाबाला) काहीच सांगायचं नाही असं ठरवलं
होतं. दोन गोष्टी, एक तर त्या दोघांना असं वाटत होतं की माझ्या या आजाराचं कारण
बाबाचं चुकीचं वागणं असावं, मला तो गैरसमज दूर करायचा नव्हता. घरापासून इतके वर्ष
दूर राहिल्यावर, हॉस्टेलमध्ये लफड्यांचे नानाविध प्रकार पाहिल्यावर (माझ्या
हॉस्टेलमधल्या एका मुलीची आई दोन दोन पुरूषांसोबत रहायची. त्यांच्यात काहीतरी अंडरस्टॅंडिंग होतं म्हणे. हेही एक
गजबच, अ सो!) मला माझ्या बापानं दुसरं कुठेतरी बाई ठेवली हे “तितकं” खटकत नव्हतं,
प्लीज नोट! अजिबात खटकत नव्हतं असं नाही तर जऽऽरा प्रमाण कमी झालं होतं इतकंच.
कदाचित माझ्या प्रकरणामध्ये त्यानं बोलू नये असं मला वाटत होतं, तसंच त्याच्याही
प्रकरणामध्ये मला बोलायचा अधिकार नव्हता असं मला हल्ली वाटत होतं. दुसरं
महत्त्वाचं म्हणजे, मी आफताबसोबत या संदर्भात काहीही बोलण्याआधी बाबाशी बोलले असते
तर आता माझी रूम ते आफताबची रूम यामध्ये मांडव पडला असता आणि आम्ही दोघंही काहीही
बोलू विचार करू शकण्याआत नवरा बायको झालो असतो. मला ते नको झालं होतं. मी आफतबची
गर्लफ्रेंड असताना त्याची बदफैली सहन करू शकले असते, पण नात्यावर एकदा का लग्नाची
मोहोर उठली आणि त्यानंतर जर तो चुकीचं वागला तर मी त्याला माफ केलं असतं का? माहित
नाही. आणि सध्या या क्षणाला माहित नाही अशा कुठल्याही प्रश्नाशी लढा देण्याची माझी
हिंमत नव्हती. इच्छा नव्हती.
घरी आल्यावर आईनं ताबडतोब
डॉक्टरांना फोन केला. शिरस्त्याप्रमाणे ते अर्ध्या तासांत घरी आले. वीकनेस,
स्ट्रेस, कसलंतरी इन्फेक्शन, पोल्युशन, खाण्यात गडबड, अतिव्यायाम, अति काम,
चष्म्याचा नंबर बदलला असेल अशा वाट्टेल ते
कारणांसकट त्यांनी खंडीभर औषधं लिहून दिली. त्यातली निम्मी तर मल्टिव्हिटॅमिन्स
होती. आईची बोलणी खाण्यापेक्षा गोळ्या गिळलेल्या परवडल्या.
तीन दिवसांपूर्वी माझं घर
सोडून गेलेला माणूस माझापासून अवघ्या काही फुटांवर होता. कॉलेजमध्ये त्यानं
सांगितलेला प्रसंग आठवला, त्याच्या खोलीमधून माझी बेडरूम सहज दिसते. मला तो दिसला
नाही तरी...सकाळपासून मी आलेली आहे हे त्याला माहित असणार, तो आलाय हेही मला माहित
आहे. आई तर अंगणातच म्हणाली, “तरीच फोन लागत नव्हता, हा पण इकडे गावीच आलाय.” आईनं
त्याला मघाशी हाकही मारली होती, तेव्हा “बाजारांत जाऊन येतो, मग घरी येईन” असं
सांगून गेटासमोरून गेला होता. त्याला माझ्याशी बोलायचं नव्हतं, हे मला मान्य आहे.
मलाही खरंतर मनापासून सांगायचं तर त्याच्याशी बोलायचं नव्हतं पण बोलणं गरजेचं
होतं. किमान माझ्यासाठी क्लोजर म्हणून तरी.
आईनं खास माझ्या आवडीचं
थालीपीठ लावलं, बाबाला बाजारातून नुस्त्या दुधाचे पेढे आणायला पाठवले माझे फेवरेट
म्हणून... बाबा बाहेर गेल्यावर आई माझ्या खोलीत आली.
“बाळा, काय झालंय ते मला
तरी सांगशील?” माझ्या डोक्यावर हात फिरवत तिनं विचारलं. खरंतर मला मुसमुसून रडू
आलं पण मी आवरलं.
“काही नाही गं, डॉक्टर
म्हणाले तसं, कामाचा स्ट्रेस आणि वेळीअवेळी खाणंपिणं”
“यतिन म्हणतोय नोकरीच
सोड. बरोबर आहे ना! इतकी दगदग आणि त्रास करून त्याचा फायदा काय... तुझी तब्बेत
महत्त्वाची. लहानपणापासून तुला इतकं जपलंय ते काय असे हाल करून घ्यायला.. जमत नसेल
तर सोडून दे.”
“आणि काय करू? घरी बसून
राहू...रिकामटेकडी?”
“रिकामटेकडी कशाला? इतकं
सारं आहे ते सांभाळ. एक विचारू का?”
“काय?”
“तुझ्यासाठी एक स्थळ
आलंय, तुझ्या काकीच्या चुलत भावाचा मुलगा आहे. त्यानं तुला साहिलच्या लग्नांत
पाहिलंय. स्वत:हून विचारलंय. तुला आज उद्या या संदर्भामध्ये फोन करणारच होते, फोटो
वगैरे बघ, काय ते ऑनलाईन गप्पा पण मारा. पसंत असलं तर तो इंडियामध्ये येईल. तुझी
आज्जी याच वर्षी गेली त्यामुळे लगेच फार थाटामाटात लग्न होणार नाही, पण तरी तुझी
इच्छा असेल तर...”
“आई, प्लीज आता हा विषय
नको... थोड्या दिवसांनी बोलू...” हा काकीच्या चुलत भावाचा मुलगा शिवम ऑलरेडी
माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये होता आणि विनाकारण सकाळ संध्याकाळ गूड मॉर्निंगचे मेसेजेस
टाकून मला पिडायचा, ते यासाठी वाटतं!!
दुपारी जेवून मी परत
झोपले. किती दिवसांची झोप उरली आहे असं वाटत होतं... खरंतर प्रेमभंग अथवा भांडणं
वादावादी गेल्यावर लोकांच्या रात्रीची झोप उडते, माझं उलटंच. रात्री तर झोपलेच,
दुपारीपण प्रचंड झोपले. नंतर झोप उडावी म्हणून अखेर पीसीवर गोविंदा धमाल डान्स
गाणी लावून बघत बसले.
संध्याकाळी आईबाबा आईच्या
एका मैत्रीणीच्या नातवाच्या पहिल्या वाढदिवसाला गेले, मला येतेस का विचारलं, नाही
म्हणून सांगितलं. ओळख ना पाळख, तिथे बसून मी उगाच बोर होणार! आईला मैत्रीण आहे,
तिला नातवंडं पण झालेली आहेत हे लक्षात येऊन मलाच जरा हसू आलं. माझं वय वर्षं
पंचवीस. केदारसोबत लग्न झालं असतं तर एव्हाना मलाही मुलं झालीच असती की! केदार
सोडून इतर कुणाहीबरोबर झालं असतं तरीही... मग आई पण आज्जी झालेली असती.. आईला
आज्जीच्या रोलमध्ये मी कधीही इमॅजिन करू शकले नसते. माझ्या आज्जीइतक्या खडूस
आज्जीच्या रोलमध्ये तर कदापिही नाही.
घरामध्ये एकटीच असताना
सहज म्हणून परत एकदा आफताबचा नंबर डायल केला. दुसर्याच रिंगला त्यानं चक्क फोन
उचलला.
“बोल”
“घरी आहेस?”
“हं”
“बोलू या का?”
“बोल म्हटलं ना”
“घरी येतोस?”
“नको. फोनवर बोल”
“आईबाबा नाहीयेत”
“फोनवर बोल”
“मला फोनवर बोलायचं
नाहीये. प्रत्यक्ष भेटू या. पाच मिनिटांसाठी ये”
“येणार नाही.”
“मग मी येऊ?”
“हं” फोन कट. म्हणजे
नक्की समजायचं काय? ये कि नको? मी माझ्या मनानंच अर्थ काढला. परत फोन करून वस्कून
कोण घेईल? पाचच मिनिटांत मी आवरून त्याच्या घरी गेले. आवरायचं काय, चेहरा धुतला,
घरात आईचा ढगळा गाऊन घातला होता, तो बदलून साधा कॉटनचा सलवार सूट घातला. केस उगाच
जरासे विंचरले, आणि माझ्या घराला कुलूप लावून त्याच्या दाराची बेल वाजवली.
दारामध्ये अझरची बाईक नव्हती. म्हणजे, घरात आफताब एकटाच असणार. जवळजवळ दोन
मिनिटांनी त्यानं दार उघडलं.
“किचनमधून आली नाहीस?”
पहिलाच प्रश्न वसकल्यासारखा. “गेटनं येताना कुणी पाहिलं असतं तर”
“तुझ्या घरी पहिल्यांदा
येत नाहीये..”
“माहित आहे. पटकन आत चल.”
इतक्या दिवसानंतरही,
खरंतर इतक्या वर्षानंतरही घरावर चाचींची छाप अजूनही होती. अझर एकटाच राहत असला तरी
घर कायम नीटनेटकं आवरलेलं. जिथली वस्तू तिथल्या तिथे ठेवायची, यांच्या घरात
सर्वांनाच सवय. किंबहुना, माझं आणि त्याचं यावरून कित्येकदा भांडण होणार. कित्येक
वर्षांत घर बदललंच नव्हतं. जुना खोक्याचा टीव्ही जाऊन फ्लॅट स्क्रीन आला, भलीमोठी
होम थीएटरची सिस्टीम आली, एसी लावला तरी घराचं रूपडं मात्र जैसे थे! आता मात्र मला
एक छोटासा बदल दिसला, सोफ्याच्या बाजूला एक भलामोठा खोका ठेवला होता आणि त्याच्या
बाजूला साड्यांचा एक ढीग. मी येण्याआधी आफताब बहुतेक साड्या घडी करत बसलेला असणार.
ढीगासमोर लॅपटॉप चालू ठेवलेला होता. त्यावरचा पिक्चर पॉझ केलेला होता. बहुतेक जोधा
अकबर असणार. (तासाभरापूर्वी आफ्ताबची “वॉचिंग जोधा अकबर अगेन! व्हॉट ऍन एपिक
लव्हस्टोरी” असं एफबी स्टेटस मी वाचलं होतं) टीव्हीवर कुठलीशी क्रिकेट मॅच चालू
होती. अझरच्या म्युझिक सिस्टमवर कसलंसं इंग्लिश ढाणढाण गाणं वाजत होतं, माझं आणि
या फिरंगी गाण्यांचं एरवीही कधी जमलं नाही त्यामुळे ते काही ओळखू आलं नाही. या
इतक्या गदारोळात हा प्राणी माझ्याकडे मात्र शिंगं
रोखलेल्या गेंड्यासारखा बघत होता. गेंड्याला शिंगं असतात की नाही ते मला
माहित नाही, त्यामुळे संदर्भ तपासून घ्यायला हवा. असो.
“हे काय?” मी साड्यांकडे
बघत विचारलं.
“काही नाही. लवकर बोल”
त्यानं हातातल्या रिमोटने म्युझिम सिस्टीम बंद केली.
“का? कुठे जायचंय तुला?”
“चहा घेणारेस?”
“नको. कॉफी करशील?”
“दूध नाहीये”
“मग चहामध्ये काय फिनाईल
घालणार होतास?” त्याच्या या तुटक अनोळखी वागणुकीचा तर राग यायला लागला होता. “
नीट बोल!” तो परत वसकला,
“चहाइतकंच दूध आहे म्हणून चहा विचारला हे तुला समजत नाही का? आम्ही रोज लिटरभर दुध
घेत नाही हेही तुला माहित नसेलच. जगामध्ये दुसर्या कुणाचा विचारच कधी करत नाही
ना?”
“मुळात तुला हे कळायला
हवं की मी इथे चहा किंवा कॉफी प्यायला आले नाही. तुम्ही रोज लिटरभर दूध घेत नसलात
तरी किमान जगामध्ये दुसर्याचा विचार करणार्या माणसा, तुला हे समजत नाही की,
नक्की काय घडतंय? त्यादिवशी भांडून बाहेर पडलास, नंतर तुला समोरासमोर भेटून बोलता
आलं नाही. कित्ती वेळा आईनं तिला कॉल केला. तापानं फणफणून आजारी आहे म्हणून मेसेज
केला. तू भेटलास मला? कॉल केलास? विचारलंस, की ब्वा स्वप्निल.. का?”
“मी का विचारू? तू मला
वाट्टेल तसं बोललीस...आठव..”
“तू आठव... माझ्याआधी तू
आठव. तू काय वागलास? आय विल नॉट से की मी जे बोलले ते योग्य होतं. दोज वेर हार्ष
वर्ड्स. शूड हॅव्ह नेव्हर युज्ड देम. बट व्हॉट अबाऊट यु? आफताब. तू रात्री अडीच वाजता
तुझ्या एक्ससोबत बोलत होतास. ती माझ्या घरात येऊन..”
“ओह, तुझं घर नाही का?”
“हो, माझंच घर. आफताब
त्या फ्लॅटची कागदोपत्री मालकी माझ्या बापाकडे आहे म्हणून ते घर माझं नाही. त्या
घराभोवती, त्या तीन खोल्यांमध्ये माझा जीव गुंतला म्हणून ते घर माझं. त्या घराच्या
प्रत्येक भिंतीवर माझ्या संसाराची, स्वप्नांची चित्रं आहेत म्हणून ते घर माझं. तू
माझ्यासोबत तिथं होतास म्हणून ते घर माझं... आणि त्या माझ्या घरामध्ये... तू मला
धोका दिलास,”
“आय ऍम टेलिंग यु दिस
अगेन ऍंड अगेन... मी तुला धोका दिला नाही. पण जर तुझं हेच मत असेल तर व्हेरी गूड.
मी यानंतर कधीही माझ्या वागण्याचं कसलंही जस्टिफीकेशन तुला देणार नाही..”
“मागणारही नाही. तूच
मेसेज केलास ना, इट्स ओव्हर म्हणून..”
“आय वॉज ड्रंक. बट
स्टिल...”
“दॅट्स नॉट एन एक्स्युज.
आणि जर खरंच तसं होतं, तर उतरल्यावर मला कॉल करायचा होतास... वी वूड हॅव डिस्कस्ड
इट लाईक ग्रोनप्स.”
“राहिलं... आय वॉज बिझी
समव्हेर एल्स”
“ओह, तुझ्यामाझ्यापेक्षा
या अशा कुठल्या कामामध्ये बिझी होतास? राईट!!! निधीच्या घरचं लग्न होतं ना, तिकडे
गेला होतास? या सर्व साड्या... लग्नासाठी द्यायच्या घ्यायच्या आहेत!!! म्हणून तू
घड्या घालत बसलास.”
“स्वप्निल, बरळू नकोस”
“मी बरळतेय? तू दारू पिऊन
मला ब्रेकपचा मेसेज टाकतोस. कावर्ड, फोन केला तर फोन घेत नाहीस? टूच्च्या गडीमाणूस
पाठवून सामान मागवतोस? तोही गावातला. गावभर माझी बदनामी करायची आयती संधी का
सोडशील? ही पोरगी माझ्यासोबत बिनालग्नाची राहत होती आणि माझं मन भरल्यावर मी सोडून
दिली अशी दवंडी पिटायची होती? समोरासमोर बोलायची हिंमत नाही.. आणि मला बरळू नको
म्हणून सांगतोस. आय वॉज हर्ट. तू मला सोडून गेलास. धोसरा काढला तुझ्या नावाचा, पण
तुला एक वेळ माझ्याकडे वळून पाहता आलं नाही.”
“तू तरी मला कॉल केलास?
मी कुठे आहे ते तुला माहित होतं. मला येऊन भेटलीस? सॉरी म्हणालीस? तुला माहित होतं
की माझा पाय दुखतोय. वारंवार अंधेरी पनवेल फिरू शकत नाही, सामान घ्यायला मी आलो
नाही बीकॉज ब्लडी हेल, तुझ्या घराच्या त्या पायर्या मला चढता आल्या नसत्या. यु नो
व्हॉट.. अजूनही गेले चार दिवस दुखतोच आहे.. आल्यापासून एकदातरी विचारलंस त्याबद्दल?
ही तुझी काळजी!”
“रात्री घर सोडून तू गेलास.
मला सोडून!! तुला किती काळजी आहे? प्रेयसी म्हणून नाही पण किमान माणूस म्हणून तरी
दया दाखवायची होतीस... गेल्या कित्येक वर्षांत पडले नाही तितकी आजारी चोवीस तासांत
पडले. रातोरात माझा बाप घरी घेऊन आला आणि तरीही तुला पर्वा कशाची तर मी तुला सॉरी
का बोलले नाही... तुझ्या पायाची चौकशी केली नाही. फोन दे मला.”
“मध्येच काय?”
“तुझा फोन दे... मला
मेसेजेस बघायचे आहेत”
“स्वप्निल, हे अति होतंय”
“होऊ देत. एकदाचं काय ते
अति होऊनच जाऊ देत. माझ्या नकळत तू जर तिला मेसेजेस करत असशील तर...”
“मी तिला मेसेज केलेला
नाहीये..” त्याचा आवाज चढला.
“मग फोन पाहू देत ना..”
माझा आवाज त्याहून दुप्पट चढला. “इतका जर सच्चा प्रामाणिक आहेस तर बघू देत ना.”
“दिस इज टू मच! स्वप्निल,
पुन्हा एकदा सांगतोय, झालं गेलं विसरून जर पुढे जायचं असेल तरच..”
“नाही, झालं गेलं काहीही
मला विसरायचं नाहीये. कधीच.”
“ठिक आहे, ऍज यु विश.
यापुढे मला आपल्यामध्ये काहीही संबंध् ठेवायचे नाहीत. जगण्यासाठी तुला तुझे मार्ग
मोकळे आहेत आणि मला माझे.”
“ते तर आधीपासूनच होते
मिस्टर आफताब. गुंतलेली तर मी होते ना, तू कधी गुंतलाच नाहीस माझ्यामध्ये..”
“हवं तर तसं समज. आणि मला
कुणाचीही उधारी नकोय. एक मिनिट” त्याने सोफ्याच्या समोर ठेवलेल्या टीपॉयवरची एक
फाईल उचलली. साधी प्लास्टिकची फाईल आणि आतमध्ये तीन चार प्रिंट आऊट्स होत्या. “हे
घे.”
“काय आहे?”
“शाळा शिकलीस ना? वाचून
बघ” म्हणत तो आत वळाला. जिन्यावरून धडाधड चढत त्याच्या खोलीत गेला. पाय दुखत
असताना हे कसब त्याला कसं काय जमलं हे एक आश्चर्यच. अर्थात त्याहून पुढचं आश्चर्य
माझ्या हातांत होतं. हे सर्व हिशोबाचे कागद होते. माझ्या फ्लॅटचं निम्मं भाडं,
किराण्याचा त्यानं केलेला खर्च, इतर सर्व सटरफटर काहीबाही खर्च् व्यवस्थित एक्सेल
शीटमध्ये लिहिलेले होते. काही पावत्यांचे स्कॅन्ड फोटो पण होते. त्यामध्ये त्यानं
केलेला सर्व खर्च आणि मी केलेला खर्च असे कॉलम्स होते. मला इतकी आकडेबाजी कळत असती
तर मीपण सीए नसते का झाले. केवळ वरवर नजर फिरवत गेले. त्या आकड्यांपेक्षाही मला त्यामागचा
कोरडेपणा जास्त जाणवत गेला. किती अलिप्तपणे त्यानं हे सर्व लिहिलं होतं. मी गेले
तीन चार दिवस पूढे काय होणार, कदाचित भांडण मिटेल, मे बी वी विल गेट मॅरीड, हे
सर्व निवळेल वगैरे काहीबाही विचार मनात आणत होते. पण चुकूनही... चुकूनही मनात हा
विचार आला नाही की, आफताबने सर्व आधीच तोडून मोडून टाकलंय. तो चक्क वेगळा झालाय
माझ्यापासून. अगदी अलगदपणे त्याला हे जमलंसुद्धा. पायांतला काटा ज्या नाजुकपणे
काढतात तसं त्यानं मला त्याच्या आयुष्यामधून बाहेर काढलंय. स्वत:ला जराही न
दुखवता.
“हे घे.” त्याच्या हातात
खाकी पाकीट होतं. “हिशोबानुसारच आहेत”
“हा तुझ्यामाझ्या एकत्र
राहण्याचा हिशोब?”
“तुला काहीही करून ऍडजस्ट
करायचं नाहीये..वेगळं व्हायचंय...”
“स्लो क्लॅप्स आफताब. मी
काय करणार हे तुला आधीच माहित होतं. इतका अंतर्बाहय ओळखतोस तू मला... की आधीच, मी
इथं येण्याअधीच तू हिशोब करून ठेवलास!! वेल डन. सी ए म्हणून खूप पुढे जाशील”
“स्वप्निल, मला तुझे
टोमणे नकोयत. प्लीज, आता गेलीस तरी चालेल.”
“अशी कशी जाऊ? हिशोब
पूर्ण करायला हवा ना... आणि या तुमच्या हिशोबामध्ये एक मेजर खर्च तुम्ही धरलेलाच
नाहीये”
“गिफ़्ट्स? ऑर
रेस्टॉरंटमध्ये खर्च झालेला पैसा. सी द लास्ट कॉलम, मिसलेनियस मध्ये आहेत सर्व...
प्रत्येक रूपयाचा खर्च नसेल...”
“मिस्टर आफताब, गेली
वर्षभर तुम्ही माझ्या चादरीत झोपताय. त्याचा हिशोब केलात? दिवसा रात्री, पहाटे,
संध्याकाळी, वीकडे वीकेंड कुठल्याही दिवशी, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने, तुमच्या
इच्छेनुसार, माझ्याही इच्छेनुसार, मी म्हणेल तेव्हा... त्या सर्वाचा हिशोब कुठाय?”
“स्वप्निल, दिस इज चीप”
“हे असले प्रेमाचे हिशोब
मांडणं चीप नाही? मग जगामधला सगळ्यांत जुना व्यवहार म्हणून ज्या ऍक्टीव्हीटीला
ओळखतात, त्याचे पैसे मी मागितले तर चीप?”
“स्वप्निल, माझ्या
पेशन्सचा अंत बघू नकोस. गो!”
“तू माझ्या पेशन्सचा अंत
ऑलरेडी पाहिलास, बास्टर्ड! दॅट्स व्हॉट यु आर! अ चीप बास्टर्ड. यो नो व्हॉट, यु
डिइज्र्व दिस. निधी तुझ्याबरोबर ज वागली ते अतिशय योग्य होतं, तुला तसंच ट्रीट
करायला हवं, कचर्यासारखं! ” हातातली फाईल मी त्याच्याच तोंडावर फेकायचा प्रयत्न
केला, अंतराचा अंदाज जरा चुकला आणि ती समोरच टीपॉयवर जाऊन पडली. त्याच्या हातातलं
पाकिट मीच खसकावून घेतलं आणि तेही तसंच जोरात फेकून दिलं. उगाचच टीपॉयला लाथेने
मारलं. तो दणकट सागवानी टीपॉय इंचभरही हालला नाही, पण माझा पाय नंतर तीन चार
तासांनी चांगलाच ठणकला. तशीच चालत दाराकडे आले, आधी सवयीने हॉलमधून किचनकडे जाणार
होते, पण आल्या आल्या केलेलं “लोकांनी बघितलं म्हणजे?” हे स्वागत आठवलं आणि मागे
फिरले. वाटेत डाव्या हाताला अझरची म्युझिक सिस्टीम होती. त्यावर जाऊन गाणं लावलं.
म्युझिक सिस्टमचा आवाज जोरात फ़ुल्ल व्हॉल्युम केला, जवळच ठेवलेला रिमोट धाडकन
उचलून खिडकीबाहेर फेकला आणि मी हॉलमधून पुढच्या दाराने बाहेर पडले. हे लिहायला
किंवा वाचायला जेवढा वेळ लागतो त्याहून निम्म्यावेळात हे सारं घडलं होतं.
मी ज्याक्षणी आफताबच्या
दाराबाहेर पडले तेव्हा त्याच्या घरामध्ये अलमोस्ट किंचाळल्यासारखी आशा गात होती,
“मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है”
खरंतर मला गुलझार आणि
त्याचे सिनेमा अजिबात आवडत नाहीत. प्रीटेन्शियस वाटतात, त्याच्या कथा मात्र सुंदर
असतात पण लिरीक्स एकदम हटके करण्याच्या नादांत काहीतरी जांगडगुत्ता! हे गाणं पण
त्यातलंच. धड काहीच नाही, तरीही आता तेच गाणं लावलं कारण “वही कहानी की मांग थी”
>>>>>>>>>>>>
रात्री आई बाबा आले
तेव्हा नऊ वाजून गेले होते. मी माझ्याच मनाने पिठलं आणि भात केला होता. आईला
त्याचं जाम कौतुक वाटलं, मनात आलं, मुंबईत तर मी रोजच माझ्या हातचं रांधून खात
होते. रात्री साडेनऊला आम्ही जेवायची पानं घेतच होतो तेव्हा वेदा आली.
वेदाचं लग्न डिग्रीनंतर
लगेचच झालं. गावामधलाच चांगला डॉक्टर नवरा मिळाला होता, त्या वाढदिवसाच्या इथे
आईनं मी घरी असल्याचं सांगितलं म्हणून मुद्दाम मला भेटायला इतक्या रात्री का होईना
ती आली.
“अगं, उद्यापरवा, परत
गेलीस तर.. म्हणून लगेच आले. बोल, काय म्हणतेस?”
मी हातात धरलेल्या
ताटामधलं गरम गरम पिठलं गार होण्याची वाट बघताना जितपत बोलणं शक्य होतं तितकं
बोलले. वेदाला मात्र भरभरून बोलायचं होतं. तशी तिनं बोलायला माझी काही हरकत
नव्हती, पण प्रॉब्लेम हा होता की तिला तिच्याबद्दल कमी आणी तिच्या नवर्याबद्ल
जास्त बोलायचं होतं. मला त्यात काही रस नव्हता. तीन चार वर्षांनी भेटलेली
मैत्रीणीकडे स्वत:विषयी बोलायला काहीच विषय असू नये!! म्हटलं जेव आता इथंच तर नको
“ते” वाट बघतील. मी फक्त तुला पाचेक मिनिटं भेटायला म्हणून आले असं म्हणत चक्क
तासभर बसली. जेवली नाहीच, पण आईनं तिच्यासाठी डब्यात पिठलं घालून दिलं. मी केलंय
हे समजल्यावर तिला मज्जाच वाटली.
ती इतक्या अप्रूपाने मला
भेटायला आली याचंच मला फार ओझं झालं. मी एरवी तिला कधी फोन मेसेज पण करत नव्हते. पण
आता नक्की केलं की सर्व मैत्रीणींना आठवड्यांतून एकदा तरी कॉल करायचा, भले
त्यांच्याकडे नवर्याबद्दलच बोलण्यासारखं असेल तरी किमान ऐकायचं... कारण, जर आज
वेदा आली नसती तर मी नक्की किती एकटी पडले आहे हेच मला समजलं नसतं!! त्याच्याशी
बोलल्यानंतर कंप्लीट सैरभैर झाले होते, पण ती आल्यामुळे जरा परत माणसांत आले.
निघताना मी वेदाला घट्ट
मिठी मारली. “आय मिस अवर ग्रूप!” मी तिला सांगितलं तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी
आलं होतं. तशी मी फार रडत नाही, पण वेदानं मात्र हे अचानक येऊन मला रडवलंच.
जेवण झाल्यावर मी जरा
गच्चीवर फेरी मारते असं आईला सांगितलं, आणि गच्चीत आल्यावर दार व्यवस्थित कडी
लावून घेतली. मला सिगरेट ओढायची होती. मी काय पक्की स्मोकर नाही, पण ज्याज्यावेळी
माझ्यासमोर अश्या द्विधा परिस्थितीच्या घटना घडतात तेव्हा निकोटीन काम्स मी! पूर्ण
अंधारात एकटीच कितीतरी वेळ उभी होते. गच्चीमधला लाईट लावलाही नाही.
बॅंडेज काढताना किती
दुखतंय माहित आहे? पण काढून झाल्यावर काय! काहीच नाही. एक्झाक्टली तेच माझ्या या
रिलेशनशिपचं झालं होतं. तोडताना त्याला नक्की काय वाटलं माहित नाही, पण मला एकच
क्षण... निव्वळ एकच क्षण वेदनेची ती तीव्र धार जाणवली. त्यानंतर नाही. मी त्याच्या
उंबरठ्यामधून बाहेर पडून माझ्या घरी पोचले तेव्हा, माझंच मला समजलं होतं. पिक्चर
खतम हो गयी! आता क्रेडीट्स रोल करायला हरकत नाही.
वाईट वाटलं,
तेवढ्यापुरतंच. डू आय स्टिल लव्ह हिम? ऑफकोर्स आय डू! आयुष्याच्या शेवटच्या
क्षणापर्यंत आफताब माझ्यासाठी स्पेशल राहील. तो माझा बॉयफ्रेंड होता म्हणून नव्हे,
माझा मित्र होता म्हणून.
माझं त्याच्यावर खूप
प्रेम आहे. हे भान्गडीवालं फिल्मी प्रेम बसण्याहीआधीपासून तो कायमच माझा बेस्ट
फ्रेंड राहिलाय.. पण त्याच्यासोबत मी
आयुष्य काढू शकणार नाही. आई जशी बाबाच्या चुका समजत असूनही त्याच्यासोबत राहिली
तसं मी नाही करू शकत. प्रश्न असा आहे की, जर आम्हाला एकत्र रहायचं असेल तर
त्त्यानं चूक करताच कामा नये. पण ते त्याला शक्य नाही... कितीही त्यानं आटापिटा केला
तरीही तो तिला विसरू शकणार नाही. मी ज्याप्रमाणे केदार चाप्टर कंप्लीटली क्लोज
केला, त्याप्रमाणे तो तिचा चाप्टर कधीही क्लोज करणार नाही. एक वेळ फिजिकल लेव्हलवर
ते जमेलही. पण मनाचं काय... ती मनात कायम राहणार. ही गोष्ट मला माहित असूनही मी
ऎक्सेप्ट करावी अशी त्याची कदाचित अपेक्षा आहे. आय डोन्ट नो, त्याला काय वाटतं ते
माहित नाही... पण मी अशी मनानं अर्धीमुर्धी कुणाचीच होऊ शकत नाही. मला व्हायचंच
नाहीये. लग्न, संसार, मुलं बाळं, करीअर पैसा या सर्वांहून जास्त मला मानसिक रीतीने
सुद्धा केलेली फसवणूक चालणार नाहीये. सो
आय ऍम नॉट रेडी फॉर इट! मला सगळं काही स्वत:साठी हवं असतं, मी कधीच काहीच
कुणाहीसोबत शेअर करून जगू शकत नाही.
मी सिंगल चाईल्ड.
लहानपणापासून मी “एकटीच” आहे हे माझ्या आईवडलांना माहित होतं. एकट्या मुलांच्या
भावनिक आणि सामाजिक गरजा इतर मुलांप्रमाणे
डेव्हलप होत नाहीत असं आईनं कुठंतरी वाचलं होतं. तसं माझ्याबाबतीत होऊ नये म्हणून
ती मला साहिल सागर वगैरेंकडे सुट्टीला पाठवायची, पण एक तर ते वयानं मोठे होते आणि
वर्षभर काहीच संपर्क साधत नसल्याने महिनाभर काय डोंबल खेळणार? मी लगेच भोकाडं
पसरून पसरून गावी परत यायचे. आईपासून दूर अजिबात जायचे नाही. आईच माझी सखीसोबती
मैत्रीण सर्व काही. घरी असताना माझ्या एकटेपणावर टीव्ही हाच परफेक्ट उपाय होता. मी
दिवसभर टीव्ही बघायचे, अगदी कार्टून्स, पिक्चर, सीरीयल जे काय लागेल ते... शाळेतून
आलं की टीव्ही, शाळेची वेळ होईपर्यंत टीव्ही. माझा हा एकटेपणा खर्या अर्थाने गेला
तो शेजारी रहायला आल्यावर. सर्वात आधी अरिफ, मग आफताब आणि मग अझरशी झालेल्या ओळखी.
त्यांच्यासोबत जरा खेळायला- इतरांच्यात वावरायला शिकले. अरिफ आज असता तर.... मी
पैजेवर सांगते, मी आणि अरिफ कधीच कपल झालो असतो. सुखी राहिलो असतो. दोघंही एकाकी
होतोच, पण दोघांनाही त्या एकाकीपणाची मिजास होती. आफताबसारखं त्या एकाकीपणावर
कसलाही मुलामा देऊन जगणं पसंद पडलंच नसतं. तोही एकटाच होता, एका अतिशय वेगळ्या
अर्थाने. पण हा एकटेपणा त्याला अपमानास्पद वाटायचा, त्याचा नकळत केलेला
उल्लेखसुद्धा त्याला खटकायचा. दोन माणसांनी एकत्र जगण्यासाठी इतकी दोन टोकं असून
चालत नाही... मीपण एकटीच होते, पण मला माझ्या एकटेपणाबद्दल कधी दया किंवा कणव
वाटली नाही. आय वॉज व्हेरी कंटेंट अबाऊट
इट.
यापुढे हाच एकाकीपणा मला
मिरवत जगायचं होतं. इतरांसाठी नाही तर, स्वत:साठी.
सिगरेट संपली तेव्हा
हातातल्या मोबाईलचं स्क्रीन अनलॉक करून पहिला फोन मी रॉयला लावला. जवळजवळ दोनेक
तास आम्ही बोलत राहिलो.
हा निर्णय खरंतर सुप्तावस्थेमध्ये
कधीच झाला होता, आता केवळ अंमलबजावणी करायची होती. जणू काही, हाच निर्णय भविष्यांत
घ्यावा लागेल याची माझी मलाच खात्री होती.
(क्रमश: )